वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • bhs अध्या. १ पृ. ८-१८
  • देवाबद्दलचं सत्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाबद्दलचं सत्य
  • बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • बायबल काय शिकवते यात वाचा
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवाला खरंच आपली काळजी आहे का?
  • लोकांना दुःख सहन करावं लागतं तेव्हा देवाला कसं वाटतं?
  • तुम्ही देवासोबत मैत्री करावी, अशी त्याची इच्छा आहे
  • तुम्ही यहोवाचे मित्र बनाल का?
  • खरा देव कोण आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • देव आणि येशू ख्रिस्त यांच्याबद्दल अचूक माहिती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
  • देव कोण आहे?
    देवाकडून आनंदाची बातमी!
  • देव कोण आहे?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
bhs अध्या. १ पृ. ८-१८

अध्याय एक

देवाबद्दलचं सत्य

१, २. लोकांच्या मनात सहसा कोणते प्रश्‍न येतात?

मुलं खूप प्रश्‍न विचारतात. तुम्ही त्यांना उत्तर दिल्यानंतरही त्यांचं समाधान होत नाही. ती लगेच विचारतात, ‘असं का?’ त्यानंतर तुम्ही कितीही उत्तरं देण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा पुढचा प्रश्‍न हजरच असतो.

२ फक्‍त मुलंच नाही तर मोठेसुद्धा प्रश्‍न विचारतात. आपण काय खाणार किंवा कोणते कपडे घालणार याबद्दल आपल्याला सहसा प्रश्‍न पडतो. तसंच, जीवनातल्या महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल आणि भविष्याबद्दलही आपल्या मनात प्रश्‍न येतात आणि जेव्हा या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत, तेव्हा आपण ती उत्तरं शोधणं सोडून देतो.

३. आपल्या मनात येणाऱ्‍या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरं मिळू शकत नाहीत, असं बऱ्‍याच लोकांना का वाटतं?

३ आपल्या मनात येणाऱ्‍या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरं, बायबलमध्ये आहेत का? काही म्हणतात, ‘आहेत’ पण बायबल समजायला खूप कठीण आहे, असं त्यांना वाटतं. असेही काही आहेत, ज्यांना ‘आम्हाला उत्तर माहीत नाही’ हे सांगण्याची लाज वाटते. तर इतर काही म्हणतात, की महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरं फक्‍त शिक्षक किंवा धार्मिक पुढारीच देऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं?

४, ५. आपल्या मनात कोणते महत्त्वपूर्ण प्रश्‍न येऊ शकतात? आणि तुम्ही या प्रश्‍नांची उत्तरं का शोधत राहिली पाहिजेत?

४ ‘माझ्या जीवनाचा काय उद्देश आहे? मेल्यावर आपण कुठे जातो? देवाचं व्यक्‍तिमत्त्व कसं आहे?’ यांसारखे प्रश्‍न तुमच्याही मनात कधी ना कधी आले असतील. यांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हे येशूने सांगितलं. तो एक महान शिक्षक होता. त्याने म्हटलं: “मागत राहा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल; शोधत राहा म्हणजे तुम्हाला सापडेल; आणि ठोठावत राहा म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल.” (मत्तय ७:७) या वचनानुसार जोपर्यंत आपल्या मनाचं समाधान होत नाही, तोपर्यंत आपण या प्रश्‍नांची उत्तरं शोधत राहिली पाहिजे.

५ तुम्ही ही उत्तरं “शोधत” राहिलात, तर ती तुम्हाला नक्की सापडतील. कारण बायबलमध्ये ती उत्तरं आहेत. (नीतिसूत्रे २:१-५) तुम्हाला वाटतं तशी ती समजायला कठीण नाहीत. समाधानकारक उत्तरं मिळाल्यानंतर तुमचं जीवन आज तर आनंदी होईलच, पण त्यासोबतच भविष्यासाठीही तुम्हाला एक चांगली आशा मिळेल. आता आपण एका अशा प्रश्‍नावर चर्चा करू या ज्यामुळे लोकांच्या मनात गोंधळ माजला आहे.

देवाला खरंच आपली काळजी आहे का?

६. देवाला आपली काळजी नाही, असं बहुतेक लोकांना का वाटतं?

६ देवाला आपली मुळीच काळजी नाही, असं पुष्कळ लोकांना वाटतं. त्याला काळजी असती तर जगातली परिस्थिती चांगली असती. जगात युद्धं, द्वेष आणि दुःख नसतं. लोक आजारी पडले नसते; त्यांना कुठलाही त्रास सहन करावा लागला नसता, त्यांचा मृत्यूही झाला नसता. त्याला खरंच आपली काळजी असती, तर त्याने आपल्यावर दुःखं येऊच दिली नसती.

७. (क) धार्मिक पुढाऱ्‍यांच्या कोणत्या शिकवणींमुळे देव क्रूर आहे असं लोकांना वाटतं? (ख) पण वाईट गोष्टींसाठी देव जबाबदार नाही, हे आपण खातरीने का म्हणू शकतो?

७ धार्मिक पुढाऱ्‍यांच्या काही शिकवणींमुळे, देव क्रूर आहे, असं लोकांना वाटतं. कुठलीही दुःखद घटना घडते तेव्हा ते म्हणतात: ‘असं घडावं ही देवाचीच इच्छा होती,’ किंवा ‘तुमच्या नशिबात देवाने जे लिहिलंय तेच झालं.’ अशी शिकवण देऊन खरंतर ते देवावर दोष लावत असतात. पण जगात चाललेल्या किंवा लोकांच्या बाबतीत घडत असलेल्या वाईट गोष्टींसाठी देव जबाबदार नाही. तो “निःसंशय काही वाईट करत नाही,” असं ईयोब ३४:१२ मध्ये म्हटलं आहे. वाईट गोष्टी घडत आहेत याची पूर्ण जाणीव त्याला आहे, पण त्यासाठी तो जबाबदार नाही. वाईट गोष्टी घडवून तो आपली परीक्षा घेत नाही. (याकोब १:१३ वाचा.) हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू या.

८, ९. आपल्यावर येणाऱ्‍या समस्यांसाठी देवाला जबाबदार ठरवणं चुकीचं का आहे? उदाहरण देऊन सांगा.

८ आपण एका तरुण मुलाचं उदाहरण पाहू या. तो आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. त्याच्या वडिलांचं त्याच्यावर खूप प्रेम होतं आणि त्यांनी त्याला नेहमी योग्य निर्णय घेण्यास मदत केली. पण एक दिवशी अचानक हा तरुण वडिलांविरुद्ध बंड करतो आणि घर सोडून निघून जातो. तो वाईट कामं करून संकटात अडकतो. मग, मुलाचं असं वाईट झाल्याबद्दल तुम्ही त्याच्या वडिलांना दोष द्याल का? वडिलांनी त्याला अडवलं असतं तर तो वाईट मार्गाला लागलाच नसता, असं तुम्ही म्हणाल का? मुळीच नाही. (लूक १५:११-१३) तसंच, पहिल्या मानवांनी जेव्हा देवाविरुद्ध बंड करून वाईट मार्ग निवडला तेव्हा देवाने त्यांना अडवलं नाही. त्यामुळे वाईट गोष्टी घडतात तेव्हा आपण हे आठवणीत ठेवलं पाहिजे की देवाने त्या घडवून आणलेल्या नाहीत. वाईट गोष्टींसाठी देवाला जबाबदार ठरवणं चुकीचं आहे.

९ पण मग, देव वाईट गोष्टी घडण्यापासून का थांबवत नाही? या प्रश्‍नाचं उत्तर बायबलमध्ये दिलेलं आहे. ते तुम्हाला या पुस्तकाच्या ११ व्या अध्यायात मिळेल. पण सध्या तुम्ही ही खातरी बाळगू शकता, की देवाचं तुमच्यावर प्रेम आहे आणि आपल्यावर येणाऱ्‍या संकटांसाठी तो मुळीच जबाबदार नाही. याउलट वाईट परिस्थिती सुधारण्याची ताकद फक्‍त त्याच्याजवळच आहे.—यशया ३३:२.

१०. वाईट लोकांनी केलेलं नुकसान देव लवकरच भरून काढणार आहे, हे आपण खातरीने का म्हणू शकतो?

१० देव पवित्र आहे. (यशया ६:३) तो जे काही करतो ते पवित्र, शुद्ध व चांगलं असतं. म्हणून आपण त्याच्यावर भरवसा ठेवू शकतो. पण मानव तसे नसतात. त्यांच्या हातून चुका होतात आणि त्यातून एखादा मानवी नेता प्रामाणिक असलाच तरी, वाईट लोकांनी केलेलं नुकसान भरून काढण्याची ताकद त्याच्यात नसते. ती फक्‍त देवाकडेच आहे. ही वाईट परिस्थिती तो सुधारू शकतो आणि तसं तो लवकरच करणार आहे. तो सर्व वाईट गोष्टी कायमच्या काढून टाकणार आहे.—स्तोत्र ३७:९-११ वाचा.

लोकांना दुःख सहन करावं लागतं तेव्हा देवाला कसं वाटतं?

११. तुम्हाला सहन करावं लागत असलेलं दुःख पाहून देवाला कसं वाटतं?

११ जगातली परिस्थिती व तुम्हाला सहन करावं लागत असलेलं दुःख पाहून देवाला कसं वाटतं? बायबल आपल्याला शिकवतं की, देवाला “न्याय प्रिय आहे.” (स्तोत्र ३७:२८) याचा अर्थ, जगात जे काही घडतं मग ते चांगलं असो किंवा वाईट, त्याची देवाला काळजी असते. लोकांना दुःखात पाहणं त्याला बिलकूल आवडत नाही. नोहाच्या काळात वाईट गोष्टी घडत होत्या तेव्हा त्याच्या “चित्ताला खेद झाला,” म्हणजे तो फार दुःखी झाला, असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (उत्पत्ति ६:५, ६) देवाच्या भावना आजही तशाच आहेत. (मलाखी ३:६) त्याला तुमची खरोखर काळजी आहे, असं बायबलमध्ये सांगितलं आहे.—१ पेत्र ५:७ वाचा.

देवाची सृष्टी: पर्वत, तलाव, मासे, पक्षी आणि झाडं

यहोवा देव विश्‍वाचा प्रेमळ निर्माणकर्ता आहे, असं बायबलमध्ये सांगितलं आहे

१२, १३. (क) आपल्याला इतरांबद्दल प्रेम आणि काळजी का वाटते? जगातलं दुःख व अन्याय पाहून तुम्हाला कसं वाटतं? (ख) सर्व दुःख आणि अन्याय देव काढून टाकेल, असं आपण खातरीने का म्हणू शकतो?

१२ बायबलमध्ये असंही सांगण्यात आलं आहे, की देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपात निर्माण केलं आहे. (उत्पत्ति १:२६) याचा अर्थ, देवामध्ये जे गुण आहेत तसेच गुण आपल्यातसुद्धा आहेत. म्हणून निरपराध लोकांना दुःख सहन करताना पाहून तुम्हाला जितकं वाईट वाटतं, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वाईट देवाला वाटतं. आपण हे कशावरून म्हणू शकतो?

१३ “देव प्रेम आहे,” असं बायबलमध्ये सांगितलं आहे. (१ योहान ४:८) तो जे काही करतो ते प्रेमापोटी करतो. आणि आपल्याला देवाच्या प्रतिरूपात बनवलं असल्यामुळे आपणही लोकांवर प्रेम करतो. विचार करा: तुमच्याकडे शक्‍ती असती तर तुम्ही जगातलं दुःख आणि अन्याय काढून टाकला नसता का? नक्कीच काढला असता! कारण तुमचं लोकांवर प्रेम आहे. देवाच्या बाबतीत काय? देवाकडे असीम शक्‍ती आहे आणि त्याचं आपल्यावर प्रेमही असल्यामुळे तो दुःख आणि अन्याय काढून टाकणार आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीला देवाने दिलेली अभिवचनं तुम्ही वाचली असतील. ते प्रत्येक अभिवचन तो नक्की पूर्ण करणार आहे! पण तुम्ही जर देवाबद्दल आणखी शिकून घेतलं, तरच तुमचा या अभिवचनांवर विश्‍वास बसेल.

तुम्ही देवासोबत मैत्री करावी, अशी त्याची इच्छा आहे

दोन स्त्रिया एकमेकींशी ओळख करून घेत आहेत

एखाद्यासोबत मैत्री करायची असेल तर तुम्ही आधी तुमचं नाव त्या व्यक्‍तीला सांगता. देवानेही त्याचं नाव बायबलमध्ये सांगितलं आहे

१४. देवाचं नाव काय आहे आणि आपण त्याचा वापर केला पाहिजे, हे कशावरून कळतं?

१४ तुम्हाला जर कोणाबरोबर मैत्री करायची असेल तर तुम्ही सहसा काय करता? तुम्ही आधी तुमचं नाव त्या व्यक्‍तीला सांगता. देवानेही तेच केलं आहे. पण देवाला वैयक्‍तिक नाव आहे का? अनेक धर्मांत अशी शिकवण दिली जाते, की देवाला विशिष्ट नाव नाही. त्याला “देव” किंवा “प्रभू” म्हटलं तरी चालतं. पण “देव” किंवा “प्रभू” ही त्याची नावं नाहीत तर “राजा” किंवा “राष्ट्रपती” यांप्रमाणे पदव्या आहेत. देवाने स्वतःहून आपल्याला त्याचं नाव सांगितलं आहे. ते नाव आहे ‘यहोवा.’ पंडिता रमाबाई भाषांतरात, स्तोत्र ८३:१८ या वचनात आपल्याला ते वाचायला मिळतं. त्यात असं म्हटलं आहे: “ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांनी जाणावे.” आणि मराठीतल्या आणखी एका भाषांतरात म्हणजे ‘द होली बायबल आर.व्ही.’ यात ‘याव्हे’ हे हिब्रू भाषेत असलेलं देवाचं नाव वापरलं आहे. (निर्गम १५:३) बायबलच्या लेखकांनी हजारो वेळा देवाच्या नावाचा उल्लेख केला. आपल्याला हे नाव माहीत व्हावं आणि आपण त्याचा वापर करावा, अशी यहोवाची इच्छा आहे. त्याच्याबरोबर मैत्री वाढवता यावी म्हणून तो तुम्हाला त्याचं नाव सांगतो.

१५. ‘यहोवा’ या नावाचा अर्थ काय होतो?

१५ ‘यहोवा’ या नावाचा अर्थ असा होतो, की त्याने दिलेलं अभिवचन तो पूर्ण करू शकतो आणि आपला उद्देश तो साध्य करू शकतो. असं करण्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे ‘यहोवा’ हे नाव दुसरं कोणीच धारण करू शकत नाही.a

१६, १७. देवाला दिलेल्या पुढील पदव्यांचा काय अर्थ होतो: (क) “सर्वसमर्थ” (ख) “सनातन राजा” आणि (ग) “निर्माणकर्ता”?

१६ आधीच्या परिच्छेदात आपण स्तोत्र ८३:१८ वचन वाचलं होतं. त्यात यहोवाविषयी असं म्हटलं आहे की, “तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस.” तसंच, उत्पत्ति ३५:११ मध्ये त्याला “सर्वसमर्थ देव” म्हटलं आहे. “सर्वसमर्थ” ही त्याची पदवी आहे. संपूर्ण विश्‍वात त्याच्याइतका शक्‍तिशाली दुसरा कोणीच नाही, असा त्याचा अर्थ होतो. आणि यिर्मया १०:१० मध्ये म्हटलं आहे, की यहोवा “सनातन राजा” आहे. “सनातन” म्हणजे त्याला सुरुवात नाही आणि अंतही नाही; तो नेहमीच अस्तित्वात आहे. स्तोत्र ९०:२ मध्ये म्हटलं आहे: “अनादिकालापासून अनंतकालापर्यंत तू देव आहेस.” हे खरोखरंच आश्‍चर्यकारक नाही का?

१७ यहोवाच आपला निर्माणकर्ता आहे. प्रकटीकरण ४:११ मध्ये म्हटलं आहे: “यहोवा आमच्या देवा, गौरव, सन्मान आणि सामर्थ्य मिळण्यास तूच योग्य आहेस; कारण तू सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि तुझ्याच इच्छेने त्या अस्तित्वात आल्या आणि निर्माण करण्यात आल्या.” म्हणजेच, स्वर्गातल्या देवदूतांपासून ते आकाशातल्या ताऱ्‍यांपर्यंत आणि पृथ्वीवर झाडांच्या फळांपासून ते समुद्रातल्या माशांपर्यंत सर्व काही यहोवानेच बनवलं आहे. या सृष्टीत तुम्हाला जे काही दिसतं ते सर्व त्यानेच बनवलं आहे.

तुम्ही यहोवाचे मित्र बनाल का?

१८. देवाचे मित्र बनणं कधीच शक्य नाही, असं काही लोकांना का वाटतं? याविषयी बायबलमध्ये काय म्हटलं आहे?

१८ यहोवाच्या अद्‌भुत गुणांबद्दल जाणून घेतल्यावर बऱ्‍याच लोकांना असं वाटतं, की ‘देव इतका शक्‍तिशाली आहे, तो इतक्या दूर स्वर्गात आहे, तर मग तो माझ्यासारख्या व्यक्‍तीसोबत मैत्री का करेल?’ पण असा विचार करणं योग्य नाही. तो सर्वश्रेष्ठ असला तरी तुम्ही त्याच्यासोबत मैत्री करावी, अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही त्याच्यासोबत जवळचं नातं जोडावं, असं त्याला वाटतं. “तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही,” असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (प्रेषितांची कार्ये १७:२७) तुम्ही त्याच्या जवळ गेलात तर तोही “तुमच्या जवळ येईल,” असं वचन तो आपल्याला देतो.—याकोब ४:८.

१९. (क) यहोवाबरोबर मैत्री करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? (ख) यहोवाचा कोणता गुण तुम्हाला सर्वात जास्त आवडतो?

१९ यहोवाबरोबर मैत्री करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? येशूने म्हटलं: “सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी हे आवश्‍यक आहे, की त्यांनी एकाच खऱ्‍या देवाला, म्हणजे तुला आणि ज्याला तू पाठवलं त्या येशू ख्रिस्ताला ओळखावं.” (योहान १७:३) तुम्ही यहोवा आणि येशू या दोघांबद्दल शिकत राहिलात, तर तुम्ही त्या दोघांना आणखी जवळून ओळखू शकाल आणि यामुळे तुम्हाला सर्वकाळाचं जीवन मिळेल. आपण याआधी शिकलो, की “देव प्रेम आहे.” (१ योहान ४:१६) पण त्याचे इतरही अनेक सुरेख गुण आहेत. तो “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा [“एकनिष्ठ प्रेमाचा,” NW] व सत्याचा सागर” आहे. (निर्गम ३४:६) तो “उत्तम व क्षमाशील” आहे. (स्तोत्र ८६:५) तो आपलं धीराने सहन करतो आणि विश्‍वसनीय आहे. (२ पेत्र ३:९; १ करिंथकर १:९) तुम्ही जसजसं बायबलचं वाचन करत राहाल तसतसं तुम्हाला त्याच्या सुरेख गुणांबद्दल आणखी शिकता येईल.

२०, २१. तुम्ही देवाला पाहू शकत नसला, तरी त्याच्याशी मैत्री कशी करू शकता?

२० पण आपण तर यहोवाला पाहू शकत नाही, मग त्याच्याबरोबर मैत्री कशी करू शकतो? (योहान १:१८; ४:२४; १ तीमथ्य १:१७) बायबलमध्ये तुम्ही यहोवाबद्दल वाचाल तेव्हा तो एक खरी व्यक्‍ती आहे हे तुम्हाला समजेल. (स्तोत्र ३१:१९; रोमकर १:२०) यहोवाविषयी तुम्ही जितकं शिकत राहाल तितकं तुमचं त्याच्यावरचं प्रेम वाढत राहील आणि तितकाच तो तुम्हाला जवळचा वाटेल.

एक वडील आपल्या मुलाला खांद्यांवर बसवून त्याच्यासोबत सृष्टी बघत आहे

वडिलांचं आपल्या मुलांवर प्रेम असतं, पण आपल्या स्वर्गीय पित्याचं आपल्यावर त्याहीपेक्षा जास्त प्रेम आहे

२१ तुमच्या बायबल वाचनाद्वारे तुम्हाला कळेल, की यहोवा आपला पिता आहे. (मत्तय ६:९) त्यानेच आपल्याला जीवन दिलं असल्यामुळे या जीवनाचा आपण शक्य तितका चांगला उपयोग करावा, अशी त्याची इच्छा आहे. एक प्रेमळ पिता आपल्या मुलांकडून अशीच तर अपेक्षा करतो! (स्तोत्र ३६:९) बायबलमध्ये अशी शिकवण देण्यात आली आहे, की तुम्ही यहोवाचे मित्र बनू शकता. (याकोब २:२३) कल्पना करा, या विश्‍वाचा निर्माणकर्ता यहोवा, तुमचा मित्र बनू इच्छितो!

२२. लोकांनी तुम्हाला बायबलचा हा अभ्यास थांबवायला सांगितला तर तुम्ही काय कराल?

२२ काही लोक तुम्हाला हा अभ्यास थांबवायला सांगतील. तुम्ही तुमचा धर्म बदलाल असं कदाचित त्यांना वाटत असेल. पण यहोवाशी तुमच्या मैत्रीच्या आड कोणालाही येऊ देऊ नका. तुम्हाला त्याच्यासारखा चांगला मित्र कधीच मिळणार नाही.

२३, २४. (क) आपण लहान मुलांसारखं का असलं पाहिजे? (ख) पुढच्या अध्यायात आपण काय पाहणार आहोत?

२३ बायबलचा अभ्यास करताना तुम्हाला कदाचित काही गोष्टी समजणार नाहीत. अशा वेळी, त्याबद्दलचं स्पष्टीकरण विचारायला लाजू नका. येशूने म्हटलं, की आपण लहान मुलांसारखं असलं पाहिजे. (मत्तय १८:२-४) मुलं नेहमी प्रश्‍न विचारतात आणि तुम्हालाही महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं मिळावीत, अशी देवाची इच्छा आहे. म्हणून तुम्ही जे शिकत आहात तेच सत्य आहे याची खातरी करून घेण्यासाठी बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास करा.—प्रेषितांची कार्ये १७:११ वाचा.

२४ यहोवाबद्दल शिकून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बायबलचा अभ्यास करणं. आणि पुढच्या अध्यायात आपण, बायबल हे इतर कुठल्याही पुस्तकापेक्षा वेगळं का आहे हे पाहणार आहोत.

a तुमच्या बायबलमध्ये ‘यहोवा’ हे नाव नसेल किंवा त्याच्या नावाचा अर्थ काय होतो, त्याचा उच्चार कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी अंत्यटीप १ पाहा.

सारांश

सत्य १: देवाबद्दलचं सत्य

“तू सर्व काही निर्माण केले.”—प्रकटीकरण ४:११

बायबलमध्ये देवाबद्दल काय शिकवण्यात आलं आहे?

  • प्रकटीकरण १५:३

    तो सर्वसमर्थ आणि संपूर्ण विश्‍वातला सर्वात शक्‍तिशाली व्यक्‍ती आहे.

  • स्तोत्र ९०:२

    त्याला सुरुवात नाही आणि अंतही नाही.

  • मत्तय ६:९

    तो आपला पिता आहे.

    आपल्याला सर्वोत्तम जीवन मिळावं, अशी त्याची इच्छा आहे.

  • प्रेषितांची कार्ये १७:२७

    आपण त्याच्याशी जवळचं नातं जोडावं, असं त्याला वाटतं.

सत्य २: देवाला नाव आहे

“यहोवा . . . हे सर्वकाळ माझे नाम आहे.”—निर्गम ३:१५, पं.र.भा.

त्याच्या नावाचा वापर करणं महत्त्वाचं का आहे?

  • स्तोत्र ८३:१८ (पं.र.भा.)

    देव आपल्याला सांगतो, की त्याचं नाव ‘यहोवा’ आहे. “देव” किंवा “प्रभू” ही त्याची नावं नाहीत तर “राजा” किंवा “राष्ट्रपती” यांप्रमाणे पदव्या आहेत. आपण ‘यहोवा’ या त्याच्या नावाचा वापर करावा, अशी त्याची इच्छा आहे.

  • निर्गम ३:१४

    त्याच्या नावाचा अर्थ, “तो व्हायला लावतो” असा होतो. यहोवानेच सर्वकाही बनवलं असल्यामुळे त्याने दिलेलं कोणतंही अभिवचन तो पूर्ण करू शकतो आणि त्याचा उद्देश साध्य करू शकतो.

सत्य ३: यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे

“देव प्रेम आहे.”—१ योहान ४:८

देव आपल्यावर प्रेम करतो याचा काय अर्थ होतो?

  • निर्गम ३४:६; स्तोत्र ३७:२८

    तो दयाळू व कनवाळू आहे. त्याला सत्य व न्याय प्रिय आहेत.

  • स्तोत्र ८६:५

    तो क्षमाशील आहे.

  • २ पेत्र ३:९

    तो आपलं धीराने सहन करतो.

  • १ करिंथकर १:९

    तो विश्‍वसनीय आहे.

सत्य ४: त्याला आपली काळजी आहे

“आपल्या सर्व चिंता त्याच्यावर टाकून द्या, कारण त्याला तुमची काळजी आहे.”—१ पेत्र ५:७

देवाला तुमची काळजी आहे, हे तुम्ही खातरीने का म्हणू शकता?

  • स्तोत्र ३७:९-११

    सर्व दुःखांचा अंत करण्याचं आणि वाईट लोकांनी केलेलं नुकसान भरून काढण्याचं त्याने वचन दिलं आहे.

  • याकोब ४:८

    तुम्ही यहोवाच्या जवळ यावं, अशी त्याची इच्छा आहे.

  • योहान १७:३

    तुम्ही जितकं देवाबद्दल शिकत राहाल, तितकं त्याच्याबद्दल तुमचं प्रेम वाढत राहील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा