भाग १
आनंदी विवाहासाठी देवाचे मार्गदर्शन स्वीकारा
“उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नरनारी अशी ती निर्माण केली.”—मत्तय १९:४
मानव इतिहासातील सगळ्यात पहिले लग्न यहोवाa देवाने लावले. बायबल म्हणते, की त्याने पहिली स्त्री बनवली आणि तिला पहिल्या पुरुषाकडे अर्थात “आदामाकडे नेले.” तिला पाहून आदामाला इतका आनंद झाला की त्याने म्हटले: “आता ही मात्र माझ्या हाडांतले हाड व मांसातले मांस आहे.” (उत्पत्ति २:२२, २३) आजही वैवाहिक जोडप्यांनी आनंदी राहावे अशी यहोवाची इच्छा आहे.
तुमचे लग्न होते तेव्हा सगळे काही सुरळीत चालेल असे कदाचित तुम्हाला वाटेल. पण खरे पाहता, एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या पती-पत्नीलादेखील कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. (१ करिंथकर ७:२८) या माहितीपत्रकात तुम्हाला बायबलची तत्त्वे आढळतील; त्यांचा अवलंब केल्यास तुमचे वैवाहिक व कौटुंबिक जीवन आनंदी होऊ शकते.—स्तोत्र १९:८-११.
१ यहोवाने दिलेली भूमिका स्वीकारा
बायबल काय म्हणते: पती कुटुंबाचे मस्तक आहे.—इफिसकर ५:२३.
पती या नात्याने तुम्ही तुमच्या पत्नीची कोमलतेने काळजी घ्यावी अशी अपेक्षा यहोवा तुमच्याकडून करतो. (१ पेत्र ३:७) त्याने पत्नीला तुमच्यासाठी एक अनुरूप साहाय्यक म्हणून बनवले. तेव्हा, तिच्याशी आदराने आणि प्रेमाने वागावे अशी अपेक्षा तो तुमच्याकडून करतो. (उत्पत्ति २:१८) तुमचे तुमच्या पत्नीवर जिवापाड प्रेम असेल, तर स्वतःचा विचार करण्याआधी तुम्ही प्रथम तिचा विचार कराल.—इफिसकर ५:२५-२९.
पत्नी या नात्याने तुम्ही तुमच्या पतीचा मनापासून आदर करावा व त्याची भूमिका पार पाडण्यास त्याला मदत करावी अशी अपेक्षा यहोवा तुमच्याकडून करतो. (१ करिंथकर ११:३; इफिसकर ५:३३) पती काही निर्णय घेतो तेव्हा त्याच्या पाठीशी उभे राहा आणि कुरकूर न करता त्याला पूर्ण सहकार्य करा. (कलस्सैकर ३:१८) असे केल्यास तुम्ही तुमच्या पतीच्या आणि यहोवाच्या नजरेत मौल्यवान व्हाल.—१ पेत्र ३:१-६.
तुम्ही काय करू शकता:
आणखी चांगला विवाहसोबती बनण्यासाठी मला कोठे सुधारणा करण्याची गरज आहे हे एकमेकांना विचारा. सोबती जे काही सांगेल ते लक्ष देऊन ऐका आणि सुधारणा करण्यासाठी होता होईल ते करा
एकमेकांना आनंदी कसे ठेवता येईल हे शिकण्यासाठी दोघांनाही वेळ लागेल. तेव्हा, धीर धरा
२ सोबत्याच्या भावनांची मनापासून कदर करा
बायबल काय म्हणते: तुम्ही नेहमी तुमच्या विवाहसोबत्याचे हित पाहिले पाहिजे. (फिलिप्पैकर २:३, ४) यहोवा आपल्या सेवकांकडून अशी अपेक्षा करतो की त्यांनी ‘सर्वांबरोबर सौम्यतेने’ वागावे. हे लक्षात घेऊन, आपल्या विवाहसोबत्याशी सौम्यपणे वागा. (२ तीमथ्य २:२४) बायबल म्हणते: “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.” तेव्हा, आपल्या शब्दांची विचारपूर्वक निवड करा. (नीतिसूत्रे १२:१८) एकमेकांशी प्रेमळपणे बोलण्यास यहोवाचा पवित्र आत्मा तुम्हाला मदत करू शकतो.—गलतीकर ५:२२, २३; कलस्सैकर ४:६.
तुम्ही काय करू शकता:
विवाहसोबत्याशी गंभीर विषयांवर चर्चा करण्याआधी, मन शांत ठेवण्यासाठी व सोबत्याचेही विचार ऐकून घेण्यासाठी देवाला प्रार्थना करा
तुम्ही काय बोलणार व कसे बोलणार याचा काळजीपूर्वक विचार करा
३ दोघे मिळून विचार करा
बायबल काय म्हणते: तुमचा विवाह होतो तेव्हा तुम्ही दोघे “एकदेह” होता. (मत्तय १९:५) पण असे असले, तरी तुम्ही दोघे वेगवेगळ्या व्यक्ती आहात व तुमची मतेही वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे एकमेकांच्या विचारांशी व भावनांशी जुळवून घेण्यास तुम्हाला शिकावे लागेल. (फिलिप्पैकर २:२) कोणतेही निर्णय घेताना एकमत असणे खूप गरजेचे असते. बायबल म्हणते: “प्रत्येक बेत मसलतीने सिद्धीस जातो.” (नीतिसूत्रे २०:१८) तेव्हा, महत्त्वाचे निर्णय एकत्र मिळून घेताना बायबलची तत्त्वे विचारात घ्या.—नीतिसूत्रे ८:३२, ३३.
तुम्ही काय करू शकता:
आपल्या सोबत्याला केवळ माहितीच देऊ नका किंवा त्याच्याकडे फक्त आपली मतेच व्यक्त करू नका, तर भावनाही व्यक्त करा
एखाद्याला शब्द देण्याआधी आपल्या सोबत्याशी बोला
a बायबलमध्ये देवाचे नाव यहोवा असे दिले आहे.