धडा ७
तुला कधी एकटं-एकटं किंवा भीती वाटली आहे का?
चित्रात दाखवलेला हा मुलगा बघ. कसा एकटाच बसलाय. तो घाबरलेलासुद्धा दिसतोय, नाही का? तुला कधी असं त्याच्यासारखं वाटलं का?— आपल्या सर्वांनाच कधी न् कधी तरी असं वाटतं. बायबलमध्येपण यहोवाच्या फ्रेंड्सबद्दल सांगितलं आहे ज्यांना एकटं-एकटं व भीती वाटली होती. एका फ्रेंडचं नाव होतं एलीया. आपण त्याच्याबद्दल वाचून बघू या.
ईजबेलीला एलीयाला मारून टाकायचं होतं
खूपखूप वर्षांपूर्वी म्हणजे येशूचापण जन्म व्हायच्याआधी एलीया इस्राएल देशात राहात होता. तेव्हा अहाब हा इस्राएलचा राजा होता. पण तो खरा देव यहोवा याची भक्ती करत नव्हता. अहाब आणि त्याची बायको ईजबेल खोटा देव बआल याची भक्ती करायचे. म्हणून इस्राएल देशातले सर्व लोक बआलची भक्ती करू लागले. राणी ईजबेल खूप वाईट होती. यहोवाची भक्ती करणाऱ्या सर्व लोकांना तिला मारून टाकायचं होतं. तिला एलीयालासुद्धा मारायचं होतं. मग एलीयानं काय केलं?—
एलीया तिकडून पळून गेला. तो एका वाळवंटात गेला आणि तिथं एका गुहेत लपून बसला. का बरं केलं त्यानं असं?— बरोबर, तो घाबरला होता! पण खरंतर एलीयाला घाबरायची काहीही गरज नव्हती. का बरं? कारण यहोवा त्याला मदत करेल हे त्याला माहीत होतं. आधीपण एकदा यहोवानं त्याला त्याची शक्ती दाखवली होती. आकाशातून आग पाठवून यहोवानं एलीयाच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं होतं. मग आत्ताही यहोवा एलीयाला मदत करू शकला असता!
यहोवानं एलीयाला मदत कशी केली?
एलीया गुहेत असताना यहोवा त्याच्याशी बोलला आणि त्याला विचारलं: ‘तू इथं काय करतोयस?’ एलीया म्हणाला: ‘इस्राएल देशात फक्त मी एकटाच तुझी भक्ती करतोय. मला मारून टाकलं जाईल, अशी मला भीती वाटतेय.’ एलीयाला वाटत होतं, की यहोवाची भक्ती करणाऱ्या इतर सर्व लोकांना मारून टाकलं आहे. पण यहोवानं एलीयाला सांगितलं: ‘नाही-नाही हे खरं नाहीय. अजून ७,००० लोक आहेत जे माझी भक्ती करतात. चल असं घाबरू नकोस. मला तुला खूप काम द्यायचंय.’ हे ऐकून एलीयाला आनंद झाला का?—
एलीयाकडून आपण कोणता धडा शिकतो?— हाच की, आपण कधीच असं समजू नये, की आपण एकटं आहोत. शिवाय आपण घाबरण्याचीसुद्धा गरज नाही. कारण यहोवावर आणि आपल्यावर प्रेम करणारे आपले कितीतरी फ्रेंड्स आहेत. आणि यहोवाजवळ खूप ताकद आहे. तो नेहमीच आपली मदत करू शकतो. मग आता आपण असा विचार केला पाहिजे का, की आपण एकटं आहोत?—