धडा ५
जे बरोबर होतं ते शमुवेल करत राहिला
लोक यहोवाची उपासना करायला निवासमंडपात यायचे. इथंच शमुवेल लहानपणापासून सेवा करत होता. खरंतर तो तिथंच राहायचा. पण शमुवेल इथं राहायला कसा आला माहीतंय? त्याआधी आपण त्याची आई हन्ना हिच्याबद्दल माहीत करून घेऊ या.
हन्नाला बाळ हवं होतं. पण तिला खूप वर्षांपर्यंत बाळ होतच नव्हतं. म्हणून तिनं यहोवाला रडून-रडून प्रार्थना केली. तिनं त्याला प्रॉमिस केलं, की जर तिला मुलगा झाला तर ती त्याला निवासमंडपात राहायला व तिथंच सेवा करायला पाठवून देईल. आणि यहोवानं तिची प्रार्थना ऐकली. तिला एक मुलगा झाला. त्याचं नाव तिनं शमुवेल ठेवलं. आणि हन्नानं प्रॉमिस केल्याप्रमाणंच शमुवेल तीन ते चार वर्षांचा असताना त्याला निवासमंडपात देवाची सेवा करायला आणून सोडलं.
त्या वेळी एली तिथं महायाजक म्हणून सेवा करायचा. त्याचे दोन मोठे मुलगेसुद्धा तिथं सेवा करत होते. आपण मागच्या धड्यात शिकलो ना, की निवासमंडप म्हणजे देवाची उपासना करण्याचं ठिकाण. तर तिथं राहणाऱ्या लोकांना व्यवस्थित राहावं लागायचं. पण एलीचे मुलगे खूप वाईट गोष्टी करत होते. शमुवेल हे सर्व बघत होता. मग तोही त्यांच्यासारखा वाईट वागू लागला का?— नाही. उलट त्याच्या आईबाबांनी त्याला जसं शिकवलं होतं तसंच तो चांगलं वागत होता.
एलीचे मुलगे वाईट वागत होते तर एलीनं त्यांना काय करायला हवं होतं?— त्यांना शिक्षा द्यायला हवी होती आणि देवाच्या या घरात त्यांना काम करू द्यायचं नव्हतं. पण एलीनं तसं केलं नाही. म्हणून यहोवाला एलीचा आणि त्याच्या दोन्ही मुलांचा खूप राग आला. त्यानं त्यांना शिक्षा द्यायचं ठरवलं.
शमुवेलानं एलीला यहोवाचा संदेश सांगितला
एकदा रात्री शमुवेल झोपला होता तेव्हा कुणीतरी, ‘शमुवेल!’ अशी हाक मारत असल्याचं त्यानं ऐकलं. त्याला वाटलं एली त्याला बोलवतोय म्हणून तो त्याच्याकडं पळत गेला पण एली त्याला म्हणाला: ‘मी नाही तुला हाक मारली.’ असं दोनदा झालं. तिसऱ्या वेळेला एली शमुवेलाला म्हणाला, की तुला पुन्हा अशी हाक ऐकू आली तर असं म्हण: ‘बोल यहोवा, मी ऐकत आहे.’ चौथ्यांदा जेव्हा शमुवेलाला हाक ऐकू आली तेव्हा तो एलीनं सांगितल्यानुसार बोलला. तेव्हा यहोवा शमुवेलाला म्हणाला: ‘एलीला सांग, की त्याचे मुलगे वाईट वागत असल्यामुळे मी त्यांना शिक्षा देणार आहे.’ आता शमुवेलाला, हा संदेश एलीला सांगणं सोपं होतं का? तुला काय वाटतं?— बरोबर, सोपं नव्हतं. शमुवेलाला खूप भीती वाटत होती. तरीपण यहोवानं त्याला जे काही सांगितलं ते त्यानं केलं आणि यहोवाचं बोलणं खरं ठरलं. एलीच्या दोन्ही मुलांना ठार मारण्यात आलं व एलीसुद्धा मरण पावला.
पण शमुवेलाचं आपल्यासाठी चांगलं उदाहरण आहे. त्याच्या आजूबाजूला लोक वाईट कामं करत होते तरीपण तो जे बरोबर आहे तेच करत राहिला. तूपण असंच करतोस का? तूपण शमुवेलासारखा जे बरोबर आहे ते करत राहशील का? असं जर तू केलंस ना, तर यहोवा आणि आम्हीसुद्धा खूश होऊ.