धडा १
तुला एक रहस्य सांगू का?
तुझ्या फ्रेंडनं कधी तुझ्या कानात काहीतरी येऊन सांगितलंय का जे दुसऱ्याला सांगितलं नाही?—a माहीतंय त्याला काय म्हणतात? त्याला सिक्रेट किंवा रहस्य म्हणतात. कारण ते दुसऱ्या कुणालाच माहीत नसतं; फक्त तुलाच माहीत असतं. बायबलमध्ये एका खास रहस्याबद्दल सांगितलंय. ते रहस्य पवित्र आहे. कारण ते पवित्र देव यहोवाकडून आहे. आणि हे रहस्य फक्त यहोवा देवाला माहीत होतं. देवदूतांनासुद्धा माहीत नव्हतं. त्यांना ते माहीत करून घ्यायचं होतं. तरीपण यहोवानं त्यांना तेव्हा सांगितलं नाही. तुला सांगू का ते रहस्य किंवा सिक्रेट?—
देवदूतांना कोणतं रहस्य माहीत करून घ्यायचं होतं?
खूपखूप वर्षांपूर्वी देवानं पहिल्या पुरुषाला व स्त्रीला बनवलं. पुरुषाचं नाव आदाम आणि स्त्रीचं नाव हव्वा होतं. देवानं त्यांना एदेन नावाची एक सुंदरशी बाग राहायला दिली. आदामानं व हव्वेनं देवाचं ऐकलं असतं तर त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी हळूहळू या संपूर्ण पृथ्वीला एदेन बागेसारखं सुंदर बनवलं असतं. आणि हे सर्व लोक त्या नंदनवनात कायम राहिले असते. पण तुला आठवतं का, आदामानं व हव्वेनं काय केलं?—
त्यांनी देवाचं ऐकलं नाही. म्हणून आज आपण कुणीच नंदनवनात राहत नाही. पण यहोवानं सांगितलं, की तो संपूर्ण पृथ्वीला नंदनवन बनवेल. आणि मग आपण सगळे तिथं कायम जगू व नेहमीसाठी आनंदी राहू. हे यहोवा कसं करणार आहे? तो हे कसं करणार आहे, हे खूप दिवस लोकांना माहीतच नव्हतं, म्हणून ते रहस्यच राहिलं.
मग येशू या पृथ्वीवर आला तेव्हा त्यानं लोकांना हे रहस्य सांगितलं. ते आहे देवाचं राज्य. हे राज्य पृथ्वीवर यावं म्हणून त्यानं लोकांना प्रार्थना करायला शिकवली. कारण हेच राज्य या पृथ्वीला सुंदर नंदनवन बनवणार आहे.
छान आहे ना हे रहस्य?— पण जे यहोवाचं ऐकतात फक्त तेच लोक या नंदनवनात राहणार आहेत. बायबलमध्ये पुष्कळ लोकांबद्दल सांगितलं आहे ज्यांनी यहोवाचं ऐकलं. तुला शिकायचंय का या लोकांबद्दल?— त्या लोकांची नावं काय होती आणि आपण त्यांच्यासारखं कसं बनू शकतो ते आता आपण बघू या.
आपण वाचू या
a या सर्व कथांमध्ये तुम्हाला काही प्रश्नांनंतर एक छोटीशी रेघ दिसेल. तेव्हा तुम्ही तेथे थांबून तुमच्या मुलाला काय वाटते ते विचारू शकता.