वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ia अध्या. १६ पृ. १५६-१६६
  • ती सुज्ञ, धैर्यवान आणि निःस्वार्थी होती

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ती सुज्ञ, धैर्यवान आणि निःस्वार्थी होती
  • त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तिनं “बोलण्याचा समय” सुज्ञपणे निवडला
  • धीर धरल्यामुळं सत्य समोर आलं
  • ती धैर्यानं बोलली
  • यहोवासाठी आणि त्याच्या लोकांसाठी तिनं निःस्वार्थीपणे कार्य केलं
  • देवाच्या लोकांसाठी तिनं जिवाची पर्वा केली नाही
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • एस्तेर पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • मर्दखय आणि एस्तेर
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • “मला मरावं लागलं तरी चालेल”
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
अधिक माहिती पाहा
त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
ia अध्या. १६ पृ. १५६-१६६
एस्तेर राणी

अध्याय सोळा

ती सुज्ञ, धैर्यवान आणि निःस्वार्थी होती

१-३. (क) आपल्या पतीच्या सिंहासनाजवळ जाताना एस्तेरला कसं वाटलं? (ख) एस्तेर भेटायला आली तेव्हा राजाची काय प्रतिक्रिया होती?

एस्तेर जशी एकेक पाऊल टाकत सिंहासनाजवळ जाऊ लागली, तसं तिचं हृदय आणखीनच धडधडू लागलं. शूशनच्या पर्शियन राजवाड्यातील दरबारात आता संपूर्ण शांतता पसरली होती. इतकी शांतता, की एस्तेरला तिच्या स्वतःच्या पावलांचा आणि तिच्या रेशमी राजवस्त्रांच्या सळसळण्याचा आवाजही ऐकू येत होता. राजा अहश्‍वेरोशचा तो दरबार अतिशय शानदार होता. उंचच उंच शोभिवंत स्तंभ आणि सुंदर नक्षीकाम केलेलं छत कुणाचंही लक्ष लगेच वेधून घ्यायचं. या छतासाठी लागलेलं गंधसरूचं लाकूड दूरवरच्या लबानोनवरून आणण्यात आलं होतं. पण, एस्तेरचं यांपैकी कशाकडेही लक्ष नव्हतं. तिचं सगळं लक्ष, सिंहासनावर बसलेल्या राजावर खिळलेलं होतं. कारण, आता तिचं जीवन याच मनुष्याच्या हातात होतं.

२ राजासुद्धा जवळ येणाऱ्‍या एस्तेरकडे एकटक पाहत होता. त्यानं आपल्या हातातला सुवर्णदंड पुढं केला होता. तशी तर ही एक साधीशीच कृती होती. पण, यामुळं एस्तेरला जीवदान मिळालं! बोलावलेलं नसताना राजापुढं येण्याचा जो अपराध तिनं केला होता, त्याबद्दल राजानं तिला माफ केल्याचं ते चिन्ह होतं. सिंहासनाजवळ येऊन एस्तेरनं आपली कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी सुवर्णदंडाच्या टोकाला स्पर्श केला.—एस्ते. ५:१, २.

एस्तेर राणी सिंहासनाजवळ येत आहे आणि राजा अहश्‍वेरोशनं आपल्या हातातला सुवर्णदंड पुढं केला आहे

राजानं दाखवलेल्या दयेबद्दल एस्तेरनं नम्रपणे कृतज्ञता व्यक्‍त केली

३ राजा अहश्‍वेरोश अतिशय रुबाबदार होता. त्याच्याकडे पाहताच त्याचं सामर्थ्य आणि ऐश्‍वर्य कोणाच्याही लक्षात आलं असतं. त्या काळच्या पर्शियन सम्राटांच्या शाही वस्त्रांची किंमत आज अब्जावधी रुपयांच्या घरात जाईल. पण, अहश्‍वेरोश कितीही सामर्थ्यवान असला, तरी आपली पत्नी एस्तेर हिच्याकडे पाहताना त्याच्या डोळ्यांत आपुलकी होती. त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेम होतं, हे नक्की. तो म्हणाला: “एस्तेर राणी, तुला काय पाहिजे? तुझी काय मागणी आहे? अर्ध्या राज्याएवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल.”—एस्ते. ५:३.

४. एस्तेरच्या मार्गात पुढं कोणती आव्हानं होती?

४ या घटकेपर्यंत एस्तेरनं खरोखरच खूप धैर्य आणि विश्‍वास दाखवला होता. आपल्या लोकांचा सर्वनाश करण्याच्या कारस्थानापासून त्यांना वाचवण्यासाठी ती राजासमोर आली होती. आणि आतापर्यंत तिला तिच्या प्रयत्नांत यशदेखील आलं होतं, पण पुढं अजून बरीच आव्हानं होती. राजाचा सर्वात भरवशाचा सल्लागार एक दुष्ट माणूस होता, आणि त्यानं राजाची फसवणूक करून एस्तेरच्या लोकांचा संहार करण्याच्या आदेशाला त्याची संमती मिळवली होती. एस्तेरला ही गोष्ट त्या गर्विष्ठ राजाला पटवून द्यावी लागणार होती. मग तिनं हे कसं केलं, आणि तिच्या विश्‍वासावरून आपण काय शिकू शकतो?

तिनं “बोलण्याचा समय” सुज्ञपणे निवडला

५, ६. (क) उपदेशक ३:१, ७ यात दिलेल्या तत्त्वाचं एस्तेरनं कशा प्रकारे पालन केलं? (ख) एस्तेरनं आपल्या पतीशी बोलताना कशा प्रकारे सुज्ञता दाखवली?

५ एस्तेरनं दरबारातल्या त्या भरल्या सभेपुढं राजाला संपूर्ण समस्या समजावून सांगायला हवी होती का? असं केल्यामुळं एकतर राजाचा सर्वांसमोर अपमान होण्याची शक्यता होती. शिवाय, हामानाला एस्तेरचे आरोप खोटे आहेत असं सिद्ध करण्यासाठी वेळ मिळाला असता. मग, एस्तेरनं काय केलं? कित्येक शतकांआधी सुज्ञ राजा शलमोन यानं देवाच्या प्रेरणेनं असं लिहिलं होतं: “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; . . . मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.” (उप. ३:१, ७) एस्तेर लहानाची मोठी होत असताना, बापाप्रमाणे तिचं संगोपन करणाऱ्‍या मर्दखयनं नक्कीच तिला अशा तत्त्वांचं पालन करण्याचं महत्त्व शिकवलं असेल. “बोलण्याचा समय” विचारपूर्वक निवडण्याचं महत्त्व तिनं शिकून घेतलं होतं, यात शंका नाही.

६ एस्तेर म्हणाली: “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपणासाठी जे भोजन तयार केले आहे त्यास आपण हामानाला घेऊन यावे.” (एस्ते. ५:४) राजानं तिचं हे निमंत्रण स्वीकारलं आणि हामानाला बोलावून आणण्याची आज्ञा दिली. एस्तेर ज्या प्रकारे बोलली त्यावरून तुम्हाला तिचा सुज्ञपणा दिसून आला का? एकीकडे तिनं आपल्या पतीचा आदरही टिकवून ठेवला आणि दुसरीकडे आपल्या चिंतांबद्दल त्याला मोकळेपणानं सांगता येईल अशी संधीही निर्माण केली.—नीतिसूत्रे १०:१९ वाचा.

७, ८. एस्तेरनं दिलेली पहिली मेजवानी कशी होती, आणि राजाशी बोलण्याचं तिनं लांबणीवर का टाकलं?

७ एस्तेरनं नक्कीच त्या मेजवानीचं खूप काळजीपूर्वक आयोजन केलं असेल. प्रत्येक लहानसहान गोष्टीची व्यवस्था करताना तिनं आपल्या पतीची पसंत-नापसंत लक्षात घेतली होती. राजाचं मन प्रसन्‍न व्हावं म्हणून मेजवानीत उत्तम प्रतीचा द्राक्षारसही होता. (स्तो. १०४:१५) अहश्‍वेरोश राजानं मेजवानीचा मनसोक्‍त आनंद घेतला आणि मग त्यानं एस्तेरला तिची मागणी काय आहे, असं पुन्हा एकदा विचारलं. आता तरी बोलण्याची योग्य वेळ आली होती का?

८ एस्तेरच्या मते अजूनही योग्य वेळ आलेली नव्हती. त्यामुळं, तिनं दुसऱ्‍या दिवशी पुन्हा एकदा राजाला आणि हामानाला आपल्याकडे मेजवानीला येण्याचं आमंत्रण दिलं. (एस्ते. ५:७, ८) राजाला सर्वकाही सांगण्याचं तिनं असं लांबणीवर का टाकलं? तुम्हाला आठवत असेल, की राजानं हामानाला सर्व यहुदी लोकांना ठार मारण्याचा आदेश काढण्याची परवानगी दिली होती. त्यामुळं, एस्तेरच्या लोकांचा जीव धोक्यात होता. इतक्या लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न असल्यामुळं, बोलण्याची योग्य वेळ येईपर्यंत थांबणं एस्तेरला भाग होतं. म्हणून, या वेळीही ती काहीच बोलली नाही. त्याऐवजी, आपल्या पतीबद्दल आपल्याला किती आदर आहे हे दाखवण्यासाठी तिनं आणखी एक संधी निर्माण केली.

९. धीर एक महत्त्वाचा गुण का आहे, आणि या बाबतीत आपण एस्तेरच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो?

९ खरंतर, एस्तेर खूप काळजीत होती आणि आपल्या मनातलं सगळं काही राजाला सांगायला ती आतुरही होती. पण तरीसुद्धा, उतावळेपणा न करता ती योग्य वेळ येईपर्यंत धीरानं थांबून राहिली. धीर हा आज दुर्मिळ होत चाललेला, पण मौल्यवान असा गुण आहे. या बाबतीत एस्तेरच्या उदाहरणावरून आपण बरंच काही शिकू शकतो. वेळोवेळी, आपल्यापैकी सर्वांनाच काही चुकीच्या गोष्टी घडत असल्याचं दिसून येतं; आणि त्या वेळी परिस्थितीत सुधारणा करण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं. या बाबतीत जर अधिकारपदावर असलेल्या एखाद्या व्यक्‍तीला सांगण्याचा आपण विचार करत असू, तर आपण एस्तेरचं अनुकरण करून उतावळेपणा करण्याचं टाळलं पाहिजे. नीतिसूत्रे २५:१५ म्हणतं: “बराच वेळ धीर धरल्याने न्यायाधीशाचे मन वळते, नरम जीभ हाड फोडते.” एस्तेरप्रमाणे धीर धरून योग्य वेळी आपले विचार नम्रपणे मांडल्यास, हाडासारख्या कठीण वाटणाऱ्‍या विरोधावरही आपण मात करू शकतो. पण मग, एस्तेरच्या धीराबद्दल आणि सुज्ञतेबद्दल यहोवानं तिला आशीर्वाद दिला का?

धीर धरल्यामुळं सत्य समोर आलं

१०, ११. पहिल्या मेजवानीवरून परत जाताना हामानाची मनःस्थिती अचानक का बदलली, आणि त्याच्या पत्नीनं व मित्रांनी त्याला काय सुचवलं?

१० एस्तेरनं धीर धरल्यामुळं अतिशय उल्लेखनीय अशा घटना घडण्याचा मार्ग मोकळा झाला. पहिली मेजवानी झाल्यानंतर हामान खूप खूश होऊन तिथून निघाला. राजा आणि राणी दोघंही आपल्याला इतकं पसंत करतात हे पाहून तो अगदी “आनंदित व प्रसन्‍नचित्त” झाला होता. पण, राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ येताच त्याची नजर मर्दखयवर पडली. हा यहुदी मनुष्य अजूनही त्याला नमन करायला तयार नव्हता. याआधीच्या अध्यायात आपण पाहिल्याप्रमाणे, मर्दखयला हामानाचा अपमान करण्याची इच्छा होती, असं नाही. पण, त्याच्या विवेकामुळं आणि यहोवा देवासोबतच्या नातेसंबंधाचा प्रश्‍न असल्यामुळं तो हामानाला वाकून नमन करत नव्हता. पण हामानाला मात्र त्याला पाहून “फार क्रोध आला.”—एस्ते. ५:९.

११ या झालेल्या अपमानाबद्दल जेव्हा हामानानं आपल्या पत्नीला आणि मित्रांना सांगितलं, तेव्हा त्यांनी त्याला एक कल्पना सुचवली. त्यांनी त्याला पन्‍नास हात उंचीचा एक खांब तयार करायला आणि त्यावर मर्दखयला लटकवण्याची राजाकडून परवानगी मागायला सांगितलं. त्यांनी सुचवलेली ही कल्पना हामानाला फार आवडली आणि तो लगेच कामाला लागला.—एस्ते. ५:१२-१४.

१२. राजानं इतिहासाचा ग्रंथ वाचून दाखवण्याची आज्ञा का दिली, आणि त्यामुळं त्याला कोणती गोष्ट समजली?

१२ इकडे, राजाला त्या रात्री एक विचित्र अनुभव आला. बायबल सांगतं, की “राजाची झोप उडाली” आणि त्यामुळं त्यानं आपल्या राज्याच्या इतिहासाचा ग्रंथ वाचून दाखवण्याची आज्ञा दिली. ग्रंथ वाचत असताना अहश्‍वेरोशला ठार मारण्याच्या एका कटाबद्दलचा वृत्तान्तही वाचण्यात आला. राजाला लगेच ती घटना आठवली. कट रचणाऱ्‍यांना पकडून मृत्युदंड देण्यात आल्याचंही त्याच्या लक्षात आलं. पण ज्यानं तो कट उघडकीस आणला होता त्या माणसाचं, मर्दखयचं काय? आता राजाची झोप पूर्णपणे उडाली होती. मर्दखयला काय बक्षीस देण्यात आलं असं त्यानं विचारलं. मर्दखयला खरंच काही बक्षीस देण्यात आलं होतं का? नाही, राजाचा जीव वाचवल्याबद्दल त्याला कोणतंही प्रतिफळ देण्यात आलं नव्हतं!—एस्तेर ६:१-३ वाचा.

१३, १४. (क) हामानाच्या बाबतीत वाईट घटना घडण्यास सुरुवात कशी झाली? (ख) हामानाच्या पत्नीनं व मित्रांनी त्याला काय सांगितलं?

१३ राजाला हे ऐकून फार वाईट वाटलं. आपल्याकडून झालेली ही चूक त्याला कशीही करून सुधारायची होती. त्यामुळं आपली मदत करू शकतील असे कोणी सेवक आहेत का, असं त्यानं विचारलं. पण, इतक्या पहाटे कोणीही नव्हतं. फक्‍त हामान राजवाड्याच्या अंगणात होता. कदाचित मर्दखयला खांबावर लटकवण्याची परवानगी मागण्यासाठीच तो इतक्या सकाळी राजाकडे आला असावा. पण हामानानं काही बोलण्याआधीच राजानं त्याला विचारलं, की एखाद्या मनुष्याचा सन्मान करण्याची जर राजाची इच्छा असेल तर त्याचा कशा प्रकारे गौरव करण्यात यावा? हामानाला वाटलं की राजा त्याच्याबद्दलच बोलत आहे. त्यामुळं, त्यानं अशा मनुष्याचा पुष्कळ गाजावाजा करून सत्कार करण्याचं राजाला सुचवलं. तो म्हणाला की अशा माणसाला राजवस्त्रं घालण्यात यावीत आणि एका मोठ्या सरदारानं त्या माणसाला राजाच्या घोड्यावर बसवून संपूर्ण शूशन नगरात त्याची मिरवणूक काढावी. तसंच, सर्वांना ऐकू यावं म्हणून त्याच्या नावाची मोठ्यानं घोषणादेखील केली जावी. पण, राजाला ज्याचा सन्मान करायचा होता, तो मनुष्य खरंतर मर्दखय आहे हे जेव्हा हामानाला कळलं, तेव्हा त्याचा चेहरा किती बघण्यालायक झाला असेल याची कल्पना करा! आणि मर्दखयच्या नावाचा जयघोष करण्याची जबाबदारी राजानं कोणावर सोपवली असेल? खुद्द हामानावर!—एस्ते. ६:४-१०.

१४ हामानाजवळ आता काही पर्यायच नव्हता. त्यामुळं राजानं दिलेलं काम त्यानं नाइलाजानं कसंतरी पार पाडलं आणि अतिशय दुःखी होऊन तो घाईघाईनं घरी परतला. हामानाला मर्दखयचा सगळ्या शहरात जो सन्मान करावा लागला, त्यावरून आता त्या यहुदी मनुष्यापुढे त्याचा काहीही टिकाव लागणार नाही, असं त्याच्या पत्नीनं व मित्रांनी त्याला सांगितलं.—एस्ते. ६:१२, १३.

१५. (क) एस्तेरनं धीर धरल्यामुळं कोणता परिणाम घडून आला? (ख) आपण वाट पाहत राहण्याची मनोवृत्ती का दाखवली पाहिजे?

१५ अशा रीतीनं, हामानानं स्वतःचीच फजिती करून घेतली. एस्तेरनं धीर दाखवल्यामुळं आणि आपली मागणी राजाला सांगण्यासाठी आणखी एक दिवस वाट पाहिल्यामुळंच हे घडू शकलं. त्या रात्री राजाची झोप उडाली, हे कदाचित यहोवानंच घडवून आणलं असावं, नाही का? (नीति. २१:१) खरोखर, वाट पाहत राहण्याची मनोवृत्ती दाखवावी, असं प्रोत्साहन देवाचं वचन आपल्याला उगीच देत नाही! (मीखा ७:७ वाचा.) कारण, जेव्हा आपण देवावर पूर्ण भरवसा ठेवून तो कार्य करेपर्यंत वाट पाहतो, तेव्हा आपल्या समस्यांवर स्वतः शोधून काढलेल्या मार्गांपेक्षा, यहोवाचे मार्ग कितीतरी पटीनं चांगले असल्याचं आपल्याला दिसून येतं.

ती धैर्यानं बोलली

१६, १७. (क) एस्तेरच्या दृष्टीनं बोलण्याची योग्य वेळ केव्हा आली? (ख) वश्‍ती राणीपेक्षा एस्तेर कशी वेगळी होती?

१६ राजा दुसऱ्‍यांदा एस्तेरकडे मेजवानीला आला; आता मात्र त्याला आणखी वाट पाहायला लावणं योग्य नाही, त्याला सर्वकाही सांगितलंच पाहिजे, हे एस्तेरनं ओळखलं. पण, सुरुवात कुठून करावी? झालं असं, की राजानं स्वतःच एस्तेरला पुन्हा एकदा तिची मागणी काय आहे, असं विचारलं. (एस्ते. ७:२) एस्तेरला जाणीव झाली, की आता “बोलण्याचा समय” आला आहे.

१७ बोलायला सुरुवात करण्याआधी एस्तेरनं नक्कीच मनातल्या मनात प्रार्थना केली असेल. मग ती म्हणाली: “महाराज, मजवर आपली कृपादृष्टी झाली असून आपल्या मर्जीस आल्यास मला व माझ्या लोकांस प्राणदान द्यावे हाच माझा अर्ज व विनंती आहे.” (एस्ते. ७:३) “आपल्या मर्जीस आल्यास” असं म्हणण्याद्वारे, राजा जो काही निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल, असं तिनं त्याला आश्‍वासन दिलं. एस्तेर ही वश्‍ती राणीपेक्षा किती वेगळी होती! राजाच्या त्या पूर्वीच्या पत्नीनं सर्वांसमोर जाणूनबुजून त्याचा अपमान केला होता. (एस्ते. १:१०-१२) पण एस्तेरनं राजाचा आदर केला. शिवाय, अविचारीपणे हामानावर विश्‍वास ठेवल्याबद्दल तिनं राजाला दोषदेखील दिला नाही. त्याऐवजी, तिनं फक्‍त राजाला तिचा जीव वाचवण्याची विनवणी केली.

१८. एस्तेरनं राजाला आपल्या समस्येविषयी कशा प्रकारे सांगितलं?

१८ एस्तेरची विनंती ऐकून कदाचित राजाला धक्का बसला असेल. ‘माझ्या राणीचा जीव धोक्यात घालण्याची कोणाची हिम्मत?’ असा त्यानं नक्कीच विचार केला असेल. एस्तेर पुढं म्हणाली: “माझा व माझ्या लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट व्हावा या हेतूने आमची विक्री होऊन चुकली आहे; आम्ही केवळ दासदासी व्हावे या हेतूने आमची विक्री झाली असती तर मी गप्प राहिले असते; तरी त्या स्थितीतही त्या वैऱ्‍याला राजाच्या नुकसानीची भरपाई करता आली नसती.” (एस्ते. ७:४) एस्तेरनं आपली समस्या अगदी स्पष्ट शब्दांत सांगितली. पण, पुढं ती असंही म्हणाली की फक्‍त दासदासी होण्याची भीती असती, तर ती गप्प राहिली असती. पण, यहुदी लोकांच्या या संहारामुळं खुद्द राजाचं नुकसान होणार असल्यामुळं साहजिकच ती गप्प राहू शकत नव्हती.

१९. एखादी गोष्ट पटवून देण्याविषयी एस्तेरच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

१९ कोणाला एखादी गोष्ट पटवून देण्याविषयी एस्तेरच्या उदाहरणावरून आपण बरंच काही शिकू शकतो. एखादी गंभीर समस्या आपल्या एखाद्या प्रिय व्यक्‍तीच्या किंवा अधिकारपदावर असलेल्या व्यक्‍तीच्या लक्षात आणून द्यायची असते, तेव्हा एस्तेरप्रमाणेच आपणही धीरानं, आदरानं आणि प्रामाणिकपणे बोललं पाहिजे.—नीति. १६:२१, २३.

२०, २१. (क) एस्तेरनं हामानाचं कारस्थान कशा प्रकारे उघडकीस आणलं, आणि यावर राजाची काय प्रतिक्रिया होती? (ख) हामानाचं पितळ उघडं पडलं तेव्हा त्यानं काय केलं?

२० अहश्‍वेरोशनं एस्तेरला विचारलं: “असं करायला मनाचा हिय्या करणारा कोण? कुठं आहे तो?” तेव्हा, हामानाकडे बोट दाखवून एस्तेर म्हणाली, “हाच तो दुष्ट हामान . . . आमचा विरोधक, आमचा दुश्‍मन!” आता आपलं काही खरं नाही, हे हामानानं ओळखलं. तो भीतीनं कावराबावरा झाला. तुम्ही त्या दृश्‍याची कल्पना करू शकता का? आपल्या भरवशाच्या माणसानं आपली फसवणूक करून आपल्याच प्रिय पत्नीचा जीव घेण्याच्या आदेशाला आपली संमती घेतली, याची अहश्‍वेरोशला जाणीव झाली होती. तेव्हा, आधीच तापट स्वभावाचा असलेला तो सम्राट रागानं लालबुंद झाला! आपलं डोकं शांत करण्यासाठी तो राजवाड्याच्या बागेत निघून गेला.—एस्तर ७:५-७, मराठी कॉमन लँग्वेज.

दुसऱ्‍या मेजवानीच्या वेळी एस्तेर अहश्‍वेरोश राजाला सर्वकाही सांगते आणि हामानाकडे बोट दाखवून त्याचा दुष्टपणा उघडकीस आणते

एस्तेरनं हामानाचा दुष्टपणा धैर्यानं उघडकीस आणला

२१ कारस्थानी व भित्रट हामानाचं पितळ उघडं पडलं होतं! तो राणीच्या पायाशी डोकं टेकवून दयेची भीक मागू लागला. राजा बागेतून परत आला तेव्हा त्यानं हामानाला एस्तेरच्या कोचावर पडून गयावया करताना पाहिलं. तेव्हा तो आणखीनच संतापला. खुद्द राजाच्या घरात राणीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केल्याचा त्यानं हामानावर आरोप लावला. हामानाचा मृत्यू आता अटळ होता! सेवकांनी त्याचं तोंड झाकून त्याला बाहेर नेलं. तेवढ्यात, राजाच्या एका सेवकानं, मर्दखयला ठार मारण्यासाठी हामानानं तयार केलेल्या खांबाबद्दल त्याला सांगितलं. हे ऐकून अहश्‍वेरोशनं हामानालाच त्या खांबावर लटकवण्याचा आदेश दिला.—एस्ते. ७:८-१०.

२२. धैर्य खचू न देण्याच्या आणि आशा न सोडण्याच्या बाबतीत आपण एस्तेरकडून काय शिकतो?

२२ आज जगात सगळीकडे अन्याय पाहायला मिळतो. त्यामुळं कधीकधी आपल्याला असं वाटू शकतं, की न्यायाचा, सत्याचा विजय होणं शक्य नाही. तुम्हालाही कधी असं वाटलं आहे का? एस्तेरचं उदाहरण लक्षात घ्या. तिनं स्वतःचं धैर्य खचू दिलं नाही आणि कधीही आशा सोडली नाही. योग्य वेळ आली तेव्हा ती सत्याच्या बाजूनं धैर्यानं बोलली आणि बाकीचं सर्व तिनं यहोवावर सोडलं. आपणही असंच करू या! कारण यहोवा आजही बदललेला नाही. ज्याप्रमाणे त्यानं हामानाला त्याच्याच जाळ्यात अडकवलं, त्याचप्रमाणे दुष्ट व कावेबाज लोकांना त्यांच्याच जाळ्यात अडकवण्यास तो आजही समर्थ आहे.—स्तोत्र ७:११-१६ वाचा.

यहोवासाठी आणि त्याच्या लोकांसाठी तिनं निःस्वार्थीपणे कार्य केलं

२३. (क) राजानं मर्दखय व एस्तेर यांना काय बक्षीस दिलं? (ख) याकोबानं त्याच्या मृत्यूच्या आधी बन्यामीनाबद्दल केलेली भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? (“भविष्यवाणी पूर्ण झाली,” या शीर्षकाची चौकटही पाहा.)

२३ सरतेशेवटी, मर्दखय कोण होता हे राजाला कळलं. तो आपला जीव वाचवणारा एक निष्ठावान माणूसच नव्हे, तर एस्तेरचा मानलेला पिता होता हेही त्याला समजलं. त्यानं खूश होऊन मर्दखयला हामानाच्या जागी प्रधानमंत्री नेमलं. हामानाचं घर, तसंच त्याची भरपूर मालमत्ता राजानं एस्तेरला दिली आणि एस्तेरनं त्या सर्व मालमत्तेवर मर्दखयला कारभारी म्हणून नेमलं.—एस्ते. ८:१, २.

२४, २५. (क) हामानाचा कट उघडकीस आल्यावरही एस्तेर निश्‍चिंत का झाली नव्हती? (ख) एस्तेरनं कशा प्रकारे पुन्हा एकदा आपला जीव धोक्यात घातला?

२४ एस्तेर आणि मर्दखय यांचा जीव तर वाचला होता. पण, ‘आपला जीव वाचला आहे, त्यामुळं आता काळजी करण्याची गरज नाही,’ असा एस्तेरनं विचार केला का? नाही, ती स्वार्थी नव्हती. तिला आपल्या लोकांची खूप काळजी वाटत होती. कारण त्या क्षणी, सर्व यहुद्यांची कत्तल करण्याचा हामानानं दिलेला आदेश पर्शियन साम्राज्याच्या कानाकोपऱ्‍यांत पोचवला जात होता. हामानानं चिठ्ठ्या टाकून (हा कदाचित जादूटोण्याचा एक प्रकार असावा, मूळ भाषेत पूर) हा क्रूर हल्ला करण्याची नेमकी वेळ ठरवली होती. (एस्ते. ९:२४-२६) तो दिवस यायला अजून बऱ्‍याच महिन्यांचा अवकाश होता. पण तरीसुद्धा, वेळ फार कमी होता. यहुद्यांवर येऊन ठेपलेलं संकट टाळणं खरंच शक्य होतं का?

२५ एस्तेरनं पुन्हा एकदा निःस्वार्थीपणा दाखवला. बोलावलेलं नसताना ती परत आपला जीव धोक्यात घालून राजाची भेट घ्यायला गेली. या वेळी तिनं रडून आपल्या लोकांसाठी दयेची भीक मागितली आणि यहुद्यांचा नाश करण्याचा तो भयंकर आदेश रद्द करण्याची आपल्या पतीला विनवणी केली. पण, पर्शियन सम्राटाच्या नावानं एकदा काढलेला कायदा रद्द केला जाऊ शकत नव्हता. (दानी. ६:१२, १५) त्यामुळं, राजानं एस्तेर आणि मर्दखयला एक नवा कायदा काढण्याची परवानगी दिली. यानुसार, यहुदी लोक स्वतःचा बचाव करू शकतात असं नवीन फर्मान काढण्यात आलं. ही चांगली बातमी यहुद्यांना देण्यासाठी पुन्हा एकदा सबंध साम्राज्यात घोडेस्वारांना पाठवण्यात आलं. यहुदी लोकांना एक आशेचा किरण मिळाला. (एस्ते. ८:३-१६) या नव्या फर्मानानुसार यहुदी लोक स्वतःचा बचाव करण्यासाठी लढू शकणार होते. त्या मोठ्या साम्राज्यात राहणाऱ्‍या यहुद्यांनी कशा प्रकारे लढाईसाठी स्वतःला सुसज्ज केलं असेल, याची आपण कल्पना करू शकतो. पण, सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न हा होता, की “सैन्यांचा यहोवा” त्यांच्या पाठीशी असेल का?—१ शमु. १७:४५, पं.र.भा.

एस्तेर व मर्दखय एक तरुण मनुष्याकडून दुसरं फर्मान लिहून घेतात

एस्तेर व मर्दखय यांनी संपूर्ण पर्शियन साम्राज्यातल्या यहुद्यांना फर्मान पाठवलं

२६, २७. (क) यहोवानं कशा प्रकारे त्याच्या लोकांना मोठा व संपूर्ण विजय मिळवून दिला? (ख) हामानाच्या मुलांना ठार मारण्यात आल्यामुळं कोणती भविष्यवाणी पूर्ण झाली?

२६ ठरलेला दिवस आला तेव्हा देवाचे लोक तयार होते. यहुदी मर्दखय नवा प्रधानमंत्री बनल्याची बातमी सगळीकडे पसरल्यामुळं बरेच पर्शियन सरदारसुद्धा यहुदी लोकांना साहाय्य करायला पुढं आले. यहोवानं त्याच्या लोकांना त्यांच्या शत्रूंवर मोठा विजय मिळवून दिला. आपल्या लोकांना पुन्हा त्रास दिला जाणार नाही, याची खातरी करण्यासाठी देवानं त्यांच्या शत्रूंचा पूर्णपणे नाश केला.a—एस्ते. ९:१-६.

२७ शिवाय, मर्दखयला हामानाच्या घरावर कारभारी म्हणून नेमण्यात आलं होतं; पण, हामानाचे दहा पुत्र जिवंत असेपर्यंत मर्दखयच्या जिवाला सतत धोका असणार होता. तेव्हा, हामानाच्या या दहा पुत्रांनाही ठार मारण्यात आलं. (एस्ते. ९:७-१०) अशा रीतीनं बायबलची एक भविष्यवाणी पूर्ण झाली. कारण, देवानं पूर्वीच सांगितलं होतं, की त्याच्या लोकांचे दुष्ट शत्रू असलेल्या अमालेकी लोकांचा संपूर्ण नाश होईल. (अनु. २५:१७-१९) हामानाचे पुत्र हे कदाचित, नाशास पात्र ठरवण्यात आलेल्या त्या राष्ट्रातल्या शेवटल्या लोकांपैकी असावेत.

२८, २९. (क) एस्तेर आणि तिच्या लोकांनी युद्धात सहभाग घ्यावा अशी यहोवाची इच्छा का होती? (ख) एस्तेरचं उदाहरण आपल्यापुढं आहे याबद्दल आपण कृतज्ञ का आहोत?

२८ एस्तेरला अगदी तरुण वयातच, युद्धासंबंधी आणि अपराध्यांना मृत्युदंड देण्यासंबंधी आदेश काढण्यासारख्या मोठ्या जबाबदाऱ्‍या पेलाव्या लागल्या. हे नक्कीच तिला सोपं गेलं नसेल. पण, यहोवाच्या लोकांचा बचाव करणं गरजेचं होतं; ही यहोवाचीच इच्छा होती. कारण, सर्व मानवजातीचं तारण करणारा, वचन दिलेला मसीहा इस्राएल राष्ट्रातूनच येणार होता. (उत्प. २२:१८) तो मसीहा, म्हणजेच येशू पृथ्वीवर आला तेव्हा त्यानं आपल्या अनुयायांना यापुढं युद्धांमध्ये सहभाग न घेण्याची आज्ञा दिली. याबद्दल, आज देवाचे सेवक या नात्यानं आपण किती आनंदी आहोत!—मत्त. २६:५२.

२९ पण, ख्रिस्ती या नात्यानं आज आपण एका वेगळ्या प्रकारच्या युद्धात भाग घेतो. हे सैतान व त्याच्या दुरात्म्यांविरुद्धचं आध्यात्मिक युद्ध आहे. सैतान आज यहोवा देवावर असलेला आपला विश्‍वास नष्ट करण्याचा पूर्वी कधी नव्हे इतका प्रयत्न करत आहे. (२ करिंथकर १०:३, ४ वाचा.) पण, एस्तेरसारखं सुंदर उदाहरण आपल्यापुढं आहे, याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! तिच्याप्रमाणेच आपण सुज्ञता, धीर व धैर्य यांसारखे गुण दाखवू या व देवाच्या लोकांसाठी निःस्वार्थीपणे कार्य करण्यास नेहमी तयार राहू या. तुम्हीही या मार्गांनी एस्तेरच्या विश्‍वासाचं अनुकरण कराल का?

एस्तेरविषयी उद्‌भवणारे प्रश्‍न

मर्दखयनं एस्तेरला यहोवाचा उपासक नसलेल्या व्यक्‍तीशी लग्न का करू दिलं?

काही विद्वान असं सुचवतात की मर्दखय एक संधीसाधू माणूस होता आणि त्याला प्रतिष्ठा मिळवायची असल्यामुळंच एस्तेरचं लग्न राजाशी व्हावं असं त्याला वाटत होतं. पण, असं मानण्याकरता कोणताही आधार सापडत नाही. मर्दखय एक विश्‍वासू यहुदी होता. त्यामुळं, त्याला हा विवाह मान्य असणं शक्य नव्हतं. (अनु. ७:३) मर्दखयनं हे लग्न रोखण्याचा प्रयत्न केला, असं प्राचीन यहुदी लिखाणांत सांगितलं आहे. शिवाय, तो व एस्तेर पर्शियन साम्राज्यात विदेशी म्हणून राहत होते आणि या साम्राज्याच्या सम्राटाला पर्शियन लोकांमध्ये देवाचा दर्जा दिला जायचा; त्यामुळं एस्तेरचं राजाशी लग्न होण्यात त्यांच्या संमतीचा प्रश्‍नच नव्हता. कालांतरानं, हे स्पष्ट झालं की यहोवानंच आपल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी हे लग्न घडवून आणलं होतं.—एस्ते. ४:१४.

एस्तेरच्या पुस्तकात देवाच्या वैयक्‍तिक नावाचा उल्लेख का आढळत नाही?

मर्दखय हा या देवप्रेरित पुस्तकाचा लेखक होता, असं पुराव्यांवरून दिसतं. कदाचित जेरूसलेमला नेण्याअगोदर, सुरुवातीला हे पुस्तक पर्शियाच्या ऐतिहासिक ग्रंथांसोबत ठेवण्यात आलं असावं. शिवाय, या पुस्तकात यहोवाचं नाव असतं, तर पर्शियन देवतांच्या उपासकांनी कदाचित हे पुस्तक नष्ट केलं असतं. पण, देवाचं नाव नसलं, तरीसुद्धा या पुस्तकात वर्णन केलेल्या घटनांमागे यहोवा होता, हे स्पष्टच आहे. लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, मूळ इब्री भाषेत या पुस्तकात देवाच्या नावाचा समावेश करण्यासाठी मुद्दामहून शब्दांची एका खास प्रकारे मांडणी करण्यात आली आहे. एकापाठोपाठ येणाऱ्‍या शब्दांच्या सुरुवातीला किंवा शेवटी देवाच्या नावाची चार अक्षरं वापरण्यात आली आहेत.

एस्तेरचं पुस्तक ऐतिहासिक दृष्ट्या अचूक नाही, हा दावा खरा आहे का?

काही टीकाकारांनी हे पुस्तक अचूक नसल्याचा दावा केला आहे. पण, अनेक विद्वान मात्र मान्य करतात, की एस्तेर हे पुस्तक लिहिणाऱ्‍याला पर्शियन राजघराणं, तिथलं बांधकाम आणि रीतिरिवाज यांबद्दल खूप बारीकसारीक गोष्टी माहीत असल्याचं दिसून येतं. बायबलव्यतिरिक्‍त, इतर कोणत्याही उपलब्ध ऐतिहासिक लिखाणांत एस्तेर राणीचा उल्लेख आढळत नाही हे खरं आहे; पण, ऐतिहासिक अहवालांतून तशी कितीतरी राजांची व राणींची नावं नाहीशी झाली असतील. लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, ऐतिहासिक अहवालांत मार्डुका नावाच्या एका मनुष्याचा उल्लेख आढळतो. मार्डुका हे मर्दखय या नावाचं पर्शियन भाषेतलं रूप आहे. विशेष म्हणजे, हा मनुष्य एस्तेर पुस्तकात वर्णन केलेल्या काळातच शूशनच्या राजदरबारात कामाला होता, असं या अहवालांत सांगण्यात आलं आहे.

भविष्यवाणी पूर्ण झाली

लढाई करून यहोवाच्या लोकांचं रक्षण करण्याद्वारे एस्तेर व मर्दखय यांनी प्राचीन काळात करण्यात आलेली बायबलमधली एक भविष्यवाणी पूर्ण केली. एस्तेरच्या काळाच्या १,२०० वर्षांपेक्षा जास्त काळाआधी कुलप्रमुख याकोब यानं यहोवाच्या प्रेरणेनं आपल्या एका पुत्राबद्दल अशी भविष्यवाणी केली होती: “बन्यामीन हा फाडून टाकणारा लांडगा आहे, सकाळी तो शिकार खाऊन टाकेल, सायंकाळी लुटीचे वाटे करेल.” (उत्प. ४९:२७) “सकाळी” म्हणजेच इस्राएली राजांच्या इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात, बन्यामीनाच्या वंशजांपैकी राजा शौल व इतर शूर योद्ध्‌यांनी यहोवाच्या लोकांच्या वतीनं अनेक लढाया लढल्या. तसंच, “सायंकाळी” म्हणजेच इस्राएली राजांचा काळ संपून विदेशी राजे राज्य करू लागले, तेव्हा बन्यामीन वंशातल्या एस्तेर व मर्दखय यांनी यहोवाच्या शत्रूंविरुद्ध लढाई करून त्यांच्यावर विजय मिळवला. हामानाच्या मालकीची भरपूर मालमत्ता त्यांना मिळाली यावरून एका अर्थानं त्यांनी “लुटीचे वाटे” केले असंही म्हणता येईल.

a यहुद्यांना त्यांच्या शत्रूंचा संपूर्णपणे विध्वंस करता यावा, म्हणून राजानं त्यांना दुसऱ्‍या दिवशीही त्यांच्याविरुद्ध लढण्याची परवानगी दिली. (एस्ते. ९:१२-१४) आजसुद्धा, यहुदी लोक दर वर्षी त्यांच्या कॅलेंडरनुसार अदार या महिन्यात, जो सहसा फेब्रुवारी-मार्चच्या सुमारास असतो, त्या मोठ्या विजयाची आठवण म्हणून एक सण साजरा करतात. या सणाला पुरीम (पूर या शब्दाचं अनेकवचनी रूप) असं म्हणतात. इस्राएलांचा नाश करण्यासाठी हामानानं चिठ्ठ्या टाकल्या होत्या, त्यावरून या सणाचं नाव पडलं.

यावर विचार करा. . .

  • “बोलण्याचा समय” निवडताना एस्तेरनं सुज्ञता कशी दाखवली?

  • एस्तेरनं धीर धरल्यामुळं कोणते चांगले परिणाम घडून आले?

  • आपल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी एस्तेरनं धैर्य आणि निःस्वार्थीपणा कसा दाखवला?

  • तुम्ही कोणकोणत्या मार्गांनी एस्तेरच्या विश्‍वासाचं अनुकरण करण्याचा निश्‍चय केला आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा