भाग १२
देवाकडील जीवनदायी ज्ञान
नीतिसूत्रे हे पुस्तक देवप्रेरित सुवचनांचा संग्रह असून, यांपैकी बहुतेक शलमोनाने लिहिली आहेत व ती दैनंदिन जीवनाकरता उपयुक्त मार्गदर्शन पुरवतात
यहोवा सुज्ञतेने राज्य करणारा शासक आहे का? या प्रश्नाचे खातरीलायक उत्तर मिळण्यासाठी तो कशा प्रकारचे मार्गदर्शन पुरवतो हे पाहिले पाहिजे. त्याच्याकडून मिळणारे मार्गदर्शन खरोखरच व्यवहारोपयोगी आहे का? आणि ते जीवनात लागू केल्याने जीवन अधिक सुखकर व अर्थपूर्ण बनते का? सुज्ञ राजा शलमोनाने शेकडो नीतिवचने लिहिली. ही नीतिवचने जीवनातल्या जवळजवळ हरएक पैलूवर प्रकाश टाकतात. काही उदाहरणे आपण पाहू या.
देवावर भरवसा ठेवण्याच्या बाबतीत. यहोवासोबत एक अतूट नातेसंबंध जोडण्यासाठी त्याच्यावर आपला भरवसा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शलमोनाने लिहिले: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीतिसूत्रे ३:५, ६) देवाकडून मिळणारे मार्गदर्शन स्वीकारून व त्याच्या आज्ञांचे पालन करून आपण देवावर भाव ठेवतो तेव्हा जीवन अतिशय अर्थपूर्ण बनते. देवाच्या मार्गदर्शनानुसार जीवनात वाटचाल केल्यामुळे मानव देवाचे मन आनंदित करू शकतात आणि यामुळे यहोवाला त्याचा शत्रू सैतान याने लावलेल्या आरोपांचे चोख उत्तर देणे शक्य होते.—नीतिसूत्रे २७:११.
इतरांशी समजूतदारपणे वागण्याच्या बाबतीत. पती, पत्नी आणि मुले यांसाठी असलेला देवाचा सल्ला पूर्वी कधी नव्हता इतका आज उपयुक्त आहे. देव पतींना असे म्हणतो: “तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस.” असा सल्ला देण्याद्वारे देव पतीला अशी आज्ञा देतो की त्याने आपल्या पत्नीशी विश्वासू राहावे. (नीतिसूत्रे ५:१८-२०) नीतिसूत्रे या पुस्तकात, विवाहित स्त्रियांना एका सद्गुणी स्त्रीचे वर्णन वाचायला मिळते जी तिच्या उत्तम गुणांमुळे आपल्या पतीच्या व मुलांच्या प्रशंसेस पात्र ठरते. (नीतिसूत्रे, अध्याय ३१) आणि मुलांनी आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहावे असा उपयुक्त सल्लाही त्यात देण्यात आला आहे. (नीतिसूत्रे ६:२०) तसेच, जीवनात मैत्रीसंबंध अतिशय मोलाचे असतात असे या पुस्तकात सांगण्यात आले आहे. कारण फटकून राहिल्यामुळे स्वार्थी मनोवृत्तीला खतपाणी मिळते. (नीतिसूत्रे १८:१) आपल्या मित्रांच्या आचारविचारांचा सहसा आपल्यावर विलक्षण प्रभाव पडतो. म्हणूनच, मित्रमैत्रिणींची विचारपूर्वक निवड करणे महत्त्वाचे आहे.—नीतिसूत्रे १३:२०; १७:१७.
स्वतःबद्दल सुज्ञ मनोवृत्ती बाळगण्याच्या बाबतीत. मद्याचे व्यसन टाळण्यास, आरोग्यासाठी हितकारक असलेल्या भावना जोपासण्यास आणि हानीकारक भावना टाळण्यास व मेहनती असण्यास मदत करणारा अनमोल सल्ला नीतिसूत्रे या पुस्तकात आढळतो. (नीतिसूत्रे ६:६; १४:३०; २०:१) देवाचा सुज्ञ सल्ला सोडून मानवी बुद्धीवर भरवसा ठेवल्यास आपण स्वतःवर संकट ओढवू असा इशारा ते आपल्याला देते. (नीतिसूत्रे १४:१२) तसेच, वाईट गोष्टींपासून आपल्या अंतःकरणाचे संरक्षण करण्याचा आग्रह ते आपल्याला करते. आणि अशी आठवण करून देते, की “[अंतःकरणात] जीवनाचा उगम आहे.”—नीतिसूत्रे ४:२३.
बायबलमध्ये दिलेल्या या सल्ल्याचा अवलंब केल्याने जीवन अधिक सुखकर बनते हे जगातल्या लाखो लोकांनी स्वतः अनुभवले आहे. म्हणूनच, यहोवाचे आधिपत्य स्वीकारण्याची असंख्य कारणे त्यांच्याजवळ आहेत.
—नीतिसूत्रे या पुस्तकावर आधारित.