अध्याय १३
“बराच मतभेद आणि वादावादी झाली”
सुंतेविषयीचा वाद नियमन मंडळासमोर मांडला जातो
प्रे. कार्यं १५:१-१२ वर आधारित
१-३. (क) नुकत्याच सुरू झालेल्या ख्रिस्ती मंडळीत कोणत्या वादामुळे फूट पडण्याचा धोका निर्माण झाला? (ख) या अहवालाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होईल?
पौल आणि बर्णबा त्यांच्या पहिल्या मिशनरी दौऱ्यावरून नुकतेच सीरियाच्या अंत्युखियाला परत आले आहेत. यहोवाने “विदेश्यांसाठीही विश्वासाचं दार उघडलं” असल्यामुळे ते खूप आनंदात आहेत. (प्रे. कार्यं १४:२६, २७) इथे अंत्युखियामध्येही आनंदाचा संदेश मोठ्या प्रमाणावर घोषित होत असल्यामुळे “बरेच” विदेशी मंडळीत येत आहेत.—प्रे. कार्यं ११:२०-२६.
२ मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या या वाढीबद्दलची बातमी लवकरच यहूदीयाला पोहोचली. पण या बातमीमुळे सर्वांनाच आनंद झाला नाही. तर, त्यामुळे खूप काळापासून चाललेला सुंतेविषयीचा वाद पुन्हा वर आला. या वादामुळे गंभीर प्रश्न उभे राहिले. यहुदी आणि विदेशी यांनी एकमेकांशी कसं वागलं पाहिजे? विदेश्यांनी मोशेचं नियमशास्त्र पाळणं गरजेचं आहे का? अशा प्रश्नांमुळे मंडळीत फूट पडण्याचा धोका निर्माण झाला. मग हा वाद कसा सोडवला जाणार होता?
३ प्रेषितांची कार्यं पुस्तकातल्या या अहवालावर चर्चा करताना आपल्याला अनेक व्यावहारिक धडे शिकायला मिळतील. त्यामुळे आजच्या काळात ख्रिस्ती एकतेला धोका निर्माण होईल असे वाद जर निर्माण झाले, तर आपल्याला समंजसपणे वागता येईल.
“जोपर्यंत . . . तुमची सुंता होत नाही” (प्रे. कार्यं १५:१)
४. काही बांधव कोणती चुकीची मतं पसरवत होते, आणि यामुळे कोणता प्रश्न उभा राहतो?
४ शिष्य लूक याने असं म्हटलं: “मग, यहूदीयाहून काही माणसं [अंत्युखियाला] आली आणि बांधवांना असं शिकवू लागली: ‘जोपर्यंत मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे तुमची सुंता होत नाही, तोपर्यंत तुमचं तारण होणं शक्य नाही.’” (प्रे. कार्यं १५:१) ही ‘यहूदीयाची माणसं’ ख्रिस्ती बनण्याआधी परूशी होती का, हे नक्की सांगता येणार नाही. पण तीही परूश्यांप्रमाणेच नियमांना खूप महत्त्व देत असावीत असं वाटतं. तसंच, आपण यरुशलेममधले प्रेषित आणि वडील यांच्यातर्फे बोलत आहोत, असा खोटा दावाही त्यांनी केला असावा. (प्रे. कार्यं १५:२३, २४) पेत्रने देवाच्या मार्गदर्शनानुसार सुंता न झालेल्या विदेश्यांना ख्रिस्ती मंडळीत स्वीकारलं, या गोष्टीला सुमारे १३ वर्षं झाली होती. मग अजूनही हे यहुदी बांधव सुंता केलीच पाहिजे असं का म्हणत होते?a—प्रे. कार्यं १०:२४-२९, ४४-४८.
५, ६. (क) अजूनही काही यहुदी बांधवांना सुंता केलीच पाहिजे असं का वाटत होतं? (ख) सुंतेचा करार हा अब्राहामच्या कराराचा भाग होता का? समजावून सांगा. (तळटीप पाहा.)
५ त्यांच्या असं बोलण्यामागे अनेक कारणं असावीत. पहिलं म्हणजे, सुंता करण्याची आज्ञा स्वतः यहोवा देवाने दिली होती आणि त्याच्याशी असलेल्या खास नात्याचं ते चिन्ह होतं. ही आज्ञा मोशेचं नियमशास्त्र मिळण्याच्याही आधी त्यांना मिळाली होती आणि नंतर ती नियमशास्त्राचा भाग बनली. सुंता करण्याची सुरुवात अब्राहाम आणि त्याच्या कुटुंबापासून झाली.b (लेवी. १२:२, ३) मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे, विदेशी लोकांनीही सुंता करणं आवश्यक होतं. तरच ते वल्हांडणाचं जेवण करणं, यासारख्या खास समारंभांत सामील होऊ शकत होते. (निर्ग. १२:४३, ४४, ४८, ४९) तेव्हा, साहजिकच एका यहुदी माणसाच्या दृष्टीने सुंता न झालेली व्यक्ती ही अशुद्ध आणि तुच्छ होती.—यश. ५२:१.
६ सत्याची नवीन शिकवण स्वीकारण्यासाठी या यहुदी बांधवांना खरंच विश्वास आणि नम्रता दाखवण्याची गरज होती. नियमशास्त्राच्या कराराची जागा आता नव्या कराराने घेतली होती. तेव्हा जन्माने यहुदी असलेली व्यक्ती आता आपोआप देवाच्या लोकांचा भाग होऊ शकत नव्हती. आणि यहुदी लोकांमध्ये राहणाऱ्या यहुदी ख्रिश्चनांना, उदाहरणार्थ, यहूदीयातल्या बांधवांना ते ख्रिस्ताचे शिष्य आहेत हे सांगण्यासाठी धाडसाची गरज होती. इतकंच नाही तर सुंता न झालेल्या विदेशी लोकांना आपले बांधव म्हणून स्वीकारण्यासाठीही त्यांना अशाच धैर्याची गरज होती.—यिर्म. ३१:३१-३३; लूक २२:२०.
७. ‘यहूदीयातल्या माणसांना’ कोणती सत्यं कळली नव्हती?
७ देवाचे स्तर बदलले नव्हते. याचा पुरावा म्हणजे नवा करार हा मोशेच्या नियमशास्त्रातल्या मुख्य तत्त्वांवरच आधारित होता. (मत्त. २२:३६-४०) उदाहरणार्थ, सुंतेविषयी पौलने नंतर असं लिहिलं: “जो आतून यहुदी, तो खरा यहुदी आहे. त्याची सुंता ही कोणत्याही लेखी नियमाप्रमाणे नसून, पवित्र शक्तीने होणारी हृदयाची सुंता आहे.” (रोम. २:२९; अनु. १०:१६) ‘यहूदीयातल्या त्या माणसांना’ ही सत्यं कळली नव्हती. त्यामुळे ते असं ठामपणे म्हणत होते की देवाने सुंतेचा नियम रद्द केलाच नव्हता. पण त्यांना समजावून सांगितल्यावर त्यांनी ऐकलं का?
“मतभेद आणि वादावादी” (प्रे. कार्यं १५:२)
८. सुंतेविषयीचा वाद यरुशलेममधल्या नियमन मंडळाकडे का नेण्यात आला?
८ लूकने पुढे असं लिहिलं: “पण या विषयावरून पौल आणि बर्णबा यांचा त्यांच्यासोबत [यहूदीयावरून आलेल्या ‘काही माणसांसोबत’] बराच मतभेद आणि वादावादी झाली. म्हणून असं ठरवण्यात आलं, की पौल आणि बर्णबा तसंच, इतर काही जणांनी यरुशलेमला जाऊन हा वाद प्रेषित आणि वडील यांच्यापुढे मांडावा.”c (प्रे. कार्यं १५:२) त्यांच्यात झालेला “मतभेद आणि वादावादी” यावरून असं दिसतं, की दोन्ही बाजूच्या लोकांची ठाम मतं होती आणि ते भावनांच्या भरात बोलत होते. हा वाद अंत्युखियाच्या मंडळीला मिटवता आला नाही. मग मंडळीतली शांती आणि एकता टिकवून ठेवण्यासाठी वडिलांनी काय केलं? त्यांनी हा वाद, नियमन मंडळ म्हणून कार्य करत असलेले यरुशलेममधले “प्रेषित आणि वडील” यांच्याकडे नेण्याचा निर्णय घेतला. आपण अंत्युखियाच्या त्या वडिलांकडून कोणती गोष्ट शिकू शकतो?
काही जण म्हणाले: “[विदेशी लोकांना] मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करायची आज्ञा दिली पाहिजे”
९, १०. अंत्युखियातल्या बांधवांनी, तसंच पौल आणि बर्णबा यांनीही आपल्यासाठी चांगलं उदाहरण कसं मांडलं आहे?
९ यातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो, तो म्हणजे आपण देवाच्या संघटनेवर पूर्ण भरवसा ठेवला पाहिजे. विचार करा, अंत्युखियाच्या बांधवांना हे माहीत होतं, की नियमन मंडळातले सर्व बांधव मुळात यहुदी होते. तरीही हे बांधव सुंतेचा वाद देवाच्या वचनांच्या आधारावर सोडवतील याबद्दल अंत्युखियाच्या बांधवांना पूर्ण भरवसा होता. त्यांना हा भरवसा का होता? कारण, यहोवा त्याच्या पवित्र शक्तीद्वारे आणि ख्रिस्ती मंडळीचं मस्तक असलेल्या येशू ख्रिस्ताद्वारे हा वाद सोडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करेल, याची मंडळीला पूर्ण खातरी होती. (मत्त. २८:१८, २०; इफिस. १:२२, २३) आज असे गंभीर वाद उभे राहतात, तेव्हा आपण अंत्युखियातल्या बांधवांचं अनुकरण केलं पाहिजे. आपणही देवाच्या संघटनेवर आणि नियमन मंडळातल्या अभिषिक्त बांधवांवर पूर्ण भरवसा ठेवला पाहिजे.
१० अशा प्रसंगांत नम्रता आणि धीर दाखवणं किती महत्त्वाचं आहे, हेही आपण शिकतो. पौल आणि बर्णबा या दोघांना विदेशी लोकांकडे जाण्यासाठी पवित्र शक्तीद्वारे खास नियुक्त करण्यात आलं होतं. तरीही, अंत्युखियामध्ये निर्माण झालेला सुंतेविषयीचा वाद तिथेच सोडवण्यासाठी त्यांनी आपला अधिकार वापरला नाही. (प्रे. कार्यं १३:२, ३) पौलने नंतर याविषयी असं लिहिलं: “मी तिथे जावं हे प्रभूने मला प्रकट केल्यामुळे मी [यरुशलेमला] गेलो.” यावरून आपल्याला हे कळतं, की हा वाद सोडवण्यासाठी देवानेच मार्गदर्शन दिलं होतं. (गलती. २:२) आजही असे फूट पाडणारे वाद उभे राहतात, तेव्हा वडील अशीच नम्रता आणि धीर दाखवण्याचा प्रयत्न करतात. स्वतःच्याच मतांवर अडून राहण्याऐवजी, ते बायबलमध्ये दिलेल्या तत्त्वांवर आणि विश्वासू दासाने दिलेल्या मार्गदर्शनावर विचार करतात. असं करण्याद्वारे ते यहोवाचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.—फिलिप्पै. २:२, ३.
११, १२. एखाद्या विषयाची यहोवाकडून स्पष्ट समज मिळेपर्यंत आपण वाट पाहणं का गरजेचं आहे?
११ काही वेळा एखाद्या विषयाची स्पष्ट समज यहोवाकडून मिळण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागू शकते. कर्नेल्यवर इ.स. ३६ मध्ये पवित्र शक्ती आली. पण विदेश्यांनी सुंता करावी की नाही याबद्दल यहोवाकडून उत्तर मिळण्यासाठी पौलच्या काळातल्या बांधवांना इ.स. ४९ पर्यंत म्हणजे जवळजवळ १३ वर्षं थांबावं लागलं. पण हा वाद सोडवायला इतका वेळ का लागला? कदाचित नम्र मनाच्या यहुदी लोकांना, या महत्त्वाच्या विषयाबद्दल आपला दृष्टिकोन बदलण्यासाठी यहोवाला पुरेसा वेळ द्यायचा असेल. कारण, त्यांचा प्रिय पूर्वज अब्राहाम याच्यासोबत १,९०० वर्षांआधी केलेला सुंतेचा करार रद्द होणं, ही त्यांच्यासाठी साधी गोष्ट नव्हती!—योहा. १६:१२.
१२ आपल्या प्रेमळ आणि धीर धरणाऱ्या स्वर्गातल्या पित्याकडून मार्गदर्शन मिळण्याचा आणि घडवलं जाण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे! देवाच्या मार्गदर्शनामुळे नेहमी चांगलेच परिणाम होतात आणि आपला फायदाच होतो. (यश. ४८:१७, १८; ६४:८) तेव्हा आपण कधीही गर्विष्ठपणे आपल्याच मतांवर अडून राहू नये. तसंच, जेव्हा संघटनेत बदल होतात किंवा काही वचनांबद्दल आपली समज सुधारली जाते, तेव्हा आपण त्याच्या विरोधात बोलणं टाळलं पाहिजे. (उप. ७:८) अशी वृत्ती आपल्यामध्ये थोड्याही प्रमाणात आहे, असं जर तुम्हाला वाटलं, तर तुम्ही प्रेषितांची कार्यं पुस्तकातल्या १५ व्या अध्यायात दिलेल्या उपयोगी तत्त्वांवर प्रार्थनापूर्वक मनन करू शकता.d
१३. सेवाकार्यात आपण यहोवासारखा धीर कसा दाखवू शकतो?
१३ कधीकधी आपण ज्यांच्यासोबत बायबल अभ्यास करतो, त्या लोकांच्या मनात अनेक वर्षांपासून असलेले काही खोटे विश्वास किंवा देवाच्या वचनानुसार नसलेल्या प्रथा सोडणं त्यांना कठीण वाटू शकतं. अशा वेळी आपल्याला धीर दाखवावा लागतो. विद्यार्थ्याच्या मनावर पवित्र शक्तीचा प्रभाव पडण्यासाठी आपल्याला कदाचित पुरेसा वेळ द्यावा लागेल. (१ करिंथ. ३:६, ७) तसंच, आपण त्याविषयी प्रार्थना करत राहण्याची गरज आहे. त्यांना कशी मदत करायची याबद्दल यहोवा आपल्याला योग्य वेळी कोणत्या ना कोणत्या मार्गाने नक्कीच मार्गदर्शन करेल.—१ योहा. ५:१४.
त्यांनी प्रोत्साहन देणारे अनुभव “सविस्तरपणे” सांगितले (प्रे. कार्यं १५:३-५)
१४, १५. अंत्युखियाच्या बांधवांनी, यरुशलेमला निघालेल्या बांधवांबद्दल आदर कसा दाखवला, आणि या बांधवांच्या भेटीमुळे फेनिके व शोमरोनच्या बांधवांना कसं प्रोत्साहन मिळालं?
१४ लूक या अहवालात पुढे असं म्हणतो: “त्यामुळे मंडळीने काही अंतरापर्यंत त्यांच्यासोबत जाऊन त्यांना निरोप दिला. मग ही माणसं फेनिके आणि शोमरोन या प्रांतांतून प्रवास करत गेली. आणि विदेशी लोक कशा प्रकारे परिवर्तन करून देवाकडे वळले, हे त्यांनी तिथल्या बांधवांना सविस्तरपणे सांगितलं. यामुळे बांधवांना खूप आनंद झाला.” (प्रे. कार्यं १५:३) मंडळीतले बांधव, पौल आणि बर्णबा व इतर बांधवांसोबत काही अंतरापर्यंत गेले. यावरून त्यांचं ख्रिस्ती प्रेम आणि त्या बांधवांबद्दलचा आदर दिसून येतो. तसंच, यावरून हेही दिसून येतं, की देवाचा आशीर्वाद या बांधवांवर असावा, असं मंडळीला वाटत होतं. पुन्हा अंत्युखियामधल्या बांधवांनी आपल्यासाठी एक चांगलं उदाहरण मांडलं आहे. आपल्या ख्रिस्ती भाऊबहिणींबद्दल, “खासकरून जे [वडील] बोलण्याच्या आणि शिकवण्याच्या बाबतीत मेहनत घेतात” त्यांच्याबद्दल आपण असाच आदर दाखवतो का?—१ तीम. ५:१७.
१५ यरुशलेमला जायला निघालेल्या बांधवांना प्रवासात फेनिके आणि शोमरोन ही शहरं लागली. तिथल्या बांधवांना त्यांच्या भेटीमुळे खूप प्रोत्साहन मिळालं. कदाचित त्या शहरांमध्ये असे यहुदी ख्रिस्तीसुद्धा असावेत, जे स्तेफन शहीद झाल्यावर तिथे पळून आले होते. बांधवांनी त्यांना, विदेश्यांना प्रचार करताना मिळालेले अनुभव “सविस्तरपणे” सांगून प्रोत्साहन दिलं. त्याप्रमाणेच, आजही शिष्य बनवण्याच्या कार्यावर यहोवा कसा आशीर्वाद देत आहे, याबद्दलच्या अहवालांमुळे खासकरून परीक्षांचा सामना करत असलेल्या बांधवांना प्रोत्साहन मिळतं. असे अहवाल मंडळीतल्या सभांमध्ये, संमेलनांमध्ये आणि अधिवेशनांमध्ये सांगितले जातात. तसंच, अशा बांधवांचे अनुभव आणि जीवन कथा आपण आपल्या प्रकाशनांमध्ये किंवा jw.org वर वाचू शकतो. तुम्ही या अहवालांतून प्रोत्साहन मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहात का?
१६. सुंतेचा विषय खूप गंभीर बनला होता हे कशावरून दिसतं?
१६ यानंतर दक्षिणेकडे सुमारे ५५० किलोमीटर प्रवास केल्यानंतर ते बांधव यरुशलेमला पोहोचले. लूकने लिहिलं: “यरुशलेमला आल्यावर मंडळीतल्या बांधवांनी, प्रेषितांनी आणि वडिलांनी आनंदाने त्यांचं स्वागत केलं. मग पौल आणि बर्णबा यांनी, देवाने त्यांच्या हातून घडवून आणलेल्या पुष्कळ गोष्टींबद्दल त्या बांधवांना सांगितलं.” (प्रे. कार्यं १५:४) पण या गोष्टी ऐकून, “परूश्यांच्या पंथातून, ज्यांनी विश्वास स्वीकारला होता असे काही जण आपल्या जागेवरून उठून म्हणाले: ‘परिवर्तन झालेल्या विदेशी लोकांची सुंता झाली पाहिजे. त्यांना मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करायची आज्ञा दिली पाहिजे.’” (प्रे. कार्यं १५:५) खरंच, विदेशी लोकांच्या सुंतेचा विषय खूप गंभीर बनला होता. आणि हा वाद सोडवणं आता खूप गरजेचं होतं.
‘प्रेषित आणि वडील एकत्र जमले’ (प्रे. कार्यं १५:६-१२)
१७. यरुशलेममधल्या नियमन मंडळात कोण-कोण होतं, आणि त्यांच्यात ‘वडिलांचा’ समावेश का करण्यात आला होता?
१७ नीतिवचनं १३:१० मध्ये म्हटलं आहे, “जे सल्ला घेतात, ते बुद्धिमान असतात.” या तत्त्वानुसार, “प्रेषित आणि वडील [सुंतेच्या] विषयावर चर्चा करायला एकत्र जमले.” (प्रे. कार्यं १५:६) ज्याप्रमाणे आजचं नियमन मंडळ सर्व ख्रिस्ती मंडळ्यांच्या वतीने निर्णय घेतं, त्याचप्रमाणे “प्रेषित आणि वडील” तेव्हा निर्णय घेण्यासाठी जमले. नियमन मंडळात, प्रेषितांसोबत “वडील” का सेवा करत होते? तुम्हाला आठवत असेल, की प्रेषित याकोबला मृत्युदंड देण्यात आला होता. तसंच, काही काळासाठी तरी प्रेषित पेत्रला तुरुंगात टाकण्यात आलं होतं. अशीच परिस्थिती इतर प्रेषितांवरही येण्याची शक्यता होती. त्यामुळे पुढाकार घेण्याची योग्यता असलेले वडील नियमन मंडळात असल्यामुळे देखरेखीचं काम कायम चालू राहू शकत होतं.
१८, १९. पेत्र काय बोलला, आणि त्यामुळे त्याच्या श्रोत्यांना कोणती गोष्ट समजायला हवी होती?
१८ लूक पुढे म्हणतो: “मग बरीच चर्चा झाल्यावर पेत्र उठला आणि त्यांना म्हणाला: ‘माणसांनो, बांधवांनो, माझ्या तोंडून विदेशी लोकांनी आनंदाचा संदेश ऐकावा आणि विश्वास ठेवावा म्हणून, देवाने पूर्वीपासूनच तुमच्यामधून माझी निवड केली हे तुम्हाला माहीतच आहे. आणि अंतःकरण जाणणाऱ्या देवाने आपल्याप्रमाणेच त्यांनाही पवित्र शक्ती देऊन या गोष्टीची साक्ष दिली. त्याने त्यांच्यात आणि आपल्यात कोणताच भेदभाव केला नाही. तर, त्याने त्यांच्या विश्वासामुळे त्यांची अंतःकरणं शुद्ध केली.’” (प्रे. कार्यं १५:७-९) एका संदर्भ ग्रंथानुसार, ज्या ग्रीक शब्दाचं भाषांतर ७ व्या वचनात “चर्चा” असं केलं आहे, त्याचा अर्थ “शोधणं” किंवा “प्रश्न विचारणं” असाही होऊ शकतो. यावरून असं दिसतं, की बांधवांना आपापली मतं योग्य आहेत असं प्रामाणिकपणे वाटत होतं आणि त्यांनी ही मतं स्पष्टपणे व्यक्त केली.
१९ पेत्रच्या या प्रभावी शब्दांमुळे सर्वांना या गोष्टीची आठवण झाली, की जेव्हा इ.स. ३६ मध्ये पहिल्या विदेश्यांना, म्हणजे कर्नेल्य आणि त्याच्या कुटुंबाला पवित्र शक्तीने अभिषिक्त करण्यात आलं, तेव्हा पेत्र तिथे स्वतः हजर होता. मग जर आता यहोवा यहुदी आणि विदेशी लोकांमध्ये फरक करत नव्हता, तर माणसांना असा फरक करण्याचा खरंच अधिकार होता का? नक्कीच नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे, मोशेच्या नियमशास्त्राचं पालन केल्याने नाही, तर येशूवर विश्वास ठेवल्याने एक व्यक्ती नीतिमान ठरते.—गलती. २:१६.
२०. सुंता केलीच पाहिजे असं म्हणणारे ‘देवाची परीक्षा पाहत’ होते असं का म्हणता येईल?
२० देवाच्या वचनाच्या आधारे आणि पवित्र शक्तीद्वारे पेत्रने दिलेली साक्ष कोणीही खोटी ठरवू शकत नव्हतं. म्हणून शेवटी तो म्हणाला: “तर मग, आपल्या पूर्वजांना किंवा आपल्यालाही जे वाहता आलं नाही, असं जड ओझं या शिष्यांच्या मानेवर लादून तुम्ही देवाची परीक्षा का पाहताय? उलट, त्यांच्याप्रमाणे प्रभू येशूच्या अपार कृपेनेच आपलंही तारण होतं, असा विश्वास आपण बाळगतो.” (प्रे. कार्यं १५:१०, ११) सुंता केलीच पाहिजे असं म्हणणारे, खरंतर ‘देवाची परीक्षा पाहत’ होते. किंवा एका भाषांतरात म्हटल्याप्रमाणे ‘त्याच्या धीराचा अंत पाहत होते.’ ते विदेश्यांवर असा नियम लादण्याचा प्रयत्न करत होते, जो ते स्वतः पूर्णपणे पाळू शकत नव्हते आणि ज्यामुळे ते मृत्युदंडाला पात्र ठरले होते. (गलती. ३:१०) याउलट, देवाने येशूच्याद्वारे अपार कृपा दाखवल्याबद्दल पेत्रच्या यहुदी श्रोत्यांनी खरंतर देवाचे आभार मानायला हवे होते.
२१. बर्णबा आणि पौल यांनी चर्चेत कसा सहभाग घेतला?
२१ पेत्रच्या शब्दांचा त्याच्या श्रोत्यांवर जबरदस्त प्रभाव पडला असावा, कारण “जमलेले सगळे लोक शांत झाले.” त्यानंतर बर्णबा आणि पौल यांनी “देवाने आपल्या हातून विदेशी लोकांमध्ये केलेली बरीच चिन्हं आणि चमत्कार, यांबद्दल” त्यांना सांगितलं. (प्रे. कार्यं १५:१२) आता प्रेषित आणि वडील सर्व पुराव्यांच्या आधारावर निर्णय घेऊ शकत होते. या निर्णयामुळे सुंतेविषयी देवाची इच्छा काय आहे हे सर्वांना स्पष्टपणे कळणार होतं.
२२-२४. (क) आजचं नियमन मंडळ पहिल्या शतकातल्या नियमन मंडळाचं अनुकरण कसं करतं? (ख) वडील देवाच्या संघटनेतल्या व्यवस्थेला आदर कसा दाखवू शकतात?
२२ आजही जेव्हा नियमन मंडळाच्या बांधवांची सभा होते, तेव्हा ते मार्गदर्शनासाठी देवाच्या वचनाची मदत घेतात आणि पवित्र शक्ती मिळण्यासाठी कळकळीने प्रार्थना करतात. (स्तो. ११९:१०५; मत्त. ७:७-११) देवाच्या इच्छेनुसार निर्णय घेता यावेत यासाठी, नियमन मंडळातल्या प्रत्येक बांधवाला सभेत चर्चा केले जाणारे मुद्दे आधीच सांगितले जातात. त्यामुळे या बांधवांना प्रत्येक मुद्द्यावर प्रार्थनापूर्वक विचार करता येतो. (नीति. १५:२८) या सभांमध्ये हे अभिषिक्त बांधव मोकळेपणाने आणि आदराने आपली मतं मांडतात. चर्चा होत असताना बायबलचा नेहमी आधार घेतला जातो.
२३ मंडळीतल्या वडिलांनीही या बांधवांचं अनुकरण केलं पाहिजे. जर वडिलांच्या सभेमध्ये एखाद्या मुद्द्यावर चर्चा करूनही एखादी गंभीर समस्या सुटली नाही, तर वडीलवर्ग शाखा कार्यालयाची किंवा शाखा कार्यालयाने नेमलेल्या बांधवांची, जसं की विभागीय पर्यवेक्षकांची मदत घेऊ शकतो. आणि तरीही जर समस्या सुटली नाही, तर शाखा कार्यालय नियमन मंडळाला त्याविषयी लिहून कळवू शकतं.
२४ खरंच, जे देवाच्या संघटनेतल्या व्यवस्थेचा आदर करतात आणि नम्रता, एकनिष्ठा आणि धीर दाखवतात त्यांना यहोवा आशीर्वाद देतो. आणि देव जे आशीर्वाद देतो ते म्हणजे खरी शांती, आध्यात्मिक वाढ आणि ख्रिस्ती एकता. पहिल्या शतकातल्या मंडळीला हे आशीर्वाद कसे मिळाले, हे आपण पुढच्या अध्यायात पाहणार आहोत.
a “यहुदी मत समर्थकांच्या शिकवणी” ही चौकट पाहा.
b सुंतेचा करार हा अब्राहामच्या कराराचा भाग नव्हता. अब्राहामचा करार आजही लागू होतो. इ.स.पू. १९४३ मध्ये अब्राहामने (अब्रामने) कनानमध्ये जाण्यासाठी फरात नदी पार केली, तेव्हापासून हा करार लागू झाला. त्या वेळी तो ७५ वर्षांचा होता. नंतर, इ.स.पू. १९१९ मध्ये सुंतेचा करार करण्यात आला. तेव्हा अब्राहाम ९९ वर्षांचा होता.—उत्प. १२:१-८; १७:१, ९-१४; गलती. ३:१७.
c तीत हा ग्रीक ख्रिस्ती, जो नंतर पौलचा विश्वासू साथीदार आणि संदेश पोहोचवणारा बनला, तो या लोकांसोबत यरुशलेमला गेला असावा असं दिसतं. (गलती. २:१; तीत १:४) सुंता न झालेल्या विदेश्यांनाही पवित्र शक्ती मिळू शकते, याचं तो एक उत्तम उदाहरण होता.—गलती. २:३.
d “यहोवाच्या साक्षीदारांचे विश्वास बायबलवर आधारित आहेत” ही चौकट पाहा.