अध्याय ८
“मंडळीत शांतीचा काळ आला”
मंडळीचा क्रूरपणे छळ करणारा शौल एक आवेशी सेवक बनतो
प्रे. कार्यं ९:१-४३ वर आधारित
१, २. दिमिष्कला जाऊन शौल काय करणार होता?
काही माणसं दिमिष्ककडे निघाली आहेत. त्यांच्या चेहऱ्यांवर अगदी क्रूर भाव आहे, कारण दिमिष्कला जाऊन त्यांना एक दुष्ट योजना पूर्ण करायची आहे. द्वेषाने पेटलेली ही माणसं, येशूच्या शिष्यांना सर्व लोकांसमोर त्यांच्या घराबाहेर ओढून, त्यांचे हातपाय बांधून यरुशलेममध्ये न्यायसभेसमोर हजर करणार आहेत.
२ त्यांच्या टोळीचा प्रमुख शौल आहे. याआधीच तो एका शिष्याच्या हत्येत सहभागी झाला होता.a थोड्याच काळाआधी शौलसारख्याच धर्मांध यहुद्यांनी येशूचा विश्वासू शिष्य स्तेफन याची दगडमार करून हत्या केली, तेव्हा शौल प्रत्यक्ष तिथे हजर होता आणि त्या हत्येला त्याचीही मान्यता होती. (प्रे. कार्यं ७:५७–८:१) पण फक्त यरुशलेममध्ये राहणाऱ्या ख्रिस्ती शिष्यांचा छळ करून शौलचं समाधान होत नाही. तर, तो इतर ठिकाणी राहणाऱ्या ख्रिश्चनांचाही छळ करण्याचा निश्चय करतो. त्याला कसंही करून ‘प्रभूचा मार्ग’ म्हटलेल्या या त्रासदायक पंथाचा समूळ नाश करायचा आहे.—प्रे. कार्यं ९:१, २; “दिमिष्कात शौलचा अधिकार” ही चौकट पाहा.
३, ४. (क) शौलसोबत काय घडलं? (ख) आपण कोणत्या प्रश्नांवर विचार करणार आहोत?
३ पण अचानक, शौलच्या भोवती एक तेजस्वी प्रकाश चमकला. त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्यांनाही तो प्रकाश दिसला, पण ते इतके आश्चर्यचकित झाले की त्यांना काहीच बोलता आलं नाही. शौल आंधळा झाला आणि जमिनीवर पडला. त्याला काहीही दिसत नव्हतं, पण त्याला आकाशातून एक आवाज ऐकू आला. तो त्याला म्हणाला, “शौल, शौल, तू मला का छळत आहेस?” शौलचा आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही. त्याने विचारलं, “प्रभू, तू कोण आहेस?” त्याला उत्तर मिळालं, “मी येशू, ज्याला तू छळत आहेस.” हे ऐकून शौलला धक्काच बसला.—प्रे. कार्यं ९:३-५; २२:९.
४ येशू शौलला जे म्हणाला त्यावरून आपल्याला काय समजतं? शौलच्या परिवर्तनाच्या वेळी घडलेल्या घटनांचं परीक्षण केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो? आणि, शौलच्या परिवर्तनानंतर आलेल्या शांतीच्या काळाचा मंडळीने ज्या प्रकारे चांगला वापर केला, त्यावरून आपल्याला कोणते धडे शिकायला मिळतात?
“तू मला का छळत आहेस?” (प्रे. कार्यं ९:१-५)
५, ६. येशू शौलला जे म्हणाला त्यावरून आपल्याला काय समजतं?
५ शौल दिमिष्कला जात असताना येशूने त्याला थांबवून, “तू माझ्या शिष्यांचा छळ का करत आहेस?” असं विचारलं नाही. तर वरती सांगितल्याप्रमाणे “तू मला का छळत आहेस?” असं त्याने विचारलं. (प्रे. कार्यं ९:४) यावरून आपल्याला कळतं, की जेव्हा येशूच्या शिष्यांवर कठीण प्रसंग येतात, तेव्हा त्यांच्याप्रमाणे स्वतः येशूलाही दुःख होतं.—मत्त. २५:३४-४०, ४५.
६ म्हणून, जर ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे तुमचा छळ केला जात असेल, तर यहोवा आणि येशू या दोघांनाही तुमच्या परिस्थितीची जाणीव आहे, याची खातरी तुम्ही बाळगू शकता. (मत्त. १०:२२, २८-३१) कदाचित तुमच्यावर आलेला कठीण प्रसंग लगेच दूर होणार नाही. पण विचार करा, शौलने स्तेफनच्या हत्येत सहभाग घेतला तेव्हा येशूने ते पाहिलं होतं; तसंच, यरुशलेममध्ये शौलने विश्वासू शिष्यांना त्यांच्या घरांतून ओढून बाहेर काढलं, तेव्हाही त्याने ते पाहिलं होतं. (प्रे. कार्यं ८:३) पण, येशूने लगेच मधे पडून आपल्या त्या शिष्यांना वाचवलं नाही. तरीही, स्तेफन आणि त्या इतर शिष्यांना विश्वासात टिकून राहण्यासाठी लागणारी शक्ती, यहोवाने ख्रिस्ताद्वारे नक्कीच त्यांना दिली.
७. छळ होत असतानाही तुम्ही विश्वासात कसे टिकून राहू शकता?
७ पुढील गोष्टी केल्या, तर तुम्ही छळ होत असतानाही विश्वासात टिकून राहू शकाल: (१) काहीही झालं तरी यहोवाला एकनिष्ठ राहण्याचा मनाशी निश्चय करा. (२) यहोवाकडे मदतीसाठी प्रार्थना करा. (फिलिप्पै. ४:६, ७) (३) सूड घेणं यहोवावर सोडून द्या. (रोम. १२:१७-२१) (४) तो कठीण प्रसंग जोपर्यंत यहोवा काढून टाकत नाही, तोपर्यंत धीराने सहन करण्यासाठी लागणारी शक्ती तो तुम्हाला देईल हा भरवसा ठेवा.—फिलिप्पै. ४:१२, १३.
“शौल, माझ्या भावा, . . . [प्रभू येशूने] मला तुझ्याकडे पाठवलंय” (प्रे. कार्यं ९:६-१७)
८, ९. हनन्यावर सोपवलेल्या कामगिरीबद्दल त्याला कदाचित कसं वाटलं असेल?
८ “प्रभू, तू कोण आहेस?” या शौलच्या प्रश्नाचं उत्तर दिल्यावर येशू त्याला म्हणाला, “आता ऊठ आणि शहरात जा आणि पुढे काय करायचं ते तुला सांगितलं जाईल.” (प्रे. कार्यं ९:६) मग, आंधळा झालेल्या शौलला त्याच्या सोबत्यांनी दिमिष्कला आणलं. तिथे शौलने तीन दिवस उपास आणि प्रार्थना केली. यादरम्यान, येशू त्याच शहरात राहणाऱ्या हनन्या नावाच्या एका शिष्याशी शौलबद्दल बोलला. दिमिष्कमध्ये राहणारे सर्व यहुदी हनन्याचा आदर करायचे.—प्रे. कार्यं २२:१२.
९ येशूने हनन्याला शौलबद्दल सांगितलं, तेव्हा त्याला कसं वाटलं असेल याची कल्पना करा! ख्रिस्ती मंडळीचं नेतृत्व करणारा, पुनरुत्थान झालेला येशू ख्रिस्त स्वतः त्याच्याशी बोलत होता. त्याने त्याला एका खास कामगिरीसाठी निवडलं होतं. हा एक मोठा सन्मान तर होताच, पण त्याच्यावर सोपवलेली कामगिरीही तितकीच कठीण होती! जेव्हा येशूने हनन्याला जाऊन शौलशी बोलायला सांगितलं, तेव्हा तो म्हणाला, “प्रभू, मी बऱ्याच जणांकडून या माणसाबद्दल ऐकलंय, की यरुशलेममध्ये त्याने तुझ्या पवित्र जनांचा छळ केला. आणि मुख्य याजकांनी तर त्याला तुझं नाव घेणाऱ्या सगळ्यांना अटक करायचा अधिकारही दिलाय.”—प्रे. कार्यं ९:१३, १४.
१०. येशू हनन्याशी जसा वागला त्यावरून आपल्याला येशूबद्दल काय शिकायला मिळतं?
१० हनन्याने त्याला वाटणारी चिंता व्यक्त केल्याबद्दल येशू त्याच्यावर रागावला नाही. उलट, येशूने त्याला अगदी स्पष्ट सूचना दिल्या. तसंच, हे कठीण काम त्याच्यावर का सोपवण्यात आलं होतं, हे स्पष्ट करून येशूने त्याच्याबद्दल आदरही दाखवला. येशूने शौलबद्दल हनन्याला असं सांगितलं, “हा माणूस माझ्यासाठी एक निवडलेलं पात्र आहे. तो विदेश्यांना, तसंच राजांना आणि इस्राएलच्या मुलांना माझ्या नावाची घोषणा करेल. माझ्या नावासाठी त्याला कायकाय सोसावं लागेल हे मी त्याला स्पष्टपणे दाखवीन.” (प्रे. कार्यं ९:१५, १६) हनन्याने लगेच येशूच्या सूचनांप्रमाणे केलं. त्याने ख्रिश्चनांचा छळ करणाऱ्या शौलला शोधलं आणि तो त्याला म्हणाला, “शौल, माझ्या भावा, तू रस्त्याने येत असताना ज्या प्रभू येशूने तुला दर्शन दिलं, त्यानेच मला तुझ्याकडे पाठवलंय. तुझी दृष्टी तुला परत मिळावी आणि तू पवित्र शक्तीने भरून जावं म्हणून त्याने मला पाठवलंय.”—प्रे. कार्यं ९:१७.
११, १२. येशू, हनन्या आणि शौल यांच्याबद्दलच्या घटनांतून आपण कोणकोणत्या गोष्टी शिकतो?
११ येशू, हनन्या आणि शौल यांच्याबद्दलच्या या घटनांतून आपल्याला काही गोष्टी स्पष्टपणे समजतात. उदाहरणार्थ, येशूने त्याच्या शिष्यांना वचन दिल्याप्रमाणे तो प्रचारकार्याचं खरोखरच मार्गदर्शन करत आहे. (मत्त. २८:२०) आज जरी तो आपल्यापैकी प्रत्येकाशी बोलत नसला, तरी आता त्याने एका विश्वासू दासाला आपल्या परिवारावर नेमलं आहे, आणि त्याच्याद्वारे तो प्रचारकार्याचं मार्गदर्शन करतो. (मत्त. २४:४५-४७) नियमन मंडळाच्या देखरेखीखाली प्रचारक आणि पायनियरांना अशा लोकांना शोधण्यासाठी पाठवलं जातं, ज्यांना ख्रिस्ताबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. याआधीच्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे, अशा कित्येक व्यक्तींनी देवाच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना केल्यानंतर यहोवाच्या साक्षीदारांशी त्यांची भेट झाली.—प्रे. कार्यं ९:११.
१२ हनन्याला सोपवण्यात आलेलं काम त्याने आज्ञाधारकपणे स्वीकारलं आणि यामुळे त्याला आशीर्वाद मिळाला. अगदी पूर्णपणे साक्ष देण्याच्या आज्ञेचं तुम्हीही पालन करत आहात का? हे काम जेव्हा तुम्हाला थोडं कठीण वाटतं, तेव्हाही तुम्ही ते करता का? काही जणांना लोकांच्या घरोघरी जायला आणि अनोळखी लोकांना भेटून त्यांच्याशी बोलायला भीती वाटते. तर इतर जणांना दुकानांमध्ये किंवा ऑफिसांमध्ये, रस्त्यावर किंवा टेलिफोनने किंवा मग पत्रं लिहून लोकांना राज्याचा संदेश सांगणं कठीण वाटतं. हनन्याने आपल्या भीतीवर मात केली आणि त्यामुळे त्याला शौलला पवित्र शक्ती मिळवायला मदत करण्याचा खास सन्मान मिळाला.b हनन्याने येशूवर भरवसा ठेवला आणि त्याने शौलला आपला भाऊ मानलं. त्यामुळे, त्याला सोपवण्यात आलेलं काम तो चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकला. जर हनन्याप्रमाणे, आपल्यालाही आपल्या भीतीवर मात करून प्रचारकार्यात यशस्वी व्हायचं असेल, तर येशू आज प्रचारकार्याचं मार्गदर्शन करत आहे हा भरवसा आपण ठेवला पाहिजे. तसंच, आपण स्वतःला लोकांच्या जागी ठेवून त्यांच्याबद्दल विचार केला पाहिजे. आणि ज्यांची आपल्याला भीती वाटते असे लोकसुद्धा भविष्यात आपले बांधव होऊ शकतात, असा दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे.—मत्त. ९:३६.
त्याने येशूबद्दल “प्रचार करायला सुरुवात केली” (प्रे. कार्यं ९:१८-३०)
१३, १४. जर तुम्ही बायबलचा अभ्यास करत असाल, पण अजून बाप्तिस्मा घेतला नसेल, तर शौलच्या उदाहरणावरून तुम्ही काय शिकू शकता?
१३ शौलला ज्या गोष्टी समजल्या त्यांनुसार त्याने लगेच पाऊल उचललं. त्याला पुन्हा दिसू लागल्यावर, त्याने बाप्तिस्मा घेतला आणि तो दिमिष्कातल्या शिष्यांसोबत मिळून उपासना करू लागला. इतकंच नाही, तर “लगेच त्याने सभास्थानांत असा प्रचार करायला सुरुवात केली, की येशू हाच देवाचा मुलगा आहे.”—प्रे. कार्यं ९:२०.
१४ जर तुम्ही बायबलचा अभ्यास करत असाल, पण अजून बाप्तिस्मा घेतला नसेल, तर तुम्हीही शौलप्रमाणे तुम्हाला शिकायला मिळालेल्या गोष्टींनुसार योग्य निर्णय घ्याल का? हे मान्य आहे, की ख्रिस्ताने केलेला एक चमत्कार शौलला प्रत्यक्ष पाहायला मिळाला होता आणि त्यामुळेच त्याला योग्य पावलं उचलण्याची प्रेरणा मिळाली. पण, येशूने केलेले चमत्कार इतरांनीही पाहिले होते. उदाहरणार्थ, येशूने एका वाळलेल्या हाताच्या माणसाला बरं केलं, तेव्हा बऱ्याच परूश्यांनी तो चमत्कार पाहिला होता. तसंच, अनेक यहुद्यांना येशूने लाजरला पुन्हा जिवंत केल्याचं माहीत होतं. तरीसुद्धा, त्यांच्यापैकी बहुतेक जणांनी येशूवर विश्वास ठेवला नाही, आणि अनेकांनी तर त्याचा विरोधही केला. (मार्क ३:१-६; योहा. १२:९, १०) पण, शौल मात्र पूर्णपणे बदलला. शौल स्वतःमध्ये असा बदल का करू शकला? कारण माणसांपेक्षा त्याला देवाची भीती होती आणि ख्रिस्ताने त्याच्यावर जी दया केली होती, त्याची त्याला मनापासून कदर होती. (फिलिप्पै. ३:८) तुम्ही पौलसारखीच मनोवृत्ती दाखवली, तर प्रचारकार्यात सहभागी होण्यापासून आणि बाप्तिस्मा घेण्यापासून कोणतीही गोष्ट तुम्हाला रोखू शकणार नाही.
१५, १६. शौलने सभास्थानांत काय केलं, आणि दिमिष्कातल्या यहुद्यांनी कसा प्रतिसाद दिला?
१५ शौल जेव्हा सभास्थानांत येशूबद्दल प्रचार करू लागला, तेव्हा लोकांना किती आश्चर्य वाटलं असेल याची कल्पना करा. काहींना तर खूप रागही आला असेल. काही जण म्हणू लागले, “यरुशलेममध्ये हे नाव घेणाऱ्यांचा ज्याने क्रूरपणे छळ केला, तो हाच माणूस आहे ना?” (प्रे. कार्यं ९:२१) येशूबद्दल आपला दृष्टिकोन कसा बदलला हे शौलने त्यांना सांगितलं आणि “येशू हाच ख्रिस्त आहे हे तर्काच्या आधारावर सिद्ध” करून दाखवलं. (प्रे. कार्यं ९:२२) पण तर्क करून नेहमीच उपयोग होत नाही. कारण कितीही चांगल्या प्रकारे तर्क केला, तरी ज्या लोकांवर रितीरिवाजांचा पगडा आहे आणि ज्यांच्या मनात अहंकार भरला आहे त्यांच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. असं असूनही शौल प्रयत्न करतच राहिला.
१६ तीन वर्षांनंतरही दिमिष्कातले यहुदी शौलचा विरोध करतच होते. शेवटी, त्यांनी त्याला ठार मारायचा कट रचला. (प्रे. कार्यं ९:२३; २ करिंथ. ११:३२, ३३; गलती. १:१३-१८) त्यांचा हा कट शौलला कळला. तेव्हा, बांधवांनी गुपचूप शौलला एका मोठ्या टोपलीत बसवून शहराच्या भिंतीतल्या एका खिडकीतून खाली उतरवलं. ज्यांनी शौलला तिथून पळून जायला मदत केली, त्यांना लूक ‘शौलचे शिष्य’ म्हणतो. (प्रे. कार्यं ९:२५) यावरून असं दिसतं, की शौलने दिमिष्कात ज्यांना प्रचार केला होता, त्यांच्यापैकी काही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता आणि ते ख्रिस्ताचे शिष्य बनले होते.
१७. (क) लोक बायबलच्या सत्याला कसा प्रतिसाद देतात? (ख) आपण काय करत राहिलं पाहिजे आणि का?
१७ तुम्ही जेव्हा पहिल्यांदा तुमच्या कुटुंबातल्या लोकांना, मित्रांना आणि इतरांना तुम्ही शिकत असलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल सांगायला सुरुवात केली, तेव्हा कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल, की बायबलच्या शिकवणी मनाला पटण्यासारख्या असल्यामुळे सगळे जण त्या लगेच स्वीकारतील. काही जणांनी कदाचित त्या स्वीकारल्याही असतील; पण अनेकांनी त्या स्वीकारल्या नसतील. इतकंच काय, तर तुमच्या स्वतःच्या कुटुंबातले लोक तुमच्याशी शत्रूंसारखे वागले असतील. (मत्त. १०:३२-३८) पण, जर तुम्ही बायबलच्या आधारावर तर्क करण्याची कला शिकून घेण्याचा प्रयत्न करत राहिलात, आणि ख्रिस्ती गुण दाखवत राहिलात, तर जे तुमचा विरोध करतात त्यांची मनोवृत्तीही पुढे बदलू शकते.—प्रे. कार्यं १७:२; १ पेत्र २:१२; ३:१, २, ७.
१८, १९. (क) बर्णबाने शौलबद्दल बांधवांना खातरी दिली तेव्हा काय परिणाम झाला? (ख) आपण बर्णबा आणि शौल यांचं अनुकरण कसं करू शकतो?
१८ शौल यरुशलेममध्ये आल्यावर, आपण आता ख्रिस्ताचा शिष्य बनल्याचं त्याने सांगितलं तेव्हा साहजिकच शिष्यांना शंका आली असेल. पण, बर्णबाने शिष्यांना खातरी दिली, तेव्हा प्रेषितांनी शौलचा स्वीकार केला आणि तो काही दिवस त्यांच्यासोबतच राहिला. (प्रे. कार्यं ९:२६-२८) शौल सावधपणे वागला, पण आनंदाच्या संदेशाची त्याला कधीही लाज वाटली नाही. (रोम. १:१६) त्याने यरुशलेममध्ये अगदी धैर्याने प्रचार केला; खरंतर, त्याने येशू ख्रिस्ताच्या शिष्यांचा क्रूरपणे छळ करायला इथूनच सुरुवात केली होती. जेव्हा यरुशलेममधल्या यहुद्यांना कळलं की ख्रिश्चनांचा छळ करण्यात पुढाकार घेणारा आता स्वतःच ख्रिस्ती बनला आहे, तेव्हा त्यांना धक्काच बसला आणि ते त्याला ठार मारायचा विचार करू लागले. अहवालात म्हटलं आहे, “बांधवांना याची खबर लागताच त्यांनी [शौलला] कैसरीयाला आणलं आणि तार्सला पाठवून दिलं.” (प्रे. कार्यं ९:३०) येशूने मंडळीद्वारे दिलेल्या मार्गदर्शनाचं पौलने नम्रपणे पालन केलं. यामुळे पौलला आणि मंडळीलाही फायदा झाला.
१९ बर्णबा शौलला मदत करण्यासाठी पुढे आला यावरून आपण काय शिकू शकतो? तो असा दयाळूपणे वागल्यामुळे यहोवाच्या या दोन आवेशी सेवकांमध्ये घनिष्ठ मैत्री निर्माण झाली. तुम्हीही मंडळीतल्या नवीन सदस्यांसोबत प्रचारात भाग घेऊन आणि त्यांना आध्यात्मिक प्रगती करायला मदत करून बर्णबाचं अनुकरण करता का? असं केल्यामुळे तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळतील. जर तुम्ही एक नवीन प्रचारक असाल, तर शौलप्रमाणे तुम्ही इतरांनी दिलेली मदत नम्रपणे स्वीकारता का? अनुभवी प्रचारकांसोबत काम केल्यामुळे सेवाकार्यात तुम्हाला आणखी परिणामकारक व्हायला मदत मिळेल, तुम्हाला या सेवेत जास्त आनंदाने सहभाग घेता येईल आणि त्या बांधवांसोबत जुळलेली तुमची मैत्री आयुष्यभर टिकेल.
“पुष्कळ जण प्रभूवर विश्वास ठेवू लागले” (प्रे. कार्यं ९:३१-४३)
२०, २१. आधीच्या आणि आजच्या काळातल्या देवाच्या सेवकांनी ‘शांतीच्या काळाचा’ कशा प्रकारे चांगला उपयोग केला?
२० शौलचं परिवर्तन झाल्यावर आणि तो यरुशलेममधून सुखरूप बाहेर पडल्यावर, “संपूर्ण यहूदीया, गालील आणि शोमरोन इथल्या मंडळीत शांतीचा काळ आला.” (प्रे. कार्यं ९:३१) या ‘चांगल्या काळाचा’ शिष्यांनी कशा प्रकारे उपयोग केला? (२ तीम. ४:२) अहवालात म्हटलं आहे की “मंडळीची उन्नती झाली.” प्रेषितांनी आणि इतर जबाबदार बांधवांनी शिष्यांचा विश्वास मजबूत केला आणि मंडळीत पुढाकार घेतला. यामुळे सर्व बांधव “यहोवाचं भय मानत होते” आणि “त्यांना पवित्र शक्तीद्वारे सांत्वन मिळालं.” उदाहरणार्थ, पेत्रने या काळात शारोन इथे असलेल्या लोद शहरातल्या शिष्यांना प्रोत्साहन दिलं. त्याच्या प्रयत्नांमुळे या भागात राहणारे बरेच लोक “प्रभूकडे वळले.” (प्रे. कार्यं ९:३२-३५) शिष्य इतर ध्येयांच्या मागे न लागता, एकमेकांची काळजी घेण्यात आणि आनंदाच्या संदेशाचा प्रचार करण्यात व्यस्त राहिले. याचा परिणाम असा झाला, की मंडळीत बांधवांची “संख्या वाढत गेली.”
२१ विसाव्या शतकाच्या शेवटी बऱ्याच देशांतल्या यहोवाच्या साक्षीदारांनीही अशाच प्रकारचा “शांतीचा काळ” अनुभवला. काही ठिकाणी, देवाच्या लोकांचा वर्षानुवर्षं छळ करणारी सरकारं अचानक पडली. तर, इतर ठिकाणी प्रचारकार्यावर असलेले प्रतिबंध एकतर कमी करण्यात आले किंवा बंदी उठवण्यात आली. जाहीरपणे प्रचार करण्याच्या या संधीचा लाखो साक्षीदारांनी फायदा घेतला आणि त्यांना त्याचे आश्चर्यकारक परिणाम मिळाले.
२२. तुम्हाला असलेल्या स्वातंत्र्याचा तुम्ही चांगला वापर कसा करू शकता?
२२ तुम्हाला असलेल्या स्वातंत्र्याचा तुम्ही चांगला वापर करत आहात का? जर तुम्ही धार्मिक स्वातंत्र्य असलेल्या देशात राहत असाल, तर सैतान मुद्दामहून तुम्हाला, यहोवाची सेवा सोडून संपत्तीच्या मागे लागण्याच्या मोहात पाडण्याचा प्रयत्न करेल. (मत्त. १३:२२) पण आपल्या ध्येयापासून कधीही भरकटू नका. जोपर्यंत थोडीफार शांती आहे, तोपर्यंत तिचा पुरेपूर उपयोग करा. असा विचार करा, की ही आपल्या क्षेत्रात अगदी पूर्णपणे साक्ष देण्याची आणि मंडळीतल्या बांधवांची उन्नती करण्याची चांगली संधी आहे. तुमची परिस्थिती कोणत्याही क्षणी बदलू शकते हे कधीही विसरू नका.
२३, २४. (क) तबीथाच्या अहवालातून आपल्याला कोणत्या गोष्टी शिकायला मिळतात? (ख) आपण काय करण्याचं ठरवू शकतो?
२३ तबीथा किंवा दुर्कस नावाच्या एका शिष्येसोबत काय झालं यावर विचार करा. ती लोदच्या जवळच असलेल्या यापो या शहरात राहायची. ही विश्वासू बहीण तिच्या वेळेचा आणि तिच्याजवळ असलेल्या गोष्टींचा चांगल्या प्रकारे उपयोग करायची. अहवालात म्हटलं आहे, की “ती इतरांसाठी बरीच चांगली कामं करायची आणि दानसुद्धा द्यायची.” पण अचानक ती आजारी पडली आणि तिचा मृत्यू झाला.c तिच्या मृत्यूमुळे यापो इथल्या शिष्यांना, खासकरून ज्यांना ती दयाळूपणे मदत करायची त्या विधवांना खूप दुःख झालं. तिच्या दफनविधीची तयार केली जात असताना पेत्र तिथे आला आणि त्याने येशू ख्रिस्ताच्या कोणत्याही प्रेषिताने याआधी केला नव्हता, असा चमत्कार केला. पेत्रने प्रार्थना करून तबीथाला पुन्हा जिवंत केलं! पेत्रने जेव्हा जिवंत झालेल्या तबीथाला पाहण्यासाठी त्या विधवांना आणि इतर शिष्यांना खोलीत बोलावलं तेव्हा त्यांना किती आनंद झाला असेल याची कल्पना करा. या सर्व घटनांमुळे पुढे येणाऱ्या परीक्षा सहन करण्यासाठी शिष्यांना खरंच खूप धैर्य मिळालं असेल. साहजिकच, या चमत्काराबद्दलची “माहिती पूर्ण यापो शहरात पसरली आणि पुष्कळ जण प्रभूवर विश्वास ठेवू लागले.”—प्रे. कार्यं ९:३६-४२.
तुम्हीही तबीथाचं अनुकरण कराल का?
२४ तबीथाच्या या सुंदर अहवालातून आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. (१) आपलं जीवन कोणत्याही क्षणी संपू शकतं. त्यामुळे, संधी आहे तोपर्यंत आपण देवाच्या दृष्टीत चांगलं नाव कमवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (उप. ७:१) (२) पुनरुत्थानाची आशा निश्चित आहे. तबीथाने केलेली अनेक चांगली कामं यहोवाच्या नजरेतून सुटली नाहीत आणि त्याने तिला याचं चांगलं प्रतिफळ दिलं. त्याच प्रकारे, तो आपण घेतलेली मेहनतही विसरणार नाही आणि हर्मगिदोनच्या आधी आपला मृत्यू जरी झाला, तरी तो आपल्याला पुन्हा जिवंत करेल. (इब्री ६:१०) म्हणूनच, आज आपण “वाईट” काळात म्हणजेच संकटांच्या काळात राहत असोत, किंवा ‘शांतीच्या काळात’ राहत असोत, आपण ख्रिस्ताबद्दल अगदी पूर्णपणे साक्ष देण्याचं काम करत राहू या.—२ तीम. ४:२.
b सहसा, पवित्र शक्तीची दानं इतरांना प्रेषितांद्वारे दिली जायची. पण ही घटना थोडी वेगळी होती. कारण, असं दिसतं की शौलला पवित्र शक्तीची दानं देण्याचा अधिकार, येशूने हनन्याला दिला होता. शौलचं परिवर्तन झाल्यावर बऱ्याच काळापर्यंत त्याचा १२ प्रेषितांशी कोणताही संपर्क नव्हता. तरीपण, त्या काळातही तो प्रचारकार्य करत होता. यावरून हे स्पष्ट होतं, की प्रचाराचं कार्य करत राहण्यासाठी लागणारी शक्ती येशूने त्याला दिली.
c “‘बरीच चांगली कामं करणारी’—तबीथा” ही चौकट पाहा.