परिशिष्ट
घटस्फोट आणि विभक्ती याविषयी बायबलचा दृष्टिकोन
विवाहितांनी आपल्या वैवाहिक शपथा विश्वासूपणे पाळाव्यात अशी यहोवा त्यांच्याकडून अपेक्षा करतो. त्याने पहिला पुरुष व स्त्री यांचा विवाह लावताना म्हटले: “पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.” नंतर येशू ख्रिस्तानेही हे वाक्य पुन्हा उच्चारून पुढे म्हटले: “म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” (उत्पत्ति २:२४; मत्तय १९:३-६) यास्तव, यहोवा देव आणि येशू या दोघांच्या नजरेत विवाह हे एक चिरकालिक बंधन आहे जे वैवाहिक जोडीदारापैकी एकाचा मृत्यू झाल्यावरच संपुष्टात येते. (१ करिंथकर ७:३९) विवाह ही पवित्र व्यवस्था असल्यामुळे घटस्फोटाला आपण क्षुल्लक समजू नये. खरे तर, शास्त्रीय आधार नसलेल्या घटस्फोटाचा यहोवाला वीट आहे.—मलाखी २:१५, १६.
घटस्फोटासाठी शास्त्रीय आधार काय आहे? यहोवा, व्यभिचार आणि लैंगिक अनैतिकता यांची घृणा करतो. (उत्पत्ति ३९:९; २ शमुवेल ११:२६, २७; स्तोत्र ५१:४) त्याला लैंगिक अनैतिकतेचा इतका वीट आहे, की याच्या आधारावर घटस्फोट घेण्याची अनुमतीदेखील तो देतो. (लैंगिक अनैतिकतेत काय काय गोवलेले आहे याबद्दल अधिक माहितीकरता याच पुस्तकाचा अध्याय ९, परिच्छेद ७ पाहा. तेथे लैंगिक अनैतिकता म्हणजे काय ते समजावण्यात आले आहे.) यहोवाने, निरपराधी जोडीदाराला अपराधी जोडीदारासोबत राहायचे की घटस्फोट घ्यायचा हे ठरवण्याचा हक्क दिला आहे. (मत्तय १९:९) म्हणून, एखादा निरपराध जोडीदार घटस्फोट घेऊ इच्छित असेल तर यहोवाला त्या घटस्फोटाचा वीट वाटणार नाही. पण त्याचबरोबर, ख्रिस्ती मंडळीतील कोणीही घटस्फोट घेण्याचे उत्तेजन इतरांना देऊ नये. उलट, काही परिस्थितींमुळे, जर अपराधी जोडीदाराने मनापासून पश्चात्ताप केला असेल तर निरपराध जोडीदार त्याला क्षमा करून घटस्फोट घेणार नाही. पण, घटस्फोटाचा निर्णय घेणाऱ्या जोडीदाराने स्वखुशीने हा निर्णय घ्यावा आणि यामुळे होणारे परिणाम भोगायला तयार असावे.—गलतीकर ६:५.
काही अगदी टोकाच्या परिस्थितींत मात्र काही ख्रिश्चनांनी, आपल्या जोडीदाराने लैंगिक अनैतिकता केली नसतानाही, याच्यापासून/तिच्यापासून विभक्त होण्याचा किंवा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकरणांत बायबलमध्ये म्हटले आहे, की सोडून देणाऱ्या जोडीदाराने “लग्न केल्यावाचून राहावे किंवा . . . [पुन्हा] समेट करावा.” (१ करिंथकर ७:११) अशा ख्रिश्चन व्यक्तीने पुन्हा लग्न करण्याकरता दुसरा जोडीदार शोधणे योग्य ठरणार नाही. (मत्तय ५:३२) पुढे काही अपवादात्मक परिस्थितींविषयी सांगितले आहे जी काहींना, विभक्त होण्याकरता आधार असल्याचे वाटते.
मुद्दामहून बायको-मुलांना न सांभाळणे. नवरा धडधाकट असूनही आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबाला अतिशय हलाखीत दिवस काढावे लागतील, जीवनावश्यक असलेल्या मूलभूत गोष्टीसुद्धा त्यांना मिळत नसतील. बायबल म्हणते: “जर कोणी . . . आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे.” (१ तीमथ्य ५:८) अशा मनुष्याने आपले वर्तन न बदलल्यास, पत्नीला हे ठरवावे लागेल की स्वतःला व आपल्या मुलांना वाचवण्याकरता कायदेशीर रीत्या विभक्त होण्याची गरज आहे किंवा नाही. अर्थात ख्रिस्ती वडिलांनी, कुटुंबाचे पालनपोषण करण्याची जबाबदारी टाळणाऱ्या बांधवावर लावण्यात आलेल्या आरोपांची गंभीरपणे दखल घ्यावी. एखादा बांधव मुद्दामहून आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याला कदाचित मंडळीतून बहिष्कृत केले जाईल.
खूप मारहाण. मारहाण करणारा जोडीदार इतक्या हिंसकपणे वागत असेल की ज्यामुळे त्याच्या निरपराध जोडीदाराच्या आरोग्याला आणि जीवालाही धोका असेल. मारहाण करणारा सोबती ख्रिस्ती असेल तर मंडळीतल्या वडिलांनी हे आरोप खरे आहेत किंवा नाहीत याची चौकशी केली पाहिजे. रागाचे झटके येणाऱ्या व हिंसक वर्तन असणाऱ्या व्यक्तीला मंडळीतून बहिष्कृत केले जाते.—गलतीकर ५:१९-२१.
यहोवाची उपासना करण्यापासून एखाद्याला पूर्णपणे रोखणे. विवाह जोडीदारापैकी एकजण सतत, दुसऱ्या जोडीदाराला खरी उपासना करण्यापासून रोखत असेल किंवा या नाही तर त्या मार्गाने देवाच्या आज्ञा तोडायला भाग पाडत असेल. तर अशा वेळी, जीव धोक्यात असलेल्या जोडीदाराला, कायदेशीर रीत्या विभक्ती मिळवल्यानंतरच आपल्याला “मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा” मानता येईल असे वाटेल.—प्रेषितांची कृत्ये ५:२९.
वर चर्चा केलेल्या सर्व टोकाच्या परिस्थितींत, कोणीही निरपराध जोडीदारावर विभक्त होण्याचा किंवा सोबत राहण्याचा दबाव आणू नये. आध्यात्मिक मनाचे प्रौढ मित्रजन व वडीलजन त्यांना आधार व बायबलमधील सल्ला देऊ शकतात. परंतु, एका पती-पत्नीत नेमके काय चालले आहे त्याची सविस्तर माहिती कोणालाही नसते. फक्त यहोवाला असते. एका ख्रिस्ती पत्नीने अथवा पतीने, आपल्या जोडीदारापासून वेगळे राहण्याकरता कारण मिळावे म्हणून आपल्या घरगुती समस्या वाढवून-चढवून सांगितल्या तर ती अथवा तो देवाचा आणि विवाह व्यवस्थेचा आदर करणार नाही. विभक्त होण्याकरता एखाद्याने गुप्तपणे कितीही युक्त्या योजल्या तरी यहोवाला त्या कळतात. “ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे.” (इब्री लोकांस ४:१३) पण एखाद्या व्यक्तीची अतिशय धोकेदायक परिस्थिती असेल व ती खूप दिवसांपर्यंत तशीच असेल तर ती शेवटचा उपाय म्हणून विभक्त होण्याचा निर्णय घेते तेव्हा कोणीही त्या व्यक्तीची टीका करू नये. कारण सरतेशेवटी, “आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहो.”—रोमकर १४:१०-१२.