वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lv अध्या. ७ पृ. ८४-९७
  • देवाप्रमाणे तुम्हीही जीवन मौल्यवान समजता का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाप्रमाणे तुम्हीही जीवन मौल्यवान समजता का?
  • देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जीवन आणि रक्‍त पवित्र आहेत
  • रक्‍ताचा वैद्यकीय वापर
  • यहोवाच्या नियमांतून त्याचे पित्यासमान प्रेम दिसून येते
  • द्वेषपूर्ण विचार टाळा!
  • रक्‍तदोषी जगात निर्दोष राहा
  • राज्य संदेशाचा प्रचार करण्याद्वारे जीवनाबद्दल कदर दाखवा
  • जीवनाबद्दल देवाचा दृष्टिकोन
    बायबल नेमके काय शिकवते?
  • जीवनाच्या देणगीची उचित कदर बाळगा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • जीवनाच्या देणगीचा आदर करा
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • जिवंत देवाचे मार्गदर्शन स्वीकारणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
देवाच्या प्रेमात टिकून राहा
lv अध्या. ७ पृ. ८४-९७
एक स्ती बहीण हेल्थ प्रॉक्सी फॉर्मवर, वैद्यकिय उपचाबाबतीत तिनं घेतलेले निर्णय लिहित आहे

अध्याय ७

देवाप्रमाणे तुम्हीही जीवन मौल्यवान समजता का?

“जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे.”—स्तोत्र ३६:९.

१, २. (क) देवाकडून आपल्याला कोणती देणगी मिळाली आहे? (ख) बायबल तत्त्वांवर तर्क करणे आज अधिक महत्त्वाचे का आहे?

आपल्या स्वर्गीय पित्याने आपल्याला एक अमूल्य देणगी दिली आहे. त्याने आपल्याला जीवन दिले आहे व बुद्धिमान प्राणी म्हणून आपली निर्मिती केली आहे त्यामुळे आपण बायबल तत्त्वांवर तर्क करू शकतो. (उत्पत्ति १:२७) या बायबल तत्त्वांनुसार आपण जगलो तर आपण यहोवावर प्रेम करणारे व “ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना . . . चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे” असे प्रौढ ख्रिस्ती बनू शकतो.—इब्री लोकांस ५:१४.

२ बायबल तत्त्वांवर तर्क करणे आज जास्त महत्त्वाचे आहे. कारण, आजचे जग क्लिष्ट बनले आहे. जीवनातील प्रत्येक क्षेत्राला लागू होणारे नियम कमी पडत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्‍या प्रगतीवरून अर्थात रक्‍तापासून तयार केलेली उत्पादने व उपचारपद्धती यांमध्ये होणाऱ्‍या प्रगतीवरून हा मुद्दा स्पष्ट होतो. यहोवाच्या आज्ञांचे पालन करू इच्छिणाऱ्‍यांसाठी हा महत्त्वाचा विषय आहे. पण आपण जर याजशी संबंधित बायबल तत्त्वे नीट समजून घेतली, तर योग्य निर्णय घेऊ ज्यामुळे आपला विवेक शुद्ध राहील व आपण देवाच्या प्रेमात टिकून राहू. (नीतिसूत्रे २:६-११) तेव्हा अशा काही बायबल तत्त्वांची आपण चर्चा करूया.

जीवन आणि रक्‍त पवित्र आहेत

३, ४. रक्‍ताच्या पावित्र्याचा सर्वात आधी उल्लेख बायबलमध्ये कोठे आढळतो व कोणत्या मूलभूत सत्यावर ही आज्ञा आधारित आहे?

३ काईनाने त्याचा भाऊ हाबेल याची हत्या केल्यानंतर यहोवाने सर्वात आधी जीवन व रक्‍त यांत असलेला महत्त्वाचा संबंध आणि त्यांचे पावित्र्य दाखवून दिले. देव काईनाला म्हणाला: “ऐक! तुझ्या भावाचे रक्‍त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे.” (उत्पत्ति ४:१०) यहोवाच्या नजरेत हाबेलाचे रक्‍त म्हणजेच त्याचे जीवन होते जे काईनाने अतिशय निर्घृणपणे संपवले. तेव्हा एका अर्थाने हाबेलाचे रक्‍त देवाकडे सूडासाठी ओरड करीत होते.—इब्री लोकांस १२:२४.

४ नोहाच्या काळात आलेल्या जलप्रलयानंतर देवाने मानवांना, रक्‍त नव्हे तर प्राण्यांचे मांस खाण्याची परवानगी दिली. देवाने म्हटले: “रक्‍तासकट मांस खाऊ नका. मी तुमच्या रक्‍ताबद्दल म्हणजे तुमच्या जिवाबद्दल झडती घेईन.” (उत्पत्ति ९:४, ५) ही आज्ञा नोहाला आणि आजपर्यंतच्या त्याच्या सर्व संततीला लागू होते. सर्व प्राण्यांचे जीवन त्यांच्या रक्‍तात आहे असे जे देवाने काईनाला म्हटले होते ते मूलभूत सत्य या आज्ञेत आणखी स्पष्ट होते. शिवाय या आज्ञेवरून हेही सिद्ध होते, की जीवनाचा उगम असलेला यहोवा देव, जीवन व रक्‍त यांचा अनादर करणाऱ्‍या सर्वांचा झाडा घेईल.—स्तोत्र ३६:९.

५, ६. रक्‍त हे पवित्र आणि मौल्यवान आहे हे मोशेला दिलेल्या नियमशास्त्रातून कसे दिसून आले? (प्राण्यांच्या जीवनाचा आदर करा हा चौकोनही पाहा.)

५ मोशेला देण्यात आलेल्या नियमशास्त्रातही ही मूलभूत सत्ये दिसून येतात. लेवीय १७:१०, ११ मध्ये असे म्हटले आहे: “कोणी कोणत्याहि प्रकारचे रक्‍त सेवन केले तर रक्‍त सेवन करणाऱ्‍या मनुष्याला मी विन्मुख होऊन त्याचा स्वजनांतून उच्छेद करीन. शरीराचे जीवन तर रक्‍तात असते, आणि तुमच्या जिवाबद्दल वेदीवर प्रायश्‍चित्त करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे; कारण रक्‍तात जीव असल्याकारणाने रक्‍तानेच प्रायश्‍चित्त होते.”a—“रक्‍तात असलेली प्रायश्‍चित्त शक्‍ती” असे शीर्षक असलेला चौकोन पाहा.

रक्‍तात असलेली प्रायश्‍चित्त शक्‍ती

देवाच्या वचनात रक्‍ताला जीवनाच्या बरोबरीचे समजण्यात आले आहे. त्यामुळे प्राचीन इस्राएलात एखाद्याने यहोवाची आज्ञा मोडली तरी जर त्याने पश्‍चात्ताप करून देवाच्या वेदीवर प्राण्याचे बलिदान दिले तर त्याची शिक्षा माफ होई. (लेवी ४:२७-३१) हे बलिदान फक्‍त काही काळापुरते त्याच्या पापांचे प्रायश्‍चित्त होते.

बायबलमध्ये वापरण्यात आलेल्या “प्रायश्‍चित्त” या शब्दाचे अर्थ, “अदला बदल” किंवा “झाकण” म्हणजेच एखाद्या पातेल्यावरील बरोबर त्याच मापाचे झाकण, असे होतात. अर्थात कोणत्याही प्राण्याचे बलिदान मानवांची पातके पूर्णपणे झाकू शकत नाहीत किंवा त्यांचे प्रायश्‍चित्त करू शकत नाहीत. परंतु, प्राण्यांची ही बलिदाने भविष्यात होणाऱ्‍या परिपूर्ण प्रायश्‍चित्त बलिदानाचा नमुना होती.—इब्री लोकांस १०:१, ४.

हे प्रायश्‍चित्त “येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे” दिले गेले. (इब्री लोकांस १०:१०) ‘निष्कलंक व निर्दोष असलेल्या कोकऱ्‍याच्या’ अर्थात ख्रिस्ताच्या ‘मूल्यवान रक्‍ताचे’ प्रतिनिधित्व करणारे त्याचे परिपूर्ण मानवी जीवन आदामाने गमावलेल्या जीवनाच्या अगदी बरोबरीचे होते. (१ पेत्र १:१९) अशा रीतीने अत्यंत सुरेख व प्रेमळ मार्गाने न्यायाची मागणी पूर्ण करण्यात आली व आपली “सार्वकालिक मुक्‍ती” शक्य झाली.—इब्री लोकांस ९:११, १२; योहान ३:१६; प्रकटीकरण ७:१४.

६ मारल्या जाणाऱ्‍या प्राण्याचे रक्‍त वेदीवर वापरले जाणार नसल्यास ते जमिनीवर ओतायचे होते. अशा प्रकारे, एका लाक्षणिक अर्थाने जीवन त्याच्या मूळ मालकाकडे अर्थात यहोवाकडे पुन्हा सोपवले जात होते. (अनुवाद १२:१६; यहेज्केल १८:४) परंतु इस्राएल लोकांना अगदीच टोकाची भूमिका घ्यायची नव्हती. मारल्या जाणाऱ्‍या प्राण्याच्या प्रत्येक मांस पेशीतून रक्‍ताचा अंश न्‌ अंश त्यांना काढत बसायचे नव्हते तर एखाद्या प्राण्याला मारल्यानंतर त्याच्या शरीरातून त्याचे सर्व रक्‍त वाहू द्यायचे होते. यामुळे एखादा इस्राएली, शुद्ध विवेकाने मांस खाऊ शकत होता व जीवनदात्याप्रती आदर दाखवू शकत होता.

७. दाविदाने रक्‍ताच्या पावित्र्याबद्दल आदर कसा दाखवला?

७ दावीद “माझ्या मनासारखा” आहे असे देवाने त्याच्याविषयी म्हटले. दाविदालाही रक्‍ताविषयी देवाने दिलेल्या नियमांतील तत्त्व समजले होते. (प्रेषितांची कृत्ये १३:२२) एके प्रसंगी त्याला खूप तहान लागली होती तेव्हा त्याच्या तीन शूरवीरांना पाणी आणण्यासाठी शत्रू छावणीत जावे लागले. छावणीतल्या एका विहिरीतून पाणी काढून त्यांनी त्याला ते आणून दिले. यावर दाविदाची काय प्रतिक्रिया होती? तो म्हणाला: “जे आपल्या प्राणांवर उदार झाले त्यांचे हे रक्‍त मी प्यावे काय?” त्याच्यासाठी आणलेले हे पाणी, आपला जीव मुठीत घेऊन शत्रू छावणीत शिरलेल्या या तीन शूरवीरांचे जणू जीवनरक्‍त होते. त्यामुळे, त्याला मरणाची तहान लागलेली असतानाही त्याने ते पाणी जमिनीवर ‘ओतून दिले.’—२ शमुवेल २३:१५-१७.

८, ९. ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाल्यानंतर जीवन व रक्‍त यांविषयी देवाचा दृष्टिकोन बदलला का? समजावून सांगा.

८ यहोवाने नोहाला रक्‍ताविषयी आज्ञा दिल्यानंतर म्हणजे सुमारे २,४०० वर्षांनंतर आणि नियमशास्त्र करार बनवल्याच्या जवळजवळ १,५०० वर्षांनंतर यहोवाने आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीच्या नियमन मंडळाला असे लिहिण्यास प्रेरित केले, की “पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टीशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हाला योग्य वाटले; त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्‍त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी.”—प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९.

९ यावरून स्पष्ट होते, की रक्‍त पवित्र आहे आणि त्याचा दुरुपयोग करणे हे मूर्तीपूजा व जारकर्म यांसारखे नैतिक अपराध करण्यासारखेच आहे, हे त्या पहिल्या शतकातील नियमन मंडळाने ताडले होते. आजचे खरे ख्रिस्ती देखील हेच मानतात. शिवाय, विशिष्ट आज्ञांची अपेक्षा न करता ते बायबलमधील तत्त्वांचा विचार करतात आणि त्यांचे पालन करतात. त्यामुळे रक्‍ताच्या वापराविषयी निर्णय घेताना ते यहोवाला संतुष्ट करतात.

रक्‍ताचा वैद्यकीय वापर

एक स्ती बहीण, रक्‍ताच्या वापराविषयी तिनं घेतलेला निर्णय तिच्या डॉक्टरला सांगत आहे

रक्‍ताच्या अंशांच्या वापराविषयी मी माझा निर्णय एखाद्या डॉक्टरला कशा प्रकारे समजावून सांगेन?

१०, ११. (क) संपूर्ण रक्‍त आणि रक्‍ताच्या प्रमुख घटकांचे संक्रमण याविषयी यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे? (ख) रक्‍ताविषयीच्या कोणत्या बाबतीत ख्रिश्‍चनांची कदाचित वेगवेगळी मते असतील?

१० ‘रक्‍त . . . वर्ज्य’ करण्याचा अर्थ, रक्‍त संक्रमण न स्वीकारणे व रक्‍त संक्रमणासाठी रक्‍तदान न करणे किंवा ते साठवून न ठेवणे असा होतो, असे यहोवाचे साक्षीदार मानतात. देवाच्या नियमांबद्दल त्यांना आदर असल्यामुळे ते, लाल पेशी, पांढऱ्‍या पेशी, प्लेटलेट्‌स आणि प्लाझमा या रक्‍ताच्या चार प्रमुख घटकांचा देखील स्वीकार करत नाहीत.

११ आज रक्‍तातल्या घटकांचे आणखी लहान लहान अंशांमध्ये विघटन केले जाते व वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा उपयोग केला जातो. खरे ख्रिस्ती हे अंश स्वीकारू शकतात का? ते “रक्‍तच” आहे असे ते समजतात का? याबाबतीत प्रत्येकाने वैयक्‍तिक निर्णय घेतला पाहिजे. हेच तत्त्व, हिमोडायलेसीस, हिमोडायल्युशन आणि स्वतःच्या रक्‍ताचे सेल साल्वेज यासारख्या प्रक्रियांच्या बाबतीत लागू होते. फक्‍त ते रक्‍त साठवून ठेवलेले नसावे.—परिशिष्टमधील रक्‍ताचे अंश आणि शस्त्रक्रियेच्या प्रक्रिया हा लेख पाहा.

१२. आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकानुसार आपण कशा प्रकारे कार्य केले पाहिजे?

१२ आपण जे वैयक्‍तिक निर्णय घेतो त्याने यहोवाला काही फरक पडत नाही, असा अर्थ होतो का? नाही. उलट आपले विचार आणि आपले हेतू यांत त्याला आस्था आहे. (नीतिसूत्रे १७:३; २४:१२) त्यामुळे यहोवाला मार्गदर्शनासाठी प्रार्थना केल्यानंतर आपण एखाद्या वैद्यकीय उत्पादनावर किंवा उपचारपद्धतीवर आणखी संशोधन केले पाहिजे व आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकानुसार कार्य केले पाहिजे. (रोमकर १४:२, २२, २३) अर्थात इतरांनी आपल्यावर त्यांचे विचार लादू नयेत किंवा आपणही इतरांना असे विचारू नये, की “तुम्ही माझ्या जागी असता तर काय केले असते?” निर्णय घेण्याच्या बाबतीत प्रत्येक ख्रिश्‍चनाने “स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.”b—गलतीकर ६:५; रोमकर १४:१२; “रक्‍त पवित्र असल्याचे मी मानतो का?” असे शीर्षक असलेला चौकोन पाहा.

रक्‍त पवित्र असल्याचे मी मानतो का?

बायबलचे तत्त्व: ‘रक्‍तापासून . . . अलिप्त राहा.’—प्रेषितांची कृत्ये १५:२०.

आपण स्वतःला विचारू शकतो

  • रक्‍तातील चार मुख्य घटक व रक्‍तातील अंश यातील फरक मी कसा समजावून सांगेन?e

  • रक्‍ताच्या अंशाचा किंवा माझ्या स्वतःच्या रक्‍ताचा वापर करून केल्या जाणाऱ्‍या उपचार पद्धतीचा स्वीकार करावा की करू नये, हे मीच का ठरवले पाहिजे?—रोमकर १२:२; गलतीकर ६:५.

  • रक्‍त अंशाचा वापर होत असलेल्या उपचार पद्धतीचा मी स्वीकार का करतो किंवा करत नाही, हे माझ्या डॉक्टरांना मी कसे समजावून सांगेन?—नीतिसूत्रे १३:१६.

यहोवाच्या नियमांतून त्याचे पित्यासमान प्रेम दिसून येते

१३. बायबलमधील नियमांवरून व तत्त्वांवरून आपल्याला काय कळते? उदाहरण द्या.

१३ बायबलमधील नियमांवरून व तत्त्वांवरून कळते, की यहोवाने अतिशय सुज्ञपणे सर्व नियम बनवले आहेत आणि तो आपल्या मुलांच्या कल्याणाची गाढ काळजी बाळगणाऱ्‍या एका प्रेमळ पित्यासमान आहे. (स्तोत्र १९:७-११) रक्‍त पवित्र असल्यामुळे यहोवाने रक्‍त वर्ज्य करा, अशी आज्ञा दिली होती. परंतु, रक्‍त वर्ज्य केल्याने आपल्याला इतरही फायदे होतात. जसे की, रक्‍त संक्रमणामुळे वाढणाऱ्‍या गुंतागुंतींपासून आपले संरक्षण होते. (प्रेषितांची कृत्ये १५:२०) खरे तर, वैद्यकीय क्षेत्रातील अनेक जण, आधुनिक वैद्यकीय उपचारांत रक्‍ताविना केल्या जाणाऱ्‍या शस्त्रक्रियांना “सुवर्ण प्रमाण” असे समजतात. खऱ्‍या ख्रिश्‍चनांना मात्र या उपचारपद्धतींतून यहोवाची अफाट बुद्धी व पित्यासमान प्रेम दिसून येते.—यशया ५५:९; योहान १४:२१, २३.

१४, १५. (क) प्राचीन इस्राएलमध्ये देवाला आपल्या लोकांबद्दल वाटत असलेली काळजी कशी दिसून आली? (ख) देवाने दिलेल्या नियमांमागील तत्त्वांचा अवलंब तुम्ही कसा करू शकाल?

१४ प्राचीन इस्राएलमध्ये देवाला आपल्या लोकांबद्दल वाटत असलेली काळजी, त्याने दिलेल्या अनेक नियमांतून दिसून येत होती. उदाहरणार्थ, इस्राएल लोक विविध कामांसाठी आपल्या घरांच्या धाब्यांचा उपयोग करायचे. त्यामुळे देवाने त्यांना कोणताही अपघात होऊ नये म्हणून घरांच्या धाब्यांना कठडा बांधण्याची आज्ञा दिली होती. (अनुवाद २२:८; १ शमुवेल ९:२५, २६; नहेम्या ८:१६; प्रेषितांची कृत्ये १०:९) देवाने अशीही आज्ञा दिली होती, की हुंदडणाऱ्‍या बैलांना लोकांनी आवरावे. (निर्गम २१:२८, २९) या आज्ञांकडे दुर्लक्ष करणे हे इतरांच्या हिताचा अनादर करण्यासारखेच होते व दुर्लक्ष करणाऱ्‍या लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा होत असे.

१५ या नियमांमागील तत्त्वांचा अवलंब तुम्ही कसा कराल? तुम्ही तुमच्या वाहनाचा, वाहन चालवण्याच्या तुमच्या सवयींचा, तुमच्या पाळीव प्राण्यांचा, तुमच्या घराचा, नोकरीच्या ठिकाणाचा व तुम्ही जे मनोरंजन निवडता त्याचा विचार करू शकता. काही देशांत, अनेक तरुण अपघातांमुळे दगावतात; या तरुणांना जोखीम पत्करण्यात मजा वाटत असल्यामुळे ते आपला जीव गमावतात. परंतु, देवाच्या प्रेमात राहू इच्छिणारे तरुण मात्र जीवनाचे मोल जाणतात व त्यामुळे ते घातक खेळात भाग घेतही नाहीत व पाहतही नाहीत. तरुणांना काहीही होत नाही, असा मूर्खपणाचा विचार ते करत नाहीत. तर स्वतःवर अनावश्‍यक संकट ओढवण्याचे टाळून ते आपल्या तारुण्याची मजा लुटतात.—उपदेशक ११:९, १०.

१६. गर्भपाताच्या संबंधाने बायबलमधील कोणते तत्त्व लागू होते? (तळटीपसुद्धा पाहा.)

१६ न जन्मलेल्या बाळाचे जीवनही देवाच्या नजरेत मौल्यवान आहे. प्राचीन इस्राएलमध्ये जर कोणी एखाद्या गर्भवती स्त्रीला इजा केली व त्यामुळे तिचा अथवा तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला तर देवाच्या नजरेत दोषी मनुष्य हत्या करणारा होता. या मनुष्याला “जिवाबद्दल जीव” द्यावा लागत असे.c (निर्गम २१:२२, २३) दर वर्षी, अगणित गर्भपात मुद्दामहून केले जातात. अनैतिक जीवनशैलीमुळे होणाऱ्‍या भ्रूणहत्या किंवा आपल्याच स्वार्थापोटी केले जात असलेले गर्भपात पाहून यहोवाला कसे वाटत असावे, याचा विचार करा.

१७. देवाच्या दर्जांचे सत्य समजण्याआधी एखाद्या स्त्रीने गर्भपात केला असेल तर अशा स्त्रीचे तुम्ही कशा प्रकारे सांत्वन करू शकाल?

१७ पण समजा एखाद्या स्त्रीने सत्याचे ज्ञान घेण्याआधी गर्भपात केला असेल तर काय? देव तिला तिच्या पापाबद्दल दया दाखवेल का? होय. मनापासून पश्‍चात्ताप करणारी व्यक्‍ती, येशूने वाहिलेल्या रक्‍ताच्या आधारावर यहोवाची क्षमा निश्‍चितच मिळवू शकते. (स्तोत्र १०३:८-१४; इफिसकर १:७) येशूनेच असे म्हटले नव्हते का की, “मी नीतिमानास बोलावण्यास आलो नाही तर पापी लोकांस पश्‍चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे”?—लूक ५:३२.

द्वेषपूर्ण विचार टाळा!

१८. मोठ्या प्रमाणात होणाऱ्‍या रक्‍तपातास कोणती प्रमुख गोष्ट कारणीभूत असल्याचे बायबल सांगते?

१८ इतरांना इजा करण्याचे टाळणेच फक्‍त पुरेसे नाही तर ज्यामुळे रक्‍तपात घडू शकतो असा द्वेष आपण मनातून काढून टाकला पाहिजे, अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. प्रेषित योहानाने लिहिले: “जो कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करितो तो नरहिंसक आहे.” (१ योहान ३:१५) या वचनात उल्लेखण्यात आलेल्या मनुष्याला, त्याचा भाऊ फक्‍त आवडतच नसतो तर त्याचे बरेवाईट व्हावे असाही विचार तो करत असतो. तो आपल्या भावाविषयी कुटाळकी करतो किंवा त्याच्यावर खोटे आरोपही लावतो. पण त्याने लावलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले तर तो देवाच्या न्यायदंडापासून वाचू शकत नाही. (लेवीय १९:१६; अनुवाद १९:१८-२१; मत्तय ५:२२) तेव्हा, आपल्या मनात जर कोणाविषयी किंचितही द्वेष असेल तर तो लगेच मुळासकट काढणे खूप महत्त्वाचे आहे.—याकोब १:१४, १५; ४:१-३.

१९. जी व्यक्‍ती बायबल तत्त्वांचा आपल्या जीवनात अवबंल करते ती स्तोत्र ११:५ व फिलिप्पैकर ४:८, ९ या वचनांबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगते?

१९ जीवन मौल्यवान आहे असा यहोवाप्रमाणेच दृष्टिकोन बाळगणारे व स्वतःला त्याच्या प्रेमात टिकवून ठेवू इच्छिणारे सर्व प्रकारची हिंसा टाळतात. स्तोत्र ११:५ (पं.र.भा.) मध्ये म्हटले आहे: ‘यहोवाचा जीव जुलमाची आवड धरणाऱ्‍यांचा द्वेष करतो.’ हे वचन फक्‍त देवाच्या व्यक्‍तिमत्त्वाविषयी सांगत नाही तर यांत एक तत्त्व सांगितलेले आहे ज्याचा आपण सर्वांनी आपल्या जीवनात अवलंब केला पाहिजे. हे तत्त्व देवावर प्रेम करणाऱ्‍यांना, हिंसाचाराची आवड निर्माण करणारे सर्वप्रकारचे मनोरंजन टाळण्यास प्रवृत्त करते. बायबलमध्ये यहोवाला “शांतिदाता देव” म्हटले आहे. यावरून, त्याच्या सेवकांना, आपले मन व आपले हृदय प्रशंसनीय, श्रवणीय, सद्‌गुणी तसेच ज्यांमुळे शांती टिकून राहते अशा गोष्टींनी भरण्यास प्रेरणा मिळते.—फिलिप्पैकर ४:८, ९.

रक्‍तदोषी जगात निर्दोष राहा

२०-२२. जगाच्या बाबतीत खऱ्‍या ख्रिश्‍चनांची काय भूमिका आहे व का?

२० देवाच्या नजरेत सैतानाचे संपूर्ण जग रक्‍तदोषी आहे. बायबलमध्ये राजकीय व्यवस्थेचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी एका जंगली श्‍वापदाचा उपयोग केला आहे. या जंगली श्‍वापदाने कोट्यवधी लोकांना तसेच यहोवाच्या अनेक सेवकांना ठार मारले आहे. (दानीएल ८:३, ४, २०-२२; प्रकटीकरण १३:१, २, ७, ८) श्‍वापदासारख्या असलेल्या सत्तांबरोबरच व्यापारी व विज्ञान जगही आहे ज्यांनी एकत्र मिळून, कल्पनाही करू शकत नाही अशा प्रकारची सर्वात हिडीस शस्त्रास्रे बनवली आहेत व त्यातून ते पुष्कळ नफाही मिळवत आहेत. “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे” हे किती खरे आहे, नाही का?—१ योहान ५:१९.

२१ येशूचे अनुयायी या ‘जगाचे नाहीत’ आणि जगाच्या राजनीतीत व युद्धात तटस्थ राहतात त्यामुळे वैयक्‍तिक व सामाजिक रक्‍तदोषापासून ते मुक्‍त आहेत.d (योहान १५:१९; १७:१६) ते येशूचे अनुकरण करत असल्यामुळे, लोक जेव्हा त्यांचा छळ करतात तेव्हा हिंसाचाराने प्रत्युत्तर देत नाहीत. त्याऐवजी ते शत्रूंवरही प्रेम करतात व त्यांच्यासाठी प्रार्थना देखील करतात.—मत्तय ५:४४; रोमकर १२:१७-२१.

२२ महत्त्वाचे म्हणजे खरे ख्रिस्ती, सर्वात जास्त रक्‍त दोषी असलेले खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य अर्थात “मोठी बाबेल” यांतून स्वतःला वेगळे करतात. कारण तिच्यामध्ये “संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे व पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्‍त सापडले” आहे, असे बायबल म्हणते. त्यामुळे, “माझ्या लोकांनो, तुम्ही . . . तिच्यामधून निघा,” अशी आपल्याला ताकीद देण्यात आली आहे.—प्रकटीकरण १७:६; १८:२, ४, २४.

२३. मोठ्या बाबेलीतून बाहेर पडण्याचा काय अर्थ होतो?

२३ मोठ्या बाबेलीतून बाहेर पडण्यामध्ये फक्‍त, खोट्या धर्माशी सर्व संपर्क तोडून टाकणेच समाविष्ट नाही. तर, खोटा धर्म खपवून घेत असलेल्या किंवा अगदी उघडपणे समर्थन करत असलेल्या सर्व वाईट गोष्टींचा वीट मानणे देखील यात समाविष्ट आहे. लैंगिक अनैतिकता, राजकीय गोष्टींत लुडबूड, पैशांचा हव्यास यांसारख्या वाईट गोष्टींची आपल्याला किळस वाटली पाहिजे. (स्तोत्र ९७:१०; प्रकटीकरण १८:७, ९, ११-१७) कारण बहुतेकदा याच गोष्टींमुळे रक्‍तपात घडतो!

२४, २५. रक्‍तदोषी असलेल्या पश्‍चात्तापी व्यक्‍तीला देव कोणत्या आधारावर क्षमा करू शकतो व बायबल काळात हे कशा प्रकारे पूर्वचित्रित करण्यात आले होते?

२४ सत्यात येण्याआधी आपल्यातील प्रत्येक जण या नाही तर त्या मार्गाने सैतानाच्या जगाला पाठिंबा देऊन रक्‍तदोषी होता. पण आपण आपला मार्ग बदलल्यामुळे, ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवल्यामुळे व आपले जीवन यहोवाला समर्पित केल्यामुळे, त्याच्याबरोबर आपला नातेसंबंध बिघडू शकेल अशा गोष्टींपासून संरक्षण मिळवू शकलो. (प्रेषितांची कृत्ये ३:१९) हे संरक्षण बायबल काळात असलेल्या शरणपुरांद्वारे पूर्वचित्रित करण्यात आले होते.—गणना ३५:११-१५; अनुवाद २१:१-९.

२५ या शरणपुरांत एखाद्याला संरक्षण कसे मिळायचे? एखादा इस्राएली चुकून दुसऱ्‍याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला तर त्याला आपला जीव वाचवण्यासाठी सर्वात जवळच्या शरणपुराकडे पळत जावे लागत असे. या शरणपुरात असलेले न्यायाधीश, सर्व गोष्टी पडताळून पाहायचे व आपला निर्णय द्यायचे. चुकून मनुष्यवध झाल्याचे शाबित झाल्यावर, त्याला महायाजकाचा मृत्यू होईपर्यंत या शरणपुरात राहावे लागत असे. त्यानंतर तो कोठेही जाण्यास मुक्‍त होता. यहोवाची दया आणि मानवी जीवनाचे त्याला वाटत असलेले मोल या उदाहरणातून किती सुरेखपणे दिसून येते! प्राचीन शहरांतील ती शरणपुरे, आज देवाने ख्रिस्ताच्या बलिदानाच्या आधारावर केलेल्या तरतुदींसारखीच आहेत. या तरतुदींमुळे, जीवन व रक्‍त यांविषयी असलेल्या देवाच्या आज्ञांचे अजाणतेत उल्लंघन केल्यामुळे होऊ शकणाऱ्‍या मृत्यूदंडापासून आपले संरक्षण होते. देवाने केलेली ही तरतूद तुम्हालाही मौल्यवान वाटते का? हे तुम्ही आपल्या कार्यातून कसे दाखवू शकता? असे करण्याचा एक मार्ग म्हणजे, अगदी तेजीने जवळ येणारे “मोठे संकट” लक्षात ठेवून तुम्ही इतरांनाही तुमच्यासोबत या प्रतिनमुनेदार शरणपुरात येण्याचे आमंत्रण देऊ शकता.—मत्तय २४:२१; २ करिंथकर ६:१, २.

राज्य संदेशाचा प्रचार करण्याद्वारे जीवनाबद्दल कदर दाखवा

२६-२८. आपला काळ आणि संदेष्टा यहेज्केलाचा काळ यांत कोणते साम्य आहे व स्वतःला देवाच्या प्रेमात टिकवून ठेवण्याकरता आपण आणखी काय करू शकतो?

२६ आपल्या दिवसांतील देवाच्या लोकांची स्थिती पाहिल्यावर आपल्याला प्राचीन काळातील संदेष्टा यहेज्केलाचा काळ आठवतो. संदेष्टा यहेज्केलास यहोवाने इस्राएल राष्ट्राला त्याच्या न्यायदंडांची घोषणा करण्यासाठी नेमले होते. देवाने त्याला सांगितले: “तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांस सावध कर.” यहेज्केलाने ही नेमणूक पार पाडली नसती तर जेरुसलेमेच्या नाशाच्या वेळी मरण पावणाऱ्‍यांच्या रक्‍ताबद्दल त्याला जबाबदार धरले जाणार होते. (यहेज्केल ३३:७-९) पण यहेज्केलाने देवाची आज्ञा मानली व त्यामुळे तो रक्‍तदोषी ठरला नाही.

२७ सैतानी जगाचा लवकरच अंत होणार आहे. त्यामुळे राज्य संदेशाची घोषणा करण्यासोबतच ‘देवाच्या सूड घेण्याच्या दिवसाची’ घोषणा करणे हे यहोवाचे साक्षीदार एक कर्तव्य व बहुमान समजतात. (यशया ६१:२; मत्तय २४:१४) या महत्त्वपूर्ण कार्यात तुम्हीही भाग घेत आहात का? प्रेषित पौलाने त्याला मिळालेली सेवा अगदी मनापासून पार पाडली. म्हणूनच तो म्हणू शकला: “मी सर्वांच्या रक्‍ताविषयी निर्दोषी आहे; कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हास सांगण्यास मी कसूर केली नाही.” (प्रेषितांची कृत्ये २०:२६, २७) आपल्यासाठी किती सुरेख उदाहरण त्याने मांडले!

२८ पण, यहोवा आपल्यावर करत असलेल्या पित्यासमान प्रेमात टिकून राहण्याकरता आपण त्याच्याप्रमाणे जीवन व रक्‍त यांना तर मौल्यवान समजलेच पाहिजे शिवाय आणखीही काहीतरी केले पाहिजे. आपण त्याच्या दृष्टीत शुद्ध किंवा पवित्र राहिले पाहिजे. हे आपण कसे करू शकतो त्याची चर्चा पुढील अध्यायात करण्यात आली आहे.

a “शरीराचे जीवन तर रक्‍तात असते,” असे जे देवाने म्हटले त्याविषयी सायंटिफिक अमेरिकन नावाचे मासिक सांगते, की “रक्‍ताला जीवनाचे रुपक देणे हे योग्य असले तरी, जिवंत राहण्यासाठी प्रत्येक प्रकारच्या रक्‍त कोशिकेची गरज आहे.”

b टेहळणी बुरूज जून १५, २००४, पृष्ठे १९-२४ पाहा.

c बायबल कोशकारांचे असे म्हणणे आहे, की इब्री भाषेतील निर्गम २१:२३ या वचनांतील शब्द, “फक्‍त स्त्रीलाच होणाऱ्‍या इजेला लागू होणे शक्य नाही.” यहोवा जेव्हा न्याय करतो तेव्हा तो गर्भातील भ्रूणाच्या वयाचा विचार करून त्यानुसार दंड देतो, असेही बायबल सांगत नाही.

d “जगात राहूनही आपले वेगळेपण कसे टिकवता येईल?” हे शीर्षक असलेला ५ वा अध्याय पाहा.

e सविस्तर माहितीसाठी रक्‍ताचे अंश आणि शस्त्रक्रियेच्या प्रक्रिया हा लेख पाहा.

प्राण्यांच्या जीवनाचा आदर करा

यहोवाने जरी आपल्याला अन्‍नासाठी, वस्त्रांसाठी व आपल्या संरक्षणासाठी प्राण्यांना मारण्याची परवानगी दिली असली तरी आपण या अधिकाराचा वापर संतुलित दृष्टिकोन ठेवून व दयाळूपणे केला पाहिजे. (उत्पत्ति ३:२१; ९:३) आपण फक्‍त मौजेखातर प्राणी मारणाऱ्‍या क्रूर शिकारी निम्रोदासारखे होऊ नये. (उत्पत्ति १०:९) याउलट आपण यहोवासारखे बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्याला प्राण्यांची, अगदी लहान चिमणीची देखील काळजी वाटते.—योना ४:११; मत्तय १०:२९.

मोशेला दिलेल्या नियमशास्त्रातून देवाची ही काळजी दिसून येते. (निर्गम २३:४, ५, १२; अनुवाद २२:१०; २५:४) या नियमशास्त्राच्या सुसंगतेत नीतिसूत्रे १२:१० म्हणते: “धार्मिक मनुष्य आपल्या पशूच्या जिवाकडे लक्ष देतो, पण दुर्जनांचे अंतर्याम क्रूर असते.” लवकरच क्रूर लोक व त्यांची कामे इतिहासजमा होतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा