तुमचे नशीब आधीच ठरलेले आहे का?
एक सेल्समन पहाटे घाईघाईने निघाला होता. त्याला विमानतळावर पोचायचे होते. पण उशीर झाल्यामुळे त्याचे विमान चुकले. काही वेळानंतर, त्याने त्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी ऐकली. विमानातील एकही जण जिवंत वाचला नव्हता.
भयानक जीवघेण्या अपघातांमधून काही जण थोडक्यात वाचल्याच्या गोष्टी आपण अधूनमधून ऐकत असतो. अशा व्यक्तींबद्दल लोक म्हणतात, “त्यांची वेळ अजून आली नव्हती.” पण जर एखादी व्यक्ती अपघातात मारली गेली, तर लोक म्हणतात “तिची वेळ आली होती.” काही लोकांची अशी धारणा आहे की मनुष्य जन्माला येतो तेव्हापासूनच त्याचे नशीब ठरलेले असते. पण हे नशीब ठरवणारा कोण, हे त्यांना सांगता येत नाही. दुसरीकडे पाहता, बरेच लोक असे मानतात की पूर्वजन्मी केलेल्या पापांची शिक्षा या जन्मात भोगावी लागते आणि या जन्मी केलेल्या पुण्याचे पुढच्या जन्मात प्रतिफळ मिळते. नशिबावर विश्वास करणाऱ्या या लोकांचे असे मत आहे की चांगली कार्ये करून पुण्य कमवल्यास व विशिष्ट धार्मिक विधी केल्यास आपण आपले नशीब बदलू शकतो. या प्रकारचे विचार तर्काला पटतात का?
या प्रकारचे विचार खरोखर तर्काला पटतात का?
आपण आधी पहिल्या धारणेबद्दल पाहू या. जर मनुष्याचे नशीब आधीपासूनच ठरलेले असेल; जर त्याच्या कर्मांप्रमाणे त्याला शिक्षा भोगावी लागत असेल, तर मग हे नशीब ठरवणारा व शिक्षा देणारा कोण? उदाहरणार्थ, शहरात वाहतुकीचे बरेच नियम असतात. तसेच, या नियमांचा भंग केल्यास शिक्षा मिळेल हेही आपल्याला माहीत असते. पण हे नियम बनवणारा आणि त्यांची अंमलबजावणी करणारा कोणीही नाही, ते आपोआपच अस्तित्वात आले असा विचार करणे तर्कशुद्ध ठरेल का?
आता आपण दुसऱ्या धारणेकडे लक्ष देऊ या. सध्याच्या जीवनातील दुःख हे पूर्वजन्मी केलेल्या पापांचे फळ आहे, असे म्हणता येईल का? समजा एखाद्याने तथाकथित पूर्वजन्मात पाप केले असेल, पण आज त्याला त्याविषयी काहीही आठवत नसेल, तर तो आपली चूक कशी सुधारू शकेल? त्याला भोगाव्या लागत असलेल्या दुःखाचे कारणच जर माहीत नसेल, तर ते दुःख भोगणे त्याला आपल्या जीवनात सुधारणा करण्यास साहाय्यक ठरेल का? तुम्हाला हे कितपत योग्य वाटते?
उदाहरणार्थ, वारंवार खोटे बोलणाऱ्या एका लहान मुलाविषयी विचार करा. त्याचे वडील त्याला आपल्या वागणुकीत सुधारणा करण्यासाठी बजावतात, पण त्याची चूक काय आहे हे त्याला दाखवत नाहीत, तेव्हा तो मुलगा काय करेल? कदाचित, तो खूप अभ्यास करेल किंवा चांगले वागण्याचा प्रयत्न करेल. तरीपण, खोटे बोलणे चूक आहे हे जोपर्यंत त्याला सांगितले जात नाही, तोपर्यंत त्याला ते कधीच कळणार नाही आणि म्हणून तो खोटे बोलतच राहील. मुलाची चूक न दाखवता त्याला सुधरण्याची ताकीद देणे काही फायद्याचे आहे का किंवा ते योग्य आहे का? पूर्वजन्मात केलेल्या पापांबद्दल शिक्षा भोगण्याविषयी एका स्त्रीने असे म्हटले: “ज्या पापाविषयी मला काहीच माहीत नाही, त्या पापासाठी संपूर्ण जीवनभर दुःख भोगणे, याला काही अर्थ आहे का? आपल्या वाट्याला आलेले दुःख निमूटपणे भोगण्याशिवाय माझ्यापुढे दुसरा पर्यायच उरणार नाही.”
नशिबावर विश्वास ठेवल्याने इतर हानीकारक परिणामही होऊ शकतात. एखादे संकट ओढवते किंवा अन्याय सहन करावा लागतो तेव्हा काही लोक म्हणतात, ‘नशिबात आहे ते भोगावंच लागेल, नशिबापुढे कोणाचं काय चालतं?’ दुसरे काही लोक मानतात की खूप पैसा खर्च करून विशिष्ट धार्मिक विधी केल्याने किंवा घरातील वस्तुंची जागा बदलल्याने नशीब बदलता येते. परिणामी, हे लोक नशीब बदलण्याच्या प्रयत्नात पुष्कळ पैसा गमावून बसतात आणि कधीकधी तर बेइमान व ढोंगी लोकांचे भक्ष्य बनतात.
दुःखांच्या मागे असलेले खरे कारण
नशिबाबद्दल आणि “पूर्वजन्मात” केलेल्या पापांबद्दल बायबल काय सांगते? बायबल आपल्याला ठासून सांगते: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतांस तर काहीच कळत नाही . . . जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे [कबरेत] तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्ति-प्रयुक्ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.” (उपदेशक ९:५, १०) दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ती व्यक्ती विचार करू शकत नाही किंवा कोणतेही काम करू शकत नाही. तिच्या शरीरात, मृत्यूनंतर अस्तित्वात राहणारा अमर आत्मा नसतो, त्यामुळे ती व्यक्ती दुसऱ्या माणसाच्या रूपात पुन्हा जन्म घेऊ शकत नाही.
तर मग असे का वाटते, की काही लोकांवर एका पाठोपाठ एक संकट येते आणि दुसऱ्यांवर मात्र संकटाची सावलीसुद्धा पडत नाही? उपदेशक ९:११ (पं.र.भा.) मध्ये, संकटे का येतात याच्या पहिल्या कारणाविषयी सांगितले आहे, ते म्हणजे, “समय व प्रसंग हे सर्वांना घडतात.” बहुधा, चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे लोक अपघातांना बळी पडतात. आपण सुरुवातीच्या परिच्छेदात ज्या उदाहरणाची चर्चा केली होती त्यावर विचार करा. दरदिवशी, कित्येक कारणांमुळे, लोकांचे विमान, ट्रेन किंवा बस चुकत असते. जेव्हा कोणताही जीवघेणा अपघात घडत नाही, तेव्हा लोक या क्षुल्लक गोष्टी लवकरच विसरून जातात. जर अपघात घडलाच तर, त्यातून वाचणाऱ्या लोकांना वाटते की त्यांची मरण्याची वेळ अजून आली नव्हती त्यामुळे ते वाचले.
लोकांना दुःख का भोगावे लागते याचे दुसरे कारण आहे, मानवांमुळे निर्माण होणारी संकटे. उपदेशक ८:९ मध्ये म्हटले आहे: “एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.” अधिकाराच्या पदावर असलेले काही जण आपल्या शक्तीचा दुरुपयोग करतात त्यामुळे त्याचे दुःखद परिणाम लोकांना भोगावे लागतात. एवढेच नव्हे, तर एक व्यक्ती ज्या प्रकारे आपले जीवन व्यतीत करते, त्याचेसुद्धा चांगले किंवा वाईट परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, वाईट सवयींमुळे लोक आजारी पडू शकतात. तसेच, एखाद्याच्या स्वभावातील दुर्गुणांमुळे इतरांसोबतचे त्याचे नातेसंबंध बिघडू शकतात. गलतीकर ६:७ मध्ये म्हटल्याप्रमाणे, “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.”
मानव, दुःखांनी त्रस्त असण्याचे तिसरे कारण म्हणजे, आपण ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत. जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वी, या जगाच्या अंताविषयी येशूने असे सांगितले होते: “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. . . . आणि अनीति वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीति थंडावेल.” (२ तीमथ्य ३:१; मत्तय २४:३, ७, १२) जसजशी या जगाची परिस्थिती आणखी भयंकर होत जाईल आणि हिंसाचार व नैसर्गिक संकटे वाढतील, तसतसे आपल्याला आधीपेक्षा जास्त संकटांना तोंड द्यावे लागेल यात तीळमात्र शंका नाही.
पण मनुष्याला भविष्याकरता कोणतीच आशा नाही असा याचा अर्थ होतो का? शेवटल्या काळाबद्दल सांगितल्यानंतर येशू म्हणाला: “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१३, १४) येथे ज्या राज्याविषयी सांगितले आहे ते देवाचे स्वर्गीय सरकार आहे आणि देवाने येशू ख्रिस्ताला या सरकारचा राजा म्हणून नेमले आहे. देवाचे हेच राज्य लवकरच सर्व दुष्टतेचा सर्वनाश करेल, आणि अशा रीतीने सध्याच्या दुष्ट जगाचा अंत करेल. तेव्हा पृथ्वीवर किती मोठा बदल घडून येईल त्याचा विचार करा! “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:४) ही खरोखरच एक आनंदाची गोष्ट नाही का?
तुमचे भविष्य कशावर अवलंबून आहे?
देवाच्या राज्याकरवी हे सर्व आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? बायबल स्पष्टपणे सांगते: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१७) जे लोक देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात, त्यांना देवाच्या राज्य शासनात पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा आहे. अर्थातच, देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आधी तुम्हाला देवाची इच्छा काय आहे, हे जाणून घेतले पाहिजे. म्हणूनच तर येशूने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) बायबलचा अभ्यास करण्याद्वारे, तुम्ही खरा देव यहोवा याच्या इच्छेविषयी आणि येशू ख्रिस्ताच्या शिकवणींविषयीसुद्धा जाणून घेऊ शकता. सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी हेच पहिले आणि अत्यंत आवश्यक पाऊल आहे.
तुमचे जीवन नशिबाच्या ताब्यात नाही. त्याउलट, तुम्ही आता जी निवड कराल, तिच्यावर तुमचे जीवन अवलंबून आहे. यास्तव, देव आपल्याला एका बायबल लेखकाद्वारे असा आग्रह करतो: “आकाश व पृथ्वी ह्यांना तुझ्याविरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की, जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवली आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतति जिवंत राहील.” (अनुवाद ३०:१९) असे होवो की तुम्ही बायबलचा अभ्यास करण्याचा निर्णय घ्यावा आणि देवाची इच्छा करत राहावी. असे केल्याने, तुम्हाला सुद्धा सदासर्वकाळचे आनंददायक जीवन उपभोगण्यास मिळेल.
तुमच्या सोबत मोफत बायबलचा अभ्यास करण्यास यहोवाच्या साक्षीदारांना आनंद होईल. कृपया, खाली दिलेल्या जवळच्या पत्त्यावर आम्हाला लिहा.
तुम्हाला अधिक माहिती हवी आहे का? खाली दिलेल्या उचित पत्त्यावर, यहोवाच्या साक्षीदारांना लिहा.
अन्यथा सूचित केले नसल्यास, शास्त्रवचनातील उतारे द होली बायबल मराठी—आर. व्ही. यातून घेण्यात आली आहेत. तसेच पं.र.भा. असा संकेत असणारी शास्त्रवचने पंडिता रमाबाई भाषांतर या बायबल आवृत्तीमधून घेण्यात आली आहेत.