वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • bh अध्या. ७ पृ. ६६-७५
  • मरण पावलेल्या तुमच्या प्रिय जनांसाठी खरी आशा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मरण पावलेल्या तुमच्या प्रिय जनांसाठी खरी आशा
  • बायबल नेमके काय शिकवते?
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा
  • “लाजरा, बाहेर ये!”
  • पुनरुत्थानाच्या अहवालांतून शिकणे
  • “स्मृती कबरेतील सर्व माणसे”
  • स्वर्गीय पुनरुत्थान
  • मृत लोक पुन्हा जिवंत होतील!
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • मरण पावलेल्या आपल्या प्रियजनांना आपण पुन्हा भेटू!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • मृत लोकांसाठी आशा—पुनरुत्थान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • आज मृत असणारे लक्षावधी लोक पुन्हा जिवंत होतील
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
बायबल नेमके काय शिकवते?
bh अध्या. ७ पृ. ६६-७५

अध्याय सात

मरण पावलेल्या तुमच्या प्रिय जनांसाठी खरी आशा

  • पुनरुत्थान नक्की होईल हे आपल्याला कसे माहीत आहे?

  • मृतांचे पुनरुत्थान करण्याची यहोवाला इच्छा आहे हे कशावरून दिसून येते?

  • कोणाचे पुनरुत्थान होईल?

१-३. कोणता शत्रू आपला पाठलाग करत आहे, आणि बायबलच्या शिकवणीवर विचार केल्यावर आपल्याला हायसे का वाटेल?

समजा तुम्ही एका क्रूर शत्रूपासून दूर पळत आहात. तो तुमच्यापेक्षा खूप शक्‍तिशाली आणि जलद आहे. तो निर्दयी आहे हे तुम्हाला माहीत आहे कारण तुम्ही त्याला तुमच्या काही मित्रांना ठार मारताना पाहिले आहे. तुम्ही त्याच्यापासून दूर पळण्याचा होता होईल तितका प्रयत्न करता पण तो जवळ येतच राहतो. तुम्हाला वाचण्याची कसलीच आशा दिसत नाही. अचानक तुमच्या बाजूला एक जण येतो जो तुम्हाला वाचवू शकतो. तो तुमच्या शत्रूपेक्षाही कैकपटीने शक्‍तिशाली आहे आणि तो मदत करण्याचे तुम्हाला वचन देतो. आता तुमच्या जिवात जीव येतो!

२ तसे पाहिले तर आज तुमच्यामागे खरोखरच एक शत्रू लागला आहे. नव्हे आपल्या सर्वांच्याच मागे तो लागला आहे. आपण मागच्या अध्यायात पाहिल्याप्रमाणे, बायबलमध्ये मृत्यूला शत्रू म्हटले आहे. आपल्यातील कोणी या शत्रूपासून पळ काढू शकत नाही. आपल्यातील बहुतेकांनी या शत्रूला आपल्या प्रिय जनांना ठार मारताना पाहिले आहे. पण यहोवा या शत्रूपेक्षाही कैकपटीने शक्‍तिशाली आहे. तो आपल्याला प्रेमळपणे वाचवण्याचे वचन देतो; आणि त्याने आपल्याला हे सिद्ध करून दाखवले आहे की तो या शत्रूवर नक्कीच विजय मिळू शकतो. आपण या शत्रूचा कायमचा नाश करणार आहोत असे त्याने वचन दिले आहे. बायबल शिकवते: “जो शेवटला शत्रु नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय.” (१ करिंथकर १५:२६) आनंदाची बातमी, नाही का?

३ हा शत्रू आपल्या एखाद्या प्रिय व्यक्‍तीवर घाला घालतो तेव्हा आपल्यावर काय परिणाम होतो, याचा आपण थोडक्यात विचार करू या. असे केल्याने, आपल्याला एका आनंदविणाऱ्‍या प्रतिज्ञेविषयी समजायला मदत होईल. यहोवा ही प्रतिज्ञा करतो की मृत पुन्हा जिवंत होतील. (यशया २६:१९) त्यांना पुन्हा जिवंत केले जाईल. ही पुनरुत्थानाची आशा आहे!

आपल्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा

४. (क) प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूवर येशूने दाखवलेल्या प्रतिक्रियेवरून आपल्याला यहोवाच्या भावना समजून घेण्यास मदत मिळते असे का म्हणता येईल? (ख) येशूची कोणाबरोबर घनिष्ठ मैत्री झाली होती?

४ तुमच्या कोणा प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू झाला आहे का? तुमच्यावर कोसळलेले दुःख आणि असाहाय्यतेच्या भावना सहनशक्‍तीच्या पलिकडे असू शकतात. अशावेळी आपण सांत्वन मिळण्यासाठी देवाच्या वचनाकडे वळाले पाहिजे. (२ करिंथकर १:३, ४) मृत्यूविषयी यहोवाला आणि येशूला कसे वाटते, हे समजायला बायबल आपली मदत करते. आपल्या पित्याचे हुबेहूब प्रतिबिंब असलेल्या येशूला, मृत्यूमुळे आपल्या प्रिय व्यक्‍तीला गमावल्याचे दुःख माहीत होते. (योहान १४:९) येशू जेरुसलेममध्ये होता तेव्हा तो जवळच्या बेथानी गावात असलेला लाजर आणि त्याच्या बहिणी मरीया व मार्था यांच्या घरी नेहमी जायचा. ते एकमेकांचे निकट स्नेही बनले होते. बायबल म्हणते: “मार्था, तिची बहीण व लाजर ह्‍यांच्यावर येशूची प्रीति होती.” (योहान ११:५) पण आपण मागच्या अध्यायात पाहिले, की लाजर मरण पावतो.

५, ६. (क) येशू लाजरच्या नातेवाईकांबरोबर व निकटवर्तीयांबरोबर होता तेव्हा त्याने कशी प्रतिक्रिया दाखवली? (ख) येशूने व्यक्‍त केलेले दुःख आपल्यासाठी प्रोत्साहनदायक का आहे?

५ मग आपला मित्र लाजर मरण पावला तेव्हा येशूला कसे वाटले? अहवाल सांगतो, की शोक करणारे लाजरचे नातेवाईक व निकटवर्ती यांना भेटायला येशू आला. त्यांना पाहून येशूला राहावले नाही. तो “आत्म्यात खवळला व विव्हळ झाला.” आणि तोच अहवाल पुढे म्हणतो: “येशू रडला.” (योहान ११:३३, ३५) येशूने शोक केला, याचा अर्थ त्याला काही आशा नव्हती का? नाही. उलट, थोड्याच वेळात एक अद्‌भूत घटना घडणार आहे, हे येशूला माहीत होते. (योहान ११:३, ४) तरीपण, मृत्यूमुळे होणारे दुःख आणि शोक त्याने अनुभवले.

६ येशूने व्यक्‍त केलेले दुःख एकप्रकारे आपल्याला प्रोत्साहन देणारे आहे. यावरून आपल्याला हे शिकायला मिळते, की येशू आणि त्याचा पिता यहोवा या दोघांनाही मृत्यूचा वीट आहे. पण यहोवा देव या शत्रूविरुद्ध लढून त्याला पराजित करू शकतो! यहोवाने येशूला काय करण्याची शक्‍ती दिली ते आपण पाहू या.

“लाजरा, बाहेर ये!”

७, ८. मानवी दृष्टीने लाजरच्या बाबतीत कोणतीच आशा का उरली नव्हती, पण येशूने काय केले?

७ लाजरला एका गुहेत पुरण्यात आले होते. येशूने, गुहेचे तोंड झाकण्यासाठी लावलेली धोंड काढण्यास सांगितले. मार्थाने त्याला विरोध केला कारण लाजरला मरून चार दिवस झाले होते. आतापर्यंत तर लाजरचे शरीर कुजायला सुरुवातही झाली असावी. (योहान ११:३९) मानवी दृष्टिकोनातून पाहिल्यास, आता कसलीच आशा उरली नव्हती.

येशू लाजरचे पुनरुत्थान करतो. त्याला हाक मारल्यावर लाजर गुहेतून बाहेर येतो आणि त्याच्या नातेवाईकांना व मित्रांना त्याला पाहून खूप आनंद होतो

लाजरच्या पुनरुत्थानामुळे सर्वांना अत्यानंद झाला.—योहान ११:३८-४४

८ धोंड काढल्यावर येशूने मोठ्याने हाक मारली: “लाजरा, बाहेर ये.” तेव्हा काय झाले? “जो मेलेला होता तो बाहेर आला.” (योहान ११:४३, ४४) तिथे जमलेल्या लोकांना किती आनंद झाला असावा, याची तुम्ही कल्पना करू शकता का? लाजर त्यांचा भाऊ असो, नातेवाईक असो, मित्र असो किंवा शेजारी असो, या सर्वांना तो मेला आहे हे माहीत होते. पण आता त्यांचा लाजर पुन्हा त्यांच्यामध्ये उभा होता! त्या सगळ्यांना क्षणभरासाठी स्वतःच्या डोळ्यांवर विश्‍वासच बसला नसेल! पुष्कळांनी लाजरला आनंदाने मिठी देखील मारली असेल. मृत्यूवर किती हा अद्‌भुत विजय!

एलीयाने एका विधवेच्या मुलाला पुन्हा जिवंत केल्यावर विधवा मुलाला मिठीत घेते

एलीयाने एका विधवेच्या पुत्राचे पुनरुत्थान केले.—१ राजे १७:१७-२४

९, १०. (क) येशूने पुनरुत्थान करण्यासाठी त्याला मिळालेल्या शक्‍तीचे श्रेय कोणाला दिले? (ख) बायबलमधील पुनरुत्थानाचे अहवाल वाचल्याने काय फायदा होऊ शकतो?

९ आपण हा चमत्कार स्वतःच्या शक्‍तीने केला असा येशूने दावा केला नाही. लाजरला बाहेर बोलवण्याआधी येशूने केलेल्या प्रार्थनेत त्याने हे स्पष्टपणे म्हटले, की लाजरचे पुनरुत्थान करणारा खुद्द यहोवा आहे. (योहान ११:४१, ४२) यहोवाने आपल्या शक्‍तीचा उपयोग केवळ एकदाच एखाद्याचे पुनरुत्थान करण्यासाठी केला नाही. लाजरचे पुनरुत्थान तर, देवाच्या वचनात लिहून ठेवलेल्या अशा नऊ चमत्कारांपैकी केवळ एक आहे.a या अहवालांचे वाचन व त्यांचा अभ्यास आनंददायक आहे. या अहवालांवरून आपण शिकतो, की देव पक्षपाती नाही. कारण त्याने, अबाल-वृद्ध, स्त्री-पुरुष, इस्राएली-गैरइस्राएली यांचे पुनरुत्थान केले. या अहवालांत, लोकांना झालेल्या आनंदाचे सुरेख वर्णन करण्यात आले आहे. जसे की, येशूने एका लहान मुलीला मृतातून उठवले तेव्हा तिचे आईवडील आनंदाने “अत्यंत आश्‍चर्यचकित झाले.” (मार्क ५:४२) होय, यहोवाने त्यांना असा एक आनंद अनुभवू दिला होता, की जो ते कधीच विसरू शकणार नव्हते.

पेत्र दुर्कसला पुन्हा जिवंत करतो

प्रेषित पेत्राने दुर्कस नामक एका ख्रिस्ती स्त्रीचे पुनरुत्थान केले.—प्रेषितांची कृत्ये ९:३६-३९

१० हे खरे आहे, की येशूने ज्यांचे पुनरुत्थान केले ते कालांतराने पुन्हा मरण पावले. मग याचा अर्थ, त्यांचे पुनरुत्थान करून काही फायदा झाला नव्हता, असा होतो का? मुळीच नाही. हे बायबल अहवाल महत्त्वपूर्ण सत्यांची पुष्टी देतात आणि आपल्याला आशा देतात.

पुनरुत्थानाच्या अहवालांतून शिकणे

११. लाजरच्या पुनरुत्थानाचा अहवाल, उपदेशक ९:५ मधील सत्याची पुष्टी कशी देतो?

११ बायबल असे शिकवते, की मृतांना “काहीच कळत नाही.” ते जिवंत नाहीत आणि कोठेही त्यांचे अस्तित्व नाही. लाजरचा अहवाल याची खात्री देतो. पुन्हा जिवंत झाल्यावर, लाजरने लोकांना स्वर्गाचे रोमांचकारी वर्णन दिले का? किंवा, धगधगत्या नरकाविषयीच्या कहाण्या सांगून त्याने त्यांना घाबरवले का? नाही. लाजरच्या तोंडून असे काही आल्याचे बायबलमध्ये सांगितलेले नाही. तो चार दिवस मरणावस्थेत होता तेव्हा त्याला ‘काहीच कळाले नाही.’ (उपदेशक ९:५) लाजर फक्‍त मृत्यूच्या निद्रावस्थेत होता.—योहान ११:११.

१२. लाजरचे पुनरुत्थान खरोखरच घडले होते, असे आपण खात्रीने का म्हणू शकतो?

१२ पुनरुत्थान काल्पनिक नव्हे तर वास्तविक आहे, हेही लाजरच्या अहवालावरून आपल्याला शिकायला मिळते. येशूने एका मोठ्या लोकसमुदायादेखत लाजरचे पुनरुत्थान केले. येशूचा तिरस्कार करणाऱ्‍या धार्मिक नेत्यांनी देखील हा चमत्कार नाकारला नाही. उलट ते म्हणाले: “आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य [येशू] तर पुष्कळ चिन्हे करितो.” (योहान ११:४७) पुष्कळ लोक लाजरला पाहायला गेले आणि त्यांपैकी अनेक जण येशूवर विश्‍वास ठेवू लागले. येशूला देवानेच पाठवले आहे, याचा जिवंत पुरावा त्यांना लाजरकडे पाहून मिळाला होता. हा पुरावा इतका जबरदस्त होता, की काही पाषाणहृदयी यहुदी धार्मिक नेत्यांनी तर येशू आणि लाजर या दोघांना ठार मारण्याचा कट रचला.—योहान ११:५३; १२:९-११.

१३. यहोवा खरोखरच मृतांचे पुनरुत्थान करणार आहे यावर विश्‍वास ठेवण्यासाठी आपल्याजवळ काय आधार आहे?

१३ पुनरुत्थान एक वास्तविकता आहे, असे मानणे तर्कशुद्ध आहे का? होय आहे. कारण येशूने असे शिकवले, की असा एक दिवस येईल जेव्हा ‘स्मृती कबरेतील सर्व माणसांचे’ पुनरुत्थान होईल. (योहान ५:२८, NW) यहोवा सबंध सजीव सृष्टीचा निर्माणकर्ता आहे. तो जीवन पुन्हा उत्पन्‍न करू शकतो, यावर विश्‍वास ठेवायला आपल्याला कठीण वाटावे का? पण त्यांना जिवंत करण्याकरता, यहोवाने त्यांना स्मरणात ठेवणे आवश्‍यक आहे. आपल्या मृत प्रिय जणांना तो आठवणीत ठेवू शकतो का? नभोमंडळात असंख्य तारे आहेत. या प्रत्येक ताऱ्‍याला त्याने नाव दिले आहे! (यशया ४०:२६) तेव्हा, आपल्या मृत प्रिय व्यक्‍तिबद्दलची खडान्‌खडा माहिती आठवणीत ठेवण्यास आणि त्यांना पुन्हा जिवंत करण्यास यहोवा देव समर्थ आहे.

१४, १५. ईयोबाने जे म्हटले त्यावरून, मृतांना पुन्हा जिवंत करण्यास यहोवा आतुर आहे हे कशावरून सूचित होते?

१४ बायबल आपल्याला शिकवते की मृतांचे पुनरुत्थान करायला यहोवा आतुर आहे. असे आपण खात्रीने का म्हणू शकतो? विश्‍वासू पुरुष ईयोब याने असे विचारले: “मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?” येथे ईयोब, देवाने त्याची पुन्हा आठवण करण्याची वेळ येईपर्यंत कबरेत थांबून राहण्याविषयी बोलत होता. त्याने यहोवाला म्हटले: “तू मला हाक मारिशील व मी तुला उत्तर देईन; मी जो तुझ्या हातची कृति त्या मजविषयी तुला उत्कंठा लागेल.”—ईयोब १४:१३-१५.

१५ विचार करा! मृतांना पुन्हा जिवंत करण्याची यहोवाला उत्कंठा लागली आहे! हे ऐकून आपल्याला आनंद होत नाही का? पण मग भविष्यात होणाऱ्‍या या पुनरुत्थानात, कोण उठतील आणि कोठे?

“स्मृती कबरेतील सर्व माणसे”

१६. मृतांना कोणत्या प्रकारच्या परिस्थितीत जगण्यासाठी पुनरुत्थित केले जाईल?

१६ बायबलमधील पुनरुत्थानाचे अहवाल आपल्याला भवितव्यात होणाऱ्‍या पुनरुत्थानाविषयी पुष्कळ काही शिकवतात. पृथ्वीवर ज्यांना पुन्हा जिवंत करण्यात आले त्यांचे आपल्या प्रिय नातेवाईकांबरोबर पुनर्मिलन झाले. भवितव्यात होणारे पुनरुत्थान असेच, नव्हे पहिल्यापेक्षाही उत्तम असेल. आपण तिसऱ्‍या अध्यायात शिकलो, की संपूर्ण पृथ्वीला परादीस बनवण्याचा देवाचा उद्देश आहे. याचा अर्थ मृतांना युद्धे, गुन्हेगारी, आजारपण यांनी पछाडलेल्या जगात जगण्याकरता जिवंत केले जाणार नाही. तर त्यांना या पृथ्वीवर शांतीमय व आनंददायक परिस्थितीत अनंतकाळ जगण्याची संधी दिली जाईल.

१७. पुनरुत्थान किती प्रमाणावर होईल?

१७ कोणाचे पुनरुत्थान होईल? येशूने म्हटले: “स्मृती कबरेतील सर्व माणसे त्याची [येशूची] वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील.” (योहान ५:२८, २९, NW) तसेच प्रकटीकरण २०:१३ म्हणते: “तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यांस बाहेर सोडले; मृत्यू व अधोलोक ह्‍यांनी आपल्यातील मृतांस बाहेर सोडले.” “अधोलोक” अथवा हेडीस मानवजातीच्या सर्वसाधारण कबरेला सूचित करते. (पृष्ठे २१२-१३ वरील परिशिष्ट पाहा.) ही सामूहिक कबर रिकामी केली जाईल. मृत्यूच्या निद्रावस्थेत असलेले कोट्यवधी लोक पुन्हा जिवंत होतील. प्रेषित पौलाने म्हटले: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रेषितांची कृत्ये २४:१५) याचा काय अर्थ होतो?

पृथ्वीवरील नंदनवनात पुनरुत्थानाच्या वेळी लोक त्यांच्या नातेवाईकांना भेटतील तेव्हा सर्वत्र आनंदी-आनंद असेल

परादीसमध्ये मृतांना उठवले जाईल आणि त्यांचे आपल्या प्रिय जनांसोबत पुनर्मिलन होईल

१८. ज्या “नीतिमानांचे” पुनरुत्थान होणार आहे त्यांच्यामध्ये कोणाचा समावेश होतो, आणि या आशेचा व्यक्‍तिगतरीत्या तुमच्यावर कसा परिणाम होऊ शकतो?

१८ ‘नीतिमानांमध्ये’ येशू पृथ्वीवर येण्याआधी हयात असणाऱ्‍या सर्वांचा समावेश होतो. या सर्वांविषयी आपण बायबलमध्ये वाचतो. तुम्ही कदाचित, नोहा, अब्राहाम, सारा, मोशे, रूथ, एस्तेर आणि आणखी पुष्कळांचा विचार कराल. यांपैकी काहींची चर्चा इब्री लोकांस पुस्तकाच्या ११ व्या अध्यायात करण्यात आली आहे की ज्यांना देवावर भक्कम विश्‍वास होता. पण आज आपल्या काळांत मरण पावणाऱ्‍या यहोवाच्या सेवकांचा देखील ‘नीतिमानांमध्ये’ समावेश होतो. पुनरुत्थानाच्या आशेमुळे आपल्या मनातील मृत्यूचे भय निघून जाते.—इब्री लोकांस २:१५.

१९. ‘अनीतिमान’ कोण आहेत, आणि यहोवा दयाळुपणे त्यांना कोणती संधी देणार आहे?

१९ पण मग, यहोवाबद्दलची माहिती न मिळाल्यामुळे त्याची सेवा करू न शकलेल्या किंवा त्याच्या आज्ञांचे पालन करू न शकलेल्या सर्व लोकांविषयी काय? या कोट्यवधी ‘अनीतिमानांना’ विसरले जाणार नाही. त्यांचेही पुनरुत्थान केले जाईल आणि त्यांना खरा देव यहोवा याच्याविषयी शिकण्याची व त्याची सेवा करण्याची संधी दिली जाईल. हजार वर्षांच्या कालावधीत, मृतांचे पुनरुत्थान केले जाईल आणि पृथ्वीवर यहोवाची सेवा करणाऱ्‍या विश्‍वासू मानवांबरोबर राहण्याची त्यांना संधी दिली जाईल. हा एक अतिशय रोमांचक काळ असेल. याच काळाला बायबलमध्ये न्यायाचा दिवस म्हटले आहे.b

२०. गेहेन्‍ना काय आहे, आणि तेथे कोण जातात?

२० याचा अर्थ असा होतो का, की प्रत्येक मृत व्यक्‍तीचे पुनरुत्थान होईल? नाही. बायबल म्हणते की काही मृत “गेहेन्‍नात” आहेत. (लूक १२:५, पं.र.भा.) गेहेन्‍ना हे नाव, प्राचीन जेरुसलेम शहराच्या बाहेर असलेल्या एका कचरातळावरून आले आहे. येथे मृत शरीरे आणि कचरा जाळण्यात येई. येथे ज्या लोकांची मृत शरीरे टाकण्यात येत, ते लोक पुनरुत्थानाच्या लायकीचे नाहीत असा यहुदी लोकांचा समज होता. तेव्हा, गेहेन्‍ना हे सार्वकालिक विनाशाचे अगदी उचित प्रतिक आहे. जिवंतांचा आणि मृतांचा न्याय करण्यात येशूची भूमिका असली तरी, यहोवाच अंतिम न्यायाधीश आहे. (प्रेषितांची कृत्ये १०:४२) त्याच्या लेखी जे दुष्ट आणि दुराग्रही आहेत त्यांचे तो कधीही पुनरुत्थान करणार नाही.

स्वर्गीय पुनरुत्थान

२१, २२. (क) आणखी कोणत्या प्रकारचे पुनरुत्थान आहे? (ख) आत्मिक जीवनाचे पुनरुत्थान सर्वात पहिले कोणाचे झाले?

२१ बायबलमध्ये आणखी एका पुनरुत्थानाविषयी देखील सांगितले आहे. हे पुनरुत्थान आत्मिक प्राणी म्हणून स्वर्गीय जीवनाविषयीचे आहे. या प्रकारच्या पुनरुत्थानाचे केवळ एक उदाहरण बायबलमध्ये दिले आहे आणि ते येशू ख्रिस्ताचे आहे.

२२ मानव असताना येशूला ठार मारण्यात आल्यानंतर यहोवाने आपल्या विश्‍वासू पुत्राला कबरेत राहू दिले नाही. (स्तोत्र १६:१०; प्रेषितांची कृत्ये १३:३४, ३५) देवाने येशूचे पुनरुत्थान केले पण मानव म्हणून नव्हे. प्रेषित पेत्र सांगतो, की ख्रिस्त “देहरुपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला.” (१ पेत्र ३:१८) हा खरोखरच एक चमत्कार होता. येशूला पुन्हा एकदा एक शक्‍तिशाली आत्मिक व्यक्‍ती म्हणून जिवंत करण्यात आले! (१ करिंथकर १५:३-६) अशाप्रकारचे गौरवी पुनरुत्थान प्राप्त करणारा येशू पहिला होता. (योहान ३:१३) पण तो पहिला आणि शेवटला असणार नव्हता.

२३, २४. येशूचा ‘लहान कळप’ कोणाचा मिळून बनला आहे, आणि त्यांची संख्या किती आहे?

२३ आपण थोड्याच अवधीत स्वर्गात पुन्हा जाणार आहोत हे माहीत असल्यामुळे येशूने आपल्या विश्‍वासू अनुयायांना सांगितले, की तो तेथे त्यांच्यासाठी “जागा तयार” करील. (योहान १४:२) स्वर्गात जाणाऱ्‍यांना येशूने ‘लहान कळप’ असे संबोधले. (लूक १२:३२) मोठ्या लोकसमुदायाच्या तुलनेत या विश्‍वासू ख्रिश्‍चनांच्या लहान गटात किती जण आहेत? प्रकटीकरण १४:१ नुसार, प्रेषित योहान म्हणतो: “मी पाहिले, तो पाहा, कोकरा [येशू ख्रिस्त] सीयोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला; त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम होते.”

२४ या १,४४,००० ख्रिश्‍चनांना स्वर्गातील जीवनासाठी पुनरुत्थित केले जाते; यांच्यामध्ये येशूच्या विश्‍वासू प्रेषितांचा देखील समावेश होतो. त्यांचे पुनरुत्थान केव्हा होते? ते ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या काळात होईल, असे प्रेषित पौलाने म्हटले. (१ करिंथकर १५:२३) नवव्या अध्यायात तुम्हाला शिकायला मिळेल, की आता आपण याच काळात जगत आहोत. तेव्हा, आपल्या काळात या १,४४,००० जणांतील जे थोडे जण उरलेले आहेत त्यांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांचे स्वर्गातील जीवनासाठी निमिषात पुनरुत्थान होते. (१ करिंथकर १५:५१-५५) परंतु, बहुतेक मानवजातीला भविष्यात पृथ्वीवरील परादीसातील जीवनासाठी पुनरुत्थानाची आशा आहे.

२५. पुढच्या अध्यायात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

२५ होय, यहोवा खरोखरच आपला शत्रू मृत्यू याला पराभूत करील आणि मग मृत्यू कायमचा नाहीसा होईल! (यशया २५:८) पण मग तुमच्या मनात विचार येईल, की ‘स्वर्गातील जीवनासाठी ज्यांचे पुनरुत्थान होणार आहे ते स्वर्गात काय करतील?’ ते स्वर्गात एका अद्‌भुत राज्य सरकाराचा भाग बनतील. या सरकाराविषयी आपण पुढच्या अध्यायात आणखी शिकू या.

a इतर अहवाल, १ राजे १७:१७-२४; २ राजे ४:३२-३७; १३:२०, २१; मत्तय २८:५-७; लूक ७:११-१७; ८:४०-५६; प्रेषितांची कृत्ये ९:३६-४२ आणि २०:७-१२ यांत तुम्हाला वाचायला मिळतील.

b न्यायाच्या दिवसाविषयी आणि कोणत्या आधारावर न्याय केला जाईल याविषयीच्या अधिक माहितीसाठी कृपया पृष्ठे २१३-१५ वरील परिशिष्ट पाहा.

बायबल असे शिकवते

  • बायबलमधील पुनरुत्थानाचे अहवाल आपल्याला पक्की आशा देतात.—योहान ११:३९-४४.

  • यहोवाला मृतांना पुन्हा जिवंत करण्याची उत्कंठा आहे.—ईयोब १४:१३-१५.

  • मानवजातीच्या सर्वसाधारण कबरेत असलेल्या सर्वांचे पुनरुत्थान होईल.—योहान ५:२८, २९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा