अध्याय १५
आपल्या वृद्ध पालकांचा सन्मान करणे
१. आपण आपल्या पालकांचे कशाप्रकारे ऋणी आहोत आणि म्हणून त्यांच्याबद्दल आपल्याला कसे वाटले पाहिजे व काय कार्य केले पाहिजे?
“तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नको,” असा उपदेश प्राचीन काळातील एका बुद्धिमान पुरूषाने दिला. (नीतिसूत्रे २३:२२) तुम्ही म्हणाल, ‘मी कधीच असे करणार नाही!’ आपल्या आईला—अथवा बापाला तुच्छ मानण्याऐवजी—आपल्यातील बहुतेकांना त्यांच्याबद्दल गाढ प्रेम वाटते. आपण त्यांचे अधिक ऋणी असल्याची जाणीव आपल्याला आहे. प्रथमतः, आपल्या पालकांनी आपल्याला जीवन दिले आहे. यहोवा जीवनाचा स्रोत असला, तरी पालकांशिवाय आपण अस्तित्वातच आलो नसतो. आपण आपल्या पालकांना जीवनापेक्षा अधिक मोलवान असे काहीही देऊ शकत नाही. एखाद्या मुलाचे बाल्यावस्थेपासून प्रौढ होईपर्यंत त्याला मदत करण्यामध्ये समाविष्ट असलेला स्वार्थत्याग, कळकळीने घेतलेली काळजी, खर्च आणि प्रेमळ लक्ष यांचा जरा विचार करा. या कारणास्तव, देवाचे वचन जो सल्ला देते तो किती वाजवी आहे: “आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख, ह्यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायु असावे.”—इफिसकर ६:२, ३.
भावनात्मक गरजा ओळखणे
२. प्रौढ मुले आपल्या पालकांचे उपकार कसे ‘फेडू’ शकतात?
२ प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना लिहिले: “[मुले अथवा नातवंडांनी] प्रथम आपल्या घरच्यांबरोबर सुभक्त्यनुसार वागून आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे उपकार फेडावयास शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे.” (१ तीमथ्य ५:४) प्रौढ मुले, पालकांनी आणि आजी-आजोबांनी अनेक वर्षे दाखवलेले प्रेम, त्यांच्यासाठी केलेले काम तसेच घेतलेल्या काळजीबद्दल कदर बाळगून त्यांचे “उपकार” फेडतात. इतरांप्रमाणे वयस्करांना देखील प्रेम आणि धीराची बहुधा अत्यंत गरज आहे हे ओळखण्याद्वारे मुले असे करू शकतात. आपल्या सर्वांप्रमाणेच, त्यांना सुद्धा मोलाचे समजले जात आहेत असे वाटू देण्याची गरज आहे. त्यांचे जीवन सार्थ असल्याचे वाटू देण्याची गरज आहे.
३. आपण पालकांचा आणि आजी-आजोबांचा सन्मान कसा करू शकतो?
३ यास्तव, आपण आपल्या पालकांवर आणि आजी-आजोबांवर प्रेम करतो याची जाणीव त्यांना करून देण्याद्वारे त्यांचा सन्मान करू शकतो. (१ करिंथकर १६:१४) आपले पालक आपल्यासोबत राहत नसल्यास, त्यांच्याशी दळणवळण राखणे ही त्यांच्याकरता एक मोठी बाब असू शकते, हे लक्षात ठेवा. एखादे आनंदाचे पत्र, फोन कॉल किंवा एखादी भेट त्यांच्या आनंदात भर टाकू शकते. जपानमध्ये राहत असलेल्या मियोने ८२ वर्षांची असताना असे लिहिले होते: “माझी मुलगी [जिचा पती प्रवासी सेवक आहे] मला सागंते: ‘आई, तू आमच्यासोबत “प्रवास” कर.’ ती मला प्रत्येक आठवड्याला त्यांच्या प्रवासाचा आराखडा आणि दूरध्वनी क्रमांक पाठवते. मी माझा नकाशा उघडून पाहते व स्वतःशी पुटपुटते: ‘हं, आता ते येथे आहेत!’ असे लेकरू असण्याच्या या आशीर्वादाबद्दल मी यहोवाचे नेहमीच आभार मानते.”
भौतिक गरजांनी साह्य करणे
४. यहुदी धार्मिक परंपरांनी वृद्ध पालकांबद्दल कठोरतेला उत्तेजन कसे दिले?
४ पालकांचा सन्मान करण्यात त्यांच्या भौतिक गरजांची काळजी घेणे याचा देखील समावेश होतो का? होय. अनेकदा त्यामध्ये याचा समावेश होतो. येशूच्या दिवसांतील यहुदी धार्मिक पुढाऱ्यांनी, एखाद्या व्यक्तीने त्याचे पैसे किंवा मालमत्ता “देवाला अर्पण” केल्याचे सांगितले असल्यास, आपल्या पालकांची काळजी घेण्याच्या जबाबदारीपासून ती व्यक्ती मुक्त होते अशा परंपरांना उंचावले. (मत्तय १५:३-६) किती कठोर! खरे पाहता, ते धार्मिक पुढारी, पालकांचा सन्मान करू नका तर स्वार्थीपणाने त्यांच्या गरजा नाकारून त्यांचा अनादर करा असे उत्तेजन लोकांना देत होते. पण आपण असे कधीही इच्छिणार नाही!—अनुवाद २७:१६.
५. काही देशांतील सरकारांनी बनवलेल्या योजनांखेरीज, पालकांचा सन्मान करण्यात काही वेळा आर्थिक मदत देण्याचा समावेश का होतो?
५ आज अनेक देशांमध्ये सरकार राबवत असलेले सामाजिक कार्यक्रम, वृद्धांना अन्न, वस्र आणि निवारा यांसारख्या काही भौतिक गरजा पुरवतात. या व्यतिरिक्त, वृद्धजण स्वतः त्यांच्या वृद्धावस्थेत काही मिळकत राखून ठेवू शकतात. परंतु, ही मिळकत संपुष्टात आल्यास अथवा अपुरी पडल्यास, मुले त्यांच्या पालकांच्या गरजा शक्य असलेल्या मार्गाने पूर्ण करून त्यांचा सन्मान करतात. वस्तुतः, वृद्ध पालकांची काळजी घेणे हा ईश्वरी भक्तीचा, म्हणजेच कौटुंबिक व्यवस्थेचा मूळ निर्माता यहोवा देव याच्या भक्तीचा एक पुरावा आहे.
प्रेम आणि स्वार्थत्याग
६. काहींनी आपल्या पालकांची काळजी घेण्यासाठी राहण्याच्या कोणत्या सोयी केल्या आहेत?
६ अनेक प्रौढ मुलांनी प्रेम आणि स्वार्थत्याग करून त्यांच्या दुर्बल पालकांच्या गरजा पुरवल्या आहेत. काहींनी त्यांच्या पालकांना स्वतःच्या घरी नेले आहे किंवा त्यांच्या जवळपासच्या परिसरात राहण्यासाठी गेले आहे. काही जण त्यांच्या पालकांसोबत राहू लागले आहेत. वारंवार, अशा व्यवस्था पालक आणि मुलांसाठी एक आशीर्वाद ठरल्या आहेत.
७. वृद्ध पालकांविषयी घाईने निर्णय न घेणे चांगले का आहे?
७ तथापि, काहीवेळा, अशा प्रकारच्या स्थलांतराचा चांगला परिणाम दिसून येत नाही. का बरे? कदाचित ते निर्णय घाईने घेतलेले असतात किंवा केवळ भावनांवर आधारलेले असतात. बायबल सुज्ञपणे इशारा देते, “शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.” (नीतिसूत्रे १४:१५) उदाहरणार्थ, समजा तुमच्या वयस्कर आईला एकटे राहणे कठीण वाटत आहे आणि ती तुमच्यासोबत राहिल्यास बरे होईल असे तुम्हाला वाटते. शहाणपणाने पाऊल उचलताना तुम्ही कदाचित पुढील गोष्टींचा विचार करू शकता: तिच्या वास्तविक गरजा कोणत्या आहेत? स्वीकारयोग्य पर्यायी उपाय देणाऱ्या खासगी अथवा प्रांताने राबवलेल्या सामाजिक सेवा आहेत का? तिला तुमच्यासोबत येण्याची इच्छा आहे का? असल्यास, त्याचा तिच्या जीवनावर कशाप्रकारे परिणाम होईल? तिला मित्रमंडळीला सोडून यावे लागणार का? याचा तिच्यावर भावनात्मकरित्या कसा परिणाम होऊ शकतो? या गोष्टी तुम्ही तिच्यासोबत बोललात का? अशा स्थलांतराचा परिणाम तुमच्यावर, तुमच्या सोबत्यावर आणि मुलांवर कसा होऊ शकतो? तुमच्या आईला काळजीची गरज असल्यास ती कोण पुरवील? ही जबाबदारी सर्वांनी मिळून हाताळली जाऊ शकते का? ज्यांचा थेट संबंध आहे त्यांच्यासोबत तुम्ही याविषयी चर्चा केली आहे का?
८. तुमच्या वृद्ध पालकांची कशी काळजी घ्यावी हे ठरवताना तुम्हाला कोणाचा सल्ला घेता येऊ शकेल?
८ काळजी घेण्याची जबाबदारी कुटुंबातील सर्व मुलांवर येत असल्यामुळे, कुटुंब मिळून एकत्र येणे सुज्ञतेचे असेल जेणेकडून निर्णय घेण्यात सर्व जण सामील होऊ शकतात. ख्रिस्ती मंडळीतील वडिलांशी अथवा अशाच प्रकारच्या परिस्थितीचा सामना केलेल्या मित्रांशी बोलणे देखील मदतदायी होऊ शकेल. बायबल इशारा देते, “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात.”—नीतिसूत्रे १५:२२.
सहानुभावी आणि समजूतदार असा
पालकाला प्रत्यक्ष बोलल्याशिवाय त्यांच्याकरता निर्णय घेणे सुज्ञतेचे नाही
९, १०. (अ) उतारवय असताना देखील वृद्ध जनांबद्दल कोणता विचारीपणा दाखवला पाहिजे? (ब) एखादा प्रौढ आपल्या पालकांसाठी कोणतेही पाऊल उचलत असला, तरी त्याने नेहमीच त्यांना काय दिले पाहिजे?
९ आपल्या वृद्ध पालकांचा सन्मान करण्यासाठी सहानुभाव आणि समजूतदारपणा यांची गरज असते. वृद्धापकाळ गंभीर परिणाम करतो तेव्हा वृद्ध जणांना चालणे, खाणे आणि काही गोष्टी लक्षात ठेवणे अधिकच कठीण होऊ लागते. त्यांना मदतीची गरज असेल. मुले अनेकदा वृद्धांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेतात व त्यांना मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतात. परंतु, वृद्ध जण आयुष्यभरातील बुद्धी आणि अनुभव असलेले वयस्कर आहेत, त्यांनी आपल्या जीवनमानात स्वतःची काळजी घेतली व स्वतःच निर्णय घेतले आहेत. त्यांची ओळख आणि स्वाभिमान या गोष्टी पालक आणि प्रौढ या त्यांच्या भूमिकेवर केंद्रित असतात. ज्या पालकांना स्वतःच्या जीवनावर मुलांनी नियंत्रण ठेवावे असे वाटते ते निराश आणि क्रोधित होतील. आपले स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे, असा विचार करून ते चिडतात व ते अशा गोष्टींचा विरोध करतात.
१० अशा समस्यांवर सोपे उपाय नाहीत, पण वृद्ध पालकांना स्वतःची काळजी घेऊ देणे आणि होता होईल तसे स्वतःच निर्णय घेऊ देणे ही दया आहे. आपल्या पालकांबरोबर प्रथम बोलण्याआधी त्यांच्यासाठी काय चांगले आहे याबाबत निर्णय घेणे सुज्ञतेचे नाही. कदाचित त्यांनी बरेच काही गमावले असेल. आता त्यांच्याजवळ जे काही बाकी आहे ते त्यांच्याजवळ राहू द्या. तुमच्या पालकांच्या जीवनावर जितके कमी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करता तितके तुमचे नातेसंबंध त्यांच्यासोबत चांगले होतात असे तुम्हाला दिसून येईल. ते आनंदी असतील आणि तुम्ही देखील. पालकांच्या भल्यासाठी विशिष्ट गोष्टी आवर्जून सांगावयाच्या असल्या, तरी त्यांचा सन्मान करण्यामध्ये पात्र असलेला मान आणि आदर त्यांना देण्याची अपेक्षा केली जाते. देवाचे वचन सल्ला देते: “पिकल्या केसासमोर उठून उभा राहा; वृद्धाला मान दे.”—लेवीय १९:३२.
उचित मनोवृत्ती बाळगणे
११-१३. गतकाळात, प्रौढ मूल आणि त्याच्या पालकांचे संबंध चांगले नसले तरीही, त्यांच्या वृद्धापकाळात त्यांची काळजी घेण्याच्या आव्हानाला तो कसे तोंड देऊ शकतो?
११ काहीवेळा वृद्ध पालकांचा सन्मान करताना प्रौढ मुलांना ज्या समस्येला तोंड द्यावे लागते, यामध्ये प्रौढ मुले लहान होती तेव्हा त्यांचा आपल्या पालकांसोबत जो नातेसंबंध होता तो समाविष्ट आहे. कदाचित, तुमचे वडील भावनाशून्य आणि प्रेम न करणारे आणि तुमची आई हक्क गाजवणारी व कठोर होती. तुम्हाला जसे हवे होते तसे ते पालक नसल्यामुळे तुम्हाला अजूनही निराश, क्रोधिष्ट किंवा दुःखित वाटत असेल. अशा भावनांवर तुम्ही मात करू शकता का?a
१२ फिनलंडमध्ये लहानाचा मोठा झालेला बॉसे सांगतो: “माझे सावत्र वडील नात्सी जर्मनीत एक एसएस अधिकारी होते. त्यांचा राग लगेच भडकत असे आणि मग ते हिंसक होत असत. त्यांनी अनेक वेळा आईला माझ्या देखत मारले होते. एकदा माझ्यावर रागावले त्यांनी पट्ट्याच्या बक्कलने माझ्या तोंडावर मारले. त्यांनी मला इतके जोराने मारले ज्यामुळे मी बिछान्यावर कोसळलो.”
१३ तरीसुद्धा, याची दुसरी बाजू देखील होती. बॉसे पुढे सांगतो: “दुसऱ्या बाजूला पाहता, त्यांनी काबाडकष्ट केले आणि कुटुंबाच्या भौतिक गरजा पुरवण्यात काही कसर बाकी ठेवली नाही. त्यांनी मला पितृत्वाची आपुलकी कधीही दाखवली नसली, तरी त्यांच्यावर पडलेल्या भावनात्मक व्रणाची जाणीव मला होती. ते तरुण असताना त्यांच्या आईने त्यांना घरातून काढून दिले होते. ते हाणामाऱ्या करतच लहानाचे मोठे झाले आणि त्यांनी तरुणपणीच युद्धात प्रवेश केला. काही अंशी मी हे समजून घेत होतो व त्यांना दोष देत नव्हतो. मी मोठा झाल्यावर, त्यांच्या मृत्यूपर्यंत होता होईल तितकी मदत करावयाची माझी इच्छा होती. ते सोपे नव्हते, पण मला जमेल ते मी केले. त्यांच्या मृत्यूपर्यंत मी त्यांचा एक चांगला पुत्र असण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मला समजून घेतले असावे असे मला वाटते.”
१४. वृद्ध पालकांची काळजी घेताना उद्भवणाऱ्या परिस्थितींना सर्व परिस्थितींसहित कोणते शास्रवचन लागू होते?
१४ इतर बाबींप्रमाणेच कौटुंबिक परिस्थितींत, बायबलचा सल्ला लागू होतो: “करूणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा; एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा.”—कलस्सैकर ३:१२, १३.
काळजीवाहुला देखील काळजीची गरज
१५. पालकांची काळजी घेणे काहीवेळा त्रासदायक ठरणारे का आहे?
१५ दुर्बल पालकांची काळजी घेणे एक कठीण कार्य आहे, ज्यामध्ये अनेक कामे, अधिक जबाबदारी आणि दीर्घ काळ समाविष्ट आहे. परंतु अनेकदा सर्वात कठीण भाग भावनात्मक असतो. तुमच्या पालकांचे आरोग्य खालावत चालल्याचे व स्मरणशक्ती आणि स्वतंत्रता कमी होत असल्याचे पाहणे दुःखदायक असते. प्वेर्त रिकोतील सॅन्डी सांगते: “माझी आई आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ होती. तिची काळजी घेणे अतिशय दुःखदायक होते. प्रथम ती लंगडू लागली, मग तिला काठीची नंतर वॉकर आणि मग व्हीलचेअरची गरज पडली. त्यानंतर दिवसेंदिवस खालावत जाऊन तिचा मृत्यू झाला. तिला हाडाचा कर्क झाल्यामुळे रात्रंदिवस तिची काळजी घ्यावी लागत होती. आम्ही तिला अंघोळ घालत असू आणि तिला जेवण भरवत असू, तिच्यासाठी वाचन करत असू. विशेषपणे भावनात्मकरित्या ते अतिशय अवघड होते. माझ्या आईचा मृत्यू होत असल्याचे मला कळले तेव्हा मी फार रडले कारण माझे तिच्यावर फार प्रेम होते.”
१६, १७. काळजीवाहूला सर्व बाबींविषयी संतुलित दृष्टिकोन बाळगण्यासाठी कोणता सल्ला मदत करील?
१६ तुमची परिस्थिती अशीच असल्यास, तिला तोंड देण्यासाठी तुम्ही काय करू शकता? बायबल वाचनाद्वारे यहोवाचे ऐकल्याने आणि प्रार्थनेद्वारे त्याच्याशी बोलल्याने बरीच मदत होऊ शकेल. (फिलिप्पैकर ४:६, ७) व्यावहारिक रितीने, तुम्हाला संतुलित आहार आणि पुरेशी झोप मिळते याची खात्री करा. असे केल्याने, तुम्ही तुमच्या प्रियजनांची भावनात्मकरित्या आणि शारीरिकरित्या काळजी घेण्याच्या चांगल्या स्थितीत असाल. कदाचित, तुम्ही दैनंदिन नित्यक्रमापासून वेळोवेळी विश्रांती घेण्यासाठी वेळ काढू शकता. सुटी काढणे शक्य नसले, तरी विरंगुळ्यासाठी काही वेळ काढण्याची योजना करू शकता. आजारी पालकांची काळजी घेण्यापासून काही वेळ काढता यावा म्हणून तुमच्या पालकांची काळजी घेण्यासाठी इतरांची व्यवस्था तुम्हाला करता येऊ शकेल.
१७ काळजीवाहू व्यक्ती प्रौढ असल्यास तिच्याही काही अवाजवी अपेक्षा असतात, हे असामान्य नाही. परंतु तुम्हाला जे करता येत नाही त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नका. काही परिस्थितींत, तुमच्या प्रियजनांची काळजी घेण्यासाठी त्यांना शुश्रूषा गृहात ठेवण्याची गरज भासेल. तुम्ही काळजीवाहू असल्यास स्वतःकरता वाजवी अपेक्षा ठेवा. तुम्ही केवळ तुमच्या पालकांच्याच गरजा नव्हे, तर तुमची मुले, वैवाहिक सोबती आणि स्वतःच्या गरजा देखील संतुलित ठेवल्या पाहिजेत.
पराकोटीचे सामर्थ्य
१८, १९. यहोवाने आधार देण्याचे कोणते अभिवचन दिले आहे आणि तो आपले वचन पाळतो हे कोणत्या अनुभवावरून दिसते?
१८ यहोवा आपले वचन, बायबलमधून प्रेमळपणे पुरवत असलेल्या मार्गदर्शनाची, वृद्ध पालकांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला बरीच मदत होऊ शकते, परंतु केवळ हीच एक मदत तो पुरवत नाही. स्तोत्रकर्त्याने प्रेरित होऊन असे लिहिले: ‘यहोवा धावा करणाऱ्या सर्वांजवळ असतो.’ “तो त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारितो.” यहोवा त्याच्या विश्वासू जणांना अतिशय बिकट परिस्थितींतून तारील किंवा त्यांचे रक्षण करील.—स्तोत्र १४५:१८, १९.
१९ फिलिपाईन्समधील मर्नाच्या आईला पक्षघाताच्या झटक्याने पूर्णपणे असाहाय्य बनवले होते तेव्हा आपल्या आईची काळजी घेत असताना ती हे शिकली. मर्ना लिहिते: “तुमची प्रिय व्यक्ती त्रास सहन करत असल्याचे, कोठे दुखते ते सांगण्यास असमर्थ असल्याचे पाहणे, यापेक्षा अधिक खिन्न करणारे असे काही नाही. ती हळूहळू पाण्यात बुडत असल्यासारखे हे होते आणि मी काहीही करू शकत नव्हते. मी किती थकले आहे त्याबद्दल अनेकदा मी गुडघे टेकून यहोवाशी बोलत असे. माझी आसवे बुधलीत भरून ठेव आणि माझे स्मरण ठेव अशी याचना केलेल्या दाविदाप्रमाणे मी रडले. [स्तोत्र ५६:८] यहोवाने अभिवचन दिल्याप्रमाणे, आवश्यक असलेले सामर्थ्य त्याने मला दिले. ‘यहोवा माझा आधार झाला.’”—स्तोत्र १८:१८.
२०. काळजी घेत असलेल्यांवर मृत्यू ओढावल्यावरही, काळजीवाहूंना बायबलची कोणती अभिवचने आशावादी असण्यासाठी मदत करतात?
२० असे म्हटले जाते की, वृद्ध पालकांची काळजी घेणे ही “आनंदी समारोप नसणारी एक गोष्ट आहे.” सर्वात उत्तम काळजी घेतल्यावरही मर्नाच्या आईप्रमाणेच वृद्ध जनांवर मृत्यू ओढावू शकतो. परंतु, यहोवावर भरवसा ठेवणाऱ्यांना, मृत्यू हा शेवट नसल्याचे माहीत आहे. प्रेषित पौलाने म्हटले: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी . . . आशा मी देवाकडे पाहून धरितो.” (प्रेषितांची कृत्ये २४:१५) आपल्या वृद्ध पालकांना मृत्यूत गमावलेले, पुनरुत्थानाच्या आशेपासून तसेच जेथे ‘मरण राहणार नाही,’ अशा देव-निर्मित नवीन आनंदी जगाच्या अभिवचनापासून सांत्वन मिळवू शकतात.—प्रकटीकरण २१:४.
२१. वृद्ध पालकांचा सन्मान केल्याने कोणते चांगले परिणाम घडून येतात?
२१ देवाच्या सेवकांना त्यांचे पालक वृद्ध झालेले असले, तरी त्यांच्याबद्दल गाढ आदर वाटतो. (नीतिसूत्रे २३:२२-२४) ते त्यांचा सन्मान करतात. असे करण्याद्वारे ते, प्रेरित नीतिसूत्र जे सांगते त्याचा अनुभव घेतात: “तुझी मातापितरे आनंद पावोत, तुझी जन्मदात्री हर्ष पावो.” (नीतिसूत्रे २३:२५) अधिक महत्त्वाचे म्हणजे, जे आपल्या वृद्ध पालकांचा सन्मान करतात ते यहोवा देवाला देखील खूष करतात व त्याचा सन्मान करतात.
a पालकांनी आपली शक्ती आणि भरवशाचा कमालीचा दुरूपयोग केल्यामुळे त्यांना दोषी समजले जाऊ शकते अशा परिस्थितींची चर्चा आम्ही येथे करत नाही.