दुःखाचा कधी अंत होईल का?
आपल्या जीवनात कधीच दुःखदायक गोष्टी सहन कराव्या लागल्या नाहीत अशा कोणाला तुम्ही ओळखता का? असे कोणी असूच शकत नाही! तसेच, आज एवढ्या दुःखदायक गोष्टी जगात का आहेत याचे कारण ठामपणे सांगणाऱ्या कोणाला तुम्ही ओळखता का? लोकांना दुःख का सहन करावे लागते हे तुम्हाला माहीत आहे का?
अनेकांना वाटते की हे सर्व आपल्या कर्माचे फळ आहे; कर्माच्या शिकवणीनुसार मागच्या जन्मी केलेल्या कार्यांमुळे आज आपल्याला दुःख भोगावे लागते. बहुतेक लोकांना ही शिकवण तर्कसंगत असल्याचे वाटते कारण स्वतःची काही चूक नसतानाही लोकांना आज दुःख भोगावे लागते. कदाचित काहींचा जन्मच गरीब कुटुंबात झालेला असतो आणि काही जण तर जन्मतःच विकलांग किंवा अधू असतात. सर्वसामान्यपणे असा विचार केला जातो की त्यांनी मागच्या जन्मी नक्कीच काही तरी पाप केलेले असावे आणि म्हणून ते आता ही शिक्षा भोगत आहेत. कदाचित तुम्हालाही असेच वाटत असेल.
परंतु, सर्वच लोक या विचाराशी सहमत नाहीत. अनेक जण असा विश्वास बाळगतात की सध्याच्या जीवनावर परिणाम करू शकणारा मागचा जन्म वगैरे काही नाही. या दृष्टिकोनावर आपण विचार करायला हवा. का बरे? यासाठी पुढील परिस्थितींचा विचार करा.
काही देशांत अधिकांश लोक अतिशय गरीब आहेत. यामुळे बहुतेक मुलांना हलाखीचा सामना करावा लागतो आणि ते आयुष्यभर आजारी असतात व गरिबीत जीवन कंठतात. मग याचा अर्थ या मुलांनी त्यांच्या मागच्या जन्मी काही तरी पाप केले होते आणि त्यामुळे त्यांना आता हे भोगावे लागत आहे असा होतो का? दुसऱ्या बाजूला पाहता, सुसंपन्न देशांतील अनेक मुलांचा जन्म श्रीमंत कुटुंबांत होतो. यामुळे गरीब देशांतील मुलांपेक्षा ते अधिक निरोगी असतात आणि सर्व सुखसोयींचा उपभोग घेतात. मग याचा अर्थ, श्रीमंत देशांतील लोकांनी त्यांच्या मागच्या जन्मी चांगली कृत्ये केली होती आणि गरीब देशांत जन्माला आलेल्या मुलांनी वाईट कृत्ये केली होती असा होतो का?
हा विश्वास तर्काला पटतो का? यामुळे आपण अशा निष्कर्षाला येणार नाही का, की गरीब देशांत जन्माला येणाऱ्यांपेक्षा समृद्ध देशांत जन्माला येणारे लोक अधिक चांगले आहेत? पण हे खरे नसल्याचे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे मागच्या जन्मी काही तरी वाईट केल्यामुळे आता दुःख भोगावे लागत आहे या शिकवणीबद्दल मनात शंका येणे साहजिकच आहे. पण मग याविषयी सत्य काय आहे हे जाणण्याचा एखादा मार्ग आहे का?
होय, असा एक मार्ग आहे आणि त्याचे स्पष्टीकरण सध्या अस्तित्वात असलेल्या अतिपुरातन पुस्तकात दिले आहे. इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा या पुस्तकाचा अनुवाद अनेक भाषांत करण्यात आल्यामुळे संपूर्ण पृथ्वीभरातील लोकांसाठी ते उपलब्ध आहे. हे पुस्तक मध्य पूर्वेकडील लोकांनी लिहिले आणि सामान्यपणे त्याचा उल्लेख पवित्र बायबल असा केला जातो.
हे प्राचीन पुस्तक आपल्याला सांगते की, पहिल्या स्त्री-पुरूषाला परिपूर्ण मानव असे निर्माण करण्यात आले होते. त्यांना पृथ्वीवरील परिपूर्ण परिसरात—बागेसमान सुंदर अशा परादीसात ठेवले होते. यामुळे त्यांच्या जीवनात कुठल्याही प्रकारचे दुःख नव्हते. निर्माणकर्त्याने त्यांना, दुःखाचा अनुभव न घेता सामोरे जाव्या लागणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांवर मात करता येईल अशा प्रकारे त्यांची निर्मिती केली होती. अनादिकाळापर्यंत कायम आनंदाने राहण्यासाठी केवळ एक महत्त्वपूर्ण अट त्यांना पूर्ण करावयाची होती. ती अट म्हणजे जिवंत राहण्यासाठी असलेल्या निर्माणकर्त्याच्या नियमांचे पालन करून त्याच्याबद्दल कदर दाखवणे.
दुःखाची गोष्ट म्हणजे, या पहिल्या जोडप्याने त्यांना मूल होण्याआधीच निर्माणकर्त्याने दिलेली एक साधी आज्ञा तोडून त्याच्याविषयी कृतघ्न मनोवृत्ती प्रदर्शित केली. परिणामस्वरूप, ते परिपूर्ण आरोग्य आणि एक सुंदर बागेसमान घर गमावून बसले. त्यानंतर लगेचच वेगवेगळ्या प्रकारचे दुःख जसे की आजारपण आणि शेवटी म्हातारपण व मृत्यू यांचा आरंभ झाला. त्यांच्या मुलांचा जन्म झाला तेव्हा ते आपल्या पालकांप्रमाणेच अपरिपूर्णतेत जन्माला आले. यामुळे मानवांच्या वाट्याला जन्मापासूनच टाळता न येणारे अनेक प्रकारचे दुःख आले आणि म्हातारपण व मरण हे अटळ होऊन बसले.
हे तुम्हाला तर्कसंगत वाटते का? नसल्यास कृपया पुढील गोष्टीवर विचार करा: हजारो मुलांना त्यांच्या जन्मापासूनच एड्सच्या विषाणूची लागण झालेली असते. निश्चितच या मुलांनी काही वाईट केल्यामुळे ही लागण त्यांना झालेली नसते. खरे पाहता त्यांना या विषाणूची लागण, रोगाची लागण झालेल्या त्यांच्या आईकडून होते. आईला ही लागण तिच्या स्वतःच्या अनैतिक जीवनशैलीमुळे झालेली असेल किंवा तिच्या अनैतिक जीवन जगणाऱ्या नवऱ्याकडून झालेली असेल. याचे कारण कोणतेही असले तरी या संसर्गाला तिचे न जन्मलेले बाळ बळी पडते. अशाचप्रकारे, जैविक परिस्थितीमुळेच पहिल्या आज्ञाभंजक मानवी जोडप्याच्या पोटी अपरिपूर्ण मुले जन्माला आली.
बायबल दाखवते की सर्व मानव याच पहिल्या जोडप्यापासून आले आहेत. यामुळे सर्व लोक त्यांच्या जन्मापासूनच अपरिपूर्ण आहेत आणि त्यांचा कल दुःखाकडे आहे. यामुळेच वारशाने मिळालेली अपरिपूर्णता तसेच सभोवतालच्या अपरिपूर्ण परिस्थितीतील जीवन आजच्या दुःखाचे प्रमुख कारण आहे, असे बायबल सांगते.
कोणीही मनुष्य यात बदल करू शकत नसल्यामुळे, तुम्ही विचार कराल की ‘या दयनीय स्थितीतून बाहेर पडण्यासाठी आशेचा किरण आहे का?’ बायबल या प्रश्नाचे उत्तर देते: निर्माणकर्ता ज्याचे नाव यहोवा आहे त्याने आपला पुत्र, येशू ख्रिस्त याच्याद्वारे मानवजातीला परिपूर्णतेच्या पूर्वस्थितीत आणण्याकरता व संपूर्ण पृथ्वीला एक वैभवी परादीस बनवण्याकरता काही योजना बनवल्या आहेत. बायबल सांगते: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१६.
प्रेम आणि दयेने प्रवृत्त होऊन निर्माणकर्ता आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे मानवजातीला त्यांच्या अपरिपूर्ण स्थितीतून आणि त्याजशी निगडीत असणाऱ्या दुःखातून पूर्णपणे मुक्त करील. येशूद्वारेच निर्माणकर्ता, इतरांचे शोषण करणाऱ्या आणि लोकांनी या पृथ्वीवर कसे राहावे याची किंचितही पर्वा न करणाऱ्या सर्व दुष्टांचे पृथ्वीवरून उच्चाटन करील. योहान ३:१६ या वचनात सांगितल्याप्रमाणे, केवळ निर्माणकर्त्यावर ‘विश्वास ठेवणाऱ्या’ अर्थात जे त्याची कदर बाळगतात केवळ त्यांनाच तो लवकरच आणणार असलेल्या नवीन जगात राहण्याची अनुमती देईल.
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की बायबल भविष्यवाणींनुसार आपण या गोष्टी घडून येणाऱ्या काळाच्या ओघात अत्यंत जवळ येऊन ठेपलो आहोत. खरे पाहता बायबल आपल्या काळाला या व्यवस्थीकरणाचे ‘शेवटले दिवस’ असे संबोधते. (२ तीमथ्य ३:१) या व्यवस्थीकरणाच्या नाशानंतर संपूर्ण पृथ्वी एक परादीस बनेल. त्या परादीसात ज्यांना अनुकूल न्याय मिळेल ते, आरंभी निर्माणकर्त्याचा पहिल्या जोडप्याविषयी जो उद्देश होता त्यानुसार कोणत्याही दुःखाविना सर्वकाळ जगतील.
परंतु हे आशीर्वाद तुम्हाला मिळतील याची खातरी तुम्ही कशी बाळगू शकता? याविषयीच्या अतिरिक्त माहितीसाठी ही पत्रिका तुम्हाला ज्यांनी दिली त्या यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधण्यासाठी मागेपुढे पाहू नका.
विचार करण्याजोगे बायबलचे संदर्भ
उत्पत्ति १:३१अ: “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.”
उत्पत्ति २:८: “परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लाविली आणि तीत आपण घडिलेल्या मनुष्याला ठेविले.”
उत्पत्ति २:१६, १७: “तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की ‘बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.’”
रोमकर ५:१२: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”
स्तोत्र ४९:७: “कोणाहि मनुष्यास आपल्या भावाला मुक्त करिता येत नाही; किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही.”
यशया ३३:२४: “‘मी रोगी आहे,’ असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.”
२ तीमथ्य ३:१: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे.”
१ तीमथ्य ६:१७, १९: ‘धनवानांनी . . . देवावर . . . आशा ठेवावी; जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी करावा.’
प्रकटीकरण २१:३, ४: “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.”
[६ पानांवरील चित्राचे श्रेय]
मुखपृष्ठ: Patrick Frilet/Sipa Press