वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • kl अध्या. १५ पृ. १४०-१४९
  • देवाला सन्मान देणारे कुटुंब उभारणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाला सन्मान देणारे कुटुंब उभारणे
  • सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आनंदी कुटुंबाची उभारणी करण्याजोगी साधनसामग्री
  • देवाविषयीच्या ज्ञानाद्वारे मुलांचे संगोपन करणे
  • “कुशल मार्गदर्शन” मिळवणे
  • कौटुंबिक जीवन यशस्वी करणे
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • तुमच्या विवाहास टिकाऊ बंधन बनवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • ख्रिस्ती विवाह यशस्वी कसा बनवाल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • विवाह—प्रेमळ देवाकडून मिळालेली देणगी
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
अधिक माहिती पाहा
सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
kl अध्या. १५ पृ. १४०-१४९

अध्याय १५

देवाला सन्मान देणारे कुटुंब उभारणे

१-३. विवाह व पालकत्वाच्या सर्वसाधारण समस्या काहींना का सुटत नाहीत, पण बायबल कशी मदत करू शकते?

समजा तुम्ही स्वतःचे घर बांधायची योजना केली आहे. पहिल्यांदा तुम्ही जागा खरेदी करता. तुम्ही तुमच्या मनःचक्षूंपुढे आपल्या नव्या घराचे चित्र मोठ्या उत्सुकतेने रंगवता. पण, तुमच्याकडे साधनसामग्री तसेच बांधण्याचे कौशल्य नसले तर काय? तुमचे प्रयत्न केवढे निष्फळ ठरतील!

२ बहुतेक जोडपी सुखी संसाराचे दृश्‍य पुढे ठेवूनच विवाहात प्रवेश करतात; पण त्यांच्याकडे त्या प्रकारातील कुटुंबाची उभारणी करण्याजोगी साधनसामग्री किंवा कौशल्य नसते. लग्नाच्या दिवसानंतर लगेचच नकारात्मक स्वभावपद्धती वाढू लागतात. मारामारी व भांडणे तर दररोजचे प्रकार बनतात. मुलांचा जन्म होतो तेव्हा नव्यानेच आईवडील बनलेल्यांना, आनंदी विवाह उभारण्यासाठी जशी कौशल्याची उणीव भासली होती, तशीच येथे पालकत्वाच्या कौशल्याची उणीव भासते आहे असे कळू लागते.

३ तथापि, बायबल येथे मदत करू शकते ही आनंदाची गोष्ट आहे. त्याची तत्त्वे ही अशी साधनसामग्री आहे जी तुम्हाला आनंदी कुटुंब उभारण्याकरता समर्थ करू शकते. (नीतिसूत्रे २४:३) कसे ते आपण पाहू या.

आनंदी कुटुंबाची उभारणी करण्याजोगी साधनसामग्री

४. विवाहात समस्या येण्याची का अपेक्षा धरता येते आणि बायबलमध्ये कोणते दर्जे देण्यात आले आहेत?

४ विवाहीत जोडी कितीही सुरेख वाटत असली तरी ते दोघेही भावनिक घडण, लहानपणाचे अनुभव आणि कौटुंबिक पार्श्‍वभूमी यात भिन्‍न असतात. या कारणामुळे विवाहानंतर समस्या उद्‌भवू शकतील अशी अपेक्षा करता येते. त्यांना कसे हाताळले जाईल? कारागीर घरांची बांधणी करतात तेव्हा घराचा नकाशा पडताळून बघतात. ही ती अनुसरण्याजोगी मार्गदर्शके असतात. बायबल सुखी कुटुंबाची उभारणी करण्यासाठी देवाचे दर्जे पुरवते. आपण यापैकीच्या काहींचे परीक्षण करू या.

५. विवाहामध्ये निष्ठा असण्याच्या महत्त्वपूर्णतेवर बायबल कसा जोर देते?

५ निष्ठा. येशूने म्हटले: “देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”a (मत्तय १९:६) प्रेषित पौलाने लिहिले: “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्‍यांचा न्याय देव करील.” (इब्रीयांस १३:४) या कारणास्तव, विवाहीत व्यक्‍तींना, यहोवासमोर आपल्या सोबत्यांना विश्‍वासू राहण्याचे बंधन असल्याचे वाटावे.—उत्पत्ति ३९:७-९.

६. निष्ठा विवाहाला बचावून ठेवण्यात कशी मदत करू शकते?

६ निष्ठा विवाहाला माननीयता व सुरक्षितता देते. निष्ठावंत पतीपत्नीला माहीत असते की, काहीही घडले तरी ते एकमेकांना आधार देतील. (उपदेशक ४:९-१२) हे, जे लोक त्यांच्या विवाहांमध्ये पहिली समस्या सामोरी येताच विवाहाचा शेवट घडवतात त्यापेक्षा किती वेगळे आहे! असे लोक लगेच हा निवाडा करतात की, ‘मी चुकीच्या व्यक्‍तीची निवड केली होती,’ ‘आता काही प्रेम राहिले नाही,’ आणि ‘नवा सोबती शोधणे हाच यावरील तरणोपाय आहे.’ पण, हा निर्णय दोघांपैकी कोणालाही भावनिकरित्या स्वतःची वाढ करून घेण्याची संधी देत नाही. उलटपक्षी, असे हे बेईमानी सोबती याच समस्या नव्या सोबत्यापर्यंत नेण्याची शक्यता आहे. कोणा व्यक्‍तीला सुंदरसे घर आहे, पण घराचे छप्पर गळते आहे असे त्याला आढळते तेव्हा तो नक्कीच त्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो. तो दुसऱ्‍या घरात स्थलांतरीत होणार नाही. त्याचप्रमाणे सोबती बदलणे हा काही वैवाहिक झगड्याच्या मुळाशी असणाऱ्‍या समस्या सोडवण्याचा मार्ग नव्हे. समस्या उद्‌भवली म्हणजे लग्नाला तिलांजली देण्याचा विचार करू नका, तर ते टिकवून ठेवण्यासाठी अधिक परिश्रम घ्या. अशी ही निष्ठा विवाहबंधनाला संरक्षण देण्याचा, सांभाळून ठेवण्याचा व ते वृद्धींगत करण्याचा विचार राखते.

७. विवाहीत लोकांमध्ये दळणवळण इतके जड का जाते, पण “नवा मनुष्य” धारण करण्यामुळे कशी मदत होऊ शकते?

७ दळणवळण. “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात,” असे बायबलचे एक नीतिसूत्र म्हणते. (नीतिसूत्रे १५:२२) तरीपण काही वैवाहिक सोबत्यांना दळणवळण करणे खूप जड जाते. हे असे का? कारण लोकांच्या दळणवळणाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. ही अशी वस्तुस्थिती आहे जी बहुतांशी गैरसमज व त्राग्याकडे निरवते. यात एखाद्याची लहानपणापासून ज्याप्रकारे वाढ झालेली आहे ती गोष्ट देखील भर टाकते. उदाहरणार्थ, काहींची वाढ त्यांचे आईबाप सतत भांडत असलेल्या वातावरणात झालेली असेल. तेव्हा आता विवाहीत व्यक्‍ती बनल्यामुळे आपल्या सोबत्याबरोबर प्रेमाने व दयेने कसे बोलावे याची त्यांना कल्पना नसते. तरीदेखील, तुमचे घर ‘कलहाचे’ बनून मोडकळीस येण्याची गरज नाही. (नीतिसूत्रे १७:१) बायबल “नवा मनुष्य” धारण करण्यावर जोर देते; ते द्वेषपूर्ण कटुत्व, किंचाळणे आणि अभद्र भाषण यांना मुभा देत नाही.—इफिसकर ४:२२-२४, ३१.

८. तुमच्या सोबत्याशी तुमचे पटत नसल्यास कोणती गोष्ट साहाय्यक ठरू शकते?

८ जेव्हा एकमेकांचे पटत नाही तेव्हा तुम्ही काय करू शकता? जर दोघांची माथी भडकू लागली तर नीतिसूत्रे १७:१४ मधील सल्ल्याचा अवलंब करणे बरे होईल: “भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी.” होय, तुम्ही दोघेही शांत असाल अशी वेळ येईपर्यंत ही चर्चा बंद ठेवावी. (उपदेशक ३:१, ७) काहीही असले तरी, “ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद” असण्याचा प्रयत्न करा. (याकोब १:१९) तुमचे ध्येय परिस्थितीवर उपाय काढावा हे असावे, आपली बाजू जिंकावी असे नसावे. (उत्पत्ति १३:८, ९) आपल्या शब्दांचा प्रयोग व बोलण्याची ढब अशी राखा की तुम्ही व तुमचा सोबती, दोघेही शांत राहाल. (नीतिसूत्रे १२:१८; १५:१, ४; २९:११) सर्वात महत्त्वाचे म्हणजे रागाच्या स्थितीत राहू नका, पण दोघेही एकत्र बसून नम्रपणे देवाकडे प्रार्थना करून त्याच्याकडील मदत शोधण्याचा प्रयत्न करा.—इफिसकर ४:२६, २७; ६:१८.

९. दळणवळणाचा आरंभ अंतःकरणात होतो असे का म्हणता येते?

९ बायबलचे एक नीतिसूत्र म्हणते: “ज्ञान्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते. ते त्याच्या वाणीत ज्ञानाची भर घालिते.” (नीतिसूत्रे १६:२३) तेव्हा, यशस्वी दळणवळणाची खरी गुरुकिल्ली अंतःकरणात आहे, मुखात नाही. तुम्हाला तुमच्या सोबत्याबद्दल काय वाटते? बायबल “समसुखदुःखी” असण्याचे ख्रिश्‍चनांना उत्तेजन देते. (१ पेत्र ३:८) तुमच्या वैवाहिक सोबत्याला जेव्हा त्रासदायक चिंता लागून असते तेव्हा तुम्हाला हे करता येईल का? तर मग, ही गोष्ट तुम्हाला कसे उत्तर द्यावे याकरता मदत देईल.—यशया ५०:४.

१०, ११. पती १ पेत्र ३:७ मधील सल्ल्याचा कसा अवलंब करू शकतो?

१० सन्मान व आदर. ख्रिस्ती पतींना असे सांगण्यात आले की, त्यांनी स्वतःच्या स्त्रियांसोबत “त्या अधिक नाजूक व्यक्‍ति आहेत म्हणून सूज्ञतेने सहवास ठेवा.” (१ पेत्र ३:७) स्वतःच्या बायकोचा सन्मान राखण्यामध्ये तिच्या मूल्यांबद्दल ओळख राखणे समाविष्ट आहे. जो पती स्वतःच्या स्त्रीसोबत “सूज्ञतेने” सहवास ठेवतो त्याला तिच्या भावनांबद्दल, अंतर्गत गुणांबद्दल, बुद्धिमत्तेबद्दल आणि माननीयतेबद्दल मोठा आदर असतो. यहोवा स्त्रियांबद्दल कसा दृष्टिकोन ठेवून आहे व त्यांना कसे वागवले जावे अशी त्याची इच्छा आहे तेही त्याने शिकण्याची इच्छा धरली पाहिजे.

११ तुमच्या घरात आपण असे म्हणू या की, एक सुंदर फुलदाणी आहे आणि ती नाजूक देखील आहे. तुम्ही ती नीट काळजीने वापरणार नाही का? याचप्रमाणे पेत्राने देखील “नाजूक व्यक्‍ति” हा शब्दप्रयोग याच अर्थाने उपयोगात आणला आहे व त्यामुळे ख्रिस्ती पतीने स्वतःच्या प्रिय बायकोकरता कोमल भावना दाखवल्या पाहिजेत.

१२. पतीची भीड राखीत आहे हे एखादी पत्नी कसे दाखवू शकते?

१२ पण बायबल पत्नीला कोणता सल्ला देते? पौलाने लिहिले: “पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.” (इफिसकर ५:३३) स्वतःला सन्मानाने वागवले जात आहे आणि पती आपल्यावर खूप प्रेम करीत आहे अशी गोष्ट पत्नीला जशी हवीहवीशी वाटते तसे पतीला देखील वाटते की, त्याच्या बायकोने त्याचा मान राखावा. एक सन्मान बाळगणारी स्त्री अविचाराने तिच्या पतीच्या चुकांचे, मग तो ख्रिस्ती विश्‍वासातील असो वा नसो, जाहीर प्रकटन करणार नाही. ती खाजगीपणे किंवा जाहीररित्या टीका करून व त्याला कमी प्रतीचे लेखून त्याच्या प्रतिष्ठेला नागवणार नाही.—१ तीमथ्य ३:११; ५:१३.

१३. स्वतःचे दृष्टिकोन शांतिप्रिय मार्गांनी कसे व्यक्‍त केले जाऊ शकतात?

१३ याचा अर्थ, बायकोला स्वतःचे विचार बोलून दाखवता येणार नाहीत असे नाही. तिला काही सतावत आहे तर ती आदराने ते बोलून दाखवू शकते. (उत्पत्ति २१:९-१२) पतीला एखादी कल्पना सुचवणे हे जणू त्याच्याकडे चेंडू टाकण्यासारखे आहे. एकतर ती त्या चेंडूला इतक्या अलगदपणे टाकील की पतीला तो सहज धरता येईल किंवा ती तो चेंडू जोराने देखील भिरकावू शकते की ज्याद्वारे पतीला चांगलाच गुद्दा बसेल. यास्तव, दोघांनी आरोप-प्रत्त्यारोपांची फेकाफेक करण्याऐवजी दयाळुपणे व सौम्यतेने एकमेकांशी बोलणे किती चांगले असेल बरे!—मत्तय ७:१२; कलस्सैकर ४:६; १ पेत्र ३:३, ४.

१४. तुमचा सोबती बायबलच्या तत्त्वांचा अवलंब विवाहात लागू करण्यामध्ये तितका रस दाखवत नसल्यास तुम्ही काय करावे?

१४ आपण पाहिल्याप्रमाणे, बायबलची तत्त्वे तुम्हाला आनंदी कुटुंबाची उभारणी करण्यात मदत देऊ शकतात. तथापि, बायबल जे म्हणते त्याबद्दल तुमचा सोबती खूपच कमी आस्था दाखवत असल्यास काय? अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या भूमिकेला देवाविषयीचे ज्ञान जोडल्यास पुष्कळसे साध्य होण्याजोगे आहे. पेत्राने लिहिले: “स्त्रियांनो, तुम्हीही आपआपल्या पतीच्या अधीन असा; ह्‍यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.” (१ पेत्र ३:१, २) अर्थात, हेच तत्त्व जेथे पत्नी बायबलबद्दल अगदी हलक्या दर्जाचा दृष्टिकोन राखून आहे तेथे पतीला लागू होण्याजोगे आहे. तुमच्या सोबत्याने काहीही करण्याचे निवडले तरी बायबलच्या तत्त्वांना तुम्हाला चांगला पती वा पत्नी बनवू द्या. देवाविषयीचे ज्ञान तुम्हाला चांगले पालक सुद्धा बनवू शकते.

देवाविषयीच्या ज्ञानाद्वारे मुलांचे संगोपन करणे

१५. सदोष पालकीय तंत्र कधी कधी कसे वंशपरंपरागत दिले जाते, पण हे चक्र कसे मोडले जाऊ शकते?

१५ एखाद्यापाशी करवत किंवा हातोडा असला म्हणजे कोणी कुशल सुतार होत नाही. त्याचप्रमाणे, घरात मुले असली म्हणजे कोणी कुशल पालक होत नाही. पालक जाणतेपणाने म्हणा किंवा अजाणपणे आपल्या मुलांची वाढ, त्यांची स्वतःची वाढ जशी करण्यात आली होती त्याप्रमाणेच करतात. अशा प्रकारे, सदोष पालकीय तंत्र एका पिढीपासून दुसऱ्‍या पीढीपर्यंत कधीकधी पोहंचवले जाते. एक प्राचीन इब्री म्हण अशी आहे: “बापांनी आंबट द्राक्षे खाल्ली व मुलांचे दात आंबले.” तरीपण, स्वतःच्या पालकांनी धरलेलाच मार्ग एखाद्या व्यक्‍तीने अनुसरण्यास हवा असे शास्त्रवचने सांगत नाहीत. त्याला दुसऱ्‍या मार्गाची, यहोवाच्या नियमांद्वारे प्रभावीत असणाऱ्‍या मार्गाची निवड करता येते.—यहेज्केल १८:२, १४, १७.

१६. आपल्या कुटुंबाकरता तरतूद करणे का महत्त्वाचे आहे आणि यात कशाचा समावेश होतो?

१६ ख्रिस्ती पालकांनी स्वतःच्या मुलांना योग्य मार्गदर्शन द्यावे व त्यांची योग्य काळजी घ्यावी असे यहोवा त्यांच्याकडून अपेक्षितो. पौलाने लिहिले: “जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्‍वास नाकारला आहे, तो माणूस विश्‍वास न ठेवणाऱ्‍या माणसापेक्षा वाईट आहे.” (१ तीमथ्य ५:८) केवढे हे जोरदार शब्द! तरतूद करणाऱ्‍याची भूमिका पूर्ण करणे हा ईश्‍वरी व्यक्‍तीचा विशेषाधिकार व जबाबदारी आहे; यात तुमच्या मुलांची शारीरिक, आध्यात्मिक व भावनिक गरजांची तरतूद करण्याचा समावेश होतो. पालकांना स्वतःच्या मुलांसाठी आनंदी वातावरण उभारता येईल अशी तत्त्वे बायबल सादर करते. यापैकी पुढील काहींचा विचार करा.

१७. तुमच्या मुलांच्या अंतःकरणात देवाचा नियम लिहिला जाण्यास हवा असेल तर कशाची गरज आहे?

१७ चांगले उदाहरण पुढे ठेवा. इस्राएली पालकांना अशी आज्ञा देण्यात आली होती: “तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर [देवाचे वचन] बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्याविषयी बोलत जा.” पालकांनी त्यांच्या मुलांना देवाच्या दर्जांचे शिक्षण द्यायचे होते. पण या आज्ञेच्या पूर्वार्धात हे विधान करण्यात आले होते की, “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव.” (अनुवाद ६:६, ७) होय, पालकांकडे जे नाही ते त्यांना त्यांच्या मुलांना देता येणार नाही. देवाचा नियम जर तुमच्या मुलांच्या अंतःकरणात लिहिला जाण्यास हवा असे तुम्हाला वाटते तर प्रथम तो तुमच्या स्वतःच्या अंतःकरणात कोरला गेला पाहिजे.—नीतिसूत्रे २०:७; पडताळा लूक ६:४०.

१८. प्रेम दाखवण्यामध्ये यहोवाने पालकांपुढे कोणते उत्कृष्ट उदाहरण मांडले आहे?

१८ तुमच्या प्रेमाची खात्री द्या. येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी यहोवाने हे जाहीर केले: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” (लूक ३:२२) अशा प्रकारे यहोवाने स्वतःच्या मुलाबद्दलची कबूली दिली, त्याच्याबद्दल संतुष्टता व्यक्‍त केली व त्याला स्वतःच्या प्रेमाची खात्री दिली. येशूने नंतर त्याच्या पित्याला असे म्हटले: “जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीति केली.” (योहान १७:२४) यास्तव, ईश्‍वरी पालक या नात्याने तुमच्या मुलांना प्रेमाचे शाब्दिक व शारीरिक वक्‍तव्य व्यक्‍त करा—आणि असे सतत करा. हे नेहमी लक्षात ठेवा की, “प्रीति उन्‍नति करिते.”—१ करिंथकर ८:१.

१९, २०. मुलांना योग्य शिस्त लावण्यात कशाचा समावेश आहे आणि पालकांना यहोवाच्या उदाहरणाकडून कसा फायदा मिळू शकतो?

१९ शिस्त. बायबल शिस्तीबद्दल आवड बाळगण्याच्या मूल्यावर जोर देते. (नीतिसूत्रे १:८) जे पालक स्वतःच्या मुलांना मार्गदर्शन देण्याच्या जबाबदारीला आज झटकून टाकतात अशांना उद्या हृदयभंग घडवून आणणाऱ्‍या परिणामांना निश्‍चितपणे तोंड द्यावे लागेल. तरीपण, पालकांनी पराकोटीला जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्‍न होतील,” असे पौलाने लिहिले. (कलस्सैकर ३:२१) पालकांनी मुलांची अवाजवी सुधारणा करण्याचे किंवा त्यांच्या उणीवांबद्दल सारखे तुणतुणे वाजवण्याचे व ते करीत असलेल्या प्रयत्नांवर टीका करत राहण्याचे टाळावे.

२० आमचा स्वर्गीय पिता, यहोवा देव, शिस्त प्रदान करण्यामध्ये चांगले उदाहरण मांडतो. तो देत असलेली सुधारणा कधीच पराकोटीची नसते. “मी तुझे योग्य शासन करीन,” असे देवाने त्याच्या लोकांना म्हटले. (यिर्मया ४६:२८) पालकांनी याबाबतीत यहोवाचे अनुकरण केले पाहिजे. जी शिस्त विशिष्ट मर्यादा ओलांडते किंवा सुधारणूक व बोधाचा योजलेल्या उद्देशापलीकडे जाते तेव्हा ती निश्‍चितपणे चिरडीस आणते.

२१. आपली शिस्त प्रभावी आहे की नाही हे पालक कसे ठरवू शकतात?

२१ आपली शिस्त प्रभावी आहे की नाही हे पालक कसे ठरवू शकतात? ते स्वतःला विचारु शकतील, ‘माझी शिस्त काय तडीस नेत आहे?’ तिने शिक्षण दिले पाहिजे. शिस्त का लावली जात आहे हे तुमच्या मुलाला कळले पाहिजे. पालकांनी देत असलेल्या सुधारणेचा नंतरचा परिणाम काय होईल त्याचीही काळजी घेतली पाहिजे. शिस्त प्रथम बहुतेक मुलांना चिडखोर करील हे खरे. (इब्रीयांस १२:११) तथापि, शिस्तीने मुलाला भीतीग्रस्त किंवा धिक्कारलेले बनवू नये किंवा ती मुळातच दुष्ट आहे अशी छाप त्याच्यावर पाडता कामा नये. यहोवाने स्वतःच्या लोकांची सुधारणा करण्याआधी असे म्हटले: “तू भिऊ नको; . . . मी तुजबरोबर आहे.” (यिर्मया ४६:२८) होय, सुधारणेचा अवलंब अशा पद्धतीने व्हायला हवा की, तुमच्या मुलाला किंवा मुलीला, तुम्ही त्याच्या वा तिच्यासोबत आहात, व आधार देणारे प्रेमळ पालक आहात अशी जाणीव झाली पाहिजे.

“कुशल मार्गदर्शन” मिळवणे

२२, २३. आनंदी कुटुंबाची उभारणी करण्यासाठी आवश्‍यक असे मार्गदर्शन तुम्ही कसे मिळवू शकता?

२२ आनंदी कुटुंबाची उभारणी करता यावी यासाठी आवश्‍यक असणारी साधनसामग्री यहोवाने पुरवली आहे याबद्दल आम्ही त्याचे कृतज्ञ असू शकतो. पण ही साधने जवळ बाळगणे पुरेसे नाही. त्यांचा योग्य उपयोग करून घेण्याचा आपण सराव केला पाहिजे. उदाहरणार्थ, कारागीर कदाचित आपल्याजवळील अवजारांचा वापर नीटपणे न करण्याची सवय स्वतःमध्ये जडवू शकेल. काही अवजारे तर चुकीच्याच कामासाठी तो कदाचित वापरील. अशा परिस्थितीत त्याचे उत्पादन नक्कीच कनिष्ठ दर्जाचे उत्पादन असेल. याचप्रमाणे, तुम्हाला आता कदाचित तुमच्या घरात शिरलेल्या काही अनिष्ट सवयांची कल्पना आलेली असेल. काही सवयांनी कदाचित बळकटपणे मूळ धरले असेल व त्या बदलण्याकरता कठीण जात असेल. तथापि, बायबलचा हा सल्ला अनुसरा: “ज्ञानी पुरुष ऐकेल व अधिक सूचना प्राप्त करील आणि कुशल मार्गदर्शन मिळवणारा व्यक्‍ती बुद्धिमान आहे.”—नीतिसूत्रे १:५, NW.

२३ देवाविषयीचे ज्ञान सतत घेत राहण्यामुळे तुम्हाला हे कुशल मार्गदर्शन मिळवला येईल. कौटुंबिक जीवनाला लागू होणाऱ्‍या बायबलमधील तत्त्वांना ग्रहण करण्याबद्दल दक्ष असा आणि आवश्‍यक तेथे सुधारणा करा. वैवाहिक दांपत्य व पालक या नात्याने सुंदर उदाहरण मांडणाऱ्‍या प्रौढ ख्रिश्‍चनांचे निरीक्षण करा. त्यांच्याशी बोला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यहोवाकडे प्रार्थनेद्वारे तुमच्या चिंता सोपवा. (स्तोत्र ५५:२२; फिलिप्पैकर ४:६, ७) तोच तुम्हाला त्याला सन्मान देणाऱ्‍या आनंदी कौटुंबिक जीवनाचा आनंद मिळवण्याकरता मदत देऊ शकतो.

[तळटीप]

a पुनर्विवाह करण्यास मोकळीक देणारा घटस्फोटाकरता एकमेव शास्त्रवचनीय आधार “जारकर्म”—विवाहाबाहेरील लैंगिक संबंध—हा आहे.—मत्तय १९:९.

तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा

निष्ठा, दळणवळण, सन्मान व आदर या गोष्टी आनंदी विवाहाला कसा हातभार लावतात?

पालक कोणकोणत्या मार्गाने स्वतःच्या मुलांना त्यांच्या प्रेमाची खात्री देऊ शकतात?

योग्य शिस्तीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत?

[Full-page picture on page 147]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा