वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • pe अध्या. १४ पृ. १२०-१२६
  • स्वर्गास कोण जातात व का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्वर्गास कोण जातात व का?
  • तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सर्व चांगले लोक स्वर्गाला जातात का?
  • काही विश्‍वासू लोक स्वर्गाला जाण्याचे कारण
  • किती लोक स्वर्गाला जाणार?
  • पृथ्वीवरुन निवडण्याचे कारण
  • देवाची मंडळी
  • देवाच्या हेतूमधील नवी गोष्ट
  • देवाचे राज्य काय आहे?
    बायबल नेमके काय शिकवते?
  • देवाचं राज्य काय आहे?
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • स्वर्गात कोण जातात?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • देवाच्या राज्याविषयी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
pe अध्या. १४ पृ. १२०-१२६

प्रकरण १४

स्वर्गास कोण जातात व का?

१. स्वर्गाला कोण व का जातात या प्रश्‍नाचे अनेक लोक कसे उत्तर देतात?

‘सर्व चांगली माणसे स्वर्गाला जातात’ असे अनेक लोक म्हणतात. परंतु ती स्वर्गाला का जातात असे विचारल्यास, ‘देवाजवळ राहण्यासाठी’ किंवा ‘ते चांगुलपणाचे प्रतिफळ आहे’ असे ते म्हणतात. पण या बाबतीत पवित्र शास्त्र काय शिकविते?

२, ३. (अ) काही माणसे स्वर्गाला जातील याची आपल्याला खात्री का वाटते? (ब) कोणत्या प्रश्‍नाचे उत्तर शोधावे लागेल?

२ पवित्र शास्त्र सांगते की येशू मृतातून उठवला गेला व तो स्वर्गाला गेला. तसेच इतर मानवही तेथे नेले जातील असे ते म्हणते. आपल्या मरणाच्या आदल्या रात्री येशूने त्याच्या विश्‍वासू प्रेषितांना सांगितलेः “माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो. आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन. यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.”—योहान १४:१-३.

३ तर हे उघड आहे की, येशू आपल्या प्रेषितांना असे सांगत होता की, त्याच्यापाशी राहण्यासाठी त्यांना स्वर्गाला नेले जाईल. त्या अद्‌भुत आशेबद्दल प्रेषित पौलानेही प्राचीन ख्रिस्ती लोकांना अनेकदा सांगितले. उदाहरणार्थ, त्याने लिहिलेः “आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभु येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे. त्याची आपण वाट पाहत आहोत.” (फिलिप्पैकर ३:२०, २१; रोमकर ६:५; २ करिंथकर ५:१, २) या अभिवचनावर विसंबून लाखो लोकांनी स्वर्गीय जीवनावर आपले डोळे लावले आहेत. तरीही, सर्व चांगले लोक स्वर्गाला जातील का?

सर्व चांगले लोक स्वर्गाला जातात का?

४, ५. दावीद व ईयोब स्वर्गाला गेले नाहीत याला काय पुरावा आहे?

४ येशू मृतातून उठल्यानंतर लवकरच, प्रेषित पेत्र यहुदी लोकांच्या समुदायाशी बोलताना म्हणालाः “कुलाधिपती दावीद . . . मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. . . . कारण दावीद स्वर्गास चढून गेला नाही.” (प्रे. कृत्ये २:२९, ३४) याचाच अर्थ दावीद हा चांगला गृहस्थ स्वर्गास गेला नाही. आता नीतीमान ईयोबाचे काय झाले?

५ ईयोबाने यातना सहन करताना देवाला प्रार्थना केली की, “तू मला शिओलात [कबरेत] लपवशील, तुझा क्रोध शमेपर्यंत मला दृष्टीआड ठेवशील, माझी मुदत नियमित करुन माझी आठवण करशील तर किती बरे होईल!” मेल्यावर कबरेमध्ये बेशुद्धावस्था येईल अशी ईयोबाची अपेक्षा होती. आपण स्वर्गाला जाणार नाही हे त्याला ठाऊक होते. पण पुढे सांगितल्याप्रमाणे त्याला आशा होतीः “मनुष्य मृत झाल्यावर पुन्हा जिवंत होईल काय? माझी सुटका होईपर्यंत कष्टमय सेवेचे सगळे दिवस [कबरेतील ठरलेला काळ] मी वाट पाहात राहीन. तू मला हाक मारशील व मी तुला उत्तर देईन.”—ईयोब १४:१३-१५.

६, ७. (अ) ख्रिस्ताच्या आधी, मरण पावलेल्यांमधील कोणीही स्वर्गाला गेला नाही हे कसे सिद्ध होते? (ब) ख्रिस्ताआधी मरण पावलेल्या सर्व विश्‍वासू लोकांचे काय होईल?

६ येशूला बाप्तिस्मा देणारा योहान हा देखील चांगला माणूस होता. तरीही येशू म्हणालाः “स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून [योहानाहून] श्रेष्ठ आहे.” (मत्तय ११:११) त्या अर्थी, बाप्तिस्मा करणारा योहान सुद्धा स्वर्गाला जाणार नाही. आदाम व हव्वेच्या बंडानंतर ४,००० वर्षांनी, येशू भूतलावर असताना म्हणालाः “स्वर्गातून उतरलेला जो, मनुष्याचा पुत्र, त्याच्यावाचून कोणीही स्वर्ग चढून गेला नाही.”—योहान ३:१३.

७ अशाप्रकारे, येशूच्या उद्‌गारांवरुन, त्याच्या दिवसापर्यंत ४,००० वर्षांच्या काळात कोणीही मानव स्वर्गाला गेला नव्हता हे स्पष्ट आहे. दावीद, ईयोब व बाप्तिस्मा करणारा योहान या सर्वांना पुनरुत्थानाद्वारे पृथ्वीवर जीवन प्राप्त होईल. येशूच्या मृत्युपूर्वी मरण पावलेल्या सर्व विश्‍वासू पुरुष व स्त्रियांना पुन्हा पृथ्वीवर राहण्याची आशा होती. देवाच्या राज्याच्या प्रजेत समाविष्ट होण्यासाठी त्यांचे पुनरुत्थान होईल.—स्तोत्रसंहिता ७२:७, ८; प्रे. कृत्ये १७:३१.

काही विश्‍वासू लोक स्वर्गाला जाण्याचे कारण

८. कोणत्या प्रश्‍नांची उत्तरे महत्त्वाची आहेत?

८ येशू स्वर्गाला का गेला? तेथे त्याला कोणते काम करायचे आहे? या प्रश्‍नांची उत्तरे महत्त्वाची आहेत. कारण स्वर्गाला जाणारे लोक येशूच्या कामात सहभागी होतील. त्यांचा स्वर्गाला जाण्याचा हेतूही तोच आहे.

९, १०. देवाच्या राज्य-शासनात ख्रिस्ताशिवाय आणखी कोण राज्य करतील असे दानीएलाने सांगितले?

९ आधीच्या प्रकरणात आपण शिकलो की, देवाच्या स्वर्गीय सरकारचा राजा या नात्याने येशू, नंदनवन झालेल्या नवीन पृथ्वीवर राज्य करील. येशू भूतलावर येण्याच्या पुष्कळ पूर्वी पवित्र शास्त्रातील दानीएलाच्या पुस्तकात भविष्य होते की, “मानव पुत्राला” “प्रभुत्व” दिले जाईल. तो “मानवपुत्र” म्हणजेच येशू ख्रिस्त होय. (मार्क १४:४१, ६२) दानीएल पुढे म्हणतोः “त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे.”—दानीएल ७:१३, १४.

१० दानीएलाच्या पुस्तकात विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट अशी की हा “मानवपुत्र” एकटाच राज्य करणार नाही. पवित्र शास्त्र म्हणतेः “राज्य व प्रभुत्व . . . ही परात्पर देवाची प्रजा—जे पवित्र जन—त्यांस देण्यात येतील. त्यांचे राज्य सनातन आहे.” (दानीएल ७:२७) “जन” व “त्यांचे राज्य” या शब्दांतून, देवाच्या शासनात ख्रिस्तासोबत राज्य करणारे इतरही आहेत असे आपल्याला कळते.

११. ख्रिस्ताचे प्रारंभीचे अनुयायी त्याच्यासह राज्य करतील हे कसे कळते?

११ आपल्या ११ विश्‍वासू प्रेषितांबरोबर येशूने शेवटची रात्र घालवली तेव्हा, देवाच्या राज्यात तेही त्याच्यासह राजे होतील असे येशूने दर्शविले. तो त्यांना म्हणालाः “माझ्या परिक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहात. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हास नेमून देतो.” (लूक २२:२८, २९) नंतर राज्याच्या या करारात कालांतराने प्रेषित पौल व तीमथ्य यांचाही समावेश झाला. यासाठीच पौलाने तीमथ्याला लिहिलेः “जर आपण धीराने सोसतो तर त्याच्याबरोबर राज्यही करु.” (२ तीमथ्य २:१२) तसेच येशूसह “पृथ्वीवर राज्य” करणाऱ्‍यांबद्दल प्रेषित योहानानेही लिहिले आहे.—प्रकटीकरण ५:९, १०; २०:६.

१२. अब्राहामाच्या “संताना”बद्दल कोणत्या गोष्टीवरुन ख्रिस्ताला सहशासक असतील असे समजते?

१२ तर, स्वर्गाला जाणारे, देवाच्या स्वर्गीय शासनात ख्रिस्ताचे सहकारी-राजे या नात्याने सेवा करण्यास तेथे जातात. येशू प्रमुख “संतान” असून, त्याच्यासह राज्य करण्यास मानवजातीतून देवाने काहींची निवड केली आहे. अशारितीने ते “संताना”चा भाग बनतात. हे पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे आहेः “तुम्ही जर ख्रिस्ताचे आहा तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारा वारीस आहा.”—गलतीकर ३:१६, २९; याकोब २:५.

किती लोक स्वर्गाला जाणार?

१३. (अ) बालके स्वर्गाला का जाणार नाहीत? (ब) राज्यपद मिळणाऱ्‍यांची संख्या येशूने कशी सांगितली?

१३ स्वर्गाला जाणाऱ्‍यांना भविष्यात पृथ्वीवर राज्य करावयाचे असल्याने, परिक्षेस उतरलेल्या ख्रिस्त-शिष्यांचाच त्यात समावेश होईल हे उघड आहे. याचा अर्थ, ख्रिस्ती सेवेमध्ये दीर्घ कालावधीत पूर्णपणे परिक्षेस उतरु न शकणाऱ्‍या तान्ह्या बाळांना व लहान मुलांना स्वर्गाला नेले जाणार नाही. (मत्तय १६:२४) परंतु अशा मृत झालेल्या बालकांना पुनरुत्थानाने पृथ्वीवर जगण्याची आशा आहे. (योहान ५:२८, २९) म्हणून, पृथ्वीवर जीवन लाभणाऱ्‍यांच्या तुलनेत स्वर्गाला जाणाऱ्‍यांची एकूण संख्या लहान असेल. येशू त्याच्या शिष्यांना म्हणालाः “हे लहान कळपा भिऊ नको; कारण तुम्हास राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.”—लूक १२:३२.

१४. स्वर्गाला जाणाऱ्‍या “लहान कळपा”त किती लोक असतील?

१४ देवाच्या राज्यातील अधिपतींची संख्या ही किती लहान आहे? त्यात फक्‍त प्रेषित व येशूच्या आरंभीच्या अनुयायांचाच समावेश होईल का? नाही. “लहान कळप” यात आणखीही लोकांचा समावेश होईल असे पवित्र शास्त्र दर्शविते. प्रकटीकरण १४:१, ३ मध्ये असे म्हटले आहेः “मी पाहिले, तो पहा, कोकरा सियोन डोंगरावर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या बरोबर . . . एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम होते.” यांना “पृथ्वीवरुन विकत घेतलेले” होते. फक्‍त १,४४,००० व्यक्‍ती कोकऱ्‍याबरोबर—येशू ख्रिस्ताबरोबर—स्वर्गीय सियोन डोंगरावर दिसल्या हे लक्षात घ्या. (इब्रीकर १२:२२) तेव्हा, सर्व चांगले लोक स्वर्गाला जाण्याऐवजी फक्‍त १,४४,००० पारखलेल्या, विश्‍वासू व्यक्‍ती ख्रिस्तासह राज्य करण्यासाठी स्वर्गास नेण्यात येतील.

पृथ्वीवरुन निवडण्याचे कारण

१५. देव, मानवांमधून हे राज्य-शासनकर्ते का निवडतो?

१५ परंतु, या राज्यपदासाठी देव भूतलावरील लोकांची निवड का करतो? ख्रिस्ताबरोबर देवदूतांना राजे का करु नये? कारण यहोवाच्या राज्य करण्याच्या हक्काला या पृथ्वीवर आव्हान दिले गेले. सैतानाच्या विरोधाखाली, माणसांचा देवावरील विश्‍वास पारखणे येथेच शक्य होते. तसेच या भूतलावरच परिक्षेमध्ये येशूने देवावरील संपूर्ण निष्ठा सिद्ध केली व मानवजातीसाठी आपल्या जिवाची खंडणी भरली. यास्तव स्वर्गीय राज्यामध्ये आपल्या पुत्राचे सहकारी म्हणून पृथ्वीवरील व्यक्‍तींचा एक “लहान कळप” नेण्याचे यहोवाने योजिले. माणूस स्वार्थासाठीच देवाची सेवा करतो हा सैतानाचा आरोप, देवावरील आपल्या निष्ठेने त्यांनी खोटा ठरवला आहे. तेव्हा, आपल्या गौरवासाठी यहोवाने त्यांचा उपयोग करावा हे यथायोग्यच आहे.—इफिसकर १:९-१२.

१६. राज्याचे शासक भूतलावर राहिलेले असल्यामुळे आपण कृतज्ञ का असावे?

१६ त्याचप्रमाणे भूतलावर ज्यांनी देवाबद्दल आपली निष्ठा सिद्ध केली व ज्यांनी या राज्याखातर आपले प्राणही अर्पण केले अशा व्यक्‍ती राज्यकर्ते म्हणून मिळणे किती उत्तम आहे याचा विचार करा. (प्रकटीकरण १२:१०, ११; २०:४) देवदूतांनी अशा परिक्षांना तोंड दिलेले नाही. तसेच मानवजातीच्या समस्या त्यांनी अनुभवलेल्या नाहीत. त्यामुळे मानवी अपूर्णता व समस्यांचा अनुभव, देवदूतांना मानवांप्रमाणे समजणार नाही. परंतु याच समस्यांमधून स्वतः गेलेले असल्याने या १,४४,००० लोकांना ती जाणीव असेल. त्यातल्या काहींना भयंकर पापात गुंतविणाऱ्‍या समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. आणि ते किती कठीण असते हे ते जाणतात. (१ करिंथकर ६:९-११) त्यामुळे भूतलावरील आपल्या प्रजाजनांसोबत ते सहानुभूतिपर्वक वागतील.—इब्रीकर २:१७, १८.

देवाची मंडळी

१७. “मंडळी” हा शब्द कशाला उद्देशून आहे?

१७ ख्रिस्त हा देवाच्या मंडळीचे मस्तक वा नेता आहे आणि मंडळीचे सर्व सदस्य येशूच्या अधीन असतात असे पवित्र शास्त्र सांगते. (इफिसकर ५:२३, २४) तेव्हा “चर्च” वा “देवाची मंडळी” हे शब्द एखाद्या इमारतीला उद्देशून नाहीत. तर ख्रिस्ती लोकांच्या समुदायाला ते उद्देशून आहेत. (१ करिंथकर १५:९) आज आपण ज्या ख्रिस्ती मंडळीसोबत संलग्न असू त्याचा कदाचित उल्लेख करु. त्याचप्रमाणे, पवित्र शास्त्रामध्ये “लावदिकिया येथील मंडळी” तसेच प्रेषित पौलाने फिलेमोनाला लिहिलेल्या पत्रात “(त्याच्या) घरात जमणाऱ्‍या मंडळी”बद्दल आपण वाचतो.—कलस्सैकर ४:१६; फिलेमोन १.

१८. (अ) “जिवंत देवाची मंडळी” कोणाची मिळून बनलेली आहे? (ब) या मंडळीला पवित्र शास्त्रात आणखी कोणत्या नावांनी संबोधिले आहे?

१८ परंतु पवित्र शास्त्र जेव्हा “जिवंत देवाच्या मंडळी”चा उल्लेख करते तेव्हा ते ख्रिस्ताच्या एका विशिष्ट समुदायाबद्दल बोलत असते. (१ तीमथ्य ३:१५) त्यांना “स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज” असेही म्हटले जाते. (इब्रीकर १२:२३) भूतलावरील ज्या ख्रिस्ती लोकांची आशा स्वर्गीय जीवनावर आहे अशांची मिळून ही “देवाची मंडळी” बनली आहे. एकूण फक्‍त १,४४,००० व्यक्‍तींचाच “देवाच्या मंडळी”मध्ये समावेश होतो. आज त्यातील फारच थोडे—शेष—अजूनही भूतलावर आहेत. पृथ्वीवरच निरंतर जगण्याची आशा असलेले ख्रिस्ती लोक आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी या “देवाच्या मंडळी”च्या सदस्यांकडे पाहतात. १,४४,००० सदस्य असलेल्या या मंडळीचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये “नवरी,” “कोकऱ्‍याची स्त्री,” “ख्रिस्ताचे शरीर,” “देवाचे मंदिर,” “देवाचे इस्राएल,” व “नवे यरुशलेम” असाही केला आहे.—प्रकटीकरण २१:९; इफिसकर ४:१२; १ करिंथकर ३:१७; गलतीकर ६:१६; प्रकटीकरण २१:२.

देवाच्या हेतूमधील नवी गोष्ट

१९. पृथ्वीसंबंधी आपला मूळ उद्देश सफल करण्यासाठी देवाने कोणती नवी गोष्ट केली?

१९ आदामाने मानवजातीला पाप व मरणाच्या वाटेला लावल्यानंतरही यहोवाने पृथ्वी व मानवजातीबद्दलच्या आपल्या हेतुमध्ये बदल केलेला नाही. तसे झाले असते तर आपला मूळ उद्देश त्याला कार्यवाहित करता आला नाही असा त्याचा अर्थ झाला असता. संपूर्ण पृथ्वीभर पसरलेल्या नंदनवनात आनंदी व आरोग्यसंपन्‍न माणसे असावीत, असा त्याचा मूळ उद्देश होता व अजूनही आहे. देवाने केलेली नवी गोष्ट एवढीच की त्याचा मूळ उद्देश तडीला जाण्यासाठी त्याने एक नवे सरकार स्थापन केले. आपण आतापर्यंत पाहिल्याप्रमाणे त्या शासनामध्ये, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त हा प्रमुख राजा असेल व त्याच्यासह राज्य करण्यास पृथ्वीवरुन १,४४,००० लोक घेतले जातील.—प्रकटीकरण ७:४.

२०. (अ) “नवे आकाश” व “नवी पृथ्वी” कोणाची मिळून बनली आहे? (ब) ‘नव्या पृथ्वी’चे सदस्य होण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे?

२० देवाच्या नवीन व्यवस्थेचे “नवे आकाश” या स्वर्गीय राज्यकर्त्यांचे बनलेले असेल. असे नीतीमान राज्यकर्ते पृथ्वीवर राज्य करणार असतील तर ज्यांच्यावर ते राज्य करतील असेही लोक असणारच. अशा व्यक्‍तींना पवित्र शास्त्रात “नवी पृथ्वी” म्हटले आहे. (२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:१-४) यात, ईयोब, दावीद व बाप्तिस्मा करणारा योहान यांच्यासह, ख्रिस्त भूतलावर येण्याआधीच्या सर्व विश्‍वासू लोकांचा समावेश असेल. तरीपण, “नवीन पृथ्वी” बनवणाऱ्‍यांच्यामध्ये इतरही अनेक असतील. या दुष्ट व्यवस्थेच्या अंतामधून वाचणाऱ्‍यांचा त्यांच्यामध्ये समावेश होईल. अशा वाचणाऱ्‍यांमध्ये तुम्ही असाल का? देवाच्या राज्य शासनाचे प्रजाजन व्हावे असे तुम्हाला वाटते का? जर वाटत असेल तर तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील.

[१२१ पानांवरील चित्रं]

ही चांगली माणसे स्वर्गाला गेली का?

दावीद राजा

ईयोब

बाप्तिस्मा करणारा योहान

[१२२ पानांवरील चित्रं]

प्रेषितांसोबत घालवलेल्या शेवटल्या रात्री येशूने त्यांना म्हटले की ते त्याच्यासोबत त्याच्या पित्याच्या राज्यात अधिपती होणार

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा