इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे होणारा परिणाम—तुमच्या मुलांवर
इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करण्यात लहान मुलं खूप तरबेज असतात. मोठ्यांना या गोष्टी शिकताना नाकी नऊ येतात, पण लहान मुलांसाठी तो हातचा मळ असतो.
असं असलं तरी, जी मुलं इंटरनेटवर खूप जास्त वेळ घालवतात त्यांना सहसा
इलेक्ट्रॉनिक साधनांचं व्यसन लागतं.
ती सायबर-बुलिंगच्या जाळ्यात अडकतात.
कळत-नकळत पोर्नोग्राफीच्या (अश्लील साहित्याच्या) संपर्कात येतात.
लक्षात ठेवण्यासारखं काही . . .
इलेक्ट्रॉनिक साधनांचं व्यसन
इंटरनेटवरच्या काही गोष्टी, जसं की गेम्स खेळणं, या सुरुवातीला गंमत म्हणून केल्या तरी पाहता पाहता त्यांचं व्यसन लागू शकतं. यात नवल असं काही नाही. कारण मोबाईलचे ॲप सहसा अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की फोनवरून आपली नजर हटूच नये. त्यामुळे आपण जितका जास्त वेळ जाहिराती असलेले ॲप पाहतो, तितकाच पैसा हे ॲप बनवणाऱ्यांच्या खिशांत आपण भरत असतो.
जरा विचार करा: तुमची मुलं इलेक्ट्रॉनिक उपकरणांना सतत चिकटून असतात का? तुम्ही त्यांना आपल्या वेळेचा चांगला उपयोग करायला कशी मदत करू शकता?—इफिसकर ५:१५, १६.
सायबर-बुलिंग
ऑनलाईन असताना काही लोक जास्त रागिष्टपणे वागतात, इतरांच्या भावनांचा विचार करत नाहीत आणि त्यांना त्यांच्या मर्यादेचं भान राहत नाही. अशा प्रकारे वागणारे इतरांचं सायबर-बुलिंग करू शकतात, म्हणजेच दुसऱ्यांना मानसिक त्रास देऊन हानी पोचवू शकतात.
लोकांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि जास्तीत जास्त फॉलोवर्स मिळवण्यासाठी काही लोक सोशल मिडियावर दुसऱ्यांशी दुष्टपणे वागतात. दुसरीकडे पाहता, एखाद्याला वाटू शकतं की आपल्यासोबत सायबर-बुलिंग झाली आहे. उदाहरणार्थ, जेव्हा त्याला कळतं की आपल्या मित्रांनी आपल्याला सोडून पार्टीत धमाल केली आणि आपल्याला एकटं पाडायचा प्रयत्न केलाय तेव्हा त्याला असं वाटू शकतं.
जरा विचार करा: सोशल मिडियाचा वापर करताना तुमची मुलं इतरांबद्दल आदर दाखवतात का? (इफिसकर ४:३१) आपल्या मित्रांनी आपल्याला सोडून मौजमजा केली हे जेव्हा त्यांना समजतं, तेव्हा ते मनाला लावून घेतात का?
पोर्नोग्राफी
आज इंटरनेटमुळे अश्लील साहित्य पाहणं किंवा ते वाचणं अगदी सोपं झालंय. मुलांना अशा साहित्यापासून वाचवण्यासाठी काही उपकरणांमध्ये चाइल्ड-लॉक किंवा फिल्टर्सची सोय असते. पण आईवडिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येकच वेळी याचा फायदा होईल असं नाही.
सेक्सटिंग म्हणजे स्मार्टफोन किंवा इतर उपकरणांद्वारे उत्तेजक फोटो दुसऱ्यांना पाठवणं किंवा दुसऱ्यांचे असे फोटो पाहणं. असं करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईही केली जाऊ शकते. काही देशांत तर असेही कायदे आहेत, की विशिष्ट वयाच्या लोकांनी सेक्सटिंग केलं, तर मुलांच्या अश्लीलतेचा प्रसार करण्यासाठी त्यांना दोषी ठरवलं जाऊ शकतं.
जरा विचार करा: इंटरनेटवर अश्लील फोटो पाहण्याच्या किंवा ते दुसऱ्यांना पाठवण्याच्या मोहापासून तुम्ही तुमच्या मुलांना कसं वाचवू शकता?—इफिसकर ५:३, ४.
हे करा
मुलांना मार्गदर्शन द्या
इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करणं मुलांच्या हातचा मळ असला, तरी त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. या विषयावर एका पुस्तकात असं म्हटलंय, की लहान मुलांना स्मार्टफोन किंवा इतर उपकरणांचा योग्य वापर कसा करायचा हे न शिकवताच त्यांच्या हातात ती उपकरणं देणं धोक्याचं आहे. हे खरंतर, पोहायला येत नसताना स्विमिंग पूलमध्ये उडी टाकायला सांगण्यासारखं आहे.
बायबलचं तत्त्व: “लहान मुलाला योग्य मार्गाने शिक्षण दे, म्हणजे म्हातारपणीही तो त्यापासून वळणार नाही.”—नीतिवचनं २२:६, तळटीप.
तुम्हाला यांपैकी काय करायला आवडेल यावर विचार करा किंवा तुम्हाला सुचलेले पर्याय लिहा.
ऑनलाईन असताना इतरांशी आदराने वागायला-बोलायला आपल्या मुलांना शिकवा
मित्रांनी एकटं पाडलंय या भावनेवर मात करायला मुलांना शिकवा
अयोग्य साहित्यापासून मुलांना वाचवण्यासाठी आवश्यक ती पावलं उचला
वेळोवेळी मुलांचा फोन चेक करा
दररोज किती वेळ इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करायचा हे ठरवा
रात्री मुलांच्या झोपण्याच्या खोलीत कोणतंही इलेक्ट्रॉनिक उपकरण ठेवू नका
जेवणाच्या वेळी फोन वापरायचा नाही असा नियम बनवा