वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g16 क्र. २ पृ. १४-१५
  • वयात येणाऱ्‍या आपल्या मुलांना मदत करणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वयात येणाऱ्‍या आपल्या मुलांना मदत करणं
  • सावध राहा!—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • एक आव्हान
  • तुम्हाला माहीत आहे का?
  • तुम्ही काय करू शकता
  • पौगंडावस्थेत असलेल्या मुलांबरोबर संवाद
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२०१६
  • तुमची किशोरवयीन मुले तुमच्या धार्मिक विश्‍वासावर प्रश्‍न करतात तेव्हा . . .
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • टीनएजर्सना प्रौढ होण्यास मदत करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०१६
g16 क्र. २ पृ. १४-१५
एक वडील आपल्या मुलाबरोबर बोलत आहेत

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला | पालक

वयात येणाऱ्‍या आपल्या मुलांना मदत करणं

बाल्यावस्था ते प्रौढावस्थेपर्यंतच्या मार्गावर पौगंडावस्था येते, हे एक वडील आणि मुलगा पाहत आहेत

एक आव्हान

तळहातावरच्या फोडाप्रमाणे तुम्ही ज्याला इतकं जपलं ते तुमचं बाळ, पाहता पाहता किशोरावस्थेत येतं. किशोरावस्थेतून लवकरच ते प्रौढ बनण्याच्या मार्गावर आहे. पण किशोरावस्था आणि प्रौढावस्था यांच्या मधल्या काळात त्याला पौगंडावस्थेतून जावं लागतं.

पौगंडावस्थेत आलेल्या तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या मनात पुष्कळ गोंधळ चाललेला असतो. लैंगिक विकास होत असतानाच्या या काळात त्याच्या मनावर दडपण येऊ शकतं. मग, पालक या नात्यानं तुम्ही आपल्या पाल्याला कशी मदत कराल?

तुम्हाला माहीत आहे का?

प्रत्येक मुलाचा किंवा मुलीचा वयात येण्याचा काळ वेगवेगळा असू शकतो. काही मुलं-मुली अगदी आठव्या वर्षीच वयात येतात तर काही १५ व्या वर्षी किंवा त्यानंतरही वयात येतात. लेटिंग गो विथ लव्ह ॲण्ड कॉन्फिडन्स नावाच्या पुस्तकात म्हटलं आहे, की “सहसा मुला-मुलींचा वयात येण्याचा काळ वेगवेगळा असू शकतो.”

पौगंडावस्थेमुळे असुरक्षितता जाणवू शकते. इतरांना माझ्याबद्दल काय वाटेल, याचा ही मुलं-मुली प्रमाणापेक्षा जास्तच विचार करत असतात. जयंतa नावाच्या एका तरुणानं म्हटलं: “मी माझ्या दिसण्याकडे, माझ्या वागण्या-बोलण्याकडे जरा जास्तच लक्ष द्यायला लागलो. चारचौघांत असताना मला वाटायचं, की लोकांना माझं वागणं विचित्र तर वाटत नाहीए ना.” त्यातल्या त्यात, चेहऱ्‍यावर पिंपल्स आले असतील तर अशा तरुण-तरुणींचा आत्मविश्‍वास आणखीनच कमी होऊ शकतो. सतरा वर्षांची कीर्ती म्हणते: “माझ्या चेहऱ्‍यावर पिंपल्स आले तेव्हा मला स्वतःचीच किळस वाटायची. मला आठवतं मी खूप रडायचे, स्वतःला कुरूप म्हणायचे.”

इतर मुला-मुलींच्या मानानं लवकर वयात येणाऱ्‍यांना खास आव्हानांना तोंड द्यावं लागतं. मुलींना खासकरून याचा सामना करावा लागू शकतो. छातीची किंवा नितंबांची वाढ होऊन त्यांना गोलवा येतो तेव्हा इतर जण त्यांना चिडवतील. “अशा मुली, शरीरसंबंधांचा अनुभव असलेल्या मोठ्या मुलांच्या लगेच नजरेत येऊ शकतात; आणि हे या मुलींसाठी धोकादायक ठरू शकतं,” असं अ पेरेन्ट्‌स गाईड टू द टीन यिअर्स नावाच्या पुस्तकात म्हटलं आहे.

वयात येणं म्हणजे प्रौढ बनणं नव्हे. नीतिसूत्रे २२:१५ मध्ये म्हटलं आहे: “बालकाच्या [तरुणाच्या] हृदयात मूर्खता जखडलेली असते.” त्यामुळे वयात आल्यावर तो शहाणा बनतो असं नाही. एखादा मुलगा किंवा मुलगी वयात आल्यानंतर एकदम मोठा किंवा मोठी दिसेल. पण याचा अर्थ, “त्याच्यात किंवा तिच्यात, सुज्ञ निर्णय घेण्याचं, जबाबदारपणे वागण्याचं, स्वतःवर ताबा ठेवण्याचं किंवा इतर बाबतीत प्रौढांसारखं वागण्याचं शहाणपण येतं, असं म्हणता येणार नाही,” असं यू ॲण्ड युअर अडोलेसेंट नावाच्या पुस्तकात म्हटलं आहे.

तुम्ही काय करू शकता

मुलगा-मुलगी वयात येण्याआधीच त्यांच्याशी बोला. वयात आल्यावर नेमकं काय होत असतं हे तुमच्या मुलाला किंवा मुलीला आधीच माहीत असणं योग्य ठरेल. मुलीला तुम्ही पाळीविषयी आणि मुलाला स्वप्नावस्थेविषयी (झोपेत असताना वीर्यस्खलन होणं याविषयी) सांगू शकता. पौगंडावस्थेत तसे इतरही बदल हळूहळू होत असतात; पण वर सांगितलेले बदल अचानक होतात. यामुळे तुमचा मुलगा किंवा मुलगी गोंधळून किंवा घाबरून जाऊ शकते. त्यामुळे अशा गोष्टींची आपल्या मुलांबरोबर चर्चा करताना, सकारात्मक पद्धतीनं बोला. या अवस्थेत असताना त्यांच्यात होणारे शारीरिक व मानसिक बदल, पौगंडावस्थेतून प्रौढावस्थेत पदार्पण करताना त्यांच्याच फायद्याचे आहेत, असं त्यांना सांगा.—बायबलमधील तत्त्व: स्तोत्र १३९:१४.

संकोच न बाळगता पूर्ण माहिती द्या. जॉन नावाच्या एका तरुणानं म्हटलं: “माझे आईबाबा जेव्हा माझ्याबरोबर ‘या विषयावर’ बोलू लागले तेव्हा त्यांनी मला स्पष्ट किंवा खरंखरं काय ते सांगितलं नाही. त्यांनी मला सरळसरळ सांगितलं असतं तर किती बरं झालं असतं, असं मला आता वाटतं.” सतरा वर्षांच्या ॲलना हिलाही असंच वाटतं. ती म्हणते: “माझ्या शरीरात होणाऱ्‍या बदलांविषयी आईनं मला सांगितलं खरं, पण मानसिक रीत्या होणाऱ्‍या बदलांविषयीसुद्धा तिनं मला सांगितलं असतं तर बरं झालं असतं.” या दोन्ही तरुणांच्या बोलण्यावरून काय कळतं? वयात आल्यानंतर शारीरिक रीत्या व मानसिक रीत्या कोणते बदल होतात या विषयावर आपल्या मुलांबरोबर बोलणं सोपं नसलं तरी, तुम्ही त्यांच्याशी बोलणं अत्यंत गरजेचं आहे.—बायबलमधील तत्त्व: प्रेषितांची कृत्ये २०:२०.

असे प्रश्‍न विचारा ज्यामुळे ते बोलू लागतील. मुलांना या विषयावर सहज बोलता यावं म्हणून तुम्ही, वयात आलेल्या इतर मुला-मुलींबद्दलचा विषय काढू शकता. जसं की, तुम्ही आपल्या मुलीला विचारू शकता: “तुझ्या वर्गातल्या कुठल्या मुलीनं तुला पाळी आल्याचं काही सांगितलं का?” “ज्या मुलींना लवकर पाळी आली त्यांची इतर जणी थट्टा करतात का?” तुमच्या मुलाला तुम्ही विचारू शकता: “ज्यांच्या अजून मिशा फुटल्या नाहीत, ज्यांची अजून उंची वाढत नाहीत अशा मुलांची इतर मुलं थट्टा करतात का?” इतरांबद्दल बोलताना मग तुमच्याही मुलाला किंवा मुलीला स्वतःच्या भावना व्यक्‍त करायला, त्याला/तिला नेमकं कसं वाटतं, ते सांगताना संकोच वाटणार नाही. आणि ते जेव्हा त्यांच्या मनातलं तुम्हाला सांगत असतात तेव्हा, “ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा” असावे, या बायबलमधील सल्ल्याचं पालन करा.—याकोब १:१९.

आपल्या किशोरवयीन मुलांना व्यावहारिक बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता वाढवण्यास मदत करा. (नीतिसूत्रे ३:२१) पौगंडावस्थेत फक्‍त शारीरिक किंवा मानसिक बदल होतात असं नाही. तर त्यांच्यात तर्क करण्याची कलादेखील विकसित होते. यामुळे प्रौढावस्थेत गेल्यावर ते योग्य निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे पौगंडकाळात असलेल्या आपल्या मुलीच्या/मुलाच्या मनात, चांगली मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करा.—बायबलमधील तत्त्व: इब्री लोकांस ५:१४.

हार मानू नका. आईवडील जेव्हा पौगंडावस्थेविषयी बोलत असतात तेव्हा पुष्कळ मुलं-मुली त्यांच्याबरोबर बोलायला कचरतात, असं पालकांना वाटू शकतं. पण खरं तर तसं नसतं. “मुलं जरी आईवडिलांचं बोलणं ऐकण्यात त्यांना काही रस नाही असं दाखवत असले, त्यांना कंटाळा आलाय, त्यांना ऐकायला किळस वाटतेय किंवा ते ऐकून न ऐकल्यासारखं करत असले तरी, तुमचा प्रत्येक शब्द ते लक्षपूर्वक मनात साठवत असतात,” असं यू ॲण्ड युअर अडोलेसेंट या पुस्तकात म्हटलं आहे.◼ (g16-E No. 2)

a या लेखातील नावे बदलण्यात आली आहेत.

मुख्य शास्त्रवचनं

  • “भयप्रद व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे.”—स्तोत्र १३९:१४.

  • “जे हितकारक ते तुम्हाला सांगण्यात . . . मी कसूर केली नाही.”—प्रेषितांची कृत्ये २०:२०.

  • “[प्रौढ लोकांना त्यांच्या] ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे.”—इब्री लोकांस ५:१४.

“मी पौगंडावस्थेतून जात होते तेव्हा माझ्या आईबाबांनी आणि खासकरून माझ्या आईनं मला खूप सांभाळून घेतलं. तिनं मला सर्व काही समजावून सांगितलं. त्यामुळे, माझ्यात आणखी कोणकोणते बदल होणार होते ते मला समजलं. आणि मी जेव्हा वयात आले तेव्हा मी गोंधळून गेले नाही. आणि मला लाज वाटेल अशा पद्धतीनं ती कधीच बोलली नाही. आईबाबांमुळेच मला खरंतर या अवघड परिस्थितीला सहजपणे सामोरं जाता आलं.”—मरी नावाची १६ वर्षांची तरुणी.

“आईबाबा या स्थितीत सतत माझ्याबरोबर होते. माझ्या मनावर काय परिणाम होत आहेत हे त्यांना माहीत असल्यामुळे मला जेव्हा एकटं राहावंसं वाटायचं तेव्हा ते मला एकटं सोडायचे. मला जास्त आनंद याचा आहे, की माझ्याबद्दल ते इतरांना सांगत सुटले नाहीत. शिवाय, माझ्यात कोणते बदल होणार होते त्याबद्दल त्यांनी आधीच मला सांगितलं होतं.”—जोन नावाची १८ वर्षांची तरुणी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा