बायबल याविषयी काय म्हणतं?
पृथ्वी
देवानं पृथ्वी का बनवली?
“ज्या देवाने पृथ्वी निर्माण केली व घडली, ज्याने स्वतः ती स्थापली, आणि उजाड अशी अस्तित्वात आणली नाही, ज्याने ती वस्ती करण्यासाठी निर्माण केली, तो यहोवा असे म्हणतो, मीच यहोवा आहे आणि दुसरा कोणी नाही.”—यशया ४५:१८, पं.र.भा.
लोकांचं काय म्हणणं आहे?
अनेकांचं असं म्हणणं आहे, की पृथ्वी कोणीही निर्माण केली नाही; ती आपोआप अस्तित्वात आली. काही धर्म असं शिकवतात, की पृथ्वी एक परीक्षेचं ठिकाण आहे. या ठिकाणी माणूस फक्त काही काळ राहतो. त्यादरम्यान देव त्याची परीक्षा घेतो. तो ज्या प्रकारे जीवन जगतो त्यावरून तो स्वर्गात जाईल की नरकात हे देव ठरवतो.
बायबलचं काय म्हणणं आहे?
बायबल म्हणतं, की “देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली.” (उत्पत्ति १:१) पुढं त्यानं पहिल्या मानवी जोडप्याला म्हटलं: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; . . . पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.” (उत्पत्ति १:२८) तसंच, मानवानं त्याची आज्ञा मोडली तरच त्याचा मृत्यू होणार होता असं देवानं सांगितलं होतं. (उत्पत्ति २:१७) याचा अर्थ, मानवानं कधीही न मरता कायम या पृथ्वीवर राहावं अशी देवाची इच्छा होती. मुळात, संबंध पृथ्वीवर देवाच्या आज्ञा मानणारे लोक सदासर्वकाळ राहणार होते आणि तिची काळजी घेणार होते.
पृथ्वीचा नाश होईल का?
“तू पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापिली आहेस की ती कधीही ढळणार नाही.”—स्तोत्र १०४:५.
लोकांचं काय म्हणणं आहे?
पृथ्वीचा नाश कसा होईल किंवा ती कशी उजाड होईल याबद्दल वैज्ञानिकांनी बरीच वर्णनं केली आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, की मानवाचं अस्तित्व धोक्यात घालणाऱ्या दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती; जसं की उल्कापात, धूमकेतू आदळणे, महाज्वालामुखी उद्रेक, सूर्याचा नाश किंवा पृथ्वीचं तापमान-वाढ. मानवाचं अस्तित्व धोक्यात घालणारी दुसरी गोष्ट म्हणजे मानवनिर्मित संकटं; जसं की आण्विक युद्धं किंवा जैविक शस्त्रांचा वापर.
बायबलचं काय म्हणणं आहे?
पृथ्वीबद्दल देवानं सुरुवातीला जे काही ठरवलं होतं ते मुळीच बदललेलं नाही. बायबल स्पष्टपणे म्हणतं, की पृथ्वी “कायम राहते.” (उपदेशक १:४) तसंच, बायबल असंही म्हणतं की पृथ्वीवर नेहमीच लोक राहतील: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.”—स्तोत्र ३७:२९.
हे जाणून घेणं महत्त्वाचं का आहे?
आज ना उद्या पृथ्वीचा नाश होणारच आहे अशी एक समज असल्यामुळं काही जण पृथ्वीची नैसर्गिक संपत्ती ओरबाडत आहेत; तर इतर काहींना भविष्याची आशा नसल्यामुळं ते केवळ आजच्यापुरतं जगत आहेत. यामुळं त्यांच्या जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. याउलट, आपण पृथ्वीवर सदासर्वकाळ राहू शकतो असा आपला विश्वास असेल, तर जीवनात आपण असे निर्णय घेऊ ज्यांचा आत्ता आणि भविष्यातसुद्धा आपल्याला फायदा होईल.
मेल्यानंतर आपण स्वर्गात जातो का?
“स्वर्ग तर परमेश्वराचा आहे, पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे.”—स्तोत्र ११५:१६.
लोकांचं काय म्हणणं आहे?
अनेकांचं असं म्हणणं आहे, की सगळे चांगले लोक स्वर्गात जातात.
बायबलचं काय म्हणणं आहे?
स्वर्ग देवासाठी आहे; पण, पृथ्वी मानवांसाठी बनवण्यात आली आहे. बायबल म्हणतं की, “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील.” (स्तोत्र ३७:११) येशू ख्रिस्त हा स्वर्गात जाणारा पहिला मानव होता; तसंच, काही मानवसुद्धा एका विशिष्ट कारणासाठी स्वर्गात जातील असं बायबल म्हणतं. येशूसोबत “पृथ्वीवर राज्य” करण्यासाठी ते स्वर्गात जातील.—प्रकटीकरण ५:९, १०; लूक १२:३२; योहान ३:१३.
हे जाणून घेणं महत्त्वाचं का आहे?
सर्व चांगले लोक स्वर्गात जातात असं जरी लोक मानत असले, तरी बायबल तसं शिकवत नाही. देवानं सर्व चांगल्या लोकांना स्वर्गात नेलं तर त्याचा असा अर्थ होईल की पृथ्वीबद्दल देवानं सुरुवातीला जे काही ठरवलं होतं ते तो पूर्ण करू शकला नाही; तसंच, पृथ्वीवर मानवांना सदासर्वकाळचं जीवन देण्याची त्याची आश्वासनंही खरी नाहीत असं वाटेल. पण याच्या अगदी उलट बायबल असं आश्वासन देतं: “परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल.”—स्तोत्र ३७:३४. ◼ (g14-E 12)