वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g05 ७/८ पृ. १०-१४
  • तुम्ही कोणते चित्रपट बघणार?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही कोणते चित्रपट बघणार?
  • सावध राहा!—२००५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मापदंडांची स्थापना
  • निर्बंध व नंतर वर्गीकरण
  • चित्रपटाचा दाखला कितपत विश्‍वासार्ह?
  • “वाईटाचा द्वेष करा”
  • चांगल्या प्रकारची करमणूक शोधा
  • प्रशिक्षित विवेकाचे फायदे
  • पटकथेपासून पडद्यापर्यंतचा प्रवास
    सावध राहा!—२००५
  • हितकारक मनोरंजन कसे निवडावे
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • काय दशा आहे करमणुकीची?
    सावध राहा!—१९९७
  • तुम्हाला मिळू शकते हितावह करमणूक
    सावध राहा!—१९९७
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२००५
g05 ७/८ पृ. १०-१४

तुम्ही कोणते चित्रपट बघणार?

अलीकडील दशकांत पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्‍या सेक्स, हिंसा व असभ्यतेविषयी मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात. काहीजण म्हणतात की विशिष्ट सेक्स दृश्‍य अश्‍लील आहे तर दुसरे म्हणतात की ते कलात्मक आहे. काहीजण म्हणतात की अमुक चित्रपटात दाखवलेली हिंसा अनावश्‍यक आहे तर काहीजण म्हणतात की त्यात काही गैर नाही. काहीजण म्हणतात या चित्रपटातील संवाद असभ्य आहेत, सद्‌भिरुचीचा भंग करणारे आहेत तर काहीजण म्हणतात की ते वास्तविक आहेत. एकजण ज्याला अश्‍लील म्हणतो त्यालाच दुसरा अभिव्यक्‍तीचे स्वातंत्र्य असे नाव देतो. दोन्ही बाजू ऐकताना असे वाटू लागते जणू हा केवळ शब्दांचा खेळ आहे.

पण चित्रपटात काय दाखवले जाते हा केवळ हलक्याफुलक्या चर्चेचा विषय नाही. हा एक महत्त्वाचा प्रश्‍न आहे. केवळ आईवडिलांकरता नव्हे तर नैतिक आदर्शांचे मोल जाणणाऱ्‍या सर्वांकरता. एका स्त्रीने म्हटले: “जेव्हाही मी आपल्या विवेकाकडे दुर्लक्ष करून एखाद्या चित्रपट गृहात जाण्याचं धाडस करते, तेव्हा बाहेर पडताना मला असं वाटू लागतं की आपण आत जाताना होतो त्यापेक्षा वाईट व्यक्‍ती आहोत. असले रद्दड चित्रपट बनवणाऱ्‍या लोकांची आणि खासकरून स्वतःची मला लाज वाटू लागते. आपण आताच जे पाहून आलोय, ते पाहिल्यामुळे मानव या नात्याने आपला दर्जा थोडा खालावलाय असं वाटू लागतं.”

मापदंडांची स्थापना

चित्रपटातील दृश्‍यांविषयी पूर्वीही वाद होता. चित्रपट इतिहासाच्या अगदी सुरुवातीच्या काळातच पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्‍या उत्तान व हिंसक दृश्‍यांविषयी बराच गलबला झाला. शेवटी, १९३० च्या दशकात संयुक्‍त संस्थानांत एक आचारसंहिता तयार करण्यात आली व चित्रपटातील दृश्‍यांवर कडक बंधने घालण्यात आली.

द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिका यानुसार, ही नवी आचारसंहिता, “अतिशय संकुचित होती व सर्वसामान्य प्रौढांच्या अनुभवाशी संबंधित असलेली कोणतीही दृश्‍ये दाखवण्यास तिने मनाई केली. ‘शृंगारप्रधान’ दृश्‍ये, विवाहबाह्‍य संबंध, निषिद्ध शरीरसंबंध, मोहित करणे, व बलात्कार यांसारखे विषय कथानकासाठी अगदी आवश्‍यक असल्याखेरीज आणि अशी कामे करणाऱ्‍यांना शेवटी कडक शिक्षा मिळाल्याचे चित्रपटात दाखवले नसल्यास त्यांचा उल्लेख करण्याचीही मनाई होती.”

हिंसाचाराच्या दृश्‍यांबाबत, चित्रपटांत “सर्वसामान्य वापरात असलेली शस्त्रे दाखवण्याची अथवा त्यांविषयी चर्चा करण्याची, गुन्ह्याचे बारकावे दाखवण्याची, कायद्याचे रक्षण करणाऱ्‍या अधिकाऱ्‍यांना गुन्हेगारांच्या हाती मृत्यू आला असे दाखवण्याची, अतीक्रूरता किंवा हत्या यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करण्याची किंवा कथानकासाठी अत्यंत आवश्‍यक असल्याखेरीज खून किंवा आत्महत्येची दृश्‍ये दाखवण्याची परवानगी नव्हती. . . . कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याच प्रकारचा गुन्हा योग्य होता असे सुचवण्यास मनाई होती.” थोडक्यात, या आचारसंहितेनुसार, “असा कोणताही चित्रपट निर्माण करण्यास मनाई होती, की ज्यामुळे तो पाहणाऱ्‍यांची नीती बिघडेल.”

निर्बंध व नंतर वर्गीकरण

हॉलीवूडचे निर्माते १९५० च्या दशकापर्यंत या आचारसंहितेचे उल्लंघन करू लागले होते. त्यांच्या मते त्यातील नियम अतिशय पुरोगामी होते. त्यामुळे १९६८ साली ही आचारसंहिता रद्द करण्यात आली आणि त्याऐवजी चित्रपटांचे वर्गीकरण करण्याची पद्धत सुरू झाली.a या वर्गीकरण पद्धतीनुसार, चित्रपटात उघड दृश्‍ये असण्यास परवानगी होती पण अशा चित्रपटावर एक विशिष्ट शिक्का लावला जाणार होता, ज्यामुळे हे चिन्ह पाहून लोकांना यातील “प्रौढांकरता” असलेल्या दृश्‍यांविषयी आधीच सूचना मिळू शकेल. मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिका या संस्थेत जवळजवळ चार दशके अध्यक्ष म्हणून काम केलेल्या जॅक व्हॅलन्टी यांच्या मते, वर्गीकरण करण्याचा उद्देश असा होता, की “आईवडिलांना निदान काही पूर्वसूचना देता यावी जेणेकरून ते आपल्या मुलांनी कोणते चित्रपट पाहावे व कोणते पाहू नयेत याविषयी स्वतःहून निर्णय घेऊ शकतील.”

वर्गीकरण पद्धती येताच चित्रकर्त्यांना रान मोकळे झाले. हॉलीवूडच्या सर्वसामान्य पटकथांमध्ये सेक्स, हिंसा, व बीभत्सपणा यांचा जणू महापूरच आला. या नव्यानेच मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे जो महापूर आला होता, त्याला बांध घालणे शक्यच नव्हते. पण दिलासा देणारी बाब म्हणजे, निदान जनतेला पूर्वसूचना मिळणार होती. पण चित्रपटाचा दाखला पाहून तुम्हाला सर्व माहिती मिळते का?

चित्रपटाचा दाखला कितपत विश्‍वासार्ह?

काहीजणांच्या मते काळाच्या ओघात वर्गीकरण पद्धती काहीशी शिथिल झाली आहे. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या एका अभ्यासावरून ही शंका बिनबुडाची नाही असे दिसून येते. कारण या अभ्यासावरून असे दिसून आले की केवळ दहा वर्षांआधीच्या चित्रपटांशी तुलना केल्यास, मुलांकरता असलेल्या अलीकडच्या चित्रपटांत जास्त हिंसक व उत्तान सेक्सप्रधान दृश्‍ये असल्याचे आढळते. या अभ्यासावरून असा निष्कर्ष काढण्यात आला की “एकाच प्रकारच्या वर्गात मोडणाऱ्‍या दोन चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्‍यांची संख्या व प्रकार अगदी वेगळे असू शकतात.” तसेच, “केवळ वयोगटाच्या आधारावर केलेले वर्गीकरण तुम्हाला त्या चित्रपटात दाखवलेली हिंसक, लैंगिक, बीभत्स दृश्‍ये व इतर गोष्टींची पूर्ण कल्पना देत नाही.”b

मागचा पुढचा विचार न करता, जे आईवडील आपल्या मुलांना थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यास पाठवतात त्यांना कदाचित आजच्या काळात कोणत्या प्रकारच्या गोष्टी मुलांनी पाहण्यास योग्य समजल्या जातात त्याची कल्पना नसावी. उदाहरणार्थ, १३-१९ या वयोगटातील मुलांनी पाहण्यास योग्य असे संयुक्‍त संस्थानात ज्याचे वर्गीकरण करण्यात आले त्या चित्रपटाच्या नायिकेचे एका चित्रपट समीक्षकाने असे वर्णन केले: “ती १७ वर्षांची एक बिनधास्त छोकरी आहे. दररोज पिऊन तर्र होण्याचे, बेकायदेशीर अंमली पदार्थ वापरण्याचे, जेथे सामूहिक लैंगिक कृत्ये केली जातात अशा पार्ट्यांना जाण्याचे किंवा ज्याच्याशी तिची नुकतीच भेट झाली आहे अशा एका तरुणासोबत उत्तानपणे संभोग करण्याचे तिला काहीही वाटत नाही.” आणि अशी दृश्‍ये फक्‍त एखाद दुसऱ्‍या चित्रपटात पाहायला मिळतात अशातला भाग नाही. द वॉशिंग्टन पोस्ट मॅग्झीन यात म्हटल्याप्रमाणे, १३-१९ या वयोगटातील मुलांनी पाहण्यास योग्य असे वर्गीकरण करण्यात आलेल्या चित्रपटांत, मौखिक संभोगाचे उल्लेख “अगदी सर्रासपणे मान्य” केले जातात. तेव्हा केवळ वर्गीकरणाच्या भरवशावर, चित्रपटात काय पाहायला मिळेल याविषयी अंदाज लावता येत नाही. मग कशाच्या आधारावर हे ठरवले जाऊ शकते?

“वाईटाचा द्वेष करा”

चित्रपटांचे वर्गीकरण, हे बायबलच्या आधारावर प्रशिक्षित केलेल्या विवेकाची जागा घेऊ शकत नाही. खरे ख्रिस्ती कोणताही निर्णय घेताना—करमणुकीशी संबंधित निर्णय घेतानाही स्तोत्र ९७:१० येथे देण्यात आलेल्या, “वाईटाचा द्वेष करा” या सल्ल्याचे पालन करण्याचा प्रयत्न करतात. जो वाईटाचा द्वेष करतो तो, देवाला ज्यांचा वीट आहे अशा गोष्टींनी स्वतःची करमणूक निश्‍चितच करणार नाही.

विशेषतः आईवडिलांनी, आपल्या मुलांना कशाप्रकारचे चित्रपट पाहू द्यावेत याविषयी दक्ष असावे. हा चित्रपट प्रौढांकरता तर नाही ना, हे केवळ वरवर पाहून समाधान मानणे अजाणपण ठरेल. कदाचित तुमच्या मुलांच्या वयोगटाकरता योग्य ठरवण्यात आलेल्या त्या चित्रपटात अशा गोष्टी दाखवलेल्या असतील की ज्या पालक या नात्याने तुम्हाला योग्य वाटत नाहीत. हे अपेक्षितच आहे कारण या जगाने स्वीकारलेली विचारसरणी व वर्तन व देवाचे आदर्श यांत जमीनअस्मानाचा फरक आहे.c—इफिसकर ४:१७, १८; १ योहान २:१५-१७.

अर्थात याचा अर्थ सगळेच चित्रपट वाईट असतात असा नव्हे. पण सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या संदर्भात, सावध राहाच्या! जून ८, १९९७ अंकात हे विधान केले होते: “प्रत्येक व्यक्‍तीनं साधकबाधक विचारांती निर्णय घ्यावेत जेणेकरून देवासमोर आणि माणसासमोर त्याला शुद्ध विवेक राखता येईल.”—१ करिंथकर १०:३१-३३.

चांगल्या प्रकारची करमणूक शोधा

आपल्या कुटुंबाने कोणते चित्रपट पाहावेत हा निर्णय घेताना पालक कशाप्रकारे चोखंदळ असू शकतात? जगातल्या निरनिराळ्या देशांतल्या आईवडिलांनी यासंदर्भात व्यक्‍त केलेले अभिप्राय येथे देत आहोत. त्यांनी जे म्हटले आहे त्यावरून कदाचित तुम्हालाही आपल्या कुटुंबाकरता चांगल्या प्रकारची करमणूक निवडण्यास मदत मिळू शकेल.—“करमणूकीचे इतर प्रकार” असे शीर्षक असलेला पृष्ठ १४ वरील चौकोन पाहा.

स्पेनमध्ये राहणारे ख्वान सांगतात: “मुलं लहान होती तेव्हा एकतर माझी पत्नी किंवा मी त्यांच्यासोबत चित्रपट पाहायला जायचो. ते कधीही एकटे किंवा मित्रांच्या घोळक्यासोबत गेले नाहीत. आता ते किशोरवयीन आहेत पण अजूनही ते कधीही चित्रपटाच्या पहिल्या खेळाला जात नाहीत. आम्ही या चित्रपटाविषयीच्या समीक्षा वाचेपर्यंत किंवा आमच्या विश्‍वासातल्या इतरांकडून त्याविषयीचे अभिप्राय ऐकेपर्यंत ते थांबतात. मग हा चित्रपट आपण पाहावा की नाही हे आम्ही कुटुंब मिळून ठरवतो.”

दक्षिण आफ्रिकेचे मार्क आपल्या किशोरवयीन मुलाला थिएटर्समध्ये लागलेल्या चित्रपटांविषयी आपली मते व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन देतात. ते म्हणतात, “माझी पत्नी व मी स्वतःहूनच चर्चा सुरू करतो आणि एखाद्या विशिष्ट चित्रपटाविषयी त्याचं मत विचारतो. यामुळे आम्हाला त्याचे विचार ऐकून त्याच्यासोबत विचारविनिमय करण्याची संधी मिळते. यामुळे आम्ही सर्वजण सोबत मिळून ज्यांचा आनंद घेऊ शकतो असे चित्रपट आम्हाला निवडता येतात.”

ब्राझीलचे रोझार्यो हे देखील आपल्या मुलांसोबत त्यांना जे चित्रपट पाहावेसे वाटतात त्यांविषयी चर्चा करतात. “मी त्यांच्यासोबत समीक्षांनी व्यक्‍त केलेली मते वाचतो. एखादा चित्रपट पाहण्यास अनुचित असू शकतो हे त्याच्या कव्हरवरून कसं ठरवता येतं हे मी त्यांना प्रत्यक्ष व्हिडिओ लायब्ररीत नेऊन शिकवतो.”

ब्रिटनचे मॅथ्यू हेही म्हणतात की मुलांना जे चित्रपट पाहायचे असतात त्यांविषयी त्यांच्याशी बोलल्याने फायदा होतो. ते सांगतात, “आमची मुलं अगदी लहान होती तेव्हापासूनच आम्ही कुटुंब या नात्याने कोणते चित्रपट पाहू इच्छितो, व त्यांत काय दाखवले आहे याविषयी चर्चा करताना मुलांनाही सामील करायचो. जर विशिष्ट चित्रपट आपण टाळला पाहिजे असं आम्ही ठरवलं तर त्यांना सरळ ‘नाही’ म्हणण्याऐवजी मी व माझी पत्नी त्यांना त्यामागची कारणं समजावून सांगायचो.”

याशिवाय काही आईवडील चित्रपटांविषयी माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटची मदत घेतात. विशिष्ट चित्रपटात काय दाखवले आहे याविषयी इत्थंभूत माहिती देणाऱ्‍या अनेक वेब साईट्‌स आहेत. या रिपोट्‌र्सवरून त्या विशिष्ट चित्रपटात कशाप्रकारच्या नीतीमूल्यांना प्रोत्साहन दिले आहे याचे स्पष्ट चित्र मिळू शकते.

प्रशिक्षित विवेकाचे फायदे

बायबल अशा व्यक्‍तींबद्दल उल्लेख करते की “ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे.” (इब्री लोकांस ५:१४) तेव्हा आईवडिलांनी आपल्या मुलांमध्ये अशाप्रकारची नीतिमूल्ये रुजवली पाहिजेत की ज्यांमुळे त्यांना स्वतःहून करमणुकीची निवड करण्याचे स्वातंत्र्य मिळाले तरीसुद्धा ते योग्य निर्णय घेऊ शकतील.

यहोवाच्या साक्षीदारांपैकी बऱ्‍याच तरुणतरुणींना त्यांच्या आईवडिलांकडून या संदर्भात उत्तम प्रशिक्षण मिळाले आहे. उदाहरणार्थ, संयुक्‍त संस्थानांत राहणारे बिल व चेरी यांना आपल्या दोन किशोरवयीन मुलांसोबत चित्रपट पाहायला जाणे आवडते. बिल सांगतात, “चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर आम्ही सर्वजण सहसा त्या चित्रपटाविषयी—त्यात कशाप्रकारची मूल्ये दाखवण्यात आली आणि ती आम्हाला पटतात किंवा नाही याविषयी चर्चा करतो.” अर्थात, बिल व चेरी यांना निवडक असण्याच्या महत्त्वाची जाणीव आहे. बिल पुढे सांगतात, “आम्ही सहसा त्या चित्रपटाविषयी प्रकाशित झालेली माहिती आधी वाचून काढतो; शिवाय जर अनपेक्षितपणे चित्रपटात काही आक्षेपार्ह गोष्टी दाखवल्या जाऊ लागल्या तर आम्ही चित्रपट अर्धवट सोडून सरळ बाहेर पडतो. आम्हाला असे करण्यास कसलाही संकोच वाटत नाही.” जबाबदारपणे निर्णय घेण्यात मुलांना समाविष्ट केल्यामुळे ते चांगले व वाईट यात फरक करण्यास शिकत आहेत असे बिल व चेरी यांना वाटते. बिल सांगतात, “चित्रपटांची निवड करण्याच्या बाबतीत ते अधिक सुज्ञपणे निर्णय घेऊ लागले आहेत.”

बिल व चेरी यांच्याप्रमाणेच अनेक पालकांनी आपल्या मुलांना चांगले काय व वाईट काय यातला फरक ओळखण्यास मदत केली आहे. चित्रपट उद्योग जे निर्माण करतात त्यापैकी बहुतेक पाहण्यास योग्य नसते हे तर उघडच आहे. पण दुसरीकडे पाहता, बायबलमधील तत्त्वांचे मार्गदर्शन घेतल्यास खरे ख्रिस्ती चांगल्या प्रकारचे आणि खऱ्‍या अर्थाने मनोरंजन करणारे करमणुकीचे प्रकार निवडून त्यांचा आनंद उपभोगू शकतात. (g०५ ५/८)

[तळटीपा]

a जगातील अनेक देशांनी अशाप्रकारची पद्धत अवलंबली आहे ज्याद्वारे चित्रपटाला विशिष्ट दाखला दिला जातो. यावरून तो चित्रपट कोणत्या वयोगटाच्या प्रेक्षकांसाठी पाहण्यालायक आहे हे सूचित होते.

b शिवाय, चलचित्रपटाचे वर्गीकरण ज्या आधारावर केले जाते ते निकष प्रत्येक देशात वेगवेगळे असू शकतात. एका देशात जो चित्रपट चौदापंधरा वर्षांच्या मुलांकरता अयोग्य समजला जातो तोच दुसऱ्‍या देशात मात्र योग्य ठरवला जाण्याची शक्यता आहे.

c खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी आठवणीत ठेवावी अशी आणखी एक गोष्ट म्हणजे लहान मुलांकरता व किशोरांकरता असलेल्या चित्रपटांत जादूटोणा, भुताटकी किंवा इतर दुरात्मिक प्रकार असू शकतात.—१ करिंथकर १०:२१.

[१२ पानांवरील चौकट/चित्रे]

‘आम्ही मिळून निर्णय घेतो’

“मी लहान होते तेव्हा पिक्चर पाहायला आम्ही सगळे कुटुंब मिळून जायचो. आता मी मोठी झाल्यामुळे आईबाबांच्या शिवायही जाण्याची मला परवानगी आहे. पण मला जाऊ देण्याआधी, आईबाबा पिक्चरचं नाव आणि तो कशाबद्दल आहे हे जरूर विचारतात. जर त्यांनी या पिक्चरविषयी ऐकलेलं नसेल तर ते याविषयीची एखादी समीक्षा वाचतात किंवा टीव्हीवर याचं ट्रेलर पाहतात. इंटरनेटवरूनही ते पिक्चरविषयी माहिती काढतात. जर त्यांना वाटलं की हा पिक्चर पाहण्यालायक नाही तर ते त्याची कारणं मला स्पष्ट सांगतात. शिवाय माझं मतही मला व्यक्‍त करू देतात. आम्ही अगदी मोकळेपणानं एकमेकांशी बोलतो आणि मग मिळून निर्णय घेतो.”—एलॉईज, १९, फ्रांस.

[१३ पानांवरील चौकट/चित्र]

चर्चा करा!

“आईवडिलांनी विशिष्ट गोष्टींची मनाई केली आणि त्यांऐवजी मुलांसाठी चांगल्या प्रकारच्या करमणुकीची व्यवस्था केली नाही तर मुलं आपल्या इच्छा त्यांच्यापासून लपवून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून, मुलांनी जर एखाद्या वाईट प्रकारच्या करमणुकीची इच्छा व्यक्‍त केली, तर काही आईवडील त्यांना लगेच नाही म्हणत नाहीत आणि परवानगीही देत नाहीत. तर हे प्रकरण थोडं थंड होण्यासाठी वेळ जाऊ देतात. काही दिवस ते मुलांवर न चिडता, या विषयावर चर्चा करतात. ही विशिष्ट करमणूक चांगली आहे असे त्यांना का वाटते हे मुलांना विचारतात. अशाप्रकारे चर्चा केल्यामुळे बरेचदा मुलंही आईवडिलांशी सहमत होतात आणि कधीकधी तर त्यांचे आभारही मानतात. मग आईवडील स्वतः पुढाकार घेऊन, मुलांसोबत दुसरा एखादा करमणुकीचा प्रकार निवडतात ज्याचा सर्वांना मिळून आनंद लुटता येईल.”—मासाकी, जपानचे एक प्रवासी पर्यवेक्षक.

[१४ पानांवरील चौकट/चित्रे]

करमणुकीचे इतर प्रकार

▪ “लहान मुलांना आपल्या वयाच्या इतर मुलांसोबत मिसळण्याची स्वाभाविक इच्छा असते. त्यामुळे आम्ही आपल्या मुलीला नेहमी चांगल्या मित्रमैत्रिणींसोबत मौजमजा करण्याची मोकळीक दिली आहे, अर्थात आमच्या देखरेखीखाली. आमच्या मंडळीतच असे अनेक तरुणतरुणी आहेत ज्यांचे वागणेबोलणे अनुकरण करण्यासारखे आहे, त्यामुळे आम्ही आमच्या मुलीला त्यांच्याशी मैत्री करण्याचे प्रोत्साहन दिले आहे.”—एलीझा, इटली.

▪ “मुलांच्या करमणुकीसाठी व्यवस्था करण्यात आम्ही जातीने लक्ष घालतो. फिरायला जाणे, बार्बेक्यूज, सहली आणि सर्व वयोगटांच्या ख्रिस्ती बांधवांसोबत स्नेहभेटी यांसारखे चांगल्या मनोरंजनाचे बेत आम्ही आखतो. यामुळे मौजमजा फक्‍त आपल्याच वयाच्या मुलांबरोबर करता येते असं आता आमच्या मुलांना वाटत नाही.”—जॉन, ब्रिटन.

▪ “ख्रिस्ती बांधवांसोबत एकत्र येणं आम्हाला खूप समाधानदायक वाटतं. माझ्या मुलांना सॉकर खेळायला आवडतं त्यामुळे आम्ही इतरांसोबत सॉकर खेळण्याचा अधूनमधून प्रोग्राम बनवतो.”—ख्वान, स्पेन.

▪ “आम्ही मुलांना निरनिराळी वाद्ये शिकण्याचं प्रोत्साहन देतो. तसंच टेनिस, व्हॉलीबॉल, सायकलींवरून फिरायला जाणं, वाचन आणि मित्रमैत्रिणी एकत्र येऊन मौजमजा करणं अशाप्रकारचे निरनिराळे छंद आम्ही मिळून जोपासतो.”—मार्क, ब्रिटन.

▪ “आम्ही सर्व कुटुंब व मित्र मिळून बोलिंगचा खेळ खेळायला जातो. तसेच महिन्यातून एकदा सर्व मिळून काहीतरी खास बेत आखतो. आईवडिलांनी मुलांवर लक्ष ठेवल्यास समस्या टाळता येतात.”—डानीलो, फिलिपाईन्स.

▪ “नुसताच चित्रपट पाहण्यापेक्षा, लाईव्ह शोज पाहण्यात खरी मजा आहे. कला प्रदर्शने, कार शोज, किंवा संगीत कार्यक्रम कुठं चालली आहेत यावर आम्ही नजर ठेवतो. अशाप्रकारच्या कार्यक्रमांत, त्यांचा आस्वाद घेताना एकमेकांशी विचारांची देवाणघेवाणही करता येते. पण आम्ही करमणुकीसाठी खूप जास्त वेळ न देण्याची काळजी घेतो. हा फक्‍त वेळेचाच प्रश्‍न नाही, तर खूप जास्त मनोरंजन केल्यामुळे त्यात काही नावीन्य, मौज राहात नाही.”—जुडिथ, दक्षिण आफ्रिका.

▪ “इतर मुलं करतात त्या सर्वच गोष्टी माझ्या मुलांसाठी चांगल्या नाहीत. हे समजून घ्यायला मी त्यांना मदत करते. त्याऐवजी त्यांना चांगल्या प्रकारची करमणूक मिळावी म्हणून माझे पती व मी नेहमी प्रयत्न करतो. ‘आपण कधीच कुठं जात नाही. काहीच मजा करत नाही’ असं त्यांनी म्हणण्याची वेळ येणार नाही याची आम्ही काळजी घेतो. आम्ही सगळे कुटुंब मिळून बगिच्यांत जातो आणि आमच्या मंडळीतल्या इतरांना आमच्या घरी आमंत्रित करून सर्व मिळून मौजमजा करतो.”d —मारीया, ब्राझील.

[तळटीप]

d सामाजिक प्रसंगांवर अधिक माहितीकरता कृपया आमचे सोबतचे नियतकालिक टेहळणी बुरूज याच्या नोव्हेंबर १, १९९२ अंकातील, पृष्ठ २४-२७ पाहावीत.

[चित्राचे श्रेय]

James Hall Museum of Transport, Johannesburg, South Africa

[११ पानांवरील चित्र]

चित्रपट पाहावा की नाही हे ठरवण्याआधी त्याविषयीच्या समीक्षा वाचून पाहा

[१३ पानांवरील चित्र]

पालकांनो, आपल्या मुलांना चोखंदळ असण्यास शिकवा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा