आधुनिक दिवसांतील चांगला शोमरोनी
मेक्सिको येथील सावध राहा! लेखकाकडून
आपल्यातील बहुतेकांनी, बायबलमधील एका दयाळू मनुष्याची गोष्ट ऐकली असेल ज्याला चांगला शोमरोनी म्हटले जाते. (लूक १०:२९-३७) या दाखल्यात, येशू ख्रिस्ताने दाखवून दिले की एक शोमरोनी मनुष्य, दुसऱ्या एका गरजू मनुष्याची काळजी घेण्याकरता काय काय करतो. आजही असे चांगले शोमरोनी आहेत का? मेक्सिकोतील पुढील अहवाल पाहा.
बेटुएल आपल्या कुटुंबाबरोबर घरी परतत असताना, त्यांनी महामार्गावर एक भयंकर अपघात झालेला पाहिला; अपघाताचे ठिकाण त्यांच्या घरापासून काही किलोमीटर दूर होते. ते मदत करायला थांबले. अपघात झालेला गाडीचालक एक डॉक्टर होता; त्याने आपल्या गर्भवती पत्नीला आणि दोन लहान मुलींना जवळच्या इस्पितळात नेण्याची बेटुएलला विनंती केली. बेटुएलने त्यांना इस्पितळात पोहंचवल्यानंतर, आणखी काही मदत करता येईल का हे पाहण्यासाठी म्हणून तो पुन्हा अपघात झालेल्या ठिकाणी गेला.
बेटुएल म्हणतो: “मी पुन्हा गेलो तोपर्यंत महामार्गावर गस्त घालणारे केंद्रीयपथक घटनास्थळी पोहंचले होते आणि या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता त्यामुळे चौकशीसाठी ते त्या डॉक्टरला घेऊन जाणार होते. या डॉक्टरनं मला विचारलं, की तुम्ही मला मदत का करताय? मी त्यांना म्हणालो, की आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत आणि आपण आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम केले पाहिजे, असे आम्ही बायबलमधून शिकलो आहोत. मी त्याला म्हणालो, की तुम्ही आपल्या बायकोची आणि मुलांची चिंता करू नका, आम्ही त्यांची काळजी घेऊ. हे ऐकून त्याच्या डोळ्यांत पाणी आलं, आणि त्यानं मग आपल्याजवळील किंमती वस्तू माझ्याजवळ ठेवायला दिल्या.”
बेटुएल व त्याच्या पत्नीने मग या डॉक्टरच्या कुटुंबाला आपल्या घरी नेले आणि कित्येक दिवसांपर्यंत त्यांनी त्यांची काळजी घेतली. बेटुएलने मग त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू केला. हा डॉक्टर मग पोलिसांच्या ताब्यातून सुटून आला तेव्हा त्याने यहोवाच्या साक्षीदारांचे आभार व्यक्त केले आणि त्यांची प्रशंसा देखील केली. आपल्या गावी परतल्यावर आपण नक्की बायबलचा अभ्यास जारी ठेवू असे वचन त्याने दिले आणि असेही म्हटले, की जर मला मुलगा झाला तर मी त्याचे नाव बेटुएल ठेवीन. बेटुएल पुढे म्हणाला: “आता दोन वर्षांनंतर आम्हाला त्यांना भेटण्याची संधी मिळाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ते बायबलचा अभ्यास करीत होते आणि त्यांनी त्यांच्या तान्ह्या मुलाचे नाव बेटुएल ठेवले होते!” (g०४ ८/८)
[२९ पानांवरील चित्र]
बेटुएल