जगावरील दृष्टिक्षेप
हत्ती ‘आपल्या मित्रांना विसरत नाहीत’
“हत्ती कधीच विसरत नाही—निदान आपल्या मित्रांना तरी ते विसरत नाहीत,” असे न्यू सायंटिस्ट मासिक म्हणते. इंग्लंडमधील ससेक्स विद्यापीठाच्या डॉ. कॅरेन मॅकोम यांनी केनियाच्या ॲम्बोसली राष्ट्रीय उद्यानातील मादा आफ्रिकन हत्तींचे खालच्या पट्टीतील “संपर्क साधण्याचे आवाज” रेकॉर्ड करून कोणते हत्ती वारंवार एकमेकांना भेटतात आणि कोणते हत्ती एकमेकांना ओळखत नाहीत याची नोंद ठेवली. त्यानंतर, त्यांनी हे रेकॉर्ड केलेले आवाज २७ हत्तींच्या कुटुंबांना ऐकवले; त्यांची काय प्रतिक्रिया असेल हे त्यांना पाहायचे होते. या हत्तींना आवाज ओळखीचा वाटला की तेही लगेच आवाज द्यायचे, आवाज फारसा ओळखीचा नसला तर ते ऐकायचे परंतु पुन्हा आवाज द्यायचे नाहीत आणि जर अनोळखी आवाज ऐकला तर ते खवळायचे आणि आपले संरक्षण करायचा प्रयत्न करायचे. “ते १४ इतर कुटुंबातील हत्तींना त्यांच्या आवाजावरून ओळखू शकले; यावरून असे सुचवले जाते की, प्रत्येक हत्तीला सुमारे १०० इतर प्रौढ हत्ती आठवू शकतात,” असे त्या लेखात म्हटले होते. हत्तींना मानवही लक्षात राहतात. इंग्लंडच्या ब्रिस्टल प्राणीसंग्रहालयाच्या सस्तन प्राणी विभागाचे मुख्य जॉन पॅट्रिज यांचे म्हणणे आहे की, त्यांनी १८ वर्षे एका आशियाई हत्तीसोबत काम केले होते; मग तीन वर्षांनी त्या हत्तीला पुन्हा भेटल्यावर त्याने त्यांना ओळखले. (g०१ ५/२२)
जेवणाची तणावपूर्ण सुटी
“‘सशक्त’ लोकांच्या ब्रिटनमध्ये दुपारचे जेवण करणारे लोक ‘कमजोर’ असतात असे मानले जाते कारण कामात एकसारखे गढून गेलेले कामगार दुपारचे जेवण करण्याऐवजी काम करता करताच एखादे सँडवीच खाऊन घेतात,” असे वृत्त लंडनच्या फायनॅन्शियल टाईम्स यात दिले आहे. अलीकडील संशोधनावरून दिसून येते की, सर्वसामान्य ब्रिटिश व्यक्तीच्या “जेवणाची सुटी” केवळ ३६ मिनिटांची असते. वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दुपारच्या सुटीमुळे तणाव कमी होतो. पण काही मालक जेवणाच्या सुटीदरम्यान मिटींग्स ठेवतात ज्यामुळे कामगारांना जराही विसावा मिळत नाही. हा अहवाल तयार केलेल्या डेटामॉनिटर या संशोधन संस्थेने म्हटले: “कामगारांकडून जास्त अपेक्षा करणाऱ्या व वेळेला खूपच बहुमोल समजणाऱ्या आजच्या समाजात दुपारच्या जेवणाची वेळ म्हणजे केवळ पोट भरण्यासाठी घेतलेली अनावश्यक सुटी वाटते.” डेटामॉनिटरच्या परीक्षिका सेरह ननी यांचे म्हणणे आहे: “आज आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये आपण उतरलो आहोत. ‘हे काम मी नंतर करीन,’ असे म्हणायची सोय नाही. कोणतेही काम आताच केले पाहिजे.” (g०१ ५/२२)
फ्रिजविना ताजे अन्न
फ्रिजविना अन्नपदार्थ थंड आणि ताजे ठेवणे कठीण आहे. परंतु, उत्तर नायजेरियाच्या निमवाळवंटी भागात शोधून काढलेला एक साधा आणि स्वस्त उपाय फार परिणामकारक ठरत आहे. मातीची भांडी एकात एक ठेवून त्या दोन भांड्यांमधली जागा ओल्या वाळूने भरली जाते. लहान मडक्यात अन्नपदार्थ ठेवून ते ओल्या कापडाने झाकले जाते. “बाहेरील उष्ण हवेमुळे बाहेरच्या मडक्याच्या पृष्ठभागावर आर्द्रता जमून तिचे बाष्पीभवन होते,” असे न्यू सायंटिस्ट मासिक म्हणते. “पाण्याच्या वाफेसोबत उष्णताही नेली जाते; वाळू आणि [झाकलेले कापड] सतत ओले राहिले तर या कोरड्या पडण्याच्या क्रियेमुळे आतल्या मडक्यातील उष्णता सतत वाहून नेली जाते.” या पद्धतीने टमाटे आणि मिरच्या चक्क तीन आठवड्यांपर्यंत ताज्या राहू शकतात आणि वांगी तर तब्बल एक महिना टिकू शकतात. “मडक्याच्या आत मडके” घालण्याच्या या पद्धतीचा शोध लावणारे मोहंमद बा अब्बा म्हणतात की, आता शेतकरी आवश्यकतेनुसार आपले उत्पन्न विकू शकतात आणि सहसा हे उत्पन्न विकण्यासाठी घरी राहणाऱ्या त्यांच्या मुली शाळेत जाऊ शकतात. (g०१ ६/८)
सेल फोनमुळे अपघात
सेल फोनमुळे फक्त रस्त्यांवरच अपघात होत नाहीत. जपानमधील रेल अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्लॅटफॉर्मवर थांबलेले प्रवासी सेल फोनवर बोलण्यात इतके दंग होऊन जातात की आपण कोठे आहोत याचे त्यांना भान राहत नाही. असाही इव्हनिंग न्यूज यात दिलेल्या वृत्तानुसार, एक तरुण आपल्या फोनवर बोलताना प्लॅटफॉर्मच्या अगदी कडेवर उभा होता. बोलता बोलता तो नकळत फोनवरील व्यक्तीला नमस्कार करायला वाकला तेव्हा त्याच्या डोक्याला एक ट्रेन घासून गेली. तो अगदी मरता मरता वाचला; फक्त “त्याच्या उजव्या डोळ्याच्या वर कापले गेले.” परंतु दुसऱ्या एका अपघातात, “माध्यमिक शाळेतील एक विद्यार्थी सेल फोनवर बोलताना प्लॅटफॉर्मच्या इतक्या कडेवर उभा राहिला की एका मालगाडीचा मार लागून तो ठार झाला.” रेलमार्ग कर्मचाऱ्यांनी सांगितले की काही वेळा लोकांचे फोन रेल्वे मार्गावर पडतात. रेल्वे मार्गावर पडलेला फोन उचलायला एका २६ वर्षांच्या तरुणाने खाली उडी मारली आणि एका ट्रेनखाली “त्याचा चेंदामेंदा झाला.” “रेल्वेचे प्लॅटफॉर्म धोक्याची ठिकाणे आहेत हे लक्षात ठेवा” असे रेल अधिकारी लोकांना सांगत आहेत. (g०१ ६/२२)