बायबलचा दृष्टिकोन
सर्व धर्म देवाकडे जाणारे वेगवेगळे मार्ग आहेत का?
“विश्वकर्त्याने एकाच धर्माला आपली ओळख करून दिली आहे यावर माझा खरंच विश्वास बसत नाही,” असे लेखक मार्कस बोर्ग म्हणाले. नोबेल शांती पुरस्काराचे विजेते डेशमंड टुटू म्हणाले की, धर्माच्या “रहस्याचा उलगडा झाल्याचा दावा कोणताही एक धर्म करू शकत नाही.” “जोथो मोत तोथो पोथ” ही एक प्रसिद्ध बंगाली म्हण आहे. तिचे स्वैर भाषांतर केल्यास तिचा असा अर्थ होतो की, सगळे धर्म फक्त वेगवेगळे मार्ग आहेत पण ते एकाच ठिकाणी जातात. बौद्ध लोकांचाही हा विश्वास आहे. खरे तर, कोट्यवधी लोकांना असेच वाटते की, सर्व धर्म देवाकडे जाणारे वेगवेगळे मार्ग आहेत.
इतिहासकार जेफ्री पॅरींडर म्हणाले: “काही वेळा असे म्हटले जाते की, सर्व धर्मांचे एकच ध्येय आहे, ते सर्व सत्याकडे जाणारे समान मार्ग आहेत, किंवा सर्व [धर्मांमध्ये] सारख्याच शिकवणी आहेत असेही म्हटले जाते.” वेगवेगळ्या धर्मांच्या शिकवणी, रीतीरिवाज, देवी-देवता यांच्यात साम्य आहे यात वाद नाही. बहुतेक धर्म प्रेम करण्यास शिकवतात आणि खून करणे, चोरी करणे किंवा लबाड बोलणे हे चुकीचे आहे असे शिकवतात. पुष्कळसे धार्मिक गट, इतरांना मदत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. जर एखादी व्यक्ती प्रामाणिकतेने आपल्या विश्वासाचे पालन करत असेल आणि चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल तर ती कोणत्या धर्माचे पालन करते याने काही फरक पडतो का? दुसऱ्या शब्दांत सर्व धर्म देवाकडे जाणारे फक्त वेगवेगळे मार्ग आहेत का?
प्रामाणिकपणा फक्त पुरेसा आहे का?
पहिल्या शतकातील यहुदी पुरुष शौल याचे उदाहरण घ्या जो कालांतराने पौल या नावाने ओळखला गेलेला ख्रिस्ती प्रेषित बनला. यहुदी धर्माविषयी तो फार आवेशी होता आणि यामुळे त्याने ख्रिस्ताच्या अनुयायांची उपासना पूर्णतः मिटवण्याचा प्रयत्न केला कारण ती उपासना अनुचित होती असे त्याला वाटत होते. (प्रेषितांची कृत्ये ८:१-३; ९:१, २) परंतु, शौलावर देवाची कृपा झाली आणि तो हे ओळखू शकला की, त्याच्यासारखे धार्मिक वृत्तीचे लोक देवाविषयी आवेशी असतील परंतु सर्व वस्तूस्थिती माहीत नसल्यामुळे त्यांची धारणा चुकीची असू शकते. (रोमकर १०:२) शौलाने देवाच्या इच्छेविषयी आणि त्याच्या व्यवहारांविषयी अधिक जाणून घेतल्यावर त्याने स्वतःमध्ये बदल केला आणि येशू ख्रिस्ताच्या ज्या अनुयायांचा तो छळ करत असे त्यांच्यासोबत तोही उपासना करू लागला.—१ तीमथ्य १:१२-१६.
शेकडो धर्मांतून आपण कोणताही धर्म निवडू शकतो आणि आपण निवडलेला कोणताही धर्म देवाला मान्य असेल असे बायबल म्हणते का? प्रेषित पौलाला पुनरुत्थित येशू ख्रिस्ताकडून मिळालेल्या सूचना अगदी याच्या उलट आहेत. येशूने त्याला परराष्ट्रीयांकडे पाठवले, ह्यासाठी की, “त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून [त्याने] त्यांचे डोळे उघडावे.” (प्रेषितांची कृत्ये २६:१७, १८) स्पष्टतः, आपण कोणता धर्म निवडतो याने फरक पडतो. पौलाला ज्या लोकांकडे पाठवले गेले होते त्यांचा आपापला धर्म होता. पण ते ‘अंधारात’ होते. जर सर्व धर्म सार्वकालिक जीवन आणि देवाची कृपा मिळवण्याचे फक्त वेगवेगळे मार्ग असते तर येशूला आपल्या अनुयायांना शिष्य बनवण्याच्या कामासाठी नियुक्त करण्याची व प्रशिक्षण देण्याची काहीच गरज नव्हती.—मत्तय २८:१९, २०.
आपल्या प्रसिद्ध डोंगरावरील प्रवचनात येशू म्हणाला: “अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.” (मत्तय ७:१३, १४) बायबल स्पष्ट शब्दांत सांगते की, “विश्वास एकच” आहे. (इफिसकर ४:५) यावरून स्पष्ट होते की, “रुंद” मार्गावर असलेल्या पुष्कळ लोकांचा आपापला धर्म आहे. पण त्यांचा “विश्वास एकच” नाही. खऱ्या उपासनेचा एकच प्रकार असल्यामुळे, ज्यांना तो खरा विश्वास प्राप्त करण्याची इच्छा आहे त्यांना तो शोधून काढावा लागेल.
खऱ्या देवाचा शोध
मानवांकडून देवाची काय अपेक्षा आहे हे त्याने मानवांना अगदी सुरवातीपासूनच सांगितले आहे. (उत्पत्ति १:२८; २:१५-१७; ४:३-५) आज त्याच्या अपेक्षा बायबलमध्ये अगदी स्पष्ट शब्दांत नमूद केलेल्या आहेत. त्यामुळे स्वीकृत उपासना आणि अस्वीकृत उपासना यांच्यात आपल्याला फरक करता येतो. (मत्तय १५:३-९) काही लोक आपल्या आईवडिलांचाच धर्म पाळतात तर काहीजण ज्या धर्मात जास्त लोक आहेत तो धर्म स्वीकारतात. पण पुष्कळांच्या बाबतीत, ते जेथे जन्मतात तिथलाच धर्म पाळू लागतात. परंतु, तुम्ही काय करावे? आपल्या वाट्याला योगायोगाने जो धर्म आला असेल तो स्वीकारावा का? किंवा तुमच्यासाठी इतरांना निर्णय घेऊ द्यावा का?
धर्म निवडताना, शास्त्रवचनांचे नीट परीक्षण करून जाणतेपणाने निर्णय घेतला पाहिजे. पहिल्या शतकात, काही सुशिक्षित लोकांनी प्रेषित पौलाचे म्हणणे डोळे मिटून स्वीकारले नाही. ‘ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी त्यांनी शास्त्रात शोध केला.’ (प्रेषितांची कृत्ये १७:११; १ योहान ४:१) तुम्ही देखील असे करू शकता.
विश्वकर्ता देव, सत्याने त्याची उपासना करणाऱ्या लोकांना शोधतो असे त्याच्याविषयी वर्णन बायबलमध्ये केले आहे. योहान ४:२३, २४ मध्ये सांगितल्यानुसार, येशूने म्हटले: “खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करितील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” “देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण” हेच केवळ त्याला स्वीकारणीय आहे. (याकोब १:२७) जीवनाकडे जाणाऱ्या अरुंद मार्गाचा शोध घेणाऱ्या लाखो लोकांना देवाने आशीर्वादित केले आहे. जे उदासीन मनोवृत्ती दाखवतात त्यांना देव अनंतकाळचे जीवन देणार नाही तर जे त्याच्या अरुंद मार्गाचा मेहनतीने शोध घेऊन त्यावर चालतात त्यांनाच तो जीवन देणार आहे.—मलाखी ३:१८. (g०१ ६/८)