शोकांतिका युद्धाची
इंग्लंडच्या लंडन शहरातील इम्पिरियल वॉर म्युझियममध्ये एक आगळेवेगळे घड्याळ आणि संख्या मोजणारे यंत्र आहे. हे वेळ दाखवण्याचे घड्याळ नाही तर या शतकाचे प्रमुख वैशिष्ट्य अर्थात युद्धाचे प्रमाण दाखवणारे घड्याळ आहे. घड्याळातला काटा पुढे सरकतो तसतशी यंत्रातील संख्या प्रत्येक ३.३१ सेकंदांनी एका आकड्याने वाढते. प्रत्येक आकडा, २० व्या शतकात युद्धामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या एका पुरुषाला, स्त्रीला किंवा लहान मुलाला सूचित करतो.
ही गणना १९८९ साली जून महिन्यात सुरू झाली होती आणि १९९९ साली डिसेंबर ३१ च्या मध्यरात्री थांबेल. त्या वेळी, त्यामध्ये दहा कोटी इतकी संख्या नोंदली जाईल; गेल्या १०० वर्षांमध्ये युद्धात मृत्यूमुखी पडलेल्यांची ही माफक संख्या आहे.
दहा कोटी लोक म्हणजे जरा कल्पना करा! महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपेक्षा कितीतरी मोठी ही संख्या आहे. तरीही, त्या आकड्यावरून युद्धग्रस्त लोकांची काय दशा झाली, त्यांना किती हाल सोसावे लागले याची काहीच कल्पना येत नाही. किंवा मरण पावलेल्यांचे नातेवाईक—असंख्य माता, पिता, बहिणी, भाऊ, विधवा आणि अनाथ यांची काय मनःस्थिती झाली याचीही कल्पना येत नाही. मग तो आकडा काय दर्शवतो? हेच की, या शतकात युद्धांत झालेला विध्वंस, रक्तपात हा संपूर्ण मानवी इतिहासात सर्वात मोठा होता; अशी क्रूरता आधी कधीच घडली नव्हती.
विसाव्या शतकाचा इतिहास हे देखील प्रकट करतो की, ठार मारण्याच्या कलेत मानव किती पारंगत झाले आहेत. इतिहास पाहिला तर, २० व्या शतकापर्यंत नवीन हत्यारे बनवण्यात फारशी प्रगती झाली नव्हती, परंतु २० व्या शतकात मात्र हत्यारांना ऊत आला. १९१४ साली पहिले महायुद्ध सुरू झाले त्या वेळी युरोपचे सैनिक बरची घेऊन घोड्यावरून युद्ध लढत होते. पण आज, उपग्रह संवेदी आणि संगणकचलित निर्देशन यंत्रणा यांचा वापर केला जातो; त्यांच्या साहाय्याने अचूकपणे पृथ्वीचा कोणताही भाग क्षेपणास्त्रांद्वारे नष्ट करता येतो. दरम्यानच्या काळात, बंदुका, रणगाडे, पाणबुड्या, लढाऊ विमाने, जैविक आणि रासायनिक हत्यारे आणि “बॉम्ब” यांचा विकास होऊन ती अधिक हानीकारक आणि घातक बनवली गेली आहेत.
एकीकडे, युद्ध लढण्यात मानव इतके तरबेज झाले आहेत की युद्ध त्यांच्यासाठी जणू लहान मुलांचा खेळ आहे, परंतु हा खेळ आता सबंध मानवजातीला महागात पडण्याची शक्यता आहे. फ्रॅकेनस्टाईन नावाच्या एका कल्पकथेत, राक्षसाला निर्माण करणाऱ्यालाच तो राक्षस ठार मारायला उठतो त्याचप्रमाणे ज्यांनी युद्धांना इतके भयंकर रूप दिले आहे त्यांनाच हे युद्ध नेस्तनाबूत करायला उठले आहे. या राक्षसाला काबूत ठेवणे किंवा नष्ट करणे आता शक्य आहे का? पुढील लेखांमध्ये या प्रश्नावर परीक्षण केले आहे.
[३ पानांवरील चित्राचे श्रेय]
U.S. National Archives photo
U.S. Coast Guard photo
By Courtesy of the Imperial War Museum