वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ४/८ पृ. २२-२४
  • कोस्टारिकाचे रहस्यमय खडकाळ गोळे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कोस्टारिकाचे रहस्यमय खडकाळ गोळे
  • सावध राहा!—१९९९
सावध राहा!—१९९९
g99 ४/८ पृ. २२-२४

कोस्टारिकाचे रहस्यमय खडकाळ गोळे

कोस्टारिकातील सावध राहा! नियतकालिकेच्या बातमीदाराकडून

तब्बल १६ शतकांपूर्वी, कोस्टारिकाच्या नैर्ऋत्य भागातील रहिवासी विविध प्रकारचे भरीव खडकाळ गोळे तयार करायचे; यांपैकी काही दहा सेंटिमीटर इतक्या लहान व्यासाचे तर काही २.४ मीटर इतक्या मोठ्या व्यासाचे असायचे. त्यांची रचना इतकी चोख होती, की पाहिल्या पाहिल्या कोणीही विचारावं: ‘हे कसे काय बनवले असतील? कशासाठी बनवले असतील?’

चिली, मेक्सिको, अमेरिका आणि इतर अनेक देशांतही खडकाळ गोळे गवसले आहेत; पण, कोस्टारिकाचे ग्रॅनाईट (कणाश्‍म) गोळे मात्र काही अनोखेच. सर्वोत्कृष्ट दर्जाच्या या गोळ्यांपैकी काही गोळे चोख गोलाकार असून गुळगुळीत आहेत. हे गोळे सापडले गेले ते सहसा २० च्या किंवा त्याहून अधिकच्या समूहात. त्यांची एक खासियत अशी, की यांपैकी बरेचसे त्रिकोण, समकोण आणि सरळ रेषा अशा भूमितीय आकारांत आढळले असून त्यांचा रोख बहुधा पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर दिशेकडे आहे.

डीकीस नदीच्या मुख प्रदेशात असे अनेक गोळे गवसले आहेत. इतर काही पालमार सूर, ब्वेनास एअरीझ आणि गोल्फीटोच्या दक्षिणीय शहरांत तसेच उत्तरेकडे असलेल्या ग्वानाकास्टे प्रांतात आणि मध्य खोऱ्‍यात गवसले आहेत. या गोळ्यांसोबत सापडलेल्या इतर कलाकृतीच्या वस्तूंवरून हे गोळे नेमक्या कोणत्या काळातले होते हे सांगता येते. हे रहस्यमय खडक सा.यु. ४०० च्या काळातले असावेत असा पुराणवस्तूशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. सा.यु. ८०० ते सा.यु. १२०० च्या काळात सगळ्यात जास्त प्रमाणात हे खडक आढळले आहेत. काही घरांजवळ किंवा थडग्यांच्या अगदी जवळपास सापडले आहेत. या गोळ्यांमध्ये मौल्यवान खजिना सापडण्याच्या आशेने काळाच्या ओघात लोकांनी यांपैकी काही नष्ट केले. पण तरीही, कोस्टारिकाच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात सध्या अस्तित्वात असलेल्या सुमारे १३० खडकाळ गोळ्यांची सूची आहे. पण, या सूचीमध्ये समाविष्ट न केलेले आणखीनही पुष्कळसे खडकाळ गोळे आहेत. प्राचीन काळातल्या या खडकाळ गोळ्यांची प्रत्यक्ष मोजणी करणे कठीण आहे कारण यांपैकी पुष्कळसे त्यांच्या मूळ स्थानापासून हलवून उद्याने आणि चर्च यांसारख्या खासगी ठिकाणी शोभेच्या वस्तू म्हणून ठेवण्यात आले आहेत. याशिवाय, भूगर्भात किंवा दाट जंगलात आणखीन पुष्कळसे गोळे असतील जे अद्याप माणसाच्या हाती लागलेले नाहीत.

ते कसे काय बनवले जात? हेच तर मोठे रहस्य आहे. इतक्या चोखपणे, काटेकोरपणे बनविण्यासाठी नक्कीच काही यांत्रिकी प्रक्रियेचा उपयोग केला असावा. त्या काळातील अनेकानेक प्रतिमांवरून आपण म्हणू शकतो, की खडकाळ गोळे तयार करणारे लोक काही साधारण लोक नव्हते तर कसबी शिल्पकार होते. या शिवाय, सा.यु. ८०० च्या काळातील सोन्याच्या कलाकृतींवरूनही असे समजते, की हे शिल्पकार अतिशय उच्च तापमानात काम करायचे. हे गोळे खडकातून खोदून काढण्यासाठी उच्च तापमानाची आणि त्यानंतर खडकांचे बाह्‍य थर काढण्यासाठी शीतलिकरणाची गरज असावी असा एक सिद्धान्त आहे. आणि मग सँडपेपरच्या किंवा चामड्याच्या साह्‍याने या गोळ्यांना पॉलिश करून काम आटोपले जात असावे.

एक महिला वैज्ञानिक खुलासा करते, की बऱ्‍यापैकी मोठे गोळे “सगळ्यात कसबी शिल्पकारांचं काम असून [हे गोळे] इतके चोख असायचे की टेपने आणि ओळंब्याने त्यांच्या व्यासाचे मोजमाप घेतले जायचे तेव्हा त्यात काहीच खोट आढळत नसे.” यावरून गणिती क्षमतेची, शिल्प खोदण्याच्या प्रगतिशील ज्ञानाची तसेच तिथले मूळचे रहिवासी कोणती अवजारे वापरत याची ग्वाही मिळते. पण, या लोकांची कोणतीही लिपी नसल्यामुळे इतक्या अचुकतेने ते लोक हे गोळे कसे तयार करायचे याबद्दल कोणताही लिखित असा अहवाल उपलब्ध नाही.

यांपैकी बरेचसे गोळे ग्रॅनाएटसारख्या खडकापासून बनवलेले आहेत. ज्ञात असलेली सगळ्यात जवळची ग्रॅनाएट खाण डीकीस नदीच्या मुख प्रदेशापासून ४० ते ५० किलोमीटर दूर डोंगरावर होती. मग शिल्पकारांनी खडकांचे अवाढव्य ओंडके कसे काय हलवले असतील? गोळे खाणीतच खोदले असल्यास त्यांस डोंगरावरून खाली उतरवताना शिल्पकारांना बरीच काळजी घ्यावी लागली असेल. आधुनिक यंत्रांचा उपयोग न करता इतक्या दूर अंतरांवर अशा अवाढव्य वस्तू हलवण्याची कल्पना तुम्ही करू शकता का? या गोळ्यांचे नेमके वजन किती असेल? यांच्यापैकी काहीं, १६ टनहून अधिक वजनाचे आहेत!

खाणीतून गोळे खोदण्याआधी ग्रॅनाएट खडक हलवला गेल्यास २.४ मीटर व्यासाचा गोळा तयार करण्यासाठी लागणाऱ्‍या २.७ मीटर घनाचे वजन २४ टन असायचे! मग हे वाहून नेण्याकरता प्रशस्त, सपाट रस्ता तयार करण्यासाठी रहिवाशांना घनदाट जंगलातून मार्ग काढावा लागला असेल. निश्‍चित एक महाकठीण कामगिरी! इतर गोळे कोक्विनापासून बनवलेले होते; कोक्विना हा बराचसा चुनखडकासारखा असून तो डीकीस नदीच्या मुख प्रदेशाजवळील समुद्रकिनाऱ्‍यांवर आढळतो. यावरून सूचित होऊ शकते, की तो तराफ्यावरून ५० किलोमीटर नदीच्या उलट दिशेने नेण्यात आला असेल. प्रशांत महासागराच्या किनारपट्टीवरून २० किलोमीटर दूर असलेल्या कॅनो बेटावरही काही गोळे सापडले आहेत.

हे गोळे तयार करण्याचा नेमका हेतू काय हे कोणीही निश्‍चितपणे सांगू शकत नाही. ते एखाद्या जमातीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्‍याच्या हुद्द्‌याचे किंवा गावाच्या प्रतिष्ठेचे चिन्ह असावे. ते धर्माचे किंवा विधीचे द्योतक असल्याचीही शक्यता आहे. कदाचित, भविष्यात केव्हातरी पुराणवस्तुशास्त्र कोस्टारिकाच्या या खडकाळ गोळ्यांचे रहस्य उघड करू शकेल.

[२२, २३ पानांवरील नकाशा]

कोस्टारिका

[चित्राचे श्रेय]

Mountain High Maps® Copyright © 1997 Digital Wisdom, Inc.

[२३ पानांवरील चित्र]

गोळ्यामागे असलेल्या यंत्रावरून त्याचे वजन सूचित होते

[चित्राचे श्रेय]

कोस्टारिकाच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाच्या सौजन्याने

[२४ पानांवरील चित्र]

कोस्टारिकाच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाच्या आवारात असलेले गोळे

आजवर सापडलेला ८.५ फूट व्यासाचा सगळ्यात मोठा गोळा

[चित्राचे श्रेय]

कोस्टारिकाच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाच्या सौजन्याने

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा