रस्ते—मानवी समाजाच्या जीवन वाहिन्या
आदिम काळापासून वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना एकमेकांशी दळणवळण राखता यावे म्हणून माणसाने पायवाटा, रस्ते आणि महामार्ग यांचे जणू एक अतिविशाल जाळेच विणले आहे. यावरून मनुष्याला प्रवासाची आणि उद्योगधंद्याची किती हौस आहे हे दिसून येते; इतकेच नव्हे तर युद्धे लढण्याची आणि साम्राज्ये उभी करण्याची देखील किती हौस आहे हेही दिसून येते. होय, रस्ते मानवी स्वभावाची एक दुसरी बाजू अर्थात विद्रूप बाजू देखील स्पष्ट करतात.
माणसांनी आणि प्राण्यांनी एकाच मार्गावरून चालून जाऊन पहिलीवहिली पायवाट तयार केली असेल, तेव्हापासून आजच्या प्रशस्त मल्टीलेन एक्सप्रेसवेज पर्यंतचा प्रवास हा केवळ मानवी इतिहासाचे दर्शनच घडवत नाही तर रस्त्यांचा हा इतिहास मनुष्य स्वभावाचेही दर्शन घडवतो.
अगदी सुरवातीचे रस्ते
द न्यू एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका म्हणते: “पहिल्यांदा रस्ते बांधण्याचा ध्यास घेतला असावा तो मेसोपोटेमियातील लोकांनी.” हे लोक टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या जवळपासच्या प्रदेशांत राहात होते. सदर माहितीसूत्र पुढे असे म्हणते, की त्यांच्या मिरवणुकीचे रस्ते, “पक्के रस्ते असून त्यांकरता भाजलेल्या विटा आणि दगड बिट्युमेनयुक्त मिश्रणात बसविलेले होते.” हे वर्णन बायबलमध्ये प्राचीन काळी बांधकामात वापरल्या जाणाऱ्या सामग्रींची आठवण करून देते: “त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले.”—उत्पत्ति ११:३.
आपली धार्मिक कार्ये पार पाडण्यासाठी प्राचीन काळच्या इस्राएल लोकांना रस्त्यांची नितान्त गरज होती. येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्याच्या तब्बल १,५०० वर्षांपूर्वी इस्राएल लोकांना आज्ञा दिली होती: “तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे वर्षातून तीनदा . . . [एक आध्यात्मिक सोहळा साजरा करण्यासाठी] त्याच्यासमोर हजर रहावे.” (अनुवाद १६:१६) हे ठिकाण जेरुसलेममध्ये होते आणि या आनंदी सोहळ्यांना लोक सहपरिवारासह जात असत. याकरता साहजिकच उत्तम रस्त्यांची गरज होती.
यावरून स्पष्ट होते, की त्या काळातल्या प्रमुख रस्त्यांची अगदी उत्तम बांधणी केलेली होती. ख्रिस्ताचा जन्म झाला त्याच्या हजार वर्षांपूर्वी राज्य करणाऱ्या शलमोनाविषयी यहुदी इतिहासकार फ्लेवियस जोसिफस म्हणतो: “त्याने रस्त्यांच्या निगराणीकडे दुर्लक्ष केले नाही; उलट जेरुसलेमला जाणाऱ्या मार्गावर त्याने काळ्या मजबूत दगडांचा हमरस्ता बांधला.”
तसेच, इस्राएलमध्ये चुकून मनुष्यवध करणाऱ्या मनुष्याला आश्रय देण्यासाठी सहा शरणपुरे होती. या शहरांकडे जाणारे रस्ते देखील उत्तम स्थितीत ठेवलेले होते. यहुदी परंपरेवरून आपल्याला हे माहीत होते, की सगळ्यात जवळच्या शरणपुराची दिशा दाखवणारे फलक, रस्ते एकमेकांना छेद देतात त्या प्रत्येक ठिकाणी लावलेले होते.—गणना ३५:६, ११-३४.
याशिवाय, व्यापाराचा विस्तार वाढू लागला तसतसे रस्त्यांचे महत्त्व आणखीन वाढू लागले आणि त्याकाळी सर्वात जास्त मागणी ज्या वस्तूला होती ती म्हणजे रेशीम. असे म्हटले जाते, की इस्राएल लोक एक राष्ट्र म्हणून जगासमोर आले त्याच्या फार पूर्वी, रेशीम किड्याने विणलेल्या धाग्यातून चिनी लोकांनी रेशीम तयार करण्याची कला आत्मसात केली; पण, येशूचा जन्म झाल्यानंतरही काही काळ त्यांनी आपला हा शोध आपल्यापुरताच ठेवला होता. परंतु तोपर्यंत, पाश्चिमात्य देशांत रेशीम बरेच लोकप्रिय झाले होते; इतके, की रस्त्यांचा इतिहास (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते त्यानुसार, रेशमीवस्त्र “मुळात स्त्रियांकरता असतात असा सर्वसामान्य समज असल्यामुळे पुरुषांनी त्यांचा उपयोग करू नये” या आशयाचे शेवटी कायदे काढावे लागले.
ज्या मार्गाने चीनमधून रेशीम इतर ठिकाणी नेले जायचे त्या मार्गाला रेशीम मार्ग म्हटले जात असे. सा.यु. १३ व्या शतकात मार्को पोलो याच मार्गाने चीनला आला; पण त्याहीआधी १,४०० वर्षे हा रस्ता अस्तित्वात होता. दोन हजारपेक्षा अधिक वर्षांपर्यंत रेशीम मार्ग हा जगातला सगळ्यात लांब रस्ता असल्याची ख्याती होती. रेशीमच्या माहेर घरापासून अर्थात चीनमधील शांघाय येथून सुरू होणारा आणि स्पेनमधील गेदीझ (आताचे कादिझ) येथे संपणारा हा रस्ता सुमारे १२,८०० किलोमीटर लांब होता.
लष्करासाठी महत्त्वपूर्ण
रस्ताबांधणीच्या कामाला सगळ्यात मोठा वेग आला तो साम्राज्याच्या हव्यासामुळे. उदाहरणार्थ, सीजर्सच्या राज्यात, रोमी साम्राज्यातील रस्ते युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्व येथपर्यंत म्हणजे एकंदर ८०,००० किलोमीटरपर्यंत पसरली आहे. शांतीच्या काळात कधीकधी रोमी सैनिकांना रस्ताबांधणीच्या आणि रस्ता दुरुस्तीच्या कामाला लावले जायचे.
लढायांसाठी, रस्ते किती महत्त्वपूर्ण आहेत याकरता अलीकडील काळातलेही उदाहरण देता येईल. इतर लोकांवर सत्ता गाजवणे हा ॲडॉल्फ हिटलरचा ध्यास होता; आणि १९३४ साली त्याने सुरू केलेल्या प्रकल्पामुळे अर्थात ऑटोबानच्या (जर्मन महामार्गाच्या) बांधणीमुळे त्याचा हा ध्यास पुष्कळशा प्रमाणात पूर्ण झाला. इतिहासकार हिंडलेच्या मते या प्रकल्पामुळे जर्मनीला “जगातील महामार्गाचे सगळ्यात पहिले जाळे” हा बहुमान मिळाला.
रस्ताबांधणी—एक शास्त्र
ग्रोमा नावाचे उपकरण वापरून रोमी सर्वेक्षकांनी रस्त्यांची अशी आखणी केली होती, की ते धनुष्यातून सोडलेल्या बाणाइतके सरळ असत. मैलाचे अतिशय कलात्मक दगड विंधण्याचे काम गवंडी करायचे तर रस्त्यांवरून किती माल वाहून नेला जाऊ शकतो हे इंजिनिअर्स ठरवायचे. हे रस्ते मजबूत पायांवर बांधलेले होते आणि त्यांचा पृष्ठभाग टिकाऊ होता. पण, या रस्त्यांच्या टिकाऊपणाचे एक प्रमुख कारण म्हणजे येथे पाणी वाहून नेण्याची अतिशय कल्पक व्यवस्था करण्यात आली होती; रस्त्यांना किंचित उंचवटा दिल्यामुळे शिवाय रस्ते सभोवतालच्या ग्रामीण भागाहून उंचावर असल्यामुळे ही व्यवस्था आणखीनच उत्तम ठरली. यावरूनच “हायवे” हा शब्द तयार करण्यात आला. त्यानंतर बाजारात रस्त्यांचे नकाशे देखील विकले जाऊ लागले.
एक इतिहासकार असे म्हणतो की, “उत्तम रस्ते बांधणारे म्हणून रोमन लोकांना इतकी ख्याती मिळाली होती, की रस्ते बांधण्यात ते किती प्रगत होते याचे वर्णन करण्यासाठी एखाद्या लेखकाला शब्दच सापडणार नाहीत कारण या इतिहासातले दुसरे कोणतेही बांधकाम इटलीच्या रस्त्यांइतके टिकाऊ आणि लोकोपयोगी ठरले नसेल याबाबतीत शंकाच आहे.”
रस्त्यांचा इतिहास या पुस्तकानुसार रोमपासून धावणारा ॲपीयन रस्ता, “पाश्चिमात्य इतिहासातला सर्वात पहिला फरसबंदी रस्ता” आहे. हा प्रसिद्ध हमरस्ता सरासरी ६ मीटर रुंद होता आणि मोठमोठ्या ज्वालामुखी दगडांनी चिरेबंद केलेला होता. प्रेषित पौलाला एक कैदी म्हणून रोमला नेले गेले तेव्हा याच रस्त्याने त्याने प्रवास केला; या रस्त्याचा काही भाग अद्यापही वापरात आहे.—प्रेषितांची कृत्ये २८:१५, १६.
दक्षिण अमेरिकन इंडियन लोकांची रस्ताबांधणी कौशल्ये देखील अनेकांना तितकीच विस्मयकारक वाटतील. सा.यु. १२०० पासून १५०० पर्यंत इंकांनी १६,००० किलोमीटर रस्त्यांचे जाळे तयार केले आणि त्यामुळे जवळजवळ १,००,००,००० लोकांचे एक राष्ट्र संयुक्त झाले. हे रस्ते कल्पना करता येणार नाही इतक्या ओसाड, डोंगराळ प्रदेशातून, वाळवंटातून आणि वर्षावनातून तसेच महान पेरूवियन अँडिजमधून धावतात!
अशाच एका रस्त्याविषयी द न्यू एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका अहवाल देते: “अँडिज रस्ता अतिशय विलक्षण होता. त्याची रुंदी ७.५ मीटर होती. अतिशय उंच पर्वतरांगांतून धावणारा आणि चढायला सोपे जावे अशारितीने बांधलेला हा घाटाचा रस्ता ७.५ मीटर रुंद होता. यात खडकांतून जाणारे रस्ते होते तसेच रस्त्याला आधार देण्यासाठी शेकडो मीटरपर्यंत आधार-भिंती बांधलेल्या होत्या. घळ्या व भेगा चिरेबंदी बांधकामाने भरून काढलेल्या होत्या आणि पर्वतातील रुंद ओढ्यांवर लोकरीचे किंवा इतर तंतूपासून तयार केलेल्या दोरांचे पूल होते. रस्त्याचा पृष्ठभाग बहुतेक ठिकाणी दगडी असून अस्फाल्टयुक्त द्रव्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केलेला होता.”
घोडा काय प्रकार आहे हे इंकांना माहीत नव्हते; पण रस्त्यांच्या जाळ्यांमुळे “राजाच्या संदेशवाहकांना उत्तम धावपट्टी” लाभली. एका इतिहासकाराने म्हटले: “सबंध रस्त्यावर ठिकठिकाणी या संदेशवाहकांना थांबण्याची ठिकाणे होती; यांमध्ये सुमारे २ किलोमीटरचे अंतर असून त्या प्रत्येकात एक लहानशी छावणी आणि बदलीचे पेशेवाईक धावपट्टू असत. लवकरात लवकर संदेश पोहंचवता यावा म्हणून या थांबण्याच्या ठिकाणांमध्ये कमीतकमी अंतर असायचे; शिवाय, हे थांबे चोवीस तास चालू असल्यामुळे कूस्कोमधील राजधानीतून २००० किलोमीटरवर असलेल्या क्विटो शहरात अवघ्या पाच दिवसांत संदेश पोहंचवता येत असे. दुसऱ्या शब्दात हे संदेशवाहक, समुद्रतळापासून कमीतकमी ४,००० मीटर उंचीवर असलेल्या रस्त्यावर ताशी सरासरी १५ किलोमीटरच्या वेगाने धावत असत; रोमनच्या इंपिरियल पोस्टने देखील इतक्या जलदगतीने कधी कार्य केले नसेल!”
दुर्घटनांना कारणीभूत
मानवी शरीरातील वाहिन्या ब्लॉक झाल्यास प्राणघातक परिणाम उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे, आज आपल्या जीवनाचा दर्जा सुधारण्यात हातभार लावलेले रस्तेच ब्लॉक झाले तर आपल्या जीवनाचा दर्जा घसरू शकतो. वर्षावने, अरण्ये, झाडेझुडपे आणि राष्ट्रीय उद्यानांतून धावणाऱ्या रस्त्यांनी मोठ्या प्रमाणात वन्यजीवनाचे नुकसान केले आहे. आणि पुष्कळदा, त्या त्या प्रदेशातील आदिवासी लोकांचे आणि अरण्यांतील त्यांच्या निवासस्थानांचे नुकसान होते. आपण रस्ते कसे बांधतो (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “प्रगतीच्या नावाखाली बांधण्यात आलेल्या ट्रान्स-ॲमेझॉन हमरस्त्याने वर्षावनांचा बराचसा भाग उद्धवस्त केला, शिवाय अरण्यांत राहणाऱ्या बऱ्याच लोकांचे जीवनक्रम उद्धवस्त करून त्यांच्यावर संकट ओढवले आहे.”
शहरी रस्त्यांवर दर वर्षी वाढतच चाललेल्या वाहनांच्या दाटीमुळे शहरांवर देखील दुष्परिणाम होत आहे. पुढेमागे, निधी उपलब्ध झाला तर कुठे एखादा महामार्ग बांधला जातो. पण, भविष्यात अशा या महामार्गांवर आणखी रहदारी वाढण्याला प्रोत्साहन मिळते आणि पर्यायाने आज लाखो लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारे आणि त्यांना मृत्यूमुखी पाडणारे प्रदूषणही वाढत आहे. इतकेच नाही तर दर वर्षी जगभरात सुमारे ५,००,००० लोक रस्त्यांवरील अपघातात ठार होतात तर आणखीन एक कोटी पन्नास लाख लोक जखमी होतात; यांच्यापैकी काही तर अगदी गंभीरपणे जखमी होतात. तुलना केल्यास, पहिल्या महायुद्धाने सुमारे ९० लाख लोकांचे जीव घेतले. युद्ध थांबले. पण, रस्त्यांवरील मृत्यूनाट्य अखंड सुरू आहे कारण आज १,००० पेक्षा अधिक लोक दररोज रस्त्यात ठार होतात!
होय, अनेक मार्गानी आपले रस्ते मनुष्याबद्दल बरेच काही सांगतात, त्याच्या सद्गुणांबद्दल आणि त्याच्या अवगुणांबद्दलही ते ग्वाही देतात. शिवाय, आपल्या स्वाधीन केलेल्या या सर्वांगसुंदर पृथ्वीग्रहाविषयी आपल्याला किती कदर आहे याची देखील ते मूक साक्ष देतात.
[२५ पानांवरील चित्र]
पौलाने ज्या ॲपीयन मार्गाने प्रवास केला होता तो अद्यापही वापरात आहे
[२६ पानांवरील चित्र]
दर वर्षी जगभरात सुमारे ५,००,००० लोक रस्त्यांवरील अपघातात दगावतात