जगावरील दृष्टिक्षेप
पाणी टंचाई
“यासाठी आताच काही ठोस पाऊल उचलले नाही तर २०२५ वर्ष उजाडण्याआधी जगातल्या २/३ लोकांचे पाणी टंचाईमुळे हालहाल होतील” असे लेक्सप्रेस नावाचे फ्रेंच नियतकालिक म्हणते. ली फीगारो वृत्तपत्र म्हणते: “आज जगातल्या १/४ लोकांना पिण्याचे पाणी सहजासहजी मिळत नाही.” पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने मार्च १९९८ साली पॅरिसमध्ये एक अंतरराष्ट्रीय परिषद भरविली होती. यात ८४ राष्ट्रांचे २०० प्रतिनिधी तसेच फ्रान्सचे राष्ट्रपती देखील उपस्थित होते; या परिषदेत, जगातल्या पाणीपुरवठ्याची बचत कशी करता येईल यावर चर्चा करण्यात आली. बरेचदा अकार्यक्षम कृषी जलसिंचन पद्धतींमुळे आणि पाण्याच्या गळक्या पाईप्समुळे पाणी वाया जाते ही एक समस्या त्यात ठळकपणे मांडली होती. फ्रेंच राष्ट्रपती झाक शीराक यांनी ठासून सांगितले की पाणी, मानवजातीची सामुदायिक संपत्ती आहे आणि त्यामुळे जागतिक पातळीवर त्याचे नियंत्रण करण्याची गरज आहे.
मुलांना महागडी चैनचंगळ नको असते
आपल्या मुलांच्या नजरेत तुम्ही एक आदर्श आई कसे बनू शकता? ६ ते १७ वर्ष वयोगटातील १,००० अमेरिकन मुलांवर घेतलेल्या व्हर्लपूल फाऊंडेशन संस्थेच्या एका सर्वेक्षणात दिसून आले, की बऱ्याचशा मुलांना आपल्या आईसोबत अगदी साध्या, दररोजच्या गोष्टी करायला आवडतात, त्यांना फक्त “आई जवळ हवी असते.” “संध्याकाळी आईसोबत बसून जेवणे,” ही मुलांची पहिली सगळ्यात आवडती गोष्ट. दुसरी म्हणजे, “एकत्र मिळून बाहेर जेवायला जाणे” किंवा “एकत्र मिळून शॉपिंगला जाणे,” तर “एकत्र बसून गप्पागोष्टी करणे” ही त्यांची तिसरी सगळ्यात आवडती गोष्ट. आईचे आभार कसे मानाल हे विचारले तेव्हाही त्यांची उत्तरे अगदी साधीसोपी होती. सत्तर टक्के मुले म्हणाली की आईचे आभार मानायचे असतात तेव्हा “आईच्या कुशीत जाऊन तिचे चुंबन घ्यायला आवडेल.” आईचे आभार मानण्याची त्यांची दुसरी आवडती पद्धत म्हणजे “मला तू फार आवडतेस” आणि “थँक्यू” असे आईला सांगणे.
आता गायींना देखील सुखसोयी
कॅनडाचे द ग्लोब ॲण्ड मेल वृत्तपत्र म्हणते की, आजकाल डेअरी फार्म्सवर, जुन्या टायर्सचे तुकडे भरलेल्या गाद्या दिसू लागल्या आहेत. ५ सेंटिमीटर जाडीच्या या गाद्यांमुळे गायी अधिक काळापर्यंत चांगले दूध देऊ शकतात असे म्हणतात. “तास न् तास काँक्रीटवर उभ्या राहिल्यामुळे गायींच्या तळपायांत वेदना होतात आणि त्यांच्या पायांना दुखापती होतात,” असे अहवालावरून समजते. त्यामुळे अशा गाद्यांमुळे त्यांच्या पायांसंबंधित समस्या तर दूर होतातच शिवाय विश्रांती घेण्यासाठी गायी खाली बसतात तेव्हा त्यांच्या गुडघ्यांना दुखापत होत नाही. या गाद्या तयार करणारा उत्पादक म्हणतो, की कुरणातल्या गवताच्या गादीवर बसल्यावर गायींना जसे मजेशीर वाटते तसे या गाद्यांवर बसल्यावर वाटावे हा या मागचा उद्देश.
स्पॅनिश मुलांवर होणारा टीव्हीचा परिणाम
युरोप प्रेस असा अहवाल देते, की संयुक्त राष्ट्र बाल निधी स्पॅनिश समितीचे कारलोस ब्रू यांच्या मते, साधारण प्रमाणात टीव्ही पाहणाऱ्या स्पॅनिश मूलाने वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत १०,००० खून प्रकरणे आणि १,००,००० गुंडगिरीची कृत्ये पाहिलेली असतात. याशिवाय, प्राध्यापक ल्यूइस मीगेल मार्टीनीस यांनी म्हटले, की ४ ते १२ वर्षे वयोगटांतली ३/४ स्पॅनिश मुले दररोज कमीतकमी दोनअडीच तास टीव्ही पाहतात तर जवळजवळ १/४ मुले दररोज चक्क चारपाच तास टीव्ही पाहतात. अहवालानुसार, ‘मुले दरवर्षी शाळेत ९०० तास घालवत असली तर टीव्हीसमोर ती सरासरी ९३७ तास घालवत असतात.’ कोमप्ल्यूटेनशियन विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ इंफर्मेशन सायंसेसचे रीकार्डो पारासेथनार यांच्या मते, “टीव्हीवर दाखवला जाणारा हिंसाचार हा आज समाजातील हिंसाचारास खतपाणी घालू शकणाऱ्या अनेक घटकांपैकीच एक आहे.”
स्त्रियांमधील हृदयरोग
सन १९६० च्या दशकापर्यंत हृदयरोग हा सहसा पुरुषांमध्ये आढळायचा, असा वेझा नियतकालिक अहवाल देते. पण मग नोकरी करण्यासाठी स्त्रिया बाहेर पडू लागल्या तेव्हापासून हे चित्र बदलू लागले. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांना देखील कामाच्या ठिकाणी होणारा “तणाव, धूम्रपान आणि फास्ट फूड्स” यांच्या संपर्कात आल्यापासून हृदयरोग झालेल्या स्त्रियांची संख्या वाढू लागली. सदर नियतकालिकानुसार काहींचे असे म्हणणे आहे, की स्त्रियांमध्ये जे होर्मोन्स असतात त्यांमुळे हृदय रोहिणीसंबंधित समस्यांपासून त्यांचे बरेच संरक्षण होते; पण, “वयाच्या ३५ व्या वर्षापासून पुढे होर्मोनमुळे लाभणारे हे संरक्षण घटत जाते आणि त्यांमुळे स्त्रियांना देखील आज पुरुषांइतकाच हृदयरोगांचा धोका आहे,” असे सदर नियतकालिक म्हणते. सन १९९५ मध्ये, स्तनाच्या कर्करोगामुळे आणि गर्भाशयाच्या कर्करोगामुळे जितक्या ब्राझीलियन स्त्रिया दगावल्या त्याच्या दुप्पट हार्ट ॲटॅकमुळे दगावल्या.
बोलिव्हियातील विस्कटलेली कुटुंबे
बोलिव्हियन टाईम्स अहवाल देते, की आज ७० टक्क्यांहून अधिक बोलिव्हियन लोक दारिद्र्यावस्थेत जगत आहेत. त्यामुळे अनेक मुले, “आपल्या विस्कटलेल्या कुटुंबातून बाहेर पडतात आणि रस्त्यावरील अधिक क्रूर वातावरणात येऊन पडतात.” या ठिकाणी मग ते कोकेन तसेच पेंट थिन्नर आणि डिंकासारखे ड्रग्स सेवन करू लागतात. अंदाजानुसार, बोलिव्हियात ८८ टक्के ड्रग्स, ५ ते २४ वर्षे वयोगटांतील मुलेमुली घेतात. यामुळे मागील १५ वर्षांच्या काळात ड्रगचा अवैध वापर १५० टक्क्यांनी वाढला आहे. टाईम्स वृत्तपत्रानुसार, “अनेकांच्या मते मोडकळीस आलेली पारंपरिक कुटुंब व्यवस्था या वाढीचे मुख्य कारण आहे.”
म्युझिकचा खरेदीवर असर
इंग्लंडच्या लेस्टर विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञांच्या एक संघाच्या लक्षात आले, की वाईन विकत घेण्यासाठी आलेल्या गिऱ्हाईकांच्या आवडीनिवडींत बॅकग्राऊंड म्युझिकमुळे बराच फरक पडतो. नॅशनल जिओग्रफिक नियतकालिक म्हणते, “जेव्हा फ्रेंच अकॉर्डियन म्युझिक लावले गेले तेव्हा जर्मन वाईनच्या एका बाटलीमागे फ्रेंच वाईनच्या चक्क पाच बाटल्या खपल्या. पण, जर्मन बियर-हॉल म्युझिक लावले गेले तेव्हा फ्रेंच वाईनच्या एका बाटलीमागे लोकांनी जर्मन वाईनच्या दोन बाटल्या विकत घेतल्या.” गंमत म्हणजे, “आपल्या या आवडीनिवडीत म्युझिकचा इतका मोठा हात आहे” हे फारच कमी लोकांच्या लक्षात आले, असे एक संशोधक म्हणतो.
स्वयंपाक करताना कोणती दक्षता घ्याल?
सन १९९० ते १९९४ च्या काळादरम्यान मॅसॅचूसेट्स जनरल हॉस्पिटलच्या सम्नर रेडस्टोन बर्न सेंटरमध्ये भाजल्यामुळे दाखल झालेल्या स्त्रियांपैकी बहुतेक स्त्रिया, स्वंयपाक करताना कपड्यांनी पेट घेतल्यामुळे मरण पावल्या होत्या, असे टफ्ट्स युनिव्हर्सिटी हेल्थ ॲण्ड न्युट्रिशन लेटर म्हणते. बऱ्याच प्रकरणांतील स्त्रिया साठीतल्या किंवा त्याहून वृद्ध असून काही घेण्यासाठी हात लांब करताना पेटलेल्या स्टोव्हवर त्यांच्या सैल बाह्या आल्यामुळे त्या जळाल्या होत्या. स्वयंपाक करताना अशा दुर्घटना टाळण्यासाठी पुढील गोष्टी सुचवलेल्या आहेत. स्वयंपाक करताना (१) सैल कपडे घालू नका, (२) काही वस्तू घेण्यासाठी हात लांब करताना कपड्यांनी पेट घेऊ नये म्हणून स्टोव्हच्या पुढच्या बर्नरचा उपयोग करा आणि (३) पटकन पेट घेणार नाहीत असेच कपडे सहसा घाला.
याला म्हणतात का प्रेम?
“तरुण मुलांच्या मते, प्रेम म्हणचे शरीरसंबंध ठेवायला तयार होणे. आणि त्यामुळे तरुण मुलींनी सेक्सला नकार दिला तर त्यांना मारझोडही होऊ शकते,” असा दक्षिण आफ्रिकाचे विटनेस इखो वृत्तपत्र अहवाल देते. केप टाऊनमधील युवकांवर केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले की, “अशा नातेसंबंधांमध्ये पुरुष हुकूमशाह असतो आणि शरीरसंबंध राखण्यास मुलींना जबरदस्ती करण्यासाठी ते हिंसेचा मार्ग पत्करतात.” एका अभ्यासातून दिसून आले, की ६० टक्के मुलींना, त्या केवळ इतर पुरुषांशी बोलल्या म्हणून त्यांच्या सोबत्यांकडून मारझोड करण्यात आली. अहवाल म्हणतो, की “मारझोड करणं इतके सर्रास झालं आहे, की अनेक मुलींना आता असं वाटतं की ते प्रेमाचंच चिन्ह आहे.”