अनंत जाहिरातींच्या चक्रव्यूहात. . .
“पप्पा चांदोबा कशाची जाहिरात करतो?” एका चिमुकलीने विचारलेला हा विलक्षण प्रश्न कार्ल सॅन्डबर्ग यांनी आपल्या कवितेत सुमारे ५० वर्षांआधी मांडला होता. भविष्यात मात्र, हा प्रश्न इतका काही विचित्र वाटणार नाही. न्यू सायंटिस्ट पत्रिकेनुसार, लंडन येथील दोन जाहिरात एक्झेकिटिव्ह, परावर्तित सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागावर जाहिराती उमटवण्याच्या योजनेवर काम करत आहेत.
चंद्र आणि जाहिरातीचा फलक? काय अफलातून कल्पना! जगातल्या सर्वांनाच पाहता येईल, कोणालाच ती जाहिरात बंद करता येणार नाही, खाली ठेवून देता येणार नाही, कचऱ्यात फेकून देता येणार नाही किंवा रिमोट कंट्रोलने आवाज घालवता येणार नाही अशा एखाद्या जाहिरातीची कल्पना करा! कदाचित ही कल्पना तुम्हाला चक्रावून सोडणार नाही, पण इतरांना स्वप्नच वास्तविकतेत उतरल्यासारखे वाटेल.
जाहिरातींनी अद्याप चंद्राला गाठले नसले, तरी त्यांनी पृथ्वीला पुरते व्यापून टाकले आहे. बहुतेक अमेरिकन पत्रिकांमधील आणि वृत्तपत्रांमधील ६० टक्के पाने जाहिरातींसाठी राखून ठेवलेली असतात. रविवारच्या द न्यूयॉर्क टाईम्स अंकातच, ३५० पाने फक्त जाहिरातींचीच असतात. काही रेडिओ केंद्रांमध्ये, प्रत्येक तासामधील ४० मिनिटे जाहिरातींना दिली जातात.
मग टीव्ही सुद्धा आहेच. एका अंदाजानुसार, अमेरिकन युवक प्रत्येक आठवड्यातील तीन तास टीव्हीच्या जाहिराती पाहण्यात घालवतात. त्यांचे माध्यामिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत, त्यांनी टीव्हीवरच्या ३,६०,००० जाहिराती पाहिलेल्या असतात. टीव्हीवरून विमानतळांवर, हॉस्पिटलच्या प्रतिक्षालयांमध्ये आणि शाळांमध्ये जाहिराती दाखवल्या जातात.
क्रिडेचे मोठमोठाले कार्यक्रम आजकाल जाहिरातींचेच प्रमुख कार्यक्रम होऊन बसले आहेत. शर्यतीच्या मोटारी जणू वेगवान जाहिरात फलकच बनल्या आहेत. काही खेळाडूंची बहुतेक कमाई जाहिरातदारांकडूनच होत असते. एका सुप्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडूने बॉल खेळून ३०.९ लाख डॉलर कमावले. तर आपल्या उत्पादनांची जाहिरात केल्याबद्दल जाहिरातदारांनी त्याला त्यापेक्षा नऊ पटीने जास्त पैसे दिले.
सगळीकडे नुसत्या जाहिरातीच जाहिराती दिसतात. भिंतींवर, बसमध्ये आणि ट्रक्समध्ये सुद्धा जाहिराती पाहायला मिळतात. टॅक्सी आणि ट्रेनच्या आतही जाहिरातींचीच सजावट असते असे म्हणायला काही हरकत नाही—अगदी सार्वजनिक मुतारींचे दरवाजेही सोडले जात नाहीत. सुपरमार्केट, मोठाली दुकाने, लिफ्ट येथेही लाऊडस्पीकरवरून जाहिराती दिल्या जातात—इतकेच काय तर, फोन होल्ड केलेला असतानाही जाहिराती ऐकवल्या जातात. काही देशांमध्ये, पोस्टाद्वारे इतकी जाहिरातबाजी चालते की, काहीजण टपाल पेटीतून टपाल काढल्यावर फालतू टपाल फेकायला सरळ कचऱ्याच्या पेटीकडे वळतात.
मकॅन एरीक्सन नावाच्या एका जागतिक जाहिरात एजन्सीने प्रकाशित केलेल्या इन्सायडर्स रिपोर्टनुसार, १९९० साली जगभरात जाहिरातींवर अंदाजे ११,०२० अब्ज रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर, १९९७ साली तर १६,४६४ अब्ज रुपये खर्च केले आणि १९९८ सालासाठी १७,३७६ अब्ज रुपये खर्च होतील असा अंदाज बांधला आहे. केवढा अमाप पैसा!
या सगळ्याचा परिणाम? एका महिला विश्लेषकाने अशा शब्दांत वर्णन केले: “संस्कृतीला आकार देणाऱ्या सर्वात प्रभावशाली शक्तींपैकी जाहिराती एक आहेत. . . . जाहिराती फक्त उत्पादनांचीच विक्री करत नाहीत. त्या प्रतिमा, मूल्ये, ध्येये, आपण कोण आहोत आणि कोण असावे अशा संकल्पना सुद्धा लोकांना स्वीकारायला लावतात . . . त्या आपल्या मनोवृत्तींना आकार देतात आणि आपल्या मनोवृत्ती आपल्या वागणुकीला.”
जाहिरातींचा पिच्छा सोडवता येत नसल्याने, जाहिरातबाजींचे कार्य कसे चालते आणि तुमच्यावर त्यांचा कसा प्रभाव होऊ शकतो ते आपण पाहू या.