जंगलातली जांभई
कोणी सर्वांदेखत जांभई देते तेव्हा त्याला शिष्टाचार नाहीत असे लोक समजतील—किंवा त्याला कंटाळा आलाय असे तरी म्हणतील. शिष्टाराचे नियम असले, तरीसुद्धा जांभया देण्याचा फायदाच होतो. जांभई देणे हे अनैच्छिक अंतःश्वसन आहे. दिवसभराच्या कामाने थकून गेल्यावर किंवा सकाळी झोपेतून उठल्यावर आपण सहसा जांभई देतो. जोराच्या जांभईने शरीराला अधिक ऑक्सीजन पुरवले जाऊन आपल्याला तात्पुरता तजेला प्राप्त होतो; बहुधा हा जागे होण्याच्या क्रियेतला भाग असतो.
पण प्राणी सुद्धा जांभई देतात हे तुम्हाला ठाऊक होते का? अर्थात ते नेहमीच ऑक्सीजन घेण्यासाठी असे करत नसतात. त्यांचे जांभई देण्याचे कारण अतिशय मनोरंजक आहे. उदाहरणार्थ, माकडे, एखादा संदेश देण्यासाठी जांभई देतात. तोंड उघडून दात दाखवण्याचा तो भयानक प्रकार प्रतिस्पर्धी नर माकडाला किंवा संभवनीय परभक्ष्याला इशारा देण्याची पद्धत असते. संदेश असा की: ‘माझा चावा भयानक आहे. दूरच राहा!’
आफ्रिकन अरण्यातली परभक्षी मांजरे देखील शिकारीला जाण्यापूर्वी पाय ताणून जांभई देतात असे निरीक्षण केले आहे. मानवांप्रमाणेच मांजरांची जांभई देखील क्रियावैज्ञानिक कार्य साधते—फुफ्फुसांमध्ये अधिक हवा भरण्याचे कार्य. यामुळे रक्तातल्या ऑक्सीजनचे प्रमाण वाढते. मग हृदय विविध भागांना हे ऑक्सीजन लागलीच पुरवते आणि त्यामुळे भरधाव वेगाच्या लहान पाठलागांकरता तत्काळ शक्ती मिळते.
एवढेच काय तर, माशांनादेखील जांभई देताना पाहिले आहे! प्राणी जगताच्या आत (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते, मासे कधीकधी “वेगाने जाण्याआधी जांभई देतात. . . . मासा उत्तेजित होतो किंवा त्याला शत्रू दिसतो अथवा अन्न दिसते तेव्हा देखील तो जांभई देतो; तत्काळ क्रिया करायची असते त्या प्रत्येक वेळी जांभई दिली जाते.”
कदाचित सर्वात प्रभावशाली जांभई ही पाणघोड्याची किंवा बेहेमोथची असते. हा बोजड प्राणी आपल्या तोंडाची गुहा चक्क १५० डिग्रींपर्यंत फाकू शकतो. या जांभईने एखादा म्हातारा नर पाणघोडा सरोवरातल्या सर्वांना म्होरक्या कोण आहे ते दाखवून देतो. त्याच्या नदीच्या क्षेत्रात अतिक्रमण करण्याचे धाडस करणाऱ्या कोणालाही अशाप्रकारे दात दाखवून इशाराही दिला जातो.
जांभईने सिंहाच्या डरकाळीसारखा परिणाम होत नसला, तरी त्याचा काही न काही उपयोग असतोच—मग ती झोपेची जांभई असो, धमकावणारी असो किंवा साधीसुधी तजेला देणारी जांभई असो. प्राणी राज्याच्या रचनाकाराच्या आश्चर्यजनक सर्जनशीलतेचे हे केवळ आणखी एक उदाहरण आहे!