ही त्यांची करमणूक
आखाड्यात सर्वत्र खळबळ माजली होती. लाखो लोक प्राचीन रोममधील एका रोमहर्षक खेळासाठी जमले होते. हा आखाडा झेंडे, गुलाब आणि रंगीबेरंगी पडद्यांनी सजलेला होता. पाण्याच्या फवाऱ्यांमधून सुगंधी पाणी फवारलं जात होतं आणि हवेत सुगंध दरवळत होता. धनवान लोक शोभिवंत पेहराव करून आले होते. या जमावाच्या गोंधळात अधूनमधून हशा पिकत होता, पण यांचं हे हास्य पुढे घडणाऱ्या अतिरंजकतेचा उलटाच भास देत होतं.
इतक्यात, ट्यूबाय वाद्यांच्या अभद्र निनादानं दोन योद्धे सामोरे आले. हे स्पर्धक जंगली क्रूरतेनं एकमेकांवर वार करू लागले तेव्हा जमाव उन्मत्त झाला. प्रेक्षकांच्या आरडाओरड्यात तलवारांची घणघण कुठल्या कुठे गायब झाली होती. तेवढ्यात, एकाच झटक्यात एका स्पर्धकानं त्याच्या प्रतिस्पर्ध्याला चीत केलं. या जमीनदोस्त योद्ध्याचा प्राण आता प्रेक्षकांच्या मुठीत होता. त्यांनी रूमालं फडकवली तर तो जिवंत राहणार. त्या जमावानं—स्त्रिया आणि मुलींनी देखील—अंगठ्यांनी एकच खूण करून ठार मारण्याचा संकेत केला. काही क्षणातच त्याचा मृतदेह आखाड्यातून फरफटत बाहेर नेण्यात आला, रक्तानं माखलेली जमीन फावड्यानं उकलून त्यावर नवीन वाळू पसरवली आणि मग हा जमाव उर्वरित रक्तरंजित दृश्ये पाहायला पुन्हा सज्ज झाला.
प्राचीन रोममध्ये राहणाऱ्या अनेकांसाठी हा करमणुकीचा एक प्रकार होता. “कट्टर नीतीवाद्यांनी देखील रक्तपाताबद्दल आनंद मानण्याविषयी काहीच हरकत घेतली नाही,” असे रोम: पहिली हजार वर्षे (इंग्रजी) या पुस्तकात म्हटले आहे. त्याचप्रमाणे, हा युद्धाचा खेळ रोममध्ये सादर केल्या जाणाऱ्या हिणकस करमणुकीतला केवळ एक प्रकार होता. प्रत्यक्षातील आरमारी युद्धं देखील रक्तपिपासू प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सादर केली जात होती. त्याचप्रमाणे, जाहीर न्यायदंड देखील होत असत, ज्यामध्ये गुन्हेगाऱ्याला एका खांबाला बांधून ठेवत आणि भुकेलेल्या जंगली जनावरांना त्याचे लचके तोडून फडशा पाडण्यासाठी सोडण्यात येई.
ज्यांना असला खुनी प्रकार आवडत नव्हता, त्यांच्याकरता रोममध्ये पुष्कळ नाटकं सादर केली जात असत. या नाटकांचे—दैनंदिन जीवनावर आधारित असलेल्या लघु नाटकांचे—“विषय व्यभिचार आणि प्रेम प्रकरणे हे असत,” असे लुटविक फ्रीडलेन्डर या लेखकाने प्रारंभिक साम्राज्यातील रोमी जीवनशैली आणि प्रथा (इंग्रजी) या पुस्तकात लिहिले. “त्यातली भाषा अगदीच अश्लील आणि विनोद बीभत्स असत, गलिच्छ, उर्मट अंगविक्षेप आणि बासुरीवर केलेल्या विचित्र नृत्याची त्यात भर असे.” द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिका नुसार, “रोमी साम्राज्यात, या नाटकांमध्ये व्यभिचारी कृत्ये अक्षरशः व्यासपीठावर केली जात असत असा पुरावा आहे.” तेव्हा, फ्रीडलेन्डर यांनी या नाटकांविषयी “अनैतिकता आणि अश्लीलतेची सर्वात स्पष्ट निर्लज्ज नाटक रचना” असे म्हटले हे उचितच आहे; शिवाय त्यांनी पुढे म्हटले: “सर्वात कामुक दृश्यांनाच अधिक दाद दिली जाई.”a
परंतु आजच्या स्थितीविषयी काय? मानवाची करमणुकीची आवडनिवड बदलली आहे का? पुढील लेखात चर्चिलेल्या पुराव्याचा विचार करा.
[तळटीपा]
a कधीकधी, एखाद्या नाट्य प्रस्तुतीला वास्तविक स्वरूप देण्याकरता व्यासपीठावरच एखाद्याचा वध केला जाई. रोमची संस्कृती (इंग्रजी) हे पुस्तक निरीक्षिते: “त्या भीषण क्षणी देखील, मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेल्या गुन्हेगाराने नायकाची भूमिका करणे ही असामान्य गोष्ट नव्हती.”
[३ पानांवरील चित्राचे श्रेय]
The Complete Encyclopedia of Illustration/J. G. Heck