सावध राहा! नियतकालिकाने १९९० मध्ये याची माहिती दिली
अलीकडेच “मॅड काऊ रोगामुळे,” युरोपमध्ये खूप खळबळ माजली. बहुतेकांना याची भीती वाटते की, या रोगाची लागण माणसांना देखील होण्याची शक्यता आहे. रोगग्रस्त जनावरांचे मांस खाणे आणि वाढतच जाणारा व असह्य प्राणघातक मध्यवर्ती चेतासंस्थेचा विकार क्रॉईट्सफेल्ट-योकोप डिसीज, यामध्ये उपरोक्त नाते असल्याचे काहींना वाटते. यात काही आश्चर्य नाही की मॅड काऊच्या रोगाची बातमी पसरल्यावर, गोमांसाचे सेवन जवळजवळ शून्यावर आले आहे.
उल्लेखनीय गोष्ट अशी की, स्टेफान्या फारारी हिने टुटोरेड्जो या इटालियन नियतकालिकाच्या मे १९९६ अंकात लिहिले: “१९९० मध्ये या विनाशकारी साथीबद्दल चर्चा करणाऱ्या नियतकालिकामध्ये—म्हणजेच यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित, सावध राहा! आम्ही वाचले आहे.” तिने नोव्हेंबर ८, १९९० (इंग्रजी) या नियतकालिकाच्या “ब्रिटनचे ‘मॅड काऊ’ प्रकरण,” या लेखाचा संदर्भ दिला आहे. त्यातील सुरवातीचे चार परिच्छेद उद्धृत केल्यानंतर, फारारी हिने याचे आश्चर्य व्यक्त केले की, “जगभरात सर्वांना या प्रकरणाबद्दल कळण्याच्या सहा वर्षांपूर्वीच” हा लेख प्रकाशित झाला. तिने पुढे म्हटले: “इतक्या विलक्षण अद्ययावत माहितीचा हा १९९० चा लेख पाहिल्यानंतर काही जण म्हणाले: ‘जर यहोवाच्या साक्षीदारांना एवढ्या गंभीर आणि महत्त्वपूर्ण प्रकरणाची माहिती होती तर त्यांनी ही गोष्ट सर्वांच्याच, अर्थात त्यांच्या मंडळीचे सदस्य नसणाऱ्या लोकांच्याही लक्षात का आणून दिली नाही?’ स्वतःलाच विचारा: १९९० मध्ये एखाद्या यहोवाच्या साक्षीदाराने तुमचे दार ठोठावून तुम्हाला बायबलमधून काही सांगितले असते आणि त्यांच्या नियतकालिकामधील तो लेख दाखवला असता, तर दुसरा धर्म अनुसरणाऱ्या किती जणांनी याचा गांभीर्याने विचार केला असता?”
१९९० मध्ये, “ब्रिटनचे ‘मॅड काऊ’ प्रकरण” हा लेख प्रकाशित झाल्यावर, सावध राहा! या नियतकालिकाची ६२ भाषांमध्ये, १ कोटी २ लाख एवढी सरासरी छपाई होती. यहोवाचे साक्षीदार २०० पेक्षा अधिक देशांत, या समयोचित नियतकालिकेचे वितरण करण्यात दंग होते. आज, सावध राहा! या नियतकालिकाची ८१ भाषांत १,८३,५०,००० प्रतींची सरासरी छपाई आहे. हे नियतकालिक आजही, बोधक आणि अद्ययावत माहिती प्रकाशित करते. तुम्हाला सावध राहा! नियतकालिकाचे भावी अंक हवे असल्यास, कृपया स्थानिक यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा अथवा पृष्ठ ५ वर दिलेल्या जवळच्या पत्त्यावर लिहून पाठवा.