आमच्या वाचकांचे मनोगत
अद्याप अविवाहित का? “तरुण लोक विचारतात . . . माझ्याशिवाय सर्वजण विवाह करीत आहेत, असे का?” या लेखाबद्दल मी आपली खूप आभारी आहे. (ऑक्टोबर २२, १९९५) आमच्याकडे लग्न सोहळ्यांना उधाण आलेले असून अनेक लोक फार कमी वयातच विवाह करत आहेत. काहींना माझी काळजी लागून आहे, कारण मी १८ वर्षांची आहे व अद्याप मला प्रियकर नाही. हा लेख अगदी योग्य वेळेवर आला व मला एक संतुलित मनोवृत्ती राखण्यास मदत मिळाली आहे.
एस. झेड., जर्मनी
माझे वय १९ असून मी अद्याप अविवाहित असल्यामुळे मी अनेकदा विचार करते की मला कोणीही पसंत करत नाही, अशी कोणती उणीव माझ्यात आहे? सत्य न मानणाऱ्या काही जणांनी मला पसंत केले परंतु मला हे नको आहे. या लेखामुळे मला कळून आले की धीर धरणे आवश्यक असून मी यहोवाला संतोषवावे हेच खरे तर महत्त्वाचे आहे.
जे. जी., अमेरिका
मी ३८ वर्षांचा अविवाहित पुरुष असून, लेखाच्या शीर्षकात विचारलेला प्रश्न मी पुष्कळदा स्वतःस विचारला आहे. अगणित अविवाहित ख्रिस्ती भगिनींनी मला दिलेल्या नकारांमुळे निराश झाल्याने, “आशा लांबणीवर पडली असता” होणाऱ्या कष्टाची मला चांगली जाणीव आहे. (नीतिसूत्रे १३:१२) अशा परिस्थितीत सापडलेल्या अविवाहित ख्रिस्ती जणांच्या भावनांना यहोवा योग्य समजतो व तो आमच्या विश्वासू सहनशीलतेची कदर करतो हे जाणणे दिलासा देणारे आहे.
डी. टी., अमेरिका
सर्वश्रेष्ठ कलाकार “सर्वश्रेष्ठ कलाकाराच्या शोधात” (नोव्हेंबर ८, १९९५), या श्रृंखलेतील लेख वाचल्यावर, मी आपली प्रशंसा व्यक्त करण्यास प्रेरित झालो आहे. मी दूरचित्रवाणीवर असे असंख्य निसर्गासंबंधी कार्यक्रम पाहिले आहेत जे महान रचनाकारास श्रेय देत नाहीत. तथापि, सावध राहा! नेहमीच आपला सर्वथोर देव, यहोवा यास श्रेय देते.
ई. झेड., अमेरिका
यहोवाकडे पाहण्याचा हा नवा दृष्टिकोन केवढा अप्रतिम आहे! त्याच्या कलेच्या गुणवत्तेला खरोखरच तोड नाही; शिवाय त्याच्या कार्याचे परिमाणदेखील अतुलनीय आहे. यहोवा देवाकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी सावध राहा! यास आकर्षक बनवणाऱ्या अनेक कुशल कलाकारांनाही मला शाबासकी द्यावीशी वाटते.
एम. क्यू., अमेरिका
“सर्वश्रेष्ठ कलाकाराच्या शोधात” या शीर्षकाखालील लेखांच्या श्रृंखलेबद्दल आभारी आहे. (नोव्हेंबर ८, १९९५) स्वतः एक कलाकार असल्यामुळे, मला हे लेख खूप आवडले. देवाच्या निर्मितीतील महान विविधता, स्तोत्रसंहितेतील काव्यमय कला व सुरेखपणे शब्दांकित केलेले बायबलचे इतर उतारे दाखवतात की यहोवा केवळ कलेचा निर्माताच नव्हे तर भोक्ता देखील आहे!
बी. आर., अमेरिका
कलेच्या क्षेत्रात ३० पेक्षा अधिक वर्षांपासून कार्यरत असल्यामुळे मला, हा अप्रतिम अंक सादर करण्यात सहभाग घेतलेल्या सर्वांचे कौतुक करावेसे वाटते! आपला महान देव, यहोवा व त्याच्या सामर्थ्यशाली निर्मिती कौशल्यांविषयी या नऊ पानांत उत्कृष्ट व तर्कशुद्ध युक्तिवाद वाचायला मिळाला.
पी. एम., अमेरिका
अन्न-संक्रमित रोग “अन्न-संक्रमित रोगांपासून स्वतःचे संरक्षण करा,” हे शीर्षक असलेला तुमचा लेख मला खूप आवडला. (नोव्हेंबर २२, १९९५) मी व्यवसायाने स्वयंपाकी आहे व मला आणखीन एक मुद्दा सांगावासा वाटतो. एखाद्यास कमी शिजविलेले मांस खाण्यास आवडत असेल; तथापि अन्न-संक्रमित रोग टाळण्याबद्दल काळजी घ्यायची असल्यास हे शक्य होणार नाही. खरे तर, अधिक तापमानांवर मांस शिजविल्यास त्यात ओलावा राहात नाही व ते पचण्यास कठीण बनू शकते. मांस पूर्णपणे शिजावे व त्याचा ओलावा देखील कायम राहावा यासाठी त्यास वाफेवर अथवा मंदाग्नीवर शिजवावे.
जे. पी. के., अमेरिका
या पाककृतीच्या सल्ल्याबद्दल आभारी आहोत.—संपादक.