व्हेल? डॉल्फिन? नाही, तो वॉल्फिन आहे!
बंदिवासातील जंगली प्राण्याचा जन्म नेहमी आनंदित करणारी घटना आहे. परंतु हवाईच्या सी लाईफ पार्क येथे, मे १५, १९८५ हा असामान्यपणे खास दिवस होता.
पुनॉहेले (पू-नॉ-हेʹले असे उच्चारले जाते) हे हवाई भाषेतील नाव असणारी ती गरोदर आई, एक ॲटलांटिकची लांब मुस्कट असणारी डॉल्फिन होती. पुनॉहेलेचा अर्थ “अतिप्रिय मित्र” असा होतो. पुनॉहेलेच्या गरोदरपणाच्या उत्तरार्धात तिचा आकार खूपच मोठा झाला होता. यास्तव, काही असामान्य घडत आहे याची जाणीव पार्कच्या कर्मचाऱ्यांना आधीच होती. पुनॉहेलेचे पिल्लू जन्मले तेव्हा त्यांच्या शंकेला पुष्टी मिळाली. तिचे नाव केकैयमालू (के-कैय-माʹलू असे उच्चारले जाते) ठेवण्यात आले. केकैयमालू एखाद्या डॉल्फिनपेक्षा लहानच नव्हती तर, तिचे मुस्कट अस्वाभाविकपणे लहान होते.
मग केकैयमालूने तोंड उघडले.
एका ॲटलांटिक लांब मुस्कटाच्या डॉल्फिनला ८८ दात असतात. परंतु, केकैयमालूने तोंड उघडले तेव्हा केवळ ६६ दात दिसून आले—ते विलक्षणीय मोठे होते. काय घडले होते?
नवीन जन्मलेल्या पिल्लाची आई, इतर पुष्कळ डॉल्फिनसोबत सी लाईफ पार्कच्या वेल्हर्स कोव शोमध्ये दररोज खेळ करीत होती. तिच्यासोबत खेळ करणारा एक १८ वर्षांचा, ९०० किलोग्रॅम वजन असणारा खोटा किलर व्हेल होता.a दिवसाच्या शेवटी, पाण्यातील त्या खेळाडूंना एकाच टाकीत स्वैरपणे पोहण्यास दिले जात होते.
केकैयमालू त्याचाच अनपेक्षित परिणाम होता—तो अर्धा डॉल्फिन व अर्धा व्हेल असणारा प्राणी होता. पार्कच्या कर्मचाऱ्यांनी आनंदाने या दुर्मिळ मिश्रजातीय प्राण्याला “वॉल्फिन” असे म्हटले. तिच्या ६६ दातांनी, डॉल्फिन आईच्या ८८ दातांचे तसेच व्हेल पित्याच्या ४४ दातांचे गुण घेतले. तिच्या गर्द रंगावरून आणि मोठ्या आकारावरून तिला देवमाश्याची वडिलोपार्जित मिळकत मिळाली असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असले तरी, पार्कचे कर्मचारी, “दोन्ही पालकांचे अद्वितीय मिश्रण,” अशाप्रकारे तिचे वर्णन करतात. तिची निमुळती रॉस्ट्रम किंवा “चोच” डॉल्फिन सारखीच परंतु, त्याहून किंचित लहान आहे.
दुसरा माहीत असलेला वॉल्फिन, जपानमधील एका मोठ्या मत्स्यालयात १९८१ मध्ये जन्मला होता. तो मिश्रजातीय प्राणी काही महिन्यांनी मरण पावला. केकैयमालूची संभवता यापेक्षाही काही चांगली असणार होती का?
ते १६ किलोग्रमचे छोटे वॉल्फिन स्वस्थ दिसत होते. ते सर्वसाधारणपणे दूध पिऊ लागले. केकैयमालूच्या जन्मानंतर लगेचच हॉनलूलू तारकांचे वृत्तपत्रक आणि जाहिरात करणारे (इंग्रजी) याने पार्कच्या एका अधिकाऱ्याची विवेचने देऊन असे म्हटले: “त्या लहान पिल्लाची प्रौढ होईपर्यंत जगण्याची शक्यता तिच्या एक-जातीय भावडांइतकी चांगली नाही . . . मिश्रजातीय बहुधा मेलेलेच जन्मतात किंवा त्यांना काही आजार जडतो व ते लहान वयातच मरतात. सुदैवाने, . . . पुनॉहेले ही एक अनुभवी व प्रेमळ आई आहे. तिने [सी लाईफ पार्क येथे] दोन इतर डॉल्फिनच्या पिल्लांना प्रौढ होईपर्यंत वाढवले आहे.” अधिकाऱ्याने म्हटले: “ती परिस्थितीशी लवकर जुळणारी आहे. ती एक खरोखरीच चांगली आई आहे.” आई या नात्याने पुनॉहेलेने मिळवलेले चांगले नाव भक्कम माहितीवर आधारित होते.
केकैयमालू आता सात पेक्षा अधिक वर्षांसाठी जिवंत राहिली आहे. आता ३०० किलोग्रॅमची असून ती तिच्या डॉल्फिन आईला ठेंगू करते. पुष्कळांनी तेव्हाच्या त्या पाच वर्षीय वॉल्फिनला अफलीत समजले होते. पण, वेल्हर्स कोव येथे काही वर्षांसाठी खेळ केल्यावर, तिने १९९० मध्ये इतिहासात एक अविस्मरणीय गोष्ट केली. ती स्वतः एक आई झाली. मकॉपू सुविधा केंद्रातील सस्तन प्राण्यांची अभिरक्षक, मॉर्ली ब्रीस हिने असे म्हटले, “सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, मिश्रजातीय प्राणी अफलीत असतात.” “परंतु केकैयमालुच्या बाबतीत तसे बिलकुल नाही.” दुर्दैवाने, तिचे पहिले पिल्लू—एक चतुर्थ्यांश व्हेल व तीन चतुर्थ्यांश डॉल्फिन—केवळ एका आठवड्यासाठीच जिवंत राहिले.
खरे म्हणजे, केकैयमालूला तिच्या पिल्लाची काळजी कशी घ्यावी हे माहीत नव्हते. “मिश्रजातीय असण्याचा त्याच्याशी काही संबंध नाही असे मला वाटते,” अशी ब्रीस म्हणते. केकैयमालू फारच लहान होती त्यामुळे तिच्या पिल्लाची काळजी कशी घ्यावी हे तिला माहीत नव्हते. तिने तिच्या पिल्लाची काळजी का घेतली नाही त्याचे हेच मुख्य कारण असावे असे तिला वाटते. “हे प्राणी, बहुधा, ८ ते १० वर्षांनी त्यांच्या लैंगिक प्रौढतेला पोहंचतात,” असे ब्रीस म्हणते. केकैयमालूने तिच्या पहिल्या पिल्लाला जन्म दिला तेव्हा ती केवळ पाच वर्षांची होती.
नोव्हेंबर ८, १९९१ रोजी केकैयमालूने दुसऱ्या पिल्लाला जन्म दिला. परंतु, या वेळी कर्मचारी तयारीत होते. वॉल्फिन आई त्या पिल्लाची काळजी स्वतःहून घेते का ते २४ तासांसाठी पाहिल्यावर, ते मध्ये घुसले. केकैयमालूला पाण्यातून एका झोळीत उचलण्यात आले. स्त्रीच्या स्तन पंपाद्वारे तिच्यातून दूध काढण्यात आले. ब्रीस सांगते, ‘मातेचे पहिले दूध पिल्लाला प्रतिजैविके पुरवत असते. त्यासाठी ते मिळवणे फारच महत्त्वपूर्ण आहे.’ पुष्कळ आठवड्यांसाठी कर्मचाऱ्यांनी नित्याने त्या आईचे दिवसातून एकदा दूध काढले. त्यांना जवळजवळ एक लिटर दूध मिळत होते.
मग, त्या वॉल्फिनचे दूध मनुष्याने बनवलेल्या मिश्रणात मिळवण्यात आले. ते, किनाऱ्यावर आलेल्या डॉल्फिनला वाचवण्याच्या प्रयत्नात, फ्लोरिडा, अमेरिका येथे तयार करण्यात आले होते. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत त्या वॉल्फिनच्या पिल्लाला प्रत्येक अडीज तासांनी, पोटातील नळीद्वारे पाजले जात होते. प्रत्येक दिवशी जवळजवळ तिचे अर्ध्या किलोने वजन वाढत होते. भरवण्याच्या वेळेदरम्यान आजी, आई आणि पिल्लू एका मोठ्या टाकीत खेळत असे.
हे लिखाण केले जाईपर्यंत, जगात माहीत असलेल्या या व्हेल आणि डॉल्फिनच्या नातीबद्दलच्या बचावण्याची संभावना चांगली दिसते. कदाचित ती एके दिवशी कुटुंबाच्या परंपरेचे अनुकरण करील. ती वेल्हर्स कोवच्या शोमध्ये खेळ करील. देवाने त्याच्या निर्मितीमध्ये विविधतेसाठी आश्चर्यकारक शक्यतेला निर्माण केले आहे. त्यात जगाला डोकावून पाहण्यास अजून एक ओझरते दर्शन दिले गेले आहे. (g94 2/22)
[तळटीपा]
a सी लाईफ पार्कच्या एका प्रकाशनाप्रमाणे, “खोट्या किलर व्हेल माश्यांना त्यांच्या वैज्ञानिक नावाच्या (स्यूडो = खोटे, ऑरका = व्हेलचा एक प्रकार) शब्दशः भाषांतरावरून हे नाव मिळते व ते पुष्कळ मोठ्या मत्स्यालयात प्रदर्शित केल्या जाणाऱ्या सारख्याच किलर व्हेल माश्यांशी जवळून संबंधित आहेत.”
[३१ पानांवरील चित्र]
एक वॉल्फिन तिच्या डॉल्फिन साथीदारांबरोबर
[चित्राचे श्रेय]
Monte Costa, Sea Life Park, Hawaii