वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt प्रकटीकरण १:१-२२:२१
  • प्रकटीकरण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रकटीकरण
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण

योहान याला झालेलं प्रकटीकरण

१ येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण,* जे देवाने त्याला यासाठी दिलं,+ की लवकरच घडणार असलेल्या गोष्टी आपल्या सेवकांना दाखवाव्यात.+ येशूने आपल्या दूताला पाठवून त्याच्याद्वारे देवाचा* सेवक योहान याला ते चिन्हांच्या रूपात प्रकट केलं.+ २ देवाने दिलेल्या वचनाबद्दल आणि येशू ख्रिस्ताने दिलेल्या साक्षीबद्दल, हो, आपण पाहिलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल योहानने साक्ष दिली. ३ जो या भविष्यवाणीचे शब्द मोठ्याने वाचतो आणि जे या भविष्यवाणीचे शब्द ऐकून त्यात सांगितलेल्या गोष्टींचं पालन करतात ते आशीर्वादित आहेत,+ कारण नेमलेली वेळ जवळ आली आहे.

४ आशिया प्रांतात असलेल्या सात मंडळ्यांना योहानकडून:+

“जो आहे, जो होता आणि जो येत आहे,” त्याच्याकडून+ आणि त्याच्या राजासनापुढे असलेल्या सात अदृश्‍य शक्‍तींकडून,*+ ५ तसंच, जो “विश्‍वासू साक्षीदार,”+ “मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला,”+ आणि “पृथ्वीवरच्या राजांचा शासक” आहे, त्या येशू ख्रिस्ताकडून+ तुम्हाला अपार कृपा आणि शांती मिळो.

ज्याचं आपल्यावर प्रेम आहे+ आणि ज्याने स्वतःच्या रक्‍ताद्वारे आपल्याला पापांपासून मुक्‍त केलं,+ ६ आणि त्याचा देव आणि पिता याच्यासाठी ज्याने आपल्याला एक राज्य+ आणि याजक असं केलं,+ त्याला सदासर्वकाळ गौरव आणि सामर्थ्य मिळो. आमेन.

७ पाहा! तो ढगांसोबत येत आहे+ आणि प्रत्येक डोळा त्याला पाहील आणि ज्यांनी त्याला भोसकलं तेही त्याला पाहतील. त्याच्यामुळे पृथ्वीवरचे सर्व वंश छाती बडवून शोक करतील.+ हो, आमेन.

८ “जो आहे, जो होता आणि जो येत आहे, जो सर्वशक्‍तिमान,” तो यहोवा* देव+ म्हणतो, “अल्फा आणि ओमेगा* मी आहे.”+

९ मी योहान तुमचा भाऊ आणि येशू ख्रिस्ताचा अनुयायी या नात्याने+ तुमच्यासोबत संकटात,+ राज्यात+ आणि धीरात तुमचा भागीदार आहे.+ देवाबद्दल बोलल्यामुळे आणि येशूबद्दल साक्ष दिल्यामुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो. १० तेव्हा पवित्र शक्‍तीच्या* प्रभावाखाली येऊन मी प्रभूच्या दिवसात पोहोचलो आणि मला पाठीमागून कर्णा वाजत असल्यासारखा मोठा आवाज ऐकू आला. ११ तो म्हणाला: “तुला जे काही दिसतं ते गुंडाळीत लिही, आणि ते इफिस,+ स्मुर्णा,+ पर्गम,+ थुवतीरा,+ सार्दीस,+ फिलदेल्फिया+ आणि लावदिकीया+ इथे असलेल्या सात मंडळ्यांना पाठव.”

१२ माझ्यासोबत कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी वळलो, तेव्हा मला सोन्याचे सात दीपवृक्ष* दिसले.+ १३ आणि दीपवृक्षांच्या मधोमध मला पायघोळ वस्त्र घातलेला आणि छातीवर सोन्याचा पट्टा बांधलेला मनुष्याच्या मुलासारखा+ कोणीतरी दिसला. १४ त्याच्या डोक्यावरचे केस पांढऱ्‍या लोकरीसारखे, बर्फासारखे शुभ्र होते आणि त्याचे डोळे आगीच्या ज्वालांसारखे होते.+ १५ त्याचे पाय, भट्टीत तापवलेल्या शुद्ध तांब्यासारखे+ आणि त्याचा आवाज पाण्याच्या जोरदार प्रवाहासारखा होता. १६ त्याच्या उजव्या हातात सात तारे होते+ आणि त्याच्या तोंडातून एक लांब, धारदार, दुधारी तलवार+ निघाली होती. त्याचं रूप* तेजस्वीपणे चमकणाऱ्‍या सूर्यासारखं होतं.+ १७ त्याला पाहून मी जणू मेल्याप्रमाणे त्याच्या पायाजवळ पडलो.

तेव्हा त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवून म्हटलं: “भिऊ नकोस. मी पहिला+ आणि शेवटला आहे.+ १८ जो जिवंत तो मी आहे.+ मी मेलो होतो,+ पण पाहा! मी सदासर्वकाळ जिवंत राहतो+ आणि माझ्याजवळ मृत्यूच्या आणि कबरेच्या* किल्ल्या आहेत.+ १९ म्हणून तू पाहिलेल्या या गोष्टी, ज्या आहेत आणि ज्या यानंतर घडणार आहेत त्या गोष्टी लिहून घे. २० माझ्या उजव्या हातात तू पाहिलेल्या सात ताऱ्‍यांचं आणि सोन्याच्या सात दीपवृक्षांचं पवित्र रहस्य असं आहे: सात तारे म्हणजे सात मंडळ्यांचे दूत आणि सात दीपवृक्ष म्हणजे सात मंडळ्या.+

२ इफिस इथे असलेल्या मंडळीच्या+ दूताला+ लिही: ज्याच्या उजव्या हातात सात तारे आहेत आणि जो सोन्याच्या सात दीपवृक्षांच्या मधून चालतो तो+ असं म्हणतो: २ ‘तुझी कार्यं, आणि तुझी मेहनत आणि धीर मला माहीत आहे. मला हेही माहीत आहे की वाईट माणसांना तू खपवून घेत नाहीस. तसंच, जे प्रेषित नसताना स्वतःला प्रेषित म्हणवतात त्यांची तू परीक्षा घेतली+ आणि ते खोटे असल्याचं तुला दिसून आलं. ३ तू अजूनही धीर धरत आहेस; माझ्या नावासाठी तू टिकून राहिला आहेस+ आणि तू खचून गेला नाहीस.+ ४ तरीपण, एका गोष्टीसाठी मी तुला दोषी ठरवतो. ती म्हणजे, तुझं सुरुवातीचं प्रेम आता आटलं आहे.

५ म्हणून तू कुठून पडला आहेस ते आठव; पश्‍चात्ताप कर+ आणि तू सुरुवातीला केली होती तशी कार्यं कर. जर तू असं केलं नाहीस, तर मी तुझ्याकडे येईन आणि तू पश्‍चात्ताप केला नाहीस, तर+ मी तुझा दीपवृक्ष+ त्याच्या जागेवरून काढून टाकीन. ६ तरीसुद्धा, तुझी एक गोष्ट चांगली आहे, की तू निकलावच्या पंथाच्या कार्यांचा द्वेष करतोस;+ मीसुद्धा त्या कार्यांचा द्वेष करतो. ७ पवित्र शक्‍ती* मंडळ्यांना काय म्हणते, हे ज्याला कान आहे त्याने ऐकावं:+ जो विजय मिळवेल त्याला+ मी देवाच्या सुंदर बागेत* असलेल्या जीवनाच्या झाडाचं फळ खाऊ देईन.’+

८ स्मुर्णा इथे असलेल्या मंडळीच्या दूताला लिही: ‘जो पहिला आणि शेवटला,’+ जो मेला होता आणि पुन्हा जिवंत झाला+ तो असं म्हणतो: ९ ‘तुझी संकटं आणि गरिबी मला माहीत आहे, पण तरीसुद्धा तू श्रीमंत आहेस.+ आणि जे मुळात यहुदी नसताना स्वतःला यहुदी म्हणतात त्यांनी केलेली निंदाही मला माहीत आहे. ती खरंतर सैतानाची सभा आहे.+ १० तुला लवकरच जी दुःखं सहन करावी लागणार आहेत त्यांची भीती बाळगू नकोस.+ पाहा! तुमची पूर्णपणे परीक्षा व्हावी म्हणून सैतान* तुमच्यापैकी काहींना तुरुंगात टाकत राहील आणि दहा दिवस तुम्हाला संकट सोसावं लागेल. मरणापर्यंत विश्‍वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन.+ ११ पवित्र शक्‍ती मंडळ्यांना काय म्हणते, हे ज्याला कान आहे त्याने ऐकावं:+ जो विजय मिळवेल+ त्याला दुसऱ्‍या मृत्यूचा अनुभव येणारच नाही.’+

१२ पर्गम इथे असलेल्या मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याजवळ लांब, धारदार, दुधारी तलवार आहे+ तो असं म्हणतो: १३ ‘तू कुठे राहत आहेस हे मला माहीत आहे. त्या ठिकाणी सैतानाचं राजासन आहे; आणि तरीसुद्धा तू माझ्या नावाला धरून ठेवलं आहेस.+ आणि तुमच्या शहरात, जिथे सैतान राहत आहे, तिथे माझा विश्‍वासू साक्षीदार+ अंतिपा याला ठार मारण्यात आलं,+ तेव्हासुद्धा तू माझ्यावर असलेला विश्‍वास नाकारला नाहीस.+

१४ पण काही गोष्टींसाठी मी तुला दोषी ठरवतो. तुमच्याकडे बलामच्या शिकवणीप्रमाणे+ चालणारे काही जण आहेत. त्या बलामने बालाकला+ इस्राएलच्या मुलांसमोर अडखळण ठेवायला शिकवलं होतं. हे यासाठी, की त्यांनी मूर्तींना अर्पण केलेल्या वस्तू खाव्यात आणि अनैतिक लैंगिक कृत्यं* करावीत.+ १५ त्याच प्रकारे, निकलावच्या पंथाच्या शिकवणीप्रमाणे चालणारेही तुझ्याकडे आहेत.+ १६ म्हणून पश्‍चात्ताप कर. जर तू असं केलं नाही, तर मी लवकरच तुझ्याकडे येईन आणि माझ्या तोंडातल्या लांब तलवारीने त्यांच्याशी लढाई करीन.+

१७ पवित्र शक्‍ती मंडळ्यांना काय म्हणते हे ज्याला कान आहे त्याने ऐकावं:+ जो विजय मिळवेल+ त्याला मी लपवून ठेवलेल्या मान्‍नातून काही देईन,+ आणि मी त्याला एक पांढरा खडा देईन. त्या खड्यावर एक नवीन नाव लिहिलं आहे आणि ज्याला तो खडा मिळतो, त्याच्याशिवाय ते नाव कोणालाही माहीत होणार नाही.’

१८ थुवतीरा इथे असलेल्या मंडळीच्या+ दूताला लिही: देवाचा मुलगा, ज्याचे डोळे आगीच्या ज्वालेसारखे+ आणि ज्याचे पाय शुद्ध तांब्यासारखे आहेत+ तो असं म्हणतो: १९ ‘मला तुझी कार्यं, तुझं प्रेम, तुझा विश्‍वास, तुझं सेवाकार्य आणि धीर माहीत आहे. तसंच, तुझी अलीकडची कार्यं तू पूर्वी केलेल्या कार्यांपेक्षा जास्त आहेत हेही मला माहीत आहे.

२० तरीपण मी या गोष्टीसाठी तुला दोषी ठरवतो, की ईजबेल नावाच्या त्या स्त्रीला तू खपवून घेतोस.+ ती स्वतःला संदेष्टी म्हणवते आणि माझ्या सेवकांना बहकवून त्यांना अनैतिक लैंगिक कृत्यं* करायला+ आणि मूर्तींना अर्पण केलेल्या गोष्टी खायला शिकवते. २१ मी तिला पश्‍चात्ताप करण्याची संधी दिली, पण ती आपल्या अनैतिक लैंगिक कृत्यांबद्दल* पश्‍चात्ताप करायला तयार नाही. २२ पाहा! मी लवकरच तिला आजारपण देऊन अंथरुणाला खिळून टाकणार आहे. आणि ज्यांनी तिच्यासोबत व्यभिचार केला, त्यांनी तिच्यासारखीच कृत्यं केल्याबद्दल पश्‍चात्ताप केला नाही, तर मी त्यांना मोठ्या संकटांमध्ये पाडीन. २३ आणि तिच्या मुलांना मी भयंकर साथीच्या रोगांनी मारून टाकीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना हे कळेल की मी गुप्त विचारांचं* आणि मनांचं परीक्षण करतो आणि मी तुमच्यापैकी प्रत्येकाला त्याच्या कार्यांप्रमाणे फळ देईन.+

२४ पण, थुवतीरा इथे असलेल्या इतरांना, म्हणजे जे या शिकवणीप्रमाणे चालत नाहीत आणि “सैतानाच्या गहन गोष्टी”*+ ज्यांनी जाणून घेतल्या नाहीत त्या सर्वांना मी असं म्हणतो: मी तुमच्यावर आणखी कोणतंही ओझं लादत नाही. २५ पण तरीसुद्धा, मी येईपर्यंत, जे तुमच्याजवळ आहे ते घट्ट धरून ठेवा.+ २६ जो विजय मिळवेल आणि शेवटपर्यंत माझ्या कार्यांचं अनुकरण करेल, त्याला मी राष्ट्रांवर अधिकार देईन.+ २७ मला माझ्या पित्याकडून जसा अधिकार मिळाला आहे तसा तोसुद्धा लोहदंडाने लोकांवर अधिकार चालवेल+ आणि मातीच्या भांड्यांप्रमाणे त्यांचा चुराडा करेल. २८ आणि मी त्याला पहाटेचा तारा देईन.+ २९ पवित्र शक्‍ती मंडळ्यांना काय म्हणते हे ज्याला कान आहे त्याने ऐकावं.’

३ सार्दीस इथे असलेल्या मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याजवळ देवाच्या सात अदृश्‍य शक्‍ती* आहेत+ आणि सात तारे आहेत+ तो असं म्हणतो: ‘मला तुझी कार्यं माहीत आहेत. तू जिवंत आहेस असं नाव तुला आहे,* पण तू मेलेला आहेस.+ २ जागा हो+ आणि उरलेल्या ज्या गोष्टी मरायला टेकल्या आहेत त्यांना बळकट कर. कारण माझ्या देवासमोर तुझी कार्यं पूर्ण झालेली मला दिसून आली नाहीत. ३ म्हणून तू जे काही स्वीकारलं आणि जे काही ऐकलं ते आठवणीत असू दे* आणि त्याचं पालन करत राहा आणि पश्‍चात्ताप कर.+ जर तू जागा झाला नाहीस, तर मी नक्कीच चोराप्रमाणे येईन+ आणि मी कोणत्या वेळेला येईन हे तुला कळणारसुद्धा नाही.+

४ तरीपण, सार्दीस इथे तुझ्याकडे असे काही जण* आहेत ज्यांनी आपली वस्त्रं दूषित केली नाहीत.+ ते माझ्यासोबत पांढरी वस्त्रं घालून चालतील+ कारण ते यासाठी योग्य आहेत. ५ जो विजय मिळवेल+ तो पांढरी वस्त्रं घालेल+ आणि मी त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकातून कधीही पुसून* टाकणार नाही.+ तर, माझ्या पित्यासमोर आणि त्याच्या स्वर्गदूतांसमोर मी त्याच्या नावाचा स्वीकार करीन.+ ६ पवित्र शक्‍ती मंडळ्यांना काय म्हणते हे ज्याला कान आहे त्याने ऐकावं.’

७ फिलदेल्फिया इथे असलेल्या मंडळीच्या दूताला लिही: जो पवित्र आहे,+ जो खरा आहे,+ ज्याच्याजवळ दावीदची किल्ली आहे,+ जो अशा रितीने उघडतो की कोणी बंद करू शकत नाही आणि अशा रितीने बंद करतो की कोणी उघडू शकत नाही, तो असं म्हणतो: ८ ‘मला तुझी कार्यं माहीत आहेत. पाहा! मी तुझ्यापुढे एक असं दार उघडलं आहे,+ जे कोणीही बंद करू शकत नाही. मला माहीत आहे, की तुझ्याजवळ थोडीच शक्‍ती आहे, पण तरी तू माझ्या वचनाचं पालन केलंस आणि माझं नाव नाकारलं नाहीस. ९ पाहा! सैतानाच्या सभेचे जे लोक यहुदी नसताना खोटं बोलून स्वतःला यहुदी म्हणवतात,+ त्यांना मी तुझ्याकडे येऊन तुझ्या पाया पडायला* लावीन. आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे हे मी त्यांना दाखवून देईन. १० माझ्या धीराबद्दलचं वचन तू पाळल्यामुळे,*+ पृथ्वीवर राहणाऱ्‍यांची परीक्षा घेण्यासाठी जो परीक्षेचा काळ संपूर्ण पृथ्वीवर येणार आहे त्यापासून मी तुला वाचवीन.+ ११ मी लवकरच येत आहे.+ जे तुझ्याजवळ आहे त्याला घट्ट धरून ठेव, म्हणजे कोणीही तुझा मुकुट तुझ्याकडून काढून घेणार नाही.+

१२ जो विजय मिळवेल त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातला एक स्तंभ बनवीन आणि तो कधीही तिथून बाहेर जाणार नाही. मी माझ्या देवाचं नाव+ आणि माझ्या देवाच्या शहराचं नाव, म्हणजे माझ्या देवाकडून स्वर्गातून उतरणाऱ्‍या नवीन यरुशलेमचं नाव+ आणि माझं स्वतःचं नवीन नाव त्याच्यावर लिहीन.+ १३ पवित्र शक्‍ती मंडळ्यांना काय म्हणते हे ज्याला कान आहे त्याने ऐकावं.’

१४ लावदिकीया इथे असलेल्या मंडळीच्या+ दूताला लिही: जो आमेन,+ जो विश्‍वासू आणि खरा+ साक्षीदार,+ जो देवाच्या निर्मितीची सुरुवात,+ तो असं म्हणतो: १५ ‘मला तुझी कार्यं माहीत आहेत, की तू गरम किंवा थंडही नाहीस. तू एकतर गरम किंवा थंड असायला हवं होतं. १६ पण तू गरम+ किंवा थंडही+ नाहीस, तर कोमट आहेस म्हणून मी तुला ओकून टाकणार आहे. १७ तू म्हणतोस, “मी श्रीमंत आहे+ आणि मी धनसंपत्ती मिळवली आहे आणि मला कशाचीही गरज नाही,” पण तुला याची जाणीव नाही की तू दुःखी, दयनीय, दरिद्री, आंधळा आणि उघडावाघडा आहेस. १८ म्हणून मी तुला असा सल्ला देतो, की तू माझ्याकडून आगीत शुद्ध केलेलं सोनं विकत घ्यावं, म्हणजे तू श्रीमंत होशील. तसंच, उघडा असल्यामुळे तुझी लाज लोकांना दिसू नये,+ म्हणून तू माझ्याकडून शुभ्र कपडे विकत घेऊन ते घालावेत. आणि तुला दृष्टी यावी म्हणून+ डोळ्यांत घालण्यासाठी तू माझ्याकडून अंजन+ विकत घ्यावं.

१९ ज्यांच्याबद्दल मला जिव्हाळा आहे त्या सर्वांना मी सुधारतो आणि त्यांचं ताडन करतो.+ म्हणून आवेशी हो आणि पश्‍चात्ताप कर.+ २० पाहा! मी दारावर उभा आहे आणि दार ठोठावत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकून दार उघडलं, तर मी त्याच्या घरात जाईन आणि आम्ही सोबत मिळून संध्याकाळचं जेवण करू. २१ जो विजय मिळवेल+ त्याला मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन.+ कारण, मीसुद्धा विजय मिळवला आहे आणि माझ्या पित्यासोबत त्याच्या राजासनावर बसलो आहे.+ २२ पवित्र शक्‍ती मंडळ्यांना काय म्हणते हे ज्याला कान आहे त्याने ऐकावं.’”

४ यानंतर पाहा! मला स्वर्गात एक उघडलेला दरवाजा दिसला आणि माझ्याशी बोलत असलेला जो पहिला आवाज मला ऐकू आला, तो एका कर्ण्याच्या आवाजासारखा होता. तो म्हणाला: “इकडे वर ये, म्हणजे पुढे ज्या गोष्टी घडणार आहेत त्या मी तुला दाखवीन.” २ यानंतर लगेच मी पवित्र शक्‍तीच्या* प्रभावाखाली आलो, आणि पाहा! स्वर्गात एक राजासन होतं आणि त्या राजासनावर एक जण बसलेला होता.+ ३ त्याचं रूप यास्फे*+ आणि सार्दी या रत्नांसारखं* होतं आणि राजासनाच्या सभोवती पाचूसारखं दिसणारं मेघधनुष्य होतं.+

४ राजासनाच्या भोवती २४ राजासनं होती आणि या राजासनांवर मी २४ वडिलांना बसलेलं पाहिलं.+ त्यांनी पांढरी वस्त्रं घातली होती आणि त्यांच्या डोक्यांवर सोन्याचे मुकुट होते. ५ राजासनातून विजा चमकत होत्या.+ तसंच आवाज आणि ढगांचा गडगडाट ऐकू येत होता;+ आणि राजासनापुढे आगीचे सात दिवे होते. हे सात दिवे देवाच्या सात अदृश्‍य शक्‍तींना* सूचित करतात.+ ६ राजासनासमोर स्फटिकासारखा, जणू काचेचा समुद्र होता.+

राजासनाच्या मधोमध आणि चारही बाजूंना चार जिवंत प्राणी होते.+ त्यांच्या अंगावर पुढे आणि मागे डोळेच डोळे होते. ७ पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा+ तर दुसरा बैलासारखा होता.+ तिसऱ्‍या जिवंत प्राण्याचा+ चेहरा माणसासारखा होता आणि चौथा जिवंत प्राणी+ उडणाऱ्‍या गरुडासारखा होता.+ ८ चार जिवंत प्राण्यांपैकी प्रत्येकाला सहा पंख होते. त्या पंखांवर सगळीकडे आणि आतल्या बाजूलाही डोळेच डोळे होते.+ ते प्राणी रात्रंदिवस सतत अशी घोषणा करत राहतात: “यहोवा* देव, सर्वशक्‍तिमान, जो होता, जो आहे आणि जो येत आहे,+ तोच पवित्र, पवित्र, पवित्र!”+

९ जेव्हा जेव्हा ते जिवंत प्राणी, राजासनावर जो बसला आहे आणि जो सदासर्वकाळ जिवंत आहे+ त्याचा गौरव, सन्मान आणि उपकारस्तुती करतात, १० तेव्हा तेव्हा २४ वडील,+ राजासनावर जो बसलेला आहे आणि जो सदासर्वकाळ जिवंत आहे त्याला नमन करून त्याची उपासना करतात. ते राजासनापुढे आपले मुकुट ठेवून म्हणतात: ११ “यहोवा* आमच्या देवा, गौरव,+ सन्मान+ आणि सामर्थ्य+ मिळण्यासाठी तूच योग्य आहेस. कारण तू सर्व गोष्टी निर्माण केल्या+ आणि तुझ्याच इच्छेने त्या अस्तित्वात आल्या आणि निर्माण करण्यात आल्या.”

५ जो राजासनावर बसलेला होता+ त्याच्या उजव्या हातात मला एक गुंडाळी दिसली. तिच्यावर दोन्ही बाजूला* लिहिलेलं होतं आणि तिला सात शिक्के मारून बंद करण्यात आलं होतं. २ मग, मला एक शक्‍तिशाली स्वर्गदूत दिसला. तो अशी घोषणा करत होता: “गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडायला कोण योग्य आहे?” ३ पण स्वर्गात किंवा पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडायला किंवा तिच्यात काय आहे हे पाहायला योग्य ठरला नाही. ४ तेव्हा मी खूप रडू लागलो, कारण गुंडाळी उघडायला किंवा तिच्यात काय आहे हे पाहायला योग्य असा कोणीही सापडला नाही. ५ पण वडिलांपैकी एक जण मला म्हणाला: “थांब, रडू नकोस. पाहा! जो यहूदाच्या वंशातला सिंह+ आणि दावीदचं+ मूळ,+ तो गुंडाळीचे सात शिक्के फोडण्यासाठी आणि ती उघडण्यासाठी विजयी ठरला आहे.”+

६ राजासनाच्या आणि त्या चार जिवंत प्राण्यांच्या मधोमध आणि वडिलांच्या मधोमध+ मला एक कोकरा+ दिसला. त्याचा जणू काय वध झाला होता.+ त्याला सात शिंगं आणि सात डोळे होते आणि ते डोळे संपूर्ण पृथ्वीवर पाठवण्यात आलेल्या देवाच्या सात अदृश्‍य शक्‍ती* आहेत.+ ७ तो कोकरा लगेच पुढे आला आणि जो राजासनावर बसलेला होता+ त्याच्या उजव्या हातातून त्याने ती गुंडाळी घेतली. ८ त्याने गुंडाळी घेतली, तेव्हा ते चार जिवंत प्राणी आणि २४ वडील+ यांनी कोकऱ्‍याला नमन केलं. त्या प्रत्येकाजवळ एक वीणा* आणि धूपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. (धूप हा पवित्र जनांच्या प्रार्थनांना सूचित करतो.)+ ९ आणि ते एक नवीन गीत गातात+ आणि म्हणतात: “गुंडाळी घेऊन तिचे शिक्के फोडायला तू योग्य आहेस. कारण तुझा वध करण्यात आला आणि तुझ्या रक्‍ताने तू प्रत्येक वंश, भाषा, लोकसमूह आणि राष्ट्र यांतून देवासाठी लोकांना विकत घेतलं आहेस.+ १० तू त्यांना आमच्या देवासाठी एक राज्य+ आणि याजक असं केलं+ आणि ते राजे या नात्याने पृथ्वीवर राज्य करतील.”+

११ मग मी पाहिलं तेव्हा राजासन, चार जिवंत प्राणी आणि वडील यांच्याभोवती मला पुष्कळ स्वर्गदूतांचा आवाज ऐकू आला. त्यांची संख्या हजारो-लाखो इतकी होती.+ १२ आणि ते मोठ्या आवाजात असं म्हणत होते: “ज्या कोकऱ्‍याचा वध झाला होता,+ तो सामर्थ्य, वैभव, बुद्धी, शक्‍ती, सन्मान, गौरव आणि स्तुती मिळण्यासाठी योग्य आहे.”+

१३ आणि मी स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली,+ तसंच समुद्रावर असलेल्या प्रत्येक प्राण्याला, सर्वांना असं म्हणताना ऐकलं: “जो राजासनावर बसला आहे+ त्याला आणि कोकऱ्‍याला+ सदासर्वकाळ स्तुती, सन्मान,+ गौरव आणि सामर्थ्य मिळो.”+ १४ तेव्हा ते चार जिवंत प्राणी म्हणाले: “आमेन!” आणि वडिलांनी गुडघे टेकून नमन केलं.

६ मग कोकऱ्‍याने+ सात शिक्क्यांपैकी एक उघडला+ तेव्हा मी पाहिलं, आणि मला त्या चार जिवंत प्राण्यांपैकी+ एकाचा आवाज ऐकू आला. तो आवाज ढगांच्या गर्जनेसारखा होता. तो म्हणाला: “ये!” २ आणि पाहा! मला एक पांढरा घोडा+ दिसला. त्यावर बसलेल्या स्वाराजवळ एक धनुष्य होतं आणि त्याला एक मुकुट देण्यात आला,+ आणि तो शत्रूंचा पराभव करत आपला विजय पूर्ण करण्यासाठी निघून गेला.+

३ त्याने दुसरा शिक्का उघडला, तेव्हा मला दुसऱ्‍या जिवंत प्राण्याचा आवाज ऐकू आला.+ तो म्हणाला: “ये!” ४ तेव्हा अग्नीच्या रंगाचा आणखी एक घोडा बाहेर निघाला. त्यावर बसलेल्या स्वाराला पृथ्वीवरून शांती काढून घेण्याचा अधिकार देण्यात आला. हे यासाठी, की लोकांनी एकमेकांची कत्तल करावी. आणि त्याला एक मोठी तलवार देण्यात आली.+

५ त्याने तिसरा शिक्का उघडला,+ तेव्हा मला तिसऱ्‍या जिवंत प्राण्याचा+ आवाज ऐकू आला. तो म्हणाला: “ये!” आणि पाहा! मला एक काळा घोडा दिसला आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराच्या हातात एक तराजू होता. ६ मग, मला चार जिवंत प्राण्यांच्या मधून एक आवाज ऐकू आला. तो म्हणाला: “एका दिनाराला* एक माप* गहू+ आणि एका दिनाराला तीन मापं जव; आणि जैतुनाचं तेल आणि द्राक्षारस यांची नासाडी करू नको.”+

७ त्याने चौथा शिक्का उघडला, तेव्हा मला चौथ्या जिवंत प्राण्याचा+ आवाज ऐकू आला. तो म्हणाला: “ये!” ८ आणि पाहा! मला फिक्कट रंगाचा एक घोडा दिसला आणि त्याच्यावर जो स्वार बसलेला होता, त्याचं नाव मृत्यू होतं. शिवाय, कबर* त्याच्या पाठोपाठ चालत होती. आणि त्यांना लांब तलवार, दुष्काळ,+ जीवघेणे रोग आणि पृथ्वीवरचे जंगली पशू यांच्याद्वारे लोकांना ठार मारण्यासाठी पृथ्वीच्या चौथ्या भागावर अधिकार देण्यात आला.+

९ त्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मला वेदीच्या खाली+ अशा लोकांचे जीव*+ दिसले, ज्यांना देवाच्या वचनामुळे आणि त्यांनी दिलेल्या साक्षीमुळे ठार मारण्यात आलं होतं.+ १० ते मोठ्याने ओरडून म्हणाले: “हे सर्वोच्च प्रभू, तू पवित्र आणि खरा आहेस,+ तू न्याय करण्यासाठी आणि पृथ्वीवर राहणाऱ्‍यांकडून आमच्या रक्‍ताचा सूड घेण्यासाठी कधीपर्यंत थांबशील?”+ ११ तेव्हा त्या प्रत्येकाला एक पांढरा झगा देण्यात आला+ आणि त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या ज्या सोबतीच्या दासांना आणि भावांना लवकरच ठार मारलं जाणार होतं,+ त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत, त्यांना आणखी थोडा वेळ विश्रांती घ्यायला सांगण्यात आलं.

१२ मग त्याने सहावा शिक्का उघडला तेव्हा मी पाहिलं आणि एक मोठा भूकंप झाला; आणि सूर्य केसांपासून* बनवलेल्या गोणपाटासारखा काळा झाला आणि संपूर्ण चंद्र रक्‍तासारखा झाला.+ १३ आणि जोराच्या वाऱ्‍याने हेलकावणाऱ्‍या अंजिराच्या झाडावरून कच्ची अंजिरं पडावीत, तसे आकाशातले तारे पृथ्वीवर पडले. १४ एखादी गुंडाळी जशी गुंडाळली जाते, तसं आकाश निघून गेलं,+ आणि प्रत्येक पर्वत आणि प्रत्येक बेट त्याच्या जागेवरून काढून टाकण्यात आलं.+ १५ तेव्हा पृथ्वीवरचे राजे, वरिष्ठ अधिकारी, सेनापती, श्रीमंत आणि प्रभावशाली माणसं, प्रत्येक गुलाम आणि प्रत्येक स्वतंत्र व्यक्‍ती गुहांमध्ये आणि पर्वतांच्या खडकांमध्ये लपली.+ १६ आणि हे लोक पर्वतांना आणि खडकांना म्हणू लागले: “आमच्यावर पडा+ आणि जो राजासनावर बसलेला आहे त्याच्यापासून+ आणि कोकऱ्‍याच्या+ क्रोधापासून आम्हाला वाचवा. १७ कारण त्यांच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे+ आणि त्याचा सामना कोण करू शकतो?”+

७ यानंतर, मला चार स्वर्गदूत पृथ्वीच्या चार कोपऱ्‍यांत उभे असलेले दिसले. पृथ्वीवर, समुद्रावर किंवा कोणत्याही झाडावर वारा वाहू नये म्हणून त्यांनी पृथ्वीचे चार वारे अडवून धरले होते. २ मग, सूर्य उगवण्याच्या दिशेने* एक स्वर्गदूत वर येताना मला दिसला. त्याच्याकडे जिवंत देवाचा शिक्का होता. आणि ज्या चार स्वर्गदूतांना पृथ्वीला आणि समुद्राला नुकसान पोहोचवण्याचा अधिकार देण्यात आला होता, त्यांना तो मोठ्या आवाजात हाक मारून म्हणाला: ३ “आपल्या देवाच्या दासांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारेपर्यंत+ पृथ्वीला, समुद्राला किंवा झाडांना नुकसान पोहोचवू नका.”+

४ मग, ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. ते इस्राएलच्या मुलांच्या प्रत्येक वंशातून+ घेतलेले १,४४,०००+ इतके होते:

५ यहूदा वंशातले १२,०००;

रऊबेन वंशातले १२,०००;

गाद वंशातले १२,०००;

६ आशेर वंशातले १२,०००;

नफताली वंशातले १२,०००;

मनश्‍शे+ वंशातले १२,०००;

७ शिमोन वंशातले १२,०००;

लेवी वंशातले १२,०००;

इस्साखार वंशातले १२,०००;

८ जबुलून वंशातले १२,०००;

योसेफ वंशातले १२,०००;

आणि बन्यामीन वंशातले १२,०००, यांच्यावर शिक्का मारण्यात आला.

९ यानंतर पाहा! सर्व राष्ट्रं, वंश, लोक आणि भाषा यांतून आलेला आणि कोणत्याही माणसाला मोजता आला नाही असा एक मोठा लोकसमुदाय,+ शुभ्र झगे घालून+ आणि हातांत खजुराच्या फांद्या घेऊन राजासनासमोर आणि कोकऱ्‍यासमोर उभा असलेला मला दिसला.+ १० ते लोक मोठ्याने अशी घोषणा करत होते: “तारण हे राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून+ आणि कोकऱ्‍याकडून मिळतं.”+

११ सर्व स्वर्गदूत राजासनाच्या, वडिलांच्या+ आणि चार जिवंत प्राण्यांच्या सभोवती उभे होते. त्यांनी राजासनापुढे गुडघे टेकले आणि असं म्हणून देवाला नमन केलं: १२ “आमेन! प्रशंसा, गौरव, बुद्धी, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य आणि शक्‍ती सदासर्वकाळ आमच्या देवाला मिळो.+ आमेन.”

१३ तेव्हा, वडिलांपैकी एकाने मला म्हटलं: “शुभ्र झगे घातलेले+ हे कोण आहेत आणि ते कुठून आले आहेत?” १४ त्यावर मी लगेच त्याला म्हणालो: “माझ्या प्रभू, हे तूच सांगू शकतोस.” तेव्हा तो मला म्हणाला: “जे मोठ्या संकटातून+ बाहेर येतात ते हेच आहेत. त्यांनी आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत.+ १५ म्हणूनच ते देवाच्या राजासनासमोर आहेत आणि त्याच्या मंदिरात रात्रंदिवस त्याची पवित्र सेवा करत आहेत. राजासनावर जो बसला आहे+ तो त्यांच्यावर आपला तंबू पसरवेल.+ १६ यापुढे ते कधी भुकेले किंवा तहानलेले असणार नाहीत. तसंच, सूर्याची किंवा उष्णतेची झळ त्यांना लागणार नाही.+ १७ कारण, राजासनाच्या मधोमध* असलेला कोकरा+ त्यांना मेंढपाळाप्रमाणे+ जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांकडे घेऊन जाईल.+ आणि देव त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल.”+

८ कोकऱ्‍याने+ सातवा शिक्का उघडला+ तेव्हा स्वर्गात सुमारे अर्धा तास शांतता पसरली. २ आणि देवासमोर उभे राहणारे सात स्वर्गदूत+ मला दिसले आणि त्यांना सात कर्णे देण्यात आले.

३ मग, धूप जाळण्याचं सोन्याचं पात्र हातात घेतलेला एक स्वर्गदूत आला आणि वेदीजवळ उभा राहिला.+ त्याला राजासनासमोर असलेल्या सोन्याच्या वेदीवर,+ सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांसोबत अर्पण करण्यासाठी भरपूर धूप+ देण्यात आला. ४ स्वर्गदूताच्या हातातल्या धूपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनांसोबत देवासमोर वर चढला.+ ५ पण, तितक्यात, स्वर्गदूताने धूप जाळण्याचं पात्र घेऊन त्यात वेदीवरचा अग्नी भरला आणि तो पृथ्वीवर टाकला. तेव्हा, ढगांचा गडगडाट झाला, गर्जना ऐकू आल्या, विजा चमकल्या+ आणि भूकंप झाला. ६ आणि सात कर्णे घेतलेले सात स्वर्गदूत आपले कर्णे+ वाजवायला तयार झाले.

७ पहिल्या स्वर्गदूताने आपला कर्णा वाजवला, तेव्हा रक्‍त मिसळलेल्या गारा आणि अग्नी उत्पन्‍न होऊन पृथ्वीवर त्यांचा वर्षाव करण्यात आला.+ यामुळे, पृथ्वीचा एकतृतीयांश भाग जळून गेला; एकतृतीयांश झाडं जळून गेली आणि सर्व हिरव्या वनस्पती जळून गेल्या.+

८ दुसऱ्‍या स्वर्गदूताने आपला कर्णा वाजवला, तेव्हा आगीने पेटलेल्या मोठ्या पर्वतासारखं काहीतरी समुद्रात फेकण्यात आलं.+ आणि त्यामुळे, एकतृतीयांश समुद्राचं रक्‍त झालं;+ ९ आणि समुद्रातले एकतृतीयांश जीव* मरून गेले+ आणि एकतृतीयांश जहाजं फुटली.

१० तिसऱ्‍या स्वर्गदूताने आपला कर्णा वाजवला, तेव्हा मशालीसारखा जळत असलेला एक मोठा तारा आकाशातून पडला. तो एकतृतीयांश नद्यांवर आणि झऱ्‍यांवर पडला.+ ११ त्या ताऱ्‍याचं नाव कडूदवणा* आहे. त्यामुळे एकतृतीयांश पाण्याचा कडूदवणा झाला आणि त्या पाण्याने बरेच लोक मरण पावले, कारण पाणी कडू झालं होतं.+

१२ चौथ्या स्वर्गदूताने आपला कर्णा वाजवला, तेव्हा सूर्याच्या एकतृतीयांश भागाला,+ चंद्राच्या एकतृतीयांश भागाला आणि एकतृतीयांश ताऱ्‍यांना तडाखा बसला. हे यासाठी, की त्यांचा एकतृतीयांश भाग काळवंडून जावा+ आणि दिवसाच्या तसंच रात्रीच्याही एकतृतीयांश भागाला प्रकाश मिळू नये.

१३ आणि पाहा! आकाशाच्या मध्यभागी मला एक गरुड उडताना दिसला. त्याला मी मोठ्या आवाजात असं म्हणताना ऐकलं: “आता आणखी तीन स्वर्गदूत कर्णे वाजवणार आहेत.+ त्यांच्या कर्ण्यांच्या नादामुळे पृथ्वीवर राहणाऱ्‍यांवर विपत्ती, विपत्ती, विपत्ती!”+

९ पाचव्या स्वर्गदूताने कर्णा वाजवला,+ तेव्हा आकाशातून पृथ्वीवर पडलेला एक तारा मला दिसला. त्याला अथांग डोहाच्या+ भुयाराची* किल्ली देण्यात आली. २ त्याने अथांग डोहाचं भुयार* उघडलं, तेव्हा एखाद्या भल्या मोठ्या भट्टीतून निघावा तसा धूर त्यातून निघाला आणि त्या धुरामुळे सूर्य आणि हवासुद्धा काळवंडली.+ ३ आणि धुरातून टोळ निघून पृथ्वीवर आले+ आणि त्यांना शक्‍ती देण्यात आली. पृथ्वीवरच्या विंचवांकडे आहे तशी शक्‍ती त्यांना देण्यात आली. ४ त्यांना अशी आज्ञा देण्यात आली की त्यांनी पृथ्वीवरच्या वनस्पतीला, कोणत्याही हिरव्या रोपाला किंवा झाडाला नुकसान पोहोचवू नये, तर ज्यांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही फक्‍त अशांना हानी करावी.+

५ त्या टोळांना, ठार मारण्याचा नाही, तर लोकांना पाच महिने यातना द्यायचा अधिकार देण्यात आला. एखाद्या विंचवाने माणसाला दंश केल्यावर जशा यातना होतात तशा त्या यातना होत्या.+ ६ त्या दिवसांत लोक मृत्यूचा मार्ग शोधतील, पण त्यांना तो मुळीच सापडणार नाही. ते मरणासाठी आसुसतील, पण मरण त्यांच्यापासून दूर पळेल.

७ टोळांचं स्वरूप, युद्धासाठी तयार केलेल्या घोड्यांसारखं होतं.+ त्यांच्या डोक्यांवर सोन्याच्या मुकुटांसारखं काहीतरी होतं आणि त्यांचे चेहरे माणसांच्या चेहऱ्‍यांसारखे होते. ८ पण, त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते आणि त्यांचे दात सिंहांच्या दातांसारखे होते.+ ९ त्यांचं कवच* लोखंडी कवचांसारखं होतं आणि त्यांच्या पंखांचा आवाज, युद्धात वेगाने धावणाऱ्‍या बऱ्‍याच घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता.+ १० तसंच, त्यांना शेपट्या आणि विंचवांसारख्या नांग्या होत्या. लोकांना पाच महिने यातना देण्याची शक्‍ती त्यांच्या शेपट्यांमध्ये होती.+ ११ अथांग डोहाचा स्वर्गदूत हा त्यांचा राजा आहे.+ इब्री भाषेत त्याचं नाव अबद्दोन,* तर ग्रीक भाषेत अपुल्लोन* असं आहे.

१२ पहिली विपत्ती होऊन गेली आहे. पाहा! या गोष्टी घडून गेल्यावर आणखी दोन विपत्ती येत आहेत.+

१३ सहाव्या स्वर्गदूताने+ कर्णा वाजवला,+ तेव्हा देवासमोर असलेल्या सोन्याच्या वेदीच्या+ शिंगांतून मला एक आवाज ऐकू आला. १४ तो कर्णा घेतलेल्या सहाव्या स्वर्गदूताला म्हणाला: “महान फरात नदीजवळ+ बांधून ठेवलेल्या चार स्वर्गदूतांना मोकळं कर.” १५ तेव्हा, एकतृतीयांश लोकांना ठार मारण्याकरता ज्या चार स्वर्गदूतांना त्या तासासाठी, दिवसासाठी, महिन्यासाठी आणि वर्षासाठी तयार करण्यात आलं होतं, त्यांना मोकळं करण्यात आलं.

१६ घोडेस्वारांच्या सैन्याची संख्या २० कोटी होती; मी त्यांची ही संख्या ऐकली. १७ दृष्टान्तात मला दिसलेले घोडे आणि त्यांवरचे स्वार असे दिसत होते: त्यांचं कवच धगधगत्या आगीसारखं लाल, गडद निळं आणि गंधकासारखं पिवळं होतं. घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी+ असून त्यांच्या तोंडांतून आग, धूर आणि गंधक बाहेर निघालं. १८ या तीन पीडांमुळे, म्हणजे त्यांच्या तोंडांतून निघणारी आग, धूर आणि गंधक यांमुळे एकतृतीयांश लोक ठार मारले गेले. १९ घोड्यांची शक्‍ती ही त्यांच्या तोंडांत आणि शेपट्यांमध्ये आहे. कारण त्यांच्या शेपट्या सापांसारख्या असून त्यांना डोकी आहेत आणि यांच्या मदतीने ते इजा करतात.

२० पण जे बाकीचे लोक या पीडांमुळे मारले गेले नाहीत, त्यांनी आपल्या कार्यांबद्दल पश्‍चात्ताप केला नाही. त्यांनी दुष्ट स्वर्गदूतांची* आणि ज्यांना पाहता, ऐकता किंवा चालता येत नाही अशा सोन्याच्या, चांदीच्या, तांब्याच्या, दगडाच्या आणि लाकडाच्या मूर्तींची उपासना करण्याचं सोडलं नाही.+ २१ तसंच, त्यांनी केलेले खून, भूतविद्या, अनैतिक लैंगिक कृत्यं* आणि चोऱ्‍या यांबद्दल त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही.

१० मग मी आणखी एक शक्‍तिशाली स्वर्गदूत स्वर्गातून खाली येताना पाहिला. त्याने एक ढग पांघरला होता* आणि त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होतं. त्याचा चेहरा सूर्यासारखा+ आणि त्याचे पाय अग्नीच्या खांबांसारखे होते. २ आणि त्याच्या हातात उघडलेली एक लहान गुंडाळी होती. त्याने त्याचा उजवा पाय समुद्रावर, तर डावा पाय पृथ्वीवर ठेवला, ३ आणि सिंहाच्या डरकाळीप्रमाणे तो मोठ्याने ओरडला.+ तो ओरडला तेव्हा ढगांच्या सात गर्जना+ मला ऐकू आल्या.

४ जेव्हा सात गर्जनांचे आवाज आले तेव्हा मी लिहिणारच होतो, पण इतक्यात स्वर्गातून एक आवाज मला ऐकू आला.+ तो म्हणाला: “सात गर्जनांनी सांगितलेल्या गोष्टी शिक्का मारून बंद कर, त्या लिहू नकोस.” ५ समुद्रावर आणि पृथ्वीवर उभा असलेला जो स्वर्गदूत मला दिसला, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे उंचावला. ६ आणि जो सदासर्वकाळ जिवंत राहतो,+ ज्याने आकाश आणि त्यातल्या सर्व गोष्टी तसंच, पृथ्वी आणि तिच्यावरच्या सर्व गोष्टी तसंच, समुद्र आणि त्यातल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या+ त्याची शपथ घेऊन तो म्हणाला: “आता आणखी उशीर होणार नाही. ७ पण, ज्या दिवसांत सातवा स्वर्गदूत+ आपला कर्णा वाजवण्याच्या बेतात असेल,+ तेव्हा देवाचं पवित्र रहस्य+ खऱ्‍या अर्थाने पूर्ण होईल. हे रहस्य त्याने आनंदाचा संदेश म्हणून आपल्या दासांना म्हणजेच संदेष्ट्यांना घोषित केलं होतं.”+

८ आणि स्वर्गातून आलेला आवाज+ पुन्हा माझ्याशी बोलला आणि म्हणाला: “जा, जो स्वर्गदूत समुद्रावर आणि पृथ्वीवर उभा आहे त्याच्या हातातली उघडलेली गुंडाळी घे.”+ ९ मग, मी त्या स्वर्गदूताकडे गेलो आणि ती लहान गुंडाळी मला दे, असं म्हणालो. तेव्हा तो मला म्हणाला: “ही घे आणि खाऊन टाक;+ ती खाल्ल्यावर तुझं पोट कडू होईल, पण तुझ्या तोंडात मात्र ती मधासारखी गोड लागेल.” १० मी स्वर्गदूताच्या हातातून ती लहान गुंडाळी घेतली आणि खाऊन टाकली.+ तेव्हा तोंडात ती मला मधासारखी गोड लागली,+ पण ती खाल्ल्यावर माझं पोट कडू झालं. ११ मग मला असं सांगण्यात आलं: “पुष्कळ लोक, राष्ट्रं आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे, तसंच बरेच राजे यांच्याबद्दल तुला पुन्हा भविष्यवाणी करावी लागेल.”

११ मग, वेतासारखी एक काठी*+ मला देण्यात आली आणि असं सांगण्यात आलं: “ऊठ आणि देवाच्या मंदिराचं* आणि वेदीचं माप घे आणि त्यात उपासना करणारे किती आहेत ते मोज. २ पण मंदिराच्या* बाहेर असलेलं अंगण सोड, त्याचं माप घेऊ नकोस, कारण ते विदेश्‍यांना देण्यात आलं आहे; ते पवित्र नगरीला+ ४२ महिने+ पायांखाली तुडवतील. ३ मी माझ्या दोन साक्षीदारांना पाठवीन आणि ते गोणपाट घालून १,२६० दिवस भविष्यवाणी करतील.” ४ पृथ्वीच्या प्रभूसमोर+ उभी असलेली जैतुनाची दोन झाडं+ आणि दोन दीपवृक्ष+ त्यांना सूचित करतात.

५ त्यांना कोणी इजा करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या तोंडातून आग निघून त्यांच्या शत्रूंना भस्म करून टाकते. जो कोणी त्यांना इजा करायचा प्रयत्न करेल त्याला अशाच प्रकारे ठार मारलं जाईल. ६ त्यांच्या भविष्यवाणी करण्याच्या दिवसांत पाऊस पडू नये म्हणून+ आकाश* बंद करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे.+ तसंच, पाण्याचं रक्‍त करण्याचा+ आणि वाटेल तितक्या वेळा पृथ्वीला सर्व प्रकारच्या पीडांनी पीडित करण्याचाही त्यांना अधिकार आहे.

७ त्यांचं साक्ष देण्याचं कार्य संपल्यावर, अथांग डोहातून वर येणारा जंगली पशू त्यांच्याशी लढाई करेल आणि त्यांच्यावर विजय मिळवून त्यांना ठार मारेल.+ ८ आणि जिला लाक्षणिक अर्थाने सदोम आणि इजिप्त* म्हटलं जातं आणि जिथे त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर* खिळण्यात आलं, त्या मोठ्या नगरीच्या मुख्य रस्त्यावर त्यांचे मृतदेह पडून राहतील. ९ पुष्कळ लोकसमूह, वंश, भाषा आणि राष्ट्रं यांतले लोक साडेतीन दिवस त्यांचे मृतदेह पाहत राहतील+ आणि ते त्यांचे मृतदेह कबरेत ठेवू देणार नाहीत. १० पृथ्वीवर राहणारे लोक त्यांच्याबद्दल आनंद साजरा करतील आणि एकमेकांना भेटी पाठवतील. कारण, या दोन संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्‍यांना यातना दिल्या होत्या.

११ मग, साडेतीन दिवसांनंतर देवापासून असलेली जीवनशक्‍ती त्यांच्यामध्ये आली,+ तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिलं ते फार घाबरले. १२ आणि त्यांना आकाशातून एक मोठा आवाज ऐकू आला. तो त्यांना म्हणाला: “इथे वर या.” मग, ते ढगातून वर आकाशात गेले आणि त्यांच्या शत्रूंनी त्यांना पाहिलं.* १३ त्याच वेळी एक मोठा भूकंप झाला आणि त्या नगरीचा दहावा भाग कोसळला. भूकंपामुळे ७,००० लोक मारले गेले आणि बाकीचे लोक घाबरले आणि त्यांनी स्वर्गाच्या देवाचा गौरव केला.

१४ दुसरी विपत्ती+ होऊन गेली आहे. पाहा! तिसरी विपत्ती लवकरच येत आहे.

१५ सातव्या स्वर्गदूताने आपला कर्णा वाजवला,+ तेव्हा स्वर्गात मोठ्या घोषणा ऐकू आल्या: “जगाचं राज्य आता आपल्या प्रभूचं+ आणि त्याच्या ख्रिस्ताचं झालं+ आहे, आणि तो सदासर्वकाळ राजा म्हणून राज्य करेल.”+

१६ तेव्हा देवासमोर आपल्या राजासनांवर बसलेल्या २४ वडिलांनी+ देवाला नमन करून त्याची उपासना केली. १७ ते म्हणाले: “हे सर्वसमर्थ यहोवा* देवा, तू जो आहेस+ आणि जो होतास, त्या तुझे आम्ही आभार मानतो, कारण तू आपलं महान सामर्थ्य हाती घेतलं आहेस आणि राजा म्हणून राज्य करायला सुरुवात केली आहेस.+ १८ पण, राष्ट्रं क्रोधित झाली आणि तुझा क्रोध प्रकट झाला. मेलेल्यांचा न्याय करण्याची आणि तुझ्या दासांना म्हणजे संदेष्ट्यांना,+ पवित्र जनांना आणि तुझ्या नावाची भीती बाळगणाऱ्‍या लहानमोठ्यांना प्रतिफळ देण्याची+ आणि पृथ्वीचा नाश करणाऱ्‍यांचा नाश करण्याची ठरवलेली वेळ आली.”+

१९ तेव्हा, स्वर्गात देवाचं मंदिर* उघडलं आणि मंदिरात* त्याच्या कराराची पेटी दिसली.+ मग विजा चमकल्या, मोठे आवाज आणि ढगांचे गडगडाट ऐकू आले, भूकंप झाला आणि मोठमोठ्या गारा पडल्या.

१२ मग स्वर्गात एक मोठं चिन्ह दिसलं: सूर्य पांघरलेली, पायांखाली चंद्र असलेली आणि डोक्यावर १२ ताऱ्‍यांचा मुकुट असलेली एक स्त्री+ होती. २ ती गरोदर होती आणि प्रसूतीच्या वेदनांमुळे व्याकूळ होऊन ओरडत होती.

३ स्वर्गात दुसरं एक चिन्ह दिसलं. पाहा! सात डोकी आणि दहा शिंगं असलेला आणि डोक्यांवर सात मुकुट असलेला अग्नीच्या रंगाचा एक मोठा अजगर+ दिसला. ४ त्याच्या शेपटीने आकाशातले एकतृतीयांश तारे+ ओढले आणि पृथ्वीवर टाकले.+ आणि जन्म देण्याच्या बेतात असलेल्या स्त्रीचं+ मूल जन्मताच खाऊन टाकावं म्हणून तो अजगर तिच्यासमोरच उभा राहिला.

५ त्या स्त्रीने एका मुलाला जन्म दिला.+ तो सर्व राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार चालवेल.+ त्या स्त्रीच्या मुलाला हिसकावून घेऊन देवाकडे आणि त्याच्या राजासनाकडे नेण्यात आलं. ६ आणि ती स्त्री ओसाड रानात पळून गेली. तिथे १,२६० दिवस+ तिचं पालनपोषण व्हावं म्हणून देवाने तिच्यासाठी एक ठिकाण तयार केलं होतं.

७ मग, स्वर्गात युद्ध सुरू झालं: मीखाएल*+ आणि त्याचे दूत अजगराविरुद्ध लढले आणि अजगर आणि त्याचे दूतही लढले. ८ पण, त्यांचं काही चाललं नाही* आणि त्यापुढे स्वर्गात त्यांच्यासाठी कोणतंही स्थान उरलं नाही. ९ त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवरच्या लोकांना फसवणाऱ्‍या+ त्या मोठ्या अजगराला,+ म्हणजेच दियाबल+ आणि सैतान+ म्हटलेल्या त्या जुन्या सापाला+ खाली फेकण्यात आलं. त्याला पृथ्वीवर फेकून देण्यात आलं+ आणि त्याच्यासोबत त्याच्या दूतांनाही फेकण्यात आलं. १० तेव्हा, स्वर्गातून आलेला एक मोठा आवाज मी ऐकला. तो म्हणाला:

“आता आमच्या देवाकडून मिळणारं तारण,+ त्याचं सामर्थ्य, राज्य+ आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार स्थापन झाला आहे. कारण आमच्या बांधवांवर दोष लावणाऱ्‍याला खाली फेकण्यात आलं आहे. तो रात्रंदिवस आमच्या देवासमोर त्यांच्यावर दोष लावत असतो!+ ११ आणि त्यांनी कोकऱ्‍याच्या रक्‍तामुळे+ आणि आपण घोषित केलेल्या संदेशामुळे*+ त्याला जिंकलं+ आणि मृत्यूचा सामना करत असतानाही त्यांनी स्वतःच्या जिवांची* पर्वा केली नाही.+ १२ त्यामुळे स्वर्गांनो आणि त्यात राहणाऱ्‍यांनो आनंद साजरा करा! पृथ्वी आणि समुद्र यांच्यावर मात्र मोठी विपत्ती ओढवली आहे.+ कारण आपला फार कमी वेळ उरला आहे+ हे ओळखून सैतान* खूप क्रोधित होऊन खाली तुमच्याकडे आला आहे.”

१३ आपल्याला खाली पृथ्वीवर फेकण्यात आलं+ आहे असं अजगराने पाहिलं, तेव्हा ज्या स्त्रीने मुलाला जन्म दिला होता तिचा त्याने छळ केला.+ १४ पण, त्या स्त्रीने ओसाड रानात आपल्या ठिकाणी उडून जावं म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख+ देण्यात आले. तिथे सापाच्या+ तोंडापासून दूर राहून एक काळ, दोन काळ आणि अर्धा काळ*+ तिचं पालनपोषण होणार होतं.

१५ आणि ती स्त्री वाहून जावी म्हणून सापाने तिच्यामागून नदीसारखा पाण्याचा प्रवाह आपल्या तोंडातून सोडला. १६ पण, पृथ्वीने स्त्रीची मदत केली आणि अजगराने तोंडातून सोडलेली नदी पृथ्वीने आपलं तोंड उघडून गिळून टाकली. १७ त्यामुळे, अजगर स्त्रीवर संतापला आणि तिच्या संततीपैकी* जे उरले आहेत,+ म्हणजे जे देवाच्या आज्ञांचं पालन करतात आणि ज्यांना येशूबद्दल साक्ष देण्याचं कार्य नेमण्यात आलं आहे, त्यांच्यासोबत युद्ध करायला निघून गेला.+

१३ आणि तो* समुद्राच्या वाळूवर उभा राहिला.

आणि एक जंगली पशू+ समुद्रातून+ वर येताना मला दिसला. त्याला दहा शिंगं आणि सात डोकी होती आणि त्याच्या शिंगांवर दहा मुकुट होते. पण, त्याच्या डोक्यांवर देवाची निंदा करणारी नावं होती. २ मी जो जंगली पशू पाहिला तो एका चित्त्यासारखा होता, पण त्याचे पाय अस्वलाच्या पायांसारखे आणि तोंड सिंहाच्या तोंडासारखं होतं. अजगराने+ या पशूला आपली शक्‍ती, आपलं राजासन आणि मोठा अधिकार दिला.+

३ त्याच्या एका डोक्याला जणू जीवघेणी जखम झाल्याचं मला दिसलं; जखम जीवघेणी असली, तरी ती बरी झाली होती,+ आणि सगळं जग आश्‍चर्य करत त्या जंगली पशूच्या मागे गेलं. ४ त्यांनी अजगराची उपासना केली, कारण त्यानेच जंगली पशूला अधिकार दिला होता. आणि “जंगली पशूसारखं कोण आहे आणि त्याच्याशी कोण लढू शकेल?” असं म्हणत त्यांनी जंगली पशूचीही उपासना केली. ५ त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारं आणि देवाची निंदा करणारं तोंड देण्यात आलं आणि ४२ महिने+ आपल्या मनासारखं वागण्याचा अधिकार त्याला देण्यात आला. ६ आणि त्याने आपलं तोंड उघडून देवाची, म्हणजे त्याच्या नावाची आणि त्याच्या निवासस्थानाची, इतकंच काय तर स्वर्गात राहणाऱ्‍यांचीही निंदा केली.+ ७ त्याला पवित्र जनांविरुद्ध लढण्याची आणि त्यांच्यावर विजय मिळवण्याची परवानगी देण्यात आली.+ तसंच त्याला प्रत्येक वंश, लोक, भाषा आणि राष्ट्र यांवर अधिकार देण्यात आला. ८ पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्याची उपासना करतील. जगाच्या स्थापनेपासून, यांच्यापैकी एकाचंही नाव वधलेल्या कोकऱ्‍याच्या+ जीवनाच्या पुस्तकात*+ लिहिण्यात आलेलं नाही.

९ ज्याला कान आहे त्याने ऐकावं.+ १० जर कोणाला कैद केलं जाणार असेल, तर त्याला कैद केलं जाईल. जो कोणी एखाद्याला तलवारीने ठार मारेल,* त्याला तलवारीने ठार मारण्यात येईल.+ म्हणूनच, पवित्र जनांना+ धीराची+ आणि विश्‍वासाची+ गरज आहे.

११ मग, आणखी एक जंगली पशू पृथ्वीतून वर येताना मला दिसला. त्याला कोकऱ्‍यासारखी दोन शिंगं होती, पण तो अजगरासारखा बोलू लागला.+ १२ तो त्या पहिल्या जंगली पशूचा+ सर्व अधिकार त्याच्यासमोर चालवतो. आणि ज्याची जीवघेणी जखम बरी झाली होती, त्या पहिल्या जंगली पशूची उपासना करायला तो पृथ्वीला आणि तिच्या रहिवाशांना भाग पाडतो.+ १३ आणि तो मोठमोठी चिन्हं करतो; लोकांसमोर आकाशातून पृथ्वीवर अग्नीचा वर्षावही करतो.

१४ त्याला जंगली पशूसमोर जी चिन्हं घडवून आणण्याची परवानगी देण्यात आली होती, त्यांद्वारे तो पृथ्वीवर राहणाऱ्‍यांना फसवतो. त्यासोबतच, पृथ्वीवर राहणाऱ्‍यांना तो त्या जंगली पशूची मूर्ती बनवायलाही सांगतो,+ जो तलवारीचा घाव सोसूनसुद्धा वाचला होता.+ १५ आणि त्याला जंगली पशूच्या मूर्तीमध्ये श्‍वास फुंकण्याची परवानगी देण्यात आली. हे यासाठी, की जंगली पशूच्या मूर्तीने बोलावं आणि जे जंगली पशूच्या मूर्तीची उपासना करत नाहीत त्या सर्वांची हत्या घडवून आणावी.

१६ तो लहान-मोठे, गरीब-श्रीमंत, स्वतंत्र आणि गुलाम अशा सर्व लोकांना बळजबरी करतो. हे यासाठी, की त्यांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करवून घ्यावी.+ १७ आणि ज्या व्यक्‍तीवर ती खूण, म्हणजे जंगली पशूचं नाव+ किंवा त्याच्या नावाची संख्या+ आहे, त्या व्यक्‍तीशिवाय कोणीही खरेदी किंवा विक्री करू नये. १८ ही गोष्ट समजून घेण्यासाठी बुद्धीची गरज आहे: ज्याच्याकडे सखोल समज आहे त्याने जंगली पशूच्या संख्येचा हिशोब करावा, कारण ती एका माणसाची संख्या* आहे, आणि त्याची संख्या ६६६ आहे.+

१४ मग पाहा! कोकरा+ सीयोन पर्वतावर+ उभा असलेला मला दिसला आणि त्याच्यासोबत १,४४,००० जण होते.+ त्यांच्या कपाळांवर कोकऱ्‍याचं आणि त्याच्या पित्याचं नाव लिहिलेलं होतं.+ २ आणि स्वर्गातून पाण्याच्या पुष्कळ प्रवाहांसारखा आणि ढगांच्या गर्जनेसारखा मोठा आवाज मला ऐकू आला. तो आवाज वीणा वाजवणाऱ्‍या गायकांसारखा होता. ३ ते राजासनासमोर, चार जिवंत प्राण्यांसमोर+ आणि वडीलजनांसमोर+ जणू एक नवीन गीत गात होते.+ आणि पृथ्वीवरून विकत घेतलेल्या १,४४,००० जणांशिवाय+ आणखी कोणालाही ते गीत शिकता येत नव्हतं. ४ ज्यांनी स्त्रियांशी संबंध ठेवून स्वतःला दूषित केलं नाही, ते हेच आहेत. खरंतर, ते शुद्ध आहेत.+ कोकरा जिथे जिथे जातो, तिथे तिथे त्याच्यामागे जाणारे ते हेच आहेत.+ त्यांना देवासाठी आणि कोकऱ्‍यासाठी पहिलं फळ+ म्हणून मानवजातीतून विकत घेण्यात आलं होतं,+ ५ आणि त्यांच्या तोंडात कोणतंही कपट दिसून आलं नाही; ते निष्कलंक आहेत.+

६ नंतर, आकाशाच्या मधोमध* उडणारा आणखी एक स्वर्गदूत मला दिसला आणि त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्‍यांना म्हणजे प्रत्येक लोकसमूहाच्या, राष्ट्राच्या, वंशाच्या आणि भाषेच्या लोकांना घोषित करण्यासाठी सर्वकाळाचा आनंदाचा संदेश होता.+ ७ तो मोठ्या आवाजात असं म्हणत होता: “देवाची भीती बाळगा आणि त्याचा गौरव करा, कारण न्याय करण्याची त्याची वेळ आली आहे.+ म्हणून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र+ आणि पाण्याचे झरे निर्माण केले त्याची उपासना करा.”

८ मग, त्याच्यामागून दुसरा स्वर्गदूत आला आणि म्हणाला: “ती पडली आहे! मोठी बाबेल,+ जिने सर्व राष्ट्रांना आपल्या अनैतिक लैंगिक कृत्यांच्या* वासनेचा* द्राक्षारस प्यायला लावला,+ ती पडली आहे!”+

९ मग, त्याच्यामागून तिसरा स्वर्गदूत आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला: “जो कोणी जंगली पशूची+ आणि त्याच्या मूर्तीची उपासना करतो आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर खूण करून घेतो,+ १० तो देवाच्या क्रोधाचा निर्भेळ* द्राक्षारसही पिईल. हा द्राक्षारस त्याच्या क्रोधाच्या प्याल्यात+ ओतण्यात आला आहे. त्याला पवित्र जनांसमोर आणि कोकऱ्‍यासमोर अग्नी आणि गंधक यांनी यातना दिल्या जातील.+ ११ त्यांच्या यातनेचा* धूर सदासर्वकाळ वर चढत जातो.+ आणि जे जंगली पशूची आणि त्याच्या मूर्तीची उपासना करतात, तसंच, जे त्याच्या नावाची खूण स्वतःवर करून घेतात, त्यांना रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही.+ १२ म्हणूनच, जे देवाच्या आज्ञा पाळतात आणि येशूवरचा* विश्‍वास बळकट धरून ठेवतात+ त्या पवित्र जनांना धीराची गरज आहे.”+

१३ मग मी स्वर्गातून एक आवाज ऐकला. तो म्हणाला, “लिही: इथून पुढे जे प्रभूसोबत ऐक्यात मरण पावतात ते मेलेले लोक सुखी आहेत.+ पवित्र शक्‍ती* म्हणते, खरंच त्यांना आपल्या कठोर परिश्रमांपासून विश्रांती मिळो, कारण त्यांनी केलेली कार्यं थेट त्यांच्यासोबत जातात.”

१४ त्यानंतर पाहा! मला एक पांढरा ढग आणि मनुष्याच्या मुलासारखा+ कोणीतरी त्या ढगावर बसलेला दिसला. त्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट होता आणि त्याच्या हातात धारदार विळा होता.

१५ मग, आणखी एक स्वर्गदूत मंदिरातून* निघाला आणि जो ढगावर बसला होता त्याला मोठ्याने हाक मारून म्हणाला: “तुझा विळा चालव आणि कापणी कर, कारण कापणीची वेळ आली आहे आणि पृथ्वीचं पीक पूर्णपणे तयार झालं आहे.”+ १६ तेव्हा ढगावर जो बसला होता त्याने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीची कापणी करण्यात आली.

१७ मग आणखी एक स्वर्गदूत स्वर्गातल्या मंदिरातून निघाला आणि त्याच्याही हातात एक धारदार विळा होता.

१८ मग आणखी एक स्वर्गदूत वेदीतून निघाला. त्याला अग्नीवर अधिकार होता आणि ज्याच्या हातात धारदार विळा होता त्याला तो मोठ्याने हाक मारून म्हणाला: “तुझा विळा चालव आणि पृथ्वीवरच्या द्राक्षवेलींचे घड गोळा कर, कारण तिची द्राक्षं पिकली आहेत.”+ १९ तेव्हा स्वर्गदूताने पृथ्वीवर आपला विळा चालवला आणि पृथ्वीवरचे द्राक्षवेलींचे घड गोळा केले आणि ते देवाच्या क्रोधाच्या द्राक्षकुंडात टाकले.+ २० द्राक्षकुंड शहराबाहेर तुडवण्यात आलं, तेव्हा घोड्यांच्या लगामांपर्यंत पोहोचेल इतकं रक्‍त द्राक्षकुंडातून बाहेर आलं आणि सुमारे ३०० किलोमीटर* दूर वाहत गेलं.

१५ नंतर, स्वर्गात आणखी एक मोठं आणि अद्‌भुत असं चिन्ह मला दिसलं. मला सात स्वर्गदूत+ दिसले. त्यांच्याजवळ सात पीडा होत्या. या शेवटच्या पीडा आहेत, कारण त्यांद्वारे देवाचा क्रोध संपतो.+

२ मग, अग्नी मिसळलेल्या काचेच्या समुद्रासारखं काहीतरी+ मला दिसलं. आणि जे जंगली पशूवर, त्याच्या मूर्तीवर+ आणि त्याच्या नावाच्या संख्येवर+ विजय मिळवतात,+ ते देवाच्या वीणा हातात घेऊन काचेच्या समुद्राजवळ उभे होते. ३ ते देवाचा सेवक मोशे+ याचं गीत आणि कोकऱ्‍याचं+ गीत गाऊन म्हणत होते:

“हे सर्वसमर्थ यहोवा* देवा,+ तुझी कार्यं महान आणि अद्‌भुत आहेत.+ हे अनंतकाळच्या राजा,+ तुझे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत.+ ४ हे यहोवा* तुझी भीती कोण बाळगणार नाही? तुझा गौरव कोण करणार नाही? कारण, फक्‍त तूच एकनिष्ठ आहेस.+ सर्व राष्ट्रं तुझ्यापुढे येऊन तुझी उपासना करतील.+ कारण तुझा न्याय नीतिमान असल्याचं प्रकट झालं आहे.”

५ यानंतर, स्वर्गात मला साक्षीच्या मंडपाचं पवित्र स्थान*+ उघडलेलं दिसलं,+ ६ आणि ज्यांच्याजवळ सात पीडा होत्या ते सात स्वर्गदूत+ पवित्र स्थानातून बाहेर आले. त्यांनी शुभ्र, तेजस्वी मलमलीची वस्त्रं घातली होती आणि छातीला सोन्याचे पट्टे गुंडाळले होते. ७ चार जिवंत प्राण्यांपैकी एकाने त्या सात स्वर्गदूतांना सात सोन्याच्या वाट्या दिल्या. त्या सदासर्वकाळ जिवंत राहणाऱ्‍या देवाच्या क्रोधाने भरलेल्या होत्या.+ ८ आणि देवाच्या गौरवापासून आणि सामर्थ्यापासून निघालेल्या धुराने संपूर्ण पवित्र स्थान भरून गेलं.+ त्या सात स्वर्गदूतांकडे असलेल्या सात पीडा+ संपेपर्यंत कोणीही पवित्र स्थानात जाऊ शकत नव्हतं.

१६ मग, पवित्र स्थानातून* एक मोठा आवाज मला ऐकू आला.+ तो त्या सात स्वर्गदूतांना म्हणाला: “जा आणि देवाच्या क्रोधाने भरलेल्या सात वाट्या पृथ्वीवर ओता.”+

२ पहिला स्वर्गदूत निघून गेला आणि त्याने आपली वाटी पृथ्वीवर ओतली.+ तेव्हा, ज्या लोकांवर जंगली पशूची खूण+ होती आणि जे त्याच्या मूर्तीची उपासना करत होते,+ त्यांना वेदनादायक आणि भयंकर फोड आले.+

३ दुसऱ्‍या स्वर्गदूताने आपली वाटी समुद्रावर ओतली,+ तेव्हा समुद्रातलं पाणी मेलेल्या माणसाच्या रक्‍तासारखं झालं+ आणि प्रत्येक जिवंत प्राणी,* हो, समुद्रात असलेलं सर्वकाही मरून गेलं.+

४ तिसऱ्‍या स्वर्गदूताने आपली वाटी नद्यांवर आणि पाण्याच्या झऱ्‍यांवर ओतली,+ तेव्हा त्यांचं रक्‍त झालं.+ ५ मग, पाण्यावर अधिकार असलेल्या स्वर्गदूताला मी असं म्हणताना ऐकलं: “हे एकनिष्ठ देवा,+ तू जो आहेस आणि होतास,+ तू नीतिमान आहेस, कारण तू हा न्यायनिवाडा केला आहेस.+ ६ त्यांनी पवित्र जनांचं आणि संदेष्ट्यांचं रक्‍त सांडलं,+ आणि तू त्यांना रक्‍त प्यायला दिलं आहेस;+ ते याच लायकीचे आहेत.”+ ७ मग मी वेदीला असं म्हणताना ऐकलं: “हे सर्वसमर्थ यहोवा* देवा,+ खरंच, तुझे निर्णय* खरे आणि न्यायाला धरून आहेत.”+

८ चौथ्या स्वर्गदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली+ आणि लोकांना अग्नीने होरपळून टाकण्याचा अधिकार सूर्याला देण्यात आला. ९ आणि भयंकर उष्णतेमुळे लोक होरपळून गेले, पण त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही. उलट, त्यांनी देवाच्या नावाची निंदा केली आणि या पीडांवर अधिकार असलेल्या देवाचा गौरव केला नाही.

१० पाचव्या स्वर्गदूताने आपली वाटी जंगली पशूच्या राजासनावर ओतली, तेव्हा त्याच्या राज्यावर अंधार पसरला,+ आणि वेदनेमुळे लोक जिभा चावू लागले. ११ पण त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही. उलट, आपल्या वेदनांमुळे आणि फोडांमुळे त्यांनी स्वर्गाच्या देवाची निंदा केली.

१२ सहाव्या स्वर्गदूताने फरात महानदीवर+ आपली वाटी ओतली, तेव्हा सूर्याच्या उगवतीपासून* येणाऱ्‍या राजांसाठी मार्ग तयार व्हावा म्हणून+ नदीतलं पाणी आटून गेलं.+

१३ आणि अजगराच्या+ तोंडातून, जंगली पशूच्या तोंडातून आणि खोट्या संदेष्ट्याच्या तोंडातून बेडकांसारखी दिसणारी तीन अशुद्ध प्रेरित वचनं बाहेर येताना मला दिसली. १४ ती मुळात, दुष्ट स्वर्गदूतांनी* प्रेरित केलेली वचनं आहेत आणि ती चमत्कार करतात.+ तसंच, ती संपूर्ण पृथ्वीवरच्या राजांकडे जाऊन त्यांना सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या युद्धासाठी+ एकत्र करतात.+

१५ “पाहा! मी चोरासारखा येत आहे.+ जो जागा राहतो,+ तसंच आपण उघडंवाघडं फिरू नये आणि लोकांसमोर लज्जित होऊ नये म्हणून आपली बाहेरची वस्त्रं राखतो, तो सुखी आहे.”+

१६ आणि त्यांनी इब्री भाषेत हर्मगिदोन* म्हटलेल्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणलं.+

१७ सातव्या स्वर्गदूताने आपली वाटी हवेत ओतली, तेव्हा पवित्र स्थानातून,* राजासनापासून एक आवाज ऐकू आला.+ तो म्हणाला: “पूर्ण झालं आहे!” १८ आणि विजा चमकल्या, आवाज आणि ढगांचे गडगडाट ऐकू आले आणि पृथ्वीवर मानव निर्माण झाल्यापासून कधीही आला नव्हता, इतका मोठा आणि भयंकर भूकंप आला.+ १९ त्या मोठ्या नगरीचे+ तीन भाग झाले, आणि राष्ट्रांतली शहरं कोसळून पडली; आणि देवासमोर मोठ्या बाबेलची+ आठवण करण्यात आली. हे यासाठी, की त्याने त्याच्या क्रोधाच्या आणि संतापाच्या द्राक्षारसाचा प्याला तिला द्यावा.+ २० तसंच, प्रत्येक बेट नाहीसं झालं आणि पर्वतांचा ठावठिकाणा राहिला नाही.+ २१ मग, लोकांवर आकाशातून मोठमोठ्या गारा पडल्या+ आणि प्रत्येक गारेचं वजन सुमारे २० किलो* इतकं होतं. गारांच्या या पीडेमुळे+ लोकांनी देवाची निंदा केली, कारण ती पीडा खरोखरच महाभयंकर होती.

१७ मग सात वाट्या घेतलेल्या सात स्वर्गदूतांपैकी+ एक जण आला आणि मला म्हणाला: “ये, पाण्याच्या पुष्कळ प्रवाहांवर बसलेल्या त्या मोठ्या वेश्‍येवर न्यायदंड कसा बजावला जाईल ते मी तुला दाखवतो.+ २ पृथ्वीवरच्या राजांनी तिच्यासोबत अनैतिक लैंगिक कृत्यं* केली+ आणि पृथ्वीवर राहणारे लोक तिच्या अनैतिक लैंगिक कृत्यांचा* द्राक्षारस पिऊन धुंद झाले होते.”+

३ त्या स्वर्गदूताने मला पवित्र शक्‍तीच्या* सामर्थ्याने एका ओसाड रानात नेलं. तिथे, एका गडद लाल रंगाच्या जंगली पशूवर बसलेली स्त्री मला दिसली. त्या पशूच्या अंगावर देवाची निंदा करणारी नावं होती. त्याला सात डोकी आणि दहा शिंगं होती. ४ त्या स्त्रीने जांभळ्या आणि गडद लाल रंगाचे कपडे घातले होते+ आणि ती सोनं, मौल्यवान रत्नं आणि मोती यांनी सजलेली होती.+ तिच्या हातात एक सोन्याचा प्याला होता. तो घृणास्पद गोष्टींनी आणि तिच्या अनैतिक लैंगिक कृत्यांच्या* अशुद्ध गोष्टींनी भरलेला होता. ५ तिच्या कपाळावर: “मोठी बाबेल, वेश्‍यांची आणि पृथ्वीवरच्या घृणास्पद गोष्टींची आई,”+ असं गूढ अर्थाचं नाव लिहिलं होतं. ६ ती स्त्री पवित्र जनांचं रक्‍त आणि येशूच्या साक्षीदारांचं रक्‍त पिऊन धुंद झालेली मला दिसली.+

तिला पाहून मला फार आश्‍चर्य वाटलं. ७ तेव्हा, स्वर्गदूत मला म्हणाला: “तुला इतकं आश्‍चर्य का वाटलं? त्या स्त्रीचं आणि सात डोकी आणि दहा शिंगं असलेल्या ज्या जंगली पशूवर+ ती बसली आहे, त्याचं रहस्य मी तुला सांगतो:+ ८ तुला दिसलेला जंगली पशू, आधी होता, पण आता नाही; तरीसुद्धा तो लवकरच अथांग डोहातून+ वर येईल आणि त्याचा नाश केला जाईल. तो जंगली पशू आधी होता, पण आता नाही आणि तरी पुन्हा हजर होईल हे पाहून पृथ्वीवर राहणारे, म्हणजे ज्यांची नावं जगाच्या स्थापनेपासून जीवनाच्या पुस्तकात* लिहिण्यात आलेली नाहीत,+ ते आश्‍चर्यचकित होतील.

९ ही गोष्ट समजून घेण्यासाठी बुद्धीची आणि ज्ञानाची गरज आहे: ती सात डोकी+ म्हणजे सात पर्वत. त्यांवर ती स्त्री बसली आहे. १० तसंच, सात राजे आहेत: त्यांच्यापैकी पाच पडले आहेत, एक आहे आणि एक अजून आलेला नाही. पण, तो येईल तेव्हा त्याला थोडा काळ राहावं लागेल. ११ आणि जो जंगली पशू होता, पण आता नाही,+ तो आठवा राजासुद्धा आहे; पण, तो सातांपासून झाला आहे, आणि त्याचा नाश होईल.

१२ जी दहा शिंगं तू पाहिली ती दहा राजांना सूचित करतात. त्यांना अजूनपर्यंत राज्य मिळालेलं नाही; पण त्यांना जंगली पशूसोबत एका तासासाठी राजांसारखा अधिकार मिळतो. १३ त्या सगळ्यांचा एकच विचार आहे आणि म्हणून ते जंगली पशूला आपलं सामर्थ्य आणि अधिकार देतात. १४ ते कोकऱ्‍यासोबत+ लढतील, पण कोकरा त्यांच्यावर विजय मिळवेल,+ कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे.+ तसंच, जे बोलावण्यात आलेले, निवडलेले आणि विश्‍वासू जन त्याच्यासोबत आहेत तेसुद्धा विजय मिळवतील.”+

१५ तो स्वर्गदूत मला म्हणाला: “जे पाण्याचे प्रवाह तू पाहिले, ज्यांच्यावर ती वेश्‍या बसली होती ते खरंतर लोक, जनसमुदाय, राष्ट्रं आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे आहेत.+ १६ तसंच, दहा शिंगं+ आणि तू पाहिलेला जंगली पशू+ हे वेश्‍येचा तिरस्कार करतील.+ ते तिला उद्ध्‌वस्त आणि नग्न करतील तसंच, तिचं मांस खातील आणि तिला आगीत पूर्णपणे जाळून टाकतील.+ १७ कारण, देवाने आपला विचार पूर्ण करण्याचं त्यांच्या मनात घातलं;+ हो, देवाची वचनं पूर्ण होईपर्यंत त्यांनी आपलं राज्य जंगली पशूला देण्याद्वारे+ त्यांचा जो एकच विचार आहे तो पूर्ण करावा, असं देवाने त्यांच्या मनात घातलं. १८ आणि तू पाहिलेली स्त्री+ म्हणजे पृथ्वीवरच्या राजांवर राज्य करणारी महानगरी आहे.”

१८ यानंतर, मला आणखी एक स्वर्गदूत स्वर्गातून उतरताना दिसला. त्याच्याकडे मोठा अधिकार होता आणि त्याच्या गौरवाच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. २ तो मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला: “ती पडली आहे! मोठी बाबेल पडली आहे!+ ती दुष्ट स्वर्गदूतांचं* निवासस्थान बनली आहे. तिथे दुष्ट स्वर्गदूत आणि अशुद्ध आणि घृणित पक्षी राहतात!+ ३ कारण, तिच्या अनैतिक लैंगिक कृत्यांच्या* वासनेचा* द्राक्षारस प्यायल्यामुळे सर्व राष्ट्रं तिला बळी पडली आहेत.+ पृथ्वीवरच्या राजांनी तिच्यासोबत अनैतिक लैंगिक कृत्यं केली+ आणि तिच्या निर्लज्ज ऐशआरामाच्या प्रभावामुळे पृथ्वीवरचे व्यापारी* श्रीमंत झाले.”

४ मग, स्वर्गातून आलेला आणखी एक आवाज मी ऐकला. तो म्हणाला: “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे भागीदार होऊ नये आणि तुमच्यावर तिच्या कोणत्याही पीडा येऊ नयेत म्हणून+ तिच्यामधून बाहेर या!+ ५ कारण तिच्या पापांची रास थेट आकाशापर्यंत पोहोचली आहे+ आणि देवाने तिच्या अन्यायी कृत्यांची* आठवण केली आहे.+ ६ तिने इतरांना जसं वागवलं, तसंच तिच्याशी वागा;+ हो, तिने जे काही केलं त्याच्या दुप्पट तिला द्या+ आणि तिने प्याल्यात+ जे मिसळलं, त्याच्या दुप्पट तिच्यासाठी मिसळा.+ ७ तिने जितकं स्वतःला गौरवलं आणि निर्लज्जपणे ऐशआराम केला, तितक्या यातना आणि दुःख तिला द्या. कारण ती मनातल्या मनात म्हणते: ‘मी तर राणीसारखी बसले आहे. मी काही विधवा नाही आणि माझ्या वाट्याला कधीही दुःख येणार नाही.’+ ८ म्हणून मरण, दुःख, दुष्काळ या सगळ्या पीडा एकाच दिवशी तिच्यावर येतील. तिला आगीत पूर्णपणे जाळून टाकलं जाईल,+ कारण ज्याने तिचा न्याय केला, तो यहोवा* देव सामर्थ्यशाली आहे.+

९ आणि पृथ्वीवरच्या ज्या राजांनी तिच्यासोबत अनैतिक लैंगिक कृत्यं* केली आणि जे तिच्यासोबत निर्लज्जपणे ऐशआरामात राहिले, ते जेव्हा तिच्या जळण्याचा धूर पाहतील, तेव्हा ते रडतील आणि दुःखाने छाती बडवून घेतील. १० तिच्या यातनेच्या भीतीने ते दूर उभे राहतात आणि म्हणतात: ‘अरेरे बाबेल नगरी! तू किती सामर्थ्यशाली महानगरी होतीस! किती वाईट झालं तुझ्यासोबत!+ कारण एका क्षणात तुझ्यावर न्यायदंड बजावण्यात आला!’

११ तसंच, पृथ्वीचे व्यापारीसुद्धा तिच्यासाठी रडतात आणि शोक करतात. कारण त्यांचा सगळा माल विकत घेणारा आता कोणीही नाही. १२ तो सगळा माल म्हणजे: सोनं, चांदी, मौल्यवान रत्नं, मोती, चांगल्या प्रतीचं मलमलीचं कापड, जांभळं कापड, रेशमी आणि लाल कापड; सुगंधी लाकडापासून बनवलेल्या वस्तू आणि हस्तिदंतापासून तयार केलेल्या निरनिराळ्या वस्तू; तसंच, मौल्यवान लाकूड, तांबं, लोखंड आणि संगमरवर यांपासून बनवलेली प्रत्येक वस्तू; १३ शिवाय दालचिनी, मसाले,* धूप, सुगंधी तेल, ऊद,* द्राक्षारस, जैतुनाचं तेल, चांगलं पीठ, गहू, गुरं, मेंढरं, घोडे, रथ, गुलाम आणि मानवी जीव. १४ ज्या उत्तम फळांची तुला आवड होती, ती आता तुझ्याजवळ नाहीत. सगळे स्वादिष्ट पदार्थ आणि चैनीच्या वस्तू तुझ्यापासून नाहीशा झाल्या आहेत. त्या पुन्हा कधीच तुला मिळणार नाहीत.

१५ या गोष्टी विकणारे आणि तिच्यामुळे श्रीमंत झालेले व्यापारी तिच्या यातनेच्या भीतीने दूर उभे राहून रडतील आणि शोक करतील. १६ ते म्हणतील: ‘अरेरे! चांगल्या प्रतीच्या मलमलीचे कपडे, जांभळे आणि लाल कपडे घातलेली आणि सोनं, चांदी, मौल्यवान रत्नं आणि मोती यांनी सजलेली महानगरी!+ किती वाईट झालं तुझ्यासोबत! १७ कारण एका क्षणात तुझी ही अमाप संपत्ती उद्ध्‌वस्त झाली!’

आणि जहाजाचा प्रत्येक चालक, प्रत्येक समुद्रप्रवासी, सर्व खलाशी आणि समुद्रावर उद्योगधंदा करून पोट भरणारे सर्व जण दूर उभे राहिले. १८ तिच्या जळण्याचा धूर पाहून ते आक्रोश करत म्हणाले: ‘या महानगरीसारखी कोणती नगरी आहे?’ १९ त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली आणि आक्रोश करत, रडत आणि शोक करत ते म्हणाले: ‘अरेरे! या महानगरीचं किती वाईट झालं! समुद्रावर ज्यांची जहाजं होती ते सर्व तिच्या धनसंपत्तीमुळे श्रीमंत झाले होते! पण एकाच क्षणात ती उद्ध्‌वस्त झाली!’+

२० हे स्वर्गा,+ तसंच पवित्र जनांनो,+ प्रेषितांनो आणि संदेष्ट्यांनो तिच्याबद्दल आनंद साजरा करा. कारण, देवाने तुमच्यासाठी तिच्यावर आपला न्यायदंड बजावला आहे!”+

२१ आणि एका शक्‍तिशाली स्वर्गदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा दगड उचलला आणि तो समुद्रात फेकून तो म्हणाला: “अशाच प्रकारे महानगरी बाबेलला एका झटक्यात फेकून दिलं जाईल आणि पुन्हा कधीच तिचा पत्ता लागणार नाही.+ २२ आणि वीणा वाजवणाऱ्‍या गायकांचा, संगीतकारांचा, बासरी वाजवणाऱ्‍यांचा आणि कर्णा वाजवणाऱ्‍यांचा आवाज पुन्हा कधीच तुझ्यात ऐकू येणार नाही. कोणताही कारागीर पुन्हा कधीच तुझ्यात सापडणार नाही; आणि जात्याचा आवाज पुन्हा कधीच तुझ्यात ऐकू येणार नाही. २३ दिव्याचा प्रकाश पुन्हा कधीच तुझ्यात चमकणार नाही, आणि वधूवरांचा आवाज पुन्हा कधीच तुझ्यात ऐकू येणार नाही. कारण, तुझे व्यापारी पृथ्वीवरचे प्रतिष्ठित लोक होते आणि तुझ्या भूतविद्येमुळे+ सर्व राष्ट्रांची फसवणूक झाली होती. २४ हो, तिच्यामध्ये संदेष्ट्यांचं, पवित्र जनांचं+ आणि पृथ्वीवर वध करण्यात आलेल्या सर्वांचं रक्‍त आढळलं.”+

१९ यानंतर, स्वर्गात एका मोठ्या लोकसमुदायाच्या आवाजासारखा मोठा आवाज मला ऐकू आला. तो म्हणाला: “याहची स्तुती करा!*+ तारण, गौरव आणि सामर्थ्य आमच्या देवाचं आहे. २ कारण त्याचे निर्णय खरे आणि न्यायाला धरून आहेत.+ ज्या मोठ्या वेश्‍येने आपल्या अनैतिक लैंगिक कृत्यांनी* पृथ्वी भ्रष्ट केली, तिच्यावर त्याने न्यायदंड बजावला आहे. तिच्या हातांना लागलेल्या* आपल्या दासांच्या रक्‍ताचा त्याने सूड घेतला आहे.”+ ३ तेव्हा लगेच, दुसऱ्‍यांदा ते म्हणाले: “याहची स्तुती करा!*+ तिच्या जळण्याचा धूर सदासर्वकाळ वर चढत राहतो.”+

४ तेव्हा त्या २४ वडिलांनी+ आणि त्या चार प्राण्यांनी,+ राजासनावर बसलेल्या देवाची गुडघे टेकून उपासना केली आणि म्हणाले: “आमेन! याहची स्तुती करा!”*+

५ तसंच, राजासनातून एक आवाज ऐकू आला. तो म्हणाला: “देवाची भीती बाळगणाऱ्‍या सर्व लहानमोठ्या दासांनो,+ आपल्या देवाची स्तुती करा.”+

६ आणि एका मोठ्या लोकसमुदायाच्या आवाजासारखा, तसंच पाण्याच्या पुष्कळ प्रवाहांसारखा आणि ढगांच्या गर्जनेसारखा मोठा आवाज मला ऐकू आला. तो म्हणाला: “याहची स्तुती करा,*+ कारण आपल्या सर्वसमर्थ देवाने, यहोवाने,*+ राजा म्हणून राज्य करायला सुरुवात केली आहे!+ ७ चला, आनंद आणि जल्लोष करू या आणि त्याचा गौरव करू या! कारण कोकऱ्‍याच्या लग्नाची वेळ आली आहे आणि त्याच्या वधूने स्वतःला सजवलं आहे. ८ तिला चांगल्या प्रतीच्या मलमलीची तेजस्वी आणि शुद्ध वस्त्रं घालायला देण्यात आली आहेत. कारण ही वस्त्रं, म्हणजे पवित्र जनांची नीतिमान कार्यं.”+

९ मग तो स्वर्गदूत मला म्हणाला, “हे लिही: ज्यांना कोकऱ्‍याच्या लग्नाच्या मेजवानीचं आमंत्रण मिळालं आहे ते सुखी!”+ पुढे तो म्हणाला: “ही देवाची खरी वचनं आहेत.” १० हे ऐकताच, त्याची उपासना करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो. पण तो मला म्हणाला: “नको! असं करू नकोस!+ मी तर तुझ्यासारखाच आणि ज्यांना येशूबद्दल साक्ष देण्याचं कार्य+ मिळालं आहे त्या तुझ्या बांधवांसारखाच फक्‍त एक दास आहे. देवाची उपासना कर!+ कारण येशूबद्दलची साक्ष देणं हाच भविष्यवाणीचा उद्देश आहे.”+

११ नंतर, मला स्वर्ग उघडलेला दिसला, आणि पाहा! एक पांढरा घोडा मला दिसला.+ त्यावर बसलेल्याचं नाव विश्‍वासू+ आणि खरा,+ असं आहे; आणि तो नीतीने न्याय करतो आणि लढतो.+ १२ त्याचे डोळे आगीच्या ज्वालेसारखे आहेत+ आणि त्याच्या डोक्यावर बरेच मुकुट आहेत. त्याच्यावर एक नाव लिहिण्यात आलं आहे. ते त्याच्याशिवाय कोणालाही माहीत नाही. १३ त्याने रक्‍ताचे डाग असलेलं* एक बाहेरचं वस्त्र घातलं आहे आणि ‘देवाचा शब्द’+ असं नाव त्याला देण्यात आलं आहे. १४ तसंच, स्वर्गातली सैन्यंही पांढऱ्‍या घोड्यांवर त्याच्या पाठोपाठ जात होती. त्यांनी चांगल्या प्रतीच्या मलमलीची पांढरी आणि शुद्ध वस्त्रं घातली होती. १५ आणि राष्ट्रांना मारण्यासाठी त्याच्या तोंडातून एक लांब, धारदार तलवार निघते+ आणि तो त्यांच्यावर लोहदंडाने अधिकार चालवेल.+ शिवाय, तो सर्वसमर्थ देवाच्या तीव्र क्रोधाचा द्राक्षकुंड तुडवतो.+ १६ त्याच्या बाहेरच्या वस्त्रावर, हो, त्याच्या मांडीवर ‘राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू,’ असं नाव लिहिण्यात आलं आहे.+

१७ तसंच, सूर्यात उभा असलेला एक स्वर्गदूतही मला दिसला. तो आकाशाच्या मधोमध* उडणाऱ्‍या सर्व पक्ष्यांना मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला: “इकडे या, देवाच्या संध्याकाळच्या मोठ्या मेजवानीसाठी एकत्र या.+ १८ हे यासाठी, की तुम्ही राजांचं मांस, सेनापतींचं मांस आणि ताकदवान माणसांचं मांस,+ घोड्यांचं आणि त्यांच्या स्वारांचं मांस खावं;+ तसंच, स्वतंत्र माणसांचं आणि दासांचं आणि लहानमोठ्या सर्वांचं मांस तुम्ही खावं.”

१९ मग जंगली पशू, पृथ्वीवरचे राजे आणि त्यांची सैन्यं यांना घोड्यावर बसलेला स्वार आणि त्याचं सैन्य यांच्याबरोबर युद्ध करण्यासाठी एकत्र झालेलं मी पाहिलं.+ २० त्यानंतर, जंगली पशूला आणि त्याच्यासोबत खोट्या संदेष्ट्यालाही+ पकडण्यात आलं. त्याने त्या जंगली पशूसमोर चमत्कार करून, स्वतःवर जंगली पशूची खूण करून घेतलेल्यांना+ आणि त्याच्या मूर्तीची उपासना करणाऱ्‍यांना+ फसवलं होतं. या दोघांनाही गंधकाने जळणाऱ्‍या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आलं.+ २१ पण जे बाकीचे होते, ते घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघणाऱ्‍या लांब तलवारीने मारले गेले.+ आणि त्यांचं मांस खाऊन सर्व पक्षी तृप्त झाले.+

२० मग, स्वर्गातून एक स्वर्गदूत उतरताना मला दिसला. त्याच्या हातात अथांग डोहाची किल्ली+ आणि एक मोठा साखळदंड होता. २ त्याने दियाबल+ आणि सैतान+ म्हटलेल्या अजगराला,+ म्हणजे त्या जुन्या सापाला+ धरलं आणि त्याला १,००० वर्षांसाठी बांधून ठेवलं. ३ ती १,००० वर्षं पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांना बहकवू नये, म्हणून त्याने त्याला अथांग डोहात+ टाकून दिलं आणि अथांग डोह बंद करून त्यावर शिक्का मारला. यानंतर, थोड्या वेळासाठी त्याला सोडलं जाईल.+

४ तसंच, मला राजासनं दिसली, आणि त्यांवर बसलेल्यांना न्याय करायचा अधिकार देण्यात आला. मग, ज्यांना येशूविषयी साक्ष दिल्याबद्दल आणि देवाविषयी सांगत असल्याबद्दल मृत्युदंड देण्यात आला होता;* तसंच, ज्यांनी जंगली पशूची किंवा त्याच्या मूर्तीची उपासना केली नव्हती आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याची खूण करून घेतली नव्हती,+ त्यांचे जीव* मला दिसले. ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्तासोबत १,००० वर्षांपर्यंत राजे म्हणून राज्य केलं.+ ५ (पण ती १,००० वर्षं पूर्ण होईपर्यंत मेलेल्यांपैकी बाकीचे+ पुन्हा जिवंत झाले नाहीत.) हे पहिलं पुनरुत्थान* आहे.+ ६ जो कोणी पहिल्या पुनरुत्थानाचा भागीदार होतो तो सुखी आणि पवित्र आहे.+ यांच्यावर दुसऱ्‍या मृत्यूचा+ काहीही अधिकार नाही.+ तर, ते देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक+ होतील आणि त्याच्यासोबत १,००० वर्षांपर्यंत राजे म्हणून राज्य करतील.+

७ ती १,००० वर्षं पूर्ण होताच सैतानाची कैदेतून सुटका केली जाईल. ८ तो पृथ्वीच्या चार दिशांना पसरलेल्या राष्ट्रांना, म्हणजे गोग आणि मागोगला बहकवण्यासाठी आणि त्यांना युद्धाकरता एकत्र करण्यासाठी जाईल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे. ९ ते संपूर्ण पृथ्वीवर चाल करून गेले आणि त्यांनी पवित्र जनांच्या छावणीला आणि परमप्रिय नगरीला वेढा घातला. पण, स्वर्गातून अग्नीचा वर्षाव झाला आणि त्या अग्नीने त्यांना भस्म केलं.+ १० आणि त्यांना बहकवणाऱ्‍या सैतानाला* अग्नी आणि गंधकाच्या सरोवरात फेकून देण्यात आलं. तिथे जंगली पशू+ आणि खोटा संदेष्टा हे दोघं आधीपासूनच होते.+ आणि त्यांना रात्रंदिवस सदासर्वकाळ यातना दिल्या जातील.*

११ आणि एक मोठं पांढरं राजासन आणि त्यावर जो बसला होता तो मला दिसला.+ पृथ्वी आणि आकाश त्याच्यासमोरून पळून गेले,+ आणि त्यांच्यासाठी कोणतंही ठिकाण सापडलं नाही. १२ मग, मरण पावलेले लहानमोठे राजासनासमोर उभे असलेले मला दिसले आणि गुंडाळ्या उघडण्यात आल्या. पण, आणखी एक गुंडाळी उघडण्यात आली; ती जीवनाची गुंडाळी* आहे.+ गुंडाळ्यांमध्ये ज्या गोष्टी लिहिण्यात आल्या होत्या त्यांवरून मेलेल्यांचा, त्यांच्या कृत्यांप्रमाणे न्याय करण्यात आला.+ १३ आणि समुद्राने त्याच्यातल्या मेलेल्यांना बाहेर सोडलं. तसंच, मृत्यूने आणि कबरेनेसुद्धा* त्यांच्यातल्या मेलेल्यांना बाहेर सोडलं आणि ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा न्याय करण्यात आला.+ १४ मृत्यू आणि कबर* यांना अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आलं.+ हे अग्नीचं सरोवर+ म्हणजे दुसरा मृत्यू.+ १५ तसंच, ज्या कोणाचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आढळलं नाही,+ त्यालाही अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आलं.+

२१ मग, मला एक नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी दिसली.+ कारण आधीचं आकाश आणि आधीची पृथ्वी नाहीशी झाली होती,+ आणि समुद्रही+ राहिला नाही. २ मग मला पवित्र नगरी, नवीन यरुशलेमही दिसली. ती स्वर्गातून, देवापासून खाली उतरताना मला दिसली+ आणि ती आपल्या वरासाठी सजलेल्या वधूसारखी होती.+ ३ मग, राजासनातून एक मोठा आवाज मला ऐकू आला. तो म्हणाला: “पाहा! देवाचा तंबू माणसांजवळ आहे, तो त्यांच्यासोबत राहील आणि ते त्याचे लोक होतील. आणि देव स्वतः त्यांच्यासोबत असेल.+ ४ तो त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल.+ यापुढे कोणीही मरणार नाही,*+ कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.+ कारण, आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.”

५ आणि राजासनावर बसलेला+ देव म्हणाला: “पाहा! मी सर्वकाही नवीन करत आहे.”+ पुढे तो असंही म्हणाला: “लिही, कारण ही वचनं विश्‍वसनीय* आणि खरी आहेत.” ६ मग तो मला म्हणाला: “ती वचनं पूर्ण झाली आहेत! मी अल्फा आणि ओमेगा,* म्हणजे सुरुवात आणि शेवट आहे.+ जो कोणी तहानलेला असेल त्याला मी जीवनाच्या झऱ्‍याचं पाणी मोफत देईन.+ ७ जो कोणी विजय मिळवतो त्याला या गोष्टींचा वारसा मिळेल. मी त्याचा देव होईन आणि तो माझा मुलगा होईल. ८ पण भितरे, विश्‍वास न ठेवणारे,+ अशुद्ध आणि घृणास्पद गोष्टी करणारे, खुनी,+ अनैतिक लैंगिक कृत्यं* करणारे,+ भूतविद्या करणारे, मूर्तिपूजा करणारे आणि खोटं बोलणारे+ या सर्वांच्या वाट्याला अग्नी आणि गंधकाने जळणारं सरोवर येईल.+ हाच दुसरा मृत्यू आहे.”+

९ मग, ज्यांच्याजवळ शेवटच्या सात पीडांनी+ भरलेल्या सात वाट्या होत्या, त्या सात स्वर्गदूतांपैकी एक आला आणि मला म्हणाला: “ये, मी तुला वधू दाखवतो, कोकऱ्‍याची वधू.”+ १० तेव्हा, तो मला पवित्र शक्‍तीच्या* सामर्थ्याने एका मोठ्या, उंच पर्वतावर घेऊन गेला आणि त्याने मला यरुशलेम हे पवित्र नगर दाखवलं. ते स्वर्गातून, देवापासून उतरत होतं+ ११ आणि ते देवाच्या तेजाने प्रकाशित झालं होतं.+ त्याचं वैभव खूप मौल्यवान रत्नासारखं, स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्‍या यास्फे* रत्नासारखं होतं.+ १२ त्याच्याभोवती एक उंच आणि मोठी भिंत होती. त्याला १२ फाटकं असून त्या फाटकांजवळ १२ स्वर्गदूत होते. त्या फाटकांवर इस्राएलच्या मुलांच्या १२ वंशांची नावं कोरण्यात आली होती. १३ पूर्वेकडे तीन फाटकं, उत्तरेकडे तीन फाटकं, दक्षिणेकडे तीन फाटकं आणि पश्‍चिमेकडे तीन फाटकं होती.+ १४ नगराच्या भिंतीला १२ दगडांचा पायाही होता आणि त्यांवर कोकऱ्‍याच्या १२ प्रेषितांची १२ नावं+ लिहिलेली होती.

१५ आता माझ्याशी जो बोलत होता त्याच्याकडे नगराचं, त्याच्या फाटकांचं आणि भिंतीचं मोजमाप घेण्यासाठी एक सोन्याचा वेत होता.+ १६ नगर चौकोनी आहे; त्याच्या रुंदीइतकीच त्याची लांबी आहे. त्याने त्या वेताने नगराचं माप घेतलं, तेव्हा ते सुमारे २,२२० किलोमीटर* इतकं होतं. त्याची लांबी, रुंदी आणि उंची सारखीच आहे. १७ नंतर, त्याने भिंतीचंही माप घेतलं आणि ते माणसाच्या, तसंच स्वर्गदूताच्या मापाप्रमाणे १४४ हात* इतकं होतं. १८ नगराची भिंत यास्फे रत्नापासून बनलेली होती+ आणि नगर पारदर्शक काचेसारख्या शुद्ध सोन्याचं होतं. १९ नगराच्या भिंतीचे पाये सर्व प्रकारच्या मौल्यवान रत्नांनी सजलेले होते: पहिला पाया यास्फे रत्नाचा होता; दुसरा नीलमणी, तिसरा मौल्यवान वाळूचा दगड, चौथा पाचू, २० पाचवा गोमेद, सहावा सार्दी, सातवा चंद्रकांत, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा राहुरत्न आणि बारावा जमुनिया रत्नाचा होता. २१ तसंच, १२ फाटकं १२ मोत्यांची, म्हणजे प्रत्येक फाटक एकेका मोत्याचं होतं. आणि नगराचा मुख्य रस्ता पारदर्शक काचेसारखा, शुद्ध सोन्याचा होता.

२२ त्या नगरात मला मंदिर दिसलं नाही, कारण सर्वसमर्थ देव यहोवा*+ आणि कोकरा हेच त्याचं मंदिर आहे. २३ त्या नगराला सूर्याच्या किंवा चंद्राच्या प्रकाशाची गरज नाही. कारण देवाच्या तेजाने ते नगर प्रकाशित होतं+ आणि कोकरा त्याचा दीप आहे.+ २४ राष्ट्रं त्याच्या प्रकाशाने चालतील+ आणि पृथ्वीवरचे राजे आपलं ऐश्‍वर्य त्यात आणतील. २५ त्याची फाटकं दिवसा बंद होणारच नाहीत कारण तिथे कधीही रात्र होणार नाही.+ २६ आणि ते राष्ट्रांचं वैभव आणि प्रतिष्ठा त्यात आणतील.+ २७ पण, कोणतीही दूषित गोष्ट, तसंच कोणत्याही घृणास्पद गोष्टी आणि कपट करणारा कोणीही त्यात प्रवेश करणार नाही.+ तर, कोकऱ्‍याच्या जीवनाच्या गुंडाळीत ज्यांची नावं आहेत फक्‍त तेच त्यात प्रवेश करतील.+

२२ मग, त्याने मला जीवनाच्या पाण्याची नदी दाखवली.+ ती स्फटिकासारखी नितळ असून देवाच्या आणि कोकऱ्‍याच्या+ राजासनातून वाहत होती. २ ती नगराच्या मुख्य रस्त्याच्या मधोमध वाहत होती. नदीच्या दोन्ही बाजूंना जीवनाची झाडं होती. ती वर्षातून १२ वेळा, म्हणजे दर महिन्याला फळ द्यायची. त्या झाडांची पानं राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी होती.+

३ यापुढे तिथे कोणताही शाप असणार नाही. तर, देवाचं आणि कोकऱ्‍याचं राजासन+ त्या नगरात असेल, आणि देवाचे दास त्याची पवित्र सेवा करतील. ४ ते त्याचा चेहरा पाहतील+ आणि त्याचं नाव त्यांच्या कपाळांवर लिहिलेलं असेल.+ ५ शिवाय, पुन्हा कधीच रात्र होणार नाही,+ आणि त्यांना दिव्याच्या किंवा सूर्याच्या प्रकाशाची गरज पडणार नाही. कारण यहोवा* देव त्यांच्यावर प्रकाश पाडेल+ आणि ते राजे म्हणून सदासर्वकाळ राज्य करतील.+

६ मग स्वर्गदूत मला म्हणाला: “ही वचनं विश्‍वसनीय* आणि खरी आहेत.+ आणि संदेष्ट्यांना प्रेरित करणारा देव,+ यहोवा,* याने लवकरच घडणार असलेल्या गोष्टी आपल्या दासांना दाखवण्यासाठी आपल्या स्वर्गदूताला पाठवलं आहे. ७ पाहा! मी लवकरच येत आहे.+ जो कोणी या गुंडाळीतल्या भविष्यवाणीचे शब्द पाळतो तो सुखी आहे.”+

८ तर, मी योहान या सगळ्या गोष्टी ऐकत आणि पाहत होतो. मी त्या ऐकल्या आणि पाहिल्या, तेव्हा ज्या स्वर्गदूताने मला या गोष्टी दाखवल्या होत्या त्याची उपासना करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो. ९ पण तो मला म्हणाला: “नको! असं करू नकोस! मी तर तुझ्यासारखाच आणि तुझ्या बांधवांसारखाच म्हणजे संदेष्ट्यांसारखाच, तसंच जे या गुंडाळीतले शब्द पाळतात त्यांच्यासारखाच फक्‍त एक दास आहे. देवाची उपासना कर!”+

१० तो मला असंही म्हणाला: “या गुंडाळीतल्या भविष्यवाणीचे शब्द शिक्का मारून बंद करू नकोस, कारण ठरवलेली वेळ जवळ आली आहे. ११ जो अनीतिमान आहे, तो अनीतीने वागत राहो, आणि जो अशुद्ध आहे, तो अशुद्धपणा करत राहो. पण जो नीतिमान आहे, त्याने नीतीने वागत राहावं आणि जो पवित्र आहे, त्याने पवित्रतेत चालत राहावं.

१२ ‘पाहा! मी लवकरच येत आहे, आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यासाठी माझ्याजवळ प्रतिफळ आहे.+ १३ मी अल्फा आणि ओमेगा,*+ म्हणजे पहिला आणि शेवटला, सुरुवात आणि अंत आहे. १४ आपल्याला जीवनाच्या झाडांजवळ जाण्याचा अधिकार मिळावा+ आणि त्या नगरीच्या फाटकांतून प्रवेश मिळावा,+ म्हणून जे आपले झगे धुतात+ ते सुखी आहेत. १५ पण कुत्रे,* भूतविद्या करणारे, अनैतिक लैंगिक कृत्यं* करणारे, खुनी, मूर्तिपूजा करणारे; तसंच, खोटेपणावर प्रेम करणारे आणि खोटं बोलणारे सर्व जण बाहेरच राहतील.’+

१६ ‘मंडळ्यांच्या हितासाठी मी, येशूने, या गोष्टींबद्दल तुम्हाला साक्ष देण्यासाठी माझ्या स्वर्गदूताला पाठवलं. मी दावीदचं मूळ आणि वंशज+ तसंच, पहाटेचा तेजस्वी तारा आहे.’”+

१७ आणि पवित्र शक्‍ती* आणि वधू+ असं म्हणतात: “ये!” आणि जो ऐकतो तो म्हणो, “ये!” आणि जो तहानलेला आहे त्याने यावं;+ आणि ज्या कोणाला जीवनाचं पाणी हवं आहे, त्याने ते मोफत घ्यावं.+

१८ “जो कोणी या गुंडाळीतल्या भविष्यवाणीचे शब्द ऐकतो त्या प्रत्येकाला मी ही साक्ष देत आहे: जर कोणी या गोष्टींत भर घातली,+ तर या गुंडाळीत लिहिलेल्या पीडा देव त्याच्यावर आणेल.+ १९ आणि जर कोणी या गुंडाळीतल्या भविष्यवाणीच्या शब्दांतून काही काढून टाकलं, तर या गुंडाळीत सांगितलेल्या गोष्टींतून, म्हणजे जीवनाच्या झाडांतून+ आणि पवित्र नगरीतून+ देव त्याचा वाटा काढून घेईल.

२० या गोष्टींबद्दल साक्ष देणारा म्हणतो, ‘हो, मी लवकरच येत आहे.’”+

“आमेन! प्रभू येशू, ये.”

२१ प्रभू येशूची अपार कृपा पवित्र जनांसोबत असो.

किंवा “खुलासा; उघड करणं.”

किंवा कदाचित, “येशूचा.”

ग्रीक न्यूमा. शब्दार्थसूचीत “रूआख; न्यूमा” पाहा.

अति. क५ पाहा.

म्हणजे, सुरुवात आणि शेवट. अल्फा हे ग्रीक वर्णमालेतलं पहिलं आणि ओमेगा हे शेवटचं अक्षर आहे.

शब्दार्थसूची पाहा.

एक प्रकारची समई.

किंवा “चेहरा.”

ग्रीक भाषेत “हेडीस.” शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “नंदनवनात.”

शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

किंवा “अगदी मनातल्या भावनांचं.” शब्दशः “गुरदे.”

किंवा “ज्यांना लोक ‘सैतानाच्या गहन गोष्टी’ म्हणतात अशा गोष्टी.”

ग्रीक न्यूमा. शब्दार्थसूचीत “रूआख; न्यूमा” पाहा.

किंवा “अशी तुझी ख्याती आहे.”

किंवा “त्याची जाणीव ठेव.”

शब्दशः “अशी काही नावं.”

किंवा “खोडून.”

किंवा “नमन करायला.”

किंवा कदाचित, “धीर दाखवण्याच्या बाबतीत माझ्या उदाहरणाचं तू अनुकरण केल्यामुळे.”

शब्दार्थसूची पाहा.

काहींच्या मते हे हिऱ्‍याला सूचित करतं.

किंवा “लाल रंगाच्या एका रत्नासारखं.”

ग्रीक न्यूमा. शब्दार्थसूचीत “रूआख; न्यूमा” पाहा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

शब्दशः “आत आणि मागच्या बाजूला.”

ग्रीक न्यूमा. शब्दार्थसूचीत “रूआख; न्यूमा” पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

एक दिनार ही एका दिवसाची मजुरी होती. शब्दार्थसूची पाहा.

सैनिकाला पुरवल्या जाणाऱ्‍या एका दिवसापुरत्या अन्‍नसामग्रीत एक माप (ग्रीक, खोइनिक्स, सुमारे ०.७ किलो) गहू दिले जायचे.

ग्रीक भाषेत “हेडीस.” शब्दार्थसूची पाहा.

हे वेदीवर ओतलेल्या त्यांच्या रक्‍ताला सूचित करतं. शब्दार्थसूची पाहा.

कदाचित बकरीच्या केसांपासून.

किंवा “पूर्वेकडून.”

किंवा “मध्यभागी.”

किंवा “प्राणी.”

एक प्रकारचं झाड. त्यात कडू आणि विषारी पदार्थ असतो.

किंवा “खड्ड्याची.”

किंवा “खड्डा.”

छातीचं संरक्षण करणारं साधन. किंवा “उरस्त्राण.”

म्हणजे “विनाश.”

म्हणजे “विनाशक.”

शब्दार्थसूची पाहा.

ग्रीक पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

किंवा “तो एका ढगाने झाकलेला होता.”

किंवा “मोजपट्टी.”

म्हणजे, मंदिराची मुख्य इमारत जिच्यात पवित्र आणि परमपवित्र स्थान होतं.

म्हणजे, मंदिराची मुख्य इमारत जिच्यात पवित्र आणि परमपवित्र स्थान होतं.

किंवा “स्वर्ग.”

किंवा “मिसर.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “त्यांचे शत्रू त्यांना पाहत राहिले.”

अति. क५ पाहा.

म्हणजे, मंदिराचं परमपवित्र स्थान.

म्हणजे, मंदिराचं परमपवित्र स्थान.

म्हणजे “देवासारखा कोण आहे?”

किंवा कदाचित, “तो (अजगर) युद्धात हरला.”

शब्दशः “त्यांच्या साक्षीच्या वचनामुळे.”

किंवा “जीवनाची.” शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “दियाबल.” म्हणजे निंदा करणारा.

म्हणजे, साडेतीन काळ.

शब्दशः “बीजापैकी.”

म्हणजे, अजगर.

किंवा “गुंडाळीत.”

किंवा कदाचित, “ज्या कोणाला तलवारीने मारलं जाणार असेल.”

किंवा “एक मानवी संख्या.”

किंवा “हवेत; डोक्यावर.”

ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

किंवा “क्रोधाचा.”

किंवा “कडक.”

किंवा “बंदिस्ततेचा; कैदेचा.”

शब्दशः “येशूचा.”

शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, मंदिराचं परमपवित्र स्थान.

शब्दशः “१,६०० स्टेडिया.” स्टेडियम हे अंतर मोजण्याचं रोमन माप असून १ स्टेडियम १८५ मी. (६०६.९५ फूट) इतकं होतं. अति. ख१४ पाहा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

म्हणजे, मंदिराचं परमपवित्र स्थान.

म्हणजे, मंदिराचं परमपवित्र स्थान.

किंवा “जीव.”

अति. क५ पाहा.

किंवा “न्याय-निर्णय.”

किंवा “पूर्वेकडून.”

शब्दार्थसूची पाहा.

ग्रीक, हर मगेदोन, हा शब्द “मगिद्दोचा पर्वत” या अर्थाच्या हिब्रू शब्दावरून आला आहे.

म्हणजे, मंदिराचं परमपवित्र स्थान.

शब्दशः “एक तालान्त इतकं.” एक ग्रीक तालान्त म्हणजे २०.४ किलोग्रॅम चांदीची नाणी होती. अति. ख१४ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

किंवा “गुंडाळीत.”

शब्दार्थसूची पाहा.

ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

किंवा “क्रोधाचा.”

किंवा “प्रवास करणारे व्यापारी.”

किंवा “तिच्या अपराधांची.”

अति. क५ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “हिंदुस्तानचा मसाला.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “तिच्या हातून.”

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

अति. क५ पाहा.

किंवा कदाचित, “रक्‍त शिंपडलेलं.”

किंवा “हवेत; डोक्यावर.”

शब्दशः “कुऱ्‍हाडीने ठार मारण्यात आलं होतं.”

शब्दार्थसूची पाहा. तसंच, प्रक ६:९ तळटीप पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “दियाबलाला.” म्हणजे, निंदा करणारा.

किंवा “जखडून ठेवलं जाईल; कैद केलं जाईल.” तसंच, प्रकटी १४:११ तळटीप पाहा.

किंवा “जीवनाचं पुस्तक.”

ग्रीक भाषेत “हेडीस.” शब्दार्थसूची पाहा.

ग्रीक भाषेत “हेडीस.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “यापुढे मरण राहणार नाही.”

किंवा “भरवशालायक.”

म्हणजे, सुरुवात आणि शेवट. अल्फा हे ग्रीक वर्णमालेतलं पहिलं आणि ओमेगा हे शेवटचं अक्षर आहे.

ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

काहींच्या मते हे हिऱ्‍याला सूचित करतं.

शब्दशः “१२,००० स्टेडिया.” स्टेडियम हे अंतर मोजण्याचं रोमन माप असून १ स्टेडियम १८५ मी. (६०६.९५ फूट) इतकं होतं. अति. ख१४ पाहा.

सुमारे ६४ मी. (२१० फूट). अति. ख१४ पाहा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “भरवशालायक.”

अति. क५ पाहा.

म्हणजे, सुरुवात आणि शेवट. अल्फा हे ग्रीक वर्णमालेतलं पहिलं आणि ओमेगा हे शेवटचं अक्षर आहे.

म्हणजे, ज्यांची कामं देवाच्या दृष्टीने घृणास्पद आहेत.

ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा