पेत्र याचं दुसरं पत्र
१ येशू ख्रिस्ताचा दास आणि प्रेषित, शिमोन पेत्र याच्याकडून, आपल्या देवाच्या आणि तारणकर्त्या येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्त्वाद्वारे ज्यांनी आमच्यासारखा मौल्यवान विश्वास प्राप्त केला आहे,* त्यांना:
२ देव आणि आपला प्रभू येशू यांच्याबद्दलच्या अचूक ज्ञानाद्वारे+ तुमच्यावर अपार कृपेचा आणि शांतीचा वर्षाव होत राहो. ३ कारण, देवाची भक्ती करत जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देवाने त्याच्या सामर्थ्याद्वारे आपल्याला दिल्या आहेत.* स्वतःच्या गौरवाद्वारे आणि चांगुलपणाद्वारे आपल्याला बोलावणाऱ्या देवाबद्दलचं अचूक ज्ञान+ घेतल्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला पुरवण्यात आल्या. ४ या गोष्टींद्वारे त्याने आपल्याला मौल्यवान आणि खूप महान अशी अभिवचनं दिली आहेत.*+ हे यासाठी, की त्यांद्वारे आपण देवाच्या गुणांचे भागीदार बनावं.+ कारण चुकीच्या इच्छांमुळे* उत्पन्न होणाऱ्या जगाच्या भ्रष्टतेपासून आपल्याला सुटका मिळाली आहे.
५ याच कारणामुळे, तुमच्या विश्वासात चांगुलपणाची+ भर घालण्याचा होताहोईल तितका प्रयत्न करा.+ तसंच, चांगुलपणात ज्ञानाची,+ ६ ज्ञानात संयमाची, संयमात+ धीराची, धीरात देवाच्या भक्तीची,+ ७ देवाच्या भक्तीत बांधवांबद्दल आपुलकीची आणि बांधवांबद्दलच्या आपुलकीत प्रेमाची भर घाला.+ ८ कारण हे गुण जर तुमच्यामध्ये असले आणि ओसंडून वाहिले, तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलच्या अचूक ज्ञानाविषयी तुम्ही अक्रियाशील किंवा निष्फळ ठरणार नाही.+
९ पण, ज्याच्यामध्ये हे गुण नाहीत तो आंधळा आहे; तो प्रकाशाकडे पाहत नाही*+ आणि पूर्वी केलेल्या पापांपासून आपल्याला शुद्ध करण्यात आलं होतं, ही गोष्ट तो विसरला आहे.+ १० म्हणून बांधवांनो, बोलावलं जाण्याचा+ आणि निवडलं जाण्याचा जो बहुमान तुम्हाला लाभला आहे, तो टिकवून ठेवण्याचा आणखी जास्त प्रयत्न करा. कारण, जर तुम्ही असं करत राहिलात, तर तुम्ही कधीही अडखळून पडणार नाही.+ ११ उलट, आपला प्रभू आणि तारणकर्ता येशू ख्रिस्त याच्या सर्वकाळाच्या राज्यात तुम्हाला मोठ्या गौरवाने प्रवेश मिळेल.+
१२ याच कारणासाठी, मी तुम्हाला सतत या गोष्टींची आठवण करून देईन. अर्थात, तुम्हाला या गोष्टी आधीपासूनच माहीत आहेत आणि तुमच्यामध्ये असलेल्या सत्यात तुम्ही अगदी खंबीर आहात. १३ तरीसुद्धा, जोपर्यंत मी या मंडपात* आहे,+ तोपर्यंत तुमचा उत्साह वाढवण्यासाठी तुम्हाला या गोष्टींची आठवण करून देणं मला योग्य वाटतं.+ १४ कारण, लवकरच माझा हा मंडप काढून टाकला जाईल हे मला माहीत आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानेच ही गोष्ट मला स्पष्टपणे प्रकट केली आहे.+ १५ म्हणून माझ्याकडून मी नेहमी प्रयत्न करत राहीन. हे यासाठी, की मी गेल्यावर, तुम्हाला या गोष्टींची स्वतःला आठवण* करून देता येईल.
१६ आम्ही तुम्हाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आणि उपस्थिती यांबद्दल जे सांगितलं, ते चलाखीने रचलेल्या काल्पनिक कहाण्यांच्या आधारावर नव्हतं. तर आम्ही स्वतः त्याच्या वैभवाचे साक्षीदार होतो.+ १७ कारण, देव जो पिता याच्याकडून त्याला सन्मान आणि गौरव मिळाला. त्या वेळी, वैभवशाली तेजातून असा आवाज ऐकू आला: “हा माझा मुलगा मला प्रिय आहे, त्याने माझं मन आनंदित केलंय.”+ १८ हो, पवित्र डोंगरावर आम्ही त्याच्यासोबत असताना स्वर्गातून आम्ही हा आवाज ऐकला.
१९ अशा रितीने, भविष्यसूचक वचनावरचा आमचा भरवसा आणखी पक्का झाला आहे; आणि (दिवस उजाडेपर्यंत आणि पहाटेचा तारा+ उगवेपर्यंत) एखाद्या अंधाऱ्या ठिकाणी, म्हणजे तुमच्या मनात दिव्याप्रमाणे+ प्रकाश देणाऱ्या या वचनाकडे तुम्ही लक्ष देत आहात हे चांगलं आहे. २० कारण सगळ्यात आधी हे लक्षात घ्या, की शास्त्रातली कोणतीही भविष्यवाणी कोणी स्वतःच्या मनाप्रमाणे केलेली नाही. २१ कारण, भविष्यवाणी ही कधीही माणसाच्या इच्छेप्रमाणे झाली नाही,+ तर माणसं देवाच्या पवित्र शक्तीच्या* मार्गदर्शनाने बोलली.+
२ पण ज्याप्रमाणे देवाच्या लोकांमध्ये खोटे संदेष्टे उठले होते, त्याचप्रमाणे तुमच्यामध्येही खोटे शिक्षक असतील.+ ते चोरून-लपून विनाशकारी पंथ निर्माण करतील आणि ज्याने त्यांना विकत घेतलं त्या आपल्या मालकालाही ते नाकारतील.+ अशा रितीने ते एकाएकी स्वतःवर विनाश ओढवून घेतील. २ शिवाय, पुष्कळ जण त्यांच्या निर्लज्ज वर्तनाचं* अनुकरण करतील+ आणि त्यांच्यामुळे सत्याच्या मार्गाची बदनामी होईल.+ ३ तसंच, ते कपटी शब्द बोलून लोभीपणाने तुमचा फायदा घेतील. पण, देवाने फार पूर्वीच ठरवलेल्या त्यांच्या न्यायदंडाला+ उशीर होणार नाही आणि त्यांचा विनाश नक्की येईल.+
४ कारण, ज्या स्वर्गदूतांनी पाप केलं त्यांचीसुद्धा देवाने गय केली नाही,+ तर त्याने त्यांना तार्तारसमध्ये* फेकून दिलं.+ त्यांचा न्याय करण्यासाठी त्याने त्यांना घोर अंधारात साखळ्यांनी बांधून* ठेवलं आहे.+ ५ प्राचीन काळातल्या जगाचीही त्याने गय केली नाही,+ तर त्याने अधार्मिक लोकांच्या जगावर जलप्रलय आणला.+ पण, त्याने नीतिमत्त्वाचा प्रचारक असलेल्या नोहाला+ इतर सात जणांसोबत सुखरूप ठेवलं.+ ६ तसंच, सदोम आणि गमोरा या शहरांना भस्म करून त्याने त्यांना शिक्षा दिली;+ आणि अशा रितीने, अधार्मिक लोकांचं पुढे काय होईल, याचा एक नमुना दाखवला.+ ७ पण, नीतिमान लोटला मात्र त्याने वाचवलं.+ तो दुष्ट* लोकांच्या निर्लज्ज वर्तनामुळे* खूप दुःखी होता. ८ कारण त्यांच्यामध्ये राहत असताना त्यांची दुष्ट कृत्यं पाहून आणि ऐकून त्या नीतिमान माणसाच्या जिवाला* दररोज यातना व्हायच्या. ९ तर मग, देवाची भक्ती करत जीवन जगणाऱ्या लोकांची परीक्षेतून सुटका कशी करावी+ आणि अनीतिमान लोकांना, न्यायाच्या दिवशी नाश करण्यासाठी कसं राखून ठेवावं हे यहोवाला* माहीत आहे.+ १० खासकरून अशांना जे इतरांची शरीरं भ्रष्ट करायचा प्रयत्न करतात+ आणि अधिकाराला तुच्छ लेखतात.+
उद्धटपणे आणि मनाला वाटेल तसं वागणाऱ्या या लोकांना, देवाने सन्मानित केलेल्यांबद्दल अपमानास्पद शब्द बोलायची मुळीच भीती वाटत नाही. ११ याउलट, माणसांपेक्षा कितीतरी पटीने जास्त शक्तिशाली असलेले स्वर्गदूतसुद्धा, यहोवाबद्दल* असलेल्या आदरामुळे त्यांची निंदा करून त्यांच्यावर दोषारोप लावत नाहीत.+ १२ पण, ज्यांचा जन्म* फक्त पकडलं जाऊन नाश होण्यासाठी झालेला असतो, अशा उपजत बुद्धीप्रमाणे वागणाऱ्या निर्बुद्ध प्राण्यांसारखे हे लोक आहेत. कारण, त्यांना माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल ते अपमानास्पद रितीने बोलतात.+ ते विनाशाच्या मार्गावर चालत असल्यामुळे स्वतःवर नाश ओढवून घेतील. १३ स्वतःच्याच नुकसानकारक आचरणामुळे त्यांना वाईट परिणाम भोगावे लागतील.
दिवसाही चैन करण्यात त्यांना मौज वाटते.+ ते डाग आणि कलंक असून तुमच्यासोबत मेजवान्या करताना आपल्या फसव्या शिकवणींनी इतरांची दिशाभूल करायला त्यांना आनंद होतो.+ १४ त्यांच्या नजरा व्यभिचाराने भरलेल्या आहेत+ आणि पाप करण्यापासून त्यांना स्वतःला आवरता येत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना भुरळ घालतात. त्यांच्या मनाला लोभीपणाची सवय झाली आहे. ते शापित आहेत. १५ सरळ मार्ग सोडून ते भरकटले आहेत. त्यांनी बौरचा मुलगा बलाम याच्या मार्गाचं अनुकरण केलं आहे.+ त्याला अपराधाची कमाई प्रिय होती.+ १६ पण, जे योग्य त्याच्या विरोधात वागल्यामुळे त्याचं ताडन करण्यात आलं.+ शेवटी, ओझं वाहणाऱ्या मुक्या जनावराने माणसाच्या आवाजात बोलल्यावर तो संदेष्टा आपल्या मूर्खपणाच्या मार्गावरून मागे फिरला.+
१७ ते कोरड्या झऱ्यांसारखे आणि जोरदार वादळाने वाहून जाणाऱ्या धुक्यासारखे आहेत; आणि त्यांच्यासाठी घोर अंधार राखून ठेवण्यात आला आहे.+ १८ ते मोठमोठ्या गोष्टी करतात, पण मुळात त्यांचं बोलणं पोकळ आहे. आणि जे नुकतेच वाईट कामं करणाऱ्यांमधून बाहेर आले आहेत, अशांच्या शारीरिक वासना चेतवून+ ते त्यांना निर्लज्ज वर्तनाने* मोहात पाडतात.+ १९ ते त्यांना स्वातंत्र्याचं आश्वासन तर देतात, पण ते स्वतःच भ्रष्टतेचे दास आहेत.+ कारण, जो कोणी एखाद्याच्या नियंत्रणाखाली येतो तो त्याचा दास बनतो.*+ २० खरंच, आपला प्रभू आणि तारणकर्ता येशू ख्रिस्त याच्याबद्दलचं अचूक ज्ञान घेण्याद्वारे, स्वतःला जगाच्या अशुद्धतेपासून दूर केल्यावर,+ जर ते पुन्हा त्याच गोष्टींमध्ये गुरफटले आणि त्यांच्या नियंत्रणाखाली आले, तर त्यांची शेवटची दशा पहिल्यापेक्षा वाईट होते.+ २१ नीतिमत्तेचा मार्ग माहीत असूनही, त्यांना मिळालेली पवित्र आज्ञा त्यांनी मोडली; यापेक्षा त्यांना तो मार्ग अचूकपणे समजलाच नसता तर जास्त बरं झालं असतं.+ २२ त्यांच्या बाबतीत ही म्हण अगदी खरी ठरली आहे: “कुत्रा आपल्या ओकारीकडे, तर धुतलेली डुकरीण परत चिखलात लोळायला जाते.”+
३ प्रिय बांधवांनो, आता मी हे दुसरं पत्र तुम्हाला लिहीत आहे. आणि माझ्या पहिल्या पत्राप्रमाणेच, या पत्राद्वारेसुद्धा तुमच्या विचारशक्तीला चालना देण्यासाठी मी काही गोष्टींची आठवण करून देत आहे.+ २ हे यासाठी, की पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या गोष्टी* आणि आपला प्रभू आणि तारणकर्ता याने तुमच्या प्रेषितांद्वारे दिलेली आज्ञा तुम्ही आठवणीत ठेवावी. ३ सगळ्यात आधी तर हे लक्षात घ्या, की शेवटच्या दिवसांत आपल्या वासनेप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक येतील आणि अशी थट्टा करतील:+ ४ “आता कुठे गेलं त्याच्या उपस्थितीचं अभिवचन?+ आमच्या वाडवडिलांचा मृत्यू झाला तेव्हापासून सगळ्या गोष्टी, निर्मितीच्या सुरुवातीपासून जशा चालल्या होत्या, तशाच अजूनही चालल्या आहेत.”+
५ कारण, ते जाणूनबुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, की फार पूर्वी आकाश होतं आणि देवाच्या वचनानेच पृथ्वी पाण्याच्या वर आणि पाण्याच्या मधोमध स्थिर उभी होती.+ ६ आणि त्याद्वारे त्या काळातल्या जगाचा जलप्रलयाने नाश झाला.+ ७ पण त्याच वचनाने, सध्या अस्तित्वात असलेले आकाश आणि पृथ्वी अग्नीसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. न्यायदंडाच्या आणि दुष्ट लोकांच्या नाशाच्या दिवसापर्यंत त्यांना राखून ठेवण्यात आलं आहे.+
८ पण प्रिय बांधवांनो, ही गोष्ट विसरू नका, की यहोवासाठी* एक दिवस हजार वर्षांसारखा, आणि हजार वर्षं एका दिवसासारखी आहेत.+ ९ काहींना वाटतं की यहोवा* आपलं अभिवचन पूर्ण करण्याच्या बाबतीत उशीर करत आहे, पण तसं नाही.+ उलट तो तुमच्या बाबतीत सहनशीलता दाखवतो. कारण कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्चात्ताप करावा असं त्याला वाटतं.+ १० पण, यहोवाचा* दिवस+ चोरासारखा येईल.+ त्या वेळी, आकाश मोठा गडगडाट करत नाहीसं होईल,+ तर सृष्टीची तत्त्वं अतिशय तापून वितळतील. तसंच, पृथ्वी आणि तिच्यातली सगळी कार्यं उघड होतील.+
११ या सर्व गोष्टी अशा प्रकारे नाहीशा होणार आहेत,* त्यामुळे तुम्ही कशा प्रकारचे लोक असलं पाहिजे याचा विचार करा! तुमची वागणूक पवित्र असली पाहिजे आणि तुम्ही देवाच्या भक्तीची कार्यं केली पाहिजेत. १२ तसंच, तुम्ही यहोवाच्या* दिवसाची वाट पाहिली पाहिजे आणि तो दिवस नेहमी डोळ्यांपुढे ठेवला पाहिजे.*+ त्या दिवशी, आकाश जळून नष्ट होईल+ आणि सृष्टीची तत्त्वं अतिशय तापून वितळतील! १३ पण, त्याच्या अभिवचनाप्रमाणे आपण एका नवीन आकाशाची आणि नवीन पृथ्वीची वाट पाहत आहोत+ आणि तिथे न्यायनीती टिकून राहील.+
१४ म्हणून प्रिय बांधवांनो, या गोष्टींची वाट पाहत असताना, तुम्ही त्याला शेवटी निष्कलंक, निर्दोष आणि शांतीत असल्याचं दिसावं म्हणून होईल तितका प्रयत्न करा.+ १५ शिवाय, आपल्या प्रभूच्या सहनशीलतेला तारणाची संधी समजा. आपला प्रिय बांधव पौल याला देण्यात आलेल्या बुद्धीप्रमाणे त्यानेही तुम्हाला याबद्दल लिहिलं होतं.+ १६ खरंतर, त्याच्या सगळ्याच पत्रांत त्याने या गोष्टींचा उल्लेख केला आहे. पण, त्यांतल्या काही गोष्टी समजायला कठीण आहेत. जे अज्ञानी आणि अस्थिर मनाचे आहेत ते या गोष्टींचा आणि बाकीच्या शास्त्रवचनांचाही चुकीचा अर्थ लावतात, आणि असं करून ते स्वतःवर नाश ओढवून घेतात.
१७ माझ्या प्रिय बांधवांनो, या गोष्टी तुम्हाला आधीपासूनच माहीत आहेत. त्यामुळे, दुष्ट लोकांच्या खोट्या शिकवणींमुळे भरकटले जाऊन तुम्ही आपली स्थिरता* गमावून बसू नये म्हणून सावध राहा.+ १८ याउलट, आपला प्रभू आणि तारणकर्ता, येशू ख्रिस्त याच्या अपार कृपेत आणि ज्ञानात दिवसेंदिवस वाढत जा. आता आणि अनंतकाळापर्यंत त्याला गौरव मिळत राहो. आमेन.
किंवा “विश्वास बाळगण्याचा ज्यांना आमच्यासारखाच सन्मान आहे.”
किंवा “उदारपणे दिल्या आहेत.”
किंवा “उदारपणे दिली आहेत.”
किंवा “वासनांमुळे.”
किंवा कदाचित, “आंधळा, फक्त जवळचं पाहणारा.”
किंवा “तंबूत,” म्हणजे, त्याचं मानवी शरीर.
किंवा “उल्लेख.”
शब्दार्थसूची पाहा.
ग्रीक, ॲसेल्गेया. शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा कदाचित, “खड्ड्यांत.”
किंवा “स्वैराचारी.”
ग्रीक, ॲसेल्गेया. शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
किंवा “स्वभावतःच ज्यांचा जन्म.”
ग्रीक, ॲसेल्गेया. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “जो कोणी एखाद्या गोष्टीच्या आहारी जातो तो तिचा दास बनतो.”
किंवा “भाकीत केलेल्या गोष्टी.”
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
किंवा “वितळणार आहेत.”
अति. क५ पाहा.
किंवा “उत्कंठा बाळगली पाहिजे.” शब्दशः “घाई करणं.”
किंवा “स्थैर्य.”