वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt इब्री लोकांना १:१-१३:२५
  • इब्री

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इब्री
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
इब्री

इब्री लोकांना पत्र

१ प्राचीन काळात देव आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे बऱ्‍याच वेळा, वेगवेगळ्या मार्गांनी बोलला.+ २ पण, आता या काळाच्या शेवटी तो आपल्याशी त्याच्या मुलाद्वारे बोलला आहे.+ त्या मुलाला त्याने सर्व गोष्टींचा वारस ठरवलं आहे+ आणि त्याच्याचद्वारे त्याने जगाच्या व्यवस्था* अस्तित्वात आणल्या.+ ३ तो देवाच्या गौरवाचं प्रतिबिंब+ आणि त्याच्या स्वभावाचं हुबेहूब प्रतिरूप आहे.+ तो त्याच्या सामर्थ्याच्या वचनाने सगळ्या गोष्टी टिकवून ठेवतो. आपल्याला आपल्या पापांपासून शुद्ध केल्यावर,+ तो स्वर्गात सर्वोच्च देवाच्या उजव्या हाताला जाऊन बसला.+ ४ अशा रितीने, तो स्वर्गदूतांपेक्षा श्रेष्ठ बनला आहे,+ कारण त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं असं नाव त्याला मिळालं आहे.+

५ उदाहरणार्थ, कोणत्याही स्वर्गदूताबद्दल देवाने कधीतरी असं म्हटलं होतं का, “तू माझा मुलगा आहेस; आज मी तुझा पिता बनलोय”?+ तसंच, “मी त्याचा पिता होईन आणि तो माझा मुलगा बनेल”?+ ६ पण, जेव्हा तो आपल्या ज्येष्ठ मुलाला+ पुन्हा जगात आणतो, तेव्हा तो म्हणतो: “सर्व स्वर्गदूतांनी त्याला नमन करावं.”

७ तसंच, स्वर्गदूतांबद्दल त्याने असं म्हटलं: “तो आपल्या स्वर्गदूतांना खूप शक्‍तिशाली* बनवतो आणि त्याच्या सेवकांना*+ अग्नीची ज्वाला बनवतो.”+ ८ पण मुलाबद्दल तो असं म्हणतो: “देव तुला सदासर्वकाळासाठी राज्याधिकार देतो*+ आणि तुझा राजदंड हा न्यायाचा* राजदंड आहे. ९ तू नीतीवर प्रेम केलंस आणि अनीतीचा द्वेष केला. म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझा तेलाने अभिषेक केला+ आणि तुझ्या इतर सोबत्यांपेक्षा तुला जास्त आनंदी केलं.”+ १० आणि, “हे प्रभू, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास, तू आपल्या हाताने आकाश बनवलंस. ११ ते नाहीसे होतील, पण तू सदासर्वकाळ राहशील; आणि एखाद्या वस्त्राप्रमाणे ते जुने होतील. १२ एखाद्या झग्याप्रमाणे, एखाद्या कापडाप्रमाणे तू त्यांना गुंडाळशील आणि ते बदलून जातील. पण तू बदलत नाहीस आणि तुझ्या आयुष्याची वर्षं कधीच संपणार नाहीत.”+

१३ पण कोणत्याही स्वर्गदूताबद्दल त्याने कधीतरी असं म्हटलं का, “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखालचं आसन करेपर्यंत माझ्या उजव्या हाताला बस”?+ १४ ते सर्व पवित्र सेवेसाठी,* म्हणजे ज्यांना तारणाचा वारसा मिळणार आहे, त्यांच्या सेवेसाठी पाठवण्यात आलेले स्वर्गदूत* नाहीत का?+

२ म्हणूनच, ऐकलेल्या गोष्टींकडे आपण नेहमीपेक्षा जास्त लक्ष दिलं पाहिजे,+ म्हणजे आपण कधीही वाहवत जाणार नाही.+ २ कारण स्वर्गदूतांद्वारे बोललेलं वचन+ खातरीलायक ठरलं, आणि त्याविरुद्ध केलेल्या प्रत्येक अपराधाची आणि उल्लंघनाची शिक्षा न्यायाप्रमाणे देण्यात आली.+ ३ मग, इतक्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केलं, तर आपण शिक्षेपासून कसं वाचू?+ कारण, या तारणाचा संदेश सांगण्याची सुरुवात आपल्या प्रभूने केली+ आणि ज्यांनी त्याचं ऐकलं त्यांनी आपल्याला त्याची खातरी पटवून दिली. ४ शिवाय देवसुद्धा चिन्हं, चमत्कार आणि वेगवेगळी अद्‌भुत कार्यं घडवून आणण्याद्वारे,+ तसंच, त्याच्या इच्छेप्रमाणे पवित्र शक्‍तीची* दानं वाटून देण्याद्वारे साक्ष देण्यात सहभागी झाला.+

५ कारण ज्या येणाऱ्‍या जगाबद्दल* आपण बोलत आहोत, ते त्याने स्वर्गदूतांच्या स्वाधीन केलेलं नाही.+ ६ पण एका ठिकाणी एका साक्षीदाराने असं म्हटलं आहे: “माणूस काय आहे की तू त्याला आठवणीत ठेवावं? आणि मानव काय आहे की तू त्याची काळजी घ्यावी?+ ७ तू त्याला स्वर्गदूतांपेक्षा काहीसं कमी बनवलंस; तू त्याला गौरवाचा आणि सन्मानाचा मुकुट घातलास आणि तुझ्या हातांच्या कार्यांवर त्याला नेमलंस. ८ तू सर्व गोष्टी त्याच्या पायांखाली ठेवल्या.”+ सगळ्या गोष्टी त्याच्या स्वाधीन करण्याद्वारे,+ त्याच्या अधीन नाही अशी कोणतीही गोष्ट देवाने ठेवली नाही.+ अर्थात, आपल्याला सध्यातरी सर्व गोष्टी त्याच्या स्वाधीन असल्याचं दिसत नाही.+ ९ पण ज्याला स्वर्गदूतांपेक्षा काहीसं कमी करण्यात आलं होतं,+ त्या येशूला आता आपण गौरवाचा आणि सन्मानाचा मुकुट घातलेला पाहतो. कारण त्याने मरण सोसलं+ आणि त्याद्वारे देवाच्या अपार कृपेमुळे सर्वांसाठी मृत्यूचा अनुभव घेतला.+

१० सर्व गोष्टी देवाच्या गौरवासाठी आहेत आणि त्या त्याच्याद्वारे अस्तित्वात आहेत. म्हणून पुष्कळ मुलांचा गौरव होण्यासाठी+ त्यांच्या मुख्य प्रतिनिधीला त्याने दुःख सोसू द्यावं, हे योग्य होतं.+ आणि या मुख्य प्रतिनिधीद्वारे देव त्यांचं तारण करतो.+ ११ पवित्र करणारा आणि ज्यांना पवित्र करण्यात आलं+ तेसुद्धा एकाच पित्यापासून आहेत,+ आणि म्हणूनच त्यांना भाऊ म्हणण्याची त्याला लाज वाटत नाही.+ १२ उदाहरणार्थ, तो म्हणतो, “मी आपल्या भावांसमोर तुझं नाव घोषित करीन; मंडळीत गीत गाऊन मी तुझी स्तुती करीन.”+ १३ पुन्हा तो म्हणतो, “मी त्याच्यावर भरवसा ठेवीन.”+ तसंच, “पाहा! मी आणि यहोवाने* मला दिलेली लहान मुलं.”+

१४ त्यामुळे ही “लहान मुलं” जशी हाडामांसाची आहेत तसाच तोसुद्धा हाडामांसाचा झाला.+ हे यासाठी, की ज्याच्याजवळ मृत्यू घडवून आणण्याची ताकद आहे,+ त्याला, म्हणजेच सैतानाला*+ त्याने आपल्या मरणाद्वारे नाहीसं करावं. १५ तसंच, मरणाच्या भीतीने ज्यांना आयुष्यभर दास करून ठेवलं होतं, त्या सगळ्यांना त्याने स्वतंत्र करावं.*+ १६ कारण खरं पाहिलं, तर तो स्वर्गदूतांची नाही, तर अब्राहामच्या संततीची* मदत करत आहे.+ १७ म्हणूनच, त्याला सर्व बाबतींत आपल्या “भावांप्रमाणे” बनावं लागलं.+ हे यासाठी, की त्याने देवाच्या सेवेत एक दयाळू आणि विश्‍वासू महायाजक बनावं, तसंच लोकांच्या पापांसाठी+ प्रायश्‍चित्ताचं बलिदान अर्पण करावं.+ १८ त्याची परीक्षा होत असताना त्याने स्वतः दुःख सोसलं,+ त्यामुळे ज्यांची परीक्षा होत आहे त्यांची मदत करायला तो समर्थ आहे.+

३ म्हणून, स्वर्गीय आमंत्रणात* भागीदार असलेल्या पवित्र बांधवांनो,+ ज्या प्रेषिताला आणि महायाजकाला आपण जाहीर रीत्या कबूल करतो, त्या येशूबद्दल विचार करा.+ २ जसा मोशे देवाच्या संपूर्ण घरात विश्‍वासू होता,+ तसाच तोसुद्धा, त्याला नेमणाऱ्‍या देवाला विश्‍वासू होता.+ ३ त्याला* मोशेपेक्षा जास्त गौरवाच्या पात्र समजलं जातं,+ कारण जो घर बांधतो त्याचा घरापेक्षा जास्त सन्मान केला जातो. ४ अर्थात, प्रत्येक घर कोणी ना कोणी बांधलेलं असतं. पण ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या तो देव आहे. ५ मोशे देवाच्या संपूर्ण घरात सेवक या नात्याने विश्‍वासू राहिला आणि याद्वारे ज्या गोष्टी नंतर सांगितल्या जाणार होत्या त्यांची साक्ष देण्यात आली. ६ पण ख्रिस्त तर देवाच्या घरावर देखरेख करणारा विश्‍वासू मुलगा होता.+ आणि जर आपण मोकळेपणाने बोलण्याचं धैर्य, आणि जिच्याबद्दल आपण अभिमान बाळगतो ती आशा शेवटपर्यंत दृढपणे टिकवून ठेवली, तर आपण त्याचं घर आहोत.+

७ म्हणून, पवित्र शक्‍ती* म्हणते त्याप्रमाणे,+ “आज जर तुम्ही त्याचे हे शब्द ऐकले तर बरं होईल. ८ ओसाड रानात तुमच्या पूर्वजांनी मला संताप आणला त्या वेळी, परीक्षेच्या दिवशी केलं, तसं आपलं हृदय कठोर करू नका.+ ९ त्यांनी ४० वर्षांपर्यंत माझी महान कार्यं पाहिली होती, तरीसुद्धा त्यांनी तिथे माझी परीक्षा पाहिली.+ १० म्हणून मला या पिढीचा तिटकारा आला आणि मी म्हणालो: ‘त्यांचं हृदय नेहमीच भरकटतं आणि त्यांनी माझे मार्ग जाणून घेतले नाहीत.’ ११ म्हणून मी माझ्या रागात अशी शपथ घेतली: ‘ते माझ्या विसाव्यात येऊ शकणार नाहीत.’ ”+

१२ बांधवांनो, जिवंत देवापासून स्वतःला दूर केल्यामुळे तुमच्यापैकी कोणामध्येही विश्‍वास नसलेलं दुष्ट हृदय उत्पन्‍न होऊ नये म्हणून सांभाळा.+ १३ पण “आज” म्हटलेला काळ जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत+ एकमेकांना प्रोत्साहन देत राहा. हे यासाठी, की तुमच्यापैकी कोणीही पापाच्या फसव्या शक्‍तीमुळे कठोर बनू नये. १४ कारण जो विश्‍वास आपल्यामध्ये सुरुवातीला होता, तो जर आपण शेवटपर्यंत टिकवून ठेवला, तरच आपण खऱ्‍या अर्थाने ख्रिस्ताचे भागीदार बनू.+ १५ ज्याप्रमाणे म्हणण्यात आलं आहे: “आज जर तुम्ही त्याचे हे शब्द ऐकले तर बरं होईल. तुमच्या पूर्वजांनी मला संताप आणला त्या वेळी केलं, तसं आपलं हृदय कठोर करू नका.”+

१६ कारण ज्यांनी ऐकूनही त्याला संताप आणला, ते कोण होते? मोशेच्या नेतृत्वाखाली इजिप्तमधून* बाहेर पडलेले सर्वच नव्हते का?+ १७ आणि ४० वर्षांपर्यंत देवाला ज्यांचा तिटकारा आला, ते कोण होते?+ ज्यांनी पाप केलं आणि ज्यांचे मृतदेह ओसाड रानात पडले, तेच नव्हते का?+ १८ आणि तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही, असं त्याने शपथ घेऊन कोणाला सांगितलं? ज्यांनी आज्ञा मोडल्या होत्या, त्यांनाच नाही का? १९ तर आपण पाहू शकतो, की विश्‍वास नसल्यामुळेच त्यांना देवाच्या विसाव्यात येता आलं नाही.+

४ देवाच्या विसाव्यात जाण्याचं अभिवचन अजूनही आहे. त्यामुळे, आपल्यापैकी कोणीही त्यासाठी लायक नसल्यासारखं दिसू नये, म्हणून आपण सांभाळू या.*+ २ कारण आनंदाचा संदेश जसा आपल्या वाडवडिलांना घोषित करण्यात आला होता, तसाच आपल्यालाही घोषित करण्यात आला आहे.+ पण वचन ऐकूनही त्यांना त्यापासून काही फायदा झाला नाही. कारण ज्यांनी ते ऐकलं, त्यांच्यासारखा विश्‍वास त्यांनी बाळगला नाही. ३ आपण विश्‍वास ठेवल्यामुळे त्याच्या विसाव्यात जातो. पण त्यांच्याबद्दल त्याने असं म्हटलं: “म्हणून मी माझ्या रागात अशी शपथ घेतली, ‘ते माझ्या विसाव्यात येऊ शकणार नाहीत.’ ”+ जगाच्या स्थापनेपासून त्याची कार्यं पूर्ण झाली असूनही त्याने असं म्हटलं.+ ४ कारण सातव्या दिवसाबद्दल त्याने एका ठिकाणी असं म्हटलं आहे: “आणि सातव्या दिवशी देवाने त्याच्या सर्व कार्यांतून विसावा घेतला.”+ ५ आणि पुन्हा इथे तो म्हणतो, “ते माझ्या विसाव्यात येऊ शकणार नाहीत.”+

६ तेव्हा, काहींचं त्याच्या विसाव्यात जाणं अजून बाकी आहे आणि ज्यांना आनंदाचा संदेश आधी घोषित करण्यात आला, ते आज्ञा मोडल्यामुळे त्यात जाऊ शकले नाहीत.+ ७ त्यामुळे, बऱ्‍याच काळानंतर दावीदच्या स्तोत्रात “आज” असं म्हणून तो पुन्हा एक दिवस निश्‍चित करतो; जसं की वर म्हणण्यात आलं आहे: “आज तुम्ही त्याचे हे शब्द ऐकले तर बरं होईल. आपलं हृदय कठोर करू नका.”+ ८ कारण जर यहोशवाने+ त्यांना विसाव्याच्या ठिकाणी नेलं असतं, तर देवाने नंतर आणखी एका दिवसाबद्दल सांगितलं नसतं. ९ याचा अर्थ, देवाच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा अजून बाकी आहे.+ १० कारण, देवाने ज्याप्रमाणे आपल्या कार्यांतून विसावा घेतला, त्याचप्रमाणे जो माणूस देवाच्या विसाव्यात गेला आहे, त्यानेसुद्धा स्वतःच्या कार्यांतून विसावा घेतला आहे.+

११ त्यांच्याप्रमाणेच आज्ञा मोडण्याची सवय लागून कोणीही पापात पडू नये, म्हणून आपण देवाच्या विसाव्यात जाण्याचा होईल तितका प्रयत्न करू या.+ १२ कारण देवाचं वचन जिवंत आणि प्रभावशाली आहे.+ ते कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा जास्त धारदार आहे.+ ते माणसाचं बाहेरचं रूप* आणि त्याचं आतलं व्यक्‍तिमत्त्व* यांमधला फरक उघड करतं. तसंच ते सांधे आणि मज्जा यांना आरपार छेदून जातं, आणि हृदयातले विचार आणि हेतू यांची पारख करू शकतं. १३ सृष्टीत अशी एकही गोष्ट नाही जी देवाच्या नजरेपासून लपलेली आहे.+ उलट, आपण ज्याला हिशोब देणार आहोत, त्याच्या डोळ्यांपुढे सर्व गोष्टी उघड्या आणि स्पष्ट आहेत.+

१४ म्हणून, स्वर्गात गेलेला देवाचा मुलगा, येशू+ हा आपला श्रेष्ठ महायाजक असल्यामुळे, आपण त्याच्यावर असलेला विश्‍वास जसा जाहीरपणे प्रकट केला होता, तसाच पुढेही करत राहू या.+ १५ कारण, आपला महायाजक असा नाही, जो आपल्या दुर्बलतांबद्दल सहानुभूती दाखवू शकणार नाही.+ तर त्यालाही आपल्याप्रमाणेच सर्व बाबतींत पारखण्यात आलं, पण तरी तो निष्पाप राहिला.+ १६ म्हणूनच, आपण अपार कृपेच्या राजासनापुढे धैर्याने जाऊ या.+ म्हणजे आपल्याला मदतीची गरज असेल, तेव्हा दया आणि अपार कृपा मिळेल.

५ कारण लोकांमधून घेतलेल्या प्रत्येक महायाजकाला त्यांच्या वतीने देवाच्या सेवेसाठी नियुक्‍त केलं जातं,+ म्हणजे त्याने पापांसाठी अर्पणं आणि बलिदानं द्यावीत.+ २ अज्ञानामुळे चुका करणाऱ्‍यांशी* तो सहानुभूतीने* व्यवहार करू शकतो. कारण त्याला स्वतःलाही आपल्या दुर्बलतेला तोंड द्यावं लागतं.* ३ आणि त्यामुळे लोकांच्या पापांसाठी जशी तो अर्पणं देतो, तशीच स्वतःच्या पापांसाठीही त्याला द्यावी लागतात.+

४ कोणताही माणूस स्वतःहून हा सन्मान घेत नाही, तर अहरोनप्रमाणे देवाने बोलावल्यावरच त्याला तो मिळतो.+ ५ त्याच प्रकारे, ख्रिस्तानेही महायाजक बनून स्वतःचा गौरव केला नाही,+ तर, “तू माझा मुलगा आहेस; आज मी तुझा पिता बनलो आहे,”+ असं ज्याने त्याला म्हटलं त्याने त्याला गौरवलं. ६ जसं की, आणखी एका ठिकाणी तो असंही म्हणतो, “तू मलकीसदेकसारखा याजक आहेस आणि तू सर्वकाळासाठी याजक राहशील.”+

७ पृथ्वीवर असताना ख्रिस्ताने, त्याला मरणापासून वाचवायला समर्थ असलेल्या देवाला, आक्रोश करून आणि अश्रू गाळून याचना आणि विनंत्या केल्या;+ आणि त्याने देवाची भीती बाळगल्यामुळे त्याच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या. ८ देवाचा मुलगा असूनही, त्याला सोसाव्या लागलेल्या गोष्टींमधून तो आज्ञाधारकपणा शिकला.+ ९ आणि त्याला परिपूर्ण करण्यात आल्यावर,+ त्याच्या आज्ञांचं पालन करणाऱ्‍या सगळ्यांचं सर्वकाळासाठी तारण करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली.+ १० कारण देवाने त्याला मलकीसदेकसारखा याजक होण्यासाठी नेमलं आहे.+

११ त्याच्याबद्दल आमच्याजवळ सांगण्यासारखं बरंच काही आहे, पण तुम्हाला ते समजावून सांगणं कठीण आहे. कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात. १२ खरंतर, आतापर्यंत* तुम्ही शिक्षक व्हायला हवं होतं. पण, तुम्हाला पुन्हा एकदा देवाच्या पवित्र वचनांच्या प्राथमिक गोष्टी*+ कोणीतरी समजावून सांगायची गरज आहे; आणि तुम्ही पुन्हा एकदा, जड अन्‍नाची नाही, तर दुधाची गरज असलेल्यांसारखे झाला आहात. १३ जो दूधच पीत राहतो त्याला देवाच्या नीतिमान वचनाचं ज्ञान मिळत नाही, कारण तो लहान मूल आहे.+ १४ पण जड अन्‍न हे प्रौढ लोकांसाठी आहे. म्हणजे अशा लोकांसाठी ज्यांनी आपल्या समजशक्‍तीचा उपयोग करून तिला चांगलं आणि वाईट यांतला फरक ओळखण्यासाठी प्रशिक्षित केलं आहे.

६ आता आपण ख्रिस्ताबद्दलच्या प्राथमिक शिकवणींच्या पुढे गेलो असल्यामुळे,+ आपण प्रौढतेपर्यंत पोहोचण्यासाठी खटपट करू या.+ आपण पुन्हा एकदा पाया घालू नये, म्हणजे पुन्हा त्याच गोष्टी शिकू नयेत, ज्या आपण सुरुवातीला शिकलो होतो. जसं की निरर्थक* कामांबद्दल पश्‍चात्ताप, देवावर विश्‍वास, २ बाप्तिस्मा,* हात ठेवणं,+ मेलेल्यांचं पुनरुत्थान*+ आणि सर्वकाळाचा न्याय यांबद्दलची शिकवण. ३ आणि देवाने घडू दिलं, तर आपण नक्कीच प्रौढतेपर्यंत पोहोचू.

४ कारण ज्यांना एकेकाळी ज्ञानाचा प्रकाश मिळाला होता;+ ज्यांनी स्वर्गीय मोफत दान चाखलं; जे पवित्र शक्‍तीचे* भागीदार झाले; ५ आणि ज्यांनी देवाचं उत्तम वचन आणि येणाऱ्‍या जगाच्या व्यवस्थेच्या* सामर्थ्यशाली गोष्टी चाखल्या, ६ पण तरीसुद्धा जे पडले,+ त्यांना परत आणून पश्‍चात्ताप करायला प्रवृत्त करणं अशक्य आहे. कारण, ते स्वतःच देवाच्या मुलाला पुन्हा वधस्तंभाला* खिळतात आणि सगळ्यांसमोर त्याला लज्जित करतात.+ ७ देवाच्या आशीर्वादाने वारंवार पाऊस पडतो, तेव्हा जमीन पावसाचं पाणी पिऊन, तिची मशागत करणाऱ्‍यांसाठी पीक उत्पन्‍न करते. ८ पण, जी जमीन काटेकुसळे उत्पन्‍न करते, ती निरुपयोगी ठरते. तिला लवकरच शाप देऊन, शेवटी जाळून टाकलं जाईल.

९ प्रिय बांधवांनो, आम्ही अशा प्रकारे बोलत असलो, तरी आम्हाला खातरी आहे, की तुम्ही यापेक्षा चांगल्या स्थितीत आहात. अर्थात, तुम्ही तारणाकडे नेणाऱ्‍या मार्गावर चालत आहात. १० तुम्ही पवित्र जनांची सेवा केली आणि अजूनही करत आहात. आणि तुमचं काम आणि देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेलं प्रेम+ विसरून जायला देव अन्यायी* नाही. ११ पण, शेवटपर्यंत+ तुमची आशा दृढपणे टिकवून ठेवण्यासाठी+ तुमच्यापैकी प्रत्येकाने अशीच मेहनती वृत्ती पुढेही दाखवावी, अशी आमची इच्छा आहे. १२ म्हणजे तुम्ही आळशी बनणार नाही,+ तर विश्‍वासाद्वारे आणि धीर धरण्याद्वारे जे अभिवचनांचे वारस होतात, त्यांचं अनुकरण करणारे व्हाल.

१३ देवाने अब्राहामला अभिवचन दिलं, तेव्हा शपथ घेण्यासाठी आपल्यापेक्षा मोठा कोणी नसल्यामुळे देवाने स्वतःचीच शपथ घेऊन म्हटलं:+ १४ “मी तुला नक्की आशीर्वाद देईन आणि तुझी संतती वाढवीन.”+ १५ अब्राहामने धीर धरल्यावर त्याला हे अभिवचन मिळालं. १६ कारण लोक सहसा आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्‍तीची शपथ घेतात; आणि त्यांच्या शपथेने प्रत्येक वाद मिटतो, कारण ती एक कायदेशीर हमी असते.+ १७ त्याच प्रकारे, आपला उद्देश* कधीही बदलणार नाही हे देवाने आपल्या अभिवचनांच्या वारसदारांना आणखी स्पष्टपणे दाखवायचं ठरवलं,+ तेव्हा त्याने शपथ घेऊन याची हमी दिली.* १८ देवाने केलेल्या या दोन गोष्टी* कधीच बदलत नाहीत आणि तो कधीही खोटं बोलू शकत नाही.+ आपण जे देवाच्या आश्रयाला धावून आलो आहोत, त्या आपल्याला, या गोष्टींमुळे आपल्यासमोर ठेवलेली आशा पक्की धरून ठेवण्याचं प्रोत्साहन मिळतं. १९ ही खातरीलायक आणि पक्की आशा+ आपल्या जिवासाठी* एखाद्या नांगरासारखी आहे आणि ती पडद्याच्या पलीकडे आत जाते.+ २० तिथे, मलकीसदेकसारखा सर्वकाळासाठी महायाजक बनलेला येशू,+ आपल्याकरता मार्ग तयार करण्यासाठी आपल्या पुढे गेला आहे.+

७ राजांना लढाईत हरवून अब्राहाम परत येत असताना, शालेमचा राजा आणि सर्वोच्च देवाचा याजक असलेला मलकीसदेक त्याला भेटला, आणि त्याने अब्राहामला आशीर्वाद दिला.+ २ अब्राहामने त्याला सर्व गोष्टींतला दहावा भाग दिला.* पहिली गोष्ट म्हणजे, मलकीसदेक या नावाचा अर्थ “नीतिमत्त्वाचा राजा,” असा आहे, तसंच, तो शालेमचा राजा म्हणजेच, “शांतीचा राजा” आहे. ३ त्याच्या आईवडिलांबद्दल कोणतीच माहिती नाही किंवा त्याची वंशावळही नाही; तसंच, त्याचा जन्म आणि मृत्यू कधी झाला याबद्दलही माहिती सापडत नाही. तर त्याला देवाच्या मुलासारखं करण्यात आल्यामुळे तो सर्वकाळासाठी याजक राहतो.+

४ कुटुंबप्रमुख* असलेल्या अब्राहामने ज्याला लुटीतल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींचा दहावा भाग दिला,+ तो माणूस किती महान होता याचा विचार करा. ५ नियमशास्त्राप्रमाणे, लेवीच्या मुलांपैकी+ ज्यांना याजकपद मिळतं त्यांना लोकांकडून, म्हणजेच अब्राहामचेच वंशज असलेल्या त्यांच्या भावांकडून, दशांश गोळा करण्याची आज्ञा दिली जाते.+ ६ पण हा माणूस जो त्यांच्या वंशावळीतला नव्हता, त्याने अब्राहामकडून दशांश घेतला आणि ज्याला अभिवचनं देण्यात आली होती, त्याला त्याने आशीर्वाद दिला.+ ७ जो लहान असतो त्याला आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्‍तीकडून आशीर्वाद मिळतो, यात शंकाच नाही. ८ एकीकडे, ज्यांना दशांश मिळतो, ती मरण पावणारी माणसं आहेत; पण दुसरीकडे ज्या माणसाला दशांश मिळाला, त्याच्याबद्दल अशी साक्ष देण्यात आली आहे, की तो जिवंत राहतो.+ ९ आणि दशांश घेणाऱ्‍या लेवीने स्वतःसुद्धा अब्राहामच्या द्वारे दशांश दिले असं म्हणता येईल, १० कारण ज्या वेळी मलकीसदेक अब्राहामला भेटला, त्या वेळी लेवी त्याच्या या पूर्वजाचा, म्हणजेच अब्राहामचा भावी वंशज होता.+

११ तर मग, लेव्यांच्या याजकपणामुळे (कारण लोकांना देण्यात आलेल्या नियमशास्त्राचाच हा एक भाग होता) जर परिपूर्णता मिळणं शक्य असतं,+ तर अहरोनसारखा नसून मलकीसदेकसारखा असलेला दुसरा एक याजक येण्याची काय गरज होती?+ १२ कारण याजकपण बदललं जात असल्यामुळे, नियमांत बदल करणंही गरजेचं आहे.+ १३ कारण ज्या माणसाबद्दल या गोष्टी सांगितल्या आहेत, तो दुसऱ्‍या एका वंशातून आला आणि त्या वंशातल्या कोणीही वेदीजवळ सेवा केली नाही.+ १४ कारण आपला प्रभू यहूदाच्या वंशातून आला हे तर स्पष्टच आहे.+ पण, त्या वंशातून याजक येण्याबद्दल मोशेने काहीही सांगितलं नाही.

१५ आणि जेव्हा मलकीसदेकसारखा+ दुसरा एक याजक+ येतो, तेव्हा ही गोष्ट आणखीनच स्पष्ट होते. १६ तो नियमाप्रमाणे शारीरिक वंशावळीच्या आधारावर याजक झाला नाही, तर अविनाशी जीवनाच्या सामर्थ्याने झाला आहे.+ १७ कारण त्याच्याबद्दल अशी साक्ष देण्यात आली आहे: “तू मलकीसदेकसारखा याजक आहेस आणि तू सर्वकाळासाठी याजक राहशील.”+

१८ तर मग, पूर्वीची आज्ञा कमजोर आणि निरुपयोगी ठरल्यामुळे ती रद्द करण्यात आली.+ १९ कारण नियमशास्त्राने कोणत्याही गोष्टीला परिपूर्ण केलं नाही,+ पण जेव्हा जास्त चांगली अशी आशा+ देण्यात आली, तेव्हा परिपूर्णता शक्य झाली, आणि त्याच आशेद्वारे आपण देवाच्या जवळ येत आहोत.+ २० ही आशा शपथ घेतल्याशिवाय देण्यात आली नाही. २१ (कारण, काही माणसं शपथेशिवाय याजक बनली आहेत हे खरं असलं, तरी या याजकाला मात्र देवाने शपथ घेऊन याजक नेमलं आणि त्याच्याबद्दल असं म्हटलं: “यहोवाने* शपथ घेतली आहे आणि तो आपलं मन बदलणार नाही,* ‘तू सर्वकाळासाठी याजक राहशील.’ ”)+ २२ त्यामुळे, येशू हा एका आणखी चांगल्या कराराची हमी देणारा* झाला आहे.+ २३ शिवाय, पूर्वी एकापाठोपाठ एक बऱ्‍याच जणांना याजक बनावं लागायचं.+ कारण मृत्यूमुळे त्यांना याजक म्हणून कायम सेवा करत राहणं शक्य नव्हतं. २४ पण हा याजक सदासर्वकाळ जिवंत असल्यामुळे,+ त्याच्या याजकपदाला वारसदारांची गरज नाही. २५ आणि म्हणूनच, त्याच्याद्वारे देवाजवळ येणाऱ्‍यांचं पूर्णपणे तारण करणंही* त्याला शक्य आहे. कारण त्यांच्याकरता याचना करण्यासाठी तो सर्वदा जिवंत आहे.+

२६ आपल्यासाठी असा एक महायाजक असणं योग्यच आहे, जो एकनिष्ठ, निर्दोष, निष्कलंक,+ पापी लोकांपेक्षा वेगळा आणि स्वर्गाहून उंच केलेला असा आहे.+ २७ दुसऱ्‍या महायाजकांप्रमाणे त्याला आधी स्वतःच्या पापांसाठी आणि मग लोकांच्या पापांसाठी,+ रोजच्या रोज बलिदानं अर्पण करायची गरज नाही.+ कारण त्याने स्वतःला अर्पण केलं, तेव्हा त्याने एकदाच सर्वकाळासाठी असं केलं.+ २८ कारण नियमशास्त्र तर अशा माणसांना महायाजक म्हणून नेमतं, ज्यांच्यामध्ये दुर्बलता आहेत.+ पण, नियमशास्त्रानंतर शपथ घेऊन दिलेल्या वचनाद्वारे+ एका मुलाला नेमण्यात आलं आणि त्याला सर्वकाळासाठी परिपूर्ण करण्यात आलं आहे.+

८ तर मग, आम्ही जे काही सांगत आहोत त्याचा मुख्य मुद्दा हा: आपल्याला लाभलेला महायाजक असा आहे+ आणि तो स्वर्गात सर्वोच्च देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.+ २ तो माणसाने नाही, तर यहोवाने* उभारलेल्या खऱ्‍या मंडपातल्या परमपवित्र स्थानाचा सेवक* आहे.+ ३ प्रत्येक महायाजकाला अर्पणं आणि बलिदानं वाहण्यासाठी नियुक्‍त केलं जातं. त्यामुळे यानेसुद्धा काहीतरी अर्पण करणं आवश्‍यक होतं.+ ४ तो पृथ्वीवर असता तर याजक नसता,+ कारण नियमशास्त्राप्रमाणे अर्पणं वाहणारी माणसं अगोदरच इथे आहेत. ५ ते करत असलेली पवित्र सेवा ही स्वर्गीय गोष्टींचं+ प्रतीक आणि छाया आहे.+ मोशे उपासना मंडप उभारणार होता तेव्हा देवाने त्याला जी आज्ञा दिली, त्याप्रमाणे हे आहे. देव त्याला म्हणाला, “पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व गोष्टी काळजीपूर्वक बनव.”+ ६ पण आता येशूला याहून श्रेष्ठ अशी सेवा* मिळाली आहे. कारण तो आणखी चांगल्या अभिवचनांवर कायदेशीर रीत्या स्थापन करण्यात आलेल्या,+ जास्त चांगल्या कराराचा+ मध्यस्थसुद्धा+ आहे.

७ त्या पहिल्या करारामध्ये काही दोष नसता, तर दुसऱ्‍या कराराची गरजच पडली नसती.+ ८ पण, लोकांमध्ये दोष आढळल्यामुळेच त्याने म्हटलं: “यहोवा* म्हणतो, ‘पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा मी इस्राएलच्या घराण्यासोबत आणि यहूदाच्या घराण्यासोबत एक नवीन करार करीन. ९ मी त्यांच्या वाडवडिलांचा हात धरून त्यांना इजिप्तमधून बाहेर आणलं,+ त्या दिवशी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार नसेल. ते माझ्या कराराला विश्‍वासू राहिले नाहीत, त्यामुळे मी त्यांची काळजी घ्यायचं सोडून दिलं,’ असं यहोवा* म्हणतो.

१० यहोवा* म्हणतो, ‘त्या दिवसांनंतर मी इस्राएलच्या घराण्याशी असा करार करीन: मी माझे नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयावर लिहीन.+ मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.+

११ यापुढे कोणीही आपल्या सहनागरिकाला किंवा आपल्या भावाला, “यहोवाची* ओळख करून घे!” असं म्हणणार नाही. कारण, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जण मला ओळखतील. १२ मी दयाळूपणे त्यांच्या अनीतिमान कार्यांची क्षमा करीन आणि त्यांची पापं पुन्हा कधीच आठवणीत आणणार नाही.’ ”+

१३ “नवीन करार,” असं म्हणण्याद्वारे त्याने आधीचा करार रद्द केला आहे.+ आता जो रद्द करण्यात आला आहे आणि जुना होत चालला आहे, तो नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे.+

९ पहिल्या करारात पवित्र सेवेबद्दल नियम आणि पृथ्वीवर उपासनेचा एक मंडपही होता.+ २ या मंडपाचा जो पहिला भाग तयार करण्यात आला होता, त्यात एक दीपवृक्ष,*+ मेज आणि अर्पणाच्या भाकरी* ठेवलेल्या होत्या.+ या भागाला पवित्र स्थान म्हटलं आहे.+ ३ पण, दुसऱ्‍या पडद्याच्या पलीकडे+ परमपवित्र स्थान म्हटलेला भाग होता.+ ४ इथे धूप जाळण्याचं सोन्याचं पात्र+ आणि पूर्णपणे सोन्याने मढवलेली कराराची पेटी होती;+ आणि त्यात मान्‍ना+ ठेवलेलं एक सोन्याचं पात्र,+ कळ्या आलेली अहरोनची काठी+ आणि कराराच्या पाट्या+ होत्या. ५ तसंच, पेटीच्या प्रायश्‍चित्ताच्या झाकणावर* पाखर घालणारे वैभवशाली करूब होते.+ अर्थात, या गोष्टींबद्दल सविस्तर सांगण्याची ही वेळ नाही.

६ अशा रितीने या सर्व गोष्टी तयार झाल्यावर, याजक नियमितपणे मंडपाच्या पहिल्या भागात पवित्र सेवा करण्यासाठी जाऊ लागले.+ ७ पण, दुसऱ्‍या भागात मात्र महायाजक एकटाच वर्षातून एकदा जायचा.+ पण, रक्‍ताशिवाय तो आत जात नव्हता.+ हे रक्‍त तो स्वतःसाठी+ आणि लोकांनी+ नकळत केलेल्या पापांसाठी अर्पण करायला जायचा. ८ अशा रितीने, पवित्र शक्‍ती* अगदी स्पष्टपणे दाखवून देते, की पहिला मंडप* उभा असेपर्यंत परमपवित्र स्थानात* जाण्याचा मार्ग प्रकट करण्यात आला नव्हता.+ ९ हा मंडप सध्याच्या काळासाठी एक उदाहरण आहे+ आणि या व्यवस्थेप्रमाणे अर्पणं आणि बलिदानं वाहिली जातात.+ पण, ही अर्पणं आणि बलिदानं पवित्र सेवा करणाऱ्‍या माणसाचा विवेक पूर्णपणे शुद्ध करू शकत नाहीत.+ १० ती फक्‍त खाण्यापिण्याबद्दल आणि शुद्धीकरणाच्या विधींबद्दल* आहेत.+ शारीरिक गोष्टींबद्दल असलेले हे नियम,+ सर्व गोष्टी व्यवस्थित करण्याच्या ठरवलेल्या काळापर्यंत लावून देण्यात आले होते.

११ पण, ख्रिस्त हा आधीच घडून गेलेल्या चांगल्या गोष्टींचा महायाजक या नात्याने आला, तेव्हा तो आणखी श्रेष्ठ आणि आणखी परिपूर्ण अशा मंडपात गेला. हा मंडप हातांनी बांधलेला नाही, म्हणजे निर्माण केलेल्या गोष्टींपैकी नाही. १२ बकऱ्‍यांचं किंवा वासरांचं* रक्‍त नाही, तर स्वतःचं रक्‍त+ घेऊन ख्रिस्त एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने आपल्या सर्वांसाठी सर्वकाळाची सुटका मिळवली.*+ १३ कारण, बकऱ्‍यांच्या आणि वासरांच्या रक्‍तामुळे,+ तसंच कालवडीची* राख शिंपडल्यामुळे अशुद्ध झालेल्यांचं शरीर देवाच्या नजरेत शुद्ध होतं;+ १४ तर मग, ज्याने सर्वकाळाच्या पवित्र शक्‍तीद्वारे स्वतःला एका निष्कलंक बलिदानाच्या रूपात देवाला अर्पण केलं, त्या ख्रिस्ताचं रक्‍त आपल्याला किती जास्त शुद्ध करू शकतं!+ आपल्याला जिवंत देवाची पवित्र सेवा करता यावी,+ म्हणून त्याचं रक्‍त आपल्या विवेकाला निर्जीव कार्यांपासून शुद्ध करतं.+

१५ म्हणूनच, तो एका नवीन कराराचा मध्यस्थ आहे.+ हे यासाठी, की ज्यांना बोलावण्यात आलं आहे, त्यांना सर्वकाळाच्या वारशाचं अभिवचन मिळावं.+ पहिल्या कराराच्या अधीन असताना केलेल्या पापांपासून ज्याने त्यांची खंडणी देऊन सुटका केली, त्याच्या मृत्यूमुळे हे सर्व शक्य झालं.+ १६ कारण, जिथे करार आहे, तिथे करार करणाऱ्‍या माणसाचा मृत्यू होणं आवश्‍यक आहे. १७ कारण, मृत्यू झाल्यावरच करार अंमलात येतो; करार करणारा माणूस जिवंत असेपर्यंत तो अंमलात येत नाही. १८ त्याचप्रमाणे, पहिला करारसुद्धा रक्‍ताशिवाय अंमलात आला नाही. १९ कारण नियमशास्त्रातली प्रत्येक आज्ञा सांगितल्यावर मोशेने पाणी, गडद लाल रंगाची लोकर आणि एजोब* झुडूप यांसोबत वासरांचं आणि बकऱ्‍यांचं रक्‍त घेऊन ते पुस्तकावर* आणि सर्व लोकांवर शिंपडलं, २० आणि म्हटलं: “देवाने तुम्हाला जो करार पाळायला सांगितला त्या कराराचं हे रक्‍त आहे.”+ २१ तसंच, मंडपावर आणि पवित्र सेवेच्या* सर्व भांड्यांवरही त्याने ते रक्‍त शिंपडलं.+ २२ हो, नियमशास्त्राप्रमाणे जवळजवळ सर्व वस्तू रक्‍ताने शुद्ध होतात;+ आणि रक्‍त ओतल्याशिवाय पापांची क्षमा मिळणं शक्य नाही.+

२३ त्यामुळे, स्वर्गातल्या गोष्टींच्या प्रतिकांचं+ अशा प्रकारे शुद्धीकरण होणं आवश्‍यक होतं.+ पण, स्वर्गातल्या गोष्टींसाठी याहून श्रेष्ठ बलिदानांची गरज आहे. २४ कारण ख्रिस्त, खऱ्‍या गोष्टींचं फक्‍त प्रतिरूप असलेल्या+ ठिकाणी, म्हणजे हातांनी बनवलेल्या परमपवित्र स्थानात नाही,+ तर प्रत्यक्ष स्वर्गात गेला+ आणि त्यामुळे आता तो आपल्यासाठी देवासमोर* उभा राहतो.+ २५ महायाजक जसा दरवर्षी,+ स्वतःचं नाही, तर प्राण्यांचं रक्‍त घेऊन परमपवित्र स्थानात जातो, तसा तो वारंवार स्वतःला अर्पण करण्यासाठी गेला नाही. २६ कारण तसं असतं, तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावं लागलं असतं. पण आता, स्वतःचं बलिदान देऊन पाप नाहीसं करण्यासाठी त्याने जगाच्या व्यवस्थांच्या* शेवटी एकदाच सर्वकाळासाठी स्वतःला प्रकट केलं आहे.+ २७ ज्याप्रमाणे, माणसांचं एकदाच मरणं आणि त्यानंतर न्याय होणं ठरलेलं असतं, २८ त्याचप्रमाणे पुष्कळ लोकांच्या पापांचा भार वाहून नेण्यासाठी ख्रिस्ताला सर्वकाळासाठी एकदाच अर्पण करण्यात आलं.+ तो दुसऱ्‍यांदा, पाप नाहीसं करण्यासाठी येणार नाही,* तर त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्‍यांचं तारण करण्यासाठी येईल.+

१० नियमशास्त्र हे पुढे येणाऱ्‍या चांगल्या गोष्टींचं+ खरं स्वरूप नाही, तर फक्‍त छाया आहे.+ त्यामुळे, वर्षांनुवर्षं सतत अर्पण केल्या जाणाऱ्‍या त्याच बलिदानांद्वारे ते* देवाजवळ येणाऱ्‍याला कधीच परिपूर्ण करू शकत नाही.+ २ जर करू शकलं असतं, तर बलिदानं अर्पण करण्याचं बंद झालं नसतं का? कारण, पवित्र सेवा करणारे एकदाच शुद्ध झाले असते आणि त्यानंतर पुन्हा कधीच त्यांना पापांची जाणीव झाली नसती. ३ पण याउलट, ही बलिदानं दरवर्षी लोकांना त्यांच्या पापांची आठवण करून देतात.+ ४ कारण, बैलांच्या किंवा बकऱ्‍यांच्या रक्‍ताने पापं नाहीशी होणं शक्य नाही.

५ म्हणून, तो जगात आला तेव्हा म्हणाला: “ ‘तुला बलिदानं आणि अर्पणं नको होती, तर तू माझ्यासाठी एक शरीर तयार केलं. ६ तुला होमार्पणं आणि पापार्पणं मान्य नव्हती.’+ ७ तेव्हा मी म्हणालो: ‘हे देवा, पाहा! (गुंडाळीत* माझ्याबद्दल लिहिण्यात आल्याप्रमाणे) तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आलो आहे.’ ”+ ८ आधी तो म्हणतो: “तुला बलिदानं आणि अर्पणं, होमार्पणं आणि पापार्पणं नको होती आणि तुला ती मान्यही नव्हती.” ही नियमशास्त्राप्रमाणे दिली जाणारी अर्पणं आहेत. ९ मग तो म्हणतो: “पाहा! तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आलो आहे.”+ दुसरं स्थापन करण्यासाठी तो पहिलं नाहीसं करतो. १० याच ‘इच्छेमुळे,’+ सर्वकाळासाठी एकदाच देण्यात आलेल्या येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या अर्पणाद्वारे, आपल्याला पवित्र करण्यात आलं आहे.+

११ तसंच, प्रत्येक याजक पवित्र सेवा*+ करण्यासाठी आणि वारंवार तीच बलिदानं अर्पण करण्यासाठी दररोज आपल्या जागी उभा राहतो.+ पण या बलिदानांमुळे पापं कधीच पूर्णपणे नाहीशी होऊ शकत नाहीत.+ १२ या माणसाने मात्र पापांकरता सर्वकाळासाठी एकदाच बलिदान अर्पण केलं आणि तो देवाच्या उजवीकडे बसला आहे.+ १३ तेव्हापासून तो त्या वेळेची वाट पाहत आहे, जेव्हा त्याच्या शत्रूंना त्याच्या पायांसाठी आसन केलं जाईल.+ १४ कारण, पवित्र केलं जाणाऱ्‍यांना त्याने फक्‍त एकच बलिदान अर्पण करून सर्वकाळासाठी परिपूर्ण केलं आहे.+ १५ शिवाय, पवित्र शक्‍तीसुद्धा* आपल्याला साक्ष देते, कारण आधी ती म्हणते: १६ “यहोवा* म्हणतो, ‘त्या दिवसांनंतर मी इस्राएलच्या घराण्याशी असा करार करीन: मी माझे नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयावर लिहीन.’ ”+ १७ मग पवित्र शक्‍ती म्हणते: “मी त्यांची पापं आणि त्यांचे अपराध पुन्हा कधीच आठवणीत आणणार नाही.”+ १८ आता ज्या पापांची क्षमा झाली आहे, त्यांसाठी आणखी कोणतंही अर्पण द्यायची गरज नाही.

१९ तर बांधवांनो, येशूच्या रक्‍तामुळेच आपल्याला परमपवित्र स्थानाकडे नेणाऱ्‍या मार्गावर चालत राहण्याचं धैर्य* मिळालं आहे.+ २० त्याने आपल्यासाठी एक नवीन आणि जिवंत मार्ग खुला केला* आहे. तो पडद्याला पार करून जातो.+ हा पडदा म्हणजे त्याचं शरीर. २१ शिवाय, आपल्यासाठी देवाच्या घरावर देखरेख करणारा एक महान याजक असल्यामुळे,+ २२ आपण सगळे जण प्रामाणिक मनाने आणि पूर्ण विश्‍वासाने देवाजवळ जाऊ या. कारण, आपली मनं रक्‍त शिंपडून दुष्ट विवेकापासून शुद्ध करण्यात आली आहेत+ आणि आपली शरीरं शुद्ध पाण्याने धुण्यात आली आहेत.+ २३ आपण न डगमगता, आपल्या आशेची सर्वांसमोर घोषणा करत राहू या.+ कारण ज्याने अभिवचन दिलं आहे तो विश्‍वसनीय आहे. २४ आणि एकमेकांचा विचार करून* आपण प्रेम आणि चांगली कार्यं करण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देऊ या.*+ २५ तसंच, काहींची रीत आहे त्याप्रमाणे आपण एकत्र येणं सोडू नये,+ तर एकमेकांना प्रोत्साहन देत राहावं+ आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचं आपण पाहतो, तसतसं हे आणखी जास्त करावं.+

२६ कारण, सत्याचं अचूक ज्ञान मिळाल्यावर जर आपण जाणूनबुजून पाप करत राहिलो,+ तर यापुढे पापांसाठी आणखी कोणतंही बलिदान नाही.+ २७ त्याऐवजी, भयंकर न्यायदंडाची भीती आणि विरोधकांना भस्म करणारा जळजळीत क्रोध, इतकंच उरतं.+ २८ मोशेच्या नियमशास्त्रातल्या आज्ञा मोडणाऱ्‍याला, दोघा किंवा तिघांच्या साक्षीवरून दयामाया न दाखवता मृत्युदंड दिला जातो.+ २९ तर मग, जी व्यक्‍ती देवाच्या मुलाला पायाखाली तुडवते आणि कराराच्या ज्या रक्‍ताद्वारे+ तिला पवित्र करण्यात आलं होतं त्याला क्षुल्लक लेखते, तसंच पवित्र शक्‍तीद्वारे मिळालेल्या अपार कृपेला तुच्छ लेखते, ती आणखीनच मोठ्या शिक्षेसाठी पात्र आहे असं तुम्हाला वाटत नाही का?+ ३० कारण “सूड घेणं माझं काम आहे; मी परतफेड करीन,” असं ज्याने म्हटलं त्याला आपण ओळखतो. तसंच, असंही लिहिण्यात आलं आहे: “यहोवा* आपल्या लोकांचा न्याय करेल.”+ ३१ जिवंत देवाच्या हातात सापडणं ही भयंकर गोष्ट आहे.

३२ पण, पूर्वीचे ते दिवस आठवत राहा, जेव्हा ज्ञानाचा प्रकाश मिळाल्यावर+ तुम्ही मोठा संघर्ष करून धीराने दुःखं सोसली. ३३ काही वेळा, जाहीरपणे* तुमचा अपमान आणि छळ करण्यात आला; तर काही वेळा, अशा गोष्टी सोसणाऱ्‍यांना तुम्ही त्यांच्या दुःखात साथ दिली.* ३४ कारण, जे तुरुंगात होते त्यांच्याबद्दल तुम्ही सहानुभूती दाखवली आणि तुमची मालमत्ता लुटण्यात आली, तरी तुम्ही ते आनंदाने सहन केलं.+ आपल्याजवळ यापेक्षा चांगली आणि कायम टिकणारी संपत्ती आहे,+ याची जाणीव असल्यामुळे तुम्ही असं केलं.

३५ त्यामुळे, आपलं धैर्य* गमावू नका, कारण याबद्दल पुढे तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल.+ ३६ देवाची इच्छा पूर्ण केल्यावर, त्याने दिलेल्या अभिवचनाचं प्रतिफळ तुम्हाला मिळावं, म्हणून तुम्हाला धीराची गरज आहे.+ ३७ कारण, “खूप थोडा वेळ” उरला आहे+ आणि “जो येणार आहे तो येईल, तो उशीर करणार नाही.”+ ३८ “पण माझा नीतिमान सेवक आपल्या विश्‍वासामुळे जगेल,”+ आणि “जर त्याने माघार घेतली, तर मला* त्याच्याबद्दल मुळीच आनंद वाटणार नाही.”+ ३९ पण, आपण मात्र माघार घेऊन नाश होणाऱ्‍यांपैकी नाही,+ तर ज्यामुळे आपलं जीवन* वाचेल असा विश्‍वास बाळगणाऱ्‍यांपैकी आहोत.

११ विश्‍वास हा आशा धरलेल्या गोष्टींबद्दलचा भरवसा+ आणि न पाहिलेल्या खऱ्‍या गोष्टींचा खातरीलायक पुरावा आहे. २ कारण त्याच्याद्वारेच, प्राचीन काळातल्या लोकांना* अशी साक्ष देण्यात आली, की त्यांना देवाची पसंती मिळाली आहे.

३ विश्‍वासानेच, आपण हे समजू शकतो, की जगातल्या सर्व गोष्टी* देवाच्या वचनाद्वारे उत्पन्‍न झाल्या.* याचा अर्थ, दिसणाऱ्‍या गोष्टी न दिसणाऱ्‍या गोष्टींमधून अस्तित्वात आल्या आहेत.

४ विश्‍वासानेच, हाबेलने काइनपेक्षा जास्त चांगलं बलिदान अर्पण केलं.+ आणि त्या विश्‍वासाद्वारेच, देवाने त्याचं अर्पण स्वीकारून त्याला अशी साक्ष दिली, की तो नीतिमान आहे.+ तो मेला असला, तरी त्याच्या विश्‍वासाद्वारे आजही बोलतो.+

५ विश्‍वासामुळेच, हनोखला+ मृत्यूचा अनुभव येऊ नये, म्हणून दुसऱ्‍या ठिकाणी नेण्यात आलं. तो कुठेही सापडला नाही, कारण देवानेच त्याला नेलं होतं.+ आणि त्याआधी त्याला अशी साक्ष देण्यात आली, की त्याने देवाचं मन आनंदित केलं आहे. ६ तसंच, विश्‍वासाशिवाय देवाला आनंदित करणं अशक्य आहे, कारण देवाजवळ येणाऱ्‍याने ही खातरी बाळगली पाहिजे, की तो अस्तित्वात आहे आणि त्याचा मनापासून शोध घेणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देतो.+

७ विश्‍वासानेच, नोहाने+ देवाचं भय बाळगून आपल्या घराण्याला वाचवण्यासाठी एक जहाज* बांधलं.+ कारण, न दिसणाऱ्‍या गोष्टींबद्दल त्याला देवाकडून सूचना मिळाली होती.+ या विश्‍वासाद्वारे त्याने जगाला दोषी ठरवलं+ आणि विश्‍वासामुळे उत्पन्‍न होणाऱ्‍या नीतिमत्त्वाचा तो वारस बनला.

८ विश्‍वासानेच, जेव्हा अब्राहामला+ बोलावण्यात आलं, तेव्हा त्याने आज्ञा मानली आणि देवाकडून वारशाने मिळणार असलेल्या ठिकाणी तो जायला निघाला. आपण कुठे जात आहोत हे माहीत नसतानाही तो गेला.+ ९ विश्‍वासानेच तो वचन दिलेल्या देशात, परक्या देशात राहत असलेल्या विदेश्‍यासारखा राहिला.+ जे त्याच्यासोबत त्याच अभिवचनाचे वारस होते+ त्या इसहाक आणि याकोब यांच्यासोबत तो तंबूंत राहिला.+ १० कारण, खरा पाया असलेल्या अशा शहराची तो वाट पाहत होता, ज्याची रचना* आणि बांधकाम करणारा देव आहे.+

११ विश्‍वासानेच, सारालासुद्धा वय होऊन गेल्यानंतरही गर्भधारणेची शक्‍ती मिळाली.+ कारण वचन देणारा विश्‍वसनीय* असल्याचं तिने मानलं. १२ याच कारणामुळे, जो जवळजवळ निर्जीव झाला होता अशा एका माणसाद्वारे,+ आकाशातल्या ताऱ्‍यांइतकी आणि समुद्रकिनारी असलेल्या वाळूच्या कणांइतकी+ मुलं जन्माला आली.+

१३ हे सगळे जण मरेपर्यंत विश्‍वासू राहिले. ते अभिवचनांची पूर्णता पाहू शकले नाहीत,+ तरीसुद्धा त्यांनी ती दुरून पाहिली+ आणि आनंद मानला. तसंच, त्या देशात आपण परके आणि तात्पुरते रहिवासी असल्याचं त्यांनी जाहीरपणे घोषित केलं. १४ कारण जे अशा प्रकारे बोलतात ते हेच दाखवून देतात, की आपलं स्वतःचं असं एक ठिकाण मिळवण्यासाठी ते उत्सुक आहेत. १५ खरंतर, ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाची जर ते सतत आठवण करत राहिले असते,+ तर तिथे परत जाण्याची संधी ते शोधू शकले असते. १६ पण, आता ते एका जास्त चांगल्या ठिकाणाची आशा बाळगतात. त्या ठिकाणाचा संबंध स्वर्गाशी आहे. म्हणूनच, स्वतःला त्यांचा देव म्हणवून घ्यायची देवाला लाज वाटत नाही,+ कारण त्याने त्यांच्यासाठी एक शहर तयार केलं आहे.+

१७ विश्‍वासानेच, अब्राहामने, त्याची परीक्षा घेण्यात आली+ तेव्हा इसहाकचं जवळजवळ अर्पण केलंच होतं. हो, ज्या माणसाने आनंदाने अभिवचनं स्वीकारली होती, तो आपल्या एकुलत्या एका मुलाला अर्पण करायला तयार झाला.+ १८ “जे इसहाकपासून येतील त्यांना तुझी संतती* म्हटलं जाईल,”+ असं सांगण्यात आलेलं असतानाही त्याने असं केलं. १९ पण, देव इसहाकला मेलेल्यांतूनही उठवायला समर्थ आहे, असा निष्कर्ष त्याने काढला. एका लाक्षणिक अर्थाने तो खरोखरच त्याला मेलेल्यांतून परत मिळाला.+

२० विश्‍वासानेच, इसहाकने याकोब+ आणि एसाव+ यांना येणाऱ्‍या गोष्टींबद्दल आशीर्वाद दिला.

२१ विश्‍वासानेच, याकोबने आपल्या मृत्यूच्या वेळी+ योसेफच्या दोन्ही मुलांना आशीर्वाद दिला+ आणि आपल्या काठीचा आधार घेऊन देवाची उपासना केली.+

२२ विश्‍वासानेच, योसेफने आपल्या मृत्यूच्या वेळी, इस्राएलच्या मुलांची इजिप्त देशातून सुटका होईल असं सांगितलं आणि आपल्या अस्थींबद्दल* सूचना दिल्या.*+

२३ विश्‍वासानेच मोशेच्या आईवडिलांनी त्याच्या जन्मानंतर त्याला तीन महिने लपवून ठेवलं.+ कारण मूल खूप सुंदर असल्याचं त्यांनी पाहिलं+ आणि राजाच्या आदेशाला ते घाबरले नाहीत.+ २४ विश्‍वासानेच, मोशेने मोठा झाल्यावर+ स्वतःला फारोच्या मुलीचा मुलगा म्हणवून घ्यायला नकार दिला.+ २५ पापाचं क्षणिक सुख उपभोगण्यापेक्षा त्याने देवाच्या लोकांसोबत अत्याचार सहन करायचं निवडलं. २६ देवाचा अभिषिक्‍त* या नात्याने अपमान सहन करणं, हे इजिप्तच्या सर्व वैभवापेक्षा जास्त मौल्यवान आहे असं त्याने मानलं. कारण त्याने आपली नजर प्रतिफळावर केंद्रित केली होती. २७ विश्‍वासानेच त्याने इजिप्त देश सोडला.+ पण त्याने राजाच्या क्रोधाला भिऊन असं केलं नाही.+ तर जो अदृश्‍य होता त्याला+ पाहत असल्यासारखा तो विश्‍वासात खंबीर राहिला. २८ विश्‍वासानेच त्याने वल्हांडण सण पाळला आणि नाश करणाऱ्‍याने त्यांच्या प्रथमपुत्रांना इजा करू नये,* म्हणून त्याने दाराच्या चौकटीवर रक्‍त शिंपडलं.+

२९ विश्‍वासानेच, ते कोरड्या जमिनीवरून चालावं तसं तांबड्या समुद्रातून चालत गेले.+ पण इजिप्तच्या लोकांनी तसंच करायचा प्रयत्न केला, तेव्हा समुद्राने त्यांना गिळून टाकलं.+

३० विश्‍वासानेच, इस्राएली लोकांनी यरीहो शहराभोवती सात दिवस फेऱ्‍या घातल्यावर शहराच्या भिंती कोसळल्या.+ ३१ विश्‍वासामुळेच, राहाब वेश्‍येचा आज्ञा न मानणाऱ्‍या लोकांसोबत नाश झाला नाही. कारण तिच्या घरी आलेल्या हेरांचं तिने शांतीने स्वागत केलं.+

३२ आणखी काय सांगू? कारण जर मी गिदोन,+ बाराक,+ शमशोन,+ इफ्ताह,+ दावीद+ तसंच शमुवेल+ आणि इतर संदेष्ट्यांबद्दल सांगू लागलो तर वेळ पुरणार नाही. ३३ विश्‍वासाद्वारेच त्यांनी राज्यं जिंकली,+ न्यायनीती स्थापन केली, अभिवचनं मिळवली,+ सिंहांची तोंडं बंद केली,+ ३४ आगीची शक्‍ती निकामी केली,+ ते तलवारीच्या धारेपासून बचावले,+ दुर्बळ स्थितीतून शक्‍तिशाली बनले,+ युद्धात शूरवीर ठरले+ आणि त्यांनी आक्रमण करणाऱ्‍या सैन्यांना पळवून लावलं.+ ३५ स्त्रियांना त्यांचे मेलेले प्रियजन पुनरुत्थानाद्वारे* परत मिळाले;+ पण इतरांचा छळ करण्यात आला; ते खंडणी भरून स्वतःची सुटका करून घ्यायला तयार झाले नाहीत, कारण त्यांना जास्त चांगलं पुनरुत्थान मिळवायचं होतं. ३६ हो, इतर बऱ्‍याच जणांची थट्टा करण्याद्वारे आणि फटके मारण्याद्वारे परीक्षा झाली. इतकंच नाही, तर त्यांना साखळदंडाची बंधनं+ आणि तुरुंगवासही सोसावा लागला.+ ३७ त्यांना दगडमार करण्यात आला,+ त्यांची परीक्षा घेण्यात आली, करवतीने त्यांच्या शरीराचे दोन तुकडे करण्यात आले, तलवारीने त्यांची कत्तल करण्यात आली,+ ते मेंढरांची आणि बकऱ्‍यांची कातडी पांघरून फिरत राहिले.+ ते निराधार, पीडित+ आणि छळलेले+ होते; ३८ आणि हे जग त्यांच्यासाठी लायक नव्हतं. ते रानावनांतून, डोंगरांतून, गुहांतून+ आणि जमिनीतल्या खाचखळग्यांतून भटकत राहिले.

३९ या सगळ्यांना त्यांच्या विश्‍वासामुळे, देवाची पसंती मिळाल्याची साक्ष तर देण्यात आली, पण त्यांनी अभिवचनाची पूर्णता पाहिली नाही. ४० कारण देवाने आपल्यासाठी जास्त चांगलं असं काहीतरी आधीच ठरवलं होतं.+ हे यासाठी, की त्यांना आपल्याशिवाय परिपूर्ण केलं जाऊ नये.

१२ तर मग, आपण साक्षीदारांच्या इतक्या मोठ्या ढगाने वेढलेले असल्यामुळे, आपण प्रत्येक ओझं आणि सहज अडकवणारं पाप काढून टाकू या+ आणि आपल्यासमोर असलेल्या शर्यतीत धीराने धावू या.+ २ आणि आपल्या विश्‍वासाचा मुख्य प्रतिनिधी असलेल्या आणि आपला विश्‍वास परिपूर्ण करणाऱ्‍या येशूवर आपण आपली नजर केंद्रित करू या.+ कारण, जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी त्याने लज्जेची पर्वा न करता वधस्तंभ* सोसला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.+ ३ खरंच, ज्याने पापी लोकांचं इतकं अपमानास्पद बोलणं सहन केलं त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या,+ म्हणजे तुम्ही थकून जाऊन हार मानणार नाही;+ त्याच्या विरोधात बोलून त्या लोकांनी स्वतःवरच दोष ओढवून घेतला.

४ पापाशी संघर्ष करताना तुमचं रक्‍त सांडेपर्यंत तुम्हाला कधीही प्रतिकार करावा लागला नाही. ५ आणि देवाने तुम्हाला आपली मुलं या नात्याने दिलेला हा सल्ला तुम्ही पूर्णपणे विसरून गेला आहात: “माझ्या मुला, यहोवाने* दिलेली शिक्षा तुच्छ लेखू नकोस, किंवा त्याने तुझी चूक सुधारली तर खचून जाऊ नकोस. ६ कारण, यहोवा* ज्याच्यावर प्रेम करतो त्याला तो सुधारतो; खरंतर, ज्या कोणाला तो आपला मुलगा म्हणून स्वीकारतो त्याला तो फटके मारतो.”*+

७ आपल्याला सुधारण्याचा* हा एक मार्ग आहे असं समजून तुम्ही हे सहन करा. देव तुम्हाला आपली मुलं समजून तुमच्याशी व्यवहार करतो.+ कारण असा कोणता मुलगा आहे, ज्याला त्याचे वडील शिक्षा करत नाहीत?+ ८ पण, जर तुम्हा सर्वांना अशी शिक्षा मिळाली नसेल, तर मुळात तुम्ही खरी मुलं नाहीत, तर अनौरस* मुलं आहात. ९ शिवाय, शारीरिक दृष्टीने जे आपले वडील आहेत तेसुद्धा आपल्याला शिक्षा करायचे आणि आपण त्यांचा आदर करायचो. तर मग, आपण जिवंत राहावं, म्हणून पवित्र शक्‍तीद्वारे* आपल्या जीवनाला मार्गदर्शन देणाऱ्‍या पित्याच्या आपण आणखी किती अधीन राहिलं पाहिजे!+ १० कारण, त्यांनी फक्‍त काही काळासाठी, त्यांना योग्य वाटलं त्याप्रमाणे आपल्याला शिक्षा केली. पण, तो तर आपल्या भल्यासाठी आपल्याला शिक्षा करतो. हे यासाठी, की आपण त्याच्यासारखं पवित्र बनावं.+ ११ हे खरं आहे, की कोणत्याही शिक्षेमुळे सुरुवातीला आनंद होत नाही, उलट वाईटच वाटतं.* पण, ज्यांना या शिक्षेमुळे वळण लागतं त्यांच्यासाठी ती पुढे नीतिमत्त्वाचं शांतिदायक फळ उत्पन्‍न करते.

१२ त्यामुळे, गळून गेलेले हात आणि कमजोर झालेले गुडघे बळकट करा.+ १३ आणि आपल्या पायांसाठी सरळ मार्ग तयार करत राहा.+ हे यासाठी, की लंगड्या पायाचा सांधा निखळू नये, तर तो बरा व्हावा. १४ सर्वांबरोबर शांतीने राहायचा+ आणि पावित्र्य* टिकवून ठेवायचा+ प्रयत्न करत राहा. कारण पवित्र असल्याशिवाय कोणीही प्रभूला पाहू शकत नाही. १५ देवाची अपार कृपा मिळवण्यासाठी कोणीही चुकणार नाही याकडे विशेष लक्ष द्या; म्हणजे, नुकसान करणारं कोणतंही विषारी मूळ उत्पन्‍न होऊन बरेच जण दूषित होणार नाहीत.+ १६ तुमच्यामध्ये अनैतिक लैंगिक कृत्यं* करणारा किंवा एसावसारखा पवित्र गोष्टींची कदर नसलेला कोणीही असणार नाही, याची काळजी घ्या. त्याने फक्‍त एक वेळच्या जेवणाच्या बदल्यात प्रथमपुत्र असल्याचा आपला हक्क विकून टाकला.+ १७ कारण तुम्हाला माहीत आहे, की नंतर जेव्हा त्याने वारसदाराच्या हक्काने आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला नाकारण्यात आलं. त्याने त्याचं* मन बदलण्यासाठी अश्रू गाळले आणि खूप गयावया केली+ तरीसुद्धा काहीच उपयोग झाला नाही.

१८ कारण तुम्ही, स्पर्श करता येण्यासारख्या+ आणि आगीने पेटलेल्या पर्वताजवळ;+ किंवा दाट ढग, घोर अंधार आणि वादळ यांजवळ आलेला नाहीत;+ १९ किंवा मग, तुम्ही कर्ण्याचा नाद+ आणि कोणाच्या बोलण्याचा आवाज ऐकत नाहीत;+ तो ऐकताच, आता आणखी ऐकायला नको अशी लोकांनी विनंती केली होती.+ २० कारण, “एखाद्या जनावराने जरी पर्वताला स्पर्श केला तरी त्याला दगडमार करण्यात यावा,”+ या आज्ञेमुळे ते खूप घाबरले. २१ शिवाय, ते दृश्‍य इतकं भयानक होतं, की “मी भीतीने थरथर कापत आहे,” असं मोशेने म्हटलं.+ २२ पण तुम्ही तर, सीयोन पर्वत,+ जिवंत देवाचं शहर, म्हणजे स्वर्गीय यरुशलेम,+ लाखो स्वर्गदूतांची महासभा+ यांजवळ आला आहात; २३ आणि प्रथमपुत्रांची मंडळी, ज्यांची नावं स्वर्गात लिहिण्यात आली आहेत आणि सर्वांचा न्यायाधीश असलेला देव+ आणि ज्यांना परिपूर्ण करण्यात आलं आहे,+ ते पवित्र शक्‍तीने उत्पन्‍न झालेले+ नीतिमान जन यांच्याजवळ तुम्ही आला आहात. २४ तसंच, एका नव्या कराराचा+ मध्यस्थ, येशू+ आणि त्याने आपल्यावर शिंपडलेलं रक्‍त, जे हाबेलच्या रक्‍तापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे बोलतं,+ यांजवळ तुम्ही आला आहात.

२५ जो तुमच्याशी बोलत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष न करण्याची खबरदारी घ्या.* कारण, ज्याने पृथ्वीवर देवाचा इशारा दिला त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणारे जर शिक्षेपासून वाचू शकले नाहीत, तर जो स्वर्गातून बोलतो त्याच्याकडे पाठ फिरवली तर आपण शिक्षेपासून कसं वाचू?+ २६ त्या वेळी, त्याच्या आवाजाने पृथ्वी हादरली होती,+ पण आता त्याने असं वचन दिलं आहे: “मी पुन्हा एकदा पृथ्वीलाच नाही, तर आकाशालाही हालवीन.”+ २७ “पुन्हा एकदा” असं जे म्हटलं आहे त्यावरून दिसून येतं, की हालवता येणाऱ्‍या गोष्टी, म्हणजे घडवण्यात आलेल्या गोष्टी नाहीशा केल्या जातील. हे यासाठी, की ज्या हालवल्या जाऊ शकत नाहीत अशा गोष्टी टिकून राहाव्यात. २८ आपल्याला एक असं राज्य मिळणार आहे जे कधीच हालवलं जाऊ शकत नाही. म्हणूनच, आपण नेहमी देवाच्या अपार कृपेचा लाभ घेऊ या. यामुळे आपल्याला देवाची भीती आणि आदर बाळगून, तो स्वीकारेल अशा पद्धतीने त्याची पवित्र सेवा करता येईल. २९ कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे.+

१३ बांधवांप्रमाणे एकमेकांवर प्रेम करत राहा.+ २ पाहुणचार करायचं* विसरू नका,+ कारण त्याद्वारे काहींनी नकळत स्वर्गदूतांचं आदरातिथ्य केलं.+ ३ तुरुंगात* असलेल्यांसोबत तुम्हीही तुरुंगात आहात असं समजून+ त्यांची आठवण ठेवा.+ तसंच, ज्यांचा छळ केला जात आहे, त्यांचीही आठवण ठेवा. कारण तुम्ही त्यांच्यासोबत एकाच शरीराचे भाग आहात.* ४ विवाहबंधनाचा सगळ्यांनी आदर करावा आणि अंथरूण निर्दोष असावं.+ कारण अनैतिक लैंगिक कृत्यं* आणि व्यभिचार करणाऱ्‍यांचा देव न्याय करेल.+ ५ आपली जीवनशैली पैशाच्या लोभापासून मुक्‍त ठेवा+ आणि आहे त्यात समाधानी राहा.+ कारण त्याने म्हटलं आहे: “मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.”+ ६ म्हणूनच, आपण धैर्याने असं म्हणू शकतो: “यहोवा* मला साहाय्य करतो; मी घाबरणार नाही. माणूस माझं काय बिघडवू शकतो?”+

७ जे तुमचं नेतृत्व करत आहेत आणि ज्यांनी तुम्हाला देवाचं वचन सांगितलं आहे, त्यांची आठवण ठेवा+ आणि त्यांच्या वागणुकीचे चांगले परिणाम पाहून त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा.+

८ येशू ख्रिस्त जसा काल होता, तसाच आजही आहे आणि सदासर्वकाळ राहील.

९ वेगवेगळ्या आणि विचित्र शिकवणींच्या मागे लागून भरकटू नका. कारण, खाण्यापिण्यापेक्षा* देवाच्या अपार कृपेने आपलं हृदय सुदृढ करणं जास्त चांगलं; जे खाण्यापिण्याच्या मागे लागतात त्यांना त्यापासून फायदा होत नाही.+

१० आपल्याजवळ अशी एक वेदी आहे, जिच्यावरून खाण्याचा अधिकार मंडपात पवित्र सेवा करणाऱ्‍यांना नाही.+ ११ कारण, महायाजक पापार्पण म्हणून ज्या प्राण्यांचं रक्‍त परमपवित्र स्थानात घेऊन जातो, त्या प्राण्यांची शरीरं छावणीच्या बाहेर जाळून टाकली जातात.+ १२ त्यामुळे लोकांना स्वतःच्या रक्‍ताद्वारे पवित्र करण्यासाठी+ येशूनेसुद्धा शहराच्या फाटकाबाहेर दुःख सोसलं.+ १३ तर मग, त्याने सहन केलेला अपमान आपणही सहन करून+ छावणीच्या बाहेर त्याच्याकडे जाऊ या. १४ कारण, इथे आपल्यासाठी कायम टिकणारं शहर नाही, तर जे येणार आहे त्या शहराची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत.+ १५ तर मग, आपण येशूच्या द्वारे नेहमी देवाला स्तुतीचं बलिदान,+ म्हणजेच त्याच्या नावाची जाहीर रीत्या घोषणा करणाऱ्‍या+ आपल्या ओठांचं फळ अर्पण करू या.+ १६ शिवाय, चांगल्या गोष्टी करायला आणि तुमच्याजवळ जे आहे, त्यातून इतरांनाही द्यायला विसरू नका+ कारण अशा बलिदानांमुळे देवाला खूप आनंद होतो.+

१७ जे तुमचं नेतृत्व करत आहेत त्यांच्या आज्ञा पाळा+ आणि त्यांच्या अधीन राहा.+ कारण आपल्याला हिशोब द्यायचा आहे हे ओळखून ते तुमचं* रक्षण करत आहेत.+ हे यासाठी, की त्यांनी हे काम आनंदाने करावं, दुःखाने* नाही; कारण तसं झालं, तर तुमचंच नुकसान होईल.

१८ आमच्यासाठी प्रार्थना करत राहा, कारण आमचा विवेक प्रामाणिक* आहे असा भरवसा आम्हाला आहे आणि सर्व गोष्टींत प्रामाणिकपणे वागण्याची आमची इच्छा आहे.+ १९ पण, मी तुम्हाला खासकरून अशी प्रार्थना करायची विनंती करतो, की मला आणखीन लवकर तुमच्याकडे येणं शक्य व्हावं.

२० शांतीच्या देवाने सर्वकाळाच्या कराराच्या रक्‍ताने मेढरांचा महान मेंढपाळ,+ म्हणजेच आपला प्रभू येशू याला मेलेल्यांतून उठवलं. आता आमची हीच प्रार्थना आहे, की २१ त्याने तुम्हाला त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक चांगली गोष्ट पुरवावी; आणि ज्यामुळे त्याचं मन आनंदित होईल, असं कार्य करायला येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला प्रवृत्त करावं. त्यालाच सदासर्वकाळ गौरव मिळो. आमेन.

२२ बांधवांनो, आता मी तुम्हाला विनंती करतो, की प्रोत्साहनाचे हे शब्द तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावेत, कारण मी हे पत्र थोडक्यात लिहिलं आहे. २३ मी तुम्हाला सांगू इच्छितो, की आपला भाऊ तीमथ्य याची सुटका करण्यात आली आहे. तो जर लवकर आला, तर त्याला घेऊन मी तुम्हाला भेटायला येईन.

२४ तुमचं नेतृत्व करत असलेल्या सर्वांना आणि सर्व पवित्र जनांना माझा नमस्कार सांगा. इटलीचे+ बांधव तुम्हाला नमस्कार सांगतात.

२५ देवाची अपार कृपा तुम्हा सगळ्यांवर असो.

किंवा “काळ.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “वाऱ्‍यासारखं.” ग्रीक, न्यूमा. शब्दार्थसूची पाहा.

किंवा “जनसेवकांना.”

शब्दशः “देव सदासर्वकाळ तुझं राजासन आहे.”

किंवा “नीतीचा.”

किंवा “जनसेवेसाठी.”

ग्रीक, न्यूमा. शब्दार्थसूचीत “रूआख; न्यूमा” पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “मानववस्ती असलेल्या पृथ्वीबद्दल.”

अति. क५ पाहा.

शब्दशः “दियाबलाला.” म्हणजे, निंदा करणारा.

किंवा “सुटका करावी.”

शब्दशः “बीजाची.”

किंवा “बोलावण्यात.”

म्हणजे, येशूला

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “मिसरमधून.”

शब्दशः “भीती बाळगावी.”

ग्रीक सायखी. शब्दार्थसूचीत “जीव” पाहा.

ग्रीक न्यूमा. शब्दार्थसूचीत “रूआख; न्यूमा” पाहा.

किंवा “बहकलेल्यांशी.”

किंवा “कोमलतेने; सौम्यपणे.”

किंवा “दुर्बलतेच्या अधीन असतो.”

शब्दशः “काळाचा विचार करता.”

किंवा “मूलभूत तत्त्वं.”

शब्दशः “निर्जीव.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “येणाऱ्‍या काळाच्या.” शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “अनीतिमान.”

किंवा “इच्छा.”

शब्दशः “मध्यस्थी केली.”

हे देवाच्या अभिवचनाला आणि शपथेला सूचित करतं.

किंवा “जीवनासाठी.”

शब्दशः “वाटून दिला.”

किंवा “कुलप्रमुख.”

अति. क५ पाहा.

किंवा “त्याला खेद होणार नाही.”

किंवा “जामीन म्हणून दिलेला.”

किंवा “वाचवणंही.”

अति. क५ पाहा.

किंवा “जनसेवक.”

किंवा “जनसेवा.”

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

एक प्रकारची समई.

किंवा “पवित्र भाकरी.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “प्रायश्‍चित्ताच्या स्थानावर.”

शब्दार्थसूची पाहा.

हा पृथ्वीवरच्या मंडपाला सूचित करतो.

हे स्वर्गातल्या पवित्र स्थानाला सूचित करतं.

शब्दशः “वेगवेगळ्या बाप्तिस्म्यांबद्दल.”

किंवा “गोऱ्ह्यांचं.”

शब्दशः “खंडणी दिली; मुक्‍तता मिळवली.”

किंवा “गाईची.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “गुंडाळीवर.”

किंवा “जनसेवेच्या.”

शब्दशः “देवाच्या चेहऱ्‍यासमोर.”

किंवा “काळांच्या.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “पापांसाठी नाही.”

किंवा कदाचित, “लोक.”

शब्दशः “पुस्तकाच्या गुंडाळीत.”

किंवा “जनसेवा.”

शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “आत्मविश्‍वास.”

शब्दशः “मार्गाचं उद्‌घाटन केलं.”

किंवा “काळजी करून; लक्ष देऊन.”

किंवा “प्रवृत्त करू या; उत्साहित करू या.”

अति. क५ पाहा.

शब्दशः “जणू नाट्यगृहात सर्वांसमोर.”

किंवा “पाठीशी उभे राहिलात.”

शब्दशः “मोकळेपणाने बोलण्याचं धैर्य.”

किंवा “माझ्या जिवाला.”

किंवा “आपला जीव.”

किंवा “आपल्या पूर्वजांना.”

किंवा “जगाच्या व्यवस्था; काळ.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “स्थापित करण्यात आल्या; तयार करण्यात आल्या.”

मत्त २४:३८ तळटीप पाहा.

किंवा “ज्याचा शिल्पकार.”

किंवा “भरवशालायक.”

शब्दशः “बीज.”

किंवा “दफनविधीबद्दल.”

किंवा “आज्ञा दिली.”

शब्दशः “ख्रिस्त.”

शब्दशः “हात लावू नये.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “शिक्षा देतो.”

किंवा “वळण लावण्याचा.”

किंवा “विवाहबाह्‍य संबंधातून झालेली.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “दुःखच होतं.”

किंवा “शुद्धता.”

शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, आपल्या वडिलांचं मन.

किंवा “त्याचं ऐकायला नकार देऊ नका; त्याला निमित्तं सांगू नका.”

किंवा “अनोळखी लोकांशी प्रेमळपणे वागायला.”

शब्दशः “बांधलेले; बंधनांत असलेले.”

किंवा कदाचित, “जणू तुम्ही त्यांच्यासोबत दुःख सोसत आहात.”

शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

म्हणजे, खाणंपिणं याविषयीच्या नियमांपेक्षा.

किंवा “तुमच्या जिवांचं.”

किंवा “कण्हत.”

किंवा “चांगला.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा