वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt फिलिप्पैकर १:१-४:२३
  • फिलिप्पैकर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • फिलिप्पैकर
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
फिलिप्पैकर

फिलिप्पैकर यांना पत्र

१ ख्रिस्त येशूचे दास, पौल आणि तीमथ्य यांच्याकडून, फिलिप्पै+ इथे ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असलेल्या सगळ्या पवित्र जनांना, तसंच मंडळीतले देखरेख करणारे आणि सहायक सेवक यांना:+

२ देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त जो आपला प्रभू यांच्याकडून तुम्हाला अपार कृपा आणि शांती मिळो.

३ तुमची आठवण काढून मी नेहमी माझ्या देवाला धन्यवाद देतो. ४ तुम्हा सर्वांसाठी देवाला याचना करताना प्रत्येक वेळी मला मनापासून आनंद होतो.+ ५ कारण अगदी पहिल्या दिवसापासून या क्षणापर्यंत, आनंदाच्या संदेशाच्या प्रसारासाठी तुम्ही खूप चांगलं योगदान दिलं आहे.* ६ कारण ज्या देवाने तुमच्यामध्ये एका चांगल्या कार्याची सुरुवात केली, तो ते कार्य ख्रिस्त येशूच्या दिवसापर्यंत+ पूर्णही करेल+ याची मला खातरी आहे. ७ तुम्हा सर्वांबद्दल माझं अशा प्रकारे विचार करणं योग्यच आहे, कारण माझं तुमच्यावर अगदी मनापासून प्रेम आहे. माझ्या तुरुंगवासातल्या बंधनांत+ आणि आनंदाच्या संदेशाचं समर्थन करण्यात,+ तसंच त्याला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यात, तुम्ही माझ्यासोबत देवाच्या अपार कृपेचे भागीदार आहात.

८ ख्रिस्त येशूला तुमच्याबद्दल जसा जिव्हाळा वाटतो, तसाच मलाही वाटत असल्यामुळे, मी तुम्हा सर्वांना भेटायला अधीर झालो आहे. या बाबतीत स्वतः देव माझा साक्षी आहे. ९ मी सतत हीच प्रार्थना करतो, की तुमचं प्रेम दिवसेंदिवस आणखी वाढत राहावं+ आणि तुम्हाला सत्याचं अचूक ज्ञान+ आणि पूर्ण समज मिळावी.+ १० हे यासाठी, की कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी,+ म्हणजे ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत तुम्ही निर्दोष राहाल आणि इतरांसाठी अडखळण ठरणार नाही.+ ११ तसंच, येशू ख्रिस्ताद्वारे उत्पन्‍न होणाऱ्‍या नीतिमत्त्वाच्या फळाने तुम्ही भरून जावं+ आणि याद्वारे देवाचा गौरव आणि स्तुती व्हावी.

१२ आता बांधवांनो, तुम्हाला हे माहीत असावं अशी माझी इच्छा आहे, की माझ्या सध्याच्या परिस्थितीमुळे खरंतर आनंदाच्या संदेशाच्या वाढीला हातभारच लागला आहे. १३ कारण, मी ख्रिस्तासाठी तुरुंगात आहे+ ही गोष्ट सम्राटाच्या अंगरक्षक दलातल्या* सगळ्यांना आणि इतर लोकांनाही समजली आहे.+ १४ मी तुरुंगात असल्यामुळे प्रभूमध्ये असलेल्या बहुतेक बांधवांचं मनोबल वाढलं आहे आणि ते आता आणखीनच धैर्याने आणि निर्भयपणे देवाचं वचन सांगत आहेत.

१५ हे खरं आहे, की काही जण ईर्ष्येच्या आणि शत्रुत्वाच्या भावनेने ख्रिस्ताचा प्रचार करत आहेत. पण, इतर जण मात्र चांगल्या भावनेने प्रचार करत आहेत. १६ मला आनंदाच्या संदेशाचं समर्थन करण्यासाठी नेमण्यात आलं आहे हे त्यांना माहीत असल्यामुळे, हे लोक प्रेमापोटी ख्रिस्ताबद्दल घोषणा करत आहेत.+ १७ पण आधी उल्लेख केलेले लोक भांडखोर वृत्तीने प्रचार करतात. त्यांचे हेतू चांगले नाहीत, कारण माझ्या या तुरुंगवासात मला दुःखी करण्याचा त्यांचा इरादा आहे. १८ पण याचा काय परिणाम झाला आहे? हाच, की कोणी चांगल्या हेतूने प्रचार करो किंवा वाईट, पण यामुळे ख्रिस्ताबद्दल सगळीकडे घोषणा होत आहे आणि मला याच गोष्टीचा आनंद आहे. खरंतर, मी असाच आनंद मानत राहीन, १९ कारण तुमच्या याचनांमुळे आणि येशू ख्रिस्ताला देण्यात आलेल्या पवित्र शक्‍तीच्या* मदतीमुळे+ माझं तारण होईल हे मला माहीत आहे.+ २० मी असा भरवसा आणि आशा बाळगतो, की कोणत्याही बाबतीत माझी लाजिरवाणी स्थिती होणार नाही. तर, नेहमीच होत आलं आहे तसं आताही, मी मनमोकळेपणाने बोलत असल्यामुळे, मी जगलो काय किंवा मेलो काय, माझ्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमाच होईल.+

२१ कारण माझ्याबद्दल बोलायचं, तर माझं जगणं हे ख्रिस्तासाठी आहे+ आणि मरणंही माझ्या फायद्याचंच आहे.+ २२ जोपर्यंत मी या शरीरात जिवंत आहे, तोपर्यंत माझ्या कार्याद्वारे मी आणखी फळ उत्पन्‍न करीन. पण मी काय निवडीन, हे मी सांगत नाही. २३ या दोन गोष्टींमुळे माझी घालमेल होत आहे, कारण सुटका होऊन ख्रिस्तासोबत असण्याची माझी खरोखर इच्छा आहे.+ आणि हे नक्कीच कित्येक पटींनी चांगलंही आहे.+ २४ पण तुमच्यासाठी माझं शरीरातच राहणं जास्त गरजेचं आहे. २५ याची पूर्ण खातरी असल्यामुळे मला माहीत आहे की मी शरीरातच, पुढेही तुम्हा सर्वांसोबत राहीन. हे यासाठी, की तुमची प्रगती व्हावी आणि विश्‍वासात तुम्हाला आनंद मिळावा. २६ आणि जेव्हा मी पुन्हा तुमच्यासोबत असेन, तेव्हा माझ्यामुळे ख्रिस्त येशूमध्ये तुमचा आनंद ओसंडून वाहावा.

२७ इतकंच सांगतो, की ख्रिस्ताबद्दलच्या आनंदाच्या संदेशाला शोभेल अशा प्रकारे वागत जा.*+ म्हणजे मी तुम्हाला येऊन भेटलो, किंवा तुमच्यापासून दूर असलो तरीसुद्धा मला तुमच्याबद्दल नेहमी हेच ऐकायला मिळावं, की तुम्ही एकदिलाने आणि एकजूटपणे+ आनंदाच्या संदेशावरच्या विश्‍वासासाठी खांद्याला खांदा लावून झटत आहात. २८ आणि तुमच्या विरोधकांना तुम्ही कोणत्याही प्रकारे भीत नाही. ही गोष्ट त्यांच्यासाठी नाशाचा,+ तर तुमच्यासाठी तारणाचा पुरावा आहे+ आणि हे देवापासून आहे. २९ कारण तुम्हाला ख्रिस्तासाठी हा सन्मान मिळाला आहे, की तुम्ही त्याच्यावर फक्‍त विश्‍वासच ठेवू नये, तर त्याच्यासाठी दुःखही सहन करावं.+ ३० कारण मला जो संघर्ष करताना तुम्ही पाहिलं+ आणि आताही मी जो करत असल्याचं तुम्ही ऐकत आहात, तोच संघर्ष तुम्हालाही करावा लागत आहे.

२ ख्रिस्तासोबत ऐक्यात असल्यामुळे तुम्ही इतरांना प्रेमाने प्रोत्साहन देता आणि त्यांचं सांत्वन करता. तसंच, त्यांच्याबद्दल काळजी, जिव्हाळा आणि करुणा व्यक्‍त करता. २ तेव्हा, पुढेही अशाच प्रकारे वागत राहा. म्हणजेच, एक मनाचे होऊन आणि एकमेकांवर सारखंच प्रेम करून, पूर्ण एकतेत राहून* आणि एकच ध्येय मनात ठेवून चाला,+ म्हणजे मला खूप आनंद होईल. ३ भांडखोर वृत्तीने+ किंवा अहंकाराने कोणतीही गोष्ट करू नका,+ तर नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.+ ४ फक्‍त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू नका,+ तर इतरांच्या फायद्याचाही विचार करा.+

५ ख्रिस्त येशूमध्ये असलेली ही मनोवृत्ती नेहमी आपल्यामध्ये असू द्या.+ ६ तो देवाच्या स्वरूपात असूनही+ त्याने कधीही देवाचं स्थान बळकावण्याचा, म्हणजेच देवाशी बरोबरी करण्याचा विचार केला नाही.+ ७ उलट, त्याने आपल्याजवळ असलेल्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि एखाद्या दासासारखा होऊन+ तो माणूस* बनला.+ ८ इतकंच नाही, तर माणूस म्हणून आल्यावर* त्याने स्वतःला नम्र केलं आणि मरण सोसण्याइतपत, हो, वधस्तंभावरचं* मरण+ सोसण्याइतपत तो आज्ञाधारक झाला.+ ९ याच कारणामुळे, देवाने एक श्रेष्ठ स्थान देऊन त्याचा गौरव केला+ आणि त्याच्यावर कृपा करून इतर सगळ्या नावांपेक्षा महान असलेलं नाव त्याला बहाल केलं.+ १० हे यासाठी, की स्वर्गात, पृथ्वीवर आणि जमिनीखाली असलेल्यांपैकी* प्रत्येकाने येशूच्या नावाने गुडघे टेकावेत.+ ११ आणि देव जो आपला पिता, त्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू असल्याचं उघडपणे मान्य करावं.+

१२ माझ्या प्रिय बांधवांनो, तुम्ही नेहमीच आज्ञा पाळत आला आहात. त्याच प्रकारे, मी तुमच्या जवळ असतानाच नाही, तर विशेषकरून आता, मी तुमच्यापासून दूर असतानासुद्धा तुम्ही भीतभीत आणि थरथर कापत आपलं तारण मिळवून घ्यायचा प्रयत्न करत राहा. १३ कारण देवाला योग्य वाटतं त्याप्रमाणे तो स्वतः तुम्हाला उत्साहित करतो. आणि तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करावं, म्हणून तो तुमच्यामध्ये तशी इच्छा निर्माण करतो आणि ते कार्य करायची ताकदही देतो. १४ कुरकुर+ आणि वादविवाद न करता सगळ्या गोष्टी करत जा.+ १५ हे यासाठी, की एका बिघडलेल्या आणि विकृत पिढीत+ तुम्ही निर्दोष, निरागस आणि निष्कलंक अशी देवाची मुलं ठरावं.+ या पिढीत तुम्ही जगामध्ये प्रकाशाप्रमाणे चमकत आहात.+ १६ तसंच, जीवनाचं वचन अगदी घट्ट धरून ठेवा,+ म्हणजे, ख्रिस्ताच्या दिवशी मला हे जाणून आनंद होईल, की माझं धावणं आणि माझी मेहनत वाया गेली नाही. १७ पण तुम्ही विश्‍वासामुळे देत असलेल्या बलिदानावर+ आणि पवित्र सेवेवर* जरी मला पेयार्पणाप्रमाणे ओतलं जात असलं,+ तरी मी तुम्हा सगळ्यांसोबत याबद्दल खूप आनंदी आहे. १८ त्याच प्रकारे तुम्हीसुद्धा आनंदी होऊन माझ्यासोबत आनंद केला पाहिजे.

१९ मी आशा करतो की प्रभू येशूची इच्छा असेल, तर मला लवकरच तीमथ्यला तुमच्याकडे पाठवता येईल.+ म्हणजे तुमची खबर ऐकून मला प्रोत्साहन मिळेल. २० कारण त्याच्यासारखा स्वभाव असलेला असा कोणीही माझ्याजवळ नाही, जो तुमची अगदी मनापासून काळजी घेईल. २१ कारण बाकीचे सर्व जण येशू ख्रिस्ताच्या नाही, तर स्वतःच्याच हिताचा विचार करत आहेत. २२ पण तीमथ्यबद्दल तुम्हाला स्वतःला हे माहीत आहे, की जसा एखादा मुलगा+ आपल्या वडिलांना मदत करतो, तशीच त्याने माझ्यासोबत आनंदाच्या संदेशाच्या वाढीसाठी मेहनत केली आहे. २३ म्हणून, माझ्या बाबतीत पुढे काय होणार हे समजताच, मी त्याला तुमच्याकडे पाठवण्याची आशा करतो. २४ खरंतर, मला ही खातरी वाटते की प्रभूची इच्छा असेल, तर लवकरच मी स्वतःसुद्धा तुमच्याकडे येईन.+

२५ पण सध्या एपफ्रदीतला तुमच्याकडे पाठवणं मला आवश्‍यक वाटतं. तो माझा भाऊ, सहकारी, सहसैनिक आणि तुम्ही पाठवलेला दूत व मला मदत करणारा सेवक आहे.+ २६ तो तुम्हा सगळ्यांना भेटायला अधीर झाला आहे आणि तो आजारी पडल्याचं तुम्हाला कळल्यामुळे फार निराश झाला आहे. २७ तो खरंच खूप आजारी पडला होता, अगदी मरायला टेकला होता, पण देवाने त्याच्यावर दया केली. खरंतर फक्‍त त्याच्यावर नाही तर माझ्यावरही केली. हे यासाठी, की मला एकापाठोपाठ एक दुःख सहन करावं लागू नये. २८ म्हणून, मी त्याला लवकरात लवकर तुमच्याकडे पाठवतो, म्हणजे त्याला पाहून तुम्ही पुन्हा आनंदी व्हाल आणि माझीही काळजी थोडी कमी होईल. २९ तो आल्यावर प्रभूमध्ये त्याचं आनंदाने आणि रीतसर स्वागत करा आणि अशा माणसांची नेहमी कदर करत जा.+ ३० कारण ख्रिस्ताच्या कार्यासाठी* त्याने आपला प्राण जवळजवळ गमावलाच होता. शिवाय, माझी सेवा करायला तुम्ही स्वतः येऊ शकत नसल्यामुळे, तुमची कमी भरून काढण्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला.+

३ बांधवांनो, शेवटी इतकंच सांगतो, की प्रभूमध्ये नेहमी आनंदी राहा.+ तुम्हाला त्याच-त्याच गोष्टींबद्दल लिहायचा मला कंटाळा येत नाही, कारण त्या तुमच्या सुरक्षेसाठीच आहेत.

२ अशुद्ध माणसांपासून* सावध राहा; दुष्ट कामं करणाऱ्‍यांपासून सावध राहा; जे सुंतेचं* समर्थन करतात* अशांपासून सावध राहा.+ ३ खऱ्‍या अर्थाने सुंता झालेले आपणच आहोत.+ कारण आपण देवाच्या पवित्र शक्‍तीने* पवित्र सेवा करतो आणि ख्रिस्त येशूमध्ये अभिमान बाळगतो.+ आणि आपण शारीरिक गोष्टींवर भरवसा ठेवत नाही. ४ अर्थात, शारीरिक गोष्टींवर भरवसा ठेवायला कोणाजवळ कारण असेल, तर ते माझ्याजवळ आहे.

जर दुसऱ्‍या कोणाला वाटत असेल, की त्याच्याजवळ शारीरिक गोष्टींवर भरवसा ठेवायचं कारण आहे, तर माझ्याकडे आणखी जास्त कारणं आहेत: ५ मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला,+ इस्राएल राष्ट्रातला आणि बन्यामीन वंशातला आहे. मी इब्री आईवडिलांपासून जन्मलेला एक इब्री आहे.+ नियमशास्त्राच्या बाबतीत म्हणाल, तर मी एक परूशी आहे.+ ६ आवेशाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर मी मंडळीचा छळ करायचो.+ आणि नियमशास्त्रावर आधारित नीतिमत्त्वाच्या बाबतीत म्हणाल, तर मी नियमशास्त्राचं काटेकोर पालन करायचो. ७ तरीसुद्धा, एकेकाळी ज्या गोष्टी माझ्यासाठी फायद्याच्या होत्या, त्यांना मी ख्रिस्तासाठी कवडीमोल लेखलं आहे.*+ ८ इतकंच काय, तर माझा प्रभू ख्रिस्त येशू याच्याबद्दलच्या अनमोल ज्ञानासमोर मी सगळ्या गोष्टींना कवडीमोल लेखतो. त्याच्यासाठी मी सगळ्या गोष्टींचं नुकसान सहन केलं आहे आणि त्या केरकचरा आहेत असं समजतो. हे यासाठी, की मी ख्रिस्ताला मिळवावं ९ आणि त्याच्यासोबत ऐक्यात असल्याचं दिसून यावं. अर्थात, हे नियमशास्त्राचं पालन करण्याद्वारे मिळणाऱ्‍या माझ्या स्वतःच्या नीतिमत्त्वामुळे नाही, तर ख्रिस्तावर+ असलेल्या विश्‍वासाद्वारे+ मिळणाऱ्‍या, म्हणजेच देवाकडून विश्‍वासाच्या आधारावर मिळणाऱ्‍या नीतिमत्त्वामुळे शक्य आहे.+ १० माझा हेतू हाच आहे, की मी स्वतःला त्याच्यासारख्या मृत्यूच्या अधीन करण्याद्वारे+ त्याला आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या* सामर्थ्याला ओळखावं+ आणि त्याच्या दुःखात सहभागी व्हावं.+ ११ हे यासाठी, की कसंही करून, पहिलं पुनरुत्थान* होणाऱ्‍यांपैकी मी एक असावं.+

१२ मला हे बक्षीस आधीच मिळालं आहे किंवा मी आधीच परिपूर्ण झालो आहे, असं नाही. तर, ज्यासाठी ख्रिस्ताने मला निवडलं+ ते कसंही करून मिळवता यावं, म्हणून मी कसोशीने प्रयत्न करत आहे.+ १३ बांधवांनो, मी ते बक्षीस मिळवलं आहे असं मी मानत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की: मी मागच्या गोष्टी विसरून+ पुढे असलेल्या गोष्टी मिळवायला झटत आहे+ १४ आणि देवाने मला ख्रिस्त येशूद्वारे दिलेल्या स्वर्गातल्या जीवनाचं*+ बक्षीस मिळवायचा कसोशीने प्रयत्न करत आहे.+ १५ त्यामुळे, आपल्यापैकी जे प्रौढ आहेत+ त्यांनी हीच मनोवृत्ती बाळगावी. आणि जर एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या मनाचा कल वेगळा असेल, तर देव तुम्हाला योग्य मनोवृत्ती प्रकट करेल. १६ म्हणून आतापर्यंत आपण जी प्रगती केली आहे, त्याच मार्गाने आपण पुढेही नीट चालत राहू या.

१७ बांधवांनो, तुम्ही सर्व जण एकतेने माझं अनुकरण करा.+ आणि आम्ही तुम्हा सर्वांसाठी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे जे चालत आहेत त्यांच्याकडे लक्ष लावा. १८ कारण मी बऱ्‍याचदा सांगायचो तसंच आताही रडून तेच सांगतो, की असे पुष्कळ आहेत जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे* शत्रू असल्याप्रमाणे वागत आहेत. १९ शेवटी त्यांचा नाश होईल. त्यांचं पोटच त्यांचा देव आहे. त्यांचं वैभव मुळात त्यांची लाज आहे आणि त्यांचं मन पृथ्वीवरच्या गोष्टींकडे लागलेलं आहे.+ २० पण आपलं नागरिकत्व+ मात्र स्वर्गातलं आहे+ आणि आपला तारणकर्ता, जो स्वर्गात आहे त्याची, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत.+ २१ त्याच्याकडे सर्व गोष्टी स्वतःच्या अधीन करण्याचं सामर्थ्य आहे.+ त्याच्या या महान शक्‍तीने तोच आपल्या या दयनीय शरीराचं रूपांतर त्याच्यासारख्या गौरवशाली शरीरात करेल.+

४ माझ्या प्रिय बांधवांनो, माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्हाला भेटायला मी आतुर आहे. तुम्ही माझा आनंद आणि माझा मुकुट आहात.+ म्हणून प्रभूमध्ये असेच स्थिर उभे राहा.+

२ मी युवदीयाला विनंती करतो आणि सुंतुखेलाही विनंती करतो, की प्रभूमध्ये एक मनाच्या असा.+ ३ हो, माझा खरा सहकारी* असलेल्या तुलाही मी विनंती करतो, की या स्त्रियांना मदत करत राहा. कारण त्यांनी माझ्यासोबत तसंच क्लेमेंतसोबत आणि जीवनाच्या पुस्तकात ज्यांची नावं आहेत,+ त्या माझ्या इतर सहकाऱ्‍यांसोबत खांद्याला खांदा लावून खूप मेहनत केली आहे. *

४ प्रभूमध्ये नेहमी आनंदी राहा. पुन्हा एकदा सांगतो, आनंदी राहा!+ ५ तुमचा समजूतदारपणा+ सर्वांना कळून येऊ द्या. प्रभू जवळ आहे. ६ कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका.+ तर, सगळ्या गोष्टींत देवाचे आभार मानून प्रार्थना आणि याचना करा आणि आपल्या विनंत्या देवाला कळवा.+ ७ म्हणजे, सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती+ ख्रिस्त येशूद्वारे तुमच्या मनाचं+ आणि बुद्धीचं* रक्षण करेल.

८ शेवटी बांधवांनो, जे काही खरं, जे काही गंभीरतेने विचार करण्यासारखं, जे काही नीतिमान, जे काही शुद्ध, जे काही प्रिय मानण्यालायक, जे काही आदरणीय, जे काही चांगलं आणि जे काही प्रशंसनीय आहे, अशाच गोष्टींचा नेहमी विचार* करत जा.+ ९ तुम्ही ज्या गोष्टी शिकून घेतल्या आणि स्वीकारल्या, तसंच माझ्याकडून ज्या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या त्या पाळत राहा,+ म्हणजे शांतीचा देव तुमच्यासोबत राहील.

१० प्रभूमध्ये मला या गोष्टीचा खूप आनंद वाटतो, की शेवटी तुम्ही पुन्हा माझ्या भल्याचा विचार करू लागला आहात.+ आधीसुद्धा तुम्हाला माझ्याबद्दल काळजी वाटत होती, पण ती दाखवायची संधी तुम्हाला मिळाली नाही. ११ अर्थात, मला एखाद्या गोष्टीची गरज आहे म्हणून मी असं म्हणत नाही. कारण, कोणत्याही परिस्थितीत समाधानी* राहायला मी शिकून घेतलं आहे.+ १२ हलाखीच्या परिस्थितीत कसं राहायचं+ आणि समृद्धीत कसं राहायचं हे मला माहीत आहे. सर्व बाबतींत आणि सर्व परिस्थितींत भरल्या पोटी कसं राहायचं आणि उपाशी कसं राहायचं; तसंच, समृद्धी असताना आणि अडचण असताना कसं राहायचं याचं रहस्य मी शिकलो आहे. १३ जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सगळ्या गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते.+

१४ तरीसुद्धा, माझ्या संकटात मला मदत करून तुम्ही चांगलंच केलं. १५ खरंतर, तुम्हा फिलिप्पैकरांना हेही माहीत आहे, की तुम्ही पहिल्यांदा आनंदाचा संदेश ऐकल्यावर, मी मासेदोनियाहून निघालो, त्या वेळी तुमच्याशिवाय दुसऱ्‍या कोणत्याच मंडळीने माझ्यासोबत देवाणघेवाण केली नाही.+ १६ कारण मी थेस्सलनीकामध्ये असताना माझी गरज भागवण्यासाठी तुम्ही फक्‍त एकदा नाही, तर दोनदा मला काहीतरी पाठवलं होतं. १७ तुमच्याकडून एखादी भेट मिळण्याची मला अपेक्षा आहे असं नाही, तर तुमच्या चांगल्या कामांमुळे तुम्हालाच जास्त फायदा व्हावा असं मला वाटतं. १८ माझ्याजवळ गरजेच्या सगळ्या वस्तू आहेत. खरंतर, गरजेपेक्षा जास्त आहेत. आणि आता एपफ्रदीतच्या+ हातून तुम्ही जे पाठवलं, ते मिळाल्यामुळे मला कसलीच कमी नाही. तुम्ही पाठवलेली ही भेट देवाच्या दृष्टीत एक मोहक सुगंध+ आणि त्याला आनंद देणारं अर्पण आहे. १९ याच्या बदल्यात, माझा देव त्याच्या गौरवी वैभवातून, ख्रिस्त येशूच्या द्वारे तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करेल.+ २० आपला देव आणि पिता याला सदासर्वकाळ गौरव मिळो. आमेन.

२१ ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असलेल्या पवित्र जनांपैकी प्रत्येकाला माझा नमस्कार सांगा. माझ्यासोबत असलेले बांधव तुम्हाला नमस्कार सांगतात. २२ सर्व पवित्र जन आणि खासकरून जे कैसराच्या* घराण्यातले आहेत,+ ते तुम्हाला नमस्कार सांगतात.

२३ तुम्ही दाखवत असलेल्या योग्य मनोवृत्तीमुळे प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा तुमच्यावर असो.

किंवा “आनंदाच्या संदेशाच्या प्रसारात तुम्ही सहभाग घेतला आहे.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “नागरिकांसारखी वागणूक ठेवा.”

किंवा “एकजिवाचे होऊन.”

शब्दशः “माणसांच्या स्वरूपाचा.”

शब्दशः “जेव्हा तो माणसाच्या स्वरूपात आढळला तेव्हा.”

शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, ज्यांचं पुनरुत्थान केलं जाईल असे लोक.

किंवा “जनसेवेवर.”

किंवा कदाचित, “प्रभूच्या कार्यासाठी.”

शब्दशः “कुत्र्यांपासून.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “जे शरीर छाटतात.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा कदाचित, “स्वतःहून सोडून दिल्या आहेत.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “आधी पुनरुत्थान.”

शब्दशः “वरच्या बोलावण्याचं.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “जू वाहण्यात खरा सहकारी.”

किंवा “खूप संघर्ष केला आहे.”

किंवा “विचारांचं.”

किंवा “मनन.”

किंवा “संतुष्ट.”

किंवा “रोमी सम्राटाच्या.” शब्दार्थसूची पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा