वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt २ करिंथकर १:१-१३:१४
  • २ करिंथकर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २ करिंथकर
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ करिंथकर

करिंथकर यांना दुसरं पत्र

१ करिंथ इथली देवाची मंडळी आणि संपूर्ण अखयातल्या+ सगळ्या पवित्र जनांना, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित असलेला पौल आणि आपला भाऊ तीमथ्य+ यांच्याकडून:

२ देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त जो आपला प्रभू यांच्याकडून तुम्हाला अपार कृपा आणि शांती मिळो.

३ आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता,+ जो खूप करुणामय असा पिता आहे,+ आणि सगळ्या प्रकारच्या सांत्वनाचा देव आहे,+ त्याची स्तुती असो. ४ तो आपल्या सगळ्या संकटांमध्ये* आपलं सांत्वन करतो.*+ देवाकडून मिळणाऱ्‍या या सांत्वनाद्वारे+ आपल्यालाही इतरांचं, कोणत्याही प्रकारच्या संकटात* सांत्वन करता यावं+ म्हणून तो असं करतो. ५ कारण ज्या प्रकारे ख्रिस्तासाठी आपल्याला पुष्कळ संकटांना तोंड द्यावं लागतं,+ त्याच प्रकारे ख्रिस्ताद्वारे आपल्याला पुष्कळ सांत्वनसुद्धा मिळतं. ६ आता, जर आम्हाला परीक्षांना* तोंड द्यावं लागतं, तर ते यासाठी की तुम्हाला सांत्वन मिळावं आणि तुमचं तारण व्हावं;* आणि जर आमचं सांत्वन केलं जातं, तर तेसुद्धा तुमच्याच सांत्वनासाठी आहे. कारण, आम्हाला जी दुःखं सोसावी लागतात, त्याच प्रकारची दुःखं सोसायला हे सांत्वन तुम्हाला मदत करतं. ७ आणि तुमच्याबद्दल आमची आशा ही न डळमळणारी आहे. कारण ज्या प्रकारे तुम्ही आमच्यासोबत दुःखं सोसता, त्याच प्रकारे आमच्यासोबत तुमचं सांत्वनही केलं जाईल+ हे आम्हाला माहीत आहे.

८ बांधवांनो, आशिया प्रांतात आम्हाला जे संकट सोसावं लागलं, त्याबद्दल तुम्हाला माहीत असावं असं आम्हाला वाटतं.+ तिथे आमच्यावर इतक्या भयंकर समस्या आल्या, की स्वतःच्या बळावर त्यांचा सामना करणं आम्हाला शक्य नव्हतं. एवढंच काय, तर आमच्या जिवाचीही आम्हाला खातरी नव्हती.+ ९ खरंतर आम्हाला मृत्युदंड सुनावण्यात आला आहे असं आम्हाला वाटलं. हे यासाठी घडलं, की आम्ही स्वतःवर नाही, तर जो मेलेल्यांना उठवतो त्या देवावर भरवसा ठेवावा.+ १० त्याने आम्हाला मरणासारख्या मोठ्या संकटातून वाचवलं, पुढेही वाचवेल आणि वाचवत राहील अशी आम्ही आशा बाळगतो.+ ११ तुम्हीही आमच्यासाठी देवाला याचना करण्याद्वारे आम्हाला मदत करू शकता.+ कारण यामुळे, पुष्कळ जणांनी केलेल्या प्रार्थनांचं उत्तर म्हणून आमच्यावर होणाऱ्‍या कृपेबद्दल पुष्कळ जणांना देवाचे आभार मानायची संधी मिळेल.+

१२ आम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटतो, की जगातल्या लोकांशी आणि विशेषतः तुमच्याशी व्यवहार करताना आम्ही पवित्रतेने आणि देव शिकवत असलेल्या प्रामाणिकपणाने वागलो. आणि आम्ही माणसांच्या बुद्धीने नाही,+ तर देवाच्या अपार कृपेने वागलो आणि याबद्दल आमचा विवेक साक्ष देतो. १३ कारण ज्या गोष्टी तुम्ही वाचू शकता* आणि ज्यांचा अर्थ समजून घेऊ शकता अशा गोष्टींशिवाय आम्ही तुम्हाला दुसरं काही लिहीत नाही. आणि तुम्ही या गोष्टी पुढेही* पूर्णपणे समजून घेत राहाल अशी मी आशा करतो. १४ खरंतर, तुम्ही काही प्रमाणात हे समजूनही घेतलं आहे, की आम्ही तुमच्यासाठी अभिमानाचं कारण आहोत आणि तुम्हीही आपला प्रभू येशू याच्या दिवशी आमच्यासाठी अभिमानाचं कारण असाल.

१५ याच भरवशामुळे मी आधी तुमच्याकडे यायच्या विचारात होतो. हे यासाठी की तुम्हाला आनंदी होण्याची आणखी एक संधी मिळावी.* १६ कारण मासेदोनियाला जात असताना आणि तिथून परतताना तुम्हाला भेट द्यावी, आणि मग यहूदीयाला जाताना तुम्ही काही अंतरापर्यंत सोबत येऊन मला निरोप द्यावा,+ असा माझा विचार होता. १७ आता, असा विचार करताना मी बेजबाबदारपणे वागलो का? किंवा माणसांच्या विचारसरणीप्रमाणे या गोष्टींची योजना करून, आधी “हो, हो” आणि नंतर “नाही, नाही” असं म्हणालो का? १८ पण ज्याप्रमाणे देव भरवशालायक आहे त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला जे सांगतो तेही खरं आहे. आम्ही आधी “हो” आणि नंतर “नाही,” असं म्हणणार नाही. १९ कारण देवाचा मुलगा, येशू ख्रिस्त, ज्याच्याबद्दल आम्ही, म्हणजेच मी, सिल्वान* आणि तीमथ्य+ याने तुमच्यामध्ये घोषणा केली, तो ख्रिस्त “हो” आणि तरीसुद्धा “नाही” असा झाला नाही. तर त्याच्या बाबतीत “हो” याचा अर्थ नेहमी “हो” असाच झाला आहे. २० कारण देवाची कितीही अभिवचनं असली, तरी ती सगळी ख्रिस्ताद्वारे खरी ठरली आहेत.*+ आणि म्हणून, त्याच्याचद्वारे आपण देवाला “आमेन” असं म्हणतो+ आणि यामुळे आपल्याद्वारे त्याचा गौरव होतो. २१ पण तुम्ही आणि आम्ही ख्रिस्ताचे आहोत या गोष्टीची जो हमी देतो आणि ज्याने आपल्याला अभिषिक्‍त केलं, तो स्वतः देव आहे.+ २२ त्याने आपल्यावर त्याचा शिक्का मारला आहे+ आणि आपल्याला येणाऱ्‍या गोष्टींची एक हमी* दिली आहे. ती म्हणजे, आपल्या हृदयात त्याने दिलेली त्याची पवित्र शक्‍ती.*+

२३ तुम्हाला आणखी दुःख द्यायचं नसल्यामुळेच मी अजून करिंथला आलेलो नाही. हे खोटं असेल, तर देवाने माझ्याविरुद्ध साक्ष द्यावी. २४ आम्ही तुमच्या विश्‍वासावर सत्ता गाजवणारे आहोत असं नाही,+ तर तुमच्या आनंदासाठी आम्ही तुमचे सहकारी आहोत. कारण, तुम्ही उभे आहात ते तुमच्या स्वतःच्याच विश्‍वासामुळे.

२ तुमच्याकडे पुन्हा आल्यावर तुम्हाला दुःख द्यायचं नाही, असं मी ठरवलं आहे. २ कारण जर मी तुम्हाला दुःखी केलं, तर मला कोण आनंदित करेल? मला आनंद देणारे तुम्हीच तर आहात. ३ मी तुम्हाला जे काही लिहिलं ते यासाठी लिहिलं, की मी तिथे आल्यावर ज्यांच्याबद्दल मला आनंद वाटायला पाहिजे, त्यांच्यामुळे मी दुःखी होऊ नये. कारण, मला खातरी आहे की ज्या गोष्टींमुळे मला आनंद होतो, त्या गोष्टींमुळे तुम्हा सर्वांनाही तितकाच आनंद होतो. ४ कारण मी खूप दुःखाने आणि मनस्ताप सहन करून, अश्रू गाळत तुम्हाला पत्र लिहिलं. तुम्हाला दुःख द्यायचा माझा हेतू नव्हता,+ तर माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे तुम्हाला कळावं अशी माझी इच्छा होती.

५ आता, जर कोणी दुःख दिलं आहे+ तर ते फक्‍त मलाच नाही, तर काही प्रमाणात तुम्हा सर्वांनाच दिलं आहे​—मला जास्त कठोर शब्दांत सांगायची इच्छा नाही. ६ त्या माणसाला बहुतेक जणांनी जे ताडन दिलं आहे, ते पुरेसं आहे. ७ आता मात्र तुम्ही त्याला प्रेमळपणे क्षमा करून सांत्वन द्या,+ नाहीतर तो दुःखात बुडून जाईल.*+ ८ म्हणून, मी तुम्हाला प्रोत्साहन देतो की त्याला तुमच्या प्रेमाचं आश्‍वासन द्या.+ ९ तुम्हाला ते पत्र लिहायचं आणखी एक कारण म्हणजे, तुम्ही सगळ्या बाबतींत आज्ञा पाळाल की नाही, हे मला पाहायचं होतं. १० तुम्ही ज्याला क्षमा करता, त्याला मीसुद्धा क्षमा करतो. खरंतर, मी ज्या कोणाला क्षमा केली आहे, (जर मी कोणाला कशाविषयी क्षमा केली असेन, तर) ती ख्रिस्ताला साक्षी ठेवून तुमच्यासाठीच केली आहे. ११ हे यासाठी की, सैतानाने आपल्यावर विजय मिळवू नये,*+ कारण त्याच्या डावपेचांबद्दल* आपण अंधारात आहोत, असं नाही.+

१२ जेव्हा मी ख्रिस्ताबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करायला त्रोवस इथे आलो+ आणि प्रभूच्या कार्यात माझ्यासाठी एक दार उघडण्यात आलं, १३ तेव्हा माझा भाऊ तीत+ याची भेट न झाल्यामुळे मी फार बेचैन झालो. म्हणून, तिथल्या शिष्यांचा निरोप घेऊन मी मासेदोनियाला निघून गेलो.+

१४ पण मी देवाचे आभार मानतो, की तो जणू एका विजयोत्सवाच्या मिरवणुकीत आम्हाला ख्रिस्तासोबत नेतो आणि स्वतःबद्दलच्या ज्ञानाचा सुगंध आमच्याद्वारे सगळीकडे पसरवतो! १५ कारण, तारण होणाऱ्‍या* आणि नाश होणाऱ्‍यांमध्ये आम्ही देवाच्या नजरेत ख्रिस्ताविषयीच्या संदेशाचा मोहक सुगंध आहोत. १६ नाश होणाऱ्‍यांसाठी आम्ही मरण आणणारा मरणाचा गंध,*+ आणि तारण होणाऱ्‍यांसाठी जीवन देणारा जीवनाचा सुगंध आहोत. आणि अशा सेवेसाठी पुरेशी पात्रता कोणाजवळ आहे? १७ आमच्याजवळ आहे, कारण पुष्कळ माणसांप्रमाणे आम्ही देवाच्या वचनाचे विक्रेते* नाही,+ तर देवाने पाठवल्याप्रमाणे आम्ही अगदी प्रामाणिकपणे बोलतो. हो, आम्ही देवाच्या समोर ख्रिस्तासोबत ही सेवा करतो.

३ आता आम्हाला पुन्हा स्वतःची शिफारस करावी लागणार आहे का? किंवा, काही माणसांप्रमाणे आम्हाला तुमच्यासाठी किंवा तुमच्याकडून शिफारसपत्रं लिहून घ्यायची गरज आहे का? २ तुम्ही स्वतःच आमचं शिफारसपत्र आहात.+ हे पत्र आमच्या हृदयावर लिहिलेलं आहे. आणि सगळ्यांना त्याबद्दल माहीत आहे आणि सगळे ते वाचत आहेत. ३ कारण तुम्ही ख्रिस्ताकडून असलेलं शिफारसपत्र आहात हे स्पष्टच आहे. आणि सेवक या नात्याने+ आम्ही हे पत्र लिहिलं आहे. आम्ही ते शाईने नाही, तर जिवंत देवाच्या पवित्र शक्‍तीने;* आणि दगडी पाट्यांवर नाही,+ तर हृदयांवर लिहिलं आहे.+

४ ख्रिस्ताद्वारे आम्हाला देवासमोर आत्मविश्‍वास आहे. ५ खरंतर, स्वतःच्या बळावर कोणतंही कार्य करण्यासाठी आमच्याजवळ पुरेशी पात्रता नाही. पण स्वतः देव आम्हाला ही पात्रता देतो.+ ६ त्याने खरोखरच आम्हाला पुरेशी पात्रता दिली आहे. हे यासाठी, की आम्ही लेखी नियमांचे नाही,+ तर एका नवीन कराराचे+ आणि पवित्र शक्‍तीचे सेवक व्हावं. कारण लेखी नियम मृत्युदंडासाठी पात्र ठरवतात,+ पण पवित्र शक्‍ती जिवंत करते.+

७ शिवाय, ज्यांद्वारे मृत्यू येतो आणि जे दगडांवर लिहिण्यात आले,+ ते लेखी नियम इतक्या गौरवी तेजासहित देण्यात आले, की मोशेच्या चेहऱ्‍यावरच्या तेजामुळे+ इस्राएली लोकांना त्याच्याकडे पाहणं शक्य नव्हतं. पण हे तेज पुढे नाहीसं होणार होतं. ८ तर मग, पवित्र शक्‍ती+ ही आणखी जास्त गौरवी तेजासहित दिली जाऊ नये का?+ ९ कारण जर दंडासाठी पात्र ठरवणारे नियम+ तेजस्वी होते,+ तर मग ज्याद्वारे नीतिमान ठरवलं जातं, ते आणखी किती तेजस्वी असेल!+ १० खरंतर, ज्याला एकेकाळी गौरवी तेजाने समृद्ध करण्यात आलं होतं, त्याचं तेज काढून घेण्यात आलं आहे. कारण जे नंतर आलं ते त्यापेक्षा जास्त तेजस्वी आहे.+ ११ जे नाहीसं होणार होतं, ते जर इतक्या गौरवी तेजाने आणण्यात आलं,+ तर मग जे टिकून राहतं त्याचं तेज कितीतरी पटीने जास्त असेल!+

१२ आपल्याला अशी आशा असल्यामुळे+ आपण अगदी मोकळेपणाने बोलतो १३ आणि मोशे जसं करायचा, तसं आपण करत नाही. जे नाहीसं होणार होतं त्याच्या तेजाकडे* इस्राएली लोकांनी एकसारखं पाहू नये, म्हणून तो आपला चेहरा पडद्याने झाकून घ्यायचा.+ १४ पण त्या लोकांची बुद्धी मंद झाली होती.+ खरं पाहिलं, तर आजपर्यंत जेव्हाही जुन्या कराराचं वाचन केलं जातं, तेव्हा त्यांचं हृदय पूर्वीसारखंच पडद्याने झाकलेलं असतं.+ कारण तो पडदा फक्‍त ख्रिस्ताद्वारे काढून टाकला जातो.+ १५ खरंतर, आजही जेव्हा जेव्हा मोशेची लिखाणं वाचली जातात,+ तेव्हा तेव्हा त्यांचं हृदय जणू पडद्याने झाकलेलं असतं.+ १६ पण, जेव्हा कोणी यहोवाकडे* वळतं तेव्हा हा पडदा काढून टाकला जातो.+ १७ यहोवा* अदृश्‍य व्यक्‍ती आहे+ आणि जिथे यहोवाची* पवित्र शक्‍ती आहे, तिथे स्वातंत्र्य आहे.+ १८ आपले चेहरे पडद्याने झाकलेले नाहीत, तर आपण सगळे आरशांप्रमाणे यहोवाचं* तेज प्रतिबिंबित करतो. आणि असं करत असताना, आपलं स्वरूप देवासारखं बनत चाललं आहे. यहोवा,* जो अदृश्‍य आहे, तो* ज्याप्रमाणे आपलं रूपांतर घडवून आणत आहे, अगदी त्याचप्रमाणे आपण दिवसेंदिवस त्याचं तेज आणखी जास्त प्रतिबिंबित करत आहोत.+

४ देवाने आमच्यावर कृपा करून ही सेवा आम्हाला सोपवली असल्यामुळे आम्ही धीर सोडत नाही. २ पण आम्ही गुप्तपणे केल्या जाणाऱ्‍या लाजिरवाण्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. आम्ही कपटीपणे वागत नाही किंवा देवाच्या वचनात भेसळ करत नाही.+ तर, सत्य जाहीर करून देवासमोर, आम्ही प्रत्येक माणसाच्या विवेकाला पटेल अशा चांगल्या वागणुकीने स्वतःची शिफारस करतो.+ ३ जर आम्ही घोषित करत असलेला आनंदाचा संदेश खरंच पडद्याने झाकलेला असेल, तर ज्यांचा नाश होत आहे त्यांच्यासाठी तो झाकलेला आहे. ४ विश्‍वास न ठेवणाऱ्‍या या लोकांची मनं या जगाच्या व्यवस्थेच्या* देवाने+ आंधळी केली आहेत.+ हे यासाठी, की ख्रिस्त जो देवाचं प्रतिरूप आहे,+ त्याच्याबद्दलच्या गौरवी संदेशाचा प्रकाश त्यांच्यावर चमकू नये.+ ५ कारण आम्ही स्वतःबद्दल घोषणा करत नाही; तर येशू ख्रिस्ताबद्दल घोषणा करतो, की तो प्रभू आहे. आणि आम्ही येशूसाठी तुमचे दास आहोत असं स्वतःबद्दल सांगतो. ६ कारण देवाने स्वतः असं म्हटलं: “अंधारातून प्रकाश चमको.”+ त्याने आमच्या मनावर त्याचा प्रकाश पाडून,+ ख्रिस्ताच्या चेहऱ्‍यावरून प्रतिबिंबित होणाऱ्‍या देवाच्या गौरवी ज्ञानाने आमची मनं उजळून टाकली आहेत.

७ तरीसुद्धा, आमची ही संपत्ती+ मातीच्या भांड्यांत+ आहे. हे यासाठी, की आमच्याजवळ असलेलं असाधारण सामर्थ्य आमचं स्वतःचं नसून, देवाचं आहे हे दिसून यावं.+ ८ आमच्यावर सगळ्या बाजूंनी दबाव आहेत, पण आमचा अगदीच कोंडमारा झालेला नाही. आम्ही गोंधळलेलो आहोत, पण आमच्याकडे सुटकेचा मार्गच नाही, असं नाही.*+ ९ आमचा छळ होतो, पण आम्हाला एकटं सोडलं जात नाही.+ आम्हाला खाली पाडलं जातं, पण आमचा नाश होत नाही.+ १० येशूने सोसल्या होत्या तशा मरणाच्या यातना आम्ही आमच्या शरीरात सतत सहन करतो.+ हे यासाठी, की येशूचं जीवन आमच्या शरीरातही प्रकट व्हावं. ११ जिवंत असलेले आम्ही, येशूसाठी सतत मरणाचा सामना करत आहोत.+ मरणाच्या अधीन असलेल्या आमच्या शरीरातही येशूचं जीवन प्रकट व्हावं म्हणून आम्ही असं करतो. १२ अशा रितीने, आमच्यामध्ये मरण, तर तुमच्यामध्ये जीवन कार्य करत आहे.

१३ आता आम्हालाही त्याच प्रकारचा विश्‍वास आहे, ज्याबद्दल असं लिहिण्यात आलं आहे: “मी विश्‍वास ठेवला आणि म्हणून मी बोललो.”+ आम्हीसुद्धा विश्‍वास ठेवला आणि म्हणूनच आम्ही बोलतो. १४ कारण ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवलं, तो येशूसोबत आम्हालाही उठवेल आणि तुमच्यासोबत त्याच्यापुढे सादर करेल हे आम्हाला माहीत आहे.+ १५ या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठीच आहेत. हे यासाठी, की आणखी पुष्कळ जण देवाची उपकारस्तुती करत असल्यामुळे, अपार कृपेचा आणखी जास्त वर्षाव होत राहावा आणि त्याद्वारे देवाचा गौरव व्हावा.+

१६ म्हणूनच, आपण धैर्य सोडत नाही. आपलं शरीर जरी हळूहळू झिजत असलं, तरीसुद्धा आपली मनोवृत्ती* नक्कीच दिवसेंदिवस नवीन होत आहे. १७ कारण आपल्यावर येणारी संकटं* जरी तात्पुरती आणि हलकी असली, तरी ती आपल्यामध्ये असं गौरवी तेज उत्पन्‍न करतात, जे कितीतरी पटीने श्रेष्ठ* आणि सर्वकाळाचं आहे.+ १८ आपण मात्र दिसत असलेल्या गोष्टींकडे नाही, तर न दिसणाऱ्‍या गोष्टींकडे लक्ष लावतो.+ कारण दिसत असलेल्या गोष्टी तात्पुरत्या आहेत, पण न दिसणाऱ्‍या गोष्टी सर्वकाळाच्या आहेत.

५ कारण आपल्याला माहीत आहे, की आपलं पृथ्वीवरचं घर, म्हणजे हा तंबू जरी पाडण्यात आला,+ तरी आपल्याला देवाकडून एक इमारत मिळणार आहे. एक असं घर, जे हातांनी बांधलेलं नसून,+ स्वर्गात असलेलं आणि सर्वकाळाचं आहे. २ कारण सध्याच्या या घरात* आपण अक्षरशः कण्हतो आणि आपल्यासाठी असलेलं जे स्वर्गातलं आहे, ते घालायची* आपल्याला खूप उत्सुकता आहे,+ ३ म्हणजे, जेव्हा आपण ते घालू, तेव्हा आपण उघडे असे आढळणार नाही. ४ खरं पाहिलं, तर या तंबूमध्ये असलेले आपण ओझ्याखाली दबून जातो आणि कण्हतो, कारण आपल्याला हे काढून टाकायचं नाही, पण ते दुसरं घालायचंही आहे.+ हे यासाठी, की जे मरणारं आहे त्याला जीवनाने कायमचं गिळून टाकावं.+ ५ आता याच गोष्टीसाठी ज्याने आपल्याला तयार केलं, तो देव आहे.+ त्याने आपल्याला येणाऱ्‍या गोष्टींची हमी* म्हणून त्याची पवित्र शक्‍ती* दिली आहे.+

६ म्हणूनच, आपण नेहमी धैर्य धरतो आणि ही जाणीव बाळगतो, की जोपर्यंत आपण या शरीराच्या घरात राहतो तोपर्यंत आपण प्रभूपासून दूर आहोत.+ ७ कारण आपण दिसणाऱ्‍या गोष्टींप्रमाणे नाही, तर विश्‍वासाने चालत आहोत. ८ आपण धैर्य धरतो आणि या शरीरात नाही, तर प्रभूसोबत राहणं जास्त पसंत करतो.+ ९ म्हणून, त्याच्या सोबत राहताना काय, किंवा त्याच्यापासून दूर राहताना काय, आपण नेहमीच त्याची स्वीकृती मिळवायचा प्रयत्न करतो. १० कारण आपल्या सगळ्यांनाच ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभं राहावं लागेल.* हे यासाठी, की शरीरात असताना प्रत्येकाने ज्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी केल्या असतील, त्यांप्रमाणे त्याला प्रतिफळ मिळावं.+

११ म्हणूनच, प्रभूची भीती बाळगणं गरजेचं आहे हे ओळखून, आम्ही सतत लोकांची मनं वळवतो. हे यासाठी, की त्यांनी आमचं ऐकावं. देव आम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो* हे आम्हाला माहीत आहे. पण, तुमच्या विवेकालाही आमची चांगल्या प्रकारे ओळख पटली असेल,* अशी आशा मी बाळगतो. १२ आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला स्वतःची शिफारस करत नाही, तर आमच्याबद्दल बढाई मारायचं तुम्हाला प्रोत्साहन देत आहोत. हे यासाठी, की जे लोक मनातल्या गोष्टींवरून नाही, तर बाहेरच्या स्वरूपावरून बढाई मारतात+ त्यांना उत्तर देणं तुम्हाला शक्य व्हावं. १३ कारण जर आम्ही वेडे झालो होतो,+ तर ते देवासाठी झालो होतो; आणि जर आम्ही समंजस आहोत, तर ते तुमच्यासाठी आहोत. १४ कारण ख्रिस्ताचं प्रेम आम्हाला भाग पाडतं. आम्हाला ही गोष्ट कळून चुकली आहे, की एकच माणूस सगळ्यांसाठी मेला,+ कारण खरंतर सगळे मेलेले होते. १५ आणि तो सगळ्यांसाठी मेला ते या उद्देशाने, की जे जगतात त्यांनी यापुढे स्वतःसाठी नाही,+ तर जो त्यांच्यासाठी मेला आणि उठवला गेला, त्याच्यासाठी जगावं.

१६ म्हणून आता आम्ही कोणत्याही माणसाकडे मानवी दृष्टिकोनाने पाहत नाही.+ एकेकाळी जरी आम्ही ख्रिस्ताला शारीरिक दृष्टीने ओळखत होतो, तरीसुद्धा आता आम्ही त्याला निश्‍चितच त्या प्रकारे ओळखत नाही.+ १७ म्हणून, जो ख्रिस्तासोबत ऐक्यात आहे, तो एक नवीन निर्मिती आहे.+ जुन्या गोष्टी गेल्या आहेत, आणि पाहा! नवीन गोष्टी अस्तित्वात आल्या आहेत. १८ पण सगळ्या गोष्टी देवाकडून आहेत. त्याने ख्रिस्ताद्वारे स्वतःसोबत आमचा समेट केला+ आणि समेट घडवून आणण्याची सेवा आमच्या हाती सोपवली.+ १९ म्हणजे, देव माणसांचे अपराध न मोजता,+ ख्रिस्ताद्वारे त्यांचा स्वतःसोबत समेट घडवून आणत आहे+ हे घोषित करण्याची सेवा, आणि हा समेटाचा संदेश त्याने आम्हाला सोपवला आहे.+

२० म्हणूनच, आम्ही राजदूत या नात्याने+ ख्रिस्ताऐवजी कार्य करत आहोत,+ जणू देव आमच्याद्वारे लोकांना विनंती करत आहे. ख्रिस्ताऐवजी आम्ही लोकांना अशी विनंती करतो, की “देवासोबत समेट करा.” २१ ज्याला पाप माहीत नव्हतं,+ त्याला देवाने आपल्याकरता पापार्पण म्हणून दिलं.* हे यासाठी, की त्याच्याद्वारे आपण देवाच्या दृष्टीत नीतिमान ठरावं.+

६ त्याच्यासोबत कार्य करत असताना,+ आम्ही तुम्हाला अशी विनंतीही करतो, की देवाची अपार कृपा स्वीकारल्यावर ती व्यर्थ ठरेल असं वागू नका.+ २ कारण तो म्हणतो: “कृपेच्या काळात मी तुझं ऐकलं, आणि तारणाच्या दिवशी तुला मदत केली.”+ पाहा! आताच विशेषकरून कृपेचा काळ आहे. पाहा! आताच तारणाचा दिवस आहे.

३ आमच्या सेवेत दोष दाखवला जाऊ नये, म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्याचं कारण होत नाही.+ ४ तर, सर्व प्रकारे आम्ही देवाचे सेवक म्हणून स्वतःची शिफारस करतो.+ धीराने पुष्कळ दुःखं सोसून, संकटं, अडचणी आणि कठीण प्रसंगांचा सामना करून,+ ५ मारहाण आणि तुरुंगवास सहन करून,+ दंगलींना तोंड देऊन, कष्ट करून, रात्ररात्र जागून, अन्‍नपाण्याशिवाय दिवस काढून;+ ६ शुद्धतेने, ज्ञानाने, सहनशीलतेने,+ दयाळूपणाने,+ पवित्र शक्‍तीने,* निष्कपट प्रेमाने,+ ७ खरं बोलण्याद्वारे, देवाच्या सामर्थ्याने;+ उजव्या* आणि डाव्या हातात* नीतिमत्त्वाची शस्त्रं घेऊन,+ ८ गौरवाने आणि अपमानाने, निंदेने आणि स्तुतीने आम्ही स्वतःची शिफारस करतो. आम्हाला फसवणूक करणारे असं समजलं जातं, तरीही आम्ही खरं बोलतो. ९ आम्ही अनोळख्यांसारखे असलो, तरी आम्हाला ओळखलं जातं. आम्ही मरायला टेकलेल्यांसारखे असलो,* तरी पाहा! आम्ही जिवंत आहोत;+ शिक्षा देण्यात आलेल्यांसारखे* असलो, तरी आम्हाला मृत्यूच्या स्वाधीन करण्यात आलेलं नाही.+ १० आम्ही शोक करणाऱ्‍यांसारखे असून नेहमी आनंदी राहतो; आम्हाला गरीब समजलं जात असूनही, आम्ही पुष्कळ जणांना श्रीमंत करतो; कंगाल समजलं जात असूनही, आमच्याजवळ सगळं काही आहे.+

११ करिंथकरांनो, आम्ही तुमच्याशी अगदी मोकळेपणाने बोललो आहोत आणि आम्ही आमचं मन मोठं केलं आहे. १२ आम्ही तुमच्यावर अगदी पूर्ण मनाने प्रेम करतो,*+ पण तुमची मनं आमच्याबद्दल संकुचित आहेत.* १३ म्हणूनच, मी तुम्हाला स्वतःची मुलं समजून असं सांगतो, की तुम्हीसुद्धा तुमची मनं मोठी करा.+

१४ विश्‍वासात नसलेल्यांसोबत जोडले जाऊ नका.*+ कारण नीती आणि अनीतीचा काय संबंध?+ किंवा उजेड आणि अंधार यांच्यात काय मेळ?+ १५ शिवाय, ख्रिस्त आणि सैतान* यांच्यात काय सारखेपणा?+ विश्‍वास ठेवणारा* आणि विश्‍वासात नसलेला यांचा काय संबंध?*+ १६ आणि देवाच्या मंदिराचा, मूर्तींसोबत कसा मेळ बसेल?+ कारण आपण एका जिवंत देवाचं मंदिर आहोत.+ जसं स्वतः देवाने म्हटलं: “मी त्यांच्यामध्ये राहीन+ आणि त्यांच्यामध्ये चालीन, आणि मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.”+ १७ “ ‘म्हणून, त्यांच्यातून बाहेर निघा आणि स्वतःला त्यांच्यापासून वेगळं करा,’ ‘आणि अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका’ ”;+ “ ‘म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन,’ असं यहोवा* म्हणतो.”+ १८ “ ‘मी तुमचा पिता होईन+ आणि तुम्ही माझी मुलं आणि माझ्या मुली व्हाल,’+ असं सर्वसमर्थ देव यहोवा* म्हणतो.”

७ म्हणूनच प्रिय बांधवांनो, आपल्याला ही अभिवचनं मिळाली असल्यामुळे+ आपण शरीराला आणि मनाला दूषित करणाऱ्‍या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला शुद्ध करू या+ आणि देवाची भीती बाळगून दिवसेंदिवस आणखी पवित्र होऊ या.

२ आमचा मनापासून स्वीकार करा.+ आम्ही कोणाचं वाईट केलं नाही. कोणाचं नुकसान केलं नाही. कोणाचा गैरफायदाही घेतला नाही.+ ३ अर्थात, तुम्हाला दोष देण्यासाठी मी या गोष्टी बोलत नाही. कारण मी आधीच सांगितलं आहे, की आम्ही जगलो किंवा मेलो तरी तुम्ही कायम आमच्या मनात असाल. ४ तुमच्याशी मी अगदी मनमोकळेपणाने बोलू शकतो. मला तुमचा फार अभिमान वाटतो. तुमच्यामुळे मला खूप दिलासा मिळाला आहे. आमच्यावर इतकी संकटं असूनही माझं मन आनंदाने ओसंडून वाहत आहे.+

५ आम्ही मासेदोनियात आलो,+ तेव्हा खरंतर आमच्या जिवाला जराही विसावा नव्हता. आम्ही सर्व प्रकारची दुःखं सहन करत होतो; बाहेर भांडणतंटे, तर आत भीती. ६ पण देव, जो खचून गेलेल्यांचं सांत्वन करतो,+ त्याने तीतच्या भेटीद्वारे* आमचं सांत्वन केलं. ७ आणि फक्‍त त्याच्या भेटीमुळेच नाही, तर मला भेटण्यासाठी तुमची आतुरता, तुम्ही करत असलेला शोक, माझ्याबद्दल असलेली तुमची काळजी* हे सगळं आम्हाला येऊन सांगताना त्याला तुमच्याकडून किती दिलासा मिळाला हे ऐकूनसुद्धा आम्हाला सांत्वन मिळालं; आणि म्हणून मला आणखी जास्त आनंद झाला.

८ मी लिहिलेल्या पत्रामुळे तुम्हाला दुःख झालं असलं,+ तरी याबद्दल मला वाईट वाटत नाही. हो, सुरुवातीला वाटलं (कारण थोड्या वेळासाठी का होईना ते पत्र वाचून तुम्हाला दुःख झालं होतं). ९ पण आता मात्र मला आनंद होतो. कारण तुम्हाला फक्‍त दुःखच झालं नाही, तर त्या दुःखामुळे तुम्ही पश्‍चात्ताप करायलाही प्रवृत्त झाला. तुमचं हे दुःख, देवाच्या इच्छेप्रमाणे असल्यामुळे आम्ही तुम्हाला आधी जे सांगितलं, त्यामुळे तुमचं मुळीच नुकसान झालं नाही. १० कारण, देवाच्या इच्छेप्रमाणे असलेल्या दुःखामुळे पश्‍चात्ताप उत्पन्‍न होऊन तारण होतं* आणि यामुळे पुढे पस्तावा करायची वेळ येत नाही.+ याउलट, जगातल्या लोकांसारख्या दुःखामुळे मरण येतं. ११ कारण पाहा! देवाच्या इच्छेप्रमाणे असलेल्या दुःखामुळे तुमच्यामध्ये इतकी उत्सुकता निर्माण झाली, की तुम्ही तुमच्यातला दोष दूर करायला झटला. झालेल्या चुकीबद्दल तुम्हाला मनापासून वाईट वाटलं. तसंच, तुमच्या मनात देवाबद्दल गाढ आदर, पश्‍चात्ताप करायची प्रामाणिक इच्छा आणि आवेश निर्माण झाला आणि तुम्ही आपली चूक सुधारली!+ या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे शुद्ध* असल्याचं दाखवून दिलं. १२ मी तुम्हाला जे पत्र लिहिलं, ते चूक करणाऱ्‍यामुळे किंवा ज्याच्याविरुद्ध चूक करण्यात आली त्याच्यामुळे नाही,+ तर आम्ही सांगितलेल्या गोष्टी ऐकायला तुम्ही किती उत्सुक आहात, हे देवासमोर सिद्ध व्हावं म्हणून लिहिलं. १३ यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे.

पण, यासोबतच तीतला मिळालेल्या आनंदामुळे आम्ही आणखीनच आनंदी झालो, कारण तुम्ही त्याला प्रोत्साहन दिलं. १४ मी तुमच्याबद्दल त्याच्याजवळ जो अभिमान व्यक्‍त केला, त्यामुळे माझ्यावर खाली पाहायची वेळ आली नाही. आम्ही तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जितक्या खऱ्‍या होत्या, तितकाच आम्ही तीत याच्याजवळ व्यक्‍त केलेला अभिमानही खरा ठरला. १५ इतकंच नाही, तर तुमच्या सर्वांची आज्ञाधारक वृत्ती+ आणि तुम्ही भीतभीत आणि थरथर कापत कशा प्रकारे त्याचा स्वीकार केला, या गोष्टींची आठवण झाल्यावर तुमच्याबद्दल त्याला आणखीनच आपुलकी वाटते. १६ मला या गोष्टीचा आनंद होतो, की मी सगळ्या बाबतींत तुमच्यावर भरवसा ठेवू शकतो. *

८ आता बांधवांनो, मासेदोनियातल्या मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या अपार कृपेबद्दल तुम्हाला माहीत असावं अशी आमची इच्छा आहे.+ २ अतिशय कठीण काळात ते बरीच दुःखं सोसत होते. पण, स्वतः भयंकर दारिद्रयात असूनही त्यांनी अगदी आनंदाने दान दिलं आणि यावरून त्यांची मोठी* उदारता दिसून आली. ३ कारण त्यांनी फक्‍त आपल्या ऐपतीप्रमाणे+ नाही, तर आपल्या ऐपतीपेक्षाही जास्त दान दिलं+ आणि या गोष्टीची मी स्वतः साक्ष देतो. ४ ते स्वतःहून पुढे आले आणि दान देण्याचा बहुमान आपल्याला मिळावा, तसंच पवित्र जनांची सेवा करण्यात आपल्यालाही हातभार लावता यावा, अशी ते आम्हाला वारंवार विनंती करत राहिले.+ ५ आम्ही अपेक्षाही केली नव्हती इतकं त्यांनी केलं. देवाच्या इच्छेप्रमाणे त्यांनी स्वतःला आधी प्रभूच्या सेवेसाठी आणि मग आमच्या सेवेसाठी वाहून घेतलं. ६ त्यामुळे आम्ही तीतला असं प्रोत्साहन दिलं,+ की तुम्ही प्रेमाने दिलेलं दान गोळा करायचं जे काम त्याने सुरू केलं होतं, ते त्याने पूर्णही करावं. ७ तुम्ही सर्व बाबतींत, म्हणजेच विश्‍वासात, बोलण्यात, ज्ञानात, उत्साहात आणि आम्ही तुम्हाला दाखवलेलं प्रेम इतरांना दाखवण्याच्या बाबतीत जसे श्रीमंत आहात, तसंच तुम्ही दान द्यायच्या बाबतीतही उदार असावं.+

८ पण, मी तुम्हाला असं करायचा हुकूम देत नाही, तर इतर जण किती आनंदाने दान देत आहेत, हे तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी आणि तुमचं प्रेम किती खरं आहे हे पारखण्यासाठी तुम्हाला हे सांगत आहे. ९ कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अपार कृपेची तुम्हाला जाणीव आहे. तो श्रीमंत असूनही तुमच्यासाठी गरीब झाला.+ हे यासाठी की त्याच्या दारिद्र्‌यामुळे तुम्ही श्रीमंत व्हावं.

१० याबद्दल मी तुम्हाला आपलं मत सांगतो:+ हे काम करणं तुमच्या हिताचंच आहे, कारण तुम्ही ते सुरू करून आता एक वर्ष उलटलं आहे आणि ते करण्याची तुम्ही इच्छाही दाखवली होती. ११ तर, तुम्ही जे काम सुरू केलं होतं ते आता पूर्णही करा. म्हणजे, आपल्या ऐपतीप्रमाणे तुम्ही जे काही द्याल त्यातून तुमची उत्सुकता दिसून येईल. १२ कारण एखाद्याला दान देण्याची जर खरंच उत्सुकता असेल, तर त्याचं दान मान्य केलं जाईल. त्याच्याकडे जे नाही त्याची अपेक्षा केली जात नाही. तर त्याच्याकडे जे आहे,+ त्याप्रमाणे तो जे काही देईल ते मान्य केलं जाईल. १३ कारण इतरांचा भार हलका करून तुमच्यावर जास्त भार टाकायची माझी इच्छा नाही. १४ तर माझी अशी इच्छा आहे, की या वेळी तुमच्या समृद्धीतून त्यांची गरज भागवली जावी आणि त्यांच्या समृद्धीतून तुमची गरज भागवली जाऊन समानता घडून यावी. १५ शास्त्रातसुद्धा असंच लिहिलं आहे: “ज्याच्याजवळ जास्त होतं, त्याला खूप जास्त झालं नाही आणि ज्याच्याजवळ कमी होतं, त्याला फार कमी पडलं नाही.”+

१६ आता, आम्हाला तुमच्याबद्दल जशी कळकळ वाटते, तशीच कळकळ तीतच्या मनात उत्पन्‍न केल्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो.+ १७ कारण, तो फक्‍त आमच्या सांगण्यावरून तुमच्याकडे यायला तयार झाला नाही, तर तो स्वतःहून खूप उत्सुकतेने तुमच्याकडे येत आहे. १८ पण त्याच्यासोबत आम्ही अशा एका बांधवाला पाठवत आहोत, ज्याने आनंदाच्या संदेशासाठी केलेल्या कार्याबद्दल, सगळ्या मंडळ्यांमध्ये त्याची प्रशंसा होत आहे. १९ इतकंच नाही, तर तुम्ही आनंदाने दिलेली ही देणगी घेऊन जायला, मंडळ्यांनी त्याला आमच्यासोबत जाण्यासाठी नेमलं आहे. ही देणगी वाटण्याचं काम आम्ही प्रभूच्या गौरवासाठी करतो आणि यावरून इतरांना मदत करण्याची आमची उत्सुकता दिसून येईल. २० ही उदार देणगी पोहोचवण्याच्या कामात कोणीही आम्हाला दोष लावू नये म्हणून आम्ही काळजी घेतो.+ २१ कारण, ‘फक्‍त यहोवाच्याच* नाही, तर माणसांच्या नजरेतही सगळ्या गोष्टी अगदी प्रामाणिकपणे करायची आमची इच्छा आहे.’+

२२ याशिवाय, त्यांच्यासोबत आम्ही आमच्या अशा एका बांधवालाही पाठवत आहोत, ज्याला आम्ही बऱ्‍याचदा पारखून पाहिलं आहे. आणि तो बऱ्‍याच बाबतींत मेहनती असल्याचं आम्हाला दिसून आलं आहे. शिवाय, तुमच्यावर त्याचा खूप भरवसा असल्यामुळे तो आणखी जास्त मेहनत करेल. २३ तीतबद्दल कोणी विचारलं, तर तो माझा साथीदार* आणि तुमच्या भल्यासाठी कार्य करणारा माझा सहकारी आहे. किंवा मग, आमच्या बांधवांबद्दल कोणी विचारलं, तर ते मंडळ्यांचे प्रेषित आणि ख्रिस्ताचा गौरव आहेत. २४ तेव्हा, त्यांच्यावर मनापासून प्रेम करा+ आणि तुमच्याबद्दल आम्हाला अभिमान का वाटतो, ते दाखवून द्या.

९ पवित्र जनांसाठी असलेल्या या सेवेच्या बाबतीत+ खरंतर मी तुम्हाला काहीही लिहायची गरज नाही. २ कारण मदत द्यायला तुम्ही किती उत्सुक आहात हे मला माहीत आहे. तुमच्याबद्दल मी मासेदोनियातल्या बांधवांना अभिमानाने सांगत असतो, की अखयातल्या बांधवांनी तर गेल्या एका वर्षापासूनच मदत तयार ठेवली आहे. तुमच्या आवेशामुळे त्यांच्यातल्या बऱ्‍याच जणांना उत्तेजन मिळालं आहे. ३ म्हणूनच मी बांधवांना पाठवत आहे. हे यासाठी की, तुमच्याबद्दल आम्ही अभिमानाने जे सांगितलं होतं, ते व्यर्थ ठरू नये. तर, मी जसं म्हटलं होतं त्याप्रमाणे तुम्ही खरोखरच तयार असावं. ४ नाहीतर, मासेदोनियाचे बांधव माझ्यासोबत आले आणि तुम्ही तयार नाही असं दिसलं, तर तुमच्यावर भरवसा ठेवल्यामुळे आम्हाला आणि आमच्यासोबत तुम्हालाही लाजिरवाणं वाटेल. ५ त्यामुळे, या बांधवांना अगोदरच तुमच्याकडे येण्याचं उत्तेजन देणं मला आवश्‍यक वाटलं. म्हणजे, तुम्ही वचन दिल्याप्रमाणे हे बांधव तुमची उदार देणगी गोळा करून तयार ठेवतील. असं केलं, तर तुमची ही देणगी, बळजबरीने घेतलेली नाही, तर उदार मनाने दिलेली देणगी ठरेल.

६ या बाबतीत, जो हात राखून पेरणी करतो, तो त्याचप्रमाणे कापणी करेल आणि जो मोकळ्या हाताने पेरणी करतो, तो त्याचप्रमाणे कापणीही करेल.+ ७ प्रत्येकाने आपल्या मनात जसं ठरवलं आहे, तसंच द्यावं. त्याने कुरकुर करत* किंवा देणं भाग पडतं म्हणून देऊ नये;+ कारण आनंदाने देणारा देवाला आवडतो.+

८ शिवाय, तुमच्याकडे नेहमी सगळ्या गोष्टी पुरेशा प्रमाणात असाव्यात आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी आवश्‍यक असलेल्या गोष्टीही भरपूर प्रमाणात असाव्यात, म्हणून देव तुमच्यावर आपल्या अपार कृपेचा वर्षाव करायला समर्थ आहे.+ ९ (शास्त्रातसुद्धा लिहिलं आहे: “त्याने उदारतेने वाटलं आणि गरिबांना दिलं. त्याचं नीतिमत्त्व सर्वकाळ टिकेल.”+ १० जो पेरणी करणाऱ्‍याला भरपूर प्रमाणात बी देतो आणि खाणाऱ्‍याला भरपूर अन्‍न देतो, तो तुम्हालाही पेरणी करण्यासाठी बी देईल आणि ते बऱ्‍याच पटींनी वाढवेल. तसंच, तो तुमच्या नीतिमत्त्वाची कार्यं फलदायी करेल.) ११ सर्व प्रकारच्या उदारतेसाठी तुम्हाला सर्व गोष्टींत समृद्ध केलं जात आहे आणि यामुळे आम्ही देवाचे आभार मानतो. १२ कारण ही जनसेवा फक्‍त पवित्र जनांच्या गरजा चांगल्या प्रकारे भागवण्यासाठी नाही,+ तर देवाला आणखी जास्त आभार व्यक्‍त केले जावेत यासाठीही आहे. १३ मदत पुरवण्याच्या या सेवेवरून तुम्ही कशा प्रकारचे लोक आहात हे दाखवून देता. आणि तुम्ही जाहीरपणे कबूल केल्याप्रमाणे ख्रिस्ताबद्दल असलेल्या आनंदाच्या संदेशानुसार वागता. तसंच, पवित्र जनांना आणि एकंदरीत सगळ्यांनाच तुम्ही उदारता दाखवता, त्यामुळे ते देवाचा गौरव करतात.+ १४ तुमच्यावर देवाच्या अपार कृपेचा भरभरून वर्षाव होत असल्यामुळे, तुमच्यासाठी देवाकडे याचना करताना ते तुमच्याबद्दल प्रेम व्यक्‍त करतात.

१५ देवाने दिलेल्या अवर्णनीय मोफत देणगीबद्दल त्याचे आभार!

१० आता मी, पौल, तुमच्यामध्ये असताना दीनदुबळा,+ पण तुमच्यापासून दूर असताना कडकपणे वागणारा असा वाटत असलो,+ तरी ख्रिस्ताच्या सौम्यतेने आणि कृपेने+ मी तुम्हाला विनंती करतो. २ मी आशा करतो, की तिकडे आल्यावर कडकपणे वागण्याची वेळ माझ्यावर येऊ नये. अर्थात, आम्ही जगाच्या रितीप्रमाणे वागतो असा आमच्याबद्दल विचार करणाऱ्‍या काहींविरुद्ध कदाचित मला कठोर पावलं उचलावी लागतील. ३ कारण आम्ही जरी जगामध्ये राहत असलो, तरी जगाप्रमाणे लढाई करत नाही. ४ कारण आमच्या लढाईची शस्त्रं जगातल्या शस्त्रांसारखी नाहीत.+ तर ती देवाकडून मिळालेली शक्‍तिशाली शस्त्रं आहेत.+ त्यांच्या मदतीने आम्ही भक्कम बुरुजांसारख्या असलेल्या गोष्टीही उलथून टाकू शकतो. ५ कारण, सर्व प्रकारचे तर्क-वितर्क आणि देवाच्या ज्ञानाच्या विरोधात उभी केलेली प्रत्येक गोष्ट आम्ही उलथून टाकतो+ आणि प्रत्येक विचाराला कैदी बनवून ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला लावतो. ६ आज्ञा न पाळणाऱ्‍या प्रत्येक माणसाला शिक्षा करायला आम्ही तयार आहोत.+ पण, आधी तुम्ही तुमचा आज्ञाधारकपणा पूर्णपणे सिद्ध करून दाखवा.

७ तुम्ही बाहेरचं रूप पाहून मत बनवता. आपण ख्रिस्ताचे आहोत असा जर एखाद्याला स्वतःबद्दल भरवसा असेल, तर त्याने एका गोष्टीचा पुन्हा विचार करावा. जितका तो ख्रिस्ताचा आहे, तितकेच आम्हीसुद्धा आहोत. ८ कारण प्रभूने, तुम्हाला खाली पाडायचा नाही, तर तुम्हाला प्रोत्साहन द्यायचा जो अधिकार आम्हाला दिला आहे,+ त्याबद्दल मी जरा जास्तच बढाई मारली, तरी मला लज्जित व्हावं लागणार नाही. ९ मी माझ्या पत्रांद्वारे तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे, असं समजू नका. १० कारण काही जण म्हणतात: “त्याची पत्रं तर फार वजनदार आणि प्रभावी असतात. पण प्रत्यक्षात तो दुबळा आहे आणि त्याची भाषणं मुळीच ऐकण्यासारखी नसतात.” ११ असं म्हणणाऱ्‍या माणसाने हे लक्षात घ्यावं, की तुमच्यापासून दूर असताना पत्रात आम्ही जे काही म्हणतो,* ते प्रत्यक्ष तुमच्यामध्ये असताना आम्ही करूनही दाखवू.*+ १२ कारण स्वतःची शिफारस करणाऱ्‍यांमध्ये स्वतःला मोजण्याचं किंवा त्यांच्यासोबत आपली तुलना करण्याचं धाडस आम्ही करत नाही.+ असे लोक, जेव्हा स्वतःच्याच स्तरांप्रमाणे स्वतःला मापतात आणि स्वतःची तुलना स्वतःशीच करतात, तेव्हा ते किती बुद्धिहीन आहेत हे दाखवून देतात.+

१३ पण आम्हाला नेमून दिलेल्या मर्यादेपलीकडे आम्ही बढाई मारणार नाही. तर देवाने जे क्षेत्र आम्हाला मापून दिलं आहे,* त्याच्या मर्यादेत राहूनच आम्ही बढाई मारू; आणि त्या क्षेत्रात तुम्हीसुद्धा येता.+ १४ आम्ही तुमच्याकडे आलो, तेव्हा खरंतर आम्हाला नेमून दिलेल्या क्षेत्रापलीकडे आम्ही गेलो नाही. कारण, ख्रिस्ताचा आनंदाचा संदेश घेऊन आम्ही सगळ्यात आधी तुमच्याकडेच आलो होतो.+ १५ आम्हाला नेमून दिलेल्या मर्यादेपलीकडे जाऊन आम्ही दुसऱ्‍या कोणाच्या मेहनतीबद्दल बढाई मारत नाही. तर, जसजसा तुमचा विश्‍वास वाढत जाईल, तसतशी आमच्या क्षेत्रात आम्ही केलेल्या कार्याची प्रगती होत जाईल, अशी आम्हाला आशा आहे. मग आमचं कार्य वाढतच जाईल. १६ हे यासाठी, की तुमच्यासोबत इतर देशांतही आम्ही आनंदाचा संदेश घोषित करावा आणि दुसऱ्‍या कोणाच्या क्षेत्रात अगोदरच झालेल्या कार्याबद्दल आम्ही बढाई मारू नये. १७ “पण जो बढाई मारतो, त्याने यहोवाच्या* बाबतीत बढाई मारावी.”+ १८ कारण जो स्वतःची शिफारस करतो त्याला नाही,+ तर ज्याची शिफारस यहोवा* करतो, त्यालाच मान्य केलं जातं.+

११ तुम्ही माझा थोडासा मूर्खपणा सहन करावा अशी माझी इच्छा आहे. खरंतर, तुम्ही तो सहन करतच आहात! २ देव जसा तुमच्याबद्दल ईर्ष्यावान* आहे तशीच ईर्ष्या मीही तुमच्याबद्दल बाळगतो. कारण तुम्हाला एक पवित्र* कुमारी म्हणून एका पुरुषाला, म्हणजेच ख्रिस्ताला सादर करता यावं, म्हणून मी स्वतः त्याच्याशी तुमचं लग्न ठरवलं आहे.+ ३ पण, ज्याप्रमाणे सापाने धूर्तपणे हव्वाला भुरळ घातली,+ त्याप्रमाणे तुमची मनंही भ्रष्ट होऊन तुम्ही ख्रिस्तासाठी असलेला तुमचा प्रामाणिकपणा आणि पवित्रता* गमावून बसाल, अशी मला भीती वाटते.+ ४ कारण कोणी येऊन, आम्ही घोषित केलेल्या येशूऐवजी दुसऱ्‍याच येशूबद्दल घोषणा करतो; किंवा तुमच्यात कार्य करत असलेल्या मनोवृत्तीऐवजी* वेगळी मनोवृत्ती तुमच्यात निर्माण करतो; किंवा तुम्ही स्वीकारलेल्या आनंदाच्या संदेशाऐवजी दुसराच संदेश घेऊन कोणी तुमच्याकडे येतो,+ तेव्हा तुम्ही त्याला सहजासहजी मान्य करता. ५ कारण तुमच्या त्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी कोणत्याही बाबतीत कमी पडलो, असं मला तरी वाटत नाही.+ ६ बोलण्यात जरी मी तरबेज नसलो,+ तरी ज्ञानाच्या बाबतीत मात्र नक्कीच तसा नाही. आणि ही गोष्ट आम्ही सर्व प्रकारे आणि सगळ्या बाबतींत तुम्हाला दाखवून दिली आहे.

७ तुम्हाला मोठेपणा मिळावा म्हणून मी जर कमीपणा घेतला आणि कोणताही मोबदला न घेता तुम्हाला देवाबद्दलचा संदेश आनंदाने घोषित केला,+ तर काही पाप केलं का? ८ तुमची सेवा करण्यासाठी मी इतर मंडळ्यांकडून गरजेच्या वस्तू* घेऊन त्यांचं नुकसान केलं.*+ ९ पण, तुमच्यामध्ये असताना मला गरज पडली, तरी मी कोणावर भार टाकला नाही. कारण मासेदोनियाहून आलेल्या बांधवांनी उदारपणे माझ्या सगळ्या गरजा भागवल्या.+ खरंच, तुमच्यावर कोणत्याही प्रकारे भार न टाकण्याची मी काळजी घेतली आणि पुढेही घेईन.+ १० ख्रिस्ताचं सत्य माझ्यामध्ये असल्याचं जितकं खरं आहे, तितकीच ही गोष्टही खरी आहे, की अखयाच्या प्रदेशांत अशी बढाई मारण्याचं मी सोडणार नाही.+ ११ मी तुमच्यावर भार का टाकला नाही? माझं तुमच्यावर प्रेम नाही म्हणून? माझं तुमच्यावर किती प्रेम आहे, हे देवाला माहीत आहे.

१२ स्वतःला प्रेषित म्हणवणारे काही जण बढाई मारून आमच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच, मी जे काही करत आहे, ते पुढेही करत राहीन.+ हे या उद्देशाने, की त्यांना आमच्याशी बरोबरी करण्याचं कोणतंही निमित्त* मिळू नये. १३ कारण अशी माणसं खोटे प्रेषित आणि फसवणारे कामगार आहेत. ते स्वतःचं खरं रूप लपवून ख्रिस्ताचे प्रेषित असल्याचा आव आणतात.+ १४ आणि यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही, कारण सैतान स्वतःसुद्धा एका तेजस्वी स्वर्गदूताचं रूप घेतो.+ १५ त्यामुळे, त्याच्या सेवकांनीही नीतिमत्त्वाच्या सेवकांचं रूप घेतलं, तर त्यात विशेष असं काहीच नाही. पण त्यांचा शेवट त्यांच्या कार्यांप्रमाणे होईल.+

१६ मी पुन्हा एकदा तेच म्हणतो: मी मूर्ख आहे असं कोणी समजू नये. आणि समजतही असाल, तर जसं एका मूर्ख माणसाला स्वीकारता तसंच मलाही स्वीकारा, म्हणजे मलासुद्धा थोडी बढाई मारता येईल. १७ या क्षणी, मी बढाई मारून आत्मविश्‍वासाने जे काही बोलत आहे, ते प्रभूच्या उदाहरणाप्रमाणे नाही, तर एका मूर्ख माणसाप्रमाणे बोलतो. १८ पुष्कळ लोक या जगातल्या* गोष्टींबद्दल बढाई मारत आहेत, त्यामुळे मीसुद्धा बढाई मारीन. १९ तुम्ही इतके “समजदार” आहात, की मूर्ख माणसांचं आनंदाने सहन करता. २० खरंतर, जो कोणी तुम्हाला गुलाम बनवतो, तुमची मालमत्ता हडपतो, तुम्हाला लुबाडतो, तुमच्यावर वर्चस्व गाजवतो आणि तुमच्या तोंडात मारतो त्याचं तुम्ही सहन करता.

२१ असं बोलणं आमच्यासाठी अपमानाचं आहे, कारण काहींच्या मते आम्ही इतके दुबळे आहोत, की आम्हाला आमचा अधिकार नीट चालवता येत नाही.

पण, जर इतर जण बढाई मारू शकतात, तर मीही मारीन. मग कोणाला मी मूर्ख वाटलो तरी चालेल. २२ ते इब्री आहेत का? मीही आहे.+ ते इस्राएली आहेत का? मीही आहे. ते अब्राहामचे वंशज* आहेत का? मीसुद्धा आहे.+ २३ ते ख्रिस्ताचे सेवक आहेत का? एका मूर्ख माणसाप्रमाणे मी उत्तर देतो, की मी त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने आहे: मी त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत केली आहे,+ कितीतरी वेळा तुरुंगवास भोगला आहे,+ असंख्य वेळा मारहाण सहन केली आहे आणि कित्येकदा मरतामरता वाचलो आहे.+ २४ पाच वेळा यहुद्यांकडून मला ३९ फटके बसले,+ २५ तीन वेळा मला छड्यांचा मार बसला,+ एकदा दगडमार करण्यात आला,+ तीन वेळा माझं जहाज फुटलं,+ एक संपूर्ण रात्र आणि दिवस मी उघड्या समुद्रावर घालवला; २६ मी कितीतरी प्रवास केला; नद्यांवरची संकटं, लुटारूंकडून संकटं, माझ्या स्वतःच्या लोकांकडून+ तसंच विदेश्‍यांकडून आलेली संकटं,+ शहरातली+ आणि ओसाड रानातली संकटं, समुद्रावरची संकटं आणि खोट्या बांधवांनी आणलेली संकटं, हे सगळं मी सोसलं. २७ मी कठोर मेहनत केली, कित्येक रात्री जागून काढल्या,+ तहान आणि भूक सहन केली,+ कित्येकदा उपाशी राहिलो,+ थंडीचा कडाका सोसला आणि अपुऱ्‍या कपड्यांवर भागवलं. *

२८ बाहेरच्या या सगळ्या गोष्टींसोबतच, सगळ्या मंडळ्यांची चिंतासुद्धा दररोज* माझ्या मनाला सतावत असते.+ २९ एखादा कमजोर झाला, तर मलाही कमजोर झाल्यासारखं वाटत नाही का? एखादा अडखळला तर माझाही जीव जळत नाही का?

३० बढाई मारायचीच असेल, तर मी अशा गोष्टींची बढाई मारीन ज्यांतून माझा दुबळेपणा दिसून येतो. ३१ आपल्या प्रभू येशूचा देव आणि पिता, ज्याची सदासर्वकाळ स्तुती केली जाईल, त्याला माहीत आहे की मी खोटं बोलत नाही. ३२ दिमिष्कमध्ये असताना अरीतास राजाच्या राज्यपालाने मला अटक करण्यासाठी दिमिष्कच्या शहरावर पहारा ठेवला होता. ३३ पण, मला एका टोपलीत* बसवून शहराच्या भिंतीतल्या खिडकीतून खाली उतरवण्यात आलं+ आणि अशा रितीने मी त्याच्या तावडीतून सुटलो.

१२ बढाई मारायचा काहीच उपयोग नसला, तरी मला बढाई मारणं भाग आहे. आता मी, प्रभूने दाखवलेले अद्‌भुत दृष्टान्त+ आणि त्याच्याकडून प्रकट झालेल्या गोष्टींबद्दल बोलीन.+ २ ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेल्या अशा एका माणसाला मी ओळखतो, ज्याला १४ वर्षांपूर्वी तिसऱ्‍या स्वर्गात उचलून घेण्यात आलं होतं. त्याला शरीरासह घेण्यात आलं की शरीराशिवाय, हे मला माहीत नाही. देवालाच ते माहीत आहे. ३ हो, खरंच मी अशा माणसाला ओळखतो. त्याला शरीरासह घेण्यात आलं की शरीराशिवाय, हे मला माहीत नाही. देवालाच ते माहीत आहे. ४ त्याला नंदनवनात उचलून नेण्यात आलं आणि ज्या गोष्टी बोलल्या जाऊ शकत नाहीत आणि ज्या बोलायची माणसाला परवानगी नाही, अशा गोष्टी त्याने ऐकल्या. ५ अशा माणसाबद्दल मी बढाई मारीन. मी स्वतःबद्दल नाही, तर फक्‍त माझ्या दुर्बलतांबद्दल बढाई मारीन. ६ कारण जरी मला बढाई मारावीशी वाटली, तरी मी मूर्ख ठरणार नाही, कारण मी खरं तेच बोलीन. तरीसुद्धा मी स्वतःला आवरतो. हे यासाठी, की कोणी माझ्यामध्ये जे काही पाहतो किंवा माझ्याकडून जे काही ऐकतो त्यापेक्षा जास्त श्रेय त्याने मला देऊ नये. ७ तसंच, मला असाधारण गोष्टी प्रकट करण्यात आल्या, म्हणून कोणी मला जास्त महत्त्व देऊ नये.

मी गर्वाने फुगू नये, म्हणून माझ्या शरीरात एक काटा रुतवण्यात आला आहे.+ मला तोंडात मारत राहण्यासाठी* ठेवलेल्या सैतानाच्या दूतासारखा तो आहे. म्हणजे मी आहे त्यापेक्षा स्वतःला जास्त समजणार नाही. ८ तो काटा काढून टाकायची मी तीन वेळा प्रभूला विनंती केली. ९ पण तो मला म्हणाला: “माझी अपार कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे. कारण दुर्बलतेतच माझं सामर्थ्य परिपूर्ण होतं.”+ त्यामुळे, माझ्या दुर्बलतांबद्दल मी खूप आनंदाने बढाई मारीन, म्हणजे ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया तंबूसारखी माझ्यावर राहील. १० म्हणूनच मी ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, छळ आणि कठीण परिस्थिती यांना तोंड देताना आनंद मानतो. कारण जेव्हा मी दुर्बळ असतो, तेव्हाच मी ताकदवान होतो.+

११ मी मूर्ख बनलो आहे आणि तुम्हीच मला असं बनायला भाग पाडलं. खरंतर, तुम्हीच माझी शिफारस करायला हवी होती. कारण तुमच्या नजेरत मी काहीच नसलो, तरी तुमच्या त्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी कोणत्याही बाबतीत कमी नाही.+ १२ खरंतर, मी प्रेषित असण्याचे पुरावे तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पाहिले होते. मी खूप धीराने+ तुमच्यामध्ये चिन्हं, चमत्कार आणि अद्‌भुत कार्यं करून तुम्हाला ते पुरावे दिले होते.+ १३ कारण फक्‍त एकाच गोष्टीत तुम्ही इतर मंडळ्यांपेक्षा कमी ठरला. ती म्हणजे, मी कोणत्याही प्रकारे तुमच्यावर भार टाकला नाही.+ या चुकीबद्दल मला माफ करा.

१४ आता मी तिसऱ्‍यांदा तुमच्याकडे यायच्या तयारीत आहे. पण मी तुमच्यावर भार टाकणार नाही, कारण मला तुमची संपत्ती नको आहे,+ तर तुम्ही हवे आहात. मुलांनी+ आईवडिलांसाठी नाही, तर आईवडिलांनी मुलांसाठी पैसा साठवून ठेवावा, अशी अपेक्षा केली जाते. १५ म्हणून, माझ्याजवळ जे काही आहे ते सगळं मी तुमच्यासाठी* आनंदाने खर्च करीन आणि स्वतःसुद्धा तुमच्यासाठी खर्च होईन.+ मी जर तुमच्यावर इतकं प्रेम करतो, तर मला तुमच्याकडून कमी प्रेम मिळावं का? १६ असो! मी तुमच्यावर कोणताही भार टाकला नाही.+ तरीसुद्धा, मी “धूर्त” होतो आणि मी तुम्हाला “कपटाने” फसवलं, असं तुम्ही म्हणता. १७ मी ज्यांना तुमच्याकडे पाठवलं त्यांच्यापैकीही कोणाद्वारे मी तुमचा गैरफायदा घेतला नाही, घेतला का? १८ मी तीतला विनंती केली आणि त्याच्यासोबत एका बांधवाला पाठवलं. तीतने मुळीच तुमचा गैरफायदा घेतला नाही, घेतला का?+ आम्ही एकसारखीच मनोवृत्ती ठेवून चाललो नाही का? आम्ही एकसारखंच वागलो नाही का?

१९ तुम्ही अजूनही असा विचार करत आहात का, की आम्ही तुमच्यासमोर स्वतःचं समर्थन करायचा प्रयत्न करत आहोत? आम्ही ख्रिस्ती या नात्याने देवासमोर स्वतःचं समर्थन करत आहोत. पण प्रिय बांधवांनो, आम्ही जे काही करतो ते सगळं तुम्हाला प्रोत्साहन मिळावं म्हणून करतो. २० कारण मला भीती वाटते, की मी तुमच्याकडे आल्यावर कदाचित तुम्ही मला माझ्या अपेक्षेप्रमाणे आढळणार नाही. आणि मीसुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला आढळणार नाही. कदाचित तुमच्यामध्ये भांडणतंटे, हेवेदावे, राग, मतभेद, निंदा, इतरांबद्दल कुजबुज, गर्विष्ठपणा आणि अव्यवस्था या गोष्टी मला दिसून येतील. २१ मला याची चिंता वाटते, की मी तुमच्याकडे येईन तेव्हा माझा देव मला तुमच्यासमोर मान खाली घालायला लावेल; आणि अशुद्धपणा, अनैतिक लैंगिक कृत्यं* आणि निर्लज्ज वर्तन* करून पश्‍चात्ताप न करणाऱ्‍यांबद्दल मला शोक करावा लागेल.

१३ मी आता तिसऱ्‍यांदा तुमच्याकडे येत आहे. “दोन किंवा तीन जणांच्या साक्षीने* प्रत्येक गोष्ट सिद्ध झाली पाहिजे.”+ २ मी आता तुमच्यापासून दूर असलो, तरी मी जणू दुसऱ्‍यांदा तुमच्यामध्ये आहे असं समजा. ज्यांनी पूर्वी पाप केलं होतं त्यांना आणि इतर जणांनाही मी अगोदरच ताकीद देतो, की मी पुन्हा कधी तुमच्याकडे आलो, तर त्यांना ताडन दिल्याशिवाय राहणार नाही. ३ कारण ख्रिस्त, जो तुमच्या बाबतीत कमजोर नाही, तर तुमच्यामध्ये सामर्थ्यवान आहे तो खरंच माझ्याद्वारे बोलत आहे, याचा पुरावा तुम्ही मागत आहात. ४ खरोखर, ख्रिस्त दुर्बल स्थितीत असताना त्याला वधस्तंभावर* मृत्युदंड देण्यात आला असला, तरी देवाच्या सामर्थ्याने तो जिवंत आहे.+ त्याच्याप्रमाणेच आम्हीसुद्धा दुर्बल स्थितीत असलो, तरी तुमच्यावर कार्य करणाऱ्‍या देवाच्या सामर्थ्याने+ आम्ही त्याच्यासोबत जिवंत असू.+

५ तुम्ही विश्‍वासात आहात की नाही याची पारख करत राहा. तुम्ही कशा प्रकारची व्यक्‍ती आहात हे सतत तपासून पाहा.+ ख्रिस्त तुमच्यासोबत ऐक्यात आहे याची तुम्हाला जाणीव नाही का? जर नसेल, तर तुम्हाला नाकारण्यात आलं आहे, असा त्याचा अर्थ होईल. ६ पण आम्हाला नाकारण्यात आलेलं नाही, हे तुम्ही ओळखाल अशी मी मनापासून आशा करतो.

७ आता देवाला आमची हीच प्रार्थना आहे, की तुम्ही कोणतंही वाईट काम करू नये. लोकांनी आम्हाला स्वीकारावं म्हणून आम्ही असं म्हणत नाही. तर आम्हाला जरी नाकारण्यात आलं, तरी तुम्ही चांगलं काम करावं म्हणून आम्ही अशी प्रार्थना करतो. ८ कारण सत्याच्या विरोधात आम्ही काहीही करू शकत नाही; फक्‍त सत्याच्या बाजूनेच करू शकतो. ९ आम्ही दुर्बल असतो आणि तुम्ही ताकदवान असता तेव्हा आम्हाला आनंदच होतो. आणि तुम्ही सुधारणा करत राहावी हीच प्रार्थना आम्ही करतो. १० म्हणूनच तुमच्यापासून दूर असतानाच मी या गोष्टी तुम्हाला लिहीत आहे. म्हणजे, तुमच्याकडे आल्यावर, प्रभूने मला दिलेल्या अधिकाराचा मला कठोरपणे वापर करावा लागू नये.+ कारण प्रभूने मला हा अधिकार तुम्हाला खाली पाडण्यासाठी नाही, तर तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी दिला आहे.

११ बांधवांनो, शेवटी इतकंच सांगतो, की नेहमी आनंदी राहा, स्वतःमध्ये सुधारणा करत राहा, सांत्वन स्वीकारत राहा,+ एकमताने विचार करत जा+ आणि शांतीने राहा.+ म्हणजे, प्रेमाचा आणि शांतीचा देव+ तुमच्यासोबत राहील. १२ एकमेकांना भेटताना बंधुप्रेमाचं चुंबन घ्या. १३ सगळे पवित्र जन तुम्हाला नमस्कार सांगतात.

१४ प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा आणि देवाचं प्रेम तुमच्यासोबत असो. तसंच तुम्हा सगळ्यांना पवित्र शक्‍तीमुळे* आशीर्वाद मिळत राहोत.

किंवा “परीक्षांमध्ये.”

किंवा “आपल्याला धीर देतो.”

किंवा “परीक्षेत.”

किंवा “संकटांना.”

किंवा “तुम्हाला वाचवलं जावं.”

किंवा कदाचित, “ज्या तुम्हाला आधीच चांगल्या प्रकारे माहीत आहेत.”

शब्दशः “शेवटपर्यंत.”

किंवा कदाचित, “तुम्हाला दोन वेळा फायदा व्हावा.”

याला सीला असंही म्हणतात.

शब्दशः “‘हो’ आहेत.”

किंवा “आगाऊ रक्कम.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “खूप दुःखामुळे खचून जाईल.”

किंवा “आपल्याला फसवू नये.”

किंवा “इराद्यांबद्दल; कुयुक्त्यांबद्दल.”

किंवा “वाचवल्या जाणाऱ्‍या.”

किंवा “सुगंध.”

किंवा “वचनाचा व्यापार करणारे; वचनापासून नफा मिळवणारे.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “परिणामाकडे; शेवटाकडे.”

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा कदाचित, “यहोवाची पवित्र शक्‍ती.”

किंवा “सध्याच्या काळाच्या.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा कदाचित, “आशाहीन स्थितीत सोडण्यात आलेलं नाही.”

किंवा “व्यक्‍तिमत्त्व.”

किंवा “परीक्षा.”

शब्दशः “वजनदार.”

किंवा “या निवासस्थानात.”

किंवा “स्वर्गातलं आपलं निवासस्थान धारण करण्याची.”

किंवा “आगाऊ रक्कम.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “प्रकट केलं जाईल.”

किंवा “देवाला आम्ही प्रकट झालेले असे आहोत.”

किंवा “आम्ही प्रकट झालेले असू.”

शब्दशः “पाप असं ठरवलं.”

शब्दार्थसूची पाहा.

कदाचित हल्ला करण्यासाठी.

कदाचित स्वतःचा बचाव करण्यासाठी.

किंवा “आम्हाला मरण्याच्या लायकीचं समजलं जात असलं.”

किंवा “ताडन करण्यात आलेल्यांसारखे.”

किंवा “आमचं मन संकुचित नाही.”

किंवा “तुम्ही मात्र आमच्यावर पूर्ण मनाने प्रेम करत नाही.”

शब्दशः “असमान जुवाखाली येऊ नका.”

शब्दशः “बलियाल.” “कुचकामी” या अर्थाच्या हिब्रू शब्दापासून आलेला.

किंवा “विश्‍वासू व्यक्‍ती.”

किंवा “भागीदारी.”

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

शब्दशः “उपस्थितीद्वारे.”

शब्दशः “तुमचा आवेश.”

किंवा “आपल्याला वाचवलं जातं.”

किंवा “निष्कलंक; निर्दोष.”

किंवा कदाचित, “तुमच्यामुळे मला खूप धैर्य मिळतं.”

किंवा “भरभरून.”

अति. क५ पाहा.

शब्दशः “वाटेकरी.”

किंवा “नाखुशीने.”

शब्दशः “शब्दात आम्ही जे आहोत.”

शब्दशः “कृतीतही असू.”

किंवा “मापून आम्हाला वाटून दिलं आहे.”

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

शब्दशः “आवेशी.”

किंवा “शुद्ध.”

किंवा “शुद्धता.”

किंवा “देवाच्या शक्‍तीऐवजी.”

किंवा “मदत.”

शब्दशः “त्यांना लुटलं.”

किंवा “आधार.”

म्हणजे, माणसांच्या.

शब्दशः “बीज.”

शब्दशः “आणि उघडा होतो.”

किंवा “माझ्यावर असलेला रोजचा दबाव.”

किंवा “वेताच्या टोपलीत.”

किंवा “मला मारण्यासाठी.”

किंवा “तुमच्या जिवांसाठी.”

ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

ग्रीक, ॲसेल्गेया. शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “तोंडून.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा