वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt मत्तय १:१-२८:२०
  • मत्तय

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मत्तय
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
मत्तय

मत्तय याने सांगितलेला आनंदाचा संदेश

१ अब्राहामचा वंशज+ दावीद, दावीदचा वंशज+ येशू ख्रिस्त* याच्या जीवनाचा अहवाल:*

२ अब्राहामला इसहाक झाला;+

इसहाकला याकोब;+

याकोबला, यहूदा+ आणि त्याचे भाऊ झाले;

 ३ यहूदाला तामारपासून पेरेस आणि जेरह झाले;+

पेरेसला हेस्रोन;+

हेस्रोनला राम+ झाला;

 ४ रामला अम्मीनादाब झाला;

अम्मीनादाबला नहशोन;+

नहशोनला सल्मोन झाला;

 ५ सल्मोनला राहाबपासून+ बवाज झाला;

बवाजला रूथपासून ओबेद;+

ओबेदला इशाय झाला;+

 ६ इशायला दावीद राजा झाला.+

दावीदला, जी पूर्वी उरीयाची बायको होती तिच्यापासून शलमोन झाला;+

 ७ शलमोनला रहबाम+ झाला;

रहबामला अबीया;

अबीयाला आसा झाला;+

 ८ आसाला यहोशाफाट झाला;+

यहोशाफाटला यहोराम;+

यहोरामला उज्जीया झाला;

 ९ उज्जीयाला योथाम झाला;+

योथामला आहाज;+

आहाजला हिज्कीया झाला;+

१० हिज्कीयाला मनश्‍शे झाला;+

मनश्‍शेला आमोन;+

आमोनला योशीया झाला;+

११ यहुद्यांना बाबेलच्या बंदिवासात नेण्यात आलं, त्या काळात+ योशीयाला+ यखन्या+ आणि त्याचे भाऊ झाले.

१२ बाबेलच्या बंदिवासात गेल्यानंतर यखन्याला शल्तीएल झाला;

शल्तीएलला जरूब्बाबेल झाला;+

१३ जरूब्बाबेलला अबीहूद झाला;

अबीहूदला एल्याकीम;

एल्याकीमला अज्जुर झाला;

१४ अज्जुरला सादोक झाला;

सादोकला याखीम;

याखीमला एलीहूद झाला;

१५ एलीहूदला एलाजार झाला;

एलाजारला मत्तान;

मत्तानला याकोब झाला;

१६ याकोबला योसेफ झाला. हा योसेफ मरीयाचा पती होता. मरीयाच्या पोटी ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला.+

१७ अशा प्रकारे अब्राहामपासून दावीदपर्यंत १४ पिढ्या झाल्या. दावीदपासून यहुद्यांच्या बाबेलमधल्या बंदिवासापर्यंत १४ पिढ्या झाल्या आणि बाबेलमधल्या बंदिवासापासून ख्रिस्तापर्यंत १४ पिढ्या झाल्या.

१८ येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला: त्याची आई मरीया हिचं योसेफशी लग्न ठरलं होतं. पण, त्यांचं लग्न होण्याआधीच ती पवित्र शक्‍तीने* गरोदर राहिली.+ १९ तिचा नवरा योसेफ एक चांगला* माणूस असल्यामुळे त्याला चारचौघांत तिची बदनामी होऊ द्यायची नव्हती. म्हणून त्याने तिला गुपचूप घटस्फोट* द्यायचं ठरवलं.+ २० पण त्याने या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर यहोवाच्या* दूताने स्वप्नात त्याला दर्शन दिलं. तो त्याला म्हणाला: “योसेफ, दावीदच्या मुला, मरीयाशी लग्न करायला* घाबरू नकोस, कारण तिच्या पोटात असलेला गर्भ पवित्र शक्‍तीमुळे* आहे.+ २१ तिला मुलगा होईल आणि तू त्याचं नाव येशू* ठेव,+ कारण तो आपल्या लोकांची त्यांच्या पापांपासून सुटका करेल.”*+ २२ यहोवाने* आपल्या संदेष्ट्याद्वारे सांगितलेलं वचन पूर्ण व्हावं, म्हणून या सगळ्या गोष्टी खरोखरच घडल्या. त्याने असं सांगितलं होतं: २३ “पाहा! कुमारी गर्भवती होईल आणि ती एका मुलाला जन्म देईल. त्याचं नाव इम्मानुएल+ ठेवलं जाईल.” या नावाचा अर्थ “देव आपल्यासोबत आहे” असा होतो.+

२४ मग योसेफ झोपेतून जागा झाला. त्याने यहोवाच्या* दूताने सांगितल्याप्रमाणे केलं आणि आपल्या बायकोला घरी आणलं. २५ पण तिने मुलाला जन्म देईपर्यंत+ त्याने तिच्याशी संबंध ठेवले नाहीत. त्याने मुलाचं नाव येशू ठेवलं.+

२ हेरोद* राजाच्या काळात+ यहूदीयातल्या बेथलेहेममध्ये+ येशूचा जन्म झाला. त्याच्या काही काळानंतर पूर्वेकडचे काही ज्योतिषी यरुशलेमला आले, २ आणि विचारू लागले: “नुकताच जन्मलेला यहुद्यांचा राजा कुठे आहे?+ कारण आम्ही पूर्वेकडे असताना त्याचा तारा आम्हाला दिसला. म्हणून आम्ही त्याला नमन करायला आलोय.” ३ हे ऐकून हेरोद राजा आणि यरुशलेममधले सर्व लोक घाबरून गेले. ४ तेव्हा हेरोदने सगळ्या मुख्य याजकांना आणि शास्त्र्यांना एकत्र जमवून, ख्रिस्ताचा* जन्म कुठे होणार होता हे विचारलं. ५ ते म्हणाले: “यहूदीयातल्या बेथलेहेममध्ये.+ कारण संदेष्ट्याने असं लिहिलंय: ६ ‘हे यहूदा देशातल्या बेथलेहेम, राज्यपालांच्या शासनाखाली असलेल्या यहूदातल्या सर्व शहरांमध्ये, तुझं स्थान कमी महत्त्वाचं मुळीच नाही. कारण तुझ्यातूनच एक शासक येईल आणि माझ्या इस्राएली लोकांवर राज्य करेल.’”+

७ मग हेरोदने ज्योतिष्यांना गुपचूप बोलावून घेतलं. त्याने बारकाईने चौकशी करून, तो तारा केव्हा दिसला होता हे त्यांच्याकडून माहीत करून घेतलं. ८ मग त्यांना बेथलेहेमला पाठवताना तो म्हणाला: “जा, तो लहान मुलगा कुठे आहे ते नीट शोधा आणि तो सापडल्यावर परत येऊन मला सांगा. मग मीही जाऊन त्याला नमन करीन.” ९ राजाचं बोलणं ऐकून ते निघाले आणि पाहा! ते पूर्वेकडे असताना जो तारा त्यांना दिसला होता,+ तोच तारा त्यांच्या पुढेपुढे जाऊ लागला. मग ज्या घरात तो मुलगा होता त्या घरावर तो येऊन थांबला. १० तो तारा पाहून त्यांना खूप आनंद झाला. ११ मग त्या घरात गेल्यावर त्यांना तो लहान मुलगा त्याच्या आईसोबत म्हणजे मरीयासोबत दिसला. तेव्हा त्यांनी गुडघे टेकून त्याला नमन केलं आणि आपल्या खजिन्याच्या पेट्या उघडून सोनं, ऊद आणि गंधरस* या भेटवस्तू त्याला दिल्या. १२ पण त्यांना स्वप्नात देवाकडून सूचना मिळाली होती,+ की हेरोदकडे परत जाऊ नका. म्हणून ते वेगळ्या मार्गाने आपल्या देशाकडे निघून गेले.

१३ ते निघून गेल्यावर यहोवाचा* दूत योसेफला स्वप्नात दर्शन देऊन+ म्हणाला: “ऊठ, लहान मुलाला आणि त्याच्या आईला घेऊन इजिप्त* देशात पळून जा. मी सांगेपर्यंत तिथेच राहा, कारण या लहान मुलाचा जीव घेण्यासाठी हेरोद लवकरच त्याचा शोध घेणार आहे.” १४ म्हणून योसेफ उठला आणि त्याच रात्री मुलाला आणि मरीयाला घेऊन इजिप्तला निघून गेला. १५ हेरोदचा मृत्यू होईपर्यंत तो तिथेच राहिला. अशा प्रकारे यहोवाने* आपल्या संदेष्ट्याद्वारे जे म्हटलं होतं, की “मी माझ्या मुलाला इजिप्तमधून बोलावलं,” ते पूर्ण झालं.+

१६ ज्योतिष्यांनी आपल्याला फसवलं आहे हे कळल्यावर हेरोद खूप संतापला. त्याने माणसं पाठवून बेथलेहेम आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशांतल्या दोन वर्षांच्या आणि त्याहून कमी वयाच्या सर्व मुलांना ठार मारलं. कारण त्याने आधीच नीट चौकशी करून त्या लहान मुलाच्या जन्माची वेळ ज्योतिष्यांकडून विचारून घेतली होती.+ १७ अशा प्रकारे यिर्मया संदेष्ट्याद्वारे जे सांगण्यात आलं होतं ते पूर्ण झालं. ते असं: १८ “रामा नगरातून रडण्याचा आणि शोक करण्याचा आवाज ऐकू आला. राहेल+ आपल्या मुलांसाठी रडत होती. तिचं काही केल्या सांत्वन होत नव्हतं, कारण तिची मुलं आता नाहीत.”+

१९ हेरोदचा मृत्यू झाल्यानंतर यहोवाच्या* दूताने इजिप्तमध्ये योसेफला स्वप्नात दर्शन दिलं.+ २० तो म्हणाला: “ऊठ, लहान मुलाला आणि त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात जा, कारण जे मुलाच्या जिवावर उठले होते ते आता मेले आहेत.” २१ म्हणून तो उठला आणि मुलाला व मरीयाला घेऊन इस्राएल देशात आला. २२ पण यहूदीयात हेरोदच्या जागी त्याचा मुलगा अर्खेलाव राज्य करत आहे, हे कळल्यावर त्याला तिथे जायला भीती वाटली. शिवाय, देवाने त्याला स्वप्नात सूचना दिल्यामुळे+ तो गालीलच्या प्रदेशात+ निघून गेला. २३ तिथे तो नासरेथ नावाच्या शहरात जाऊन राहू लागला.+ अशा प्रकारे, “त्याला नासरेथकर* म्हटलं जाईल,” हे संदेष्ट्यांचे शब्द पूर्ण झाले.+

३ नंतर बाप्तिस्मा* देणारा योहान+ यहूदीयाच्या ओसाड रानात आला आणि अशी घोषणा करू लागला:+ २ “पश्‍चात्ताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलंय.”+ ३ याच योहानबद्दल यशया संदेष्ट्याने असं सांगितलं होतं:+ “ओसाड रानात घोषणा करणाऱ्‍या एकाचा आवाज ऐकू येतोय: ‘यहोवासाठी* मार्ग तयार करा! त्याच्यासाठी रस्ते मोकळे करा.’”+ ४ योहान उंटाच्या केसांचे कपडे घालायचा आणि कमरेला चामड्याचा पट्टा बांधायचा.+ तो टोळ आणि रानातला मध खायचा.+ ५ मग यरुशलेमचे, तसंच यहूदीया आणि यार्देन नदीच्या आसपासच्या सगळ्या प्रदेशांतले लोक त्याच्याकडे येऊ लागले.+ ६ त्यांनी आपल्या पापांची उघडपणे कबुली देऊन त्याच्याकडून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.+

७ बऱ्‍याच परूशी* आणि सदूकी*+ लोकांना त्या ठिकाणी येताना पाहून तो त्यांना म्हणाला: “अरे विषारी सापाच्या पिल्लांनो!+ देवाच्या येणाऱ्‍या क्रोधापासून तुम्ही वाचू शकता असं तुम्हाला कोणी सांगितलं?+ ८ आधी तुमचा पश्‍चात्ताप तुमच्या कामांतून दाखवा.* ९ ‘आपण तर अब्राहामचे वंशज आहोत,’ अशा भ्रमात राहू नका.+ कारण मी तुम्हाला सांगतो, देवाला पाहिजे असेल तर तो अब्राहामसाठी या दगडांपासूनसुद्धा मुलं उत्पन्‍न करू शकतो. १० कुऱ्‍हाड तर केव्हाच झाडाच्या मुळाशी ठेवण्यात आली आहे. जे झाड चांगलं फळ देत नाही ते तोडून आगीत टाकलं जाईल.+ ११ मी तुमच्या पश्‍चात्तापामुळे तुम्हाला पाण्याने बाप्तिस्मा देतो;+ पण, जो माझ्या मागून येतोय त्याला माझ्यापेक्षा जास्त अधिकार आहे. मी तर त्याचे जोडे काढायलाही योग्य नाही.+ तो तुम्हाला पवित्र शक्‍तीने*+ आणि अग्नीने बाप्तिस्मा देईल.+ १२ त्याच्या हातात धान्यापासून भुसा वेगळा करायचं फावडं आहे आणि तो त्याचं खळं* पूर्णपणे स्वच्छ करेल. तो गहू कोठारांत जमा करेल, तर भुसा अशा आगीत जाळून टाकेल+ जी विझवता येत नाही.”

१३ मग येशू बाप्तिस्मा घेण्यासाठी गालीलहून यार्देन नदीजवळ योहानकडे आला.+ १४ पण योहान त्याला अडवायचा प्रयत्न करू लागला आणि म्हणाला: “खरंतर मी तुझ्याकडून बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे. तू माझ्याकडे कसा काय आलास?” १५ येशू त्याला म्हणाला: “मला अडवू नकोस, कारण आपण देवाच्या इच्छेप्रमाणे सगळं काही करावं हेच योग्य आहे.” त्यानंतर त्याने त्याला अडवलं नाही. १६ बाप्तिस्मा झाल्यानंतर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि बघा! आकाश उघडलं+ आणि देवाची पवित्र शक्‍ती* कबुतरासारखी येशूवर उतरताना योहानला दिसली.+ १७ आणि त्याच वेळी स्वर्गातून असा आवाज ऐकू आला:+ “हा माझा मुलगा+ मला प्रिय आहे. त्याने माझं मन आनंदित केलंय.”+

४ मग पवित्र शक्‍तीने* येशूला ओसाड रानात नेलं आणि तिथे सैतानाने*+ त्याची परीक्षा घेतली.+ २ त्याने ४० दिवस आणि ४० रात्री उपास केल्यावर त्याला भूक लागली. ३ तेव्हा परीक्षा घेणारा+ त्याच्याजवळ आला आणि त्याला म्हणाला: “तू जर देवाचा मुलगा असशील, तर या दगडांना भाकरी व्हायला सांग.” ४ पण त्याने उत्तर दिलं: “‘माणसाने फक्‍त भाकरीनेच नाही, तर यहोवाच्या* तोंडातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगलं पाहिजे,’ असं लिहिलंय.”+

५ मग सैतानाने त्याला पवित्र नगरात नेलं+ आणि मंदिराच्या भिंतीवर एका उंच ठिकाणी उभं केलं.+ ६ तो त्याला म्हणाला: “तू जर देवाचा मुलगा असशील, तर खाली उडी टाक. कारण असं लिहिलंय: ‘तो आपल्या स्वर्गदूतांना तुझ्याबद्दल आज्ञा देईल,’ आणि, ‘तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये, म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून घेतील.’”+ ७ येशू त्याला म्हणाला: “असंही लिहिलंय: ‘तुझा देव यहोवा* याची परीक्षा पाहू नकोस.’”+

८ मग सैतानाने त्याला एका खूप उंच डोंगरावर नेऊन जगातली सर्व राज्यं आणि त्यांचं वैभव दाखवलं.+ ९ तो त्याला म्हणाला: “तू एकदा माझ्या पाया पडून माझी उपासना केलीस, तर हे सगळं मी तुला देईन.” १० तेव्हा येशू त्याला म्हणाला: “अरे सैताना, चालता हो! कारण असं लिहिलंय: ‘तू फक्‍त तुझा देव यहोवा* याचीच उपासना कर+ आणि फक्‍त त्याचीच पवित्र सेवा कर.’”+ ११ मग सैतान त्याला सोडून निघून गेला+ आणि स्वर्गदूत येऊन त्याची सेवा करू लागले.+

१२ नंतर, योहानला अटक झाली+ आहे हे ऐकल्यावर येशू गालीलला निघून गेला.+ १३ पुढे, तो नासरेथ सोडून कफर्णहूममध्ये+ राहू लागला. ते जबुलून आणि नफतालीच्या प्रांतांत गालील समुद्राजवळ आहे. १४ अशा प्रकारे यशया संदेष्ट्याद्वारे जे सांगण्यात आलं होतं ते पूर्ण झालं. ते असं: १५ “हे जबुलून आणि नफतालीच्या प्रदेशा, यार्देन नदीच्या पलीकडे समुद्रकिनाऱ्‍यावर असलेल्या विदेश्‍यांच्या गालीला! १६ अंधारात बसलेल्या लोकांना तेजस्वी प्रकाश दिसला आणि मृत्युछायेच्या प्रदेशात बसलेल्यांवर प्रकाश+ चमकला.”+ १७ तेव्हापासून येशू असा प्रचार करू लागला: “पश्‍चात्ताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलंय.”+

१८ मग गालील समुद्राजवळून जाताना त्याला शिमोन (याला पेत्र असंही म्हणतात)+ आणि त्याचा भाऊ अंद्रिया हे दोघं समुद्रात जाळं टाकताना दिसले. कारण ते मासे धरणारे होते.+ १९ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसं धरणारे करीन.”+ २० हे ऐकताच त्यांनी आपली जाळी टाकून दिली आणि ते त्याच्यामागे चालू लागले.+ २१ तिथून पुढे गेल्यावर त्याला आणखी दोघं, म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान+ हे दिसले. ते आपल्या वडिलांसोबत नावेत जाळी नीट करत होते. तेव्हा येशूने त्यांना बोलावलं.+ २२ ते लगेच आपली नाव आणि आपल्या वडिलांना सोडून त्याच्यामागे गेले.

२३ मग येशू तिथल्या सभास्थानांत+ शिकवत, राज्याबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करत संपूर्ण गालीलमध्ये फिरला.+ तसंच त्याने लोकांचे सर्व प्रकारचे आजार आणि सर्व प्रकारची दुखणी बरी केली.+ २४ तेव्हा, सीरियाच्या संपूर्ण प्रदेशात त्याची बातमी पसरली. लोक त्याच्याजवळ वेगवेगळ्या प्रकारचे आजार आणि दुखणी असलेल्यांना,+ तसंच, दुष्ट स्वर्गदूतांनी* पछाडलेल्यांना,+ फेफरेकऱ्‍यांना*+ आणि लकवा मारलेल्यांना घेऊन आले आणि त्याने त्यांना बरं केलं. २५ यामुळे, गालील व दकापलीस* आणि यरुशलेम व यहूदीया, तसंच यार्देन नदीच्या पलीकडे असलेल्या प्रदेशातून मोठ्या संख्येने लोक त्याच्यामागे जाऊ लागले.

५ पुष्कळ लोक जमलेले पाहून तो डोंगरावर गेला. तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. २ मग तो त्यांना शिकवू लागला. तो म्हणाला:

३ “ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे* ते सुखी आहेत,+ कारण स्वर्गाचं राज्य अशाच लोकांचं आहे.

४ जे शोक करतात ते सुखी आहेत, कारण त्यांचं सांत्वन केलं जाईल.+

५ जे नम्र* ते सुखी आहेत,+ कारण त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल.+

६ ज्यांना नीतिमत्त्वाची* तहान आणि भूक आहे ते सुखी आहेत,+ कारण त्यांना तृप्त केलं जाईल.+

७ जे दयाळू ते सुखी आहेत,+ कारण त्यांच्यावर दया केली जाईल.

८ ज्यांचं मन शुद्ध ते सुखी आहेत,+ कारण ते देवाला पाहतील.

९ जे शांती टिकवून ठेवायचा प्रयत्न करतात* ते सुखी आहेत,+ कारण त्यांना देवाची मुलं म्हटलं जाईल.

१० नीतिमत्त्वासाठी* ज्यांचा छळ झालाय ते सुखी आहेत,+ कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे.

११ माझ्यामुळे जेव्हा लोक तुमचा अपमान+ आणि छळ करून+ तुमच्यावर सर्व प्रकारचे खोटे आरोप लावतात, तेव्हा तुम्ही सुखी आहात.+ १२ हर्ष करा आणि खूप आनंदित व्हा,+ कारण स्वर्गात तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल.+ तुमच्याआधी होऊन गेलेल्या संदेष्ट्यांचाही त्यांनी असाच छळ केला होता.+

१३ तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात.+ पण मिठाचा खारटपणा गेला, तर तो पुन्हा कशाने आणता येईल? ते टाकून देण्याशिवाय आणि पायांखाली तुडवण्याशिवाय कसल्याही उपयोगाचं राहणार नाही.+

१४ तुम्ही जगाचा प्रकाश आहात.+ डोंगरावर वसलेलं शहर लपू शकत नाही. १५ लोक दिवा लावून टोपलीखाली ठेवत नाहीत, तर एखाद्या उंच ठिकाणी ठेवतात. त्यामुळे घरातल्या सर्वांना प्रकाश मिळतो.+ १६ त्याचप्रमाणे, तुमचा प्रकाश लोकांपुढे पडू द्या,+ म्हणजे ते तुमची चांगली कामं+ पाहून स्वर्गातल्या तुमच्या पित्याचा गौरव करतील.+

१७ मी नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचं लिखाण रद्द करायला आलोय, असं समजू नका. मी ते रद्द करायला नाही, तर पूर्ण करायला आलोय.+ १८ मी तुम्हाला खरं सांगतो, की एकवेळ आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, पण नियमशास्त्रातलं एकही अक्षर किंवा अक्षरातली एक रेषसुद्धा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.+ १९ त्यामुळे जो यातली सर्वात लहान आज्ञा मोडतो आणि दुसऱ्‍यांनाही तसं करायला शिकवतो, त्याला स्वर्गाच्या राज्यात सगळ्यात लहान म्हटलं जाईल. पण, जो या आज्ञांचं पालन करतो आणि दुसऱ्‍यांनाही तसं करायला शिकवतो त्याला स्वर्गाच्या राज्यात महान म्हटलं जाईल. २० कारण मी तर तुम्हाला सांगतो, की तुमचं नीतिमत्त्व शास्त्री आणि परूशी यांच्या नीतिमत्त्वापेक्षा जास्त नसलं,+ तर स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला मुळीच जाता येणार नाही.+

२१ पूर्वीच्या काळातल्या लोकांना जे सांगण्यात आलं होतं ते तुम्ही ऐकलंय, की ‘खून करू नका+ आणि जो खून करतो त्याला न्यायालयात जाब द्यावा लागेल.’+ २२ पण मी तर तुम्हाला म्हणतो, की जो आपल्या भावाबद्दल मनात राग बाळगतो+ त्याला न्यायालयात जाब द्यावा लागेल. जो आपल्या भावाला शिव्याशाप देतो त्याला सर्वोच्च न्यायालयात जाब द्यावा लागेल. आणि जो त्याला ‘अरे नीच मूर्खा!’ असं म्हणतो, तो गेहेन्‍नाच्या* आगीत टाकला जाण्यासाठी पात्र ठरेल.+

२३ तर मग, तू आपलं अर्पण वेदीजवळ आणत असताना,+ तुझ्या भावाला तुझ्याविरुद्ध काही तक्रार आहे हे तुला आठवलं, २४ तर तुझं ते अर्पण तिथेच वेदीसमोर ठेवून निघून जा. आधी आपल्या भावाशी समेट कर आणि मग परत येऊन आपलं अर्पण दे.+

२५ जो तुझ्याविरुद्ध खटला भरणार आहे त्याच्यासोबत न्यायालयात जात असतानाच लवकरात लवकर वाद मिटव. नाहीतर, तो तुला न्यायाधीशाच्या हाती सोपवेल, न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती सोपवेल आणि शेवटी तुला तुरुंगात टाकलं जाईल.+ २६ मी तुला नक्की सांगतो, की तू त्याची एकेक दमडी* फेडेपर्यंत तुला तिथून मुळीच सुटका मिळणार नाही.

२७ ‘व्यभिचार करू नका,’+ असं सांगण्यात आलं होतं, हे तुम्ही ऐकलंय. २८ पण, मी तर तुम्हाला सांगतो, की जो एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने* पाहत राहतो,+ त्याने केव्हाच आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाय.+ २९ म्हणून, जर तुझा उजवा डोळा तुला अडखळायला लावत असेल,* तर तो उपटून टाक आणि फेकून दे.+ कारण संपूर्ण शरीर गेहेन्‍नात* टाकलं जावं, यापेक्षा एक अवयव गमावलेला बरा.+ ३० तसंच, तुझा उजवा हात तुला अडखळायला लावत असेल,* तर तो कापून टाक आणि फेकून दे.+ कारण संपूर्ण शरीर गेहेन्‍नात* पडावं, यापेक्षा एक अवयव गमावलेला बरा.+

३१ तसंच, असंही सांगण्यात आलं होतं, की ‘जो आपल्या बायकोला घटस्फोट देतो त्याने तिला सोडचिठ्ठी द्यावी.’+ ३२ पण मी तर तुम्हाला सांगतो, की जो अनैतिक लैंगिक कृत्यांशिवाय* इतर कोणत्याही कारणाने आपल्या बायकोला घटस्फोट देतो, तो तिला व्यभिचार करायला प्रवृत्त करतो. आणि जो अशा घटस्फोट झालेल्या स्त्रीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो.+

३३ शिवाय, तुम्ही हेही ऐकलंय, की पूर्वीच्या काळातल्या लोकांना असं सांगण्यात आलं होतं: ‘घेतलेली शपथ मोडू नका.+ यहोवाला* केलेले नवस पूर्ण करा.’+ ३४ पण मी तर तुम्हाला म्हणतो: शपथच घेऊ नका.+ स्वर्गाची घेऊ नका, कारण स्वर्ग देवाचं राजासन आहे; ३५ पृथ्वीची शपथ घेऊ नका, कारण ती त्याच्या पायाचं आसन आहे.+ आणि यरुशलेमचीही घेऊ नका, कारण ते महान राजाचं नगर आहे.+ ३६ आपल्या डोक्याची शपथ घेऊ नका, कारण तुमचा एकही केस तुम्ही पांढरा किंवा काळा करू शकत नाही. ३७ त्यामुळे तुमचं बोलणं ‘हो’ तर हो, ‘नाही’ तर नाही इतकंच असावं.+ कारण यापेक्षा जे काही जास्त, ते त्या दुष्टाकडून आहे.+

३८ ‘डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात,’ असं म्हणण्यात आलं होतं हे तुम्ही ऐकलंय.+ ३९ पण मी तर तुम्हाला सांगतो: दुष्ट माणसाचा प्रतिकार करू नका, तर जो तुमच्या उजव्या गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसराही गाल करा.+ ४० जर कोणी न्यायालयात तुमच्याविरुद्ध तक्रार करून तुमचा झगा घ्यायचा प्रयत्न करत असेल, तर त्याला तुमचं बाहेरचं वस्त्रही द्या.+ ४१ जर एखाद्या अधिकाऱ्‍याने त्याची काही सेवा करायला तुम्हाला एका मैलापर्यंत* जायला भाग पाडलं, तर त्याच्यासोबत दोन मैल जा. ४२ जो तुमच्याकडे काही मागतो त्याला ते द्या आणि ज्याला तुमच्याकडून काही उसनं* घ्यायचंय त्याच्याकडे पाठ फिरवू नका.+

४३ ‘तू आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम कर+ आणि आपल्या शत्रूचा द्वेष कर,’ असं सांगण्यात आलं होतं, हे तुम्ही ऐकलंय. ४४ पण मी तर तुम्हाला सांगतो: आपल्या शत्रूंवर प्रेम करत राहा+ आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहा.+ ४५ असं केलं, तर तुम्ही स्वर्गातल्या तुमच्या पित्याची मुलं असल्याचं सिद्ध कराल.+ कारण तो चांगल्या लोकांसोबतच दुष्टांवरही सूर्य उगवतो आणि नीतिमान लोकांसोबतच अनीतिमान लोकांवरही पाऊस पाडतो.+ ४६ कारण तुमच्यावर प्रेम करणाऱ्‍यांवर जर तुम्ही प्रेम करत असाल, तर तुम्हाला काय प्रतिफळ मिळणार?+ जकातदारसुद्धा तसंच करत नाहीत का? ४७ आणि जर तुम्ही फक्‍त आपल्या भावांनाच नमस्कार करत असाल, तर तुम्ही विशेष असं काय करता? विदेशी लोकसुद्धा तसंच करत नाहीत का? ४८ म्हणूनच, स्वर्गातला तुमचा पिता जसा परिपूर्ण आहे, तसेच तुम्हीही परिपूर्ण व्हा.+

६ सांभाळा, लोकांनी आपल्याला पाहावं म्हणून त्यांच्यासमोर चांगली कामं करू नका;*+ नाहीतर स्वर्गातल्या तुमच्या पित्याकडून तुम्हाला कोणतंही प्रतिफळ मिळणार नाही. २ म्हणून, तुम्ही दानधर्म करता तेव्हा लोकांनी आपली वाहवा करावी म्हणून ढोंगी लोकांसारखं सभास्थानांत आणि रस्त्यांवर गाजावाजा* करू नका. मी तुम्हाला खरं सांगतो, त्यांना त्यांचं पूर्ण प्रतिफळ मिळालंय. ३ उलट तुम्ही दानधर्म करता, तेव्हा तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका; ४ म्हणजे तुमचा दानधर्म गुप्त राहील आणि तुमचा पिता, जो गुप्त गोष्टीही पाहू शकतो तो तुम्हाला प्रतिफळ देईल.+

५ तसंच, तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंगी लोकांसारखी करू नका.+ कारण लोकांनी आपल्याला पाहावं म्हणून सभास्थानांत आणि चौकांत उभं राहून प्रार्थना करायला त्यांना आवडतं.+ मी तुम्हाला खरं सांगतो, त्यांना त्यांचं पूर्ण प्रतिफळ मिळालंय. ६ उलट, तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा आतल्या खोलीत जा, दार लावून घ्या आणि तुमच्या अदृश्‍य पित्याला* प्रार्थना करा.+ मग, तुमचा पिता जो गुप्त गोष्टीही पाहू शकतो तो तुम्हाला प्रतिफळ देईल. ७ प्रार्थना करताना विदेश्‍यांसारखं त्याच गोष्टी पुन्हापुन्हा बोलू नका. कारण आपण पुष्कळ बोललो तर आपली प्रार्थना ऐकली जाईल असं त्यांना वाटतं. ८ तेव्हा त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुम्हाला कशाची गरज आहे हे तुम्ही मागायच्या आधीच तुमच्या पित्याला माहीत असतं.+

९ म्हणून अशा प्रकारे प्रार्थना करा:+

‘हे आमच्या स्वर्गातल्या पित्या, तुझं नाव+ पवित्र मानलं जावो.+ १० तुझं राज्य+ येवो. तुझी इच्छा+ जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो.+ ११ आमची रोजची भाकर आज आम्हाला दे.+ १२ आणि जसं आम्ही आमच्या कर्जदारांना माफ केलंय, तसं तूही आमची कर्जं* माफ कर.+ १३ आम्हाला मोहात पडू देऊ नकोस,*+ तर त्या दुष्टापासून वाचव.’*+

१४ कारण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा केली, तर स्वर्गातला तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करेल.+ १५ पण, जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा केली नाही, तर स्वर्गातला तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.+

१६ तुम्ही उपास करता+ तेव्हा ढोंगी लोकांसारखं चेहरा उदास करायचं सोडून द्या. कारण आपण उपास करत आहोत हे लोकांना दिसावं, म्हणून ते मुद्दामहून स्वतःकडे दुर्लक्ष करतात.+ मी तुम्हाला खरं सांगतो, त्यांना त्यांचं पूर्ण प्रतिफळ मिळालंय. १७ पण तू उपास करताना आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपलं तोंड धू; १८ म्हणजे तू उपास करत आहेस हे माणसांना नाही, तर फक्‍त तुझ्या अदृश्‍य* पित्याला दिसेल. मग तुझा पिता, जो गुप्त गोष्टीही पाहू शकतो तो तुला प्रतिफळ देईल.

१९ पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवायचं सोडून द्या.+ तिथे कसर* आणि गंज लागून ती नष्ट होते आणि चोर घरफोडी करून ती लुटतात. २० त्याऐवजी स्वर्गात संपत्ती साठवा.+ तिथे कसर आणि गंज लागून ती नष्ट होत नाही+ आणि चोर घर फोडून ती लुटत नाहीत. २१ कारण जिथे तुझं धन आहे, तिथे तुझं मनही असेल.

२२ डोळा हा शरीराचा दिवा आहे.+ म्हणून जर तुमची नजर एकाग्र* असेल, तर तुमचं संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. २३ पण जर तुमची नजर ईर्ष्येने भरलेली* असेल,+ तर तुमचं पूर्ण शरीर अंधकारमय होईल. आणि जर तुमच्यात असलेला प्रकाशच अंधकारमय झाला, तर तो अंधार किती मोठा असेल!

२४ कोणीही दोन मालकांची सेवा करू शकत नाही. कारण एकतर तो त्यांच्यापैकी एकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्‍यावर प्रेम करेल,+ किंवा एका मालकाशी एकनिष्ठ राहील आणि दुसऱ्‍याला तुच्छ लेखेल. तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.+

२५ म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, काय खावं किंवा काय प्यावं अशी आपल्या जिवाबद्दल, किंवा काय घालावं+ अशी आपल्या शरीराबद्दल चिंता करायचं सोडून द्या.+ अन्‍नापेक्षा जीव आणि कपड्यांपेक्षा शरीर जास्त महत्त्वाचं नाही का?+ २६ आकाशातल्या पक्ष्यांकडे निरखून पाहा.+ ते पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत किंवा कोठारांत धान्य साठवत नाहीत; तरीही स्वर्गातला तुमचा पिता त्यांना खाऊ घालतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मौल्यवान नाही का? २७ चिंता करून कोणी आपलं आयुष्य हातभर* वाढवू शकतं का?+ २८ तसंच, काय घालावं याची चिंता का करता? रानातल्या फुलांकडून शिका. ती कशी वाढतात? ती तर कष्ट करत नाहीत किंवा सूतही कातत नाहीत. २९ पण मी तुम्हाला सांगतो, की शलमोन इतका वैभवी राजा असूनही त्यानेसुद्धा+ कधी या फुलांसारखा सुंदर पेहराव केला नव्हता. ३० रानातली झाडंझुडपं आज आहेत, पण उद्या ती भट्टीत टाकली जातील. त्यांना जर देव इतकं सुंदर सजवतो, तर अरे अल्पविश्‍वासी* लोकांनो, तो तुम्हाला घालायला कपडे देणार नाही का? ३१ म्हणून, ‘काय खावं?’, ‘काय प्यावं?’ किंवा ‘काय घालावं?’ याची कधीही चिंता करू नका.+ ३२ कारण या गोष्टी मिळवण्यासाठी जगातले लोक धडपड करत आहेत. पण तुम्हाला या सर्व गोष्टींची गरज आहे हे स्वर्गातल्या तुमच्या पित्याला माहीत आहे.

३३ म्हणून, आधी देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्त्व* मिळवण्याचा प्रयत्न करत राहा. मग या सगळ्या गोष्टीही तुम्हाला दिल्या जातील.+ ३४ त्यामुळे, उद्याची चिंता कधीही करू नका,+ कारण उद्याचा दिवस नव्या चिंता घेऊन उगवेल. ज्या दिवसाची चिंता त्या दिवसाला पुरे.

७ तुमचे दोष काढले जाऊ नयेत, म्हणून तुम्ही दुसऱ्‍यांचे दोष काढायचं सोडून द्या.+ २ कारण ज्या प्रकारे तुम्ही दुसऱ्‍यांचा न्याय करता, त्याच प्रकारे तुमचाही न्याय केला जाईल.+ आणि ज्या मापाने तुम्ही दुसऱ्‍यांना मापून देता, त्याच मापाने तेही तुम्हाला मापून देतील.+ ३ तर मग, तुझ्या स्वतःच्या डोळ्यातलं लाकूड न बघता, तू तुझ्या भावाच्या डोळ्यातली बारीकशी काडी का बघतोस?+ ४ किंवा तुझ्या स्वतःच्या डोळ्यात लाकूड असताना, ‘मला तुझ्या डोळ्यातली काडी काढू दे,’ असं तू आपल्या भावाला कसं काय म्हणू शकतोस? ५ अरे ढोंगी माणसा! आधी स्वतःच्या डोळ्यातलं लाकूड काढ; म्हणजे मग तुझ्या भावाच्या डोळ्यातली काडी कशी काढायची हे तुला स्पष्ट दिसेल.

६ पवित्र गोष्टी कुत्र्यांना देऊ नका आणि तुमचे मोती डुकरांपुढे टाकू नका.+ नाहीतर, ते त्यांना पायांखाली तुडवतील आणि उलटून तुमच्यावर हल्ला करतील.*

७ मागत राहा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल.+ शोधत राहा म्हणजे तुम्हाला सापडेल. आणि ठोठावत राहा म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल.+ ८ कारण जो मागतो त्याला दिलं जातं,+ जो शोधतो त्याला सापडतं आणि जो ठोठावतो त्याच्यासाठी उघडलं जातं. ९ खरंच, तुमच्यापैकी असा कोण आहे जो आपल्या मुलाने भाकर मागितल्यावर त्याला दगड देईल? १० किंवा मासा मागितल्यावर साप देईल? कोणीही असं करणार नाही. ११ तुम्ही पापी असूनही जर तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी द्यायचं कळतं, तर मग स्वर्गातला तुमचा पिता त्याच्याकडे मागणाऱ्‍यांना त्या देणार नाही का?+

१२ म्हणून, ज्या गोष्टी इतरांनी आपल्यासाठी कराव्यात असं तुम्हाला वाटतं, त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी केल्या पाहिजेत.+ कारण नियमशास्त्रात आणि संदेष्ट्यांच्या लिखाणांत हेच सांगितलंय.+

१३ अरुंद दरवाजाने आत जा.+ कारण, नाशाकडे जाणारा दरवाजा रुंद आणि रस्ता पसरट आहे आणि त्यातून जाणारे बरेच आहेत. १४ पण जीवनाकडे जाणारा दरवाजा अरुंद आणि रस्ता छोटा* आहे आणि फार कमी लोकांना तो सापडतो.+

१५ खोट्या संदेष्ट्यांपासून जपून राहा.+ कारण ते मेंढरांच्या वेषात तुमच्याकडे येतात,+ पण आतून ते क्रूर लांडगे आहेत.+ १६ तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल. काटेरी झुडपांना द्राक्षं किंवा अंजिरं कधी लागतात का?+ १७ त्याचप्रमाणे, प्रत्येक चांगलं झाड चांगलं फळ देतं, पण कीड लागलेलं झाड खराब फळ देतं.+ १८ चांगल्या झाडाला कधी खराब फळ येऊ शकत नाही आणि कीड लागलेल्या झाडाला कधी चांगलं फळ येऊ शकत नाही.+ १९ चांगलं फळ न देणारं प्रत्येक झाड कापून आगीत टाकलं जातं.+ २० खरंच, त्या माणसांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल.+

२१ मला ‘प्रभू, प्रभू,’ म्हणणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही, तर स्वर्गातल्या माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करणाराच त्या राज्यात जाईल.+ २२ त्या दिवशी बरेच लोक मला म्हणतील: ‘प्रभू, प्रभू,+ आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले नाहीत का? तुझ्या नावाने दुष्ट स्वर्गदूत* काढले नाहीत का? आणि तुझ्या नावाने बरेच चमत्कार केले नाहीत का?’+ २३ पण, मी त्यांना स्पष्टपणे सांगीन: ‘अरे दुष्टांनो!* मी तुम्हाला कधीच ओळखत नव्हतो, माझ्यापुढून निघून जा!’+

२४ म्हणून, जो माझे हे शब्द ऐकून त्यांप्रमाणे वागतो तो अशा एका बुद्धिमान माणसासारखा आहे, ज्याने आपलं घर खडकावर बांधलं.+ २५ मग मुसळधार पाऊस आला, पूर आला आणि वादळी वारे त्या घरावर आदळले. तरी ते घर कोसळलं नाही, कारण ते खडकावर बांधलेलं होतं. २६ याउलट, जो माझे हे शब्द ऐकून त्यांप्रमाणे वागत नाही, तो अशा एका मूर्ख माणसासारखा आहे ज्याने आपलं घर वाळूवर बांधलं.+ २७ मग मुसळधार पाऊस आला, पूर आला आणि वादळी वारे त्या घरावर आदळले.+ तेव्हा ते घर कोसळलं आणि जमीनदोस्त झालं.”

२८ येशूचं हे बोलणं संपल्यावर लोक त्याची शिकवायची पद्धत पाहून थक्क झाले.+ २९ कारण तो त्यांच्या शास्त्र्यांसारखा नाही, तर अधिकार असलेल्या व्यक्‍तीसारखा त्यांना शिकवत होता.+

८ मग, तो डोंगरावरून खाली उतरल्यावर लोकांचा मोठा समुदाय त्याच्यामागे जाऊ लागला. २ तितक्यात एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला आणि आदराने त्याच्यापुढे वाकून* त्याला म्हणाला: “प्रभू, तुमची इच्छा असेल, तर तुम्ही मला शुद्ध करू शकता.”+ ३ तेव्हा येशूने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि तो म्हणाला: “माझी इच्छा आहे! शुद्ध हो.”+ आणि त्याच क्षणी त्याचा कुष्ठरोग बरा होऊन तो शुद्ध झाला.+ ४ मग येशू त्याला म्हणाला: “हे बघ, कुणालाही याबद्दल सांगू नकोस.+ तर याजकाकडे जाऊन स्वतःला दाखव+ आणि त्यांना* साक्ष मिळावी म्हणून मोशेने सांगितलेलं अर्पण दे.”+

५ तो कफर्णहूमला आला तेव्हा सैन्यातला एक अधिकारी त्याच्याकडे येऊन त्याला विनंती करू लागला+ ६ आणि म्हणाला: “प्रभू, माझा नोकर घरी आजारी आहे, त्याला लकवा मारलाय आणि खूप त्रास होतोय.” ७ तो त्याला म्हणाला: “तिथे आल्यावर मी त्याला बरं करीन.” ८ तेव्हा तो अधिकारी म्हणाला: “प्रभू, तुम्ही माझ्या घरी यावं इतकी माझी लायकी नाही. तुम्ही फक्‍त तोंडातून शब्द काढला तरी माझा नोकर बरा होईल. ९ कारण मी स्वतः दुसऱ्‍याच्या अधिकाराखाली असलेला माणूस आहे. माझ्या हाताखालीही सैनिक आहेत. मी त्यांच्यापैकी एकाला ‘जा!’ म्हटलं तर तो जातो आणि दुसऱ्‍याला ‘ये!’ म्हटलं तर तो येतो. माझ्या दासाला मी, ‘अमुक कर!’ असं म्हटलं तर तो ते करतो.” १० येशूने हे ऐकलं तेव्हा त्याला खूप आश्‍चर्य वाटलं. म्हणून त्याच्यामागे येणाऱ्‍या लोकांना तो म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, मला इस्राएलमध्ये इतका मोठा विश्‍वास असलेला एकही माणूस पाहायला मिळाला नाही.+ ११ पण मी तुम्हाला सांगतो, पूर्वेकडून आणि पश्‍चिमेकडून बरेच जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याबरोबर एकाच मेजावर बसून जेवतील.+ १२ पण राज्याच्या मुलांना बाहेर अंधारात टाकलं जाईल. तिथे ती रडतील आणि आक्रोश करतील.”*+ १३ मग येशू त्या अधिकाऱ्‍याला म्हणाला: “जा. तू दाखवलेल्या विश्‍वासाप्रमाणे घडो.”+ आणि त्याच वेळी त्याचा नोकर बरा झाला.+

१४ मग येशू पेत्रच्या घरी आला तेव्हा त्याने पाहिलं, की त्याची सासू+ तापाने आजारी आहे.+ १५ त्याने तिच्या हाताला स्पर्श केला,+ तेव्हा तिचा ताप उतरला. मग ती उठून त्याची सेवा करू लागली. १६ नंतर, संध्याकाळ झाल्यावर लोकांनी त्याच्याकडे दुष्ट स्वर्गदूतांनी* पछाडलेल्या बऱ्‍याच जणांना आणलं. तेव्हा त्याने फक्‍त आपल्या शब्दाने दुष्ट स्वर्गदूतांना घालवलं आणि आजारी असलेल्या सर्वांना बरं केलं. १७ अशा प्रकारे यशया संदेष्ट्याद्वारे सांगण्यात आलेले हे शब्द पूर्ण झाले: “त्याने आमचे आजार आणि आमची दुखणी स्वतःवर घेतली.”+

१८ मग आपल्याभोवती लोक जमलेले पाहून येशूने शिष्यांना पलीकडे जायची आज्ञा दिली.+ १९ तेव्हा एक शास्त्री त्याच्याकडे येऊन म्हणाला: “गुरुजी, तुम्ही जिथेही जाल तिथे मी तुमच्यामागे येईन.”+ २० पण येशू त्याला म्हणाला: “कोल्ह्यांना राहायला गुहा आणि आकाशातल्या पक्ष्यांना घरटी आहेत. पण मनुष्याच्या मुलाला तर डोकं टेकायलाही जागा नाही.”+ २१ मग शिष्यांपैकी आणखी एक जण त्याला म्हणाला: “प्रभू, आधी मला जाऊन माझ्या वडिलांना पुरू द्या.”+ २२ येशू त्याला म्हणाला: “माझ्यामागे चालत राहा आणि जे मेलेले आहेत त्यांना आपल्या मेलेल्यांना पुरू दे.”+

२३ मग तो एका नावेत चढल्यावर त्याचे शिष्यही त्याच्यामागे गेले.+ २४ अचानक, समुद्रात मोठं वादळ आलं आणि लाटा नावेवर आदळू लागल्या; पण तो झोपला होता.+ २५ तेव्हा, त्याच्याकडे येऊन त्यांनी त्याला उठवलं आणि म्हटलं: “प्रभू, वाचव, आपण बुडतोय!” २६ पण, तो त्यांना म्हणाला: “इतकं का घाबरता?* किती कमी विश्‍वास आहे तुमच्यात!”+ मग तो उठला आणि त्याने वाऱ्‍याला आणि समुद्राला दटावलं. तेव्हा समुद्र अगदी शांत झाला.+ २७ हे पाहून शिष्यांना खूप आश्‍चर्य वाटलं आणि ते म्हणाले: “हा माणूस आहे तरी कोण? वारा आणि समुद्रही याचं ऐकतात.”

२८ मग तो पलीकडे गदरेकरांच्या प्रदेशात आला. तेव्हा, दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडलेली दोन माणसं कबरस्तानातून येताना त्याला दिसली.+ ती माणसं इतकी भयंकर होती, की त्या रस्त्याने जाण्याचं कोणाचंही धाडस व्हायचं नाही. २९ अचानक ती माणसं किंचाळून म्हणाली: “देवाच्या मुला, तुझ्याशी आमचं काय घेणंदेणं?+ नेमलेल्या वेळेआधीच+ तू आम्हाला शिक्षा द्यायला* आलास का?”+ ३० तिथून बऱ्‍याच अंतरावर डुकरांचा एक मोठा कळप चरत होता.+ ३१ त्यामुळे ते दुष्ट स्वर्गदूत त्याला अशी विनवणी करू लागले: “तू जर आम्हाला काढून टाकणार असशील, तर त्या डुकरांच्या कळपात आम्हाला पाठव.”+ ३२ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “जा!” मग ते त्यांच्यामधून निघून डुकरांमध्ये शिरले. तेव्हा, तो कळप धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला आणि बुडून मेला. ३३ मग, कळप चारणारे तिथून पळाले. ते शहरात गेले आणि घडलेल्या सर्व गोष्टींबद्दल, तसंच दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडलेल्या माणसांबद्दलही त्यांनी लोकांना सांगितलं. ३४ तेव्हा शहरातले सगळे लोक येशूला भेटायला निघाले आणि त्याला पाहिल्यावर त्यांनी त्याला आपल्या प्रदेशातून निघून जायची विनंती केली.+

९ मग नावेत बसून तो पलीकडे, आपल्या शहरात गेला.+ २ तेव्हा काही जणांनी खाटेवर पडून असलेल्या एका माणसाला त्याच्याकडे आणलं. त्याला लकवा मारला होता. त्यांचा विश्‍वास पाहून येशू त्या माणसाला म्हणाला: “मुला, काळजी करू नकोस. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”+ ३ तेव्हा, काही शास्त्री आपसात म्हणू लागले: “हा तर देवाची निंदा करतोय.” ४ त्यांचे विचार ओळखून येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही असे दुष्ट विचार का करता?+ ५ मला सांगा, ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ असं म्हणणं जास्त सोपं आहे, की ‘ऊठ आणि चालायला लाग,’ असं म्हणणं जास्त सोपं आहे?+ ६ तरी, मनुष्याच्या मुलाला पृथ्वीवर पापांची क्षमा करायचा अधिकार आहे हे तुम्हाला कळावं म्हणून . . . . ” मग येशू त्या लकवा मारलेल्या माणसाला म्हणाला: “ऊठ, आपली खाट उचल आणि घरी जा.”+ ७ तेव्हा तो उठला आणि आपल्या घरी गेला. ८ लोकांनी हे पाहिलं तेव्हा त्यांना भीती वाटली आणि माणसांना असा अधिकार देणाऱ्‍या देवाचा त्यांनी गौरव केला.

९ मग तिथून पुढे जाताना येशूला मत्तय नावाचा एक माणूस जकात नाक्यावर बसलेला दिसला. तो त्या माणसाला म्हणाला: “माझ्यामागे ये आणि माझा शिष्य हो.” तेव्हा तो माणूस उठला आणि त्याच्यामागे चालू लागला.+ १० नंतर येशू मत्तयच्या घरी जेवायला बसला होता, तेव्हा बरेच जकातदार आणि पापी लोक तिथे आले. ते येशूसोबत आणि त्याच्या शिष्यांसोबत जेवायला बसले.+ ११ हे पाहून परूशी त्याच्या शिष्यांना म्हणाले: “तुमचा गुरू जकातदारांसोबत आणि पापी लोकांसोबत बसून कसा काय जेवतो?”+ १२ त्यांचं हे बोलणं ऐकून तो म्हणाला: “वैद्याची गरज निरोगी लोकांना नाही, तर आजारी लोकांना असते.+ १३ म्हणून आता जा आणि ‘मला बलिदान नको, दया हवी,’ याचा काय अर्थ होतो हे शिका.+ कारण मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना बोलवायला आलोय.”

१४ मग योहानच्या शिष्यांनी येशूकडे येऊन विचारलं: “परूशी लोक आणि आम्ही उपास करतो, पण तुमचे शिष्य उपास करत नाहीत, असं का बरं?”+ १५ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “नवरा मुलगा+ सोबत असेपर्यंत त्याच्या मित्रांना शोक करायची गरज असते का? पण असे दिवस येतील, जेव्हा नवऱ्‍या मुलाला त्यांच्यापासून दूर केलं जाईल+ आणि तेव्हा ते उपास करतील. १६ जुन्या झग्याला कोणीही नवीन कापडाचं ठिगळ लावत नाही. कारण नवीन कापड आकसतं आणि झग्याला पडलेलं छिद्र आणखीनच मोठं होतं.+ १७ तसंच, लोक कधीही जुन्या बुधल्यांमध्ये* नवीन द्राक्षारस भरत नाहीत. कारण असं केलं, तर बुधल्या फाटून द्राक्षारस सांडेल आणि बुधल्याही खराब होतील. म्हणून, लोक नवीन द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये भरतात आणि त्यामुळे दोन्ही टिकतात.”

१८ तो या गोष्टी त्यांना सांगत होता, इतक्यात एक अधिकारी त्याच्याकडे आला. तो त्याला नमन करून म्हणाला: “आतापर्यंत तर माझी मुलगी मेली असेल. पण माझ्या घरी येऊन तिच्यावर हात ठेवा म्हणजे ती जिवंत होईल.”+

१९ मग येशू उठला आणि त्याच्या शिष्यांसोबत त्या अधिकाऱ्‍याच्या मागे गेला. २० इतक्यात, १२ वर्षांपासून रक्‍तस्रावाने+ आजारी असलेली एक स्त्री येशूच्या मागून आली. आणि तिने त्याच्या कपड्यांच्या काठाला हात लावला.+ २१ कारण ती मनातल्या मनात म्हणत होती: “मी फक्‍त त्याच्या कपड्यांना हात लावला तरी बरी होईन.” २२ येशूने मागे वळून तिला पाहिलं आणि तो म्हणाला: “मुली, घाबरू नकोस! तुझ्या विश्‍वासाने तुला बरं केलंय.”+ आणि त्याच क्षणी ती स्त्री बरी झाली.+

२३ मग येशू त्या अधिकाऱ्‍याच्या घरी आला, तेव्हा त्याने बासरीवर शोकसंगीत वाजवणाऱ्‍या आणि मोठमोठ्याने रडणाऱ्‍या लोकांना पाहिलं.+ २४ तो म्हणाला: “तुम्ही सगळे बाहेर जा. कारण मुलगी मेली नाही, झोपली आहे.”+ तेव्हा, लोक त्याची थट्टा करत हसू लागले. २५ लोकांना बाहेर पाठवल्यावर तो आत गेला आणि त्याने मुलीचा हात आपल्या हातात घेतला.+ तेव्हा ती लगेच उठली.+ २६ या घटनेची बातमी त्या पूर्ण प्रदेशात पसरली.

२७ येशू तिथून पुढे गेला तेव्हा दोन आंधळी माणसं+ त्याच्या मागेमागे चालत मोठ्याने म्हणत होती: “हे दावीदच्या मुला, आमच्यावर दया कर.” २८ मग तो घरात गेल्यावर ती आंधळी माणसं त्याच्याजवळ आली आणि त्याने त्यांना विचारलं: “मी तुमची दृष्टी परत देऊ शकतो असा विश्‍वास तुम्हाला आहे का?”+ ते म्हणाले: “हो, प्रभू.” २९ मग, त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला+ आणि तो म्हणाला: “तुमच्या विश्‍वासाप्रमाणे तुमच्यासोबत घडो.” ३० तेव्हा त्यांना लगेच दिसू लागलं. मग येशूने त्यांना असं बजावून सांगितलं: “कोणालाही याबद्दल कळू देऊ नका.”+ ३१ पण तिथून गेल्यावर त्यांनी त्या प्रदेशातल्या सगळ्या लोकांना याबद्दल सांगितलं.

३२ ते तिथून जात होते, तेव्हा लोकांनी दुष्ट स्वर्गदूताने* पछाडलेल्या एका मुक्या माणसाला त्याच्याकडे आणलं.+ ३३ त्याने दुष्ट स्वर्गदूताला काढल्यावर तो मुका माणूस बोलू लागला.+ लोकांनी हे पाहिलं तेव्हा त्यांना खूप आश्‍चर्य वाटलं आणि ते म्हणाले: “इस्राएलमध्ये पूर्वी कधीच असं घडलं नव्हतं.”+ ३४ पण परूशी लोक म्हणू लागले: “हा दुष्ट स्वर्गदूतांच्या अधिकाऱ्‍याच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढतो.”+

३५ मग, येशू सभास्थानांत शिकवत आणि देवाच्या राज्याबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करत सगळ्या नगरांतून आणि गावांतून फिरला. तसंच त्याने सर्व प्रकारचे रोग आणि दुखणीही बरी केली.+ ३६ त्याने लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला.+ कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे जखमी झालेले आणि भरकटलेले होते.+ ३७ मग तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “पीक तर भरपूर आहे, पण कामकरी कमी आहेत.+ ३८ म्हणून, पिकाच्या मालकाने कापणी करायला कामकरी पाठवावेत अशी त्याला विनंती करा.”+

१० मग त्याने आपल्या १२ शिष्यांना बोलावलं आणि त्यांना दुष्ट स्वर्गदूतांवर* अधिकार देऊन, त्या दुष्ट स्वर्गदूतांना काढून टाकण्याचा, तसंच, सर्व प्रकारचे रोग आणि दुखणी बरी करण्याचा अधिकारही दिला.+

२ त्याच्या १२ प्रेषितांची* नावं अशी होती:+ पहिला, शिमोन (याला पेत्र असंही म्हणतात)+ आणि त्याचा भाऊ अंद्रिया,+ जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान,+ ३ फिलिप्प, बर्थलमय,+ थोमा,+ जकात वसूल करणारा मत्तय,+ अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, ४ शिमोन कनानी* आणि ज्याने पुढे येशूचा विश्‍वासघात केला तो यहूदा इस्कर्योत.+

५ या १२ जणांना येशूने अशा सूचना देऊन पाठवलं:+ “विदेश्‍यांच्या प्रदेशात आणि कोणत्याही शोमरोनी शहरात जाऊ नका.+ ६ फक्‍त इस्राएलच्या घराण्यातल्या हरवलेल्या मेंढरांकडेच जा.+ ७ जाताना अशी घोषणा करा: ‘स्वर्गाचं राज्य जवळ आलंय.’+ ८ आजाऱ्‍यांना बरं करा,+ मेलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा आणि दुष्ट स्वर्गदूतांना काढा. तुम्हाला फुकट मिळालंय, तुम्हीही फुकट द्या. ९ तुमच्या बटव्यात* सोन्याचे, चांदीचे किंवा तांब्याचे पैसे घेऊ नका.+ १० तसंच प्रवासासाठी जेवणाची पिशवी, दोन जोड कपडे, जोडे किंवा काठी सोबत घेऊ नका.+ कारण कामकऱ्‍याला त्याचं अन्‍न मिळणं योग्यच आहे.+

११ कोणत्याही शहरात किंवा गावात गेल्यावर तिथे कोण योग्य आहे हे शोधून काढा. तिथून निघेपर्यंत त्याच्याकडेच मुक्काम करा.+ १२ एखाद्या घरात गेल्यावर घरातल्या लोकांना नमस्कार करा आणि त्यांना शांती मिळो अशी सदिच्छा व्यक्‍त करा. १३ ते घर योग्य असेल, तर त्यांना शांती लाभेल;+ पण जर योग्य नसेल, तर ती शांती तुमच्याकडे परत येईल. १४ एखाद्या ठिकाणी जर कोणी तुमचं स्वागत केलं नाही किंवा तुमचं ऐकून घेतलं नाही, तर त्या घरातून किंवा शहरातून बाहेर निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका.+ १५ मी तुम्हाला खरं सांगतो, न्यायाच्या दिवशी या शहरापेक्षा सदोम आणि गमोरा+ देशाला जास्त सोपं जाईल.

१६ पाहा! लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावं तसं मी तुम्हाला पाठवतोय. म्हणून, सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे भोळे असा.+ १७ लोकांपासून सांभाळून राहा. कारण ते तुम्हाला न्यायालयांच्या हवाली करतील+ आणि त्यांच्या सभास्थानांत+ तुम्हाला फटके मारतील.+ १८ त्यांना आणि विदेश्‍यांना साक्ष मिळावी म्हणून+ माझ्यामुळे तुम्हाला राज्यपालांच्या आणि राजांच्या समोर नेलं जाईल.+ १९ पण जेव्हा ते तुम्हाला त्यांच्यासमोर नेतील, तेव्हा कसं बोलावं किंवा काय बोलावं याची काळजी करू नका. तुम्ही काय बोलावं हे त्या वेळी तुम्हाला सुचेल.+ २० कारण बोलणारे फक्‍त तुम्ही नसून, तुमच्या पित्याची पवित्र शक्‍ती* तुमच्याद्वारे बोलत असते.+ २१ शिवाय, भाऊ भावाला आणि बाप आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी धरून देईल. मुलं आईवडिलांविरुद्ध उठतील आणि त्यांना ठार मारण्यासाठी धरून देतील.+ २२ माझ्या नावामुळे सगळे लोक तुमचा द्वेष करतील.+ पण जो शेवटपर्यंत धीर धरेल,* त्यालाच वाचवलं जाईल.*+ २३ जेव्हा ते एका शहरात तुमचा छळ करतील, तेव्हा दुसऱ्‍या शहरात पळून जा.+ कारण मी तुम्हाला खरं सांगतो, मनुष्याचा मुलगा येईपर्यंत तुम्ही इस्राएलच्या सर्व शहरांचा दौरा पूर्ण करू शकणार नाही.

२४ विद्यार्थी आपल्या शिक्षकापेक्षा किंवा गुलाम आपल्या मालकापेक्षा मोठा नसतो.+ २५ विद्यार्थी शिक्षकासारखा आणि गुलाम मालकासारखा झाला तर तेवढंच पुरे आहे.+ लोकांनी घराच्या मालकालाच बालजबूल*+ म्हटलं, तर ते घरच्यांनासुद्धा म्हणणार नाहीत का? २६ म्हणून त्यांना घाबरू नका. कारण अशी कोणतीही झाकलेली गोष्ट नाही, जी उघड होणार नाही आणि अशी कोणतीही गुप्त गोष्ट नाही, जी उजेडात येणार नाही.+ २७ मी तुम्हाला जे अंधारात सांगतो त्याबद्दल उजेडात बोला आणि तुमच्या कानांत कुजबुजलेलं, घरांच्या छतांवरून घोषित करा.+ २८ जे शरीर नष्ट करतात, पण जीवन नष्ट करू शकत नाहीत* त्यांना घाबरू नका.+ तर, जो गेहेन्‍नात* जीवन आणि शरीर दोन्ही नष्ट करू शकतो त्याची भीती बाळगा.+ २९ एका पैशाला* दोन चिमण्या विकल्या जातात की नाही? तरीपण, यांपैकी एकही तुमच्या पित्याच्या नकळत जमिनीवर पडत नाही.+ ३० खरंतर, तुमच्या डोक्यावरचे सगळे केससुद्धा मोजलेले आहेत. ३१ म्हणून घाबरू नका, पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही जास्त मौल्यवान आहात.+

३२ जो माझ्यावर विश्‍वास असल्याचं लोकांसमोर स्वीकारतो,+ त्याला मीसुद्धा स्वर्गातल्या माझ्या पित्यासमोर स्वीकारीन.+ ३३ पण जो लोकांसमोर मला नाकारतो, त्याला मीसुद्धा स्वर्गातल्या माझ्या पित्यासमोर नाकारीन.+ ३४ मी पृथ्वीवर शांती आणायला आलोय असं समजू नका. मी शांती आणायला नाही, तर तलवार चालवायला आलोय.+ ३५ कारण मुलाविरुद्ध बाप, आईविरुद्ध मुलगी आणि सासूविरुद्ध सून अशी फूट पाडण्यासाठी मी आलोय.+ ३६ खरंच, माणसाच्या घरचे लोकच त्याचे शत्रू होतील. ३७ ज्याचं माझ्यापेक्षा आपल्या वडिलांवर किंवा आईवर जास्त प्रेम आहे, तो माझा शिष्य व्हायला योग्य नाही. आणि ज्याचं माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर जास्त प्रेम आहे तो माझा शिष्य व्हायला योग्य नाही.+ ३८ तसंच, जो आपला वधस्तंभ* घेऊन माझ्यामागे चालत नाही, तोही माझा शिष्य व्हायला योग्य नाही.+ ३९ जो आपला जीव* वाचवायचा प्रयत्न करतो तो त्याला गमावेल आणि जो माझ्यासाठी आपला जीव* गमावतो त्याला तो मिळेल.+

४० जो तुम्हाला स्वीकारतो तो मलाही स्वीकारतो. आणि जो मला स्वीकारतो, तो ज्याने मला पाठवलं त्यालाही स्वीकारतो.+ ४१ जो एखाद्या संदेष्ट्याला, संदेष्टा असल्यामुळे स्वीकारतो त्याला संदेष्ट्याला मिळणारं प्रतिफळ मिळेल.+ तसंच, जो एखाद्या नीतिमान माणसाला, नीतिमान असल्यामुळे स्वीकारतो, त्याला नीतिमान माणसाला मिळणारं प्रतिफळ मिळेल. ४२ मी तुम्हाला खरं सांगतो, जो या शिष्यांपैकी एकाला, माझा शिष्य असल्यामुळे पेलाभर थंड पाणी प्यायला देईल, त्याला त्याचं प्रतिफळ मिळाल्याशिवाय राहणार नाही.”+

११ आपल्या १२ शिष्यांना सूचना दिल्यावर, येशू त्यांच्या शहरांत शिकवायला आणि राज्याची घोषणा करायला निघाला.+

२ जेव्हा ख्रिस्ताने केलेल्या सर्व गोष्टींबद्दल योहानने तुरुंगात ऐकलं,+ तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना त्याच्याकडे पाठवून+ ३ त्याला विचारलं: “जो येणार होता तो तूच आहेस का, की आम्ही दुसऱ्‍या कोणाची वाट पाहावी?”+ ४ तेव्हा येशूने त्यांना असं उत्तर दिलं: “तुम्ही जे काही ऐकताय आणि पाहताय ते जाऊन योहानला सांगा.+ ५ आंधळे पाहत आहेत,+ लंगडे चालत आहेत, कुष्ठरोगी+ शुद्ध केले जात आहेत, बहिऱ्‍यांना ऐकू येतंय, मेलेल्यांना जिवंत केलं जातंय आणि गोरगरिबांना आनंदाचा संदेश सांगितला जातोय.+ ६ ज्याला माझ्यात अडखळण्याचं कारण सापडत नाही* तो माणूस सुखी!”+

७ ते तिथून जात होते, तेव्हा येशू जमलेल्या लोकांशी योहानबद्दल बोलू लागला: “ओसाड रानात तुम्ही काय पाहायला गेला होता?+ वाऱ्‍याने हलणारी गवताची काडी?+ ८ मग काय पाहायला गेला होता? मऊ मखमली कपडे* घातलेला माणूस? असे कपडे घालणारे तर राजमहालात असतात. ९ मग, कशाला गेला होता तुम्ही? संदेष्ट्याला पाहायला? हो, मी तुम्हाला सांगतो, जो संदेष्ट्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे त्याला.+ १० हा तोच आहे ज्याच्याबद्दल असं लिहिलंय: ‘पाहा! मी माझ्या दूताला तुझ्यापुढे* पाठवतोय. तो तुझ्यापुढे जाऊन तुझ्यासाठी मार्ग तयार करेल.’+ ११ मी तुम्हाला खरं सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा देणारा योहान याच्यापेक्षा श्रेष्ठ, अजूनपर्यंत कोणी आलेला नाही. पण स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.+ १२ बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानच्या दिवसांपासून आतापर्यंत लोक स्वर्गाच्या राज्याचं ध्येय गाठण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहेत आणि जे असे प्रयत्न करत आहेत ते त्याला मिळवतात.+ १३ कारण संदेष्ट्यांच्या आणि नियमशास्त्राच्या सगळ्या भविष्यवाण्या योहानच्या काळापर्यंत होत्या.+ १४ तुम्ही मान्य करा किंवा नका करू, पण ‘संदेष्ट्यांनी ज्याच्याबद्दल सांगितलं होतं तो एलीया’ हाच आहे.+ १५ ज्याला कान आहेत त्याने ऐकावं.

१६ या पिढीची तुलना मी कोणाशी करू?+ बाजारात बसलेल्या लहान मुलांसारखी ही पिढी आहे. ते आपल्या सोबत्यांना हाक मारून म्हणतात: १७ ‘आम्ही तुमच्यासाठी बासरी वाजवली, पण तुम्ही नाचला नाहीत. आम्ही मोठ्याने रडलो, पण तुम्ही छाती बडवून शोक केला नाही.’ १८ त्याचप्रमाणे, योहान खातपीत आला नाही, तरी लोक असं म्हणतात की ‘त्याच्यात दुष्ट स्वर्गदूत* आहे.’ १९ मनुष्याचा मुलगा खातपीत आला+ आणि तरी लोक म्हणतात, ‘पाहा! हा खादाड आणि दारुडा! जकातदारांचा आणि पापी लोकांचा मित्र!’+ पण, बुद्धी कार्यांनी* सिद्ध होते.”*+

२० मग, ज्या शहरांमध्ये त्याने सगळ्यात जास्त चमत्कार* केले होते, त्यांनी पश्‍चात्ताप न केल्यामुळे तो त्यांचा धिक्कार करत म्हणाला: २१ “हे खोराजिन! तुझा धिक्कार असो! हे बेथसैदा! तुझा धिक्कार असो! कारण तुमच्यामध्ये जी अद्‌भुत कार्यं घडली ती सोरमध्ये आणि सीदोनमध्ये घडली असती, तर त्यांनी केव्हाच गोणपाट घालून आणि राखेत बसून पश्‍चात्ताप केला असता.+ २२ मी तर तुम्हाला सांगतो न्यायाच्या दिवशी सोर आणि सीदोन यांना तुमच्यापेक्षा जास्त सोपं जाईल.+ २३ आणि हे कफर्णहूम!+ तुला काय स्वर्गापर्यंत उंच केलं जाईल? नाही, तू खाली कबरेत* जाशील.+ कारण तुझ्यामध्ये जी अद्‌भुत कार्यं घडली ती सदोममध्ये घडली असती, तर ते आजपर्यंत राहिलं असतं. २४ मी तर तुला सांगतो, न्यायाच्या दिवशी सदोम देशाला तुझ्यापेक्षा जास्त सोपं जाईल.”+

२५ त्या वेळी येशू म्हणाला: “हे पित्या, आकाशाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, मी सर्वांसमोर तुझी स्तुती करतो. कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धिमान लोकांपासून लपवून, लहान मुलांना प्रकट केल्या आहेत.+ २६ हो पित्या, कारण तुला हेच योग्य वाटलं.” २७ येशू असंही म्हणाला, “माझ्या पित्याने सर्व गोष्टी माझ्या स्वाधीन केल्या आहेत+ आणि पित्याशिवाय कोणीही मुलाला पूर्णपणे ओळखत नाही.+ तसंच, पित्यालाही कोणी पूर्णपणे ओळखत नाही, फक्‍त मुलगा त्याला ओळखतो. आणि ज्या कोणाला तो पित्याबद्दलचं ज्ञान प्रकट करू इच्छितो, तोच पित्याला ओळखतो.+ २८ कष्ट करणाऱ्‍या आणि ओझ्याने दबलेल्या सर्व लोकांनो, माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला तजेला देईन. २९ माझं जू* आपल्या खांद्यावर घ्या आणि माझ्याकडून शिका, म्हणजे तुमच्या जिवाला* विश्रांती मिळेल. कारण मी प्रेमळ* आणि नम्र आहे.+ ३० माझं जू वाहायला सोपं आणि माझं ओझं हलकं आहे.”

१२ एकदा येशू शब्बाथाच्या* दिवशी शेतांतून चालला होता. त्याच्या शिष्यांना भूक लागल्यामुळे ते धान्याची कणसं तोडून खाऊ लागले.+ २ हे पाहून परूशी त्याला म्हणाले: “बघ, तुझे शिष्य शब्बाथाच्या दिवशी नियमाप्रमाणे योग्य नसलेली गोष्ट करत आहेत.”+ ३ तो त्यांना म्हणाला: “दावीद आणि त्याच्यासोबत असलेल्या माणसांना भूक लागली, तेव्हा त्याने काय केलं ते तुम्ही वाचलं नाही का?+ ४ तो देवाच्या घरात गेला आणि त्याने आणि त्याच्याबरोबर असलेल्या माणसांनी पवित्र भाकरी*+ खाल्ल्या. नियमाप्रमाणे, याजकांशिवाय कोणीही त्या भाकरी खाणं योग्य नव्हतं.+ ५ किंवा मग, शब्बाथाच्या दिवशी याजक मंदिरात काम करतात आणि तरीसुद्धा निर्दोष राहतात, हे तुम्ही नियमशास्त्रात वाचलं नाही का?+ ६ मी तर तुम्हाला सांगतो, जो मंदिरापेक्षा महान तो इथे आहे.+ ७ पण जर तुम्हाला या वचनाचा अर्थ समजला असता, की ‘मला बलिदान नको, दया हवी,’+ तर जे निर्दोष आहेत त्यांना तुम्ही दोष लावला नसता. ८ कारण मनुष्याचा मुलगा शब्बाथाचा प्रभू आहे.”+

९ तिथून निघाल्यावर तो त्यांच्या सभास्थानात गेला. १० तिथे वाळलेल्या* हाताचा एक माणूस होता.+ तेव्हा, येशूवर आरोप लावण्यासाठी काही जणांनी त्याला विचारलं: “शब्बाथाच्या दिवशी एखाद्याला बरं करणं नियमाप्रमाणे योग्य आहे का?”+ ११ तो त्यांना म्हणाला: “तुमच्याजवळ जर एक मेंढरू असेल आणि ते शब्बाथाच्या दिवशी खड्ड्यात पडलं, तर तुमच्यापैकी असा कोण आहे जो लगेच त्याला धरून बाहेर काढणार नाही?+ १२ मेंढरापेक्षा माणूस किती जास्त मौल्यवान आहे! तर मग, शब्बाथाच्या दिवशी चांगलं काम करणं नियमाप्रमाणे नक्कीच योग्य आहे.” १३ मग तो त्या माणसाला म्हणाला: “हात लांब कर.” त्याने तो लांब केला, तेव्हा तो त्याच्या दुसऱ्‍या हातासारखा चांगला झाला. १४ पण परूशी लोक बाहेर जाऊन येशूला ठार मारण्याचा कट करू लागले. १५ हे समजल्यावर तो तिथून निघून गेला. पुष्कळ लोकही त्याच्यामागे गेले+ आणि त्याने त्या सगळ्यांना बरं केलं. १६ पण आपल्याबद्दल कोणालाही सांगू नये असं त्याने त्यांना बजावून सांगितलं.+ १७ अशा प्रकारे यशया संदेष्ट्याद्वारे सांगण्यात आलेले हे शब्द पूर्ण झाले:

१८ “पाहा! माझा निवडलेला सेवक,+ माझा सगळ्यात प्रिय, ज्याच्यामुळे मला* आनंद होतो!+ मी त्याला आपली पवित्र शक्‍ती* देईन+ आणि खरा न्याय काय असतो, हे तो राष्ट्रांना दाखवेल. १९ तो भांडणतंटा किंवा आरडाओरडा करणार नाही+ आणि मुख्य रस्त्यांवर कोणाला त्याचा गाजावाजा ऐकू येणार नाही. २० न्याय स्थापन करण्यात यशस्वी होईपर्यंत तो गवताची वाकलेली काडी तोडणार नाही आणि मिणमिणती वात विझवणार नाही.+ २१ खरंच, राष्ट्रं त्याच्या नावाची आशा धरतील.”+

२२ मग त्यांनी दुष्ट स्वर्गदूताने* पछाडलेल्या एका आंधळ्या आणि मुक्या माणसाला येशूजवळ आणलं. त्याने त्याला बरं केलं, तेव्हा तो मुका माणूस बोलू आणि पाहू लागला. २३ हे बघून जमलेल्या लोकांना फार आश्‍चर्य वाटलं आणि ते म्हणू लागले: “दावीदचा मुलगा हाच तर नसावा?” २४ हे ऐकून परूशी लोक म्हणाले: “हा माणूस दुष्ट स्वर्गदूतांचा अधिकारी म्हणजे बालजबूल,* याच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढतो.”+ २५ त्यांचे विचार ओळखून तो त्यांना म्हणाला: “ज्या राज्यात फूट पडते ते राज्य नष्ट होतं. तसंच, ज्या शहरात किंवा घरात फूट पडते, तेसुद्धा टिकू शकत नाही. २६ त्याचप्रमाणे, सैतानानेच जर सैतानाला काढलं तर तो स्वतःच्याच विरोधात लढत आहे. मग त्याचं राज्य कसं काय टिकेल? २७ आणि जर मी बालजबूलच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढतो, तर तुमचे शिष्य कोणाच्या मदतीने काढतात? म्हणून, तुम्ही चुकीचं बोलताय हे तुमचे शिष्यच दाखवून देतील. २८ पण, जर मी देवाच्या पवित्र शक्‍तीच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढत असेन, तर देवाच्या राज्याने तुम्हाला गाठलंय.*+ २९ जर कोणाला एखाद्या ताकदवान माणसाच्या घरात शिरून त्याची संपत्ती लुटायची असेल, तर आधी त्याला त्या माणसाला बांधून ठेवावं लागणार नाही का? ३० जो माझ्या बाजूने नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्यासोबत गोळा करत नाही तो विखरून टाकतो.+

३१ म्हणून मी तुम्हाला सांगतो, माणसांनी कोणत्याही प्रकारचं पाप किंवा निंदा केली तर त्यांना क्षमा केली जाईल. पण जो पवित्र शक्‍तीची निंदा करतो, त्याला क्षमा केली जाणार नाही.+ ३२ उदाहरणार्थ, जो मनुष्याच्या मुलाविरुद्ध काही बोलतो त्याला क्षमा केली जाईल.+ पण जो पवित्र शक्‍तीविरुद्ध बोलतो त्याला क्षमा केली जाणार नाही; या जगाच्या व्यवस्थेत* नाही आणि येणाऱ्‍या जगाच्या व्यवस्थेतही* नाही.+

३३ तुमचं झाड एकतर चांगलं असेल आणि त्याचं फळही चांगलं असेल, किंवा मग तुमचं झाड कुजकं असेल आणि त्याचं फळही कुजकं असेल. कारण झाडाची परीक्षा त्याच्या फळांवरूनच होते.+ ३४ अरे विषारी सापाच्या पिल्लांनो!+ तुम्ही दुष्ट असून चांगल्या गोष्टी कशा बोलणार? कारण अंतःकरणात जे भरलेलं असतं तेच तोंडातून बाहेर पडतं.+ ३५ चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी बाहेर काढतो, तर वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी बाहेर काढतो.+ ३६ मी तुम्हाला सांगतो, माणसांनी बोललेल्या प्रत्येक व्यर्थ गोष्टीसाठी त्यांना न्यायाच्या दिवशी हिशोब द्यावा लागेल.+ ३७ कारण तुमच्या शब्दांनीच तुम्ही नीतिमान ठराल आणि तुमच्या शब्दांनीच तुम्ही दोषी ठराल.”

३८ मग काही शास्त्री आणि परूशी त्याला म्हणाले: “गुरुजी, आम्हाला तुमच्या हातून एखादं चिन्ह पाहायचंय.”+ ३९ त्याने त्यांना उत्तर दिलं: “दुष्ट आणि व्यभिचारी* पिढी सतत चिन्ह मागत राहते. पण योना संदेष्ट्याच्या चिन्हाशिवाय दुसरं कोणतंही चिन्ह त्या पिढीला दिलं जाणार नाही.+ ४० कारण जसा योना तीन दिवस आणि तीन रात्री एका मोठ्या माशाच्या पोटात होता,+ तसाच मनुष्याचा मुलगा तीन दिवस आणि तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.+ ४१ न्यायाच्या वेळी निनवेचे लोक या पिढीबरोबर उठतील आणि तिला दोषी ठरवतील. कारण त्यांनी योनाच्या संदेशामुळे पश्‍चात्ताप केला होता.+ पण पाहा! योनापेक्षा जो महान तो इथे आहे.+ ४२ न्यायाच्या वेळी, दक्षिणेच्या राणीला या पिढीबरोबर उठवलं जाईल आणि ती या पिढीला दोषी ठरवेल. कारण शलमोनकडून बुद्धीच्या गोष्टी ऐकण्यासाठी ती खूप लांबून* आली होती.+ पण पाहा! शलमोनपेक्षा जो महान तो इथे आहे.+

४३ जेव्हा दुष्ट स्वर्गदूत एखाद्या माणसातून बाहेर निघतो, तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणांत राहण्याची जागा शोधत फिरतो, पण त्याला ती सापडत नाही.+ ४४ मग तो म्हणतो, ‘मी जिथून निघालो त्या माझ्या घरी परत जाईन.’ पण तिथे आल्यावर त्याला ते घर रिकामं आणि झाडूनपुसून स्वच्छ केलेलं आणि सजवलेलं दिसतं. ४५ तेव्हा तो जातो आणि आपल्यापेक्षा वाईट अशा आणखी सात दुष्ट स्वर्गदूतांना घेऊन येतो. मग ते त्या माणसात शिरून तिथेच राहू लागतात. अशा रितीने त्या माणसाची अवस्था आधीपेक्षाही वाईट होते.+ या दुष्ट पिढीच्या बाबतीतही असंच घडेल.”

४६ तो जमलेल्या लोकांशी बोलत होता, तेव्हा त्याची आई आणि त्याचे भाऊ+ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहत उभे होते.+ ४७ म्हणून एक जण येऊन त्याला म्हणाला: “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर उभे आहेत आणि त्यांना तुमच्याशी बोलायचंय.” ४८ तेव्हा येशूने त्याला उत्तर दिलं: “माझी आई आणि माझे भाऊ कोण?” ४९ मग आपल्या शिष्यांकडे हाताने इशारा करून तो म्हणाला: “पाहा, माझी आई आणि माझे भाऊ हेच आहेत!+ ५० कारण जो स्वर्गातल्या माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो, तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई.”+

१३ त्या दिवशी येशू घरातून बाहेर निघून समुद्रकिनाऱ्‍यावर बसला होता. २ तेव्हा त्याच्याभोवती इतके लोक जमले, की तो जाऊन एका नावेत बसला आणि सगळे लोक किनाऱ्‍यावर उभे राहिले.+ ३ मग त्याने उदाहरणं देऊन+ त्यांना बऱ्‍याच गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला: “एकदा एक शेतकरी पेरणी करायला निघाला.+ ४ तो पेरणी करत होता, तेव्हा काही बी रस्त्याच्या कडेला पडलं आणि पक्ष्यांनी येऊन ते खाऊन टाकलं.+ ५ काही बी खडकाळ जमिनीवर पडलं. तिथे जास्त माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवलं.+ ६ पण सूर्य वर येताच कडक उन्हामुळे रोपं वाळून गेली, कारण त्यांनी मूळ धरलं नव्हतं. ७ काही बी काटेरी झुडपांत पडलं आणि ती झुडपं वाढल्यावर त्यांनी रोपांची वाढ खुंटवली.+ ८ पण काही बी चांगल्या जमिनीवर पडलं आणि कुठे शंभरपट, कुठे साठपट, तर कुठे तीसपट असं पीक येऊ लागलं.+ ९ ज्याला कान आहेत त्याने ऐकावं.”+

१० मग शिष्य त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणाले: “तू त्यांच्याशी बोलताना उदाहरणं का देतोस?”+ ११ त्याने उत्तर दिलं: “स्वर्गाच्या राज्याच्या पवित्र रहस्यांची समज तुम्हाला देण्यात आली आहे,+ पण त्यांना नाही. १२ कारण ज्याच्याजवळ आहे त्याला आणखी दिलं जाईल आणि त्याच्याजवळ भरपूर होईल. पण ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडून जे आहे तेसुद्धा काढून घेतलं जाईल.+ १३ म्हणूनच मी त्यांच्याशी बोलताना उदाहरणं देतो. कारण ते पाहत असूनही त्यांना दिसत नाही, ऐकत असूनही त्यांना ऐकू येत नाही आणि सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ त्यांना समजत नाही.+ १४ त्यांच्या बाबतीत यशयाची भविष्यवाणी पूर्ण होत आहे. त्याने म्हटलं होतं: ‘तुम्ही ऐकाल तर खरं, पण तुम्हाला अर्थ कळणार नाही; तुम्ही पाहाल तर खरं, पण तुम्हाला दिसणार नाही.+ १५ कारण या लोकांची मनं कठोर झाली आहेत. ते ऐकून न ऐकल्यासारखं करतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत. त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहू नये आणि आपल्या कानांनी ऐकू नये; तसंच, त्यांच्या मनाने याचा अर्थ समजून घेऊ नये आणि त्यांनी मागे फिरू नये आणि मी त्यांना बरं करू नये, म्हणून ते असं करतात.’+

१६ पण तुम्ही सुखी आहात, कारण तुमचे डोळे पाहतात आणि तुमचे कान ऐकतात.+ १७ मी तुम्हाला खरं सांगतो, पुष्कळ संदेष्ट्यांना आणि नीतिमान माणसांना, तुम्ही पाहत असलेल्या गोष्टी पाहायची आणि तुम्ही ऐकत असलेल्या गोष्टी ऐकायची इच्छा होती. पण त्यांना त्या पाहता आणि ऐकता आल्या नाहीत.+

१८ आता बी पेरणाऱ्‍या शेतकऱ्‍याच्या उदाहरणाचा अर्थ काय, ते ऐका.+ १९ एखादा जेव्हा राज्याचं वचन ऐकतो पण त्याचा अर्थ समजून घेत नाही, तेव्हा सैतान*+ येऊन त्याच्या हृदयात जे पेरण्यात आलंय ते काढून घेतो. हा माणूस रस्त्याच्या कडेला पडलेल्या बीसारखा आहे.+ २० खडकाळ जमिनीवर पेरलेल्या बीसारखा असलेला माणूस, वचन ऐकल्यावर ते लगेच आनंदाने स्वीकारतो.+ २१ पण, वचनाने त्याच्यात मूळ न धरल्यामुळे तो फक्‍त काही काळ टिकून राहतो. मग वचनामुळे एखादं संकट आलं किंवा छळ झाला, तर तो लगेच अडखळून पडतो. २२ काटेरी झुडपांत पेरलेल्या बीसारखा असलेला माणूस वचन तर ऐकतो, पण जगाच्या व्यवस्थेच्या* चिंता+ आणि पैशाची फसवी ताकद यांमुळे वचनाची वाढ खुंटते आणि ते निष्फळ होतं.+ २३ पण चांगल्या जमिनीत पेरलेल्या बीसारखा माणूस वचन ऐकतो, त्याचा अर्थ समजून घेतो आणि खातरीने फळ देतो. कोणी शंभरपट, कोणी साठपट तर कोणी तीसपट.”+

२४ मग तो त्यांना आणखी एक उदाहरण देऊन म्हणाला: “स्वर्गाचं राज्य अशा एका माणसासारखं आहे, ज्याने आपल्या शेतात चांगलं बी पेरलं. २५ मग माणसं झोपेत असताना त्याचा एक शत्रू गव्हात जंगली गवताचं बी पेरून गेला. २६ पुढे गव्हाची रोपं वाढून त्यांना दाणे आले, तेव्हा शेतात जंगली गवतही दिसू लागलं. २७ म्हणून शेताच्या मालकाचे दास त्याच्याकडे येऊन म्हणाले, ‘मालक, तुम्ही आपल्या शेतात चांगलं बी पेरलं होतं ना? मग, हे जंगली गवत कसं काय उगवलं?’ २८ तो त्यांना म्हणाला, ‘हे काम एका शत्रूचं आहे.’+ तेव्हा ते त्याला म्हणाले, ‘आम्ही जाऊन ते गोळा करावं, अशी तुमची इच्छा आहे का?’ २९ तो म्हणाला, ‘नको, कारण गवत गोळा करताना तुम्ही त्यासोबत गहूपण उपटाल. ३० म्हणून कापणीपर्यंत दोन्ही सोबत वाढू द्या. मग कापणीच्या वेळी मी कापणी करणाऱ्‍यांना सांगीन, की आधी जंगली गवत गोळा करा आणि जाळून टाकण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा. नंतर गहू माझ्या कोठारांत जमा करा.’”+

३१ तो त्यांना आणखी एक उदाहरण देऊन म्हणाला: “स्वर्गाचं राज्य एका माणसाने आपल्या शेतात पेरलेल्या मोहरीच्या दाण्यासारखं आहे.+ ३२ खरंतर तो दाणा सर्व बियांपेक्षा लहान असतो. पण वाढल्यावर त्याचं रोप सर्व भाज्यांपेक्षा मोठं होऊन त्याचं झाड होतं. मग आकाशातले पक्षी त्याच्या फांद्यांवर आपली घरटी बांधतात.”

३३ त्याने त्यांना आणखी एक उदाहरण दिलं: “स्वर्गाचं राज्य अशा खमिरासारखं* आहे, जे एका स्त्रीने तीन मापं पिठामध्ये घातलं आणि त्यामुळे सगळं पीठ फुगलं.”+

३४ या सगळ्या गोष्टी येशूने जमलेल्या लोकांना उदाहरणं देऊन सांगितल्या. खरंतर, तो कधीच उदाहरणांशिवाय त्यांच्याशी बोलायचा नाही.+ ३५ संदेष्ट्याने जे सांगितलं होतं ते पूर्ण व्हावं म्हणून हे घडलं. ते असं: “मी आपलं तोंड उघडून उदाहरणं देईन. सुरुवातीपासून* गुप्त असलेल्या गोष्टी मी घोषित करीन.”+

३६ मग लोकांना निरोप दिल्यावर तो घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “जंगली गवताच्या उदाहरणाचा अर्थ आम्हाला समजावून सांग.” ३७ तो त्यांना म्हणाला: “चांगलं बी पेरणारा, मनुष्याचा मुलगा आहे. ३८ शेत म्हणजे जग.+ चांगलं बी म्हणजे राज्याची मुलं, तर जंगली गवत सैतानाची मुलं आहेत.+ ३९ आणि ते पेरणारा शत्रू, सैतान* आहे. कापणी म्हणजे या जगाच्या व्यवस्थेची समाप्ती* आणि कापणी करणारे स्वर्गदूत आहेत. ४० म्हणून जसं जंगली गवत गोळा करून जाळून टाकलं जातं, तसंच या जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीला* घडेल.+ ४१ तेव्हा मनुष्याचा मुलगा आपल्या स्वर्गदूतांना पाठवेल. ते त्याच्या राज्यातून अडखळायला लावणाऱ्‍या सर्व गोष्टी आणि अनीतीने वागणाऱ्‍या लोकांना गोळा करतील. ४२ ते त्यांना आगीच्या भट्टीत टाकून देतील.+ तिथे ते रडतील आणि आक्रोश करतील.* ४३ त्या वेळी नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे तेजस्वीपणे चमकतील.+ ज्याला कान आहेत त्याने ऐकावं.

४४ स्वर्गाचं राज्य शेतात लपवलेल्या अशा खजिन्यासारखं आहे, जो एका माणसाला सापडला आणि त्याने तो लपवून ठेवला. त्याला इतका आनंद झाला, की त्याने जाऊन आपल्याजवळ असलेलं सगळं काही विकलं आणि ते शेत विकत घेतलं.+

४५ तसंच, स्वर्गाचं राज्य मौल्यवान मोत्यांच्या शोधात देशोदेशी फिरणाऱ्‍या एका व्यापाऱ्‍यासारखं आहे. ४६ त्याला एक खूप मौल्यवान मोती सापडला. तेव्हा त्याने जाऊन आपल्याजवळ असलेलं सगळं काही विकलं आणि तो मोती विकत घेतला.+

४७ तसंच, स्वर्गाचं राज्य समुद्रात टाकलेल्या अशा एका जाळ्यासारखं आहे, ज्यात सर्व प्रकारचे मासे अडकले. ४८ जाळं पूर्ण भरल्यानंतर त्यांनी ते किनाऱ्‍यावर आणलं आणि बसून चांगले मासे+ भांड्यांमध्ये जमा केले, तर खराब मासे+ फेकून दिले. ४९ जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीला* असंच घडेल. स्वर्गदूतांना पाठवलं जाईल आणि ते दुष्टांना नीतिमानांपासून वेगळं करतील ५० आणि त्यांना आगीच्या भट्टीत टाकतील. तिथे ते रडतील आणि आक्रोश करतील.*

५१ तुम्हाला या सर्व गोष्टींचा अर्थ समजला का?” ते त्याला म्हणाले: “हो.” ५२ मग तो त्यांना म्हणाला: “लोकांना शिकवणारा प्रत्येक शिक्षक, ज्याला स्वर्गाच्या राज्याबद्दल शिकवण्यात आलंय, तो अशा एका घरमालकासारखा आहे जो आपल्या भांडारातून नव्या आणि जुन्या गोष्टी बाहेर काढतो.”

५३ ही सगळी उदाहरणं सांगितल्यावर येशू तिथून निघाला. ५४ मग आपल्या गावी+ आल्यावर तो तिथल्या सभास्थानात जाऊन लोकांना शिकवू लागला. तेव्हा त्यांना खूप आश्‍चर्य वाटलं आणि ते म्हणाले: “या माणसाला ही बुद्धी आणि चमत्कार* करण्याची शक्‍ती कुठून मिळाली?+ ५५ हा त्या सुताराचाच मुलगा ना?+ आणि याच्या आईचं नाव मरीया आहे ना? याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदा हे याचेच भाऊ आहेत ना?+ ५६ आणि याच्या सगळ्या बहिणीही इथेच राहत नाहीत का? मग हा या सगळ्या गोष्टी कुठे शिकला?”+ ५७ यामुळे त्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही.+ पण येशू त्यांना म्हणाला: “संदेष्ट्याचा सगळीकडे आदर केला जातो, फक्‍त त्याच्या स्वतःच्या गावात आणि स्वतःच्या घरात केला जात नाही.”+ ५८ त्यांच्या अविश्‍वासामुळे त्याने तिथे जास्त चमत्कार* केले नाहीत.

१४ त्या वेळी प्रांताधिकारी हेरोद* याने येशूबद्दल ऐकलं+ २ आणि तो आपल्या सेवकांना म्हणाला: “हा बाप्तिस्मा देणारा योहान आहे. त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आलंय. म्हणूनच तो ही सगळी अद्‌भुत कार्यं करतोय.”+ ३ हेरोदने आपला भाऊ फिलिप्प याची बायको हेरोदिया हिच्यामुळे योहानला अटक केली होती आणि त्याला बांधून तुरुंगात डांबलं होतं.+ ४ कारण योहान त्याला बऱ्‍याच वेळा म्हणाला होता: “तू हेरोदियाला आपली बायको बनवलं हे कायद्याने योग्य नाही.”+ ५ खरंतर, योहानला ठार मारायची हेरोदची इच्छा होती. पण त्याला लोकांची भीती वाटत होती, कारण ते योहानला संदेष्टा मानायचे.+ ६ मग हेरोदच्या वाढदिवसाच्या+ सोहळ्यात हेरोदियाची मुलगी नाचली, तेव्हा हेरोद खूप खूश झाला.+ ७ म्हणून त्याने शपथ घेऊन, ती जे काही मागेल ते तिला दिलं जाईल असं वचन दिलं. ८ तेव्हा आपल्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली: “बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानचं डोकं मला एका थाळीत आणून द्या.”+ ९ हे ऐकून राजाला दुःख झालं, पण शपथ घेतल्यामुळे आणि त्याच्यासोबत जेवायला बसलेल्या लोकांमुळे त्याने तिला ते देण्याची आज्ञा दिली. १० त्याने तुरुंगात माणसं पाठवून योहानचं डोकं कापलं. ११ मग ते एका थाळीत आणून त्या मुलीला देण्यात आलं आणि तिने ते आपल्या आईकडे नेलं. १२ नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचा मृतदेह तिथून नेला आणि तो पुरला. मग ते येशूकडे आले आणि त्यांनी त्याला सगळी हकिगत सांगितली. १३ हे ऐकल्यावर, एकांत मिळावा म्हणून येशू नावेत बसून अशा एका ठिकाणी निघून गेला, जिथे कोणीही राहत नव्हतं. पण लोकांना हे समजलं तेव्हा ते नगरांतून पायी त्याच्यामागे गेले.+

१४ तो किनाऱ्‍याजवळ आला तेव्हा लोकांचा मोठा समुदाय पाहून त्याला त्यांचा कळवळा आला+ आणि त्याने त्यांच्यातल्या आजारी लोकांना बरं केलं.+ १५ पण संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “इथे आसपास कोणीही राहत नाही आणि खूप उशीरही झालाय. म्हणून लोकांना पाठवून दे म्हणजे ते जवळच्या गावांत जाऊन स्वतःसाठी काही खायला विकत घेतील.”+ १६ पण येशू त्यांना म्हणाला: “त्यांना जायची गरज नाही. तुम्हीच त्यांना काहीतरी खायला द्या.” १७ तेव्हा ते म्हणाले: “आमच्याजवळ फक्‍त पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.” १८ यावर तो म्हणाला: “ते इकडे माझ्याकडे आणा.” १९ मग त्याने लोकांना गवतावर बसायला सांगितलं. त्यानंतर त्या पाच भाकरी आणि दोन मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहिलं आणि धन्यवाद देऊन+ भाकरी मोडल्या. त्याने त्या शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी त्या लोकांना दिल्या. २० मग सगळे पोटभर जेवले आणि त्यांनी उरलेलं अन्‍न गोळा केलं, तेव्हा त्याच्या १२ टोपल्या भरल्या.+ २१ जेवणाऱ्‍यांमध्ये जवळजवळ ५,००० पुरुष, तसंच स्त्रिया आणि लहान मुलंही होती.+ २२ मग लगेच त्याने आपल्या शिष्यांना नावेत बसून आपल्यापुढे पलीकडच्या किनाऱ्‍यावर जायला सांगितलं आणि तो लोकांना निरोप देऊ लागला.+

२३ लोकांना पाठवल्यानंतर येशू डोंगरावर प्रार्थना करायला निघून गेला.+ संध्याकाळ झाली तेव्हा तो तिथे एकटाच होता. २४ इकडे शिष्यांची नाव किनाऱ्‍यापासून काही किलोमीटर* दूर गेली होती. ती लाटांमुळे हेलकावे खात होती, कारण वारा विरुद्ध दिशेचा होता. २५ मग रात्रीच्या चौथ्या प्रहरी,* येशू समुद्रावर चालत त्यांच्याकडे आला. २६ शिष्यांनी त्याला समुद्रावर चालताना पाहिलं तेव्हा त्यांना भीती वाटली आणि ते म्हणाले: “आपल्याला काहीतरी भास होतोय!” तेव्हा ते घाबरून ओरडू लागले. २७ पण येशू लगेच त्यांच्याशी बोलला आणि म्हणाला: “तुम्ही का घाबरता? भिऊ नका, मी आहे.”+ २८ पेत्रने त्याला उत्तर दिलं: “प्रभू तू असशील तर मला पाण्यावरून तुझ्याजवळ येण्याची आज्ञा दे.” २९ तो म्हणाला: “ये!” तेव्हा पेत्र नावेतून उतरला आणि पाण्यावरून चालत येशूकडे जाऊ लागला. ३० पण वादळाकडे पाहून तो घाबरला आणि बुडू लागला. तो ओरडून म्हणाला: “प्रभू, मला वाचव!” ३१ येशूने लगेच आपला हात पुढे करून त्याला धरलं आणि तो म्हणाला: “अरे अल्पविश्‍वासी माणसा,* तू शंका का घेतलीस?”+ ३२ ते नावेत चढल्यावर वादळ शांत झालं. ३३ तेव्हा जे नावेत होते ते त्याला नमन करून म्हणाले: “तू खरोखरच देवाचा मुलगा आहेस!” ३४ मग ते पलीकडे गनेसरेतच्या भागात गेले.+

३५ तिथल्या लोकांनी त्याला ओळखलं तेव्हा त्यांनी आसपासच्या प्रदेशात निरोप पाठवला. त्यामुळे, लोक सगळ्या आजारी माणसांना त्याच्याजवळ आणू लागले. ३६ ते त्याला अशी विनंती करू लागले की, आम्हाला फक्‍त तुमच्या कपड्यांच्या काठाला हात लावू द्या.+ तेव्हा ज्यांनी ज्यांनी हात लावला ते सगळे पूर्णपणे बरे झाले.

१५ मग, यरुशलेमहून काही परूशी आणि शास्त्री येशूकडे आले+ आणि त्याला म्हणाले: २ “तुमचे शिष्य वाडवडिलांच्या परंपरा का मोडतात? जसं की, जेवण्याआधी ते हात धूत* नाहीत.”+

३ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “तुम्ही आपल्या परंपरांमुळे देवाची आज्ञा का मोडता?+ ४ जसं की, देवाने म्हटलंय, ‘आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा,’+ आणि ‘जो आपल्या वडिलांशी किंवा आईशी अपमानास्पद बोलतो,* त्याला ठार मारलं जावं.’+ ५ पण तुम्ही म्हणता, ‘जो आपल्या वडिलांना किंवा आईला म्हणतो, की “तुम्हाला उपयोगी पडलं असतं असं जे काही माझ्याकडे आहे, ते मी देवाला अर्पण केलंय,”+ ६ तर त्याला आपल्या वडिलांचा आदर करण्याची काही गरज नाही.’ अशा रितीने तुम्ही तुमच्या परंपरांमुळे देवाचं वचन तुच्छ लेखता.+ ७ अरे ढोंग्यांनो, यशयाने भविष्यवाणीत तुमच्याबद्दल जे म्हटलं होतं ते अगदी खरंय:+ ८ ‘हे लोक ओठांनी तर माझा सन्मान करतात, पण त्यांचं हृदय माझ्यापासून फार दूर आहे. ९ ते माझी उपासना करत असले, तरी ती व्यर्थ आहे. कारण ते माणसांच्या आज्ञा, देवाचे सिद्धान्त म्हणून शिकवतात.’”+ १० तेव्हा तो लोकांना आपल्याजवळ बोलावून म्हणाला: “ऐका आणि याचा अर्थ समजून घ्या:+ ११ माणसाच्या तोंडात जे जातं त्यामुळे तो अशुद्ध होत नाही, तर त्याच्या तोंडून जे निघतं त्यामुळे तो अशुद्ध होतो.”+

१२ मग त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले: “परूशी तुझ्या बोलण्याने दुखावले गेले* हे तुला कळलं का?”+ १३ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “माझ्या पित्याने लावलं नाही असं प्रत्येक झाड उपटून टाकलं जाईल. १४ त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. ते स्वतः आंधळे असून इतरांना रस्ता दाखवतात. एका आंधळ्याने दुसऱ्‍या आंधळ्याला रस्ता दाखवला तर दोघंही खड्ड्यात पडतील.”+ १५ पेत्र म्हणाला: “आम्हाला ते उदाहरण समजावून सांग.” १६ तेव्हा तो म्हणाला: “तुम्हालाही अजून ते समजलं नाही का?+ १७ जे काही माणसाच्या तोंडात जातं ते त्याच्या पोटात जाऊन शरीराबाहेर टाकलं जातं, हे तुम्हाला माहीत नाही का? १८ पण ज्या गोष्टी तोंडातून निघतात त्या माणसाच्या हृदयातून येतात आणि त्याच गोष्टी माणसाला अशुद्ध करतात.+ १९ उदाहरणार्थ, हृदयातून दुष्ट विचार निघतात.+ आणि त्यांमुळे खून, व्यभिचार, अनैतिक लैंगिक कृत्यं,* चोऱ्‍या, खोट्या साक्षी, निंदा या गोष्टी घडतात. २० या गोष्टी माणसाला अशुद्ध करतात. पण जेवण्याआधी हात न धुतल्यामुळे* माणूस अशुद्ध होत नाही.”

२१ तिथून निघाल्यावर येशू सोर आणि सीदोनच्या प्रदेशात गेला.+ २२ तेव्हा, त्या भागात राहणारी फेनिकेची एक स्त्री त्याच्याकडे आली आणि मोठ्याने म्हणू लागली: “प्रभू, दावीदच्या मुला! माझ्यावर दया करा. माझी मुलगी दुष्ट स्वर्गदूताने* पछाडल्यामुळे खूप त्रासात आहे.”+ २३ पण त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिलं नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला विनंती केली: “तिला जायला सांग, कारण ती ओरडत आपल्या मागेमागे येत आहे.” २४ त्याने उत्तर दिलं: “मला इस्राएलच्या घराण्याच्या हरवलेल्या मेंढरांशिवाय इतर कोणाकडेही पाठवण्यात आलेलं नाही.”+ २५ पण ती स्त्री त्याला नमन करून म्हणाली: “प्रभू, मला मदत करा!” २६ तो तिला म्हणाला: “मुलांसाठी असलेली भाकर कुत्र्याच्या पिल्लांपुढे टाकणं योग्य नाही.” २७ ती म्हणाली: “खरंय प्रभू, पण कुत्र्याची पिल्लंसुद्धा आपल्या मालकांच्या मेजावरून पडणारे तुकडे खातातच ना.”+ २८ तेव्हा येशू तिला म्हणाला: “बाई, तुझा विश्‍वास खरंच मोठा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे घडू दे.” आणि त्याच वेळी तिची मुलगी बरी झाली.

२९ तिथून निघाल्यावर येशू गालील समुद्राजवळ आला+ आणि एका डोंगरावर जाऊन तिथे बसला. ३० तेव्हा लोक मोठ्या संख्येने त्याच्याकडे येऊ लागले. त्यांनी आपल्यासोबत लंगड्या, लुळ्या, आंधळ्या, मुक्या आणि अशा बऱ्‍याच लोकांना आणून त्याच्या पायांजवळ ठेवलं. तेव्हा त्याने त्यांना बरं केलं.+ ३१ जेव्हा लोकांनी पाहिलं, की मुके बोलत आहेत, लुळे बरे होत आहेत, लंगडे चालत आहेत आणि आंधळ्यांना दिसत आहे, तेव्हा त्यांना खूप आश्‍चर्य वाटलं. त्यामुळे त्यांनी इस्राएलच्या देवाचा गौरव केला.+

३२ मग, येशू आपल्या शिष्यांना बोलावून म्हणाला: “मला या लोकांची दया येते+ कारण ते तीन दिवसांपासून माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याजवळ खायला काहीच नाही. त्यांना असंच उपाशी पाठवून देणं मला योग्य वाटत नाही. कारण वाटेत त्यांचे भुकेने हाल होतील.”+ ३३ पण शिष्य त्याला म्हणाले: “अशा या रानात एवढ्या मोठ्या जमावाला पुरेल इतकं अन्‍न आम्ही कुठून आणणार?”+ ३४ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले: “सात, आणि काही लहान मासे.” ३५ मग लोकांना खाली बसायला सांगून, ३६ येशूने ते मासे आणि सात भाकरी घेतल्या आणि देवाला धन्यवाद देऊन त्या भाकरी मोडल्या. त्याने त्या शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी त्या लोकांना दिल्या.+ ३७ मग सगळे पोटभर जेवले आणि त्यांनी उरलेलं अन्‍न गोळा केलं, तेव्हा त्याच्या सात मोठ्या टोपल्या भरल्या.+ ३८ जेवणाऱ्‍यांमध्ये ४,००० पुरुष, तसंच स्त्रिया आणि लहान मुलंही होती. ३९ शेवटी, लोकांना पाठवून दिल्यावर तो नावेत बसून मगदानच्या प्रदेशात गेला.+

१६ तेव्हा परूशी आणि सदूकी लोक त्याच्याजवळ येऊन त्याची परीक्षा पाहण्यासाठी, आम्हाला स्वर्गातून एखादं चिन्ह दाखवा असं म्हणू लागले.+ २ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “संध्याकाळी तुम्ही म्हणता, ‘हवामान चांगलं असेल, कारण आकाश तांबडं आहे.’ ३ तसंच, सकाळी तुम्ही म्हणता, की ‘आज थंड आणि पावसाळी हवामान असेल, कारण आकाश तांबडं असलं, तरी ढगाळ आहे.’ आकाशाकडे पाहून तुम्हाला हवामानाचा अंदाज तर लावता येतो, पण काळाची चिन्हं पाहून त्यांचा अर्थ तुम्हाला लावता येत नाही. ४ ही दुष्ट आणि व्यभिचारी* पिढी सतत चिन्ह मागत राहते. पण, योनाच्या चिन्हाशिवाय+ दुसरं कोणतंही चिन्ह या पिढीला दिलं जाणार नाही.”+ असं म्हणून तो त्यांना सोडून तिथून निघून गेला.

५ नंतर शिष्य पलीकडे गेले, पण ते आपल्यासोबत भाकरी घ्यायला विसरले.+ ६ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “जागे राहा आणि परूशी आणि सदूकी लोकांच्या खमिरापासून* सांभाळा.”+ ७ त्यामुळे ते आपसात चर्चा करत म्हणाले: “आपण तर भाकरी घेतल्याच नाहीत.” ८ पण येशू हे ओळखून म्हणाला: “अरे अल्पविश्‍वासी माणसांनो!* भाकरी नाहीत म्हणून तुम्ही आपसात चर्चा का करताय? ९ मला काय सांगायचंय हे तुम्हाला कळत नाही का? मी पाच भाकऱ्‍यांनी ५,००० माणसांना जेवायला दिलं होतं, हे तुम्हाला आठवत नाही का? आणि त्या वेळी उरलेल्या अन्‍नाच्या किती टोपल्या तुम्ही भरून घेतल्या होत्या?+ १० आणि सात भाकऱ्‍यांनी मी कसं ४,००० माणसांना जेवायला दिलं, हे तुम्ही विसरलात का? आणि त्या वेळी उरलेल्या अन्‍नाच्या किती टोपल्या* तुम्ही भरून घेतल्या होत्या?+ ११ मग मी भाकरींबद्दल बोलत नव्हतो हे तुमच्या लक्षात कसं येत नाही? परूशी आणि सदूकी लोकांच्या खमिरापासून* सांभाळा!”+ १२ तेव्हा कुठे त्यांच्या लक्षात आलं, की तो भाकरीच्या खमिराबद्दल नाही, तर परूशी आणि सदूकी लोकांच्या शिकवणीबद्दल बोलत होता.

१३ मग, कैसरीया फिलिप्पैच्या भागात आल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारलं: “मनुष्याचा मुलगा कोण आहे असं लोक म्हणतात?”+ १४ ते म्हणाले: “काही जण म्हणतात बाप्तिस्मा देणारा योहान,+ तर काही म्हणतात एलीया.+ पण इतर जण म्हणतात की तो यिर्मया किंवा दुसरा एखादा संदेष्टा असेल.” १५ यावर तो त्यांना म्हणाला: “पण तुम्हाला काय वाटतं, मी कोण आहे?” १६ तेव्हा शिमोन पेत्रने उत्तर दिलं: “तू ख्रिस्त,+ जिवंत देवाचा मुलगा आहेस.”+ १७ येशू त्याला म्हणाला: “शिमोन, योनाच्या मुला, तू खरंच आशीर्वादित आहेस! कारण कोणत्याही माणसाने* नाही, तर स्वर्गातल्या माझ्या पित्याने तुला हे प्रकट केलंय.+ १८ तसंच, मी तुला सांगतो: तू पेत्र आहेस+ आणि या खडकावर+ मी आपली मंडळी उभारीन. कबरेचे* दरवाजे तिच्यावर विजयी ठरणार नाहीत. १९ मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. तू पृथ्वीवर जे बांधशील ते स्वर्गात आधीच बांधलेलं असेल आणि तू पृथ्वीवर जे मोकळं करशील ते स्वर्गात आधीच मोकळं केलेलं असेल.” २० मग त्याने शिष्यांना बजावून सांगितलं की तो ख्रिस्त आहे, हे त्यांनी कोणालाही सांगू नये.+

२१ त्या वेळेपासून येशू आपल्या शिष्यांना सांगू लागला, की त्याला यरुशलेमला जावं लागेल. तिथे वडीलजनांकडून, मुख्य याजकांकडून तसंच शास्त्र्यांकडून त्याला बराच छळ सोसावा लागेल. शेवटी त्याला ठार मारलं जाईल आणि तिसऱ्‍या दिवशी उठवलं जाईल.+ २२ तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन गेला आणि रागावून म्हणाला: “हे काय बोलतोस प्रभू?* तुला नक्कीच असं काही होणार नाही.”+ २३ पण येशूने पेत्रकडे पाठ फिरवली आणि तो म्हणाला: “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा!* तू माझ्यासाठी अडखळण आहेस. कारण तुझे विचार देवाचे नाहीत तर माणसांचे आहेत.”+

२४ मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला: “जर कोणाला माझ्यामागे यायचं असेल, तर त्याने स्वतःला नाकारावं आणि आपला वधस्तंभ* उचलून माझ्यामागे चालत राहावं.+ २५ कारण जो आपला जीव* वाचवायचा प्रयत्न करतो, तो आपला जीव* गमावून बसेल. पण जो माझ्यासाठी आपला जीव* गमावतो त्याला तो मिळेल.+ २६ शेवटी, एखाद्या माणसाने संपूर्ण जग मिळवलं, पण आपला जीव* गमावला तर त्याचा काय उपयोग?+ किंवा, आपल्या जिवाच्या* मोबदल्यात माणूस काय देऊ शकेल?+ २७ कारण मनुष्याचा मुलगा आपल्या पित्याच्या गौरवात, आपल्या दूतांसोबत येणार आहे. तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वागणुकीप्रमाणे प्रतिफळ देईल.+ २८ मी तुम्हाला खरं सांगतो, इथे उभे असलेल्यांपैकी काही जण असे आहेत, की जोपर्यंत ते मनुष्याच्या मुलाला त्याच्या राज्यात येताना पाहत नाहीत, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”+

१७ सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना आपल्यासोबत एका उंच डोंगरावर नेलं. तिथे त्यांच्याशिवाय आणखी कोणीच नव्हतं.+ २ मग त्यांच्यासमोर त्याचं रूपांतर झालं. त्याचा चेहरा सूर्यासारखा चमकू लागला आणि त्याचे कपडे प्रकाशासारखे तेजस्वी* दिसू लागले.+ ३ आणि पाहा! मोशे आणि एलीया येशूसोबत बोलत असताना त्यांना दिसले. ४ तेव्हा पेत्र येशूला म्हणाला: “प्रभू, बरं झालं आम्ही आलो. तुझी इच्छा असेल, तर मी इथे तीन तंबू टाकतो; एक तुझ्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयासाठी.” ५ तो बोलतच होता, तितक्यात एका तेजस्वी ढगाने त्यांना झाकून टाकलं आणि त्या ढगातून असा आवाज ऐकू आला: “हा माझा मुलगा मला प्रिय आहे. त्याने माझं मन आनंदित केलंय.+ तुम्ही त्याचं ऐका.”+ ६ हे ऐकून शिष्य खूप घाबरले आणि पालथे पडले. ७ तेव्हा येशू त्यांच्याजवळ आला आणि त्यांना स्पर्श करून म्हणाला: “उठा, घाबरू नका.” ८ त्यांनी वर पाहिलं तेव्हा तिथे येशूशिवाय आणखी कोणीही नव्हतं. ९ ते डोंगरावरून खाली येत होते, तेव्हा येशूने त्यांना अशी आज्ञा दिली, “मनुष्याच्या मुलाला मेलेल्यांतून उठवलं जात नाही, तोपर्यंत हा दृष्टान्त कोणालाही सांगू नका.”+

१० पण शिष्यांनी त्याला विचारलं: “मग शास्त्री असं का म्हणतात, की आधी एलीया आला पाहिजे?”+ ११ यावर तो म्हणाला: “एलीया खरोखरच येतोय आणि तो सर्व गोष्टी पूर्वीसारख्या व्यवस्थित करेल.+ १२ पण मी तर तुम्हाला सांगतो, की एलीया आधीच आलाय आणि त्यांनी त्याला ओळखलं नाही. उलट, त्याच्यासोबत त्यांनी वाटेल तसं केलं.+ त्याच प्रकारे, मनुष्याचा मुलगाही त्यांच्याकडून छळ सोसणार आहे.”+ १३ तेव्हा शिष्यांच्या लक्षात आलं, की तो बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानबद्दल बोलत आहे.

१४ ते जमलेल्या लोकांजवळ+ आले, तेव्हा एक माणूस येशूजवळ आला आणि गुडघे टेकून त्याला म्हणाला: १५ “प्रभू, माझ्या मुलावर दया करा. कारण तो आजारी आहे आणि त्याला झटके येतात. तो बऱ्‍याचदा आगीत आणि बऱ्‍याचदा पाण्यात पडतो.+ १६ मी त्याला तुमच्या शिष्यांकडे आणलं होतं. पण ते त्याला बरं करू शकले नाहीत.” १७ तेव्हा येशूने उत्तर दिलं: “हे विश्‍वास नसलेल्या भ्रष्ट पिढी!+ मी कधीपर्यंत तुमच्याबरोबर राहू? कधीपर्यंत तुम्हाला सोसू? त्याला इथे माझ्याजवळ आणा.” १८ मग येशूने दुष्ट स्वर्गदूताला* दटावलं तेव्हा तो त्याच्यातून निघाला आणि त्याच वेळी तो मुलगा बरा झाला.+ १९ नंतर, शिष्य एकांतात येशूजवळ येऊन म्हणाले: “आम्ही त्याला का काढू शकलो नाही?” २० तो त्यांना म्हणाला: “तुमचा विश्‍वास कमी असल्यामुळे. कारण मी तुम्हाला खरं सांगतो, की जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याइतकाही विश्‍वास असला, तर तुम्ही या डोंगराला ‘इथून तिथे जा’ असं म्हणाल आणि तो जाईल. आणि कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नसेल.”+ २१*​——

२२ मग ते गालीलमध्ये एकत्र जमले होते, तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मनुष्याच्या मुलाचा विश्‍वासघात करून त्याला लोकांच्या हवाली केलं जाईल.+ २३ ते त्याला ठार मारतील आणि तिसऱ्‍या दिवशी त्याला उठवलं जाईल.”+ हे ऐकून त्यांना खूप दुःख झालं.

२४ मग ते कफर्णहूम इथे आले, तेव्हा मंदिराचा कर* गोळा करणारी माणसं पेत्रकडे येऊन म्हणाली: “तुमचा गुरू मंदिराचा कर भरत नाही का?”+ २५ तो म्हणाला: “हो, भरतो.” पण, घरात आल्यावर तो काही बोलायच्या आधीच येशू त्याला म्हणाला: “शिमोन, तुला काय वाटतं? पृथ्वीवरचे राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात? आपल्या मुलांकडून की परक्यांकडून?” २६ त्याने “परक्यांकडून” असं उत्तर दिलं, तेव्हा येशू त्याला म्हणाला: “मग साहजिकच मुलांना कर भरायची गरज नाही. २७ पण आपल्यामुळे त्यांना अडखळण व्हायला नको,+ म्हणून समुद्रावर जा आणि गळ टाक. जो पहिला मासा गळाला लागेल त्याच्या तोंडात तुला एक चांदीचं नाणं* सापडेल. ते घेऊन तुझा आणि माझा कर भर.”

१८ त्या वेळी, शिष्य येशूच्या जवळ येऊन म्हणाले: “स्वर्गाच्या राज्यात सगळ्यात मोठा कोण?”+ २ तेव्हा येशूने एका लहान मुलाला आपल्याजवळ बोलावलं आणि त्याला त्यांच्यामध्ये उभं करून ३ तो म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल करून* लहान मुलांसारखं+ होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाताच येणार नाही.+ ४ म्हणून, जो स्वतःला या लहान मुलासारखं नम्र करेल, तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा असेल.+ ५ जो अशा एखाद्या लहान मुलाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मलाही स्वीकारतो. ६ पण, माझ्यावर विश्‍वास असलेल्या अशा लहानांपैकी एकालाही जो अडखळायला लावतो, त्याच्या गळ्यात जात्याचा मोठा दगड* बांधून त्याला खोल समुद्रात टाकून दिलं, तर तेच त्याच्यासाठी चांगलं ठरेल.+

७ अडखळणांमुळे* या जगाची किती दुर्दशा होईल! अडखळणं तर नक्कीच येतील, पण ज्या माणसामुळे अडखळण येतं त्याची खूप वाईट स्थिती होईल! ८ म्हणून, जर तुझा हात किंवा पाय तुला अडखळायला लावत असेल, तर तो कापून फेकून दे.+ दोन हात किंवा दोन पायांसोबत सर्वकाळाच्या आगीत टाकलं जाण्यापेक्षा, अधू किंवा लंगडं होऊन जीवन मिळवणं तुझ्यासाठी जास्त चांगलं आहे.+ ९ तसंच, जर तुझा डोळा तुला अडखळायला लावत असेल तर तो उपटून फेकून दे. कारण दोन डोळे असून गेहेन्‍नाच्या* आगीत टाकलं जावं, यापेक्षा एकच डोळा असून जीवन मिळवणं तुझ्यासाठी जास्त चांगलं आहे.+ १० या लहानांपैकी एकालाही कधी तुच्छ लेखू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, की त्यांचे स्वर्गदूत नेहमी स्वर्गात माझ्या पित्यासमोर असतात.+ ११*​——

१२ तुम्हाला काय वाटतं? एखाद्या माणसाजवळ १०० मेंढरं असली आणि त्यांपैकी जर एक मेंढरू वाट चुकलं,+ तर तो ९९ मेंढरांना डोंगरावर तसंच सोडून, त्या वाट चुकलेल्या एका मेंढराला शोधायला जाणार नाही का?+ १३ आणि जर त्याला ते सापडलं, तर मी तुम्हाला खातरीने सांगतो, की वाट न चुकलेल्या ९९ मेंढरांपेक्षा त्याला त्या एका मेंढराबद्दल जास्त आनंद होईल. १४ त्याच प्रकारे, या लहानांपैकी एकाचाही नाश व्हावा अशी स्वर्गातल्या माझ्या* पित्याची इच्छा नाही.+

१५ तुझ्या भावाने एखादं पाप केलं, तर एकांतात जाऊन त्याच्याशी बोल आणि त्याचा दोष त्याला दाखव.*+ जर त्याने तुझं ऐकलं, तर तू आपल्या भावाला मिळवलं आहेस.+ १६ पण जर त्याने ऐकलं नाही, तर मग आपल्यासोबत आणखी एकदोन जणांना त्याच्याकडे घेऊन जा; म्हणजे दोन किंवा तीन जणांच्या साक्षीने* प्रत्येक गोष्ट सिद्ध केली जाईल.+ १७ जर त्याने त्यांचं ऐकलं नाही, तर मंडळीशी बोल. आणि जर त्याने मंडळीचंही ऐकलं नाही, तर मग त्याला विदेश्‍यांसारखं+ किंवा जकातदारांसारखं समज.+

१८ मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही पृथ्वीवर ज्या गोष्टी बांधाल, त्या स्वर्गात आधीच बांधलेल्या असतील आणि तुम्ही पृथ्वीवर ज्या गोष्टी मोकळ्या कराल, त्या स्वर्गात आधीच मोकळ्या केलेल्या असतील. १९ तसंच, मी तुम्हाला खरं सांगतो, पृथ्वीवर एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल जर तुमच्यापैकी दोघांनी सहमत होऊन प्रार्थना केली, तर स्वर्गात राहणारा माझा पिता त्यांच्यासाठी त्या प्रार्थनेचं उत्तर देईल.+ २० कारण जिथे दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र जमतात,+ तिथे मी त्यांच्यामध्ये असतो.”

२१ मग पेत्र येऊन त्याला म्हणाला: “प्रभू, माझा भाऊ माझ्याविरुद्ध पाप करत असेल, तर मी त्याला किती वेळा क्षमा करू? सात वेळा?” २२ येशू त्याला म्हणाला: “मी तुला सांगतो, सात वेळा नाही, तर ७७ वेळा त्याला क्षमा कर.+

२३ स्वर्गाचं राज्य अशा एका राजासारखं आहे, ज्याने आपल्या दासांकडून हिशोब घ्यायचं ठरवलं. २४ जेव्हा तो त्यांच्याकडून हिशोब घेऊ लागला, तेव्हा त्याच्यापुढे अशा एका माणसाला आणण्यात आलं ज्याच्यावर त्याचं सहा कोटी दिनारांचं* कर्ज होतं. २५ पण हे कर्ज फेडायची त्याची ऐपत नसल्यामुळे, मालकाने त्याच्यासोबतच, त्याची बायको आणि मुलं, तसंच त्याच्या मालकीच्या सर्व वस्तू विकून ते कर्ज फेडावं असा हुकूम दिला.+ २६ तेव्हा तो दास मालकाच्या पाया पडून म्हणाला, ‘मला आणखी थोडा वेळ द्या, मी तुमचं सगळं कर्ज फेडीन.’ २७ तेव्हा मालकाला त्याची दया आली* आणि त्याने त्याचं कर्ज माफ करून त्याला जाऊ दिलं.+ २८ पण तो दास बाहेर गेल्यावर त्याला दुसरा एक दास भेटला. त्याच्यावर त्याचं १०० दिनारांचं* कर्ज होतं. तेव्हा पहिल्या दासाने त्याला धरलं आणि त्याचा गळा दाबून त्याला म्हटलं, ‘माझे पैसे आत्ताच्या आता परत कर.’ २९ दुसरा दास त्याच्या पाया पडून गयावया करू लागला आणि म्हणाला: ‘मला आणखी थोडा वेळ दे, मी तुझे सगळे पैसे परत करीन.’ ३० पण तो काही ऐकायला तयार नव्हता, उलट त्याने त्या दुसऱ्‍या दासाला त्याचं पूर्ण कर्ज फेडेपर्यंत तुरुंगात टाकलं. ३१ इतर दासांनी हे सगळं पाहिलं, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी आपल्या मालकाकडे जाऊन घडलेली सगळी हकिगत त्याला सांगितली. ३२ तेव्हा त्याचा मालक त्याला बोलावून म्हणाला: ‘अरे दुष्ट दासा! तू माझ्यापुढे गयावया केलीस तेव्हा मी तुझं सगळं कर्ज माफ केलं. ३३ मग, जशी मी तुला दया दाखवली तशीच तूही तुझ्या सोबतच्या दासाला दया दाखवायला नको होती का?’+ ३४ म्हणून मालक खूप संतापला आणि तो दास सगळं कर्ज फेडत नाही, तोपर्यंत त्याने त्याला तुरुंगातल्या शिपायांच्या हाती सोपवून दिलं. ३५ त्याच प्रकारे, जर तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या भावाला मनापासून क्षमा केली नाही,+ तर स्वर्गातला माझा पिताही तुमच्याशी असाच व्यवहार करेल.”+

१९ येशूचं हे सर्व बोलणं संपल्यावर, तो गालीलमधून निघून यार्देन नदीपलीकडे, यहूदीयाच्या सीमेजवळ असलेल्या प्रदेशात आला.+ २ तेव्हा मोठ्या संख्येने लोक त्याच्यामागे आले आणि त्याने त्यांना बरं केलं.

३ मग परूशी त्याच्याजवळ आले आणि त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्यांनी त्याला विचारलं: “एखाद्या माणसाने कोणत्याही कारणाने आपल्या बायकोला घटस्फोट देणं नियमाप्रमाणे योग्य आहे का?”+ ४ त्याने उत्तर दिलं: “तुम्ही वाचलं नाही का, की निर्माणकर्त्याने सुरुवातीपासूनच त्यांना पुरुष आणि स्त्री असं निर्माण केलं,+ ५ आणि म्हटलं, ‘या कारणामुळे, माणूस आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या बायकोसोबत राहील आणि ते दोघं एकदेह होतील?’+ ६ तर मग, आता ते दोन नाहीत तर एकदेह आहेत. म्हणूनच, देवाने जे जोडलंय, ते कोणत्याही माणसाने तोडू नये.”*+ ७ ते त्याला म्हणाले: “मग एखादा माणूस आपल्या बायकोला सोडचिठ्ठी देऊन तिला घटस्फोट देऊ शकतो, असं मोशेने का सांगितलं?”+ ८ तो त्यांना म्हणाला: “मोशेने तुमच्या कठोर वृत्तीमुळे तुम्हाला तुमच्या बायकांना घटस्फोट द्यायची परवानगी दिली होती,+ पण सुरुवातीपासून असं नव्हतं.+ ९ मी तर तुम्हाला सांगतो, की जो अनैतिक लैंगिक कृत्यांशिवाय* इतर कोणत्याही कारणामुळे आपल्या बायकोला घटस्फोट देतो आणि दुसऱ्‍या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.”+

१० तेव्हा शिष्य त्याला म्हणाले: “नवरा-बायकोच्या नात्याबद्दल जर असं असेल, तर मग लग्न न केलेलंच बरं.” ११ तो त्यांना म्हणाला: “सगळेच जण हा निर्णय घेतात असं नाही, तर ज्यांना ती देणगी मिळाली आहे तेच असा निर्णय घेतात.+ १२ कारण काही असे आहेत, जे जन्मापासूनच नपुंसक आहेत आणि काही असे आहेत ज्यांना माणसांनी नपुंसक बनवलं; आणि असेही काही नपुंसक आहेत ज्यांनी स्वर्गाच्या राज्यासाठी स्वतःला नपुंसक बनवलंय. ज्याला शक्य आहे त्याने हा निर्णय घ्यावा.”+

१३ मग येशूने लहान मुलांवर हात ठेवून प्रार्थना करावी, म्हणून लोक आपल्या मुलांना त्याच्याकडे आणू लागले; तेव्हा शिष्य त्या लोकांना रागावले.+ १४ पण येशू म्हणाला: “मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना अडवू नका. कारण स्वर्गाचं राज्य अशांचंच आहे.”+ १५ मग त्यांच्यावर हात ठेवून तो तिथून निघाला.

१६ तितक्यात एक जण त्याच्याकडे येऊन म्हणाला: “गुरू, सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी मी कोणतं चांगलं काम केलं पाहिजे?”+ १७ तो त्याला म्हणाला: “चांगलं काम कोणतं, हे तू मला का विचारतोस? चांगला फक्‍त एकच आहे.+ पण जर तुला जीवन मिळवायचं असेल तर आज्ञांचं पालन करत राहा.”+ १८ तो त्याला म्हणाला: “कोणत्या आज्ञा?” येशू म्हणाला: “खून करू नका,+ व्यभिचार करू नका,+ चोरी करू नका,+ खोटी साक्ष देऊ नका,+ १९ आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा+ आणि आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखंच प्रेम करा.”+ २० तेव्हा तो तरुण येशूला म्हणाला: “मी तर आधीपासूनच या सगळ्या आज्ञांचं पालन करतो. मग मी आणखी काय केलं पाहिजे?” २१ येशू त्याला म्हणाला: “तुला परिपूर्ण व्हायचं असेल, तर जा आणि तुझी मालमत्ता विकून गरिबांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल.+ आणि ये, माझा शिष्य हो.”+ २२ हे ऐकल्यावर तो तरुण दुःखी होऊन निघून गेला, कारण त्याच्याजवळ भरपूर मालमत्ता होती.+ २३ तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, श्रीमंत माणसाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणं कठीण जाईल.+ २४ मी तुम्हाला हेही सांगतो, श्रीमंत माणसाला देवाच्या राज्यात जाण्यापेक्षा एका उंटाला सुईच्या नाकातून जाणं सोपं आहे.”+

२५ शिष्यांनी हे ऐकलं तेव्हा त्यांना खूप आश्‍चर्य वाटलं आणि ते म्हणाले: “मग, कोणाचं तारण होणं शक्य आहे?”+ २६ येशू त्यांच्यावर नजर रोखून त्यांना म्हणाला: “माणसांना हे अशक्य आहे, पण देवाला सगळं काही शक्य आहे.”+

२७ मग पेत्र येशूला म्हणाला: “बघ! आम्ही सगळं काही सोडून तुझ्यामागे आलो आहोत. मग आम्हाला काय मिळेल?”+ २८ येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा सगळं नवीन केलं जाईल* आणि मनुष्याचा मुलगा आपल्या वैभवी राजासनावर बसेल, तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्ही, १२ राजासनांवर बसून इस्राएलच्या १२ वंशांचा न्याय कराल.+ २९ आणि माझ्या नावासाठी ज्याने घरदार, शेतीवाडी, तसंच बहीणभाऊ, आईवडील आणि मुलंबाळं सोडून दिली आहेत, त्या प्रत्येकाला शंभरपटीने हे सगळं आणि सर्वकाळाचं जीवन मिळेल.+

३० पण जे पहिले आहेत असे बरेच जण शेवटचे असतील आणि जे शेवटचे ते पहिले असतील.+

२० स्वर्गाचं राज्य अशा एका जमीनदारासारखं आहे, जो आपल्या द्राक्षमळ्यात काम करण्यासाठी मजूर ठरवायला पहाटेच निघाला.+ २ दिवसाला एक दिनार* याप्रमाणे मजुरी द्यायचं ठरल्यावर, त्याने त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवून दिलं. ३ मग पुन्हा सकाळी नऊच्या सुमारास* तो बाहेर गेला, तेव्हा त्याला बाजारात आणखी काही जण दिसले. त्यांना अजूनही काम मिळालं नव्हतं. ४ तेव्हा तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीही द्राक्षमळ्यात जा. मी तुम्हाला योग्य ती मजुरी देईन.’ ५ तेव्हा तेही मळ्यात गेले. मग दुपारी बाराच्या* आणि तीनच्या* सुमारास तो पुन्हा बाहेर गेला आणि त्याने तसंच केलं. ६ शेवटी पाचच्या सुमारास* तो बाहेर गेला, तेव्हा त्याला आणखी काही जण नुसतेच उभे असलेले दिसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, ‘तुम्ही दिवसभर इथे रिकामेच का उभे राहिलात?’ ७ त्यांनी उत्तर दिलं, ‘कारण आम्हाला कोणीच काम दिलं नाही.’ तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीही द्राक्षमळ्यात जा.’

८ मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा मालक आपल्या कारभाऱ्‍याला म्हणाला, ‘मजुरांना बोलावून त्यांना त्यांची मजुरी दे.+ जे शेवटी आले होते त्यांना आधी आणि जे आधी आले होते त्यांना शेवटी मजुरी दे.’ ९ पाच वाजता कामावर घेतलेले मजूर आले, तेव्हा त्या प्रत्येकाला एकेक दिनार* मजुरी मिळाली. १० त्यामुळे सुरुवातीला कामावर घेतलेले मजूर जेव्हा आपली मजुरी घ्यायला आले, तेव्हा आपल्याला जास्त मजुरी मिळेल असं त्यांना वाटलं. पण त्यांनाही एकच दिनार* देण्यात आला. ११ तेव्हा ते जमीनदाराविरुद्ध कुरकुर करू लागले १२ आणि म्हणाले, ‘आम्ही दिवसभर उन्हातान्हात राबलो, पण या शेवटी आलेल्यांनी फक्‍त एकच तास काम केलं; तरी तुम्ही त्यांना आमच्यासारखंच लेखलं!’ १३ तेव्हा तो त्यांच्यापैकी एकाला म्हणाला, ‘हे बघ, मी तुझ्यावर काही अन्याय केला नाही. तू एक दिनार* मजुरीवर काम करायला तयार झाला होतास की नाही?+ १४ मग तुझी मजुरी घे आणि जा. मला या शेवटच्या मजुरालाही तुझ्याइतकीच मजुरी द्यायची आहे. १५ जे माझ्या मालकीचं आहे, त्याचं माझ्या मनाप्रमाणे करायचा मला अधिकार नाही का? की माझ्या चांगुलपणामुळे* तुझी नजर द्वेषाने* भरली आहे?’+ १६ अशा प्रकारे, शेवटचे ते पहिले आणि पहिले ते शेवटचे होतील.”+

१७ मग वर यरुशलेमला जात असताना येशू वाटेत आपल्या १२ शिष्यांना बाजूला घेऊन म्हणाला:+ १८ “पाहा! आपण वर यरुशलेमला जात आहोत आणि मनुष्याच्या मुलाला मुख्य याजकांच्या आणि शास्त्र्यांच्या हवाली केलं जाईल. ते त्याला मृत्युदंड सुनावतील+ १९ आणि विदेश्‍यांच्या हाती सोपवतील आणि ते त्याची थट्टा करतील, त्याला फटके मारतील आणि वधस्तंभावर* खिळतील+ आणि तिसऱ्‍या दिवशी त्याला उठवलं जाईल.”+

२० मग जब्दीच्या मुलांची+ आई आपल्या मुलांना येशूजवळ घेऊन आली आणि तिने त्याला नमन केलं. तिला त्याच्याकडे काहीतरी मागायचं होतं.+ २१ म्हणून तो तिला म्हणाला: “तुला काय पाहिजे?” ती म्हणाली: “तुझ्या राज्यात माझ्या या मुलांपैकी एक जण तुझ्या उजवीकडे आणि दुसरा तुझ्या डावीकडे बसेल असं वचन दे.”+ २२ येशू म्हणाला: “तुम्ही काय मागत आहात याची तुम्हाला कल्पना नाही. जो प्याला मी लवकरच पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल का?”+ ते म्हणाले: “हो, पिता येईल.” २३ तो त्यांना म्हणाला: “तुम्ही माझा प्याला जरूर प्याल,+ पण माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे बसण्याचा अधिकार देणं माझ्या हातात नाही. माझ्या पित्याने ज्यांच्यासाठी तो राखून ठेवलाय त्यांना तो मिळेल.”+

२४ ही गोष्ट बाकीच्या दहा जणांनी ऐकली तेव्हा त्यांना त्या दोघा भावांचा खूप राग आला.+ २५ पण येशू त्यांना आपल्याजवळ बोलावून म्हणाला: “विदेश्‍यांचे राजे लोकांवर सत्ता चालवतात आणि महत्त्वाच्या पदांवर असलेले त्यांच्यावर अधिकार गाजवतात, हे तुम्हाला माहीत आहे.+ २६ पण तुमच्यामध्ये असं व्हायला नको.+ उलट, ज्याला तुमच्यामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल त्याने तुमचा सेवक झालं पाहिजे.+ २७ आणि ज्याला तुमच्यामध्ये प्रमुख व्हायचं असेल त्याने तुमचा दास झालं पाहिजे.+ २८ कारण, मनुष्याचा मुलगापण सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करायला+ आणि बऱ्‍याच जणांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून द्यायला आलाय.”+

२९ ते यरीहोमधून बाहेर जात असताना एक मोठा समुदाय त्याच्यामागे आला. ३० तितक्यात, रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोन आंधळ्यांनी येशू तिथून जात असल्याचं ऐकलं. तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले: “हे प्रभू, दावीदच्या मुला, आमच्यावर दया कर!”+ ३१ पण लोकांनी त्यांना दटावून गप्प बसायला सांगितलं. तेव्हा ते आणखीनच मोठ्याने ओरडून म्हणाले: “हे प्रभू, दावीदच्या मुला, आमच्यावर दया कर!” ३२ म्हणून येशू थांबला आणि त्यांना बोलावून म्हणाला: “मी तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची इच्छा आहे?” ३३ ते त्याला म्हणाले, “प्रभू, आम्हाला दिसू दे.” ३४ तेव्हा येशूला त्यांचा कळवळा आला आणि त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला,+ तेव्हा लगेच त्यांची दृष्टी परत आली आणि ते त्याच्यामागे चालू लागले.

२१ यरुशलेमजवळ आल्यावर ते जैतुनांच्या डोंगरावर असलेल्या बेथफगे इथे पोहोचले. तेव्हा येशूने दोन शिष्यांना असं सांगून पुढे पाठवलं:+ २ “समोरच्या गावात जा; तिथे गेल्यावर तुम्हाला एक गाढवी आणि तिचं पिल्लू बांधलेलं दिसेल. त्यांना सोडवून माझ्याकडे आणा. ३ जर कोणी काही म्हणालं, तर ‘प्रभूला यांची गरज आहे’ असं सांगा, म्हणजे तो लगेच त्यांना जाऊ देईल.”

४ संदेष्ट्याचं वचन पूर्ण व्हावं म्हणून हे सगळं घडलं. त्याने असं म्हटलं होतं: ५ “सीयोनच्या मुलीला सांगा: ‘पाहा! तुझा राजा तुझ्याकडे येतोय.+ तो सौम्य+ आहे आणि तो गाढवावर, हो, ओझं वाहणाऱ्‍या गाढवीच्या पिल्लावर बसून येतोय.’”+

६ तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूने सांगितल्याप्रमाणे केलं.+ ७ त्यांनी गाढवी आणि तिच्या पिल्लाला आणलं आणि आपली बाहेरची वस्त्रं त्यांच्यावर टाकली आणि येशू गाढवीच्या पिल्लावर बसला.+ ८ जमलेल्या लोकांपैकी बहुतेकांनी आपली बाहेरची वस्त्रं रस्त्यावर पसरली.+ तर, इतरांनी झाडांच्या फांद्या तोडून त्या रस्त्यावर पसरल्या. ९ आणि त्याच्या पुढे आणि मागे चालणारे लोक अशी घोषणा करत होते: “आम्ही प्रार्थना करतो, दावीदच्या मुलाचा उद्धार होवो!+ यहोवाच्या* नावाने येणारा आशीर्वादित असो!+ स्वर्गात राहणाऱ्‍या देवा, आम्ही प्रार्थना करतो, याचा उद्धार होवो!”+

१० जेव्हा तो यरुशलेम शहरात आला तेव्हा संपूर्ण शहरात खळबळ माजली. सगळे लोक म्हणू लागले: “हा आहे तरी कोण?” ११ तेव्हा त्याच्यासोबतच्या लोकांनी त्यांना सांगितलं: “हा गालीलच्या नासरेथचा येशू संदेष्टा आहे!”+

१२ मग येशू मंदिरात गेला आणि जे लोक मंदिराच्या आत खरेदी-विक्री करत होते त्या सर्वांना त्याने तिथून हाकलून लावलं. तसंच, त्याने पैसे बदलून देणाऱ्‍यांची मेजं आणि कबुतरं विकणाऱ्‍यांची बाकं उलटून टाकली.+ १३ तो त्यांना म्हणाला: “‘माझ्या मंदिराला प्रार्थनेचं मंदिर म्हणतील,’ असं लिहिलंय,+ पण तुम्ही तर याला लुटारूंची गुहा करत आहात.”+ १४ मग, मंदिरात आंधळे आणि लंगडे लोक त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना बरं केलं.

१५ त्याने केलेली ही अद्‌भुत कार्यं जेव्हा मुख्य याजकांनी आणि शास्त्र्यांनी पाहिली आणि जेव्हा त्यांनी लहान मुलांना मंदिरात असं ओरडताना ऐकलं, की “आम्ही प्रार्थना करतो, दावीदच्या मुलाचा उद्धार होवो!”+ तेव्हा त्यांना खूप राग आला.+ १६ आणि ते त्याला म्हणाले: “ही मुलं काय म्हणत आहेत हे तू ऐकलंस का?” येशू त्यांना म्हणाला: “हो. ‘तू लहान मुलांना आणि तान्ह्या बाळांना आपल्या तोंडाने स्तुती करायला लावलं आहेस,’ हे तुम्ही कधी वाचलं नाही का?”+ १७ मग त्यांना सोडून तो शहराबाहेर बेथानी इथे गेला आणि रात्री त्याने तिथेच मुक्काम केला.+

१८ पहाटे शहराकडे परत येताना त्याला भूक लागली.+ १९ मग, रस्त्याच्या कडेला त्याला अंजिराचं एक झाड दिसलं आणि तो त्याच्याजवळ गेला. पण झाडावर पानांशिवाय त्याला काहीही दिसलं नाही.+ तेव्हा तो त्या झाडाला म्हणाला: “तुला पुन्हा कधीही फळ येणार नाही.”+ आणि ते अंजिराचं झाड लगेच वाळून गेलं. २० हे पाहून शिष्यांना फार आश्‍चर्य वाटलं आणि ते त्याला म्हणाले: “अंजिराचं झाड लगेच कसं काय वाळून गेलं?”+ २१ येशूने त्यांना उत्तर दिलं: “मी तुम्हाला खरं सांगतो, की जर तुमच्याजवळ विश्‍वास असला आणि तुम्ही शंका बाळगली नाही, तर जे मी अंजिराच्या झाडासोबत केलं, ते तर तुम्ही करालच; पण तुम्ही या डोंगराला जर म्हटलं, की ‘इथून उपटून समुद्रात जाऊन पड,’ तर तेसुद्धा घडेल.+ २२ आणि तुम्ही प्रार्थनेत विश्‍वासाने जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल.”+

२३ तो मंदिरात जाऊन शिकवत असताना मुख्य याजक आणि वडीलजन त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “तू कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतोस? कोणी दिला तुला हा अधिकार?”+ २४ येशू त्यांना म्हणाला: “मीही तुम्हाला एक प्रश्‍न विचारतो. जर तुम्ही मला त्याचं उत्तर दिलं, तर मीही तुम्हाला सांगीन की मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो. २५ योहानने दिलेला बाप्तिस्मा कोणापासून होता? देवापासून* की माणसांपासून?” तेव्हा ते आपसात चर्चा करू लागले आणि म्हणाले, “‘देवापासून’ असं म्हटलं तर तो आपल्याला म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्‍वास का ठेवला नाही?’+ २६ आणि ‘माणसांपासून’ असं म्हटलं तर लोक आपल्याला सोडणार नाहीत. कारण ते सगळे योहानला संदेष्टा मानतात.” २७ म्हणून ते येशूला म्हणाले: “आम्हाला नाही माहीत.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हाला सांगणार नाही.

२८ तुम्हाला काय वाटतं ते सांगा. एका माणसाला दोन मुलं होती. तो पहिल्या मुलाजवळ जाऊन म्हणाला, ‘बाळा, आज तू द्राक्षमळ्यात जाऊन काम कर.’ २९ तेव्हा तो म्हणाला, ‘मी नाही जाणार,’ पण नंतर त्याला वाईट वाटलं आणि तो गेला. ३० दुसऱ्‍या मुलाजवळ जाऊन तो माणूस तसंच म्हणाला. तेव्हा त्याने उत्तर दिलं, ‘जातो बाबा,’ पण तो गेलाच नाही. ३१ तुमच्या मते या दोघांपैकी कोण आपल्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे वागला?” ते म्हणाले, “पहिला मुलगा.” येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, जकातदार आणि वेश्‍या तुमच्याआधी देवाच्या राज्यात जातील. ३२ कारण योहानने तुमच्याकडे येऊन तुम्हाला योग्य मार्ग* दाखवला, पण तुम्ही त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही. पण, जकातदारांनी आणि वेश्‍यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला.+ हे पाहिल्यावरही तुम्हाला पस्तावा होऊन तुम्ही त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही.

३३ आणखी एक उदाहरण ऐका: एक जमीनदार होता. त्याने द्राक्षमळा लावला+ आणि त्याच्याभोवती कुंपण घातलं आणि त्यात द्राक्षं तुडवण्यासाठी द्राक्षकुंड खणलं आणि पहाऱ्‍यासाठी एक मचाण बांधलं.*+ मग माळ्यांना आपल्या द्राक्षमळ्याचा ठेका देऊन तो परदेशी गेला.+ ३४ फळांचा हंगाम आला तेव्हा त्याने पिकातला स्वतःचा वाटा मागण्यासाठी आपल्या दासांना माळ्यांकडे पाठवलं. ३५ पण माळ्यांनी त्याच्या दासांना धरून एकाला बेदम मारलं, दुसऱ्‍याला ठार मारलं आणि आणखी एकाला दगडमार केला.+ ३६ मग त्याने पहिल्यापेक्षा जास्त दासांना पाठवलं. पण त्यांच्यासोबतही त्यांनी तसंच केलं.+ ३७ शेवटी, त्याने स्वतःच्या मुलाला त्यांच्याकडे असा विचार करून पाठवलं, की ‘निदान ते माझ्या मुलाचा तरी मान राखतील.’ ३८ पण मुलाला पाहून माळी आपसात म्हणू लागले, ‘हा तर वारस आहे.+ चला आपण त्याला मारून टाकू आणि त्याच्या वारशाची जमीन हडपून घेऊ!’ ३९ म्हणून त्यांनी त्याला धरलं आणि द्राक्षमळ्याबाहेर नेऊन मारून टाकलं.+ ४० मग, द्राक्षमळ्याचा मालक येईल तेव्हा तो या माळ्यांचं काय करेल?” ४१ ते त्याला म्हणाले: “ते दुष्ट असल्यामुळे तो त्यांना जिवंत सोडणार नाही. आणि तो द्राक्षमळ्याचा ठेका अशा माळ्यांना देईल, जे त्याला फळांच्या हंगामात त्याच्या वाट्याचं पीक देतील.”

४२ येशू त्यांना म्हणाला: “‘बांधकाम करणाऱ्‍यांनी जो दगड नाकारला, तोच कोपऱ्‍याचा मुख्य दगड* बनलाय.+ हे यहोवाने* घडवून आणलंय आणि आमच्या दृष्टीत ते अद्‌भुत आहे,’ हे तुम्ही कधी शास्त्रात वाचलं नाही का?+ ४३ म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो, की देवाचं राज्य तुमच्याकडून काढून घेतलं जाईल आणि त्याची फळं उत्पन्‍न करणाऱ्‍या राष्ट्राला ते दिलं जाईल. ४४ या दगडावर जो पडेल त्याचा चुराडा होईल.+ आणि ज्या कोणावर तो पडेल त्याला तो चिरडून टाकेल.”+

४५ मुख्य याजकांनी आणि परूश्‍यांनी त्याची ही उदाहरणं ऐकली, तेव्हा तो आपल्याबद्दलच बोलत आहे हे त्यांच्या लक्षात आलं.+ ४६ त्याला धरण्याची* त्यांची इच्छा होती, पण ते लोकांना घाबरत होते, कारण लोक त्याला संदेष्टा मानायचे.+

२२ पुन्हा एकदा येशूने त्यांना काही उदाहरणं दिली. तो म्हणाला: २ “स्वर्गाचं राज्य अशा एका राजासारखं आहे, ज्याने आपल्या मुलाच्या लग्नाची मेजवानी दिली.+ ३ ज्यांना लग्नाच्या मेजवानीचं आमंत्रण देण्यात आलं होतं, त्यांना बोलावण्यासाठी त्याने आपल्या दासांना पाठवलं. पण ते यायला तयार झाले नाहीत.+ ४ मग त्याने आणखी काही दासांना असं म्हणून पाठवलं, ‘आमंत्रण दिलेल्या लोकांना सांगा: “जेवण तयार आहे, मी माझे बैल आणि धष्टपुष्ट प्राणी कापले आहेत आणि सगळी तयारी झाली आहे. म्हणून, मेजवानीला चला.”’ ५ पण त्यांनी जराही लक्ष दिलं नाही. उलट ते आपापल्या कामाला निघून गेले; कोणी आपल्या शेतात तर कोणी आपल्या व्यापारासाठी निघून गेलं.+ ६ बाकीच्या लोकांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला आणि त्यांना ठार मारलं.

७ तेव्हा राजाला खूप राग आला. त्याने आपलं सैन्य पाठवून त्या खुन्यांचा नाश केला आणि त्यांचं शहर जाळून टाकलं.+ ८ मग तो आपल्या दासांना म्हणाला, ‘लग्नाची मेजवानी तर तयार आहे, पण आमंत्रण दिलेले लोक लायक नव्हते.+ ९ म्हणून, शहरातल्या मुख्य रस्त्यांवर जा आणि जो कोणी तुम्हाला दिसेल त्याला लग्नाच्या मेजवानीचं आमंत्रण द्या.’+ १० तेव्हा, त्याचे दास बाहेर रस्त्यांवर गेले आणि जो कोणी सापडेल, मग तो चांगला असो किंवा वाईट, त्या सगळ्यांना त्यांनी एकत्र केलं. मग लग्नाचं सभागृह, मेजवानीला आलेल्या लोकांनी भरून गेलं.

११ राजा पाहुण्यांना पाहायला आत आला, तेव्हा त्याची नजर अशा एका माणसावर गेली, ज्याने लग्नाचा पोशाख घातला नव्हता. १२ तेव्हा तो त्याला म्हणाला, ‘लग्नाचा पोशाख न घालता तू आत कसा काय आलास?’ यावर त्याला काहीच उत्तर देता आलं नाही. १३ तेव्हा राजा आपल्या सेवकांना म्हणाला, ‘याचे हातपाय बांधून याला बाहेर अंधारात टाकून द्या. तिथे तो रडेल आणि आक्रोश करेल.’*

१४ कारण आमंत्रण मिळालेले लोक तर बरेच आहेत, पण निवडलेले फार कमी.”

१५ तेव्हा परूशी लोक निघून गेले आणि त्याला बोलण्यात कसं पकडता येईल, याबद्दल त्यांनी कट केला.+ १६ मग त्यांनी आपल्या शिष्यांना आणि हेरोदच्या पक्षाच्या सदस्यांना+ त्याच्याकडे पाठवलं. ते येशूला म्हणाले: “हे गुरू, तुम्ही नेहमी खरं तेच बोलता आणि देवाचा मार्ग अगदी खरेपणाने शिकवता हे आम्हाला माहीत आहे. तसंच, तुम्ही कोणाची मर्जी मिळवण्याचा प्रयत्न करत नाही, कारण तुम्ही लोकांचं तोंड पाहून बोलत नाही. १७ तेव्हा आम्हाला सांगा, कैसराला* कर देणं नियमाप्रमाणे योग्य आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं?” १८ पण येशू त्यांचा दुष्ट हेतू ओळखून म्हणाला: “अरे ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का पाहता? १९ मला कराचं नाणं दाखवा.” तेव्हा त्यांनी त्याला एक दिनाराचं* नाणं आणून दिलं. २० तो त्यांना म्हणाला: “हे चित्र आणि यावर लिहिलेलं नाव कोणाचं आहे?” २१ ते म्हणाले: “कैसराचं.” तेव्हा तो त्यांना म्हणाला: “तर मग, जे कैसराचं आहे ते कैसराला द्या, पण जे देवाचं आहे ते देवाला द्या.”+ २२ हे ऐकून ते थक्क झाले आणि त्याला सोडून निघून गेले.

२३ त्याच दिवशी, पुनरुत्थान* होत नाही असं म्हणणारे सदूकी लोक+ त्याच्याजवळ आले आणि त्यांनी त्याला विचारलं:+ २४ “गुरुजी, मोशेने सांगितलंय की ‘मूलबाळ नसलेल्या एखाद्या माणसाचा मृत्यू झाला, तर त्याच्या भावाने त्याच्या बायकोशी लग्न करावं आणि आपल्या भावाचा वंश चालवावा.’+ २५ आमच्या इथे सात भाऊ होते. पहिल्याचं लग्न झालं आणि तो मेला. पण त्याला मूलबाळ नव्हतं, त्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली. २६ दुसऱ्‍या आणि तिसऱ्‍या भावासोबत आणि नंतर सातही जणांसोबत असंच झालं. २७ शेवटी त्या स्त्रीचाही मृत्यू झाला. २८ तर मग, पुनरुत्थान झाल्यावर ती त्या सात भावांपैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केलं होतं.”

२९ येशूने त्यांना उत्तर दिलं: “तुमचा गैरसमज झालाय, कारण तुम्हाला शास्त्रवचनांचं ज्ञान नाही आणि तुम्हाला देवाचं सामर्थ्यही माहीत नाही.+ ३० पुनरुत्थान* झाल्यावर पुरुष लग्न करत नाहीत आणि स्त्रियांचंही लग्न करून दिलं जात नाही, तर ते स्वर्गदूतांसारखे असतात.+ ३१ मेलेल्यांच्या पुनरुत्थानाबद्दल देवाने सांगितलेले हे शब्द तुम्ही वाचले नाहीत का: ३२ ‘मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव आहे’?+ तो मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे.”+ ३३ हे ऐकल्यावर लोक त्याच्या शिकवणीवरून चकित झाले.+

३४ त्याने सदूकी लोकांना कसं निरुत्तर केलं हे परूश्‍यांनी ऐकलं, तेव्हा ते सगळे मिळून त्याच्याजवळ आले. ३५ त्यांच्यापैकी नियमशास्त्राचं भरपूर ज्ञान असलेल्या एकाने त्याची परीक्षा पाहण्यासाठी विचारलं: ३६ “गुरू, नियमशास्त्रातली सगळ्यात महत्त्वाची आज्ञा कोणती?”+ ३७ तो त्याला म्हणाला: “‘तू आपला देव यहोवा* याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने* आणि पूर्ण बुद्धीने प्रेम कर.’+ ३८ हीच सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली आज्ञा आहे. ३९ तिच्यासारखीच दुसरी आज्ञा ही आहे: ‘तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखंच प्रेम कर.’+ ४० पूर्ण नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांची सगळी लिखाणं याच दोन आज्ञांवर आधारलेली आहेत.”+

४१ मग परूशी एकत्र जमलेले असताना येशूने त्यांना विचारलं:+ ४२ “ख्रिस्ताबद्दल तुम्हाला काय वाटतं? तो कोणाचा मुलगा आहे?” ते त्याला म्हणाले: “दावीदचा.”+ ४३ त्याने त्यांना विचारलं: “तर मग, देवाच्या प्रेरणेने+ दावीद त्याला प्रभू असं म्हणून, हे का म्हणतो, की ४४ ‘यहोवा* माझ्या प्रभूला म्हणाला: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली तुडवेपर्यंत माझ्या उजव्या हाताला बस”’?+ ४५ मग जर दावीद त्याला प्रभू म्हणतो, तर तो त्याचा मुलगा कसा काय असू शकतो?”+ ४६ तेव्हा, कोणी त्याला एका शब्दानेही उत्तर देऊ शकलं नाही. आणि त्या दिवसापासून त्याला आणखी काही विचारण्याचं कोणीही धाडस केलं नाही.

२३ मग येशू जमलेल्या लोकांना आणि आपल्या शिष्यांना म्हणाला: २ “शास्त्री आणि परूशी यांनी मोशेची जागा घेतली आहे. ३ म्हणून, ज्या गोष्टी ते तुम्हाला करायला सांगतात त्या सगळ्या करा, पण त्यांच्यासारखं वागू नका. कारण ते बोलतात पण त्याप्रमाणे वागत नाहीत.+ ४ ते जड ओझी बांधून लोकांच्या खांद्यांवर लादतात,+ पण स्वतः तर त्या ओझ्याला बोटही लावत नाहीत.+ ५ ते जे काही करतात ते लोकांनी आपल्याला पाहावं म्हणून करतात.+ कारण ज्या शास्त्राच्या डब्या* ते ताईत म्हणून घालतात, त्यांचा आकार ते मुद्दामहून वाढवतात+ आणि आपल्या झग्यांचे गोंडे मोठे करतात.+ ६ त्यांना मेजवान्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या जागेवर आणि सभास्थानांतल्या पुढच्या* आसनांवर बसायला आवडतं.+ ७ शिवाय, बाजारांत इतरांनी आपल्याला आदराने नमस्कार करावा आणि लोकांनी आपल्याला रब्बी* म्हणावं असं त्यांना वाटतं. ८ पण तुम्ही स्वतःला रब्बी म्हणवून घेऊ नका. कारण तुमचा गुरू+ एकच आहे आणि तुम्ही सगळे भाऊ आहात. ९ तसंच, पृथ्वीवर कोणालाही पिता म्हणू नका. कारण तुमचा पिता+ एकच आहे आणि तो स्वर्गात राहतो. १० स्वतःला प्रमुखही म्हणवून घेऊ नका. कारण तुमच्यात प्रमुख फक्‍त एकच, म्हणजे ख्रिस्त आहे. ११ उलट तुमच्यामध्ये जो सर्वात मोठा त्याने तुमचा सेवक व्हावं.+ १२ जो स्वतःचा गौरव करतो त्याला नमवलं जाईल+ आणि जो स्वतःला नम्र करतो त्याचा गौरव केला जाईल.+

१३ अरे ढोंगी शास्त्र्यांनो आणि परूश्‍यांनो, तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही लोकांसाठी स्वर्गाच्या राज्याचं दार बंद करता. तुम्ही स्वतः तर आत जातच नाही, पण जे जात आहेत त्यांनाही जाऊ देत नाही.+ १४ *​——

१५ अरे ढोंगी शास्त्र्यांनो आणि परूश्‍यांनो,+ तुमचा धिक्कार असो! कारण एखाद्याला यहुदी धर्म स्वीकारायला लावण्यासाठी तुम्ही समुद्र आणि जमीन पालथी घालता. आणि जेव्हा तो तसं करतो, तेव्हा तुम्ही त्याला स्वतःपेक्षा दुप्पट, गेहेन्‍नात* जाण्याच्या लायकीचं बनवता.

१६ दुसऱ्‍यांना मार्ग दाखवणाऱ्‍या आंधळ्यांनो,+ तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही म्हणता, ‘एखाद्याने मंदिराच्या नावाने शपथ घेतली तर त्यात काहीच नाही. पण जर कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली, तर ती पूर्ण करणं त्याचं कर्तव्य आहे.’+ १७ मूर्खांनो आणि आंधळ्यांनो! दोन्हीपैकी खरंतर कोणतं जास्त महत्त्वाचं आहे, मंदिराचं सोनं की ज्यामुळे ते सोनं पवित्र झालं ते मंदिर? १८ तुम्ही असंही म्हणता, की ‘कोणी वेदीच्या नावाने शपथ घेतली तर त्यात काहीच नाही. पण जर कोणी त्यावरच्या अर्पणाच्या नावाने शपथ घेतली, तर ती पूर्ण करणं त्याचं कर्तव्य आहे.’ १९ अरे आंधळ्यांनो! खरंतर जास्त महत्त्वाचं काय आहे, अर्पण की ज्यामुळे ते अर्पण पवित्र होतं ती वेदी? २० म्हणून, जो वेदीची शपथ घेतो, तो वेदीची आणि तिच्यावर असलेल्या सगळ्या गोष्टींची शपथ घेतो. २१ आणि जो मंदिराची शपथ घेतो, तो मंदिराची आणि त्यात राहणाऱ्‍या देवाची+ शपथ घेतो. २२ आणि जो स्वर्गाची शपथ घेतो, तो देवाच्या राजासनाची आणि त्यावर बसणाऱ्‍याची शपथ घेतो.

२३ अरे ढोंगी शास्त्र्यांनो आणि परूश्‍यांनो, तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही पुदिना, बडीशेप आणि जिरं यांचा दहावा भाग* देता.+ पण, नियमशास्त्रातल्या जास्त महत्त्वाच्या गोष्टी, म्हणजेच न्याय,+ दया+ आणि विश्‍वासूपणा यांकडे तुम्ही दुर्लक्ष केलंय. या गोष्टी देणं तर आवश्‍यक होतंच, पण इतर गोष्टींकडे दुर्लक्ष न करता!+ २४ दुसऱ्‍यांना मार्ग दाखवणाऱ्‍या आंधळ्यांनो!+ तुम्ही माशी गाळून काढता+ पण उंट गिळून टाकता!+

२५ अरे ढोंगी शास्त्र्यांनो आणि परूश्‍यांनो, तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही प्याला आणि ताट बाहेरून स्वच्छ करता,+ पण आतून ते लोभ*+ आणि बेतालपणा* यांनी भरलेलं आहे.+ २६ अरे आंधळ्या परूश्‍या, आधी प्याला आणि ताट आतून स्वच्छ कर, म्हणजे ते बाहेरूनपण स्वच्छ होईल.

२७ अरे ढोंगी शास्त्र्यांनो आणि परूश्‍यांनो,+ तुमचा धिक्कार असो! तुम्ही चुना लावलेल्या कबरींसारखे आहात.+ त्या बाहेरून तर फार सुंदर दिसतात, पण आत त्या मेलेल्या माणसांच्या हाडांनी आणि सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. २८ त्याच प्रकारे तुम्हीही लोकांना बाहेरून नीतिमान दिसता, पण आत तुम्ही ढोंगीपणाने आणि अनीतीने भरलेले आहात.+

२९ अरे ढोंगी शास्त्र्यांनो आणि परूश्‍यांनो,+ तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरी बांधता आणि नीतिमान माणसांच्या कबरी* सजवता,+ ३० आणि म्हणता, ‘जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात राहत असतो, तर संदेष्ट्यांची हत्या करण्यात आम्ही त्यांना साथ दिली नसती.’ ३१ असं म्हणून खरंतर, आपण संदेष्ट्यांची हत्या करणाऱ्‍यांची मुलं आहोत अशी तुम्ही स्वतःच आपल्याविरुद्ध साक्ष देत आहात.+ ३२ तर आता, तुमच्या वाडवडिलांच्या कृत्यांमध्ये राहिलेली कमी तुम्ही भरून काढा.

३३ विषारी सापाच्या पिल्लांनो,+ गेहेन्‍नाच्या* न्यायदंडापासून तुम्ही कसं वाचाल?+ ३४ म्हणूनच, मी तुमच्याकडे संदेष्टे,+ विद्वान आणि लोकांना शिकवणारे शिक्षक+ पाठवतोय. त्यांच्यापैकी काहींना तुम्ही ठार माराल+ आणि वधस्तंभावर* मृत्युदंड द्याल, तर काहींना तुमच्या सभास्थानांत फटके माराल+ आणि एका शहरातून दुसऱ्‍या शहरात त्यांच्यामागे जाऊन त्यांचा छळ कराल.+ ३५ यासाठी की, नीतिमान हाबेलच्या+ रक्‍तापासून, बरख्याचा मुलगा जखऱ्‍या ज्याला तुम्ही मंदिराच्या आणि वेदीच्या मधोमध ठार मारलं+ त्याच्या रक्‍तापर्यंत, ज्या सगळ्या नीतिमान माणसांचं रक्‍त आजपर्यंत पृथ्वीवर सांडण्यात आलंय, त्याचा दोष तुमच्यावर यावा. ३६ मी तुम्हाला खरं सांगतो, या सर्व गोष्टी या पिढीवर येतील.

३७ यरुशलेम, यरुशलेम, संदेष्ट्यांची हत्या करणारी आणि तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणारी नगरी!+ कोंबडी जशी आपल्या पिल्लांना आपल्या पंखांखाली एकत्र करते, तसंच तुमच्या मुलांना एकत्र करण्याची माझी कितीतरी वेळा इच्छा होती! पण तुम्हाला ते नको होतं.+ ३८ म्हणून पाहा! देवाने तुमच्या घराचा* त्याग केलाय.*+ ३९ कारण मी तुम्हाला सांगतो, की आतापासून, ‘यहोवाच्या* नावाने येणारा आशीर्वादित असो,’+ असं जोपर्यंत तुम्ही म्हणणार नाही तोपर्यंत तुम्ही मला पाहणारच नाही!”

२४ मग येशू मंदिरातून बाहेर जात असताना त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्याला मंदिराच्या इमारती दाखवू लागले. २ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “तुम्ही या सर्व गोष्टी पाहताय ना? मी तुम्हाला खरं सांगतो, इथे एकाही दगडावर दगड राहणार नाही. प्रत्येक दगड खाली पाडला जाईल.”+

३ तो जैतुनांच्या डोंगरावर बसलेला असताना, शिष्य एकांतात त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “आम्हाला सांग, या गोष्टी केव्हा होतील आणि तुझ्या उपस्थितीचं*+ आणि जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीचं* चिन्ह काय असेल?”+

४ यावर येशूने त्यांना उत्तर दिलं: “तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा.+ ५ कारण माझ्या नावाने बरेच जण येतील आणि ‘मी ख्रिस्त आहे,’ असं म्हणून पुष्कळ जणांना फसवतील.+ ६ तुम्ही लढायांचा आवाज आणि लढायांच्या बातम्या ऐकाल. पण सांभाळा, घाबरून जाऊ नका, कारण या गोष्टी घडणं आवश्‍यक आहे, पण इतक्यात अंत येणार नाही.+

७ कारण एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल.+ ठिकठिकाणी दुष्काळ पडतील+ आणि भूकंप होतील.+ ८ पण या सगळ्या गोष्टी संकटांची* फक्‍त सुरुवात असेल.

९ तेव्हा लोक तुमचा छळ करण्यासाठी तुम्हाला अधिकाऱ्‍यांच्या हवाली करतील.+ ते तुम्हाला ठार मारतील+ आणि माझ्या नावामुळे सगळी राष्ट्रं तुमचा द्वेष करतील.+ १० तसंच, त्या वेळी बरेच लोक अडखळतील* आणि एकमेकांचा विश्‍वासघात करतील आणि एकमेकांचा द्वेष करतील. ११ पुष्कळ खोटे संदेष्टे उठून बऱ्‍याच जणांना फसवतील.+ १२ आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांचं प्रेम थंड होईल. १३ पण जो शेवटपर्यंत धीर धरेल* त्यालाच वाचवलं जाईल.*+ १४ आणि सगळ्या राष्ट्रांना साक्ष मिळावी म्हणून राज्याचा हा आनंदाचा संदेश संपूर्ण जगात घोषित केला जाईल+ आणि त्यानंतर अंत येईल.

१५ म्हणून दानीएल संदेष्ट्याने सांगितलेली उद्ध्‌वस्त करणारी घृणास्पद गोष्ट जेव्हा तुम्ही एका पवित्र ठिकाणात उभी असलेली पाहाल+ (वाचणाऱ्‍याने हे समजून घ्यावं), १६ तेव्हा जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जायला सुरुवात करावी.+ १७ आणि घराच्या छतावर असलेल्या माणसाने आपल्या घरातून काही वस्तू घ्यायला खाली येऊ नये, १८ शेतात असलेल्या माणसानेही आपलं बाहेरचं वस्त्र घ्यायला परत जाऊ नये. १९ त्या दिवसांत गरोदर आणि अंगावर पाजणाऱ्‍या स्त्रियांची फार दुर्दशा होईल! २० तुम्हाला हिवाळ्यात किंवा शब्बाथाच्या दिवशी पळून जावं लागू नये म्हणून प्रार्थना करत राहा. २१ कारण तेव्हा, जगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आलं नाही आणि पुन्हा कधीही येणार नाही+ असं मोठं संकट येईल.+ २२ खरं पाहता, जर ते दिवस कमी करण्यात आले नाहीत, तर कोणीच वाचू शकणार नाही; पण निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस कमी केले जातील.+

२३ तेव्हा जर कोणी तुम्हाला म्हणालं, की ‘पाहा! ख्रिस्त इथे आहे,’+ किंवा ‘तिथे आहे!’ तर त्यावर विश्‍वास ठेवू नका.+ २४ कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे+ उठतील आणि लोकांना, इतकंच काय तर निवडलेल्या लोकांनाही फसवण्यासाठी मोठमोठी चिन्हं आणि चमत्कार करतील.+ २५ पण पाहा! मी तुम्हाला हे सगळं आधीच सांगून ठेवलंय. २६ म्हणून, जर लोक तुम्हाला म्हणाले, की ‘पाहा! तो ओसाड रानात आहे,’ तर बाहेर जाऊ नका. किंवा जर ते म्हणाले, ‘पाहा! तो आतल्या खोल्यांमध्ये आहे,’ तर त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नका.+ २७ कारण वीज जशी पूर्वेकडे चमकून पश्‍चिमेपर्यंत चकाकत जाते, तशीच मनुष्याच्या मुलाची उपस्थितीही* असेल.+ २८ जिथे प्रेत आहे तिथे गिधाडं जमा होतील.+

२९ त्या दिवसांतल्या संकटानंतर लगेच सूर्य अंधकारमय होईल+ आणि चंद्र प्रकाश देणार नाही. तसंच तारे आकाशातून खाली पडतील आणि आकाशातल्या शक्‍तींना हादरे बसतील.+ ३० मग मनुष्याच्या मुलाचं चिन्ह आकाशात दिसेल आणि पृथ्वीवर सगळ्या वंशांचे लोक दुःखाने छाती बडवून घेतील.+ ते मनुष्याच्या मुलाला+ आकाशातल्या ढगांवर सामर्थ्याने आणि मोठ्या वैभवाने येताना पाहतील.+ ३१ तो आपल्या स्वर्गदूतांना कर्ण्याच्या मोठ्या आवाजासोबत पाठवेल आणि ते आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना चारही दिशांतून* गोळा करतील.+

३२ आता अंजिराच्या झाडाच्या उदाहरणावरून एक गोष्ट समजून घ्या: अंजिराच्या झाडाच्या कोवळ्या फांदीला जेव्हा पालवी फुटते, तेव्हा उन्हाळा जवळ आलाय हे तुम्ही ओळखता.+ ३३ त्याच प्रकारे तुम्हीपण या सगळ्या गोष्टी पाहाल तेव्हा तो दाराजवळच आहे हे ओळखा.+ ३४ मी तुम्हाला खरं सांगतो, या सगळ्या गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी मुळीच नाहीशी होणार नाही. ३५ आकाश आणि पृथ्वीही नाहीशी होईल, पण माझे शब्द पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत.+

३६ त्या दिवसाबद्दल आणि त्या वेळेबद्दल कोणालाही माहीत नाही,+ स्वर्गदूतांना नाही आणि देवाच्या मुलालाही नाही; फक्‍त पित्याला माहीत आहे.+ ३७ कारण नोहाच्या दिवसांत जसं होतं+ तसंच मनुष्याच्या मुलाच्या उपस्थितीच्या* काळातही होईल.+ ३८ कारण जलप्रलय येण्याआधीच्या काळात, नोहा जहाजात* गेला त्या दिवसापर्यंत+ लोक खातपीत होते, लग्नं करत होते ३९ आणि जलप्रलय येऊन ते सगळे त्यात वाहून जाईपर्यंत+ त्यांनी लक्ष दिलं नाही. त्याच प्रकारे, मनुष्याच्या मुलाच्या उपस्थितीच्या काळातही होईल. ४० तेव्हा जर दोन माणसं शेतात असतील, तर एकाला घेतलं जाईल आणि दुसऱ्‍याला सोडून दिलं जाईल. ४१ दोन बायका जात्यावर दळत असतील, तर एकीला घेतलं जाईल आणि दुसरीला सोडून दिलं जाईल.+ ४२ म्हणून जागे राहा, कारण तुमचा प्रभू कोणत्या दिवशी येतोय हे तुम्हाला माहीत नाही.+

४३ पण एक गोष्ट लक्षात असू द्या: चोर कोणत्या प्रहरी* येणार आहे हे जर घराच्या मालकाला माहीत असतं,+ तर तो जागाच राहिला असता आणि त्याने त्याला आपलं घर फोडू दिलं नसतं.+ ४४ म्हणून तुम्हीही तयार राहा,+ कारण तुम्ही विचारही केला नसेल अशा वेळी मनुष्याचा मुलगा येईल.

४५ आपल्या घरातल्या सेवकांना योग्य वेळी अन्‍न पुरवण्यासाठी मालकाने ज्याला नेमलं, असा विश्‍वासू आणि बुद्धिमान* दास खरोखर कोण आहे?+ ४६ मालक परत आल्यावर तो त्याला तसं करताना दिसला, तर तो दास आशीर्वादित ठरेल!+ ४७ मी तुम्हाला खरं सांगतो, तो त्याला आपल्या सगळ्या मालमत्तेवर अधिकार देईल.

४८ पण जर तो दुष्ट दास कधी मनात म्हणाला, की ‘माझ्या मालकाला परत यायला उशीर लागतोय,’+ ४९ आणि जर तो आपल्या सोबतच्या दासांना मारहाण करू लागला आणि अट्टल दारुड्यांसोबत खाऊपिऊ लागला, ५० तर त्याने अपेक्षाही केली नसेल अशा दिवशी आणि त्याने कल्पनाही केली नसेल अशा वेळी त्याचा मालक येईल.+ ५१ तो त्याला सगळ्यात कडक शिक्षा देईल आणि अविश्‍वासू लोकांमध्ये त्याला टाकून देईल. तिथे तो रडेल आणि आक्रोश करेल.*+

२५ स्वर्गाचं राज्य अशा दहा कुमारींसारखं आहे, ज्या आपले दिवे घेऊन+ नवऱ्‍या मुलाला भेटायला निघाल्या.+ २ त्यांपैकी पाच मूर्ख होत्या आणि पाच समजदार* होत्या.+ ३ कारण मूर्ख कुमारींनी दिवे तर घेतले, पण आपल्यासोबत तेल घेतलं नाही. ४ पण समजदार कुमारींनी दिव्यांसोबत भांड्यांत तेलही घेतलं. ५ जेव्हा नवऱ्‍या मुलाला यायला उशीर होऊ लागला तेव्हा त्या सर्व पेंगू लागल्या आणि झोपल्या. ६ मग मध्यरात्री अशी हाक आली: ‘पाहा, नवरा मुलगा येतोय! त्याला भेटायला बाहेर चला.’ ७ तेव्हा त्या सगळ्या कुमारी उठल्या आणि आपले दिवे नीट करू लागल्या.+ ८ मग मूर्ख कुमारी समजदार कुमारींना म्हणाल्या, ‘तुमच्यातलं थोडं तेल आम्हाला द्या, कारण आमचे दिवे विझू लागले आहेत.’ ९ पण समजदार कुमारी त्यांना म्हणाल्या: ‘आमच्याजवळ असलेलं तेल कदाचित आपल्या सगळ्यांना पुरणार नाही. म्हणून तुम्ही तेल विकणाऱ्‍यांकडे जाऊन ते विकत घ्या.’ १० त्या तेल विकत घ्यायला जात असतानाच नवरा मुलगा आला. तेव्हा ज्या कुमारी तयार होत्या त्या त्याच्यासोबत लग्नाच्या मेजवानीला आत गेल्या+ आणि दार बंद करण्यात आलं. ११ नंतर बाकीच्या कुमारीही आल्या आणि म्हणाल्या, ‘प्रभू, प्रभू, आमच्यासाठी दार उघड!’+ १२ पण त्याने त्यांना उत्तर दिलं: ‘मी तुम्हाला खरं सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही.’

१३ म्हणून सतत जागे राहा,+ कारण तो दिवस आणि ती वेळही तुम्हाला माहीत नाही.+

१४ स्वर्गाचं राज्य अशा एका माणसासारखं आहे, ज्याने परदेशी जाण्याआधी आपल्या दासांना बोलावलं आणि आपली संपत्ती त्यांना सोपवली.+ १५ त्याने एकाला पाच तालान्त,* दुसऱ्‍याला दोन तालान्त आणि आणखी एकाला एक तालान्त, असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. १६ मग ज्याला पाच तालान्त मिळाले होते, त्याने लगेच जाऊन त्यांवर व्यापार केला आणि आणखी पाच तालान्त मिळवले. १७ त्याच प्रकारे, ज्याला दोन तालान्त मिळाले होते त्याने आणखी दोन मिळवले. १८ पण ज्याला फक्‍त एक तालान्त मिळाला होता, त्याने जाऊन आपल्या मालकाचे पैसे* जमिनीत लपवून ठेवले.

१९ बऱ्‍याच काळानंतर त्या दासांचा मालक आला आणि त्याने त्यांच्याकडून हिशोब मागितला.+ २० तेव्हा ज्याला पाच तालान्त मिळाले होते तो पुढे आला आणि त्याने आणखी पाच तालान्त आणून मालकाला म्हटलं, ‘मालक, तुम्ही मला पाच तालान्त दिले होते. हे पाहा, मी आणखी पाच मिळवले आहेत.’+ २१ त्याचा मालक त्याला म्हणाला: ‘शाब्बास, चांगल्या आणि विश्‍वासू दासा! तू थोड्या गोष्टींच्या बाबतीत विश्‍वासू राहिलास. मी तुला पुष्कळ गोष्टींवर अधिकार देईन.+ आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो.’+ २२ मग ज्याला दोन तालान्त मिळाले होते तो पुढे येऊन म्हणाला, ‘मालक, तुम्ही मला दोन तालान्त दिले होते; पाहा, मी आणखी दोन मिळवले आहेत.’+ २३ त्याचा मालक त्याला म्हणाला: ‘शाब्बास, चांगल्या आणि विश्‍वासू दासा! तू थोड्या गोष्टींच्या बाबतीत विश्‍वासू राहिलास. मी तुला पुष्कळ गोष्टींवर अधिकार देईन. आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो.’

२४ शेवटी ज्याला एक तालान्त मिळाला होता तो पुढे येऊन म्हणाला: ‘मालक, तुम्ही कठोर आहात हे मला माहीत होतं. तुम्ही जिथे पेरणी केली नाही तिथे कापणी करता आणि जिथे विखरलं नाही तिथून धान्य गोळा करता.+ २५ म्हणून मला भीती वाटली आणि मी तुमचा तालान्त जमिनीत लपवून ठेवला. हा घ्या तुमचा तालान्त.’ २६ तेव्हा मालक त्याला म्हणाला: ‘अरे दुष्ट आणि आळशी दासा, मी जिथे पेरणी केली नाही तिथे कापणी करतो आणि जिथे विखरलं नाही तिथून धान्य गोळा करतो, हे तुला माहीत होतं ना? २७ मग, तू माझे पैसे* सावकाराकडे ठेवायचे होतेस, म्हणजे परत आल्यावर ते मला व्याजासकट मिळाले असते.

२८ म्हणून, याच्याकडचा तालान्त घ्या आणि ज्याच्याजवळ दहा तालान्त आहेत त्याला तो द्या.+ २९ कारण ज्याच्याजवळ आहे त्याला आणखी देण्यात येईल आणि त्याच्याजवळ भरपूर होईल. पण ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे आहे तेसुद्धा काढून घेतलं जाईल.+ ३० आणि या नालायक दासाला बाहेर अंधारात टाकून द्या. तिथे तो रडेल आणि आक्रोश करेल.’*

३१ जेव्हा मनुष्याचा मुलगा+ आपल्या वैभवात येईल आणि सगळे स्वर्गदूत त्याच्यासोबत येतील,+ तेव्हा तो आपल्या वैभवी राजासनावर बसेल. ३२ सगळ्या राष्ट्रांना त्याच्यापुढे जमवलं जाईल आणि जसा मेंढपाळ मेंढरांना बकऱ्‍यांपासून वेगळं करतो, तसा तो लोकांना एकमेकांपासून वेगळं करेल. ३३ आणि तो मेंढरांना आपल्या उजव्या हाताला, तर बकऱ्‍यांना डाव्या हाताला ठेवेल.+

३४ मग जे राजाच्या उजवीकडे असतील त्यांना तो म्हणेल: ‘माझ्या पित्याने आशीर्वादित केलेल्यांनो, या! जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार करण्यात आलेल्या राज्याचा वारसा घ्या. ३५ कारण मी उपाशी होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिलं. मला तहान लागली होती, तेव्हा तुम्ही मला पाणी दिलं. मी अनोळखी होतो तरी तुम्ही मला आपल्या घरात घेतलं.+ ३६ मी उघडा होतो* तेव्हा तुम्ही मला कपडे दिले.+ मी आजारी पडलो तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली, तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही मला भेटायला आलात.’+ ३७ मग ते नीतिमान लोक त्याला म्हणतील: ‘प्रभू, आम्ही तुला उपाशी असलेला पाहून केव्हा खायला दिलं, किंवा तहान लागलेली पाहून केव्हा पाणी दिलं?+ ३८ तू अनोळखी असताना आम्ही केव्हा तुला घरात घेतलं, किंवा उघडा आहेस हे पाहून केव्हा कपडे दिले? ३९ आम्ही तुला आजारी, किंवा तुरुंगात पाहून केव्हा भेटायला आलो?’ ४० तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल: ‘मी तुम्हाला खरं सांगतो, या माझ्या भावांपैकी सगळ्यात लहानासाठी तुम्ही जे काही केलं ते माझ्यासाठीच केलं.’+

४१ मग त्याच्या डावीकडे असलेल्यांना तो म्हणेल: ‘अरे शापित लोकांनो! माझ्यापुढून निघून जा+ आणि सैतानासाठी* आणि त्याच्या दूतांसाठी तयार केलेल्या+ सर्वकाळाच्या आगीत जा.+ ४२ कारण मी उपाशी होतो, पण तुम्ही मला खायला दिलं नाही. मला तहान लागली होती, पण तुम्ही मला पाणी दिलं नाही. ४३ मी अनोळखी होतो पण तुम्ही मला आपल्या घरात घेतलं नाही; उघडा होतो पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी पडलो आणि तुरुंगात होतो, पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही.’ ४४ मग तेसुद्धा त्याला म्हणतील: ‘प्रभू, आम्ही तुला उपाशी किंवा तहानलेला, अनोळखी किंवा उघडा, आजारी किंवा तुरुंगात असलेला पाहून तुझी सेवा केली नाही, असं केव्हा झालं?’ ४५ तेव्हा तो त्यांना उत्तर देईल: ‘मी तुम्हाला खरं सांगतो, यांपैकी सगळ्यात लहानासाठी तुम्ही जे केलं नाही, ते माझ्यासाठीही केलं नाही.’+ ४६ या लोकांचा सर्वकाळासाठी नाश होईल,*+ तर नीतिमान लोकांना सर्वकाळाचं जीवन मिळेल.”+

२६ येशूचं हे सगळं बोलणं संपल्यावर तो आपल्या शिष्यांना म्हणाला: २ “आजपासून दोन दिवसांनंतर वल्हांडणाचा सण आहे+ आणि मनुष्याच्या मुलाला वधस्तंभावर* मृत्युदंड देण्यासाठी पकडून दिलं जाईल+ हे तुम्हाला माहीत आहे.”

३ तेव्हा मुख्य याजक आणि वडीलजन, महायाजक कयफा याच्या घराच्या अंगणात जमले,+ ४ आणि त्यांनी धूर्तपणे* येशूला अटक करून ठार मारायचा कट रचला.+ ५ पण ते म्हणाले: “सणाच्या वेळी नको, नाहीतर लोक गोंधळ माजवतील.”

६ मग, येशू बेथानी इथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी होता,+ ७ तेव्हा एक स्त्री मौल्यवान सुगंधी तेलाची बाटली* घेऊन त्याच्याजवळ आली आणि तो जेवत असताना ती त्याच्या डोक्यावर ते तेल ओतू लागली. ८ हे पाहून शिष्य संतापले आणि म्हणाले: “ही स्त्री तेल वाया का घालवत आहे? ९ हेच तेल विकलं असतं तर बरेच पैसे मिळाले असते आणि ते गरिबांना देता आले असते.” १० ते काय बोलत आहेत हे ओळखून येशू त्यांना म्हणाला: “या स्त्रीला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक चांगलं काम केलंय. ११ कारण गरीब तर नेहमीच तुमच्यासोबत असतील,+ पण मी नेहमी तुमच्यासोबत असणार नाही.+ १२ तिने माझ्या शरीराला सुगंधी तेल लावून माझ्या दफनविधीची तयारी केली आहे.+ १३ मी तुम्हाला खरं सांगतो, जगात जिथे जिथे आनंदाच्या संदेशाची घोषणा केली जाईल तिथे तिथे या स्त्रीची आठवण करून, तिने जे केलं तेही सांगितलं जाईल.”+

१४ मग त्या १२ शिष्यांपैकी यहूदा इस्कर्योत+ नावाचा एक जण मुख्य याजकांकडे गेला+ १५ आणि म्हणाला: “जर मी त्याला पकडून दिलं तर तुम्ही मला काय द्याल?”+ ते त्याला चांदीची ३० नाणी+ द्यायला तयार झाले. १६ तेव्हापासून तो त्याला पकडून देण्याची एखादी चांगली संधी शोधू लागला.

१७ बेखमीर भाकरींच्या सणाच्या+ पहिल्या दिवशी, शिष्य येशूजवळ येऊन म्हणाले: “आम्ही तुझ्यासाठी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी कुठे करू?”+ १८ तो म्हणाला: “शहरात अमुक अमुक माणसाकडे जाऊन म्हणा, की ‘गुरू म्हणतात: “माझ्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे; मी माझ्या शिष्यांसोबत तुझ्या घरी वल्हांडण साजरा करीन.”’” १९ तेव्हा येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी केलं आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली.

२० संध्याकाळ झाली+ तेव्हा तो १२ शिष्यांसोबत मेजाभोवती जेवायला बसला.+ २१ ते जेवत असताना तो म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, तुमच्यापैकीच एक जण मला पकडून देईल.”+ २२ हे ऐकून त्यांना फार दुःख झालं आणि प्रत्येक जण त्याला म्हणू लागला: “प्रभू, तो मी तर नाही ना?” २३ तेव्हा त्याने उत्तर दिलं: “ज्याने माझ्यासोबत ताटात हात घातलाय, तोच माझा विश्‍वासघात करेल.+ २४ मनुष्याच्या मुलाबद्दल लिहिण्यात आल्याप्रमाणे तो तर जाणारच आहे, पण जो मनुष्याच्या मुलाचा विश्‍वासघात करून त्याला पकडून देईल,+ त्या माणसाची किती दुर्दशा होईल!+ तो जन्मालाच आला नसता तर बरं झालं असतं!”+ २५ तेव्हा यहूदा, जो काही वेळातच त्याला पकडून देणार होता, तो म्हणाला: “रब्बी,* तो मी तर नाही ना?” येशू त्याला म्हणाला: “तू स्वतःच बोललास.”

२६ नंतर, ते जेवत असताना येशूने भाकर घेतली आणि धन्यवाद देऊन ती मोडली.+ ती शिष्यांना देऊन तो म्हणाला: “ही भाकर घ्या आणि खा. ही माझ्या शरीराला सूचित करते.”+ २७ मग एक प्याला घेऊन त्याने देवाचे उपकार मानले आणि तो प्याला त्यांना देऊन तो म्हणाला: “तुम्ही सगळे यातून प्या,+ २८ कारण द्राक्षारसाचा हा प्याला माझ्या ‘कराराच्या+ रक्‍ताला’ सूचित करतो.+ ते पुष्कळ लोकांच्या+ पापांच्या क्षमेसाठी+ ओतलं जाणार आहे. २९ पण मी तुम्हाला सांगतो, की जोपर्यंत मी आपल्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षारस पीत नाही, तोपर्यंत मी पुन्हा कधी हा द्राक्षारस पिणार नाही.”+ ३० शेवटी, स्तुतिगीतं* गायल्यानंतर ते तिथून निघून जैतुनांच्या डोंगरावर गेले.+

३१ मग येशू त्यांना म्हणाला: “आज रात्री तुम्ही सगळे मला सोडून जाल,* कारण असं लिहिलंय: ‘मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची पांगापांग होईल.’+ ३२ पण मला उठवण्यात आल्यानंतर मी तुमच्यापुढे गालीलमध्ये जाईन.”+ ३३ पेत्र त्याला म्हणाला: “बाकीचे सगळे तुला सोडून गेले तरी मी तुला कधीही सोडून जाणार नाही!”*+ ३४ तेव्हा येशू त्याला म्हणाला: “मी तुला खरं सांगतो, आज रात्री कोंबडा आरवण्याआधी तू तीन वेळा मला नाकारशील.”+ ३५ पेत्र त्याला म्हणाला: “मला तुझ्यासोबत मरावं लागलं तरी मी तुला मुळीच नाकारणार नाही.”+ इतर सगळ्या शिष्यांनीही तसंच म्हटलं.

३६ मग येशू त्यांच्यासोबत गेथशेमाने या ठिकाणी आला+ आणि तो शिष्यांना म्हणाला: “मी तिथे जाऊन प्रार्थना करेपर्यंत इथेच बसा.”+ ३७ त्याने पेत्रला आणि जब्दीच्या दोन मुलांना आपल्यासोबत घेतलं. मग तो खूप अस्वस्थ झाला आणि त्याचं मन दुःखाने व्याकूळ होऊ लागलं.+ ३८ तो त्यांना म्हणाला: “मी* फार दुःखी आहे, माझ्या मनाला मरणासारख्या यातना होत आहेत. तुम्ही इथेच थांबा आणि माझ्यासोबत जागे राहा.”+ ३९ मग तिथून जरासं पुढे जाऊन त्याने गुडघे टेकले आणि जमिनीपर्यंत वाकून तो अशी प्रार्थना करू लागला:+ “माझ्या पित्या, शक्य असेल तर हा प्याला+ माझ्यापासून काढून घे. तरी, माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”+

४० तो शिष्यांजवळ परत आला आणि त्यांना झोपलेलं पाहून तो पेत्रला म्हणाला: “तुम्ही माझ्यासोबत थोडा वेळसुद्धा जागू शकला नाहीत का?+ ४१ मोहात पडू नये म्हणून+ जागे राहा+ आणि प्रार्थना करत राहा.+ कारण मन तर उत्सुक* आहे, पण शरीर दुर्बळ आहे.”+ ४२ मग पुन्हा त्याने जाऊन अशी प्रार्थना केली: “माझ्या पित्या, जर हा प्याला मला प्यावाच लागणार असेल आणि तो माझ्यापासून काढून घेणं शक्य नसेल, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”+ ४३ मग त्याने पुन्हा येऊन त्यांना झोपलेलं पाहिलं, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. ४४ म्हणून त्यांना सोडून तो पुन्हा निघून गेला आणि त्याने तिसऱ्‍यांदा तशीच प्रार्थना केली. ४५ नंतर तो शिष्यांकडे परत येऊन त्यांना म्हणाला: “अशा वेळी तुम्ही झोपत आहात आणि विश्रांती घेत आहात! पाहा! मनुष्याच्या मुलाला विश्‍वासघाताने पापी लोकांच्या हाती धरून देण्याची वेळ जवळ आली आहे. ४६ उठा, आपण जाऊ या. पाहा! माझा विश्‍वासघात करणारा जवळ आलाय!” ४७ तो बोलत होता, इतक्यात यहूदा, जो १२ शिष्यांपैकी एक होता, तो आला आणि त्याच्यासोबत तलवारी आणि काठ्या घेतलेल्या लोकांचा मोठा जमाव होता. त्यांना मुख्य याजकांनी आणि वडीलजनांनी पाठवलं होतं.+

४८ त्याचा विश्‍वासघात करणाऱ्‍या यहूदाने त्यांना अशी खूण दिली होती, की “मी ज्याचं चुंबन घेईन, तोच येशू आहे. त्याला अटक करा.” ४९ मग थेट येशूजवळ जाऊन तो म्हणाला: “रब्बी, सलाम!” आणि त्याने प्रेमाने त्याचं चुंबन घेतलं. ५० पण येशू त्याला म्हणाला: “तू इथे काय करायला आला आहेस?”+ तेव्हा ते पुढे आले आणि त्यांनी येशूला पकडून त्याला अटक केली. ५१ पण तेवढ्यात, येशूसोबत असलेल्यांपैकी एकाने आपली तलवार काढून महायाजकाच्या दासावर हल्ला केला आणि त्याचा कान कापून टाकला.+ ५२ तेव्हा येशू त्याला म्हणाला: “आपली तलवार जागच्या जागी ठेव,+ कारण जे तलवार हातात घेतात त्यांचा तलवारीने नाश होईल.+ ५३ तुला काय वाटतं, मी या क्षणी माझ्या पित्याला, माझ्यासाठी स्वर्गदूतांच्या १२ फौजा+ पाठवण्याची विनंती करू शकत नाही का? ५४ पण तसं झालं, तर या गोष्टी घडणं आवश्‍यक आहे असं शास्त्रात जे लिहिलंय, ते कसं पूर्ण होईल?” ५५ मग येशू लोकांच्या जमावाला म्हणाला: “मी काय चोर आहे, की तुम्ही मला तलवारी आणि काठ्या घेऊन पकडायला आलात? दररोज मी मंदिरात बसून शिकवत होतो,+ तेव्हा तुम्ही मला पकडलं नाही.+ ५६ पण, संदेष्ट्यांनी जे लिहिलंय* ते पूर्ण व्हावं म्हणून या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत.”+ तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.+

५७ ज्यांनी येशूला पकडलं होतं त्यांनी त्याला महायाजक कयफा+ याच्याकडे नेलं. तिथे शास्त्री आणि वडीलजन एकत्र जमले होते.+ ५८ पण पेत्र बरंच अंतर ठेवून त्याच्या मागेमागे चालत गेला. महायाजकाच्या अंगणापर्यंत आल्यावर तो आत गेला आणि पुढे काय होतं हे पाहायला घराच्या नोकरचाकरांसोबत बसला.+

५९ आता मुख्य याजक आणि संपूर्ण न्यायसभा,* येशूला मृत्युदंड देता यावा म्हणून त्याच्याविरुद्ध खोटा पुरावा शोधत होती.+ ६० पण बरेच खोटे साक्षीदार पुढे आले+ तरीसुद्धा त्यांना असा पुरावा सापडला नाही. मग, दोन साक्षीदार आले ६१ आणि म्हणाले: “हा माणूस म्हणतो, की ‘मी देवाचं मंदिर पाडून तीन दिवसांत पुन्हा उभं करू शकतो.’”+ ६२ हे ऐकताच महायाजक उभा राहिला आणि तो येशूला म्हणाला: “तू काहीच कसं बोलत नाहीस? ही माणसं तुझ्याविरुद्ध काय आरोप लावत आहेत हे तू ऐकलं नाहीस का?”+ ६३ पण तरीही येशू शांतच राहिला.+ तेव्हा महायाजक त्याला म्हणाला: “मी तुला जिवंत देवाची शपथ घालून विचारतो, तू देवाचा मुलगा, ख्रिस्त आहेस का हे आम्हाला सांग!”+ ६४ येशू त्याला म्हणाला: “तुम्ही स्वतःच बोललात. पण मी तुम्हाला सांगतो: यापुढे तुम्ही मनुष्याच्या मुलाला+ सामर्थ्यशाली देवाच्या उजव्या हाताला बसलेला+ आणि आकाशातल्या ढगांवर स्वार होऊन येताना पाहाल.”+ ६५ तेव्हा महायाजक आपलं बाहेरचं वस्त्र फाडून म्हणाला: “याने देवाची निंदा केली आहे! आता आणखी साक्षीदारांची काय गरज? बघा, त्याने देवाची केलेली निंदा तुम्ही स्वतः ऐकली आहे. ६६ तुमचं काय म्हणणं आहे?” त्यांनी उत्तर दिलं: “याला मृत्युदंड दिला पाहिजे.”+ ६७ तेव्हा, ते त्याच्या तोंडावर थुंकले+ आणि त्याला बुक्क्या मारू लागले.+ काही जणांनी त्याच्या थोबाडीत मारल्या,+ ६८ आणि ते म्हणू लागले: “ख्रिस्त आहेस ना तू? मग भविष्यवाणी कर आणि तुला कोणी मारलं ते सांग.”

६९ मग, पेत्र अंगणात बसलेला असताना एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली: “तूसुद्धा त्या गालीलच्या येशूसोबत होतास ना!”+ ७० पण तो सगळ्यांसमोर ते नाकारून म्हणाला: “तू काय बोलत आहेस, मला माहीत नाही.” ७१ तो बाहेर फाटकाजवळ गेला तेव्हा आणखी एका मुलीने त्याला ओळखलं आणि जवळ उभे असलेल्यांना ती म्हणाली: “हा माणूस नासरेथकर येशूसोबत होता!”+ ७२ त्याने पुन्हा एकदा शपथ घेऊन ती गोष्ट नाकारली: “मी त्या माणसाला ओळखत नाही!” ७३ थोड्या वेळाने तिथे उभे असलेले लोक पेत्रजवळ येऊन म्हणाले: “नक्कीच तूपण त्यांच्यातलाच एक आहेस, खरंतर तुझ्या बोलण्यावरून* लगेच कळून येतं.” ७४ तेव्हा, आपण खोटं बोलत असलो, तर आपल्याला शाप लागावा असं म्हणून तो शपथ घेऊन म्हणाला: “मी त्या माणसाला ओळखत नाही!” आणि तेवढ्यात कोंबडा आरवला. ७५ तेव्हा, “कोंबडा आरवण्याआधी तू तीन वेळा मला नाकारशील,” हे येशूचे शब्द+ पेत्रला आठवले आणि तो बाहेर जाऊन ढसाढसा रडू लागला.

२७ सकाळ झाल्यावर, सगळे मुख्य याजक आणि वडीलजन यांनी येशूला ठार मारण्यासाठी आपसात चर्चा केली.+ २ मग ते त्याला बांधून तिथून घेऊन गेले आणि त्यांनी त्याला राज्यपाल पिलात याच्या हवाली केलं.+

३ येशूला मृत्युदंड सुनावण्यात आला आहे, हे पाहून त्याचा विश्‍वासघात करणाऱ्‍या यहूदाचं मन त्याला खाऊ लागलं आणि तो त्याला दिलेली चांदीची ३० नाणी घेऊन मुख्य याजक आणि वडीलजनांकडे गेला,+ ४ आणि म्हणाला: “मी एका निर्दोष माणसाच्या रक्‍ताचा सौदा करून पाप केलंय.” पण ते त्याला म्हणाले: “आमचं त्याच्याशी काय घेणं-देणं? तुझं तूच बघ!”* ५ तेव्हा त्याने ती चांदीची नाणी मंदिरात फेकून दिली आणि जाऊन गळफास घेतला.+ ६ पण मुख्य याजक ती चांदीची नाणी घेऊन म्हणाले: “हे पैसे मंदिराच्या खजिन्यात टाकणं योग्य नाही, कारण हे रक्‍ताचं मोल आहे.” ७ मग आपसात चर्चा करून त्यांनी त्या पैशांनी परक्यांना पुरण्यासाठी कुंभाराचं शेत विकत घेतलं. ८ म्हणून त्या शेताला आजपर्यंत ‘रक्‍ताचं शेत’ असं म्हणतात.+ ९ तेव्हा यिर्मया संदेष्ट्याद्वारे जे सांगण्यात आलं होतं ते पूर्ण झालं: “त्यांनी त्या माणसासाठी ठरवण्यात आलेली किंमत, म्हणजे चांदीची ती ३० नाणी घेतली; इस्राएलच्या मुलांपैकी काहींनी त्याच्या जिवासाठी ठरवलेली ही किंमत होती १० आणि यहोवाने* मला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी हे पैसे देऊन कुंभाराचं शेत विकत घेतलं.”+

११ येशू राज्यपालासमोर उभा होता तेव्हा राज्यपालाने त्याला विचारलं: “तू यहुद्यांचा राजा आहेस का?” येशू त्याला म्हणाला: “तुम्ही स्वतःच तसं म्हणत आहात.”+ १२ पण मुख्य याजक आणि वडीलजन त्याच्यावर आरोप लावत होते, तेव्हा त्याने काहीच उत्तर दिलं नाही.+ १३ म्हणून पिलात त्याला म्हणाला: “ते तुझ्याविरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देत आहेत हे तू ऐकत नाहीस का?” १४ पण त्याने त्याला एका शब्दानेही उत्तर दिलं नाही. तेव्हा राज्यपालाला फार आश्‍चर्य वाटलं.

१५ दरवर्षी त्या सणाच्या वेळी, लोकांच्या इच्छेप्रमाणे, कोणत्याही एका कैद्याची सुटका करण्याची राज्यपालाची रीत होती.+ १६ त्या वेळी, बरब्बा नावाचा एक कुख्यात कैदी तुरुंगात होता. १७ म्हणून, लोक जमलेले असताना पिलात त्यांना म्हणाला: “मी कोणाची सुटका करावी अशी तुमची इच्छा आहे, बरब्बाची की ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूची?” १८ कारण त्यांनी द्वेषामुळे येशूला पकडून दिलं होतं हे पिलातला माहीत होतं. १९ शिवाय, तो न्यायासनावर बसलेला असताना त्याच्या बायकोने त्याला असा निरोप पाठवला, की “त्या सज्जन माणसाच्या प्रकरणात पडू नकोस, कारण आज मला त्याच्याबद्दल एक स्वप्न पडून खूप त्रास झाला.” २० पण मुख्य याजकांनी आणि वडिलांनी लोकांना असं पटवून दिलं, की त्यांनी बरब्बाच्या सुटकेची+ आणि येशूला मृत्युदंड सुनावण्याची मागणी करावी.+ २१ राज्यपालाने पुन्हा एकदा त्यांना विचारलं: “दोघांपैकी मी कोणाची सुटका करावी अशी तुमची इच्छा आहे?” ते म्हणाले: “बरब्बाची.” २२ पिलात त्यांना म्हणाला: “मग ख्रिस्त म्हटलेल्या येशूचं मी काय करावं?” तेव्हा ते सगळे म्हणाले: “त्याला वधस्तंभावर* खिळा!”*+ २३ तो म्हणाला: “पण, का? त्याने कोणतं वाईट काम केलंय?” तेव्हा ते आणखी जास्त ओरडू लागले: “त्याला वधस्तंभावर खिळा!”+

२४ लोकांवर काहीच परिणाम होत नाही, उलट गोंधळ वाढतच चालला आहे हे पाहून पिलातने पाणी घेऊन सगळ्या लोकांसमोर आपले हात धुतले आणि तो म्हणाला: “मी या माणसाच्या रक्‍तापासून निर्दोष आहे. तुम्हीच याला जबाबदार आहात.” २५ तेव्हा सगळ्या लोकांनी उत्तर दिलं: “त्याच्या रक्‍ताचा दोष आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळांवर असो.”+ २६ मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्याने बरब्बाची सुटका केली, पण येशूला चाबकाचे फटके मारून+ वधस्तंभावर खिळण्यासाठी सैनिकांच्या हाती दिलं.+

२७ मग सैनिकांनी येशूला राज्यपालाच्या भवनात नेलं आणि इतर सगळ्या सैनिकांना त्याच्याभोवती जमवलं.+ २८ त्यांनी त्याचे कपडे उतरवून त्याला एक गडद लाल रंगाचं वस्त्र घातलं.+ २९ आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्यांनी तो त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याच्या उजव्या हातात वेताची एक काठी दिली. मग त्याच्यासमोर गुडघे टेकून ते असं म्हणून त्याची थट्टा करू लागले: “यहुद्यांच्या राजाचा जयजयकार असो!”* ३० ते त्याच्यावर थुंकले+ आणि त्याच्या हातातली वेताची काठी घेऊन त्याच्या डोक्यावर मारू लागले. ३१ शेवटी, त्याची अशी थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावर घातलेलं वस्त्र काढलं. मग त्याला त्याचा झगा घालून ते त्याला वधस्तंभावर खिळण्यासाठी घेऊन गेले.+

३२ ते बाहेर जात असताना त्यांना मूळचा कुरेनेचा असणारा शिमोन नावाचा एक माणूस दिसला. तेव्हा त्यांनी येशूचा वधस्तंभ उचलून नेण्यासाठी त्याला भाग पाडलं.+ ३३ मग जेव्हा ते गुलगुथा,  म्हणजेच कवटीची जागा या ठिकाणी आले,+ ३४ तेव्हा त्यांनी येशूला कडू पदार्थ मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला.+ पण तो चाखल्यावर त्याने तो प्यायला नकार दिला. ३५ त्याला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्यांनी त्याच्या कपड्यांसाठी चिठ्ठ्या टाकून ते आपसात वाटून घेतले.+ ३६ मग त्याच्यावर पहारा देत ते तिथेच बसून राहिले ३७ आणि त्याच्याविरुद्ध असलेला आरोप लिहून त्यांनी तो वधस्तंभावर, त्याच्या डोक्याच्या वर लावला. त्यावर असं लिहिलं होतं: “हा यहुद्यांचा राजा येशू आहे.”+

३८ येशूसोबत दोन चोरांनाही वधस्तंभांवर लटकवण्यात आलं होतं, एकाला त्याच्या उजवीकडे आणि दुसऱ्‍याला डावीकडे.+ ३९ त्या वेळी तिथून येणारे-जाणारे लोक डोकं हलवून+ त्याची निंदा करत होते+ ४० आणि असं म्हणत होते: “तू मंदिर पाडून तीन दिवसांत पुन्हा उभं करणार होतास ना?+ मग आता स्वतःला वाचव! तू देवाचा मुलगा असशील तर वधस्तंभावरून खाली येऊन दाखव!”+ ४१ त्याच प्रकारे मुख्य याजक, शास्त्री आणि वडीलजनसुद्धा त्याची अशी थट्टा करू लागले:+ ४२ “याने दुसऱ्‍यांना वाचवलं; पण याला स्वतःला वाचवता येत नाही! इस्राएलचा राजा+ आहे हा; मग आता वधस्तंभावरून खाली ये म्हणावं, मग आम्हीही तुझ्यावर विश्‍वास ठेवू. ४३ याचा देवावर भरवसा आहे ना? मग आता देवाची याच्यावर मर्जी असेल, तर त्याने याला वाचवावं,+ कारण हा म्हणतो, ‘मी देवाचा मुलगा आहे.’”+ ४४ तसंच, वधस्तंभांवर त्याच्या बाजूला असलेले चोरही त्याची निंदा करत होते.+

४५ मग, दुपारी सुमारे बारा वाजेपासून* सुमारे तीन वाजेपर्यंत* पृथ्वीवर अंधार पसरला.+ ४६ तीन वाजण्याच्या सुमारास येशू मोठ्याने म्हणाला: “एली, एली, लामा साबाखतानी?”  म्हणजेच, “माझ्या देवा, माझ्या देवा, तू मला का सोडून दिलंस?”+ ४७ हे ऐकून तिथे उभे असलेले काही लोक म्हणू लागले: “तो एलीयाला हाक मारतोय.”+ ४८ तेव्हा लगेच त्यांच्यापैकी एकाने धावत जाऊन एक बोळा आणला आणि तो आंबट द्राक्षारसात बुडवून एका वेताच्या टोकावर ठेवून त्याला चोखायला दिला.+ ४९ पण बाकीचे लोक म्हणाले: “असू दे! एलीया याला वाचवायला येतो का ते पाहू या.” ५० मग येशू पुन्हा मोठ्याने ओरडला आणि त्याने प्राण सोडला.+

५१ पाहा! त्याच क्षणी मंदिराच्या पवित्र स्थानाचा पडदा+ वरपासून खालपर्यंत+ फाटून त्याचे दोन भाग झाले,+ आणि भूकंप होऊन खडक फुटले. ५२ कबरी* उघडल्या गेल्या आणि मरण पावलेल्या बऱ्‍याच पवित्र जनांचे मृतदेह बाहेर पडले ५३ आणि कबरस्तानात असलेल्या बऱ्‍याच लोकांनी ते पाहिले. (कबरींजवळ गेलेले काही लोक येशूला पुन्हा उठवण्यात आल्यानंतर पवित्र शहरात आले.)* ५४ पण जेव्हा सैन्याच्या अधिकाऱ्‍याने आणि येशूवर पहारा ठेवणाऱ्‍या इतरांनी तो भूकंप आणि बाकीच्या गोष्टी घडताना पाहिल्या, तेव्हा त्यांना खूप भीती वाटली आणि ते म्हणाले: “खरंच, हा देवाचा मुलगा होता!”+

५५ येशूची सेवा करायला गालीलहून त्याच्यामागे आलेल्या बऱ्‍याच स्त्रियासुद्धा+ दुरून हे सगळं पाहत होत्या. ५६ त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया, याकोब आणि योसे यांची आई मरीया आणि जब्दीच्या मुलांची आई यासुद्धा होत्या.+

५७ मग दुपार टळून गेल्यावर, अरिमथाई इथला योसेफ नावाचा एक श्रीमंत माणूस आला. तोही येशूचा शिष्य झाला होता.+ ५८ या माणसाने पिलातकडे जाऊन येशूचा मृतदेह आपल्याला द्यावा अशी विनंती केली.+ तेव्हा पिलातने तो त्याला देण्याची आज्ञा केली.+ ५९ योसेफने त्याचा मृतदेह नेऊन तो उत्तम प्रतीच्या, स्वच्छ मलमलीच्या कापडात गुंडाळला,+ ६० आणि त्याने खडकात खोदलेल्या त्याच्या नव्या कबरेत* तो ठेवला.+ मग त्याने एक मोठा दगड लोटून कबरेचं* दार बंद केलं आणि तो निघून गेला. ६१ पण मग्दालीया मरीया आणि दुसरी मरीया तिथेच कबरेसमोर बसून राहिल्या.+

६२ दुसऱ्‍या दिवशी, म्हणजे शब्बाथाच्या तयारीनंतरच्या दिवशी+ मुख्य याजक आणि परूशी पिलातसमोर जमले ६३ आणि म्हणाले: “महाराज, ‘तीन दिवसांनंतर मला उठवलं जाईल,’ असं तो ठक जिवंत असताना म्हणाला होता+ हे आम्हाला चांगलं आठवतं. ६४ म्हणून, तिसऱ्‍या दिवसापर्यंत कबरेवर पहारा ठेवण्याची आज्ञा द्या, नाहीतर त्याचे शिष्य येऊन त्याचा मृतदेह चोरून नेतील+ आणि लोकांना असं सांगतील, की ‘त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आलंय!’ असं झालं तर ही शेवटची फसवणूक आधीपेक्षा वाईट ठरेल.” ६५ पिलात त्यांना म्हणाला: “तुम्ही पहारेकऱ्‍यांना नेऊ शकता. जा, तुम्हाला जमेल तसा बंदोबस्त करा.” ६६ तेव्हा ते गेले आणि त्यांनी कबरेचं दार पूर्णपणे बंद करून तिथे पहारेकरी ठेवले.

२८ शब्बाथानंतर, आठवड्याचा पहिला दिवस उजाडत असताना मग्दालीया मरीया आणि दुसरी मरीया येशूची कबर पाहायला आल्या.+

२ आणि पाहा! मोठा भूकंप झाला होता कारण यहोवाचा* दूत स्वर्गातून उतरला होता आणि कबरेच्या दारावरचा दगड लोटून तो त्यावर बसला होता.+ ३ तो चमकणाऱ्‍या विजेसारखा दिसत होता आणि त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते.+ ४ त्याला पाहून पहारेकरी भीतीने थरथर कापू लागले आणि त्यांची स्थिती मेलेल्या माणसांसारखी झाली.

५ पण स्वर्गदूत त्या स्त्रियांना म्हणाला: “घाबरू नका, कारण ज्याला वधस्तंभावर* मृत्युदंड देण्यात आला, त्या येशूला तुम्ही शोधत आहात हे मला माहीत आहे.+ ६ तो इथे नाही कारण त्याने सांगितल्याप्रमाणे त्याला उठवण्यात आलंय.+ या, आणि त्याला जिथे ठेवण्यात आलं होतं ती जागा पाहा. ७ मग लगेच जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा, की त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आलंय. कारण पाहा! तो तुमच्यापुढे गालीलला जातोय.+ तुम्ही त्याला तिथे पाहाल. बघा! मी हाच संदेश सांगायला आलोय.”+

८ तेव्हा त्या कबरेजवळून* निघून त्याच्या शिष्यांना ही बातमी सांगायला धावत गेल्या. त्या फार घाबरलेल्या होत्या पण खूप आनंदीसुद्धा होत्या.+ ९ आणि पाहा! येशू त्यांना भेटला आणि म्हणाला: “तुम्हाला शांती असो!” तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ जाऊन त्याचे पाय धरले आणि त्याला नमन केलं. १० मग येशू त्यांना म्हणाला: “घाबरू नका! जा आणि माझ्या भावांना ही बातमी सांगा, म्हणजे ते गालीलमध्ये जातील आणि तिथे मला पाहतील.”

११ त्या जात असताना पहारेकऱ्‍यांपैकी काही जण+ शहरात गेले आणि त्यांनी घडलेली सगळी हकिगत मुख्य याजकांना सांगितली. १२ मग त्यांनी वडीलजनांसोबत चर्चा केल्यानंतर, सैनिकांना भरपूर चांदीची नाणी दिली १३ आणि ते म्हणाले: “असं म्हणा, की ‘आम्ही रात्री झोपेत होतो, तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला चोरून नेलं.’+ १४ आणि ही गोष्ट राज्यपालाच्या कानावर गेलीच, तर आम्ही त्याला सगळं काही समजावून सांगू,* तुम्हाला चिंता करायची काही गरज नाही.” १५ तेव्हा त्यांनी ती चांदीची नाणी घेऊन त्यांना सांगितल्याप्रमाणे केलं. आणि हीच गोष्ट यहुद्यांमध्ये पसरली आणि आजपर्यंत सांगितली जाते.

१६ इकडे, ११ शिष्य गालीलमध्ये,+ येशूने त्यांना ज्या डोंगरावर भेटायला सांगितलं होतं त्या डोंगरावर गेले.+ १७ त्याला पाहिल्यावर त्यांनी त्याला नमन केलं, पण काहींच्या मनात शंका आली. १८ मग येशू त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याशी बोलला. तो त्यांना म्हणाला: “स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळा अधिकार मला देण्यात आलाय.+ १९ म्हणून, जा आणि सगळ्या राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा+ आणि त्यांना पित्याच्या, मुलाच्या आणि पवित्र शक्‍तीच्या* नावाने बाप्तिस्मा द्या,+ २० आणि मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.+ आणि पाहा! जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत*+ मी नेहमी तुमच्यासोबत असेन.”

किंवा “मसीहा; देवाचा अभिषिक्‍त.”

किंवा “याची वंशावळ.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “नीतिमान.”

यहुदी परंपरेनुसार, लग्न ठरल्यावर ते मोडण्यासाठी घटस्फोट द्यावा लागायचा.

ख्रिस्ती ग्रीक भाषांतरात देवाचं नाव ‘यहोवा’ हे २३७ ठिकाणी आढळतं; त्यांपैकी हे पहिलं. अति. क५ पाहा.

शब्दशः “आपली बायको मरीया हिला घरी आणायला.”

शब्दार्थसूची पाहा.

हे नाव येशूवा किंवा यहोशवा या हिब्रू नावाचं रूप आहे. या नावाचा अर्थ “यहोवा तारण करतो” असा होतो.

शब्दशः “आपल्या लोकांचं तारण करेल.”

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “मसीहाचा; देवाच्या अभिषिक्‍ताचा.”

ऊद आणि गंधरस हे मौल्यवान, सुगंधी पदार्थ होते. शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “मिसर.”

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

कदाचित “अंकुर” या अर्थाच्या मूळ हिब्रू शब्दावरून.

शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “आधी पश्‍चात्तापाला शोभणारी फळं उत्पन्‍न करा.”

शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, धान्याची झोडपणी करण्याचं ठिकाण. शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, ज्यांना फीट येण्याचा आजार आहे.

किंवा “दहा शहरांचा प्रदेश.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “जे पवित्र शक्‍तीसाठी भीक मागतात.”

किंवा “सौम्य वृत्तीचे.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “जे शांतिप्रिय.”

शब्दार्थसूची पाहा.

यरुशलेमच्या बाहेर केरकचरा जाळण्याची जागा. शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “क्वॉड्रन.”

म्हणजे, कामुक भावना उत्तेजित होतील अशा प्रकारे.

किंवा “पाप करायला प्रवृत्त करत असेल.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “पाप करायला प्रवृत्त करत असेल.”

शब्दार्थसूची पाहा.

ग्रीक, पोर्निया.  शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

अति. ख१४ पाहा.

म्हणजे, बिनव्याजाने.

किंवा “नीतिमत्त्वाने वागू नका.”

शब्दशः “आपल्यापुढे कर्णा वाजवू नका.”

किंवा “गुप्त ठिकाणी राहणाऱ्‍या पित्याला.”

किंवा “पापं.”

शब्दशः “मोहात पाडू नकोस.”

किंवा “सोडव.”

किंवा “गुप्त ठिकाणी राहणाऱ्‍या.”

किंवा “कीड.”

किंवा “निर्दोष.” शब्दशः “साधी.”

शब्दशः “वाईट; दुष्ट.”

अति. ख१४ पाहा.

किंवा “कमी विश्‍वास असलेल्या.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “तुम्हाला फाडून टाकतील.”

किंवा “चिंचोळा.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “वाईट कामं करणाऱ्‍यांनो.”

किंवा “आणि नमन करून.”

हे कदाचित याजकांना सूचित करत असावं.

किंवा “दात खातील.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “तुम्ही एवढे भित्रे कसे?”

शब्दशः “छळायला.”

प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेल्या पिशव्या. शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, “आवेशी असलेला.”

कदाचित एक प्रकारचा कमरपट्टा ज्यात पैसे ठेवले जायचे.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “धीर धरतो.”

किंवा “त्याचंच तारण होईल.”

दुष्ट स्वर्गदूतांचा राजा किंवा शासक असलेल्या सैतानाला दिलेलं एक नाव.

किंवा “जीवनाची आशा हिरावून घेऊ शकत नाहीत.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “असारियन,”  एका दिवसाच्या मजुरीचा सोळावा भाग. अति. ख१४ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “आपलं जीवन.”

किंवा “आपलं जीवन.”

किंवा “जो माझ्याबद्दल कोणतीही शंका घेत नाही.”

किंवा “महागाची वस्त्रं.”

शब्दशः “तुझ्या मुखापुढे.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “परिणामांद्वारे.”

किंवा “नीतिमान ठरते.”

किंवा “अद्‌भुत कार्यं.”

ग्रीक भाषेत “हेडीस.”  शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “तुम्हाला.”

किंवा “सौम्य वृत्तीचा.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “अर्पणाच्या भाकरी.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “लकवा मारल्यामुळे लुळा झालेल्या.”

किंवा “माझ्या जिवाला.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

दुष्ट स्वर्गदूतांचा राजा किंवा शासक असलेल्या सैतानाला दिलेलं एक नाव.

किंवा “देवाचं राज्य आलं आहे आणि तुम्हाला कळलंसुद्धा नाही.”

किंवा “सध्याच्या काळात.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “येणाऱ्‍या काळातही.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “विश्‍वासघातकी.”

शब्दशः “पृथ्वीच्या टोकापासून.”

शब्दशः “तो दुष्ट.”

किंवा “सध्याच्या काळाच्या.” शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, पीठ फुगवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ, यीस्ट. शब्दार्थसूची पाहा.

किंवा कदाचित, “जगाच्या स्थापनेपासून.”

शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.

किंवा “सध्याच्या काळाची समाप्ती.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “सध्याच्या काळाच्या समाप्तीला.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “दात खातील.”

किंवा “सध्याच्या काळाच्या समाप्तीला.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “दात खातील.”

किंवा “अद्‌भुत कार्यं.”

किंवा “अद्‌भुत कार्यं.”

म्हणजे, हेरोद अंतिपा. शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “कित्येक स्टेडिया.” स्टेडियम  हे अंतर मोजण्याचं रोमन माप असून एक स्टेडियम  १८५ मी. (६०६.९५ फूट) इतकं होतं.

म्हणजे, पहाटे तीन वाजेपासून सूर्योदयापर्यंत, म्हणजे पहाटे सहा वाजेपर्यंत.

किंवा “कमी विश्‍वास असलेल्या माणसा.”

म्हणजे, हात धुण्याचा विधी पाळत नाहीत.

किंवा “वडिलांना किंवा आईला शिव्याशाप देतो.”

किंवा “अडखळले.”

ग्रीक, पोर्निया  अनेकवचन. शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, हात धुण्याचा विधी न पाळल्यामुळे.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “विश्‍वासघातकी.”

इस्राएलमध्ये भाकर बनवताना पीठ फुगवण्यासाठी खमीर वापरलं जायचं. शब्दार्थसूची पाहा.

किंवा “कमी विश्‍वास असलेल्यांनो.”

किंवा “मोठ्या टोपल्या.”

इस्राएलमध्ये भाकर बनवताना पीठ फुगवण्यासाठी खमीर वापरलं जायचं. शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “मांसाने आणि रक्‍ताने.”

ग्रीक भाषेत “हेडीस.”  शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “स्वतःवर दया कर.”

शब्दशः “माझ्या मागे हो.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “जीवन.”

किंवा “जीवन.”

किंवा “जीवन.”

किंवा “जीवन.”

किंवा “जीवनाच्या.”

किंवा “शुभ्र.”

शब्दार्थसूची पाहा.

अति. क३ पाहा.

शब्दशः “दोन ड्राख्मांचा  कर.” अति. ख१४ पाहा.

शब्दशः “स्टाटेर  नाणं,” ज्याचं मोल चार ड्राख्मा  होतं. अति. ख१४ पाहा.

किंवा “मागे फिरून.”

किंवा “गाढव ओढतं तसा जात्याचा दगड.”

किंवा “पाप करायला प्रवृत्त करणाऱ्‍या कारणांमुळे.” शब्दशः “अडखळायला लावणाऱ्‍या दगडांमुळे.”

शब्दार्थसूची पाहा.

अति. क३ पाहा.

किंवा कदाचित, “तुमच्या.”

शब्दशः “आणि त्याची चूक सुधार.”

शब्दशः “तोंडून.”

म्हणजे, चांदीची नाणी. शब्दशः “दहा हजार तालान्त  इतकं.” अति. ख१४ पाहा.

किंवा “कळवळा आला.”

अति. ख१४ पाहा.

किंवा “वेगळं करू नये.”

ग्रीक, पोर्निया.  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “नव्याने निर्मिती केली जाईल.”

अति. ख१४ पाहा.

शब्दशः “सुमारे तिसऱ्‍या तासाला.”

शब्दशः “सुमारे सहाव्या तासाला.”

शब्दशः “सुमारे नवव्या तासाला.”

शब्दशः “सुमारे अकराव्या तासाला.”

अति. ख१४ पाहा.

अति. ख१४ पाहा.

अति. ख१४ पाहा.

किंवा “उदारतेमुळे.”

शब्दशः “वाईटपणाने; दुष्टतेने.”

शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

शब्दशः “स्वर्गापासून.”

शब्दशः “नीतिमत्त्वाचा मार्ग.”

किंवा “माळा बांधला.”

शब्दार्थसूचीत “कोपऱ्‍याचा दगड” पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “अटक करण्याची.”

किंवा “दात खाईल.”

किंवा “रोमी सम्राटाला.” शब्दार्थसूची पाहा.

अति. ख१४ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

यहुदी लोक कपाळावर आणि डाव्या हातावर शास्त्रपट असलेली एक लहानशी पेटी बांधायचे. यामुळे वाइटापासून आपलं रक्षण होईल असा त्यांचा समज होता.

किंवा “सर्वात चांगल्या.”

किंवा “गुरू.”

अति. क३ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “दशांश.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “लुटीचा माल.”

किंवा “असंयम.”

किंवा “स्मारक कबरी.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, मंदिराचा.

किंवा कदाचित, “ओसाड होण्यासाठी सोडून दिलंय.”

अति. क५ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “सध्याच्या काळाच्या समाप्तीचं.” शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “बाळाच्या जन्माच्या वेळी स्त्रीला येणाऱ्‍या कळांची.”

किंवा “आपला विश्‍वास गमावतील.”

किंवा “धीर धरतो.”

किंवा “त्याचंच तारण होईल.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “वाऱ्‍यांतून.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “पेटी.” हे चौकोनी कोपरे आणि खालचा भाग सपाट असलेल्या पेटीच्या आकाराच्या एका लांबुळक्या जहाजाला सूचित करतं.

किंवा “रात्री कोणत्या वेळी.”

किंवा “समजदार.”

किंवा “दात खाईल.”

किंवा “बुद्धिमान.”

तालान्त  हे वजन आणि पैसे मोजण्याचं हिब्रू लोकांचं सर्वात मोठं माप होतं. पहिल्या शतकात, एक ग्रीक तालान्त  सुमारे २०.४ किलोग्रॅम चांदीच्या नाण्यांइतका होता. अति. ख१४ पाहा.

शब्दशः “चांदी.”

शब्दशः “चांदी.”

किंवा “दात खाईल.”

किंवा “माझ्या अंगावर पुरेसे कपडे नव्हते.”

शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.

शब्दशः “छाटून टाकले जातील.” म्हणजे, जीवनातून.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “कुयुक्‍तीने.”

म्हणजे, अलाबास्त्र  नावाच्या दगडापासून बनवलेली बाटली. शब्दार्थसूचीत “अलाबास्त्र” पाहा.

किंवा “गुरू.”

किंवा “स्तोत्रं.”

शब्दशः “तुम्ही सर्व आज रात्री माझ्या बाबतीत अडखळाल.”

शब्दशः “बाकीचे सर्व जण तुझ्या बाबतीत अडखळले तरी मी अडखळणार नाही.”

किंवा “माझा जीव.”

किंवा “तयार.”

किंवा “शास्त्रवचनांत जे लिहिलंय.”

म्हणजे, यहुदी उच्च न्यायालय. शब्दार्थसूची पाहा.

किंवा “बोलण्याच्या विशिष्ट पद्धतीवरून; बोलीवरून.”

किंवा “तो तुझा प्रश्‍न आहे.”

अति. क५ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “वधस्तंभावर मृत्युदंड द्या!”

किंवा “यहुद्यांच्या राजा, नमस्कार!”

शब्दशः “सहाव्या तासापासून.”

शब्दशः “नवव्या तासापर्यंत.”

किंवा “स्मारक कबरी.”

कंसात दिलेली माहिती नंतर घडलेल्या घटनांविषयी आहे.

किंवा “स्मारक कबरेत.”

किंवा “स्मारक कबरेचं.”

अति. क५ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “स्मारक कबरेजवळून.”

शब्दशः “त्याचं मन वळवू.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “सध्याच्या काळाच्या समाप्तीपर्यंत.” शब्दार्थसूची पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा