मलाखी
१ एक न्यायसंदेश:
यहोवाने इस्राएलला मलाखी* याच्याकडून हा संदेश दिला:
२ यहोवा म्हणतो, “मी तुमच्यावर प्रेम केलं.”+
पण तुम्ही म्हणता: “कशावरून तू आमच्यावर प्रेम केलंस?”
यहोवा म्हणतो, “एसाव याकोबचा भाऊ नव्हता का?+ पण मी याकोबवर प्रेम केलं, ३ आणि एसावचा द्वेष केला;+ मी त्याचे पर्वत उजाड केले+ आणि त्याचा वारसा मी ओसाड रानातल्या कोल्ह्यांना दिला.”+
४ “अदोम* म्हणतो, ‘आम्ही उद्ध्वस्त झालो, तरी आम्ही परत येऊ आणि आमचे पडलेले बुरूज पुन्हा बांधू.’ पण सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘ते बांधतील, पण मी तोडून टाकीन. लोक त्यांना “यहोवाने कायमचे दोषी ठरवलेले,” असं म्हणतील आणि त्यांच्या देशाला “दुष्टतेचा प्रदेश” म्हटलं जाईल.+ ५ तुम्ही हे आपल्या डोळ्यांनी पाहाल आणि म्हणाल: “इस्राएलच्या संपूर्ण प्रदेशात यहोवाचा गौरव होवो.”’”
६ “मी सैन्यांचा देव यहोवा, माझ्या नावाला तुच्छ लेखणाऱ्या याजकांना म्हणतो,+ ‘मुलगा आपल्या पित्याचा आदर करतो+ आणि सेवक आपल्या मालकाचा आदर करतो. मग, जर मी पिता आहे,+ तर मला आदर मिळायला नको का?+ आणि जर मी मालक आहे, तर तुम्ही मला भिऊन वागायला* नको का?’
‘पण तुम्ही म्हणता: “आम्ही तुझ्या नावाला कसं तुच्छ लेखलं?”’
७ ‘माझ्या वेदीवर दूषित अन्न* अर्पण करून.’
‘मग तुम्ही म्हणता: “आम्ही तुला कसं दूषित केलं?”’
‘“यहोवाचं मेज+ तुच्छ आहे,” असं म्हणून. ८ तुम्ही अर्पणासाठी एखादा आंधळा प्राणी आणता आणि म्हणता: “यात चुकीचं काहीच नाही.” तसंच, तुम्ही लंगडा किंवा आजारी प्राणी अर्पणासाठी आणता आणि म्हणता: “यात चुकीचं काहीच नाही.”’”+
सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “जरा आपल्या राज्यपालाला अशी भेट देऊन पाहा. तो तुमच्यावर खूश होईल का? किंवा तुमच्यावर कृपा करेल का?”
९ “म्हणून आता, देवाने आपल्यावर कृपा करावी अशी त्याला विनंती करा. तुम्ही आपल्या हाताने त्याला अशी अर्पणं दिल्यावर, तो खरंच तुमच्यावर कृपा करेल का?” असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.
१० “तुमच्यापैकी दरवाजे बंद करायला* कोण तयार आहे?+ तुम्ही तर माझ्या वेदीवर आग जाळण्यासाठीही मोबदला घेता.+ तुमची ही अशी सेवा मला मुळीच आवडत नाही आणि तुमच्या हातची अर्पणं मी स्वीकारणार नाही,”+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.
११ “कारण पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत,* माझं नाव सर्व राष्ट्रांमध्ये महान होईल.+ प्रत्येक ठिकाणी माझ्या नावासाठी, शुद्ध भेट म्हणून अर्पणं दिली जातील आणि बलिदानं जाळली जातील; कारण राष्ट्रांमध्ये माझं नाव महान असेल,”+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.
१२ “पण तुम्ही त्याचा* अनादर करत आहात,+ कारण तुम्ही म्हणता, ‘यहोवाचं मेज दूषित आहे आणि त्यावर ठेवलेली अर्पणं तुच्छ आहेत.’+ १३ तसंच, ‘हे किती कंटाळवाणं आहे! असं म्हणून तुम्ही नाक मुरडता,” असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. “तुम्ही चोरलेले, लंगडे आणि आजारी प्राणी आणता. आणि असे प्राणी माझ्यासाठी भेट म्हणून अर्पण करता! अशा भेटी मी का स्वीकाराव्यात?”+ असं यहोवा म्हणतो.
१४ “ज्याच्या कळपात निर्दोष नर असूनही, जो यहोवाला नवस करून दोष असलेला* प्राणी बलिदान करतो, तो कपटी माणूस शापित असो. कारण मी एक महान राजा आहे+ आणि माझं नाव सर्व राष्ट्रांमध्ये विस्मयकारक होईल,”+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.
२ “याजकांनो, ही आज्ञा तुमच्यासाठी आहे.+ २ जर तुम्ही माझं ऐकलं नाही आणि माझ्या नावाचा गौरव करण्याकडे लक्ष दिलं नाही, तर मी तुमच्यावर शाप पाठवीन.+ आणि तुमचे आशीर्वाद शापांमध्ये बदलीन.+ हो, तुम्ही लक्ष देत नसल्यामुळे, मी तुमचे आशीर्वाद शापांत बदलले आहेत,” असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.
३ “पाहा! मी तुमच्यामुळे तुमचं पेरलेलं बियाणं नष्ट करीन,*+ आणि तुमच्या सणांतल्या बलिदानांच्या प्राण्यांचं शेण तुमच्या तोंडाला फासीन आणि तुम्हाला नेऊन शेणाच्या ढिगाऱ्यावर* फेकलं जाईल. ४ मग तुम्हाला कळेल, की लेवीसोबत केलेला माझा करार पुढे चालू राहावा,+ म्हणून मी तुम्हाला ही आज्ञा दिली आहे,” असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.
५ “त्याने माझं भय मानावं,* म्हणून मी त्याच्यासोबत जीवनाचा आणि शांतीचा हा करार केला होता. त्याने माझं भय मानलं आणि माझ्या नावाचा सन्मान केला. ६ सत्याचा नियम* त्याच्या तोंडात होता+ आणि त्याच्या ओठांवर कोणतीही अनीती दिसून आली नाही. तो माझ्यासोबत शांतीने आणि सरळ मार्गाने चालला+ आणि त्याने अनेकांना अपराधापासून वळवलं. ७ याजकाच्या ओठांनी ज्ञानाचं रक्षण केलं पाहिजे आणि लोकांनी त्याच्याकडे नियमशास्त्राबद्दल* विचारपूस केली पाहिजे,+ कारण तो सैन्यांचा देव यहोवा याचा दूत आहे.”
८ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “तुम्ही मात्र मार्गावरून भरकटला आहात. तुम्ही बऱ्याच लोकांना नियमशास्त्राच्या बाबतीत* अडखळायला लावलं आहे.+ तुम्ही लेवीचा करार मोडला आहे.+ ९ मी तुम्हाला लोकांमध्ये तुच्छ करीन आणि ते तुमचा तिरस्कार करतील, कारण तुम्ही माझ्या मार्गांनी चालला नाहीत. उलट माझं नियमशास्त्र लागू करताना तुम्ही भेदभाव केला.”+
१० “आपल्या सगळ्यांचा एकच पिता नाही का?+ एकाच देवाने आपल्याला निर्माण केलं नाही का? मग आपण एकमेकांशी विश्वासघात करून,+ आपल्या वाडवडिलांच्या कराराचा अनादर का करावा? ११ यहूदाने विश्वासघात केलाय आणि इस्राएलमध्ये व यरुशलेममध्ये घृणास्पद असं काहीतरी घडलंय. यहोवा ज्या पावित्र्यावर*+ प्रेम करतो, त्याचा यहूदाने अनादर केलाय. आणि त्याने एका परक्या देवाच्या मुलीशी लग्न केलंय.+ १२ यहोवा असं करणाऱ्या प्रत्येकाला, याकोबच्या तंबूंमधून नष्ट करेल, मग तो कोणीही असो.* जरी त्याने सैन्यांचा देव यहोवा याच्यासाठी अर्पण आणलं, तरी त्याला नष्ट केलं जाईल.”+
१३ “तुम्ही आणखी* एक गोष्ट करता; आणि त्यामुळे यहोवाची वेदी अश्रूंनी भिजली आहे आणि तिथे रडण्याचा व उसासे टाकण्याचा आवाज ऐकू येत आहे. म्हणूनच, आता तो तुमच्या अर्पणांकडे लक्ष देत नाही आणि तुमच्या हातून काहीही स्वीकारत नाही.+ १४ तुम्ही म्हणता, ‘हे कशामुळे?’ कारण, यहोवा तुमच्यामध्ये आणि तुमच्या तरुणपणाच्या बायकोमध्ये साक्षीदार झाला आहे. ती कराराने तुमची बायको* आणि जीवनसाथी आहे, तरी तुम्ही तिच्याशी विश्वासघात केला.+ १५ पण तुमच्यात असे काही जण आहेत, ज्यांनी अशा प्रकारे न वागण्याचं आपल्या मनात ठरवलं आहे. कारण त्यांना अशी मुलं हवी आहेत, जी खरोखर देवाच्या लोकांपैकी* असतील. हे लोक अजूनही देवाच्या पवित्र शक्तीच्या* मार्गदर्शनाप्रमाणे वागतात. म्हणून आता तुम्हीही आपल्या मनाचं परीक्षण करा आणि योग्य मनोवृत्ती उत्पन्न करा. आपल्या तरुणपणाच्या बायकोसोबत विश्वासघात न करण्याचा निश्चय करा. १६ कारण मला* घटस्फोटाची घृणा वाटते,’+ असं इस्राएलचा देव यहोवा म्हणतो. “आणि जो हिंसाचाराने आपले कपडे डागाळतो* त्याचीही मला घृणा वाटते,” असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. “म्हणून आपल्या मनाचं परीक्षण करा आणि योग्य मनोवृत्ती उत्पन्न करा. यापुढे विश्वासघात करू नका.+
१७ तुम्ही यहोवाला आपल्या शब्दांनी हैराण केलं आहे.+ पण तुम्ही म्हणता, ‘आम्ही त्याला कसं हैराण केलं?’ ‘दुष्टता करणारा प्रत्येक जण यहोवाच्या नजरेत चांगला आहे आणि तो त्याला स्वीकारतो,’+ असं बोलून आणि, ‘न्यायाचा देव कुठे आहे?’ असं म्हणून, तुम्ही त्याला हैराण केलं आहे.”
३ “पाहा! मी माझ्या दूताला पुढे पाठवत आहे आणि तो माझ्यासाठी मार्ग तयार* करेल.+ ज्या खऱ्या प्रभूचा तुम्ही शोध घेत आहात, तो अचानक आपल्या मंदिरात येईल.+ आणि ज्याची तुम्ही आनंदाने वाट पाहत आहात, तो कराराचा दूत येईल. पाहा! तो नक्कीच येईल,” असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.
२ “पण ज्या दिवशी तो येईल, त्या दिवशी कोण टिकून राहू शकेल आणि तो प्रकट होईल, तेव्हा कोण उभा राहू शकेल? कारण तो धातू शुद्ध करणाऱ्याच्या आगीसारखा आणि धोब्यांच्या साबणासारखा*+ असेल. ३ धातू शुद्ध करणारा जसा चांदी गाळायला बसतो, तसा तो लेव्यांच्या मुलांना शुद्ध करेल;+ तो त्यांना सोन्यासारखं आणि चांदीसारखं गाळेल आणि ते यहोवासाठी नीतीने भेट अर्पण करणाऱ्या लोकांसारखे होतील. ४ आणि पूर्वीच्या दिवसांप्रमाणे आणि प्राचीन काळाप्रमाणे, यहूदा आणि यरुशलेम यांच्या अर्पणामुळे यहोवाला आनंद* होईल.+
५ मी न्याय करायला तुमच्याकडे येईन. जादूटोणा करणारे,+ व्यभिचारी, खोट्या शपथा घेणारे,+ तसंच मजुराला, विधवेला व अनाथाला* लुबाडणारे,+ आणि जे विदेश्यांना मदत करत नाहीत,*+ अशा सर्वांना मी लगेच दोषी ठरवीन.* कारण त्यांनी माझं भय मानलं नाही,” असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.
६ “कारण मी यहोवा आहे; मी बदलत नाही.*+ म्हणूनच, याकोबच्या मुलांनो, तुमचा अजून नाश झाला नाही. ७ तुमच्या वाडवडिलांच्या काळापासून तुम्ही माझे कायदे मोडले आणि तुम्ही ते पाळले नाहीत.+ आता माझ्याकडे परत या, म्हणजे मी तुमच्याकडे परत येईन,”+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.
पण तुम्ही म्हणता: “आम्ही तुझ्याकडे कसं परत येऊ?”
८ “माणूस देवाला लुबाडू शकतो का? पण तुम्ही मला लुबाडत आहात.”
तुम्ही म्हणता: “आम्ही तुला कसं लुबाडलं?”
“दशांश* आणि अर्पणं आणण्याच्या बाबतीत. ९ तुम्ही खरोखर शापित आहात,* कारण तुम्ही मला लुबाडत आहात. हो, सगळं राष्ट्र मला लुबाडत आहे.” १० सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “माझ्या मंदिरात अन्न असावं,+ म्हणून संपूर्ण दशांश* कोठारात आणा;+ आणि मी तुमच्यासाठी आकाशाची फाटकं उघडून,+ काहीच कमी पडणार नाही इतक्या आशीर्वादांचा वर्षाव करतो* की नाही, याबद्दल मला पारखून पाहा.”+
११ “पीक खाऊन टाकणाऱ्या कीटकाला मी दम देईन, म्हणजे तो तुमच्या देशातल्या पिकांची आणि तुमच्या द्राक्षमळ्यातल्या फळांची नासधूस करणार नाही,”+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.
१२ “सर्व राष्ट्रं तुम्हाला सुखी म्हणतील,+ कारण तुमचा देश, आनंदाचा देश होईल,” असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.
१३ “तुम्ही माझ्याविरुद्ध कठोर शब्दांत बोललात,” असं यहोवा म्हणतो.
पण तुम्ही म्हणता: “आम्ही कधी आपसात तुझ्याविरुद्ध बोललो?”+
१४ “तुम्ही म्हणता, ‘देवाची सेवा करण्याचा काहीच उपयोग नाही.+ आम्ही सैन्यांचा देव यहोवा याच्यापुढे शोक करत चाललो आणि त्याच्या सगळ्या आज्ञा पाळल्या, त्याचा आम्हाला काय फायदा झाला? १५ आम्हाला तर गर्विष्ठ लोक सुखी वाटतात. आणि जे दुष्टपणे वागतात त्यांचीच भरभराट होते.+ ते देवाची परीक्षा घेण्याचं धाडस करतात, तरी त्यांना कोणतीच शिक्षा होत नाही.’”
१६ त्या वेळी, यहोवाची भीती बाळगणारे एकमेकांशी बोलले. प्रत्येक जण आपल्या सोबत्याशी बोलला. आणि यहोवा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकत होता. तेव्हा, जे यहोवाची भीती बाळगतात आणि त्याच्या नावावर मनन करतात*+ त्या सर्वांसाठी एक स्मरणाचं पुस्तक त्याच्यापुढे लिहिण्यात आलं.+
१७ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “मी आपल्यासाठी एक खास प्रजा*+ निर्माण करीन आणि त्या दिवशी ते सर्व माझे लोक होतील.+ जसा एखादा पिता आपली सेवा करणाऱ्या मुलाला दया दाखवतो, तशी मी त्यांना दया दाखवीन.+ १८ मग तुम्हाला पुन्हा एकदा, नीतिमान आणि दुष्ट माणसातला; आणि देवाची सेवा करणारा आणि न करणारा, यांतला फरक दिसून येईल.”+
४ “कारण पाहा! तो दिवस येत आहे. तो भट्टीच्या आगीसारखा धगधगत आहे.+ त्या दिवशी सगळे गर्विष्ठ आणि दुष्ट लोक सुकलेल्या गवतासारखे होतील. तो येणारा दिवस नक्कीच त्यांना भस्म करेल आणि तो त्यांचं मूळ किंवा फांदी, काहीच राहू देणार नाही,” असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. २ पण माझ्या नावाचा आदर करणाऱ्यांनो,* नीतीचा सूर्य तुमच्यावर चमकेल आणि त्याची किरणं* आरोग्य देतील; आणि तुम्ही धष्टपुष्ट वासरांसारखे इथे-तिथे उड्या माराल.”
३ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “तुम्ही दुष्टांना तुडवाल, कारण ज्या दिवशी मी हे घडवून आणीन, त्या दिवशी ते तुमच्या पायाच्या धुळीसारखे होतील.
४ माझा सेवक मोशे याचं नियमशास्त्र, म्हणजेच मी होरेब इथे सर्व इस्राएली लोकांना दिलेले कायदे आणि न्याय-निर्णय* आठवा.+
५ पाहा! यहोवाचा महान आणि विस्मयकारक दिवस+ येण्याआधी, मी तुमच्याकडे एलीया संदेष्ट्याला पाठवत आहे.+ ६ तो वडिलांची मनं मुलांकडे, आणि मुलांची मनं वडिलांकडे वळवेल.+ म्हणजे, मला येऊन पृथ्वीचा नाश करावा लागणार नाही.”
(हिब्रू-ॲरामेईक शास्त्राचं भाषांतर इथे संपतं. यानंतर ख्रिस्ती ग्रीक शास्त्राचं भाषांतर सुरू होतं.)
म्हणजे, “माझा दूत.”
एसावचं दुसरं नाव. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “माझा आदर करायला.”
शब्दशः “भाकर.”
इथे, सेवा म्हणून मंदिराचे दरवाजे बंद करण्याविषयी सांगितलं आहे.
किंवा “सूर्योदयाच्या दिशेपासून सूर्यास्ताच्या दिशेपर्यंत.”
किंवा कदाचित, “माझा.”
किंवा “व्यंग असलेला.”
शब्दशः “रागावीन.”
म्हणजे जिथे बलिदानांच्या प्राण्याचं शेण फेकलं जायचं.
किंवा “आदर करावा.”
किंवा “शिक्षण.”
किंवा “शिक्षणाबद्दल.”
किंवा कदाचित, “तुमच्या शिक्षणाने.”
किंवा कदाचित, “पवित्र ठिकाणावर.”
शब्दशः “जो जागा आहे आणि जो उत्तर देतो.”
शब्दशः “दुसरी.”
किंवा “कायदेशीर पत्नी.”
शब्दशः “देवाची संतती.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “त्याला.”
किंवा “जो हिंसाचार करतो.”
किंवा “मोकळा.”
किंवा “खारासारखा.”
किंवा “समाधान.”
किंवा “वडील नसलेल्या मुलाला.”
किंवा “विदेश्यांचे हक्क नाकारतात.”
किंवा “अशा सर्वांविरुद्ध मी लगेच साक्ष देईन.”
किंवा “मी बदललेलो नाही.”
किंवा “दहावे भाग.”
किंवा कदाचित, “तुम्ही मला शाप देऊन शापित करत आहात.”
किंवा “सगळे दहावे भाग.”
शब्दशः “रिकामं करतो.”
किंवा “विचार करतात.” किंवा कदाचित, “जपून ठेवतात.”
किंवा “मौल्यवान संपत्ती.”
शब्दशः “भय मानणाऱ्यांनो.”
शब्दशः “पंख.”
शब्दार्थसूची पाहा.