वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt हबक्कूक
  • हबक्कूक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हबक्कूक
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
हबक्कूक

हबक्कूक

१ हबक्कूक* संदेष्ट्याला एका दृष्टान्तात हा संदेश मिळाला. तो म्हणाला:

 २ “हे यहोवा,* मी मदतीसाठी तुला कुठपर्यंत हाक मारू? तू कधी माझं ऐकशील?+

या हिंसाचारापासून सुटका करण्याची मी कुठपर्यंत विनंती करू? तू माझी सुटका का करत नाहीस?*+

 ३ तू मला वाईट कामं होताना का पाहायला लावतोस?

तू अत्याचार का खपवून घेतोस?

ही लुबाडणूक आणि हिंसाचार मला का पाहावा लागत आहे?

हे भांडणतंटे आणि झगडे का वाढत आहेत?

 ४ कायदा कमजोर पडला आहे,

न्यायाचा कधीच विजय होत नाही.

कारण दुष्टांनी चांगल्या लोकांना* घेरलंय;

म्हणूनच योग्य न्याय होत नाही.+

 ५ ‘राष्ट्रांकडे पाहा आणि लक्ष द्या!

आश्‍चर्याने एकटक पाहा आणि थक्क व्हा;

कारण तुमच्या दिवसांत असं काहीतरी घडणार आहे,

की त्याबद्दल तुम्हाला सांगितलं, तरी तुमचा विश्‍वास बसणार नाही.+

 ६ कारण आता मी खास्दी लोकांना उभं करत आहे.+

ते एक निर्दयी आणि अविचारी राष्ट्र आहे.

जी घरं त्यांची नाहीत, ती काबीज करण्यासाठी

ते पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत जातात.+

 ७ ते भयानक आणि भीतिदायक आहेत.

ते स्वतःच कायदा ठरवतात आणि दुसऱ्‍यांवर अधिकार* गाजवतात.+

 ८ त्यांचे घोडे चित्त्यांपेक्षा चपळ आहेत,

आणि रात्री निघणाऱ्‍या लांडग्यांपेक्षा क्रूर आहेत.+

त्यांचे लढाईचे घोडे वेगाने धावतात;

त्यांचे घोडे दुरून येतात.

शिकारीवर झडप घालणाऱ्‍या गरुडांसारखे ते आहेत.+

 ९ ते सगळे हिंसाचार करण्याच्या इराद्याने येतात.+

पूर्वेच्या वाऱ्‍यासारखे+ ते पुढे पाहत वाटचाल करतात,

आणि वाळूच्या कणांसारखे असंख्य बंदिवानांना गोळा करतात.

१० ते राजांना तुच्छ लेखतात

आणि उच्च अधिकाऱ्‍यांवर+ हसतात.

ते प्रत्येक किल्ल्याची+ थट्टा करतात;

ते मातीचा ढीग रचून किल्ला काबीज करतात.

११ मग ते वाऱ्‍याच्या वेगाने वाटचाल करून देशातून जातात,

पण ते दोषी ठरतील,+

कारण आपल्या शक्‍तीचं श्रेय ते आपल्या देवाला देतात.’*+

१२ हे यहोवा, तू तर सर्वकाळापासून आहेस.+

हे माझ्या देवा, माझ्या पवित्र देवा, तुला मरण नाही.*+

हे यहोवा, तू न्यायदंड आणण्यासाठी त्यांना नेमलं आहेस.

हे माझ्या खडका,+ तू शिक्षा देण्यासाठी* त्यांना निवडलं आहेस.+

१३ तुझे डोळे इतके शुद्ध आहेत, की तुला अनीती पाहवत नाही,

तुला दुष्टता सहन होत नाही.+

मग तू विश्‍वासघातकी लोकांना का खपवून घेतोस?+

आणि जेव्हा दुष्ट आपल्यापेक्षा चांगल्या* माणसाला गिळून टाकतो, तेव्हा तू गप्प का राहतोस?+

१४ तू माणसाला समुद्रातल्या माशांसारखा,

आणि कोणताही शासक नसलेल्या किड्यामुंग्यांसारखा का करतोस?

१५ त्या सर्वांना तो* गळाने उचलतो.

तो जाळं टाकून त्यांना पकडतो;

तो आपल्या जाळ्यात त्यांना गोळा करतो.

आणि यामुळे तो खूप खूश होतो.+

१६ म्हणूनच तो आपल्या जाळ्याला बलिदानं अर्पण करतो

आणि मासे पकडण्याच्या आपल्या जाळ्यासमोर हवन करतो;

कारण यांमुळेच त्याला चांगलं* अन्‍न

आणि उत्तम पदार्थ मिळतात.

१७ मग तो असंच आपलं जाळं रिकामं करत राहील का?*

तो असाच निर्दयीपणे राष्ट्रांची कत्तल करत राहील का?+

२ मी तर माझ्या पहाऱ्‍याच्या चौकीवर उभा राहीन,+

आणि मी बुरुजावरून हलणार नाही.

तो माझ्याद्वारे काय बोलतो, याची मी वाट पाहत राहीन,

आणि ताडन मिळाल्यावर काय उत्तर द्यावं, यावर मी विचार करत राहीन.”

 २ मग यहोवाने मला उत्तर दिलं:

“हा दृष्टान्त लिहून ठेव आणि मोठ्याने वाचणाऱ्‍याला सहज* वाचता यावा,+

म्हणून तो पाट्यांवर स्पष्टपणे कोरून ठेव.+

 ३ कारण हा दृष्टान्त अजूनही आपल्या नेमलेल्या वेळेची वाट पाहत आहे,

तो लवकरच पूर्ण होईल, तो खोटा ठरणार नाही.

तो पूर्ण व्हायला उशीर लागला,* तरी त्याची वाट पाहत राहा!*+

कारण तो नक्कीच खरा ठरेल.

त्याला उशीर होणार नाही!

 ४ गर्विष्ठाकडे पाहा;

तो सरळ मनाचा नाही.

पण नीतिमान आपल्या विश्‍वासूपणामुळे* जगेल.+

 ५ खरोखर, द्राक्षारस विश्‍वासघातकी आहे,

त्यामुळे गर्विष्ठ माणूस आपलं ध्येय गाठणार नाही.

तो कबरेसारखा* भुकेला आहे;

आणि मृत्यूसारखा अधाशी* आहे.

तो राष्ट्रांना एकत्र करत राहतो

आणि सर्व लोकांना बंदी बनवतो.+

 ६ हे सर्व लोक त्याच्याविरुद्ध म्हणी वापरणार नाहीत का?

ते टोमणे मारून आणि कोडी घालून बोलणार नाहीत का?+

ते म्हणतील:

‘जे आपलं नाही, ते गोळा करणाऱ्‍याचा

आणि जो आपलं कर्ज आणखी वाढवतो, त्याचा धिक्कार असो!

पण हे सारं कुठपर्यंत?

 ७ तुला कर्ज देणारे अचानक तुझ्याविरुद्ध उठणार नाहीत का?

ते उठतील आणि तुला धरून जोरजोराने हलवतील,

ते तुझी संपत्ती लुटतील.+

 ८ तू बऱ्‍याच राष्ट्रांना लुटलंस,

म्हणून त्यांतले उरलेले लोक तुला लुटतील,+

कारण तू माणसांचं रक्‍त सांडलंस;

तू जमिनीचा,

शहरांचा आणि त्यांत राहणाऱ्‍यांचा नाश केलास.+

 ९ आपल्या घराण्यासाठी बेइमानीचं धन कमवणाऱ्‍याचा धिक्कार असो!

तो संकटापासून सुटण्यासाठी

आपलं घरटं उंचावर बांधतो.

१० तुझ्या कटकारस्थानांमुळे तुझ्या घराण्याची बेअब्रू होते.

पुष्कळ लोकांचा नाश करून तू स्वतःविरुद्धच* पाप करतोस.+

११ भिंतीमधून दगड ओरडेल,

आणि छतातला लाकडी खांबही बोलेल.

१२ रक्‍तपाताने शहर बांधणाऱ्‍याचा,

आणि अनीतीने नगर वसवणाऱ्‍याचा धिक्कार असो!

१३ पाहा! जे शेवटी आगीत जाणार आहे त्यासाठी लोक मेहनत करतात,

आणि राष्ट्रं व्यर्थ गोष्टींसाठी घाम गाळतात.+

हे सैन्यांचा देव यहोवा याच्याकडूनच नाही का?

१४ कारण जसा समुद्र पाण्याने भरला आहे,

तशीच ही पृथ्वी यहोवाच्या गौरवाविषयीच्या ज्ञानाने भरून जाईल.+

१५ आपल्या सोबत्यांची नग्नता पाहण्यासाठी

जो त्यांना मद्य पाजतो, त्याचा धिक्कार असो!

त्यांनी पिऊन धुंद व्हावं, म्हणून तो त्यात क्रोध आणि संताप मिसळतो.

१६ तुझा सन्मान होण्याऐवजी तुझी बेअब्रू होईल.

तुलाही मद्य पाजलं जाईल आणि तू आपली बेसुनत* स्थिती उघडी करशील.*

यहोवाच्या उजव्या हातातल्या प्याल्यातून तुलाही प्यावं लागेल,+

आणि गौरवाऐवजी तुझी लाजिरवाणी अवस्था होईल.

१७ कारण लबानोनविरुद्ध केलेला हिंसाचार तुला घेरेल,

आणि तू प्राण्यांना दहशत बसवून त्यांचा केलेला नाश तुझ्यावर उलटेल,

कारण तू माणसांचं रक्‍त सांडलंस;

तू जमिनीचा,

शहरांचा आणि त्यांत राहणाऱ्‍यांचा नाश केलास.+

१८ मूर्ती बनवणाऱ्‍याने जी मूर्ती स्वतःच कोरली आहे,

तिचा काय फायदा?

धातूची मूर्ती* बनवणाऱ्‍याचा तिच्यावर कितीही भरवसा असला,

तरी त्या मूर्तीचा आणि त्या खोट्या शिक्षकाचा काय उपयोग?

जे बोलूही शकत नाहीत, असे निरुपयोगी देव बनवण्याचा काय फायदा?+

१९ जो लाकडाच्या तुकड्याला “ऊठ!” असं म्हणतो,

किंवा मुक्या दगडाला, “जागा हो! आम्हाला शिकव!” असं म्हणतो, त्याचा धिक्कार असो!

पाहा! तो सोन्याने आणि चांदीने मढवलेला आहे,+

त्यात अजिबात प्राण* नाही.+

२० पण यहोवा त्याच्या पवित्र मंदिरात आहे.+

सबंध पृथ्वीने त्याच्यापुढे शांत राहावं!’”+

३ हबक्कूक संदेष्ट्याने शोकगीत गाऊन केलेली प्रार्थना:

 २ “हे यहोवा, मी तुझ्या पराक्रमांबद्दल ऐकलंय.

हे यहोवा, तुझ्या कार्यांबद्दल ऐकून मी अगदी थक्क झालोय.

या वर्षांदरम्यान* तशीच कार्यं पुन्हा कर!

या वर्षांदरम्यान* ती सर्वांना कळू दे.

संकटाच्या काळात दया दाखवायला विसरू नकोस.+

 ३ देव तेमानहून आला,

पवित्र देव पारान पर्वतावरून आला.+ (सेला )*

त्याच्या वैभवाने आकाशाला झाकून टाकलं;+

त्याच्या स्तुतीने पृथ्वी भरून गेली.

 ४ त्याचं तेज प्रकाशासारखं होतं.+

त्याच्या हातातून दोन किरणं निघत होती.

त्यात त्याचं सामर्थ्य दडलेलं होतं.

 ५ रोगाची साथ+ त्याच्यापुढे जात होती,

आणि फणफणता ताप त्याच्यामागून येत होता.

 ६ तो स्तब्ध उभा राहिला आणि त्याने पृथ्वीला हादरून सोडलं.+

त्याने एक नजर टाकताच राष्ट्रांचा थरकाप उडाला.+

सर्वकाळापासून उभे असलेले पर्वत कोसळले,

आणि वर्षानुवर्षांपासून असलेल्या टेकड्या खाली वाकल्या.+

हे त्याचे पूर्वीपासूनचे मार्ग आहेत.

 ७ कूशानच्या तंबूंत मला संकट दिसलं.

मिद्यान देशाच्या तंबूंची कापडं फडफडू लागली.+

 ८ हे यहोवा, तू नद्यांवर रागावला आहेस का?

तुझा क्रोध नद्यांवर भडकला आहे का?

की तू समुद्रावर संतापला आहेस?+

तू आपल्या घोड्यांवर स्वार झालास;+

तुझे रथ विजयी झाले.*+

 ९ तू आपलं धनुष्य काढून तयार केलं आहेस.

तुझ्या शस्त्रांना* तू शपथ घालून नेमलं आहेस.* (सेला )

तू नद्यांनी पृथ्वीला दुभंगून टाकतोस.

१० तुला पाहून पर्वत वेदनांनी तळमळले.+

वादळी पावसामुळे पाण्याचे लोट वाहत आले.

पृथ्वीच्या पोटातल्या पाण्याने गर्जना केली.+

ते वर उफाळून आलं.*

११ सूर्य आणि चंद्र त्यांच्या उच्च ठिकाणी स्तब्ध झाले.+

तुझे बाण प्रकाशासारखे निघाले.+

तुझा भाला विजेसारखा चकाकला.

१२ तू संतप्त होऊन पृथ्वीवरून चाललास.

तू क्रोधाने राष्ट्रांना तुडवलंस. *

१३ तू आपल्या लोकांना तारण्यासाठी, तुझ्या अभिषिक्‍ताला वाचवण्यासाठी निघालास.

दुष्टांच्या घराच्या पुढाऱ्‍याला* तू चिरडून टाकलंस.

त्यांचं घर पायापासून छतापर्यंत* उघडं पडलं. (सेला )

१४ त्याचे योद्धे मला विखरून टाकायला तुफानासारखे आले,

एकांतात दुःखी माणसाला नष्ट करायला त्यांना खूप आनंद वाटला,

पण तू त्याचीच शस्त्रं* त्याच्या योद्ध्यांच्या डोक्यात खुपसलीस.

१५ तू आपल्या घोड्यांवरून समुद्रातून,

अथांग सागराच्या उसळत्या पाण्यातून स्वारी केलीस.

१६ मी ऐकलं तेव्हा माझ्या काळजाचा थरकाप उडाला;

त्या आवाजाने माझे ओठ थरथर कापू लागले.

माझी हाडं खिळखिळी झाली;+

माझे पाय लटपटू लागले.

पण तरी मी संकटाच्या दिवसाची शांतपणे वाट पाहीन,+

कारण आमच्यावर हल्ला करणाऱ्‍या लोकांवर तो दिवस येत आहे.

१७ जरी अंजिराच्या झाडाला बहर आला नाही,

आणि द्राक्षवेलींवर द्राक्षं आली नाहीत;

जरी जैतुनाचं पीक बुडालं,

आणि शेतांत काहीच अन्‍न उगवलं नाही;

जरी मेंढवाड्यातून कळप नाहीसे झाले,

आणि गोठ्यांत गुरंढोरं उरली नाहीत,

१८ तरीही मी यहोवामुळे आनंदी होईन;

माझं तारण करणाऱ्‍या देवामुळे मी हर्ष करीन.+

१९ सर्वोच्च प्रभू यहोवा माझी ताकद आहे;+

तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करेल

आणि मला उच्च स्थानांवर चालवेल.+

संचालकाला; माझ्या तंतुवाद्यांसोबत गाण्यासाठी.”

याचा अर्थ कदाचित, “कडकडून मारलेली मिठी” असा असावा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “वाचवत का नाहीस?”

किंवा “नीतिमानांना.”

किंवा “मोठेपणा.”

किंवा कदाचित, “त्यांची ताकद त्यांचा देव आहे.”

किंवा कदाचित, “आम्ही मरणार नाही.”

किंवा “ताडन देण्यासाठी.”

किंवा “नीतिमान.”

म्हणजे, खास्दी शत्रू.

शब्दशः “तेलकट.”

किंवा कदाचित, “आपली तलवार उपसत राहील का?”

किंवा “न अडखळता.”

किंवा “उशीर लागत आहे असं वाटलं.”

किंवा “उत्सुकतेने वाट पाहा.”

किंवा कदाचित, “विश्‍वासामुळे.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “अतृप्त.”

किंवा “आपल्या जिवाविरुद्धच.”

किंवा “सुंता न झालेली.”

किंवा कदाचित, “आणि तू अडखळत चालशील.”

किंवा “ओतीव मूर्ती.”

किंवा “श्‍वास.”

किंवा कदाचित, “आमच्या काळात.”

किंवा कदाचित, “आमच्या काळात.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “तुझ्या रथांनी तारण केलं.”

किंवा कदाचित, “बाणांना.”

किंवा कदाचित, “वंशांच्या शपथा सांगण्यात आल्या आहेत.”

हे कदाचित लाटांना सूचित करत असावं.

शब्दशः “झोडपलंस.”

शब्दशः “डोकं.”

शब्दशः “मान.”

शब्दशः “त्याचेच दांडे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा