वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt नहूम १:१-३:१९
  • नहूम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नहूम
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
नहूम

नहूम

१ हे एल्कोश इथल्या नहूम* याला झालेल्या दृष्टान्ताचं पुस्तक आहे. निनवेविरुद्ध न्यायदंडाची घोषणा:+

 २ फक्‍त आपलीच उपासना केली जावी अशी यहोवा* अपेक्षा करतो;+

यहोवा आपल्या शत्रूंना शिक्षा देतो.

तो त्यांची वाईट कृत्यं विसरत नाही आणि त्यांच्यावर आपला क्रोध ओततो.+

यहोवा आपल्या वैऱ्‍यांवर सूड उगवतो.

 ३ यहोवा लगेच रागवत नाही.+ त्याच्याकडे अफाट शक्‍ती आहे,+

पण यहोवा अपराध्यांना योग्य शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.+

तो विनाश करणाऱ्‍या वाऱ्‍यात आणि वादळात चालतो.

आणि ढग त्याच्या पायाची धूळ आहेत.+

 ४ तो समुद्राला दम देतो+ आणि त्याला सुकवतो;

तो सगळ्या नद्या कोरड्या करतो.+

बाशान आणि कर्मेल सुकून जातात.+

आणि लबानोनची फुलं कोमेजतात.

 ५ त्याच्यामुळे पर्वत थरथरतात,

आणि टेकड्या विरघळतात.+

त्याच्या चेहऱ्‍यामुळे पृथ्वीचा थरकाप होईल,

जग आणि त्यात राहणाऱ्‍या सर्वांचा थरकाप उडेल.+

 ६ त्याच्या संतापासमोर कोण उभा राहू शकतो?+

आणि त्याच्या भयानक क्रोधापुढे कोण टिकू शकतो?+

त्याचा राग आगीसारखा ओतला जाईल,

आणि त्याच्यामुळे खडकांचे तुकडे होतील.

 ७ यहोवा चांगला आहे,+ संकटाच्या दिवशी तो आश्रयाचं ठिकाण होतो.+

त्याच्यात शरण घेणाऱ्‍यांची तो काळजी घेतो.*+

 ८ वाहून नेणाऱ्‍या पुराने तो तिच्या* ठिकाणाचा सर्वनाश करेल,

आणि काळोख त्याच्या शत्रूंचा पाठलाग करेल.

 ९ यहोवाविरुद्ध तू काय कट रचणार?

तो तुझा असा सर्वनाश करेल,

की त्याला दुसऱ्‍यांदा संकट आणावं लागणार नाही.+

१० ते काट्यांसारखे गुंतलेले आहेत;

ते मद्याच्या नशेत असलेल्यांसारखे आहेत.

पण ते सुक्या गवतासारखे भस्म होतील.

११ यहोवाविरुद्ध दुष्ट योजना करणारा,

आणि बिनकामाचा सल्ला देणारा तुझ्यातून येईल.

१२ यहोवा म्हणतो:

“ते खूप ताकदवान आणि असंख्य असले,

तरी त्यांना कापून टाकलं जाईल आणि ते नाहीसे होतील. *

मी तुला* शिक्षा केली आहे, पण यापुढे मी तुला शिक्षा करणार नाही.

१३ आता मी तुझ्यावर असलेलं त्याचं जू* तोडून टाकीन,+

आणि तुझ्या बेड्यांचे दोन तुकडे करीन.

१४ यहोवाने तुझ्याबद्दल* अशी आज्ञा दिली आहे,

‘कोणीही तुझं नाव पुढे चालवणार नाही.

तुझ्या देवांच्या मंदिरातल्या* कोरीव आणि धातूच्या मूर्तींचा* मी नाश करीन.

तू घृणास्पद आहेस, म्हणून मी तुझ्यासाठी एक कबर बनवीन.’

१५ पाहा, आनंदाचा संदेश सांगणारा,

शांतीची घोषणा करणारा+ डोंगरांवरून येत आहे,

हे यहूदा, आपले सण साजरे कर,+ आपले नवस फेड,

कारण दुष्ट लोक पुन्हा तुझ्यावर हल्ला करणार नाहीत.

त्यांचा पूर्णपणे नाश केला जाईल.”

२ पांगापांग करणारा तुझ्याविरुद्ध* आला आहे.+

तटबंदीचं संरक्षण कर.

रस्त्यावर पहारा ठेव.

आपली सगळी शक्‍ती गोळा करून सुसज्ज हो.

 २ कारण यहोवा याकोबचा गौरव त्याला परत देईल,

तसंच, तो इस्राएललाही त्याचं वैभव परत देईल.

कारण नाश करणाऱ्‍यांनी त्यांचा नाश केला आहे;+

आणि त्यांनी त्यांच्या फांद्यांची नासधूस केली आहे.

 ३ त्याच्या वीरांच्या ढाली लाल रंगाने रंगवलेल्या आहेत,

त्याच्या योद्ध्यांची वस्त्रं गडद लाल रंगाची आहेत.

तो युद्धाची तयारी करतो, त्या दिवशी

त्याच्या लढाईच्या रथांवर लावलेलं लोखंड आगीसारखं चमकतं

आणि त्याचे सैनिक लाकडी भाले* फिरवतात.

 ४ लढाईचे रथ रस्त्यांवरून बेफाम धावत आहेत.

ते चौकांमध्ये इकडून तिकडे वेगाने पळत आहेत.

ते जळत्या मशालींसारखे चमकतात आणि वीजेसारखे चकाकतात.

 ५ तो आपल्या अधिकाऱ्‍यांना बोलावून घेईल.

ते अडखळत येतील.

ते घाईघाईने तिच्या भिंतीकडे जाऊन,

तिथे अडथळा उभारतील.

 ६ नद्यांची फाटकं उघडली जातील,

आणि राजवाडा कोसळेल.*

 ७ हे फर्मान अटळ आहे: तिला उघडं पाडण्यात आलं आहे;

तिला बंदिवासात नेलं आहे,

तिच्या दासी छाती* बडवून, कबुतरांसारख्या विव्हळत आहेत.*

 ८ निनवे+ पूर्वीपासून पाण्याच्या तळ्यासारखी होती,

पण आता लोक पळून जात आहेत.

“थांबा! थांबा!” असं म्हणूनही

कोणी मागे वळून पाहत नाही.+

 ९ चांदी लुटा, सोनं लुटा!

खजिन्याला काही अंतच नाही.

तो सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तूंनी भरलेला आहे.

१० शहर रिकामं, ओसाड आणि उद्ध्‌वस्त झालं आहे!+

त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं आहे, त्यांचे गुडघे लटपटत आहेत, त्यांच्या कंबरेत कळा येत आहेत;

त्यांचे चेहरे पांढरे पडले आहेत.

११ सिंहांची+ गुहा कुठे आहे? तिथे तरुण सिंह* शिकार खातात,

तिथे सिंह आपल्या बछड्यांना नेतो,

आणि तिथे त्यांना कोणाचीही भीती नसते.

१२ सिंह आपल्या बछड्यांसाठी भरपूर शिकार करायचा

आणि आपल्या सिंहिणींसाठी प्राण्यांची नरडी धरायचा,

तो आपल्या शिकारीच्या मांसाने

आणि फाडलेल्या प्राण्यांनी आपल्या गुहा भरायचा.

१३ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “पाहा! मी तुझ्या विरोधात आहे,+

मी तिचे लढाईचे रथ जाळीन आणि त्यांचा धूर निघेल;+

तुझे तरुण सिंह,* तलवारीने मारले जातील.

मी तुला पृथ्वीवर कुठेही शिकार करू देणार नाही,

आणि तुझ्या दूतांचा आवाज पुन्हा ऐकू येणार नाही.”+

३ रक्‍तपात करणाऱ्‍या नगरीचा धिक्कार असो!

ती फसवणूक आणि लुटालूट यांनी भरलेली आहे.

तिच्या लुबाडणुकीला अंत नाही!

 २ ऐका! चाबकाच्या फटकाऱ्‍याचा, चाकांच्या खडखडाटाचा,

घोड्याच्या टापांचा आणि धावणाऱ्‍या रथाचा आवाज येत आहे.

 ३ पाहा! घोडेस्वार, तळपती तलवार आणि चकाकता भाला.

कत्तल झालेल्यांचे असंख्य मृतदेह आणि शवांचे ढीग दिसत आहेत.

सगळीकडे प्रेतंच प्रेतं आहेत.

लोक प्रेतांवरून अडखळत आहेत.

 ४ हे सर्व त्या वेश्‍येच्या बऱ्‍याच अनैतिक कृत्यांमुळे घडलं आहे.

ती सुंदर आणि मोहक आहे, ती भूतविद्या करण्यात कुशल आहे,

ती आपल्या व्यभिचाराने राष्ट्रांना आणि आपल्या भूतविद्येने घराण्यांना जाळ्यात ओढते.

 ५ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “पाहा! मी तुझ्या* विरोधात आहे.+

मी तुझा परकर तुझ्या तोंडापर्यंत उचलीन;

मी राष्ट्रांना तुझी नग्नता,

आणि राज्यांना तुझी लाज पाहायला लावीन.

 ६ मी तुझ्यावर घाण फेकीन

आणि लोकांना तुझी घृणा वाटेल;

ते तुझा तमाशा पाहतील.+

 ७ तुला पाहणारा प्रत्येक जण तुझ्यापासून दूर पळेल+ आणि म्हणेल,

‘निनवेचा सर्वनाश झाला आहे!

तिच्यासाठी कोण शोक करेल?’

तुला सांत्वन देणारे मी कुठून शोधू?

 ८ नाईलच्या कालव्यांच्या+ बाजूला असलेल्या नोआमोन*+ नगरीपेक्षा तू चांगली आहेस का?

ती पाण्याने वेढलेली होती;

समुद्र तिची संपत्ती होती आणि तो तिचं रक्षण करणाऱ्‍या भिंतीसारखा होता.

 ९ इथियोपिया* आणि इजिप्त* यांच्याकडून तिला अमर्याद शक्‍ती मिळायची.

पूट+ आणि लिबियाचे लोक तुझे सहायक होते.+

१० पण तीसुद्धा बंदिवासात गेली;

तिलाही कैद करून नेण्यात आलं.+

तिच्या मुलाबाळांना रस्त्यांच्या कोपऱ्‍यांवर आपटून मारण्यात आलं.

तिच्या प्रतिष्ठित माणसांवर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या,

आणि तिच्या सर्व महान पुरुषांना बेड्यांनी जखडण्यात आलं.

११ तूही मद्याने धुंद होशील;+

तू लपून बसशील.

शत्रूंपासून बचावासाठी तू आश्रय शोधशील.

१२ तुझे सर्व किल्ले पहिल्या पिकलेल्या अंजिरांच्या झाडांसारखे आहेत;

ती झाडं हलवली, तर अंजिरं सहज खाणाऱ्‍यांच्या तोंडात पडतील.

१३ पाहा! तुझं सैन्य बायकांसारखं आहे.

तुझ्या देशाची फाटकं शत्रूंसाठी सताड उघडी असतील.

तुझ्या फाटकांचे अडसर आगीत भस्म होतील.

१४ पाणी भर, कारण वेढा पडणार आहे!+

किल्ले मजबूत कर.

चिखलात उतर आणि तो पायांनी तुडव;

विटा तयार करण्याचा साचा घे.

१५ तरीही आग तुझा नाश करेल.

तलवार तुझी कत्तल करेल.+

टोळांसारखी ती तुला फस्त करेल.+

स्वतःला टोळांसारखं असंख्य कर!

हो, स्वतःला टोळांसारखं अगणित कर!

१६ तू आपल्या व्यापाऱ्‍यांची संख्या आकाशातल्या ताऱ्‍यांपेक्षा वाढवली आहेस.

लहान टोळ आपली कात टाकून उडून जातात.

१७ तुझे पहारेकरी टोळांसारखे,

आणि तुझे अधिकारी टोळधाडीसारखे आहेत.

ते थंडीच्या दिवसांत भिंतींमागे आश्रय घेतात,

पण ऊन पडताच उडून जातात;

आणि ते कुठे आहेत हे कोणालाच कळत नाही.

१८ हे अश्‍शूरच्या राजा, तुझे मेंढपाळ पेंगत आहेत;

तुझे प्रतिष्ठित लोक घरी आरामात पडले आहेत.

तुझ्या लोकांची डोंगरांमध्ये पांगापांग झाली आहे,

आणि त्यांना गोळा करणारं कोणीही नाही.+

१९ या भयंकर संकटापासून तुझी सुटका नाही.

तुझी जखम बरी होणं शक्य नाही.

तुझ्याबद्दलची बातमी ऐकणारे सर्व जण टाळ्या वाजवतील;+

कारण तुझी भयकंर क्रूरता ज्याने सोसली नाही, असा कोण आहे?”+

म्हणजे, “सांत्वन देणारा.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “लक्षात ठेवतो.” शब्दशः “ओळखतो.”

म्हणजे, निनवे.

किंवा कदाचित, “तो त्यांच्या मधून जाईल.”

म्हणजे, यहूदा.

शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, अश्‍शूर.

किंवा “घरातल्या.”

किंवा “ओतीव मूर्तींचा.”

म्हणजे, निनवे.

किंवा “गंधसरूचे भाले.”

किंवा “विरघळेल.”

शब्दशः “हृदयं.”

किंवा “रडत आहेत.”

किंवा “आयाळ असलेले तरुण सिंह.”

किंवा “आयाळ असलेले तरुण सिंह.”

म्हणजे, निनवे.

म्हणजे, थीब्ज.

किंवा “कूश.”

किंवा “मिसर.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा