वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt आमोस १:१-९:१५
  • आमोस

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमोस
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
आमोस

आमोस

१ आमोस* याला दृष्टान्ताद्वारे मिळालेला हा संदेश आहे. आमोस तकोवाच्या+ मेंढपाळांपैकी एक होता. त्याला भूकंपाच्या दोन वर्षांपूर्वी,+ यहूदाचा राजा उज्जीया+ आणि इस्राएलचा राजा, म्हणजे योवाशचा+ मुलगा यराबाम+ यांच्या शासनकाळात, इस्राएलबद्दल हा दृष्टान्त झाला. २ आमोस म्हणाला:

“यहोवा* सीयोनमधून गरजेल,

आणि यरुशलेममधून घोषणा करेल.

मेंढपाळांची कुरणं शोक करतील,

आणि कर्मेलच्या शिखरावरची हिरवळ सुकेल.”+

 ३ “यहोवा म्हणतो,

‘“दिमिष्कने तीन नाही, तर चार वेळा बंड* केलं; म्हणून मी माझा निर्णय बदलणार नाही,

कारण त्यांनी गिलादला मळणीच्या यंत्रांनी मळलं.+

 ४ म्हणून मी हजाएलच्या+ घरावर आग पाठवीन,

आणि ती बेन-हदादचे बुरूज भस्म करेल.+

 ५ मी दिमिष्कचे अडसर तोडून टाकीन;+

मी बिकथ-आवेनच्या रहिवाशांचा,

आणि बेथ-एदनवरून शासन करणाऱ्‍याचा* नाश करीन;

आणि अरामचे लोक बंदिवान म्हणून कीर इथे जातील,”+ असं यहोवा म्हणतो.’

 ६ यहोवा म्हणतो,

‘“गाझाने तीन नाही, तर चार वेळा बंड केलं;+ म्हणून मी माझा निर्णय बदलणार नाही,

कारण त्यांनी सगळ्या लोकांना बंदिवान बनवून+ अदोमच्या हाती दिलं.

 ७ म्हणून मी गाझाच्या भिंतीवर आग पाठवीन,+

आणि ती तिचे बुरूज भस्म करेल.

 ८ मी अश्‍दोदच्या रहिवाशांचा,

आणि अष्कलोनवरून शासन करणाऱ्‍याचा* नाश करीन;+

मी एक्रोनविरुद्ध माझा हात उगारीन+

आणि उरलेल्या पलिष्टी लोकांचा नाश होईल,”+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.’

 ९ यहोवा म्हणतो,

‘सोरने तीन नाही, तर चार वेळा बंड केलं;+ म्हणून मी माझा निर्णय बदलणार नाही,

कारण त्यांनी सगळ्या बंदिवानांना अदोमच्या हाती दिलं,

आणि ते भावांचा करार विसरले.+

१० म्हणून मी सोरच्या भिंतीवर आग पाठवीन,

आणि ती तिचे बुरूज भस्म करेल.’+

११ यहोवा म्हणतो,

‘अदोमने तीन नाही, तर चार वेळा बंड केलं;+ म्हणून मी माझा निर्णय बदलणार नाही,

कारण त्याने तलवार घेऊन आपल्याच भावाचा पाठलाग केला,+

आणि त्याने दया दाखवायला नकार दिला;

तो आपल्या रागाच्या भरात त्यांना सतत फाडून खातो,

आणि त्यांच्यावर कायम संतापलेला असतो.+

१२ म्हणून मी तेमानवर आग पाठवीन,+

आणि ती बस्राचे बुरूज भस्म करेल.’+

१३ यहोवा म्हणतो,

‘“अम्मोनी लोकांनी तीन नाही, तर चार वेळा बंड केलं;+ म्हणून मी माझा निर्णय बदलणार नाही,

कारण त्यांनी आपल्या देशाच्या सीमा वाढवण्यासाठी+ गिलादच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकलं.

१४ म्हणून मी राब्बाच्या भिंतीवर आग पाठवीन,+

आणि ती तिचे बुरूज भस्म करेल,

युद्धाच्या दिवशी लढाईची घोषणा ऐकू येईल,

वादळी वाऱ्‍याच्या दिवशी तुफान येईल.

१५ आणि त्यांच्या राजाला आणि त्याच्या अधिकाऱ्‍यांना* बंदिवान म्हणून नेलं जाईल,”+ असं यहोवा म्हणतो.’

२ यहोवा म्हणतो,

‘“मवाबने तीन नाही, तर चार वेळा बंड* केलं;+ म्हणून मी माझा निर्णय बदलणार नाही,

कारण त्याने अदोमच्या राजाची हाडं जाळून त्यांची राख* केली.

 २ म्हणून मी मवाबवर आग पाठवीन

आणि ती करियोथचे बुरूज भस्म करेल;+

मवाब मरेल तेव्हा गोंधळ माजलेला असेल,

लढाईची घोषणा केली जाईल आणि शिंग फुंकलं जाईल.+

 ३ मी तिच्यामधून शासन करणाऱ्‍याला* काढून टाकीन,

त्याच्यासोबत त्याच्या सर्व अधिकाऱ्‍यांनाही मी मारून टाकीन,”+ असं यहोवा म्हणतो.’

 ४ यहोवा म्हणतो,

‘यहूदाने तीन नाही, तर चार वेळा बंड केलं;+ म्हणून मी माझा निर्णय बदलणार नाही,

कारण त्यांनी यहोवाचं नियमशास्त्र* नाकारलं,

आणि त्यांनी त्याचे कायदे पाळले नाहीत.+

उलट, त्यांचे वाडवडील ज्या खोट्या गोष्टींच्या मागे लागले, त्याच गोष्टींमुळे तेही भरकटले.+

 ५ म्हणून मी यहूदावर आग पाठवीन

आणि ती यरुशलेमचे बुरूज भस्म करेल.’+

 ६ यहोवा म्हणतो,

‘इस्राएलने तीन नाही, तर चार वेळा बंड केलं;+ म्हणून मी माझा निर्णय बदलणार नाही,

कारण ते नीतिमानाला चांदीसाठी,

आणि गरिबाला चपलांच्या जोडासाठी विकतात.+

 ७ ते गोरगरिबांचं डोकं पायाखाली तुडवतात,+

आणि दीनदुबळ्यांचा रस्ता अडवतात.+

मुलगा आणि बाप एकाच मुलीशी संबंध ठेवतात,

आणि माझं पवित्र नाव दूषित करतात.

 ८ ते तारण म्हणून जप्त केलेल्या वस्त्रांवर+ प्रत्येक वेदीच्या+ जवळ अंग पसरतात;

दंड म्हणून वसूल केलेल्या पैशांनी ते आपल्या देवांच्या मंदिरात द्राक्षारस पितात.’

 ९ ‘पण मी त्यांच्यासमोर अमोऱ्‍याचा नाश केला;+

तो देवदार वृक्षांसारखा उंच आणि अल्लोन* वृक्षांसारखा मजबूत होता,

मी वरती त्याचं फळ आणि खाली त्याचं मूळ नष्ट केलं.+

१० अमोऱ्‍याच्या देशाचा ताबा घेण्यासाठी,

मी तुम्हाला इजिप्त* देशातून बाहेर आणलं+

आणि ४० वर्षं ओसाड रानातून चालवलं.+

११ तुमच्या मुलांपैकी काहींना मी संदेष्टे म्हणून,+

आणि तुमच्या तरुणांपैकी काहींना नाझीर*+ म्हणून नेमलं.

इस्राएली लोकांनो, हे खरं नाही का?’ असं यहोवा म्हणतो.

१२ ‘पण तुम्ही त्या नाझीरांना* द्राक्षारस पाजत राहिलात,+

आणि संदेष्ट्यांना, “तुम्ही भविष्यवाणी करू नका,” असा आदेश दिलात.+

१३ म्हणून, धान्याने भरलेल्या गाड्याखाली जशी जमीन दबते,

तसा मी तुम्हाला तुमच्या ठिकाणी चिरडून टाकीन.

१४ जो चपळ आहे, त्याला पळायला जागा सापडणार नाही,+

जो ताकदवान आहे, त्याच्याकडे शक्‍ती उरणार नाही,

आणि कोणत्याही योद्ध्याला आपला जीव वाचवता येणार नाही.

१५ धनुष्य चालवणारा उभा राहू शकणार नाही,

जो वेगवान आहे, त्याला पळता येणार नाही,

आणि घोडेस्वाराला आपला जीव वाचवता येणार नाही.

१६ योद्ध्यांपैकी जो सर्वात धैर्यवान आहे,

तोसुद्धा त्या दिवशी उघडाच पळून जाईल,’+ असं यहोवा म्हणतो.”

३ “हे इस्राएली लोकांनो, यहोवाने तुमच्याविषयी, म्हणजे त्याने इजिप्त देशातून बाहेर आणलेल्या सबंध घराण्याविषयी सांगितलेला हा संदेश ऐका:

 २ ‘पृथ्वीवरच्या सर्व घराण्यांपैकी मी फक्‍त तुमच्याच घराण्याला ओळखतो.+

म्हणूनच तुमच्या सर्व अपराधांबद्दल मी तुमच्याकडून हिशोब घेईन.+

 ३ जर दोन जणांनी भेटायचंच ठरवलं नसेल, तर ते सोबत चालू शकतील का?

 ४ जंगलात शिकार नसेल, तर सिंह गर्जना करेल का?

तरुण सिंहाने* काही पकडलं नसेल, तर तो गुहेतून गुरगुरेल का?

 ५ जर जमिनीवर सापळाच लावला नसेल,* तर पक्षी त्यात अडकेल का?

सापळ्यात काही अडकलं नाही, तर तो सापळा जमिनीवरून वर उडेल का?

 ६ शहरात शिंग फुंकलं गेलं, तर लोक थरथर कापत नाहीत का?

शहरावर विपत्ती आली, तर ती यहोवानेच आणलेली नाही का?

 ७ कारण सर्वोच्च प्रभू यहोवा आपल्या मनातली गोष्ट*

आपल्या सेवकांना, म्हणजे संदेष्ट्यांना सांगितल्याशिवाय, काहीही करणार नाही.+

 ८ सिंह गरजला आहे!+ मग कोण घाबरणार नाही?

सर्वोच्च प्रभू यहोवा बोलला आहे! मग कोण भविष्यवाणी करणार नाही?’+

 ९ ‘अश्‍दोदच्या बुरुजांवरून घोषणा करा

आणि इजिप्तच्या बुरुजांवरून जाहीर करा.

असं म्हणा: “शोमरोनच्या पर्वतांविरुद्ध एकत्र या;+

शहरात माजलेला गोंधळ

आणि तिथे चाललेली फसवणूक पाहा.+

१० कारण योग्य ते कसं करायचं हे त्यांना माहीत नाही,” असं यहोवा म्हणतो,

“ते आपल्या बुरुजांमध्ये हिंसाचार आणि विनाश साठवत आहेत.”’

११ म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो,

‘देशाला एक शत्रू घेरेल,+

तो तुमची शक्‍ती हिरावून घेईल

आणि तुमचे बुरूज लुटले जातील.’+

१२ यहोवा म्हणतो,

‘मेंढपाळ जसा सिंहाच्या जबड्यातून फक्‍त दोन पाय आणि कानाचा तुकडा खेचून घेतो,

तसंच, जे आज शोमरोनमध्ये आपल्या सुंदर पलंगांवर आणि दिवाणांवर* बसले आहेत,+

त्या इस्राएली लोकांपैकी फक्‍त काही जणांना वाचवलं जाईल.’

१३ सैन्यांचा देव, सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘ऐका आणि याकोबच्या घराण्याला ताकीद द्या.’*

१४ ‘कारण इस्राएलने केलेल्या सर्व बंडांसाठी* ज्या दिवशी मी त्याच्याकडून हिशोब मागीन,+

त्या दिवशी मी बेथेलच्या वेदींचाही नाश करीन;+

मी प्रत्येक वेदीची शिंगं कापून टाकीन आणि ती जमिनीवर पडतील.+

१५ उन्हाळ्याच्या घरासोबत मी हिवाळ्याचं घरही पाडून टाकीन.’

‘हस्तिदंताची घरं नष्ट होतील,+

आणि आलिशान* घरांचाही नाश होईल,’+ असं यहोवा म्हणतो.”

४ “शोमरोनच्या पर्वतावर असलेल्या+

बाशानच्या गाईंनो, हा संदेश ऐका.

तुम्ही दीनदुबळ्यांना लुबाडणाऱ्‍या+ आणि गोरगरिबांना चिरडणाऱ्‍या स्त्रिया आहात,

तुम्ही आपल्या नवऱ्‍यांना* म्हणता, ‘आम्हाला प्यायला मद्य आणून द्या!’

 २ सर्वोच्च प्रभू यहोवा याने आपल्या पवित्रतेची शपथ घेतली आहे,

‘“पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा तो तुम्हाला कसायाच्या आकड्यांनी

आणि तुमच्यापैकी उरलेल्यांना मासे पकडण्याच्या गळांनी उचलेल.

 ३ तुमच्यापैकी प्रत्येक जण भिंतीतल्या खिंडारांतून* सरळ बाहेर पडेल;

तुम्हाला हर्मोनमध्ये फेकून दिलं जाईल,” असं यहोवा म्हणतो.’

 ४ ‘बेथेलला या आणि पाप करा,*+

गिलगालला येऊन आणखी जास्त पाप करा!+

सकाळी तुमची बलिदानं घेऊन या,+

आणि तिसऱ्‍या दिवशी तुमचे दशांश* घेऊन या.+

 ५ आभाराचं अर्पण म्हणून खमीर घातलेली भाकर जाळा;+

स्वेच्छेने आणलेल्या अर्पणांची मोठ्याने घोषणा करा!

कारण हे इस्राएली लोकांनो, तुम्हाला हेच करायला आवडतं,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.

 ६ ‘मी तुमच्या सगळ्या शहरांत तुमची उपासमार केली*

आणि तुमच्या सर्व घरांत भाकरीचा तुटवडा पाडला;+

पण तरीही तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत,’+ असं यहोवा म्हणतो.

 ७ ‘मी कापणीच्या आधी तीन महिने पाऊस थांबवून ठेवला;+

मी एका शहरावर पाऊस पाडला, तर दुसऱ्‍यावर पाडला नाही.

शेताच्या एका भागावर पाऊस पडायचा,

तर दुसरा भाग, पाऊस न पडल्यामुळे कोरडाच राहायचा.

 ८ दोनतीन शहरांतले लोक पाणी प्यायला एकाच शहरात लटपटत जायचे,+

पण त्यांची तहान भागायची नाही;

तरीही, तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत,’+ असं यहोवा म्हणतो.

 ९ मी तुम्हाला उष्ण वारा आणि कीड यांनी पीडित केलं.+

तुम्ही भरपूर बागा आणि द्राक्षमळे लावलेत,

पण टोळ तुमच्या अंजिराच्या आणि जैतुनाच्या झाडांचा फडशा पाडायचे;*+

पण तरीही तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत,’+ असं यहोवा म्हणतो.

१० ‘इजिप्तवर आली होती, तशी पीडा* मी तुमच्यावर आणली.+

मी तलवारीने तुमच्या तरुणांना ठार मारलं+ आणि तुमचे घोडे लुटून नेले.+

तुमच्या छावण्यांमध्ये प्रेतांचा दुर्गंध पसरला;+

पण तरीही तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत,’ असं यहोवा म्हणतो.

११ मी जसा सदोम आणि गमोरा यांचा नाश केला होता,+

तसाच मी तुमच्या देशाचाही नाश केला.

आणि तुम्ही आगीतून ओढून काढलेल्या ओंडक्यासारखे होता;

पण तरीही तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत,’+ असं यहोवा म्हणतो.

१२ म्हणून हे इस्राएल, मी तुझ्यासोबत असंच करीन,

मी तुला अशाच प्रकारे शिक्षा देईन,

हे इस्राएल, तुझ्या देवासमोर यायला तयार हो!

१३ कारण पाहा! त्याने पर्वत घडवले+ आणि वारा निर्माण केला;+

तो माणसाला आपले विचार सांगतो,

तो पहाटेला अंधारात बदलतो,+

आणि तो पृथ्वीच्या उच्च स्थानांत चालतो;+

सैन्यांचा देव यहोवा हे त्याचं नाव आहे.”

५ “हे इस्राएलच्या घराण्या, मी या शोकगीतातून तुझ्याविरुद्ध सांगत असलेला संदेश ऐक:

 २ ‘इस्राएल कुमारी पडली आहे;

तिला पुन्हा उठता येणार नाही.

तिला तिच्याच देशात टाकून देण्यात आलंय;

तिला उठवणारं कोणीच नाही.’

३ कारण सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो:

‘इस्राएलच्या घराण्यासोबत असं होईल, की ज्या शहरातून हजार लढाईला निघायचे, त्यात फक्‍त शंभर उरतील;

आणि ज्या शहरातून शंभर निघायचे, त्यात फक्‍त दहा उरतील.’+

४ इस्राएलच्या घराण्याला यहोवा असं म्हणतो:

‘माझा शोध घ्या आणि जिवंत राहा.+

 ५ बेथेल शोधू नका,+

गिलगालला जाऊ नका+ किंवा बैर-शेबाला जाऊ नका,+

कारण गिलगाल नक्कीच बंदिवासात जाईल,+

आणि बेथेल उरणार नाही.*

 ६ यहोवाचा शोध घ्या आणि जिवंत राहा;+

नाहीतर, योसेफच्या घराण्यावर तो आगीसारखा भडकेल,

आणि बेथेलला भस्म करेल; आणि ती आग विझवणारं कोणी नसेल.

 ७ तुमचा न्याय कडूदवण्यासारखा* आहे,

आणि तुम्ही नीती धुळीत मिळवता.+

 ८ ज्याने कृत्तिका* आणि मृगशीर्ष नक्षत्रं बनवली,+

जो गडद अंधाराची सकाळ करतो,

जो दिवसाची काळोखी रात्र करतो,+

जो समुद्राच्या पाण्याला बोलावतो

आणि पृथ्वीवर त्याचा वर्षाव करतो,+

​—त्याचं नाव यहोवा आहे.

 ९ तो बलवानावर अचानक विनाश आणेल,

आणि तटबंदी असलेल्या ठिकाणांचा नाश करेल.

१० शहराच्या फाटकांच्या आत ताडन देणाऱ्‍यांचा ते द्वेष करतात,

आणि खरं बोलणाऱ्‍यांची त्यांना घृणा वाटते.+

११ तुम्ही गोरगरिबांकडून शेताचं भाडं* घेता

आणि खंडणी म्हणून त्यांचं पीक मागता,+

त्यामुळे तुम्ही कोरीव दगडांनी बांधलेल्या तुमच्या घरात राहणार नाही,+

आणि तुम्ही लावलेल्या चांगल्या द्राक्षमळ्यांमधला द्राक्षारस तुम्ही पिणार नाही.+

१२ कारण तुम्ही किती अपराध* केलेत,

आणि किती मोठी पापं केलीत हे मला माहीत आहे.

तुम्ही नीतिमानाचा छळ करता,

तुम्ही लाच* घेता,

आणि शहराच्या फाटकांजवळ बसून गरिबाचा हक्क लुबाडता.+

१३ म्हणून, ज्यांना समज आहे, ते त्या वेळी शांत राहतील,

कारण ती संकटाची वेळ असेल.+

१४ वाइटाचा नाही, तर चांगल्याचा शोध घ्या,+

म्हणजे तुम्ही जिवंत राहाल.+

मग तुम्ही म्हणता त्याप्रमाणे,

सैन्यांचा देव यहोवा तुमच्यासोबत असेल.+

१५ वाइटाचा द्वेष करा आणि चांगल्यावर प्रेम करा,+

शहराच्या फाटकांच्या आत न्याय करा.+

तेव्हा कदाचित सैन्यांचा देव यहोवा,

योसेफच्या उरलेल्यांवर कृपा करेल.’+

१६ म्हणून यहोवा, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो:

‘सर्व चौकांमध्ये आक्रोश होईल,

सगळ्या रस्त्यांवर ते “हाय! हाय!” करतील,

ते शोक करण्यासाठी शेतकऱ्‍यांना बोलावतील

आणि पैसे देऊन रडणाऱ्‍यांना बोलावतील.’

१७ ‘प्रत्येक द्राक्षमळ्यात आक्रोश केला जाईल;+

कारण मी तुमच्यामधून फिरेन आणि शिक्षा देईन,’ असं यहोवा म्हणतो.

१८ ‘जे यहोवाचा दिवस येण्याची वाट बघतात त्यांची दुर्दशा होईल!+

तुमच्यासाठी यहोवाचा दिवस कसा असेल?+

तो उजेडाचा नाही, तर अंधाराचा दिवस असेल.+

१९ जसा एखादा माणूस सिंहापासून पळतो आणि अस्वलाच्या तावडीत सापडतो,

आणि जेव्हा तो घरात येऊन भिंतीला हात टेकतो, तेव्हा त्याला साप चावतो, तसं त्या दिवशी होईल.

२० यहोवाचा दिवस उजेडाचा नाही, तर अंधाराचा असेल;

त्यात प्रकाश नसेल, तर गडद काळोख असेल.

२१ तुमच्या सणांची मला घृणा वाटते, मला त्यांचा राग येतो,+

तुमच्या पवित्र सभांमधल्या सुवासामुळे मला आनंद होत नाही.

२२ तुम्ही जरी मला होमार्पणं आणि भेट म्हणून अर्पणं दिलीत,

तरी मला आनंद होणार नाही;+

आणि तुम्ही शांती-अर्पणं म्हणून आणलेल्या धष्टपुष्ट प्राण्यांचा मी स्वीकार करणार नाही.+

२३ तुमच्या गाण्यांचा गोंगाट मला ऐकायला लावू नका;

तुमच्या तंतुवाद्यांचे सूर मी ऐकणार नाही.+

२४ न्यायाला पाण्यासारखं,+

आणि नीतीला सतत वाहणाऱ्‍या ओढ्यासारखं वाहू द्या.

२५ हे इस्राएलच्या घराण्या, तू ४० वर्षं ओसाड रानात होतास,

तेव्हा तू माझ्यासाठी बलिदानं आणि भेट म्हणून अर्पणं आणली होतीस का?+

२६ आता तुम्हाला तुमचा राजा सक्कुथ आणि कैवान,* यांना घेऊन जावं लागेल.

तुम्ही स्वतःसाठी बनवलेल्या मूर्तींना, तुमच्या देवाच्या ताऱ्‍याला, तुम्हाला घेऊन जावं लागेल.

२७ आणि मी तुम्हाला दिमिष्कच्या पलीकडे बंदिवासात पाठवीन,’+ असं तो म्हणतो; सैन्यांचा देव यहोवा हे त्याचं नाव आहे.”+

६ “जे स्वतःवर भरवसा ठेवून सीयोनमध्ये आरामात* राहतात,

ज्यांना शोमरोनमध्ये सुरक्षित वाटतं, त्यांची दुर्दशा होईल!+

सगळ्यात मुख्य असलेल्या राष्ट्रातल्या प्रतिष्ठित माणसांची;

इस्राएलचं घराणं ज्यांच्याकडे येतं, त्यांची दुर्दशा होईल!

 २ पलीकडे कालने इथे जाऊन पाहा.

तिथून मोठं हमाथ+ इथे जा,

आणि खाली पलिष्ट्यांच्या गथ शहरात जा.

या राज्यांपेक्षा* ती राज्यं श्रेष्ठ आहेत का?

की त्यांचा प्रदेश तुमच्या प्रदेशापेक्षा मोठा आहे?

 ३ संकटाच्या दिवसाबद्दल तुम्ही विचार का करत नाही?+

आणि हिंसेचं शासन* जवळ का आणता?+

 ४ ते हस्तिदंताच्या पलंगांवर झोपतात+ आणि दिवाणांवर पसरतात,+

ते कळपातली कोकरं आणि धष्टपुष्ट वासरं* खातात;+

 ५ ते वीणेच्या* सुरांवर आपल्याच मनाने गाणी रचतात,+

आणि दावीदप्रमाणे नवनवीन वाद्यं बनवतात;+

 ६ ते मोठ्या प्याल्यांमधून द्राक्षारस पितात+

आणि उत्तम तेलांनी स्वतःचा अभिषेक करतात.

पण त्यांना योसेफवर येणाऱ्‍या संकटाची पर्वा नाही.+

 ७ म्हणून ते सर्वात आधी बंदिवासात जातील,+

आणि त्यांचे मौजमस्ती करण्याचे दिवस संपतील.

 ८ ‘सर्वोच्च प्रभू यहोवा याने स्वतःची* शपथ घेतली आहे,’+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो,

‘“मला याकोबच्या गर्वाची घृणा वाटते,+

त्याच्या बुरुजांचा मला राग येतो,+

म्हणून मी हे शहर आणि त्यातलं सर्वकाही शत्रूंच्या हाती देऊन टाकीन.+

९ आणि एका घरात दहा पुरुष उरले असतील, तर तेही मरतील. १० एक नातेवाईक* येऊन त्यांना बाहेर नेईल आणि एकेक करून जाळेल. तो त्यांची हाडं घरातून बाहेर आणेल; मग घराच्या आतल्या खोल्यांमध्ये जो कोणी असेल त्याला तो नातेवाईक म्हणेल, ‘तुझ्यासोबत आणखी कोणी उरलं आहे का?’ आणि तो म्हणेल, ‘कोणी नाही!’ मग तो नातेवाईक म्हणेल, ‘शांत राहा! कारण यहोवाच्या नावाचा उल्लेख करण्याची ही वेळ नाही.’”

११ कारण आज्ञा देणारा यहोवा आहे,+

आणि तो मोठं घर तोडून त्याचे तुकडेतुकडे करेल.

आणि लहान घराची दगडमाती करेल.+

१२ घोडे खडकावर धावतात का?

किंवा गुरंढोरं घेऊन कोणी त्यावर नांगरतं का?

तुम्ही न्यायाला विषारी वनस्पतीसारखं,

आणि नीतीच्या फळाला कडूदवण्यासारखं* केलं आहे.+

१३ तुम्ही व्यर्थ गोष्टींमुळे आनंदी होता,

आणि म्हणता, ‘आपण आपल्याच शक्‍तीमुळे ताकदवान झालो नाही का?’+

१४ म्हणून, हे इस्राएलच्या घराण्या, मी तुझ्याविरुद्ध एक मोठं राष्ट्र आणीन,’+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो,

‘आणि ते लेबो-हमाथपासून*+ अराबाच्या खोऱ्‍यापर्यंत तुमच्यावर अत्याचार करतील.’”

७ सर्वोच्च प्रभू यहोवाने मला एक दृष्टान्त दाखवला. पाहा, हिवाळ्यातलं पीक* उगवू लागलं, तेव्हा त्याने टोळधाड आणली. राजासाठी गवत कापून झाल्यावर हे पीक पेरण्यात आलं होतं. २ टोळांनी देशातली सगळी हिरवळ खाऊन टाकल्यावर, मी म्हणालो: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा, कृपा करून क्षमा कर!+ नाहीतर, याकोब कसा वाचेल?* कारण तो दुबळा आहे!”+

३ म्हणून यहोवाने यावर पुन्हा विचार केला.*+ मग यहोवा म्हणाला, “असं होणार नाही.”

४ तेव्हा, सर्वोच्च प्रभू यहोवाने मला हा दृष्टान्त दाखवला: पाहा, सर्वोच्च प्रभू यहोवा याने आगीने शिक्षा देण्याची आज्ञा दिली. त्या आगीत खोल समुद्रातलं पाणी सुकून गेलं आणि जमिनीचा काही भागही नष्ट झाला. ५ तेव्हा मी म्हणालो: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा, कृपा करून हे थांबव.+ नाहीतर याकोब कसा वाचेल?* कारण तो दुबळा आहे!”+

६ म्हणून यहोवाने यावर पुन्हा विचार केला.*+ मग सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणाला: “हेही होणार नाही.”

७ मग त्याने मला हा दृष्टान्त दाखवला: पाहा! ओळंबा* लावून बांधलेल्या एका भिंतीवर यहोवा उभा होता आणि त्याच्या हातात एक ओळंबा होता. ८ मग यहोवा मला म्हणाला: “आमोस, तुला काय दिसतंय?” मी म्हणालो: “ओळंबा.” तेव्हा यहोवा म्हणाला: “माझ्या लोकांमध्ये, इस्राएली लोकांमध्ये मी एक ओळंबा लावत आहे. मी यापुढे त्यांना क्षमा करणार नाही.+ ९ इसहाकची उच्च स्थानं+ उजाड पडतील आणि इस्राएलच्या पवित्र ठिकाणांची नासधूस केली जाईल+ आणि मी यराबामच्या घराण्याचा तलवारीने नाश करीन.”+

१० बेथेलचा याजक अमस्या+ याने इस्राएलचा राजा यराबाम+ याला असा निरोप पाठवला: “आमोस इस्राएलमध्येच राहून तुझ्याविरुद्ध कटकारस्थानं रचत आहे.+ देशातल्या लोकांना त्याचे संदेश ऐकवत नाहीत.+ ११ कारण आमोस म्हणतो, ‘यराबाम तलवारीने मरेल आणि इस्राएली लोक नक्कीच आपल्या देशातून बंदिवासात जातील.’”+

१२ मग अमस्या आमोसला म्हणाला: “अरे दृष्टान्त पाहणाऱ्‍या, जा, यहूदा देशात निघून जा, तिथे संदेश सांग+ आणि आपलं पोट भर.* १३ पण आता तू बेथेलमध्ये भविष्यवाणी करू नकोस,+ कारण हे एका राजाचं मंदिर आहे.+ ही राजधानी आहे.”

१४ तेव्हा आमोसने अमस्याला असं उत्तर दिलं: “मी मुळात संदेष्टा नव्हतो किंवा संदेष्ट्याचा मुलगाही नव्हतो. मी तर मेंढपाळ होतो+ आणि उंबराच्या झाडांची काळजी घ्यायचो.* १५ पण मी कळप राखत असताना यहोवाने मला बोलावलं आणि यहोवा मला म्हणाला, ‘जा, माझ्या लोकांना, इस्राएली लोकांना संदेश सांग.’+ १६ म्हणून आता यहोवाचा हा संदेश ऐक: ‘तू म्हणतोस, “इस्राएलविरुद्ध भविष्यवाणी करू नकोस+ आणि इसहाकच्या घराण्याविरुद्ध संदेश सांगू नकोस.”+ १७ म्हणून यहोवा असं म्हणतो: “तुझी बायको शहरात वेश्‍या बनेल आणि तुझी मुलं व मुली तलवारीने मरतील. तुझा देश मोजायच्या दोरीने मोजून, वाटून टाकला जाईल आणि तू स्वतः एका परक्या देशात मरशील; आणि इस्राएली लोक नक्कीच आपल्या देशातून बंदिवासात जातील.”’”+

८ सर्वोच्च प्रभू यहोवाने मला हा दृष्टान्त दाखवला: पाहा! उन्हाळी फळांची एक टोपली होती. २ मग तो म्हणाला, “आमोस, तुला काय दिसतंय?” मी म्हणालो, “उन्हाळी फळांची टोपली.” मग यहोवा मला म्हणाला: “माझ्या लोकांचा, म्हणजे इस्राएली लोकांचा अंत जवळ आलाय. यापुढे मी त्यांना दया दाखवणार नाही.+ ३ ‘त्या दिवशी मंदिरात गीतं गाण्याऐवजी शोक केला जाईल,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो. ‘सगळीकडे प्रेतंच प्रेतं पडलेली असतील+ आणि त्यामुळे शांतता पसरेल.’

 ४ गोरगरिबांना तुडवणाऱ्‍यांनो,

आणि देशातल्या दीनदुबळ्यांचा नाश करणाऱ्‍यांनो ऐका,+

 ५ तुम्ही म्हणता, ‘नवचंद्राचा* सण केव्हा संपेल,+ आणि आम्हाला आमचं धान्य कधी विकता येईल?

शब्बाथ+ कधी संपेल आणि आम्ही आमचं धान्य कधी विकायला काढू?

आम्ही एफाचं* माप छोटं करू,

आणि शेकेलचं* वजन वाढवू,

म्हणजे आम्हाला खोट्या तराजूने लोकांना फसवता येईल;+

 ६ मग आम्ही चांदीने दीनदुबळ्यांना,

आणि चपलांच्या एका जोडाच्या बदल्यात गोरगरिबांना विकत घेऊ,+

आणि खराब धान्य विकू.’

 ७ यहोवाने याकोबच्या गर्वाची शपथ घेतली आहे,+

‘मी त्यांची कृत्यं कधीही विसरणार नाही.+

 ८ यामुळे देश* थरथरेल,

आणि त्यातला प्रत्येक रहिवासी शोक करेल.+

सगळा देश, भरून वाहणाऱ्‍या नाईल नदीसारखा होईल,

आणि इजिप्तच्या नाईलसारखा वर उसळून पुन्हा ओसरेल.’+

 ९ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘त्या दिवशी,

मी भर दुपारी सूर्य मावळायला लावीन,

लख्ख प्रकाशाच्या दिवशी काळोख पसरवीन.+

१० मी तुमच्या सणांना शोकात बदलीन,+

आणि तुमची गाणी शोकगीतांमध्ये बदलीन.

मी प्रत्येकाच्या कमरेवर गोणपाट घालीन

आणि प्रत्येकाच्या डोक्याचं मुंडण करीन;

एकुलत्या एका मुलासाठी शोक केला जातो, तसा शोक मी करायला लावीन,

त्या दिवसाचा शेवट कडू असेल.’

११ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘पाहा! असे दिवस येत आहेत,

जेव्हा मी देशात दुष्काळ पाठवीन,

पण तो अन्‍नाचा किंवा पाण्याचा दुष्काळ नसेल,

तर यहोवाच्या शब्दांचा दुष्काळ असेल.+

१२ ते या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत,

आणि उत्तरेपासून पूर्वेपर्यंत* लटपटत जातील.

ते यहोवाचे शब्द शोधण्यासाठी वणवण फिरतील, पण त्यांना ते सापडणार नाहीत.

१३ त्या दिवशी सुंदर तरुणी,*

आणि तरुण तहानेमुळे चक्कर येऊन पडतील;

१४ जे शोमरोनच्या दोषाची+ शपथ घेऊन म्हणतात,

“हे दान, तुझ्या देवाच्या जिवाची शपथ!”+

आणि “बैर-शेबाला जाणाऱ्‍या मार्गाची+ शपथ!”

ते पडतील आणि पुन्हा उठू शकणार नाहीत.’”+

९ मला यहोवा वेदीच्या वरती दिसला+ आणि तो म्हणाला: “खांबांच्या माथ्यावर मार, म्हणजे त्यांचा पाया हलेल. त्यांची डोकी* कापून टाक, आणि मी त्यांच्यातल्या उरलेल्यांना तलवारीने मारून टाकीन. कोणालाही पळून जाता येणार नाही आणि कोणी प्रयत्न केला, तरी त्याला निसटून जाता येणार नाही.+

 २ ते जरी कबर* खोदून तिच्यात लपून बसले,

तरी मी त्यांना आपल्या हाताने बाहेर काढीन;

ते आकाशात गेले,

तरी मी त्यांना तिथून खाली आणीन.

 ३ आणि जर ते कर्मेल पर्वतावर जाऊन लपले,

तर मी त्यांना तिथून शोधून काढीन.+

माझ्यापासून लपण्यासाठी ते समुद्राच्या तळाशी गेले,

तर तिथे मी सापाला त्यांना चावण्याची आज्ञा देईन.

 ४ जर त्यांच्या शत्रूंनी त्यांना बंदिवासात नेलं,

तर तिथे मी तलवारीला आज्ञा करीन आणि ती त्यांना मारून टाकेल;+

मी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी नाही, तर संकटं आणण्यासाठी त्यांच्यावर आपली नजर रोखीन.+

 ५ कारण सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा यहोवा याने हात लावताच देश* वितळेल,+

आणि त्याचे सर्व रहिवासी शोक करतील;+

सगळा देश, भरून वाहणाऱ्‍या नाईल नदीसारखा उसळेल,

आणि इजिप्तच्या नाईलसारखा पुन्हा ओसरेल.+

 ६ ‘जो आकाशात आपला जिना

आणि पृथ्वीवर आपला घुमट बांधतो;

जो समुद्राच्या पाण्याला बोलावतो

आणि पृथ्वीवर त्याचा वर्षाव करतो,+

​—त्याचं नाव यहोवा आहे.’+

 ७ यहोवा म्हणतो, ‘इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही माझ्यासाठी कूशी लोकांच्या वंशजांसारखे नाहीत का?

मी इस्राएलला इजिप्त देशातून बाहेर आणलं नाही का?+

मी पलिष्ट्यांना क्रेतमधून,+ आणि अरामी लोकांना कीरमधून बाहेर आणलं नाही का?’+

 ८ ‘पाहा! सर्वोच्च प्रभू यहोवा याची नजर या पापी राज्यावर आहे,

आणि तो पृथ्वीच्या पाठीवरून त्याचं नामोनिशाण मिटवून टाकेल.+

पण मी याकोबच्या घराण्याचा पूर्णपणे नाश करणार नाही,’+ असं यहोवा म्हणतो.

 ९ ‘कारण पाहा! मी अशी आज्ञा देतो,

चाळणीत धान्य चाळल्यावर

जसा एकही खडा जमिनीवर पडत नाही,

तसं इस्राएलच्या घराण्याला सर्व राष्ट्रांमध्ये चाळलं जावं.+

१० माझ्या लोकांतले पापी म्हणतात, “संकट आमच्या जवळ येणार नाही, ते आमच्यापर्यंत पोहोचणारही नाही,”

पण ते सर्व तलवारीने मरतील.’

११ ‘त्या दिवशी मी दावीदचा पडलेला तंबू* पुन्हा उभा करीन,+

मी खिंडारं दुरुस्त करीन,

त्याचे कोसळलेले भाग परत उभे करीन;

मी तो पूर्वीच्या दिवसांप्रमाणे पुन्हा बांधीन.+

१२ मग माझे लोक अदोमच्या उरलेल्यांचा,

आणि माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या सर्व राष्ट्रांचा ताबा घेतील,’+ असं यहोवा म्हणतो. तोच हे सर्व घडवून आणेल.

१३ यहोवा म्हणतो, ‘पाहा! असे दिवस येत आहेत,

जेव्हा नांगरणारा, कापणी करणाऱ्‍याला;

आणि द्राक्षं तुडवणारा, बी पेरणाऱ्‍याला गाठेल.+

पर्वतांवरून गोड द्राक्षारस पाझरेल+

आणि टेकड्यांवरून तो वाहील.+

१४ मी माझ्या लोकांना, इस्राएली लोकांना गोळा करून बंदिवासातून परत आणीन,+

आणि ते त्यांची उजाड पडलेली शहरं पुन्हा बांधून त्यांत राहतील;+

ते द्राक्षमळे लावून त्यांचा द्राक्षारस पितील+

आणि बागा लावून त्यांची फळं खातील.’+

१५ ‘मी त्यांना त्यांच्या देशात रुजवीन,

आणि जो देश मी त्यांना दिलाय

त्यातून त्यांना पुन्हा कधीही उपटलं जाणार नाही,’+ असं तुमचा देव यहोवा म्हणतो.”

म्हणजे, “ओझं असणं” किंवा “ओझं वाहून नेणं.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “अपराध.”

शब्दशः “ज्याच्या हातात राजदंड आहे.”

शब्दशः “ज्याच्या हातात राजदंड आहे.”

किंवा कदाचित, “राजकुमार.”

किंवा “अपराध.”

शब्दशः “चुना.”

शब्दशः “न्यायाधीश.”

किंवा “शिक्षण.”

मोठ्या वृक्षांची एक जात. इंग्रजीत या वृक्षांना “ओक”  म्हणतात.

किंवा “मिसर.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “आयाळ असलेल्या तरुण सिंहाने.”

किंवा कदाचित, “त्यात आमिष लावलं नसेल.”

किंवा “त्याचं गुपित.”

किंवा “दिमिष्कच्या दिवाणांवर.”

किंवा “घराण्याविरुद्ध साक्ष द्या.”

किंवा “अपराधांसाठी.”

किंवा कदाचित, “पुष्कळ.”

किंवा “मालकांना.”

किंवा “भगदाडांतून.”

किंवा “बंड करा.”

किंवा “दहावे भाग.”

शब्दशः “दातांची स्वच्छता दिली.”

किंवा “नाश करायचे.”

किंवा “रोगराई.”

किंवा कदाचित, “रहस्यमय ठिकाण बनेल.”

एक कडू वनस्पती. किंवा “कडवटपणासारखा.”

कदाचित वृषभ नक्षत्रातले प्लिएडस तारे.

किंवा “जमिनीचा कर.”

किंवा “बंडं.”

किंवा “गप्प राहण्यासाठी पैसे.”

ही दोन्ही दैवतं शनी ग्रहाला सूचित करत असावीत. शनी ग्रहाची देव म्हणून उपासना केली जायची.

किंवा “आत्मसंतुष्ट.”

हे यहूदा आणि इस्राएलच्या राज्यांना सूचित करतं.

शब्दशः “आसन.”

किंवा “तरणे बैल.”

किंवा “तंतुवाद्याच्या.”

किंवा “स्वतःच्या जिवाची.”

शब्दशः “त्याचा काका.”

एक कडू वनस्पती. किंवा “कडवटपणासारखं.”

किंवा “हमाथच्या प्रवेशापासून.”

म्हणजे, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांतलं.

शब्दशः “उठेल?”

किंवा “यहोवाला पस्तावा झाला.”

शब्दशः “उठेल?”

किंवा “यहोवाला पस्तावा झाला.”

भिंत सरळ रेषेत बांधली जात आहे की नाही हे पाहण्याचं साधन. यात एका दोरीला खाली वजन बांधलेलं असतं.

शब्दशः “भाकर खा.”

किंवा “उंबरांना टोचा मारणारा होतो.”

चंद्राची पहिली कोर दिसते तो दिवस.

अति. ख१४ पाहा.

अति. ख१४ पाहा.

किंवा “पृथ्वी.”

किंवा “सूर्योदयाच्या दिशेपर्यंत.”

किंवा “कुमारी.”

किंवा कदाचित, “खांबांचे माथे.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “पृथ्वी.”

किंवा “मंडप; झोपडी.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा