वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt योएल १:१-३:२१
  • योएल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • योएल
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
योएल

योएल

१ पथूएलचा मुलगा योएल* याला मिळालेला यहोवाचा* संदेश:

 २ “हे वडीलजनांनो, ऐका,

आणि देशाच्या* सर्व रहिवाशांनो, लक्ष द्या.

तुमच्या काळात किंवा तुमच्या वाडवडिलांच्या काळात,

कधी असं घडलं होतं का?+

 ३ तुम्ही आपल्या मुलांना याबद्दल सांगा,

आणि तुमच्या मुलांनी ते त्यांच्या मुलांना सांगावं;

आणि त्यांच्या मुलांनी ते पुढच्या पिढीला सांगावं.

 ४ कुरतडणाऱ्‍या टोळांनी जे सोडलं, ते झुंडींनी येणाऱ्‍या टोळांनी खाल्लं;+

झुंडींनी येणाऱ्‍या टोळांनी जे सोडलं, ते बिनपंखांच्या टोळांनी खाल्लं;

आणि बिनपंखांच्या टोळांनी जे सोडलं, ते अधाशी टोळांनी खाल्लं.+

 ५ अरे दारुड्यांनो,+ उठा आणि रडा!

द्राक्षारस पिणाऱ्‍यांनो, आक्रोश करा,

कारण गोड द्राक्षारस तुमच्या तोंडून काढून घेण्यात आलाय.+

 ६ असंख्य लोक असलेल्या एका शक्‍तिशाली राष्ट्राने+ माझ्या देशावर हल्ला केलाय.

त्याचे दात सिंहाच्या दातांसारखे+ आणि त्याचा जबडा सिंहाच्या जबड्यासारखा आहे.

 ७ त्याने माझा द्राक्षवेल उद्ध्‌वस्त केला आहे आणि माझ्या अंजिराच्या झाडाचं फक्‍त खोड ठेवलं आहे,

त्यांची साल त्यांनी पूर्णपणे सोलून टाकली आहे,

आणि त्यांच्या फांद्या पांढऱ्‍या झाल्या आहेत.

 ८ गोणपाट घालून आपल्या तरुण वरासाठी*

शोक करणाऱ्‍या कुमारीसारखा* आक्रोश करा.

 ९ यहोवाच्या मंदिरातली अन्‍नार्पणं+ आणि पेयार्पणं+ बंद झाली आहेत;

यहोवाची सेवा करणारे याजक शोक करत आहेत.

१० शेताची नासधूस करण्यात आली आहे, जमीन शोक करत आहे;+

कारण धान्याचा नाश करण्यात आलाय, नवीन द्राक्षारस सुकून गेलाय आणि तेलही संपलंय.+

११ गव्हाच्या आणि जवाच्या पिकांमुळे

शेतकरी हताश झाले आहेत, द्राक्षमळ्यांची मशागत करणारे आक्रोश करत आहेत,

कारण शेतातलं पीक नष्ट झालंय.

१२ द्राक्षवेल सुकून गेलाय,

अंजिराचं झाड कोमेजून गेलंय.

डाळिंब, खजूर आणि सफरचंद

अशी रानातली सगळी झाडं सुकली आहेत;+

कारण लोकांचा आनंद अपमानात बदललाय.

१३ हे याजकांनो, गोणपाट घालून शोक करा;*

वेदीच्या सेवकांनो, आक्रोश करा.+

माझ्या देवाच्या सेवकांनो, या आणि रात्रभर गोणपाट घालून राहा;

कारण तुमच्या देवाच्या मंदिरात आता कोणीही

अन्‍नार्पण+ आणि पेयार्पण+ आणत नाही.

१४ उपास घोषित करा;* पवित्र सभा भरवा.+

तुमचा देव यहोवा याच्या मंदिरात वडीलजनांना आणि देशाच्या सर्व रहिवाशांना एकत्र करा,+

आणि यहोवाला मदतीची याचना करा.

१५ त्या दिवसामुळे हायहाय करा!

कारण यहोवाचा दिवस जवळ आलाय,+

सर्वसमर्थाकडून येणाऱ्‍या नाशासारखा तो दिवस येईल!

१६ आपल्या डोळ्यांदेखत आपलं अन्‍न काढून घेण्यात आलं नाही का?

आणि आपल्या देवाच्या मंदिरातून आनंद आणि उत्साह नाहीसा झाला नाही का?

१७ बियाणं* फावड्यांखाली सुकून गेलंय.

गोदामं उजाड पडली आहेत.

धान्य सुकून गेल्यामुळे, कोठारं पाडून टाकण्यात आली आहेत.

१८ गुरंढोरंही कण्हत आहेत!

चारा नसल्यामुळे गायबैलांचे कळप गोंधळून इकडे तिकडे भटकत आहेत,

आणि मेंढरांचे कळप शिक्षा भोगत आहेत!

१९ हे यहोवा, मी तुला हाक मारीन;+

कारण रानातली कुरणं* जळून गेली आहेत,

आणि एका ज्वालेने रानातली सगळी झाडं भस्म केली आहेत.

२० जंगली पशूंनाही तुझीच आस लागली आहे,

कारण पाण्याचे ओढे कोरडे पडले आहेत

आणि आगीने रानातली कुरणं नष्ट केली आहेत.”

२ “सीयोनमध्ये शिंग फुंका!+

माझ्या पवित्र पर्वतावर युद्धाची घोषणा करा.

देशातल्या* सगळ्या रहिवाशांचा थरकाप उडो!

कारण यहोवाचा दिवस येत आहे!+ तो जवळ आहे!

 २ तो घोर अंधकाराचा दिवस आहे,+

तो ढगांचा आणि दाट काळोखाचा दिवस आहे,+

पर्वतांवर पसरणाऱ्‍या पहाटेच्या प्रकाशासारखा तो दिवस आहे.

असंख्य लोक असलेलं एक शक्‍तिशाली राष्ट्र आहे;+

त्यासारखं राष्ट्र पूर्वी कधी झालं नव्हतं,

आणि यापुढेही त्यासारखं राष्ट्र

पिढ्या न्‌ पिढ्या होणार नाही.

 ३ त्यांच्यापुढे अग्नी नाश करतो,

आणि त्यांच्यामागे ज्वाला भस्म करते.+

त्यांच्यापुढे असलेला देश एदेन बागेसारखा आहे,+

पण त्यांच्यामागचा प्रदेश ओसाड रानासारखा आहे.

त्यांच्यापासून काहीच वाचू शकत नाही.

 ४ ते घोड्यांसारखे दिसतात,

आणि युद्धाच्या घोड्यांसारखे धावतात.+

 ५ जेव्हा ते पर्वताच्या माथ्यांवर उड्या मारतात, तेव्हा रथांसारखा,+

आणि आगीत जळणाऱ्‍या गवताच्या तडतडण्यासारखा आवाज होतो.

ते युद्धासाठी सज्ज झालेल्या बलवान सैन्यासारखे आहेत.+

 ६ त्यांच्यामुळे लोकांना पीडा होतील.

सगळ्यांचे चेहरे पांढरे पडतील.

 ७ ते योद्ध्यांसारखे हल्ला करतात,

सैनिकांसारखे भिंतीवर चढतात,

प्रत्येक जण आपापल्या मार्गावर चालतो,

कोणीही आपली रांग सोडत नाही.

 ८ ते एकमेकांना ढकलत नाहीत;

प्रत्येक जण आपल्या मार्गाने वाटचाल करतो.

जरी त्यांच्यापैकी काही शस्त्रांनी पडले,

तरी इतर जण आपली रांग सोडत नाहीत.

 ९ ते शहरांमध्ये शिरतात आणि भिंतीवर धावतात.

ते घरांवर चढतात आणि चोरासारखे खिडक्यांमधून घुसतात.

१० त्यांच्यापुढे देश कापतो आणि आकाश थरथरतं.

सूर्य आणि चंद्र काळवंडले आहेत,+

ताऱ्‍यांचं तेज नाहीसं झालं आहे.

११ यहोवा आपल्या सैन्यापुढे मोठ्याने घोषणा करेल,+ कारण त्याचं सैन्य खूप मोठं आहे.+

त्याचा शब्द पूर्ण करणारा* शक्‍तिशाली आहे.

यहोवाचा दिवस महान आणि भयानक आहे.+

त्या दिवशी कोण टिकेल?”+

१२ यहोवा म्हणतो: “अजूनही संधी आहे, पूर्ण मनाने माझ्याकडे परत या,+

उपास करून,+ रडत आणि आक्रोश करत माझ्याकडे परत या.

१३ आपले कपडे नाही,+ तर हृदय फाडा,+

आणि तुमचा देव यहोवा याच्याकडे परत या,

कारण तो करुणामय,* दयाळू आणि सहनशील* आहे;+ तो एकनिष्ठ प्रेमाने भरलेला आहे,+

तो हे संकट आणण्याबद्दल पुन्हा विचार करेल.*

१४ काय माहीत, कदाचित तो आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करेल*+

आणि तुम्हाला आशीर्वाद देईल,

त्यामुळे तुम्ही आपला देव यहोवा याला अन्‍नार्पण आणि पेयार्पण देऊ शकाल!

१५ सीयोनमध्ये शिंग फुंका!

उपास घोषित करा;* पवित्र सभा भरवा.+

१६ लोकांना गोळा करा; मंडळीला पवित्र करा.+

वृद्ध लोकांना* जमा करा आणि लहान मुलांना आणि तान्ह्या बाळांना गोळा करा.+

वराने आणि वधूने आपल्या आतल्या खोलीतून बाहेर यावं.

१७ यहोवाची सेवा करणाऱ्‍या याजकांनी

वऱ्‍हांडा आणि वेदी+ यांच्यामध्ये रडून असं म्हणावं:

‘हे यहोवा, आपल्या लोकांना दया दाखव;

तुझ्या लोकांचा अपमान होऊ देऊ नको,

आणि राष्ट्रांना त्यांच्यावर राज्य करू देऊ नको.

“यांचा देव कुठे आहे,” असं लोकांनी का म्हणावं?’+

१८ मग यहोवा आपल्या देशासाठी आवेशी होईल,

आणि आपल्या लोकांना दया दाखवेल.+

१९ यहोवा आपल्या लोकांना असं उत्तर देईल:

‘मी तुम्हाला धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल देईन,

आणि तुम्ही तृप्त व्हाल;+

यापुढे इतर राष्ट्रं तुमची निंदा करणार नाहीत.+

२० उत्तरेकडून हल्ला करणाऱ्‍याला मी हाकलून लावीन;

मी त्याला एका कोरड्या आणि ओसाड प्रदेशात विखरून टाकीन,

त्याच्या सैन्याचा पुढचा भाग* पूर्वेच्या समुद्राकडे*

आणि मागचा भाग पश्‍चिमेच्या समुद्राकडे* असेल.

त्याच्या प्रेताला दुर्गंधी येईल

आणि ती सबंध देशात पसरेल;+

कारण देव अद्‌भुत गोष्टी करेल.’

२१ हे देशा, घाबरू नकोस.

खूश हो आणि आनंद साजरा कर, कारण यहोवा महान कार्यं करणार आहे.

२२ रानातल्या पशूंनो, घाबरू नका,

कारण रानातली कुरणं हिरवीगार होतील,+

आणि झाडांना फळं लागतील;+

अंजिराचं झाड आणि द्राक्षवेल भरपूर फळं देतील.+

२३ सीयोनच्या मुलांनो, तुम्ही खूश व्हा आणि तुमचा देव यहोवा याच्यामुळे आनंद साजरा करा;+

कारण तो तुम्हाला योग्य प्रमाणात शरद ऋतूतला पाऊस देईल,

तो तुमच्यावर पाऊस पाडेल,

आणि आधीप्रमाणेच, तो तुम्हाला शरद आणि वसंत ऋतूंतला पाऊस देईल.+

२४ खळी* धान्याने भरलेली असतील,

आणि कुंडे नवीन द्राक्षारसाने आणि तेलाने भरून वाहतील.+

२५ ज्या वर्षांमध्ये मी माझ्या मोठ्या सैन्याला,

म्हणजे झुंडींनी येणारे टोळ, बिनपंखांचे टोळ, अधाशी टोळ आणि कुरतडणारे टोळ यांना तुमच्यामध्ये पाठवलं आणि त्यांनी तुमचं पीक खाल्लं,

त्या वर्षांच्या नुकसानाची मी भरपाई करीन.+

२६ तुम्ही नक्कीच खाऊन तृप्त व्हाल,+

आणि तुमचा देव यहोवा याच्या नावाची स्तुती कराल,+

त्याने तुमच्यासाठी आश्‍चर्यकारक कार्यं केली आहेत;

माझ्या लोकांना पुन्हा कधीच लज्जित व्हावं लागणार नाही.+

२७ तेव्हा तुम्हाला कळेल, की मी इस्राएली लोकांमध्ये आहे+

आणि मी तुमचा देव यहोवा आहे;+ माझ्याशिवाय इतर कोणीही देव नाही!

माझ्या लोकांना पुन्हा कधीच लज्जित व्हावं लागणार नाही.

२८ मग मी माझी पवित्र शक्‍ती* सर्व प्रकारच्या माणसांवर ओतीन,+

आणि तुमची मुलं आणि तुमच्या मुली भविष्यवाण्या करतील,

तुमच्यातली वृद्ध माणसं स्वप्नं पाहतील,

आणि तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.+

२९ त्या दिवसांत मी माझ्या दासांवर आणि दासींवरही

माझी पवित्र शक्‍ती ओतीन.

३० मी आकाशात आणि पृथ्वीवर अद्‌भुत गोष्टी* दाखवीन,

रक्‍त, अग्नी आणि धुराचे लोट दिसतील.+

३१ यहोवाचा महान आणि भयानक दिवस येण्याआधी+

सूर्य काळवंडेल आणि चंद्र रक्‍तासारखा लाल होईल.+

३२ आणि जो कोणी यहोवाचं नाव घेऊन त्याला हाक मारेल, त्याला वाचवलं जाईल;+

कारण यहोवाने सांगितल्याप्रमाणे, सीनाय पर्वतावर आणि यरुशलेममध्ये वाचलेले लोक,+

म्हणजे ज्यांना यहोवाने बोलावलं आहे, ते वाचलेले लोक असतील.”

३ “पाहा! त्या दिवसांत आणि त्या काळात,

जेव्हा मी यहूदाच्या आणि यरुशलेमच्या बंदिवानांना परत आणीन,+

 २ तेव्हा मी सर्व राष्ट्रांनाही एकत्र करीन

आणि मी त्यांना खाली यहोशाफाटच्या* खोऱ्‍यात* आणीन.

माझे लोक आणि माझा वारसा असलेलं इस्राएल यांच्यासोबत त्यांनी जे केलं,

त्याबद्दल मी तिथे त्यांचा न्याय करीन;+

कारण त्यांनी माझ्या लोकांची इतर राष्ट्रांमध्ये पांगापांग केली,

आणि माझा देश आपसात वाटून घेतला.+

 ३ त्यांनी माझ्या लोकांसाठी चिठ्ठ्या टाकल्या;+

वेश्‍येला पैसे देण्यासाठी ते मुलगा विकायचे

आणि द्राक्षारस पिण्यासाठी मुलगी विकायचे.

 ४ हे सोर, सीदोन आणि पलेशेथच्या सर्व प्रदेशांनो,

तुमचा माझा काय संबंध?

तुमचं काही वाईट केल्याबद्दल, तुम्ही माझा सूड घेत आहात का?

तुम्ही माझा सूड घेत असाल,

तर मी लगेच तुमच्या कृत्यांप्रमाणे तुमची परतफेड करीन.+

 ५ कारण तुम्ही माझं सोनं आणि चांदी घेतली आहे,+

आणि माझा सगळ्यात मौल्यवान खजिना तुम्ही तुमच्या मंदिरांत नेला;

 ६ यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांना त्यांच्या देशापासून दूर नेण्यासाठी,

तुम्ही त्यांना ग्रीसच्या लोकांना विकून टाकलं;+

 ७ म्हणून तुम्ही त्यांना जिथे विकलं होतं, तिथून त्यांना परत आणून,+

मी तुमच्या कृत्यांप्रमाणे तुमची परतफेड करीन.

 ८ मी तुमच्या मुलामुलींना यहूदाच्या लोकांच्या हाती विकून टाकीन,+

आणि ते त्यांना एका दूरच्या राष्ट्राला, म्हणजे शबाच्या लोकांना विकतील;

कारण यहोवा स्वतः असं बोललाय.

 ९ राष्ट्रांमध्ये ही घोषणा करा:+

‘युद्धासाठी तयार व्हा!* शूरवीरांना सज्ज करा!

सर्व सैनिकांना हल्ला करण्यासाठी पुढे सरसावू द्या!+

१० तुमच्या नांगरांचे फाळ ठोकून तलवारी बनवा आणि तुमच्या कोयत्यांचे भाले बनवा.

दुबळ्यानेही म्हणावं, “मी ताकदवान आहे.”

११ आजूबाजूच्या राष्ट्रांनो, एकत्र व्हा आणि येऊन मदत करा!’”+

हे यहोवा, तुझ्या वीरांना* खाली त्या ठिकाणी घेऊन ये.

१२ “राष्ट्रांनो उठा, आणि यहोशाफाटच्या खोऱ्‍यात* या;

कारण तिथे मी आजूबाजूच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करण्यासाठी बसणार आहे.+

१३ विळा चालवा, कारण पीक तयार आहे.

द्राक्षकुंड भरलं आहे, म्हणून खाली या आणि द्राक्षं तुडवा.+

द्राक्षारसाची भांडी ओसंडून वाहत आहेत, कारण राष्ट्रांचा दुष्टपणा फार झाला आहे.

१४ लोकांच्या झुंडीच्या झुंडी निर्णयाच्या खोऱ्‍यात* जमा झाल्या आहेत,

कारण निर्णयाच्या खोऱ्‍यात* यहोवाचा दिवस जवळ आला आहे.+

१५ सूर्य आणि चंद्र काळवंडतील,

आणि ताऱ्‍यांचं तेज नाहीसं होईल.

१६ तेव्हा यहोवा सीयोनमधून गरजेल,

तो यरुशलेममधून घोषणा करेल.

आकाश आणि पृथ्वी थरथरू लागतील;

पण यहोवा आपल्या लोकांसाठी आश्रय असेल,+

इस्राएलच्या लोकांसाठी तो एक गड असेल.

१७ तेव्हा तुम्हाला कळेल, की सीयोनवर, माझ्या पवित्र पर्वतावर राहणारा मी तुमचा देव यहोवा आहे.+

यरुशलेम एक पवित्र ठिकाण होईल,+

आणि यापुढे परके* तिथे पाऊल ठेवणार नाहीत.+

१८ त्या दिवशी, पर्वतांवरून गोड द्राक्षारस पाझरेल,+

टेकड्यांवरून दूध वाहील.

यहूदाचे सगळे ओढे पाण्याने भरून वाहतील.

यहोवाच्या मंदिरातून एक झरा वाहील,+

तो बाभळीच्या झाडांच्या खोऱ्‍याला पाणी पुरवेल.

१९ पण इजिप्त* ओसाड पडेल,+

आणि अदोम उजाड रान होईल,+

कारण ते यहूदाच्या लोकांशी क्रूरपणे वागले,+

आणि त्यांच्या देशात त्यांनी निर्दोष रक्‍त सांडलं.+

२० पण यहूदामध्ये कायम लोकांची वस्ती राहील,

आणि यरुशलेम पिढ्या न्‌ पिढ्या राहील.+

२१ मी त्यांना निर्दोष समजत नव्हतो, पण आता मी त्यांना निर्दोष समजेन;*+

आणि यहोवा सीयोनमध्ये राहील.”+

म्हणजे, “यहोवा देव आहे.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “पृथ्वीच्या.”

किंवा “नवऱ्‍यासाठी.”

किंवा “तरुणीसारखा.”

किंवा “छाती बडवा.”

शब्दशः “पवित्र करा.”

किंवा कदाचित, “सुकलेली अंजिरं.”

किंवा “गुरं चारण्याच्या जमिनी.”

किंवा “पृथ्वीच्या.”

किंवा “हुकूम बजावणारा.”

किंवा “कृपाळू.”

किंवा “लगेच न रागावणारा.”

किंवा “त्याला पस्तावा होईल.”

किंवा “पस्तावा होईल.”

शब्दशः “पवित्र करा.”

किंवा “वडीलजनांना.”

शब्दशः “तोंड.”

म्हणजे, मृत समुद्र.

म्हणजे, भूमध्य समुद्र.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “चमत्कार.”

म्हणजे, “यहोवा न्यायाधीश आहे.”

किंवा “खालच्या मैदानात.”

शब्दशः “पवित्र करा.”

किंवा “योद्ध्यांना.”

किंवा “खालच्या मैदानात.”

किंवा “खालच्या मैदानात.”

किंवा “खालच्या मैदानात.”

किंवा “विदेशी.”

किंवा “मिसर.”

शब्दशः “त्यांचं रक्‍त निर्दोष समजेन.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा