नहेम्या
१ हखल्याचा मुलगा नहेम्या*+ याचे शब्द: राजाच्या* शासनकाळाच्या २० व्या वर्षी किसलेव* महिन्यात मी शूशनच्या*+ राजवाड्यात होतो. २ तेव्हा माझ्या भावांपैकी एक असलेला हनानी+ हा यहूदाहून इतर काही माणसांसोबत आला. मी त्यांना बंदिवासातून सुटलेल्यांपैकी उरलेल्या यहुद्यांबद्दल+ आणि यरुशलेमबद्दलही विचारलं. ३ ते म्हणाले: “बंदिवासातून सुटलेल्यांपैकी, जे लोक तिथल्या प्रांतात आहेत ते फार वाईट आणि लाजिरवाण्या परिस्थितीत आहेत.+ यरुशलेमच्या भिंती पडलेल्या आहेत+ आणि शहराची फाटकं जळून गेली आहेत.”+
४ हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवस शोक करत राहिलो. मी उपास करून,+ स्वर्गातल्या देवासमोर प्रार्थना करत राहिलो. ५ मी म्हणालो: “हे यहोवा,* स्वर्गातल्या महान आणि विस्मयकारक देवा, तू नेहमी आपला करार पाळतोस; तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांना आणि तुझ्या आज्ञा पाळणाऱ्यांना तू एकनिष्ठ प्रेम दाखवतोस.+ ६ कृपा करून तुझ्या या सेवकाकडे लक्ष दे आणि आज मी तुझ्यासमोर करत असलेली माझी प्रार्थना ऐक. मी तुझ्या सेवकांसाठी, म्हणजे इस्राएली लोकांसाठी रात्रंदिवस तुला प्रार्थना करत आहे+ आणि इस्राएलच्या लोकांनी तुझ्याविरुद्ध केलेली पापं कबूल करत आहे. मी आणि माझ्या वडिलांच्या घराण्याने पाप केलं आहे.+ ७ आम्ही तुझ्याविरुद्ध दुष्टपणे वागलो आहोत.+ तू तुझा सेवक मोशे याला दिलेल्या आज्ञा, नियम आणि न्याय-निर्णय* आम्ही पाळले नाहीत.+
८ तू आपला सेवक मोशे याला जे सांगितलं होतं, ते* कृपा करून आठव: ‘जर तुम्ही अविश्वासूपणे वागलात, तर मी सर्व राष्ट्रांमध्ये तुमची पांगापांग करीन.+ ९ पण जर तुम्ही माझ्याकडे परत येऊन माझ्या आज्ञांचं पालन केलं, तर तुम्ही पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांत कुठेही असलात, तरी मी तुम्हाला तिथून गोळा करीन+ आणि आपल्या नावाच्या गौरवासाठी जे ठिकाण मी निवडलं आहे,+ तिथे तुम्हाला आणीन.’ १० ते तुझे सेवक आणि तुझे लोक आहेत. तू आपल्या महान सामर्थ्याने त्यांना सोडवलंस.+ ११ हे यहोवा, कृपा करून तुझ्या या सेवकाची प्रार्थना ऐक. तसंच, तुझ्या नावाचा मनापासून आदर करण्यात आनंद मानणाऱ्या तुझ्या इतर सर्व सेवकांचीही प्रार्थना ऐक. तुझ्या या सेवकाला आज तू यश दे आणि राजाने मला दया दाखवावी असं होऊ दे.”+
त्या वेळी मी राजाचा प्यालेबरदार* होतो.+
२ अर्तहशश्त राजाच्या+ शासनकाळाच्या २० व्या वर्षी+ निसान* महिन्यात, राजापुढे मद्य ठेवलेलं होतं. मी नेहमीप्रमाणे मद्याचा प्याला राजाच्या हातात दिला.+ यापूर्वी मी राजासमोर कधीही उदास दिसलो नव्हतो. २ तेव्हा राजा मला म्हणाला: “तू आजारी नाहीस, मग इतका उदास का दिसतोस? तुला काहीतरी काळजी असल्याशिवाय असं होणार नाही.” हे ऐकल्यावर मी खूप घाबरलो.
३ तेव्हा मी म्हणालो: “महाराजांना मोठं आयुष्य लाभो! माझ्या वाडवडिलांना ज्या शहरात पुरलं आहे, ते शहर उजाड पडलं आहे आणि त्याची फाटकं जळून खाक झाली आहेत.+ मग, माझं मन उदास होणार नाही का?” ४ तेव्हा राजा मला म्हणाला: “तुझी काय इच्छा आहे, सांग.” हे ऐकून मी लगेच स्वर्गातल्या देवाला प्रार्थना केली.+ ५ त्यानंतर मी राजाला म्हणालो: “तुमची हरकत नसेल आणि तुमच्या या सेवकावर तुमची कृपा असेल, तर यहूदामध्ये ज्या शहरात माझ्या वाडवडिलांना पुरलं आहे, तिथे मला पाठवा, म्हणजे मी ते पुन्हा बांधीन.”+ ६ मग राजा, ज्याच्या शेजारी त्याची राणीही बसली होती, त्याने मला विचारलं: “तुझा प्रवास किती दिवसांचा असेल आणि तू कधी परत येशील?” अशा रितीने, राजा मला पाठवायला तयार झाला+ आणि मी त्याला माझ्या परत येण्याची निश्चित वेळ सांगितली.+
७ मग मी राजाला म्हणालो: “महाराजांची माझ्यावर कृपा असेल, तर नदीपलीकडच्या* प्रांताच्या राज्यपालांसाठी मला पत्रं देण्यात यावीत,+ म्हणजे ते मला त्यांच्या प्रदेशातून जाऊ देतील आणि मी यहूदापर्यंत सुखरूपपणे पोहोचू शकेन. ८ तसंच, महाराजांचा वनरक्षक आसाफ याच्यासाठीही एक पत्र मला द्यावं, म्हणजे तो मंदिराच्या किल्ल्याची दारं,+ शहराच्या भिंती+ आणि मी ज्या घरात राहीन ते बांधण्यासाठी मला लाकडं देईल.” तेव्हा राजाने मला पत्रं दिली,+ कारण माझा देव माझ्यासोबत होता.*+
९ मग मी नदीपलीकडच्या प्रांताच्या राज्यपालांकडे आलो आणि त्यांना राजाची पत्रं दिली. राजाने माझ्यासोबत सैन्याचे अधिकारी आणि घोडेस्वार यांनाही पाठवलं होतं. १० इस्राएलच्या लोकांना मदत करण्यासाठी कोणी आला आहे, ही गोष्ट होरोनी सनबल्लट+ आणि अम्मोनी+ अधिकारी* तोबीया+ यांना समजली, तेव्हा त्यांना ती अजिबात आवडली नाही.
११ शेवटी मी यरुशलेमला पोहोचलो आणि तिथे तीन दिवस राहिलो. १२ मी रात्री उठून आपल्यासोबत काही माणसांना घेतलं. यरुशलेमसाठी जे करण्याचं माझ्या देवाने माझ्या मनात घातलं होतं, त्याबद्दल मी कोणालाही सांगितलं नाही. आणि ज्या गाढवावर मी बसलो होतो, त्याच्याशिवाय आमच्यासोबत इतर कोणतंच जनावर नव्हतं. १३ मी रात्री खोऱ्याच्या फाटकातून+ गेलो आणि मोठ्या सापाच्या कारंज्यासमोरून, राखेच्या ढिगाऱ्यांच्या फाटकाकडे+ गेलो. यरुशलेमच्या पडलेल्या भिंतींची आणि त्याच्या जळून गेलेल्या फाटकांची+ मी पाहणी केली. १४ नंतर मी पुढे कारंज्याच्या फाटकाकडे+ आणि राजाच्या तळ्याकडे गेलो. मी ज्या गाढवावर बसलो होतो, त्याला तिथून पुढे जाण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. १५ तरीही, रात्री मी खोऱ्याच्या वाटेने+ पुढे जात भिंतीची पाहणी करत राहिलो. त्यानंतर मी परत फिरलो आणि खोऱ्याच्या फाटकातून आत येऊन आपल्या घरी परतलो.
१६ मी कुठे गेलो होतो आणि काय करत होतो, हे उपअधिकाऱ्यांना+ माहीत नव्हतं. कारण मी यहुदी लोकांना, याजकांना, उच्च घराण्यातल्या लोकांना, उपअधिकाऱ्यांना आणि मंदिराच्या बांधकामात भाग घेणाऱ्या इतरांना काहीच सांगितलं नव्हतं. १७ शेवटी मी त्यांना म्हणालो: “आपली परिस्थिती किती वाईट आहे! पाहा, यरुशलेम उजाड पडलं आहे आणि त्याची फाटकं आगीने जाळून टाकण्यात आली आहेत. चला, आपण यरुशलेमच्या भिंती पुन्हा बांधू, म्हणजे आपल्यावर हा कलंक राहणार नाही.” १८ मग देव कशा प्रकारे माझ्यासोबत होता+ आणि राजा मला काय म्हणाला,+ हे मी त्या सर्वांना सांगितलं. तेव्हा ते म्हणाले: “चला आपण बांधकाम सुरू करू.” मग त्यांनी या चांगल्या कामासाठी एकमेकांना प्रोत्साहन दिलं.*+
१९ जेव्हा होरोनी सनबल्लट, अम्मोनी+ अधिकारी* तोबीया+ आणि अरबी गेशेम+ यांनी याविषयी ऐकलं, तेव्हा ते आमची थट्टा करू लागले.+ ते तिरस्काराने आम्हाला म्हणाले: “तुम्ही हे काय चालवलंय? महाराजांविरुद्ध तुम्ही बंड करणार आहात का?”+ २० तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं: “स्वर्गातला देवच आम्हाला यश देईल+ आणि आम्ही त्याचे सेवक हे बांधकाम पूर्ण करू. पण यरुशलेममध्ये तुमचा काहीच भाग नाही किंवा तुम्ही कोणताच हक्क सांगू शकत नाही आणि यरुशलेमच्या इतिहासात तुमचं नाव असावं, असं तुम्ही काहीही केलेलं नाही.”+
३ मग महायाजक एल्याशीब+ आणि याजक असलेल्या त्याच्या भावांनी मिळून मेंढरं फाटक+ बांधायला सुरुवात केली. त्यांनी त्या फाटकाला पवित्र* केलं+ आणि त्याला दरवाजे बसवले. हमेआच्या बुरुजापासून+ ते हनानेलच्या बुरुजापर्यंतच्या+ भागाला त्यांनी पवित्र केलं. २ त्यांच्या बाजूला यरीहोची माणसं+ बांधकाम करत होती आणि त्यांच्या बाजूला इम्रीचा मुलगा जक्कूर बांधकाम करत होता.
३ हस्सनाच्या मुलांनी मासे फाटक+ बांधलं; त्यांनी त्याची लाकडी चौकट बसवली+ आणि मग तिला दरवाजे, कड्या आणि अडसर लावले. ४ आणि त्यांच्या बाजूला उरीयाचा मुलगा, म्हणजे हक्कोसचा नातू मरेमोथ+ याने दुरुस्तीचं काम केलं. त्याच्या बाजूला बरेख्याचा मुलगा, म्हणजे मशेजबेलचा नातू मशुल्लाम+ याने दुरुस्तीचं काम केलं. त्याच्या बाजूला बानाचा मुलगा सादोक याने दुरुस्तीचं काम केलं. ५ त्यांच्या बाजूला तकोवाच्या लोकांनी+ दुरुस्तीचं काम केलं, पण त्यांच्यातल्या प्रतिष्ठित लोकांनी आपल्यावर देखरेख करणाऱ्यांच्या हाताखाली सेवा करायला नकार दिला.
६ पासेहाचा मुलगा योयादा आणि बसोदयाचा मुलगा मशुल्लाम यांनी जुन्या शहराच्या फाटकाची+ दुरुस्ती केली. त्यांनी त्याची लाकडी चौकट बसवली आणि मग तिला दरवाजे, कड्या आणि अडसर लावले. ७ त्यांच्या बाजूला गिबोनी+ मलत्याह आणि मेरोनोथी यादोन यांनी दुरुस्तीचं काम केलं. ही गिबोनची आणि मिस्पाची+ माणसं होती आणि ती नदीपलीकडे* असलेल्या प्रांताच्या+ राज्यपालाच्या अधिकाराखाली* होती. ८ त्यांच्या बाजूला सोनार असलेला हरहयाचा मुलगा उज्जियेल याने दुरुस्तीचं काम केलं. त्याच्या बाजूला अत्तर बनवणाऱ्यांपैकी* असलेला हनन्या याने दुरुस्तीचं काम केलं. त्यांनी यरुशलेमपासून रुंद भिंतीपर्यंतच्या+ भागात दगडी फरश्या बसवल्या. ९ त्यांच्या बाजूला यरुशलेमच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी असलेला, हूरचा मुलगा रफाया याने दुरुस्तीचं काम केलं. १० त्यांच्या बाजूला हरूमफचा मुलगा यदाया याने आपल्या घरासमोर दुरुस्तीचं काम केलं. त्याच्या बाजूला हशबन्याहचा मुलगा हत्तूश याने दुरुस्तीचं काम केलं.
११ हारीमचा मुलगा+ मल्कीया आणि पहथ-मवाबचा मुलगा+ हश्शूब यांनी दुसऱ्या भागाची,* तसंच भट्ट्यांच्या बुरुजाची+ दुरुस्ती केली. १२ त्यांच्या बाजूला यरुशलेमच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी असलेला, हल्लोहेशचा मुलगा शल्लूम याने दुरुस्तीचं काम केलं; त्याच्या मुलींनीही त्याच्यासोबत दुरुस्तीचं काम केलं.
१३ हानून आणि जानोहचे+ रहिवासी यांनी खोऱ्याच्या फाटकाची+ दुरुस्ती केली; त्यांनी ते बांधलं आणि त्याचे दरवाजे, कड्या आणि अडसर लावले. तसंच त्यांनी १,००० हात* अंतरापर्यंत, म्हणजे राखेच्या ढिगाऱ्यांच्या फाटकापर्यंत+ भिंतीची दुरुस्ती केली. १४ बेथ-हक्करेम+ जिल्ह्याचा अधिकारी असलेला, रेखाबचा मुलगा मल्कीया याने राखेच्या ढिगाऱ्यांच्या फाटकाची दुरुस्ती केली. त्याने ते बांधलं आणि त्याचे दरवाजे, कड्या आणि अडसर लावले.
१५ मिस्पा+ जिल्ह्याचा अधिकारी असलेला कोलहोजेचा मुलगा शल्लून याने कारंजे फाटकाची+ दुरुस्ती केली; त्याने ते बांधलं, त्याचं छत बनवलं आणि त्याचे दरवाजे, कड्या आणि अडसर लावले. तसंच, राजाच्या बागेजवळ+ जे नाल्याचं तळं होतं, त्याच्या भिंतीचीही+ त्याने दुरुस्ती केली. त्याने दावीदपुरापासून+ खाली जाणाऱ्या जिन्यापर्यंत+ दुरुस्तीचं काम केलं.
१६ बेथ-सूरच्या+ अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी असलेला अजबूकचा मुलगा नहेम्या याने दावीदच्या कबरस्तानासमोर+ दुरुस्तीचं काम केलं. त्याने तलावापर्यंत+ आणि योद्ध्यांच्या भवनापर्यंत दुरुस्तीचं काम केलं.
१७ त्याच्या शेजारी या लेव्यांनी दुरुस्तीचं काम केलं: बानीचा मुलगा रहूम आणि त्याच्या बाजूला कईलाच्या+ अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी असलेला हशब्याह याने आपल्या जिल्ह्याच्या वतीने दुरुस्तीचं काम केलं. १८ त्याच्या बाजूला त्यांच्या या भावांनी दुरुस्तीचं काम केलं: कईलाच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी असलेला हेनादादचा मुलगा बवइ.
१९ त्याच्याशेजारी मिस्पाचा अधिकारी असलेला येशूवाचा+ मुलगा एजेर, भिंतीला आधार देणाऱ्या खांबाला लागून असलेल्या शस्त्रागाराकडे* जाणाऱ्या चढावासमोर,+ दुसऱ्या एका भागाची दुरुस्ती करत होता.
२० त्याच्या बाजूला जब्बइचा+ मुलगा बारूख याने आवेशाने काम केलं आणि भिंतीला आधार देणाऱ्या खांबापासून, महायाजक एल्याशीब+ याच्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंत आणखी एका भागाची दुरुस्ती केली.
२१ त्याच्याशेजारी उरीयाचा मुलगा आणि हक्कोसचा नातू मरेमोथ+ याने आणखी एका भागाची, म्हणजे एल्याशीबच्या घराच्या प्रवेशद्वारापासून, घराच्या शेवटापर्यंतच्या भागाची दुरुस्ती केली.
२२ त्याच्या बाजूला यार्देन जिल्ह्यातल्या*+ याजकांनी दुरुस्तीचं काम केलं. २३ त्यांच्याशेजारी बन्यामीन आणि हश्शूब यांनी आपापल्या घरासमोर दुरुस्तीचं काम केलं. त्यांच्या बाजूला मासेयाचा मुलगा आणि अनन्याचा नातू अजऱ्या यानेही आपल्याच घरासमोर दुरुस्तीचं काम केलं. २४ त्याच्या बाजूला हेनादादचा मुलगा बिन्नुई याने आणखी एका भागाचं, म्हणजे अजऱ्याच्या घरापासून भिंतीला आधार देणाऱ्या खांबापर्यंत+ आणि भिंतीच्या कोपऱ्यापर्यंत दुरुस्तीचं काम केलं.
२५ त्याच्याशेजारी उजईचा मुलगा पलाल याने भिंतीला आधार देणाऱ्या खांबासमोर आणि राजमहालाला*+ लागून असलेल्या बुरुजासमोर, म्हणजे ‘पहारेकऱ्यांच्या अंगणाजवळ’+ असलेल्या वरच्या बुरुजासमोर दुरुस्तीचं काम केलं. त्याच्या बाजूला परोशचा मुलगा+ पदायाह याने दुरुस्तीचं काम केलं.
२६ ओफेल+ इथे राहणाऱ्या मंदिराच्या सेवकांनी*+ पूर्वेकडे असलेल्या पाणी फाटकासमोरच्या+ भागापर्यंत आणि पुढे आलेल्या बुरुजापर्यंत दुरुस्तीचं काम केलं.
२७ त्यांच्या बाजूला तकोवाच्या लोकांनी+ दुसऱ्या एका भागाचं, म्हणजे पुढे आलेल्या मोठ्या बुरुजासमोरून ओफेलच्या भिंतीपर्यंत दुरुस्तीचं काम केलं.
२८ याजकांपैकी प्रत्येकाने घोडा फाटकापासून+ पुढे, आपापल्या घरासमोर दुरुस्तीचं काम केलं.
२९ त्यांच्याशेजारी इम्मेरचा मुलगा सादोक+ याने आपल्याच घरासमोर दुरुस्तीचं काम केलं.
त्याच्या बाजूला पूर्वेकडच्या फाटकाचा पहारेकरी+ असलेला शखन्याहचा मुलगा शमाया याने दुरुस्तीचं काम केलं.
३० त्याच्याशेजारी शलेम्याहचा मुलगा हनन्या आणि सालफचा सहावा मुलगा हानून याने दुसऱ्या एका भागाचं दुरुस्तीचं काम केलं.
त्याच्या बाजूला बरेख्याचा मुलगा मशुल्लाम+ याने आपल्याच घरासमोर* दुरुस्तीचं काम केलं.
३१ त्याच्याशेजारी सोनारांच्या संघाचा सदस्य असलेल्या मल्कीयाने तपासणी फाटकासमोर, मंदिराच्या सेवकांच्या*+ आणि व्यापाऱ्यांच्या घरापर्यंत, तसंच कोपऱ्यावर असलेल्या वरच्या खोलीपर्यंत दुरुस्तीचं काम केलं.
३२ सोनार आणि व्यापारी यांनी, कोपऱ्यावर असलेली वरची खोली आणि मेंढरं फाटक+ यांच्या मधल्या भागात दुरुस्तीचं काम केलं.
४ आम्ही भिंत पुन्हा बांधत आहोत हे सनबल्लटला+ कळलं, तेव्हा त्याला ते अजिबात आवडलं नाही.* तो खूप संतापला आणि यहुद्यांना हिणवू लागला. २ त्याच्या भावांच्या आणि शोमरोनच्या सैनिकांच्या समोर तो म्हणाला: “हे दुबळे यहुदी लोक काय करत आहेत? हे काम त्यांना जमणार आहे का? बलिदानं अर्पण करून ते हे काम एका दिवसात संपवणार आहेत का? मातीच्या ढिगाऱ्यांतल्या जळलेल्या दगडांना ते पुन्हा जिवंत करणार आहेत का?”+
३ तेव्हा त्याच्याजवळ उभा असलेला अम्मोनी+ तोबीया+ म्हणाला: “ते जे बांधकाम करत आहेत त्याच्यावर एखादा कोल्हा चढला, तरी ती दगडी भिंत कोसळेल.”
४ पण नहेम्या म्हणाला: “हे आमच्या देवा ऐक, कारण आमचा अपमान केला जात आहे.+ त्यांचे टोमणे त्यांनाच लागू दे*+ आणि बंदिवासाच्या देशात त्यांना लुटलं जाऊ दे. ५ त्यांचे अपराध झाकू नकोस किंवा त्यांचं पाप तुझ्यासमोरून पुसून टाकू नकोस.+ कारण त्यांनी बांधकाम करणाऱ्यांचा अपमान केला आहे.”
६ तेव्हा आम्ही भिंत बांधण्याचं काम चालूच ठेवलं. संपूर्ण भिंत तिच्या अर्ध्या उंचीपर्यंत बांधून पूर्ण झाली आणि लोक मन लावून काम करत राहिले.
७ जेव्हा सनबल्लट, तोबीया,+ तसंच अरबी,+ अम्मोनी, आणि अश्दोदी+ लोक यांनी ऐकलं, की यरुशलेमच्या भिंतींच्या दुरुस्तीचं काम जोरात चाललं आहे आणि ती जिथेजिथे पडली आहे तिथेतिथे पुन्हा बांधकाम करण्यात येत आहे, तेव्हा त्यांना खूप राग आला. ८ म्हणून त्यांनी यरुशलेमविरुद्ध लढण्याचा आणि तिथे जाऊन गोंधळ माजवण्याचा कट रचला. ९ तेव्हा आम्ही आमच्या देवाला प्रार्थना केली आणि रात्रंदिवस त्यांच्यापासून संरक्षणासाठी पहारा ठेवला.
१० पण यहूदाचे लोक म्हणू लागले: “मजूर* थकून गेले आहेत आणि दगडमातीचे खूप ढिगारे आहेत. आपण ही भिंत कधीच बांधून पूर्ण करू शकणार नाही.”
११ दुसरीकडे आमचे शत्रू म्हणत होते: “त्यांनी आपल्याला पाहण्याआधीच किंवा त्यांना काही कळण्याआधीच, आपण त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना मारून टाकू आणि त्यांचं काम बंद पाडू.”
१२ शत्रूंच्या जवळ राहणारे यहुदी जेव्हा काम करायला यायचे, तेव्हा ते आम्हाला सारखं* असं सांगायचे: “ते सर्व दिशांनी येतील आणि आपल्यावर हल्ला करतील.”
१३ म्हणून मी भिंतीमागे खोलवर असलेल्या आणि खुल्या ठिकाणांवर पहारेकरी नेमले. मी त्यांना त्यांच्या घराण्यांनुसार नेमलं आणि तलवारी, भाले आणि धनुष्यं घेऊन पहारा द्यायला सांगितलं. १४ ते घाबरत आहेत हे जेव्हा मी पाहिलं, तेव्हा मी लगेच उठून उपअधिकाऱ्यांना आणि उच्च घराण्यांतल्या लोकांना+ म्हणालो: “त्यांना घाबरू नका.+ आपला महान आणि विस्मयकारक+ देव यहोवा याला आठवा आणि आपल्या भावांसाठी, बायकामुलांसाठी आणि घरांसाठी लढा.”
१५ आमच्या शत्रूंना समजलं, की त्यांची योजना आम्हाला कळली आहे आणि खऱ्या देवाने त्यांचा कट हाणून पाडला आहे. त्यानंतर आम्ही पुन्हा भिंतीचं बांधकाम सुरू केलं. १६ त्या दिवसापासून माझी अर्धी माणसं काम करायची+ आणि बाकीची माणसं चिलखत घालून भाले, ढाली आणि धनुष्यं घेऊन उभी राहायची. आणि अधिकारी+ सर्व यहुद्यांच्या मागे उभे राहून, १७ भिंत बांधणाऱ्यांना मदत करायचे. जे ओझी वाहून नेत होते, ते एका हाताने काम करायचे आणि त्यांच्या दुसऱ्या हातात शस्त्र असायचं. १८ तसंच, बांधकाम करणाऱ्या प्रत्येकाच्या कमरेला तलवार असायची आणि शिंग वाजवणारा+ माझ्या बाजूला उभा राहायचा.
१९ मग मी उपअधिकाऱ्यांना, उच्च घराण्यांतल्या लोकांना आणि बाकीच्या सर्वांना म्हणालो: “हे काम फार मोठं आहे आणि आपण एकमेकांपासून दूर, वेगवेगळ्या ठिकाणी भिंतीचं बांधकाम करत आहोत. २० म्हणून शिंग फुंकण्याचा आवाज ऐकताच, आम्ही आहोत त्या ठिकाणी तुम्ही सर्व जण एकत्र या. आपला देव आपल्या बाजूने लढेल.”+
२१ तेव्हा आम्ही काम करत राहिलो आणि आमच्यापैकी अर्धी माणसं, पहाटेपासून ते आकाशात तारे दिसू लागेपर्यंत भाले घेऊन उभी राहायची. २२ मग मी लोकांना म्हणालो: “सर्व पुरुषांनी आपापल्या सेवकासोबत रात्री यरुशलेममध्ये राहावं. ते रात्री पहारा देतील आणि दिवसा काम करतील.” २३ अशा रितीने, मी, माझे भाऊ, माझे सेवक+ आणि माझ्यासोबत असलेले पहारेकरी, कधीच आमची वस्त्रं काढत नव्हतो आणि आमच्यापैकी प्रत्येकाच्या उजव्या हातात नेहमी शस्त्र असायचं.
५ मग, लोकांनी आणि त्यांच्या बायकांनी आपल्या यहुदी भावांविरुद्ध खूपच तक्रार करायला सुरुवात केली.+ २ काही लोक म्हणू लागले: “आम्ही पुष्कळ लोक आहोत आणि आम्हाला बरीच मुलंबाळं आहेत. जिवंत राहण्यासाठी आम्हाला पोट भरेल इतकं अन्न मिळालं पाहिजे.” ३ तर इतर लोक असं म्हणत होते: “या दुष्काळात अन्न मिळवण्यासाठी आम्हाला आमची शेतं, द्राक्षमळे आणि घरं गहाण ठेवावी लागतात.” ४ आणखी काही लोक म्हणत होते: “राजाचा कर भरण्यासाठी आम्ही आमच्या शेतांवर आणि द्राक्षमळ्यांवर पैसे उसने घेतले आहेत.+ ५ खरंतर, आम्ही आणि आमचे भाऊ एकाच हाडामांसाचे आहोत* आणि आमची मुलं त्यांच्या मुलांपेक्षा काही वेगळी नाहीत. तरीही, आम्हाला आमच्या मुलामुलींना गुलाम म्हणून विकावं लागतंय. आमच्या काही मुली तर आधीच गुलामगिरीत आहेत.+ पण हे थांबवण्याची ताकद आमच्यात नाही, कारण आमची शेतं आणि द्राक्षमळे इतरांच्या ताब्यात आहेत.”
६ त्यांच्या या तक्रारी ऐकून मला खूप राग आला. ७ म्हणून मी या गोष्टींवर विचार केला आणि मग या विषयावर मी उपअधिकाऱ्यांसोबत आणि उच्च घराण्यांतल्या लोकांसोबत बोललो आणि त्यांना म्हणालो: “तुमच्यापैकी प्रत्येक जण स्वतःच्याच भावाकडून व्याज घेतोय.”+
शिवाय, हा प्रश्न सोडवण्यासाठी मी एक मोठी सभाही भरवली. ८ मी त्यांना म्हणालो: “आपल्या ज्या यहुदी भावांना, इतर राष्ट्रांना विकण्यात आलं होतं, त्यांना परत विकत घेण्यासाठी आम्हाला शक्य होतं ते सर्व आम्ही केलं. मग, आता तुम्ही आपल्याच भावांना विकणार आहात का,+ आणि आम्हाला त्यांना परत विकत घ्यावं लागेल का?” हे ऐकून ते काहीच उत्तर देऊ शकले नाहीत, कारण काय बोलावं हे त्यांना सुचत नव्हतं. ९ मग मी त्यांना म्हणालो: “तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे. इतर राष्ट्रांनी, म्हणजे आपल्या शत्रूंनी आपली निंदा करू नये, म्हणून तुम्ही आपल्या देवाला भिऊन वागायला नको का?+ १० तेव्हा आता कृपा करून व्याज घेणं बंद करा. मी, माझे भाऊ आणि माझे सेवक तर आपल्या यहुदी भावांकडून व्याज न घेता त्यांना धान्य आणि पैसे उसने देतो.+ ११ तुम्ही आजच्या आज त्यांची शेतं, द्राक्षमळे आणि जैतुनाच्या बागा त्यांना परत करा.+ तसंच, त्यांचे पैसे, नवीन द्राक्षारस आणि तेल यांतला जो शंभरावा भाग* तुम्ही त्यांच्याकडून व्याज म्हणून घेता, तोही त्यांना परत करा.”
१२ यावर ते म्हणाले: “या सर्व गोष्टी आम्ही त्यांना परत करू आणि त्यांच्याकडून काहीच मागणार नाही. तू जसं सांगितलंस तसंच आम्ही करू.” त्यांनी त्यांचं हे वचन पाळण्याची शपथ घ्यावी म्हणून मी याजकांना बोलावलं. १३ त्यासोबतच मी आपलं वस्त्र झटकलं आणि म्हणालो: “जो कोणी हे वचन पाळणार नाही, त्या प्रत्येकाला खऱ्या देवाने त्याच्या घरादारातून आणि मालमत्तेतून अशाच रितीने झटकून टाकावं. त्या माणसाला अशा प्रकारे झटकून कंगाल करून टाकलं जावं.” यावर मंडळीतले सर्व जण “आमेन!”* असं म्हणाले. मग त्यांनी यहोवाची स्तुती केली आणि लोकांनी वचन दिल्याप्रमाणे केलं.
१४ इतकंच नाही, तर राजाने मला ज्या दिवसापासून यहूदा प्रांताचा राज्यपाल+ बनवलं, त्या दिवसापासून आजपर्यंत, म्हणजे अर्तहशश्त राजाच्या शासनकाळाच्या+ २० व्या वर्षापासून+ ते ३२ व्या वर्षापर्यंत,+ एकूण १२ वर्षं, मी किंवा माझ्या भावांनी राज्यपालाला दिला जाणारा अन्नाचा भत्ता घेतला नाही.+ १५ पण माझ्याआधीच्या राज्यपालांनी लोकांवर खूप भार टाकला होता आणि ते त्यांच्याकडून दररोज अन्नासाठी आणि मद्यासाठी चांदीचे ४० शेकेल* घेत होते. त्यांचे सेवकही लोकांवर खूप अत्याचार करायचे. पण मला देवाची भीती असल्यामुळे+ मी तसं केलं नाही.+
१६ शिवाय, भिंत बांधण्याच्या कामात मी स्वतः हातभार लावला आणि माझे सर्व सेवकही तिथे काम करायचे. आम्ही कोणाकडून साधं एक शेतही घेतलं नाही.+ १७ माझ्या मेजावर १५० यहुदी आणि उपअधिकारी, तसंच इतर राष्ट्रांतून येणारे पाहुणेही जेवायला असायचे. १८ दररोज, माझ्या आज्ञेने* एक बैल, सहा धष्टपुष्ट मेंढे आणि वेगवेगळे पक्षी यांचं मांस शिजवलं जायचं आणि दर दहा दिवसांनी सर्व प्रकारची मद्यं भरपूर प्रमाणात मेजावर आणली जायची. इतकं सर्व असूनही मी राज्यपालाला दिला जाणारा भत्ता कधी मागितला नाही, कारण लोकांवर आधीच राजाच्या सेवेचा भार होता. १९ म्हणून मी अशी प्रार्थना केली, “हे माझ्या देवा, मी या लोकांसाठी जे काही केलं आहे ते विसरू नकोस.+ माझी आठवण ठेव आणि मला आशीर्वाद दे.”
६ सनबल्लट, तोबीया,+ अरबी गेशेम+ आणि आमच्या बाकीच्या शत्रूंना जेव्हा कळलं, की मी भिंत बांधून पूर्ण केली आहे+ आणि ती जिथेजिथे पडली होती तिथे पुन्हा बांधकाम करण्यात आलं आहे (पण अजून मी फाटकांना दरवाजे बसवले नव्हते),+ २ तेव्हा सनबल्लट आणि गेशेम यांनी मला लगेच असा निरोप पाठवला: “आपण ओनोच्या खोऱ्यातल्या*+ गावात भेटण्यासाठी एक वेळ ठरवू या आणि तू तिथे आम्हाला भेटायला ये.” पण खरंतर, माझं काहीतरी बरंवाईट करण्याचा त्यांचा कट होता. ३ तेव्हा मी काही लोकांना त्यांच्याकडे असा निरोप घेऊन पाठवलं: “मी या मोठ्या कामात गुंतलोय, त्यामुळे मला तिथे यायला जमणार नाही. मी तुम्हाला भेटायला आलो तर इकडे काम बंद पडेल.” ४ त्यांनी चार वेळा मला तोच निरोप पाठवला, पण मी प्रत्येक वेळी त्यांना तेच उत्तर दिलं.
५ मग पाचव्या वेळी, सनबल्लटने आपल्या सेवकाला माझ्याकडे तोच निरोप घेऊन पाठवलं, पण या वेळी त्याच्या हाती त्याने एक खुलं* पत्रही पाठवलं. ६ त्यात असं लिहिलं होतं: “आसपासच्या राष्ट्रांत अशी चर्चा चालली आहे आणि गेशेमसुद्धा+ हेच बोलत आहे, की तू आणि यहुदी लोक मिळून बंड करण्याची योजना करत आहात.+ म्हणूनच तुम्ही ही भिंत बांधत आहात; आणि या बातम्यांनुसार तू त्यांचा राजा बनणार आहेस. ७ तसंच, ‘आता यहूदामध्ये एक राजा आहे!’ अशी स्वतःबद्दल घोषणा करण्यासाठी तू सबंध यरुशलेममध्ये संदेष्ट्यांना नेमलं आहेस. ही बातमी आता नक्कीच राजापर्यंत पोहोचेल, म्हणून तू इथे ये, म्हणजे आपण या गोष्टीबद्दल चर्चा करू.”
८ पण मी त्याला असं उत्तर पाठवलं: “तू म्हणत आहेस तसं काहीही घडलेलं नाही. या सगळ्या फक्त तुझ्या मनातल्या* कल्पना आहेत.” ९ ते सर्व आम्हाला असं म्हणून घाबरवण्याचा प्रयत्न करत होते: “ते निराश होतील* आणि हे काम पूर्ण करू शकणार नाहीत.”+ पण मी अशी प्रार्थना केली, “हे देवा, माझ्या हातांना बळ दे.”+
१० मग मी दलायाचा मुलगा, म्हणजे महेटाबेलचा नातू शमाया याच्या घरी गेलो. तो तिथे लपून बसला होता. तो म्हणाला: “आपण एक वेळ ठरवून खऱ्या देवाच्या मंदिरात भेटू. आणि आपण मंदिराची दारं बंद करून घेऊ, कारण ते तुला ठार मारायला येत आहेत. ते रात्रीच्या वेळी तुला मारायला येणार आहेत.” ११ पण मी म्हणालो: “मी राज्यपाल आहे. मग असं पळून जाणं मला शोभेल का? माझ्यासारखा माणूस मंदिरात जाऊन लपला तर जिवंत राहू शकेल का?+ मी मंदिरात जाणार नाही!” १२ तेव्हा मला कळलं, की या संदेष्ट्याला देवाने पाठवलं नव्हतं, तर मला फसवण्यासाठी तोबीया आणि सनबल्लट+ यांनी त्याला पैसे दिले होते. १३ मला घाबरवण्यासाठी आणि पाप करायला लावण्यासाठी, त्याला पैसे देण्यात आले होते. यामुळे माझी बदनामी करण्याचं आणि माझ्यावर आरोप लावण्याचं त्यांना निमित्त मिळालं असतं.
१४ तेव्हा मी अशी प्रार्थना केली: “हे माझ्या देवा, तोबीया+ आणि सनबल्लट यांनी जे केलं ते विसरू नकोस. तसंच, संदेष्टी नोअद्या आणि इतर संदेष्ट्यांनी मला सतत घाबरवण्याचा कसा प्रयत्न केला, तेही विसरू नकोस.”
१५ अशा रितीने, अलूल* महिन्याच्या २५ व्या दिवशी, म्हणजे ५२ दिवसांत भिंत बांधून पूर्ण झाली.
१६ ही गोष्ट जेव्हा आमच्या सर्व शत्रूंनी ऐकली आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांनी हे पाहिलं, तेव्हा त्यांना खूप लाज वाटली.+ आणि हे काम आमच्या देवाच्या मदतीनेच पूर्ण झालं होतं, हे त्यांना कळलं. १७ त्या दिवसांत, यहूदाच्या उच्च घराण्यांतले लोक+ तोबीयाला बरीच पत्रं पाठवायचे आणि तो त्यांची उत्तरं द्यायचा. १८ यहूदामधल्या बऱ्याच लोकांनी तोबीयाला साथ देण्याची शपथ घेतली होती. कारण तो आरहचा मुलगा+ शखन्याह याचा जावई होता आणि त्याचा मुलगा यहोहानान याने बरेख्याचा मुलगा मशुल्लाम+ याच्या मुलीशी लग्न केलं होतं. १९ शिवाय, ते लोक सतत मला तोबीयाबद्दल चांगल्या गोष्टी सांगत राहायचे आणि मी जे बोलायचो ते त्याला जाऊन सांगायचे. मग तोबीया मला घाबरवण्यासाठी पत्रं पाठवायचा.+
७ भिंत बांधण्याचं काम पूर्ण होताच,+ मी तिच्या फाटकांचे दरवाजे बसवले.+ त्यानंतर द्वारपालांना,+ गायकांना+ आणि लेव्यांना+ नेमण्यात आलं. २ मग मी माझा भाऊ हनानी,+ तसंच किल्ल्याचा+ अधिकारी हनन्याह यांना यरुशलेमवर अधिकारी म्हणून नेमलं. हनन्याह हा खूप भरवशालायक माणूस होता आणि तो इतर बऱ्याच लोकांपेक्षा खऱ्या देवाची जास्त भीती बाळगायचा.+ ३ मी त्यांना म्हणालो: “यरुशलेमची फाटकं दुपारपर्यंत उघडली जाऊ नयेत. आणि द्वारपालांचा पहारा संपण्याआधीच त्यांनी फाटकं बंद करून त्यांना अडसर लावावेत. पहारा देण्यासाठी यरुशलेमच्या रहिवाशांना पहारेकरी म्हणून नेमावं. काहींनी त्यांच्या चौक्यांवर आणि काहींनी आपापल्या घरासमोर पहारा द्यावा.” ४ यरुशलेम शहर खूप मोठं होतं आणि त्यात फार कमी लोक राहत होते.+ शिवाय, घरं अजून पुन्हा बांधण्यात आली नव्हती.
५ तेव्हा, मी उच्च घराण्यांतल्या लोकांना आणि उपअधिकाऱ्यांना गोळा करावं आणि लोकांची त्यांच्या वंशावळीप्रमाणे नोंदणी करावी,+ असं माझ्या देवाने माझ्या मनात घातलं. मग, मला बंदिवासातून सर्वात आधी परत आलेल्यांची नोंदणी केलेलं एक पुस्तक सापडलं. त्यात त्यांच्या वंशावळीची पुढीलप्रमाणे नोंदणी करण्यात आली होती:
६ बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर+ ज्या लोकांना बंदी बनवून घेऊन गेला होता,+ त्यांपैकी प्रांतातले हे यहुदी बंदिवासातून नंतर यरुशलेम आणि यहूदा इथे आपापल्या शहरात परत आले.+ ७ ते जरूब्बाबेल,+ येशूवा,+ नहेम्या, अजऱ्या, रामीयाह, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेथ, बिग्वई, नहूम आणि बानाह यांच्यासोबत परत आले.
परत आलेल्या इस्राएली पुरुषांची संख्या पुढीलप्रमाणे होती:+ ८ परोशची मुलं,* २,१७२; ९ शपत्याहची मुलं, ३७२; १० आरहची मुलं,+ ६५२; ११ पहथ-मवाबचे वंशज+ येशूवा व यवाब यांची मुलं,+ २,८१८; १२ एलामची मुलं,+ १,२५४; १३ जत्तूची मुलं, ८४५; १४ जक्काईची मुलं, ७६०; १५ बिन्नुईची मुलं, ६४८; १६ बेबाईची मुलं, ६२८; १७ अजगादची मुलं २,३२२; १८ अदोनीकामची मुलं, ६६७; १९ बिग्वईची मुलं, २,०६७; २० आदीनची मुलं, ६५५; २१ हिज्कीयाच्या घराण्यातल्या आटेरची मुलं, ९८; २२ हाशूमची मुलं, ३२८; २३ बेजाइची मुलं, ३२४; २४ हारीफची मुलं, ११२; २५ गिबोनची+ मुलं, ९५; २६ बेथलेहेमची आणि नटोफाची माणसं, १८८; २७ अनाथोथची+ माणसं, १२८; २८ बेथ-अजमावेथची माणसं, ४२; २९ किर्याथ-यारीमची,+ कफीराची आणि बैरोथची+ माणसं, ७४३; ३० रामाची आणि गेबाची+ माणसं, ६२१; ३१ मिखमासची+ माणसं, १२२; ३२ बेथेलची+ आणि आयची+ माणसं, १२३; ३३ दुसऱ्या नबोची माणसं, ५२; ३४ दुसऱ्या एलामची मुलं, १,२५४; ३५ हारीमची मुलं, ३२०; ३६ यरीहोची माणसं, ३४५; ३७ लोद, हादीद व ओनो+ यांची मुलं, ७२१; ३८ सनाहची माणसं, ३,९३०.
३९ याजकांची+ संख्या पुढीलप्रमाणे होती: येशूवाच्या घराण्यातल्या यदायाची मुलं, ९७३; ४० इम्मेरची मुलं, १,०५२; ४१ पशहूरची मुलं,+ १,२४७; ४२ हारीमची+ मुलं, १,०१७.
४३ लेव्यांची+ संख्या पुढीलप्रमाणे होती: होदवाच्या घराण्यातल्या कदमीएलची, येशूवाची मुलं,+ ७४. ४४ गायकांची+ संख्या पुढीलप्रमाणे होती: आसाफची+ मुलं, १४८. ४५ द्वारपालांची+ संख्या पुढीलप्रमाणे होती: शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूब,+ हतीता आणि शोबाई यांची मुलं, १३८.
४६ मंदिरातल्या सेवकांची*+ नावं पुढीलप्रमाणे होती: सीहाची मुलं, हसूफाची मुलं, तब्बावोथची मुलं, ४७ केरोसची मुलं, सीयाची मुलं, पादोनची मुलं, ४८ लबानाची मुलं, हगाबाची मुलं, सल्माईची मुलं, ४९ हानानची मुलं, गिद्देलची मुलं, गहरची मुलं, ५० रायाची मुलं, रसीनची मुलं, नकोदाची मुलं, ५१ गज्जामची मुलं, उज्जाची मुलं, पासेहाची मुलं, ५२ बेसाईची मुलं, मऊनीमची मुलं, नफूशेसीमची मुलं, ५३ बकबुकची मुलं, हकूफाची मुलं, हरहूरची मुलं, ५४ बसलीथची मुलं, महीदाची मुलं, हरशाची मुलं, ५५ बर्कोसची मुलं, सीसराची मुलं, तामहाची मुलं, ५६ नसीहाची मुलं आणि हतीफाची मुलं.
५७ शलमोनच्या सेवकांची मुलं+ पुढीलप्रमाणे होती: सोताईची मुलं, सोफेरेथची मुलं, परीदाची मुलं, ५८ यालाची मुलं, दर्कोनची मुलं, गिद्देलची मुलं, ५९ शपत्याहची मुलं, हत्तीलची मुलं, पोखेरेथ-हस्सबाईमची मुलं आणि आमोनची मुलं. ६० मंदिरातल्या सर्व सेवकांची*+ आणि शलमोनच्या सेवकांच्या मुलांची एकूण संख्या ३९२ इतकी होती.
६१ जे तेल-मेलह, तेल-हर्शा, करूब, अद्दोन आणि इम्मेर इथून आले आणि ज्यांना आपलं कूळ आणि वंश दाखवून आपण इस्राएली आहोत हे सिद्ध करता आलं नाही, त्यांची नावं अशी होती:+ ६२ दलायाची मुलं, तोबीयाची मुलं, नकोदाची मुलं, ६४२. ६३ याजकांच्या मुलांची नावं पुढीलप्रमाणे होती: हबायाची मुलं, हक्कोसची+ मुलं, बर्जिल्ल्यची मुलं; (बर्जिल्ल्य याने गिलादमध्ये राहणाऱ्या बर्जिल्ल्यच्या+ मुलीशी लग्न केलं होतं आणि तिच्या घराण्यावरून त्याचं बर्जिल्ल्य असं नाव पडलं.) ६४ त्यांनी आपली वंशावळ सिद्ध करण्यासाठी वंशावळींची पुस्तकं शोधली, पण त्यांना ती सापडली नाहीत, म्हणून त्यांना याजकपदासाठी अयोग्य ठरवण्यात आलं.*+ ६५ राज्यपालाने*+ त्यांना सांगितलं, की जोपर्यंत उरीम आणि थुम्मीम*+ वापरून देवाला विचारणारा याजक येत नाही, तोपर्यंत ते परमपवित्र गोष्टी खाऊ शकणार नाहीत.+
६६ संपूर्ण मंडळीतल्या लोकांची एकूण संख्या ४२,३६० इतकी होती.+ ६७ त्यांच्या दासदासींची+ संख्या ७,३३७ इतकी होती आणि याशिवाय त्यांच्याकडे २४५ गायक व गायिकाही होत्या.+ ६८ त्यांच्याकडे ७३६ घोडे, २४५ खेचरं, ६९ तसंच ४३५ उंट, आणि ६,७२० गाढवं होती.
७० इस्राएली लोकांच्या कुळांच्या काही प्रमुखांनी मंदिराच्या कामासाठी दान दिलं.+ राज्यपालाने* खजिन्यासाठी सोन्याचे १,००० ड्राख्मा,* ५० वाट्या आणि याजकांचे ५३० झगे दिले.+ ७१ तसंच, कुळांच्या काही प्रमुखांनी बांधकामाच्या कार्याकरता असलेल्या भांडारासाठी सोन्याचे २०,००० ड्राख्मा आणि चांदीच्या २,२०० मिना* दिल्या. ७२ आणि इतर इस्राएली लोकांनी सोन्याचे २०,००० ड्राख्मा, चांदीच्या २,००० मिना आणि याजकांचे ६७ झगे दिले.
७३ मग याजक, लेवी, द्वारपाल, गायक,+ मंदिरातले सेवक* आणि इतर काही लोक आपापल्या शहरांत आणि बाकीचे सर्व इस्राएली* आपापल्या शहरांत राहू लागले.+ सातवा महिना सुरू होईपर्यंत,+ सर्व इस्राएली लोक आपापल्या शहरांत राहू लागले होते.+
८ मग सर्व लोक पाणी फाटकाच्या+ समोर असलेल्या चौकात एकमताने जमले. त्यांनी शास्त्री* एज्रा+ याला, यहोवाने इस्राएली लोकांना मोशेद्वारे दिलेलं नियमशास्त्राचं पुस्तक+ आणायला सांगितलं. २ तेव्हा सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी+ एज्रा याजकाने मंडळीसमोर, म्हणजे सर्व पुरुष, स्त्रिया आणि जे कोणी ऐकून समजू शकतील अशा सर्वांसमोर नियमशास्त्र आणलं.+ ३ मग त्याने पाणी फाटकाच्या समोर असलेल्या चौकात, पहाटेपासून दुपारपर्यंत सर्व पुरुष, स्त्रिया आणि जे कोणी ऐकून समजू शकतील अशा सर्वांच्या समोर नियमशास्त्र मोठ्याने वाचलं.+ तेव्हा लोक ते लक्ष देऊन ऐकत होते.+ ४ शास्त्री* एज्रा या प्रसंगासाठी खास तयार केलेल्या लाकडी मंचावर उभा होता. त्याच्यासोबत त्याच्या उजवीकडे मतिथ्य, शेमा, अनाया, उरीया, हिल्कीया आणि मासेया हे उभे होते. आणि त्याच्या डावीकडे पदायाह, मीशाएल, मल्कीया,+ हाशूम, हश्बद्दाना, जखऱ्या आणि मशुल्लाम हे उभे होते.
५ एज्रा लोकांपेक्षा उंच ठिकाणी उभा असल्यामुळे सर्व लोक त्याला पाहू शकत होते. त्याने पुस्तक उघडलं, तेव्हा सर्व लोक उठून उभे राहिले. ६ मग एज्राने महान आणि खऱ्या देवाची, म्हणजे यहोवाची स्तुती केली. तेव्हा सगळ्या लोकांनी आपले हात वर करून “आमेन!* आमेन!”+ असं म्हटलं. मग त्यांनी खाली वाकून, जमिनीवर डोकं टेकवून यहोवाला नमन केलं. ७ त्यानंतर येशूवा, बानी, शेरेब्याह,+ यामीन, अकूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजऱ्या, योजाबाद,+ हानान आणि पलायाह या लेव्यांनी लोकांना नियमशास्त्र समजावून सांगितलं.+ आणि लोक उभे राहून ऐकत होते. ८ ते पुस्तकातून, म्हणजेच खऱ्या देवाच्या नियमशास्त्रातून वाचत राहिले. त्यांनी ते लोकांना चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं आणि वाचलेल्या गोष्टींचा अर्थ स्पष्ट केला. अशा रितीने, जे वाचलं जात होतं, ते समजून घेण्यासाठी त्यांनी लोकांना मदत केली.+
९ मग, त्या वेळी राज्यपाल* असलेला नहेम्या, तसंच, याजक व शास्त्री* असलेला एज्रा+ आणि लोकांना शिकवत असलेले लेवी सर्वांना म्हणाले: “तुमचा देव यहोवा याच्यासाठी आजचा दिवस पवित्र आहे.+ म्हणून शोक करू नका किंवा रडू नका.” कारण नियमशास्त्रातले शब्द ऐकून सर्व लोक रडत होते. १० तो त्यांना म्हणाला: “जा, चांगले चांगले पदार्थ* खा आणि गोड पेयं प्या. ज्यांच्याकडे काही शिजवलेलं नसेल, त्यांच्याकडेही काही पाठवा.+ कारण आजचा दिवस आपल्या प्रभूसाठी पवित्र आहे. म्हणून दुःखी राहू नका, कारण यहोवाकडून मिळणारा आनंद तुम्हाला सामर्थ्य देतो.”* ११ मग लेवी सर्व लोकांना शांत करण्यासाठी म्हणाले: “रडू नका आणि दुःखी राहू नका! कारण आजचा दिवस पवित्र आहे.” १२ तेव्हा सर्व लोक गेले आणि त्यांनी खाणंपिणं केलं. तसंच, त्यांनी इतरांकडेही चांगले चांगले पदार्थ पाठवले. त्यांनी मोठा आनंद साजरा केला,+ कारण ज्या गोष्टी त्यांनी ऐकल्या होत्या, त्यांचा अर्थ त्यांना समजला होता.+
१३ मग दुसऱ्या दिवशी सर्व इस्राएली लोकांच्या कुळांचे प्रमुख, याजक आणि लेवी नियमशास्त्रातल्या वचनांचा अर्थ आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी शास्त्री* एज्रा याच्याभोवती जमले. १४ मग, यहोवाने मोशेद्वारे दिलेल्या नियमशास्त्रात त्यांना असं लिहिलेलं सापडलं, की सातव्या महिन्यातल्या सणाच्या दिवसांत, इस्राएली लोकांनी मंडपांमध्ये* राहावं,+ १५ आणि याविषयी घोषणा करावी.+ तसंच, त्यांनी आपल्या सर्व शहरांत आणि यरुशलेमच्या कानाकोपऱ्यांत अशीही घोषणा करावी: “डोंगरांवर जा आणि नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे मंडप तयार करण्यासाठी जैतून, पाईन, हदास,* खजूर आणि इतर झाडांच्या, भरपूर पानं असलेल्या फांद्या आणा.”
१६ तेव्हा लोकांनी जाऊन फांद्या आणल्या आणि प्रत्येकाने आपापल्या घराच्या छतावर आणि अंगणात मंडप तयार केले. तसंच, लोकांनी खऱ्या देवाच्या मंदिराच्या अंगणांत,+ पाणी फाटकाच्या चौकात+ आणि एफ्राईमच्या फाटकाच्या चौकातही+ मंडप तयार केले. १७ अशा प्रकारे, बंदिवासातून परत आलेल्या सर्व इस्राएली लोकांच्या मंडळीने मंडप तयार केले आणि ते त्यांत राहू लागले. नूनचा मुलगा यहोशवा याच्या काळापासून,+ त्या दिवसापर्यंत इस्राएली लोकांमध्ये अशा रितीने हा सण साजरा करण्यात आला नव्हता. म्हणून लोकांनी खूप आनंदाने हा सण साजरा केला.+ १८ आणि सणाच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत, खऱ्या देवाच्या नियमशास्त्राच्या पुस्तकाचं दररोज वाचन करण्यात आलं.+ लोकांनी सात दिवस हा सण साजरा केला. आठव्या दिवशी, नियमाशास्त्रात सांगितल्याप्रमाणे एक पवित्र सभा ठेवण्यात आली.+
९ सातव्या महिन्याच्या २४ व्या दिवशी इस्राएली लोकांनी उपास केला आणि ते गोणपाट घालून व डोक्यावर धूळ टाकून एकत्र जमले.+ २ मग त्यांच्यापैकी मूळच्या इस्राएली लोकांनी स्वतःला विदेश्यांपासून वेगळं केलं.+ त्यांनी उभं राहून आपली आणि आपल्या वाडवडिलांची पापं कबूल केली.+ ३ यानंतर, ते आपापल्या ठिकाणी उभे राहिले आणि त्यांनी तीन तास* आपला देव यहोवा याच्या नियमशास्त्राचं पुस्तक मोठ्याने वाचलं.+ मग आणखी तीन तास ते आपला देव यहोवा याच्यापुढे नमन करून, आपली पापं कबूल करत राहिले.
४ यानंतर येशूवा, बानी, कदमीएल, शबन्याह, बुन्नी, शेरेब्याह,+ बानी आणि कनानी यांनी लेव्यांच्या मंचावर उभं राहून,+ आपला देव यहोवा याला मोठ्याने प्रार्थना केली. ५ मग येशूवा, कदमीएल, बानी, हशबन्याह, शेरेब्याह, होदीया, शबन्याह आणि पथायाह म्हणाले: “उभे राहा आणि तुमचा देव यहोवा याची सदासर्वकाळ* स्तुती करा.+ हे देवा, लोक तुझ्या वैभवी नावाची स्तुती करोत, कारण आम्ही तुझा कितीही महिमा आणि स्तुती केली, तरी ती कमीच आहे.
६ तूच यहोवा आहेस;+ तू आकाश, अगदी सर्वात उंच आकाश आणि त्याची सर्व सेना, पृथ्वी आणि तिच्यावर असलेलं सर्वकाही, तसंच समुद्र आणि त्यातलं सर्वकाही बनवलंस. तूच त्या सर्वांना जिवंत ठेवतोस आणि आकाशाची सर्व सेना तुला वाकून नमन करते. ७ तू खरा देव यहोवा आहेस. तूच अब्रामला खास्द्यांच्या ऊर देशातून बाहेर आणून+ त्याला अब्राहाम हे नाव दिलंस.+ ८ तो मनापासून तुला विश्वासू होता हे तू पाहिलंस;+ म्हणून, तू त्याला आणि त्याच्या वंशजांना* कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबूसी आणि गिर्गाशी लोकांचा देश देण्याबद्दल एक करार केलास.+ तू नीतिमान असल्यामुळे आपली वचनं पाळलीस.
९ नंतर, तू इजिप्तमध्ये* आमच्या वाडवडिलांचं दुःख पाहिलंस+ आणि तांबड्या समुद्राजवळ त्यांनी ओरडून केलेली याचना तू ऐकलीस. १० मग तू फारो, त्याचा देश, त्याचे सर्व सेवक आणि त्याच्या देशाचे सर्व लोक यांना शिक्षा देण्यासाठी अनेक चिन्हं व चमत्कार केलेस,+ कारण ते तुझ्या लोकांशी गर्विष्ठपणे वागले+ हे तुला माहीत होतं. तू आपल्या नावाचा गौरव केलास आणि आजही लोकांना तुझं नाव माहीत आहे.+ ११ तू त्यांच्या डोळ्यांसमोर समुद्राचे दोन भाग केले आणि ते लोक समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालत गेले;+ खवळलेल्या समुद्रात एखादा दगड फेकावा, तसं तू त्यांचा पाठलाग करणाऱ्यांना खोल समुद्रात फेकून दिलंस.+ १२ तू त्यांना दिवसा ढगाच्या खांबाने मार्ग दाखवलास, आणि रात्री आगीच्या खांबाने प्रकाश देऊन वाट दाखवलीस.+ १३ मग तू खाली सीनाय पर्वतावर आलास;+ तू त्यांच्याशी स्वर्गातून बोललास+ आणि त्यांना तुझे नीतिमान न्याय-निर्णय, सत्याचे नियम,* चांगले कायदे आणि आज्ञा दिल्यास.+ १४ तू त्यांना तुझ्या पवित्र शब्बाथाबद्दल शिकवलंस+ आणि आपला सेवक मोशे याच्याद्वारे आज्ञा, कायदे आणि एक नियमशास्त्र दिलंस. १५ ते भुकेले होते, तेव्हा तू त्यांना आकाशातून अन्न दिलंस+ आणि त्यांना तहान लागली, तेव्हा तू त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढलंस.+ जो देश त्यांना देण्याची तू शपथ घेतली होतीस,* त्यात जाऊन त्याचा ताबा घ्यायला तू त्यांना सांगितलंस.
१६ पण आमचे वाडवडील गर्विष्ठपणे वागले+ आणि हट्टी बनले*+ आणि त्यांनी तुझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. १७ त्यांनी तुझं ऐकलं नाही+ आणि तू त्यांच्यासमोर केलेली अद्भुत कार्यं ते विसरून गेले; ते हट्टी बनले* आणि आपल्यासाठी एक पुढारी नेमून ते इजिप्तच्या गुलामगिरीत परत जायला निघाले.+ पण, तू क्षमाशील, करुणामय,* दयाळू व सहनशील* देव आहेस आणि एकनिष्ठ प्रेमाने* भरलेला आहेस,+ म्हणून तू आमच्या वाडवडिलांना सोडलं नाहीस.+ १८ त्यांनी आपल्यासाठी धातूपासून एका वासराची मूर्ती* बनवली आणि ते म्हणाले, ‘हे इस्राएल, तुला इजिप्तमधून बाहेर आणणारा हाच तुझा देव आहे.’+ अशा रितीने त्यांनी तुझा खूप अपमान केला. १९ पण तरीसुद्धा, तू त्यांना ओसाड रानात सोडून दिलं नाहीस कारण तू खूप दयाळू आहेस.+ तू दिवसा ढगाच्या खांबाने त्यांना मार्ग दाखवत राहिलास आणि रात्री आगीच्या खांबाने प्रकाश देऊन, तू त्यांना वाट दाखवायचं सोडलं नाहीस.+ २० त्यांनी समजदार व्हावं म्हणून तू त्यांना आपली पवित्र शक्ती* दिलीस.+ तू त्यांना मान्ना खायला द्यायचं सोडलं नाहीस+ आणि त्यांना तहान लागली, तेव्हा तू त्यांना पाणी दिलंस.+ २१ ओसाड रानात ४० वर्षं तू त्यांना अन्न दिलंस.+ त्यांना काहीही कमी पडलं नाही. त्यांचे कपडे जुने झाले नाहीत+ आणि त्यांचे पायही कधी सुजले नाहीत.
२२ तू राष्ट्रांना आणि देशांना त्यांच्या हाती दिलंस आणि त्यांची जमीन त्यांना वाटून दिलीस.+ त्यांनी सीहोनचा,+ म्हणजे हेशबोनच्या राजाचा देश+ ताब्यात घेतला. तसंच, ओगचा, म्हणजेच बाशानच्या राजाचा देशही त्यांनी ताब्यात घेतला.+ २३ तू त्यांच्या मुलांना आकाशातल्या ताऱ्यांसारखं अगणित केलंस.+ तू त्यांच्या वाडवडिलांना जो देश देण्याचं वचन दिलं होतंस, त्या देशात तू त्यांना आणलंस.+ २४ तेव्हा, त्यांच्या मुलांनी जाऊन त्या देशाचा ताबा घेतला.+ तू त्या देशात राहणाऱ्या कनानी लोकांना हरवलंस+ आणि त्यांच्या हाती दिलंस; त्यांनी त्या देशाच्या राजांसोबत आणि लोकांसोबत वाटेल तसं करावं, म्हणून तू त्यांना त्यांच्या हाती दिलंस. २५ त्यांनी सभोवती भिंती असलेली शहरं+ आणि सुपीक जमिनीचा देश+ काबीज केला. तसंच, सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टींनी भरलेली घरं, आधीच खोदलेली पाण्याची कुंडे, द्राक्षमळे, जैतुनाच्या बागा+ आणि पुष्कळ फळझाडं यांचा ताबा घेतला. ते खाऊन तृप्त आणि धष्टपुष्ट झाले आणि तुझ्या अपार चांगुलपणामुळे ते सुखाने राहू लागले.
२६ पण, त्यांनी तुझ्या आज्ञा मोडून तुझ्याविरुद्ध बंड केलं+ आणि तुझ्या नियमशास्त्राकडे त्यांनी पाठ फिरवली.* त्यांनी तुझ्याकडे परत यावं, म्हणून त्यांना ताकीद देणाऱ्या तुझ्या संदेष्ट्यांना त्यांनी मारून टाकलं आणि त्यांनी तुझा खूप अपमान केला.+ २७ यामुळे तू त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिलंस+ आणि ते त्यांच्यावर अत्याचार करत राहिले.+ पण त्यांच्या संकटांच्या काळात जेव्हा ते रडून तुझ्याकडे याचना करायचे, तेव्हा तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐकायचास. तू खूप दयाळू असल्यामुळे, त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून सोडवण्यासाठी तू तारणकर्ते दिलेस.+
२८ पण त्यांची सुटका होताच, ते पुन्हा तुझ्या नजरेत वाईट असलेल्या गोष्टी करू लागायचे.+ मग तू त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती द्यायचास आणि ते त्यांच्यावर अधिकार गाजवायचे.*+ मग ते पुन्हा तुझ्याकडे परत येऊन मदतीची याचना करायचे+ आणि तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐकायचास; तू खूप दयाळू असल्यामुळे वारंवार त्यांची सुटका करायचास.+ २९ त्यांनी परत फिरून तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे वागावं म्हणून तू त्यांना ताकीद द्यायचास. पण, ते गर्विष्ठपणे वागले आणि तुझ्या आज्ञा पाळायला त्यांनी नकार दिला.+ तुझे कायदे पाळल्यामुळे माणसांना जीवन मिळतं.+ पण, आमच्या वाडवडिलांनी तुझे कायदे मोडून पाप केलं. त्यांनी हट्टीपणे तुझ्याकडे पाठ फिरवून तुझ्याविरुद्ध बंड केलं* आणि त्यांनी तुझं ऐकलं नाही. ३० तू अनेक वर्षं त्यांच्याशी सहनशीलपणे वागलास.+ तुझ्या पवित्र शक्तीद्वारे तू आपल्या संदेष्ट्यांकडून त्यांना ताकीद देत राहिलास, पण तरीही त्यांनी ऐकलं नाही. शेवटी, तू त्यांना इतर राष्ट्रांच्या हाती दिलंस.+ ३१ तू खूप दयाळू असल्यामुळे तू त्यांचा पूर्णपणे नाश केला नाहीस+ किंवा त्यांना सोडून दिलं नाहीस, कारण तू करुणामय* आणि दयाळू देव आहेस.+
३२ हे आमच्या महान, शक्तिशाली आणि विस्मयकारक देवा, तू नेहमी तुझा करार पाळून एकनिष्ठ प्रेम दाखवलं आहेस.+ म्हणून आमच्यावर, तसंच आमच्या राजांवर, अधिकाऱ्यांवर,+ याजकांवर,+ संदेष्ट्यांवर,+ वाडवडिलांवर आणि अश्शूरच्या राजांच्या दिवसांपासून+ आजपर्यंत तुझ्या लोकांवर जी सर्व संकटं आली, त्यांकडे तू आता दुर्लक्ष करू नकोस. ३३ आमच्यासोबत जे काही घडलं त्याला आम्हीच जबाबदार होतो, तू आमच्यावर कोणताच अन्याय केला नाहीस. कारण, तू विश्वासूपणे वागलास. खरंतर, आम्हीच दुष्टपणे वागलो.+ ३४ आमचे राजे, अधिकारी, याजक, आणि आमचे वाडवडील तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे वागले नाहीत; तू त्यांना ज्या आज्ञा आणि स्मरण-सूचना देऊन ताकीद दिलीस, त्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. ३५ जेव्हा ते स्वतःच्या राज्यात, म्हणजे तू त्यांना दिलेल्या मोठ्या आणि सुपीक देशात राहत होते आणि तू दाखवलेल्या अपार चांगुलपणाचा आनंद घेत होते, तेव्हाही त्यांनी तुझी उपासना केली नाही+ आणि ते आपल्या वाईट कामांपासून मागे वळले नाहीत. ३६ म्हणूनच, आज आम्ही गुलाम झालो आहोत.+ ज्या देशाचं उत्पन्न आणि ज्या देशातल्या चांगल्या गोष्टी खाण्यासाठी, तो देश तू आमच्या वाडवडिलांना दिला, त्याच देशात आज आम्ही गुलाम झालो आहोत. ३७ तू आम्हाला आमच्या पापांमुळे ज्या राजांच्या हाती दिलं आहेस, त्यांना आज या देशाचं भरपूर पीक मिळत आहे.+ ते आमच्यावर* आणि आमच्या गुराढोरांवर त्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे अधिकार गाजवतात आणि यामुळे आम्ही फार दुःखात आहोत.
३८ या सर्व कारणांमुळेच आज आम्ही लेखी स्वरूपात एक पक्का करार करत आहोत+ आणि आमचे अधिकारी, लेवी आणि याजक त्यावर आपली मोहर लावत आहेत.”+
१० ज्यांनी त्या करारावर आपली मोहर लावली+ त्यांची नावं पुढीलप्रमाणे होती:
हखल्याहचा मुलगा, म्हणजे राज्यपाल* असलेला नहेम्या,
तसंच, सिद्कीया, २ सराया, अजऱ्या, यिर्मया, ३ पशहूर, अमऱ्या, मल्कीया, ४ हत्तूश, शबन्याह, मल्लूख, ५ हारीम,+ मरेमोथ, ओबद्या, ६ दानीएल,+ गिन्नथोन, बारूख, ७ मशुल्लाम, अबीया, मियामीन, ८ माज्या, बिल्गइ आणि शमाया; हे याजक आहेत.
९ तसंच, लेव्यांची नावं पुढीलप्रमाणे होती: अजन्याचा मुलगा येशूवा, हेनादादच्या मुलांपैकी बिन्नुई, कदमीएल,+ १० आणि त्यांचे भाऊ शबन्याह, होदीया, कलीता, पलायाह, हानान, ११ मीखा, रहोब, हशब्याह, १२ जक्कूर, शेरेब्याह,+ शबन्याह, १३ होदीया, बानी आणि बनीनू.
१४ लोकांच्या प्रमुखांची नावं पुढीलप्रमाणे होती: परोश, पहथ-मवाब,+ एलाम, जत्तू, बानी, १५ बुन्नी, अजगाद, बेबाई, १६ अदोनीया, बिग्वई, आदीन, १७ आटेर, हिज्कीया, अज्जूर, १८ होदीया, हाशूम, बेजाइ, १९ हारीफ, अनाथोथ, नोबाई, २० मग्पीयाश, मशुल्लाम, हेजीर, २१ मशेजबेल, सादोक, यद्दवा, २२ पलत्याह, हानान, अनाया, २३ होशे, हनन्या, हश्शूब, २४ हल्लोहेश, पिल्हा, शोबेक, २५ रहूम, हशबना, मासेया, २६ अहीया, हानान, अनान, २७ मल्लूख, हारीम आणि बानाह.
२८ तसंच इतर लोकांनी, म्हणजे याजक, लेवी, द्वारपाल, गायक, मंदिरातले सेवक* आणि खऱ्या देवाच्या नियमशास्त्राचं पालन करण्यासाठी, ज्यांनी स्वतःला इतर राष्ट्रांच्या लोकांपासून वेगळं केलं होतं,+ त्यांनी, तसंच त्यांच्या बायका, मुलं-मुली आणि या कराराबद्दल समजण्याइतकं वय असलेल्या सर्वांनी, २९ आपल्या भावांसोबत, म्हणजेच त्यांच्यातल्या मुख्य माणसांसोबत मिळून, खऱ्या देवाचा सेवक मोशे याच्याद्वारे देण्यात आलेल्या खऱ्या देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे चालण्याची; आणि आपला प्रभू यहोवा याच्या सर्व आज्ञा, न्याय-निर्णय आणि कायदे काळजीपूर्वक पाळण्याची शपथ घेतली. ही शपथ पूर्ण केली नाही, तर आपल्यावर शाप यावा असं त्यांनी म्हटलं. ३० त्यांनी अशी शपथ घेतली: “आम्ही आमच्या मुली इतर राष्ट्रांतल्या लोकांना देणार नाही आणि आमच्या मुलांसाठी त्यांच्या मुली करणार नाही.+
३१ जर इतर राष्ट्रांतल्या लोकांनी शब्बाथाच्या दिवशी+ किंवा दुसऱ्या एखाद्या पवित्र दिवशी+ कोणतंही धान्य किंवा इतर काही सामान विकायला आणलं, तर आम्ही त्यांच्याकडून काहीही विकत घेणार नाही. तसंच, सातव्या वर्षी आम्ही जमिनीचं पीक घेणार नाही+ आणि सर्व कर्ज माफ करू.+
३२ शिवाय, आम्ही स्वतःसाठी असा नियम बनवतो, की आमच्यापैकी प्रत्येक जण आपल्या देवाच्या मंदिराच्या सेवेसाठी दर वर्षी शेकेलचा* तिसरा भाग देईल.+ ३३ हे दान शब्बाथाच्या+ आणि नवचंद्राच्या दिवशी*+ दिल्या जाणाऱ्या भाकरींच्या थप्प्या,*+ नियमित दिलं जाणारं अन्नार्पण+ व होमार्पण, तसंच, ठरलेले सण,+ पवित्र गोष्टी, इस्राएली लोकांकरता प्रायश्चित्त म्हणून दिली जाणारी पापार्पणं+ यांसाठी आणि देवाच्या मंदिराच्या सर्व कामांसाठी वापरलं जाईल.
३४ तसंच, नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, आमचा देव यहोवा याच्या वेदीवर आग जळत राहावी, म्हणून दरवर्षी, ठरलेल्या वेळी याजक, लेवी आणि इतर लोक यांनी आपापल्या कुळांप्रमाणे देवाच्या मंदिरात लाकडं आणावी, यासाठी आम्ही चिठ्ठ्या टाकू.+ ३५ शिवाय, आमच्या जमिनीचं पहिलं पीक आणि सर्व प्रकारच्या फळझाडांची पहिली फळं, आम्ही दरवर्षी यहोवाच्या मंदिरात आणू.+ ३६ त्याच प्रकारे, नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आमचे प्रथमपुत्र, तसंच, आमच्या जनावरांचे,+ गुराढोरांचे आणि बकऱ्या किंवा मेंढरांचे कळप यांतले पहिले जन्मलेले आम्ही मंदिरात आणू. आम्ही त्यांना आमच्या देवाच्या मंदिरात सेवा करणाऱ्या याजकांकडे आणू.+ ३७ तसंच, पहिल्या पिकातलं भरडलेलं धान्य,+ आमची दानं, सर्व प्रकारच्या झाडांची फळं,+ नवीन द्राक्षारस आणि तेल,+ हे सर्व आम्ही आमच्या देवाच्या मंदिराच्या कोठारांत* याजकांकडे आणू.+ त्यासोबत आमच्या जमिनीच्या पिकाचा दहावा भाग* आम्ही लेव्यांना देऊ.+ कारण लेवीच, शेती केल्या जाणाऱ्या आमच्या सर्व शहरांतून पिकांचा दहावा भाग गोळा करतात.
३८ जेव्हा लेवी दहावा भाग गोळा करतील, तेव्हा याजक, म्हणजे अहरोनचा वंशज लेव्यांसोबत असावा. तसंच, लेव्यांनी त्यांना मिळणाऱ्या दहाव्या भागातून दहावा भाग,+ आपल्या देवाच्या मंदिराच्या कोठारांतल्या खोल्यांमध्ये* आणावा. ३९ इस्राएली लोकांनी आणि लेव्यांच्या मुलांनी धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल+ यांचं दान कोठारांमध्ये* आणावं.+ कारण तिथेच मंदिरातली भांडी ठेवली जातात. तसंच, सेवा करणारे याजक, द्वारपाल आणि गायकही तिथे राहतात. आम्ही आमच्या देवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष करणार नाही.”+
११ त्या वेळी, लोकांचे अधिकारी यरुशलेममध्ये राहत होते;+ पण लोकांमधून प्रत्येक दहा जणांपैकी एकाने पवित्र शहरात, म्हणजे यरुशलेममध्ये राहायला यावं, म्हणून लोकांनी चिठ्ठ्या टाकल्या.+ बाकीचे नऊ जण इतर शहरांतच राहणार होते. २ जी माणसं यरुशलेमला येऊन राहायला स्वेच्छेने तयार झाली, त्यांची लोकांनी प्रशंसा केली.
३ यरुशलेममध्ये राहणाऱ्या यहूदा प्रांतातल्या प्रमुखांची नावं पुढीलप्रमाणे होती: (उरलेले इस्राएली लोक, याजक, लेवी, मंदिरातले सेवक*+ आणि शलमोनच्या सेवकांची मुलं+ यहूदाच्या इतर शहरांत राहत होती. हे सर्व आपल्या शहरात आपापल्या वारशाच्या जागेत राहत होते.+
४ यहूदा आणि बन्यामीनच्या वंशजांपैकीही काही जण यरुशलेममध्ये राहत होते.) यहूदाच्या वंशजांमधून अथाया हा होता. अथाया उज्जीयाचा, उज्जीया जखऱ्याचा, जखऱ्या अमऱ्याचा, अमऱ्या शपत्याहचा, शपत्याह महललेलचा मुलगा होता आणि महललेल हा पेरेसच्या घराण्यातला होता.+ ५ तसंच, मासेया. मासेया हा बारूखचा, बारूख कोलहोजेचा, कोलहोजे हजायाचा, हजाया अदायाचा, अदाया योयोरीबचा, आणि योयोरीब हा जखऱ्याचा मुलगा होता. जखऱ्या हा शेलहच्या घराण्यातला होता. ६ पेरेसच्या वंशजांपैकी यरुशलेममध्ये एकूण ४६८ शूर पुरुष राहत होते.
७ बन्यामीनच्या वंशजांतल्या लोकांची नावं पुढीलप्रमाणे होती: सल्लू.+ सल्लू मशुल्लामचा, मशुल्लाम योएदचा, योएद पदायाहचा, पदायाह कोलायाचा, कोलाया मासेयाचा, मासेया ईथीएलचा आणि ईथीएल यशायाचा मुलगा होता. ८ त्याच्यासोबतच गब्बई आणि सल्लाई हेही होते. असे एकूण ९२८ पुरुष होते. ९ जिख्रीचा मुलगा योएल त्यांच्यावर देखरेख करणारा होता आणि त्याच्या खालोखाल हस्सनुवाचा मुलगा यहूदा हा शहराची देखरेख करायचा.
१० याजकांची नावं पुढीलप्रमाणे होती: योयोरीबचा मुलगा यदाया, याखीन,+ ११ आणि सराया. सराया हिल्कीयाचा, हिल्कीया मशुल्लामचा, मशुल्लाम सादोकचा, सादोक मरायोथचा आणि मरायोथ अहीटूबचा मुलगा होता.+ अहीटूब खऱ्या देवाच्या मंदिरातला एक महत्त्वाचा अधिकारी होता. १२ आणि मंदिरात काम करणारे त्यांचे भाऊ, असे एकूण ८२२ पुरुष होते. तसंच अदाया. अदाया यरोहामचा, यरोहाम पलल्याहचा, पलल्याह अमसीचा, अमसी जखऱ्याचा, जखऱ्या पशहूरचा+ आणि पशहूर मल्कीयाचा मुलगा होता. १३ त्याच्यासोबत कुळांचे प्रमुख असलेले त्याचे भाऊ, असे एकूण २४२ पुरुष होते; तसंच अमशसइ. अमशसइ अजरेलचा, अजरेल अहजईचा, अहजई मशिल्लेमोथचा आणि मशिल्लेमोथ इम्मेरचा मुलगा होता. १४ शिवाय, शूर आणि धैर्यवान असलेले त्यांचे भाऊ, असे एकूण १२८ पुरुष होते. जब्दीएल हा त्यांच्यावर देखरेख करणारा होता आणि तो एका प्रतिष्ठित घराण्यातला होता.
१५ लेव्यांची नावं पुढीलप्रमाणे होती: शमाया.+ शमाया हश्शूबचा, हश्शूब अज्रीकामचा, अज्रीकाम हशब्याहचा आणि हशब्याह बुन्नीचा मुलगा होता. १६ तसंच लेव्यांच्या प्रमुखांपैकी शब्बथई+ आणि योजाबाद+ हे होते. ते दोघं खऱ्या देवाच्या मंदिराचा बाहेरचा कारभार पाहायचे. १७ तसंच मत्तन्याह.+ मत्तन्याह मीखाचा, मीखा जब्दीचा आणि जब्दी आसाफचा मुलगा+ होता. मत्तन्याह स्तुतिगीतं गाणाऱ्यांचा संचालक होता. तो प्रार्थनेच्या वेळी स्तुतिगीतं गाण्यात पुढाकार घ्यायचा.+ त्याच्यासोबत उपसंचालक असलेला त्याचा भाऊ बकबुक्याह होता. बकबुक्याह अब्दाचा, अब्दा शम्मुवाचा, शम्मुवा गालालचा आणि गालाल यदूथूनचा मुलगा होता.+ १८ पवित्र शहरात एकूण २८४ लेवी राहत होते.
१९ द्वारपालांमध्ये अक्कूब, तल्मोन+ आणि त्यांचे भाऊ, असे एकूण १७२ पुरुष फाटकांवर पहारा द्यायचे.
२० उरलेले इस्राएली, याजक आणि लेवी हे यहूदाच्या इतर शहरांमध्ये आपापल्या वारशाच्या जागेत राहत होते. २१ मंदिरातले सेवक*+ ओफेल+ इथे राहत होते. सीहा आणि गिश्पा हे मंदिरातल्या सेवकांवर* अधिकारी होते.
२२ उज्जी हा यरुशलेममध्ये लेव्यांवर देखरेख करायचा. उज्जी बानीचा, बानी हशब्याहचा, हशब्याह मत्तन्याहचा+ आणि मत्तन्याह मीखाचा मुलगा होता. मीखा हा आसाफच्या घराण्यातला, म्हणजे गायकांपैकी होता. तो खऱ्या देवाच्या मंदिराच्या कामावर अधिकारी होता. २३ गायकांबद्दल राजाची एक खास आज्ञा होती+ आणि त्याप्रमाणे त्यांच्या दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक ठरलेली व्यवस्था होती. २४ तसंच पथायाह. पथायाह हा मशेजबेलचा मुलगा होता. मशेजबेल जेरहच्या घराण्यातला होता आणि जेरह हा यहूदाचा मुलगा होता. पथायाह हा लोकांशी संबंधित असलेल्या सर्व बाबतींत राजाचा सल्लागार होता. *
२५ वस्त्या आणि त्यांच्या आसपासची शेतं पुढीलप्रमाणे होती: यहूदा वंशाचे काही लोक किर्याथ-अर्बामध्ये+ आणि त्याच्या आसपासच्या नगरांमध्ये, दीबोनमध्ये आणि त्याच्या आसपासच्या नगरांमध्ये, यकबसेलमध्ये+ आणि त्याच्या आसपासच्या वस्त्यांमध्ये, २६ येशूवामध्ये, मोलादामध्ये,+ बेथ-पलेतमध्ये,+ २७ हसर-शुवालमध्ये,+ बैर-शेबामध्ये आणि त्याच्या आसपासच्या नगरांमध्ये, २८ सिक्लागमध्ये,+ मकोनामध्ये आणि त्याच्या आसपासच्या नगरांमध्ये, २९ एन-रिम्मोनमध्ये,+ सारयामध्ये+ आणि यर्मूथमध्ये, ३० जानोहमध्ये,+ अदुल्लममध्ये आणि त्याच्या वस्त्यांमध्ये, लाखीशमध्ये+ आणि त्याच्या शेतांमध्ये, अजेकामध्ये+ आणि त्याच्या आसपासच्या नगरांमध्ये राहत होते. ते बैर-शेबापासून थेट हिन्नोमच्या खोऱ्यापर्यंतच्या प्रदेशात राहू लागले.*+
३१ बन्यामीन वंशाचे लोक गेबामध्ये,+ मिखमाशमध्ये, अयामध्ये, बेथेलमध्ये+ आणि त्याच्या आसपासच्या नगरांमध्ये, ३२ अनाथोथमध्ये,+ नोबमध्ये,+ अनन्यामध्ये, ३३ हासोरमध्ये, रामामध्ये,+ गित्तइममध्ये, ३४ हादीदमध्ये, सबोइममध्ये, नबल्लाटमध्ये, ३५ लोदमध्ये आणि ओनोमध्ये,+ म्हणजेच कारागिरांच्या खोऱ्यामध्ये राहत होते. ३६ आणि यहूदात राहणारे लेव्यांचे काही गट बन्यामीनच्या प्रदेशात राहू लागले.
१२ शल्तीएलचा मुलगा+ जरूब्बाबेल+ आणि येशूवा+ यांच्यासोबत परत आलेल्या याजकांची आणि लेव्यांची नावं पुढीलप्रमाणे होती: सराया, यिर्मया, एज्रा, २ अमऱ्या, मल्लूख, हत्तूश, ३ शखन्याह, रहूम, मरेमोथ, ४ इद्दो, गिन्नथोई, अबीया, ५ मियामीन, मादियाह, बिल्गा, ६ शमाया, योयोरीब, यदाया, ७ सल्लू, आमोक, हिल्कीया आणि यदाया. येशूवाच्या दिवसांत हे याजकांचे आणि त्यांच्या भावांचे प्रमुख होते.
८ लेव्यांची नावं पुढीलप्रमाणे होती: येशूवा, बिन्नुई, कदमीएल,+ शेरेब्याह, यहूदा आणि मत्तन्याह.+ मत्तन्याह आपल्या भावांसोबत स्तुतिगीतं गाण्यात पुढाकार घ्यायचा. ९ आणि त्यांचे भाऊ बकबुक्याह आणि उन्नी त्यांच्यासमोर उभे राहून पहारा द्यायचे.* १० येशूवाला योयाकीम झाला, योयाकीमला एल्याशीब+ झाला आणि एल्याशीबला योयादा+ झाला. ११ योयादाला योनाथान झाला आणि योनाथानला यद्दवा झाला.
१२ योयाकीमच्या दिवसांत आपापल्या कुळांचे प्रमुख असलेल्या याजकांची नावं पुढीलप्रमाणे होती: सरायाच्या+ कुळातून मरायाह; यिर्मयाच्या कुळातून हनन्या; १३ एज्राच्या+ कुळातून मशुल्लाम; अमऱ्याच्या कुळातून यहोहानान; १४ मल्लूखीच्या कुळातून योनाथान; शबन्याहच्या कुळातून योसेफ; १५ हारीमच्या+ कुळातून अदना; मरायोथच्या कुळातून हेलकइ; १६ इद्दोच्या कुळातून जखऱ्या; गिन्नथोनच्या कुळातून मशुल्लाम; १७ अबीयाच्या+ कुळातून जिख्री; मिन्यामीनच्या कुळातून . . . ;* मोवद्याच्या कुळातून पिल्तय; १८ बिल्गाच्या+ कुळातून शम्मुवा; शमायाच्या कुळातून यहोनाथान; १९ योयोरीबच्या कुळातून मत्तनई; यदायाच्या+ कुळातून उज्जी; २० सल्लाईच्या कुळातून कल्लय; आमोकच्या कुळातून एबेर; २१ हिल्कीयाच्या कुळातून हशब्याह आणि यदायाच्या कुळातून नथनेल.
२२ लेव्यांच्या कुळांच्या प्रमुखांची आणि याजकांची नावं, ही एल्याशीब, योयादा, योहानान आणि यद्दवा+ यांच्या दिवसांत, म्हणजे पर्शियाचा राजा दारयावेश याच्या शासनकाळापर्यंत लिहून ठेवण्यात आली.
२३ कुळांचे प्रमुख असलेल्या लेव्यांची नावं, एल्याशीबचा मुलगा योहानान याच्या काळापर्यंत, इतिहासाच्या पुस्तकात लिहून ठेवण्यात आली. २४ हशब्याह, शेरेब्याह आणि कदमीएलचा मुलगा+ येशूवा+ हे लेव्यांचे प्रमुख होते. आणि खऱ्या देवाचा सेवक दावीद याच्या सूचनांप्रमाणे, त्यांचे भाऊ स्तुती आणि धन्यवाद करण्यासाठी त्यांच्यासमोर उभे राहायचे,+ म्हणजे पहारेकऱ्यांचा एक गट दुसऱ्या गटासमोर उभा राहायचा. २५ मत्तन्याह,+ बकबुक्याह, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन आणि अक्कूब+ हे द्वारपाल+ होते. ते फाटकांजवळ असलेल्या कोठारांवर पहारा द्यायचे. २६ हे सर्व, येशूवाचा+ मुलगा म्हणजे योसादाकचा नातू योयाकीम याच्या दिवसांत, तसंच राज्यपाल असलेला नहेम्या आणि याजक व शास्त्री* असलेला एज्रा+ यांच्या दिवसांत सेवा करायचे.
२७ यरुशलेमच्या भिंतींच्या उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी लेव्यांना, ते राहत असलेल्या ठिकाणांहून शोधून यरुशलेमला आणण्यात आलं. धन्यवादाची गीतं गाऊन+ तसंच झांजा, तंतुवाद्यं आणि वीणा* वाजवून हा सोहळा आनंदाने साजरा करण्यासाठी त्यांना आणण्यात आलं. २८ शिवाय, गायकांची मुलं* यार्देनच्या प्रदेशातून एकत्र आली. ती यरुशलेमच्या आसपासच्या सर्व भागांतून, नटोफाच्या लोकांच्या+ वस्त्यांमधून, २९ बेथ-गिलगालमधून+ आणि गेबाच्या+ व अजमावेथच्या+ आसपासच्या परिसरातून आली. कारण गायकांनी यरुशलेमच्या चारही बाजूला स्वतःसाठी वस्त्या बांधल्या होत्या. ३० मग याजकांनी आणि लेव्यांनी स्वतःला शुद्ध केलं. तसंच लोकांना, फाटकांना आणि भिंतीलाही त्यांनी शुद्ध केलं.+
३१ त्यानंतर, मी यहूदाच्या अधिकाऱ्यांना भिंतीवर आणलं. मग धन्यवादाची गीतं गाण्यासाठी मी दोन मोठे गट तयार केले आणि इतर लोकांना त्यांच्यामागे चालायला सांगितलं. एक गट भिंतीवरून उजवीकडे राखेच्या ढिगाऱ्यांच्या फाटकाच्या+ दिशेने निघाला. ३२ होशाया आणि त्याच्यासोबत यहूदाच्या अधिकाऱ्यांपैकी अर्धे जण गायकांमागे चालू लागले. ३३ अजऱ्या, एज्रा, मशुल्लाम, ३४ यहूदा, बन्यामीन, शमाया आणि यिर्मया हेही त्यांच्यासोबत होते. ३५ त्यांच्यासोबत कर्णे+ घेतलेली याजकांची ही मुलंसुद्धा होती: जखऱ्या. जखऱ्या योनाथानचा, योनाथान शमायाचा, शमाया मत्तन्याहचा, मत्तन्याह मीखायाचा, मीखाया जक्कूरचा आणि जक्कूर आसाफचा मुलगा+ होता. ३६ आणि त्याचे भाऊ शमाया, अजरेल, मिललई, गिललई, माई, नथनेल, यहूदा आणि हनानी. या सर्वांनी खऱ्या देवाचा सेवक दावीद याची वाद्यं+ घेतली होती. आणि शास्त्री* एज्रा+ त्यांच्यापुढे चालत होता. ३७ ते कारंजे फाटकापासून+ दावीदपुराच्या+ जिन्यावरून+ सरळ पुढे गेले आणि दावीदच्या घरावर असलेल्या भिंतीच्या चढावावरून, पूर्वेकडे असलेल्या पाणी फाटकाकडे+ गेले.
३८ धन्यवादाची गीतं गाणारा दुसरा गट उलट दिशेने* चालू लागला. मग मी अर्ध्या लोकांसोबत त्याच्यामागे चालू लागलो. आम्ही भट्ट्यांच्या बुरुजाकडून+ रुंद भिंतीच्या+ दिशेने गेलो. ३९ मग एफ्राईमच्या फाटकावरून+ आणि जुन्या शहराच्या फाटकावरून+ आम्ही मासे फाटक,+ हनानेलचा बुरूज,+ हमयाचा बुरूज आणि मेंढरं फाटक+ असं करत पहारेकऱ्याच्या फाटकापर्यंत आलो.
४० शेवटी, धन्यवादाची गीतं गाणारे दोन्ही गट खऱ्या देवाच्या मंदिरासमोर उभे राहिले. मी आणि माझ्यासोबत असलेले अर्धे उपअधिकारीही उभे राहिले. ४१ तसंच, कर्णे घेतलेले याजक एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मीखाया, एल्योवेनय, जखऱ्या आणि हनन्या, ४२ शिवाय मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्कीया, एलाम आणि एजेर हेही तिथे होते. मग इज्रह्या याच्या मार्गदर्शनाखाली गायक मोठ्याने गाऊ लागले.
४३ त्या दिवशी त्यांनी पुष्कळ बलिदानं दिली आणि खूप आनंद साजरा केला.+ कारण खऱ्या देवाने त्यांना आशीर्वाद दिला होता. स्त्रिया आणि मुलंही आनंदात होती.+ म्हणून यरुशलेममधल्या लोकांच्या आनंदाचा जल्लोष दूरपर्यंत ऐकू येत होता.+
४४ त्या दिवशी, लोकांनी दिलेली दानं,+ पहिली पिकं+ आणि दहावे भाग*+ साठवण्याच्या कोठारांवर+ काही माणसांना नेमण्यात आलं. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे,+ शहरांच्या शेतांतून याजकांसाठी आणि लेव्यांसाठी+ असलेला पिकाचा भाग त्यांनी या कोठारांमध्ये साठवायचा होता. यहूदाच्या लोकांनी ही दानं दिली, कारण याजक आणि लेवी मंदिरात सेवा करू लागल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला होता. ४५ आणि याजकांनी व लेव्यांनी देवाच्या उपासनेशी संबंधित आपापली कामं आणि नेमून दिलेले शुद्धीकरणाचे विधी करायला सुरुवात केली. तसंच, दावीद आणि त्याचा मुलगा शलमोन यांच्या सूचनांप्रमाणे, गायकांनी आणि द्वारपालांनीही आपापली कामं करायला सुरुवात केली. ४६ कारण फार पूर्वी दावीद आणि आसाफ यांच्या काळात, गायकांना मार्गदर्शन करण्यासाठी संचालक होते, तसंच देवाची स्तुती व धन्यवाद करण्यासाठी गीतंही होती.+ ४७ जरूब्बाबेलच्या+ आणि नहेम्याच्या काळात, सर्व इस्राएली लोक गायकांना+ आणि द्वारपालांना+ त्यांच्या दररोजच्या गरजेप्रमाणे दान द्यायचे. तसंच, ते लेव्यांसाठीही दान द्यायचे+ आणि लेवी त्यांतून अहरोनच्या वंशजांचा भाग वेगळा काढायचे.
१३ त्या दिवशी, मोशेचं पुस्तक सर्व लोकांसमोर वाचण्यात आलं+ आणि त्यात असं लिहिलेलं सापडलं, की कोणत्याही अम्मोनी किंवा मवाबी+ माणसाने खऱ्या देवाच्या मंडळीत कधीही येऊ नये,+ २ कारण त्यांनी इस्राएली लोकांसाठी अन्न आणि पाणी आणलं नव्हतं. उलट, इस्राएली लोकांना शाप देण्यासाठी त्यांनी बलामला पैसे दिले.+ पण आमच्या देवाने तो शाप आशीर्वादात बदलला.+ ३ नियमशास्त्रातले हे शब्द ऐकताच, लोकांनी आपल्यामधून विदेशी वंशाच्या* लोकांना वेगळं करायला सुरुवात केली.+
४ याआधी, आमच्या देवाच्या मंदिराच्या कोठारांचा* अधिकार,+ तोबीयाचा नातेवाईक+ असलेल्या एल्याशीब+ याजकाकडे होता. ५ त्याने तोबीयाला एक मोठं कोठार* दिलं होतं. पूर्वी त्या कोठारात अन्नार्पणाचं सामान, ऊद* आणि भांडी ठेवली जायची. तसंच लेवी,+ गायक आणि द्वारपाल यांच्यासाठी दिलं जाणारं धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल+ यांचा दहावा भाग* आणि याजकांसाठी असलेली दानंही त्या कोठारात ठेवली जायची.+
६ या सर्व काळात मी यरुशलेममध्ये नव्हतो, कारण बाबेलचा राजा अर्तहशश्त+ याच्या शासनकाळाच्या ३२ व्या वर्षी+ मी त्याच्याकडे गेलो होतो. मग, काही काळाने मी राजाकडे रजा मागितली. ७ मी यरुशलेमला आलो, तेव्हा एल्याशीबने+ केलेल्या एका वाईट गोष्टीबद्दल मला कळलं. त्याने तोबीयाला+ खऱ्या देवाच्या मंदिरातल्या अंगणात एक कोठार दिलं होतं. ८ ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही, म्हणून मी त्या कोठारातून* तोबीयाच्या घरचं सगळं सामान बाहेर फेकून दिलं. ९ त्यानंतर मी कोठारं* स्वच्छ करण्याची आज्ञा दिली आणि मग खऱ्या देवाच्या मंदिरातली भांडी,+ तसंच अन्नार्पणाचं सामान आणि ऊद+ तिथे परत ठेवला.
१० मला असंही कळलं, की लेव्यांसाठी असलेले भाग+ त्यांना देण्यात आले नव्हते.+ त्यामुळे, मंदिरात सेवा करणारे लेवी आणि गायक आपापल्या शेताकडे+ परत गेले होते. ११ म्हणून मी उपअधिकाऱ्यांना खडसावून विचारलं:+ “खऱ्या देवाच्या मंदिराकडे असं दुर्लक्ष का करण्यात आलं?”+ मग मी त्यांना* एकत्र जमवलं आणि त्यांना आपापल्या कामावर पुन्हा नेमलं. १२ मग यहूदातल्या सर्व लोकांनी धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल यांचा दहावा भाग+ कोठारांमध्ये आणला.+ १३ त्यानंतर मी याजक असलेला शलेम्याह, शास्त्री* सादोक, आणि लेव्यांमधला पदायाह यांना कोठारांवर अधिकारी नेमलं. जक्कूरचा मुलगा, म्हणजे मत्तन्याहचा नातू हानान हा त्यांचा सहायक होता. ही सर्व माणसं भरवशालायक होती आणि आपल्या भावांना त्यांचे भाग वाटून देण्याची जबाबदारी त्यांची होती.
१४ हे माझ्या देवा, मी केलेल्या या गोष्टींची आठवण ठेव+ आणि तुझ्या मंदिरासाठी आणि त्यात सेवा करणाऱ्यांसाठी* मी जे एकनिष्ठ प्रेम दाखवलं, ते विसरू नकोस.+
१५ त्या दिवसांत मी असं पाहिलं, की यहूदातले लोक शब्बाथाच्या दिवशीही द्राक्षकुंडांत द्राक्षं तुडवायचे.+ ते धान्याच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादायचे, तसंच द्राक्षारस, द्राक्षं, अंजिरं आणि सर्व प्रकारचा माल शब्बाथाच्या दिवशी यरुशलेमला आणायचे.+ म्हणून मी त्यांना ताकीद दिली, की त्यांनी त्या दिवशी कोणतंही सामान विकू नये.* १६ शिवाय, शहरात राहणारे सोरचे लोकही मासे आणि सर्व प्रकारच्या वस्तू आणून, यहूदाच्या लोकांना यरुशलेममध्ये शब्बाथाच्या दिवशी विकायचे.+ १७ त्यामुळे, मी यहूदाच्या उच्च घराण्यांतल्या लोकांवर रागावलो आणि त्यांना विचारलं: “तुम्ही हे दुष्ट काम करून शब्बाथाच्या दिवसाला अपवित्र का करताय? १८ तुमच्या वाडवडिलांनीही हेच केलं नव्हतं का? आणि यामुळेच ही सगळी संकटं आपल्या देवाने आपल्यावर आणि या शहरावर आणली नव्हती का? आता शब्बाथाचा दिवस अपवित्र करून,+ तुम्हीही देवाला इस्राएलचा आणखीन राग येईल असं वागताय.”
१९ म्हणून शब्बाथ सुरू होण्याआधी यरुशलेमच्या फाटकांवर अंधार पडू लागताच, दरवाजे बंद केले जावेत अशी मी आज्ञा दिली. तसंच, शब्बाथ संपेपर्यंत दरवाजे उघडले जाऊ नयेत, असंही मी त्यांना बजावलं. शिवाय, शब्बाथाच्या दिवशी कोणतंही सामान आत आणलं जाऊ नये, म्हणून मी स्वतःच्या काही सेवकांना फाटकांजवळ उभं केलं. २० त्यामुळे, एकदोनदा व्यापाऱ्यांना आणि सर्व प्रकारचा माल विकणाऱ्यांना यरुशलेमच्या बाहेरच रात्र घालवावी लागली. २१ तेव्हा, मी त्यांना म्हणालो, “तुम्ही रात्रीचे असे भिंतीबाहेर का थांबून राहता?” मग मी त्यांना ताकीद दिली, “परत कधी असं केलंत, तर मला जबरदस्तीने तुम्हाला हाकलून द्यावं लागेल.” त्या वेळेपासून ते पुन्हा कधीही शब्बाथाच्या दिवशी आले नाहीत.
२२ मग मी लेव्यांना सांगितलं, की त्यांनी नियमितपणे स्वतःला शुद्ध करावं आणि शब्बाथाचा दिवस पवित्र ठेवण्यासाठी+ फाटकांवर पहारा द्यावा. हे माझ्या देवा, मी केलेल्या या गोष्टीचीही तू आठवण ठेव आणि तुझ्या अपार एकनिष्ठ प्रेमामुळे मला दया दाखव.+
२३ त्या दिवसांत मी असंही पाहिलं, की यहुद्यांनी अश्दोदी,+ अम्मोनी आणि मवाबी+ स्त्रियांशी लग्न केलं होतं.*+ २४ त्यांची अर्धी मुलं अश्दोदी आणि बाकीची मुलं इतर विदेशी भाषा बोलत होती, पण त्यांच्यापैकी कोणालाही यहुद्यांची भाषा येत नव्हती. २५ म्हणून मी त्यांना खडसावलं आणि सक्त ताकीद दिली. मी त्यांच्यापैकी काही माणसांना मार दिला+ आणि त्यांचे केस उपटले. मी त्यांना देवाच्या नावाने अशी शपथ घ्यायला लावली, की आम्ही आपल्या मुली त्यांच्या मुलांना देणार नाही आणि त्यांच्या मुली आमच्यासाठी किंवा आमच्या मुलांसाठी करणार नाही.+ २६ मग मी त्यांना म्हणालो, “इस्राएलच्या शलमोन राजाला अशा स्त्रियांनीच पाप करायला लावलं नव्हतं का? सगळ्या राष्ट्रांमध्ये त्याच्यासारखा राजा शोधून सापडला नसता.+ देवाचंही त्याच्यावर खूप प्रेम होतं,+ त्यामुळे त्याने संपूर्ण इस्राएलचं राज्य त्याच्या हाती दिलं होतं. पण, त्याच्या विदेशी बायकांनी त्यालाही पाप करायला लावलं.+ २७ आता तुम्हीही विदेशी बायकांशी लग्न करण्याचं हे भयंकर पाप करून, आपल्या देवाशी अविश्वासूपणे वागताय. खरंच, माझा यावर विश्वासच बसत नाही!”+
२८ महायाजक एल्याशीब+ याचा मुलगा योयादा+ याच्या मुलांपैकी एकाने, होरोनी सनबल्लटच्या+ मुलीशी लग्न केलं होतं. म्हणून मी त्याला हाकलून लावलं.
२९ हे माझ्या देवा, त्यांना लक्षात ठेव, कारण त्यांनी याजकपद दूषित केलं आहे आणि याजकपदाचा व लेव्यांसोबतचा करार+ अपवित्र केला आहे.
३० अशा प्रकारे, मी त्यांना विदेश्यांच्या प्रभावापासून पूर्णपणे शुद्ध केलं आणि याजकांना आणि लेव्यांना आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी नेमलं.+ ३१ तसंच, मी वेळच्या वेळी लाकडं आणि पहिलं पीक मंदिरात आणलं जाण्याची व्यवस्था केली.+
म्हणून हे माझ्या देवा, माझी आठवण ठेव आणि मला आशीर्वाद दे.+
म्हणजे, “याह सांत्वन करतो.”
म्हणजे, अर्तहशश्त
अति. ख१५ पाहा.
किंवा “सूसाच्या.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “जी ताकीद दिली होती, ती.”
किंवा “राजाला प्याला भरून देणारा.”
अति. ख१५ पाहा.
किंवा “फरात नदीपलीकडच्या.”
शब्दशः “माझ्या देवाचा चांगला हात माझ्यावर होता.”
शब्दशः “सेवक.”
शब्दशः “त्यांनी आपल्या हातांना बळ दिलं.”
शब्दशः “सेवक.”
किंवा “समर्पित.”
किंवा “फरात नदीपलीकडे.”
शब्दशः “राजासनाची.”
किंवा “मलम बनवणाऱ्यांपैकी.”
किंवा “मोजलेल्या भागाची.”
जवळजवळ ४५५ मी. (१,४६० फूट). अति. ख१४ पाहा.
किंवा “शस्त्रं ठेवण्याच्या ठिकाणाकडे.”
किंवा कदाचित, “जवळच्या जिल्ह्यातल्या.”
किंवा “राजाच्या घराला.”
किंवा “नथीनीमांनी.” शब्दशः “दिलेले लोक.”
किंवा “कोठारासमोर; खोलीसमोर.”
किंवा “नथीनीमांच्या.” शब्दशः “दिलेले लोक.”
किंवा “त्याला राग आला.”
शब्दशः “त्यांच्याच डोक्यावर परत पाठव.”
किंवा “ओझी वाहणारे.”
शब्दशः “दहा वेळा.”
शब्दशः “आमच्या भावांच्या मांसासारखंच आमचं मांस आहे.”
किंवा “एक टक्का,” म्हणजे, दर महिन्याला एक टक्का.
किंवा “असंच घडो.”
एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
किंवा “माझ्या खर्चाने.”
शब्दशः “खोऱ्यातलं मैदान.”
किंवा “मोहर लावून बंद न केलेलं.”
शब्दशः “तुझ्या हृदयातल्या.”
शब्दशः “त्यांचे हात खाली पडतील.”
अति. ख१५ पाहा.
या अध्यायात “मुलं” या शब्दाचा अर्थ “वंशज,” आणि काही ठिकाणी “रहिवासी” असाही होऊ शकतो.
किंवा “नथीनीमांची.” शब्दशः “दिलेले लोक.”
किंवा “सर्व नथीनीमांची.” शब्दशः “दिलेले लोक.”
किंवा “अशुद्ध ठरवून याजकपद नाकारण्यात आलं.”
किंवा “तिर्शाथाने,” तिर्शाथा ही पर्शियात, प्रांताच्या राज्यपालासाठी वापरली जाणारी पदवी होती.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “तिर्शाथाने,” तिर्शाथा ही पर्शियात, प्रांताच्या राज्यपालासाठी वापरली जाणारी पदवी होती.
ड्राख्मा हे पर्शियातल्या डॅरिक या सोन्याच्या नाण्याच्याच मूल्याचं होतं, असं समजलं जातं. डॅरिकचं वजन ८.४ ग्रॅम इतकं होतं. पण हे ग्रीक शास्त्रवचनातलं ड्राख्मा नाही. अति. ख१४ पाहा.
हिब्रू शास्त्रवचनांत, एक मिना म्हणजे ५७० ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
किंवा “नथीनीम.” शब्दशः “दिलेले लोक.”
शब्दशः “सर्व इस्राएल.”
किंवा “प्रती तयार करणारा.”
किंवा “प्रती तयार करणारा.”
किंवा “असंच घडो!”
किंवा “तिर्शाथा,” ही पर्शियात, प्रांताच्या राज्यपालासाठी वापरली जाणारी पदवी होती.
किंवा “प्रती तयार करणारा.”
शब्दशः “तेलकट पदार्थ.”
शब्दशः “यहोवाचा आनंद तुमचा आश्रयदुर्ग आहे.”
किंवा “प्रती तयार करणारा.”
किंवा “तात्पुरत्या आश्रयांमध्ये.”
चमकणारी पानं आणि पांढरी सुगंधी फुलं असणारं एक झुडूप.
शब्दशः “दिवसाचा चवथा भाग.”
किंवा “सर्वकाळापासून सर्वकाळापर्यंत.”
शब्दशः “बीज.”
किंवा “मिसरमध्ये.”
किंवा “विश्वसनीय नियम.”
शब्दशः “हात वर केला.”
शब्दशः “मान कठोर केली.”
शब्दशः “मान कठोर केली.”
किंवा “कृपाळू.”
किंवा “लगेच न रागावणारा.”
किंवा “प्रेमदयेने.”
किंवा “ओतीव मूर्ती.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “त्यांनी तुझं नियमशास्त्र आपल्या पाठीमागे टाकलं.”
किंवा “त्यांना चिरडायचे.”
शब्दशः “मान कठोर केली.”
किंवा “कृपाळू.”
शब्दशः “आमच्या शरीरांवर.”
किंवा “तिर्शाथा.” ही पर्शियात, प्रांताच्या राज्यपालासाठी वापरली जाणारी पदवी होती.
किंवा “नथीनीम.” शब्दशः “दिलेले लोक.”
एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
चंद्राची पहिली कोर दिसते तो दिवस.
म्हणजे, अर्पणाच्या भाकरी.
किंवा “जेवणाच्या खोल्यांत.”
किंवा “दशांश.”
किंवा “जेवणाच्या खोल्यांमध्ये.”
किंवा “जेवणाच्या खोल्यांमध्ये.”
किंवा “नथीनीम.” शब्दशः “दिलेले लोक.”
किंवा “नथीनीम.” शब्दशः “दिलेले लोक.”
किंवा “नथीनीमांवर.” शब्दशः “दिलेले लोक.”
शब्दशः “राजाच्या हाताशी होता.”
किंवा “छावणी केली.”
किंवा कदाचित, “उपासनेदरम्यान उभे राहायचे.”
हिब्रू शास्त्रात या ठिकाणी एक नाव गाळण्यात आलं आहे.
किंवा “प्रती तयार करणारा.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “प्रशिक्षित गायक.”
किंवा “प्रती तयार करणारा.”
किंवा “समोर.”
किंवा “दशांश.”
किंवा “मिश्र वंशाच्या.”
किंवा “जेवणाच्या खोल्यांचा.”
किंवा “जेवणाची खोली.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “दशांश.”
किंवा “जेवणाच्या खोलीतून.”
किंवा “जेवणाच्या खोल्या.”
म्हणजे, लेवी आणि गायक यांना.
किंवा “प्रती तयार करणारा.”
किंवा “त्याचं रक्षण करणाऱ्यांसाठी.”
किंवा कदाचित, “त्यांना त्या दिवशी ताकीद दिली, की त्यांनी कोणतंही सामान विकू नये.”
किंवा “स्त्रियांना आपल्या घरी आणलं होतं.”