वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt १ राजे १:१-२२:५३
  • १ राजे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १ राजे
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ राजे

१ राजे

१ दावीद राजा आता फार वृद्ध झाला होता.+ त्याच्यावर कितीही पांघरुणं घातली, तरी त्याला ऊब येत नव्हती. २ म्हणून त्याचे सेवक त्याला म्हणाले: “कृपया आमच्या प्रभूसाठी, राजासाठी एक कुमारी शोधायची परवानगी आम्हाला द्या. ती राजाची काळजी घेईल आणि त्यांची सेवा करेल. ती आमच्या प्रभूच्या, राजाच्या जवळ झोपेल म्हणजे त्यांना ऊब मिळेल.” ३ मग इस्राएलच्या संपूर्ण प्रदेशात ते एका सुंदर मुलीचा शोध घेऊ लागले. तेव्हा त्यांना शूनेमची+ राहणारी अबीशग+ मिळाली आणि ते तिला राजाकडे घेऊन आले. ४ ती मुलगी अतिशय सुंदर होती. ती राजाची काळजी घेऊ लागली आणि त्याची सेवा करू लागली. पण राजाने तिच्याशी संबंध ठेवले नाहीत.

५ त्या काळात, हग्गीथचा मुलगा अदोनीया+ आपलं वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत होता. “मीच राजा होणार!” असं तो म्हणत होता. त्याने स्वतःसाठी एक रथ तयार केला; तसंच त्याने घोडेस्वार आणि आपल्यापुढे धावण्यासाठी ५० माणसंही ठेवली.+ ६ पण, “तू असं का केलंस?” असं म्हणून अदोनीयाच्या वडिलांनी त्याला कधीही टोकलं नव्हतं.* त्याचा जन्म अबशालोमनंतर झाला होता, आणि तोसुद्धा अतिशय देखणा होता. ७ अदोनीया हा सरूवाच्या मुलाशी, यवाबशी आणि अब्याथार+ याजकाशी बोलला, आणि त्यांनी त्याला मदत करायची व पाठिंबा द्यायची तयारी दाखवली.+ ८ पण सादोक+ याजक, यहोयादाचा मुलगा बनाया,+ नाथान+ संदेष्टा, शिमी,+ रेई आणि दावीदचे शूर योद्धे+ यांनी मात्र अदोनीयाला पाठिंबा दिला नाही.

९ नंतर, अदोनीयाने एन-रोगेलच्या जवळ जोहेलेथ खडकाशेजारी बलिदान अर्पण करायची व्यवस्था केली.+ त्याने तिथे मेंढरं, गुरंढोरं आणि धष्टपुष्ट जनावरं यांचं बलिदान दिलं. त्या प्रसंगी त्याने आपल्या सगळ्या भावांना, म्हणजे राजाच्या मुलांना; तसंच यहूदाच्या सर्व माणसांना, म्हणजे राजाच्या सेवकांना आमंत्रण दिलं. १० पण त्याने नाथान संदेष्टा, बनाया आणि दावीदचे शूर योद्धे यांना मात्र आमंत्रण दिलं नाही. त्याने आपला भाऊ शलमोन यालाही आमंत्रण दिलं नाही. ११ मग नाथान+ संदेष्टा शलमोनच्या आईला,+ बथशेबाला+ म्हणाला: “हग्गीथचा मुलगा अदोनीया+ राजा बनलाय हे तू ऐकलं नाहीस का? पण आपले प्रभू दावीद यांना याबद्दल काहीच माहीत नाही. १२ आता जर तुला तुझा आणि तुझ्या मुलाचा, शलमोनचा जीव वाचवायचा असेल,+ तर मी जो सल्ला देतोय तो ऐक. १३ दावीद राजाकडे जा आणि त्याला म्हण: ‘माझे प्रभू, माझे राजे! तुमच्या या दासीला तुम्हीच शपथ घेऊन असं म्हणाला होतात ना, की “माझ्यानंतर तुझा मुलगा शलमोन राजा बनेल आणि तोच माझ्या राजासनावर बसेल”?+ मग अदोनीया कसा काय राजा बनला?’ १४ आणि तू हे सगळं राजाशी बोलत असतानाच मी तिथे येईन आणि तू जे काही म्हणतेस ते बरोबर आहे असं राजाला सांगेन.”

१५ मग बथशेबा राजाकडे त्याच्या खोलीत गेली. राजा फार वृद्ध झाला होता आणि शूनेमची राहणारी अबीशग+ त्याची सेवा करत होती. १६ मग बथशेबाने खाली वाकून राजाला नमन केलं. तेव्हा राजाने तिला विचारलं: “तुझी काय विनंती आहे?” १७ त्यावर ती म्हणाली: “माझे प्रभू, तुम्ही तुमचा देव यहोवा* याच्या नावाने शपथ घेऊन आपल्या या दासीला असं म्हटलं होतं, की ‘माझ्यानंतर तुझा मुलगा शलमोन राजा बनेल आणि तोच माझ्या राजासनावर बसेल.’+ १८ पण बघा, आता अदोनीया राजा होऊन बसलाय! आणि माझ्या प्रभूला, माझ्या राजाला याबद्दल काहीच माहीत नाही.+ १९ अदोनीयाने मोठ्या प्रमाणात बैलांचं, धष्टपुष्ट जनावरांचं आणि मेंढरांचं बलिदान दिलंय आणि राजाच्या सगळ्या मुलांना, अब्याथार याजकाला आणि सेनापती यवाबला आमंत्रण दिलंय;+ पण तुमचा सेवक शलमोन याला मात्र त्याने बोलावलं नाही.+ २० आता, माझ्या प्रभूनंतर त्यांच्या राजासनावर कोण बसेल हे राजाने सांगावं म्हणून संपूर्ण इस्राएलचे डोळे तुमच्याकडे लागले आहेत. २१ नाहीतर माझे प्रभू, माझे राजे, असं होईल की तुमच्यामागे* मला आणि माझ्या मुलाला लगेच राजद्रोही समजलं जाईल.”

२२ बथशेबा राजाशी बोलत असतानाच नाथान संदेष्टाही तिथे आला.+ २३ तेव्हा राजाला सांगण्यात आलं: “नाथान संदेष्टा आलाय!” नाथान आत आला आणि त्याने जमिनीवर डोकं टेकवून राजाला दंडवत घातला. २४ मग तो म्हणाला: “माझ्या प्रभूने, राजाने असं म्हटलं होतं का, की ‘माझ्यानंतर अदोनीया हा राजा बनेल आणि तोच माझ्या राजासनावर बसेल’?+ २५ कारण तो आज पुष्कळशा बैलांचं, धष्टपुष्ट जनावरांचं आणि मेंढरांचं बलिदान द्यायला गेलाय.+ आणि त्याने राजाच्या सगळ्या मुलांना, सेनापतींना आणि अब्याथार याजकाला आमंत्रित केलंय.+ ते सगळे तिथे त्याच्यासोबत खातपीत आहेत. आणि अशी घोषणा करत आहेत: ‘अदोनीया राजाला दीर्घायुष्य लाभो!’ २६ पण त्याने मला, तुमच्या या सेवकाला बोलावलं नाही. शिवाय सादोक याजक, यहोयादाचा मुलगा बनाया+ आणि तुमचा सेवक शलमोन यांनाही त्याने बोलावलं नाही. २७ हे सगळं माझ्या प्रभूच्या, राजाच्या संमतीने झालंय का? माझ्या प्रभूनंतर राजासनावर कोण बसेल हे राजाने ठरवलंय का? पण राजाने, माझ्या प्रभूने, त्याबद्दल मला काहीच सांगितलं नाही.”

२८ मग दावीद राजा म्हणाला: “बथशेबाला माझ्याकडे बोलवा.” तेव्हा ती आली आणि राजासमोर उभी राहिली. २९ राजा शपथ घेऊन तिला म्हणाला: “ज्याने मला माझ्या सगळ्या संकटांतून वाचवलं+ त्या जिवंत देवाची, यहोवाची शपथ, ३० इस्राएलचा देव यहोवा याच्या नावाने मी तुला जी शपथ वाहिली होती, की ‘माझ्यानंतर तुझा मुलगा शलमोन राजा बनेल, आणि माझ्या जागी तोच राजासनावर बसेल!’ ती मी आज पूर्ण करीन.” ३१ तेव्हा बथशेबाने जमिनीवर डोकं टेकवून राजाला दंडवत घातला, आणि ती म्हणाली: “माझ्या प्रभूंना, राजा दावीद यांना दीर्घायुष्य लाभो!”

३२ त्यानंतर लगेच दावीद राजा म्हणाला: “सादोक याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा+ मुलगा बनाया+ यांना माझ्याकडे बोलवा.” तेव्हा ते राजाकडे आले. ३३ राजा त्यांना म्हणाला: “माझ्या सेवकांना सोबत घ्या आणि माझ्या मुलाला, शलमोनला माझ्या खेचरावर*+ बसवून खाली गीहोनला+ घेऊन जा. ३४ तिथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा शलमोनला इस्राएलचा राजा म्हणून अभिषिक्‍त करतील.+ मग शिंग फुंकून अशी घोषणा करा: ‘शलमोन राजाला दीर्घायुष्य लाभो!’+ ३५ मग त्याच्यामागे चालत परत या. तो येऊन माझ्या राजासनावर बसेल आणि माझ्या जागी राजा बनेल. आणि मी इस्राएलचा आणि यहूदाचा पुढारी म्हणून त्याची नेमणूक करीन.” ३६ त्यावर यहोयादाचा मुलगा बनाया लगेच राजाला म्हणाला: “आमेन! माझ्या प्रभूचा देव, राजाचा देव यहोवा या गोष्टीला मान्यता देवो! ३७ यहोवा जसा माझ्या प्रभूसोबत, राजासोबत राहिला, तसाच तो शलमोनसोबतही राहो.+ आणि तो शलमोनचं राजासन माझ्या प्रभूच्या, दावीद राजाच्या राजासनापेक्षाही अधिक महान करो.”+

३८ मग सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा मुलगा बनाया,+ करेथी आणि पलेथी+ लोक खाली गेले; आणि त्यांनी शलमोनला दावीद राजाच्या खेचरावर+ बसवून गीहोनला+ आणलं. ३९ मग सादोक याजकाने तंबूमधून+ तेलाचं शिंग घेतलं+ आणि शलमोनचा अभिषेक केला.+ नंतर त्यांनी शिंग फुंकलं आणि सर्व लोक मोठ्याने अशी घोषणा करू लागले: “शलमोन राजाला दीर्घायुष्य लाभो!” ४० त्यानंतर सर्व लोक बासऱ्‍या वाजवत आणि मोठा जल्लोष करत त्याच्यामागे जाऊ लागले. तो जल्लोष इतका मोठा होता, की त्या आवाजाने जमीन हादरू लागली.+

४१ इकडे अदोनीयाचं आणि त्याने आमंत्रित केलेल्या लोकांचं खाणंपिणं संपलं;+ इतक्यात त्यांनी तो आवाज ऐकला. शिंग फुंकल्याचा आवाज ऐकताच यवाबने म्हटलं: “शहरात हा कसला गोंधळ चाललाय?” ४२ तो बोलत होता तेवढ्यात अब्याथार याजकाचा मुलगा योनाथान+ तिथे आला. तेव्हा अदोनीया म्हणाला: “आत ये, तू भला* माणूस आहेस. तू नक्कीच काहीतरी चांगली बातमी आणली असशील.” ४३ पण योनाथान अदोनीयाला म्हणाला: “नाही! आपल्या प्रभूने, दावीद राजाने शलमोनला राजा बनवलंय. ४४ दावीद राजाने सादोक याजकाला, नाथान संदेष्ट्याला, यहोयादाच्या मुलाला म्हणजे बनायाला, तसंच करेथी आणि पलेथी लोकांना शलमोनसोबत पाठवलं. आणि त्यांनी त्याला राजाच्या खेचरावर बसवलं.+ ४५ मग सादोक याजकाने आणि नाथान संदेष्ट्याने त्याला गीहोनमध्ये राजा म्हणून अभिषिक्‍त केलं. त्यानंतर ते जल्लोष करत परत आले आणि त्यामुळे शहरात गोंधळ माजला. तुम्ही जो आवाज ऐकला तो याचाच होता. ४६ इतकंच नाही, तर शलमोन राजासनावर विराजमान झालाय. ४७ आणि हो, आणखी एक गोष्ट, राजाचे सेवक आपल्या प्रभूचं, दावीद राजाचं अभिनंदन करायला आले आहेत. ते म्हणत आहेत: ‘तुमचा देव, शलमोनचं नाव तुमच्या नावापेक्षा अधिक मोठं करो. आणि तो त्याचं राजासन तुमच्या राजासनापेक्षाही महान करो!’ तेव्हा राजाने पलंगावरूनच देवाला नमन केलं. ४८ आणि राजा असंही म्हणाला: ‘ज्याने आज माझ्या मुलाला माझ्या राजासनावर बसवलं, आणि हे पाहण्याची संधी मला दिली त्या इस्राएलच्या देवाची, यहोवाची स्तुती होवो!’”

४९ तेव्हा अदोनीयाने आमंत्रित केलेले सगळे लोक अतिशय घाबरले, आणि उठून आपापल्या मार्गाने निघून गेले. ५० अदोनीयालासुद्धा शलमोनची फार भीती वाटली. म्हणून तो लगेच उठून गेला आणि वेदीची शिंगं घट्ट धरून राहिला.+ ५१ तेव्हा शलमोनला असं सांगण्यात आलं: “अदोनीया हा शलमोन राजाच्या भीतीमुळे वेदीची शिंगं धरून बसलाय. तो म्हणतोय: ‘शलमोन राजा आपल्या या दासाला तलवारीने मारून टाकणार नाही, अशी आधी त्याने मला शपथ द्यावी.’” ५२ त्यावर शलमोन म्हणाला: “तो एक भला माणूस असल्याचं दिसून आलं, तर त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. पण त्याच्यामध्ये जर दुष्टपणा दिसून आला,+ तर मात्र तो जिवंत राहणार नाही.” ५३ म्हणून मग शलमोन राजाने माणसं पाठवून त्याला वेदीवरून उतरवून आणलं. त्याने शलमोन राजापुढे येऊन त्याला वाकून नमन केलं. मग शलमोन त्याला म्हणाला: “आपल्या घरी जा.”

२ दावीद आपल्या आयुष्याच्या अखेरीस येऊन पोहोचला, तेव्हा त्याने आपल्या मुलाला, शलमोनला या सूचना दिल्या: २ “मी आता मरणार आहे. तेव्हा हिंमत धर+ आणि खंबीर हो.+ ३ तुझा देव यहोवा याच्या बाबतीत असलेलं तुझं कर्तव्य पूर्ण कर. त्याने सांगितलेल्या मार्गांवर चाल. मोशेच्या नियमशास्त्रात+ लिहिलेले त्याचे कायदे, त्याच्या आज्ञा, न्याय-निर्णय* आणि स्मरण-सूचना* यांचं पालन कर. म्हणजे मग, तू जे काही करशील त्यात आणि जिथे कुठे तू जाशील तिथे तुला यश मिळेल.* ४ आणि यहोवाने मला जे वचन दिलं होतं ते तो पूर्ण करेल. त्याने असं वचन दिलं होतं: ‘तुझी मुलं माझ्यासमोर पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने*+ विश्‍वासूपणे चालत राहिली आणि त्यांनी आपल्या वागणुकीकडे लक्ष दिलं, तर इस्राएलच्या राजासनावर बसायला तुझ्या वंशाचा एकही पुरुष नाही, असं कधीही होणार नाही.’+

५ तसंच, सरूवाचा मुलगा यवाब माझ्याशी कसा वागला हे तुला चांगलं माहीत आहे. आणि त्याने इस्राएलच्या दोन सेनापतींच्या बाबतीत, म्हणजे नेरचा मुलगा अबनेर+ आणि येथेरचा मुलगा अमासा+ यांच्या बाबतीत काय केलं हेसुद्धा तुला माहीत आहे. त्याने शांतीच्या काळात त्यांचा खून करून युद्धाच्या काळाप्रमाणे रक्‍त सांडलं.+ असं करून त्याने आपला कमरबंद आणि पायातले जोडे रक्‍ताने डागाळले. ६ म्हणून तू आपल्या बुद्धीचा वापर कर आणि त्याच्या पिकलेल्या केसांना शांतीने कबरेत* जाऊ देऊ नकोस.+

७ पण गिलादी बर्जिल्ल्य+ याच्या मुलांवर मात्र तू एकनिष्ठ प्रेम कर. तुझ्यासोबत तुझ्या मेजावर जेवणाऱ्‍यांमध्ये तेही असावेत. कारण तुझा भाऊ अबशालोम याच्यापासून मी पळून गेलो,+ तेव्हा त्यांनीही मला मदत केली होती.+

८ आणि बहुरीममध्ये राहणाऱ्‍या बन्यामीन वंशातल्या गेराचा मुलगा शिमी हासुद्धा तुझ्याजवळ आहे. ज्या दिवशी मी महनाइमला+ जात होतो, त्या दिवशी त्याने मला भयंकर शिव्याशाप दिले होते.+ पण तो यार्देनजवळ मला भेटायला आला, तेव्हा मी यहोवाच्या नावाने त्याला शपथ देऊन म्हणालो होतो: ‘मी तुला मारून टाकणार नाही.’+ ९ पण आता त्याला शिक्षा दिल्याशिवाय सोडू नकोस.+ तू बुद्धिमान आहेस, आणि त्याच्या बाबतीत काय करायचं हे तुला माहीत आहे. तू त्याला म्हातारा होऊन शांतीने मरू देऊ नकोस.”*+

१० नंतर दावीदचा मृत्यू झाला* आणि त्याला दावीदपुरात+ दफन करण्यात आलं. ११ दावीदने इस्राएलवर ४० वर्षं राज्य केलं; त्याने हेब्रोनमधून+ ७ वर्षं आणि यरुशलेममधून ३३ वर्षं राज्य केलं.+

१२ मग शलमोन आपल्या वडिलांच्या, दावीदच्या राजासनावर बसला आणि हळूहळू त्याचं राज्य बळकट होत गेलं.+

१३ काही काळाने मग हग्गीथचा मुलगा अदोनीया हा शलमोनच्या आईकडे, बथशेबाकडे आला. तिने त्याला विचारलं: “तू चांगल्या हेतूने आला आहेस ना?” तो म्हणाला: “हो.” १४ पुढे तो म्हणाला: “मला तुमच्याशी काही बोलायचंय.” ती म्हणाली: “बोल.” १५ तेव्हा तो म्हणाला: “तुम्हाला तर माहीतच आहे, की राज्यपद मला मिळणार होतं आणि मी राजा बनावं अशी सगळ्या इस्राएलची अपेक्षा होती.+ पण राज्यपद माझ्यापासून जाऊन माझ्या भावाला मिळालं. कारण यहोवाने त्याला ते दिलं.+ १६ पण आता तुमच्याकडे माझी एकच विनंती आहे. मला नाही म्हणू नका.” त्यावर ती त्याला म्हणाली: “सांग.” १७ तो म्हणाला: “कृपा करून शलमोन राजाला सांगा, की शूनेमकरीण अबीशग+ मला बायको करून दे. तो तुम्हाला नाही म्हणणार नाही.” १८ त्यावर बथशेबा म्हणाली: “ठीक आहे. मी तुझ्यासाठी राजाशी बोलते.”

१९ मग बथशेबा अदोनीयाच्या वतीने शलमोन राजाकडे बोलायला गेली. ती आली तेव्हा तिला भेटायला राजा लगेच आपल्या जागेवरून उठला आणि त्याने तिला दंडवत घातला. मग तो आपल्या राजासनावर जाऊन बसला. आणि त्याने आपल्या आईसाठी आपल्या उजवीकडे एक आसन ठेवायला सांगितलं. २० मग ती त्याला म्हणाली: “मी तुझ्याकडे एक छोटीशी विनंती करते. मला नाही म्हणू नकोस.” तेव्हा राजा तिला म्हणाला: “आई सांग! मी तुला नाही म्हणणार नाही.” २१ ती म्हणाली: “शूनेमकरीण अबीशग ही तुझ्या भावाला, अदोनीयाला बायको करून दे.” २२ त्यावर शलमोन राजा आपल्या आईला म्हणाला: “अदोनीयासाठी तू फक्‍त शूनेमकरीण अबीशगच का मागितलीस? त्याच्यासाठी माझं राज्यसुद्धा मागायचं होतंस ना!+ नाहीतरी त्याला अब्याथार याजकाचा आणि सरूवाच्या मुलाचा,+ यवाबचा पाठिंबा आहेच.+ शिवाय तो माझा मोठा भाऊही आहे.”+

२३ मग शलमोन राजा यहोवाच्या नावाने शपथ घेऊन म्हणाला: “अदोनीयाने अशी विनंती केली, म्हणून त्याला आपला जीव गमवावाच लागेल. आणि तसं जर झालं नाही, तर देव मला कठोरातली कठोर शिक्षा करो. २४ ज्या जिवंत देवाने, यहोवाने मला माझ्या वडिलांच्या, दावीदच्या राजासनावर बसवलं आणि माझं राज्य स्थिर केलं;+ आणि ज्याने आपल्या वचनाप्रमाणे मला राजघराणं* दिलं+ त्या देवाची शपथ, आजच्या आज अदोनीयाला मारून टाकलं जाईल.”+ २५ मग शलमोन राजाने लगेच यहोयादाचा मुलगा बनाया+ याला पाठवलं. त्याने जाऊन अदोनीयावर असा वार केला की तो मेला.

२६ नंतर, अब्याथार+ याजकाला राजा म्हणाला: “तू अनाथोथ+ इथे आपल्या शेतांकडे जा. खरंतर तुला मृत्युदंड मिळाला पाहिजे. पण आज मी तुला ठार मारणार नाही. कारण, माझे वडील दावीद यांच्यासमोर तू सर्वोच्च प्रभू यहोवा याच्या कराराची पेटी उचलायचास.+ आणि माझ्या वडिलांनी जी संकटं सोसली त्या सगळ्यांत तू त्यांच्यासोबत होतास.”+ २७ मग शलमोनने यहोवाचा याजक अब्याथार याला त्याच्या सेवेतून काढून टाकलं. अशा प्रकारे, यहोवाने एलीच्या घराण्याविरुद्ध+ शिलो+ इथे जे सांगितलं होतं ते पूर्ण झालं.

२८ यवाबला ही खबर मिळाली तेव्हा तो यहोवाच्या तंबूकडे पळून गेला,+ आणि तिथे जाऊन तो वेदीची शिंगं घट्ट धरून राहिला; कारण त्याने अबशालोमला जरी पाठिंबा दिला नव्हता,+ तरी अदोनीयाला त्याने पाठिंबा दिला होता.+ २९ मग शलमोन राजाला सांगण्यात आलं: “यवाब यहोवाच्या तंबूकडे पळालाय; तो तिथे वेदीजवळ आहे.” तेव्हा शलमोनने यहोयादाचा मुलगा बनाया याला असा हुकूम देऊन पाठवलं: “जा, त्याला मारून टाक!” ३० म्हणून मग बनाया यहोवाच्या तंबूकडे जाऊन यवाबला म्हणाला: “राजाने हुकूम दिलाय, ‘बाहेर ये!’” पण तो म्हणाला: “नाही! मी इथेच मरेन.” मग बनाया राजाकडे परत आला आणि यवाबने दिलेलं उत्तर त्याने राजाला सांगितलं. ३१ तेव्हा राजा बनायाला म्हणाला: “यवाब म्हणतो तसंच कर. त्याला ठार मारून दफन कर. आणि त्याने विनाकारण सांडलेल्या रक्‍ताचा दोष+ माझ्या आणि माझ्या वडिलांच्या घराण्यावरून दूर कर. ३२ त्याच्या रक्‍ताचा दोष यहोवा त्याच्याच माथ्यावर मारेल. कारण, माझे वडील दावीद यांच्या नकळत त्याने स्वतःपेक्षा नीतिमान आणि भल्या असलेल्या दोन माणसांना तलवारीने मारून टाकलं होतं; त्याने इस्राएलचा सेनापती+ नेरचा मुलगा अबनेर+ आणि यहूदाचा सेनापती+ येथेरचा मुलगा अमासा+ यांना मारून टाकलं होतं. ३३ त्यांच्या रक्‍ताचा दोष यवाबवर आणि त्याच्या वंशजांवर कायमचा राहील.+ पण दावीद, त्यांचे वंशज, त्यांचं घराणं आणि त्यांचं राजासन यांच्यावर सर्वकाळ यहोवाची शांती राहो.” ३४ म्हणून यहोयादाचा मुलगा बनाया गेला आणि त्याने यवाबवर वार करून त्याला ठार मारलं; यवाबला ओसाड रानातल्या त्याच्या घराजवळ पुरण्यात आलं. ३५ मग राजाने यहोयादाचा मुलगा बनाया+ याला यवाबच्या जागी सेनापती बनवलं, आणि अब्याथारच्या जागी सादोकला+ याजक म्हणून नेमलं.

३६ नंतर राजाने शिमीला+ बोलावलं आणि तो त्याला म्हणाला: “तू यरुशलेममध्येच घर बांधून राहा. तिथून दुसरीकडे कुठेही जाऊ नकोस. ३७ ज्या दिवशी तू बाहेर पडून किद्रोन खोरं+ पार करशील, त्या दिवशी तू मेलाच म्हणून समज! तुझ्या रक्‍ताचा दोष तुझ्याच माथ्यावर राहील.” ३८ त्यावर शिमी राजाला म्हणाला: “ठीक आहे. माझ्या प्रभूंनी, राजांनी जसं सांगितलं तसंच मी करीन.” म्हणून शिमी बरेच दिवस यरुशलेममध्ये राहिला.

३९ पण तीन वर्षांनंतर असं झालं, की शिमीच्या दासांपैकी दोघं जण आखीशकडे+ पळून गेले; आखीश हा गथचा राजा माका याचा मुलगा होता. शिमीला जेव्हा सांगण्यात आलं, की “तुझे दास गथमध्ये आहेत,” ४० तेव्हा शिमीने लगेच गाढव तयार केलं आणि आपल्या दासांना शोधण्यासाठी तो गथमध्ये आखीशकडे गेला. शिमी आपल्या दासांना घेऊन गथहून परत आला, ४१ तेव्हा शलमोनला सांगण्यात आलं: “शिमी यरुशलेम सोडून गथला गेला होता, आणि आता परत आलाय.” ४२ तेव्हा शिमीला बोलावून राजा म्हणाला: “मी तुला यहोवाच्या नावाने शपथ घालून अशी ताकीद दिली होती ना, की ‘ज्या दिवशी तू इथून बाहेर पडून दुसरीकडे कुठेही जाशील, त्या दिवशी तू नक्की मरशील’? आणि त्यावर तूही मला म्हणाला होतास ना, की ‘ठीक आहे, तुम्ही म्हणालात तसंच मी करीन’?+ ४३ तर मग, यहोवासमोर घेतलेली शपथ आणि मी दिलेली आज्ञा तू का पाळली नाहीस?” ४४ राजा पुढे शिमीला म्हणाला: “माझे वडील दावीद यांच्याशी तू किती दुष्टपणे वागलास हे तुझ्या मनाला चांगलं माहीत आहे.+ आता यहोवा तो दुष्टपणा तुझ्याच माथ्यावर मारेल.+ ४५ पण शलमोन राजाला यहोवा आशीर्वादित करेल+ आणि दावीदचं राजासन तो कायमचं स्थापन करेल.” ४६ मग राजाने यहोयादाचा मुलगा बनाया याला आज्ञा दिली, तेव्हा तो गेला आणि त्याने शिमीवर वार करून त्याला ठार मारलं.+

अशा प्रकारे शलमोनच्या राज्याला बळकटी आणि स्थिरता मिळाली.+

३ शलमोनने इजिप्तचा* राजा फारो याच्या मुलीशी लग्न करून+ त्याच्याशी सोयरीक केली. फारोच्या मुलीशी लग्न करून त्याने तिला दावीदपुरात+ आणलं. आणि आपलं घर,+ यहोवाचं घर+ आणि यरुशलेम शहराची भिंत बांधायचं काम पूर्ण होईपर्यंत,+ त्याने तिला तिथेच दावीदपुरात ठेवलं. २ पण लोक आताही उच्च स्थानांवर* बलिदानं अर्पण करत होते.+ कारण, यहोवाच्या नावाचा गौरव करण्यासाठी अजूनपर्यंत मंदिर* बांधण्यात आलं नव्हतं.+ ३ शलमोन आपल्या वडिलांच्या, दावीदच्या सांगण्याप्रमाणे देवाच्या कायद्यांचं पालन करत राहिला. अशा प्रकारे तो यहोवावर प्रेम करत राहिला. शलमोन उच्च स्थानांवर अग्नीत जाळून बलिदानंही अर्पण करायचा.+

४ शलमोन राजा गिबोनमध्ये बलिदान अर्पण करायला गेला. कारण ते सगळ्यात महत्त्वाचं* उच्च स्थान होतं.+ तिथे वेदीवर त्याने १,००० होमार्पणं वाहिली.+ ५ शलमोन गिबोनमध्ये असताना यहोवाने त्याला रात्री स्वप्नात दर्शन दिलं. देव त्याला म्हणाला: “तुला जे काही हवंय ते माग, मी तुला ते देईन.”+ ६ त्यावर शलमोन म्हणाला: “तुझा सेवक, म्हणजे माझे वडील दावीद हे तुझ्यासमोर विश्‍वासाने, नीतीने आणि खऱ्‍या मनाने चालले, तेव्हा तू त्यांच्यावर अपार प्रेम* केलंस. आणि त्यांच्या राजासनावर बसण्यासाठी त्यांना एक मुलगा देऊन तू आजही त्यांच्यावर अपार प्रेम* करतोस.+ ७ आता हे माझ्या देवा यहोवा, तू मला, तुझ्या या सेवकाला माझ्या वडिलांच्या, दावीदच्या जागी राजा बनवलंस. पण मी तर अजून लहान* आहे आणि मला काही अनुभवसुद्धा नाही.+ ८ तुझा हा सेवक, तुझ्या निवडलेल्या लोकांवर राज्य करतोय.+ आणि या लोकांची संख्या इतकी मोठी आहे, की ती कोणालाही मोजता येणार नाही. ९ म्हणून तुझ्या या लोकांचा न्याय करण्यासाठी, बऱ्‍यावाइटातला फरक ओळखण्यासाठी+ आपल्या या सेवकाला आज्ञाधारक मन दे.+ नाहीतर, या असंख्य* लोकांचा न्याय करणं कोणाला शक्य आहे?”

१० शलमोनने ही गोष्ट मागितली म्हणून यहोवाला आनंद झाला.+ ११ मग देव त्याला म्हणाला: “तू स्वतःसाठी दीर्घायुष्य, धनसंपत्ती किंवा आपल्या शत्रूंचा जीव मागितला नाहीस, तर न्यायनिवाडा करण्यासाठी समजशक्‍ती मागितलीस.+ १२ म्हणून मी तुझी विनंती मान्य करीन.+ मी तुला सुज्ञ आणि समंजस मन देईन.+ म्हणजे जसा पूर्वी तुझ्यासारखा कोणी नव्हता, तसा यापुढेही कोणी तुझ्यासारखा होणार नाही.+ १३ याशिवाय तू जे मागितलं नाहीस, तेही मी तुला देईन.+ मी तुला इतकी धनसंपत्ती आणि मानसन्मान देईन,+ की तुझ्या संपूर्ण जीवनकाळात तुझ्यासारखा कोणताही राजा नसेल.+ १४ आणि तुझे वडील दावीद यांच्यासारखंच जर तू माझ्या नियमांचं आणि आज्ञांचं पालन केलंस आणि माझ्या मार्गांवर चालत राहिलास,+ तर मी तुला दीर्घायुष्यही देईन.”+

१५ शलमोन झोपेतून जागा झाला तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की ते एक दर्शन होतं. मग तो यरुशलेमला परत आला आणि यहोवाच्या कराराच्या पेटीपुढे उभा राहिला. त्याने तिथे होमार्पणं आणि शांती-अर्पणं+ वाहिली आणि आपल्या सर्व सेवकांना मेजवानी दिली.

१६ नंतर असं झालं, की दोन वेश्‍या राजाकडे आल्या आणि त्याच्यापुढे उभ्या राहिल्या. १७ त्यातली पहिली स्त्री म्हणाली: “हे माझ्या प्रभू, ही स्त्री आणि मी, आम्ही दोघी एकाच घरात राहतो. ती घरात असताना मी एका बाळाला जन्म दिला. १८ मग तिसऱ्‍या दिवशी या स्त्रीनेसुद्धा एका बाळाला जन्म दिला. त्या वेळी, आम्ही दोघीच घरात होतो; आमच्याशिवाय दुसरं कोणीही तिथे नव्हतं. १९ रात्री या स्त्रीचा मुलगा तिच्या अंगाखाली आला आणि मेला. २० म्हणून ती मध्यरात्री उठली. आणि आपली ही दासी गाढ झोपेत असताना, तिने माझ्या कुशीतला माझा मुलगा घेतला आणि आपल्या कुशीत झोपवला. आणि स्वतःचा मेलेला मुलगा माझ्या कुशीत ठेवला. २१ मग सकाळी मी माझ्या मुलाला दूध पाजायला उठले, तेव्हा मी पाहिलं की तो मेलाय. नंतर मी नीट निरखून पाहिलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की तो मला झालेला मुलगा नाही.” २२ पण दुसरी स्त्री म्हणाली: “नाही, जिवंत मुलगा माझा आहे, मेलेला मुलगा तुझा आहे!” पण पहिली स्त्री म्हणत होती: “नाही, मेलेला मुलगा तुझा आहे, जिवंत माझा आहे!” अशा प्रकारे त्या दोघी राजापुढे भांडू लागल्या.

२३ शेवटी राजा म्हणाला: “ही स्त्री म्हणते, की ‘जिवंत मुलगा माझा आहे, मेलेला मुलगा तुझा आहे!’ आणि ती स्त्री म्हणते, की ‘नाही, मेलेला मुलगा तुझा आहे, जिवंत माझा आहे!’” २४ राजा पुढे म्हणाला: “एक तलवार आणा.” म्हणून त्यांनी राजाला एक तलवार आणून दिली. २५ तेव्हा राजा म्हणाला: “या जिवंत मुलाचे दोन तुकडे करा! अर्धा एकीला द्या आणि अर्धा दुसरीला द्या!” २६ तेव्हा जिवंत मूल ज्या स्त्रीचं होतं तिच्या मनात आपल्या मुलासाठी ममता दाटून आली. ती लगेच राजापुढे गयावया करून अशी विनंती करू लागली: “हे माझ्या प्रभू! कृपा करून हे जिवंत मूल हिला देऊन टाका! पण मुलाला मात्र मारू नका!” पण दुसरी स्त्री म्हणू लागली: “तो ना माझा, ना तुझा! होऊ दे त्याचे दोन तुकडे!” २७ तेव्हा राजा म्हणाला: “मुलाला मारू नका. जिवंत मूल पहिल्या स्त्रीला द्या. कारण तीच त्याची खरी आई आहे!”

२८ राजाने केलेल्या या न्यायाबद्दल संपूर्ण इस्राएलने ऐकलं, तेव्हा त्यांना राजाचा फार धाक* वाटला.+ कारण न्यायनिवाडा करण्यासाठी त्याला देवाने बुद्धी दिली आहे हे त्यांच्या लक्षात आलं.+

४ शलमोन राजा संपूर्ण इस्राएलवर राज्य करायचा.+ २ त्याच्या राज्यातले उच्च अधिकारी हे होते: सादोकचा+ मुलगा अजऱ्‍या हा याजक होता; ३ शिशाची मुलं अलिहोरेफ आणि अहीया हे सचिव होते;+ अहीलूदचा मुलगा यहोशाफाट+ हा इतिहास-लेखक होता; ४ यहोयादाचा मुलगा बनाया+ हा सेनापती होता; सादोक आणि अब्याथार+ हे याजक होते; ५ नाथानचा+ मुलगा अजऱ्‍या हा प्रांताधिकाऱ्‍यांचा प्रमुख होता; नाथानचा मुलगा जाबूद हा याजक आणि राजाचा मित्र+ होता; ६ अहीशार हा राजमहालातल्या कामांवर देखरेख करणारा होता; आणि अब्दाचा मुलगा अदोनीराम+ हा सक्‍तीची मजुरी करणाऱ्‍यांवर अधिकारी होता.+

७ शलमोनने संपूर्ण इस्राएलवर १२ प्रांताधिकारी नेमले होते. ते राजाला आणि त्याच्या घराण्याला अन्‍नसामग्री पुरवायचे. प्रत्येक प्रांताधिकाऱ्‍यावर, वर्षातला एक महिना अन्‍नसामग्री पुरवायची जबाबदारी होती.+ ८ ते प्रांताधिकारी हे होते: एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशावर हूरचा मुलगा होता; ९ माकस, शालबीम,+ बेथ-शेमेश आणि एलोन-बेथ-हानान या प्रदेशांवर देकरचा मुलगा होता; १० अरुबोथ प्रदेशावर हेसेदचा मुलगा होता (सोखो आणि हेफेरचा संपूर्ण प्रदेश त्याच्या अधिकाराखाली यायचा); ११ दोरच्या संपूर्ण उतारांच्या प्रदेशावर अबीनादाबचा मुलगा होता (शलमोनची मुलगी टाफाथ ही त्याची बायको होती); १२ तानख, मगिद्दो+ आणि बेथ-शानच्या+ संपूर्ण प्रदेशांवर अहीलूदचा मुलगा बाना होता; तसंच, तो बेथ-शानपासून आबेल-महोलापर्यंत आणि तिथून यकमामपर्यंतच्या+ संपूर्ण प्रदेशावरही होता (बेथ-शानचा प्रदेश इज्रेलच्या खाली व सारतानच्या शेजारी होता); १३ रामोथ-गिलाद+ प्रदेशावर गेबेरचा मुलगा होता (त्याच्या अधिकाराखाली मनश्‍शेचा मुलगा याईर+ याची गिलाद+ प्रदेशातली खेडी होती; तसंच, बाशानमध्ये+ असलेला अर्गोबचा+ प्रदेशही होता. या प्रदेशात, मजबूत भिंती आणि तांब्याचे अडसर असलेली ६० मोठी शहरं होती); १४ महनाइम+ प्रदेशावर इद्दोचा मुलगा अहीनादाब होता; १५ नफतालीच्या प्रदेशावर अहीमास होता (शलमोनची आणखी एक मुलगी बासमथ ही त्याची बायको होती); १६ आशेर आणि बालोथ प्रदेशांवर हूशयचा मुलगा बाना होता; १७ इस्साखारच्या प्रदेशावर पारूहाचा मुलगा यहोशाफाट होता; १८ बन्यामीनच्या+ प्रदेशावर एलाचा मुलगा शिमी+ होता; १९ गिलादच्या+ प्रदेशावर उरीचा मुलगा गेबेर होता (पूर्वी हा प्रदेश अमोऱ्‍यांचा राजा सीहोन+ आणि बाशानचा राजा ओग+ यांच्या अधिकाराखाली होता). या सगळ्या प्रांताधिकाऱ्‍यांवर एक प्रमुख अधिकारीही होता.

२० यहूदा आणि इस्राएलमधल्या लोकांची संख्या समुद्रकिनाऱ्‍यावर असलेल्या वाळूच्या कणांसारखी अगणित होती.+ ते सगळे खाऊन-पिऊन आनंदी जीवन जगत होते.+

२१ शलमोनने नदीपासून*+ ते पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि इजिप्तच्या सीमेपर्यंत सर्व राज्यांवर शासन केलं. शलमोन जिवंत होता तोपर्यंत या सर्व राज्यांनी त्याला नजराणे पाठवले आणि त्याची सेवा केली.+

२२ शलमोनच्या राजमहालात प्रत्येक दिवसाला लागणारी अन्‍नसामग्री इतकी होती: ३० कोर* मापं चांगलं पीठ, ६० कोर मापं पीठ; २३ १० धष्टपुष्ट गाय-बैल, कुरणांत चरणारे २० गाय-बैल, १०० मेंढरं; तसंच काही हरणं, सांबरं, भेकरं* आणि पोसलेले पक्षी. २४ नदीच्या+ या बाजूच्या* सर्व प्रदेशांवर, म्हणजे तिफसाहपासून गाझापर्यंतच्या+ सर्व प्रदेशांवर आणि तिथल्या राजांवर शलमोनचा अधिकार होता. आणि त्याच्या संपूर्ण राज्यात व आसपासच्या सगळ्या प्रदेशांत शांती होती.+ २५ शलमोनच्या संपूर्ण शासनकाळात, दानपासून बैर-शेबापर्यंत, यहूदा आणि इस्राएलमधले सगळे लोक आपापल्या द्राक्षवेलाखाली आणि अंजिराच्या झाडाखाली सुरक्षित व निर्भयपणे राहत होते.

२६ शलमोनकडे त्याच्या रथांच्या घोड्यांसाठी ४,०००* तबेले होते; त्याच्याकडे १२,००० घोडेसुद्धा* होते.+

२७ शलमोन राजाचे प्रांताधिकारी त्याच्यासाठी आणि त्याच्या मेजावर जेवणाऱ्‍या सर्वांसाठी अन्‍नसामग्री पुरवायचे. प्रत्येक प्रांताधिकाऱ्‍यावर त्याला नेमून दिलेल्या महिन्यात अन्‍नसामग्री पुरवायची आणि कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची जबाबदारी होती.+ २८ प्रत्येक जण त्याला नेमून दिल्याप्रमाणे घोड्यांसाठी, तसंच रथ ओढणाऱ्‍या घोड्यांसाठी जव आणि गवताच्या पेंढ्या हव्या त्या ठिकाणी पुरवायचा.

२९ देवाने शलमोनला अमर्याद बुद्धी आणि समजशक्‍ती दिली; त्याने त्याला समुद्रकिनाऱ्‍यावर पसरलेल्या वाळूइतकी अमाप सुज्ञता दिली.*+ ३० शलमोनची बुद्धी पूर्वेकडच्या सर्व लोकांपेक्षा आणि इजिप्तच्या सर्व ज्ञानापेक्षा अफाट होती.+ ३१ इतर कोणत्याही माणसापेक्षा तो जास्त बुद्धिमान होता; तो एथान+ एज्राही आणि माहोलची मुलं हेमान,+ कल्कोल+ व दर्दा यांच्यापेक्षाही बुद्धिमान होता. आणि त्याची कीर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांमध्ये पसरली.+ ३२ त्याने ३,००० नीतिवचनं रचली,*+ आणि त्याची १,००५ गीतंही+ होती. ३३ तो लबानोनच्या देवदार वृक्षांपासून ते भिंतीवर उगवणाऱ्‍या एजोबच्या*+ रोपट्यांपर्यंत सर्व वनस्पतींबद्दल बोलायचा; प्राणी,+ पक्षी,+ सरपटणारे प्राणी,+ कीटक आणि मासे यांबद्दलही तो बोलायचा. ३४ शलमोनच्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकायला सर्व राष्ट्रांतून लोक त्याच्याकडे यायचे; तसंच, पृथ्वीवरच्या ज्या राजांनी त्याच्या बुद्धीबद्दल ऐकलं, तेसुद्धा त्याच्याकडे यायचे.+

५ सोरचा+ राजा हीराम याला जेव्हा समजलं, की शलमोनला त्याच्या वडिलांच्या जागी राजा म्हणून अभिषिक्‍त करण्यात आलं आहे, तेव्हा त्याने शलमोनकडे आपले सेवक पाठवले. कारण, दावीदसोबत हीरामचे नेहमीच मैत्रीचे संबंध होते.*+ २ म्हणून मग शलमोनने हीरामला असा निरोप पाठवला:+ ३ “तुम्हाला तर माहीतच आहे की माझ्या वडिलांना, दावीदला त्यांचा देव यहोवा याच्या नावाच्या गौरवासाठी मंदिर बांधता आलं नाही. कारण यहोवाने त्यांच्या सगळ्या शत्रूंना त्यांच्या पायाखाली देईपर्यंत, त्यांना आजूबाजूच्या सर्व शत्रूंशी लढाई करावी लागली.+ ४ पण आता माझा देव यहोवा याने मला चारही बाजूंनी शांती दिली आहे;+ कोणी विरोध करणारा नाही आणि काही संकटही नाही.+ ५ म्हणून यहोवाने माझ्या वडिलांना दिलेल्या वचनाप्रमाणे, मला माझा देव यहोवा याच्या नावाच्या गौरवासाठी मंदिर बांधायची इच्छा आहे. त्याने माझ्या वडिलांना, दावीदला असं वचन दिलं होतं: ‘तुझ्या ज्या मुलाला मी तुझ्या जागी राजासनावर बसवीन, तोच माझ्या नावाच्या गौरवासाठी एक घर बांधेल.’+ ६ तर आता तुमच्या लोकांना माझ्यासाठी लबानोनचे देवदार वृक्ष कापण्याची आज्ञा द्या.+ माझे सेवक तुमच्या सेवकांबरोबर काम करतील आणि तुम्ही ठरवाल ती मजुरी मी तुमच्या सेवकांना देईन. कारण तुम्हाला माहीत आहे, की आमच्यापैकी कोणामध्येही सीदोनी लोकांसारखं झाड कापण्याचं कौशल्य नाही.”+

७ हीरामने शलमोनचे हे शब्द ऐकले, तेव्हा त्याला खूप आनंद झाला. तो म्हणाला: “आज यहोवाची स्तुती होवो! कारण त्याने या मोठ्या* प्रजेवर राज्य करायला दावीदला एक बुद्धिमान मुलगा दिला आहे!”+ ८ म्हणून हीरामने शलमोनला असं कळवलं: “तू पाठवलेला संदेश मी ऐकलाय. तुझ्या इच्छेप्रमाणे देवदाराची आणि गंधसरूची लाकडं+ पुरवण्यासाठी तुला जी काही मदत हवी असेल ती मी करीन. ९ माझे सेवक लबानोनवरून समुद्रापर्यंत लाकडाचे ओंडके घेऊन येतील. मग त्यांचे तराफे* बनवून तू सांगशील त्या ठिकाणी ते समुद्रमार्गाने मी पोहोचते करीन. तिथे ते तराफे सुटे केल्यावर तू ते घेऊन जाऊ शकतोस. मग याच्या बदल्यात मी सांगीन ती अन्‍नसाम्रगी तू माझ्या घराण्यासाठी पुरव.”+

१० हीरामने मग शलमोनला हवी तेवढी देवदाराची आणि गंधसरूची लाकडं पुरवली. ११ आणि शलमोनने अन्‍नसामग्री म्हणून हीरामला त्याच्या घराण्यासाठी २०,००० कोर* मापं गहू आणि २० कोर मापं उच्च प्रतीचं जैतुनाचं तेल* दिलं. शलमोन दरवर्षी इतकी अन्‍नसामग्री हीरामला द्यायचा.+ १२ यहोवाने शलमोनला वचन दिलं होतं त्याप्रमाणे त्याने त्याला बुद्धी दिली.+ हीराम आणि शलमोन यांच्यामध्ये शांतीचे संबंध होते आणि त्या दोघांनी एकमेकांसोबत मैत्रीचा करार केला.

१३ शलमोनने संपूर्ण इस्राएलमधून ३०,००० माणसांना सक्‍तीची मजुरी करायला नेमलं.+ १४ तो दहा-दहा हजार माणसांना दर महिन्याला आळीपाळीने लबानोनला पाठवायचा. ते एक महिना तिथे जाऊन काम करायचे आणि दोन महिने आपल्या घरी राहायचे. सक्‍तीची मजुरी करणाऱ्‍या या लोकांवर अदोनीराम हा अधिकारी होता.+ १५ शलमोनकडे ओझी वाहणारे ७०,००० मजूर आणि डोंगरांवर दगड फोडणारे+ ८०,००० मजूर होते.+ १६ याशिवाय, शलमोनचे ३,३०० प्रमुख अधिकारी,+ मुकादम म्हणून कामगारांवर देखरेख करण्याचं काम करायचे. १७ मंदिराचा पाया,+ घडवलेल्या दगडांनी+ घालण्यासाठी कामगारांनी राजाच्या आज्ञेवरून खाणीतून मोठमोठे आणि महागडे दगड+ काढून आणले. १८ मग शलमोनच्या आणि हीरामच्या कामगारांनी, तसंच गिबली+ लोकांनी ते दगड कापण्याचं काम केलं. शिवाय, मंदिर बांधण्यासाठी त्यांनी लाकूड आणि दगड तयार केले.

६ इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर पडल्याच्या ४८० व्या वर्षी,+ म्हणजे शलमोन इस्राएलचा राजा बनला त्याच्या चौथ्या वर्षी, जिव* महिन्यात+ (म्हणजे दुसऱ्‍या महिन्यात) त्याने यहोवासाठी मंदिर* बांधायला सुरुवात केली.+ २ शलमोन राजाने यहोवासाठी बांधलेलं मंदिर ६० हात* लांब, २० हात रुंद आणि ३० हात उंच होतं.+ ३ मंदिराच्या* द्वारमंडपाची+ लांबी* २० हात, म्हणजे मंदिराच्या रुंदीइतकीच होती. आणि मंदिरापासून पुढे मोजलं, तर त्या द्वारमंडपाची रुंदी दहा हात होती.

४ त्याने मंदिराला खिडक्या बनवल्या; त्या आतून बाहेर निमुळत्या आकाराच्या होत्या.+ ५ शिवाय, त्याने मंदिराच्या भिंतीला लागून एक इमारतही बांधली. ती मंदिराच्या भिंतींभोवती,* म्हणजे मंदिराच्या* आणि आतल्या खोलीच्या*+ भिंतीभोवती बांधली होती; त्याने सर्व बाजूंना खोल्याही बांधल्या.+ ६ इमारतीच्या सर्वात खालच्या मजल्याची रुंदी पाच हात, मधल्या मजल्याची रुंदी सहा हात आणि तिसऱ्‍या मजल्याची रुंदी सात हात होती. त्याने मंदिराची भिंत सर्व बाजूंनी अशा प्रकारे बनवली, की तुळया* ठेवण्यासाठी आधार मिळेल. त्यामुळे तुळया घुसवण्यासाठी मंदिराच्या भिंतीमध्ये खाचा पाडण्याची गरज पडली नाही.+

७ मंदिर बांधण्यासाठी लागणारे दगड आधीच खाणीत घडवून तयार केले होते.+ त्यामुळे मंदिर बांधलं जात असताना तिथे हातोडे, कुऱ्‍हाडी किंवा कोणत्याही लोखंडी हत्यारांचा आवाज झाला नाही. ८ इमारतीच्या सगळ्यात खालच्या मजल्याचं प्रवेशद्वार मंदिराच्या दक्षिणेकडे* होतं.+ मधल्या मजल्यावर जाण्यासाठी व तिथून तिसऱ्‍या मजल्यावर जाण्यासाठी एक नागमोडी जिनाही होता. ९ अशा प्रकारे त्याने मंदिराचं बांधकाम चालू ठेवलं आणि ते पूर्ण केलं.+ त्याने देवदार लाकडाच्या तुळया आणि तक्‍ते*+ वापरून मंदिराचं छत बांधलं. १० मंदिराभोवती बांधलेल्या इमारतीचा+ प्रत्येक मजला पाच हात उंच होता. आणि तो देवदाराच्या लाकडांनी मंदिराला जोडला होता.

११ यादरम्यान, यहोवाकडून शलमोनला असा संदेश मिळाला: १२ “तू जर माझ्या कायद्यांप्रमाणे चाललास, माझे नियम पाळलेस आणि माझ्या सर्व आज्ञांनुसार चालून त्यांचं पालन केलंस,+ तर मीही तुझ्या वडिलांना, दावीदला तुझ्याविषयी जे वचन दिलं होतं ते पूर्ण करीन;+ खासकरून तू बांधत असलेल्या या मंदिराविषयीचं वचन मी पूर्ण करीन. १३ मी इस्राएली लोकांमध्ये राहीन,+ आणि माझ्या इस्राएली लोकांचा मी त्याग करणार नाही.”+

१४ शलमोनने मंदिर बांधण्याचं काम पूर्ण केलं. १५ त्याने मंदिराच्या आतल्या भिंती देवदाराच्या तक्त्यांनी बनवल्या; त्याने खालपासून छतापर्यंत भिंती लाकडाने मढवल्या. शिवाय त्याने मंदिराच्या जमिनीवर गंधसरूचे तक्‍ते बसवले.+ १६ मंदिराच्या मागच्या बाजूला त्याने २० हात लांबीची एक खोली बनवली; ती खोली जमिनीपासून छतापर्यंत देवदाराच्या तक्त्यांनी बनवण्यात आली होती. त्याने त्याच्यात* आतली खोली,+ म्हणजे परमपवित्र स्थान बनवलं.+ १७ त्याच्यासमोरचा मंदिराचा+ भाग* ४० हात लांब होता. १८ मंदिराच्या आत असलेल्या देवदाराच्या लाकडांवर खरबुजाच्या+ आणि उमललेल्या फुलांच्या आकृत्या कोरण्यात आल्या होत्या.+ मंदिराच्या भिंती देवदाराच्या लाकडांनी मढवलेल्या होत्या, त्यामुळे भिंतींचे दगड दिसत नव्हते.

१९ यहोवाच्या कराराची पेटी+ ठेवण्यासाठी त्याने मंदिराची आतली खोली+ तयार केली. २० आतली खोली २० हात लांब, २० हात रुंद आणि २० हात उंच होती.+ त्याने ती खोली शुद्ध सोन्याने मढवली; आणि त्याने वेदीही+ देवदाराच्या लाकडाने मढवली. २१ शलमोनने ते मंदिर आतून शुद्ध सोन्याने मढवलं.+ त्याने सोन्याने मढवलेल्या आतल्या खोलीसमोर+ सोन्याच्या साखळ्या लावल्या. २२ त्याने ते संपूर्ण मंदिर सोन्याने मढवलं. आतल्या खोलीजवळ असलेली संपूर्ण वेदीही त्याने सोन्याने मढवली.+

२३ त्याने आतल्या खोलीसाठी पाईन वृक्षाच्या लाकडापासून* दोन करूब+ बनवले. प्रत्येक करुबाची उंची दहा हात होती.+ २४ करुबाच्या एका पंखाची लांबी पाच हात, आणि दुसऱ्‍या पंखाची लांबी पाच हात होती; एका पंखाच्या टोकापासून दुसऱ्‍या पंखाच्या टोकापर्यंत एकूण लांबी दहा हात होती. २५ दुसऱ्‍या करुबाच्या पंखांची एकूण लांबीही दहा हात होती. दोन्ही करूब सारख्याच आकाराचे आणि मापाचे होते. २६ दोन्ही करुबांची उंची सारखीच, म्हणजे दहा हात होती. २७ मग त्याने ते दोन्ही करूब+ मंदिराच्या आतल्या खोलीत* ठेवले. करुबांचे पंख असे पसरले होते, की एका करुबाचा एक पंख एका बाजूच्या भिंतीला, आणि दुसऱ्‍या करुबाचा एक पंख दुसऱ्‍या बाजूच्या भिंतीला लागायचा. शिवाय त्यांचे बाकीचे दोन पंख खोलीच्या मधल्या बाजूला असे पसरले होते, की ते एकमेकांना लागायचे. २८ आणि त्याने ते करूब सोन्याने मढवले.

२९ मंदिराच्या सगळ्या भिंतींवर, म्हणजे आतल्या आणि बाहेरच्या खोलीच्या सगळ्या भिंतींवर त्याने करुबांच्या,+ खजुराच्या झाडांच्या+ आणि उमललेल्या फुलांच्या आकृत्या कोरल्या.+ ३० त्याने मंदिराच्या आतल्या आणि बाहेरच्या खोलीची जमीन सोन्याने मढवली. ३१ आतल्या खोलीच्या प्रवेशासाठी त्याने पाईन लाकडाचे दोन दरवाजे, बाजूचे दोन स्तंभ आणि दाराची चौकट बनवली; एक पाचवा भाग बनवला.* ३२ पाईन लाकडाच्या त्या दोन दरवाजांवर त्याने करुबांच्या, खजुराच्या झाडांच्या आणि उमललेल्या फुलांच्या आकृत्या कोरल्या आणि त्या सोन्याने मढवल्या; त्याने करूब आणि खजुराची झाडं सोनं ठोकून मढवली. ३३ मंदिराच्या* प्रवेशद्वारासाठीही त्याने अशाच प्रकारे पाईन लाकडाची चौकट बनवली; हा चौथा भाग होता.* ३४ त्याने गंधसरूच्या लाकडाची दोन दारं बनवली. प्रत्येक दार घडीचं असल्यामुळे ते मधोमध दुमडलं जायचं.+ ३५ त्याने त्यांवर करुबांच्या, खजुराच्या झाडांच्या आणि उमललेल्या फुलांच्या आकृत्या कोरल्या, आणि त्या सोन्याने मढवल्या.

३६ त्याने आतल्या अंगणाची+ भिंत बांधली. ती भिंत घडवलेल्या दगडांच्या तीन थरांनी आणि देवदाराच्या तुळयांच्या एका रांगेने बांधलेली होती.+

३७ शलमोन राजाच्या शासनाच्या चौथ्या वर्षाच्या जिव* महिन्यात, यहोवाच्या मंदिराचा पाया घालण्यात आला;+ ३८ आणि ११ व्या वर्षाच्या बूल* महिन्यात, म्हणजे आठव्या महिन्यात त्याचं बांधकाम पूर्ण झालं. मंदिरासाठी जो नमुना आणि बारकावे देण्यात आले होते,+ अगदी त्यांप्रमाणेच ते बांधण्यात आलं. अशा प्रकारे, शलमोनला मंदिर बांधण्यासाठी सात वर्षं लागली.

७ शलमोनला स्वतःचा राजमहाल बांधून पूर्ण करायला+ १३ वर्षं लागली.+

२ त्याने लबानोन-वनगृह+ नावाची एक इमारतही बांधली. तिची लांबी १०० हात,* रुंदी ५० हात आणि उंची ३० हात होती. ती देवदार लाकडाने बनवलेल्या खांबांच्या चार रांगांवर उभी होती; आणि त्या खांबांवर देवदार लाकडाच्या तुळया*+ होत्या. ३ तुळयांनी बनलेल्या या साच्यावर त्याने देवदार लाकडाचे तक्‍ते* टाकून इमारत उभी केली; त्यांची एकूण संख्या ४५, म्हणजे प्रत्येक रांगेत १५* होती. ४ या इमारतीला तीन मजले व चौकटी असलेल्या खिडक्यांच्या तीन रांगा होत्या; या सगळ्या खिडक्या समोरासमोर होत्या. ५ इमारतीची सर्व प्रवेशद्वारं आणि त्यांच्या चौकटी चौरस* होत्या. तसंच, तिन्ही मजल्यांवर समोरासमोर असलेल्या खिडक्यांच्या चौकटीही चौरस होत्या.

६ त्याने एक स्तंभ-गृहसुद्धा बनवलं. त्याची लांबी ५० हात आणि रुंदी ३० हात होती. त्याच्यासमोर छत असलेला खांबांचा एक वऱ्‍हांडाही होता.

७ याशिवाय, त्याने राजासन-गृह+ म्हणजे न्याय-गृहसुद्धा+ बांधलं; तिथून तो न्यायनिवाडा करायचा. त्या गृहाला जमिनीपासून छतापर्यंत देवदाराच्या लाकडाचे तक्‍ते बसवण्यात आले होते.

८ शलमोनने राजासन-गृहाच्या मागच्या बाजूला, दुसऱ्‍या अंगणात+ एक राजमहाल बांधला; तिथे तो राहणार होता. राजासन-गृह ज्या पद्धतीने बांधण्यात आलं, त्याच पद्धतीने हा राजमहालही बांधण्यात आला. शलमोनने आपल्या बायकोसाठी,+ म्हणजे फारोच्या मुलीसाठीही असाच महाल बांधला.

९ या सगळ्या इमारती घडवलेल्या आणि महागड्या दगडांनी+ बांधण्यात आल्या होत्या. हे दगड मोजमाप घेऊन सर्व बाजूंनी करवतींनी व्यवस्थित कापलेले होते. इमारतींच्या पायापासून ते भिंतीच्या टोकापर्यंत आणि अगदी बाहेरच्या मोठ्या अंगणापर्यंत+ असेच दगड वापरण्यात आले होते. १० इमारतींचा पाया मोठमोठ्या आणि महागड्या दगडांनी घालण्यात आला होता; काही दगडांचं माप आठ हात, तर काही दगडांचं माप दहा हात होतं. ११ त्यांवर मापानुसार घडवलेले महागडे दगड आणि देवदाराची लाकडंही होती. १२ मोठ्या अंगणाच्या सभोवती असलेली भिंत घडवलेल्या दगडांच्या तीन थरांनी आणि देवदाराच्या तुळयांच्या एका रांगेने बांधलेली होती. ती भिंत यहोवाच्या मंदिरातल्या आतल्या अंगणाच्या+ आणि घराच्या द्वारमंडपाच्या+ भिंतीसारखी होती.

१३ शलमोन राजाने सोर इथून हीरामला+ बोलावून घेतलं. १४ तो नफताली वंशातल्या एका विधवेचा मुलगा होता. त्याचे वडील सोरचे राहणारे असून तांब्याची कामं करणारे होते.+ हीरामकडे तांब्याची* सर्व प्रकारची कामं करण्यासाठी लागणारं खास कौशल्य, ज्ञान+ आणि अनुभव होता. तो शलमोन राजाकडे आला आणि त्याने त्याची सर्व कामं करून दिली.

१५ त्याने तांब्याचे दोन ओतीव* स्तंभ तयार केले.+ प्रत्येक स्तंभ १८ हात उंच होता, आणि त्याचा घेर मोजायला १२ हात लांबीची दोरी लागायची.*+ १६ या स्तंभांच्या वर ठेवण्यासाठी त्याने तांब्याचे दोन ओतीव कळस तयार केले. प्रत्येक कळस पाच हात उंचीचा होता. १७ स्तंभांवर असलेले कळस हे गुंफलेल्या साखळ्यांच्या नक्षीदार जाळीने सजवलेले होते;+ दोन्ही कळसांना सात-सात साखळ्या होत्या. १८ स्तंभांवर असलेल्या कळसाभोवतीची जाळी त्याने डाळिंबाच्या दोन रांगांनी सजवली होती; त्याने दोन्ही स्तंभ असेच सजवले. १९ मंदिराच्या द्वारमंडपासमोर असलेल्या स्तंभांच्या कळसांचा वरचा भाग भुईकमळाच्या* आकाराचा असून तो चार हात उंचीचा होता. २० स्तंभांवर असलेले कळस हे जाळीला लागून असलेल्या गोलाकार भागावर होते; आणि प्रत्येक कळसाच्या सभोवती २०० डाळिंबांच्या रांगा होत्या.+

२१ त्याने हे दोन्ही स्तंभ मंदिराच्या* द्वारमंडपासमोर उभे केले.+ त्याने उजवीकडे* एक स्तंभ उभा केला, आणि त्याला याखीन* असं नाव दिलं. त्यानंतर त्याने डावीकडे* दुसरा स्तंभ उभा केला, आणि त्याला बवाज* असं नाव दिलं.+ २२ स्तंभांचा वरचा भाग भुईकमळाच्या आकाराचा होता. अशा प्रकारे स्तंभ बनवण्याचं काम संपलं.

२३ मग त्याने धातूचा एक मोठा ओतीव गंगाळ-सागर* तयार केला.+ तो गोलाकार असून त्याचा व्यास १० हात आणि त्याची उंची ५ हात होती. त्याचा घेर मोजायला ३० हात लांब दोरी लागायची.*+ २४ गंगाळाच्या काठाच्या खालच्या घेरावर सर्व बाजूंनी खरबुजाच्या आकृत्यांच्या+ दोन रांगा होत्या. एकेका हाताच्या अंतरात दहा-दहा खरबुजांची सजावट केलेली होती. गंगाळाचं ओतीव काम करतानाच त्या रांगा गंगाळासोबत अखंड तयार करण्यात आल्या होत्या. २५ तो गंगाळ-सागर १२ बैलांवर+ ठेवण्यात आला होता. त्यांपैकी तीन बैलांची तोंडं उत्तरेकडे, तीन बैलांची पश्‍चिमेकडे, तीन बैलांची दक्षिणेकडे आणि तीन बैलांची तोंडं पूर्वेकडे होती. त्या बैलांचे मागचे भाग आतल्या बाजूला होते, आणि त्यांच्या पाठींवर गंगाळ-सागर आधारलेला होता. २६ त्या गंगाळाची जाडी चार बोटं* होती. त्याचा काठ एखाद्या प्याल्याच्या काठासारखा, उमललेल्या भुईकमळासारखा होता. त्यात २,००० बथ* पाणी मावायचं.

२७ मग त्याने हाताने ढकलता येतील अशा तांब्याच्या दहा गाड्या*+ तयार केल्या. प्रत्येक गाडी चार हात लांब, चार हात रुंद आणि तीन हात उंच होती. २८ या गाड्यांची रचना अशी होती: गाड्यांच्या बाजूंना पत्रे असून ते उभ्या-आडव्या पट्ट्यांच्या मधे होते. २९ उभ्या-आडव्या पट्ट्यांच्या मधे असलेल्या पत्र्यांवर सिंह,+ बैल आणि करूब+ यांच्या आकृत्या कोरल्या होत्या. अशीच रचना उभ्या-आडव्या पट्ट्यांवरही होती. सिंह व बैल यांच्या आकृत्यांच्या वर आणि खाली लोंबत्या माळा कोरलेल्या होत्या. ३० प्रत्येक गाडीला तांब्याची चार चाकं असून त्यांचे आस* तांब्याचेच होते. आणि चाकांना आधार देण्यासाठी गाडीच्या चारही कोपऱ्‍यांवर दांडे होते. हेच दांडे वर गंगाळालाही आधार देत होते. हे दांडेसुद्धा ओतीव असून त्यांच्या बाजूंवर लोंबत्या माळा कोरलेल्या होत्या. ३१ गंगाळाचं तोंड गाडीच्या वरच्या भागाच्या आत बसवलं होतं. गाडीचा हा वरचा भाग गोलाकार होता. या भागाच्या खालच्या कडापासून गंगाळाच्या तळापर्यंतचं अंतर एक हात होतं. अशा प्रकारे, गाडीच्या वरच्या भागापासून गंगाळाच्या तळापर्यंत असलेल्या आधाराचं एकूण अंतर दीड हात होतं. आणि गाडीच्या या वरच्या भागावर कोरीव काम केलेलं होतं. याच्या बाजूंना असलेले पत्रे गोलाकार नसून चौकोनी होते. ३२ गाडीची चार चाकं गाडीच्या बाजूंना असलेल्या पत्र्यांच्या खाली होती. आणि चाकांना आधार देणारे दांडे गाडीला जोडलेले होते. प्रत्येक चाकाची उंची दीड हात होती. ३३ चाकांची रचना रथांच्या चाकांसारखी होती. त्यांच्या कडा, आस, आऱ्‍या आणि चाकांचा मधला भाग हे सगळं तांब्याच्या ओतीव कामाचं होतं. ३४ प्रत्येक गाडीच्या चार कोपऱ्‍यांवर आधार देणारे दांडे होते. हे दांडेसुद्धा, गाडीचं ओतीव काम करतानाच गाडीसोबत अखंड तयार करण्यात आले होते. ३५ गाडीचा वरचा भाग हा एक गोलाकार पट्टा असून त्याची उंची अर्धा हात होती. गाडीच्या या वरच्या भागावर असलेल्या पट्ट्या आणि त्यांच्या मधे असलेले पत्रे हे सगळे गाडीचं ओतीव काम करतानाच अखंड तयार करण्यात आले होते. ३६ त्याच्या पत्र्यांवर आणि पट्ट्यांवर जिथे कुठे जागा असेल तिथे करूब, सिंह आणि खजुराची झाडं यांच्या आकृत्या कोरल्या होत्या. तसंच, सभोवती लोंबत्या माळा कोरलेल्या होत्या.+ ३७ अशा प्रकारे, हाताने ढकलता येतील अशा दहा गाड्या+ त्याने बनवल्या. सगळ्या गाड्यांचं ओतीव काम एकसारखं+ असून त्यांचं मोजमाप आणि त्यांचा आकारही सारखाच होता.

३८ त्याने तांब्याची दहा गंगाळंही बनवली.+ प्रत्येकात ४० बथ पाणी मावू शकत होतं. प्रत्येक गंगाळाचा व्यास चार हात होता. आणि दहा गाड्यांसाठी प्रत्येकी एकेक गंगाळ होतं. ३९ त्याने पाच गाड्या मंदिराच्या उजवीकडे आणि पाच गाड्या मंदिराच्या डावीकडे ठेवल्या. आणि मोठा गंगाळ-सागर मंदिराच्या उजवीकडे, म्हणजे दक्षिणपूर्वेकडे ठेवला.+

४० तसंच हीरामने+ गंगाळं, फावडी+ आणि कटोरेसुद्धा+ बनवले.

अशा प्रकारे, हीरामने शलमोन राजासाठी यहोवाच्या मंदिराचं सर्व काम पूर्ण केलं.+ त्याने बनवलेल्या वस्तू या: ४१ दोन स्तंभ+ आणि त्यांच्या वर असलेले कटोऱ्‍याच्या आकाराचे दोन कळस; स्तंभांच्या टोकांवर असलेल्या या कळसांना सजवण्यासाठी दोन नक्षीदार जाळ्या;+ ४२ स्तंभांवरचे कळस सजवण्याकरता असलेल्या या दोन जाळ्यांसाठी ४०० डाळिंबं+ (प्रत्येक जाळीवर डाळिंबांच्या दोन रांगा होत्या); ४३ हाताने ढकलता येतील अशा दहा गाड्या+ आणि त्यांवरची दहा गंगाळं;+ ४४ मोठा गंगाळ-सागर+ आणि त्याच्या खाली असलेले १२ बैल; ४५ आणि राख काढायच्या बादल्या, फावडी, कटोरे आणि सर्व भांडी. शलमोन राजाच्या सांगण्यानुसार, हीरामने यहोवाच्या मंदिरासाठी बनवलेल्या या सर्व वस्तू चकाकी दिलेल्या तांब्याच्या होत्या. ४६ राजाने या सर्व वस्तू यार्देन प्रांतात, सुक्कोथ आणि सारतानच्या मधल्या प्रदेशात मातीच्या साच्यात ओतून तयार केल्या होत्या.

४७ ही सर्व भांडी खूपच जास्त असल्यामुळे शलमोनने त्यांचं वजन केलं नाही. आणि म्हणून नेमकं किती तांबं वापरण्यात आलं ते समजू शकलं नाही.+ ४८ शलमोनने यहोवाच्या मंदिरासाठी लागणाऱ्‍या या सर्व वस्तू तयार केल्या: सोन्याची वेदी;+ अर्पणाची भाकर ठेवण्यासाठी सोन्याचं मेज;+ ४९ सोन्याचे दीपवृक्ष+​—आतल्या खोलीसमोर उजवीकडे पाच आणि डावीकडे पाच; सोन्याच्या पाकळ्या,+ सोन्याचे दीप आणि सोन्याचे चिमटे.+ ५० तसंच शुद्ध सोन्याची गंगाळं, आग विझवण्यासाठी कातरी,+ कटोरे, प्याले,+ धूप जाळण्याची पात्रं;+ तसंच, आतल्या खोलीच्या म्हणजे परमपवित्र स्थानाच्या, तसंच मंदिराच्या पवित्र स्थानाच्या दरवाजांसाठी+ सोन्याच्या बिजागऱ्‍या बनवल्या.+

५१ अशा रितीने, शलमोन राजाने यहोवाच्या मंदिराचं सगळं काम संपवलं. मग त्याने आपले वडील दावीद यांनी पवित्र केलेल्या वस्तू आत आणल्या;+ त्याने चांदी, सोनं आणि सगळ्या वस्तू यहोवाच्या मंदिराच्या भांडारात आणल्या.+

८ मग शलमोनने इस्राएलच्या वडीलजनांना, म्हणजे इस्राएल वंशांच्या सगळ्या प्रधानांना आणि घराण्यांच्या प्रमुखांना बोलावून घेतलं.+ ते सगळे दावीदपुरातून, म्हणजे सीयोनमधून+ यहोवाच्या कराराची पेटी आणण्यासाठी+ यरुशलेममध्ये शलमोन राजाकडे एकत्र जमले. २ इस्राएलचे हे सर्व पुरुष एथानीम* महिन्यात, म्हणजे सातव्या महिन्यात+ सणाच्या* वेळी शलमोन राजासमोर एकत्र जमले. ३ इस्राएलचे सर्व वडीलजन आले, तेव्हा याजकांनी कराराची पेटी उचलली.+ ४ याजक आणि लेवी हे यहोवाच्या कराराची पेटी, भेटमंडप+ आणि मंडपातली सर्व पवित्र भांडी घेऊन आले. ५ शलमोन राजा आणि इस्राएलच्या ज्या लोकांना त्याने बोलावलं होतं ते सर्व कराराच्या पेटीपुढे उभे होते. त्या वेळी, इतक्या मोठ्या प्रमाणात मेंढरांची आणि गाय-बैलांची बलिदानं दिली जात होती,+ की त्यांची संख्या मोजणं शक्य नव्हतं.

६ याजकांनी मग यहोवाच्या कराराची पेटी तिच्या जागेवर आणून ठेवली;+ त्यांनी ती मंदिराच्या आतल्या खोलीत, म्हणजे परमपवित्र स्थानात करुबांच्या पंखांखाली ठेवली.+

७ कराराच्या पेटीच्या जागेवर करुबांचे पंख अशा प्रकारे पसरले होते, की कराराची पेटी आणि तिचे दांडे करुबांमुळे वरून झाकले गेले होते.+ ८ कराराच्या पेटीचे दांडे+ इतके मोठे होते, की त्यांची टोकं आतल्या खोलीसमोर असलेल्या पवित्र स्थानातूनही दिसायची. पण बाहेरून मात्र ती दिसायची नाहीत. आणि आजपर्यंत ते तिथे तसेच आहेत. ९ कराराच्या पेटीत दोन दगडी पाट्यांशिवाय+ दुसरं काहीच नव्हतं; इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आले+ तेव्हा यहोवाने त्यांच्याशी एक करार केला होता.+ आणि त्या वेळी होरेब इथे मोशेने त्या दगडी पाट्या कराराच्या पेटीत ठेवल्या होत्या.+

१० याजक जेव्हा पवित्र स्थानातून बाहेर आले, तेव्हा यहोवाचं मंदिर ढगाने+ भरून गेलं.+ ११ या ढगामुळे याजक तिथे उभे राहून सेवा करू शकले नाहीत, कारण यहोवाचं मंदिर यहोवाच्या तेजाने भरून गेलं होतं.+ १२ त्या वेळी शलमोन म्हणाला: “यहोवाने म्हटलं होतं, की तो गडद अंधारात राहील.+ १३ मी यशस्वीपणे तुझ्यासाठी एक भव्य मंदिर बांधलंय, तुझ्यासाठी एक कायमचं निवासस्थान बांधलंय.”+

१४ मग राजा मागे वळला आणि तिथे उभ्या असलेल्या इस्राएलच्या संपूर्ण मंडळीला त्याने आशीर्वाद दिला.+ १५ तो म्हणाला: “इस्राएलचा देव यहोवा याची स्तुती होवो. त्याने स्वतः आपल्या मुखाने माझ्या वडिलांना, दावीदला वचन दिलं होतं आणि स्वतःच्या हाताने त्याने ते पूर्णही केलंय. त्याने म्हटलं होतं: १६ ‘ज्या दिवशी मी माझ्या इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणलं, त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या नावाच्या गौरवासाठी+ घर बांधायला मी इस्राएलच्या कोणत्याही वंशातलं शहर निवडलं नाही. पण माझ्या इस्राएली लोकांवर राज्य करायला मी दावीदला निवडलं.’ १७ इस्राएलचा देव यहोवा याच्या नावाच्या गौरवासाठी एक घर* बांधायची माझ्या वडिलांची, दावीदची मनापासून इच्छा होती.+ १८ पण यहोवा माझ्या वडिलांना, दावीदला म्हणाला, ‘तुला माझ्या नावाच्या गौरवासाठी एक घर बांधायची मनापासून इच्छा आहे आणि तुझी ही इच्छा चांगलीच आहे. १९ असं असलं, तरी तू माझ्यासाठी घर बांधणार नाहीस; तर तुला जो मुलगा होईल तो माझ्या नावाच्या गौरवासाठी घर बांधेल.’+ २० यहोवाने आपलं वचन पूर्ण केलंय. कारण यहोवाने वचन दिल्याप्रमाणे मी माझ्या वडिलांच्या, दावीदच्या जागी इस्राएलच्या राजासनावर बसलो. आणि इस्राएलचा देव यहोवा याच्या नावाच्या गौरवासाठी मी मंदिरही बांधलं.+ २१ शिवाय, आपल्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर आणल्यावर यहोवाने त्यांच्यासोबत जो करार केला होता, तो करार असलेली पेटी+ ठेवण्यासाठी मी मंदिरात एक स्थानही तयार केलं.”

२२ मग शलमोन इस्राएलच्या संपूर्ण मंडळीपुढे यहोवाच्या वेदीसमोर उभा राहिला. त्याने आपले हात वर आकाशाकडे पसरले,+ २३ आणि तो म्हणाला: “हे इस्राएलच्या देवा, यहोवा! वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर तुझ्यासारखा कोणीही देव नाही;+ तू आपला करार पाळतोस आणि तुझ्या मार्गांवर पूर्ण मनाने चालणाऱ्‍या आपल्या सेवकांवर एकनिष्ठ प्रेम करतोस.+ २४ तू तुझ्या सेवकाला, माझे वडील दावीद यांना दिलेलं वचन पूर्ण केलंस. तू स्वतः आपल्या मुखाने वचन दिलं होतं आणि आज तू स्वतःच्या हाताने ते पूर्ण केलंस.+ २५ आता हे इस्राएलच्या देवा यहोवा तू तुझ्या सेवकाला, माझे वडील दावीद यांना दिलेलं हे वचन पूर्ण कर. तू म्हणाला होतास: ‘तुझ्या मुलांनी जर आपल्या वागणुकीकडे लक्ष दिलं आणि ते तुझ्यासारखंच माझ्यासमोर चालत राहिले, तर इस्राएलच्या राजासनावर बसायला तुझ्या वंशाचा एकही पुरुष नाही, असं कधीही होणार नाही.’+ २६ तर आता हे इस्राएलच्या देवा, तू तुझ्या सेवकाला, माझे वडील दावीद यांना दिलेलं हे वचन खरं ठरो.

२७ पण देव खरोखर पृथ्वीवर राहील काय?+ पाहा! आकाशात आणि आकाशांच्या आकाशातही तू मावू शकत नाहीस,+ तर मी बांधलेल्या या मंदिरात तू कसा मावणार!+ २८ आता हे माझ्या देवा यहोवा, तुझ्या या सेवकाच्या प्रार्थनेकडे आणि तो कृपेसाठी करत असलेल्या विनंतीकडे लक्ष दे. आज तुझा हा सेवक मदतीसाठी करत असलेला धावा ऐक आणि तो तुझ्यासमोर करत असलेली प्रार्थना ऐक. २९ ज्या स्थानाविषयी तू म्हणाला होतास, की ‘माझं नाव तिथे राहील,’+ त्या स्थानावर, म्हणजे या मंदिरावर दिवसरात्र तुझी नजर असू दे. तुझा सेवक या स्थानाकडे वळून प्रार्थना करेल, तेव्हा ती ऐकण्यासाठी तुझी दृष्टी या स्थानावर असू दे.+ ३० तुझा सेवक जेव्हा कृपेसाठी विनंती करेल आणि तुझे इस्राएली लोक या स्थानाकडे वळून विनंती करतील तेव्हा तू ती ऐक; स्वर्गातल्या आपल्या निवासस्थानातून तू ती विनंती ऐक+ आणि त्यांना क्षमा कर.+

३१ एखाद्या माणसाला, आपल्या सोबत्याविरुद्ध पाप केल्याबद्दल शपथ घ्यायला लावण्यात आली* आणि त्या शपथेच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारलेली असताना जर तो या मंदिरात तुझ्या वेदीसमोर आला,+ ३२ तर तू स्वर्गातून त्याचं ऐक आणि आपल्या सेवकांचा न्याय कर. दुष्टाला दोषी ठरवून त्याचा गुन्हा त्याच्याच माथ्यावर मार. आणि नीतिमानाला निर्दोष ठरवून त्याच्या नीतिमान कार्यांप्रमाणे त्याला प्रतिफळ दे.+

३३ तुझे इस्राएली लोक तुझ्याविरुद्ध पाप करत राहिल्यामुळे शत्रूंकडून त्यांचा पराभव झाला,+ आणि त्यांनी पुन्हा तुझ्याकडे वळून जर तुझ्या नावाचा गौरव केला+ आणि तुझ्या या मंदिरात प्रार्थना करून तुझ्याकडे कृपेची भीक मागितली,+ ३४ तर तू स्वर्गातून आपल्या इस्राएली लोकांचं ऐक आणि त्यांच्या पापांची क्षमा कर आणि त्यांच्या पूर्वजांना तू जो देश दिला होता त्यात त्यांना परत आण.+

३५ ते तुझ्याविरुद्ध पाप करत राहिल्यामुळे+ जर आकाशाची दारं बंद होऊन पाऊस पडला नाही,+ पण तू त्यांना नम्र व्हायला* लावल्यामुळे त्यांनी या स्थानाकडे वळून प्रार्थना केली आणि तुझ्या नावाचा गौरव केला आणि त्यांनी आपला पापी मार्ग सोडून दिला,+ ३६ तर तू स्वर्गातून त्यांचं ऐक आणि तुझ्या सेवकांच्या, तुझ्या इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा कर. ज्या चांगल्या मार्गाने त्यांनी चाललं पाहिजे तो मार्ग त्यांना शिकव;+ आणि तुझ्या लोकांना तू वारसा म्हणून दिलेल्या तुझ्या देशात पाऊस पाड.+

३७ देशात जर दुष्काळ पडला,+ रोगाची साथ पसरली, पिकांना करपून टाकणारा उष्ण वारा आला, पिकांना बुरशी लागली,+ टोळधाड किंवा पीक फस्त करणारे नाकतोडे आले, किंवा देशातल्या एखाद्या शहराला त्यांच्या शत्रूने वेढा घातला, त्यांच्यावर इतर कुठलीही पीडा आली किंवा रोगराई पसरली,+ ३८ आणि त्यांच्यापैकी कोणत्याही माणसाने किंवा तुझ्या सगळ्या इस्राएली लोकांनी या मंदिराकडे आपले हात पसरून प्रार्थना किंवा कृपेसाठी कोणतीही विनंती केली,+ (कारण प्रत्येकाला आपल्या मनातलं दुःख माहीत असतं),+ ३९ तर तू स्वर्गातून, तुझ्या निवासस्थानातून+ ती ऐक. त्यांना क्षमा करून+ मदत कर. आणि प्रत्येकाला आपल्या कामांप्रमाणे प्रतिफळ दे;+ कारण तू प्रत्येकाचं मन ओळखू शकतोस (तूच फक्‍त प्रत्येक माणसाचं मन खऱ्‍या अर्थाने ओळखू शकतोस).+ ४० म्हणजे मग तू आमच्या पूर्वजांना दिलेल्या देशात ते जोपर्यंत राहतील तोपर्यंत तुझं भय बाळगतील.

४१ तसंच, तुझ्या इस्राएली लोकांपैकी नसलेला विदेशी माणूस जर तुझं नाव* ऐकून दूरच्या देशातून आला,+ ४२ (कारण ते तुझ्या महान नावाविषयी,+ तुझ्या सामर्थ्यशाली हाताविषयी आणि तुझ्या पराक्रमी बाहूविषयी ऐकतील), आणि त्याने तुझ्या या मंदिराकडे वळून प्रार्थना केली, ४३ तर तू स्वर्गातून, तुझ्या निवासस्थानातून+ ती ऐक. आणि तो विदेशी जी काही विनंती करेल ती तू पूर्ण कर. म्हणजे तुझ्या इस्राएली लोकांप्रमाणेच पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांना तुझं नाव समजेल आणि ते तुझं भय बाळगतील.+ तसंच, मी बांधलेल्या या मंदिराला तुझं नाव दिलेलं आहे हेसुद्धा त्यांना समजेल.

४४ तू आपल्या लोकांना त्यांच्या शत्रूंशी लढायला कुठेही पाठवलं+ आणि त्यांनी जर तू निवडलेल्या शहराकडे+ आणि मी तुझ्या नावासाठी बांधलेल्या या मंदिराकडे वळून+ तुला प्रार्थना केली+ तर हे यहोवा, ४५ तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना आणि कृपेसाठी त्यांनी केलेली विनंती ऐक आणि त्यांना मदत कर.*

४६ त्यांनी जर तुझ्याविरुद्ध पाप केलं (कारण असा कोणताही माणूस नाही जो पाप करत नाही),+ आणि तुझा राग त्यांच्यावर भडकला व तू त्यांना शत्रूच्या हाती दिलं, आणि शत्रूने त्यांना बंदी करून आपल्या देशात नेलं; मग तो जवळचा देश असो किंवा दूरचा देश असो;+ ४७ आणि बंदी करून नेलेल्या देशात ते जर भानावर आले+ आणि शत्रूंच्या देशात ते तुझ्याकडे वळले+ आणि ‘आम्ही पाप केलं आणि चुकीचं वागलो; आम्ही दुष्टपणे वागलो,’+ असं म्हणून त्यांनी कृपेची भीक मागितली,+ ४८ आणि ज्या शत्रूंनी त्यांना बंदी करून नेलं, त्यांच्या देशात असताना ते जर पूर्ण मनाने आणि जिवाने तुझ्याकडे वळले,+ आणि तू त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे व तू निवडलेल्या शहराकडे आणि मी तुझ्या नावाच्या गौरवासाठी बांधलेल्या मंदिराकडे वळून त्यांनी प्रार्थना केली,+ ४९ तर स्वर्गातून, तुझ्या निवासस्थानातून+ त्यांची प्रार्थना आणि कृपेसाठी त्यांनी केलेली विनंती ऐक आणि त्यांना मदत कर.* ५० तुझ्याविरुद्ध पाप केलेल्या तुझ्या लोकांना क्षमा कर. त्यांनी तुझ्याविरुद्ध केलेले सगळे अपराध माफ कर. शत्रूंना त्यांची कीव यावी म्हणून त्यांच्या शत्रूंच्या मनात दया उत्पन्‍न कर.+ ५१ (कारण ते तुझे लोक आणि तुझा वारसा आहेत.+ तू त्यांना इजिप्तमधून,+ लोखंड वितळवणाऱ्‍या भट्टीतून बाहेर आणलंस.)+ ५२ तुझ्या सेवकाच्या आणि तुझ्या इस्राएली लोकांनी कृपेसाठी केलेल्या विनंतीकडे तुझं लक्ष असू दे.*+ ते जेव्हा-केव्हा मदतीसाठी तुझा धावा करतील* तेव्हा तू त्यांचं ऐक.+ ५३ कारण हे सर्वोच्च प्रभू यहोवा, तू आमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर आणल्यावर तुझा सेवक मोशे याच्याद्वारे सांगितलं होतं, त्याप्रमाणे तू पृथ्वीवरच्या सर्व लोकांमधून तुझ्या इस्राएली लोकांना आपला वारसा होण्यासाठी वेगळं केलंय.”+

५४ अशा प्रकारे, यहोवाच्या वेदीपुढे गुडघे टेकून आणि स्वर्गाकडे हात पसरून यहोवाला प्रार्थना आणि कृपेसाठी विनंती केल्यावर शलमोन उठला.+ ५५ मग तो इस्राएलच्या संपूर्ण मंडळीसमोर उभा राहिला आणि त्याने त्यांना आशीर्वाद दिला. तो मोठ्या आवाजात म्हणाला: ५६ “यहोवाची स्तुती असो! कारण त्याने वचन दिल्याप्रमाणे आपल्या इस्राएली लोकांना विसाव्याचं ठिकाण दिलंय.+ त्याने आपला सेवक मोशे याच्याद्वारे चांगल्या गोष्टींबद्दल जी सर्व अभिवचनं दिली होती, त्यांपैकी एकही अभिवचन निष्फळ ठरलेलं नाही.+ ५७ आपला देव यहोवा जसा आपल्या पूर्वजांसोबत होता,+ तसाच तो आपल्यासोबतही असो. तो आपला त्याग न करो किंवा आपल्याला सोडून न देवो.+ ५८ आपण त्याच्या सर्व मार्गांनी चालावं, आणि त्याने आपल्या पूर्वजांना ज्या आज्ञा, कायदे आणि नियम पाळायला सांगितले होते त्यांचं आपणही पालन करावं, म्हणून तो आपली अंतःकरणं त्याच्याकडे आकर्षित करो.+ ५९ आपला देव यहोवा याच्याकडे कृपेसाठी केलेल्या विनंतीचे माझे हे शब्द दिवसरात्र यहोवासमोर असोत. आणि दररोज गरज पडेल त्याप्रमाणे तो आपल्या सेवकाला व आपल्या इस्राएली लोकांना न्याय देवो, ६० म्हणजे पृथ्वीवरच्या सर्व लोकांना कळेल, की यहोवा हाच खरा देव आहे.+ त्याच्याशिवाय दुसरा कोणीही नाही!+ ६१ तेव्हा, आजच्या सारखंच तुम्ही पुढेही पूर्ण मनाने*+ आपला देव यहोवा याच्या कायद्यांप्रमाणे चालत राहा आणि त्याच्या आज्ञांचं पालन करत राहा.”

६२ मग राजाने आणि संपूर्ण इस्राएलने यहोवासमोर खूप मोठ्या प्रमाणात बलिदानं अर्पण केली.+ ६३ शलमोनने यहोवाला ही शांती-अर्पणं+ वाहिली: २२,००० गाय-बैल आणि १,२०,००० मेंढरं. अशा प्रकारे, राजाने आणि संपूर्ण इस्राएलने यहोवाच्या मंदिराचं उद्‌घाटन केलं.+ ६४ त्या दिवशी होमार्पणं, शांती-अर्पणांची चरबी+ व अन्‍नार्पणं वाहण्यासाठी राजाला यहोवाच्या मंदिरासमोर असलेल्या अंगणाचा मधला भाग पवित्र करावा लागला. कारण, ही अर्पणं वाहण्यासाठी यहोवासमोर असलेली तांब्याची वेदी+ खूप लहान पडत होती. ६५ त्या वेळी, शलमोनने संपूर्ण इस्राएलसोबत, म्हणजे लेबो-हमाथपासून* ते थेट इजिप्तच्या ओढ्यापर्यंतच्या+ मोठ्या मंडळीसोबत सण साजरा केला.+ त्या सगळ्यांनी आपला देव यहोवा याच्यासमोर सात दिवस आणि त्यानंतर आणखी सात दिवस, असे एकूण १४ दिवस सण साजरा केला. ६६ आणि दुसऱ्‍या* दिवशी राजाने लोकांना निरोप दिला. मग लोकांनी राजाला आशीर्वाद दिला आणि मोठा जल्लोष करत ते आपापल्या घरी गेले. यहोवाने आपला सेवक दावीद याला आणि आपल्या इस्राएली लोकांना जो चांगुलपणा+ दाखवला होता, त्यामुळे त्यांची मनं आनंदाने भरून गेली होती.

९ शलमोनने यहोवाचं मंदिर, आपला राजमहाल+ आणि त्याच्या मनात होतं ते सगळं बांधून पूर्ण केलं,+ त्यानंतर लगेचच २ यहोवाने त्याला दर्शन दिलं. देवाने शलमोनला गिबोनमध्ये पहिल्यांदा दर्शन दिलं होतं,+ तसंच या वेळीही त्याला दर्शन दिलं. ३ यहोवा त्याला म्हणाला: “तू मला केलेली प्रार्थना आणि कृपेसाठी केलेली विनंती मी ऐकली आहे. तू बांधलेल्या मंदिराला मी कायमचं माझं नाव देऊन ते पवित्र केलंय.+ माझी दृष्टी आणि माझं मन नेहमी तिथे राहील.+ ४ तू जर तुझे वडील दावीद यांच्यासारखं माझ्यासमोर खऱ्‍या मनाने+ आणि सरळ मार्गाने+ चाललास,+ माझ्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केलंस,+ माझे न्याय-निर्णय* आणि कायदे पाळलेस,+ ५ तर मी तुझ्या वडिलांना, दावीदला वचन दिलं होतं त्याप्रमाणे इस्राएलवर तुझं राजासन कायमचं स्थापन करीन. मी दावीदला म्हणालो होतो: ‘इस्राएलच्या राजासनावर बसायला तुझ्या वंशाचा एकही पुरुष नाही, असं कधीही होणार नाही.’+ ६ पण जर तुम्ही आणि तुमची मुलं माझ्या मार्गापासून भरकटली, मी दिलेल्या आज्ञांचं व कायद्यांचं तुम्ही पालन केलं नाही आणि तुम्ही जाऊन दुसऱ्‍या दैवतांची उपासना केलीत व त्यांच्या पाया पडलात,+ ७ तर मी इस्राएलला दिलेल्या देशातून त्यांना घालवून देईन,+ मी माझ्या नावाच्या गौरवासाठी पवित्र केलेलं मंदिर माझ्या नजरेपासून दूर करीन+ आणि इस्राएल सर्व लोकांमध्ये थट्टेचा आणि निंदेचा विषय बनेल.+ ८ हे मंदिर उद्ध्‌वस्त होऊन त्याचा ढिगारा बनेल.+ येणारा-जाणारा प्रत्येक जण ते पाहून चकित होईल आणि थट्टेने डोकं हालवून* म्हणेल: ‘यहोवाने या देशाची आणि या मंदिराची अशी दशा का केली?’+ ९ मग ते म्हणतील, की ‘ज्या देवाने त्यांच्या पूर्वजांना इजिप्त देशातून बाहेर आणलं होतं, त्या यहोवा देवाला त्यांनी सोडून दिलं. त्यांनी इतर दैवतांना जवळ केलं आणि त्यांच्या पाया पडून त्यांची उपासना केली. म्हणूनच यहोवाने हे संकट त्यांच्यावर आणलंय.’”+

१० शलमोनला दोन्ही इमारती, म्हणजे यहोवाचं मंदिर आणि आपला राजमहाल बांधून पूर्ण करायला २० वर्षं लागली.+ ११ सोरचा राजा हीराम+ याने शलमोनला देवदाराची व गंधसरूची लाकडं पुरवली. तसंच, त्याला जितकं सोनं हवं होतं तितकं सोनंही त्याने त्याला पुरवलं.+ म्हणून शलमोन राजाने हीरामला गालीलच्या प्रदेशातली २० शहरं दिली. १२ मग शलमोनने दिलेली शहरं पाहायला हीराम सोरमधून तिथे गेला. पण ती शहरं पाहून तो खूश झाला नाही.* १३ तो म्हणाला: “माझ्या भावा, असली कसली शहरं दिलीस तू मला?” म्हणून आजपर्यंत ती शहरं काबुलचा देश* या नावाने ओळखली जातात. १४ हीरामने शलमोन राजाला १२० तालान्त* सोनं पाठवलं.+

१५ शलमोन राजाने ज्या लोकांना यहोवाचं मंदिर,+ आपला राजमहाल, टेकडी,*+ यरुशलेम शहराची भिंत, हासोर,+ मगिद्दो+ आणि गेजेर+ बांधण्यासाठी सक्‍तीची मजुरी करायला लावली होती, त्यांचा हा अहवाल आहे.+ १६ (इजिप्तचा राजा फारो याने गेजेर शहर काबीज करून ते जाळून टाकलं होतं. आणि त्यात राहणाऱ्‍या कनानी लोकांनाही त्याने मारून टाकलं होतं.+ त्याने ते शहर शलमोनच्या बायकोला, म्हणजे आपल्या मुलीला+ लग्नाच्या वेळी भेट* म्हणून दिलं होतं.) १७ शलमोनने जी शहरं पुन्हा बांधली ती ही: गेजेर, खालचं बेथ-होरोन,+ १८ बालाथ+ आणि देशातल्या ओसाड रानातलं तामार. १९ तसंच त्याने कोठारांसाठी, रथांसाठी आणि घोडेस्वारांसाठीही शहरं बांधली.+ याशिवाय शलमोनने यरुशलेममध्ये, लबानोनमध्ये आणि त्याच्या अधिकाराखाली असलेल्या संपूर्ण देशात त्याला जे काही बांधायचं होतं ते बांधलं. २० इस्राएली लोकांपैकी नसलेले+ अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी+ यांच्यापैकी उरलेल्या सर्व लोकांना, २१ म्हणजे देशात उरलेल्या त्यांच्या वंशजांना (ज्यांचा इस्राएली लोक पूर्णपणे नाश करू शकले नाहीत), शलमोनने सक्‍तीची मजुरी करायला लावली आणि आजपर्यंत ते हेच काम करत आहेत.+ २२ पण शलमोनने इस्राएली लोकांपैकी कोणालाही दास बनवलं नाही;+ ते त्याचे योद्धे, सेवक, अधिकारी, सहायक सेनाधिकारी आणि त्याच्या रथस्वारांचे व घोडेस्वारांचे प्रमुख होते. २३ शलमोनच्या कामाची देखरेख करणारे ५५० प्रमुख अधिकारी होते; ते काम करणाऱ्‍या लोकांवर देखरेख करायचे.+

२४ फारोची मुलगी+ दावीदपुरातून,+ तिच्यासाठी शलमोनने बांधलेल्या तिच्या महालात राहायला आली; मग त्याने टेकडी*+ बांधली.

२५ यहोवासाठी बांधलेल्या वेदीवर शलमोन वर्षातून तीन वेळा+ होमार्पणं आणि शांती-अर्पणं वाहायचा. तसंच, यहोवासमोर असलेल्या वेदीवर तो बलिदानांचं हवनही करायचा.*+ आणि अशा प्रकारे, शलमोनने मंदिर बांधण्याचं काम पूर्ण केलं.+

२६ शलमोन राजाने एस्योन-गेबेर+ इथे जहाजांचा एक ताफासुद्धा तयार केला; एस्योन-गेबेर हे अदोम देशात,+ तांबड्या समुद्राच्या किनाऱ्‍यावर असलेल्या एलोथच्या शेजारी आहे. २७ शलमोनच्या सेवकांसोबत काम करण्यासाठी हीरामने आपल्या सेवकांनाही जहाजांचे ताफे घेऊन पाठवलं;+ त्याचे हे सेवक अनुभवी खलाशी होते. २८ ते ओफीर+ इथे गेले आणि तिथून ते शलमोन राजासाठी ४२० तालान्त सोनं घेऊन आले.

१० शलमोनला यहोवाच्या नावामुळे जी कीर्ती मिळत होती त्याबद्दल शबाच्या राणीने ऐकलं.+ तेव्हा ती त्याला अतिशय कठीण प्रश्‍न विचारून* त्याची परीक्षा पाहायला आली.+ २ ती एक भला-मोठा काफिला* घेऊन यरुशलेममध्ये आली.+ येताना तिने अतिशय मोठ्या प्रमाणात सोनं, मौल्यवान रत्नं आणि बाल्सम* तेल+ उंटांवर लादून आणलं. मग ती शलमोनकडे गेली आणि तिला जे काही जाणून घ्यायचं होतं ते सर्व तिने त्याला विचारलं. ३ शलमोनने तिच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरं दिली. असा एकही प्रश्‍न नव्हता जो तिला समजावून सांगणं राजाला कठीण गेलं.

४ शबाच्या राणीने जेव्हा शलमोनची बुद्धिमत्ता,+ त्याने बांधलेला राजमहाल,+ ५ त्याच्या मेजावरची पक्वान्‍नं,+ त्याच्या सेवकांची बसण्याची व्यवस्था, जेवण वाढणाऱ्‍यांचा पोशाख आणि त्यांची सेवा, त्याचे प्यालेबरदार पाहिले; तसंच, तो यहोवाच्या मंदिरात नियमितपणे अर्पण करत असलेली बलिदानं तिने पाहिली तेव्हा ती अगदी थक्क झाली. ६ ती राजाला म्हणाली: “तुम्ही केलेल्या मोठमोठ्या गोष्टींबद्दल* आणि तुमच्या बुद्धीबद्दल मी माझ्या देशात जे काही ऐकलं होतं ते अगदी खरंय. ७ पण प्रत्यक्ष येऊन स्वतःच्या डोळ्यांनी या सर्व गोष्टी पाहण्याआधी मी त्यांच्यावर विश्‍वास ठेवला नव्हता. आणि खरंतर मी जे काही पाहिलंय, त्यातलं अर्धंसुद्धा मला सांगण्यात आलं नव्हतं! मी ऐकलं होतं त्यापेक्षा तुमची बुद्धी आणि तुमचं ऐश्‍वर्य कितीतरी पटीने जास्त आहे. ८ तुमच्या सर्व माणसांना आणि सेवेसाठी नेहमी हजर असलेल्या तुमच्या सेवकांना तुमच्याकडून बुद्धीचे शब्द ऐकायला मिळतात, ही त्यांच्यासाठी किती सन्मानाची गोष्ट आहे!+ ९ तुम्हाला मोठ्या आनंदाने इस्राएलच्या राजासनावर विराजमान करणाऱ्‍या तुमच्या यहोवा देवाचा गौरव होवो.+ यहोवाने इस्राएलवर असलेल्या आपल्या अपार प्रेमामुळेच, तुम्हाला न्यायनीतीने शासन करण्यासाठी राजा म्हणून नियुक्‍त केलंय.”

१० मग शबाच्या राणीने शलमोन राजाला १२० तालान्त* सोनं आणि अतिशय मोठ्या प्रमाणात बाल्सम तेल+ व मौल्यवान रत्नं दिली.+ तिने राजाला जितक्या प्रमाणात बाल्सम तेल दिलं, तितकं पुन्हा कधीही कोणी दिलं नाही.

११ ओफीर+ इथून हीरामच्या जहाजांच्या ताफ्याने सोन्यासोबतच मौल्यवान रत्नं+ आणि अतिशय मोठ्या प्रमाणात रक्‍तचंदनाची लाकडंही+ आणली. १२ राजाने रक्‍तचंदनाच्या लाकडांपासून यहोवाच्या मंदिरासाठी आणि राजमहालासाठी आधार देणारे कठडे बनवले. तसंच, त्याने त्यांपासून गायकांसाठी वीणा आणि तंतुवाद्यंही बनवली.+ या प्रकारचं रक्‍तचंदनाचं लाकूड पुन्हा कधीही आणण्यात आलं नाही किंवा आजपर्यंत पाहण्यात आलं नाही.

१३ शलमोन राजाने शबाच्या राणीला मोठ्या उदारतेने अनेक भेटवस्तू दिल्या. याशिवाय, तिला जे काही हवं होतं आणि तिने जे काही मागितलं ते सर्व त्याने तिला दिलं. त्यानंतर ती आपल्या सेवकांसोबत आपल्या देशात परत गेली.+

१४ शलमोनला दरवर्षी ६६६ तालान्त सोनं मिळायचं.+ १५ यासोबतच व्यापाऱ्‍यांकडून, सौदा करणाऱ्‍यांकडून, तसंच अरबच्या सर्व राजांकडून आणि देशातल्या सगळ्या राज्यपालांकडून त्याला करही मिळायचा.

१६ शलमोन राजाने मिश्र सोन्याच्या २०० मोठ्या ढाली बनवल्या+ (प्रत्येक ढाल बनवायला ६०० शेकेल* सोनं लागलं).+ १७ तसंच, त्याने मिश्र सोन्याच्या ३०० छोट्या ढालीही* बनवल्या (प्रत्येक छोटी ढाल बनवायला तीन मिना* सोनं लागलं). मग राजाने त्या सर्व ढाली लबानोन-वनगृहात+ ठेवल्या.

१८ राजाने हस्तिदंताचं एक भव्य राजासनसुद्धा बनवलं+ आणि ते शुद्ध सोन्याने मढवलं.+ १९ राजासनापर्यंत चढून जाण्यासाठी सहा पायऱ्‍या होत्या आणि राजासनाच्या वर एक गोलाकार छत्र होतं. त्याच्या दोन्ही बाजूंना हात ठेवण्यासाठी आधार असून त्यांच्या बाजूला सिंहांचे+ दोन पुतळे उभे करण्यात आले होते. २० सहा पायऱ्‍यांवर दोन्ही बाजूंना एकेक असे १२ सिंहांचे पुतळे उभे करण्यात आले होते. अशा प्रकारचं राजासन दुसऱ्‍या कोणत्याही राज्यात बनवण्यात आलं नव्हतं.

२१ शलमोन राजाकडे असलेले पिण्याचे सर्व प्याले सोन्याचे होते. तसंच, लबानोन-वनगृहातली+ सर्व भांडीसुद्धा शुद्ध सोन्याची होती. कुठलीही वस्तू चांदीची नव्हती. कारण शलमोनच्या काळात चांदीला कोणीही विचारत नव्हतं.+ २२ हीरामच्या जहाजांच्या ताफ्यासोबत, राजाचाही तार्शीशच्या जहाजांचा ताफा+ समुद्रावर होता. तार्शीशची ही जहाजं तीन वर्षांतून एकदा सोनं, चांदी, हस्तिदंत,+ वानरं आणि मोर घेऊन यायची.

२३ संपूर्ण पृथ्वीवर शलमोन राजाइतका श्रीमंत+ आणि बुद्धिमान राजा दुसरा कोणीही नव्हता.+ २४ देवाने शलमोनला अफाट बुद्धी दिली होती.+ आणि त्याच्या तोंडून बुद्धीचे बोल ऐकण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्‍यांतून लोक त्याच्याकडे यायचे. २५ येताना ते राजासाठी काही ना काही नजराणा घेऊन यायचे. ते आपल्यासोबत सोन्या-चांदीच्या वस्तू, तसंच वस्त्रं, शस्त्रं, बाल्सम* तेल, घोडे आणि खेचरं आणायचे; असं वर्षानुवर्षं चालत राहिलं.

२६ शलमोन स्वतःसाठी रथ आणि घोडे* जमा करत राहिला. त्याच्याकडे १,४०० रथ आणि १२,००० घोडे* होते.+ त्यातले काही त्याने रथांसाठी बांधलेल्या शहरांत आणि काही स्वतःजवळ यरुशलेममध्ये ठेवले.+

२७ शलमोन राजाने यरुशलेममध्ये चांदीचं प्रमाण दगडांइतकं आणि देवदाराच्या लाकडाचं प्रमाण शेफीलातल्या उंबराच्या झाडांइतकं मुबलक केलं.+

२८ शलमोनसाठी इजिप्तमधून घोडे मागवले जायचे. राजाचे व्यापारी घोड्यांच्या कळपाची किंमत ठरवून कळपचे कळप विकत घ्यायचे.*+ २९ इजिप्तमधून मागवलेल्या प्रत्येक रथाची किंमत ६०० चांदीचे तुकडे आणि प्रत्येक घोड्याची किंमत १५० चांदीचे तुकडे इतकी होती; मग राजाचे व्यापारी हे रथ आणि घोडे हित्ती लोकांच्या+ सर्व राजांना आणि सीरियाच्या सर्व राजांना विकायचे.

११ शलमोन राजाने फारोच्या मुलीशिवाय+ इतर अनेक विदेशी स्त्रियांवरसुद्धा प्रेम केलं;+ त्याने मवाबी,+ अम्मोनी,+ अदोमी, सीदोनी+ आणि हित्ती+ स्त्रियांवर प्रेम केलं. २ या स्त्रिया ज्या राष्ट्रांतल्या होत्या त्यांबद्दल यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं होतं: “तुम्ही त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नका,* नाहीतर ते नक्की तुमची मनं त्यांच्या दैवतांकडे वळवतील.”+ पण तरीसुद्धा शलमोनने त्यांच्याशी जवळीक साधली आणि त्यांच्यावर प्रेम केलं. ३ शलमोनला ७०० बायका असून त्या राजघराण्यातल्या होत्या. तसंच त्याला ३०० उपपत्नीसुद्धा होत्या. त्याच्या या बायकांनी हळूहळू त्याचं मन देवापासून बहकवलं.* ४ शलमोन वयोवृद्ध झाला+ तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचं मन इतर दैवतांकडे वळवलं.+ त्याचे वडील दावीद यांच्याप्रमाणे, त्याचं मन आपला देव यहोवा याच्याकडे पूर्णपणे नव्हतं.* ५ शलमोन सीदोनी लोकांची देवी अष्टारोथ+ आणि अम्मोनी लोकांचं घृणास्पद दैवत मिलकोम+ यांची उपासना करू लागला. ६ शलमोनने यहोवाच्या नजरेत जे वाईट ते केलं. आणि आपले वडील दावीद यांच्याप्रमाणे त्याने पूर्ण मनाने यहोवाची उपासना केली नाही.+

७ या काळात, शलमोनने यरुशलेमसमोर असलेल्या डोंगरावर मवाबचं घृणास्पद दैवत कमोश आणि अम्मोनी लोकांचं घृणास्पद दैवत+ मोलख+ यांच्यासाठी एकेक उच्च स्थान* बांधलं.+ ८ आपल्या दैवतांना होम-हवन करणाऱ्‍या आणि बलिदानं अर्पण करणाऱ्‍या त्याच्या सगळ्या विदेशी बायकांसाठी शलमोनने अशीच उच्च स्थानं बांधली.

९ शलमोनचं मन यहोवापासून बहकल्यामुळे देवाचा क्रोध त्याच्यावर भडकला.+ इस्राएलचा देव यहोवा याने दोन वेळा त्याला दर्शन दिलं होतं,+ १० आणि नेमकं याच गोष्टीबद्दल त्याला बजावून सांगितलं होतं, की त्याने इतर दैवतांची उपासना करू नये.+ पण शलमोनने यहोवाची ही आज्ञा पाळली नाही. ११ मग यहोवा शलमोनला म्हणाला: “तू अशा प्रकारे वागलास आणि मी दिलेल्या कराराचं व कायद्यांचं तू पालन केलं नाहीस; म्हणून आता मी तुझं राज्य नक्की तुझ्यापासून काढून घेईन आणि ते तुझ्या एका सेवकाला देईन.+ १२ पण तुझे वडील दावीद यांना दिलेल्या वचनामुळे मी हे तुझ्या जीवनकाळात करणार नाही, तर तुझ्या मुलाच्या हातून मी ते राज्य काढून घेईन.+ १३ परंतु मी सगळंच राज्य काढून घेणार नाही.+ माझा सेवक दावीद याच्यामुळे आणि मी निवडलेल्या यरुशलेम शहरामुळे+ मी एक वंश तुझ्या मुलाला देईन.”+

१४ मग यहोवाने शलमोनच्या विरोधात अदोमी हदाद याला उभं केलं;+ तो अदोमच्या राजघराण्यातला होता.+ १५ दावीदने अदोमच्या लोकांना हरवल्यानंतर+ जेव्हा सेनापती यवाब युद्धात मेलेल्या लोकांना पुरायला गेला, तेव्हा यवाबने अदोमच्या सर्व पुरुषांना* मारून टाकण्याचा प्रयत्न केला. १६ (कारण अदोममधल्या प्रत्येक पुरुषाला मारून टाकेपर्यंत यवाब आणि सर्व इस्राएली सैनिक सहा महिने तिथेच राहिले.) १७ पण हदाद मात्र आपल्या वडिलांच्या अदोमी सेवकांसोबत इजिप्तला पळून गेला; त्या वेळी हदाद लहान मुलगा होता. १८ ते मिद्यान इथून निघून पारानमध्ये आले. मग पारानमधून+ काही माणसं आपल्यासोबत घेऊन ते इजिप्तमध्ये फारो राजाकडे गेले. राजाने हदादला राहायला घर दिलं, त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली आणि त्याला जमीनही दिली. १९ फारो राजा हदादवर इतका खूश होता की त्याने त्याचं लग्न आपल्या बायकोच्या बहिणीशी, म्हणजे तहपनेस राणीच्या* बहिणीशी लावून दिलं. २० काही काळाने तहपनेसच्या बहिणीने हदादच्या मुलाला, गनुबथला जन्म दिला. तहपनेसने फारोच्या राजमहालात त्याचं संगोपन केलं आणि तो फारोच्या घरात त्याच्या मुलांमध्ये राहिला.

२१ इजिप्तमध्ये असताना हदादने ऐकलं, की दावीदचा मृत्यू झाला आहे*+ आणि त्याचा सेनापती यवाबसुद्धा मरण पावला आहे.+ म्हणून हदाद फारोला म्हणाला: “मला माझ्या देशात परत जाऊ द्या.” २२ पण फारो त्याला म्हणाला: “तुला तुझ्या देशात परत का जायचंय? इथे माझ्याकडे तुला काय कमी आहे?” त्यावर तो म्हणाला: “कसलीच नाही. पण तरीसुद्धा मला जाऊ द्या.”

२३ देवाने शलमोनच्या विरोधात आणखी एकाला, म्हणजे एल्यादाचा मुलगा रजोन याला उभं केलं;+ तो आपल्या प्रभूपासून, सोबाचा राजा हदद-एजर+ याच्यापासून पळून गेला होता. २४ दावीदने सोबाच्या लोकांना हरवलं,* तेव्हा रजोनने काही माणसं गोळा केली आणि तो लूटमार करणाऱ्‍या या टोळीचा प्रमुख बनला.+ ते सगळे दिमिष्कमध्ये+ जाऊन स्थायिक झाले आणि तिथे राज्य करू लागले. २५ शलमोन जिवंत होता तोपर्यंत रजोनने इस्राएलचा विरोध केला. हदादप्रमाणेच त्यानेसुद्धा इस्राएलला त्रास दिला. रजोनने सीरियावर राज्य केलं आणि तो इस्राएलचा तिरस्कार करत राहिला.

२६ यासोबतच, शलमोनचा सेवक+ यराबाम+ यानेही त्याच्याविरुद्ध बंड केलं.+ तो नबाटचा मुलगा असून एफ्राईम वंशाचा होता आणि सरेदा इथला राहणारा होता. त्याच्या आईचं नाव सरूया होतं आणि ती एक विधवा होती. २७ यराबामने राजाविरुद्ध बंड केलं त्याचं कारण हे होतं: शलमोनने टेकडी*+ बांधून आपल्या वडिलांच्या शहराच्या, म्हणजे दावीदपुराच्या+ भिंतीला पडलेली खिंडार बुजवली होती. २८ यराबाम हा एक कर्तबगार माणूस होता. त्याची मेहनती वृत्ती पाहून शलमोनने त्याला सक्‍तीची मजुरी करणाऱ्‍या योसेफच्या घराण्यातल्या लोकांवर देखरेख करण्यासाठी नेमलं होतं.+ २९ त्या काळात यराबाम यरुशलेममधून बाहेर गेला. रस्त्याने जात असताना त्याला शिलो इथला अहीया+ संदेष्टा भेटला. तेव्हा त्या दोघांशिवाय तिथे कोणीही नव्हतं. त्या वेळी अहीयाने एक नवीन झगा घातला होता. ३० अहीयाने आपल्या अंगावरचा तो नवीन झगा काढून फाडला आणि त्याचे १२ तुकडे केले. ३१ मग तो यराबामला म्हणाला:

“यातले दहा तुकडे घे, कारण इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: ‘मी शलमोनच्या हातून राज्य काढून घेतोय. आणि त्यातले दहा वंश मी तुला देईन.+ ३२ पण माझा सेवक दावीद याच्यामुळे+ आणि इस्राएलच्या सर्व वंशांतून निवडलेल्या यरुशलेम शहरामुळे+ मी एक वंश त्याच्याकडेच राहू देईन.+ ३३ मी असं करीन कारण त्यांनी मला सोडून दिलंय.+ आणि ते सीदोनी लोकांची देवी अष्टारोथ, मवाबी लोकांचं दैवत कमोश आणि अम्मोनी लोकांचं दैवत मिलकोम यांच्या पाया पडत आहेत. शलमोनचे वडील दावीद यांच्याप्रमाणे ते माझ्या मार्गांनुसार चालले नाहीत. त्यांनी माझ्या दृष्टीने जे योग्य ते केलं नाही आणि माझ्या कायद्यांचं व नियमांचंही पालन केलं नाही. ३४ पण मी त्याच्या हातून सगळंच राज्य काढून घेणार नाही. तो जिवंत असेपर्यंत मी त्याला प्रधान म्हणून राहू देईन. माझा निवडलेला सेवक दावीद याच्यामुळे मी असं करीन.+ कारण दावीदने माझ्या आज्ञांचं आणि कायद्यांचं पालन केलं. ३५ पण मी त्याच्या मुलाच्या हातून राज्य काढून घेईन आणि त्यातले दहा वंश तुला देईन.+ ३६ त्याच्या मुलाला मी एक वंश देईन. म्हणजे मी माझ्या नावाच्या गौरवासाठी निवडलेल्या यरुशलेम शहरात, माझ्यासमोर माझा सेवक दावीद याच्या वंशाचा दिवा कायम राहील.+ ३७ मी तुझी नेमणूक करीन आणि तू संपूर्ण इस्राएलचा राजा बनशील. तुला हवं त्या सगळ्यावर तू राज्य करशील. ३८ तू जर माझा सेवक दावीद याच्यासारखंच मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकल्यास, माझ्या मार्गांवर चालत राहिलास आणि माझ्या कायद्यांचं व आज्ञांचं पालन करून माझ्या दृष्टीने योग्य ते करत राहिलास,+ तर मी तुझ्याही सोबत असेन. आणि दावीदप्रमाणेच तुझंही राजघराणं मी कायमचं स्थापन करीन+ आणि तुला इस्राएलचा राजा बनवीन. ३९ मी दावीदच्या वंशजांना, त्यांनी केलेल्या वाईट कृत्यांमुळे शरमेने मान खाली घालायला लावीन;+ पण मी हे कायमसाठी करणार नाही.’”+

४० म्हणून मग शलमोनने यराबामला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. पण यराबाम इजिप्तच्या राजाकडे,+ शिशककडे+ पळून गेला. आणि शलमोनचा मृत्यू होईपर्यंत तो तिथेच इजिप्तमध्ये राहिला.

४१ शलमोनबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याच्या बुद्धीबद्दल आणि त्याने जे काही केलं त्याबद्दलची सर्व माहिती शलमोनच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आली आहे.+ ४२ शलमोनने यरुशलेममधून संपूर्ण इस्राएलवर एकूण ४० वर्षं राज्य केलं. ४३ पुढे शलमोनचा मृत्यू झाला* आणि त्याला त्याच्या वडिलांच्या शहरात, म्हणजे दावीदपुरात दफन करण्यात आलं. आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा रहबाम+ हा राजा बनला.

१२ रहबाम शखेम+ इथे गेला, कारण सर्व इस्राएली लोक त्याला राजा बनवायला+ तिथे जमले होते. २ ही गोष्ट नबाटचा मुलगा यराबाम याला समजली. (तो शलमोन राजाच्या भीतीमुळे इजिप्तला पळून गेला होता आणि अजूनही तिथेच राहत होता.)+ ३ तेव्हा लोकांनी त्याला बोलावून घेतलं. मग यराबाम आणि इस्राएलची सर्व मंडळी रहबामकडे येऊन म्हणाली: ४ “तुझ्या वडिलांनी आमच्यावर फार जड जू* लादलंय.+ त्यांनी आम्हाला कामाच्या ओझ्याखाली भरडून काढलंय. पण तू जर आमच्या कामाचा भार कमी केलास आणि हे जड जू हलकं केलंस तर आम्ही तुझी सेवा करू.”

५ त्यावर तो त्यांना म्हणाला: “आता तुम्ही जा, आणि तीन दिवसांनी परत या.” म्हणून ते लोक निघून गेले.+ ६ मग रहबाम राजाने वडीलधाऱ्‍यांशी* सल्लामसलत केली; या वडीलधाऱ्‍या माणसांनी त्याचा पिता शलमोन याची सेवा केली होती. रहबामने त्यांना विचारलं: “तुम्हाला काय वाटतं, या लोकांना मी काय उत्तर द्यावं?” ७ ते त्याला म्हणाले: “आज जर तू या लोकांची विनंती मान्य करून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केलंस आणि त्यांचा सेवक बनलास, तर ते आयुष्यभर तुझे सेवक होऊन राहतील.”

८ पण वडीलधाऱ्‍यांनी दिलेला हा सल्ला त्याने धुडकावून लावला. आणि ज्यांच्यासोबत तो लहानाचा मोठा झाला होता त्या आपल्या तरुण सेवकांशी त्याने सल्लामसलत केली.+ ९ त्याने त्यांना विचारलं: “जे लोक मला म्हणाले की ‘तुझ्या वडिलांनी आमच्यावर लादलेलं जू हलकं कर,’ त्या लोकांना आपण काय उत्तर द्यावं असं तुम्हाला वाटतं?” १० तेव्हा, त्याच्यासोबत लहानाचे मोठे झालेले तरुण त्याला म्हणाले: “जे लोक तुला असं म्हणाले की ‘तुझ्या वडिलांनी आमच्यावर लादलेलं जू फार जड आहे, ते हलकं कर,’ त्यांना तू असं सांग: ‘माझ्या हाताची करंगळी माझ्या वडिलांच्या कमरेपेक्षा जाड होईल. ११ माझ्या वडिलांनी तुमच्यावर जड जू लादलं; पण मी ते आणखी जड करीन. माझ्या वडिलांनी तुम्हाला चाबकाचे फटके देऊन शिक्षा केली; पण मी तुम्हाला काटेरी चाबकाचे फटके देऊन शिक्षा करीन.’”

१२ मग, “तिसऱ्‍या दिवशी परत या”+ असं जे रहबामने सांगितलं होतं, त्याप्रमाणे यराबाम आणि सर्व लोक तिसऱ्‍या दिवशी त्याच्याकडे आले. १३ पण राजा त्यांच्याशी अतिशय कठोरपणे बोलला; वडीलधाऱ्‍या माणसांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे त्याने केलं नाही. १४ याउलट, तरुणांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तो लोकांना म्हणाला: “माझ्या वडिलांनी तुमच्यावर जड जू लादलं; पण मी ते आणखी जड करीन. माझ्या वडिलांनी तुम्हाला चाबकाचे फटके देऊन शिक्षा केली; पण मी तुम्हाला काटेरी चाबकाचे फटके देऊन शिक्षा करीन.” १५ अशा प्रकारे राजाने लोकांचं म्हणणं ऐकलं नाही. यहोवाने शिलोतल्या अहीयाद्वारे नबाटचा मुलगा यराबाम याला जे सांगितलं होतं,+ ते पूर्ण व्हावं म्हणून यहोवानेच हे सगळं घडवून आणलं होतं.+

१६ राजा आपलं म्हणणं ऐकत नाही हे सर्व इस्राएली लोकांनी पाहिलं, तेव्हा ते त्याला म्हणाले: “दावीदशी आमचं काहीही घेणंदेणं नाही. इशायच्या मुलाच्या वारशात आम्हाला काहीच हिस्सा नाही. हे इस्राएलच्या लोकांनो! चला आपापल्या देवांकडे! हे दावीद! आता तुझं घराणं तूच सांभाळ!” असं बोलून सर्व इस्राएली लोक आपापल्या घरी निघून गेले.+ १७ पण रहबाम यहूदाच्या शहरांमध्ये राहणाऱ्‍या इस्राएली लोकांवर राज्य करत राहिला.+

१८ मग रहबाम राजाने, सक्‍तीची मजुरी करणाऱ्‍या लोकांवर अधिकारी असलेल्या अदोरामला+ इस्राएली लोकांकडे पाठवलं. पण त्यांनी त्याला दगडमार करून मारून टाकलं. रहबाम राजा कसाबसा आपल्या रथावर चढून यरुशलेमला पळून गेला.+ १९ आणि आजपर्यंत इस्राएली लोक दावीदच्या राजघराण्याविरुद्ध बंड करत आहेत.+

२० यराबाम परत आला आहे हे समजताच सर्व इस्राएली लोकांनी एक सभा भरवली. मग त्यांनी त्याला तिथे बोलावलं आणि सर्व इस्राएलवर राजा बनवलं.+ फक्‍त यहूदाचाच वंश दावीदच्या राजघराण्याला विश्‍वासू राहिला.+

२१ रहबाम यरुशलेमला आला तेव्हा त्याने लगेच यहूदाच्या संपूर्ण घराण्याला आणि बन्यामीन वंशाला एकत्र केलं. शलमोनचा मुलगा रहबाम याचं राज्यपद त्याला परत मिळावं म्हणून इस्राएलच्या घराण्याविरुद्ध लढाई करण्यासाठी त्याने १,८०,००० प्रशिक्षित* योद्धे जमवले.+ २२ तेव्हा खऱ्‍या देवाकडून शमाया+ संदेष्ट्याला* असा संदेश मिळाला: २३ “यहूदाचा राजा, म्हणजे शलमोनचा मुलगा रहबाम, तसंच यहूदा व बन्यामीनचं सगळं घराणं आणि बाकीचे लोक या सर्वांना असं सांग, की २४ ‘यहोवा असं म्हणतो: “आपल्या इस्राएली भावांशी जाऊन लढू नका. प्रत्येकाने आपापल्या घरी परत जावं. कारण मीच हे घडवून आणलंय.”’”+ यहोवाचं हे म्हणणं लोकांनी ऐकलं, आणि यहोवाने सांगितलं होतं त्याप्रमाणे ते आपापल्या घरी निघून गेले.

२५ मग यराबामने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातलं शखेम+ शहर पुन्हा बांधलं* आणि तो तिथे राहू लागला. त्यानंतर तो पनुएलला+ गेला आणि त्याने ते शहरही पुन्हा बांधलं.* २६ यराबामने मग विचार केला: “राज्य परत दावीदच्या राजघराण्याला मिळण्याची शक्यता वाटते.+ २७ कारण हे लोक जर यहोवाच्या मंदिरात बलिदानं अर्पण करायला यरुशलेमला जात राहिले,+ तर त्यांची मनंही त्यांच्या प्रभूकडे, यहूदाचा राजा रहबाम याच्याकडे वळतील. आणि मग ते मला मारून टाकतील आणि यहूदाच्या राजाकडे, रहबामकडे परत जातील.” २८ मग आपल्या सल्लागारांशी चर्चा केल्यानंतर राजाने सोन्याची दोन वासरं बनवली,+ आणि तो लोकांना म्हणाला: “हे इस्राएलच्या लोकांनो! यरुशलेमला जाण्याचं कष्ट का घेता? हे पाहा! हा तुमचा देव, यानेच तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणलं.”+ २९ मग त्यातलं एक वासरू त्याने बेथेल+ इथे व एक दान+ इथे ठेवलं. ३० आणि त्यामुळे लोकांनी पाप केलं;+ ते अगदी दानपर्यंत जाऊन तिथे ठेवलेल्या वासराची उपासना करू लागले.

३१ यराबामने उच्च स्थानांवर* उपासना करण्यासाठी मंदिरंही बांधली. आणि लेवी वंशापैकी नसलेल्या सामान्य लोकांमधून काहींना त्याने याजक म्हणून नेमलं.+ ३२ तसंच त्याने यहूदातल्या सणासारखाच एक सण, आठव्या महिन्याच्या १५ व्या दिवशी सुरू केला.+ आणि आपण बनवलेल्या वासरांपुढे त्याने बेथेलमध्ये+ बनवलेल्या वेदीवर बलिदानं अर्पण केली. तसंच त्याने बेथेलमध्ये बनवलेल्या उच्च स्थानांसाठी याजकही नेमले. ३३ आठव्या महिन्याच्या १५ व्या दिवशी, बेथेलमध्ये आपण बनवलेल्या वेदीवर तो बलिदानं अर्पण करू लागला; हा महिना त्याने स्वतःच निवडला होता. त्याने इस्राएली लोकांसाठी सण सुरू केला आणि वेदीसमोर जाऊन अर्पणं वाहिली व बलिदानांचं हवन केलं.*

१३ यराबाम बलिदानांचं हवन करायला* वेदीजवळ उभा होता,+ तेव्हा यहोवाच्या सांगण्यावरून देवाचा एक माणूस+ यहूदाहून बेथेलला आला. २ मग यहोवाच्या सांगण्यावरून देवाचा माणूस त्या वेदीविरुद्ध मोठ्याने असं म्हणाला: “हे वेदी! हे वेदी! यहोवा असं म्हणतो: ‘पाहा! दावीदच्या घराण्यात योशीया+ नावाचा एक मुलगा जन्माला येईल. तुझ्यावर बलिदानांचं हवन करणाऱ्‍या उच्च स्थानांच्या* याजकांना तो तुझ्यावर अर्पण करेल आणि माणसांची हाडं तुझ्यावर जाळेल.’”+ ३ त्या दिवशी त्याने एक चिन्ह दिलं. तो म्हणाला: “यहोवाने सांगितलेलं चिन्ह हे: पाहा! वेदी दुभंगली जाईल आणि तिच्यावरची राख* इथे-तिथे फेकली जाईल.”

४ खऱ्‍या देवाच्या माणसाने बेथेलमधल्या वेदीविरुद्ध मोठ्याने बोललेले हे शब्द ऐकताच, यराबाम राजाने वेदीवरून आपला हात काढला आणि त्याच्याकडे हात रोखून तो म्हणाला: “धरा त्याला!”+ पण त्याच क्षणी, देवाच्या माणसाकडे रोखून धरलेला त्याचा हात वाळून गेला,* आणि त्याला तो मागे घेता येईना.+ ५ मग यहोवाच्या सांगण्यावरून खऱ्‍या देवाच्या माणसाने जे चिन्ह दिलं होतं, त्याप्रमाणे वेदी दुभंगली आणि तिच्यावरची राख इथे-तिथे फेकली गेली.

६ मग राजा खऱ्‍या देवाच्या माणसाला म्हणाला: “कृपा करून तुझा देव यहोवा याच्याकडे कृपेची भीक माग. माझा हात बरा व्हावा म्हणून माझ्यासाठी प्रार्थना कर.”+ तेव्हा त्याने यहोवाकडे कृपेची भीक मागितली आणि राजाचा हात बरा होऊन पहिल्यासारखा झाला. ७ मग राजा त्याला म्हणाला: “माझ्यासोबत घरी चल आणि काहीतरी खा. मला तुला भेटवस्तूही द्यायची आहे.” ८ पण खऱ्‍या देवाचा तो माणूस त्याला म्हणाला: “तू मला अर्धा राजमहाल जरी दिलास, तरी मी तुझ्यासोबत येणार नाही. मी इथे अन्‍नाचा एक कणही खाणार नाही किंवा पाणीही पिणार नाही. ९ कारण यहोवाने मला अशी आज्ञा दिली आहे: ‘इथे काही खाऊ नकोस किंवा पाणीही पिऊ नकोस. आणि ज्या रस्त्याने तू आला आहेस त्या रस्त्याने परत जाऊ नकोस.’” १० म्हणून मग तो ज्या रस्त्याने बेथेलला आला होता, त्या रस्त्याने न जाता दुसऱ्‍या रस्त्याने निघून गेला.

११ बेथेलमध्ये एक वृद्ध संदेष्टा राहत होता. त्या दिवशी बेथेलमध्ये खऱ्‍या देवाच्या माणसाने जे काही केलं होतं आणि तो राजाला जे काही बोलला होता, ते सगळं त्या वृद्ध संदेष्ट्याच्या मुलांनी घरी येऊन आपल्या वडिलांना सांगितलं. त्यांनी या गोष्टी आपल्या वडिलांना सांगितल्यावर, १२ त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारलं: “तो कोणत्या रस्त्याने गेला?” तेव्हा, यहूदाहून आलेला खऱ्‍या देवाचा माणूस कोणत्या रस्त्याने गेला हे त्याच्या मुलांनी त्याला दाखवलं. १३ मग तो आपल्या मुलांना म्हणाला: “माझ्यासाठी गाढव तयार करा, म्हणजे मी त्यावर बसून जाईन.” म्हणून त्यांनी त्याच्यासाठी गाढव तयार केलं आणि तो त्यावर बसून निघाला.

१४ तो त्या खऱ्‍या देवाच्या माणसामागे गेला, तेव्हा त्याला तो एका मोठ्या झाडाखाली बसलेला दिसला. त्याने त्याला विचारलं: “यहूदाहून आलेला खऱ्‍या देवाचा माणूस तूच का?”+ त्यावर तो म्हणाला: “हो, मीच आहे तो.” १५ मग तो वृद्ध संदेष्टा त्याला म्हणाला: “माझ्यासोबत घरी चल आणि काहीतरी खा.” १६ पण तो त्याला म्हणाला: “मी तुमच्यासोबत मागे जाऊ शकत नाही किंवा तुमच्या घरीही येऊ शकत नाही. आणि मी इथे काही खाऊ शकत नाही किंवा पाणीही पिऊ शकत नाही. १७ कारण यहोवाने मला असं सांगितलंय, की ‘इथे काही खाऊ नकोस किंवा पाणीही पिऊ नकोस. आणि ज्या रस्त्याने तू आलास त्या रस्त्याने परत जाऊ नकोस.’” १८ तेव्हा वृद्ध संदेष्टा त्याला म्हणाला: “मीसुद्धा तुझ्यासारखाच एक संदेष्टा आहे. आणि यहोवाने एका स्वर्गदूताद्वारे मला असं सांगितलंय, की ‘त्याला आपल्या घरी घेऊन ये आणि काही खाऊ-पिऊ घाल.’” (खरंतर, त्याने त्याला फसवलं.) १९ म्हणून मग तो जेवण-खावण करायला त्या वृद्ध संदेष्ट्यासोबत त्याच्या घरी गेला.

२० ते जेवायला बसलेले असताना, जो वृद्ध संदेष्टा त्याला परत घेऊन आला होता त्याला यहोवाचा संदेश मिळाला. २१ आणि यहूदाहून आलेल्या खऱ्‍या देवाच्या माणसाला उद्देशून तो मोठ्याने म्हणाला: “यहोवा असं म्हणतो: ‘तू यहोवाविरुद्ध बंड केलंस. तुझा देव यहोवा याने दिलेली आज्ञा तू पाळली नाहीस. २२ “इथे काही खाऊ नकोस किंवा पाणीही पिऊ नकोस,” असं सांगितलेलं असतानाही तू खाणंपिणं करायला परत मागे गेलास. म्हणून आता तुझा मृतदेह तुझ्या वाडवडिलांच्या कबरेत पुरला जाणार नाही.’”+

२३ मग खऱ्‍या देवाच्या माणसाचं खाणंपिणं झाल्यावर, वृद्ध संदेष्ट्याने आपल्या घरी आणलेल्या या संदेष्ट्याला पाठवून देण्यासाठी गाढव तयार केलं. २४ आणि तो आपल्या रस्त्याने जायला निघाला. पण रस्त्याने जात असताना एक सिंह समोर आला आणि सिंहाने त्याला मारून टाकलं.+ त्याचा मृतदेह रस्त्यावरच पडला होता आणि जवळच गाढव उभं होतं. तसंच सिंहसुद्धा तिथेच उभा होता. २५ तिथून येणाऱ्‍या-जाणाऱ्‍या माणसांनी जेव्हा रस्त्यावर पडलेला तो मृतदेह आणि त्याच्याजवळ उभा असलेला सिंह पाहिला, तेव्हा त्यांनी वृद्ध संदेष्टा राहत असलेल्या शहरात जाऊन लोकांना ही बातमी सांगितली.

२६ ज्या वृद्ध संदेष्ट्याने त्याला रस्त्यातून परत आणलं होतं त्याने ही बातमी ऐकली, तेव्हा तो लगेच म्हणाला: “हा तोच खऱ्‍या देवाचा माणूस आहे ज्याने यहोवाच्या आज्ञेविरुद्ध काम केलंय.+ आणि म्हणूनच, यहोवाने त्याला सिंहाच्या तावडीत दिलं आणि सिंहाने त्याला फाडून मारून टाकलं. यहोवाने त्याला सांगितलं होतं तसंच घडलं.”+ २७ मग तो आपल्या मुलांना म्हणाला: “माझ्यासाठी गाढव तयार करा.” म्हणून त्यांनी त्याच्यासाठी गाढव तयार केलं. २८ तो रस्त्याने जाऊ लागला, तेव्हा रस्त्यात पडलेला मृतदेह आणि जवळच गाढव व सिंह उभे असलेले त्याला दिसले. पण सिंहाने मृतदेह खाल्ला नव्हता किंवा गाढवावरही हल्ला केला नव्हता. २९ मग त्या संदेष्ट्याने खऱ्‍या देवाच्या माणसाचा मृतदेह उचलून गाढवावर ठेवला. त्याच्यासाठी शोक करायला आणि त्याला दफन करायला तो त्याचा मृतदेह आपल्या शहरात घेऊन आला. ३० त्याने तो मृतदेह, स्वतःसाठी बनवलेल्या कबरेत ठेवला. मग, “फार वाईट झालं माझ्या भावा!” असं म्हणून ते त्याच्यासाठी शोक करत राहिले. ३१ त्याला दफन केल्यावर तो वृद्ध संदेष्टा आपल्या मुलांना म्हणाला: “या खऱ्‍या देवाच्या माणसाला जिथे दफन करण्यात आलंय, तिथेच मलाही माझ्या मृत्यूनंतर दफन करा. आणि माझ्या अस्थी त्याच्या अस्थींजवळच ठेवा.+ ३२ त्या माणसाने यहोवाच्या सांगण्यावरून बेथेलमधल्या वेदीविरुद्ध आणि शोमरोनातल्या शहरांत उच्च स्थानांवर+ असलेल्या सर्व मंदिरांविरुद्ध जे काही म्हटलं होतं ते सगळं नक्कीच पूर्ण होईल.”+

३३ इतकं सगळं होऊनसुद्धा यराबामने आपला वाईट मार्ग सोडला नाही. उच्च स्थानांवर सेवा करण्यासाठी तो सामान्य लोकांमधून याजकांची नेमणूक करत राहिला.+ ज्या कोणाला इच्छा असेल त्याला तो याजकपदावर नेमायचा. तो म्हणायचा: “उच्च स्थानांवर सेवा करण्यासाठी यालासुद्धा याजक होऊ द्या.”+ ३४ यराबामच्या घराण्यातल्या लोकांनी केलेल्या या पापामुळे+ त्यांचा नाश झाला; पृथ्वीवर त्यांचं नामोनिशाण राहिलं नाही.+

१४ त्याच काळात, यराबामचा मुलगा अबीया हा आजारी पडला. २ म्हणून मग यराबाम आपल्या बायकोला म्हणाला: “ऊठ, आपला वेष बदल, म्हणजे तू यराबामची बायको आहेस हे कोणालाही कळणार नाही, आणि शिलो इथे जा. पाहा! तिथे अहीया संदेष्टा आहे. मी या लोकांचा राजा होणार, हे त्यानेच मला सांगितलं होतं.+ ३ जाताना आपल्याबरोबर दहा भाकरी, काही पुऱ्‍या आणि मधाची एक कुपी* घेऊन जा. मग आपल्या मुलाचं काय होईल हे तो संदेष्टा तुला सांगेल.”

४ मग यराबामने सांगितलं होतं तसंच त्याच्या बायकोने केलं. ती निघाली आणि शिलो+ इथे अहीयाच्या घरी आली. अहीयाला दिसत नव्हतं; कारण वय झाल्यामुळे त्याची दृष्टी गेली होती.

५ पण यहोवाने अहीयाला सांगितलं होतं: “पाहा! यराबामची बायको आपल्या मुलाबद्दल विचारायला तुझ्याकडे येत आहे. कारण तिचा मुलगा आजारी आहे. तिला काय उत्तर द्यायचं ते मी तुला सांगीन.* ती येईल तेव्हा ती आपली खरी ओळख लपवेल.”

६ ती दारातून आत येत असताना अहीयाने तिच्या पावलांचा आवाज ऐकला आणि तो म्हणाला: “यराबामची पत्नी, आत ये! तू आपली ओळख का लपवतेस? देवाने तुला एक वाईट संदेश द्यायला मला सांगितलंय. ७ जा आणि यराबामला सांग, ‘इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो: “मी माझ्या इस्राएली लोकांचा पुढारी होण्यासाठी तुझ्या लोकांमधून तुला निवडलं.+ ८ मग मी दावीदच्या घराण्याकडून राज्य काढून घेतलं आणि ते तुला दिलं.+ पण माझा सेवक दावीद याच्यासारखं तू वागला नाहीस. दावीदने माझ्या आज्ञांचं पालन केलं. माझ्या दृष्टीने जे योग्य ते करून तो मनापासून माझ्या मार्गांवर चालला. पण तू तसा वागला नाहीस.+ ९ उलट, तुझ्याआधी जे होऊन गेले त्या सगळ्यांपेक्षा तू जास्त वाईट वागलास. तू माझ्याकडे पाठ फिरवून+ स्वतःसाठी दुसरा देव बनवलास आणि धातूच्या मूर्ती* तयार केल्यास. आणि असं करून तू मला राग आणलास.+ १० म्हणूनच मी यराबामच्या घराण्यावर संकट आणतोय. त्याच्या घराण्यातला प्रत्येक पुरुष व मुलगा, मग तो लाचार असो किंवा दुर्बळ, त्याचा मी इस्राएलमधून समूळ नाश करीन. गोठ्यातलं शेण जसं पूर्णपणे काढून टाकलं जातं, अगदी तसंच मी यराबामचं घराणं पूर्णपणे नाहीसं करीन!+ ११ यराबामच्या घराण्यातला जो कोणी शहरात मरेल, त्याला कुत्री खाऊन टाकतील; आणि जो कोणी मैदानावर मरेल त्याला आकाशातले पक्षी खाऊन टाकतील; कारण यहोवा हे बोललाय.”’

१२ आता ऊठ आणि आपल्या घरी जा. तू शहरात पाय ठेवताच तुझ्या मुलाचा मृत्यू होईल. १३ संपूर्ण इस्राएल त्याच्यासाठी शोक करून त्याला पुरेल; यराबामच्या घराण्यात फक्‍त त्यालाच कबरेत दफन केलं जाईल. कारण, इस्राएलचा देव यहोवा याला यराबामच्या घराण्यात केवळ त्याच्यातच काहीतरी चांगलं पाहायला मिळालं. १४ इस्राएलच्या घराण्यावर यहोवा एक असा राजा नेमेल जो एक दिवस यराबामच्या घराण्याचा समूळ नाश करेल;+ आणि तो दिवस फार दूर नाही. १५ यहोवा इस्राएलला असा तडाखा देईल, की इस्राएलची स्थिती पाण्यात हेलकावणाऱ्‍या गवतासारखी होईल. त्याने तुमच्या पूर्वजांना दिलेल्या या उत्तम देशातून तो तुम्हाला मुळासकट उपटून काढेल+ आणि नदीच्या* पलीकडे तुमची पांगापांग करेल.+ इस्राएलने पूजेचे खांब*+ बनवून यहोवाला क्रोध आणल्यामुळे तो असं करेल. १६ यराबामने स्वतः केलेल्या आणि इस्राएलला करायला लावलेल्या पापांमुळे तो इस्राएलचा त्याग करेल.”+

१७ मग यराबामची बायको निघाली आणि तिरसा इथे आली. ती घराच्या उंबरठ्याजवळ येताच तिच्या मुलाचा मृत्यू झाला. १८ आणि यहोवाने आपल्या सेवकाद्वारे, म्हणजे अहीया संदेष्ट्याद्वारे जे सांगितलं होतं, त्याप्रमाणे सर्व इस्राएली लोकांनी त्याला दफन केलं आणि त्याच्यासाठी शोक केला.

१९ आणि यराबामबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने कसं राज्य केलं आणि कशा प्रकारे युद्ध केलं+ या सगळ्या गोष्टी इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आल्या आहेत. २० यराबामने एकूण २२ वर्षं राज्य केलं. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला*+ आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा नादाब राजा बनला.+

२१ इकडे, शलमोनचा मुलगा रहबाम यहूदाचा राजा बनला होता. तो राजा बनला तेव्हा ४१ वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेममध्ये, म्हणजे यहोवाने आपल्या नावाच्या गौरवासाठी+ इस्राएल वंशांच्या प्रदेशातून निवडलेल्या शहरामध्ये+ १७ वर्षं राज्य केलं. रहबामची आई अम्मोनी+ असून तिचं नाव नामा होतं. २२ यहूदातले लोक यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिले.+ त्यांनी आपल्या पूर्वजांपेक्षा जास्त पाप करून त्याचा क्रोध भडकवला.+ २३ त्यांनीसुद्धा प्रत्येक उंच टेकडीवर+ आणि प्रत्येक हिरव्यागार वृक्षाखाली+ आपल्यासाठी उच्च स्थानं,* पूजेचे स्तंभ आणि पूजेचे खांब*+ उभे केले. २४ शिवाय, देशात असे पुरुषही होते जे मंदिरात पुरुष-वेश्‍येची कामं करायचे.+ हे पुरुष, यहोवाने इस्राएली लोकांपुढून हाकलून दिलेल्या राष्ट्रांसारखी घृणास्पद कामं करायचे.

२५ रहबाम राजाच्या शासनकाळाच्या पाचव्या वर्षी इजिप्तचा राजा शिशक+ याने यरुशलेमवर हल्ला केला.+ २६ त्याने यहोवाच्या मंदिरात आणि राजमहालात असलेला खजिना लुटला.+ त्याने सगळं काही लुटलं; शलमोनने बनवलेल्या सोन्याच्या ढालीसुद्धा त्याने लुटल्या.+ २७ म्हणून रहबाम राजाने त्यांच्याऐवजी तांब्याच्या ढाली बनवल्या. आणि त्याने त्या ढाली राजमहालाच्या प्रवेशद्वाराची राखण करणाऱ्‍या रक्षकांच्या* प्रमुखांच्या हवाली केल्या. २८ राजा यहोवाच्या मंदिरात यायचा तेव्हा हे रक्षक त्या ढाली घेऊन त्याच्यासोबत चालायचे. आणि नंतर त्या पुन्हा रक्षकांच्या चौकीत आणून ठेवायचे.

२९ रहबामबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सगळं यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.+ ३० रहबाम आणि यराबाम यांच्यात सतत युद्ध होत राहिलं.+ ३१ मग रहबामचा मृत्यू झाला आणि त्याला दावीदपुरात आपल्या पूर्वजांच्या कबरेत दफन करण्यात आलं.+ त्याची आई ही अम्मोनी+ असून तिचं नाव नामा होतं. रहबामच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा अबीयाम*+ हा राजा बनला.

१५ नबाटचा मुलगा, म्हणजे राजा यराबाम+ याच्या शासनकाळाच्या १८ व्या वर्षी अबीयाम यहूदाचा राजा बनला.+ २ त्याने यरुशलेमवर तीन वर्षं राज्य केलं. त्याच्या आईचं नाव माका+ असून ती अबीशालोमची नात होती. ३ आपल्या वडिलांनी जी पापं केली होती, तशीच पापं अबीयामसुद्धा करत राहिला. आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे त्याचं मन त्याचा देव यहोवा याच्याकडे पूर्णपणे नव्हतं.* ४ पण दावीदमुळे,+ त्याचा देव यहोवा याने यरुशलेममध्ये त्याला एक वंशाचा दिवा दिला;+ देवाने त्याच्यानंतर त्याच्या मुलाला राजा म्हणून नेमलं आणि यरुशलेमचं अस्तित्व टिकवून ठेवलं. ५ कारण, दावीदने यहोवाच्या नजरेत जे योग्य होतं तेच केलं. उरीया हित्तीच्या बाबतीत त्याने जे केलं,+ ती एक गोष्ट सोडून त्याने आयुष्यभर देवाच्या आज्ञांचं पालन केलं; त्यांपासून तो कधीही भरकटला नाही. ६ रहबाम जिवंत होता तोपर्यंत रहबाममध्ये आणि यराबाममध्ये युद्ध होत राहिलं.+

७ अबीयामबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.+ अबीयाम आणि यराबाम यांच्यामध्येही युद्ध होत राहिलं.+ ८ मग अबीयामचा मृत्यू झाला* आणि त्याला दावीदपुरात दफन करण्यात आलं. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा आसा+ हा राजा बनला.+

९ इस्राएलचा राजा यराबाम याच्या शासनकाळाच्या २० व्या वर्षी आसा यहूदावर राज्य करू लागला. १० त्याने यरुशलेममध्ये ४१ वर्षं राज्य केलं. त्याच्या आजीचं नाव माका+ असून ती अबीशालोमची नात होती. ११ आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे आसानेही यहोवाच्या नजरेत जे योग्य तेच केलं.+ १२ मंदिरात पुरुष-वेश्‍येची कामं करणाऱ्‍या माणसांना त्याने देशातून हाकलून दिलं,+ आणि त्याच्या वाडवडिलांनी बनवलेल्या घृणास्पद मूर्तीही* त्याने काढून टाकल्या.+ १३ त्याने आपली आजी माका+ हिलासुद्धा राजमातेच्या पदावरून काढून टाकलं. कारण तिने पूजेच्या खांबाची* उपासना करण्यासाठी एक अश्‍लील मूर्ती बनवली होती. तिने बनवलेली ही मूर्ती आसाने फोडून किद्रोन खोऱ्‍यात+ जाळून टाकली.+ १४ उच्च स्थानं* मात्र काढून टाकण्यात आली नव्हती.+ पण असं असलं, तरी आसाने आयुष्यभर पूर्ण मनाने* यहोवाची सेवा केली. १५ तसंच, त्याने आणि त्याच्या वडिलांनी पवित्र केलेल्या वस्तू, म्हणजे सोनं, चांदी आणि वेगवेगळी भांडी या सर्व वस्तू त्याने यहोवाच्या मंदिरात आणल्या.+

१६ आसा आणि इस्राएलचा राजा बाशा+ यांच्यात सतत युद्ध होत राहिलं. १७ इस्राएलचा राजा बाशा याने यहूदावर हल्ला केला, आणि यहूदाचा राजा आसा याच्या प्रदेशात लोकांचं येणं-जाणं होऊ नये+ म्हणून तो रामा+ शहर बांधू लागला.* १८ तेव्हा, आसाने यहोवाच्या मंदिरातल्या आणि राजमहालातल्या भांडारांत उरलेलं सगळं सोनं व चांदी घेतलं. आणि ते आपल्या सेवकांच्या हातून दिमिष्कमध्ये राहणारा सीरियाचा राजा बेन-हदाद याच्याकडे पाठवलं;+ बेन-हदाद हा तब्रिम्मोनचा मुलगा व हेज्योनचा नातू होता. आसाने त्याला असा संदेश पाठवला: १९ “माझे वडील आणि तुझे वडील यांच्यामध्ये जसा एक करार होता, तसाच एक करार आपण आपसात करू या. मी तुला सोनं आणि चांदी भेट म्हणून पाठवतोय. तर आता, इस्राएलचा राजा बाशा याच्याशी तू जो करार केलाय तो मोडून टाक, म्हणजे तो माझा पिच्छा सोडेल.” २० बेन-हदादने आसा राजाचं म्हणणं ऐकलं आणि त्याने आपल्या सेनापतींना इस्राएलच्या शहरांवर हल्ला करायला पाठवलं. त्यांनी जाऊन ईयोन,+ दान,+ आबेल-बेथ-माका, तसंच सगळा किन्‍नेरोथ आणि नफतालीचा सर्व प्रदेश जिंकला. २१ बाशाने हे ऐकलं तेव्हा त्याने लगेच रामा शहर बांधायचं* सोडून दिलं आणि तो परत तिरसा+ इथे जाऊन राहू लागला. २२ मग आसा राजाने यहूदातल्या सर्व लोकांना बोलावलं; त्याने कोणालाही सोडलं नाही. आणि रामा शहर बांधण्यासाठी बाशा जी लाकडं व जे दगड वापरत होता ते त्यांनी उचलून नेले. आणि त्यांचा उपयोग करून आसा राजाने मिस्पा+ आणि बन्यामीनच्या प्रदेशातलं गेबा+ शहर बांधलं.*

२३ आसाबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याची पराक्रमाची कामं, त्याने जी शहरं बांधली* आणि त्याने जे काही केलं ते सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. पण तो म्हातारा झाला तेव्हा त्याच्या पायांना एक रोग जडला आणि त्यामुळे त्याला भयंकर त्रास झाला.+ २४ मग आसाचा मृत्यू झाला* आणि त्याला त्याच्या पूर्वजांच्या शहरात, म्हणजे दावीदपुरात दफन करण्यात आलं. आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोशाफाट+ हा राजा बनला.

२५ यहूदाचा राजा आसा याच्या शासनकाळाच्या दुसऱ्‍या वर्षी, यराबामचा मुलगा नादाब+ हा राजा बनला आणि त्याने इस्राएलवर दोन वर्षं राज्य केलं. २६ त्याने यहोवाच्या नजरेत जे वाईट ते केलं. तो आपल्या वडिलांच्या मार्गाने चालत राहिला;+ त्याच्या वडिलांनी स्वतः पाप केलं आणि इस्राएललाही पाप करायला लावलं.+ २७ इस्साखारच्या घराण्यातल्या अहीयाच्या मुलाने, म्हणजे बाशाने नादाबविरुद्ध कट रचला; आणि पलिष्ट्यांच्या गिब्बथोन+ शहरात त्याला मारून टाकलं. त्या वेळी नादाबने आणि सर्व इस्राएलने गिब्बथोनला वेढा घातला होता. २८ अशा प्रकारे, बाशाने त्याला यहूदाचा राजा आसा याच्या शासनकाळाच्या तिसऱ्‍या वर्षी ठार मारलं आणि तो त्याच्या जागी राजा बनला. २९ राजा बनल्या-बनल्या बाशाने यराबामच्या घराण्यातल्या सगळ्यांना मारून टाकलं; त्याने एकालाही जिवंत सोडलं नाही. यहोवाने शिलोमधला आपला सेवक अहीया याच्याद्वारे सांगितलं होतं, त्याप्रमाणे बाशाने यराबामच्या घराण्याचा समूळ नाश केला.+ ३० यराबामने स्वतः अनेक पापं केली होती आणि इस्राएललाही पाप करायला लावलं होतं. तसंच, त्याने इस्राएलचा देव यहोवा याचा क्रोध भडकवला होता; आणि म्हणून हे सगळं घडून आलं. ३१ नादाबविषयीची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. ३२ आसा आणि इस्राएलचा राजा बाशा यांच्यात सतत युद्ध होत राहिलं.+

३३ यहूदाचा राजा आसा याच्या शासनकाळाच्या तिसऱ्‍या वर्षी अहीयाचा मुलगा बाशा, तिरसा इथे इस्राएलचा राजा बनला आणि त्याने २४ वर्षं इस्राएलवर राज्य केलं.+ ३४ पण यहोवाच्या नजरेत जे वाईट ते तो करत राहिला.+ तो यराबामच्या मार्गाने चालत राहिला, आणि यराबामने इस्राएलला जे पाप करायला लावलं होतं, तेच पाप त्यानेही केलं.+

१६ मग हनानीचा+ मुलगा येहू+ याला यहोवाकडून बाशाविरुद्ध असा न्यायाचा संदेश मिळाला: २ “मी तुला धुळीतून उचलून माझ्या इस्राएली लोकांचा पुढारी बनवलं.+ पण तू मात्र यराबामच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत राहिलास. तू माझ्या इस्राएली लोकांना पाप करायला लावलंस आणि त्यांनी केलेल्या पापांमुळे माझा क्रोध भडकला.+ ३ म्हणून मी बाशाचा आणि त्याच्या घराण्याचा समूळ नाश करणार आहे. नबाटचा मुलगा यराबाम याच्या घराण्याच्या बाबतीत मी जे केलं,+ तेच बाशाच्या घराण्याचंही करीन. ४ बाशाच्या घराण्यातला जो कोणी शहरात मरेल, त्याला कुत्री खाऊन टाकतील; आणि त्याच्या घराण्यातला जो कोणी मैदानावर मरेल, त्याला आकाशातले पक्षी खाऊन टाकतील.”

५ बाशाबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याची पराक्रमाची कामं आणि त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. ६ मग बाशाचा मृत्यू झाला* आणि त्याला तिरसा+ या ठिकाणी दफन करण्यात आलं. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा एलाह त्याच्या जागी राजा बनला. ७ यराबामच्या घराण्याप्रमाणेच बाशाने यहोवाच्या नजरेत अनेक वाईट कामं केली आणि आपल्या कृत्यांमुळे त्याचा क्रोध भडकवला. तसंच, त्याने नादाबला ठारही मारलं.+ या दोन गोष्टींमुळे यहोवाने हनानीचा मुलगा येहू याला बाशाविरुद्ध न्यायाचा संदेश दिला.

८ यहूदाचा राजा आसा याच्या शासनकाळाच्या २६ व्या वर्षी बाशाचा मुलगा एलाह हा तिरसा इथे इस्राएलचा राजा बनला. आणि त्याने दोन वर्षं राज्य केलं. ९ मग एलाहच्या रथांच्या अर्ध्या दलाचा अधिकारी असलेला त्याचा सेवक जिम्री याने त्याच्याविरुद्ध कट रचला. त्या वेळी एलाह हा तिरसा या ठिकाणी, आपल्या राजमहालाची व्यवस्था पाहणाऱ्‍या अरसाच्या घरी दारू पिऊन धुंद झाला होता. १० तेव्हा जिम्री आत आला आणि त्याने त्याच्यावर वार करून त्याला ठार मारलं.+ मग तो त्याच्या जागी राजा बनला. यहूदाचा राजा आसा याच्या शासनकाळाच्या २७ व्या वर्षी हे घडलं. ११ राजासनावर बसून राज्य सुरू करताच त्याने बाशाच्या घराण्यातल्या सगळ्यांना मारून टाकलं; त्याच्या नातेवाइकांपैकी* किंवा मित्रांपैकी एकही पुरुष किंवा मुलगा त्याने जिवंत सोडला नाही. १२ अशा प्रकारे जिम्रीने बाशाच्या घराण्याचा समूळ नाश केला. येहू संदेष्ट्याद्वारे यहोवाने बाशाबद्दल जसं सांगितलं होतं तसंच घडलं.+ १३ बाशा आणि त्याचा मुलगा एलाह यांनी अनेक वाईट कामं केली होती. तसंच त्यांनी इस्राएली लोकांनाही वाईट कामं करायला लावली होती; त्यांना आपल्या निरर्थक मूर्तींची उपासना करायला लावून त्यांनी इस्राएलचा देव यहोवा याचा क्रोध भडकवला होता.+ आणि यामुळे हे सगळं घडलं. १४ एलाहबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.

१५ यहूदाचा राजा आसा याच्या शासनकाळाच्या २७ व्या वर्षी जिम्री हा सात दिवसांसाठी तिरसा इथे राजा बनला. त्या वेळी इस्राएलच्या सैनिकांनी पलिष्टी लोकांच्या गिब्बथोन+ शहरावर हल्ला करण्यासाठी तिथे छावणी दिली होती. १६ जिम्रीने कट करून राजाला ठार मारलं आहे, ही गोष्ट छावणीतल्या सैनिकांनी ऐकली. म्हणून त्या दिवशी सर्व इस्राएलने राजाच्या सेनापतीला, म्हणजे अम्रीला+ छावणीतच इस्राएलचा राजा बनवलं. १७ मग अम्री आणि त्याच्यासोबत असलेले सर्व इस्राएली सैनिक गिब्बथोन इथून निघाले आणि त्यांनी जाऊन तिरसा शहराला वेढा घातला. १८ शहरावर कब्जा करण्यात आला आहे हे जेव्हा जिम्रीने पाहिलं, तेव्हा तो राजमहालाच्या मनोऱ्‍यात* गेला आणि राजमहालाला आग लावून तो स्वतः त्या आगीत जळून मेला.+ १९ जिम्रीने स्वतः केलेल्या पापांमुळे हे घडून आलं. त्याने, इस्राएलला पाप करायला लावणाऱ्‍या यराबामच्या मार्गाने चालून यहोवाच्या नजरेत जे वाईट होतं ते केलं.+ २० जिम्रीबद्दलची बाकीची माहिती आणि त्याने केलेला कट यांबद्दल इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.

२१ त्या वेळी इस्राएली लोकांमध्ये दोन गट पडले. एका गटातल्या लोकांना गीनथचा मुलगा तिब्नी याला राजा बनवायची इच्छा होती, म्हणून ते त्याच्या बाजूने झाले; तर दुसरा गट अम्रीच्या बाजूने झाला. २२ पण अम्रीच्या बाजूने असलेले लोक, गीनथचा मुलगा तिब्नी याच्या बाजूने असलेल्या लोकांपेक्षा वरचढ ठरले. त्यामुळे तिब्नी मेला आणि अम्री हा राजा बनला.

२३ यहूदाचा राजा आसा याच्या शासनकाळाच्या ३१ व्या वर्षी अम्री इस्राएलचा राजा बनला. त्याने १२ वर्षं राज्य केलं. तिरसा या ठिकाणी त्याने सहा वर्षं राज्य केलं. २४ त्याने दोन तालान्त* चांदी देऊन शेमेर याच्याकडून शोमरोनचा डोंगर विकत घेतला व त्यावर एक शहर बांधलं. आणि आपण बांधलेल्या या शहराला त्याने डोंगराचा मालक शेमेर याच्या नावावरून शोमरोन*+ असं नाव दिलं. २५ अम्री हा यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला. त्याने आपल्याआधी होऊन गेलेल्या सगळ्यांपेक्षा जास्त वाईट कामं केली.+ २६ तो नबाटचा मुलगा यराबाम याच्या मार्गांवर चालत राहिला. यराबामने इस्राएलला पाप करायला लावलं होतं; त्याने त्यांना निरर्थक मूर्तींची उपासना करायला लावून+ इस्राएलचा देव यहोवा याचा क्रोध भडकवला होता. २७ अम्रीबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पराक्रमाची कामं आणि त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. २८ मग अम्रीचा मृत्यू झाला* आणि त्याला शोमरोन इथे दफन करण्यात आलं. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अहाब+ त्याच्या जागी राजा बनला.

२९ यहूदाचा राजा आसा याच्या शासनकाळाच्या ३८ व्या वर्षी अम्रीचा मुलगा अहाब हा इस्राएलचा राजा बनला. त्याने शोमरोन+ इथून इस्राएलवर २२ वर्षं राज्य केलं. ३० यहोवाच्या नजरेत, अम्रीचा मुलगा अहाब हा त्याच्याआधी होऊन गेलेल्या सगळ्यांपेक्षा जास्त दुष्ट होता.+ ३१ तो नबाटचा मुलगा यराबाम याच्या पापी मार्गांवर चालत राहिला.+ आणि हेही कमी म्हणून की काय, त्याने सीदोनी+ लोकांचा राजा एथबाल याची मुलगी ईजबेल+ हिच्याशी लग्न केलं. आणि तो बआल दैवताची उपासना करू लागला+ व त्याच्या पाया पडू लागला. ३२ तसंच, त्याने शोमरोन इथे बांधलेल्या बआलच्या मंदिरात+ बआलसाठी एक वेदीसुद्धा तयार केली. ३३ याशिवाय अहाबने पूजेचा खांबही* उभा केला.+ अशा प्रकारे, अहाबने आपल्याआधी होऊन गेलेल्या इस्राएलच्या सर्व राजांपेक्षा जास्त वाईट कामं करून इस्राएलचा देव यहोवा याचा क्रोध भडकवला.

३४ अहाबच्या शासनकाळात बेथेलचा राहणारा हिएल याने यरीहो शहर पुन्हा बांधलं. त्याने शहराचा पाया घातला, तेव्हा त्याचा पहिला मुलगा अबीराम हा मेला; आणि त्याने शहराचे दरवाजे बसवले, तेव्हा त्याचा सर्वात लहान मुलगा सगूब हा मेला. यहोवाने नूनचा मुलगा यहोशवा याच्याद्वारे सांगितलं होतं अगदी तसंच घडलं.+

१७ गिलाद+ प्रदेशात, तिश्‍बी इथे राहणारा एलीया*+ हा अहाब राजाला म्हणाला: “मी ज्याची सेवा करतो* त्या इस्राएलच्या जिवंत देवाची, यहोवाची शपथ! जोपर्यंत मी सांगत नाही, तोपर्यंत येत्या काही वर्षांत पाऊस किंवा दव पडणार नाही!”+

२ मग एलीयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: ३ “इथून निघ आणि पूर्वेकडे जा. तिथे यार्देनच्या पूर्वेला असलेल्या करीथच्या खोऱ्‍यात लपून राहा. ४ तिथल्या झऱ्‍याचं पाणी तुला प्यायला मिळेल आणि तिथे मी कावळ्यांना तुला अन्‍न पुरवण्याची आज्ञा देईन.”+ ५ तेव्हा तो लगेच निघाला आणि यहोवाने सांगितलं होतं त्याप्रमाणे त्याने केलं; तो यार्देनच्या पूर्वेला असलेल्या करीथच्या खोऱ्‍यात जाऊन राहू लागला. ६ तिथे सकाळ-संध्याकाळ कावळे त्याला भाकर व मांस आणून द्यायचे आणि तो झऱ्‍याचं पाणी प्यायचा.+ ७ पण काही दिवसांनी झऱ्‍याचं पाणी आटलं,+ कारण देशात पाऊस पडत नव्हता.

८ मग यहोवाकडून त्याला असा संदेश मिळाला: ९ “ऊठ, आणि सीदोन देशातल्या सारफथ इथे जाऊन राहा. पाहा! तिथे मी एका विधवेला तुला अन्‍न पुरवण्याची आज्ञा देईन.”+ १० म्हणून तो निघाला आणि सारफथला गेला. तो शहराच्या दरवाजाजवळ पोहोचला, तेव्हा एक विधवा लाकडं गोळा करत असलेली त्याला दिसली. तो तिला हाक मारून म्हणाला: “कृपा करून मला प्यायला एक पेलाभर पाणी आण.”+ ११ ती पाणी आणायला जाऊ लागली, तेव्हा त्याने तिला हाक मारून म्हटलं: “कृपया माझ्यासाठी भाकरीचा एक तुकडाही घेऊन ये.” १२ त्यावर ती त्याला म्हणाली: “तुझ्या जिवंत देवाची, यहोवाची शपथ! माझ्याकडे एकही भाकर नाही; फक्‍त मोठ्या मडक्यात मूठभर पीठ आणि छोट्या कुपीत थोडंसं तेल आहे.+ आता मी काही लाकडं गोळा करून घरी जाईन. मग माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी काहीतरी खायला बनवीन. हे आमचं शेवटचं जेवण असेल, त्यानंतर आम्ही दोघं मरून जाऊ.”

१३ मग एलीया तिला म्हणाला: “घाबरू नकोस. जा आणि तू म्हणालीस तसं कर. पण त्याआधी तुझ्याजवळ जे काही आहे त्यातून माझ्यासाठी एक छोटी भाकर बनवून आण. मग त्यानंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलासाठी काहीतरी बनव. १४ कारण इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: ‘ज्या दिवसापर्यंत यहोवा जमिनीवर पाऊस पाडत नाही, त्या दिवसापर्यंत तुझ्याकडे असलेल्या मोठ्या मडक्यातलं पीठ आणि लहान मडक्यातलं तेल संपणार नाही.’”+ १५ म्हणून मग ती गेली आणि एलीयाने सांगितल्याप्रमाणे तिने केलं. आणि तिला, तिच्या कुटुंबाला आणि एलीयाला बऱ्‍याच दिवसांपर्यंत पुरेसं अन्‍न मिळत राहिलं.+ १६ यहोवाने एलीयाद्वारे सांगितलं होतं त्याप्रमाणे तिच्या मोठ्या मडक्यातलं पीठ आणि लहान मडक्यातलं तेल संपलं नाही.

१७ या गोष्टी घडल्यानंतर असं झालं, की त्या स्त्रीचा मुलगा आजारी पडला. आणि त्याचा आजार वाढून शेवटी तो मेला.+ १८ तेव्हा ती स्त्री एलीयाला म्हणाली: “हे खऱ्‍या देवाच्या माणसा! माझ्याशी तुमचं काय वैर? माझ्या पापांची आठवण करून द्यायला आणि माझ्या मुलाला मारून टाकायला तुम्ही आला आहात का?”+ १९ त्यावर तो तिला म्हणाला: “मुलाला माझ्याकडे दे.” मग त्याने त्या मुलाला आपल्या हातात घेतलं आणि त्याला उचलून छतावर असलेल्या आपल्या खोलीत नेलं. तिथे त्याने मुलाला आपल्या बिछान्यावर ठेवलं.+ २० मग यहोवाचा धावा करून तो म्हणाला: “हे माझ्या देवा यहोवा!+ ज्या विधवेच्या घरी मी राहतोय तिच्या मुलाला मारून तू तिच्यावरही संकट आणत आहेस का?” २१ मग मुलाच्या अंगावर तीन वेळा वाकून तो यहोवाचा धावा करत म्हणाला: “हे माझ्या देवा यहोवा! कृपा करून या मुलाचा जीव त्याच्यात परत येऊ दे.” २२ यहोवाने एलीयाची विनंती ऐकली+ आणि त्या मुलाचा जीव त्याच्यात परत आला व तो जिवंत झाला.+ २३ मग एलीयाने त्या मुलाला छतावरच्या खोलीतून खाली आणलं आणि त्याला आपल्या आईकडे देऊन तो म्हणाला: “पाहा! तुझा मुलगा जिवंत आहे!”+ २४ तेव्हा ती स्त्री एलीयाला म्हणाली: “आता माझी खातरी पटली आहे, की तुम्ही खरंच देवाचे माणूस आहात.+ आणि तुमच्या तोंडून निघणारं यहोवाचं वचन खरंय.”

१८ काही काळानंतर, म्हणजे तिसऱ्‍या वर्षी+ एलीयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: “अहाबकडे जा, कारण मी जमिनीवर पाऊस पाडणार आहे.”+ २ म्हणून मग एलीया अहाबकडे जायला निघाला. त्या वेळी शोमरोनमध्ये भयंकर दुष्काळ पडला होता.+

३ इकडे, अहाबने आपल्या राजमहालाची व्यवस्था पाहणाऱ्‍या ओबद्याला बोलावून घेतलं. (ओबद्या हा यहोवाला फार भिऊन वागायचा. ४ ज्या वेळी ईजबेल+ यहोवाच्या संदेष्ट्यांना मारून टाकत होती, त्या वेळी ओबद्याने एका गुहेत ५० आणि दुसऱ्‍या गुहेत ५० अशा १०० संदेष्ट्यांना लपवलं होतं आणि त्यांना अन्‍नपाणी पुरवलं होतं.) ५ मग अहाब ओबद्याला म्हणाला: “जा आणि संपूर्ण देशातले पाण्याचे झरे व ओढे पाहून ये. कदाचित आपल्या घोड्यांसाठी आणि खेचरांसाठी आपल्याला पुरेसं गवत मिळेल, म्हणजे आपली सगळीच जनावरं मरणार नाहीत.” ६ मग कोण कुठल्या प्रदेशातून जाईल हे ठरवून त्यांनी आपसात देश वाटून घेतला. अहाब एका मार्गाने गेला आणि ओबद्या दुसऱ्‍या मार्गाने गेला.

७ ओबद्या आपल्या मार्गाने जात असताना, एलीया त्याला भेटायला आला. ओबद्याने त्याला लगेच ओळखलं, आणि त्याला दंडवत घालून तो म्हणाला: “माझे प्रभू, तुम्ही एलीयाच आहात ना?”+ ८ त्यावर तो म्हणाला: “हो मीच आहे. जा आणि तुझ्या प्रभूला सांग: ‘एलीया आलाय!’” ९ पण ओबद्या त्याला म्हणाला: “मी असं काय पाप केलंय, म्हणून तुम्ही तुमच्या या सेवकाला अहाबच्या हाती मरायला देत आहात? १० तुमच्या जिवंत देवाची, यहोवाची शपथ! असं एकही राज्य किंवा देश नाही जिथे माझ्या प्रभूने तुम्हाला शोधायला माणसं पाठवली नव्हती. आणि ‘तो इथे नाही’ असं म्हणणाऱ्‍या राज्याला आणि देशाला त्यांनी अशी शपथ घ्यायला लावली, की ‘आम्हाला तो सापडत नाही.’+ ११ आणि आता तुम्ही म्हणत आहात: ‘जा आणि तुझ्या प्रभूला सांग: “एलीया आलाय!”’ १२ मी इथून गेल्यावर यहोवाची पवित्र शक्‍ती* तुम्हाला कोणत्या ठिकाणी घेऊन जाईल+ माहीत नाही. आणि मी जर अहाबला जाऊन सांगितलं आणि त्यांना तुम्ही सापडले नाहीत, तर ते नक्कीच माझा जीव घेतील. पण तुमचा हा सेवक तर लहानपणापासून यहोवाचं भय बाळगत आलाय. १३ ईजबेल यहोवाच्या संदेष्ट्यांना मारून टाकत होती, त्या काळात मी काय केलं हे माझ्या प्रभूच्या कानावर आलं नाही का? त्या वेळी मी कशा प्रकारे यहोवाच्या १०० संदेष्ट्यांना ५०-५० च्या गटांत गुहांमध्ये लपवलं आणि त्यांना अन्‍नपाणी पुरवत राहिलो हे तुम्ही ऐकलं नाही का?+ १४ आणि आता तुम्ही म्हणत आहात, की ‘जा आणि तुझ्या प्रभूला सांग: “एलीया आलाय!”’ ते तर नक्कीच मला मारून टाकतील.” १५ पण एलीया म्हणाला: “ज्या जिवंत देवाची मी सेवा करतो,* त्या सैन्यांच्या देवाची, यहोवाची शपथ! आज मी नक्कीच त्याला जाऊन भेटेन.”

१६ म्हणून मग ओबद्या अहाबकडे गेला आणि त्याने ही गोष्ट त्याला सांगितली. तेव्हा अहाब एलीयाला भेटायला निघाला.

१७ एलीयाला पाहताच अहाब म्हणाला: “तूच ना तो, इस्राएलवर भयंकर संकट आणणारा?”

१८ त्यावर तो म्हणाला: “इस्राएलवर संकट आणणारा मी नाही, तर तू आणि तुझ्या वडिलांचं घराणं आहे. कारण तुम्ही यहोवाच्या आज्ञा पाळण्याचं सोडून दिलं आणि बआल दैवतांच्या मागे लागलात.+ १९ आता सर्व इस्राएलला कर्मेल डोंगरावर+ माझ्याकडे बोलव. शिवाय, ईजबेलच्या मेजावर जेवणाऱ्‍या बआलच्या ४५० संदेष्ट्यांना आणि पूजेच्या खांबाची*+ उपासना करणाऱ्‍या ४०० संदेष्ट्यांनाही बोलावून घे.” २० म्हणून अहाबने सर्व इस्राएली लोकांना तसा निरोप पाठवला आणि संदेष्ट्यांना कर्मेल डोंगरावर जमा केलं.

२१ मग एलीया सगळ्या लोकांकडे येऊन म्हणाला: “तुम्ही आणखी किती दिवस दोन मतांमध्ये डगमगत राहणार?*+ जर यहोवा खरा देव असेल, तर त्याची उपासना करा;+ पण जर बआल खरा देव असेल, तर त्याच्यामागे जा!” त्यावर लोकांनी त्याला एका शब्दानेही उत्तर दिलं नाही. २२ एलीया मग त्या लोकांना म्हणाला: “यहोवाच्या संदेष्ट्यांपैकी मी एकटाच उरलो आहे.+ पण बआल दैवताचे ४५० संदेष्टे आहेत. २३ आता आम्हाला दोन गोऱ्‍हे* द्या. त्यांपैकी बआलच्या संदेष्ट्यांनी हवा तो गोऱ्‍हा निवडून घ्यावा आणि त्याचे तुकडे करून ते लाकडांवर ठेवावेत; पण त्यांनी त्याला अग्नी लावू नये. मग मी दुसरा गोऱ्‍हा तयार करून लाकडांवर ठेवीन; पण त्याला अग्नी लावणार नाही. २४ मग तुम्ही तुमच्या देवाचं नाव घेऊन त्याचा धावा करा,+ आणि मी यहोवाचं नाव घेऊन त्याचा धावा करीन. मग जो देव अग्नी पाठवून उत्तर देईल, तो दाखवून देईल की तोच खरा देव आहे.”+ त्यावर सगळे लोक त्याला म्हणाले: “ठीक आहे.”

२५ एलीया मग बआलच्या संदेष्ट्यांना म्हणाला: “तुम्ही संख्येने जास्त आहात. म्हणून आधी तुम्ही गोऱ्‍हा निवडून तयार करा. मग तुमच्या देवाच्या नावाचा धावा करा; पण बलिदानाला अग्नी लावू नका.” २६ म्हणून त्यांनी एक गोऱ्‍हा निवडला आणि तो तयार केला. मग सकाळपासून अगदी दुपारपर्यंत बआलच्या नावाचा धावा करत ते असं म्हणत राहिले: “हे बआल! आमचं ऐक!” पण कोणताही आवाज आला नाही, किंवा कोणीही उत्तर दिलं नाही.+ त्यांनी जी वेदी बांधली होती तिच्याभोवती ते उड्या मारत राहिले व नाचत राहिले. २७ मग दुपारच्या वेळी एलीया त्यांची थट्टा करत म्हणू लागला: “आणखी मोठ्याने ओरडून त्याचा धावा करा! देव आहे ना तो!+ कदाचित तो विचारांत मग्न असेल, किंवा शौचाला गेला असेल.* किंवा मग तो गाढ झोपेत असेल; कोणीतरी त्याला जागं केलं पाहिजे!” २८ ते मोठमोठ्याने ओरडून धावा करत होते आणि आपल्या प्रथेप्रमाणे अंगावर खंजिरांनी आणि भाल्यांनी वार करून घेत होते; रक्‍तबंबाळ होईपर्यंत ते असं करत राहिले. २९ दुपार टळून संध्याकाळी अन्‍नार्पणाची वेळ झाली, तरी ते वेड्यासारखं वागत राहिले.* पण कोणताही आवाज आला नाही, किंवा कोणीही उत्तर दिलं नाही; त्यांच्याकडे लक्ष देणारा कोणीही नव्हता.+

३० मग एलीया सर्व लोकांना म्हणाला: “माझ्याकडे या.” म्हणून सगळे लोक त्याच्याकडे गेले. मग यहोवाची जी वेदी पाडण्यात आली होती ती त्याने दुरुस्त केली.+ ३१ आणि, “तुझं नाव इस्राएल असेल” असं यहोवाने ज्याला वचन दिलं होतं,+ त्या याकोबच्या मुलांच्या वंशांच्या संख्येप्रमाणे एलीयाने १२ दगड घेतले. ३२ त्या दगडांपासून त्याने यहोवाच्या नावाचा गौरव करण्यासाठी एक वेदी बांधली.+ मग त्या वेदीभोवती त्याने एक मोठा खड्डा खोदला; दोन सेया मापं* बियांची पेरणी करायला जमिनीचा जितका तुकडा लागतो, तितका मोठा तो खड्डा होता. ३३ त्यानंतर त्याने वेदीवर लाकडं रचली. मग गोऱ्‍हा कापून त्याचे तुकडे लाकडांवर ठेवले.+ नंतर तो म्हणाला: “चार मोठी मडकी भरून पाणी आणा, आणि ते होमार्पणावर आणि लाकडांवर ओता.” ३४ मग तो म्हणाला: “पुन्हा तसंच करा.” तेव्हा त्यांनी तसंच केलं. तो परत त्यांना म्हणाला: “आता तिसऱ्‍यांदा तसंच करा.” म्हणून तिसऱ्‍यांदाही त्यांनी तसंच केलं. ३५ तेव्हा ते पाणी वेदीच्या चारही बाजूंनी वाहू लागलं; शिवाय त्याने तो खड्डाही पाण्याने भरून घेतला.

३६ मग संध्याकाळी अन्‍नार्पण वाहण्याची वेळ झाली,+ तेव्हा एलीया संदेष्टा पुढे आला आणि म्हणाला: “हे यहोवा! अब्राहाम,+ इसहाक आणि इस्राएलच्या देवा!+ आज दाखवून दे की इस्राएलमध्ये तूच देव आहेस; आणि मी तुझा सेवक आहे व तुझ्या सांगण्यावरूनच मी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत.+ ३७ हे यहोवा! माझं ऐक, मला उत्तर दे! म्हणजे हे यहोवा, तूच खरा देव आहेस आणि तूच या लोकांची मनं आपल्याकडे वळवत आहेस हे या लोकांना कळेल.”+

३८ तेव्हा यहोवाकडून अग्नी उतरला आणि त्याने होमार्पण, लाकडं, दगड व माती भस्म केली+ आणि खड्ड्यातलं पाणीही आटवून टाकलं.+ ३९ सगळ्या लोकांनी हे पाहिलं, तेव्हा त्यांनी लगेच जमिनीवर पडून दंडवत घातला आणि ते म्हणाले: “यहोवाच खरा देव आहे! यहोवाच खरा देव आहे!” ४० मग एलीया त्यांना म्हणाला: “पकडा बआलच्या संदेष्ट्यांना! त्यांच्यापैकी एकालाही निसटून जाऊ देऊ नका!” तेव्हा त्यांनी लगेच त्यांना पकडलं. एलीयाने मग त्यांना कीशोनच्या ओढ्याजवळ+ आणून त्यांची कत्तल केली.+

४१ नंतर एलीया अहाबला म्हणाला: “वरती जा आणि खाणंपिणं कर, कारण मुसळधार पावसाचा आवाज ऐकू येतोय.”+ ४२ म्हणून अहाब खाणंपिणं करायला वरती गेला. इकडे, एलीया कर्मेल डोंगराच्या माथ्यावर गेला. तिथे तो गुडघ्यांवर बसला आणि त्याने आपलं डोकं गुडघ्यांजवळ नेलं.+ ४३ मग तो आपल्या सेवकाला म्हणाला: “वरती जा, आणि समुद्राकडे नजर टाक.” म्हणून त्याने वरती जाऊन पाहिलं आणि तो म्हणाला: “तिथे काहीच दिसत नाही.” एलीयाने त्याला सात वेळा म्हटलं: “परत जाऊन बघ.” ४४ सातव्या वेळी त्याचा सेवक त्याला म्हणाला: “पाहा! माणसाच्या हाताएवढा लहानसा ढग समुद्रातून वर येताना दिसतोय.” त्यावर एलीया म्हणाला: “जा आणि अहाबला सांग, ‘रथ जोडून खाली जा! नाहीतर मुसळधार पावसामुळे तू अडकून राहशील!’” ४५ यादरम्यान आकाशात काळे ढग जमले, वारा सुटला व जोरदार पाऊस पडू लागला;+ आणि अहाब रथात बसून इज्रेलला+ जाऊ लागला. ४६ पण यहोवाने एलीयाला शक्‍ती दिली, तेव्हा एलीया आपला झगा कमरेला बांधून इतक्या वेगाने धावू लागला, की तो अहाबच्या पुढे निघून इज्रेलपर्यंत गेला.

१९ एलीयाने जे काही केलं आणि त्याने कसं सगळ्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकलं+ ते सर्व अहाबने+ ईजबेलला+ सांगितलं. २ तेव्हा ईजबेलने एका दूताच्या हातून एलीयाला असा संदेश पाठवला: “उद्या जर या वेळेपर्यंत मी त्या संदेष्ट्यांसारखीच तुझी दशा केली नाही, तर माझे देव मला कठोरातली कठोर शिक्षा करोत!” ३ हे ऐकून एलीया फार घाबरला, आणि आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळून गेला.+ तो यहूदातल्या+ बैर-शेबा+ इथे आला आणि तिथे त्याने आपल्या सेवकाला सोडलं. ४ मग तो ओसाड रानात एक दिवसाचा प्रवास करून गेला आणि एका झाडाखाली जाऊन बसला. आपल्याला मरण यावं अशी विनंती तो करू लागला. तो म्हणाला: “हे यहोवा, पुरे झालं! आता माझा जीव घेऊन टाक,+ कारण मी काही माझ्या पूर्वजांपेक्षा चांगला नाही.”

५ मग त्या झाडाखाली अंग टाकून तो गाढ झोपला. पण अचानक एक स्वर्गदूत त्याला स्पर्श करून+ म्हणाला: “ऊठ, थोडं खाऊन घे.”+ ६ त्याने पाहिलं तेव्हा त्याला आपल्या उशाजवळ तापलेल्या दगडांवर ठेवलेली एक भाकर आणि जवळच पाण्याने भरलेली एक सुरई दिसली. ७ नंतर यहोवाचा स्वर्गदूत दुसऱ्‍यांदा त्याच्याकडे आला आणि त्याला स्पर्श करून म्हणाला: “ऊठ आणि थोडं खाऊन घे. कारण तुला जो प्रवास करायचाय तो तुझ्यासाठी फार कठीण असणार आहे.” ८ म्हणून मग तो उठला आणि त्याने खाऊनपिऊन घेतलं. आणि त्या अन्‍नातून मिळालेल्या शक्‍तीच्या जोरावर त्याने ४० दिवस व ४० रात्री प्रवास केला. शेवटी तो खऱ्‍या देवाच्या पर्वताजवळ, म्हणजे होरेब पर्वताजवळ पोहोचला.+

९ तिथे त्याने एका गुहेत+ रात्र काढली. तेव्हा पाहा! यहोवाकडून त्याला संदेश मिळाला. तो म्हणाला: “एलीया, तू इथे काय करतोस?” १० त्यावर एलीया म्हणाला: “मी सैन्यांचा देव यहोवा याची अतिशय आवेशाने सेवा करत आलोय.+ इस्राएलच्या लोकांनी तुझा करार पाळायचं सोडून दिलंय.+ त्यांनी तुझ्या वेदी पाडून टाकल्या आहेत आणि तुझ्या संदेष्ट्यांनाही तलवारीने मारून टाकलंय.+ मी एकटाच उरलोय. आणि आता ते माझाही जीव घ्यायचा प्रयत्न करत आहेत.”+ ११ पण तो म्हणाला: “बाहेर जा आणि यहोवासमोर पर्वतावर उभा राहा.” तेव्हा पाहा! यहोवा तिथून जात असताना,+ जोरदार सोसाट्याच्या वाऱ्‍याने पर्वतांना तडे गेले आणि यहोवासमोर खडक फुटले.+ पण त्या वाऱ्‍यामध्ये यहोवा नव्हता. वाऱ्‍यानंतर भूकंप झाला,+ पण त्या भूकंपात यहोवा नव्हता. १२ भूकंपानंतर अग्नी आला,+ पण त्या अग्नीतही यहोवा नव्हता. मग अग्नीनंतर एक शांत व मंद वाणी ऐकू आली.+ १३ ती वाणी ऐकताच एलीयाने आपलं तोंड झग्याने* झाकून घेतलं+ आणि बाहेर येऊन तो गुहेच्या तोंडाजवळ उभा राहिला. मग त्या वाणीने त्याला विचारलं: “एलीया, तू इथे काय करतोस?” १४ त्यावर तो म्हणाला: “मी सैन्यांचा देव यहोवा याची अतिशय आवेशाने सेवा करत आलोय. इस्राएलच्या लोकांनी तुझा करार पाळायचं सोडून दिलंय.+ त्यांनी तुझ्या वेदी पाडून टाकल्या आहेत आणि तुझ्या संदेष्ट्यांनाही तलवारीने मारून टाकलंय. मी एकटाच उरलोय. आणि आता ते माझाही जीव घ्यायचा प्रयत्न करत आहेत.”+

१५ यहोवा त्याला म्हणाला: “दिमिष्कच्या ओसाड रानात परत जा. तिथे पोहोचल्यावर हजाएलला+ सीरियाचा राजा म्हणून अभिषिक्‍त कर. १६ आणि निमशीचा नातू येहू याला इस्राएलचा राजा म्हणून अभिषिक्‍त कर.+ तसंच, आबेल-महोला इथे राहणारा शाफाटचा मुलगा अलीशा* याला तुझ्या जागी संदेष्टा म्हणून अभिषिक्‍त कर.+ १७ जो कोणी हजाएलच्या तलवारीपासून निसटेल,+ त्याला येहू ठार मारेल;+ आणि जो कोणी येहूच्या तलवारीपासून निसटेल, त्याला अलीशा ठार मारेल.+ १८ आणि पाहा! इस्राएलमध्ये अजूनही अशी ७,००० माणसं आहेत,+ ज्यांनी बआलपुढे गुडघे टेकले नाहीत+ किंवा त्याचं चुंबन घेतलं नाही.”+

१९ त्यानंतर एलीया तिथून निघाला. त्याला शाफाटचा मुलगा अलीशा हा बैलांच्या १२ जोड्या घेऊन नांगरणी करताना दिसला; अलीशा बैलांच्या १२ व्या जोडीमागे होता. मग एलीया त्याच्याजवळ गेला आणि त्याने आपला झगा+ त्याच्यावर टाकला. २० तेव्हा तो बैलांना सोडून एलीयाच्या मागे धावत गेला आणि म्हणाला: “कृपा करून मला माझ्या आईवडिलांचा मुका घेऊन त्यांचा निरोप घेऊ द्या. त्यानंतर मी तुमच्यासोबत येईन.” तेव्हा एलीया त्याला म्हणाला: “जा, मी तुला थांबवणार नाही.” २१ म्हणून मग अलीशा गेला आणि बैलांची एक जोडी घेऊन त्याने त्यांचं बलिदान दिलं. नंतर त्याने नांगरणी करायची लाकडी अवजारं जाळून त्यांवर बैलांचं मांस शिजवलं आणि ते लोकांना खायला दिलं. मग तिथून निघून तो एलीयाच्या मागे गेला आणि त्याची सेवा करू लागला.+

२० सीरियाचा+ राजा बेन-हदाद+ याने आपलं सगळं सैन्य एकत्र जमवलं. याशिवाय, त्याने इतर ३२ राजे आणि त्यांचे घोडे व रथ सोबत घेतले. आणि शोमरोनविरुद्ध+ लढाई करण्यासाठी त्याने त्या शहराला वेढा घातला.+ २ मग त्याने आपल्या दूतांच्या हातून इस्राएलचा राजा अहाब+ याला शहरात असा निरोप पाठवला: “बेन-हदाद असं म्हणतो, की ३ ‘तुझं सोनं-चांदी आणि तुझ्या सगळ्यात सुंदर बायका व देखणी मुलं माझी आहेत.’” ४ त्यावर इस्राएलचा राजा त्याला म्हणाला: “हे राजा, माझ्या प्रभू, तुम्ही म्हणता तसं मी आणि माझं सर्वकाही तुमचंच आहे.”+

५ नंतर ते दूत परत अहाब राजाकडे आले आणि म्हणाले: “बेन-हदाद असं म्हणतो: ‘मी तुला असा निरोप पाठवला होता, की “तू तुझं सोनं-चांदी आणि तुझ्या बायका-मुलं माझ्या हवाली कर.” ६ आता उद्या याच वेळी माझे सेवक तुझ्याकडे येतील आणि तुझ्या महालाची आणि तुझ्या अधिकाऱ्‍यांच्या घरांची झडती घेतील. आणि तुझ्या सगळ्या मौल्यवान गोष्टी ते लुटून नेतील.’”

७ तेव्हा इस्राएलच्या राजाने देशातल्या सगळ्या वडीलजनांना बोलावून घेतलं आणि तो त्यांना म्हणाला: “पाहा! हा माणूस आपल्यावर कसं संकट आणायचा प्रयत्न करतोय! त्याने माझ्या बायका-मुलं आणि माझं सोनं-चांदी मागितलं, आणि मी त्याला नाही म्हणालो नाही.” ८ तेव्हा सर्व वडीलजन आणि सर्व लोक त्याला म्हणाले: “त्याचं ऐकू नका, त्याची मागणीही मान्य करू नका.” ९ म्हणून मग अहाब राजा बेन-हदादच्या दूतांना म्हणाला: “जा आणि राजाला, माझ्या प्रभूला असं सांगा: ‘तुमच्या या सेवकाकडे तुम्ही आधी जी मागणी केली होती, ती मी मान्य करीन. पण आता तुम्ही जी मागणी करत आहात ती मी पूर्ण करू शकणार नाही.’” तेव्हा ते दूत गेले आणि त्यांनी बेन-हदादला हा निरोप कळवला.

१० बेन-हदादने मग त्याला असा संदेश पाठवला: “मी शोमरोनचा असा नाश करीन, की माझ्या अफाट सैन्यातल्या प्रत्येकाला द्यायला तिथे मूठभर धूळसुद्धा उरणार नाही! आणि मी जर तसं केलं नाही, तर माझे देव मला कठोरातली कठोर शिक्षा करोत!” ११ त्यावर इस्राएलच्या राजाने त्याला असं उत्तर दिलं: “त्याला जाऊन सांगा, ‘युद्ध सुरू होण्याआधीच तू युद्ध जिंकलास अशी बढाई मारू नकोस.’”+ १२ बेन-हदादला हा संदेश मिळाला त्या वेळी तो आणि इतर राजे आपल्या तंबूंमध्ये दारू पीत बसले होते. संदेश ऐकताच, बेन-हदाद आपल्या सेवकांना म्हणाला: “हल्ला करायला तयार व्हा!” तेव्हा ते सगळे शहरावर हल्ला करायला तयार झाले.

१३ इकडे, एक संदेष्टा इस्राएलचा राजा अहाब+ याच्याकडे आला आणि म्हणाला: “यहोवा असं म्हणतो, ‘तू हे अफाट सैन्य पाहत आहेस ना? आज मी ते तुझ्या हाती देईन. मग तुला कळून येईल की मी यहोवा आहे.’”+ १४ त्यावर अहाबने विचारलं: “कोणाच्या हातून?” तेव्हा तो संदेष्टा म्हणाला: “‘तुझ्या राज्यपालांच्या सहायकांच्या हातून,’ असं यहोवा म्हणतो.” मग त्याने विचारलं: “युद्ध कोण सुरू करेल?” त्यावर तो म्हणाला: “तू.”

१५ अहाबने मग राज्यपालांच्या सहायकांची संख्या मोजली; त्यांची संख्या २३२ इतकी होती. त्यानंतर, त्याने सर्व इस्राएली सैनिकांची संख्या मोजली; त्यांची संख्या ७,००० इतकी होती. १६ ते सगळे हल्ला करायला दुपारच्या वेळी बाहेर पडले. त्या वेळी बेन-हदाद आणि त्याला मदत करायला आलेले ३२ राजे तंबूंमध्ये दारू पिऊन धुंद झाले होते. १७ लढाई करण्यासाठी सगळ्यात आधी राज्यपालांचे सहायक बाहेर आले. तेव्हा काय घडत आहे हे पाहण्यासाठी बेन-हदादने लगेच आपल्या दूतांना पाठवलं. दूतांनी परत येऊन त्याला अशी खबर दिली: “शोमरोनातून माणसं बाहेर आली आहेत.” १८ त्यावर बेन-हदाद म्हणाला: “ते जर शांती-सलोखा करायला बाहेर आले असतील, तर त्यांना जिवंत पकडा; आणि ते जर लढाई करायला बाहेर आले असतील, तरी त्यांना जिवंतच पकडा.” १९ पण राज्यपालांचे सहायक आणि त्यांच्यामागे सर्व सैनिक जेव्हा शहराबाहेर पडले, २० तेव्हा त्यांच्यातल्या प्रत्येकाने आपल्या शत्रूंना ठार मारलं. मग सीरियाच्या सैनिकांनी पळ काढला+ आणि इस्राएली सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला. पण सीरियाचा राजा बेन-हदाद घोड्यावर स्वार होऊन काही घोडेस्वारांसोबत तिथून निसटला. २१ नंतर इस्राएलचा राजाही बाहेर पडला. त्याने घोड्यांवर व रथांवर स्वार असलेल्या लोकांना ठार मारून सीरियाच्या सैनिकांवर मोठा विजय मिळवला.*

२२ नंतर तो संदेष्टा+ पुन्हा इस्राएलच्या राजाकडे आला आणि म्हणाला: “पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला* सीरियाचा राजा पुन्हा तुझ्यावर हल्ला करायला येईल.+ म्हणून जा आणि आपलं सैन्य मजबूत कर आणि तू काय करणार आहेस याचा चांगला विचार कर.”+

२३ सीरियाच्या राजाचे सेवक त्याला म्हणाले: “त्यांचा देव हा पर्वतांवरचा देव आहे, म्हणूनच ते आपल्याला हरवू शकले. पण आपण जर मैदानावर त्यांच्याशी लढलो, तर आपण नक्कीच त्यांना हरवू. २४ शिवाय असंही करा: सगळ्या राजांना त्यांच्या पदावरून काढून टाका+ आणि त्यांच्या जागी राज्यपालांना नेमा. २५ आणि तुम्ही जितकं सैन्य गमावलं तितकंच सैन्य परत जमा करा; म्हणजे तुम्ही जितके घोडे आणि रथ गमावले तितकेच परत जमा करा. त्यानंतर आपण मैदानावर त्यांच्याशी लढाई करू, म्हणजे मग नक्कीच आपला विजय होईल.” तेव्हा बेन-हदाद राजाने त्यांचा सल्ला ऐकला आणि त्याप्रमाणे केलं.

२६ मग वर्षाच्या सुरुवातीला* बेन-हदादने सीरियाचं सैन्य जमवलं आणि तो इस्राएलशी लढाई करायला अफेक+ इथे गेला. २७ इकडे, इस्राएली लोकांनीसुद्धा आपलं सैन्य जमवून त्यांना सर्व आवश्‍यक गोष्टी पुरवल्या, आणि ते शत्रूचा सामना करण्यासाठी निघाले. त्यांनी जाऊन सीरियाच्या सैन्यासमोर छावणी दिली. सीरियाचे सैनिक इतके जास्त होते, की सगळा प्रदेश त्यांनी भरून गेला होता.+ त्यांच्यासमोर इस्राएली सैनिक, बकऱ्‍यांच्या दोन छोट्या कळपांसारखे अगदी लहान वाटत होते. २८ मग खऱ्‍या देवाचा माणूस इस्राएलच्या राजाकडे आला आणि म्हणाला: “यहोवा असं म्हणतो, की ‘सीरियाच्या लोकांनी असं म्हटलंय: “यहोवा मैदानांवरचा देव नाही, तर पर्वतांवरचा देव आहे.” म्हणून मी हे सर्व अफाट सैन्य तुझ्या हाती देईन.+ म्हणजे तुला नक्की कळून येईल, की मी यहोवा आहे.’”+

२९ ते सात दिवस एकमेकांसमोर छावणी देऊन होते. मग सातव्या दिवशी लढाई सुरू झाली. इस्राएली सैनिकांनी एका दिवसात सीरियाच्या १,००,००० पायदळ सैनिकांना ठार मारलं. ३० बाकीचे सैनिक अफेक+ शहरात पळून गेले. पण उरलेल्या २७,००० सैनिकांवर शहराची भिंत कोसळून पडली. बेन-हदादसुद्धा शहरात पळून गेला आणि एका घरात आतल्या खोलीत जाऊन लपला.

३१ मग बेन-हदादचे सेवक त्याला म्हणाले: “आम्ही असं ऐकलंय, की इस्राएलच्या घराण्यातले राजे फार दयाळू* आहेत. म्हणून आम्हाला परवानगी द्या, म्हणजे आम्ही कमरेला गोणपाट गुंडाळून आणि डोक्याला दोर बांधून इस्राएलच्या राजाकडे जाऊ. कदाचित तो तुम्हाला जिवंत सोडेल.”+ ३२ म्हणून मग त्यांनी कमरेला गोणपाटं गुंडाळली व डोक्याला दोर बांधले आणि ते इस्राएलच्या राजाकडे येऊन म्हणाले: “तुमचा सेवक बेन-हदाद असं म्हणतो, ‘कृपा करून माझा जीव घेऊ नकोस.’” त्यावर अहाब राजा म्हणाला: “तो अजून जिवंत आहे का? तो तर माझा भाऊ आहे.” ३३ हा शुभ-शकुन आहे असं समजून बेन-हदादच्या माणसांनी त्याच्या शब्दांवर विश्‍वास ठेवला आणि ते म्हणाले: “हो, बेन-हदाद तुमचा भाऊ आहे.” त्यावर तो त्यांना म्हणाला: “जा आणि त्याला घेऊन या.” बेन-हदाद त्याला भेटायला आला, तेव्हा त्याने त्याला आपल्या रथात घेतलं.

३४ मग बेन-हदाद त्याला म्हणाला: “माझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांकडून घेतलेली शहरं मी तुला परत देईन. आणि माझ्या वडिलांनी शोमरोनात जशा बाजारपेठा बनवल्या होत्या,* तशा तूही दिमिष्कमध्ये बनव.”

त्यावर अहाब म्हणाला: “ठीक आहे, या करारामुळे मी तुला जाऊ देईन.”

तेव्हा त्याने त्याच्याशी करार केला आणि त्याला जाऊ दिलं.

३५ मग संदेष्ट्यांच्या पुत्रांपैकी*+ एकाने यहोवाच्या आज्ञेवरून आपल्या सोबत्याला म्हटलं: “कृपा करून, मला मार.” पण त्या माणसाने त्याला मारायला नकार दिला. ३६ तेव्हा तो त्याला म्हणाला: “तू यहोवाचं ऐकलं नाहीस. म्हणून जेव्हा तू इथून जाशील तेव्हा लगेच एक सिंह तुला मारून टाकेल.” मग तो तिथून निघाला आणि एका सिंहाने त्या माणसावर हल्ला करून त्याला मारून टाकलं.

३७ मग तो दुसऱ्‍या एका माणसाला भेटला आणि त्याला म्हणाला: “कृपा करून, मला मार.” तेव्हा त्या माणसाने त्याला मारलं आणि जखमी केलं.

३८ मग तो संदेष्टा रस्त्याच्या कडेला जाऊन राजाची वाट पाहत उभा राहिला. आपली ओळख लपवण्यासाठी त्याने डोळ्यांवर पट्टी बांधली होती. ३९ राजा तिथून जात असताना तो त्याला मोठ्याने हाक मारून म्हणाला: “तुमचा हा सेवक युद्धात गेला होता. युद्ध सुरू असताना एक माणूस युद्धातून मागे आला. तो आपल्यासोबत एका कैद्याला घेऊन आला आणि मला म्हणाला: ‘याच्यावर लक्ष ठेव. हा जर पळून गेला तर याच्या बदल्यात तुझा जीव घेण्यात येईल,+ किंवा भरपाई म्हणून तुला एक तालान्त* चांदी द्यावी लागेल.’ ४० मग तुमचा हा सेवक काही कामात गुंतलेला असताना, तो कैदी अचानक निसटून गेला.” त्यावर इस्राएलचा राजा त्याला म्हणाला: “तुला ती शिक्षा मिळालीच पाहिजे. तू स्वतःच स्वतःचा न्याय केलाय.” ४१ तेव्हा त्याने लगेच आपल्या डोळ्यांवरची पट्टी काढली आणि इस्राएलच्या राजाने ओळखलं, की तो संदेष्ट्यांपैकी एक आहे.+ ४२ तो राजाला म्हणाला: “यहोवा असं म्हणतो: ‘मी तुला ज्या माणसाला मारून टाकायला सांगितलं होतं, त्या माणसाला तू तुझ्या हातून निसटून जाऊ दिलंस.+ म्हणून आता त्याच्या बदल्यात तुझा जीव घेतला जाईल,+ आणि त्याच्या लोकांच्या बदल्यात तुझ्या लोकांचा नाश केला जाईल.’”+ ४३ हे ऐकून इस्राएलच्या राजाचं तोंड उतरलं आणि तो निराश होऊन शोमरोनमध्ये+ आपल्या महालात गेला.

२१ या गोष्टी झाल्यानंतर इज्रेलमध्ये राहणारा नाबोथ याच्या द्राक्षमळ्याबद्दल एक घटना घडली. नाबोथचा द्राक्षमळा, शोमरोनचा राजा अहाब याच्या महालाशेजारी इज्रेलमध्ये+ होता. २ अहाब नाबोथला म्हणाला: “तुझा द्राक्षमळा माझ्या महालाजवळच आहे. तो मला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लावीन. त्याच्या बदल्यात मी तुला आणखी चांगला द्राक्षमळा देईन; किंवा तुला हवं असेल, तर त्याची जेवढी किंमत आहे तेवढे पैसे तुला देईन.” ३ पण नाबोथ अहाबला म्हणाला: “माझ्या वाडवडिलांची वारशाची जमीन तुम्हाला देण्याचा मी विचारसुद्धा करू शकत नाही.+ तसं करणं यहोवाच्या दृष्टीने चुकीचं ठरेल.” ४ तेव्हा अहाब अतिशय दुःखी होऊन घरी गेला. त्याचं तोंड उतरलं होतं. कारण इज्रेलकर नाबोथ त्याला असं म्हणाला होता: “मी माझ्या वाडवडिलांची वारशाची जमीन तुम्हाला देणार नाही.” घरी आल्यावर अहाब आपल्या बिछान्यावर भिंतीकडे तोंड करून पडून राहिला. तो काही खायलाही तयार नव्हता.

५ तेव्हा त्याची बायको ईजबेल+ त्याच्याकडे येऊन म्हणाली: “तुम्ही एवढे दुःखी का आहात? तुम्ही जेवत का नाही?” ६ त्यावर तो तिला म्हणाला: “मी इज्रेलकर नाबोथला म्हणालो, की ‘तुझा द्राक्षमळा मला विकत दे. किंवा हवं असेल तर त्याच्या बदल्यात मी तुला दुसरा द्राक्षमळा देतो.’ पण तो म्हणाला: ‘मी तुम्हाला माझा द्राक्षमळा देणार नाही.’” ७ तेव्हा त्याची बायको ईजबेल त्याला म्हणाली: “आज इस्राएलवर कोणाचं राज्य आहे? तुमचंच ना! तर आता उठा, काहीतरी खाऊन घ्या आणि आनंदी राहा. मी तुम्हाला इज्रेलकर नाबोथचा मळा मिळवून देईन.”+ ८ मग तिने अहाबच्या नावाने पत्रं लिहिली आणि त्यांवर त्याची मोहर लावली.+ तिने ती पत्रं नाबोथच्या शहरातल्या वडीलजनांना+ आणि प्रतिष्ठित लोकांना पाठवली. ९ पत्रांत तिने असं लिहिलं: “उपासाची घोषणा करा. आणि नाबोथला सर्व लोकांच्या पुढे बसवा. १० मग दोन रिकामटेकड्या माणसांना त्याच्यासमोर बसवा आणि त्यांना नाबोथविरुद्ध अशी साक्ष द्याला सांगा,+ की ‘तू देवाची आणि राजाची निंदा केलीस!’+ नंतर त्याला बाहेर घेऊन जा आणि दगडमार करून ठार मारा.”+

११ म्हणून, ईजबेलने पत्रांत सांगितल्याप्रमाणे नाबोथच्या शहरातल्या माणसांनी, म्हणजे तिथल्या वडीलजनांनी आणि प्रतिष्ठित लोकांनी केलं. १२ त्यांनी उपासाची घोषणा केली आणि नाबोथला सर्व लोकांच्या पुढे बसवलं. १३ मग दोन रिकामटेकडी माणसं त्याच्यासमोर येऊन बसली. आणि सर्व लोकांपुढे ती त्याच्याविरुद्ध अशी साक्ष देऊ लागली: “नाबोथने देवाची आणि राजाची निंदा केली आहे!”+ त्यानंतर त्यांनी त्याला शहराबाहेर नेलं आणि दगडमार करून ठार मारलं.+ १४ मग त्यांनी ईजबेलला असा निरोप पाठवला: “आम्ही नाबोथला दगडमार करून ठार मारलंय.”+

१५ नाबोथला दगडमार करून ठार मारण्यात आलं आहे, हे समजताच ईजबेल अहाबला म्हणाली: “ज्या इज्रेलकर नाबोथने तुम्हाला द्राक्षमळा विकायला नकार दिला होता, तो आता मेलाय. तर आता उठा आणि जाऊन त्याचा द्राक्षमळा ताब्यात घ्या.”+ १६ नाबोथ मेला आहे हे ऐकताच अहाब उठला आणि त्याच्या द्राक्षमळ्याचा ताबा घ्यायला निघाला.

१७ इकडे, एलीया+ तिश्‍बी याला यहोवाकडून असा संदेश मिळाला: १८ “ऊठ, आणि शोमरोनात+ इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे जा. तो नाबोथच्या द्राक्षमळ्यात आहे. त्या मळ्याचा ताबा घ्यायला तो तिथे गेलाय. १९ त्याला सांग, ‘यहोवा असं म्हणतो: “तू एका माणसाचा खून केलास+ आणि त्याची जमीनही बळकावलीस काय?”’+ मग त्याला म्हण: ‘यहोवा असं म्हणतो: “ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोथचं रक्‍त चाटलं, त्याच ठिकाणी कुत्री तुझंही रक्‍त चाटतील.”’”+

२० नंतर अहाब एलीयाला म्हणाला: “माझ्या शत्रू! शेवटी मी सापडलोच तुला!”+ त्यावर एलीया त्याला म्हणाला: “हो, सापडलास तू. देव असं म्हणतो: ‘तू यहोवाच्या नजरेत वाईट करायचं ठरवलं* आहेस,+ २१ म्हणून आता मी तुझ्यावर संकट आणीन आणि तुझा व तुझ्या घराण्याचा समूळ नाश करीन; तुझ्या घराण्यातला प्रत्येक पुरुष व मुलगा,+ मग तो लाचार असो किंवा दुर्बळ त्याचा मी इस्राएलमधून नाश करीन.+ २२ तू माझा क्रोध भडकवलास आणि इस्राएलला पाप करायला लावलंस, म्हणून आता नबाटचा मुलगा यराबाम आणि अहीयाचा मुलगा बाशा यांच्या घराण्यांसारखीच मी तुझ्याही घराण्याची दशा करीन.’+ २३ आणि ईजबेलबद्दल यहोवा असं म्हणतो: ‘ईजबेलला इज्रेलच्याच जमिनीवर कुत्री खाऊन टाकतील.+ २४ अहाबच्या घराण्यातला जो कोणी शहरात मरेल, त्याला कुत्री खाऊन टाकतील; आणि जो कोणी मैदानावर मरेल, त्याला आकाशातले पक्षी खाऊन टाकतील.+ २५ खरंच, आजपर्यंत अहाबइतका वाईट कोणीही होऊन गेला नाही.+ कारण त्याने आपल्या बायकोच्या, ईजबेलच्या भडकावण्यावरून यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करण्याचा ठाम निश्‍चय केलाय.*+ २६ यहोवाने इस्राएली लोकांपुढून ज्या सर्व अमोरी लोकांना हाकलून लावलं होतं,+ त्या लोकांप्रमाणे अहाबसुद्धा घृणास्पद मूर्तींच्या* मागे लागला; आणि अशा प्रकारे तो अतिशय दुष्टपणे वागला.’”

२७ हे शब्द ऐकताच अहाबने दुःखाने आपले कपडे फाडले आणि गोणपाट घातलं. तो उपास करू लागला, गोणपाटावर झोपू लागला आणि उदास होऊन चालू लागला. २८ मग एलीया तिश्‍बी याला यहोवाकडून असा संदेश मिळाला: २९ “अहाब माझ्यासमोर कसा नमलाय हे तू पाहिलंस का?+ तो माझ्यासमोर नम्र झाला, म्हणून तो जिवंत असेपर्यंत मी त्याच्यावर हे संकट आणणार नाही; तर त्याच्या मुलाच्या जीवनकाळात मी हे संकट त्याच्या घराण्यावर आणीन.”+

२२ सीरिया आणि इस्राएल यांच्यामध्ये तीन वर्षं कोणतंही युद्ध झालं नाही. २ मग तिसऱ्‍या वर्षी यहूदाचा राजा यहोशाफाट+ हा इस्राएलच्या राजाकडे गेला.+ ३ तेव्हा इस्राएलचा राजा आपल्या सेवकांना म्हणाला: “तुम्हाला तर माहीतच आहे की रामोथ-गिलाद+ हे आपलं आहे. तरीसुद्धा आपण सीरियाच्या राजाकडून ते परत घ्यायला का कचरतोय?” ४ मग तो यहोशाफाटला म्हणाला: “तू माझ्यासोबत रामोथ-गिलादमध्ये लढाई करायला येशील का?” त्यावर यहोशाफाट इस्राएलच्या राजाला म्हणाला: “हो मी येईन. माझे लोक आणि माझे घोडे घेऊन मी तुझ्यासोबत येईन.”+

५ पण यहोशाफाट इस्राएलच्या राजाला म्हणाला: “कृपा करून, याबद्दल आधी यहोवाचा सल्ला घे.”+ ६ म्हणून मग इस्राएलच्या राजाने जवळपास ४०० संदेष्ट्यांना बोलावून विचारलं: “मी रामोथ-गिलादशी युद्ध करायला जावं की नाही?” ते म्हणाले: “हो जा. कारण यहोवा ते शहर राजाला नक्की मिळवून देईल.”

७ मग यहोशाफाट म्हणाला: “इथे कोणी यहोवाचा संदेष्टा नाही का? आपण त्याच्याकडूनही देवाचा सल्ला घेऊ.”+ ८ त्यावर इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला: “इथे आणखी एक माणूस आहे; इम्लाचा मुलगा मीखाया. आपण त्याच्याकडूनही यहोवाचा सल्ला घेऊ शकतो,+ पण मला तो अजिबात आवडत नाही.+ कारण माझ्या बाबतीत तो कधीच चांगला संदेश देत नाही, नेहमी वाईटच देतो.”+ पण यहोशाफाट म्हणाला: “राजाने असं बोलू नये.”

९ मग इस्राएलच्या राजाने दरबारातल्या एका अधिकाऱ्‍याला बोलावून म्हटलं: “पटकन जा आणि इम्लाच्या मुलाला, मीखायाला घेऊन ये.”+ १० त्या वेळी इस्राएलचा राजा आणि यहूदाचा राजा यहोशाफाट, शाही पोशाख घालून शोमरोनच्या प्रवेशद्वाराकडे असलेल्या खळ्याजवळ* आपल्या राजासनांवर बसले होते. आणि सगळे संदेष्टे त्यांच्यापुढे भविष्यवाणी करत होते.+ ११ मग कनाना याचा मुलगा सिद्‌कीया याने आपल्यासाठी लोखंडाची शिंगं बनवली, आणि तो म्हणाला: “यहोवा असं म्हणतो, ‘सीरियाच्या लोकांचा नाश होईपर्यंत तुम्ही या शिंगांनी त्यांना ढकलत राहाल.’”* १२ बाकीचे सगळे संदेष्टेही असंच म्हणत होते: “जा, रामोथ-गिलादवर हल्ला कर. यहोवा ते राजाला नक्की मिळवून देईल; तू यशस्वी होशील.”

१३ इकडे, मीखायाला बोलवायला गेलेला दूत त्याला म्हणाला: “पाहा! सगळे संदेष्टे राजाबद्दल चांगल्या गोष्टी बोलत आहेत. तर आता कृपा करून तुमचंही बोलणं त्यांच्यासारखं चांगलंच असू द्या.”+ १४ पण मीखाया म्हणाला: “जिवंत देव यहोवा याची शपथ, यहोवा मला जे सांगेल तेच मी बोलीन.” १५ मग मीखाया राजाकडे आला आणि राजाने त्याला विचारलं: “मीखाया, आम्ही रामोथ-गिलादशी युद्ध करायला जावं की नाही?” तो लगेच म्हणाला: “हो जा, यहोवा ते राजाला मिळवून देईल; तू यशस्वी होशील.” १६ त्यावर राजा त्याला म्हणाला: “मी किती वेळा तुला शपथ घालून सांगू, की यहोवाच्या नावाने फक्‍त खरं तेच बोल?” १७ तेव्हा तो म्हणाला: “मला सगळे इस्राएली लोक, मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे डोंगरांवर इकडे-तिकडे पसरलेले दिसत आहेत.+ यहोवा म्हणतो: ‘यांना कोणीही मालक नाही. तेव्हा प्रत्येकाला शांतीने आपापल्या घरी परत जाऊ द्या.’”

१८ मग इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला: “मी तुला म्हणालो होतो ना, ‘हा माझ्याबद्दल चांगला संदेश देणार नाही, वाईटच देईल’?”+

१९ मग मीखाया म्हणाला: “तर आता यहोवाचा संदेश काय आहे तो ऐक: मी पाहिलं, की यहोवा आपल्या राजासनावर बसलाय+ आणि त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातली सगळी सेना उभी आहे.+ २० यहोवाने मग विचारलं, ‘अहाबने रामोथ-गिलादला जावं आणि तिथे त्याचा मृत्यू व्हावा, म्हणून त्याला कोण फसवेल?’ तेव्हा कोणी असं सुचवलं, तर कोणी तसं. २१ मग एक स्वर्गदूत पुढे आला+ आणि यहोवासमोर उभा राहिला. तो म्हणाला, ‘मी त्याला फसवीन.’ तेव्हा यहोवाने त्याला विचारलं, ‘तू हे कसं करशील?’ २२ त्यावर तो स्वर्गदूत म्हणाला: ‘मी जाईन आणि त्याच्या सर्व संदेष्ट्यांना खोटं बोलायला लावीन.’+ तेव्हा देव त्याला म्हणाला: ‘तू त्याला फसवशील; तू नक्की यशस्वी होशील. जा आणि तसंच कर.’ २३ म्हणूनच यहोवाने तुझ्या या सर्व संदेष्ट्यांना खोटं बोलायला लावलंय.+ पण खरंतर तुझ्यावर संकट येईल अशी घोषणा यहोवाने केली आहे.”+

२४ तेव्हा कनानाचा मुलगा सिद्‌कीया मीखायाच्या जवळ आला आणि त्याला थोबाडीत मारून म्हणाला: “यहोवाची पवित्र शक्‍ती* मला सोडून तुझ्याशी कधीपासून बोलायला लागली?”+ २५ मीखायाने उत्तर दिलं: “ज्या दिवशी तू आतल्या खोलीत लपायला पळशील त्या दिवशी तुला हे कळेल.” २६ तेव्हा इस्राएलचा राजा म्हणाला: “मीखायाला धरा आणि त्याला शहराचा प्रमुख आमोन व राजाचा मुलगा योवाश यांच्या हवाली करा. २७ त्यांना सांगा, की ‘राजाचा असा हुकूम आहे: “या माणसाला तुरुंगात टाका+ आणि मी सुखरूप परत येईपर्यंत त्याला फक्‍त भाकरीच्या तुकड्यावर आणि घोटभर पाण्यावर ठेवा.”’” २८ पण मीखाया म्हणाला: “तू सुखरूप परत आलास, तर असं समज की यहोवा माझ्याशी बोललाच नाही.”+ तो पुढे म्हणाला: “लोकांनो, तुम्हीसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा.”

२९ यानंतर इस्राएलचा राजा आणि यहूदाचा राजा यहोशाफाट रामोथ-गिलादवर हल्ला करायला गेले.+ ३० तेव्हा इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला: “मी वेष बदलून लढाईत जाईन, पण तू मात्र तुझा शाही पोशाख घाल.” मग इस्राएलचा राजा आपला वेश बदलून+ लढाईत गेला. ३१ इकडे, सीरियाच्या राजाने आपल्या रथदलाच्या ३२ अधिकाऱ्‍यांना असा आदेश दिला होता:+ “कोणत्याही छोट्या-मोठ्या सैनिकाशी किंवा अधिकाऱ्‍याशी लढू नका; फक्‍त इस्राएलच्या राजाशी लढा.” ३२ मग यहोशाफाटला पाहताच रथदलाचे अधिकारी आपसात म्हणाले: “हाच इस्राएलचा राजा असावा.” म्हणून मग ते त्याच्याशी लढायला गेले; तेव्हा यहोशाफाट मदतीसाठी ओरडू लागला. ३३ पण तो इस्राएलचा राजा नाही हे समजताच रथदलाच्या अधिकाऱ्‍यांनी त्याचा पाठलाग करायचं सोडून दिलं.

३४ मग एका माणसाने सहजच एक बाण सोडला आणि तो इस्राएलच्या राजाला जाऊन लागला; चिलखताचे दोन भाग जिथे जोडले होते, तिथे जाऊन तो बाण रुतला. मग राजा रथ चालवणाऱ्‍या माणसाला म्हणाला: “रथ वळव आणि मला या लढाईतून बाहेर ने, कारण मी फार जखमी झालोय.”+ ३५ त्या दिवशी दिवसभर लढाई चालली. आणि राजाला सीरियाच्या लोकांच्या दिशेने रथात आधार देऊन उभं करावं लागलं. रथामध्ये राजाच्या जखमेतून रक्‍त वाहत राहिलं आणि संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला.+ ३६ मग सूर्यास्ताच्या वेळी छावणीत अशी घोषणा करण्यात आली: “प्रत्येकाने आपापल्या शहरात, आपापल्या देशात परत जावं!”+ ३७ अशा प्रकारे राजाचा मृत्यू झाला आणि त्याला शोमरोनात आणून दफन करण्यात आलं. ३८ त्यांनी शोमरोनच्या तळ्याजवळ त्याचा रथ धुतला, तेव्हा कुत्र्यांनी येऊन त्याचं रक्‍त चाटलं आणि वेश्‍यांनी तिथे अंघोळ केली;* यहोवाने सांगितलं होतं तसंच घडलं.+

३९ अहाबविषयीची बाकीची माहिती, म्हणजे त्याने हस्तिदंतांपासून+ जो महाल बांधला, त्याने जी शहरं बांधली आणि त्याने जे काही केलं, ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. ४० अहाबचा मृत्यू झाला*+ आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा अहज्या+ राजा बनला.

४१ इस्राएलचा राजा अहाब याच्या शासनकाळाच्या चौथ्या वर्षी, आसाचा मुलगा यहोशाफाट+ हा यहूदाचा राजा बनला. ४२ यहोशाफाट राजा बनला तेव्हा तो ३५ वर्षांचा होता. त्याने एकूण २५ वर्षं यरुशलेममध्ये राज्य केलं. त्याच्या आईचं नाव अजूबा असून ती शिल्ही याची मुलगी होती. ४३ यहोशाफाट आपल्या वडिलांच्या, आसाच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत राहिला;+ त्या मार्गापासून तो बहकला नाही. यहोवाच्या नजरेत जे योग्य ते त्याने केलं.+ पण उपासनेची उच्च स्थानं मात्र काढून टाकण्यात आली नव्हती. त्या उच्च स्थानांवर लोक अजूनही बलिदानं अर्पण करत होते आणि बलिदानांचं हवन करत होते.*+ ४४ यहोशाफाटने इस्राएलच्या राजासोबत शांतीचे संबंध ठेवले.+ ४५ यहोशाफाटबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पराक्रमाची कामं आणि त्याने लढलेली युद्धं हे सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. ४६ तसंच, त्याचे वडील आसा यांच्या काळात मंदिरात पुरुष-वेश्‍येची+ कामं करणारे जे उरले होते, त्या सर्वांना त्याने देशातून काढून टाकलं.+

४७ त्या दिवसांत अदोममध्ये+ कोणी राजा नव्हता; त्याच्या जागी एक अधिकारी राज्य चालवायचा.+

४८ यहोशाफाटने ओफीर इथून सोनं आणण्यासाठी तार्शीशची जहाजं* बांधली.+ पण ती जहाजं तिथे पोहोचू शकली नाहीत, कारण एस्योन-गेबेर इथे ती जहाजं फुटली.+ ४९ तेव्हा अहाबचा मुलगा अहज्या यहोशाफाटला म्हणाला: “तुझ्या सेवकांसोबत माझ्या सेवकांनाही जहाजांवर जाऊ दे.” पण यहोशाफाट यासाठी तयार झाला नाही.

५० मग यहोशाफाटचा मृत्यू झाला*+ आणि त्याला आपला पूर्वज दावीद याच्या शहरात, म्हणजे दावीदपुरात आपल्या पूर्वजांसोबत दफन करण्यात आलं. आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोराम+ हा राजा बनला.

५१ यहूदाचा राजा यहोशाफाट याच्या शासनकाळाच्या १७ व्या वर्षी, अहाबचा मुलगा अहज्या+ शोमरोनमध्ये इस्राएलचा राजा बनला. त्याने इस्राएलवर दोन वर्षं राज्य केलं. ५२ तो यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला. तो आपल्या आईवडिलांच्या+ आणि इस्राएलला पाप करायला लावणाऱ्‍या नबाटच्या मुलाच्या, म्हणजे यराबामच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत राहिला.+ ५३ अहज्या आपल्या वडिलांप्रमाणेच बआल दैवताची उपासना करत राहिला,+ त्याच्या पाया पडत राहिला आणि इस्राएलचा देव यहोवा याला क्रोधित करत राहिला.+

किंवा “दुखावलं नव्हतं; रागावलं नव्हतं.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “पूर्वजांकडे जाऊन निजल्यावर.”

किंवा “मादी खेचरावर.”

किंवा “योग्य.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “तू सुज्ञपणे वागशील.”

शब्दार्थसूची पाहा.

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “त्याच्या पिकलेल्या केसांना रक्‍ताने शिओलमध्ये पाठव.”

शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

किंवा “घर.”

किंवा “मिसरचा.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “घर.”

शब्दशः “महान.”

किंवा “अपार एकनिष्ठ प्रेम.”

किंवा “अपार एकनिष्ठ प्रेम.”

किंवा “तरुण.”

किंवा कदाचित, “अडेल.”

शब्दशः “भीती.”

म्हणजे, फरात नदी.

एक कोर म्हणजे २२० ली. अति. ख१४ पाहा.

हरणाची एक जात.

म्हणजे, फरात नदीच्या पश्‍चिमेकडे.

ही संख्या काही हस्तलिखितांमध्ये आणि समांतर अहवालांमध्ये आढळते. तर इतर काही हस्तलिखितांमध्ये ४०,००० संख्या आढळते.

किंवा “घोडेस्वारसुद्धा.”

किंवा “सुज्ञ मन दिलं.” शब्दशः “विशाल मन.”

किंवा “म्हटली.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “दावीदवर हीरामचं नेहमीच प्रेम होतं.”

किंवा “अगणित.”

लाकडं एकमेकांना जोडून पाण्यातून जाण्यासाठी तयार केलेलं एक साधन.

एक कोर म्हणजे २२० ली. अति. ख१४ पाहा.

किंवा “जैतून कुटून काढलेलं तेल.”

अति. ख१५ पाहा.

अति. ख८ पाहा.

एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.

शब्दशः “‘मंदिर,’ हे पवित्र स्थानाला सूचित करतं असं दिसतं.”

किंवा “रुंदी.”

म्हणजे, तीन बाजूंना.

या ठिकाणी हे पवित्र स्थानाला सूचित करतं.

म्हणजे, परमपवित्र स्थान.

बीम; छताला आधार देणारा लाकडाचा लांब ओंडका.

शब्दशः “उजवीकडे.”

किंवा “मोठ्या फळ्या.”

म्हणजे, मंदिराच्या आत.

म्हणजे, परमपवित्र स्थानासमोरचं पवित्र स्थान.

शब्दशः “तेलाचं लाकूड,” कदाचित अलेप्पो पाईन वृक्ष.

म्हणजे, परमपवित्र स्थान.

इथे कदाचित दाराच्या चौकटीच्या रचनेविषयी किंवा दाराच्या मापाविषयी सांगितलं आहे.

या ठिकाणी हे पवित्र स्थानाला सूचित करतं.

इथे कदाचित दाराच्या चौकटीच्या रचनेविषयी किंवा दाराच्या मापाविषयी सांगितलं आहे.

अति. ख१५ पाहा.

अति. ख१५ पाहा.

एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.

बीम; छताला आधार देणारा लाकडाचा लांब ओंडका.

किंवा “मोठ्या फळ्या.”

‘१५’ ही संख्या कशाला सूचित करते हे निश्‍चित नाही; ती खांबांना, खोल्यांना किंवा तुळयांना सूचित करत असावी.

किंवा “आयताकार.”

किंवा “कांस्याची; ब्रॉन्झची,” इथे आणि या अध्यायात येणाऱ्‍या वचनांत जिथे तांबं म्हटलं आहे तिथे ब्रॉन्झ असू शकतं.

साच्यात ओतून तयार केलेले.

किंवा “प्रत्येक स्तंभाचा परीघ १२ हात होता.”

किंवा “लिली फुलाच्या.”

या ठिकाणी हे पवित्र स्थानाला सूचित करतं.

किंवा “दक्षिणेकडे.”

म्हणजे, “तो [अर्थात, यहोवा] कायमचं स्थापित करो.”

किंवा “उत्तरेकडे.”

“त्याच्यात सामर्थ्य आहे,” असा कदाचित याचा अर्थ असावा.

किंवा “पाण्याचा मोठा हौद.”

किंवा “त्याचा परीघ ३० हात होता.”

सुमारे ७.४ सें.मी. (२.९ इंच). अति. ख१४ पाहा.

एक बथ म्हणजे २२ ली. अति. ख१४ पाहा.

किंवा “पाण्याच्या हातगाड्या.”

चाकांना जोडणारे दांडे.

अति. ख१५ पाहा.

म्हणजे, मंडपांचा सण.

किंवा “मंदिर.”

म्हणजे, अशी शपथ जी खोटी असली किंवा पूर्ण केली नाही तर शाप लागतो.

किंवा “दुःख सोसायला.”

किंवा “तुझा नावलौकिक.”

शब्दशः “न्याय दे.”

शब्दशः “न्याय दे.”

शब्दशः “तुझे डोळे उघडे असू दे.”

किंवा “ते तुझ्याकडे जे काही मागतील.”

किंवा “पूर्णपणे समर्पित अंतःकरणाने.”

किंवा “हमाथच्या प्रवेशापासून.”

शब्दशः “आठव्या,” म्हणजे दुसऱ्‍या सात-दिवसांच्या कालावधीनंतरचा दिवस.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “शिट्टी वाजवून.”

शब्दशः “ती त्याच्या दृष्टीने योग्य नव्हती.”

किंवा कदाचित, “काहीही उपयोगाचा नसलेला देश.”

एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

किंवा “मिल्लो.” या हिब्रू शब्दाचा अर्थ “भर घालणं” असा होतो.

किंवा “आहेर; हुंडा.”

किंवा “मिल्लो.” या हिब्रू शब्दाचा अर्थ “भर घालणं” असा होतो.

किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळायचा.”

किंवा “कोडी घालून.”

किंवा “लवाजमा.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “तुमच्या शब्दांबद्दल.”

एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.

सहसा तिरंदाजांजवळ असणारी छोटी ढाल.

हिब्रू शास्त्रवचनांत, एक मिना म्हणजे ५७० ग्रॅम. अति. ख१४ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “घोडेस्वार.”

किंवा “घोडेस्वार.”

किंवा कदाचित, “कळपचे कळप इजिप्त आणि कोवा देशातून विकत घ्यायचे; राजाचे व्यापारी कोवामधून ते विकत घ्यायचे.” कोवा हे कदाचित किलिकिया असावं.

किंवा “लग्नाचे संबंध जोडू नका.”

किंवा “त्याच्या बायकांचा त्याच्यावर जबरदस्त प्रभाव होता.”

किंवा “याला पूर्णपणे समर्पित नव्हतं.”

शब्दार्थसूची पाहा.

यात लहान मुलगेही असावेत असं दिसतं.

राज्य करणारी राणी नाही.

शब्दशः “पूर्वजांकडे जाऊन निजला आहे.”

शब्दशः “मारून टाकलं.”

किंवा “मिल्लो.” या हिब्रू शब्दाचा अर्थ “भर घालणं” असा होतो.

शब्दशः “शलमोन आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “वडीलजनांशी.”

शब्दशः “निवडलेले.”

शब्दशः “खऱ्‍या देवाचा माणूस.”

किंवा “मजबूत केलं.”

किंवा “मजबूत केलं.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळली.”

किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळायला.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “चरबीयुक्‍त राख,” म्हणजे बलिदानांच्या चरबीत भिजलेली राख.

किंवा “त्याच्या हाताला लकवा मारला.”

निमुळत्या तोंडाचं छोटं मडकं.

किंवा “तू तिला असं-असं सांग.”

किंवा “ओतीव मूर्ती.”

म्हणजे, फरात नदी.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “तो आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “धावणाऱ्‍यांच्या.”

याला अबीया असंही म्हटलं आहे.

किंवा “याला पूर्णपणे समर्पित नव्हतं.”

शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “पूर्णपणे समर्पित मनाने.”

किंवा “मजबूत करू लागला; पुन्हा बांधू लागला.”

किंवा “मजबूत करण्याचं; पुन्हा बांधण्याचं.”

किंवा “मजबूत केलं; पुन्हा बांधलं.”

किंवा “मजबूत केली; पुन्हा बांधली.”

शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

किंवा “रक्‍ताचा सूड घेणाऱ्‍यांपैकी.”

अतिशय उंच इमारत.

एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

म्हणजे, “शेमेरच्या कुळाचे.”

शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे “माझा देव यहोवा आहे.”

शब्दशः “ज्याच्यासमोर मी उभा राहतो.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “ज्याच्यासमोर मी उभा राहतो.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “दोन कुबड्या घेऊन लंगडत राहणार.”

किंवा “दोन तरणे बैल.”

किंवा कदाचित, “तो प्रवासाला गेला असेल.”

किंवा “संदेष्ट्यांसारखं वागत राहिले.”

सुमारे १० किलो. अति. ख१४ पाहा.

किंवा “संदेष्ट्याच्या झग्याने.”

म्हणजे, “देव तारण आहे.”

किंवा “सैनिकांची मोठी कत्तल केली.”

म्हणजे, वसंत ऋतूत.

म्हणजे, वसंत ऋतूत.

किंवा “एकनिष्ठ प्रेम करणारे.”

किंवा “जसे रस्ते नेमले होते.”

“संदेष्ट्यांचे पुत्र” हा वाक्यांश संदेष्ट्यांच्या समूहाला किंवा प्रशिक्षण मिळणाऱ्‍या संदेष्ट्यांच्या गटाला सूचित करत असावा.

एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

शब्दशः “वाईट ते करायला स्वतःला विकून टाकलं.”

शब्दशः “वाईट ते करायला स्वतःला विकून टाकलं.”

इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “शिंगांनी त्यांना हुंदडत राहाल.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा कदाचित, “जिथे वेश्‍या अंघोळ करायच्या, तिथे कुत्र्यांनी त्याचं रक्‍त चाटलं.”

शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळत होते.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा