वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt २ शमुवेल १:१-२४:२५
  • २ शमुवेल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २ शमुवेल
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ शमुवेल

२ शमुवेल

१ शौलचा मृत्यू झाला होता. आणि दावीद अमालेकी लोकांना हरवून* सिक्लागमध्ये+ परत आला होता. त्याला तिथे येऊन दोन दिवस झाले होते. २ मग तिसऱ्‍या दिवशी, शौलच्या छावणीतून एक माणूस तिथे आला. त्याने आपले कपडे फाडले होते आणि डोक्यात धूळ टाकली होती. तो दावीदसमोर आला तेव्हा त्याने जमिनीवर पडून त्याला दंडवत घातला.

३ दावीदने त्याला विचारलं: “तू कुठून आलास?” त्यावर तो म्हणाला: “मी इस्राएलच्या छावणीतून पळून आलोय.” ४ तेव्हा दावीदने त्याला विचारलं: “काय झालं तिकडे? सांग मला.” त्यावर तो म्हणाला: “लोकांनी युद्धातून पळ काढला आणि बरेच लोक मारले गेले. शौल आणि त्याचा मुलगा योनाथान हेसुद्धा मारले गेले.”+ ५ मग दावीदने खबर घेऊन आलेल्या त्या तरुण माणसाला विचारलं: “शौलचा आणि योनाथानचा मृत्यू झालाय हे तुला कसं कळलं?” ६ त्यावर त्या तरुणाने म्हटलं: “मी सहजच गिलबोवाच्या+ डोंगरावर फिरत होतो. तेव्हा मी पाहिलं, की शौल आपल्या भाल्याच्या आधाराने उभा आहे, आणि रथांनी व घोडेस्वारांनी त्याला जवळजवळ घेरलंच आहे.+ ७ त्याने मागे वळून पाहिल्यावर त्याला मी दिसलो. त्याने मला बोलावलं तेव्हा मी म्हणालो: ‘मी काय करू तुझ्यासाठी?’ ८ त्याने मला विचारलं: ‘तू कोण आहेस?’ मी म्हणालो: ‘मी अमालेकी+ आहे.’ ९ मग तो म्हणाला: ‘इकडे ये आणि मला मारून टाक. कारण मला असह्‍य वेदना होत आहेत, तरी माझा जीव काही जात नाही.’ १० म्हणून मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याला मारून टाकलं.+ कारण, एवढा जखमी होऊन पडल्यावर तो काही वाचणार नाही हे मला माहीत होतं. मग मी त्याच्या डोक्यावरचा मुकुट आणि हातावरचा बाजूबंद काढून घेतला आणि ते घेऊन मी इथे तुमच्याकडे, माझ्या प्रभूकडे आलो.”

११ हे ऐकून दावीदने दुःखाने आपले कपडे फाडले आणि त्याच्यासोबत असलेल्या सगळ्या माणसांनीही तसंच केलं. १२ त्यांनी शौल, त्याचा मुलगा योनाथान, यहोवाचे* लोक आणि इस्राएलचं घराणं+ या सर्वांसाठी संध्याकाळपर्यंत मोठमोठ्याने रडून शोक आणि उपास केला.+ कारण ते सर्व तलवारीने मारले गेले होते.

१३ त्यानंतर, दावीदने खबर घेऊन आलेल्या त्या माणसाला विचारलं: “तू कुठला आहेस?” तो म्हणाला: “मी एका विदेश्‍याचा, एका अमालेकी माणसाचा मुलगा आहे.” १४ तेव्हा दावीद त्याला म्हणाला: “यहोवाच्या अभिषिक्‍ताला मारून टाकायला तुला भीती कशी वाटली नाही?”+ १५ मग दावीद आपल्या एका माणसाला बोलावून म्हणाला: “हो पुढे आणि मारून टाक त्याला.” म्हणून त्याने त्याच्यावर वार करून त्याला मारून टाकलं.+ १६ दावीद त्याला म्हणाला: “तुझ्या मृत्यूसाठी तूच जबाबदार आहेस.* कारण, ‘यहोवाच्या अभिषिक्‍ताला मीच मारून टाकलं,’ असं म्हणून तू स्वतःच स्वतःविरुद्ध साक्ष दिलीस.”+

१७ मग दावीदने शौल आणि त्याचा मुलगा योनाथान यांच्यासाठी एक शोकगीत गायलं.+ १८ आणि ते शोकगीत यहूदातल्या लोकांना शिकवलं जावं असंही त्याने सांगितलं. “धनुष्य,” असं म्हटलेलं हे शोकगीत याशारच्या पुस्तकात+ लिहिलेलं आहे. ते असं:

१९ “हे इस्राएला! तुझं सौंदर्य तुझ्या उच्च स्थानी मारलं गेलं.+

पराक्रमी शूर कसे मरून पडलेत!

२० गथमध्ये हे सांगू नका;+

अष्कलोनच्या रस्त्यांवर याची घोषणा करू नका.

नाहीतर पलिष्ट्यांच्या मुली हर्षित होतील;

त्या बेसुंती* माणसांच्या मुली आनंदोत्सव करतील.

२१ हे गिलबोवाच्या+ डोंगरांनो,

तुमच्यावर ना दव पडो, ना पाऊस,

ना पवित्र दानांसाठी तुमच्या शेतांत उपज येवो.+

कारण शूरवीरांची ढाल तिथे अशुद्ध झाली;

शौलची ढाल आता तेलाने अभिषिक्‍त होणार नाही.

२२ शत्रूंचं रक्‍त सांडल्याशिवाय,

शूरवीरांची चरबी भेदल्याशिवाय,

योनाथानचं धनुष्य परत येत नसे,+

आणि विजय मिळवल्याशिवाय शौलची तलवार म्यानात जात नसे.+

२३ शौल आणि योनाथान,+ आयुष्यभर लोकांचे प्रिय व आवडते* राहिले.

मरतानाही त्यांची ताटातूट झाली नाही.+

ते गरुडांपेक्षा वेगवान,+

आणि सिंहांपेक्षा बलवान होते.+

२४ हे इस्राएलच्या मुलींनो, शौलसाठी शोक करा,

त्याने तुम्हाला लाल रंगाच्या भरजरी कपड्यांनी सजवलं,

तुमच्या कपड्यांवर त्याने सोन्याचे दागिने घातले.

२५ पाहा, युद्धात पराक्रमी शूर कसे मरून पडलेत!

तुझ्या उच्च स्थानी योनाथान मरून पडलाय!+

२६ योनाथान, माझ्या भावा! तुला गमावल्यामुळे मी अतिशय दुःखी झालोय.

फार प्रिय होतास तू माझ्यासाठी.+

माझ्यावरचं तुझं प्रेम, मला स्त्रियांच्या प्रेमापेक्षाही अधिक होतं.+

२७ पाहा, पराक्रमी शूर कसे मरून पडलेत,

युद्धाची शस्त्रं कशी नष्ट झाली आहेत!”

२ त्यानंतर दावीदने यहोवाला विचारलं:+ “मी यहूदातल्या एखाद्या शहरात जाऊ का?” त्यावर यहोवा त्याला म्हणाला: “जा.” दावीदने पुढे विचारलं: “मी कुठे जाऊ?” तेव्हा तो म्हणाला: “हेब्रोनला जा.”+ २ म्हणून दावीद आपल्या दोन बायकांना, म्हणजे इज्रेलमधली अहीनवाम+ आणि कर्मेलमधली नाबालची विधवा अबीगईल+ यांना घेऊन तिथे गेला. ३ दावीद आपल्या माणसांनाही घेऊन गेला.+ ते सगळे आपापल्या कुटुंबांसोबत तिथे गेले आणि हेब्रोनच्या आसपासच्या शहरांत जाऊन राहू लागले. ४ मग यहूदातली माणसं तिथे आली आणि त्यांनी यहूदाच्या घराण्यावर राजा म्हणून दावीदचा अभिषेक केला.+

त्यांनी दावीदला सांगितलं: “शौलला ज्यांनी दफन केलं ती माणसं याबेश-गिलादमधली होती.” ५ म्हणून दावीदने आपल्या दूतांच्या हातून याबेश-गिलादच्या माणसांना असा संदेश पाठवला: “यहोवा तुम्हाला आशीर्वादित करो. कारण तुम्ही तुमच्या प्रभूंना, शौलला दफन करून त्यांना एकनिष्ठ प्रेम दाखवलं.+ ६ यहोवाही तुम्हाला एकनिष्ठ प्रेम दाखवो आणि तुमच्याशी विश्‍वासूपणे वागो. तुम्ही केलेल्या या चांगल्या कामाबद्दल मीसुद्धा तुम्हाला दया दाखवीन.+ ७ तुमचे प्रभू शौल आता राहिले नाहीत. आणि यहूदाच्या घराण्याने मला त्यांचा राजा म्हणून अभिषिक्‍त केलंय. म्हणून आता हिंमत धरा आणि धैर्यवान व्हा.”

८ पण इकडे शौलचा सेनापती, म्हणजे नेरचा मुलगा अबनेर+ याने शौलचा मुलगा ईश-बोशेथ+ याला नदीच्या पलीकडे महनाइम+ इथे आणलं. ९ आणि त्याला अशुरी लोकांवर, तसंच गिलाद,+ इज्रेल,+ एफ्राईम,+ बन्यामीन आणि संपूर्ण इस्राएलवर राजा नेमलं. १० शौलचा मुलगा ईश-बोशेथ इस्राएलचा राजा बनला तेव्हा तो ४० वर्षांचा होता. त्याने दोन वर्षं राज्य केलं. पण यहूदाच्या घराण्याने मात्र दावीदला साथ दिली.+ ११ दावीदने हेब्रोनमधून साडेसात वर्षं यहूदाच्या घराण्यावर राज्य केलं.+

१२ काही काळाने, नेरचा मुलगा अबनेर आणि शौलच्या मुलाचे सेवक, म्हणजे ईश-बोशेथचे सेवक महनाइममधून+ गिबोनला+ गेले. १३ इकडे, सरूवाचा+ मुलगा यवाब+ आणि दावीदचे सेवकसुद्धा बाहेर पडले. या दोन्ही गटांची गिबोनच्या तळ्याजवळ गाठ पडली. तळ्याच्या एका बाजूला एक गट, तर दुसऱ्‍या बाजूला दुसरा गट बसला. १४ मग अबनेर यवाबला म्हणाला: “चल, आपल्या तरुण माणसांना आपल्यासमोर येऊन एकमेकांशी दोन हात* करू दे.” त्यावर यवाब म्हणाला: “ठीक आहे, होऊन जाऊ दे.” १५ मग त्यांची माणसं उठली आणि समोर आली. त्यांची संख्या एकसारखीच होती. शौलचा मुलगा ईश-बोशेथ याच्या बाजूने १२ बन्यामिनी माणसं, तर दावीदच्या बाजूने त्याचे १२ सेवक समोर आले. १६ प्रत्येकाने आपापल्या प्रतिस्पर्ध्याचं डोकं धरून त्याच्या कुशीत तलवार भोसकली, आणि ते सगळे एकदम खाली कोसळून पडले. म्हणून गिबोनमधल्या त्या जागेला हेलकथ-हसूरीम* असं नाव पडलं.

१७ त्या दिवशी झालेल्या लढाईने भयंकर स्वरूप धारण केलं. दावीदच्या सेवकांनी अबनेरला आणि इस्राएलच्या माणसांना हरवलं. १८ तिथे सरूवाची तीन मुलंसुद्धा होती:+ यवाब,+ अबीशय+ आणि असाएल.+ त्यांच्यातला असाएल हा अगदी रानातल्या हरणासारखा चपळ होता. १९ असाएल अबनेरचा पाठलाग करायला लागला. त्याने त्याचा असा पाठलाग केला, की पाठलाग करताना तो ना उजवीकडे वळला, ना डावीकडे. २० अबनेरने मागे वळून पाहिलं आणि विचारलं: “असाएल, तूच आहेस ना?” त्यावर तो म्हणाला: “हो मीच.” २१ तेव्हा अबनेर त्याला म्हणाला: “माझा पाठलाग करायचं सोड. त्यापेक्षा दुसऱ्‍या एखाद्याला पकड. आणि त्याचं जे काही असेल ते लुटून घे.” पण असाएलने त्याचा पाठलाग करायचं काही सोडलं नाही. २२ म्हणून अबनेर पुन्हा असाएलला म्हणाला: “माझा पाठलाग करायचं सोडून दे. तुला मारून टाकायला मला का भाग पाडतोस? मग मी यवाबला, तुझ्या भावाला तोंड कसं दाखवू?” २३ पण तो काहीएक ऐकायला तयार नव्हता. म्हणून मग अबनेरने आपल्या भाल्याचा मागचा भाग त्याच्या पोटात असा खुपसला,+ की भाला आरपार जाऊन त्याच्या पाठीतून बाहेर निघाला; आणि असाएल खाली पडून जागच्या जागी मेला. असाएल मरून पडला त्या ठिकाणी जो कोणी यायचा, तो क्षणभर स्तब्ध होऊन तिथेच उभा राहायचा.

२४ मग यवाब आणि अबीशयने अबनेरचा पाठलाग केला. आणि सूर्यास्त होता होता ते अम्मा नावाच्या टेकडीवर आले; ही टेकडी, गिबोनच्या ओसाड रानाकडे जाणाऱ्‍या रस्त्यावर असलेल्या गिहासमोर आहे. २५ मग बन्यामिनी लोक अबनेरच्या मागे एकत्र जमले; आणि सैन्यदलाच्या तुकडीप्रमाणे एका टेकडीवर तैनात झाले. २६ तेव्हा अबनेर यवाबला हाक मारून म्हणाला: “आपण कुठवर असं एकमेकांना तलवारीने मारत राहणार? याचा शेवट कटूच होणार हे तुला माहीत नाही का? मग, ‘आपल्या भावांचा पाठलाग करायचं बंद करा,’ असं आपल्या लोकांना सांगायला तू अजून किती वेळ लावणार आहेस?” २७ त्यावर यवाब म्हणाला: “जिवंत आणि खऱ्‍या देवाची शपथ, तू जर हे बोलला नसतास, तर लोक सकाळपर्यंत आपल्या भावांचा पाठलाग करत राहिले असते.” २८ मग यवाबने शिंग फुंकलं, तेव्हा त्याच्या माणसांनी इस्राएलचा पाठलाग करायचं थांबवलं आणि लढाई बंद झाली.

२९ अबनेर आणि त्याच्या माणसांनी मग अराबातून+ रात्रभर प्रवास करून यार्देन नदी पार केली. आणि खोऱ्‍यातून* चालत जाऊन शेवटी ते महनाइमला+ पोहोचले. ३० यवाबने अबनेरचा पाठलाग करायचं सोडून दिल्यावर आपल्या सगळ्या माणसांना एकत्र केलं. तेव्हा दावीदच्या सेवकांपैकी, असाएलशिवाय आणखी १९ जण नसल्याचं दिसून आलं. ३१ पण दावीदच्या सेवकांनी बन्यामिनी लोकांना आणि अबनेरच्या माणसांना हरवलं होतं आणि त्यांची ३६० माणसं मारली गेली होती. ३२ त्यांनी असाएलला+ बेथलेहेममध्ये+ त्याच्या वडिलांच्या कबरेत पुरलं. मग यवाब व त्याच्या माणसांनी रात्रभर प्रवास केला, आणि दिवस उजाडता उजाडता ते हेब्रोनला+ पोहोचले.

३ शौलचं घराणं आणि दावीदचं घराणं यांचं आपसात असलेलं युद्ध पुढे बराच काळ चालू राहिलं. दावीद दिवसेंदिवस प्रबळ होत गेला+ आणि शौलचं घराणं कमकुवत होत गेलं.+

२ या काळादरम्यान दावीदला हेब्रोनमध्ये काही मुलं झाली.+ त्याच्या पहिल्या मुलाचं नाव अम्नोन होतं.+ तो त्याला इज्रेलमधल्या अहीनवामपासून+ झाला होता. ३ त्याच्या दुसऱ्‍या मुलाचं नाव किलाब होतं; तो त्याला कर्मेलमधल्या नाबालची विधवा अबीगईल+ हिच्यापासून झाला होता. त्याचा तिसरा मुलगा अबशालोम;+ तो त्याला माकापासून झाला होता. माका ही गशूरचा राजा तलमय+ याची मुलगी होती. ४ त्याचा चौथा मुलगा अदोनीया,+ हा त्याला हग्गीथ हिच्यापासून झाला होता. त्याचा पाचवा मुलगा शपत्याह, त्याला अबीटलपासून झाला होता. ५ आणि त्याचा सहावा मुलगा इथ्राम होता. हा दावीदला आपली बायको एग्ला हिच्यापासून झाला होता. दावीदला ही मुलं हेब्रोनमध्ये झाली होती.

६ शौलच्या आणि दावीदच्या घराण्यातला लढा चालू असताना, अबनेर+ हा शौलच्या घराण्यात आपलं वर्चस्व वाढवत गेला. ७ शौलची रिस्पा+ नावाची एक उपपत्नी होती; ती अय्या याची मुलगी होती. नंतर, ईश-बोशेथ+ अबनेरला म्हणाला: “तुम्ही माझ्या वडिलांच्या उपपत्नीसोबत संबंध का ठेवले?”+ ८ ईश-बोशेथचं हे बोलणं ऐकून अबनेर खूप भडकला आणि म्हणाला: “मी काय यहूदाचा कुत्रा* आहे? मी आजपर्यंत शौलच्या, तुझ्या बापाच्या घराण्याला, त्याच्या भावांना आणि त्याच्या मित्रांना विश्‍वासू राहिलो.* शिवाय, तुला दावीदच्या हवाली करून मी तुझा विश्‍वासघातही केला नाही. आणि तरीही आज एका बाईवरून तू मला जाब विचारतोस? ९ यहोवाने दावीदला वचन दिलं होतं त्याप्रमाणे+ आता जर मी केलं नाही, तर देव मला कठोरातली कठोर शिक्षा करो. १० देवाने वचन दिलं होतं, की तो शौलच्या घराण्याकडून राज्य काढून घेईल, आणि दावीदचं राजासन दानपासून बैर-शेबापर्यंत+ संपूर्ण इस्राएलवर आणि यहूदावर स्थापन करेल.” ११ त्यावर ईश-बोशेथ एका शब्दानेही अबनेरला उत्तर देऊ शकला नाही, कारण तो त्याला घाबरून होता.+

१२ त्यानंतर अबनेरने लगेच आपल्या दूतांच्या हातून दावीदला असा संदेश पाठवला: “हा संपूर्ण देश कोणाचा आहे?” पुढे तो म्हणाला: “माझ्यासोबत एक करार करा. मग संपूर्ण इस्राएलचं मन तुमच्याकडे वळवण्यासाठी मला जे काही करावं लागेल ते मी करीन.”+ १३ त्यावर दावीद म्हणाला: “ठीक आहे! मी नक्की तुझ्यासोबत करार करीन, पण एका अटीवर! तू मला भेटायला येशील तेव्हा शौलची मुलगी मीखल+ हिला आपल्यासोबत घेऊन ये. नाहीतर मला आपलं तोंड दाखवू नकोस.” १४ मग दावीदने आपल्या दूतांच्या हातून ईश-बोशेथला,+ शौलच्या मुलाला असा निरोप पाठवला: “माझी बायको मीखल मला दे. पलिष्ट्यांच्या १०० अग्रत्वचा देऊन माझं तिच्याशी लग्न ठरलं होतं.”+ १५ तेव्हा ईश-बोशेथने तिला आणण्यासाठी तिच्या नवऱ्‍याकडे, म्हणजे लईशचा मुलगा पलतीयेल+ याच्याकडे माणसं पाठवली. १६ पण तिचा नवरा तिच्यासोबत निघाला आणि रडतरडत बहुरीमपर्यंत+ तिच्यामागे गेला. मग अबनेर त्याला म्हणाला: “परत जा!” तेव्हा तो निघून गेला.

१७ यादरम्यान, अबनेरने इस्राएलच्या वडीलजनांना निरोप पाठवला: “तुम्हाला बऱ्‍याच दिवसांपासून दावीदला आपला राजा बनवायचं होतं ना? १८ तर आता तसंच करा. कारण यहोवा दावीदला असं म्हणाला होता: ‘माझा सेवक दावीद+ याच्याच हातून मी माझ्या इस्राएली लोकांना पलिष्ट्यांपासून आणि सगळ्या शत्रूंपासून वाचवीन.’” १९ मग अबनेर बन्यामिनी लोकांशी बोलला.+ आणि इस्राएलने व बन्यामीनच्या संपूर्ण घराण्याने जे काही करायचं मान्य केलंय, ते दावीदला खासगीत सांगण्यासाठी तो हेब्रोनलाही गेला.

२० अबनेर आपली २० माणसं घेऊन हेब्रोनमध्ये दावीदकडे आला, तेव्हा दावीदने त्याच्यासाठी आणि त्याच्या माणसांसाठी एक मेजवानी ठेवली. २१ मग अबनेर दावीदला म्हणाला: “आता मला सर्व इस्राएली लोकांना माझ्या प्रभूकडे, राजाकडे एकत्र आणायला जाऊ द्या; म्हणजे ते तुमच्यासोबत एक करार करतील आणि तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही सर्व इस्राएलवर राज्य कराल.” म्हणून मग दावीदने अबनेरला पाठवून दिलं आणि तो शांतीने आपल्या मार्गाने गेला.

२२ तेवढ्यात, यवाब आणि दावीदचे सेवक लुटीचा भरमसाट माल घेऊन एका मोहिमेवरून परत आले. पण त्या वेळी अबनेर दावीदसोबत हेब्रोनमध्ये नव्हता; कारण दावीदने त्याला शांतीने पाठवून दिलं होतं. २३ यवाब+ आणि त्याचं सैन्य परत आलं, तेव्हा यवाबला असं सांगण्यात आलं: “नेरचा+ मुलगा अबनेर+ राजाकडे आला होता. आणि राजाने त्याला शांतीने आपल्या मार्गाने पाठवून दिलं.” २४ तेव्हा यवाब राजाकडे गेला आणि म्हणाला: “तुम्ही हे काय केलंत? अबनेर स्वतःहून तुमच्याकडे आला होता. मग तुम्ही त्याला का पाठवून दिलं? तुम्ही त्याला निसटून कसं जाऊ दिलं? २५ नेरचा मुलगा अबनेर कसा आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे! तो तुम्हाला फसवून तुमच्या प्रत्येक हालचालीची आणि तुम्ही काय करताय याची माहिती काढायला इथे आला होता.”

२६ मग यवाब दावीदसमोरून निघून गेला, आणि त्याने अबनेरला बोलावून आणायला काही दूत पाठवले. ते अबनेरला सिरा नावाच्या विहिरीजवळून परत घेऊन आले. पण दावीदला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. २७ अबनेर जेव्हा हेब्रोनला परत आला,+ तेव्हा त्याच्याशी खासगीत बोलण्यासाठी यवाब त्याला फाटकाच्या आत एकीकडे घेऊन गेला. मग आपला भाऊ असाएल याच्या खुनाचा* बदला घेण्यासाठी+ त्याने अबनेरच्या पोटात असा वार केला की तो जागीच मेला.+ २८ दावीदला नंतर हे समजलं तेव्हा तो म्हणाला: “नेरचा मुलगा अबनेर याच्या रक्‍ताच्या दोषापासून+ मी आणि माझं राज्य यहोवापुढे कायम निर्दोष असू. २९ त्याच्या रक्‍ताचा दोष यवाबच्या माथ्यावर+ आणि त्याच्या वडिलांच्या संपूर्ण घराण्यावर येवो. यवाबच्या घराण्यात कुष्ठरोगी,+ स्रावी,+ टकळीवर सूत कातणारा,* तलवारीला किंवा उपासमारीला बळी पडणारा माणूस कायम राहो.”+ ३० अशा प्रकारे, यवाब आणि त्याचा भाऊ अबीशय+ यांनी अबनेरचा+ खून केला; कारण गिबोनमध्ये झालेल्या लढाईत अबनेरने त्यांच्या भावाला, असाएलला मारून टाकलं होतं.+

३१ मग दावीद यवाबला आणि आपल्यासोबत असलेल्या सगळ्या लोकांना म्हणाला: “आपले कपडे फाडून गोणपाट बांधा आणि अबनेरसाठी शोक करा.” दावीद राजा स्वतः शवयात्रेमागे चालत होता. ३२ त्यांनी अबनेरला हेब्रोनमध्ये पुरलं. दावीद राजा अबनेरच्या कबरेजवळ मोठ्याने रडला, आणि त्याच्यासोबतचे लोकही रडू लागले. ३३ राजाने अबनेरसाठी असं शोकगीत गायलं:

“मूर्खाला यावं तसं मरण अबनेरला यावं का?

३४ तुझे हात बांधलेले नव्हते,

आणि तुझ्या पायांत बेड्याही नव्हत्या.

तरीसुद्धा गुन्हेगारांना* कोणी बळी पडावा तसा तू बळी पडलास.”+

तेव्हा सर्व लोक पुन्हा अबनेरसाठी रडू लागले.

३५ दिवस अजून थोडा उरला होता. तेव्हा सर्व लोक दावीदकडे आले आणि त्याला जेवायचा* आग्रह करू लागले. पण दावीद शपथ घेऊन म्हणाला: “सूर्य मावळण्याआधी मी भाकरीचा एक तुकडा किंवा अन्‍नाचा एक कण जरी खाल्ला, तर देव मला कठोरातली कठोर शिक्षा करो!”+ ३६ सर्व लोकांनी हे पाहिलं तेव्हा राजाचं हे वागणं त्यांना योग्य वाटलं; नेहमीप्रमाणे या वेळीही त्यांना त्याचं वागणं योग्य वाटलं. ३७ त्या दिवशी, सर्व लोकांना आणि संपूर्ण इस्राएलला समजलं, की नेरचा मुलगा अबनेर याच्या खुनासाठी राजा जबाबदार नाही.+ ३८ मग राजा आपल्या सेवकांना म्हणाला: “तुम्हाला माहीत नाही का, आज इस्राएलने एका पुढाऱ्‍याला, एका महान पुरुषाला गमावलंय?+ ३९ मी जरी एक अभिषिक्‍त राजा असलो,+ तरी आज मी कमजोर आहे. ही माणसं, सरूवाची+ मुलं फार निर्दयी आहेत.+ यहोवा दुष्टाला त्याच्या दुष्टपणाची शिक्षा करो.”+

४ शौलचा मुलगा ईश-बोशेथ+ याला* समजलं, की हेब्रोनमध्ये+ अबनेरचा मृत्यू झाला आहे. तेव्हा त्याचा धीर खचला* आणि सर्व इस्राएली लोकही घाबरले. २ शौलच्या मुलाकडे लुटारूंच्या ज्या टोळ्या होत्या त्यांवर दोन अधिकारी होते: एकाचं नाव बानाह, तर दुसऱ्‍याचं नाव रेखाब. ही दोघं बन्यामीन वंशातल्या रिम्मोनची मुलं होती; रिम्मोन हा बैरोथचा राहणारा होता. (त्या काळात, बैरोथसुद्धा+ बन्यामीनच्या प्रदेशाचाच भाग समजला जायचा. ३ बैरोथचे लोक गित्तइम+ इथे पळून गेले होते, आणि ते आजपर्यंत तिथेच विदेशी म्हणून राहत आहेत.)

४ शौलचा मुलगा योनाथान+ याचा एक मुलगा दोन्ही पायांनी अधू होता.+ तो जेव्हा पाच वर्षांचा होता, तेव्हा शौल आणि योनाथान यांच्या मृत्यूची खबर इज्रेलहून+ आली. ती खबर ऐकून त्याची दाई फार घाबरली आणि त्याला घेऊन पळाली. पण पळत असताना तो तिच्या हातातून पडला आणि अधू झाला. त्याचं नाव मफीबोशेथ.+

५ इकडे, बैरोथमधल्या रिम्मोनची मुलं, रेखाब आणि बानाह भर दुपारी ईश-बोशेथच्या घरी गेली. त्या वेळी, ईश-बोशेथ दुपारची झोप घेत होता. ६ तेव्हा, रेखाब आणि बानाह+ गहू घेण्याच्या निमित्ताने घरात शिरले आणि त्यांनी त्याच्या पोटावर वार केला. त्यानंतर ते तिथून पळून गेले. ७ ते जेव्हा घरात गेले, तेव्हा ईश-बोशेथ आपल्या खोलीत पलंगावर झोपला होता. मग त्यांनी त्याच्यावर वार करून त्याला ठार मारलं आणि त्याचं डोकं कापलं. नंतर त्याचं डोकं घेऊन ते संपूर्ण रात्र अराबाला जाणाऱ्‍या रस्त्याने चालत गेले. ८ मग त्यांनी ईश-बोशेथचं+ डोकं हेब्रोनमध्ये दावीद राजाकडे आणलं आणि ते त्याला म्हणाले: “हे पाहा! तुमच्या जिवावर उठलेला+ तुमचा शत्रू+ शौल याच्या मुलाचं, ईश-बोशेथचं डोकं! आज आमच्या प्रभूसाठी, आमच्या राजासाठी यहोवाने शौलचा आणि त्याच्या वंशजांचा बदला घेतलाय.”

९ पण दावीद बैरोथमधल्या रिम्मोनच्या मुलांना, म्हणजे रेखाब आणि त्याचा भाऊ बानाह यांना म्हणाला: “ज्याने मला माझ्या सर्व संकटांतून वाचवलं त्या जिवंत देवाची, यहोवाची शपथ,+ १० सिक्लागमध्ये जेव्हा एकाने मला खबर दिली, की ‘शौल मेला आहे,’+ तेव्हा त्याला असं वाटलं, की तो मला आनंदाची बातमी सांगतोय. पण मी त्याला पकडून ठार मारलं.+ बातमी घेऊन आलेल्या त्या माणसाला मी हेच बक्षीस दिलं! ११ तर मग, एखाद्या निर्दोष माणसाला त्याच्याच घरात घुसून त्याच्या बिछान्यावर ठार मारणाऱ्‍या दुष्ट माणसांना आणखी किती कडक शिक्षा व्हायला हवी! म्हणून त्याच्या रक्‍ताचा बदला मी तुमच्याकडून घेईन.+ तुम्हाला मरावंच लागेल!” १२ मग दावीदने आपल्या माणसांना त्यांना मारून टाकण्याचा हुकूम दिला.+ त्यांनी त्या दोघांचे हातपाय कापून टाकले आणि त्यांना हेब्रोनच्या तळ्याजवळ लटकवलं.+ पण ईश-बोशेथचं डोकं त्यांनी हेब्रोनमध्ये अबनेरच्या कबरेत पुरलं.

५ काही काळाने, इस्राएलचे सर्व वंश हेब्रोनमध्ये दावीदकडे आले+ आणि म्हणाले: “हे बघ! तुझ्याशी आमचं रक्‍ताचं नातं आहे.+ २ पूर्वी जेव्हा शौल आमचा राजा होता, तेव्हा युद्धाच्या मोहिमांमध्ये तूच इस्राएलचं नेतृत्व करायचास.+ आणि यहोवा तुला म्हणाला होता: ‘तू माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ आणि इस्राएलचा पुढारी होशील.’”+ ३ अशा प्रकारे इस्राएलचे सर्व वडीलजन हेब्रोनमध्ये दावीद राजाकडे आले आणि त्याने हेब्रोनमध्ये यहोवापुढे त्यांच्यासोबत एक करार केला.+ मग त्यांनी संपूर्ण इस्राएलचा राजा म्हणून दावीदचा अभिषेक केला.+

४ दावीद राजा बनला तेव्हा तो ३० वर्षांचा होता. त्याने ४० वर्षं राज्य केलं.+ ५ त्याने हेब्रोनमधून साडेसात वर्षं यहूदावर राज्य केलं; तर, यरुशलेममधून+ त्याने ३३ वर्षं संपूर्ण इस्राएल आणि यहूदावर राज्य केलं. ६ पुढे दावीद राजा आणि त्याची माणसं यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या यबूसी+ लोकांशी लढाई करायला गेली. तेव्हा यबूसी लोकांनी दावीदला असा टोमणा मारला: “तू आमच्या इथे पाऊलसुद्धा ठेवू शकणार नाहीस! आमच्यातले आंधळे-पांगळेसुद्धा तुला हाकलून लावतील.” त्यांना असं वाटत होतं, की दावीद कधीच तिथे येऊ शकणार नाही.+ ७ पण दावीदने सीयोनचा किल्ला काबीज केला; आज त्याला दावीदपूर+ असं म्हटलं जातं. ८ त्या दिवशी दावीद म्हणाला: “यबूसी लोकांवर हल्ला करणाऱ्‍यांनी पाण्याच्या खंदकातून जावं आणि दावीदचा द्वेष करणाऱ्‍या त्या ‘आंधळ्या आणि पांगळ्या’ लोकांना मारून टाकावं!” म्हणून असं म्हटलं जातं: “आंधळे आणि पांगळे कधीच इथे पाऊल ठेवू शकणार नाहीत.” ९ नंतर दावीद त्या किल्ल्यातच राहू लागला. आणि त्याला दावीदपूर असं नाव पडलं.* दावीद तिथे टेकडीवर*+ आणि शहरात इतर ठिकाणी मजबूत भिंती आणि इमारती बांधू लागला.+ १० अशा प्रकारे, दावीद अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला.+ आणि सैन्यांचा देव यहोवा त्याच्या पाठीशी होता.+

११ सोरचा राजा हीराम+ याने दावीदकडे आपले दूत पाठवले. त्यासोबतच त्याने देवदाराचं लाकूड,+ शिवाय सुतारकाम करणारे आणि भिंती बांधण्यासाठी गवंडीही पाठवले. ते दावीदसाठी राजमहाल* बांधू लागले.+ १२ यहोवानेच इस्राएलवर आपलं राज्यपद स्थिर केलं आहे+ आणि त्यानेच त्याच्या इस्राएली लोकांसाठी+ आपल्या राज्याची भरभराट केली आहे,+ याची दावीदला जाणीव झाली.

१३ हेब्रोनमधून यरुशलेममध्ये आल्यावर दावीदने आणखी काही उपपत्नी+ व बायका केल्या. आणि दावीदला आणखी मुलंमुली झाल्या.+ १४ यरुशलेममध्ये झालेल्या त्याच्या मुलांची नावं अशी: शम्मुवा, शोबाब, नाथान,+ शलमोन,+ १५ इभार, अलीशवा, नेफेग, याफीय, १६ अलीशामा, एल्यादा आणि अलीफलेट.

१७ दावीदला इस्राएलचा राजा म्हणून अभिषिक्‍त करण्यात आलं आहे+ ही गोष्ट जेव्हा पलिष्टी लोकांनी ऐकली, तेव्हा ते सगळे त्याच्याशी लढायला आले.+ दावीदला हे समजलं तेव्हा तो एका सुरक्षित ठिकाणी निघून गेला.+ १८ इकडे पलिष्टी लोक येऊन रेफाईम खोऱ्‍यात पसरले.+ १९ तेव्हा दावीदने यहोवाला विचारलं:+ “मी पलिष्ट्यांवर हल्ला करू का? तू त्यांना माझ्या हाती देशील का?” त्यावर यहोवा दावीदला म्हणाला: “जा, त्यांच्यावर हल्ला कर. कारण मी पलिष्ट्यांना नक्की तुझ्या हाती देईन.”+ २० म्हणून मग दावीद बाल-परासीम इथे आला आणि त्याने पलिष्ट्यांवर हल्ला करून त्यांना मारून टाकलं. मग दावीद म्हणाला: “यहोवा माझ्यापुढे जाऊन पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूंवर तुटून पडला+ आणि त्याने त्यांचा नाश केला.” त्यामुळे दावीदने त्या जागेचं नाव बाल-परासीम* असं ठेवलं.+ २१ पलिष्टी लोक आपल्या मूर्ती तिथेच सोडून पळून गेले. दावीद आणि त्याच्या माणसांनी त्या मूर्ती उचलून नेल्या.

२२ नंतर पलिष्टी लोक पुन्हा एकदा आले आणि रेफाईम खोऱ्‍यात पसरले.+ २३ तेव्हा काय करावं याबद्दल दावीदने यहोवाला विचारलं. त्यावर तो त्याला म्हणाला: “त्यांच्यावर समोरून हल्ला करू नकोस; तर त्यांना वळसा घालून त्यांच्या पाठीमागे जा. आणि मग तुतीच्या झाडांसमोर त्यांच्यावर हल्ला कर. २४ तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून तुला चाल करून येणाऱ्‍या सैन्याचा आवाज येईल तेव्हा लगेच हल्ला कर. कारण पलिष्ट्यांच्या सैन्याचा नाश करायला यहोवा आधीच पुढे गेलेला असेल.” २५ मग, यहोवाने जसं सांगितलं होतं अगदी तसंच दावीदने केलं. आणि तो गेबापासून+ गेजेरपर्यंत+ पलिष्ट्यांना तलवारीने मारत गेला.+

६ दावीदने पुन्हा एकदा इस्राएलमधल्या सैनिकांच्या सगळ्यात चांगल्या तुकड्या जमा केल्या. त्या सैनिकांची संख्या ३०,००० इतकी होती. २ मग दावीद आणि त्याच्यासोबतची सर्व माणसं बाले-यहूदा इथून खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी आणण्यासाठी निघाली.+ लोक त्या पेटीसमोर, करुबांच्या वर* विराजमान असलेला+ सैन्यांचा देव यहोवा याच्या नावाचा धावा करायचे.+ ३ पण टेकडीवर असलेल्या अबीनादाबच्या घरातून+ खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी नेण्यासाठी, त्यांनी ती एका नव्या गाडीवर+ ठेवली. आणि अबीनादाबची मुलं, म्हणजे उज्जा व अहयो हे दोघं ती गाडी हाकत होते.

४ अशा रितीने त्यांनी खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी, टेकडीवर असलेल्या अबीनादाबच्या घरातून बाहेर आणली. आणि अहयो हा त्या पेटीच्या पुढे चालत होता. ५ दावीद आणि इस्राएलचं संपूर्ण घराणं यहोवासमोर आनंदोत्सव करत होतं. ते सर्व गंधसरूच्या लाकडाची वेगवेगळी वाद्यं, वीणा, इतर तंतुवाद्यं,+ डफ,+ झांजा+ आणि छोट्या झांजा वाजवून आनंदोत्सव करत होते. ६ पण ते नाखोनच्या खळ्याजवळ* आले, तेव्हा बैल अडखळले आणि कराराची पेटी पडायला लागली. म्हणून उज्जाने आपला हात पुढे करून खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी धरली.+ ७ तेव्हा, यहोवाचा क्रोध उज्जावर भडकला आणि देवाच्या नियमाचा अनादर केल्यामुळे+ खऱ्‍या देवाने त्याला तिथेच मारून टाकलं.+ तो खऱ्‍या देवाच्या कराराच्या पेटीजवळ मेला. ८ पण यहोवाचा क्रोध उज्जावर भडकल्यामुळे दावीदला राग आला;* आणि आजपर्यंत ते ठिकाण पेरेस-उज्जा* या नावाने ओळखलं जातं. ९ त्या दिवशी दावीदला यहोवाची फार दहशत बसली+ आणि तो म्हणाला: “मी यहोवाच्या कराराची पेटी माझ्या इथे कशी काय आणू?”+ १० यहोवाच्या कराराची पेटी आपल्या शहरात, म्हणजे दावीदपुरात+ न्यायला दावीद तयार नव्हता. त्यामुळे त्याने ती पेटी ओबेद-अदोम+ या गित्ती माणसाच्या घरी नेली.

११ ओबेद-अदोम या गित्ती माणसाच्या घरी यहोवाच्या कराराची पेटी तीन महिने राहिली. या काळात यहोवा ओबेद-अदोमला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वादित करत राहिला.+ १२ दावीद राजाला खबर मिळाली: “खऱ्‍या देवाच्या कराराच्या पेटीमुळे यहोवाने ओबेद-अदोमच्या कुटुंबाचं कल्याण केलंय आणि त्याचं जे काही आहे ते सर्व आशीर्वादित केलंय.” म्हणून मग, दावीद मोठ्या आनंदाने खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी दावीदपुरात आणायला ओबेद-अदोमच्या घरी गेला.+ १३ यहोवाच्या कराराची पेटी वाहून नेणारे+ जेव्हा सहा पावलं चालून गेले, तेव्हा दावीदने एका बैलाचं आणि एका धष्टपुष्ट प्राण्याचं बलिदान दिलं.

१४ दावीद मोठ्या आवेशाने यहोवापुढे नाचत होता; त्या वेळी त्याने मलमलीचं* एफोद घातलं होतं.*+ १५ दावीद आणि त्याच्यासोबत इस्राएलचं संपूर्ण घराणं आनंदाने जयघोष करत+ आणि शिंग फुंकत,+ यहोवाच्या कराराची पेटी+ घेऊन येत होतं. १६ यहोवाच्या कराराची पेटी दावीदपुरात येत असताना शौलच्या मुलीने, मीखलने+ खिडकीतून खाली पाहिलं. तेव्हा दावीद यहोवापुढे नाचत-बागडत असल्याचा तिला दिसला. आणि ती मनातल्या मनात त्याला तुच्छ लेखू लागली.+ १७ दावीदने यहोवाच्या कराराच्या पेटीसाठी जो तंबू उभा केला होता,+ त्यात त्यांनी ती पेटी आणून ठेवली. त्यानंतर दावीदने यहोवासमोर+ होमार्पणं+ आणि शांती-अर्पणं वाहिली.+ १८ होमार्पणं आणि शांती-अर्पणं वाहिल्यानंतर त्याने सैन्यांचा देव यहोवा याच्या नावाने सर्व लोकांना आशीर्वाद दिला. १९ तसंच त्याने सर्व लोकांना, म्हणजे इस्राएलच्या समूहातल्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला एक भाकर,* खजुराची एक ढेप आणि मनुकांची एक ढेप दिली. त्यानंतर सर्व लोक आपापल्या घरी निघून गेले.

२० मग दावीद आपल्या कुटुंबातल्या लोकांना आशीर्वाद द्यायला घरी आला. तेव्हा शौलची मुलगी मीखल+ त्याला भेटायला बाहेर आली. ती त्याला म्हणाली: “एखादा मूर्ख माणूस जसा उघडा-नागडा होतो, तसा इस्राएलचा राजा जेव्हा आज आपल्या सेवकांच्या दासींसमोर उघडा झाला, तेव्हा त्याने स्वतःला किती वैभवशाली बनवलं!”+ २१ त्यावर दावीद मीखलला म्हणाला: “ज्याने तुझ्या बापाऐवजी आणि त्याच्या संपूर्ण घराण्याऐवजी मला निवडलं, त्या यहोवासमोर मी आनंदोत्सव करत होतो. यहोवाने मला त्याच्या लोकांचा, इस्राएलचा पुढारी म्हणून नेमलं.+ म्हणून यहोवासमोर मी आनंदोत्सव करणारच. २२ आणि मी स्वतःला याहून जास्त लीन करीन आणि स्वतःला आपल्या नजरेत आणखी कमी करीन. पण तू ज्या दासींबद्दल बोललीस त्या माझा गौरव करतील.” २३ म्हणून शौलची मुलगी मीखल+ हिला मरेपर्यंत मूलबाळ झालं नाही.

७ दावीद राजा आपल्या राजमहालात* राहू लागला+ आणि यहोवाने त्याला आसपासच्या सर्व शत्रूंपासून आराम दिला. २ तेव्हा दावीद राजा, नाथान+ संदेष्ट्याला म्हणाला: “इथे मी देवदार लाकडाने बनलेल्या घरात राहतोय.+ पण खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी मात्र कापडाच्या तंबूत आहे.”+ ३ त्यावर नाथान राजाला म्हणाला: “तुझ्या मनात आहे तसं कर. कारण यहोवा तुझ्याबरोबर आहे.”+

४ त्याच रात्री नाथानला यहोवाकडून असा संदेश मिळाला: ५ “माझा सेवक दावीद याच्याकडे जा आणि त्याला सांग, ‘यहोवा असं म्हणतो: “तुला माझ्यासाठी राहायला घर बांधायचंय का?+ ६ पण, मी इस्राएली लोकांना इजिप्तमधून* बाहेर आणलं त्या दिवसापासून आजपर्यंत मी कधीच कुठल्याही घरात राहिलो नाही.+ तंबूत किंवा उपासना मंडपात+ राहूनच मी एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी जात राहिलो. ७ त्या संपूर्ण काळात, मी सर्व इस्राएली लोकांसोबत ठिकठिकाणी गेलो. माझ्या इस्राएली लोकांचा सांभाळ करायला मी इस्राएली वंशांच्या पुढाऱ्‍यांना नेमलं. पण त्यांच्यापैकी कोणालाही मी कधी एका शब्दाने असं म्हटलं का, की ‘तू माझ्यासाठी देवदाराचं घर का बांधलं नाहीस?’”’ ८ तर आता माझा सेवक दावीद याला सांग, ‘सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “तू माळरानात मेंढरांच्या मागे फिरत होतास,+ तेव्हा मी तुला माझ्या इस्राएली लोकांचा पुढारी होण्यासाठी तिथून काढून आणलं.+ ९ तू जिथे कुठे जाशील तिथे मी तुझ्यासोबत असेन.+ मी तुझे सर्व शत्रू तुझ्यापुढून नाहीसे करीन.+ तसंच, मी तुझं नाव पृथ्वीवरच्या महान पुरुषांसारखं मोठं करीन.+ १० मी माझ्या इस्राएली लोकांसाठी एक ठिकाण नेमून देईन आणि त्यांना तिथे स्थायिक करीन. ते तिथे राहतील आणि यापुढे कोणीही त्यांना त्रास देणार नाही; दुष्ट लोक पूर्वीप्रमाणे पुन्हा त्यांच्यावर जुलूम करणार नाहीत.+ ११ माझ्या इस्राएली लोकांवर मी न्यायाधीश नेमले+ त्या काळापासून घडत आलं, तसं यापुढे घडणार नाही; दुष्ट लोक पुन्हा त्यांच्यावर जुलूम करणार नाहीत. आणि तुझ्या सर्व शत्रूंपासून मी तुला आराम देईन.+

तसंच यहोवा तुला असंही म्हणाला, की यहोवा तुझ्यासाठी एक राजघराणं तयार करेल.*+ १२ तुझ्या आयुष्याचे दिवस संपून+ तुझा मृत्यू होईल,* तेव्हा मी तुझ्या संततीला,* तुझ्या पोटच्या मुलाला तुझ्यानंतर राजा बनवीन. आणि मी त्याचं राज्य स्थापन करून ते स्थिर करीन.+ १३ माझ्या नावाचा गौरव करण्यासाठी तोच एक घर बांधेल+ आणि मी त्याचं राजासन स्थापन करून कायमचं स्थिर करीन.+ १४ मी त्याचा पिता होईन आणि तो माझा मुलगा होईल.+ तो जर चुकला तर मी त्याची चूक सुधारीन* आणि माणसं* फटके देऊन शिक्षा करतात, तशी मी त्याला शिक्षा करीन.+ १५ मी त्याच्यावर एकनिष्ठ प्रेम करण्याचं कधीही सोडणार नाही. ज्या शौलला मी तुझ्यापुढून काढून टाकलं, त्याच्यावर जसं एकनिष्ठ प्रेम करण्याचं मी सोडून दिलं,+ तसं मी त्याच्या बाबतीत करणार नाही. १६ तुझं घराणं आणि तुझं राज्य तुझ्यापुढे कायम सुरक्षित राहील; तुझं राजासन स्थापित होऊन कायम स्थिर राहील.”’”+

१७ नाथानने या सगळ्या गोष्टी आणि हा संपूर्ण दृष्टान्त दावीदला सांगितला.+

१८ तेव्हा दावीद राजा यहोवापुढे येऊन बसला आणि म्हणाला: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा! मी कोण आणि माझं घराणं तरी काय? पण तरीसुद्धा तू माझ्यासाठी इतकं काही केलंस.+ १९ आणि हेसुद्धा कमी म्हणून की काय, हे सर्वोच्च प्रभू यहोवा! तुझ्या या सेवकाचं घराणं भविष्यात दूरपर्यंत टिकून राहील असंही तू म्हणतोस; आणि हा नियम,* हे सर्वोच्च प्रभू यहोवा, सर्व मानवांसाठी आहे. २० हे सर्वोच्च प्रभू यहोवा, तुझ्या सेवकाला, दावीदला तू चांगलं ओळखतोस.+ तर आता मी आणखी काय बोलणार? २१ तू या सर्व महान गोष्टी आपल्या मनाप्रमाणे आणि वचन दिल्याप्रमाणे केल्यास आणि तुझ्या या सेवकाला सांगितल्यास.+ २२ म्हणूनच हे सर्वोच्च प्रभू यहोवा, तू खरोखर महान आहेस.+ तुझ्यासारखा कोणीही नाही+ आणि तुझ्याशिवाय दुसरा कोणीही देव नाही;+ आम्ही आजपर्यंत आमच्या कानांनी जे काही ऐकलं, त्यावरून आम्ही हे खातरीने म्हणू शकतो. २३ या संपूर्ण पृथ्वीवर तुझ्या इस्राएली लोकांसारखं कोणतं राष्ट्र आहे?+ हे देवा, आपले लोक होण्याकरता तू जाऊन त्यांची सुटका केलीस.+ त्यांच्यासाठी महान आणि अद्‌भुत कार्यं+ करून तू आपलं नाव मोठं केलंस.+ तू ज्यांची इजिप्तमधून सुटका केलीस, त्या आपल्या लोकांसाठी तू राष्ट्रांना आणि त्यांच्या दैवतांना त्यांच्यापुढून घालवून दिलंस. २४ तू इस्राएली लोकांना कायमसाठी आपलं केलंस+ आणि हे यहोवा, तू त्यांचा देव बनलास.+

२५ आता हे यहोवा देवा, तुझ्या या सेवकाच्या बाबतीत आणि त्याच्या घराण्याच्या बाबतीत तू जे वचन दिलंस ते सर्वकाळ पाळ. आणि तू जसं म्हणालास तसंच होऊ दे.+ २६ तुझं नाव सदासर्वकाळ उंचावलं जावो.+ म्हणजे ‘सैन्यांचा देव यहोवा हाच इस्राएलचा देव आहे,’ असं लोक म्हणतील. आणि तुझ्या या सेवकाचं, दावीदचं घराणं कायम तुझ्यापुढे स्थापित असो.+ २७ कारण हे सैन्यांच्या देवा यहोवा, इस्राएलच्या देवा तू आपल्या सेवकाला सांगितलंस, की ‘मी तुझ्यासाठी एक राजघराणं तयार करीन.’*+ आणि म्हणून ही विनंती करण्याची हिंमत तुझ्या या सेवकाला झाली. २८ हे सर्वोच्च प्रभू यहोवा, तूच खरा देव आहेस आणि तुझी वचनं खरी आहेत.+ आणि तुझ्या या सेवकासाठी तू या चांगल्या गोष्टी करण्याचं वचन दिलं आहेस. २९ तेव्हा, तुझ्या या सेवकाच्या घराण्याला आशीर्वाद देण्यात तुला आनंद मिळो आणि ते तुझ्यासमोर कायम टिकून राहो.+ कारण हे सर्वोच्च प्रभू यहोवा, तूच हे वचन दिलंस. आणि तुझ्या आशीर्वादाने तुझ्या या सेवकाचं घराणं कायम आशीर्वादित होवो.”+

८ काही काळानंतर, दावीदने पलिष्टी+ लोकांना हरवून त्यांच्यावर कब्जा केला+ आणि त्यांच्या हातून मेथेग-अम्मा हे शहर घेतलं.

२ त्याने मवाबी+ लोकांनाही हरवलं. मग त्याने त्यांना जमिनीवर एका रांगेत झोपायला सांगितलं आणि मोजमाप करण्याच्या दोरीने ती रांग मापली. दोन मापं दोरीमध्ये जितके मावले त्यांना मारून टाकण्यासाठी आणि एक माप दोरीमध्ये जितके मावले त्यांना जिवंत ठेवण्यासाठी त्याने ती रांग मापली.+ अशा प्रकारे मवाबी लोक दावीदचे सेवक बनले आणि त्याला कर* देऊ लागले.+

३ हदद-एजर हा फरात नदीजवळच्या+ प्रदेशावर आपला अधिकार पुन्हा मिळवण्यासाठी जात होता तेव्हा दावीदने त्याला हरवलं; हदद-एजर हा सोबाचा+ राजा रहोब याचा मुलगा होता. ४ दावीदने त्याचे १,७०० घोडेस्वार आणि २०,००० पायदळ सैनिक जिंकून घेतले. मग त्याच्या रथांचे १०० घोडे सोडून, दावीदने बाकीच्या सगळ्या घोड्यांच्या पायांच्या शिरा* कापून टाकल्या.+

५ सोबाचा राजा हदद-एजरची मदत करायला दिमिष्कमधून+ सीरियाचे लोक आले, तेव्हा दावीदने त्यांचे २२,००० लोक मारून टाकले.+ ६ मग दावीदने दिमिष्कच्या सीरियामध्ये सैनिकांच्या चौक्या बनवल्या. आणि सीरियाचे लोक दावीदचे सेवक बनले व त्याला कर* देऊ लागले. दावीद जिथे कुठे जायचा तिथे यहोवा त्याला विजय मिळवून द्यायचा.+ ७ याशिवाय, दावीदने हदद-एजेरच्या सेवकांकडून सोन्याच्या गोलाकार ढालीसुद्धा घेतल्या आणि त्या यरुशलेममध्ये आणल्या.+ ८ तसंच, दावीद राजाने बेरोथा आणि बेटा या हदद-एजरच्या शहरांतून अतिशय मोठ्या प्रमाणात तांबं आणलं.

९ दावीदने हदद-एजरच्या संपूर्ण सैन्याला हरवलं आहे, हे हमाथचा+ राजा तोई याने ऐकलं.+ १० तेव्हा तोईने आपला मुलगा योराम याला दावीदची ख्यालीखुशाली विचारायला आणि दावीदने हदद-एजरशी लढाई करून त्याला हरवलं म्हणून त्याचं अभिनंदन करायला पाठवलं. (कारण हदद-एजरने अनेकदा तोईशी लढाई केली होती.) योराम आपल्याबरोबर चांदीच्या, सोन्याच्या आणि तांब्याच्या वस्तू घेऊन आला. ११ या सगळ्या वस्तू दावीद राजाने यहोवासाठी पवित्र म्हणून वेगळ्या काढून ठेवल्या. इतर राष्ट्रांना हरवून त्यांच्याकडून आणलेल्या सोन्या-चांदीप्रमाणेच त्याने याही वस्तू पवित्र म्हणून वेगळ्या ठेवल्या.+ १२ त्याने ही लूट सीरिया आणि मवाबमधून,+ तसंच अम्मोनी, पलिष्टी,+ अमालेकी+ यांच्याकडून आणि सोबाचा राजा रहोब याचा मुलगा हदद-एजर+ याच्याकडून मिळवली होती. १३ याशिवाय, दावीद जेव्हा १८,००० अदोमी लोकांना क्षार खोऱ्‍यात मारून परत आला,+ तेव्हा त्याचं मोठं नाव झालं. १४ त्याने अदोममध्ये सैनिकांच्या चौक्या बनवल्या; त्याने संपूर्ण अदोममध्ये चौक्या बनवल्या आणि सर्व अदोमी लोक दावीदचे सेवक बनले.+ दावीद जिथे कुठे जायचा तिथे यहोवा त्याला विजय मिळवून द्यायचा.+

१५ दावीद संपूर्ण इस्राएलवर राज्य करत राहिला.+ त्याने आपल्या सर्व लोकांवर+ न्यायाने आणि नीतीने शासन केलं.+ १६ सरूवाचा मुलगा यवाब+ हा त्याचा सेनापती होता. आणि अहीलूदचा मुलगा यहोशाफाट+ इतिहास-लेखक होता. १७ अहीटूबचा मुलगा सादोक+ आणि अब्याथारचा मुलगा अहीमलेख हे दोघं याजक होते, तर सराया हा सचिव होता. १८ यहोयादाचा मुलगा बनाया+ हा करेथी आणि पलेथी+ लोकांवर अधिकारी होता. आणि दावीदची मुलं खास मंत्री बनली.*

९ पुढे दावीदने विचारलं: “शौलच्या घराण्यातलं कोणी अजून जिवंत आहे का? असेल तर योनाथानसाठी त्याला दया* दाखवायची माझी इच्छा आहे.”+ २ त्या वेळी शौलच्या घराण्यात सीबा+ नावाचा एक सेवक होता. त्यांनी त्याला दावीद राजाकडे आणलं आणि दावीदने त्याला विचारलं: “तूच सीबा आहेस का?” त्यावर तो म्हणाला: “हो मीच तो, आपला सेवक.” ३ पुढे राजाने त्याला विचारलं: “शौलच्या घराण्यातलं कोणी अजून जिवंत आहे का? कारण मला त्याच्यावर देवासारखी दया* करायची इच्छा आहे.” तेव्हा सीबा म्हणाला: “हो, योनाथानचा एक मुलगा अजून जिवंत आहे; तो दोन्ही पायांनी अधू आहे.”+ ४ मग राजाने त्याला विचारलं: “तो कुठे आहे?” त्यावर सीबा म्हणाला: “तो लो-दबार इथे, अम्मीएलचा मुलगा माखीर+ याच्या घरी आहे.”

५ तेव्हा दावीद राजाने लगेच माणसं पाठवली आणि त्याला लो-दबारमधून अम्मीएलचा मुलगा माखीर याच्या घरून बोलावून घेतलं. ६ योनाथानचा मुलगा, म्हणजे शौलचा नातू मफीबोशेथ दावीदकडे आला, तेव्हा त्याने लगेच जमिनीवर पडून दावीदला दंडवत घातला. मग दावीद म्हणाला: “मफीबोशेथ!” त्यावर तो म्हणाला: “हो माझ्या प्रभू.” ७ दावीद त्याला म्हणाला: “घाबरू नकोस. तुझे वडील योनाथान यांच्यासाठी मी नक्की तुला दया* दाखवीन.+ तुझे आजोबा, शौल यांची सगळी जमीन मी तुला परत करीन, आणि तू नेहमी माझ्यासोबत माझ्या मेजावर जेवशील.”+

८ तेव्हा तो राजाला दंडवत घालून म्हणाला: “माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्याकडे तुम्ही लक्ष द्यावं,+ अशी तुमच्या या सेवकाची लायकी तरी काय?” ९ राजाने मग शौलचा सहायक सीबा याला बोलावून घेतलं आणि तो त्याला म्हणाला: “शौलच्या आणि त्याच्या घराण्याच्या मालकीचं जे काही होतं, ते सगळं मी तुझ्या मालकाच्या नातवाला देतोय.+ १० तू, तुझी मुलं आणि तुझे सेवक, तुम्ही सगळे त्याच्यासाठी शेती कराल आणि जमिनीचा उपज गोळा कराल. म्हणजे तुझ्या मालकाच्या नातवाचे जे कोणी असतील त्यांच्या खाण्यापिण्याची सोय होईल. पण तुझ्या मालकाचा नातू, मफीबोशेथ मात्र कायम माझ्यासोबत माझ्या मेजावर जेवण करेल.”+

सीबाला १५ मुलं होती आणि त्याच्याकडे २० सेवक होते.+ ११ तेव्हा सीबा राजाला म्हणाला: “हे राजा, माझ्या प्रभू, तुम्ही तुमच्या या सेवकाला जी आज्ञा दिलीत, त्याप्रमाणे तुमचा हा सेवक सगळं काही करेल.” अशा प्रकारे, मफीबोशेथ दावीदच्या इतर मुलांप्रमाणे दावीदसोबत* त्याच्या मेजावर जेवू लागला. १२ मफीबोशेथला मीखा+ नावाचा एक लहान मुलगाही होता; आणि सीबाच्या घरात राहणारे सगळे मफीबोशेथचे सेवक बनले. १३ मफीबोशेथ यरुशलेममध्येच राहिला. कारण तो नेहमी राजाच्या मेजावर जेवायचा;+ तो दोन्ही पायांनी अधू होता.+

१० पुढे अम्मोनी+ लोकांच्या राजाचा मृत्यू झाला. आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा हानून+ हा राजा बनला. २ तेव्हा दावीद म्हणाला: “नाहाशचा मुलगा हानून याच्यावर मी दया* करीन. कारण त्याच्या वडिलांनीसुद्धा माझ्यावर दया केली होती.”* हानूनच्या वडिलांचा मृत्यू झाला होता, म्हणून दावीदने त्याचं सांत्वन करण्यासाठी आपले काही सेवक त्याच्याकडे पाठवले. पण दावीदचे सेवक जेव्हा अम्मोनी लोकांच्या देशात आले, ३ तेव्हा अम्मोनी लोकांचे अधिकारी आपल्या प्रभूला, हानूनला म्हणाले: “तुम्हाला काय वाटतं, दावीदने खरंच तुमच्या वडिलांचा सन्मान करण्यासाठी आणि तुमचं सांत्वन करण्यासाठी आपली माणसं पाठवली आहेत काय? नाही! खरंतर शहर उलथून टाकावं, म्हणून हेरगिरी करायला आणि शहराची पाहणी करायला दावीदने त्याच्या सेवकांना तुमच्याकडे पाठवलंय.” ४ त्यामुळे मग हानूनने दावीदच्या सेवकांना पकडून त्यांच्या अर्ध्या दाढ्या कापल्या.+ तसंच, त्यांच्या झग्यांचा कमरेखालचा भाग कापून टाकला आणि त्यांना पाठवून दिलं. ५ दावीदने हे ऐकलं, तेव्हा त्याने लगेच त्या सेवकांना भेटायला काही माणसं पाठवली. कारण त्या सेवकांचा घोर अपमान झाला होता. राजाने आपल्या माणसांच्या हातून त्यांना असा निरोप पाठवला: “तुमच्या दाढ्या वाढत नाहीत तोपर्यंत यरीहोतच+ राहा आणि मग परत या.”

६ काही काळाने अम्मोनी लोकांना समजलं, की दावीद आपला तिरस्कार करू लागला आहे. म्हणून त्यांनी इतर देशांत आपली माणसं पाठवली आणि भाडोत्री सैनिक गोळा केले: बेथ-रहोब+ आणि सोबा+ इथे राहणारे सीरियाचे २०,००० पायदळ सैनिक; माका+ राजा व त्याचे १,००० सैनिक आणि इशतोबचे* १२,००० सैनिक त्यांनी मागवले.+ ७ ही गोष्ट दावीदच्या कानावर आली, तेव्हा त्याने यवाबला आणि आपल्या संपूर्ण सैन्याला, तसंच आपल्या सगळ्यात शूर योद्ध्यांना लढाईला पाठवलं.+ ८ मग अम्मोनी लोक बाहेर पडले आणि सैन्यदलाप्रमाणे शहराच्या दरवाजासमोर तैनात झाले. आणि सोबा व रहोब इथले सीरियाचे सैनिक, तसंच इशतोब* व माकाचे सैनिक दुसरीकडे खुल्या मैदानात उतरले.

९ शत्रूच्या सैन्याने आपल्याला मागून-पुढून घेरलं आहे हे यवाबने पाहिलं, तेव्हा त्याने इस्राएली सैनिकांच्या सगळ्यात चांगल्या तुकड्या निवडल्या आणि सीरियाच्या सैनिकांचा सामना करण्यासाठी त्यांना सैन्यदलाप्रमाणे तैनात केलं;+ १० तर अम्मोनी+ लोकांचा सामना करण्यासाठी बाकीच्या सैनिकांना सैन्यदलाप्रमाणे तैनात करता यावं, म्हणून त्याने त्यांना आपला भाऊ अबीशय+ याच्या हाताखाली दिलं. ११ मग तो म्हणाला: “सीरियाचे लोक जर माझ्यावर प्रबळ झाले, तर तू मला मदत करायला ये. आणि जर अम्मोनी लोक तुझ्यावर प्रबळ झाले, तर मी तुझ्या मदतीला येईन. १२ आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या शहरांसाठी आपण हिंमत धरून धैर्याने लढूयात;+ आणि यहोवाला जसं योग्य वाटेल तसं तो करेल.”+

१३ मग, यवाब आणि त्याची माणसं जेव्हा सीरियाच्या लोकांचा सामना करण्यासाठी पुढे गेली, तेव्हा त्यांनी त्यांच्यापासून पळ काढला.+ १४ सीरियाचे लोक पळून गेल्याचं पाहून अम्मोनी लोकांनीही अबीशयपुढून पळ काढला आणि ते आपल्या शहरात गेले. त्यानंतर यवाब अम्मोनी लोकांना सोडून यरुशलेममध्ये परत आला.

१५ इस्राएलपुढे आपण हरलो हे पाहून, सीरियाचे लोक पुन्हा एकदा एकत्र जमले.+ १६ हदद-एजरने+ आपली माणसं पाठवून नदीजवळच्या*+ प्रदेशातल्या सीरियाच्या माणसांना बोलावलं. आणि हदद-एजरचा सेनापती शोबख याच्या नेतृत्वाखाली ते हेलाम या ठिकाणी आले.

१७ दावीदला ही खबर मिळताच, त्याने लगेच सर्व इस्राएलला जमा केलं आणि यार्देन पार करून तो हेलाम इथे गेला. तिथे सीरियाचे लोक दावीदचा सामना करण्यासाठी सैन्यदलाप्रमाणे तैनात झाले आणि त्यांनी त्याच्याशी युद्ध केलं.+ १८ पण सीरियाच्या लोकांनी इस्राएलपुढून पळ काढला; दावीदने रथांवर स्वार असलेल्या सीरियाच्या ७०० माणसांना आणि ४०,००० घोडेस्वारांना मारून टाकलं. तसंच, त्याने त्यांचा सेनापती शोबख याच्यावर वार केला आणि तो तिथेच मेला.+ १९ इस्राएलने आपल्याला हरवून टाकलं आहे, हे हदद-एजरच्या अधीन असलेल्या सर्व राजांनी पाहिलं, तेव्हा त्यांनी लगेच इस्राएलसोबत शांतीचा करार केला आणि ते इस्राएलच्या अधीन झाले;+ त्यानंतर सीरियाच्या लोकांनी अम्मोनी लोकांना मदत करायची धास्ती घेतली.

११ वर्षाच्या सुरुवातीला,* जेव्हा राजे युद्धाच्या मोहिमांवर जायचे तेव्हा दावीदने यवाबला, त्याच्या सेवकांना आणि इस्राएलच्या संपूर्ण सैन्याला अम्मोनी लोकांचा नाश करायला पाठवलं. त्यांनी जाऊन राब्बा+ शहराला वेढा घातला. पण दावीद मात्र यरुशलेममध्येच राहिला.+

२ एकदा, संध्याकाळच्या वेळी* दावीद आपल्या पलंगावरून उठला आणि राजमहालाच्या छतावर फिरू लागला. तिथून त्याने एका स्त्रीला अंघोळ करताना पाहिलं. ती स्त्री दिसायला फार सुंदर होती. ३ दावीदने मग तिची चौकशी करायला एका सेवकाला पाठवलं. तेव्हा त्याने येऊन दावीदला सांगितलं: “ती अलीयमची मुलगी+ आणि उरीया+ हित्ती+ याची बायको बथशेबा+ आहे.” ४ मग दावीदने तिला बोलावून आणण्यासाठी आपल्या काही माणसांना पाठवलं.+ ती स्त्री त्याच्याकडे आली तेव्हा त्याने तिच्याशी संबंध ठेवले.+ (आपली अशुद्धता* दूर करण्यासाठी ती स्वतःला शुद्ध करत असताना हे घडलं.)+ त्यानंतर ती स्त्री आपल्या घरी निघून गेली.

५ पुढे त्या स्त्रीला दिवस गेले आणि तिने दावीदला असा निरोप पाठवला: “मी गरोदर आहे.” ६ तेव्हा दावीदने यवाबला संदेश पाठवला: “उरीया हित्तीला माझ्याकडे पाठव.” म्हणून यवाबने उरीयाला दावीदकडे पाठवलं. ७ उरीया आला तेव्हा दावीदने त्याला यवाब व त्याचे सैनिक यांच्याविषयी विचारलं आणि युद्धाबद्दल चौकशी केली. ८ दावीद मग उरीयाला म्हणाला: “आता आपल्या घरी जा आणि आराम कर.” उरीया जेव्हा राजमहालातून बाहेर पडला, तेव्हा राजाकडून त्याला भेट* पाठवण्यात आली. ९ पण उरीया आपल्या घरी गेला नाही. तो आपल्या प्रभूच्या इतर सेवकांसोबत राजमहालाच्या दरवाजाजवळच झोपला. १० “उरीया आपल्या घरी गेला नाही,” असं दावीदला सांगण्यात आलं. तेव्हा तो उरीयाला म्हणाला: “तू नुकताच प्रवासाहून आला आहेस ना? मग तू घरी का गेला नाहीस?” ११ त्यावर उरीया दावीदला म्हणाला: “तिकडे देवाच्या कराराची पेटी+ आणि इस्राएलची व यहूदाची माणसं तंबूंत राहत आहेत; माझे प्रभू यवाब आणि माझ्या प्रभूचे सेवक हे सगळे खुल्या मैदानात तळ ठोकून आहेत. मग अशा वेळी मी खाणंपिणं करायला आणि बायकोसोबत झोपायला घरी कसं जाऊ शकतो?+ तुमची, तुमच्या जिवाची शपथ, मी असं मुळीच करणार नाही!”

१२ मग दावीद उरीयाला म्हणाला: “आजसुद्धा इथेच राहा. मग उद्या मी तुला पाठवून देईन.” म्हणून त्या दिवशी आणि दुसऱ्‍या दिवशीही उरीया यरुशलेममध्येच राहिला. १३ दावीदने मग त्याला आपल्यासोबत खाणंपिणं करायला बोलावून घेतलं. त्याने त्याला दारू पाजून धुंद केलं. मग संध्याकाळ झाली तेव्हा उरीया बाहेर पडला आणि आपल्या बिछान्यावर आपल्या प्रभूच्या सेवकांजवळ जाऊन झोपला; पण तो आपल्या घरी गेला नाही. १४ सकाळी दावीदने यवाबला एक पत्र लिहिलं आणि ते उरीयाच्या हाती पाठवलं. १५ पत्रात त्याने असं लिहिलं: “युद्धभूमीवर जिथे भयंकर युद्ध चालू असेल तिथे अगदी समोर उरीयाला उभं करा. मग तिथून मागे हटा, म्हणजे उरीयावर वार होऊन तो मारला जाईल.”+

१६ यवाब त्या शहरावर बारीक लक्ष ठेवून होता, आणि शूर योद्धे कोणत्या ठिकाणी तैनात आहेत हे त्याला चांगलं माहीत होतं. म्हणून त्याने उरीयाला त्या ठिकाणी तैनात केलं. १७ शहरातल्या माणसांनी बाहेर येऊन यवाबशी लढाई केली, तेव्हा दावीदचे काही सेवक मारले गेले; त्यांच्यात उरीया हित्ती हासुद्धा होता.+ १८ यवाबने मग दावीदला युद्धाची सगळी बातमी कळवली. १९ त्याने निरोप घेऊन जाणाऱ्‍या दूताला अशी सूचना दिली: “राजाला युद्धाबद्दलची सगळी माहिती दिल्यावर, २० राजा कदाचित संतापेल आणि तुला म्हणेल, ‘युद्ध करायला तुम्हाला शहराच्या इतक्या जवळ जायची काय गरज होती? ते लोक भिंतीवरून तुमच्यावर बाण सोडतील हे तुम्हाला माहीत नव्हतं का? २१ यरुब्बेशेथचा*+ मुलगा अबीमलेख याला कोणी मारलं?+ एका स्त्रीने तेबेसच्या तटावरून त्याच्यावर जात्याचा वरचा दगड फेकून त्याला मारून टाकलं की नाही? मग तुम्ही कशाला तटाच्या इतक्या जवळ गेलात?’ तेव्हा तू असं म्हण: ‘तुमचा सेवक उरीया हित्ती हासुद्धा मारला गेला.’”

२२ म्हणून तो दूत दावीदकडे गेला, आणि यवाबने त्याला जे काही सांगायला पाठवलं होतं ते सगळं त्याने त्याला सांगितलं. २३ मग तो दूत दावीदला म्हणाला: “शत्रू आमच्यावर प्रबळ ठरले आणि त्यांनी बाहेर मैदानात येऊन आमच्यावर हल्ला केला. पण आम्ही त्यांचा सामना करून त्यांना परत शहराच्या दरवाजापर्यंत रेटलं. २४ आणि तिरंदाजांनी शहराच्या तटावरून तुमच्या सेवकांवर बाण सोडले, तेव्हा राजाचे काही सेवक मारले गेले; त्यात तुमचा सेवक उरीया हित्तीसुद्धा मारला गेला.”+ २५ तेव्हा दावीद त्या दूताला म्हणाला: “यवाबला म्हण: ‘या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नकोस. कारण तलवार कधीही भेदभाव करत नाही, ती कोणाचाही जीव घेते. तेव्हा शहरावर आणखी जोरदार हल्ला कर आणि ते काबीज कर.’+ असं म्हणून यवाबला धीर दे.”

२६ आपल्या नवऱ्‍याचा मृत्यू झालाय हे ऐकून उरीयाची बायको त्याच्यासाठी शोक करू लागली. २७ तिचा शोक करण्याचा काळ संपला तेव्हा दावीदने लगेच माणसं पाठवून तिला आपल्या घरी आणलं. ती दावीदची बायको झाली+ आणि तिने त्याच्या मुलाला जन्म दिला. पण दावीदने जे काही केलं होतं ते यहोवाच्या नजरेत फार वाईट होतं.+

१२ म्हणून यहोवाने नाथानला+ दावीदकडे पाठवलं. नाथान दावीदकडे आला+ आणि त्याला म्हणाला: “एका शहरात दोन माणसं राहत होती. एक श्रीमंत, तर दुसरा गरीब. २ श्रीमंत माणसाकडे भरपूर मेंढरं आणि गुरंढोरं होती.+ ३ पण गरीब माणसाकडे एका लहानशा मेंढीशिवाय दुसरं काहीच नव्हतं.+ त्याने ती विकत आणून तिची चांगली काळजी घेतली. ती त्याच्या मुलाबाळांसोबत त्याच्यासमोर वाढली. ती त्याच्या घासातला घास खायची, त्याच्या प्याल्यातून पाणी प्यायची आणि त्याच्या कुशीत झोपायची. त्या माणसासाठी ती त्याच्या मुलीसारखीच झाली होती. ४ एकदा श्रीमंत माणसाच्या घरी एक पाहुणा आला. पण त्याच्याकडे आलेल्या त्या प्रवाशासाठी जेवण बनवायला त्याने स्वतःच्या मेंढरांतून किंवा गुराढोरांतून काहीएक घेतलं नाही. त्याऐवजी, त्याने त्या गरीब माणसाची ती मेंढी घेतली आणि त्या पाहुण्यासाठी जेवण तयार केलं.”+

५ हे ऐकून दावीदला त्या माणसाचा भयंकर राग आला. आणि तो नाथानला म्हणाला: “जिवंत देव यहोवाची शपथ,+ ज्या माणसाने हे केलं त्याला मृत्युदंड मिळालाच पाहिजे! ६ त्याने काही दयामाया न दाखवता हे कृत्य केलंय. म्हणून त्या मेंढीच्या बदल्यात त्याला चार पटीने भरपाई करावीच लागेल.”+

७ मग नाथान दावीदला म्हणाला: “तो माणूस तूच आहेस! इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: ‘मीच तुला इस्राएलचा राजा म्हणून अभिषिक्‍त केलं होतं.+ आणि मीच तुला शौलच्या हातून वाचवलं होतं.+ ८ मी तुला तुझ्या मालकाचं घराणं+ आणि तुझ्या मालकाच्या बायका दिल्या.+ तसंच इस्राएलचं आणि यहूदाचं घराणंही मी तुला दिलं.+ आणि जर तेही कमी पडलं असतं, तर मी तुझ्यासाठी आणखी बरंच काही करायला तयार होतो.+ ९ तर मग, यहोवाच्या नजरेत जे वाईट आहे ते करून तू त्याला* तुच्छ का लेखलंस? तू उरीया हित्तीला तलवारीने मारून टाकलंस!+ अम्मोनी लोकांच्या तलवारीने त्याचा खून करून+ तू त्याची बायको आपली बायको करून घेतलीस.+ १० पाहा! आता तुझ्या घरातून तलवार कधीही दूर होणार नाही.+ कारण तू मला तुच्छ लेखलंस आणि उरीया हित्तीची बायको आपली बायको करून घेतलीस.’ ११ यहोवा म्हणतो: ‘मी तुझ्याच घरातून तुझ्यावर संकटं आणीन.+ तुझ्या डोळ्यांसमोर मी तुझ्या बायका घेऊन दुसऱ्‍या माणसाला* देईन.+ आणि तो भरदिवसा तुझ्या बायकांसोबत संबंध ठेवेल.+ १२ तू गुप्तपणे हे काम केलंस.+ पण मी संपूर्ण इस्राएलच्या समोर, दिवसाढवळ्या हे घडवून आणीन.’”

१३ तेव्हा दावीद नाथानला म्हणाला: “मी यहोवाविरुद्ध पाप केलंय.”+ त्यावर नाथान दावीदला म्हणाला: “यहोवानेही तुझं पाप माफ केलंय.+ तू मरणार नाहीस.+ १४ पण हे कृत्य करून तू यहोवाचा घोर अनादर केलास. म्हणून जो मुलगा तुला नुकताच झालाय तो निश्‍चितच मरेल.”

१५ मग नाथान आपल्या घरी निघून गेला.

इकडे, उरीयाच्या बायकोला दावीदपासून जो मुलगा झाला होता त्याला यहोवाने आजारी पाडलं. १६ दावीद त्या मुलासाठी खऱ्‍या देवापुढे कळकळून विनंती करू लागला. त्याने कडक उपास केले आणि रोज रात्री तो आपल्या खोलीत जाऊन जमिनीवर पडून राहायचा.+ १७ त्याच्या घरातल्या वडीलधाऱ्‍या माणसांनी त्याच्याकडे येऊन त्याला जमिनीवरून उठवण्याचा प्रयत्न केला. पण तो काही केल्या उठेना. त्याने त्यांच्यासोबत काही खायलाही नकार दिला. १८ मग सातव्या दिवशी त्या मुलाचा मृत्यू झाला. पण दावीदला ही गोष्ट सांगायला त्याचे सेवक घाबरत होते. ते म्हणाले: “मूल जिवंत असताना आपण त्यांच्याशी बोलायला गेलो, तेव्हाच ते आपलं ऐकायला तयार नव्हते, तर आता मूल मरण पावलंय हे आपण त्यांना कसं सांगणार? त्यांनी आपल्या जिवाचं काही बरंवाईट करून घेतलं तर!”

१९ दावीदने जेव्हा आपल्या सेवकांना एकमेकांसोबत कुजबूज करताना पाहिलं, तेव्हा त्याने ओळखलं की मूल मेलं आहे. त्याने आपल्या सेवकांना विचारलं: “मूल गेलं का?” त्यावर ते म्हणाले: “हो, मूल गेलं.” २० तेव्हा दावीद जमिनीवरून उठला. त्याने अंघोळ केली, अंगाला तेल लावलं+ आणि कपडे बदलले. मग यहोवाच्या मंडपात* जाऊन+ त्याने देवाला दंडवत घातला. त्यानंतर तो आपल्या घरी गेला. त्याने जेवण वाढायला सांगितलं आणि तो जेवला. २१ त्याच्या सेवकांनी त्याला विचारलं: “तुम्ही असं का केलंत? मूल जिवंत होतं तोपर्यंत तुम्ही उपासतापास केला आणि शोक करत राहिलात. पण मूल गेल्याबरोबर तुम्ही उठलात आणि जेवलात. असं का?” २२ त्यावर तो म्हणाला: “मूल जिवंत होतं तेव्हा मी उपास केला+ आणि त्याच्यासाठी शोक केला; कारण मी असा विचार केला, की ‘कोण जाणे कदाचित यहोवा माझ्यावर कृपा करेल आणि मुलाला जिवंत राहू देईल.’+ २३ पण जर आता मूल राहिलंच नाही, तर मी उपास का करू? मी काय त्याला परत आणू शकतो?+ मी त्याच्याकडे जाईन,+ पण मूल मात्र माझ्याकडे परत येणार नाही.”+

२४ मग दावीदने आपल्या बायकोचं, बथशेबाचं+ सांत्वन केलं. पुढे तो तिच्याजवळ गेला आणि त्याने तिच्याशी संबंध ठेवले. काही काळाने, तिला एक मुलगा झाला आणि त्याचं नाव शलमोन*+ ठेवण्यात आलं. यहोवाचं त्याच्यावर खूप प्रेम होतं.+ २५ म्हणून त्याने नाथान संदेष्ट्याच्या हाती असा निरोप पाठवला,+ की यहोवासाठी त्या मुलाचं नाव यदीद्या* असं ठेव.

२६ इकडे, यवाब अम्मोनी+ लोकांच्या राब्बा+ शहराविरुद्ध लढत राहिला आणि त्याने ते राजधानीचं शहर* काबीज केलं.+ २७ मग यवाबने दूतांच्या हातून दावीदला निरोप पाठवून म्हटलं: “मी राब्बा+ शहराविरुद्ध लढलो आणि पाण्याचं शहर* काबीज केलंय. २८ आता सैनिकांच्या बाकीच्या तुकड्या एकत्र करा आणि शहराला वेढा घालून त्यावर कब्जा करा. नाहीतर, मी त्या शहरावर कब्जा करायचो आणि त्याचं श्रेय मलाच मिळायचं.”*

२९ म्हणून मग दावीदने सैनिकांच्या सर्व तुकड्या जमा केल्या आणि तो राब्बा शहराकडे गेला. त्या शहराशी लढाई करून त्याने ते काबीज केलं. ३० मग त्याने मल्कामच्या* डोक्यावरचा मुकुट काढून घेतला. मुकुटातल्या सोन्याचं वजन एक तालान्त* इतकं होतं. याशिवाय, त्यात मौल्यवान रत्नंही जडलेली होती. तो मुकुट दावीदच्या डोक्यावर ठेवण्यात आला. दावीदने त्या शहरातून+ अतिशय मोठ्या प्रमाणात लुटीचा मालही आणला.+ ३१ त्याने त्या शहरातल्या लोकांना बाहेर काढलं आणि त्यांना करवतीने दगड कापण्याच्या कामाला लावलं. तसंच, त्याने त्यांना धारदार लोखंडी हत्यारं व कुऱ्‍हाडी वापरून मजुरीची कामं करायला आणि विटा बनवायच्या कामाला लावलं. त्याने अम्मोनी लोकांच्या सर्व शहरांच्या बाबतीत असंच केलं. शेवटी, दावीद आणि त्याचे सर्व सैनिक यरुशलेमला परत आले.

१३ दावीदचा मुलगा अबशालोम याची एक बहीण होती. ती खूप सुंदर असून तिचं नाव तामार+ होतं. दावीदच्या मुलाचं, अम्नोनचं+ तिच्यावर प्रेम जडलं. २ आपली बहीण तामार हिच्यामुळे तो इतका बेचैन झाला, की तो आजारी पडला. कारण, ती कुमारी होती आणि तिच्यासोबत काही करण्याची शक्यता त्याला दिसत नव्हती. ३ अम्नोनचा यहोनादाब+ नावाचा एक मित्र होता. तो दावीदचा भाऊ शिमाह+ याचा मुलगा होता. यहोनादाब हा अतिशय चतुर होता. ४ तो अम्नोनला म्हणाला: “तू राजाचा मुलगा असून इतका उदास-उदास का वाटतोस? मला सांग काय झालंय.” त्यावर अम्नोन त्याला म्हणाला: “माझा भाऊ अबशालोम याची बहीण तामार हिच्यावर माझं मन बसलंय.”+ ५ यहोनादाब त्याला म्हणाला: “असं कर, आपल्या बिछान्यावर पडून राहा आणि आजारी असल्याचं सोंग कर. मग तुझे वडील तुला भेटायला आले की त्यांना म्हण, ‘कृपा करून माझी बहीण तामार हिला माझ्याकडे पाठवा. म्हणजे ती मला काहीतरी खायला बनवून देईल. तिने जर आजाऱ्‍यांना दिलं जाणारं जेवण माझ्यासमोर तयार केलं, तर मी ते तिच्या हातून खाईन.’”

६ म्हणून मग अम्नोन आजारी असल्याचं सोंग करून पडून राहिला. राजा त्याला भेटायला आला तेव्हा तो राजाला म्हणाला: “कृपा करून माझी बहीण तामार हिला माझ्याकडे पाठवा. म्हणजे ती माझ्यासमोर दोन भाकरी* तयार करून मला आपल्या हाताने भरवेल.” ७ तेव्हा दावीदने घरी तामारला असा निरोप पाठवला: “तुझा भाऊ अम्नोन याच्या घरी जा आणि त्याच्यासाठी जेवण* तयार कर.” ८ म्हणून मग तामार आपला भाऊ अम्नोन याच्या घरी गेली. तो बिछान्यावर पडून होता. तिने त्याच्यासमोर पीठ घेऊन ते मळलं आणि त्यापासून भाकरी बनवल्या. ९ मग तिने त्या भाकरी एका ताटात घालून अम्नोनसमोर ठेवल्या. पण अम्नोन त्या खायला तयार झाला नाही. तो म्हणाला: “सगळ्यांना बाहेर पाठवून द्या!” म्हणून सगळे जण बाहेर गेले.

१० अम्नोन मग तामारला म्हणाला: “माझ्या झोपायच्या खोलीत जेवण घेऊन ये, म्हणजे मी ते तुझ्या हातून खाईन.” म्हणून मग तामार, तयार केलेल्या त्या भाकरी* घेऊन आपला भाऊ अम्नोन याच्या झोपायच्या खोलीत गेली. ११ तिने त्या भाकरी त्याला खायला दिल्या, तेव्हा त्याने तिला धरलं आणि तो तिला म्हणाला: “ये माझ्या बहिणी, माझ्याजवळ येऊन झोप.” १२ पण ती त्याला म्हणाली: “नाही माझ्या भावा! माझ्यावर जबरदस्ती करू नकोस! असं कृत्य इस्राएलमध्ये घडायला नको.+ तू असलं नीच काम करू नकोस.+ १३ माझी बेअब्रू झाली तर मी कशी जगणार? आणि तुला तर इस्राएलमधल्या निर्लज्ज माणसांमध्ये गणलं जाईल. त्याऐवजी कृपा करून राजाशी बोल. माझा हात तुझ्या हातात द्यायला ते नाही म्हणणार नाहीत.” १४ पण तो तिचं काहीएक ऐकायला तयार नव्हता. त्याने तिच्यावर जबरदस्ती करून तिच्यावर बलात्कार केला आणि तिला बेअब्रू केलं. १५ त्यानंतर अम्नोनला तिचा भयंकर तिरस्कार वाटू लागला. तो आधी तिच्यावर जितकं प्रेम करायचा, त्यापेक्षा कितीतरी जास्त आता तो तिचा तिरस्कार करू लागला. तो तिला म्हणाला: “ऊठ, चालती हो!” १६ तेव्हा ती त्याला म्हणाली: “नाही माझ्या भावा, असं करू नकोस. तू माझ्यासोबत जे केलं, त्यापेक्षा मला आता हाकलून देणं हे जास्त वाईट आहे!” पण तो तिचं काहीही ऐकायला तयार नव्हता.

१७ तेव्हा त्याने आपल्या एका तरुण सेवकाला बोलावून म्हटलं: “हिला माझ्या नजरेसमोरून दूर कर आणि दार बंद करून घे!” १८ (त्या वेळी तामारने एक खास* झगा घातला होता; कारण त्या काळात राजाच्या कुमारी मुली अशीच वस्त्रं घालायच्या.) म्हणून मग अम्नोनच्या सेवकाने तिला घराबाहेर काढलं आणि दार बंद करून घेतलं. १९ मग तामारने आपल्या डोक्यावर राख टाकली+ व अंगावरचा तो खास झगा फाडला. आणि आपल्या डोक्यावर हात ठेवून ती मोठमोठ्याने रडत निघून गेली.

२० तेव्हा तिच्या भावाने, अबशालोमने+ तिला विचारलं: “हे तुझ्यासोबत तुझ्या भावाने, अम्नोनने केलंय का? पण माझ्या बहिणी ऐक, याविषयी कोणालाही काही सांगू नकोस. तो तुझा भाऊ आहे.+ तेव्हा यावर जास्त विचार करू नकोस.” मग, तामार आपला भाऊ अबशालोम याच्या घरात एकाकी जीवन जगू लागली. २१ दावीद राजाने हे सगळं ऐकलं तेव्हा त्याला फार राग आला.+ पण त्याला अम्नोनचं मन दुखवायचं नव्हतं. कारण तो त्याचा पहिला मुलगा होता आणि त्याच्यावर त्याचं खूप प्रेम होतं. २२ अबशालोम अम्नोनचा द्वेष करू लागला.+ कारण त्याने त्याच्या बहिणीची, तामारची बेअब्रू केली होती.+ पण तो अम्नोनला बरंवाईट काहीच बोलला नाही.

२३ या घटनेच्या दोन वर्षांनंतर, अबशालोमने एफ्राईमजवळ+ असलेल्या बआल-हासोर इथे मेंढरांची लोकर कातरण्यासाठी माणसं बोलावली. आणि त्याने राजाच्या सर्व मुलांना आमंत्रण दिलं.+ २४ अबशालोम राजाकडे येऊन म्हणाला: “आपल्या सेवकाच्या मेंढरांच्या लोकरीची कातरणी आहे. तेव्हा राजाने आवर्जून आपल्या सर्व सेवकांसोबत यावं.” २५ पण राजा अबशालोमला म्हणाला: “नको माझ्या मुला. आम्ही सगळेच आलो तर उगाच तुझ्यावर जास्त भार पडेल.” अबशालोमने बराच आग्रह करूनही राजा काही जायला तयार झाला नाही. पण त्याने त्याला आशीर्वाद दिला. २६ मग अबशालोम म्हणाला: “ठीक आहे. तुम्ही येत नसाल तर निदान माझा भाऊ अम्नोन याला तरी आमच्यासोबत पाठवा.”+ त्यावर राजा म्हणाला: “त्याने तुझ्यासोबत का जावं?” २७ पण अबशालोमने खूप आग्रह केला. त्यामुळे मग राजाने अम्नोनला आणि आपल्या सगळ्या मुलांना त्याच्यासोबत पाठवलं.

२८ मग अबशालोमने आपल्या सेवकांना अशी आज्ञा दिली: “अम्नोनवर लक्ष ठेवा. तो जेव्हा द्राक्षारस पिऊन धुंद होईल त्या वेळी मी तुम्हाला म्हणीन, ‘अम्नोनला ठार मारा!’ तेव्हा तुम्ही त्याला मारून टाका. अजिबात घाबरू नका. मी सांगतोय ना तुम्हाला? म्हणून हिंमत धरा आणि शौर्य दाखवा.” २९ मग अबशालोमने जसं सांगितलं होतं, अगदी तसंच त्याच्या सेवकांनी अम्नोनच्या बाबतीत केलं. तेव्हा राजाची बाकीची सर्व मुलं उठली आणि आपापल्या खेचरावर बसून पळून गेली. ३० ते सर्व रस्त्यात असतानाच दावीदला अशी खबर मिळाली: “अबशालोमने राजाच्या सगळ्या मुलांना मारून टाकलंय. त्यातला एकही वाचला नाही.” ३१ ते ऐकून राजा उठला आणि दुःखाने आपले कपडे फाडून तो जमिनीवर पडून राहिला. तेव्हा त्याच्या सर्व सेवकांनीसुद्धा आपले कपडे फाडले आणि ते त्याच्याजवळ उभे राहिले.

३२ पण दावीदचा भाऊ शिमाह+ याचा मुलगा यहोनादाब+ दावीदला म्हणाला: “हे माझ्या प्रभू, असा गैरसमज करून घेऊ नका, की अबशालोमने राजाच्या सगळ्या मुलांना मारून टाकलंय; त्याने फक्‍त अम्नोनला ठार मारलंय.+ आणि हे सगळं अबशालोमच्या हुकमावरून झालंय.+ कारण, ज्या दिवशी अम्नोनने तामारची+ अब्रू लुटली+ त्या दिवसापासूनच त्याने असं करायचं ठरवून टाकलं होतं. ३३ तेव्हा हे माझ्या प्रभू, ‘राजाची सर्व मुलं मरण पावलीत’ या बातमीवर राजाने विश्‍वास ठेवू नये. कारण फक्‍त अम्नोन मरण पावलाय.”

३४ इकडे, अबशालोम पळून गेला.+ नंतर शहराच्या पहारेकऱ्‍याने समोर नजर टाकली, तेव्हा डोंगराकडच्या रस्त्याने पुष्कळसे लोक येत असल्याचं त्याला दिसलं. ३५ त्यावर यहोनादाब+ राजाला म्हणाला: “पाहा! राजाची मुलं परत आली आहेत. तुमचा हा सेवक बरोबर बोलला होता.” ३६ त्याचं बोलणं संपलं ना संपलं तोच राजाची मुलं मोठमोठ्याने रडत आत आली. त्यांच्यासोबत राजा आणि त्याचे सर्व सेवकसुद्धा खूप रडले. ३७ पण अबशालोम तलमय याच्याकडे पळून गेला;+ तलमय हा गशूरचा राजा अम्मीहूद याचा मुलगा होता. दावीदने आपला मुलगा अम्नोन याच्यासाठी बरेच दिवस शोक केला. ३८ अबशालोम गशूरला+ पळून गेल्यावर तीन वर्षं तिथेच राहिला.

३९ शेवटी, दावीद राजाला अबशालोमला भेटायची खूप ओढ लागली. कारण आतापर्यंत तो अम्नोनच्या मृत्यूच्या दुःखातून सावरला होता.

१४ सरूवाचा मुलगा यवाब+ याच्या लक्षात आलं, की राजाचं मन अबशालोमसाठी आतुर झालं आहे.+ २ म्हणून मग यवाबने तकोवा+ इथून एका चतुर स्त्रीला बोलावून घेतलं. तो तिला म्हणाला: “शोकवस्त्रं घालून शोक करत असल्याचं सोंग घे. अंगाला तेल लावू नकोस+ आणि असं दाखव, की तू कोणाच्यातरी मृत्यूसाठी खूप दिवसांपासून शोक करत आहेस. ३ आणि राजाकडे जाऊन असं-असं बोल.” मग राजाशी काय बोलायचं हे यवाबने तिला सांगितलं.

४ तकोवाची ती स्त्री मग राजाकडे गेली आणि तिने जमिनीवर डोकं टेकवून त्याला दंडवत घातला. ती त्याला म्हणाली: “हे राजा! मला मदत करा!” ५ तेव्हा तो तिला म्हणाला: “काय झालं?” त्यावर ती म्हणाली: “मी एक विधवा आहे; माझा नवरा मेलाय. ६ तुमच्या या दासीला दोन मुलं होती. ती दोघं शेतात एकमेकांसोबत भांडायला लागली. पण त्यांचं भांडण सोडवायला कोणीही नव्हतं. आणि त्यांच्यातल्या एकाने दुसऱ्‍यावर वार करून त्याला ठार मारलं. ७ आता सगळे नातेवाईक माझ्याविरुद्ध उठलेत. ते आपल्या या दासीला म्हणत आहेत: ‘ज्याने आपल्या भावाला मारलं त्याला आमच्या हवाली कर. म्हणजे आपल्या भावाचा खून केल्याबद्दल आम्ही त्याचा जीव घेऊ;+ मग त्यामुळे तुझ्या कुटुंबात कोणी वारस राहिला नाही तरी चालेल!’ ते माझा उरलेला शेवटचा जळता निखारा* विझवून टाकतील. आणि मग पृथ्वीवरून माझ्या नवऱ्‍याचं नाव व त्याचे वंशज नाहीसे होतील.”

८ तेव्हा राजा त्या स्त्रीला म्हणाला: “तू आपल्या घरी जा. तुझ्यासंबंधाने मी एक आदेश काढीन.” ९ त्यावर तकोवाची ती स्त्री राजाला म्हणाली: “हे राजा, माझ्या प्रभू! माझ्या मुलाच्या अपराधाचा दोष माझ्यावर आणि माझ्या वडिलांच्या घराण्यावर येवो. आणि तुम्ही व तुमचं राजघराणं निर्दोष राहो.” १० राजा मग तिला म्हणाला: “आता जर कोणी तुला काही बोललं, तर त्याला माझ्याकडे घेऊन ये. मग तो परत कधीही तुला त्रास देणार नाही.” ११ तेव्हा ती म्हणाली: “हे राजा, कृपया तुमचा देव यहोवा याची आठवण ठेवा. म्हणजे, रक्‍ताचा सूड घेणारा+ माझ्या मुलाला ठार मारून माझ्या दुःखात आणखी भर घालणार नाही.” त्यावर राजा म्हणाला: “जिवंत देव यहोवाची शपथ,+ तुझ्या मुलाच्या केसालाही धक्का लागणार नाही.” १२ मग ती स्त्री म्हणाली: “हे राजा, माझ्या प्रभू! तुमच्या या दासीला आणखी काही बोलायची परवानगी असावी.” त्यावर राजा म्हणाला: “बोल!”

१३ ती स्त्री म्हणाली: “हे राजा, देवाच्या लोकांचं+ नुकसान होईल असं तुम्ही का वागलात? तुम्ही स्वतःच्या मुलाला हद्दपार केलंत आणि त्याला परतही आणत नाहीत.+ म्हणून, तुम्ही नुकतंच जे म्हणालात त्यावरून तुम्ही स्वतः दोषी ठरता. १४ मरण हे सगळ्यांना येणारच, आणि जमिनीवर पडलेलं पाणी जसं पुन्हा भरून घेता येत नाही, तसं आपलंही होईल. देव कोणाचाही जीव घेत नाही; उलट, हद्दपार केलेला माणूस कायमचा आपल्यापासून हद्दपारीत राहू नये, म्हणून त्याला परत आणण्याची कारणं तो शोधतो. १५ हे राजा, माझ्या प्रभू! लोकांनी मला घाबरवून सोडलं, म्हणून मी ही गोष्ट बोलायला इथे आले. कारण तुमच्या या दासीने विचार केला: ‘मी याविषयी राजाशी बोलून बघते; कदाचित राजा आपल्या या दासीची विनंती मान्य करेल. १६ माझं म्हणणं ऐकून राजा कदाचित आपल्या या दासीला त्या माणसाच्या हातून वाचवेल, जो मला आणि माझ्या मुलाला देवाने दिलेल्या वारशाच्या प्रदेशातून नाहीसं करायला बघतोय.’+ १७ मग आपल्या या दासीने विचार केला: ‘राजाच्या, माझ्या प्रभूंच्या शब्दांनी मला दिलासा मिळेल.’ कारण बऱ्‍या-वाइटात फरक करण्यात माझे राजे, माझे प्रभू अगदी खऱ्‍या देवाच्या स्वर्गदूतासारखे आहेत. तुमचा देव यहोवा तुमच्यासोबत असो.”

१८ राजा मग त्या स्त्रीला म्हणाला: “मी आता तुला जे काही विचारीन ते मला सांग. माझ्यापासून काहीही लपवू नकोस.” त्यावर ती स्त्री म्हणाली: “हो माझ्या प्रभू. राजाला जे काही विचारायचं असेल ते त्यांनी विचारावं.” १९ तेव्हा राजाने विचारलं: “हे सगळं तुला यवाबने करायला सांगितलं ना?”+ त्यावर ती स्त्री म्हणाली: “हे राजा, माझ्या प्रभू तुमच्या जिवाची शपथ, तुम्ही अगदी बरोबर बोललात. तुमचे सेवक यवाब यांनीच मला हे सगळं करायला सांगितलं. आणि हे सगळं बोलायला त्यांनीच तुमच्या या दासीला शिकवून पाठवलं. २० या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता यावं, म्हणून तुमचे सेवक यवाब यांनी मला हे सगळं करायला पाठवलं. पण माझे प्रभू हे खऱ्‍या देवाच्या स्वर्गदूतासारखे बुद्धिमान आहेत, आणि देशात काय चाललंय हे सगळं त्यांना माहीत आहे.”

२१ नंतर राजा यवाबला म्हणाला: “ठीक आहे. तू म्हणतोस तसं मी करीन.+ जा आणि त्या तरुणाला, अबशालोमला परत घेऊन ये.”+ २२ तेव्हा यवाबने जमिनीवर डोकं टेकवून राजाला दंडवत घातला. आणि राजाची स्तुती करून तो म्हणाला: “हे राजा, माझ्या प्रभू! आपल्या या सेवकाची विनंती तुम्ही मान्य केलीत. आज तुमच्या या सेवकाला खातरी पटली आहे, की तुमची माझ्यावर कृपा आहे.” २३ मग यवाब गशूरला+ गेला आणि अबशालोमला यरुशलेममध्ये घेऊन आला. २४ पण राजा म्हणाला: “तो त्याच्या घरी परत येऊ शकतो, पण त्याने माझं तोंड पाहू नये.” म्हणून अबशालोम आपल्या घरी परतला, पण तो राजासमोर आला नाही.

२५ संपूर्ण इस्राएलमध्ये अबशालोमसारखा देखणा कोणीही नव्हता. त्याच्या देखणेपणाची लोक तोंड भरून प्रशंसा करायचे. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत त्याच्यात कोणताही दोष नव्हता. २६ त्याला आपल्या डोक्याच्या केसांचा भार सहन व्हायचा नाही, म्हणून तो दरवर्षी आपले केस कापायचा. तो केस कापायचा तेव्हा शाही वजनाप्रमाणे* त्यांचं वजन २.३ किलो* इतकं भरायचं. २७ अबशालोमला तीन मुलं+ आणि एक मुलगी होती. त्याच्या मुलीचं नाव तामार असून ती फार सुंदर होती.

२८ अबशालोमला यरुशलेममध्ये येऊन पूर्ण दोन वर्षं झाली होती, पण तो राजाला भेटू शकला नाही.+ २९ म्हणून मग अबशालोमने यवाबला राजाकडे पाठवण्यासाठी बोलावलं, पण तो काही आला नाही. मग त्याने दुसऱ्‍यांदा यवाबला बोलावणं पाठवलं, पण तरीही त्याने यायला नकार दिला. ३० शेवटी, अबशालोम आपल्या सेवकांना म्हणाला: “माझ्या शेताच्या शेजारीच यवाबचं शेत आहे. आणि त्यात जवाचं पीक आलंय. जा आणि त्याला आग लावून टाका.” म्हणून मग अबशालोमच्या सेवकांनी यवाबच्या शेताला आग लावली. ३१ तेव्हा यवाब अबशालोमच्या घरी आला आणि त्याला म्हणाला: “तुझ्या सेवकांनी माझ्या शेताला आग का लावली?” ३२ त्यावर अबशालोम यवाबला म्हणाला: “हे बघ, मी तुला निरोप पाठवला होता, की ‘माझ्याकडे ये, म्हणजे मी तुला राजाकडे असं विचारायला पाठवीन: “मी गशूरमधून इथे कशाला आलोय?+ त्यापेक्षा मी तिथेच राहिलो असतो तर बरं झालं असतं. आता मला राजाला भेटायची परवानगी मिळावी. आणि मी जर दोषी असेन, तर राजाने मला मृत्युदंड द्यावा.”’”

३३ मग यवाब राजाकडे जाऊन याविषयी बोलला. म्हणून राजाने अबशालोमला बोलावलं. अबशालोम आला आणि त्याने जमिनीवर डोकं टेकवून राजाला दंडवत घातला, आणि राजाने त्याचा मुका घेतला.+

१५ या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर, अबशालोमने आपल्यासाठी एक रथ व काही घोडे घेतले, आणि आपल्यापुढे धावण्यासाठी त्याने ५० माणसं ठेवली.+ २ अबशालोम रोज सकाळी लवकर उठून शहराच्या दरवाजाकडे जाणाऱ्‍या रस्त्याच्या कडेला उभा राहायचा.+ एखादा माणूस राजाकडे आपलं काही प्रकरण घेऊन न्याय मागायला आला,+ की अबशालोम त्याला बोलावून म्हणायचा: “तू कोणत्या शहरातून आलास?” तेव्हा तो माणूस म्हणायचा: “आपला हा दास इस्राएलच्या अमुक एका वंशातला आहे.” ३ मग अबशालोम त्याला म्हणायचा: “हे बघ, तुझा दावा अगदी योग्य आणि खरा आहे. पण तुझं प्रकरण ऐकून घेणारा राजाच्या वतीने कोणीही नाही.” ४ पुढे अबशालोम म्हणायचा: “या देशात न्यायाधीश म्हणून मला नेमलं असतं, तर किती बरं झालं असतं! मग ज्या कोणाची काही तक्रार किंवा प्रकरण असेल, तो ते माझ्याकडे आणू शकला असता. आणि मी त्याला नक्कीच न्याय दिला असता.”

५ एखादा माणूस अबशालोमला दंडवत घालायला पुढे आला, की अबशालोम हात पुढे करून त्याला धरायचा आणि त्याचा मुका घ्यायचा.+ ६ राजाकडे न्याय मागायला येणाऱ्‍या सर्व इस्राएली लोकांसोबत तो असंच वागायचा. अशा प्रकारे, अबशालोम इस्राएलच्या सगळ्या लोकांची मनं जिंकू लागला.+

७ पुढे चार वर्षांनी* अबशालोम दावीद राजाला म्हणाला: “कृपा करून मला हेब्रोनला+ जाऊ द्या. म्हणजे मी यहोवाला जो नवस केला होता तो मला फेडता येईल. ८ कारण, आपला हा सेवक सीरियातल्या गशूरमध्ये+ असताना त्याने असा नवस+ केला होता, की ‘यहोवाने जर मला यरुशलेममध्ये परत आणलं, तर मी यहोवासाठी अर्पण वाहीन.’”* ९ त्यावर राजा त्याला म्हणाला: “ठीक आहे, शांतीने जा.” तेव्हा तो निघाला आणि हेब्रोनला गेला.

१० अबशालोमने मग इस्राएलच्या सर्व वंशांमध्ये जासूद पाठवून असं सांगितलं, की “शिंग फुंकल्याचा आवाज ऐकताच अशी घोषणा करा: ‘अबशालोम हेब्रोनमध्ये+ राजा बनलाय!’” ११ अबशालोम हेब्रोनला गेला तेव्हा त्याच्यासोबत यरुशलेममधून २०० माणसं गेली होती. त्याच्या आमंत्रणावरून ती भोळ्या मनाने गेली होती; त्यांना कुठल्याही गोष्टीची कल्पना नव्हती. १२ नंतर, बलिदानं अर्पण करत असताना अबशालोमने दावीदचा सल्लागार+ अहिथोफेल+ याला बोलावून घेतलं; तो गिलो+ इथला राहणारा होता. अबशालोमने रचलेला कट जोर धरत गेला, आणि त्याला पाठिंबा देणाऱ्‍या लोकांची संख्याही वाढत गेली.+

१३ इकडे, खबर आणणाऱ्‍या एकाने दावीदला येऊन सांगितलं: “इस्राएलच्या लोकांची मनं अबशालोमकडे वळली आहेत.” १४ हे ऐकून दावीद यरुशलेममध्ये आपल्यासोबत असलेल्या सगळ्या सेवकांना म्हणाला: “चला, आपण इथून पळून जाऊ.+ नाहीतर आपल्यापैकी कोणीही अबशालोमच्या हातून सुटणार नाही! निघा लवकर, नाहीतर तो इथे पोहोचायचा आणि आपला व या शहराचा तलवारीने नाश करायचा.”+ १५ तेव्हा राजाचे सेवक त्याला म्हणाले: “आमच्या प्रभूला, राजाला जसं ठीक वाटेल तसं आम्ही करू.”+ १६ म्हणून मग राजा आपल्या सर्व घराण्याला घेऊन निघाला. पण त्याने आपल्या दहा उपपत्नींना+ राजमहाल सांभाळायला तिथेच ठेवलं. १७ राजा निघाला तेव्हा त्याच्या पाठोपाठ सगळे लोकही निघाले, आणि ते बेथ-मरहाक इथे येऊन थांबले.

१८ राजासोबत निघालेले त्याचे सर्व सेवक; तसंच करेथी, पलेथी+ आणि गथमधून+ त्याच्याबरोबर आलेली ६०० गित्ती+ माणसं राजासमोरून जात असताना राजा त्यांची पाहणी करत होता. १९ तेव्हा दावीद, गथच्या राहणाऱ्‍या इत्तयला+ म्हणाला: “तू का येतोस आमच्याबरोबर? परत जा आणि नवीन राजासोबत राहा. कारण, तू विदेशी असून आपल्या देशातून हद्दपार केलेला आहेस. २० तू काल-परवाच आलेला माणूस आहेस. आणि मी कुठे जाणार हे माझं मलाच माहीत नाही. मग मी तुला आमच्यासोबत इकडे-तिकडे भटकायला कसं लावू? तर आता आपल्या भावांना घेऊन परत जा. यहोवा तुझ्यावर एकनिष्ठ प्रेम करो आणि तुझ्याशी विश्‍वासूपणे वागो!”+ २१ पण इत्तय राजाला म्हणाला: “जिवंत देव यहोवाची शपथ, आणि माझे प्रभू, माझे राजे तुमच्या जिवाची शपथ! माझे प्रभू, माझे राजे तुम्ही जिथे कुठे जाल तिथे मी तुमच्यासोबत येईन; मग त्यासाठी मला मरावं लागलं तरी चालेल!”+ २२ तेव्हा दावीद इत्तयला+ म्हणाला: “ठीक आहे. चल ये आमच्यासोबत.” म्हणून मग गथचा राहणारा इत्तय हा आपल्या सगळ्या माणसांना आणि मुलाबाळांना घेऊन दावीदसोबत गेला.

२३ राजा जेव्हा किद्रोन खोऱ्‍याजवळ+ उभा होता आणि सगळे लोक खोरं पार करून जात होते, तेव्हा त्या प्रदेशातले सगळे लोक मोठमोठ्याने रडू लागले. दावीदसोबतचे सर्व लोक खोरं पार करून ओसाड रानाकडे जाणाऱ्‍या रस्त्याने जाऊ लागले. २४ त्या वेळी सादोक+ आणि त्याच्यासोबत खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी+ घेऊन जाणारे सगळे लेवीही+ आले.+ आणि त्यांनी खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी खाली ठेवली. सगळ्या लोकांनी शहरातून निघून खोरं पार केलं तेव्हा अब्याथारही+ तिथे होता. २५ पण राजा सादोकला म्हणाला: “खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी परत शहरात घेऊन जा.+ यहोवाने जर माझ्यावर कृपा केली, तर तो मला परत आणेल आणि ही कराराची पेटी आणि तिचं निवासस्थान+ मला दाखवेल. २६ पण जर तो म्हणाला: ‘मी तुझ्यावर प्रसन्‍न नाही,’ तर मग त्याच्या दृष्टीने जे योग्य असेल, ते तो माझ्या बाबतीत करो.” २७ राजा पुढे सादोक याजकाला म्हणाला: “तुम्ही द्रष्टा*+ आहात ना? मग शांतीने परत शहरात जा. आणि तुमची मुलं, म्हणजे अहीमास आणि अब्याथारचा मुलगा योनाथान+ यांनाही आपल्यासोबत घेऊन जा. २८ आणि पाहा, तुमच्याकडून काही खबर मिळत नाही तोपर्यंत मी ओसाड रानाच्या उतारांजवळच राहीन.”+ २९ म्हणून मग, सादोक आणि अब्याथार यांनी खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी परत यरुशलेमला नेली, आणि ते तिथेच राहिले.

३० दावीद मग जैतुनांच्या डोंगरावर+ चढून जाऊ लागला, आणि जात असताना तो रडत होता. त्याचं डोकं झाकलेलं होतं आणि तो अनवाणी चालत होता. त्याच्यासोबत असलेल्या सगळ्या लोकांनीही आपापलं डोकं झाकलं होतं आणि तेसुद्धा रडतरडत चालले होते. ३१ दावीदला तेव्हा सांगण्यात आलं: “अबशालोमसोबत+ कट करणाऱ्‍यांमध्ये अहिथोफेलसुद्धा आहे.”+ तेव्हा दावीद म्हणाला: “हे यहोवा!+ कृपया, अहिथोफेलचा सल्ला मूर्खपणाचा समजला जाईल असं कर.”+

३२ मग डोंगरमाथ्यावर जिथे लोक देवाची उपासना करायचे, तिथे दावीद पोहोचला. हूशय+ अर्की+ हा त्याला भेटायला तिथे आला होता; त्याने आपला झगा फाडला होता आणि डोक्यात धूळ टाकली होती. ३३ पण दावीद त्याला म्हणाला: “तू जर माझ्यासोबत आलास, तर मला भार होशील. ३४ त्यापेक्षा शहरात परत जा आणि अबशालोमला असं म्हण: ‘हे राजा, मी तुमचा सेवक! पूर्वी मी तुमच्या वडिलांचा सेवक होतो, पण आता तुमचा सेवक आहे.’+ म्हणजे मग तू अहिथोफेलचा सल्ला निष्फळ करून माझी मदत करू शकशील.+ ३५ शिवाय सादोक आणि अब्याथार हे दोघं याजकही तिथे तुझ्यासोबत आहेत. राजाच्या घरात तू जे काही ऐकशील ते सादोक आणि अब्याथार याजकांना सांग.+ ३६ पाहा! तिथे त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलंसुद्धा, म्हणजे सादोकचा मुलगा अहीमास+ आणि अब्याथारचा मुलगा योनाथान+ हेसुद्धा आहेत. तुम्ही जे काही ऐकाल ते त्यांच्या हातून मला कळवा.” ३७ म्हणून मग दावीदचा मित्र* हूशय शहरात गेला;+ त्या वेळी अबशालोम यरुशलेममध्ये प्रवेश करत होता.

१६ इकडे, दावीद डोंगरमाथ्यावरून थोडं पुढे गेला.+ तेव्हा मफीबोशेथचा+ सहायक सीबा+ त्याला भेटायला तिथे आला होता. त्याने आपल्यासोबत सामान लादलेली दोन गाढवं आणली होती. त्यांवर २०० भाकरी, मनुकांच्या १०० ढेपा, उन्हाळी फळांच्या* १०० ढेपा आणि द्राक्षारसाचं एक मोठं मडकं लादलेलं होतं.+ २ तेव्हा राजा सीबाला म्हणाला: “तू हे सगळं कशाला आणलंस?” त्यावर सीबा म्हणाला: “राजाच्या कुटुंबातल्या लोकांना बसण्यासाठी ही गाढवं आहेत, भाकरी आणि उन्हाळी फळं ही तरुण माणसांसाठी आहेत, तर हा द्राक्षारस ओसाड रानात थकल्या-भागलेल्यांसाठी आहे.”+ ३ राजाने मग त्याला विचारलं: “तुझ्या मालकाचा मुलगा* कुठे आहे?”+ तेव्हा सीबा राजाला म्हणाला: “तो यरुशलेममध्येच थांबलाय. कारण तो म्हणतोय, की ‘इस्राएलचं घराणं आज माझ्या वडिलांचं राज्य मला परत देईल.’”+ ४ त्यावर राजा सीबाला म्हणाला: “पाहा! मफीबोशेथचं जे काही आहे ते सगळं आता तुझं आहे.”+ तेव्हा सीबा म्हणाला: “हे राजा, माझ्या प्रभू, मी तुम्हाला नमन करतो. तुमची कृपा माझ्यावर राहो.”+

५ दावीद राजा जेव्हा बहुरीममध्ये पोहोचला, तेव्हा शौलच्या घराण्यातला शिमी+ त्याला मोठमोठ्याने शिव्याशाप देत बाहेर आला; तो गेराचा मुलगा होता.+ ६ शिमी हा दावीद राजावर आणि त्याच्या सगळ्या सेवकांवर, तसंच राजासोबत असलेल्या सगळ्या लोकांवर आणि त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या शूर योद्ध्यांवर दगड फेकत होता. ७ तो शिव्याशाप देत म्हणत होता: “अरे नीच, खुनी माणसा! चालता हो इथून! नीघ इथून! ८ तू शौलच्या घराण्याचं रक्‍त सांडलंस आणि त्याचं राज्य बळकावलंस. म्हणून आता यहोवा तुझ्या कृत्यांची परतफेड करतोय. यहोवाने तुझं राज्यपद तुझ्या मुलाला, अबशालोमला दिलंय. तुझ्यावर हे संकट आलंय, कारण तू खुनी आहेस!”+

९ तेव्हा सरूवाचा मुलगा अबीशय+ राजाला म्हणाला: “या मेलेल्या कुत्र्याची+ इतकी हिंमत, की तो माझ्या प्रभूला, राजाला शिव्याशाप देतोय?+ तुम्ही फक्‍त आज्ञा करा, मी त्याचं मुंडकंच उडवतो.”+ १० पण राजा म्हणाला: “सरूवाच्या मुलांनो,+ तुम्हाला याच्याशी काय घेणंदेणं? त्याला शिव्याशाप देऊ द्या.+ यहोवानेच जर त्याला म्हटलंय,+ की ‘दावीदला शिव्याशाप दे!’ तर त्याला कोण विचारू शकतं, की ‘तू असं का करतोस?’” ११ दावीद मग अबीशयला आणि आपल्या सगळ्या सेवकांना म्हणाला: “माझा स्वतःचा, माझा पोटचा मुलगाच जर माझ्या जिवावर उठलाय,+ तर एका बन्यामिनी+ माणसाकडून मी काय अपेक्षा करणार? सोडून द्या त्याला. देऊ द्या त्याला शिव्याशाप, कारण यहोवानेच त्याला तसं सांगितलंय! १२ कदाचित यहोवा माझं दुःख पाहील+ आणि आजच्या या शिव्याशापांच्या बदल्यात यहोवा मला आशीर्वाद देईल.”+ १३ असं म्हणून दावीद आणि त्याची माणसं आपल्या रस्त्याने पुढे जाऊ लागली. आणि शिमीसुद्धा शिव्याशाप देत,+ दगड फेकत आणि धूळ उडवत त्याच्या बरोबरीने डोंगराच्या कडेने जाऊ लागला.

१४ शेवटी, राजा आणि त्याच्यासोबतचे सगळे लोक ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. ते अतिशय थकले होते म्हणून त्यांनी तिथे विश्रांती घेतली.

१५ इकडे, अबशालोम आणि इस्राएलची सर्व माणसं यरुशलेममध्ये पोहोचली; अबशालोमसोबत अहिथोफेलसुद्धा+ होता. १६ मग दावीदचा मित्र* हूशय+ अर्की+ अबशालोमकडे आला आणि त्याला म्हणाला: “राजाला दीर्घायुष्य लाभो!+ राजाला दीर्घायुष्य लाभो!” १७ तेव्हा अबशालोम हूशयला म्हणाला: “हेच का तुझं मित्रावरचं एकनिष्ठ प्रेम? तू आपल्या मित्रासोबत का नाही गेलास?” १८ त्यावर हूशय अबशालोमला म्हणाला: “ज्याला यहोवाने, या लोकांनी आणि इस्राएलच्या सगळ्या माणसांनी निवडलंय, त्याच्या बाजूने मी आहे. मी त्याच्याच सोबत राहीन. १९ आणि मी पुन्हा एकदा तेच म्हणतो. राजाच्या मुलाशिवाय मी आणखी कोणाची सेवा करणार? मी जशी तुमच्या वडिलांची सेवा केली, तशी तुमचीही सेवा करीन.”+

२० अबशालोम मग अहिथोफेलला म्हणाला: “तुमचा काय सल्ला आहे?+ आपण आता काय करावं?” २१ तेव्हा अहिथोफेल अबशालोमला म्हणाला: “तुझ्या वडिलांनी राजमहाल सांभाळायला ज्या उपपत्नी मागे ठेवल्या आहेत+ त्यांच्याशी संबंध ठेव.+ म्हणजे तू तुझ्या वडिलांचा घोर अपमान केलाय हे सगळ्या इस्राएलला समजेल. आणि जे तुझ्या बाजूने आहेत त्यांना आणखी बळ मिळेल.” २२ म्हणून मग त्यांनी घराच्या छतावर+ अबशालोमसाठी एक तंबू बांधला. आणि अबशालोमने संपूर्ण इस्राएलच्या डोळ्यांदेखत+ आपल्या वडिलांच्या उपपत्नींसोबत+ संबंध ठेवले.

२३ त्या काळात अहिथोफेलचा+ सल्ला खऱ्‍या देवाचा शब्द मानला जायचा.* दावीद आणि अबशालोम हे दोघं अहिथोफेलने दिलेला सल्ला फार मानायचे.

१७ अहिथोफेल मग अबशालोमला म्हणाला: “कृपया मला १२,००० माणसं निवडण्याची परवानगी दे. म्हणजे मी त्यांना घेऊन आज रात्रीच दावीदचा पाठलाग करायला निघेन. २ तो जेव्हा थकला-भागलेला असेल आणि त्याच्यात काहीच ताकद उरलेली नसेल,+ तेव्हा मी त्याच्यावर हल्ला करून त्याला गोंधळात पाडीन. मग त्याच्यासोबत असलेले सगळे लोक पळून जातील. आणि मी फक्‍त राजाला ठार मारीन.+ ३ त्यानंतर मी सगळ्या लोकांना तुझ्याकडे परत आणीन. तू ज्या माणसाच्या जिवावर उठलाय तो एकदाचा मेला, की त्याचे सर्व लोक तुझ्याकडे परत येतील. मग सगळे लोक शांतीने राहतील.” ४ अहिथोफेलने सुचवलेली ही योजना अबशालोमला आणि इस्राएलच्या सर्व वडीलजनांना पटली.

५ पण अबशालोम म्हणाला: “हूशय+ अर्कीलासुद्धा बोलवा; त्याचं काय म्हणणं आहे तेही ऐकूयात.” ६ हूशय जेव्हा अबशालोमकडे आला तेव्हा अबशालोम त्याला म्हणाला: “अहिथोफेलने असा-असा सल्ला दिलाय. तुला काय वाटतं, आपण त्याच्या सल्ल्याप्रमाणे करावं का? किंवा मग तुझं काय म्हणणं आहे ते सांग.” ७ त्यावर हूशय त्याला म्हणाला: “या वेळेस अहिथोफेलने जो सल्ला दिलाय तो काही बरोबर वाटत नाही!”+

८ हूशय पुढे म्हणाला: “तुमचे वडील आणि त्यांची माणसं किती शूरवीर आहेत+ हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. आणि ते सर्व जण, पिल्लं हरवलेल्या जंगलातल्या अस्वलीसारखं चवताळलेले आहेत.+ शिवाय, तुमचे वडील शूर योद्धे आहेत;+ ते काही लोकांमध्ये राहून रात्र काढणार नाहीत. ९ या क्षणी, ते कुठल्यातरी गुहेत* किंवा मग दुसरीकडे कुठेतरी लपून बसले असतील;+ आणि जर त्यांनी सर्वात आधी हल्ला केला, तर ऐकणारे म्हणतील, ‘अबशालोमच्या बाजूचे लोक हरले!’ १० मग, सिंहासारखं+ हृदय असलेल्या माणसाचंही भीतीने पाणीपाणी होईल. कारण, तुमचे वडील एक शूर योद्धे आहेत+ आणि त्यांच्यासोबतची माणसंही धैर्यवान आहेत हे संपूर्ण इस्राएलला माहीत आहे. ११ तेव्हा मी असा सल्ला देईन: दानपासून बैर-शेबापर्यंत+ असलेल्या सर्व इस्राएली लोकांना तुमच्याकडे एकत्र करा, म्हणजे त्यांची संख्या समुद्रकिनाऱ्‍यावरच्या वाळूइतकी अगणित होईल;+ त्यानंतर तुम्ही स्वतः युद्धात त्यांचं नेतृत्व करा. १२ ते जिथे कुठे सापडतील तिथे जाऊन आपण त्यांच्यावर हल्ला करू. जमिनीवर जसं दव पडतं तसं आपण त्यांच्यावर तुटून पडू. म्हणजे त्यांच्यापैकी कोणीही वाचणार नाही; तुमचे वडीलही नाहीत आणि त्यांची माणसंही नाहीत. १३ ते जर एखाद्या शहरात पळून गेले, तर सर्व इस्राएली लोक दोरखंड घेऊन त्या शहराकडे जातील; आणि आपण ते शहर दोरखंडांनी ओढून खोऱ्‍यात टाकून देऊ. मग एक खडासुद्धा तिथे शिल्लक राहणार नाही.”

१४ मग अबशालोम आणि इस्राएलची सर्व माणसं म्हणाली: “अहिथोफेलच्या सल्ल्यापेक्षा हूशय अर्कीचा सल्ला जास्त चांगला वाटतो!”+ यहोवाला अबशालोमवर संकट आणता यावं,+ यासाठी यहोवाने अहिथोफेलचा उत्तम सल्ला निष्फळ करण्याचं ठरवलं होतं,*+ आणि म्हणून असं घडलं.

१५ हूशय नंतर सादोक आणि अब्याथार+ याजकांना म्हणाला: “अहिथोफेलने अबशालोमला आणि इस्राएलच्या वडीलजनांना असा-असा सल्ला दिला होता; पण मी त्यांना असा सल्ला दिला. १६ तर आता पटकन जाऊन दावीदला सावध करा आणि त्यांना असा निरोप द्या: ‘आज रात्री ओसाड रानाच्या उतारांजवळ* थांबू नका. कसंही करून नदी पार करून जा. नाहीतर राजा आणि त्याच्यासोबतचे सगळे लोक मारले जातील.’”+

१७ योनाथान+ आणि अहीमास+ हे शहराबाहेर एन-रोगेल+ इथे राहत होते. शहरात जाताना आपल्याला कोणीतरी पाहील याची त्यांना भीती होती. म्हणून एका दासीने त्यांच्याकडे जाऊन त्यांना सगळी खबर दिली; मग ती खबर घेऊन ते दावीदकडे निघाले. १८ पण जाताना एका तरुणाने त्यांना पाहिलं आणि अबशालोमला येऊन सांगितलं. म्हणून मग योनाथान आणि अहीमास लगेच तिथून निघाले आणि बहुरीम+ इथे एका माणसाच्या घरी गेले; त्या माणसाच्या घराच्या अंगणात एक विहीर होती. ते त्या विहिरीत उतरले. १९ मग त्या माणसाच्या बायकोने एक कापड घेऊन विहिरीच्या तोंडावर अंथरलं आणि त्यावर भरडलेलं धान्य पसरवलं. त्यामुळे कोणाला काहीच कळलं नाही. २० मग अबशालोमचे सेवक त्या स्त्रीच्या घरी आले आणि त्यांनी तिला विचारलं: “अहीमास आणि योनाथान कुठे आहेत?” त्यावर ती स्त्री त्यांना म्हणाली: “ते नदीच्या दिशेने गेले.”+ अबशालोमच्या सेवकांनी त्यांचा खूप शोध केला, पण ते काही सापडले नाहीत. म्हणून मग ते सेवक यरुशलेमला परत गेले.

२१ अबशालोमचे सेवक गेल्यानंतर योनाथान आणि अहीमास त्या विहिरीतून बाहेर आले. मग दावीदकडे जाऊन त्यांनी त्याला खबर दिली. ते म्हणाले: “लगेच निघा आणि नदी पार करून जा. कारण अहिथोफेलने तुमच्या विरोधात असा-असा सल्ला दिलाय.”+ २२ तेव्हा दावीद आणि त्याच्यासोबतचे सगळे लोक लगेच निघाले आणि यार्देन पार करून गेले; दिवस उजाडेपर्यंत, एकूण एक माणूस यार्देन पार करून गेला होता.

२३ अहिथोफेलने जेव्हा पाहिलं, की त्याच्या सल्ल्याप्रमाणे काम झालं नाही, तेव्हा तो गाढवावर बसून आपल्या गावी गेला.+ मग त्याने आपल्या घराची सर्व व्यवस्था लावली+ आणि त्यानंतर तो फाशी घेऊन* मेला.+ अहिथोफेलला त्याच्या पूर्वजांच्या कबरेत पुरण्यात आलं.

२४ यादरम्यान, दावीद महनाइम+ इथे गेला. आणि अबशालोम आपल्या सर्व इस्राएली माणसांना घेऊन यार्देन पार करून गेला. २५ अबशालोमने यवाबच्या जागी अमासा याला सेनापती नेमलं;+ अमासा+ हा इथ्रा या इस्राएली माणसाचा मुलगा होता. इथ्राने नाहाशची मुलगी अबीगईल+ हिच्याशी संबंध ठेवले होते; अबीगईल ही यवाबची आई सरूवा हिची बहीण होती. २६ मग अबशालोम आणि त्याच्यासोबतची इस्राएली माणसं यांनी गिलादच्या+ प्रदेशात छावणी दिली.

२७ दावीद महनाइममध्ये आला तेव्हा राब्बा+ इथला (अम्मोनी लोकांच्या प्रदेशातलं शहर) नाहाशचा मुलगा शोबी, लो-दबार इथला अम्मीएलचा मुलगा माखीर+ आणि रोगलीम इथला बर्जिल्ल्य+ गिलादी, २८ यांनी आपल्यासोबत बिछाने, स्वयंपाकाची भांडी, मातीची भांडी, गहू, जव, पीठ, हुरडा, कडधान्यं, डाळी, वाळवलेलं धान्य, २९ मध, लोणी, पनीर आणि मेंढरं आणली. या सर्व गोष्टी त्यांनी दावीद आणि त्याच्या लोकांसाठी आणल्या होत्या.+ कारण, “ओसाड रानात लोक भुकेने आणि तहानेने अगदी व्याकूळ झाले असतील,”+ असा त्यांनी विचार केला.

१८ मग दावीदने आपल्यासोबत असलेल्या माणसांची संख्या मोजली, आणि शंभर-शंभर व हजार-हजार माणसांचे गट करून त्यांच्यावर प्रमुख नेमले.+ २ दावीदने आपल्यासोबत असलेल्या माणसांना तीन गटांमध्ये पाठवलं: एक गट यवाबच्या+ अधिकाराखाली, दुसरा गट यवाबचा भाऊ, म्हणजे सरूवाचा+ मुलगा अबीशय+ याच्या अधिकाराखाली आणि तिसरा गट गथचा राहणारा इत्तय+ याच्या अधिकाराखाली पाठवला. मग राजा त्यांना म्हणाला: “मीसुद्धा तुमच्यासोबत येईन.” ३ पण ते त्याला म्हणाले: “तुम्ही आमच्यासोबत येऊ नका.+ कारण आम्ही जर पळून गेलो, तर त्यांना त्याचं काही वाटणार नाही. आणि आमच्यातले अर्धे लोक जरी मेले, तरीही त्यांना काही फरक पडणार नाही. पण तुमचं मोल आमच्यातल्या १०,००० माणसांपेक्षा जास्त आहे.+ म्हणून, तुम्ही शहरातच राहून आम्हाला मदत पुरवली तर बरं होईल.” ४ त्यावर राजा त्यांना म्हणाला: “तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं मी करीन.” मग राजा शहराच्या दरवाजाजवळ उभा राहिला आणि सगळी माणसं शंभर व हजारांच्या गटांत बाहेर पडली. ५ त्या वेळी राजाने यवाब, अबीशय आणि इत्तय यांना असा आदेश दिला: “माझ्यासाठी त्या तरुणासोबत, अबशालोमसोबत नरमाईने वागा.”+ राजाने जेव्हा प्रमुखांना अबशालोमविषयी हा आदेश दिला, तेव्हा सगळ्या माणसांनी तो ऐकला.

६ मग सगळी माणसं इस्राएलचा सामना करण्यासाठी शहराबाहेर गेली, आणि एफ्राईमच्या जंगलात युद्ध झालं.+ ७ तिथे दावीदच्या सेवकांनी इस्राएलच्या लोकांना+ हरवलं.+ आणि त्या दिवशी अतिशय मोठ्या प्रमाणात कत्तल होऊन २०,००० माणसं मारली गेली. ८ हे युद्ध संपूर्ण प्रदेशात पसरलं. त्या दिवशी तलवारीमुळे जितके लोक मारले गेले, त्यापेक्षा कितीतरी जास्त लोक जंगलामुळे मारले गेले.

९ शेवटी, अबशालोमची दावीदच्या सेवकांशी गाठ पडली. त्या वेळी अबशालोम खेचरावर बसून चालला होता. खेचरावर बसून पळून जात असताना, ते खेचर एका मोठ्या झाडाच्या दाट फांद्यांखालून गेलं. आणि अबशालोमचं डोकं त्या झाडाच्या फांद्यांमध्ये अडकलं. तो ज्या खेचरावरून जात होता, ते पुढे निघून गेलं आणि अबशालोम तिथेच अधांतरी लटकत राहिला. १० मग कोणीतरी ते पाहिलं आणि यवाबला+ जाऊन असं सांगितलं: “मी अबशालोमला एका मोठ्या झाडाला लटकलेलं पाहिलं.” ११ तेव्हा यवाब त्या माणसाला म्हणाला: “तू जर ते पाहिलंस, तर मग त्याला तिथल्या तिथे मारून जमिनीवर का पाडलं नाहीस? तू तसं केलं असतंस, तर मी तुझ्यावर खूश होऊन तुला चांदीचे दहा तुकडे आणि एक कमरबंद दिला नसता का?” १२ पण तो माणूस यवाबला म्हणाला: “तुम्ही मला १,००० चांदीचे तुकडे जरी दिले असते, तरी मी राजाच्या मुलावर हात उचलला नसता. कारण राजाने जेव्हा अबीशयला, इत्तयला आणि तुम्हाला आदेश दिला होता, की ‘त्या तरुण अबशालोमवर कोणीही हात उचलणार नाही याची काळजी घ्या,’+ तेव्हा आम्ही ते ऐकलं होतं. १३ तो आदेश मोडून मी जर अबशालोमचा जीव घेतला असता, तर ही गोष्ट राजापासून मुळीच लपून राहिली नसती आणि तुम्हीही मला वाचवलं नसतं.” १४ त्यावर यवाब त्याला म्हणाला: “मी तुझ्यामागे आणखी वेळ वाया घालवणार नाही.” मग त्याने तीन टोकदार सळया* घेतल्या आणि मोठ्या झाडाला जिवंत लटकत असलेल्या अबशालोमच्या छातीत* त्या खुपसल्या. १५ मग यवाबची शस्त्रं वाहणारे दहा सेवक तिथे आले आणि अबशालोमवर वार करून त्यांनी त्याला ठार मारलं.+ १६ लोकांनी इस्राएलचा पाठलाग करायचं सोडून द्यावं, म्हणून मग यवाबने रणशिंग फुंकलं; अशा प्रकारे यवाबने त्यांना थांबवलं. १७ मग त्यांनी अबशालोमचा मृतदेह घेऊन तो जंगलात एका मोठ्या खड्ड्यात फेकला व त्यावर दगडांचा मोठा ढीग केला;+ आणि सगळे इस्राएली आपल्या घरी पळून गेले.

१८ अबशालोम जेव्हा जिवंत होता, तेव्हा त्याने ‘राजाच्या खोऱ्‍यात’+ स्वतःसाठी एक स्तंभ उभारला होता. कारण तो म्हणाला: “माझं नाव पुढे चालवायला मला मुलगा नाही.”+ म्हणून त्याने त्या स्तंभाला स्वतःचं नाव दिलं, आणि आजपर्यंत त्याला अबशालोमचा स्मारकस्तंभ असं म्हटलं जातं.

१९ सादोकचा मुलगा अहीमास+ म्हणाला: “मला परवानगी द्या. म्हणजे मी धावत जाऊन राजाला ही खबर देईन. कारण यहोवाने राजाला आपल्या शत्रूंपासून सुटका देऊन त्यांना न्याय दिलाय.”+ २० पण यवाब त्याला म्हणाला: “नाही, आज तू खबर घेऊन जाणार नाहीस. दुसऱ्‍या एखाद्या दिवशी तू खबर घेऊन जा, पण आज नको. कारण राजाचा स्वतःचा मुलगा मेलाय.”+ २१ मग यवाबने एका कूशी+ माणसाला म्हटलं: “जा, तू जे काही पाहिलंस ते राजाला जाऊन सांग.” तेव्हा तो कूशी माणूस यवाबला नमन करून धावत निघाला. २२ मग सादोकचा मुलगा अहीमास पुन्हा यवाबला म्हणाला: “काहीही झालं तरी चालेल. पण मलासुद्धा त्या कूशी माणसाच्या मागे धावत जाऊ द्या.” पण यवाब त्याला म्हणाला: “माझ्या मुला, तुझ्याजवळ सांगायला काही खबर नाही, मग तू कशाला त्याच्यामागे धावत जातोस?” २३ तरीसुद्धा तो म्हणाला: “काहीही होवो, मला धावत जाऊ द्या.” म्हणून मग यवाब त्याला म्हणाला: “ठीक आहे, जा!” तेव्हा अहीमास, यार्देन प्रांताच्या रस्त्याने धावत निघाला आणि शेवटी त्या कूशी माणसाच्या पुढे निघून गेला.

२४ इकडे, दावीद शहराच्या दोन दरवाजांच्या मधे बसला होता.+ त्या वेळी एक पहारेकरी+ शहराच्या भिंतीला लागून असलेल्या दरवाजाच्या छतावर गेला होता. पहारेकऱ्‍याने समोर पाहिलं तेव्हा त्याला एक माणूस धावत येताना दिसला. २५ त्यामुळे पहारेकऱ्‍याने मोठ्याने ओरडून राजाला ते सांगितलं. त्यावर राजा म्हणाला: “तो जर एकटाच असेल, तर तो नक्कीच खबर घेऊन आला असेल.” तो माणूस जवळ येत होता, २६ तेवढ्यात पहारेकऱ्‍याला आणखी एक माणूस धावत येताना दिसला. पहारेकरी मग मोठ्याने ओरडून द्वारपालाला म्हणाला: “पाहा! आणखी एक माणूस धावत येतोय!” त्यावर राजा म्हणाला: “हासुद्धा खबरच घेऊन येतोय.” २७ पहारेकरी पुढे म्हणाला: “पहिल्या माणसाचं धावणं सादोकचा मुलगा अहीमास+ याच्यासारखं वाटतंय.” त्यावर राजा म्हणाला: “तो एक चांगला माणूस आहे. आणि तो नेहमी चांगली खबर घेऊन येतो.” २८ अहीमास धावत येत मोठ्याने राजाला म्हणाला: “सगळं काही ठीक आहे!” मग त्याने जमिनीवर डोकं टेकवून राजाला नमन केलं. आणि तो राजाला म्हणाला: “तुमचा देव यहोवा याची स्तुती होवो! कारण माझ्या प्रभूविरुद्ध, राजाविरुद्ध बंड करणाऱ्‍यांना त्याने तुमच्या हवाली केलंय.”+

२९ पण राजाने विचारलं: “तो तरुण अबशालोम तर ठीक आहे ना?” त्यावर अहीमास म्हणाला: “यवाबने राजाच्या सेवकाला* आणि आपल्या या सेवकाला पाठवलं, त्या वेळी तिथे खूप मोठा गोंधळ माजलेला मी पाहिला. पण नेमकं काय झालं ते मला समजलं नाही.”+ ३० तेव्हा राजा त्याला म्हणाला: “तू बाजूला हो आणि इकडे उभा राहा.” म्हणून तो बाजूला जाऊन उभा राहिला.

३१ मग तो कूशी माणूस तिथे पोहोचला+ आणि म्हणाला: “माझ्या प्रभूसाठी, राजासाठी मी एक खबर आणली आहे: आज यहोवाने, तुमच्या विरोधात उठलेल्या सगळ्या लोकांच्या हातून तुम्हाला सोडवलंय आणि तुम्हाला न्याय दिलाय.”+ ३२ पण राजाने त्या कूशी माणसाला विचारलं: “तो तरुण अबशालोम तर ठीक आहे ना?” त्यावर तो कूशी माणूस म्हणाला: “राजाच्या, माझ्या प्रभूच्या सगळ्या शत्रूंची गत, आणि तुमचं वाईट करण्यासाठी तुमच्या विरोधात उठणाऱ्‍या सगळ्यांची गत त्या तरुणासारखीच होवो!”+

३३ हे ऐकून राजाला फार गहिवरून आलं. आणि तो दरवाजाच्या वर असलेल्या छतावरच्या खोलीत जाऊन रडला. वर चढून जाता असताना तो म्हणत होता: “माझ्या मुला अबशालोम! माझ्या मुला! तुझ्याऐवजी मी मेलो असतो तर बरं झालं असतं! अबशालोम माझ्या मुला!”+

१९ यवाबला असं सांगण्यात आलं, की “राजा अबशालोमसाठी रडतोय आणि खूप शोक करतोय.”+ २ विजयाचा तो दिवस सर्व लोकांसाठी शोकाचा दिवस बनला. कारण लोकांनी असं ऐकलं, की राजा आपल्या मुलासाठी शोक करत आहे. ३ त्या दिवशी लोक गुपचूप शहरात परत आले;+ युद्धातून पळ काढणारे सैनिक जसं लज्जित होऊन परत येतात, तसं ते परत आले. ४ राजा आपलं तोंड झाकून मोठ्याने रडत होता. तो म्हणत होता: “अबशालोम, माझ्या मुला! माझ्या मुला, अबशालोम!”+

५ मग यवाब घरात राजाकडे गेला आणि म्हणाला: “तुमच्या ज्या सेवकांनी आज तुमचा, तुमच्या मुला-मुलींचा,+ तुमच्या बायकांचा आणि उपपत्नींचा+ जीव वाचवला, त्या सगळ्या सेवकांना तुम्ही आज शरमेने खाली पाहायला लावलंय. ६ जे तुमचा द्वेष करतात त्यांच्यावर तुम्ही प्रेम करता, आणि जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांचा तुम्ही द्वेष करता. आज तुम्ही दाखवून दिलंत, की तुम्हाला तुमच्या प्रमुखांची आणि सेवकांची काहीच किंमत नाही. कारण आज जर अबशालोम जिवंत राहिला असता आणि आम्ही सगळे मेलो असतो, तर तुम्हाला काहीच वाटलं नसतं हे मला पक्कं माहीत आहे. ७ तर आता उठा आणि बाहेर जाऊन आपल्या सेवकांना धीर द्या. कारण मी यहोवाची शपथ घेऊन सांगतो, की तुम्ही जर असं केलं नाही तर आज रात्रीपर्यंत इथे एकही माणूस तुमच्यासोबत थांबणार नाही. मग, तरुणपणापासून आजपर्यंत तुमच्यावर जितकी संकटं आली, त्यांपेक्षा हे संकट तुमच्यासाठी जास्त भयंकर ठरेल.” ८ म्हणून मग राजा उठला आणि शहराच्या दरवाजाजवळ जाऊन बसला. आणि सगळ्या लोकांना असं सांगण्यात आलं: “राजा आता दरवाजाजवळ बसलाय.” तेव्हा सगळे लोक राजासमोर जमले.

पण जे इस्राएली युद्धात हरले होते, ते आपल्या घरी पळून गेले.+ ९ इस्राएलच्या सर्व वंशांतले लोक आपापसात वाद घालून म्हणत होते: “राजाने आम्हाला आमच्या शत्रूंपासून वाचवलं;+ त्याने पलिष्टी लोकांच्या हातून आमची सुटका केली. पण आता अबशालोममुळे तो देश सोडून पळून गेलाय.+ १० आणि ज्या अबशालोमचा आपला राजा म्हणून आपण अभिषेक केला होता,+ तो युद्धात मेला.+ तर मग राजाला परत आणण्यासाठी तुम्ही काहीच का करत नाही?”

११ मग दावीद राजाने सादोक+ आणि अब्याथार+ याजकांना असा निरोप पाठवला: “यहूदाच्या वडीलजनांशी+ बोला आणि त्यांना म्हणा: ‘इस्राएलच्या सर्व वंशांकडून राजाच्या घरी त्याच्यासाठी संदेश आलाय; मग राजाला त्याच्या घरी परत आणण्यात, तुम्ही का सगळ्यात मागे आहात? १२ तुम्ही माझे भाऊ आहात; तुमच्याशी तर माझं रक्‍ताचं नातं आहे. असं असूनही राजाला परत आणण्यासाठी तुम्ही सगळ्यात मागे का राहिलात?’ १३ आणि अमासाला+ असं सांगा: ‘तुझं-माझं रक्‍ताचं नातं आहे. म्हणून, आता जर मी तुला यवाबच्या+ जागी सेनापती बनवलं नाही, तर देव मला कठोरातली कठोर शिक्षा करो.’”

१४ अशा प्रकारे त्याने यहूदाच्या सगळ्या माणसांची मनं जिंकली. आणि त्यांच्यात एकमत होऊन त्यांनी राजाला असा संदेश पाठवला: “तुम्ही आणि तुमचे सगळे सेवक परत या.”

१५ म्हणून मग राजा परत जायला निघाला आणि तो यार्देनजवळ पोहोचला. तेव्हा यहूदाचे लोक राजाला भेटायला आणि यार्देन नदी पार करण्यासाठी त्याला मदत करायला गिलगाल+ इथे आले. १६ त्या वेळी गेराचा मुलगा शिमी+ हासुद्धा दावीद राजाला भेटायला घाईघाईने यहूदाच्या माणसांसोबत तिथे आला होता; शिमी हा बन्यामीन वंशातला असून बहुरीम इथला राहणारा होता. १७ तो राजाला भेटायला आला तेव्हा त्याच्यासोबत बन्यामीन वंशातली १,००० माणसंही होती. तसंच, शौलच्या घराण्याचा सेवक सीबा+ हासुद्धा आपल्या १५ मुलांना आणि २० सेवकांना घेऊन घाईघाईने राजाच्या आधी यार्देनकडे पोहोचला होता. १८ मग राजाच्या घराण्यातल्या लोकांना यार्देन नदी पार करून देण्यासाठी आणि राजा म्हणेल ते करण्यासाठी तो* नदी पार करून गेला. पण राजा यार्देन नदी पार करणार, इतक्यात गेराचा मुलगा शिमी राजाच्या पायांजवळ पडला, १९ आणि तो राजाला म्हणाला: “हे राजा, माझ्या प्रभू, माझा अपराध माफ करा. माझे प्रभू ज्या दिवशी यरुशलेममधून निघाले, त्या दिवशी तुमच्या या दासाने जी चूक केली ती राजाने विसरून जावी.+ राजाने ती गोष्ट मनाला लावून घेऊ नये. २० कारण तुमच्या या सेवकाला माहीत आहे, की त्याने पाप केलंय. आणि म्हणूनच योसेफच्या संपूर्ण घराण्यापैकी मीच सगळ्यात आधी माझ्या प्रभूला, राजाला भेटायला आलोय.”

२१ त्यावर सरूवाचा+ मुलगा अबीशय+ लगेच म्हणाला: “शिमीने यहोवाच्या अभिषिक्‍ताला शिव्याशाप दिले होते,+ तेव्हा त्याला मारूनच टाकलं पाहिजे.” २२ पण दावीद म्हणाला: “सरूवाच्या मुलांनो,+ तुम्हाला याच्याशी काय घेणंदेणं? तुम्हाला माझ्या मनाविरुद्ध का वागायचंय? मी आज पुन्हा इस्राएलचा राजा बनलोय. मग इस्राएलमध्ये आज एखाद्याचा जीव घेणं ठीक राहील का?” २३ मग राजा शिमीला म्हणाला: “तू मरणार नाहीस.” राजाने त्याला हे शपथ घेऊन सांगितलं.+

२४ शौलचा नातू मफीबोशेथ+ हासुद्धा राजाला भेटायला आला होता. राजा गेला त्या दिवसापासून ते राजा सुखरूप परत येईपर्यंत मफीबोशेथने आपले पाय धुतले नव्हते. शिवाय, त्याने दाढीमिशीही केली नव्हती आणि आपले कपडेही धुतले नव्हते. २५ तो यरुशलेम इथे* राजाला भेटायला आला, तेव्हा राजा त्याला म्हणाला: “मफीबोशेथ, तू माझ्यासोबत का आला नव्हता?” २६ त्यावर तो म्हणाला: “हे राजा माझ्या प्रभू, तुम्हाला माहीत आहे की तुमचा हा सेवक अधू आहे.+ मी माझ्या सेवकाला+ म्हणालो होतो: ‘माझ्यासाठी गाढव तयार कर, म्हणजे मी त्यावर बसून राजासोबत जाईन.’ पण त्याने मला फसवलं. २७ त्याने तुमच्या या सेवकाची माझ्या प्रभूकडे, राजाकडे बदनामी केली.+ पण माझे प्रभू, माझे राजे खऱ्‍या देवाच्या स्वर्गदूतासारखे आहेत. तेव्हा, तुम्हाला आता जसं योग्य वाटतं तसं करा. २८ खरंतर माझे प्रभू, माझे राजे, माझ्या वडिलांच्या संपूर्ण घराण्याचा नाश करू शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. उलट, आपल्या या सेवकाला त्यांनी आपल्यासोबत मेजावर बसून जेवण्याचा मान दिला.+ असं असताना, राजाकडे आणखी काही मागण्याचा मला काय अधिकार?”

२९ पण राजा त्याला म्हणाला: “तू असं का बोलतोस? मी ठरवलंय, की तू आणि सीबा तुम्ही दोघं शेत वाटून घ्याल.”+ ३० त्यावर मफीबोशेथ राजाला म्हणाला: “माझे प्रभू, माझे राजे आता सुखरूप आपल्या घरी परत आले आहेत, तेव्हा सीबालाच सगळं काही घेऊ द्या.”

३१ मग रोगलीम इथून, बर्जिल्ल्य+ गिलादी हासुद्धा राजाला यार्देनपर्यंत पोहोचवायला आला. ३२ बर्जिल्ल्य हा खूप वयस्कर होता, तो ८० वर्षांचा होता. राजा महनाइममध्ये राहत असताना बर्जिल्ल्यने त्याला अन्‍नसामग्री पुरवली होती.+ कारण तो फार श्रीमंत होता. ३३ राजा बर्जिल्ल्यला म्हणाला: “माझ्यासोबत नदी पार करून चल. यरुशलेममध्ये मी तुझ्या खाण्यापिण्याची सगळी सोय करीन.”+ ३४ पण बर्जिल्ल्य राजाला म्हणाला: “माझ्या आयुष्याचे दिवस उरलेच किती? मग मी राजासोबत यरुशलेमला का जावं? ३५ मी आता ८० वर्षांचा म्हातारा झालोय.+ या वयात मी बऱ्‍यावाइटाची पारख करू शकत नाही. मी जे खातो-पितो त्याची चव मला कळत नाही. गायकांच्या सुरेल आवाजाचा आनंदही मला घेता येत नाही.+ तर मग हे राजा, माझ्या प्रभू, तुमच्या या सेवकाने सोबत येऊन तुमच्यावर भार का व्हावं? ३६ मला तुमच्यासोबत यार्देनपर्यंत येण्याचा मान मिळाला, हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. म्हणून राजाने मला कोणताही मोबदला देण्याची गरज नाही. ३७ तुमच्या या सेवकाला परत जाऊ द्या. म्हणजे माझ्या शहरात, माझ्या आईवडिलांच्या कबरेजवळ मला मरण येईल.+ पण पाहा, तुमचा सेवक किम्हाम+ हा इथे आहे. कृपा करून त्याला माझ्या प्रभूसोबत, राजासोबत, यार्देन पार करून येऊ द्या. आणि तुम्हाला जे काही चांगलं करायचंय, ते त्याच्यासाठी करा.”

३८ मग राजा म्हणाला: “किम्हाम यार्देन पार करून माझ्यासोबत येईल. आणि तुला जे चांगलं वाटतं ते मी त्याच्यासाठी करीन; तू म्हणशील तसं मी तुझ्यासाठी करीन.” ३९ मग सगळे लोक यार्देन पार करून जाऊ लागले. राजाही नदी पार करून गेला; जाण्याआधी त्याने बर्जिल्ल्यचा मुका घेतला+ आणि त्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर बर्जिल्ल्य आपल्या घरी परत गेला. ४० राजा नदी पार करून गिलगालला+ गेला, तेव्हा किम्हामसुद्धा त्याच्यासोबत गेला. यहूदाच्या सर्व लोकांनी आणि इस्राएलच्या निम्म्या लोकांनी राजाला नदीपार आणलं.+

४१ तेव्हा इस्राएलची सर्व माणसं राजाकडे येऊन म्हणाली: “आमच्या भावांनी, यहूदाच्या या माणसांनी असं का केलं? आम्हाला न सांगता त्यांनी तुम्हाला, तुमच्या घराण्याला आणि तुमच्या सगळ्या माणसांना गुपचूप यार्देनपार का आणलं?”+ ४२ त्यावर यहूदाची सर्व माणसं इस्राएलच्या माणसांना म्हणाली: “कारण राजा आमचा नातेवाईक आहे.+ पण तुम्हाला का एवढा राग येतोय? राजाने काय आमच्या खाण्यापिण्यावर खर्च केलाय? की, राजाकडून आम्हाला इनाम मिळालाय?”

४३ पण इस्राएलची माणसं यहूदाच्या माणसांना म्हणाली: “या राज्यात आमचे दहा हिश्‍शे आहेत. त्यामुळे राजावर सगळ्यात जास्त हक्क आमचा आहे. मग तुम्ही आमच्याशी असं तुच्छपणे का वागलात? खरंतर, राजाला आणायला सगळ्यात आधी आम्ही जायला हवं होतं.” पण या वादात यहूदाच्या माणसांपुढे इस्राएलच्या माणसांचं काहीएक चाललं नाही.*

२० शबा+ नावाचा एक दुष्ट माणूस होता. तो बन्यामीन वंशातल्या बिक्रीचा मुलगा होता. तो शिंग फुंकून म्हणाला:+ “हे इस्राएलच्या लोकांनो! दावीदशी आपलं काहीही घेणंदेणं नाही. इशायच्या मुलाच्या वारशात आपल्याला काहीच हिस्सा नाही.+ चला आपापल्या देवांकडे!”*+ २ तेव्हा इस्राएलच्या सगळ्या माणसांनी दावीदच्या मागे जाण्याचं सोडून दिलं, आणि बिक्रीचा+ मुलगा शबा याच्या मागे ते जाऊ लागले. पण यहूदाची माणसं मात्र आपल्या राजाला धरून राहिली. ती यार्देनपासून यरुशलेमपर्यंत त्याच्यासोबत होती.+

३ मग दावीद राजा यरुशलेममध्ये आपल्या राजमहालात* परत आला.+ तेव्हा त्याने, राजमहाल सांभाळायला मागे ठेवलेल्या आपल्या दहा उपपत्नींना,+ पहारा असलेल्या एका घरात वेगळं ठेवलं. त्याने त्यांच्या अन्‍नपाण्याची सोय केली, पण त्यांच्याशी संबंध ठेवले नाहीत.+ नवरा जिवंत असूनही या स्त्रिया मरेपर्यंत विधवांसारख्या तिथेच बंदिवासात राहिल्या.

४ राजा मग अमासाला+ म्हणाला: “तीन दिवसांत यहूदाच्या सगळ्या माणसांना माझ्याकडे जमा कर. आणि तूही माझ्यासमोर हजर हो.” ५ म्हणून अमासा यहूदाच्या माणसांना जमा करायला गेला. पण तो काही नेमून दिलेल्या वेळेत आला नाही. ६ मग दावीद अबीशयला+ म्हणाला: “अबशालोमपेक्षा, बिक्रीचा मुलगा शबा+ आपलं जास्त नुकसान करू शकतो.+ तेव्हा आपल्या प्रभूच्या सेवकांना घे आणि त्याचा पाठलाग कर. नाहीतर तो तटबंदीच्या एखाद्या शहरात पळून जायचा आणि आपल्या हातून निसटायचा.” ७ म्हणून मग यवाबची+ माणसं; तसंच करेथी व पलेथी+ लोक आणि सर्व शूर योद्धे त्याच्यामागे गेले. ते सगळे, बिक्रीचा मुलगा शबा याचा पाठलाग करण्यासाठी यरुशलेममधून बाहेर पडले. ८ ते गिबोनच्या+ मोठ्या खडकाजवळ पोहोचले, तेव्हा अमासा+ त्यांना भेटायला आला. त्या वेळी यवाबने युद्धाचा पोशाख घातला होता, आणि म्यानात असलेली तलवार कंबरेला लटकवली होती. तो पुढे आला आणि त्याने आपली तलवार खाली पाडली.

९ यवाबने अमासाला विचारलं: “माझ्या भावा, तू बरा आहेस ना?” मग त्याने आपल्या उजव्या हाताने अमासाची दाढी धरली आणि जणू काय आपण त्याचा मुका घेत आहोत असं दाखवलं. १० पण यवाबच्या हातात असलेल्या तलवारीकडे अमासाचं लक्ष गेलं नाही. मग यवाबने अमासाच्या पोटात तलवारीने असा वार केला,+ की त्याची आतडी बाहेर निघून जमिनीवर पडली. अमासावर पुन्हा वार करायची यवाबला गरजच पडली नाही; त्याला मारून टाकायला एकच वार पुरेसा होता. मग यवाब आणि अबीशय बिक्रीच्या मुलाचा, शबाचा पाठलाग करायला पुढे निघाले.

११ यवाबच्या माणसांपैकी एक तरुण माणूस अमासाच्या बाजूला उभा राहिला आणि असं म्हणू लागला: “जो कोणी यवाबच्या पक्षाचा आणि दावीदच्या बाजूने असेल त्याने यवाबच्या मागे जावं!” १२ यादरम्यान, अमासा रस्त्याच्या मधोमध रक्‍ताच्या थारोळ्यात पडला होता. जेव्हा त्या तरुणाने पाहिलं, की येणारे सर्व लोक तिथे येऊन थांबत आहेत, तेव्हा त्याने अमासाला रस्त्यावरून काढून बाजूच्या एका शेतात नेलं आणि त्याच्यावर एक कापड टाकलं. १३ अमासाला रस्त्याच्या मधून काढल्यानंतर सर्व माणसं बिक्रीचा मुलगा शबा+ याचा पाठलाग करण्यासाठी यवाबच्या मागे गेली.

१४ इकडे, शबा इस्राएलच्या सर्व वंशांच्या प्रदेशांतून जात बेथ-माकातल्या+ आबेल शहरात पोहोचला. बिक्रीच्या घराण्यातली माणसंही एकत्र होऊन त्याच्या मागे गेली.

१५ मग यवाब आणि त्याची माणसं आली, आणि बेथ-माकातल्या ज्या आबेल शहरात शबा होता त्याला त्यांनी वेढा घातला. शहरावर हल्ला करण्यासाठी, यवाबसोबत असलेल्या सर्व माणसांनी शहराच्या भिंतीभोवती दगड-मातीचा ढिगारा रचला. आणि आतली भिंत पाडण्यासाठी ते तिचा पाया खिळखिळा करू लागले. १६ तेव्हा एक सुज्ञ स्त्री, शहराच्या भिंतीवरून मोठ्याने हाक मारून म्हणाली: “माणसांनो ऐका! कृपा करून यवाबला सांगा, ‘इकडे या, मला तुमच्याशी काही बोलायचंय.’” १७ त्यामुळे यवाब त्या स्त्रीकडे गेला. ती त्याला म्हणाली: “तुम्ही यवाब आहात का?” तो म्हणाला: “हो.” त्यावर ती त्याला म्हणाली: “तुमच्या या दासीचं म्हणणं कृपया ऐकून घ्या.” तो म्हणाला: “बोल, मी ऐकतोय.” १८ ती पुढे म्हणाली: “पूर्वी लोक नेहमी असं म्हणायचे: ‘चला, आबेल शहरातून सल्ला घेऊ या.’ आणि मग समस्या सुटायची. १९ मी इस्राएलच्या शांतिप्रिय आणि विश्‍वासू लोकांच्या वतीने बोलत आहे. तुम्ही इस्राएलमधल्या एका महत्त्वाच्या शहराचा नाश करायला निघालात. तुम्ही यहोवाच्या वारशाचा नाश का करताय?”+ २० तेव्हा यवाब म्हणाला: “त्याचा नाश करायचा मी विचारसुद्धा करू शकत नाही. २१ तसं काहीही करायचा माझा हेतू नाही. खरंतर, एफ्राईमच्या डोंगराळ भागात+ राहणाऱ्‍या बिक्रीचा मुलगा शबा+ याने दावीद राजाविरुद्ध बंड केलंय. त्या माणसाला जर तुम्ही माझ्या हवाली केलंत, तर मी शहर सोडून जाईन.” त्यावर ती स्त्री म्हणाली: “ठीक आहे! त्या माणसाचं डोकं तटावरून तुमच्याकडे फेकलं जाईल.”

२२ तेव्हा ती सुज्ञ स्त्री लगेच शहरातल्या सगळ्या लोकांशी जाऊन बोलली. मग त्यांनी बिक्रीच्या मुलाचं, म्हणजे शबाचं डोकं कापलं आणि ते बाहेर यवाबकडे फेकलं. यवाबने मग रणशिंग फुंकलं तेव्हा सर्व माणसं शहर सोडून आपापल्या घरी गेली.+ आणि यवाब यरुशलेममध्ये राजाकडे परत आला.

२३ यवाब हा संपूर्ण इस्राएलचा सेनापती होता;+ यहोयादाचा+ मुलगा बनाया+ हा करेथी आणि पलेथी+ लोकांवर अधिकारी होता. २४ अदोराम+ हा सक्‍तीची मजुरी करणाऱ्‍यांवर अधिकारी होता; अहीलूदचा मुलगा यहोशाफाट+ इतिहास-लेखक होता. २५ शवा हा सचिव होता; सादोक+ आणि अब्याथार+ हे याजक होते. २६ आणि याईरच्या घराण्यातला ईरा हासुद्धा दावीदचा खास मंत्री बनला.*

२१ दावीदच्या काळात सलग तीन वर्षं दुष्काळ पडला.+ त्याने याबद्दल यहोवाला विचारलं, तेव्हा यहोवा म्हणाला: “शौलने गिबोनी लोकांची कत्तल केली आहे; त्यामुळे तो आणि त्याचं घराणं रक्‍तदोषी आहे.”+ २ म्हणून मग राजाने गिबोनी+ लोकांना बोलावून घेतलं आणि तो त्यांच्याशी बोलला. (हे गिबोनी लोक मुळात इस्राएली नव्हते, तर ते उरलेले अमोरी+ लोक होते. इस्राएली लोकांनी त्यांना वचन दिलं होतं, की ते त्यांना मारून टाकणार नाहीत.+ पण, इस्राएलच्या आणि यहूदाच्या लोकांसाठी असलेल्या आपल्या अति-आवेशामुळे शौलने त्यांचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला.) ३ दावीद त्या गिबोनी लोकांना म्हणाला: “मी तुमच्यासाठी काय करू? मी कशा प्रकारे प्रायश्‍चित्त करू, म्हणजे यहोवाच्या वारशाला तुम्ही आशीर्वाद द्याल?” ४ तेव्हा गिबोनी लोक त्याला म्हणाले: “शौलने आणि त्याच्या घराण्याने आमच्यासोबत जे काही केलंय, त्याची भरपाई सोन्या-चांदीने होऊ शकणार नाही.+ शिवाय, इस्राएलमधल्या कोणाचा जीवही आम्हाला घेता येणार नाही.” त्यावर दावीद म्हणाला: “तुम्ही जे म्हणाल ते मी तुमच्यासाठी करीन.” ५ तेव्हा ते राजाला म्हणाले: “ज्या माणसाने आमचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला, आणि आमच्यापैकी एकही जण इस्राएलच्या संपूर्ण प्रदेशात जिवंत राहणार नाही असा कट केला+​— ६ त्याच्या सात मुलांना आमच्या हवाली करा. म्हणजे यहोवाने ज्या शौलला निवडलं होतं,+ त्या शौलच्या गिबा+ शहरात आम्ही यहोवासमोर त्यांचे मृतदेह लटकवू.”+ तेव्हा राजा म्हणाला: “ठीक आहे. मी त्यांना तुमच्या हवाली करीन.”

७ पण शौलचा नातू, म्हणजे योनाथानचा मुलगा मफीबोशेथ+ याच्यावर राजाने दया केली. कारण, दावीद आणि शौलचा मुलगा योनाथान यांनी यहोवासमोर शपथ घेतली होती.+ ८ मग राजाने, अय्याची मुलगी रिस्पा+ हिच्यापासून शौलला झालेल्या दोन मुलांना, म्हणजे अरमोनी आणि मफीबोशेथ यांना घेतलं; तसंच त्याने शौलची मुलगी मीखल*+ हिला अद्रीएलपासून+ (हा महोला इथल्या बर्जिल्ल्यचा मुलगा होता) झालेल्या पाच मुलांना घेतलं. ९ आणि त्याने त्यांना गिबोनी लोकांच्या हवाली केलं. गिबोनी लोकांनी मग त्यांचे मृतदेह डोंगरावर यहोवासमोर लटकवले.+ त्या सातही मुलांचा सोबतच मृत्यू झाला. त्यांना कापणीच्या सुरुवातीच्या दिवसांत, म्हणजे जवाच्या कापणीच्या सुरुवातीला ठार मारण्यात आलं. १० मग अय्याची मुलगी रिस्पा+ हिने गोणपाट आणून ते आपल्यासाठी खडकावर पसरवून ठेवलं. कापणीच्या सुरुवातीपासून ते मृतदेहांवर आकाशातून पाऊस पडेपर्यंत ती तिथेच राहिली. तिने दिवसा आकाशातल्या पक्ष्यांना त्या मृतदेहांवर बसू दिलं नाही, किंवा रात्री जंगली जनावरांनाही त्यांच्या आसपास फिरकू दिलं नाही.

११ शौलची उपपत्नी, म्हणजे अय्याची मुलगी रिस्पा हिने जे केलं ते दावीदला कळवण्यात आलं. १२ तेव्हा दावीद याबेश-गिलादला+ गेला आणि त्याने तिथल्या पुढाऱ्‍यांकडून* शौल आणि त्याचा मुलगा योनाथान यांच्या अस्थी आणल्या; गिलबोवा+ इथे पलिष्टी लोकांनी जेव्हा शौलला ठार मारलं होतं, तेव्हा त्यांनी शौल आणि योनाथान यांचे मृतदेह बेथ-शानच्या चौकात लटकवले होते. तिथून याबेश-गिलादच्या लोकांनी ते चोरून नेले होते. १३ दावीदने तिथे जाऊन शौल आणि त्याचा मुलगा योनाथान यांच्या अस्थी आणल्या. आणि ज्या माणसांना मृत्युदंड देण्यात आला होता त्यांच्याही अस्थी गोळा करण्यात आल्या.+ १४ मग लोकांनी शौल आणि त्याचा मुलगा योनाथान यांच्या अस्थी पुरल्या; त्यांनी त्या बन्यामीनच्या प्रदेशातल्या सेला+ इथे, शौलच्या वडिलांच्या, म्हणजे कीशच्या+ कबरेत पुरल्या. राजाच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी सगळं काही केलं. त्यानंतर, देशासाठी केलेल्या विनंत्या देवाने ऐकल्या.+

१५ नंतर, पलिष्टी आणि इस्राएली यांच्यात पुन्हा युद्ध सुरू झालं.+ म्हणून दावीद आणि त्याचे सेवक पलिष्टी लोकांशी जाऊन लढले. पण लढता-लढता दावीद खूप थकून गेला. १६ पलिष्टी लोकांत रेफाई+ वंशातला इशबी-बनोब नावाचा एक माणूस होता. त्याच्याकडे तांब्याचा भाला असून त्या भाल्याचं वजन ३०० शेकेल* होतं.+ तसंच, त्याच्याकडे एक नवीन तलवारही होती. आणि तो दावीदला मारायला पाहत होता. १७ इतक्यात सरूवाचा मुलगा अबीशय+ दावीदच्या मदतीला धावून आला.+ आणि त्याने त्या पलिष्ट्यावर वार करून त्याला मारून टाकलं. मग दावीदच्या माणसांनी त्याला अशी शपथ घातली: “इस्राएलचा दिवा विझावा अशी आमची इच्छा नाही.+ म्हणून इथून पुढे तुम्ही कधीही आमच्यासोबत युद्धावर येणार नाहीत!”+

१८ यानंतर, गोब इथे इस्राएली लोकांचं पुन्हा पलिष्ट्यांशी युद्ध सुरू झालं.+ त्या वेळी हूशाथी सिब्बखय+ याने रफाई+ वंशातल्या सफ याला मारून टाकलं.

१९ मग, पुन्हा एकदा गोब इथे इस्राएली लोकांची पलिष्ट्यांशी लढाई झाली.+ तेव्हा, बेथलेहेम इथला यारे-ओरगीम याचा मुलगा एलहानान याने गित्ती गल्याथला मारून टाकलं; गल्याथच्या भाल्याचा दांडा, हातमागाच्या दांड्यासारखा होता.+

२० गथ इथे पुन्हा युद्ध झालं. तिथे एक अतिशय धिप्पाड माणूस होता. त्याच्या दोन्ही हातांना आणि दोन्ही पायांना सहा-सहा अशी एकूण २४ बोटं होती; तोसुद्धा रेफाई वंशातला होता.+ २१ तो इस्राएलची निंदा करत होता.+ म्हणून योनाथानने त्याला मारून टाकलं; योनाथान हा दावीदचा भाऊ शिमी+ याचा मुलगा होता.

२२ रेफाई वंशातली ही चारही माणसं गथची राहणारी होती. दावीद आणि त्याचे सेवक यांच्या हातून त्यांचा मृत्यू झाला.+

२२ यहोवाने दावीदला त्याच्या सर्व शत्रूंच्या+ आणि शौलच्या हातून सोडवलं,+ तेव्हा त्याने यहोवासाठी हे गीत गायलं:+

 २ “यहोवा माझा खडक आणि माझा मजबूत गड आहे;+ तोच मला वाचवतो.+

 ३ माझा देव माझा खडक आहे,+ मी त्याचा आश्रय घेतो,

तो माझी ढाल,+ माझा शक्‍तिशाली तारणकर्ता आहे,* तो माझं सुरक्षित आश्रयस्थान* आहे;+

मी जिथे धावून जाऊ शकतो असं तो स्थान आहे;+ मला हिंसेपासून वाचवणारा तो माझा तारणकर्ता आहे.+

 ४ यहोवा स्तुतिपात्र आहे, मी त्याला प्रार्थना करतो;

तो मला माझ्या शत्रूंपासून वाचवेल.

 ५ मृत्यूच्या लाटांनी मला सगळीकडून वेढलं;+

नीच माणसांच्या महापुरांनी मला घाबरवून सोडलं.+

 ६ कबरेच्या* दोरांनी मला घेरलं;+

मी मृत्यूच्या सापळ्यांत अडकलो.+

 ७ संकटात मी यहोवाला हाक मारली,+

माझ्या देवाचा मी धावा करत राहिलो.

तेव्हा आपल्या मंदिरातून त्याने माझा आवाज ऐकला,

आणि माझी मदतीची याचना त्याच्या कानापर्यंत पोहोचली.+

 ८ तेव्हा पृथ्वी हादरली, ती थरथरू लागली;+

आकाशाचा पाया डळमळला,+

आणि त्याला हादरे बसले, कारण त्याचा क्रोध भडकला होता.+

 ९ त्याच्या नाकपुड्यांतून धूर,

आणि मुखातून भस्म करणारी आग निघाली;+

त्याच्यापुढे निखारे धगधगत होते.

१० खाली उतरताना त्याने आकाशाला वाकवलं,+

त्याच्या पायांखाली काळाकुट्ट अंधार होता.+

११ तो एका करुबावर स्वार होऊन+ उडत आला.

एका स्वर्गदूताच्या* पंखांवर तो दिसत होता.+

१२ मग त्याने गडगडणाऱ्‍या घनदाट काळ्या ढगांनी,

अंधाराच्या मंडपानी स्वतःला झाकलं.+

१३ त्याच्यापुढे असलेल्या तेजाने निखारे धगधगले.

१४ मग यहोवा आकाशातून गर्जना करू लागला;+

सर्वोच्च देवाचा आवाज ऐकू आला.+

१५ त्याने बाण मारून+ माझ्या शत्रूंची पांगापांग केली;

विजा पाडून त्यांचा गोंधळ उडवला.+

१६ यहोवाच्या धमकावण्याने,

त्याच्या नाकपुड्यांतल्या जोरदार श्‍वासाने,+

समुद्राचा तळ दिसू लागला;+

आणि जमिनीचा पाया उघडा पडला.

१७ तो उंचावरून खाली वाकला;

त्याने मला धरून, खोल पाण्यातून बाहेर काढलं.+

१८ त्याने माझा द्वेष करणाऱ्‍या, माझ्यापेक्षा बलवान असलेल्या,

माझ्या शक्‍तिशाली शत्रूपासून मला सोडवलं.+

१९ माझ्या संकटाच्या दिवशी ते माझ्यावर उठले,+

पण यहोवा माझ्या पाठीशी होता.

२० त्याने मला एका सुरक्षित ठिकाणी* आणलं;+

तो माझ्यावर खूश होता, म्हणून त्याने मला वाचवलं.+

२१ यहोवा माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे;+

माझ्या हातांच्या निर्दोषतेप्रमाणे मला प्रतिफळ देतो.+

२२ कारण मी यहोवाच्या मार्गांवर चालत राहिलो,

आणि देवाला सोडून देण्याचा दुष्टपणा मी केला नाही.

२३ त्याचे सर्व न्याय-निर्णय*+ माझ्यासमोर आहेत;

त्याच्या कायद्यांपासून मी भरकटणार नाही.+

२४ मी त्याच्यासमोर नेहमी निर्दोष राहीन;+

स्वतःला अपराधांपासून दूर ठेवीन.+

२५ यहोवा माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे;+

माझ्या निर्दोषतेप्रमाणे माझी परतफेड करो.+

२६ जो एकनिष्ठ, त्याच्याशी तू एकनिष्ठपणे वागतोस;+

प्रामाणिक माणसाशी तू प्रामाणिकपणे वागतोस;+

२७ जो शुद्ध, त्याच्याशी तू शुद्धतेने वागतोस,+

पण जो कपटी आहे त्याच्याशी तू हुशारीने वागतोस.+

२८ नम्र असलेल्यांना तू वाचवतोस,+

पण गर्विष्ठांचा विरोध करून तू त्यांना खाली पाडतोस.+

२९ हे यहोवा! तू माझा दीप आहेस;+

यहोवाच माझ्या अंधाराला प्रकाशात बदलतो.+

३० तुझ्या मदतीने मी लुटारूंच्या टोळीवर तुटून पडू शकतो;

देवाच्या शक्‍तीने मी तट ओलांडू शकतो.+

३१ खऱ्‍या देवाचा मार्ग परिपूर्ण आहे;+

यहोवाचे शब्द शुद्ध आहेत.+

त्याचा आश्रय घेणाऱ्‍या सर्वांसाठी तो ढालीसारखा आहे.+

३२ कारण यहोवाशिवाय दुसरा कोण देव आहे?+

आमच्या देवासारखा भक्कम खडक कोण आहे?+

३३ खरा देव माझा मजबूत गड आहे,+

तो माझा मार्ग मोकळा* करेल.+

३४ तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे चपळ करतो;

तो मला उंच ठिकाणी उभं करतो.+

३५ तो माझ्या हातांना युद्धकला शिकवतो;

माझे बाहू तांब्याचं धनुष्य वाकवू शकतात.

३६ तू मला तुझी तारणाची ढाल देतोस,

आणि तुझी नम्रता मला महान बनवते.+

३७ माझ्या पावलांसाठी तू मार्ग रुंद करतोस;

माझे पाय घसरणार नाहीत.+

३८ माझ्या शत्रूंचा पाठलाग करून मी त्यांचा नाश करीन;

त्यांचा सर्वनाश केल्याशिवाय मी परत येणार नाही.

३९ त्यांनी पुन्हा डोकं वर काढू नये, म्हणून मी त्यांना चिरडून नाहीसं करीन;+

ते माझ्या पायांजवळ पडतील.

४० तू मला शक्‍ती देऊन युद्धासाठी सज्ज करशील;+

माझ्या वैऱ्‍यांना तू माझ्यासमोर खाली पाडशील.+

४१ तू माझ्या शत्रूंना माझ्यापुढून माघार घ्यायला लावशील;+

माझा द्वेष करणाऱ्‍यांचा मी अंत करीन.+

४२ ते मदतीची याचना करतात, पण त्यांना वाचवायला कोणीही नाही;

ते यहोवालाही हाक मारतात, पण तो त्यांना उत्तर देत नाही.+

४३ मी त्यांना कुटून अगदी जमिनीवरच्या धुळीसारखं करीन;

मी त्यांचा चुराडा करीन आणि रस्त्यावरच्या चिखलासारखं त्यांना तुडवीन.

४४ माझी टीका करणाऱ्‍या माझ्या लोकांपासून तू मला वाचवशील.+

मी राष्ट्रांचा प्रमुख व्हावं म्हणून तू माझं रक्षण करशील;+

मी ज्या लोकांना ओळखत नाही तेही माझी सेवा करतील.+

४५ विदेशी लोक घाबरत घाबरत माझ्यापुढे येतील;+

ते माझ्याबद्दल जे काही ऐकतील, त्यामुळे ते माझ्या आज्ञा पाळतील.*

४६ विदेशी लोकांचं धैर्य खचेल;

ते थरथर कापत आपल्या गडांमधून बाहेर येतील.

४७ यहोवा जिवंत देव आहे! खडकासारख्या माझ्या देवाची स्तुती होवो!+

माझ्या देवाचा, माझ्या तारणाच्या खडकाचा सन्मान होवो!+

४८ खरा देव माझ्या शत्रूंचा बदला घेतो;+

तो राष्ट्रांना माझ्या अधीन करतो.+

४९ तो माझ्या शत्रूंपासून मला सोडवतो.

हे देवा, माझ्यावर हल्ला करणाऱ्‍यांपासून तू मला दूर उंचावर ठेवतोस;+

हिंसा करणाऱ्‍या माणसापासून तू मला वाचवतोस.+

५० म्हणूनच हे यहोवा! मी राष्ट्रांमध्ये तुझी उपकारस्तुती करीन,+

आणि तुझ्या नावाची स्तुतिगीतं गाईन:+

५१ तो मोठमोठी कार्यं करून आपल्या राजाचं तारण करतो;*+

तो आपल्या अभिषिक्‍तावर एकनिष्ठ प्रेम करतो;

दावीदवर आणि त्याच्या संततीवर* तो सदासर्वकाळ एकनिष्ठ प्रेम करतो.”+

२३ दावीदचे शेवटचे शब्द:+

“इशायचा मुलगा+ दावीद याचे हे बोल,

ज्याला गौरवण्यात आलं त्या माणसाचे हे बोल,+

याकोबच्या देवाचा जो अभिषिक्‍त,+

आणि इस्राएलचा जो प्रिय स्तोत्रगायक* त्याचे हे बोल.+

 २ यहोवाची पवित्र शक्‍ती* माझ्याद्वारे बोलली;+

त्याचा शब्द माझ्या जिभेवर होता.+

 ३ इस्राएलचा देव बोलला;

इस्राएलचा खडक+ मला म्हणाला:

‘जेव्हा मानवांवर शासन करणारा नीतिमान असतो,+

देवाचं भय बाळगून तो राज्य करतो,+

 ४ तेव्हा ते शासन सूर्योदयाच्या प्रकाशासारखं,+

आणि सकाळच्या स्वच्छ आकाशासारखं असतं.

ते पाऊस पडल्यानंतरच्या सूर्यप्रकाशासारखं,

जमिनीतून गवत उगवणाऱ्‍या पावसानंतरच्या सूर्यप्रकाशासारखं असतं.’+

 ५ देवासमोर माझं राजघराणंही* असंच नाही का?

कारण त्याने माझ्याशी एक कायमचा करार केला आहे,+

तो करार सर्व बाबतीत व्यवस्थित आणि सुरक्षित आहे.

तो करार माझं संपूर्ण तारण करणारा आणि मला आनंद देणारा आहे,

आणि त्यामुळेच तो माझ्या घराण्याची भरभराट करत नाही का?+

 ६ पण सर्व दुष्ट माणसांना काटेरी झुडपांसारखं फेकून दिलं जातं,+

कारण ती हातांनी उचलता येत नाहीत.

 ७ ती उचलण्यासाठी एखाद्याकडे

लोखंडाचं अवजार आणि भाला असला पाहिजे,

आणि ती आपल्या जागी पूर्णपणे जाळली पाहिजेत.”

८ दावीदच्या शूर योद्ध्यांची+ नावं अशी: पहिला, योशेब-बश्‍शेबेथ तखमोनी.* तो तिघांचा प्रमुख होता.+ एकदा त्याने भाला चालवून ८०० पेक्षा जास्त लोकांना ठार मारलं होतं. ९ दुसरा, एलाजार;+ तो दोदोचा+ मुलगा आणि अहोहीचा नातू होता. एकदा पलिष्टी लोक इस्राएलशी युद्ध करायला जमले, तेव्हा दावीदसोबत असलेल्या तीन शूर योद्ध्यांनी पलिष्ट्यांना आव्हान दिलं; त्या तिघांपैकी एक एलाजार होता. त्या वेळी, इस्राएली लोकांनी पळ काढला. १० पण, एलाजार मात्र तिथेच जागेवर उभा राहिला आणि तलवारीने पलिष्ट्यांना मारत राहिला; तलवार चालवून अगदी हात थकेपर्यंत आणि हाताची मूठ आखडून जाईपर्यंत तो पलिष्ट्यांना मारत राहिला.+ त्या दिवशी यहोवाने इस्राएलला मोठा विजय मिळवून दिला.+ मग मारून टाकलेल्या पलिष्ट्यांच्या सामानाची लुटालूट करायला इस्राएली लोक परत एलाजारकडे आले.

११ तिसरा शूर योद्धा म्हणजे शाम्मा; हा आगे हरारीचा मुलगा होता. पलिष्टी लोक इस्राएलशी युद्ध करायला लेही या ठिकाणी एकत्र जमले; तिथेच मसुरीचं एक शेत होतं. पलिष्ट्यांना पाहून इस्राएली लोकांनी तिथून पळ काढला. १२ पण शाम्मा शेताच्या मधोमध उभा राहून पलिष्ट्यांना मारत राहिला आणि त्याने शेताचं रक्षण केलं. त्या दिवशी, यहोवाने इस्राएलला मोठा विजय मिळवून दिला.+

१३ कापणीच्या काळात, ३० प्रमुखांपैकी तिघं जण अदुल्लामच्या+ गुहेत दावीदकडे गेले. त्या वेळी, पलिष्टी लोकांची एक टोळी रेफाईमच्या खोऱ्‍यात+ छावणी देऊन राहत होती. १४ दावीद तेव्हा एका सुरक्षित ठिकाणी राहत होता;+ आणि पलिष्टी सैनिकांची एक चौकी बेथलेहेममध्ये होती. १५ त्या वेळी, दावीदने आपली उत्कट इच्छा व्यक्‍त करून म्हटलं: “बेथलेहेमच्या दरवाजाजवळ असलेल्या विहिरीतलं पाणी मला प्यायला मिळालं तर किती बरं होईल!” १६ तेव्हा ते तीन शूर योद्धे पलिष्ट्यांच्या छावणीत घुसले, आणि बेथलेहेमच्या दरवाजाजवळ असलेल्या विहिरीतलं पाणी काढून त्यांनी ते दावीदला आणून दिलं. पण दावीदने ते पाणी प्यायला नकार दिला आणि यहोवासमोर त्याने ते जमिनीवर ओतून दिलं.+ १७ तो म्हणाला: “हे यहोवा! असं करायचा मी विचारसुद्धा करू शकत नाही! ज्या माणसांनी आपला जीव धोक्यात घातला त्यांचं रक्‍त मी कसं पिणार?”+ म्हणून तो ते पाणी प्यायला नाही. दावीदच्या तीन शूर योद्ध्यांनी असे महान पराक्रम केले.

१८ सरूवाचा मुलगा+ आणि यवाबचा भाऊ अबीशय+ हा इतर तीन जणांवर प्रमुख होता. त्याने आपला भाला चालवून ३०० पेक्षा जास्त लोकांना ठार मारलं होतं. त्या पहिल्या तीन शूर योद्ध्यांसारखंच याचंही मोठं नाव होतं.+ १९ त्या तिघांपेक्षा हा सगळ्यात जास्त नावाजलेला होता आणि त्यांचा प्रमुख होता. पण तरीसुद्धा तो पहिल्या तिघांच्या बरोबरीला पोहोचला नाही.

२० यहोयादाचा मुलगा बनाया+ हा एक धाडसी पुरुष होता.* कब्सेल+ या ठिकाणी त्याने मोठमोठे पराक्रम केले. त्याने मवाबी अरीएलच्या दोन मुलांना ठार मारलं. तसंच, एकदा बर्फ पडत असताना त्याने कोरड्या हौदात उतरून एका सिंहाला मारून टाकलं.+ २१ त्याने इजिप्तच्या एका धिप्पाड माणसालाही मारून टाकलं. त्या माणसाच्या हातात एक भाला होता. पण बनाया फक्‍त एक काठी घेऊन त्याच्यावर धावून गेला. आणि त्याने त्या माणसाच्या हातून भाला हिसकावून त्याच्याच भाल्याने त्याला ठार मारलं. २२ यहोयादाचा मुलगा बनाया याने असे मोठमोठे पराक्रम केले. आणि त्या तिघा शूर योद्ध्यांसारखंच याचंही मोठं नाव होतं. २३ बनाया हा तीस शूरवीरांपेक्षाही जास्त नावाजलेला होता. पण त्या तिघांच्या बरोबरीला तो पोहोचला नाही. असं असलं, तरी दावीदने त्याला आपल्या अंगरक्षकांवर नेमलं.

२४ यवाबचा भाऊ असाएल+ हा त्या तीस शूरवीरांपैकी एक होता. तसंच, त्या तीस जणांमध्ये हेसुद्धा होते: बेथलेहेममधल्या दोदोचा मुलगा एलहानान,+ २५ शाम्मा हरोदी, अलीका हरोदी, २६ हेलस+ पलती, इक्केश तकोई याचा मुलगा ईरा,+ २७ अबियेजेर+ अनाथोथी,+ मबुन्‍नय हूशाथी, २८ सलमोन अहोही, महरय+ नटोफाथी, २९ बानाह नटोफाथीचा मुलगा हेलेब, बन्यामीनच्या गिबातल्या रीबयचा मुलगा इत्तय, ३० बनाया+ पिराथोनी, गाशच्या+ ओढ्यांजवळचा हिद्दय, ३१ अबी-अलबोन अर्बाथी, अजमावेथ बरहूमी, ३२ अलीहबा शालबोनी, याशेनची मुलं, योनाथान, ३३ शाम्मा हरारी, शारार हरारी याचा मुलगा अहीयाम, ३४ एका माकाथी माणसाचा मुलगा अहसबय याचा मुलगा अलीफलेट, अहिथोफेल+ गिलोनी याचा मुलगा अलीयम, ३५ हेसरो कर्मेली, पारय अरबी, ३६ सोबा इथल्या नाथानचा मुलगा इगाल, बानी गादी, ३७ सेलक अम्मोनी, सरूवाचा मुलगा यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी, ३८ ईरा इथ्री, गारेब इथ्री+ ३९ आणि उरीया+ हित्ती​—अशी एकूण ३७ माणसं.

२४ यहोवाचा क्रोध पुन्हा एकदा इस्राएलवर भडकला.+ कारण, दावीदला कोणी इस्राएलविरुद्ध प्रवृत्त करून असं म्हटलं: “जा आणि इस्राएल व यहूदाच्या माणसांची+ मोजणी कर.”+ २ म्हणून, राजा आपल्यासोबत असलेल्या सेनापतीला, यवाबला+ म्हणाला: “दानपासून बैर-शेबापर्यंत+ इस्राएलच्या सगळ्या वंशांत जा आणि लोकांची नोंदणी कर. म्हणजे त्यांची संख्या किती आहे ते मला कळेल.” ३ पण यवाब राजाला म्हणाला: “माझे प्रभू, माझे राजे, तुमचा देव यहोवा हा लोकांची संख्या १०० पटींनी वाढवो आणि तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहोत. पण माझ्या प्रभूला, राजाला ही गोष्ट का करावीशी वाटते?”

४ पण राजाच्या म्हणण्यापुढे यवाबचं आणि इतर सेनापतींचं काहीही चाललं नाही. म्हणून मग ते इस्राएलच्या लोकांची नोंदणी करायला राजापुढून निघून गेले.+ ५ त्यांनी यार्देन नदी पार करून अरोएर+ शहरात तळ दिला; त्यांनी शहराच्या उजवीकडे* खोऱ्‍याच्या मधोमध तळ दिला. तिथून ते गाद वंशाच्या प्रदेशाकडे आणि पुढे याजेर+ शहराकडे गेले. ६ त्यानंतर ते गिलाद+ आणि तहतीम-होदशी या प्रदेशांत गेले. पुढे ते दान-यान इथे गेले आणि तिथून वळसा घालून सीदोनला+ गेले. ७ मग ते सोरच्या+ किल्ल्यात आणि हिव्वी+ व कनानी लोकांच्या सगळ्या शहरांत गेले. आणि शेवटी ते यहूदाच्या नेगेबकडे+ असलेल्या बैर-शेबात+ गेले. ८ अशा प्रकारे ते संपूर्ण देशातून फिरले आणि नऊ महिने व २० दिवसांनंतर यरुशलेमला परत आले. ९ मग यवाबने नोंदणी केलेल्या लोकांची संख्या राजाला सांगितली. तलवार चालवणाऱ्‍या इस्राएलमधल्या योद्ध्यांची संख्या ८,००,००० आणि यहूदामधल्या माणसांची संख्या ५,००,००० इतकी होती.+

१० पण लोकांची संख्या मोजल्यानंतर दावीदचं मन त्याला खाऊ लागलं.*+ म्हणून तो यहोवाला म्हणाला: “हे यहोवा! मी हे काम करून खूप मोठं पाप केलंय.+ कृपा करून आपल्या या सेवकाचा अपराध माफ कर;+ मी खरंच, खूप मूर्खपणे वागलोय.”+ ११ दावीद सकाळी उठला तेव्हा यहोवा गाद+ संदेष्ट्याला, म्हणजे दावीदच्या दृष्टान्त पाहणाऱ्‍याला म्हणाला: १२ “दावीदकडे जा आणि त्याला म्हण, ‘यहोवा असं म्हणतो: “मी तुझ्यासमोर तीन पर्याय ठेवतो. त्यातला एक निवड, म्हणजे त्याप्रमाणे मी तुझ्या बाबतीत करीन.”’”+ १३ म्हणून गाद संदेष्टा दावीदकडे गेला आणि त्याला म्हणाला: “तुझ्या देशावर सात वर्षं दुष्काळ पडावा?+ की तुझ्या शत्रूंनी तुझा पाठलाग करावा आणि तू तीन महिने त्यांच्यापासून पळ काढावा?+ की तुझ्या देशात तीन दिवस रोगाची साथ पसरावी?+ आता काळजीपूर्वक विचार कर आणि ज्याने मला पाठवलंय त्याला मी काय उत्तर देऊ ते सांग.” १४ तेव्हा दावीद गाद संदेष्ट्याला म्हणाला: “मी मोठ्या संकटात सापडलोय. यहोवा अतिशय दयाळू आहे,+ म्हणून आपण त्याच्या हातात पडलेलं बरं.+ पण मला माणसाच्या हाती पडू देऊ नको.”+

१५ मग यहोवाने सकाळपासून ते ठरवलेल्या वेळेपर्यंत इस्राएलवर रोगाची साथ पाठवली.+ तेव्हा दानपासून बैर-शेबापर्यंत+ ७०,००० लोक मृत्युमुखी पडले.+ १६ स्वर्गदूताने जेव्हा यरुशलेमचा नाश करण्यासाठी आपला हात पुढे केला, तेव्हा आपण आणलेल्या संकटाबद्दल यहोवाला फार वाईट वाटलं.*+ आणि लोकांचा नाश करणाऱ्‍या त्या स्वर्गदूताला तो म्हणाला: “आता पुरे! आपला हात आवर.” त्या वेळी यहोवाचा स्वर्गदूत अरवना+ यबूसी+ याच्या खळ्याजवळ* होता.

१७ दावीदने जेव्हा लोकांचा नाश करणाऱ्‍या त्या स्वर्गदूताला पाहिलं, तेव्हा तो यहोवाला म्हणाला: “पाप मी केलंय, चूक तर माझी आहे; पण ही मेंढरं+​—यांनी काय केलंय? कृपा करून, तुझा हात माझ्यावर आणि माझ्या वडिलांच्या घराण्यावर पडू दे.”+

१८ म्हणून, गाद संदेष्टा त्या दिवशी दावीदकडे येऊन म्हणाला: “जा, वरती जाऊन अरवना यबूसी याच्या खळ्यावर यहोवासाठी एक वेदी बांध.”+ १९ म्हणून, गाद संदेष्ट्याद्वारे यहोवाने सांगितलं होतं त्याप्रमाणे दावीद वरती खळ्याकडे गेला. २० अरवनाने जेव्हा खाली नजर टाकली, तेव्हा राजा आणि त्याचे सेवक आपल्याकडे येताना त्याला दिसले. म्हणून तो लगेच बाहेर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत डोकं टेकवून राजाला दंडवत घातला. २१ अरवनाने विचारलं: “माझ्या प्रभूचं, माझ्या राजाचं आपल्या या सेवकाकडे कसं काय येणं झालं?” त्यावर दावीद म्हणाला: “मी तुझ्याकडून हे खळं विकत घ्यायला आलोय. लोकांवर ओढवलेलं संकट थांबावं म्हणून इथे मला यहोवासाठी एक वेदी बांधायची आहे.”+ २२ तेव्हा अरवना दावीदला म्हणाला: “माझ्या प्रभूने, राजाने ते असंच घ्यावं आणि हवं ते* अर्पण करावं. पाहा, होमार्पणासाठी इथे गुरं आहेत. शिवाय, जाळण्यासाठी मळणीच्या फळ्या आणि जूसुद्धा* आहे. २३ हे राजा, मी* हे सगळं काही तुम्हाला देतो.” अरवना पुढे राजाला म्हणाला: “तुमचा देव यहोवा तुमच्यावर कृपा करो.”

२४ पण राजा अरवनाला म्हणाला: “नाही, मी हे असंच घेणार नाही. मी ते तुझ्याकडून विकत घेईन. ज्या होमार्पणांसाठी मला कोणतीही किंमत चुकवावी लागणार नाही, अशी होमार्पणं मी माझा देव यहोवा याला कधीच देणार नाही.” म्हणून मग दावीदने ५० शेकेल* चांदी देऊन ते खळं आणि बैल विकत घेतले.+ २५ मग दावीदने तिथे यहोवासाठी एक वेदी बांधली+ आणि त्यावर होमार्पणं आणि शांती-अर्पणं वाहिली. त्यानंतर देशासाठी केलेली विनवणी यहोवाने ऐकली+ आणि इस्राएलमधली रोगाची साथ थांबली.

किंवा “लोकांची कत्तल करून.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “तुझ्या रक्‍ताचा दोष तुझ्याच डोक्यावर आहे.”

शब्दार्थसूचीत “सुंता” पाहा.

किंवा “मनोहर.”

किंवा “स्पर्धा.”

म्हणजे, “गारगोटीच्या दगडांच्या सुऱ्‍यांचं मैदान.”

किंवा कदाचित, “सगळ्या बिथरोन प्रदेशातून.”

शब्दशः “कुत्र्याचं डोकं.”

किंवा “एकनिष्ठ प्रेम दाखवलं.”

शब्दशः “रक्‍ताचा.”

हे कदाचित, बायकांची कामं करावी लागणाऱ्‍या अपंग माणसाला सूचित करतं.

शब्दशः “अनीतीच्या मुलांना.”

किंवा “सांत्वनाची (शोकाची) भाकर खाण्याचा.”

शब्दशः “शौलच्या मुलाला.”

शब्दशः “त्याचे हात गळाले.”

किंवा कदाचित, “असं नाव त्याने दिलं.”

किंवा “मिल्लोवर.” या हिब्रू शब्दाचा अर्थ “भर घालणं” असा होतो.

किंवा “घर.”

म्हणजे “तुटून पडण्यात तरबेज असलेला.”

किंवा कदाचित, “करुबांच्या मधे.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “दावीद नाराज झाला.”

म्हणजे “उज्जावर क्रोध भडकला.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “कंबरेला बांधलं होतं.”

मधोमध मोठं छिद्र असलेली भाकर.

किंवा “घरात.”

किंवा “मिसरमधून.”

किंवा “घर बांधेल.”

शब्दशः “पूर्वजांकडे जाऊन निजशील.”

शब्दशः “बीज.”

शब्दशः “मी मनुष्यांच्या काठीने त्याचं ताडन करीन.”

किंवा कदाचित, “आदामची मुलं.”

किंवा “सूचना.”

किंवा “घर बांधीन.”

किंवा “नजराणा.”

किंवा “धोंडशिरा.”

किंवा “नजराणा.”

शब्दशः “याजक बनली.”

किंवा “एकनिष्ठ प्रेम.”

किंवा “एकनिष्ठ प्रेम.”

किंवा “एकनिष्ठ प्रेम.”

किंवा कदाचित, “माझ्यासोबत.”

किंवा “एकनिष्ठ प्रेम.”

किंवा “एकनिष्ठ प्रेम केलं होतं.”

किंवा “तोबच्या माणसांमधून.”

किंवा “तोब.”

म्हणजे, फरात नदी.

म्हणजे, वसंत ऋतूत.

किंवा “एकदा दुपार सरत आली त्या वेळी.”

कदाचित मासिक पाळीची अशुद्धता.

किंवा “राजाचा वाटा,” म्हणजे, खास पाहुण्यासाठी यजमानाने पाठवलेला वाटा.

यरुब्बाल किंवा गिदोन असंही म्हटलं आहे (शास ६:३२).

शब्दशः “त्याचा शब्द.”

किंवा “तुझ्या साथीदाराला.”

शब्दशः “घरात.”

“शांती,” या अर्थाच्या हिब्रू शब्दावरून.

म्हणजे, “याहला प्रिय.”

किंवा “राजनगर.”

कदाचित शहराला पाणीपुरवठा करणारे स्रोत.

शब्दशः “ते माझ्या नावाने ओळखलं जायचं.”

अम्मोनी लोकांचं एक दैवत. इतर ठिकाणी त्याला मोलख किंवा मिलकोम असं म्हटलं आहे.

एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

शब्दशः “हृदयाच्या आकाराच्या भाकरी.”

किंवा “आजाऱ्‍यांसाठी असलेलं जेवण.”

शब्दशः “हृदयाच्या आकाराच्या भाकरी.”

किंवा “भरजरी.”

म्हणजे, वंशाचा दिवा.

हे दगडाचं वजन असून ते कदाचित राजमहालात ठेवलेलं प्रमाण वजन असावं; किंवा कदाचित हे एक “शाही” शेकेल असून सर्वसामान्य शेकेलपेक्षा वेगळं असावं.

शब्दशः “२०० शेकेल;” अति. ख१४ पाहा.

किंवा कदाचित, “४० वर्षांनी.”

किंवा “उपासना करीन.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “विश्‍वासातला माणूस.”

खासकरून अंजीर आणि कदाचित खजूरसुद्धा.

किंवा “नातू.”

किंवा “विश्‍वासातला माणूस.”

किंवा “असा होता जसं काय कोणी खऱ्‍या देवाकडे मार्गदर्शन मागत आहे.”

किंवा “खळग्यात; डोंगर कपारीत.”

किंवा “करण्याची आज्ञा दिली होती.”

किंवा कदाचित, “सपाट प्रदेशात.”

किंवा “गळा आवळून.”

किंवा कदाचित, “भाले; बरच्या.”

शब्दशः “हृदयात.”

हे कूशी माणसाला सूचित करतं.

किंवा कदाचित, “ते.”

किंवा कदाचित, “इथून.”

किंवा “यहूदाच्या माणसांचे शब्द इस्राएलच्या माणसांच्या शब्दांपेक्षा कठोर होते.”

किंवा कदाचित, “तंबूंकडे.”

किंवा “घरात.”

शब्दशः “याजक बनला.”

किंवा कदाचित, “मेरब.”

किंवा कदाचित, “जमीनदारांकडून.”

जवळजवळ ३.४२ किलो. अति. ख१४ पाहा.

शब्दशः “माझ्या तारणाचं शिंग आहे.” शब्दार्थसूचीत “शिंग” पाहा.

किंवा “उंच ठिकाण.”

हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

किंवा “वाऱ्‍याच्या.”

किंवा “मोकळ्या जागी.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “परिपूर्ण.”

शब्दशः “माझ्याबद्दल ऐकताच ते माझी आज्ञा पाळतील.”

किंवा “राजाला मोठमोठे विजय मिळवून देतो.”

शब्दशः “बीज.”

किंवा “जो प्रिय.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “घराणंही.”

हखमोनचा वंशज.

शब्दशः “एका धाडसी माणसाचा मुलगा होता.”

किंवा “दक्षिणेकडे.”

किंवा “दावीदचा विवेक त्याला बोचू लागला.”

किंवा “पस्तावा झाला.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “त्यांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते.”

शब्दार्थसूचीत “जू” पाहा.

शब्दशः “अरवना.”

एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा