यहोशवा
१ यहोवाचा* सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर मोशेचा सहायक,+ म्हणजे नूनचा मुलगा यहोशवा*+ याला यहोवा म्हणाला: २ “माझा सेवक मोशे याचा मृत्यू झालाय.+ त्यामुळे आता तू या सर्व इस्राएली लोकांना घेऊन यार्देन नदी पार करायची आणि जो देश मी त्यांना देणार आहे+ तिथे जायची तयारी कर. ३ मी मोशेला वचन दिलं होतं त्याप्रमाणे जिथे-जिथे तुमचं पाऊल पडेल ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला देईन.+ ४ तुमच्या देशाच्या सीमा, ओसाड रानापासून लबानोन आणि महान फरात नदीपर्यंत (जो हित्ती लोकांचा संपूर्ण प्रदेश+ आहे); तसंच, पश्चिमेकडच्या महासागरापर्यंत* पसरतील.+ ५ तू जिवंत आहेस तोपर्यंत कोणीही तुला हरवू शकणार नाही.+ मी जसा मोशेसोबत होतो, तसाच तुझ्यासोबतही राहीन.+ मी तुला कधीही सोडणार नाही किंवा टाकून देणार नाही.+ ६ हिंमत धर, खंबीर हो.+ कारण जो देश मी या लोकांच्या वाडवडिलांना देण्याचं वचन दिलं होतं,+ तो देश या लोकांना तूच मिळवून देशील.
७ हिंमत धर, खंबीर हो. आणि माझा सेवक मोशे याने जे नियमशास्त्र पाळण्याची आज्ञा दिली होती, त्यातल्या सगळ्या आज्ञांचं तू काळजीपूर्वक पालन कर. त्यांच्यापासून भरकटू नकोस,+ म्हणजे तू नेहमी सुज्ञपणे वागशील.+ ८ हे नियमशास्त्र नेहमी तुझ्या ओठांवर असू दे.+ त्यातल्या सर्व आज्ञांचं काळजीपूर्वक पालन करण्यासाठी त्यावर रात्रंदिवस मनन कर.*+ असं केलंस तर तू यशस्वी होशील आणि सुज्ञपणे वागशील.+ ९ मी पुन्हा एकदा तुला सांगतो, हिंमत धर आणि खंबीर हो. घाबरू नकोस, भिऊ नकोस. तू जिथे कुठे जाशील तिथे मी तुझा देव यहोवा तुझ्यासोबत असेन.”+
१० मग यहोशवाने लोकांच्या अधिकाऱ्यांना आज्ञा दिली: ११ “छावणीत जा आणि सगळ्या लोकांना सांगा: ‘खाण्या-पिण्याच्या वस्तू बांधून घ्या. कारण तुमचा देव यहोवा जो देश तुम्हाला देणार आहे, तो ताब्यात घेण्यासाठी तीन दिवसांच्या आत तुम्ही यार्देन पार करणार आहात.’”+
१२ आणि रऊबेन व गादच्या वंशांना, तसंच मनश्शेच्या अर्ध्या वंशाला यहोशवा म्हणाला: १३ “यहोवाचा सेवक मोशे याने तुम्हाला जे सांगितलं होतं त्याची आठवण करा:+ ‘तुमचा देव यहोवा तुम्हाला शांती देतोय. त्याने हा देश तुम्हाला दिलाय. १४ यार्देनच्या या बाजूला* जो देश मोशेने तुम्हाला दिलाय तिथे तुमच्या बायका, तुमची मुलंबाळं आणि तुमची गुरंढोरं राहतील.+ पण तुम्ही सर्व शूर योद्ध्यांनी+ मात्र यार्देन पार करून सैन्यदलाप्रमाणे आपल्या बांधवांच्या पुढे जावं+ आणि त्यांना मदत करावी. १५ यहोवाने जशी तुम्हाला शांती दिली तशी तो तुमच्या बांधवांनाही देईपर्यंत, आणि जो देश तुमचा देव यहोवा त्यांना देत आहे तो ते ताब्यात घेईपर्यंत त्यांना मदत करा. मग यहोवाचा सेवक मोशे याने तुम्हाला यार्देनच्या पूर्वेकडे जो देश राहायला दिलाय तिथे परत या.’”+
१६ तेव्हा ते यहोशवाला म्हणाले: “तू जे काही सांगितलंस, ते सर्व आम्ही करू. आणि तू आम्हाला जिथे कुठे पाठवशील तिथे आम्ही जाऊ.+ १७ मोशेने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकल्या, तसंच तुझंही ऐकू. तुझा देव यहोवा जसा मोशेसोबत होता, तसाच तो तुझ्यासोबतही असो.+ १८ जो कोणी तुझ्या आदेशाच्या विरोधात जाईल आणि तुझ्या आज्ञा पाळणार नाही त्याला मारून टाकलं जाईल.+ पण तू मात्र हिंमत धर आणि खंबीर हो.”+