इब्री लोकांना पत्र
१ प्राचीन काळात देव आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे बऱ्याच वेळा, वेगवेगळ्या मार्गांनी बोलला.+ २ पण, आता या काळाच्या शेवटी तो आपल्याशी त्याच्या मुलाद्वारे बोलला आहे.+ त्या मुलाला त्याने सर्व गोष्टींचा वारस ठरवलं आहे+ आणि त्याच्याचद्वारे त्याने जगाच्या व्यवस्था* अस्तित्वात आणल्या.+ ३ तो देवाच्या गौरवाचं प्रतिबिंब+ आणि त्याच्या स्वभावाचं हुबेहूब प्रतिरूप आहे.+ तो त्याच्या सामर्थ्याच्या वचनाने सगळ्या गोष्टी टिकवून ठेवतो. आपल्याला आपल्या पापांपासून शुद्ध केल्यावर,+ तो स्वर्गात सर्वोच्च देवाच्या उजव्या हाताला जाऊन बसला.+ ४ अशा रितीने, तो स्वर्गदूतांपेक्षा श्रेष्ठ बनला आहे,+ कारण त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं असं नाव त्याला मिळालं आहे.+
५ उदाहरणार्थ, कोणत्याही स्वर्गदूताबद्दल देवाने कधीतरी असं म्हटलं होतं का, “तू माझा मुलगा आहेस; आज मी तुझा पिता बनलोय”?+ तसंच, “मी त्याचा पिता होईन आणि तो माझा मुलगा बनेल”?+ ६ पण, जेव्हा तो आपल्या ज्येष्ठ मुलाला+ पुन्हा जगात आणतो, तेव्हा तो म्हणतो: “सर्व स्वर्गदूतांनी त्याला नमन करावं.”
७ तसंच, स्वर्गदूतांबद्दल त्याने असं म्हटलं: “तो आपल्या स्वर्गदूतांना खूप शक्तिशाली* बनवतो आणि त्याच्या सेवकांना*+ अग्नीची ज्वाला बनवतो.”+ ८ पण मुलाबद्दल तो असं म्हणतो: “देव तुला सदासर्वकाळासाठी राज्याधिकार देतो*+ आणि तुझा राजदंड हा न्यायाचा* राजदंड आहे. ९ तू नीतीवर प्रेम केलंस आणि अनीतीचा द्वेष केला. म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझा तेलाने अभिषेक केला+ आणि तुझ्या इतर सोबत्यांपेक्षा तुला जास्त आनंदी केलं.”+ १० आणि, “हे प्रभू, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास, तू आपल्या हाताने आकाश बनवलंस. ११ ते नाहीसे होतील, पण तू सदासर्वकाळ राहशील; आणि एखाद्या वस्त्राप्रमाणे ते जुने होतील. १२ एखाद्या झग्याप्रमाणे, एखाद्या कापडाप्रमाणे तू त्यांना गुंडाळशील आणि ते बदलून जातील. पण तू बदलत नाहीस आणि तुझ्या आयुष्याची वर्षं कधीच संपणार नाहीत.”+
१३ पण कोणत्याही स्वर्गदूताबद्दल त्याने कधीतरी असं म्हटलं का, “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखालचं आसन करेपर्यंत माझ्या उजव्या हाताला बस”?+ १४ ते सर्व पवित्र सेवेसाठी,* म्हणजे ज्यांना तारणाचा वारसा मिळणार आहे, त्यांच्या सेवेसाठी पाठवण्यात आलेले स्वर्गदूत* नाहीत का?+